[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ एकोनचत्वारिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
चूडामणिमादाय यान्तं हनुमन्तं प्रति सीतया श्रीरामप्रभृतीनुत्सायितुमाग्रहकरणं समुद्रतरणे संशयानायाः सीताया
हनुमता वानराणां पराक्रमं वर्णयित्वाऽऽश्वासनम् -
चूडामणि घेऊन जाणार्‍या हनुमन्तास सीतेने श्रीराम आदिंना उत्साहित करण्यासाठी सांगणे तसेच समुद्र तरणाविषयी साशंक झालेल्या सीतेला वानरांचा पराक्रम सांगून हनुमन्ताचे आश्वासन देणे -
मणिं दत्त्वा ततः सीता हनुमन्तमथाब्रवीत् ।
अभिज्ञानमभिज्ञातमेतद् रामस्य तत्त्वतः ॥ १ ॥
चूडामणी दिल्यानन्तर सीता हनुमन्तास म्हणाली - "माझ्या या चिन्हाला भगवान श्रीराम उत्तम प्रकारे ओळखतात. ॥१॥
मणिं दृष्ट्‍वा तु रामो वै त्रयाणां संस्मरिष्यति ।
वीरो जनन्या मम च राज्ञो दशरथस्य च ॥ २ ॥
हा मणी पाहिल्यावर वीर रामास नक्कीच तीन व्यक्तींचे स्मरण होईल - माझ्या मातेचे, माझे आणि महाराज दशरथांचे एकाच वेळी स्मरण होईल. ॥२॥
स भूयस्त्वं समुत्साहचोदितो हरिसत्तम ।
अस्मिन् कार्यसमुत्साहे प्रचिन्तय यदुत्तरम् ॥ ३ ॥
'हे कपिश्रेष्ठा ! तू पुन्हा विशेष उत्साहाने प्रेरित होऊन या कार्याच्या सिद्धिसाठी, जे भावी कर्तव्य असेल त्यासंबन्धी विचार कर. ॥३॥
त्वमस्मिन् कार्यनिर्योगे प्रमाणं हरिसत्तम ।
तस्य चिन्तय यो यत्‍नो दुःखक्षयकरो भवेत् ॥ ४ ॥
हे वानर शिरोमणी ! हे कार्य निभावून नेण्यास तूच प्रमाण आहेस- माझा भार तुझ्यावरच आहे. हे हनुमान ! तूंच प्रयत्‍न करून माझ्या दुःखाचा क्षय करणारा हो ! म्हणून तू असा एखाद्या उपाय शोधून काढ की ज्या योगे माझ्या दुःखाचे निवारण होईल. ॥४॥
हनुमन् यत्‍नमास्थाय दुःखक्षयकरो भव ।
स तथेति प्रतिज्ञाय मारुतिर्भीमविक्रमः ॥ ५ ॥

शिरसाऽऽवन्द्य वैदेहीं गमनायोपचक्रमे ।
'हनुमान् !विशेष प्रयत्‍न करून तू माझं दुःख दूर करण्यात श्रीरामांना विशेष साहाय्य. कर." तेव्हां 'ठिक आहे' असे म्हणत सीतेच्या आज्ञेला अनुसरून, त्यानुसार कार्य करण्याची प्रतिज्ञा करून भीमपराक्रमी अह्नुमान वैदेहीच्या चरणांवर मस्तक ठेऊन जाण्यासाठी निघाला. ॥ ५ १/२ ॥
ज्ञात्वा संप्रस्थितं देवी वानरं पवनात्मजम् ॥ ६ ॥

बाष्पगद्‌गदया वाचा मैथिली वाक्यमब्रवीत् ।
पवनपुत्र वानरवीर हनुमान तेथून परत निघण्यास तयार झालेले पाहून मैथिलीचा कंठ दाटून आला आणि ती अडखळत अडखळत अश्रुगद्‍गद वाणीने त्यांना म्हणाली - ॥६ १/२॥
कुशलं हनुमन् ब्रूयाः सहितौ रामलक्ष्मणौ ॥ ७ ॥

सुग्रीवं च सहामात्यं सर्वान् वृद्धांश्च वानरान् ।
ब्रूयास्त्वं वानरश्रेष्ठ कुशलं धर्मसंहितम् ॥ ८ ॥
हे हनुमान ! उभयता रामलक्ष्मणांना एकदमच तू माझे कुशल सांग. आणि त्यांचा कुशल समाचार विचार. हे वानरश्रेष्ठ ! नन्तर सचिवांसहित सुग्रीव तसेच इतरही सर्व वृद्ध आणि थोर वानरांना धर्मयुक्त कुशल समाचार सांग आणि त्यांचाही कुशल समाचार विचार. ॥७-८॥
यथा स च महाबाहुर्मां तारयति राघवः ।
अस्माद् दुःखाम्बुसंरोधात् त्वं समाधातुमर्हसि ॥ ९ ॥
महाबाहु श्रीराम ज्याप्रकारे या दुःखरूपी महासागरातून माझा उद्धार करतील, असाच प्रयत्‍न तुला केला पाहिजे. ॥९॥
जीवन्तीं मां यथा रामः सम्भावयति कीर्तिमान् ।
तत्तथा हनुमन् वाच्यं वाचा धर्ममवाप्नुहि ॥ १० ॥
हे हनुमाना ! मी जिवन्त असतानांच ते कीर्तिमान राम माझे रक्षण करतील असे भाषण तू त्यांच्याशी कर आणि आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर मला दुःखातून पार पाडण्याचे धर्मकार्य तुझ्या हातून होऊ दे. ॥१०॥
नित्यमुत्साहयुक्तस्य वाचः श्रुत्वा मयेरिताः ।
वर्धिष्यते दाशरथेः पौरुषं मदवाप्तये ॥ ११ ॥
मी जे तुझाशी बोलले ते ऐकून दशरथपुत्र राम माझ्या प्राप्तीकरता अधिकाधिक प्रयत्‍न करतील. ॥ ११ ॥
मत्सन्देशयुता वाचः त्वत्तः श्रुत्वैव राघवः ।
पराक्रमे मतिं वीरो विधिवत् संविधास्यति ॥ १२ ॥
तसे तर दाशरथी राम सदाच उत्साहाने भरलेले असतात तथापि पराक्रम करण्याचा विधिवत प्रयत्‍न करण्याकडे आपले मन लावतील." ॥१२॥
सीतायास्तद् वचः श्रुत्वा हनुमान् मारुतात्मजः ।
शिरस्यञ्जलिमाधाय वाक्यमुत्तरब्रवीत् ॥ १३ ॥
सीतेचे हे भाषण ऐकल्यावर पवनपुत्र हनुमन्तानी मस्तकावर हात जोडून विनयपूर्वक तिच्या भाषणास उत्तर दिले. तो म्हणाला- ॥१३॥
क्षिप्रमेष्यति काकुत्स्थो हर्यृक्षप्रवरैर्वृतः ।
यस्ते युधि विजित्यारीञ्शोकं व्यपनयिष्यति ॥ १४ ॥
"हे देवी ! श्रेष्ठ श्रेष्ठ वानर आणि अस्वले यांचे सैन्य बरोबर घेऊन काकुत्स्थ कुलोत्पन्न श्रीराम लवकरच इकडे येतील आणि शत्रूंना युद्धामध्ये जिंकून तुझ्या दुःखाचा ते लवकरच परिहार करतील. ॥१४॥ "
नहि पश्यामि मर्त्येषु नासुरेषु सुरेषु वा ।
यस्तस्य वमतो बाणान् स्थातुमुत्सहतेऽग्रतः ॥ १५ ॥
एकदा श्रीराम बाण सोडू लागले की त्यांच्या समोर उभा राहण्यास समर्थ होईल असा कोणीही वीर पुरुष, मनुष्य, दैत्य अथवा देव यांच्यामध्ये आहे, असे मला आढळून येत नाही. ॥१५॥
अप्यर्कमपि पर्जन्यमपि वैवस्वतं यमम् ।
स हि सोढुं रणे शक्तस्तव हेतोर्विशेषतः ॥ १६ ॥
'भगवान श्रीराम तर संग्रामात सूर्याशी, इन्द्रांशी अथवा वैवस्वताशी युद्ध करण्यात समर्थ आहेत, आणि विशेषकरून तुझ्यासाठी तर ते त्यांच्याशीही युद्ध करण्याचा प्रसंग आला तर मागेपुढे पहाणारच नाही, हे निश्चित आहे. ॥१६॥
स हि सागरपर्यन्तां महीं साधितुमर्हति ।
त्वन्निमित्तो हि रामस्य जयो जनकनन्दिनि ॥ १७ ॥
'ही समुद्रवलयांकित पृथ्वीही जिंकण्यास ते समर्थ आहेत, म्हणून हे जनकनन्दिनी ! तुझ्यासाठी युद्ध करते वेळी तर श्रीरामांना निश्चितच जय मिळेल." ॥१७॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा सम्यक् सत्यं सुभाषितम् ।
जानकी बहुमेने तं वचनं चेदमब्रवीत् ॥ १८ ॥
हनुमन्ताचे ते भाषण युक्तिसंगत, सत्य आणि सुन्दर होते. ते ऐकून जानकीने त्याचा फार आदर केला आणि ती परत त्याच्याशी काही बोलण्यास उद्यत झाली. ॥१८॥
ततस्तं प्रस्थितं सीता वीक्षमाणा पुनः पुनः ।
भर्तृस्नेहान्वितं वाक्यं सौहार्दादनुमानयत् ॥ १९ ॥
त्यानन्तर तेथून निघण्याच्या तयारीत असलेल्या हनुमन्ताकडे ती वारंवार पाहू लागली, आपल्या पतीच्या प्रेमाचा संबन्ध आहे त्या हनुमन्ताच्या भाषणाची प्रशंसा करून तिने म्हटले- ॥१९॥
यदि वा मन्यसे वीर वसैकाहमरिन्दम ।
कस्मिंश्चित् संवृते देशे विश्रान्तः श्वो गमिष्यसि ॥ २० ॥
"शत्रूंचे दमन करणार्‍या वीरा ! जर तुला योग्य वाटत असेल तर तू येथे एखाद्या गुप्त स्थानात एक दिवस राहा आणि याप्रकारे एक दिवस विश्रान्ती घेऊन उद्या तू परत जा. ॥२०॥ "
मम चैवाल्पभाग्यायाः सान्निध्यात् तव वानर ।
अस्य शोकस्य महतो मुहूर्तं मोक्षणं भवेत् ॥ २१ ॥
हे वानरवीरा ! अशा प्रकारे तू राहिलास तर या भाग्यहीन स्त्रीच्या शोकाचे तुझ्या सानिध्यामुळे थोडा वेळ का होईना, निवारण होईल. ॥२१॥
गते हि हरिशार्दूल पुनरागमनाय तु ।
प्राणानामपि सन्देहो मम स्यान्नात्र संशयः ॥ २२ ॥
'हे कपिश्रेष्ठा ! विश्राम घेतल्यानन्तर येथून तू परत जाशील, त्यानन्तर परत तुम्ही सर्व येण्यास जर काही अडचण आली किंवा विलंब झाला तर माझ्यावर ही प्राणसंकट ओढवेल यात संशय नाही. ॥२२॥
तवादर्शनजः शोको भूयो मां परितापयेत् ।
दुःखादुःखपरामृष्टां दीपयन्निव वानर ॥ २३ ॥
'हे वानरवीरा ! मी दुःखामागून दुःख सहन करीत आहे. तू येथून निघून गेल्यावर, तू दृष्टिआड झाल्याने मला अधिकच शोक होईल आणि त्यामुळे माझ्या अंगाचा जणु काही शोकाने भडकाच उडेल. (मी जणु दग्ध होऊन जाईन.) ॥२३॥
अयं च वीर सन्देहः तिष्ठतीव ममाग्रतः ।
सुमहांस्त्वत्सहायेषु हर्यृक्षेषु हरीश्वर ॥ २४ ॥

कथं नु खलु दुष्पारं तरिष्यन्ति महोदधिम् ।
तानि हर्यृक्षसैन्यानि तौ वा नरवरात्मजौ ॥ २५ ॥
'हे वीरा ! माझ्या मनामध्ये एक जबरदस्त संशय येत आहे की तुला सहाय्य करणारे वानर आणि अस्वले एकत्रित झाली तरी वानराधिपती सुग्रीव, महासागराचे उल्लंघन करण्यास कसे समर्थ होतील ? किंवा अस्वल-वानरांचे ते सैन्य अथवा ते पुरुषश्रेष्ठ दशरथ पुत्र तरी महासागराचे उल्लंघन करण्यास कसे समर्थ होतील. ॥२४-२५॥
त्रयाणामेव भूतानां सागरस्यास्य लङ्‌घने ।
शक्तिः स्याद् वैनतेयस्य तव वा मारुतस्य वा ॥ २६ ॥
'या संसारात समुद्राचे उल्लंघन करण्याची क्षमता केवळ तीनच प्राण्यांच्या ठिकाणी दिसून येत आहे, तुझ्या ठिकाणी, गरूडाच्या ठिकाणी आणि वायूच्या ठिकाणी. ॥२६॥
तदस्मिन् कार्यनिर्योगे वीरैवं दुरतिक्रमे ।
किं पश्यसि समाधानं त्वं हि कार्यविदां वरः ॥ २७ ॥
'हे वीर ! याप्रकारे हे समुद्रलंघन रूपी कार्य निभावून नेणे अत्यन्त कठीण वाटत आहे. अशा परिस्थितिमध्ये तुला कार्यसिद्धिचा कुठला उपाय सुचतो आहे, हे तू सांग. कारण कार्यसिद्धिचा उपाय जाणणार्‍या लोकांच्या मध्ये तूच सर्वश्रेष्ठ आहेस. ॥२७॥
काममस्य त्वमेवैकः कार्यस्य परिसाधने ।
पर्याप्तः परवीरघ्न यशस्यस्ते फलोदयः ॥ २८ ॥
'शत्रूंच्या वीरांचा संहार करणार्‍या पवनपुत्रा ! यात जराही संशय नाही की तू एकटा सुद्धा माझ्या उद्धाररूपी कार्य करण्यास समर्थ आहेस, परन्तु असे करण्याने विजयरूपी जे फळ प्राप्त होईल त्याचे यश केवळ तुलाच मिळेल, भगवान श्रीरामास मिळणार नाही. ॥२८॥
बलैः समग्रैरयुधि मां रावणं जित्य संयुगे ।
विजयी स्वपुरीं यायात् तत्तस्य सदृशं भवेत् ॥ २९ ॥
'जर श्रीरामांनी सर्व सेनेसह रावणाला युद्धात पराजित करून विजयी होऊन मला घेऊन ते स्वतःच्या पुरीला (अयोध्येला) परत गेले तर ते त्यांना अधिक साजेसे यशकीर्ती मिळवून देणारे ठरेल. ॥२९॥
बलैस्तु संकुलां कृत्वा लङ्‌कां परबलार्दनः ।
मां नयेद् यदि काकुत्स्थस्तत् तस्य सदृशं भवेत् ॥ ३० ॥
'शत्रू सैन्याचा संहार करणार्‍या श्रीरामांनी जर आपल्या सैन्याच्या द्वारे लंकेला पददलित करून मला आपल्या बरोबर नेले तर तेच त्यांच्यासाठी अधिक योग्य ठरेल. ॥३०॥
तद्यथा तस्य विक्रान्तं अनुरूपं महात्मनः ।
भवेदाहवशूरस्य तथा त्वमुपपादय ॥ ३१ ॥
म्हणून तू असा उपाय कर की समरशूर महात्मा श्रीरामांचा पराक्रम त्यांना साजेल अशा प्रकारे व्हावा." ॥३१॥
तदर्थोपहितं वाक्यं सहितं हेतुसंहितम् ।
निशम्य हनुमाञ्शेषं वाक्यमुत्तरमब्रवीत् ॥ ३२ ॥
देवी सीतेचे हे भाषण अर्थयुक्त, स्नेहयुक्त आणि युक्तियुक्तही होते. तिचे हे अवशिष्ट भाषण ऐकून घेऊन हनुमन्तानी याप्रकारे उत्तर दिले - ॥३२॥
देवि हर्यृक्षसैन्यानामीश्वरः प्लवतां वरः ।
सुग्रीवः सत्यसम्पन्नस्तवार्थे कृतनिश्चयः ॥ ३३ ॥
"हे देवी ! वानर आणि अस्वले यांच्या सैन्याचा जो अधिपती, वानरश्रेष्ठ सुग्रीव तो सत्यनिष्ठ आहे आणि तुझे कार्य पार पाडण्याविषयी त्याने दृढ निश्चय केलेला आहे. ॥३३॥ "
स वानरसहस्राणां कोटीभिरभिसंवृतः ।
क्षिप्रमेष्यति वैदेहि राक्षसानां निबर्हणः ॥ ३४ ॥
'विदेहनन्दिनी !त्यामध्ये राक्षसांचा संहार करण्याची शक्ति आहे. तो हजारो वानरांच्या कोट्‍यावधी झुंडी बरोबर घेऊन लवकरच लंकेवर आक्रमण करील. ॥३४॥
तस्य विक्रमसम्पन्नाः सत्त्ववन्तो महाबलाः ।
मनस्सङ्‌कल्पसम्पाता निदेशे हरयः स्थिताः ॥ ३५ ॥
'त्याच्या जवळ पराक्रमी, धैर्यशाली, महाबलाढ्‍य आणि मानसिक संकल्पाप्रमाणे उड्‍डाण करून दूरवर जाणारे अनेक वानर आहेत, जे त्याच्या आज्ञेचे पालन करण्यास सदा तत्पर असतात. ॥३५॥
येषां नोपरि नाधस्तान्न तिर्यक् सज्जते गतिः ।
न च कर्मसु सीदन्ति महत्स्वमिततेजसः ॥ ३६ ॥
'त्यांची गति उर्ध्वदिशेस, अधोभागी तथा इकडे तिकडे आठही दिशांना असून ती कुंठित होत नाही. ते अत्यन्त तेजस्वी असून ते कसल्याही मोठ्‍या कार्यात कोणास हार जात नाहीत. (त्यांचे धैर्य टिकून राहाते.) ॥३६॥
असकृत् तैर्महोत्साहैः ससागरधराधरा ।
प्रदक्षिणीकृता भूमिर्वायुमार्गानुसारिभिः ॥ ३७ ॥
'त्यांनी अत्यन्त उत्साहाने आकाशमार्गाने गमन करून (वायुमार्गाचे अनुसरण करून) सागर आणि पर्वत यासह अनेक वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा केली आहे. ॥३७॥
मद्विशिष्टाश्च तुल्याश्च सन्ति तत्र वनौकसः ।
मत्तः प्रत्यवरः कश्चिन्नास्ति सुग्रीवसन्निधौ ॥ ३८ ॥
'सुग्रीवाजवळ माझ्यापेक्षा पराक्रमात कमी असा कोणीही वानर नाही. जे काही वानर आहेत, त्यातील काही माझ्या बरोबरीचे आहेत तर काही माझ्यापेक्षाही पराक्रमी आहेत. ॥३८॥
अहं तावदिह प्राप्तः किं पुनस्ते महाबलाः ।
नहि प्रकृष्टाः प्रेष्यन्ते प्रेष्यन्ते हीतरे जनाः ॥ ३९ ॥

तदलं परितापेन देवि शोको व्यपैतु ते ।
एकोत्पातेन ते लङ्‌कामेष्यन्ति हरियूथपाः ॥ ४० ॥
'मी कनिष्ठ प्रतीतला असूनही जर येथे आलो आहे तर त्या महाबलाढ्‍य वीरांचे काय वर्णन करावे ? जे श्रेष्ठ पुरुष असतात त्यांना सन्देशवाहक दूत म्हणून पाठविण्यात येत नाहीत. अशा कामासाठी साधारण प्रतिचे लोकच पाठविले जातात. तेव्हां तू विशेष चिन्ता करू नकोस. आणि अजिबात शोक करू नकोस. एकाच धडाक्यात सर्व वानरयूथपती लंकेत येऊन पोहोंचतील याची खात्री असू दे. ॥३९-४०॥
मम पृष्ठगतौ तौ च चन्द्रसूर्याविवोदितौ ।
त्वत्सकाशं महासंघौ नृसिंहावागमिष्यतः ॥ ४१ ॥
'उदयकाळच्या सूर्य आणि चन्द्राप्रमाणे शोभून दिसणारे ते पुरुषश्रेष्ठ राम, लक्ष्मण माझ्या पाठीवर बसून आणि मोठ मोठ्‍या सेना बरोबर घेऊन येथे तुझ्याकडे येतील. ॥४१॥
तौ हि वीरौ नरवरौ सहितौ रामलक्ष्मणौ ।
आगम्य नगरीं लङ्‌कां सायकैर्विधमिष्यतः ॥ ४२ ॥
'ते दोघे नरश्रेष्ठ वीर श्रीराम आणि लक्ष्मण एकत्रितपणे येथे येऊन आपल्या बाणांनी लङ्‌कापुरीचा विध्वंस करुन टाकतील. ॥४२॥
सगणं रावणं हत्वा राघवो रघुनन्दनः ।
त्वामादाय वरारोहे स्वपुरं प्रति यास्यति ॥ ४३ ॥
'हे वरारोहे ! रघुकुलाला आनन्दित करणारे श्रीराघव रावणाला त्याच्या सैनिकांसहित मारून तुला बरोबर घेऊन आपल्या पुरीला (अयोध्येला) परत जातील. ॥४३॥
तदाश्वसिहि भद्रं ते भव त्वं कालकांक्षिणी ।
नचिराद् द्रक्ष्यसे रामं प्रज्वलन्तिमिवानलम् ॥ ४४ ॥
'म्हणून तू धैर्य धारण कर. तुझे कल्याण असो ! तू योग्य समयाची प्रतिक्षा कर. प्रज्ज्वलित अग्नीप्रमाणे तेजस्वी श्रीराम तुला लवकरच दर्शन देतील. ॥४४॥
निहते राक्षसेन्द्रे च सपुत्रामात्यबान्धवे ।
त्वं समेष्यसि रामेण शशाङ्‌केनेव रोहिणी ॥ ४५ ॥
'पुत्र, मन्त्री आणि बन्धुबान्धवासह राक्षसराज रावण मारला गेल्यावर जशी रोहिणी चन्द्रम्यास भेटते त्याप्रमाणे तू ही श्रीरामास भेटशील. ॥४५॥
क्षिप्रं त्वं देवि शोकस्य पारं द्रक्ष्यसि मैथिलि ।
रावणं चैव रामेण द्रक्ष्यसे निहतं बलात् ॥ ४६ ॥
हे देवि ! सांप्रतच्या शोकाचा शेवट झालेला पाहयाची पाळी तुला लवकरच येईल आणि रामाच्या हारून रावण वध पावल्याचेही तू सत्वरच पाहशील. ॥४६॥
एवमाश्वास्य वैदेहीं हनुमान् मारुतात्मजः ।
गमनाय मतिं कृत्वा वैदेहीं पुनरब्रवीत् ॥ ४७ ॥
वैदेही सीतेला याप्रकारे आश्वासन देऊन मारूतसुत हनुमान तेथून परत जाण्याचा निश्चय करून परत सीतेला म्हणाले - ॥४७॥
तमरिघ्नं कृतात्मानं क्षिप्रं द्रक्ष्यसि राघवम् ।
लक्ष्मणं च धनुष्पाणिं लङ्‌काद्वारमुपागतम् ॥ ४८ ॥
"हे देवी ! तू लवकरच असे पाहशील की शुद्ध अन्तःकरणाचे, शत्रूनाशक राघव तसेच लक्ष्मण हातात धनुष्य धारण करून लंकेच्या द्वारापर्यत येऊन पोहोंचले आहेत. ॥४८॥ "
नखदंष्ट्रायुधान् वीरान् सिंहशार्दूलविक्रमान् ।
वानरान् वारणेन्द्राभान् क्षिप्रं द्रक्ष्यसि सङ्‌गतान् ॥ ४९ ॥
'नखे आणि दात हीच ज्यांची आयुधे आहेत आणि जे सिंह आणि व्याघ्राप्रमाणे पराक्रमी आणि गजराजाप्रमाणे विशालदेही आहेत अशा वानरांनाही तू लवकरच येथे एकत्रित आलेले पहाशील. ॥४९॥
शैलाम्बुदनिकाशानां लङ्‌कामलयसानुषु ।
नर्दतां कपिमुख्यानामार्ये यूथान्यनेकशः ॥ ५० ॥
'हे आर्ये ! पर्वत आणि मेघांप्रमाणे विशालदेही मुख्य-मुख्य वानरांच्या अनेक झुंडी लङ्‌कावर्ती मलयपर्वताच्या शिखरावर गर्जना करतांना तुला दिसून येतील. ॥५०॥
स तु मर्मणि घोरेण ताडितो मन्मथेषुणा ।
न शर्म लभते रामः सिंहार्दित इव द्विपः ॥ ५१ ॥
'श्रीरामचन्द्रांच्या मर्मस्थळामध्ये कामदेवाच्या भयंकर बाणांनी आघात केला आहे त्यामुळे सिंहाकडून पीडित झालेल्या गजराजाप्रमाणे त्यांना जराही चैन पडत नाही आहे. ॥५१॥
मा रुदो देवि शोकेन मा भूत् ते मनसो भयम् ।
शचीव भर्त्रा शक्रेण संगमेष्यसि शोभने ॥ ५२ ॥
'हे देवी ! तू शोकामुळे रूदन करू नकोस. तुझ्या मनांतील भय काढून टाक शोभने ! जसं शचीचं आणि देवराज इन्द्राचं मीलन होतं, त्याप्रमाणेच तुझं श्रीरामांशी मीलन होईल. ॥५२॥
रामाद् विशिष्टः कोऽन्योऽस्ति कश्चित् सौमित्रिणा समः ।
अग्निमारुतकल्पौ तौ भ्रातरौ तव संश्रयौ ॥ ५३ ॥
'श्रीरामचन्द्रांहून अधिक पराक्रमी या जगात दुसरा कोण आहे ? अग्निला आणि वायूला तुल्यबळ असलेले ते दोघे बन्धु यांचा आश्रय असताना तुला कशाची काळजी वाटते. ॥५३॥
नास्मिंश्चिरं वत्स्यसि देवि देशे
रक्षोगणैरध्युषितेऽतिरौद्रे ।
न ते चिरादागमनं प्रियस्य
क्षमस्व मत्संगमकालमात्रम् ॥ ५४ ॥
हे देवी ! राक्षसगणांनी वस्ती केलेल्या या भयंकर प्रदेशात यापुढें तुला आता फार दिवस राहावे लागणार नाही. तुझ्या प्रियतमाचे लवकरच इकडे आगमन होईल. माझी आणि त्यांची भेट होण्यास लागेल इतकाच काळ जाई पर्यन्त तू आता त्यांची वाट पहा, म्हणजे झाले. या विलंबासाठी तू मला क्षमा कर. ॥५४॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे एकोनचत्वारिंश सर्गः ॥ ३९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा एकोणचाळिसावा सर्ग पूर्ण झाला. ॥३९॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP