श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ शततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामरावणयोर्युद्धं, रवणस्य शक्त्याी लक्ष्मणस्य मूर्छा, रावणस्य युद्धात् पलायनं च -
राम आणि रावणाचे युद्ध, रावणाच्या शक्तिने लक्ष्मणांचे मूर्च्छित होणे तसेच रावणाचे युद्धातून पळून जाणे -
तस्मिन् प्रतिहतेऽस्त्रे तु रावणो राक्षसाधिपः ।
क्रोधं च द्विगुणं चक्रे क्रोधाच्चास्त्रमनन्तरम् ।। १ ।।

मयेन विहितं रौद्रं अन्यदस्त्रं महाद्युतिः ।
उत्स्रष्टुं रावणो घोरं राघवाय प्रचक्रमे ।। २ ।।
आपले ते अस्त्र नष्ट झाल्यावर महातेजस्वी राक्षसराज रावणाने दुप्पट क्रोध प्रकट केला. त्याने क्रोधवश राघवांवर एक दुसरेच भयंकर अस्त्र सोडण्याचे आयोजन केले, जे मयासुराने बनविले होते. ॥१-२॥
ततः शूलानि निश्चेरुः गदाश्च मुसलानि च ।
कार्मुकाद् दीप्यमानानि वज्रसाराणि सर्वशः ।। ३ ।।

मुद्‌गराः कूटपाशाश्च दीप्ताश्चाशनयस्तथा ।
निष्पेतुर्विविधास्तीक्ष्णा वाता इव युगक्षये ।। ४ ।।
त्यासमयी रावणाच्या धनुष्यातून वज्रासमान दृढ आणि चमकणारी शूल, गदा, मुसळ, मुद्‍गर, कूटपाश तसेच चमचमणारी अशनि आदि निरनिराळ्या प्रकारची तीक्ष्ण अस्त्रे सुटू लागली, जणु प्रलयकाळी वायुचीच विविध रूपे प्रकट होत होती. ॥३-४॥
तदस्त्रं राघवः श्रीमान् उत्तमास्त्रविदां वरः ।
जघान परमास्त्रेण गान्धर्वेण महाद्युतिः ।। ५ ।।
तेव्हा उत्तम अस्त्रांचे ज्ञाते लोकांमध्ये श्रेष्ठ महातेजस्वी श्रीमान्‌ राघवांनी गांध नामक श्रेष्ठ अस्त्राच्या द्वारे रावणाच्या त्या अस्त्राला शान्त केले. ॥५॥
तस्मिन् प्रतिहतेऽस्त्रे तु राघवेण महात्मना ।
रावणः क्रोधताम्राक्षः सौरमस्त्रमुदीरयत् ।। ६ ।।
महात्मा राघवांकडून ते अस्त्र प्रतिहत झाल्यावर रावणाचे नेत्र क्रोधाने लाल झाले आणि त्याने सूर्यास्त्राचा प्रयोग केला. ॥६॥
ततश्चक्राणि निष्पेतुः भास्वराणि महान्ति च ।
कार्मुकाद्‌भीमवेगस्य दशग्रीवस्य धीमतः ।। ७ ।।
मग तर भयानक वेगशाली बुद्धिमान्‌ राक्षस दशग्रीव याच्या धनुष्यातून मोठ मोठी तेजस्वी चक्रे प्रकट होऊ लागली. ॥७॥
तैरासीद्‌ गगनं दीप्तं सम्पतद्‌भिः समन्ततः ।
पतद्‌भिश्च दिशो दीप्ताः चन्द्रसूर्यग्रहैरिव ।। ८ ।।
चंद्रमा आणि सूर्य आदि ग्रहांप्रमाणे आकाराची ती दीप्तिमान्‌ अस्त्रे-शस्त्रे सर्वत्र प्रकट होत होती आणि खाली पडत होती. त्यांच्यामुळे आकाशात प्रकाश पसरला आणि सर्व दिशा उद्‍भासित झाल्या. ॥८॥
तानि चिच्छेद बाणौघैः चक्राणि स तु राघवः ।
आयुधानि च चित्राणि रावणस्य चमूमुखे ।। ९ ।।
परंतु राघवांनी आपल्या बाणसमूहांच्या द्वारे सेनेच्या तोंडावरच रावणाच्या त्या चक्रांचे आणि विचित्र आयुधांचे तुकडे तुकडे करून टाकले. ॥९॥
तदस्त्रं तु हतं दृष्ट्‍वा रावणो राक्षसाधिपः ।
विव्याध दशभिर्बाणै रामं सर्वेषु मर्मसु ।। १० ।।
ते अस्त्र नष्ट झालेले पाहून राक्षसराज रावणाने दहा बाणांच्या द्वारे रामांच्या सर्व मर्मस्थानी गंभीर आघात केले. ॥१०॥
स विद्धो दशभिर्बाणैः महाकार्मुकनिःसृतैः ।
रावणेन महातेजा न प्राकम्पत राघवः ।। ११ ।।
रावणाच्या विशाल धनुष्यातून सुटलेल्या त्या दहा बाणांनी घायाळ होऊनही महातेजस्वी राघव विचलित झाले नाहीत. ॥११॥
ततो विव्याध गात्रेषु सर्वेषु समितिञ्जयः ।
राघवस्तु सुसङ्‌क्रुद्धो रावणं बहुभिः शरैः ।। १२ ।।
त्यानंतर समरविजयी राघवांनी अत्यंत कुपित होऊन बरेचसे बाण मारून रावणाच्या सर्व अंगांवर जखमा केल्या. ॥१२॥
एतस्मिन्नन्तरे क्रुद्धो राघवस्यानुजो बली ।
लक्ष्मणः सायकान् सप्त जग्राह परवीरहा ।। १३ ।।
यांतच मध्ये शत्रुवीरांचा संहार करणार्‍या महाबली रामानुज लक्ष्मणांनी कुपित होऊन सात सायक हातात घेतले. ॥१३॥
तैः सायकैर्महावेगै रावणस्य महाद्युतिः ।
ध्वजं मनुष्यशीर्षं तु तस्य चिच्छेद नैकधा ।। १४ ।।
त्या महान्‌ वेगशाली सायकांच्या द्वारा महातेजस्वी सौमित्रांनी रावणाची ध्वजा, जिच्यावर मनुष्याच्या कवटीचे चिन्ह होते, तिचे कित्येक तुकडे करून टाकले. ॥१४॥
सारथेश्चापि बाणेन शिरो ज्वलितकुण्डलम् ।
जहार लक्ष्मणः श्रीमान् नैर्ऋतस्य महाबलः ।। १५ ।।
यानंतर महाबली श्रीमान्‌ लक्ष्मणांनी एका बाणाने त्या राक्षसराजाच्या सारथ्याचे, झगमगणार्‍या कुण्डलांनी मण्डित मस्तकही कापून टाकले. ॥१५॥
तस्य बाणैश्च चिच्छेद धनुर्गजकरोपमम् ।
लक्ष्मणो राक्षसेन्द्रस्य पञ्चभिर्निशितैस्तदा ।। १६ ।।
एवढेच नव्हे तर लक्ष्मणांनी पाच तीक्ष्ण बाण मारून त्या राक्षसराजाच्या हत्तीच्या सोंडे समान मोठ्‍या धनुष्यालाही छाटून टाकले. ॥१६॥
नीलमेघनिभांश्चास्य सदश्वान् पर्वतोपमान् ।
जघानाप्लुत्य गदया रावणस्य विभीषणः ।। १७ ।।
त्यानंतर विभीषणांनी उसळून आपल्या गदेने रावणाच्या नील मेघासमान सुंदर कान्ति असणार्‍या सुंदर पर्वताकार घोड्‍यांनाही मारून खाली पाडले. ॥१७॥
हताश्वाद् तु तदा वेगाद् अवप्लुत्य महारथात् ।
क्रोधमाहारयत् तीव्रं भ्रातरं प्रति रावणः ।। १८ ।।
घोडे मारले गेल्यावर रावणाने आपल्या विशाल रथांतून वेगपूर्वक खाली उडी मारली आणि आपल्या भावाचा त्याला फारच राग आला. ॥१८॥
ततः शक्तिं महाशक्तिः प्रदीप्तां अशनीमिव ।
विभीषणाय चिक्षेप राक्षसेन्द्रः प्रतापवान् ।। १९ ।।
तेव्हा त्या महान्‌ शक्तिशाली प्रतापी राक्षसराजाने विभीषणाला मारण्यासाठी एक वज्रासमान प्रज्वलित शक्ति फेकली. ॥१९॥
अप्राप्तामेव तां बाणैः त्रिभिश्चिच्छेद लक्ष्मणः ।
अथोदतिष्ठत् सन्नादो वानराणां महारणे ।। २० ।।
ती शक्ति अद्याप विभीषणापर्यंत पोहोचलीही नव्हती की तोच लक्ष्मणांनी तीन बाण मारून तिला मध्येच छेदून टाकले. हे पाहून त्या महासमरात वानरांचा महान्‌ हर्षनाद निनादू लागला. ॥२०॥
संपपात त्रिधा छिन्ना शक्तिः काञ्चनमालिनी ।
सविस्फुलिङ्‌गा ज्वलिता महोल्केव दिवश्च्युता ।। २१ ।।
सोन्याच्या माळेने अलंकृत ती शक्ति तीन भागात विभक्त होऊन पृथ्वीवर पडली, जणु आकाशातून ठिणग्यांसहित फार मोठी उल्काच तुटून पृथ्वीवर पडली असावी. ॥२१॥
ततः सम्भाविततरां कालेनापि दुरासदाम् ।
जग्राह विपुलां शक्तिं दीप्यमानां स्वतेजसा ।। २२ ।।
त्यानंतर रावणाने विभीषणाला मारण्यासाठी एक अशी विशाल शक्ति हातात घेतली, जी आपल्या अमोघतेसाठी विशेष विख्यात होती. काळही तिचा वेग सहन करू शकत नव्हता. ती शक्ति आपल्या तेजाने उद्दीप्त होत होती. ॥२२॥
सा वेगिता बलवता रावणेन दुरात्मना ।
जज्वाल सुमहातेजा शक्राशनिसमप्रभा ।। २३ ।।
दुरात्मा बलवान्‌ रावणाच्या द्वारा हातात घेतली गेलेली ती वेगशालीनी महातेजस्वी आणि वज्राप्रमाणे दीप्तिमती शक्ति आपल्या दिव्य तेजाने प्रज्वलित झाली. ॥२३॥
एतस्मिन्नन्तरे वीरो लक्ष्मणस्तं विभीषणम् ।
प्राणसंशयमापन्नं तूर्णमभ्यवपद्यत ।। २४ ।।
इतक्यातच विभीषणांना प्राण-संशयाच्या अवस्थेत पडलेले पाहून वीर लक्ष्मणांनी तात्काळ त्यांचे रक्षण केले. त्यांना पाठीशी घालून ते स्वतः शक्तिच्या समोर उभे राहिले. ॥२४॥
तं विमोक्षयितुं वीरः चापमायम्य लक्ष्मणः ।
रावणं शक्तिहस्तं वै शरवर्षैरवाकिरत् ।। २५ ।।
विभीषणांना वाचविण्यासाठी वीर लक्ष्मण आपले धनुष्य खेचून हातात शक्ति घेऊन उभा असलेल्या रावणावर बाणांची वृष्टि करू लागले. ॥२५॥
कीर्यमाणः शरौघेण विसृष्टेन महात्मना ।
स प्रहर्तुं मनश्चक्रे विमुखीकृतविक्रमः ।। २६ ।।
महात्मा लक्ष्मणांनी सोडलेल्या बाणसमूहांचे लक्ष्य बनून रावण आपल्या भावाला मारण्याच्या पराक्रमापासून विमुख झाला. आता त्याच्या मनात प्रहार करण्याची इच्छा राहिली नाही. ॥२६॥
मोक्षितं भ्रातरं दृष्ट्‍वा लक्ष्मणेन स रावणः ।
लक्ष्मणाभिमुखस्तिष्ठन् इदं वचनमब्रवीत् ।। २७ ।।
लक्ष्मणांनी माझ्या भावाला वाचवले हे पाहून रावण त्यांच्याकडे तोंड करून उभा राहिला आणि याप्रकारे बोलला - ॥२७॥
मोक्षितस्ते बलश्लाघिन् यस्मादेवं विभीषणः ।
विमुच्य राक्षसं शक्तिः त्वयीयं विनिपात्यते ।। २८ ।।
आपल्या बळासंबंधी घमेंड बाळगणार्‍या लक्ष्मणा ! तू असा प्रयास करून विभीषणाला वाचवले आहेस म्हणून आता या राक्षसाला सोडून मी तुझ्यावरच या शक्तिचा प्रहार करत आहे. ॥२८॥
एषा ते हृदयं भित्त्वा शक्तिर्लोहितलक्षणा ।
मद्‌बाहुपरिघोत्सृष्टा प्राणानादाय यास्यति ।। २९ ।।
ही शक्ति स्वभावतःच शत्रुच्या रक्ताने न्हाऊन निघणारी आहे. ही माझ्या हातातून सुटताच तुझ्या हृदयाला विदीर्ण करून प्राणांना आपल्या बरोबर घेऊन जाईल. ॥२९॥
इत्येवमुक्त्वा तां शक्तिं अष्टघण्टां महास्वनाम् ।
मयेन मायाविहितां अमोघां शत्रुघातिनीम् ।। ३० ।।

लक्ष्मणाय समुद्दिश्य ज्वलन्तीमिव तेजसा ।
रावणः परमक्रुद्धः चिक्षेप च ननाद च ।। ३१ ।।
असे म्हणून अत्यंत कुपित झालेल्या रावणाने मयासुराच्या मायेने निर्मित, आठ घंटांनी विभूषित तसेच महाभयंकर शब्द करणारी ती अमोघ आणि शत्रुघातिनी शक्ति, जी आपल्या तेजाने प्रज्वलित होत होती, लक्ष्मणांना लक्ष्य करून सोडून दिली आणि मोठ्‍याने गर्जना केली. ॥३०-३१॥
सा क्षिप्ता भीमवेगेन शक्राशनिसमस्वना ।
शक्तिरभ्यपतद् वेगाद् लक्ष्मणं रणमूर्धनि ।। ३२ ।।
वज्र आणि अशनि समान गडगडाट उत्पन्न करणारी ती शक्ति युद्धाच्या तोंडावर भयानक वेगाने सोडली गेली आणि लक्ष्मणांना वेगाने लागली. ॥३२॥
तामनुव्याहरच्छक्तिं आपतन्तीं स राघवः ।
स्वस्त्यस्तु लक्ष्मणायेति मोघा भव हतोद्यमा ।। ३३ ।।
लक्ष्मणांकडे येणार्‍या त्या शक्तिला लक्ष्य करून राघवांनी म्हटले - लक्ष्मणाचे कल्याण होवो. तुझ्या प्राणनाशविषयक उद्योग नष्ट होवो, आणि म्हणून तू व्यर्थ होऊन जा. ॥३३॥
रावणेन रणे शक्तिः क्रुद्धेनाशीविषोपमा ।
मुक्ताऽऽशूरस्यभीतस्य लक्ष्मणस्य ममज्ज सा ।। ३४ ।।
ती शक्ति विषधर सर्पासमान भयंकर होती. रणभूमीमध्ये कुपित झालेल्या रावणाने जेव्हा तिला सोडली तेव्हा ती तात्काळच निर्भय वीर लक्ष्मणांच्या छातीत बुडून गेली. ॥३४॥
न्यपतत् सा महावेगा लक्ष्मणस्य महोरसि ।
जिह्वेवोरगराजस्य दीप्यमाना महाद्युतिः ।। ३५ ।।

ततो रावणवेगेन सुदूरमवगाढया ।
शक्त्या निर्भिन्नहृदयः पपात भुवि लक्ष्मणः ।। ३६ ।।
नागराज वासुकिच्या जिव्हेप्रमाणे देदीप्यमान ती महातेजस्विनी आणि महावेगवान्‌ शक्ति जेव्हा लक्ष्मणांच्या विशाल वक्षःस्थळावर पडली तेव्हा रावणाच्या वेगामुळे खूप खोलपर्यंत आत घुसली. त्या शक्तिने हृदय विदीर्ण झाल्याने लक्ष्मण पृथ्वीवर कोसळले. ॥३५-३६॥
तदवस्थं समीपस्थो लक्ष्मणं प्रेक्ष्य राघवः ।
भ्रातृस्नेहान्महातेजा विषण्णहृदयोऽभवत् ।। ३७ ।।
महातेजस्वी राघव जवळच उभे होते. लक्ष्मणांना त्या अवस्थेत पाहून भ्रातृस्नेहामुळे ते मनातल्या मनात विषादात बुडून गेले. ॥३७॥
स मुहूर्तमिव ध्यात्वा बाष्पपर्याकुलेक्षणः ।
बभूव संरब्धतरो युगान्त इव पावकः ।। ३८ ।।
ते एक मुहूर्तपर्यंत चिंतेत बुडून राहिले. नेत्रात अश्रु आणून प्रलयकालच्या प्रज्वलित अग्निप्रमाणे अत्यंत रोषाने उद्दीप्त झाले. ॥३८॥
न विषादस्य कालोऽयं इति सञ्चिन्त्य राघवः ।
चक्रे सुतुमुलं युद्धं रावणस्य वधे धृतः ।
सर्वयत्‍नेन महता लक्ष्मणं परिवीक्ष्य च ।। ३९ ।।
ही विषादाची वेळ नाही असा विचार करून राघव रावणाच्या वधाचा निश्चय करून महान्‌ प्रयत्‍नाने सारी शक्ति एकवटून आणि लक्ष्मणांकडे पाहून अत्यंत भयंकर युद्ध करू लागले. ॥३९॥
स ददर्श ततो रामः शक्त्या भिन्नं महाहवे ।
लक्ष्मणं रुधिरादिग्धं सपन्नगमिवाचलम् ।। ४० ।।
त्यानंतर श्रीरामांनी त्या महासमरात शक्तिने विदीर्ण झालेल्या लक्ष्मणांकडे पाहिले. ते रक्तांत न्हाऊन तेथे पडलेले होते आणि सर्पयुक्त पर्वतासमान भासत होते. ॥४०॥
तामपि प्रहितां शक्तिं रावणेन बलीयसा ।
यत्‍नतस्ते हरिश्रेष्ठा न शेकुरवमर्दितुम् ।। ४१ ।।
अत्यंत बलवान्‌ रावणाने फेकलेल्या त्या शक्तिला लक्ष्मणांच्या छातीतून काढण्याचे खूप प्रयत्‍न करूनही ते श्रेष्ठ वानरगण त्यात सफल होऊ शकले नाहीत. ॥४१॥
अर्दिताश्चैव बाणौघैः ते प्रवेकेण रक्षसाम् ।
सौमित्रिं सा विनिर्भिद्य प्रविष्टा धरणीतलम् ।। ४२ ।।
कारण वानरही राक्षसशिरोमणी रावणाच्या बाण समूहांनी पीडित झालेले होते. ती शक्ति सौमित्राच्या शरीराला विदीर्ण करून धरणीतला पर्यंत पोहोचली होती. ॥४२॥
तां कराभ्यां परामृश्य रामः शक्तिं भयावहाम् ।
बभञ्ज समरे क्रुद्धो बलवान् विचकर्ष च ।। ४३ ।।
तेव्हा महाबली श्रीरामांनी ती भयंकर शक्ति आपल्या दोन्ही हातांनी पकडून लक्ष्मणांच्या शरीरातून बाहेर काढली आणि समरांगणात कुपित होऊन तिला तोडून टाकले. ॥४३॥
तस्य निष्कर्षतः शक्तिं रावणेन बलीयसा ।
शराः सर्वेषु गात्रेषु पातिता मर्मभेदिनः ।। ४४ ।।
श्रीराम जेव्हा लक्ष्मणांच्या शरीरातून ती शक्ति बाहेर काढत होते त्यावेळी महाबली रावण त्यांच्या संपूर्ण अंगांवर मर्मभेदी बाणांची वृष्टि करत राहिला होता. ॥४४॥
अचिन्तयित्वा तान् बाणान् समाश्लिष्य च लक्ष्णमम् ।
अब्रवीच्च हनूमन्तं सुग्रीवं च महाकपिम् ।। ४५ ।।
परंतु त्या बाणांची पर्वा न करता लक्ष्मणाला हृदयाशी धरून भगवान्‌ श्रीराम, हनुमान्‌ आणि महाकपि सुग्रीवास म्हणाले - ॥४५॥
लक्ष्मणं परिवार्यैवं तिष्ठध्वं वानरोत्तमाः
पराक्रमस्य कालोऽयं सम्प्राप्तो मे चिरेप्सितः ।। ४६ ।।
कपिवरांनो ! तुम्ही लोक लक्ष्मणांना याच प्रकारे सर्व बाजुनी घेरून उभे रहा. आता माझ्यासाठी जो मला चिरकाळापासून अभीष्ट होता, तो पराक्रम करून दाखवण्याचा अवसर आलेला आहे. ॥४६॥
पापात्मायं दशग्रीवो वध्यतां पापनिश्चयः ।
काङ्‌क्षतः चातकस्येव घर्मान्ते मेघदर्शनम् ।। ४७ ।।
या पापात्मा आणि पापपूर्ण विचार बाळगणार्‍या दशमुख रावणाला आता मारून टाकणे हेच उचित आहे. ज्याप्रमाणे चातकीला ग्रीष्म ऋतुच्या शेवटी मेघाच्या दर्शनाची इच्छा राहिलेली असते त्याचप्रकारे मीही याचा वध करण्यासाठी चिरकालापासून याला पाहू इच्छित होतो. ॥४७॥
अस्मिन् मुहूर्ते न चिरात् सत्यं प्रतिश्रुणोमि वः ।
अरावणमरामं वा जगद् द्रक्ष्यथ वानराः ।। ४८ ।।
वानरांनो ! मी या मुहूर्तामध्ये तुमच्या समोर ही सत्य प्रतिज्ञा करून सांगतो आहे की काही वेळातच हा संसार रावणरहित दिसून येईल अथवा रामरहित. ॥४८॥
राज्यनाशं वने वासं दण्डके परिधावनम् ।
वैदेह्याश्च परामर्शो रक्षोभिश्च समागमम् ।। ४९ ।।

प्राप्तं दुःखं महाघोरं क्लेशश्च निरयोपमः ।
अद्य सर्वमहं त्यक्ष्ये निहत्वा रावणं रणे ।। ५० ।।
माझ्या राज्याचा नाश, वनात निवास, दण्डकारण्यातील धावाधाव, वैदेही सीतेचे राक्षसद्वारा अपहरण तसेच राक्षसांबरोबरचा संग्राम - या सर्व कारणांमुळे मला महाघोर दुःख सहन करावे लागले आहे आणि नरकासारखे कष्ट सोसावे लागले आहेत, परंतु रणभूमीमध्ये रावणाचा वध करून आज मी त्या सार्‍या दुःखातून सुटून जाईन. ॥४९-५०॥
यदर्थं वानरं सैन्यं समानीतमिदं मया ।
सुग्रीवश्च कृतो राज्ये निहत्वा वालिनं रणे ।
यदर्थं सागरः क्रान्तः सेतुर्बद्धश्च सागरे ।। ५१ ।।

सोऽयमद्य रणे पापः चक्षुर्विषयमागतः ।
चक्षुर्विषयमागम्य नायं जीवितुमर्हति ।। ५२ ।।
ज्याच्यासाठी मी वानरांची ही विशाल सेना बरोबर आणली आहे, ज्याच्यामुळे मी युद्धात वालीचा वध करून सुग्रीवाला राज्यावर बसविले आहे तसेच ज्याच्या उद्देश्याने समुद्रावर पूल बांधला आहे आणि त्याला पार केले आहे तो पापी रावण आज युद्धात माझ्या डोळ्यांसमोर उपस्थित आहे. माझ्या दृष्टिपथात येऊन आता हा जिवंत राहाण्यास योग्य नाही आहे. ॥५१-५२॥
दृष्टिं दृष्टिविषस्येव सर्पस्य मम रावणः ।
यथा वा वैनतेयस्य दृष्टिं प्राप्तो भुजंगमः ।। ५३ ।।
डोळ्यासमोर येऊन जसे कोणी मनुष्य जिवंत राहू शकत नाही अथवा विनतानंदन गरूडाच्या दृष्टिस पडून जसा कोणी महान्‌ सर्प जीवित वाचू शकत नाही त्याच प्रकारे आज रावण, माझ्या समोर येऊन जिवंत अथवा सकुशल परत जाऊ शकत नाही. ॥५३॥
स्वस्थाः पश्यत दुर्धर्षा युद्धं वानरपुङ्‌गवाः ।
आसीनाः पर्वताग्रेषु ममेदं रावणस्य च ।। ५४ ।।
दुर्धर्ष वानरश्रेष्ठांनो ! आता तुम्ही लोक पर्वत शिखरावर बसून माझे आणि रावणाचे हे युद्ध सुखपूर्वक बघा. ॥५४॥
अद्य पश्यंतु रामस्य रामत्वं मम संयुगे ।
त्रयो लोकाः सगन्धर्वाः सदेवाः सर्षिचारणाः ।। ५५ ।।
आज संग्रामात देवता, गंधर्व, सिद्ध, ऋषि आणि चारणांसहित तीन्ही लोकांतील प्राणी रामाचे रामत्व पाहू देत. ॥५५॥
अद्य कर्म करिष्यामि यल्लोकाः सचराचराः ।
सदेवाः कथयिष्यन्ति यावद् भूमिर्धरिष्यति ।
समागम्य सदा लोके यथा युद्धं प्रवर्तितम् ।। ५६ ।।
आज मी असा पराक्रम प्रकट करीन की जोपर्यंत पृथ्वी कायम राहील, तो पर्यंत चराचर जगतातील जीव आणि देवताही सदा लोकात एकत्र जमून ज्याची चर्चा करतील आणि ज्याप्रकारे युद्ध झाले आहे, त्याप्रकारे एक दुसर्‍यास सांगतील. ॥५६॥
एवमुक्त्वा शितैर्बाणैः तप्तकाञ्चनभूषणैः ।
आजघान रणे रामः दशग्रीवं समाहितः ।। ५७ ।।
असे म्हणून भगवान्‌ श्रीराम सावधान होऊन आपल्या सुवर्णभूषित तीक्ष्ण बाणांनी रणभूमीमध्ये दशानन रावणाला घायाळ करू लागले. ॥५७॥
तथा प्रदीप्तैर्नाराचैः मुसलैश्चापि रावणः ।
अभ्यवर्षत् तदा रामं धाराभिरिव तोयदः ।। ५८ ।।
याप्रमाणे जसा मेघ जलधारा वर्षत राहतो त्याप्रमाणे रावणही श्रीरामांच्यावर चमकणार्‍या नाराच्यांची आणि मुसळांची वृष्टि करू लागला. ॥५८॥
रामरावणमुक्तानां अन्योन्यं अभिनिघ्नताम् ।
वराणां च शराणां च बभूव तुमुलः स्वनः ।। ५९ ।।
एक दुसर्‍यावर प्रहार करीत असणार्‍या राम आणि रावण यांनी सोडलेले श्रेष्ठ बाण परस्परात टक्कर होण्यामुळे फारच भयंकर शब्द प्रकट होत होता. ॥५९॥
विभिन्नाश्च विकीर्णाश्च रामरावणयोः शराः ।
अन्तरिक्षात् प्रदीप्ताग्रा निपेतुर्धरणीतले ।। ६० ।।
श्रीराम आणि रावणाचे बाण परस्परांमुळे छिन्न-भिन्न होऊन आकाशातून पृथ्वीवर पडत होते. त्या समयी त्यांचे अग्रभाग फार उद्दीप्त दिसून येत होते. ॥६०॥
तयोर्ज्यातलनिर्घोषो रामरावणयोर्महान् ।
त्रासनः सर्वभूतानां सम्बभूवाद्‌भुतोपमः ।। ६१ ।।
राम आणि रावण यांच्या धनुष्यांपासून प्रकट झालेला टणत्काराचा ध्वनि समस्त प्राण्यांच्या मनात त्रास उत्पन्न करत होता आणि फार अद्‍भुत प्रतीत होत होता. ॥६१॥
स कीर्यमाणः शरजालवृष्टिभिः
महात्मना दीप्तधनुष्मतार्दितः ।
भयात् प्रदुद्राव समेत्य रावणो
यथाऽनिलेनाभिहतो बलाहकः ।। ६२ ।।
जसा वायुच्या मार्‍याने मेघ छिन्न-भिन्न होऊन जातो त्याच प्रकारे दीप्तिमान्‌ धनुष्य धारण करणार्‍या महात्मा श्रीरामांच्या बाणसमूहांच्या दृष्टिने आहत आणि पीडित झालेला रावण भयाने तेथून पळून गेला. ॥६२॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे शततमः सर्गः ।। १०० ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा शंभरावा सर्ग पूरा झाला. ॥१००॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP