श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। षट्पञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्वामित्रेण वसिष्ठस्योपरि विविधदिव्यास्त्राणां प्रयोगो वसिष्ठेन ब्रह्मदण्डादेव तेषां शमनं ततो ब्राह्मणत्वप्राप्तये विश्वामित्रस्य तपः कर्तुं निश्चयः - विश्वामित्रांच्या द्वारा वसिष्ठांवर नाना प्रकारच्या दिव्यास्त्रांचा प्रयोग आणि वसिष्ठद्वारा ब्रह्मदण्डानेच त्यांचे शमन, तसेच विश्वामित्रांचा ब्राह्मणत्वाच्या प्राप्तिसाठी तप करण्याचा निश्चय -
एवमुक्तो वसिष्ठेन विश्वामित्रो महाबलः ।
आग्नेयमस्त्रमुद्दिश्य तिष्ठ तिष्ठेति चाब्रवीत् ॥ १ ॥
वसिष्ठांनी असे म्हटल्यावर महाबली विश्वामित्र आग्नेयास्त्र घेऊन म्हणाले - 'अरे, उभा रहा, उभा रहा.' ॥ १ ॥
ब्रह्मदण्डं समुद्यम्य कालदण्डमिवापरम् ।
वसिष्ठो भगवान् क्रोधादिदं वचनमब्रवीत् ॥ २ ॥
त्यासमयी अद्वितीय कालदण्डाप्रमाणे असलेला ब्रह्मदण्ड उचलून भगवान वसिष्ठ क्रोधपूर्वक म्हणाले - ॥ २ ॥
क्षत्रबन्धो स्थितोऽस्म्येष यद् बलं तद् विदर्शय ।
नाशयाम्यद्य ते दर्पं शस्त्रस्य तव गाधिज ॥ ३ ॥
"क्षत्रियधमा ! घे, हा मी उभा आहे. तुझ्यापाशी जे बळ असेल ते दाखव. गाधिपुत्रा ! आज तुझ्या अस्त्र-शस्त्रांच्या ज्ञानाच्या गर्वाला मी आता नष्ट करून टाकतो (तुझी सर्व शक्ति निष्क्रिय करतो). ॥ ३ ॥
क्व च ते क्षत्रियबलं क्व च ब्रह्मबलं महत् ।
पश्य ब्रह्मबलं दिव्यं मम क्षत्रियपांसन ॥ ४ ॥
क्षत्रियकुलकलंका ! कुठे तुझे क्षात्र बल आणि कुठे हे ब्रह्मबल ! माझ्या दिव्य ब्रह्मबलाला पाहून घे." ॥ ४ ॥
तस्यास्त्रं गाधिपुत्रस्य घोरमाग्नेयमुत्तमम् ।
ब्रह्मदण्डेन तच्छान्तमग्नेर्वेग इवाम्भसा ॥ ५ ॥
पाणी पडल्यावर जळत असणार्‍या आगीचा वेग जसा शांत होतो तसे गाधिपुत्र विश्वामित्रांचे ते उत्तम आणि भयंकर आग्नेयास्त्र वसिष्ठांच्या ब्रह्मदण्डामुळे शांत झाले. ॥ ५ ॥
वारुणं चैव रौद्रं च ऐन्द्रं पाशुपतं तथा ।
ऐषीकं चापि चिक्षेप कुपितो गाधिनन्दनः ॥ ६ ॥
तेव्हां गाधिपुत्र विश्वामित्रांनी कुपित होऊन वारुण, रौद्र, ऐन्द्र, पाशुपत आणि ऐषीक नामक अस्त्रांचा प्रयोग केला. ॥ ६ ॥
मानवं मोहनं चैव गांधर्वं स्वापनं तथा ।
जृंभणं मादनं चैव संतापनविलापने ॥ ७ ॥

शोषणं दारणं चैव वज्रमस्त्रं सुदुर्जयम् ।
ब्रह्मपाशं कालपाशं वारुणं पाशमेव च ॥ ८ ॥

पिनाकमस्त्रं दयितं शुष्कार्द्रे अशनी तथा ।
दण्डास्त्रमथ पैशाचं क्रौञ्चमस्त्रं तथैव च ॥ ९ ॥

धर्मचक्रं कालचक्रं विष्णुचक्रं तथैव च ।
वायव्यं मथनं चैव अस्त्रं हयशिरस्तथा ॥ १० ॥

शक्तिद्वयं च चिक्षेप कङ्‍कालं मुसलं तथा ।
वैद्याधरं महास्त्रं च कालास्त्रमथ दारुणम् ॥ ११ ॥

त्रिशूलमस्त्रं घोरं च कापालमथ कङ्‍कणम् ।
एतान्यस्त्राणि चिक्षेप सर्वाणि रघुनन्दन ॥ १२ ॥
'रघुनन्दना ! त्यानंतर क्रमशः मानव, मोहन, गांधर्व, स्वापन, जृम्भण, मादन, संतापन, विलापन, शोषण, विदारण, सुदुर्जय, वज्रास्त्र, ब्रह्मपाश, कालपाश, वारुणपाश, परमप्रिय पिनाकास्त्र, कोरडी आणि ओली दोन्ही प्रकारची अशनि, दण्डास्त्र, पैशाचास्त्र, क्रौञ्चास्त्र, धर्मचक्र, कालचक्र, विष्णुचक्र, वायवास्त्र, मंथनास्त्र, हयशिरा, दोन प्रकारच्या शक्ति, कंकाल, मुसळ, महान वैद्यधरास्त्र, दारुण कालास्त्र, भयंकर त्रिशूलास्त्र, कापालास्त्र आणि कंकणास्त्र - ही सर्व अस्त्रे वसिष्ठांवर चालविली. ॥ ७-१२ ॥
वसिष्ठे जपतां श्रेष्ठे तदद्‍भुतमिवाभवत् ।
तानि सर्वाणि दण्डेन ग्रसते ब्रह्मणः सुतः ॥ १३ ॥
जप करणारांत श्रेष्ठ महर्षि वसिष्ठांवर इतक्या अस्त्रांचा प्रहार, जी एक अद्‍भुत अशी घटना होती, परंतु ब्रह्मदेवांचे पुत्र वसिष्ठ यांनी त्या सर्व अस्त्रांना केवळ आपल्या दण्डानेच नष्ट करून टाकले. ॥ १३ ॥
तेषु शान्तेषु ब्रह्मास्त्रं क्षिप्तवान् गाधिनन्दनः ।
तदस्त्रमुद्यतं दृष्ट्‍वा देवाः साग्निपुरोगमाः ॥ १४ ॥

देवर्षयश्च सम्भ्रान्ता गन्धर्वाः समहोरगाः ।
त्रैलोक्यमासीत् संत्रस्तं ब्रह्मास्त्रे समुदीरिते ॥ १५ ॥
ती सर्व अस्त्रे शांत झाल्यावर गाधिनन्दन विश्वामित्रांनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. ब्रह्मास्त्राला उद्यत पाहून अग्नि आदि देवता, देवर्षि, गंधर्व, आणि मोठमोठे नागही भयभीत झाले, भयकंपित झाले. ब्रह्मास्त्र वर उठताच तिन्ही लोकांतील प्राण्यांचा थरकाप उडाला. ॥ १४-१५ ॥
तदप्यस्त्रं महाघोरं ब्राह्मं ब्राह्मेण तेजसा ।
वसिष्ठो ग्रसते सर्वं ब्रह्मदण्डेन राघव ॥ १६ ॥
'राघवा ! वसिष्ठांनी अपल्या ब्रह्मतेजाच्या प्रभावाने त्या महाभयंकर ब्रह्मास्त्रालाही ब्रह्मदण्डाच्या द्वारेच शांत केले. ॥ १६ ॥
ब्रह्मास्त्रं ग्रसमानस्य वसिष्ठस्य महात्मनः ।
त्रैलोक्यमोहनं रौद्रं रूपमासीत् सुदारुणम् ॥ १७ ॥
त्या ब्रह्मास्त्राला शांत करते समयी महात्मा वसिष्ठांचे ते रौद्ररूप तिन्ही लोकांना मोहित (अचंबित) करणारे आणि अत्यंत भयंकर दिसत होते. ॥ १७ ॥
रोमकूपेषु सर्वेषु वसिष्ठस्य महात्मनः ।
मरीच्य इव निष्पेतुरग्नेर्धूमाकुलार्चिषः ॥ १८ ॥
महात्मा वसिष्ठांच्या समस्त रोमकूपांतून किरणांप्रमाणे धूमयुक्त आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. ॥ १८ ॥
प्राज्वलद् ब्रह्मदण्डश्च वसिष्ठस्य करोद्यतः ।
विधूम इव कालाग्नेर्यमदण्ड इवापरः ॥ १९ ॥
वसिष्ठांच्या हातात उचलून धरलेला, द्वितीय यमदण्डासमान असलेला तो ब्रह्मदण्ड धूमरहित कालाग्नि प्रमाणे प्रज्वलित झाला होता. ॥ १९ ॥
ततोऽस्तुवन् मुनिगणा वसिष्ठं जपतां वरम् ।
अमोघं ते बलं ब्रह्मंस्तेजो धारय तेजसा ॥ २० ॥
त्यासमयी समस्त मुनिगण मंत्र जपणारात श्रेष्ठ वसिष्ठ मुनिंची स्तुति करीत असतांना म्हणाले, "ब्रह्मन् ! आपले बल अमोघ आहे. आपण आपल्या तेजाला आपल्या शक्तिनेच आवरावे. ॥ २० ॥
निगृहीतस्त्वया ब्रह्मन् विश्वामित्रो महाबलः ।
अमोघं ते बलं श्रेष्ठ लोकाः संतु गतव्यथाः ॥ २१ ॥
'महाबलाढ्य विश्वामित्र आपल्याकडून पराजित झाले आहेत. मुनिश्रेष्ठ ! आपले बल अमोघ आहे. आता आपण शांत व्हावे म्हणजे लोकांची व्यथा दूर होईल. ॥ २१ ॥
एवमुक्तो महातेजाः शमं चक्रे महाबलः ।
विश्वामित्रो विनिकृतो विनिःश्वस्येदमब्रवीत् ॥ २२ ॥
महर्षिंनी असे म्हटल्यावर महातेजस्वी महाबली वसिष्ठ शांत झाले आणि पराजित विश्वामित्र दीर्घ श्वास घेऊन असे म्हणाले - ॥ २२ ॥
धिग् बलं क्षत्रियबलं ब्रह्मतेजोबलं बलम् ।
एकेन ब्रह्मदण्डेन सर्वास्त्राणि हतानि मे ॥ २३ ॥
'क्षत्रियाच्या बलाचा धिक्कार असो. ब्रह्मतेजाने प्राप्त होणारे बलच वास्तविक बल आहे. कारण आज एका ब्रह्मदण्डाने माझ्या सर्व अस्त्रांना निस्तेज केले आहे. ॥ २३ ॥
तदेतत् प्रसमीक्ष्याहं प्रसन्नेन्द्रियमानसः ।
तपो महत् समास्थास्ये यद् वै ब्रह्मत्वकारणम् ॥ २४ ॥
'या घटनेला प्रत्यक्ष पाहून आता मी आपले मन आणि इंद्रियांना निर्मल करून अशा महान तपाचे अनुष्ठान करीन की जे माझ्यासाठी ब्राह्मणत्वाच्या प्राप्तिचे कारण होईल.' ॥ २४ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे षट्पञ्चाशः सर्गः ॥ ५६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा छप्पन्नावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५६ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP