॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ सुन्दरकाण्ड ॥ ॥ प्रथमः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] हनुमानाचे समुद्र-उल्लंघन आणि त्याचा लंकेत प्रवेश श्रीमहादेव उवाच शतयोजनविस्तीर्णं समुद्रं मकरालयम् । लिलङ्घयिषुरानन्द सन्दोहो मारुतात्मजः ॥ १ ॥ श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, आनंदाचा डोह असणाऱ्या हनुमानाने शंभर योजने विस्तृत असणाऱ्या आणि मगरींचे वसतिस्थान असणारा समुद्र उल्लंघून जाण्याची तयारी केली. (१) ध्यात्वा रामं परात्मानमिदं वचनमब्रवीत् । पश्यन्तु वानराः सर्वे गच्छन्तं मां विहायसा ॥ २ ॥ अमोघं रामनिर्मुक्तं महाबाणमिवाखिलाः । पश्याम्यद्यैव रामस्य पत्नीं जनकनन्दिनीम् ॥ ३ ॥ नंतर परमात्मा श्रीरामांचे स्मरण करून हनुमान म्हणाला, "अरे वानरांनो, श्रीरामांनी सोडलेल्या अमोघ व प्रचंड बाणाप्रमाणे आकाशमार्गाने जाणाऱ्या मला तुम्ही आता सर्वजण बघा. मी आजच जनकाची कन्या असणाऱ्या श्रीरामांच्या पत्नीला भेटेन. (२-३) कृतार्थोहं कृतार्थोहं पुनः पश्यामि राघवम् । प्राणप्रयाणसमये यस्य नाम सकृत्स्मरन् ॥ ४ ॥ नरस्तीर्त्वा भवाम्भोधिमपारं याति तत्पदम् । किं पुनस्तस्य दूतोऽहं तदङ्गाङ्गुलिमुद्रिक ॥ ५ ॥ तमेव हृदये ध्यात्वा लङ्घयाम्यल्पवारिधिम् । इत्युक्त्वा हनुमान्बाहू प्रसार्यायतवालधिः ॥ ६ ॥ ऋजुग्रीवोर्ध्वदृष्टिः सन्नाकुञ्चितपदद्वयः । दक्षिणाभिमुखस्तूर्णं पुप्लुवेऽनिलविक्रमः ॥ ७ ॥ अशा रीतीने कृतार्थ व कृतकृत्य होऊन मी पुनः श्रीराघवांचे दर्शन घेईन. प्राणप्रयाणाच्या वेळी ज्यांचे नाव एकदाच स्मरण करणारा माणूस हा अपार भवसागर तरून, श्रीरामांचे श्रेष्ठस्थानी जातो, अशा त्या श्रीरामांचा मी दूत आहे. त्यांच्या बोटातील मुद्रिका माझ्याजवळ आहे. श्रीरामांचेच ध्यान माझ्या हृदयात करीत मी हा तुच्छ समुद्र ओलांडून जाईन. त्यात काय मोठे ?" असे बोलून हनुमानाने आपले बाहू पसरले, शेपटी सरळ लांब केली, मान सरळ केली, दृष्टी वर केली आणि दोन्ही पाय जवळ घेतले, दक्षिणेकडे तोंड केले आणि वायूप्रमाणे पराक्रमी असणाऱ्या हनुमानाने लगेच उड्डाण केले. (४-७) आकाशात्त्वरितं देवैर्वीक्ष्यमाणो जगाम सः । दृष्ट्वानिलसुतं देवा गच्छन्तं वायुवेगतः ॥ ८ ॥ परीक्षणार्थं सत्त्वस्य वानरस्येदमब्रुवन् । गच्छत्येष महासत्त्वो वानरो वायुविक्रमः ॥ ९ ॥ देवगण पाहात असताना तो हनुमान आकाशातून त्वरेने जात होता. त्या वेळी वायुवेगाने जाणाऱ्या पवनसुत हनुमानाला पाहून, त्याच्या सामर्थ्याची परीक्षा पाहण्यास देव आपापसात म्हणू लागले- "वायूसारखा पराक्रमी आणि महासामर्थ्यसंपन्न, असा हा वानर जात आहे. (८-९) लङ्कां प्रवेष्टुं शक्तो वा न वा जानीमहे बलम् । एवं विचार्य नागानां मातरं सुरसाभिधाम् ॥ १० ॥ अब्रवीद्देवतावृन्दः कौतूहलसमन्वितः । गच्छ त्वं वानरेन्द्रस्य किञ्चिद्विघ्नं समाचर ॥ ११ ॥ ज्ञात्वा तस्य बलं बुद्धिं पुनरेहि त्वरान्विता । इत्युक्ता सा ययौ शिघ्रं हनुमद्विघ्नकारणात् ॥ १२ ॥ परंतु तो लंकेत प्रवेश करण्यास समर्थ होईल की नाही हे कळत नाही. म्हणून याच्या सामर्थ्याची परीक्षा घ्यावयास हवी." अशा कुतूहलाने देवतांचा समूह सुरसा नावाच्या नागांच्या मातेला म्हणाला, 'सुरसे, तू आता जा आणि त्या श्रेष्ठ वानराच्या मार्गात काही तरी विघ्न आण. त्याचे बळ आणि बुद्धी हे जाणून घेऊन तू त्वरेने परत ये.' देवांनी असे सांगितल्यावर, हनुमानाच्या मार्गात विघ्न आणण्यासाठी सुरसा त्वरित निघाली. (१०-१२) आवृत्य मार्गं पुरतः स्थित्वा वानरमब्रवीत् । एहि मे वदनं शीघ्रं प्रविशस्व महामते ॥ १३ ॥ देवैस्त्वं कल्पितो भक्ष्यः क्षुधासम्पीडितात्मनः । तामाह हनुमान्मातरहं रामस्य शासनात् ॥ १४ ॥ गच्छामि जानकीं द्रष्टुं पुनरागम्य सत्वरः । रामाय कुशलं तस्याः कथयित्वा त्वदाननम् ॥ १५ ॥ निवेक्ष्ये देहि मे मार्गं सुरसायै नमोऽस्तु ते । इत्युक्त्वा पुनरेवाह सुरसा क्षुधितास्म्यहम् ॥ १६ ॥ प्रविश्य गच्छ मे वक्त्रं नो चेत्त्वां भक्षयाम्यहम् । इत्युक्तो हनुमानाह मुखं शीघ्रम् विदारय ॥ १७ ॥ प्रविश्य वदनं तेऽद्य गच्छामि त्वरयान्वितः । इत्युक्त्वा योजनायामदेहो भूत्वा पुरः स्थितः ॥ १८ ॥ हनुमानाचा मार्ग अडवून आणि त्याच्यापुढे उभी राहून ती म्हणाली, "हे महाबुद्धिमान वानरा, ये आणि माझ्या तोंडात शीघ्र प्रवेश कर. भुकेने माझा जीव अगदी व्याकूळ झाला आहे. म्हणून देवांनीच तुला माझे भक्ष्य म्हणून तुझी योजना केली असावी." तेव्हा हनुमान तिला म्हणाला, "हे माते, मी श्रीरामांच्या आज्ञेने जानकीला भेटण्यासाठी जात आहे. भेटून सत्वर परत येतो, तिचे कुशल श्रीरामांना सांगून, मग मी तुझ्या तोंडात प्रवेश करतो. माझा रस्ता सोड. हे सुरसे, तुला माझा नमरकार असो." हनुमान असे बोलल्यावर सुरसा त्याला पुनः म्हणाली, "मी अतिशय भुकेली आहे. तेव्हा तू सत्वर माझ्या तोंडात प्रवेश कर आणि मग जा. तू असे केले नाहीस तर मी तुला खाऊन टाकीन." तिने असे म्हटल्यावर हनुमान तिला म्हणाला, "तू पटकन तोंड उघड. आत्ताच तुझ्या तोंडात प्रवेश करून मी त्वरेने पुढे जातो." असे म्हणून आपला देह एक योजन लांब रुंद करून हनुमान तिच्या पुढे उभा राहिला. (१३-१८) दृष्ट्वा हनूमतो रूपं सुरसा पञ्चयोजनम् । मुखं चकार हनुमान् द्विगुणं रूपमादधत् ॥ १९ ॥ हनुमानाचे ते रूप पाहून सुरसेने आपले मुख पाच योजने विस्तृत केले. तेव्हा हनुमानाने आपले रूप त्याच्या दुप्पट केले. (१९) ततश्चकार सुरसा पञ्च योजनानां च विंशतिम् । वक्त्रं चकार हनुमांस्त्रिंशद्योजनसम्मितम् ॥ २० ॥ त्यानंतर सुरसेने आपले तोंड वीस योजने लांब रुंद केले. तेव्हा हनुमानाने आपले शरीर तीस योजने लांब रुंद केले. (२०) ततश्चकार सुरसा पञ्चाशद्योजनायतम् । वक्त्रं तदा हनूमांस्तु बभूवाङ्गुष्ठसन्निभः ॥ २१ ॥ मग सुरसेने आपले मुख पन्नास योजने विस्तृत केले. तेव्हा हनुमान पटकन अंगठ्या एवढ्या आकाराचा झाला. (२१) प्रविश्य वदनं तस्याः पुनरेत्य पुरः स्थितः । प्रविष्टो निर्गतोऽहं ते वदनं देवि ते नमः ॥ २२ ॥ नंतर तिच्या मुखात प्रवेश करून, तिने तोंड बंद करण्यापूर्वी चट्दिशी पुनः बाहेर येऊन हनुमान तिच्यापुढे उभा राहिला आणि म्हणाला, "हे देवी, तुझ्या तोंडात प्रवेश करून मी पुनः बाहेर आलो आहे. आता तुला नमस्कार असो." (२२) एवं वदन्तं दृष्ट्वा सा हनूमन्तमथाब्रवीत् । गच्छ साधय रामस्य कार्यं बुद्धिमतां वर ॥ २३ ॥ अशा प्रकारे त्याचे बोलणे ऐकून सुरसा हनुमंताला म्हणाली, "हे बुद्धिमंतामध्ये श्रेष्ठा, तू आता जा आणि श्रीरामांचे कार्य सिद्ध करून घे. (२३) देवैः सम्प्रेषिताहं ते बलं जिज्ञासुभिः कपे । दृष्ट्वा सीतां पुनर्गत्वा रामं द्रक्ष्यामि गच्छ भोः ॥ २४ ॥ हे वानरा, तुझे बळ जाणून घेण्यासाठी देवांनी मला पाठविले होते. सीतेला भेटून आणि पुनः परत येऊन तू श्रीरामांना भेटशील. तू जा आता." (२४) इत्युक्त्वा सा ययौ देवलोकं वायुसुतः पुनः । जगाम वायुमार्गेण गरुत्मानिव पक्षिराट् ॥ २५ ॥ असे सांगून ती देवलोकाला निघून गेली. त्यानंतर पुनः वायुसुत हनुमान पक्षिराज गरुडाप्रमाणे वायुमार्गाने पुढे गेला. (२५) समुद्रोऽप्याह मैनाकं मणिकाञ्चनपर्वतम् । गच्छत्येष महासत्त्वो हनूमान्मारुतात्मजः ॥ २६ ॥ रामस्य कार्यसिद्ध्यर्थं तस्य त्वं सचिवो भव । सगरैर्वर्द्धितो यस्मात्पुराहं सागरोऽभवम् ॥ २७ ॥ त्यावेळी रत्ने आणि कांचन यांनी युक्त मैनाक पर्वताला समुद्र म्हणाला, "बघ, श्रीरामांचे कार्य सिद्ध करण्यासाठी हा महाशक्तिशाली मारुत-पुत्र हनुमान जात आहे. तू त्याचा सहायक हो. पूर्वीच्या काळी सगर नावाच्या राजाच्या पुत्रांनी मला वाढविले; म्हणून मला सागर म्हणतात. (२६-२७) तस्यान्वये बभूवासौ रामो दाशरथिः प्रभुः । तस्य कार्यार्थसिद्ध्यर्थं गच्छत्येष महाकपिः ॥ २८ ॥ त्या सगराच्या वंशातच दशरथ-तनय, प्रभू श्रीराम जन्माला आले आहेत. आणि हा महान वानर त्यांच्या कार्याची सिद्धी करण्यासाठी जात आहे. (२८) त्वमुत्तिष्ठ जलात्तूर्णं त्वयि विश्रम्य गच्छतु । स तथेति प्रादुरभूज्जलमध्यान्महोन्नतः ॥ २९ ॥ नाना मणिमयैः शृङ्गैस्तस्योपरि नरकृतिः । प्राह यान्तं हनूमन्तं मैनाकोऽहं महाकपे ॥ ३० ॥ तेव्हा तू पाण्यातून झटदिशी वर ऊठ. तुझ्या माथ्यावर विश्रांती घेऊन या वानराला जाऊ दे." 'ठीक आहे', असे म्हणून, नाना रत्नांनी युक्त अशा आपल्या शिखरासह तो पाण्यामधून अतिशय उंच होऊन प्रकट झाला. त्या शिखरावर माणसाचे रूप धारण करून तो जाणाऱ्या हनुमंताला म्हणाला, "हे महावानरा, मी मैनाक पर्वत आहे. (२९-३०) समुद्रेण समादिष्टस्त्वद्विश्रामाय मारुते । आगच्छामृतकल्पानि जग्ध्वा पक्वफलानि मे ॥ ३१ ॥ विश्रमात्र क्षणं पश्चाद्गमिष्यसि यथासुखम् । एवमुक्तोऽथ तं प्राह हनूमान्मारुतात्मजः ॥ ३२ ॥ हे मारुती, तुला विश्रांती द्यावी अशी समुद्राने मला आज्ञा केली आहे. तेव्हां ये, आणि अमृताप्रमाणे असणारी माझ्या शिखरावरील पिकलेली फळे खाऊन, येथेच क्षणभर विश्रांती घेऊन, नंतर तू सुखाने पुढे जा." असे त्याने म्हटल्यावर मारुतपुत्र हनुमान त्याला म्हणाला-(३१-३२) गच्छतो रामकार्यार्थं भक्षणं मे कथं भवेत् । विश्रामो वा कथं मे स्याद्गन्तव्यं त्वरितं मया ॥ ३३ ॥ "श्रीरामांच्या कार्यासाठी मी जात असताना मला खाणे कसे बरे सुचेल ? किंवा मी विश्रांती तरी कशी घेऊ ? कारण मला ताबडतोब जायचे आहे." (३३) इत्युक्त्वा स्पृष्टशिखरः कराग्रेण ययौ कपिः । किञ्चिद्दूरं गतस्यास्य छायां छायाग्रहोऽग्रहीत् ॥ ३४ ॥ असे बोलून आपल्या बोटाने मैनाक पर्वताच्या शिखराला स्पर्श करून मारुती पुढे गेला. तो थोडेसे दूर गेल्यावर छायाग्रहाने त्याच्या छायेला पकडले. (३४) सिंहिका नाम सा घोरा जलमध्ये स्थिता सदा । आकाशगामिनां छायामाक्रम्याकृष्य भक्षयेत् ॥ ३५ ॥ तो छायाग्रह म्हणजे सिंहिका नावाची एक भयंकर राक्षसी होती. ती नेहमी पाण्यामध्ये राहात असे. आकाशातून जाणाऱ्या प्राण्यांची छाया पकडून ती त्यांना खेचून घेई आणि त्यांना खाऊन टाकी. (३५) तया गृहितो हनूमांश्चिन्तयामास वीर्यवान् । केनेदं मे कृतं वेगरोधनं विघ्नकारिणा ॥ ३६ ॥ तिने पकडल्यावर सामर्थ्यसंपन्न हनुमानाने विचार केला की, "माझ्या मार्गात विघ्न निर्माण करणाऱ्या कुणी बरे माझ्या वेगाला रोखून धरले आहे ? (३६) दृश्यते नैव कोऽप्यत्र विस्मयो मे प्रजायते । एवं विचिन्त्य हनूमानधो दृष्टिं प्रसारयत् ॥ ३७ ॥ येथे तर कुणीही दिसत नाही. त्यामुळे मला फार आश्चर्य वाटत आहे." असा विचार करून हनुमंताने आपली दृष्टी खालच्या बाजूला टाकली. (३७) तत्र दृष्ट्वा महाकायां सिंहिकां घोररूपिणीम् । पपात सलिले तूर्णं पद्भ्यामेवाहनद्रुषा ॥ ३८ ॥ तेव्हा तेथे त्याला धिप्पाड शरीराची आणि भयंकर रूप असणारी सिंहिका दिसली. लगेच त्याने पाण्यात उडी मारली आणि रागाने तिला दोन्ही पायांनी लाथा घालून ठार केले. (३८) पुनरुत्प्लुत्य हनूमान्दक्षिणाभिमुखो ययौ । ततो दक्षिणमासाद्य कूलं नानाफलद्रुमम् ॥ ३९ ॥ नानापक्षिमृगाकीर्णं नानापुष्पलतावृतम् । ततो ददर्श नगरं त्रिकुटचलमूर्धनि ॥ ४० ॥ नंतर पुनः वर आकाशात उड्डाण करून हनुमान दक्षिणेकडे तोंड करून निघाला आणि तो समुद्राच्या दक्षिण तीरावर पोचला. त्या तीरावर फळांनी भरलेले नाना प्रकारचे वृक्ष होते. नानाप्रकारचे पशू व पक्षी यांनी ते तीर भरलेले होते. तसेच ते विविध प्रकारच्या पुष्पलतांनी युक्त होते. त्यानंतर त्रिकूट पर्वताच्या माथ्यावर त्याला एक नगर दिसले. (३९-४०) प्राकारैर्बहुभिर्युक्तं परिखाभिश्च सर्वतः । प्रवेक्ष्यामि कथं लङ्कामिति चिन्तापरोऽभवत् ॥ ४१ ॥ ते नगर अनेक तटांनी युक्त होते. ते तट सर्व बाजूंनी खंदकांनी वेढले होते. तेव्हा 'या लंका नगरीत कसा बरे प्रवेश करता येईल,' अशी चिंता मारुतीला लागली. (४१) रात्रौ वेक्ष्यामि सूक्ष्मोऽहं लङ्कां रावणपालिताम् । एवं विचिन्त्य तत्रैव स्थित्वा लङ्कां जगाम सः ॥ ४२ ॥ रावणाने पालन केलेल्या या लंकेत मी सूक्ष्म रूप धारण करून रात्रीच्या वेळी प्रवेश करीन, असा विचार करून, तो रात्र होईपर्यत तेथेच थांबला आणि मग रात्र पडल्यावर लंकेकडे जाण्यास निघाला. (४२) धृत्वा सूक्ष्मं वपुर्द्वारं प्रविवेश प्रतापवान् । तत्र लङ्कापुरी साक्षात् राक्षसीवेषधारिणी । ॥ ४३ ॥ सूक्ष्म रूप धारण करून प्रतापी हनुमानाने लंकेच्या द्वारात प्रवेश केला. तेथे प्रत्यक्ष लंका नगरी ही राक्षसीचा वेष धारण करून उभी होती. (४३) प्रविशन्तं हनूमन्तं दृष्ट्वा लङ्का व्यतर्जयत् । कस्त्वं वानररूपेण मां अनादृश्य लङ्किनीम् ॥ ४४ ॥ प्रविश्य चोरवद्रात्रौ किं भवान्कर्तुमिच्छति । इत्युक्त्वा रोषताम्राक्षी पदेनाभिजघान तम् ॥ ४५ ॥ हनुमान प्रवेश करीत आहे हे पाहिल्यावर लंकेने त्याला दटावले. "मज लंकिनीचा अनादर करून, रात्री चोराप्रमाणे प्रवेश करणारा, वानराचे रूप धारण केलेला तू कोण आहेस ? तुला काय पाहिजे ?" असे बोलून क्रोधाने डोळे लाल करून तिने त्या हनुमानाला आपल्या लाथेने तडाखा दिला. (४४-४५) हनूमानपि तां वाममुष्टिनावज्ञयाहनत् । तदैव पतिता भूमौ रक्तमुद्वमती भृशम् ॥ ४६ ॥ तेव्हा हनुमानानेसुद्धा आपल्या डाव्या हाताचा ठोसा तिला लगावला. तत्काळ खूप रक्त ओकीत ती जमिनीवर पडली. (४६) उत्थाय प्राह सा लङ्का हनूमन्तं महाबलम् । हनूमन् गच्छ भद्रं ते जिता लङ्का त्वयानघ ॥ ४७ ॥ मग उठून उभी राहून ती लंका महाबली हनुमानाला म्हणाली, "हे हनुमाना, तू जा. तुझे कल्याण होवो. हे पुण्यशीला, तू लंकेला जिंकले आहेस. (४७) पुराहं ब्रह्मणा प्रोक्ता ह्यष्टाविंशतिपर्यये । त्रेतायुगे दाशरथी रामो नारायणोऽव्ययः ॥ ४८ ॥ जनिष्यते योगमाया सीता जनकवेश्मनि । भूभारहरणार्थाय प्रार्थितोऽयं मया क्वचित् ॥ ४९ ॥ पूर्वी मला ब्र ह्मदेवांनी सांगितले होते की 'अठ्ठाविसाव्या चार युगांच्या पर्यायांतील त्रेतायुगामध्ये, अविनाशी नारायण हे दशरथाचे पुत्र श्रीराम या स्वरूपात जन्माला येतील; त्यांची योगमाया ही जनकाच्या घरी सीता होऊन जन्म घेईल. कारण पूर्वी भूमीचा भार हरण करण्याची प्रार्थना मी नारायणाला केली होती. (४८-४९) सभार्यो राघवो भ्राता गमिष्यति महावनम् । तत्र सीतां महाकायां रवणोऽपहरिष्यति ॥ ५० ॥ श्रीराम आपली पत्नी व भाऊ यांचेसह घोर अरण्यात जातील. तेथे महामाया सीतेचे अपहरण रावण करील. (५०) पश्चाद्रामेण साचिव्यं सुग्रीवस्य भविष्यति । सुग्रीवो जानकीं द्रष्टुं वानरान्प्रेषयिष्यति ॥ ५१ ॥ त्यानंतर श्रीरामांबरोबर सुग्रीवाचे सख्य होईल. आणि जानकीला शोधण्यासाठी सुग्रीव आपल्या वानरांना पाठवील. (५१) तत्रैको वानरो रात्रावागमिष्यति तेऽन्तिकम् । त्वया च भर्सितः सोऽपि त्वां हनिष्यति मुष्टिना ॥ ५२ ॥ त्यांतील एक वानर रात्रीच्या वेळी तुझ्याजवळ येईल. तू त्याची निर्भर्त्सना करशील, तेव्हा तोसुद्धा तुझ्यावर मुष्टिप्रहार करील. (५२) तेनाहता त्वं व्यथिता भविष्यसि यदानघे । तदैव रावणस्यान्तो भविष्यति न संशयः ॥ ५३ ॥ हे निष्पाप स्त्रिये, त्या वानराने मुष्टिप्रहार केल्याने जेव्हा तू व्याकूळ होशील, तेव्हांच रावणाचा अंत होईल, यात संशय नाही.' (५३) तस्मात् त्वया जिता लङ्का जितं सर्वं त्वयानघ । रावणान्तःपुरवरे क्रीडाकाननमुत्तमम् ॥ ५४ ॥ "ज्या अर्थी हे पावना, तू मज लंकेला जिंकले आहेस, त्या अर्थी तू आता सर्वांनाच जिंकले आहेस. आता मी सांगते ते ऐक. रावणाच्या श्रेष्ठ अंतःपुरात क्रीडा करण्यासाठी एक उत्तम उपवन आहे. (५४) तन्मध्येऽशोकवनिका दिव्यपादपसङ्कुला । अस्ति तस्यां महावृक्षः शिंशपा नाम मध्यगः ॥ ५५ ॥ त्याच्या मध्यभागी दिव्य वृक्षांनी भरलेले अशोकवन आहे. त्याच्या मध्यभागी अशोकाचा एक विशाल वृक्ष आहे. (५५) तत्रास्ते जानकी घोरराक्षसीभिः सुरक्षिता । दृष्ट्वैव गच्छ त्वरितं राघवाय निवेदय ॥ ५६ ॥ तेथे भयंकर राक्षसींच्या पहाऱ्यात सीता आहे. तिला भेटून तू त्वरित परत जा आणि श्रीराघवांना तिची वार्ता सांग. (५६) धन्याहमप्यद्य चिराय राघव- स्मृतिर्ममासीद्भवपाशमोचिनी । तद्भक्तसङ्गोऽप्यतिदुर्लभो मम प्रसीदतां दाशरथिः सदा हृदि ॥ ५७ ॥ बऱ्याच काळानंतर, संसाराचे पाशातून मुक्त करणारी श्रीरामांची स्मृती मला आली आहे. तसेच त्यांच्या भक्ताचा अतिशय दुर्लभ असा संग मला प्राप्त झाला म्हणून मी आज धन्य झाले. माझ्या हृदयात असणारे दशरथपुत्र श्रीराम माझ्यावर सदा प्रसन्न असोत." (५७) उल्लङ्घितेऽब्धौ पवनात्मजेन धरासुतायाश्च दशाननस्य । पुस्फोर वामाक्षि भुजश्च तीव्रं रामस्य दक्षाङ्गमतीन्द्रियस्य ॥ ५८ ॥ पवनसुत हनुमानाने समुद्र ओलांडला. त्या क्षणीच भूमिकन्या सीता आणि रावण यांचा डावा डोळा आणि बाहू हे जोराने स्फुरण पावू लागले, तर अतींद्रिय अशा श्रीरामांचे उजवे अंग स्फुरण पावू लागले. (५८) इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे सुन्दरकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥ इति श्रीमद्अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे सुंदरकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥ |