॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
युद्धकांड
॥ अध्याय सव्विसावा ॥
हनुमंत – कुंभकर्ण युद्ध
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
क्रोधाविष्ट कुंभकर्णाकडून वानरसैन्याचा संहार :
रणीं मारिले निशाचर । कुंभकर्णासीं क्रोध फार ।
गिळावया पैं वानर । अति सत्वर धांवला ॥ १ ॥
संमुख येतां कुंभकर्ण । मागां न सरती वानरगण ।
अंगदें आश्वासिलें पूर्ण । करावया रण उद्यत ॥२॥
ते निवृत्ता महामायाः श्रुत्वांगदवचस्तदा ।
नौष्ठिकीं बुद्धिमास्थाय सर्वे संग्रामकांक्षिणः ॥१॥
अथ वृक्षान्महाकायाः शृंगाणि सुमहांति च ।
वानरास्तुर्णमुत्पाट्य कुंभकर्णमभिद्रवन् ॥२॥
अंगदाचा वानरसैन्याला धीर :
देवोनि रामनामाचा धीर । अंगदें परतविलें वानर ।
करोनि वाढिवेचा गजर । धांवले समोर कुंभकर्णा ॥ ३ ॥
सांडोनि शरीराची आस । मरणावरी घालोनि कांस ।
वानरवीरां विशेष । अति उल्लास संग्रामीं ॥ ४ ॥
रामनामाच्या गजरीं । मरण घालून तोडरी ।
कुंभकर्णासीं समरीं । युद्ध वानरीं माडलें ॥ ५ ॥
कुंभकर्ण आवेशें येत । त्यासी वानरवीर समस्त ।
शिळा शिखरें पर्वत । स्वयें हाणित साटोपें ॥ ६ ॥
कुंभकर्ण रागेंकरीं । वानरां करावया बोहरी ।
धरोनियां दोहीं करीं । मुखाभीतरीं घालीत ॥ ७ ॥
वानर घालितां मुखांतरीं । स्ववेंचि निघती कर्णद्वारीं ।
बैसोनियां नाकावरी । भुभुःकारीं गर्जत ॥ ८ ॥
रिघोनियां कर्णद्वारी । वानर चढले मुगुटावरी ।
एक बैसले ध्वजाग्रीं । एक छत्राग्रीं वळंघले ॥ ९ ॥
वानर गेले हातोहात । मुख राहिलें हकहकित ।
चवी न लभेचि निश्चित । समसमित अवाळीं ॥ १० ॥
जिव्हा राहिली वणवणीत । आसावले ठेले दांत ।
कांही नाढळे मुखांत । चरफडित कुंभकर्ण ॥ ११ ॥
वानर नाढळती घांसासीं । राग आला कुंभकर्णासीं ।
मारावया वानरांसी । अति आवेंशीं चालिला ॥ १२ ॥
छेदावया वानरांचा कंद । कुंभकर्णा आला क्रोध ।
तंव पावला अंगद । रणबंधसमवेत ॥ १३ ॥
अंगदः कुमुदो नीलो गवाक्षो गवयो हरिः ।
मैंदोऽथ द्विविदश्चैव जांबवान्विनतस्तथा ॥३॥
युगपद्व्यहनन्सर्वे कुंभकर्ण महाबलम् ।
तस्य गात्रे विनिक्षिप्ताः शिलाः शैलनिभास्तदा ॥४॥
ध्वजं रथं खरांश्चैव शूलं चैव न्यपातयन् ॥५॥
अंगद वानरसेनानींसमवेत कुंभकर्णाचा रथ व सारथी पाडतो :
कोपें येतां कुंभकर्ण । अंगदादि दाही जण ।
उठावले वानरगण । कोण कोण ते ऐका ॥ १४ ॥
अंगद कुमुद नीळ प्रख्यात । गवाक्ष गवय आणि विनत ।
मैंद द्विविद जांबवत । हरि विख्यात महावीर ॥ १५ ॥
इहीं दहा जणीं वीरीं । क्षोभें कुंभकर्णावरी ।
शिळा शिखरें पर्वत गिरी । बहु तरुवरी हाणिल्या ॥ १६ ॥
कुंभकर्णाच्या अंगावरी । शिळा शिखरें होत चुरी ।
पिष्ट होइजे तरुवरीं । महावीरी हाणितां ॥ १७ ॥
अंगदाची प्रबळ शिळा । न भेदीच त्याच्या शळा ।
रथ सांडोनि उडाला । गजबजिला कुंभकर्ण ॥ १८ ॥
रथ सारथी सहस्रखर । ध्वज पताका सहितछत्र ।
अवघा केला चकचूर । अंगदवीरें गर्जोनी ॥ १९ ॥
अंगदें थोर केली ख्याती । कुंभकर्ण केला विरथी ।
तेणें गदा घेतली हातीं । कोपानुवृत्तीं धांविन्नला ॥ २० ॥
सोऽवप्लुत्य रथाद्विरो गदामुद्यम्य सत्वरम् ।
वेगेनाभ्युत्पपाताशु पक्षवानिव पर्वतः ॥६॥
स कुम्भकर्णः संक्रुद्धः शूलमुद्यम्य वीर्यवान् ।
शतानि सप्त चाष्टौ च सहस्त्राणि च वानराः ॥७॥
प्रकीर्णाः शेरते भूमौ कुंभकर्णनिपातिताः ।
षोडशाष्टौ च दश च सहस्र वापि वानरान् ॥८॥
संपारिष्वज्य बाहुभ्यां निष्पिपेष स राक्षसः ॥९॥
कुंभकर्णाचा आवेशः
रथ सारथि होतां चूर । उडोनि गेला निशाचर ।
गदाशूळेंसीं सशस्र । मारूं वानर धांवला ॥ २१ ॥
अंगदवाक्यप्रबोधनीं । वानरवीर रणांगणी ।
पाठीं देणें नाही कोणी । भिडती रणीं साटोपें ॥ २२ ॥
कुंभकर्ण शूळहस्तें । एके घायें वानरातें ।
सात शतें आठ शतें । खोंचून अमितें पाडिलीं ॥ २३ ॥
पसरोनियां दोन्ही हात । सोळा शत अठरा शत ।
दहा सहस्र असंख्यात । कपि मारीत आवेशीं ॥ २४ ॥
वानरवीर असंख्यात । कुंभकर्णे खेंव्याआंत ।
रगडूनियां अपरिमित । रणीं बहुत पाडिले ॥ २५ ॥
वानरवीरांचियां श्रेणी । कुंभकर्णे पाडिल्या रणीं ।
अशुद्ध प्रवाहे धरणीं । जाली चिडाणी मेदमांसें ॥ २६ ॥
वानरवीर पडतां रणीं । सुषेण वैद्यशिरोमणी ।
श्रीरामचरणरज घालोनी । वानरश्रेणी उठविल्या ॥ २७ ॥
मांस भक्षावया तेथ । कुंभकर्ण असे पहात ।
वानर उठले समस्त । अति विस्मित तेणें जाला ॥ २८ ॥
भक्ता साह्य श्रीरघुनाथ । मरों नेदी निजभक्त ।
रामनामें पैं गर्जत । कपि समस्त उठले ॥ २९ ॥
रणीं वाढला कुंभकर्ण । त्यासीं करावया रण ।
कपि पावले पांच जण । शिळापाषाणद्रुमयोद्धे ॥ ३० ॥
ऋषभः शरभो नीलो गवाक्षो गंधमादनः ।
पंचवानरशार्दूलाः कुंभकर्णमुपाद्रवन् ॥१०॥
शैलैर्वृक्षैस्तलैः पादैर्मुष्टिमिश्च महाबलाः ।
कुंभकर्ण महाकायं सर्वतो व्यहनन्द्दढम् ॥११॥
स्पर्शनिव प्रहारांस्तान्मन्यमानो न विव्यथे ।
ऋषभं तु महावेगं बाहुभ्यां परिषस्वजे ॥१२॥
कुंभकर्णभुजाभ्यां तु पीडितो वानरोत्तमः ।
पपात ऋषभो भूम्यां मुखादागतशोणितः ॥१३॥
ऋषभ वगैरे वानरवीरांकडून वृक्षशिलादिकांनी कुंभकर्णावर प्रहार :
पांचही वीर संग्रामशीळ । ऋषभ शरभ आणि नीळ ।
गवाक्ष गवय अति प्रबळ । वीरशार्दूळ संग्रामीं ॥ ३१ ॥
नीळ निजांगें आपण । घेऊन पर्वत पाषाण ।
संमुख ठोकिला कुंभकर्ण । रणीं गर्जोन साटोपें ॥ ३२ ॥
लागतां पर्वतांचा घात । कुंभकर्ण रुधिरोक्षित ।
तेणें रागें मुष्टिघात । नीळासीं देत निजहस्ते ॥ ३३ ॥
लागतांचि मुष्टिघात । तेणें नीळ रुधिर वमित ।
विकळ पडिला मूर्च्छित । जेंवी पर्वत वज्रघातें ॥ ३४ ॥
नीळ पडतांचि मूर्च्छित । श्रीरामस्मरणान्वित ।
सवेंचि होवोनि सावचित्त । आला गर्जत संग्रामा ॥ ३५ ॥
शिळा शिखरें प्रचंड शैल । तळघातें शाल ताल ।
मुष्टीं हाणिती वर्मस्थळ । संग्रामकुशळ कपियोद्धे ॥ ३६ ॥
पांचही वीर एकीभूत । होवोनियां संग्रामांत ।
कुंभकर्णासी भिडत । आले गर्जत साटोपें ॥ ३७ ॥
ऐसें लागतां प्रहार । कुंभकर्ण केला जर्जर ।
ते घाय मानूनि निशाछर । रणीं दुर्धर खवळला ॥ ३८ ॥
ऋषभवीर आतुर्बळी । आकळोनियां करतळीं ।
खेंव देवोनि रांगोळी । केला तत्काळी कुंभकर्णे ॥ ३९ ॥
अति बळें बळवंत । ऋषभवीर अति विख्यात ।
स्वयें रुधिरातें वमित । रणीं मूर्च्छित पाडिला ॥ ४० ॥
मुष्टिना शणभं चापि जानुना नीलमाहवे ।
आजघान गवाक्षं च तलेनेंद्ररिपुस्तदा॥१४॥
शरैरामर्दितस्तत्र सुगंधो गंधमादनः ।
दत्तप्रहार व्यथिता मुमुहुः शोणितोक्षिताः ॥१५॥
निपेतुश्चापि मेदिन्यां निकृत्ता इव किंशुकाः ।
तेषु वानरमुख्येषु पातितेषु महात्मसु ॥१६॥
वानराणां सहस्त्राणि कुंभकर्णं प्रदुद्रुवुः ।
ते वानराः खमुत्पत्य सन्नदन्तो महाबलाः ॥१७॥
तं नखैर्दशनैश्चेव जानुभिर्मुष्टिभिस्तलैः ।
कुंम्भकर्णं महाकायं ते निजघ्नु प्लवंगमाः ॥१८॥
कुंभकर्ण ऋषभास मूर्च्छित करुन चौघा वानर वीरांचा संहार करतो :
ऋषभा पाडोनि मूर्च्छापन्न । उरले जे कां चवघे जण ।
त्यांवरी धांवता कुंभकर्ण । रणीं गर्जोन साटोपें ॥ ४१ ॥
शरभें हाणितला पर्वत । येरें दिधला मुष्टिघात ।
पर्वत पिष्ट करोनि तेथ । शरभ मूर्च्छित पाडिला ॥ ४२ ॥
नीळें हाणितां शिळाशिखर । रागें दिधला पांपर ।
लातां शिखर करोनि चूर । नीळ महावीर पाडिला ॥ ४३ ॥
गवाक्ष वीर अति विख्यात । कुंभकर्णाचे पाडिले दांत ।
येरें हाणोनि तळघात । रणीं मूर्च्छित पाडिला ॥ ४४ ॥
गंधमादन वीर दारुण । शालतालवृक्षीं जाण ।
हाणोनियां कुंभकर्ण । रुधिरें पूर्ण न्हाणिला ॥ ४५ ॥
रागें त्रिशूळ हाणितां जाण । गगना गेला गंधमादर ।
कुंभकर्ण स्वयें उडोन । धरी धांवोन साटोपें ॥ ४६ ॥
सुगंध देखोनि गंधमादन । त्याचें केलें अंगमर्दन ।
ऐसे पाडिले पांची जण । केलें गर्जन कुंभकर्णे ॥ ४७ ॥
पळावया वानरभार । धांविन्नला निशाचर ।
तंव ते निधडे महावीर । युद्धा सत्वर मिसळले ॥ ४८ ॥
करोनियां रामानामस्मरण । गगना उडोनि वानरगण ।
शिळा पर्वत पाषाण । शाल ताल पूर्ण हाणिती ॥ ४९ ॥
कुंभकर्ण आतुर्बळी । हाणोनियां निजशूळीं ।
शिळावृक्षपर्वतजाळी । छेदून तत्काळीं सांडिले ॥ ५० ॥
मारावया वानरकोटी । धांविन्नला उठाउठीं ।
वानरवीर जगजेठी । कंठी मुकुटीं झोंबले ॥ ५१ ॥
कुंभकर्णाचे आंगावरी । चालिल्या वानरांच्या हारी ।
एक चिरिती नखाग्रीं । एक दशनाग्रीं मारिती ॥ ५२ ॥
एक गुडघा हाणिती तळीं । मुष्टिघातें आतुर्बळी ।
एक हाणिती करतळीं । तनु रक्ताळी तिहीं केली ॥ ५३ ॥
वानर मिळोनि समस्त । निष्ठुर हाणोनियां घात ।
कुंभकर्ण रुधिराक्त । केला रणांत वानरीं ॥ ५४ ॥
ऐसें वानरीं करितां रण । कोपा चढला कुंभकर्ण ।
शूळ घेवोनि आपण । कपिकंदन मांडिलें ॥ ५५ ॥
बाहुभ्यां वानरान्सर्वानाकृष्य सुमहाबलः ।
भक्षयामास संक्रुद्धो गरुडः पन्नगानिव ॥१९॥
मर्दयन्वानरान्संक्रुद्धो राक्षसोत्तमः ।
मांसशोणितसंक्लेदां कुर्वन्भूमिं स राक्षसः ॥२०॥
वज्रहस्तो यथा शक्रः पाशहस्तो यथांतकः ।
शूलहस्तो बभौ युद्धे कुंभकर्णो महाबलः ॥२१॥
यथा शुष्काण्यरण्यानि ग्रीष्मे दहति पावकः ।
तथा वानरसैन्यानि कुंभकर्णो ददाह सः ॥२२॥
कुंभकर्णाकडून वानरसैन्याचा संहार :
हाणिता शूळाचा आघात । वानर उडती आकाशांत ।
कुंभकर्णे पसरोनि हात । कपि समस्त आकळिले ॥ ५६ ॥
एक रगडोन भक्षित । एक सगळेचि गिळित ।
एक शिळातळीं मर्दित । एक चघळित दांतातळीं ॥ ५७ ॥
रणीं मारितां प्लवंगम । जालामांसशोणितकर्दम ।
रणभूमि अति दुर्गम । वानरां परम प्रळयांत ॥ ५८ ॥
इंद्र वज्रें करी पर्वतछेदन । पाशहस्तें यम घे प्राण ।
तेंवी शूळाघातें कुंभकर्ण । वानरां कंदन करीतसे ॥ ५९ ॥
जेंवी कां शुष्कवनीं तृणें । ग्रीष्मीं जाळिजे हुताशनें ।
तेंवी वानरपाळीगणें । कुंभकर्णे त्रासिलीं ॥ ६० ॥
ततस्ते वध्यमानास्तु कुंभकर्णेन वानराः ।
राघवाभ्याशमाजग्मुर्व्ययिता नष्टचेतसः॥२३॥
दुःखित वानरसैन्य श्रीरामांकडे येते व हनुमंताचे आक्रमण :
कुंभकर्ण करितां घात । वानरां आश्रय श्रीरघुनाथ ।
त्यापासीं आले समस्त । दुःखाभिभूत कपिकुळें ॥ ६१ ॥
कुंभकर्णाच्या आटाटी । श्रीरामें लक्षोनियां दृष्टीं ।
वानर आले कोट्यनुकोटी । रणीं संकटी त्रासूनी ॥ ६२ ॥
वानरसैन्याची महाआटी । हनुमंतें देखोनियां दृष्टी ।
रागें उठला कडकडाटीं । फोडावया घाटी कुंभकर्णाची ॥ ६३ ॥
सीताशुद्धी करितां जाण । दिर्घ देखिला कुंभकर्ण ।
त्यासींच आपण करावें रण । हा संकल्प पूर्ण हनुमंती ॥ ६४ ॥
बळी वाखाणिला कुंभकर्ण । त्यासींच करोनियां रण ।
त्याची पहावया आंगवण । उल्लास पूर्ण हनुमंता ॥ ६५ ॥
आजी माझें भाग्य समर्थ । प्रसन्न जाला श्रीरघुनाथ ।
रणीं सांपडला कुंभकेत । युद्धपुरुषार्थ तुकावया ॥ ६६ ॥
हनुमाशैलशृंगाणि शतशोऽथ सहस्त्रशः ।
ववर्ष कुंभकर्णस्य शरीरे वानरर्षभः ॥२४॥
तानि पर्वतशृंगाणि शूलेन परमाहवे ।
बिभेद परमायत्तः कुंभकर्णो मदोत्कटः ॥२५॥
ततो हरीणां तदनीकमुग्रं दुद्राव शूलं निशितं प्रगृह्य ।
तथौ च तस्यापततः पुरस्थान्महीधराग्रं हनुमान्प्रगृह्य ॥२६॥
हनुमंत शेपटीच्या साहाय्याने कुंभकर्णाची धांदल उडवितो :
पहिलें पुच्छाचें करोनि रण । पाहूं कुंभकर्णाची आंगवण ।
नातोपे तरी आपण । देवोनि उड्डाण निर्दळूं ॥ ६७ ॥
ऐसें विचारोनि हनुमंत । पुच्छाग्रें प्रेरिदां पर्वत ।
वर्षे पर्वत शतानुशत । असंख्यात ते वेळां ॥ ६८ ॥
शतानुशत पर्वत । पुच्छ लागवेगें वर्षत ।
तेणें कुंभकर्ण साशंकित । गिरि तोडित शूळहस्ते ॥ ६९ ॥
पर्वत सहस्रें सहस्र । तोडितां श्रमला निशाचर ।
झणाणिले त्याचे कर । कपि दुर्धर पुच्छाग्रें ॥ ७० ॥
ऐसें त्याचें पुच्छ बळी । करोनि राक्षसां रवंदळी ।
केली लंकेची पैं होळी । आतुर्बळी कपिपुच्छ ॥ ७१ ॥
पुच्छाग्रबळें जाण । केलें अखयाचें निर्दळण ।
इंद्रजितासीं रणीं गांजोन । करावया रण कपिपुच्छ ॥ ७२ ॥
कपिपुच्छ प्रतापवंत । धाक लाविला लंकेआत ।
निधडा वीर हनुमंत । ऐसें निश्चित मानलें ॥ ७३ ॥
ऐसा कपिपुच्छाचा धाक । कुंभकर्णे घेतला देख ।
हनुमंत आला पैं संमुख । देवोनि हाक साटोपें ॥ ७४ ॥
जैसा अचळ गिरिवर । तैसा कुंभकर्णासमोर ।
उभा ठेला हनुमान वीर । शैलशिखर झेलीत ॥ ७५ ॥
कुंभकर्ण मदोन्मत्त । सैरां धांवे शूळहस्त ।
पुढें देखोन हनुमंत । साशंकित तो जाला ॥ ७६ ॥
हाणितां पुच्छाभिघात । कुंभकर्ण चांचरी जात ।
झणाणिला शूळहस्त । शूळ गळत रणांगणीं ॥ ७७ ॥
शूळ रणीं गळोनि पडत । तेणें कुंभकर्ण क्रोधान्वित ।
शूळ घेवोनि धांवत । रणीं हनुमंत मारावया ॥ ७८ ॥
सशूलमाविध्य तडित्प्रकाशं गिरिर्यथा प्रज्वलिताग्रशृंगम् ।
स तेन वीरोभिहतस्तानांतरे स विहृलः शोणितमुद्वमन्मुखात् ॥२७॥
रणे बभासे हनुमान्महायशा यथातपांते सजलो बलाहकः ॥२८॥
अकुंभकर्णाचा हनुमंतावर शूळप्रहरः
कुंभकर्णाची आंगवण । पहावया हनुमंत आपण ।
पुढें राहिला सावधान । मरण मारुन प्रतापी ॥ ७९ ॥
याच्या अंगी किती शक्ती । घावो हाणील कैशा रीतीं ।
तें पाहावया मारुती । सावधवृत्तीं राहिला ॥ ८० ॥
मारावया हनुमंत । कुंभकर्ण शूळहस्त ।
रागें रणरंगी गर्जत । स्वयें धांवत साटोपें ॥ ८१ ॥
जेंवी विजू धगधगित । तैसा शूळ सिंदूरार्चित ।
जैसा देदीप्यमान पर्वत । तैसा भासत महाशूळ ॥ ८२ ॥
शूळप्रहार करताना कुंभकर्णालाच मूर्च्छा येते :
घाव हाणितां कपींद्रा । शूळ न फुटेचि वानरा ।
भवंडी आली निशाचरा । पडे माघारा चांचरित ॥ ८३ ॥
पुढें अशुद्धातें वमित । मूर्च्छापन्न हनुमंत ।
देखोनि कुंभकर्ण धांवत । कपीचा घात करावया ॥ ८४ ॥
हनुमंत अति विंदानीं । कुंभकर्ण धरोनि चरणीं ।
गर्जत उठिला तो रणीं । गरगरोनि भवंडित ॥ ८५ ॥
क्षणैक भवंडी भूतळीं । क्षणैक भवंडी नभःस्थळीं ।
हनुमान वीर महाबळी । चक्रानुमेंळीं भवंडिला ॥ ८६ ॥
त्यासी टाकितां समुद्रतळीं । समुद्र लागेल नाभिमूळीं ।
आपटितां पैं भूतळीं । होईल रांगोळी पाताळा ॥ ८७ ॥
यासी टाकितां अंबरी । गिळील विमानांचिया हारी ।
त्यासी मारुं कैशापरी । विचार करी हनुमंत ॥ ८८ ॥
कुंभकर्णायेवढें धेंडे । उचलोनियां कैवाडें ।
हनुमान मानला रणसुरवाडें । वाडेंकोडें नाचत ॥ ८९ ॥
श्रीराम संतोषोनि पूर्ण । सुग्रीवासी सांगे आपण ।
हनुमंताची आंगवण । रणविंदान पाहे पां ॥ ९० ॥
सुग्रीवाची उत्स्फुर्त उडी :
ऐकतां श्रीरामवचन । सुग्रीवासी आलें स्फुरण ।
स्वयें करोनि उड्डाण । कुंभकर्ण हांकिला ॥ ९१ ॥
एकावरी दोघे जण । हा पुरुषार्थ नव्हे जाण ।
हनुमंतें कुंभकर्ण । स्वयें आपण सोडिला ॥ ९२ ॥
हनुमंताचा संताप :
जैसा होता स्वयें उचलिला । तैसाच तेथें उभा केला ।
निधडा हनुमंता दादुला । उडोनि आला श्रीरामापासीं ॥ ९३ ॥
घालोनियां लोटांगण । मस्तकी वंदोनिया चरण ।
हनुमंत कोपायमान । काय आपण बोलत ॥ ९४ ॥
हनुमान म्हणे श्रीरामातें । धूरलक्षण नाही तूतें ।
काय उणें देखोनि मातें । सुग्रीवातें धाडिलें ॥ ९५ ॥
नाहीं वीर्य धैर्य सांडिलें । नाही उणेपण मज आलें ।
सुग्रीवासी कोणें बोलें । त्वां धाडिलें श्रीरामा ॥ ९६ ॥
धाडोनियां युद्धसंग्रामासीं । तुवां दिधलें आणिकासी ।
गार्हाणें सांगूं कोणापासीं । उकसाबुकसीं स्फुंदत ॥ ९७ ॥
देखोनि हनुमंताची व्यथा । कृपा आली श्रीरघुनाथा ।
आलिंगोनी एकात्मता । आश्वासिता होय त्यासी ॥ ९८ ॥
हनुमंताच्या उदरांत । डोई घालोनि रघुनाथ ।
माझे अपराध समस्त । क्षमा निश्चित करीं बापा ॥ ९९ ॥
पाहें हनुमंताचें रण । म्हणतां त्यासी आलें स्फुरण ।
मजही न पुसतां जाण । केलें उड्डाण सुग्रीवें ॥ १०० ॥
तुझी आण हनुमंता । सुग्रीव मज न पुसतां ।
रणीं आला साटोपता । सत्य वार्ता हे माझी ॥ १०१ ॥
श्रीरामाच्या मृदु वचनीं । हनुमान लोळें गडबडोनी ।
त्रिसत्य सत्य तुझी वाणी । वेदपुराणीं अति वंद्य ॥ २ ॥
हनुमान चरणीं ठेवोनि माथा । म्हणे सुखी जालो श्रीरघुनाथा ।
परिहार सुचो नको आतां । पुढील कथा अवधारीं ॥ ३ ॥
एका जनार्दना शरण । हनुमंतकुंभकर्णरण ।
जाहलें दोहींचे निरुपण अवधारा ॥ १०४ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे युद्धकांडे एकाकारटीकायां हनुमंतकुंभकर्ण युद्धवर्णनं नाम षड्विंशततितमोऽध्यायः ॥ २६ ॥
ओव्या ॥ १०४ ॥ श्लोक ॥ २८ ॥ एवं ॥ १३२ ॥
GO TOP
|