[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ द्वितीयः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वने श्रीरामादीन् प्रति विराधस्याक्रमणम् -
वनामध्ये श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेवर विराधाचे आक्रमण -
कृतातिथ्योऽथ रामस्तु सूर्यस्योदयनं प्रति ।
आमन्त्र्य स मुनीन् सर्वान् वनमेवान्वगाहत ॥ १ ॥
रात्री त्या महर्षिंचे आतिथ्य ग्रहण करून सकाळी सूर्योदय झाल्यावर समस्त मुनिंचा निरोप घेऊन राम पुन्हा वनातच जाऊ लागले. ॥१॥
नानामृगगणाकीर्णमृक्षशार्दूलसेवितम् ।
ध्वस्तवृक्षलतागुल्मं दुर्दर्शसलिलाशयम् ॥ २ ॥

निष्कूजमानशकुनि झिल्लिकागणनादितम् ।
लक्ष्मणानुचरो रामो वनमध्यं ददर्श ह ॥ ३ ॥
जाता जाता लक्ष्मणासहित श्रीरामांनी वनाच्या मध्यभागी एक असे स्थान पाहिले की जे नाना प्रकारच्या मृगांनी व्याप्त होते. तेथे बरीच अस्वले आणि वाघ राहात होते. तेथील वृक्ष, लता आणि झाडी नष्ट होऊन गेली होती. त्या वन प्रदेशात कुठल्याही जलाशयाचे दर्शन होणे कठीण होते. तेथील पक्षी तेथेच किलबिलाट करीत होते. रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती. ॥२-३॥
सीतया सह काकुत्स्थस्तस्मिन् घोरमृगायुते ।
ददर्श गिरिशृङ्‌गाभं पुरुषादं महास्वनम् ॥ ४ ॥
भयंकर जंगली पशुंनी भरलेल्या त्या दुर्गम वनात सीतेसह काकुत्स्थ रामांनी एक नरभक्षी राक्षस पाहिला, जो पर्वत शिखराप्रमाणे उंच होता आणि उच्चस्वरांत गर्जना करीत होता. ॥४॥
गंभीराक्षं महावक्त्रं विकटं विकटोदरम् ।
बीभत्सं विषमं दीर्घं विकृतं घोरदर्शनम् ॥ ५ ॥
त्याचे डोळे खोल होते, तोंड फारच मोठे होते, आकार विकट आणि पोट फारच विकराळ होते. तो दिसण्यात फार भयंकर , बिभत्स, बेडौल, फारच मोठा आणि विकृत वेषाने युक्त होता. ॥५॥
वसानं चर्म वैयाघ्रं वसार्द्रं रुधिरोक्षितम् ।
त्रासनं सर्वभूतानां व्यादितास्यमिवान्तकम् ॥ ६ ॥
त्याने रक्ताने माखलेले आणि चरबीने ओले झालेले व्याघ्रचर्म धारण केले होते. समस्त प्राण्यांना त्रास पोहोचविणारा तो राक्षस यमराजाप्रमाणे तोंड पसरून उभा होता. ॥६॥
त्रीन् सिंहांश्चतुरो व्याघ्रान् द्वौ वृकौ पृषतान् दश ।
सविषाणं वसादिग्धं गजस्य च शिरो महत् ॥ ७ ॥
तो एका लोखंडाच्या शूळात तीन सिंह, चार वाघ, दोन लांडगे, दहा चितकबरी हरीणे आणि दातांसहित एक मोठे हत्तीचे मस्तक ज्याला चरबी चिकटलेली होती गुंफून मोठमोठ्याने गर्जना करीत होता. ॥७॥
अवसज्यायसे शूले विनदन्तं महास्वनम् ।
स रामं लक्ष्मणं चैव सीतां दृष्ट्‍वा च मैथिलीम् ॥ ८ ॥

अभ्यधावत् सुसङ्‌क्रुद्धः प्रजाः काल इवान्तकः ।
स कृत्वा भैरवं नादं चालयन्निव मेदिनीम् ॥ ९ ॥
श्रीराम, लक्ष्मण आणि मैथिलीला पाहून तो क्रोधाने भरून भैरवनाद करून पृथ्वीला कंपीत करीत प्राणांतकारी काल प्रजेकडे जसा धावतो त्याप्रमाणे त्यांच्याकडे धावला. ॥८-९॥
अङ्‌केनादाय वैदेहीमपक्रम्य तदाब्रवीत् ।
युवां जटाचीरधरौ सभार्यौ क्षीणजीवितौ ॥ १० ॥

प्रविष्टौ दण्डकारण्यं शरचापासिपाणिणौ ।
तो वैदेहीला मांडीवर घेऊन थोडा दूर जाऊन उभा राहिला. नंतर त्या दोघा भावांना म्हणाला - ’तुम्ही दोघे जटा आणि चीर धारण करून या स्त्री बरोबर राहात आहात आणि धनुष्य-बाण आणि तलवार घेऊन दण्डकवनात घुसला आहात त्यावरून असे कळून येत आहे की तुमचे (जीवन) आयुष्य क्षीण होत चालले आहे. ॥१० १/२॥
कथं तापसयोर्वां च वासः प्रमदया सह ॥ ११ ॥

अधर्मचारिणौ पापौ कौ युवां मुनिदूषकौ ।
’तुम्ही दोघे तर तपस्वी वाटत आहात मग तुमचे तरूण स्त्री बरोबर राहाणे कसे संभव झाले ? अधर्म परायण, पापी तसेच मुनिसमुदायाला कलङ्‌कित करणारे तुम्ही दोघे कोण आहात ? ॥११ १/२॥
अहं वनमिदं दुर्गं विराधो नाम राक्षसः ॥ १२ ॥

चरामि सायुधो नित्यमृषिमांसानि भक्षयन् ।
’मी विराध नामक राक्षस आहे आणि प्रतिदिन ऋषिंचे मांस भक्षण करीत असतो आणि हातात अस्त्र-शस्त्र घेऊन या दुर्गम वनात विचरत राहात असतो. ॥१२ १/२॥
इयं नारी वरारोहा मम भार्या भविष्यति ॥ १३ ॥

युवयोः पापयोश्चाहं पास्यामि रुधिरं मृधे ।
’ही स्त्री फार सुंदर आहे, म्हणून माझी भार्या बनेल आणि तुम्हा दोघा पाप्यांचे मी युद्धस्थलावर रक्तपान करीन.’ ॥१३ १/२॥
तस्यैवं ब्रुवतो दुष्टं विराधस्य दुरात्मनः ॥ १४ ॥

श्रुत्वा सगर्वितं वाक्यं सम्भ्रान्ता जनकात्मजा ।
सीता प्रावेपतोद्वेगात् प्रवाते कदली यथा ॥ १५ ॥
दुरात्मा विराधाचे हे दुष्टता आणि घमेंडीने भरलेले बोलणे ऐकून जनकनंदिनी सीता घाबरून गेली आणि जसे जोराच्या वार्‍याने केळीचे झाड जोरजोरात हळू लागते त्या प्रकारे ती उद्वेगाने थरथर कापू लागली. ॥१४-१५॥
तां दृष्ट्‍वा राघवः सीतां विराधाङ्‌कगतां शुभाम् ।
अब्रवील्लक्ष्मणं वाक्यं मुखेन परिशुष्यता ॥ १६ ॥
शुभलक्षणसंपन्न सीतेला एकाएकी विराधाच्या हातात सांपडलेली पाहून श्रीरामचंद्र सुकलेल्या तोंडाने लक्ष्मणाला संबोधित करून म्हणाले - ॥१६॥
पश्य सौम्य नरेन्द्रस्य जनकस्यात्मसम्भवाम् ।
मम भार्यां शुभाचारां विराधाङ्‌के प्रवेशिताम् ॥ १७ ॥
’सौम्य ! पहा तर खरे, महाराज जनकांची कन्या आणि माझी सती-साध्वी पत्‍नी सीता विवशतापूर्वक विराधाच्या अङ्‌गावर जाऊन पोहोचली आहे. ॥१७॥
अत्यन्तसुखसंवृद्धां राजपुत्रीं यशस्विनीम् ।
यदभिप्रेतमस्मासु प्रियं वरवृतं च यत् ॥ १८ ॥

कैकेय्यास्तु सुसंवृत्तं क्षिप्रमद्यैव लक्ष्मण ।
या न तुष्यति राज्येन पुत्रार्थे दीर्घदर्शिनी ॥ १९ ॥
’अत्यंत सुखांत वाढलेली यशस्विनी राजकुमारी सीतेची ही अवस्था ! (हाय ! किती कष्टाची गोष्ट आहे) लक्ष्मणा ! वनात आमच्यासाठी ज्या दुःखाची प्राप्ती कैकेयीला अभीष्ट होती आणि जे काही तिला प्रिय होते, ज्यासाठी तिने वर मागितले होते ते सर्व आजच शीघ्रतापूर्वक सिद्ध झाले आहे. म्हणून तर ती दूरदर्शिनी कैकेयी आपल्या पुत्रासाठी केवळ राज्य घेऊन संतुष्ट झाली नाही. ॥१८-१९॥
ययाहं सर्वभूतानां हितः प्रस्थापितो वनम् ।
अद्येदानीं सकामा सा या माता मध्यमा मम ॥ २० ॥
’जिने समस्त प्राण्यांना प्रिय असूनही मला वनात धाडून दिले, ती माझी मधली माता (आई) कैकेयी आज यावेळी सफल मनोरथ झाली आहे. ॥२०॥
परस्पर्शात् तु वैदेह्या न दुःखतरमस्ति मे ।
पितुर्विनाशात् सौमित्रे स्वराज्यहरणात् तथा ॥ २१ ॥
’वैदेहीला दुसरा कुणी स्पर्श करेल यापेक्षा अधिक दुःखाची गोष्ट दुसरी कुठली नाही आहे. सौमित्रा ! पित्याचा मृत्यु तसेच आपल्या राज्याचा अपहरणानेही इतके कष्ट मला झाले नव्हते जितके आता झाले आहेत.’ ॥२१॥
इति ब्रुवति काकुत्स्थे बाष्पशोकपरिप्लुतः ।
अब्रवील्लक्ष्मणः क्रुद्धो रुद्धो नाग इव श्वसन् ॥ २२ ॥
’श्रीरामचंद्रांनी असे म्हटल्यावर शोकाने अश्रु ढाळीत लक्ष्मण कुपित होऊन मंत्राने अवरुद्ध झालेल्या सर्पाप्रमाणे फुस्कारत म्हणाले - ॥२२॥
अनाथ इव भूतानां नाथस्त्वं वासवोपमः ।
मया प्रेष्येण काकुत्स्थ किमर्थं परितप्यसे ॥ २३ ॥
’काकुत्स्थ ! आपण इंद्राप्रमाणे समस्त प्राण्यांचे स्वामी आणि संरक्षक आहात. मी दास (येथे) उपस्थित असता आपण कशासाठी अनाथाप्रमाणे संतप्त होत आहात ? ॥२३॥
शरेण निहतस्याद्य मया क्रुद्धेन रक्षसः ।
विराधस्य गतासोर्हि मही पास्यति शोणितम् ॥ २४ ॥
’मी आत्ता कुपित होऊन आपल्या बाणांनी या राक्षसाचा वध करतो. आज ही पृथ्वी माझ्या द्वारे मारल्या गेलेल्या प्राणशून्य विराधाचे रक्त पिईल. ॥२४॥
राज्यकामे मम क्रोधो भरते यो बभूव ह ।
तं विराधे विमोक्ष्यामि वज्री वज्रमिवाचले ॥ २५ ॥
’राज्याची इच्छा ठेवणार्‍या भरतावर माझा जो क्रोध प्रकट झाला होता, त्या क्रोधाला आज मी (ज्याप्रमाणे वज्रधारी इंद्र पर्वतावर आपले वज्र सोडतो त्याप्रमाणे) विराधावर सोडीन. ॥२५॥
मम भुजबलवेगवेगितः
पततु शरोऽस्य महान् महोरसि ।
व्यपनयतु तनोश्च जीवितं
पततु ततश्च महीं विघूर्णितः ॥ २६ ॥
’माझ्या भुजांच्या बळाच्या वेगाने वेगवान होऊन सुटलेला माझा महान बाण आज विराधाच्या विशाल वक्षःस्थलावर पडेल. याच्या शरीरापासून प्राणांना वेगळा करेल. त्यानंतर हा विराध चक्कर येऊन पृथ्वीवर पडेल. ॥२६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्ष रामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा दुसरा सर्ग पूरा झाला. ॥२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP