श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चतु:षष्टितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

कुंभकर्णस्य प्रत्याक्षिप्य महोदरेण युद्धं विनैवाभीष्टवस्तुनो लाभोपायस्य कथनम् -
महोदराचे कुंभकर्णाप्रति आक्षेप करून रावणाला युद्धाशिवायच अभीष्ट वस्तुच्या प्राप्तीचा उपाय सांगणे -
तदुक्तमतिकायस्य बलिनो बाहुशालिनः ।
कुंभकर्णस्य वचनं श्रुत्वोवाच महोदरः ॥ १ ॥
आपल्या भुजांनी सुशोभित होणार्‍या विशालकाय तसेच बलवान्‌ राक्षस कुंभकर्णाचे हे वचन ऐकून महोदराने म्हटले - ॥१॥
कुंभकर्ण कुले जातो धृष्टः प्राकृतदर्शनः ।
अवलिप्तो न शक्नोषि कृत्यं सर्वत्र वेदितुम् ॥ २ ॥
कुंभकर्णा ! तू उत्तम कुळात उत्पन्न झाला आहेस परंतु तुझी दृष्टि (बुद्धि) निम्न श्रेणीच्या लोकांप्रमाणे आहे. तू धीट आणि घमेंडी आहेस, म्हणून सर्व विषयात काय कर्तव्य आहे, ही गोष्ट जाणू शकत नाहीस. ॥२॥
न हि राजा न जानीते कुंभकर्ण नयानयौ ।
त्वं तु कैशोरकास् धृष्टः केवलं वक्तुमिच्छसि ॥ ३ ॥
कुंभकर्णा ! आपले महाराज नीति आणि अनीतिला जाणत नाहीत, अशी गोष्ट नाही आहे. तू केवळ आपल्या किशोर वयामुळे धृष्टतापूर्वक या प्रकारच्या गोष्टी सांगू इच्छितोस. ॥३॥
स्थानं वृद्धिं च हानिं च देशकालविधानवित् ।
आत्मनश्च परेषां च बुध्यते राक्षसर्षभः ॥ ४ ॥
राक्षसशिरोमणी रावण देशकालासाठी उचित कर्तव्याला जाणत आहेत आणि आपले तसेच शत्रूपक्षाचे स्थान, वृद्धि तसेच क्षय यांना उत्तम प्रकारे समजतात. ॥४॥
यत् त्वशक्यं बलवता कर्तुं प्राकृतबुद्धिना ।
अनुपासितवृद्धेन कः कुर्यात् तादृशं बुधः ॥ ५ ॥
ज्याने वृद्ध पुरुषांची उपासना अथवा सत्संग केला नसेल आणि ज्याची बुद्धि प्राकृत आहे, असा बलवान्‌ पुरुषही जे कर्म करू शकत नाही- ज्याला अनुचित समजतो - असे कर्म कोणी बुद्धिमान्‌ पुरुष कसे करू शकेल ? ॥५॥
यांस्तु धर्मार्थकामांस्त्वं ब्रवीषि पृथगाश्रयान् ।
अनुबोद्धुं स्वभावेन नहि लक्षणमस्ति ते ॥ ६ ॥
ज्या अर्थ, धर्म आणि कामाला तू पृथक - पृथक आश्रय असणारे सांगत आहेस, त्यांना ठीक-ठीक समजण्याची शक्ति तुझ्यामध्ये नाही आहे. ॥६॥
कर्म चैव हि सर्वेषां कारणानां प्रयोजनम् ।
श्रेयः पापीयसां चात्र फलं भवति कर्मणाम् ॥ ७ ॥
सुखाचे साधनभूत जो त्रिवर्ग (धर्म, अर्थ आणि काम) आहे, त्या सर्वांचे एकमात्र कर्मच प्रयोजक आहे. (कारण जो कर्मानुष्ठान रहित आहे, त्याचा धर्म, अर्थ अथवा काम - कुठला ही पुरुषार्थ सफल होत नाही.) याच तर्‍हेने एका पुरुषाच्या प्रयत्‍नाने सिद्ध होणार्‍या सर्व शुभाशुभ व्यापारांचे फळ येथे एकाच कर्त्याला प्राप्त होते. (या प्रकारे जेव्हा परस्पर विरूद्ध असूनही धर्म आणि कामाचे अनुष्ठान एकाच पुरुषाद्वारे होत असलेले दिसून येते, तेव्हा तुझे म्हणणे की केवळ धर्माचेच अनुष्ठान केले पाहिजे, धर्म विरोधी कामाचे नाही, हे कसे संगत होऊ शकते ?) ॥७॥
निःश्रेयसफलावेव धर्मार्थावितरावपि ।
अधर्मानर्थयोः प्राप्तं फलं च प्रत्यवायिकम् ॥ ८ ॥
निष्काम भावाने केलेला धर्म (जप, ध्यान आदि) आणि अर्थ (धनसाध्य, यज्ञ, दान आदि) - हे चित्तशुद्धिद्वारा जरी नि:श्रेयस (मोक्ष) रूप फळाची प्राप्ति करविणारे आहेत तथापि कामना - विशेषाने स्वर्ग तसेच अभ्युदय आणि अन्य फळांचीही प्राप्ति करवितात. पूर्वोक्त जपादिरूप अथवा क्रियामय नित्यधर्माचा लोप झाल्यावर अधर्म आणि अनर्थ प्राप्त होतात आणि ते असताना प्रत्यवायजनित फळ भोगावे लागते. (परंतु काम्य-कर्म न केल्याने प्रत्यवाय होत नाही, ही धर्म आणि अर्थापेक्षा कामाची विशेषता आहे.) ॥८॥
ऐहलौकिकपारक्यं कर्म पुंभिर्निषेव्यते ।
कर्माण्यपि तु कल्याणि लभते काममास्थितः ॥ ९ ॥
जीवांना धर्म आणि अधर्माचे फळ या लोकात आणि परलोकात भोगावे लागते. परंतु जो कामना-विशेषाच्या उद्देश्याने यत्‍नपूर्वक कर्मांचे अनुष्ठान करतो. त्याला येथेही त्याच्या सुख-मनोरथाची प्राप्ती होऊन जाते. धर्म आदिंच्या फलाप्रमाणे त्याच्यासाठी कालान्तर अथवा लोकान्तराची अपेक्षा असत नाही. (याप्रकारे काम, धर्म आणि अर्थाहूनही विलक्षण सिद्ध होत असतो.) ॥९॥
तत्र क्लृप्तमिदं राज्ञा हृदि कार्यं मतं च नः ।
शत्रौ हि साहसं यत् तत् किमिवात्रापनीयते ॥ १० ॥
येथे राजासाठी कामरूपी पुरुषार्थाचे सेवन उचित आहे (**). असेच राक्षसराजाने आपल्या हृदयात निश्चित केले आहे आणि हीच आम्हां मंन्त्र्यांची ही संमति आहे. शत्रूच्या प्रति साहसपूर्ण कार्य करणे यात कुठली अनीति आहे. (म्हणून त्यांनी जे काही केले आहे, उचितच केले आहे.) ॥१०॥
(** - येथे महोदराने रावणाची खुशामत करण्यासाठी ’कामवादा’ची स्थापना अथवा प्रशंसा केली आहे. हे आदर्श मत नाही वास्तविक धर्म, अर्थ आणि काम यात धर्मच प्रधान आहे. म्हणून त्याच्या सेवनाने प्राणिमात्राचे कल्याण होऊ शकते.)
एकस्यैवाभियाने तु हेतुर्यः प्राहृतस्त्वया ।
तत्राप्यनुपपन्नं ते वक्ष्यामि यदसाधु च ॥ ११ ॥
तू युद्धासाठी आपण एकट्‍यानेच प्रस्थान करण्याविषयी जो हेतु दिला आहेस (आपल्या महान्‌ बलाच्या द्वारा शत्रुला परास्त करून टाकण्याची जी घोषणा केली आहेस.) त्यातही जी असंगत आणि अनुचित गोष्ट सांगितली गेली आहे, ती मी तुझ्या समोर ठेवतो. ॥११॥
येन पूर्वं जनस्थाने बहवोऽतिबला हताः ।
राक्षसा राघवं तं त्वं कथमेको जयिष्यसि ॥ १२ ॥
ज्यांनी पूर्वी जनस्थनात अनेक बलशाली राक्षसांना मारून टाकले होते, त्याच राघवांना तू एकटा कसा परास्त करशील ? ॥१२॥
ये पुरा निर्जितास्तेन जनस्थाने महौजसः ।
राक्षसांस्तान् पुरे सर्वान् भीतानद्य न पश्यसि ॥ १३ ॥
जनस्थानात श्रीरामांनी प्रथम ज्या महान्‌ बलशाली निशाचरांना मारून पळवून लावले होते, ते आजही या लंकापुरीत विद्यमान आहेत आणि त्यांचे भय अद्यापही दूर झालेले नाही. काय तू त्या राक्षसांना पहात नाहीस ? ॥१३॥
तं सिंहमिव संक्रुद्धं रामं दशरथात्मजम् ।
सर्पं सुप्तमहो बुद्ध्वा प्रबोधयितुमिच्छसि ॥ १४ ॥
दाशरथि श्रीराम अत्यंत कुपित झालेल्या सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि भयंकर आहेत, काय तू त्यांच्याशी भिडण्याचे साहस करशील ? काय जाणून बुजून झोपलेल्या सर्पाला जागे करू इच्छित आहेस ? तुझ्या मूर्खपणाचे आश्चर्य वाटते आहे ! ॥१४॥
ज्वलन्तं तेजसा नित्यं क्रोधेन च दुरासदम् ।
कस्तं मृत्युमिवासह्यं आसादयितुमर्हति ॥ १५ ॥
श्रीराम सदाच आपल्या तेजाने देदिप्यमान आहेत. त्यांनी क्रोध केल्यावर ते अत्यंत दुर्जय आणि मृत्युसमान असह्य होतात. भले, मग कोण योद्धा त्यांचा सामना करू शकतो ? ॥१५॥
संशयस्थमिदं सर्वं शत्रोः प्रतिसमासने ।
एकस्य गमनं तात नहि मे रोचते भृशम् ॥ १६ ॥
आमची ही सारी सेनाही जर त्या अजेय शत्रूचा सामना करण्यासाठी उभी राहिली तर तिचे जीवनही संशयात पडू शकते. म्हणून तात ! युद्धासाठी तुझे एकट्‍याचे जाणे मला बिलकुल चांगले वाटत नाही. ॥१६॥
हीनार्थस्तु समृद्धार्थं को रिपुं प्राकृतं यथा ।
निश्चित्य जीवितत्यागे वशमानेतुमिच्छति ॥ १७ ॥
जो सहायकांनी संपन्न आणि जीवित त्यागासही तयार होऊन शत्रूंचा संहार करण्याचा निश्चय करणारा असतो, अशा शत्रुला अत्यंत साधारण मानून कोण असहाय योद्धा वश करून घेण्याची इच्छा करू शकतो ? ॥१७॥
यस्य नास्ति मनुष्येषु सदृशो राक्षसोत्तम ।
कथमाशंससे योद्धुं तुल्येनेन्द्रविवस्वतोः ॥ १८ ॥
राक्षस शिरोमणे ! मनुष्यांमध्ये ज्याची बरोबरी करणारा दुसरा कोणी नाही तसेच जो इंद्र आणि सूर्याच्या समान तेजस्वी आहे त्या श्रीरामांशी युद्ध करण्याचे धाडस तुला कसे होत आहे ? ॥१८॥
एवमुक्त्वा तु संरब्धं कुंभकर्णं महोदरः ।
उवाच रक्षसां मध्ये रावणं लोकरावणम् ॥ १९ ॥
रोषाच्या आवेशाने युक्त कुंभकर्णाला असे म्हणून महोदराने समस्त राक्षसांच्या मध्ये बसलेला, लोकांना रडविणार्‍या रावणास म्हटले - ॥१९॥
लब्ध्वा पुरस्ताद् वैदेहीं किमर्थं त्वं विलंबसे ।
यदीच्छसि तदा सीता वशगा ते भविष्यति ॥ २० ॥
महाराज ! आपण वैदेही सीतेला आपल्या समोर प्राप्त करूनही कशासाठी विलम्ब करत आहात ? आपण जेव्हा इच्छा कराल तेव्हा सीता आपल्याला वश होऊन जाईल. ॥२०॥
दृष्टः कश्चिदुपायो मे सीतोपस्थानकारकः ।
रुचिरश्चेत् स्वया बुध्या राक्षसेन्द्र ततः शृणु ॥ २१ ॥
राक्षसराज ! मला एक असा उपाय सुचला आहे की जो सीतेला आपल्या सेवेत उपस्थित करूनच राहील. आपण तो ऐकावा. ऐकून आपल्या बुद्धिने त्यावर विचार करावा आणि योग्य वाटला तर तो उपयोगात आणावा. ॥२१॥
अहं द्विजिह्वः संह्रादी कुंभकर्णो वितर्दनः ।
पञ्च रामवधायैते निर्यान्तीत्यवघोषय ॥ २२ ॥
आपण नगरात असे घोषित करून टाका कि महोदर, द्विजिद, संहृदी, कुंभकर्ण आणि वितर्दन हे पाच राक्षस रामाचा वध करण्यासाठी जात आहेत. ॥२२॥
ततो गत्वा वयं युद्धं दास्यामस्तस्य यत्‍न तः ।
जेष्यामो यदि ते शत्रून् नोपायैः कृत्यमस्ति नः ॥ २३ ॥
आम्ही लोक रणभूमीमध्ये जाऊन प्रयत्‍नपूर्वक रामांशी युद्ध करू. जर आपल्या शत्रूंवर आम्ही विजय मिळवू शकलो तर मग आपल्यासाठी सीतेला वश करण्यासाठी दुसर्‍या कोठल्या उपायाची आवश्यकताच राहाणार नाही. ॥२३॥
अथ जीवति नः शत्रुः वयं च कृतसंयुगाः ।
ततः समभिपत्स्यामो मनसा यत् समीक्षितम् ॥ २४ ॥
जर आपला शत्रु अजेय असल्यामुळे जिवंतच राहिला आणि आम्ही युद्ध करता करता मारले गेलो नाही तर आपण तो उपाय उपयोगात आणू, जो आपण मनात विचार करून निश्चित केला आहे. ॥२४॥
वयं युद्धादिहैष्यामो रुधिरेण समुक्षिताः ।
विदार्यं स्वतनुं बाणै रामनामाङ्‌कितैः शरैः ॥ २५ ॥

भक्षितो राघवोऽस्माभिः लक्ष्मणश्चेति वादिनः ।
तव पादौ ग्रहीष्यामः त्वं नः कामं प्रपूरय ॥ २६ ॥
रामनामाने अंकित बाणांच्या द्वारा आपल्या शरीरास घायाळ करवून रक्ताने न्हाऊन आम्ही असे सांगत युद्धभूमीवरून येथे परत येऊ की आम्ही (राम) राघव आणि लक्ष्मणांना खाऊन टाकले आहे. त्यासमयी आम्ही आपले पाय धरून असे ही सांगू की आम्ही शत्रुला मारले आहे. म्हणून आपण आमची इच्छा पूर्ण करावी. ॥२५-२६॥
ततोऽवघोषय पुरे गजस्कन्धेन पार्थिव ।
हतो रामः सह भ्रात्रा ससैन्य इति सर्वतः ॥ २७ ॥
पृथ्वीनाथ ! तेव्हा आपण कुणाला तरी हत्तीच्या पाठीवर बसवून सर्व नगरात ही घोषणा करवावी की भाऊ आणि सेनेसहित राम मारले गेले आहेत. ॥२७॥
प्रीतो नाम ततो भूत्वा भृत्यानां त्वमरिन्दम ।
भोगांश्च परिवारांश्च कामांन् वसु च दापय ॥ २८ ॥

ततो माल्यानि वासांसि वीराणामनुलेपनम् ।
पेयं च बहु योधेभ्यः स्वयं च मुदितः पिब ॥ २९ ॥
शत्रुदमन ! इतकेच नव्हे तर आपण प्रसन्नता दाखवून आपल्या वीर सेवकांना त्यांच्या अभीष्ट वस्तु, तर्‍हे तर्‍हेची भोग सामग्री, दास-दासी आणि धन-रत्‍ने, आभूषणे, वस्त्रे आणि अनुलेपन देववावे. अन्य योद्ध्यांनाही बरेचसे उपहार द्यावे तसेच स्वत: ही आनंद साजरा करीत मद्यपान करावे. ॥२८-२९॥
ततोऽस्मिन् बहुलीभूते कौलीने सर्वतो गते ।
भक्षितः ससुहृद् रामो राक्षसैरिति विश्रुते ॥ ३० ॥

प्रविश्याश्वास्य चापि त्वं सीतां रहसि सान्त्वयन् ।
धनधान्यैश्च कामैश्च रत्‍नैःश्चैनां प्रलोभय ॥ ३१ ॥
त्यानंतर जेव्हा लोकांमध्ये सर्वत्र ही चर्चा पसरेल की राम आपल्या सुहृदांसहित राक्षसांचा आहार बनून गेले आहेत आणि सीतेच्या कानावरही ही गोष्ट पडेल तेव्हा आपण सीतेला समजाविण्यासाठी एकांतात तिच्या राहण्याच्या ठिकाणी जावे आणि नाना प्रकारे तिला धीर देऊन तिला धन-धान्य, नाना तर्‍हेचे भोग आणि रत्‍ने आदिंचा लोभ दाखवावा. ॥३०-३१॥
अनयोपधया राजन् भयशोकानुबंधया ।
अकामा त्वद्‌वशं सीता नष्टनाथा गमिष्यति ॥ ३२ ॥
राजन्‌ ! या प्रवञ्चनेमुळे स्वत:ला अनाथ मानणार्‍या सीतेचा शोक अधिकच वाढेल आणि ती इच्छा नसतांना ही आपल्या अधीन होऊन जाईल. ॥३२॥
रमणीयं हि भर्तारं विनष्टमधिगम्य सा ।
नैराश्यात् स्त्रीलघुत्वाच्च त्वद्‌वशं प्रतिपत्स्यते ॥ ३३ ॥
आपल्या रमणीय पतीचा विनाश झालेला जाणून ती निराशेमुळे आणि नारी-सुलभ चपलतेमुळे आपल्याला वश होऊन जाईल. ॥३३॥
सा पुरा सुखसंवृद्धा सुखार्हा दुःखकर्शिता ।
त्वय्यधीनं सुखं ज्ञात्वा सर्वथैव गमिष्यति ॥ ३४ ॥
ती पूर्वी सुखात वाढलेली आहे आणि सुख भोगण्यास योग्य आहे, परंतु या दिवसात दु:खाने दुर्बळ झालेली आहे. अशा स्थितिमध्ये आता आपल्याच अधीन स्वत:चे सुख आहे, असे समजून सर्वथा आपल्या सेवेमध्ये येऊन जाईल. ॥३४॥
एतत् सुनीतं मम दर्शनेन
रामं हि दृष्ट्‍वैव भवेदनर्थः ।
इहैव ते सेत्स्यति मोत्सुको भूः
महानयुद्धेन सुखस्य लाभः ॥ ३५ ॥
माझ्या दृष्टीने हीच सर्वात सुंदर नीति आहे. युद्धात तर श्रीरामांचे दर्शन होताच आपल्याला अनर्थाची (मृत्युची) प्राप्ती होऊ शकते म्हणून आपण युद्धस्थळी जाण्यासाठी उत्सुक न होता येथेच आपल्या अभीष्ट मनोरथाची सिद्धि होऊन जाईल. युद्धाशिवायच आपल्याला सुखाचा महान्‌ लाभ होईल. ॥३५॥
अदृष्टसैन्यो ह्यनवाप्तसंशयो
रिपुं त्वयुद्धेन जयन् जनाधिपः ।
यशश्च पुण्यं च महन्महीपते
श्रियं च कीर्तिं च चिरं समश्नुते ॥ ३६ ॥
महाराज ! जो राजा युद्धाशिवायच शत्रूवर विजय मिळवितो, त्याची सेना नष्ट होत नाही. त्याचे जीवनही संशयात पडत नाही, तो पवित्र आणि महान्‌ यश मिळवतो तसेच दीर्घकाळपर्यत लक्ष्मी आणि उत्तम कीर्तिचा उपभोग करतो. ॥३६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे चतुष्षष्ठितमः सर्गः ॥ ६४ ॥

याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा चौसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP