उत्तरदिग्वर्तीनि स्थानानि परिचाययता सुग्रीवेण शतबलिप्रभृतीनां तत्र प्रेषणम् -
|
सुग्रीवांचे उत्तर दिशेच्या स्थानांचा परिचय देऊन शतबली आदि वानरांना तेथे धाडणे -
|
ततः संदिश्य सुग्रीवः श्वशुरं पश्चिमां दिशम् । वीरं शतबलिं नाम वानरं वानरेश्वरः ॥ १ ॥ उवाच राजा सर्वज्ञः सर्ववानरसत्तमम् । वाक्यमात्महितं चैव रामस्य च हितं तदा ॥ २ ॥
|
याप्रकारे आपल्या श्वसुरांना पश्चिम दिशेकडे जाण्याचा संदेश देऊन सर्वज्ञ सर्व-वानर-शिरोमणी वानरेश्वर राजा सुग्रीव आपले हितैषी शतबली नामक वीर वानरास श्रीरामांच्या हिताची गोष्ट सांगू लागले- ॥१-२॥
|
वृतः शतसहस्रेण त्वद्विधानां वनौकसाम् । वैवस्वसुतैः सार्धं प्रतिष्ठस्व स्वमंत्रिभिः ॥ ३ ॥ दिशं ह्युदीचीं विक्रांत हिमशैलावतंसिकाम् । सर्वतः परिमार्गध्वं रामपत्नींि यशस्विनीम् ॥ ४ ॥
|
’पराक्रमी वीरा ! तुम्ही आपल्या सारख्याच एक लाख वनवासी वानरांना जे यमराजांचे पुत्र आहेत, बरोबर घेऊन आपल्या समस्त मत्र्यांसहित उत्तर दिशेमध्ये प्रवेश करा जी हिमालयरूपी आभूषणांनी विभूषित आहे आणि तेथे सर्व बाजूंना यशस्विनि श्रीरामपत्नी सीतेचे अन्वेषण करा. ॥३-४॥
|
अस्मिन् कार्ये विनिर्वृते कृते दाशरथेः प्रिये । ऋणान्मुक्ता भविष्यामः कृतार्थार्थविदां वराः ॥ ५ ॥
|
’आपल्या मुख्य प्रयोजनास जाणणार्या वीरांमध्ये श्रेष्ठ वानरांनो, जर वानरांच्या द्वारा (आमच्या कडून) दशरथनंदन भगवान् श्रीरामांचे हे कार्य संपन्न झाले तर आपण त्यांच्या उपकाराच्या ऋणांतून मुक्त आणि कृतार्थ होऊन जाऊं. ॥५॥
|
कृतं हि प्रियमस्माकं राघवेण महात्मना । तस्य चेत् प्रतिकारोऽस्ति सफलं जीवितं भवेत् ॥ ६ ॥
|
’महात्मा राघवांनी आम्हा लोकांचे प्रिय कार्य केलेले आहे. त्याची थोडीफार जरी परतफेड करता आली (करणे शक्य झाले) तर आमचे जीवन सफल होऊन जाईल. ॥६॥
|
अर्थिनः कार्यनिर्वृत्तिं अकर्तुरपि यश्चरेत् । तस्य स्यात् सफलं जन्म किं पुनः पूर्वकारिणः ॥ ७ ॥
|
’ज्याने काही उपकार केले नसतील, तो ही जर काही कार्यासाठी प्रार्थी होऊन आला असेल तर जो मनुष्य त्याचे कार्य सिद्ध करतो, त्याचा जन्मही सफल होतो, मग ज्याने पूर्वीच्या उपकाराच्या कार्याला सिद्ध केले असेल, त्याच्या जीवनाच्या सफलते विषयी तर काय सांगावे ? ॥७॥
|
एतां बुद्धिं समस्थाय दृश्यते जानकी यथा । तथा भवद्भिः कर्तव्यं अस्मत् प्रियहितैषिभिः ॥ ८ ॥
|
’ह्याच विचाराचा आश्रय घेऊन माझ्या हिताची आणि प्रियाची इच्छा करणार्या तुम्ही सर्व वानरांनी असा प्रयत्न केला पाहिजे की ज्यायोगे जानकी सीतेचा शोध लागेल. ॥८॥
|
अयं हि सर्वभूतानां मान्यस्तु नरसत्तमः । अस्मासु च गतः प्रीतिं रामः परपुरञ्जयः ॥ ९ ॥
|
’शत्रुंच्या नगरीवर विजय मिळविणारे हे नरश्रेष्ठ श्रीराम समस्त प्राण्यांसाठी माननीय आहेत. आम्हां लोकांवरही त्यांचे फार प्रेम आहे. ॥९॥
|
इमानि बहुगुर्गाणि नद्यः शैलांतराणि च । भवंतः परिमार्गंतु बुद्धिविक्रमसंपदा ॥ १० ॥
|
’तुम्ही सर्व लोक बुद्धि आणि पराक्रमाच्या द्वारा या अत्यंत दुर्गम प्रदेशात, पर्वत आणि नद्यांच्या तटावर जा - जाऊन सीतेचा शोध करा. ॥१०॥
|
तत्र म्लेच्छान् पुलिंदांश्च शूरसेनांस्तथैव च । प्रस्थलान् भरतांश्चैव कुरूंश्च सह मद्रकैः ॥ ११ ॥ कांबोजयवनांश्चैव शकानां पत्तनानि च । अन्वीक्ष्य दरदांश्चैव हिमवंतं विचिन्वथ ॥ १२ ॥
|
उत्तरेला म्लेंच्छ, पुलिंद, शूरसेन, प्रस्थल, भरत (इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापुरच्या आसपासचे प्रांत), कुरू (दक्षिण कुरू- कुरूक्षेत्राच्या आसपासची भूमी), भद्र, कंबोज, यवन, शकांचे देश आणि नगरात उत्तम प्रकारे अनुसंधान करून दरद देशात आणि हिमालय पर्वतावर शोधून काढा. ॥११-१२॥
|
लोध्रपद्मकखण्डेषु देवदारुवनेषु च । रावणः सह वैदेह्या मार्गितव्यस्ततस्ततः ॥ १३ ॥
|
’तेथे लोध्र आणि पद्मकाच्या झाडींच्या मध्ये तसे देवदारूच्या जंगलात वैदेही सहित रावणाचा शोध घेतला पाहिजे. ॥१३॥
|
ततः सोमाश्रमं गत्वा देवगंधर्वसेवितम् । कालं नाम महासानुं पर्वतं तु गमिष्यथ ॥ १४ ॥
|
’नंतर देवता आणि गंधर्वांनी सेवित सोमाश्रमा मधून जाऊन उंच शिखर असणार्या काल नामक पर्वतावर जा. ॥१४॥
|
महत्सु तस्य शैलेषु पर्वतेषु गुहासु च । विचिन्वत महाभागां रामपत्नींर अनिंदिताम् ॥ १५ ॥
|
’त्या पर्वताच्या शाखा-भूत अन्य लहान-मोठे पर्वत आणि त्या सर्वांतील गुहांमध्ये सती-साध्वी श्रीरामपत्नी महाभागा सीतेचे अन्वेषण करा. ॥१५॥
|
तमतिक्रम्य शैलेंद्रं हेमगर्भं महागिरिम् । ततः सुदर्शंनं नाम पर्वतं गंतुमर्हथ ॥ १६ ॥
|
’ज्याच्या आत सुवर्णाची खाण आहे, त्या गिरिराज कालला ओलांडून तुम्ही सुदर्शन नामक महान् पर्वतावर गेले पाहिजे. ॥१६॥
|
ततो देवसखो नाम पर्वतः पतगालयः । नानापक्षिगणाकीर्णो विविधद्रुमभूषितः ॥ १७ ॥
|
’त्याच्या पुढे गेल्यावर देवसख नावाचा पहाड लागेल जो पक्ष्यांचे निवासस्थान आहे. तो निरनिराळ्या विहंगमांनी व्याप्त तसेच नाना प्रकारच्या वृक्षांनी विभूषित आहे. ॥१७॥
|
तस्य काननखण्डेषु निर्झरेषु गुहासु च । रावणः सह वैदेह्या मार्गितव्यस्ततस्ततः ॥ १८ ॥
|
त्यांतील वनसमूह, निर्झर आणि गुहांमध्ये तुम्ही वैदेही सीतेसहित रावणाचा शोध करावयास पाहिजे. ॥१८॥
|
तमतिक्रम्य चाकाशं सर्वतः शतयोजनम् । अपर्वतनदीवृक्षं सर्वसत्त्वविवर्जितम् ॥ १९ ॥
|
’तेथून पुढे गेल्यावर एक ओसाड मैदान लागेल. जे सर्व बाजूनी शंभर योजने विस्तृत आहे. तेथे नदी, पर्वत, वृक्ष आणि सर्व प्रकारचे जीव-जंतुचा अभाव आहे. ॥१९॥
|
तत्तु शीघ्रमतिक्रम्य कांतारं रोमहर्षणम् । कैलासं पाण्डुरं प्राप्य हृष्टा यूयंभविष्यथ ॥ २० ॥
|
’अंगावर काटा आणणार्या त्या दुर्गम प्रांताला शीघ्रतापूर्वक ओलांडून गेल्यावर तुम्हाला श्वेतवर्णाचा कैलास पर्वत लागेल. तेथे पोहोचल्यावर तुम्ही सर्व लोक हर्षाने फुलून जाल. ॥२०॥
|
तत्र पाण्डुरमेघाभं जांबूनदपरिष्कृतम् । कुबेरभवनं रम्यं निर्मितं विश्वकर्मणा ॥ २१ ॥
|
’तेथेच विश्वकर्म्याने बनविलेले कुबेराचे रमणीय भवन आहे जे श्वेत मेघांप्रमाणे प्रतीत होत असते. त्या भवनाला जाम्बूनद नामक सुवर्णाने विभूषित केले गेले आहे. ॥२१॥
|
विशाला नलिनी यत्र प्रभूतकमलोत्पला । हंसकारण्डवाकीर्णा ह्यप्सरोगणसेविता ॥ २२ ॥
|
’त्याच्या जवळच एक फार मोठे सरोवर आहे. ज्यात कमळे आणि उत्पले भरपूर प्रमाणात प्राप्त होतात, त्यात हंस आणि कारण्डव आदि जलपक्षी भरून राहिलेले आहेत तसेच अप्सराही त्यात जल-क्रीडा करतात. ॥२२॥
|
तत्र वैश्रवणो राजा सर्वलोकनमस्कृतः । धनदो रमते श्रीमान् गुह्यकैः सह यक्षराट् ॥ २३ ॥
|
’तेथे यक्षांचे स्वामी विश्रवाकुमार श्रीमान् राजा कुबेर जे समस्त विश्वासाठी वंदनीय आणि धन देणारे आहेत, गुह्यकांसह विहार करतात. ॥२३॥
|
तस्य चंद्रनिकाशेषु पर्वतेषु गुहासु च । रावणः सह वैदेह्या मार्गितव्यस्ततस्ततः ॥ २४ ॥
|
’त्या कैलासाच्या चंद्रम्याच्या प्रमाणे उज्ज्वल शाखा पर्वतांवर तसेच त्यांच्या गुहांमध्ये सर्व बाजूस हिंडून-फिरून तुम्ही सीतेसहित रावणाचे अनुसंधान केले पाहिजे. ॥२४॥
|
क्रौञ्चं तु गिरिमासाद्य बिलं तस्य सुदुर्गमम् । अप्रमत्तैः प्रवेष्टव्यं दुष्प्रवेशं हि तत् स्मृतम् ॥ २५ ॥
|
’त्यानंतर क्रौंचगिरिवर जाऊन तेथील अत्यंत दुर्गम विवररूप गुहेत (जी स्कंदाच्या शक्तीने पर्वत विदीर्ण होण्यामुळे बनलेली आहे) तुम्हांला सावधपणे प्रवेश केला पाहिजे, कारण तिच्यामध्ये प्रवेश करणे अत्यंत कठीण मानले गेले आहे. ॥२५॥
|
वसंति हि महात्मानः तत्र सूर्यसमप्रभाः । देवैरभ्यर्थिताः सम्यग् देवरूपा महर्षयः ॥ २६ ॥
|
’त्या गुहेमध्ये सूर्यासमान तेजस्वी महात्मा निवास करतात. त्या देवस्वरूप महर्षिंची देवताही अभ्यर्चना करतात. ॥२६॥
|
कौञ्चस्य तु गुहाश्चान्याः सानूनि शिखराणि च । निर्दराश्च नितंबाश्च विचेतव्यास्ततस्ततः ॥ २७ ॥
|
’क्रौंच पर्वताच्या आणखीही बर्याचशा गुहा, अनेकानेक शिखरे, कंदरा तसेच उतरते प्रदेश आहेत. त्या सर्व प्रदेशात हिंडून फिरून तुम्ही सीता सहित रावणाचा पत्ता लावला पाहिजे. ॥२७॥
|
अवृक्षं कामशैलं च मानसं विहगालयम् । न गतिस्तत्र भूतानां देवदानवरक्षसाम् ॥ २८ ॥
|
’तेथून पुढे वृक्षांरहित मानस नामक शिखर आहे. जेथे शून्य असल्याने कधी पक्षीसुद्धा जात नाहीत. कामदेवाच्या तपस्येचे स्थान असल्याने ते क्रौंच शिखर कामशैल नावाने विख्यात आहे. तेथे भूते, देवता तसेच राक्षसांचेही कधी जाणे होत नाही. ॥२८॥
|
स च सर्वैर्विचेतव्यः ससानुप्रस्थभूधरः । क्रौञ्चं गिरिमतिक्रम्य मैनाको नाम पर्वतः ॥ २९ ॥
|
’शिखरे आणि पर्वतांसहित संपूर्ण क्रौंचपर्वताचा तुम्ही शोध घ्या. क्रौंचगिरिला ओलांडून पुढे गेल्यावर मैनाक पर्वत लागेल. ॥२९॥
|
मयस्य भवनं यत्र दानवस्य स्वयं कृतम् । मैनाकस्तु विचेतव्यः ससानुप्रस्थकंदरः ॥ ३० ॥
|
’तेथे मय दानवाचे घर आहे. जे त्याने स्वतःच आपल्यासाठी बनविले आहे. तुम्ही लोकांनी शिखरे, चौरस मैदाने आणि कंदरांसहित मैनाक पर्वतावर उत्तम तर्हेने सीतेचा शोध करावयास हवा. ॥३०॥
|
स्त्रीणामश्वमुखीनां च निकेतास्तत्र तत्र तु । तं देशं समतिक्रम्य आश्रमं सिद्धसेवितम् ॥ ३१ ॥
|
’तेथे जेथे-तेथे घोड्यांसारखी मुखे असलेल्या किन्नरांची निवासस्थाने आहेत- तो प्रदेश ओलांडून गेल्यावर सिद्धसेवित आश्रम लागेल. ॥३१॥
|
सिद्धा वैखानसा यत्र वालखिल्याश्च तापसाः । वंदितव्यास्ततः सिद्धाः तपसा वीतकल्मषाः ॥ ३२ ॥ प्रष्टव्या चापि सीतायाः प्रवृत्तिर्विनयान्वितैः ।
|
’त्यात सिद्ध, वैखानस तसेच वालखिल्य नामक तपस्वी निवास करतात. तपस्येमुळे त्यांचे पाप धुतले गेले आहे. त्या सिद्धांना तुम्ही लोक प्रणाम करा आणि विनीत भावाने सीतेचा समाचार विचारा. ॥३२ १/२॥
|
हेमपुष्करसंछन्नं तस्मिन् वैखानसं सरः ॥ ३३ ॥ तरुणादित्यसंकाशैः हंसैर्विचरितं शुभैः ।
|
’त्या आश्रमा जवळच ’वैखानस’ नामक एक प्रसिद्ध सरोवर आहे, ज्याचे जल सुवर्णमय कमलांनी आल्हादित राहात असते, त्यात प्रातःकालीन सूर्यासमान सोनेरी आणि अरुणवर्णाचे सुंदर हंस विचरत राहातात. ॥३३ १/२॥
|
औपवाह्यः कुबेरस्य सार्वभौम इति स्मृतः ॥ ३४ ॥ गजः पर्येति तं देशं सदा सह करेणुभिः ।
|
’कुबेराच्या वाहनात कामी येणारा सार्वभौम नामक गजराज आपल्या हत्तीणी समवेत त्या देशात सदा फिरत राहतो. ॥३४ १/२॥
|
तत्सरः समतिक्रम्य नष्टचंद्रदिवाकरम् । अनक्षत्रगणं व्योम निष्पयोदमनादितम् ॥ ३५ ॥
|
’त्या सरोवरास ओलांडून पुढे गेल्यावर शून्य आकाश दिसून येते. त्यांत सूर्य, चंद्रमा तसेच तार्यांचे दर्शन होत नाही. तेथे मेघांचा समुदाय दिसत नाही अथवा त्यांची गर्जनाही ऐकू येत नाहीत. ॥३५॥
|
गभस्तिभिरिवार्कस्य स तु देशः प्रकाशते । विश्राम्यद्भिस्तपः सिद्धैः देवकल्पैः स्वयंप्रभैः ॥ ३६ ॥
|
’तथापि त्या देशात असा प्रकाश पसरलेला असेल की जणु सूर्याच्या किरणांनीच तो प्रकाशित होत आहे. तेथे आपल्याच प्रभेने प्रकाशित तपःसिद्ध देवोपम महर्षि निवास करीत आहेत. त्यांच्याच अंगप्रभेने त्या देशात उजेड पसरलेला असतो. ॥३६॥
|
तं तु देशमतिक्रम्य शैलोदा नाम निम्नगा । उभयोस्तीरयोस्तस्याः कीचका नाम बेणवः ॥ ३७ ॥
|
’त्या प्रदेशाला ओलांडून पुढे गेल्यावर ’शैलोदा’ नावाच्या नदीचे दर्शन होईल. तिच्या दोन्ही तटावर कीचक (बांबूवेणु प्रमाणे ध्वनी करणारे) कळक प्रसिद्ध आहे. ॥३७॥
|
ते नयंति परं तीरं सिद्धान् प्रत्यानयंति च । उत्तराः कुरवस्तत्र कृतपुण्यप्रतिश्रयाः ॥ ३८ ॥
|
’ते बांबूच (साधन बनून) सिद्ध पुरुषांना शैलोदेच्या दुसर्या तटावर घेऊन जातात आणि तेथून या तटास घेऊन येतात. जेथे केवळ पुण्यात्मा पुरुषांचा वास आहे तो उत्तर कुरूदेश शैलोदेच्या तटावरच आहे. ॥३८॥
|
ततः काञ्चनपद्माभिः पद्मिनीभिः कृतोदकाः । नीलवैदूर्यपत्राढ्या नद्यस्तत्र सहस्रशः ॥ ३९ ॥
|
’उत्तर कुरूदेशात नील वैडूर्य मण्यासमान हिरव्या हिरव्या कमलांच्या पानांनी सुशोभित हजारो नद्या वहात आहेत; ज्यांचे जल सुवर्णमय पद्मांनी अलंकृत अनेकानेक पुष्करिणींना मिळालेले आहेत. ॥३९॥
|
रक्तोत्पलवनैश्चात्र मण्डिताश्च हिरण्मयैः । तरुणादित्यसंकाशा भांति तत्र जलाशयाः ॥ ४० ॥
|
’तेथील जलाशय लाल आणि सोनेरी कमल समूहांनी मण्डित होऊन प्रातःकाळी उदित झालेल्या सूर्यासमान शोभतात. ॥४०॥
|
महार्हमणिपत्रैश्च काञ्चनप्रभकेसरैः । नीलोत्पलवनैश्चित्रैः स देशः सर्वतो वृतः ॥ ४१ ॥
|
’बहुमूल्य मण्यांसमान पाने आणि सुवर्णासमान कांतिमान् केसर असलेल्या विचित्र विचित्र नील कमलांच्या द्वारा तेथील प्रदेश सर्व बाजूंनी सुशोभित होत असतो. ॥४१॥
|
निस्तुलाभिश्च मुक्ताभिः मणिभिश्च महाधनैः । उद्भूुतपुलिनास्तत्र जातरूपैश्च निम्नगाः ॥ ४२ ॥ सर्वरत्नमियैश्चित्रैः अवगाढा नगोत्तमैः । जातरूपमयैश्चापि हुताशनसमप्रभैः ॥ ४३ ॥
|
’तेथील नद्यांचे तट गोल गोल मोती, बहुमूल्य मणि आणि रत्नांनी संपन्न आहेत. इतकेच नव्हे तर त्या नद्यांच्या किनार्यांवर संपूर्ण रत्नांनी युक्त विचित्र विचित्र पर्वतही विद्यमान् आहेत, जे त्यांच्या जलात खोलवर घुसलेले आहेत. त्या पर्वतांपैकी कित्येक तर सुवर्णमय आहेत, ज्यांच्या पासून अग्निप्रमाणे प्रकाश पसरत असतो. ॥४२-४३॥
|
नित्यपुष्पफलास्तत्र नगाः पत्ररथाकुलाः । दिव्यागंधरसस्पर्शाः सर्वकामान् स्रवंति च ॥ ४४ ॥
|
’तेथील वृक्षांना सदाच फळे-फुले लागलेली असतात आणि त्यांच्यावर पक्षी किलबिलाट करीत राहातात. ते वृक्ष दिव्य गंध, दिव्य रस आणि दिव्य स्पर्श प्रदान करतात तसेच प्राण्यांच्या मनोवाञ्छित वस्तूंचीही वृष्टि करीत राहातात. ॥४४॥
|
नानाकाराणि वासांसि फलंत्यन्ये नगोत्तमाः । मुक्तावैदूर्यचित्राणि भूषणानि तथैव च । स्त्रीणां यान्यनुरूपाणि पुरुषाणां तथैव च ॥ ४५ ॥
|
’यांच्या शिवाय अनेक अनेक श्रेष्ठ वृक्ष फळांच्या रूपाने नाना प्रकारची वस्त्रे, मोती आणि वैडूर्य मणिजडित आभूषणेही देतात जी स्त्रिया आणि पुरुषांच्या उपयोगांत आणण्यायोग्य असतात. ॥४५॥
|
सर्वर्तुसखसेव्यानि फलंत्यन्ये नगोत्तमाः । महार्हमणिचित्राणि हैमान्यन्ये नगोत्तमाः ॥ ४६ ॥
|
’दुसरे उत्तम वृक्ष सर्व ऋतुमध्ये सुखपूर्वक सेवन करण्यायोग्य उत्तमोत्तम फळे देतात. अन्यान्य सुंदर वृक्ष बहुमूल्य मण्यांसमान विचित्र फळे उत्पन्न करतात. ॥४६॥
|
शयनानि प्रसूयंते चित्रास्तरणवंति च । मनःकांतानि माल्यानि फलंत्यत्रापरे द्रुमाः ॥ ४७ ॥ पानानि च महार्हाणि भक्ष्याणि विविधानि च । स्त्रियश्च गुणसंपन्ना रूपयौवनलक्षिताः ॥ ४८ ॥
|
’कित्येक वृक्ष विचित्र बिछान्यांनी युक्त शय्याच फळांच्या रूपात प्रकट करतात; मनाला प्रिय वाटणार्या सुंदर माळाही प्रस्तुत करतात; बहुमूल्य पेय पदार्थ आणि विविध प्रकारचे भोजन देतात. तसेच रूप आणि यौवनाने प्रकाशित होणार्या सद्गुणवती युवतींनाही जन्म देतात. ॥४७-४८॥
|
गंधर्वाः किन्निराः सिद्धा नागा विद्याधरास्तथा । रमंते सहितास्तत्र नारीभिर्भास्करप्रभाः ॥ ४९ ॥
|
’तेथे सूर्यासमान कांतिमान् गंधर्व, किन्नर, सिद्ध, नाग आणि विद्याधर सदा स्त्रियांसहित क्रीडा-विहार करतात. ॥४९॥
|
सर्वे सुकृतकर्माणः सर्वे रतिपरायणाः । सर्वे कामार्थसहिता वसंति सहयोषितः ॥ ५० ॥
|
’तेथील लोक पुण्यकर्मे करणारे आहेत, सर्व अर्थ आणि काम यांनी संपन्न आहेत; तसेच सर्व लोक काम-क्रीडा परायण होऊन युवती स्त्रियांच्या बरोबर निवास करतात. ॥५०॥
|
गीतवादित्रनिर्घोषः सोत्कृष्टहसितस्वनः । श्रूयते सततं तत्र सर्वभूतमनोरमः ॥ ५१ ॥
|
’तेथे निरंतर उत्कृष्ट हास्य-विनोदाच्या ध्वनीने युक्त गीतवाद्यांचा मधुर घोष ऐकू येत असतो, जो समस्त प्राण्यांच्या मनाला आनंद प्रदान करणारा असतो. ॥५१॥
|
तत्र नामुदितः कश्चिन् नात्र कश्चिद् असत्प्रियः । अहन्यहनि वर्धंते गुणास्तत्र मनोरमाः ॥ ५२ ॥
|
’तेथे कोणीही अप्रसन्न राहात नाही. कुणालाही वाईट कर्माची आवड नसते. तेथे राहाण्याने प्रतिदिन मनोरम गुणांची वृद्धि होते. ॥५२॥
|
समतिक्रम्य तं देशं उत्तरः पयसां निधिः । तत्र सोमगिरिर्नाम मध्ये हेममयो महान् ॥ ५३ ॥
|
’त्या देशाला ओलांडून पुढे गेल्यावर उत्तरदिग्वर्ती समुद्र उपलब्ध होतो. त्या समुद्राच्या मध्यभागी सोमगिरि नामक एक फार उंच सुवर्णमय पर्वत आहे. ॥५३॥
|
इंद्रलोकगता ये च ब्रह्मलोकगताश्च ये । देवास्तं समवेक्षंते गिरिराजं दिवं गताः ॥ ५४ ॥
|
’जे लोक स्वर्गलोकात गेले आहेत. ते, तसेच इंद्रलोक आणि ब्रह्मलोकात राहणार्या देवता त्या गिरिराज सोमगिरिचे दर्शन करतात. ॥५४॥
|
स तु देशो विसूर्योऽपि तस्य भासा प्रकाशते । सूर्यलक्ष्म्या ऽभिविज्ञेयः तपतेव विवस्वता ॥ ५५ ॥
|
’तो देश सूर्यरहित आहे तरीही सोमगिरिच्या प्रभेने सदा प्रकाशित होत राहातो. तप्त सूर्याच्या प्रभेने जे देश प्रकाशित होत असतात, त्यांच्या प्रमाणेच त्याला सूर्यदेवाच्या शोभेने संपन्न असल्याप्रमाणेच मानला पाहिजे. ॥५५॥
|
भगवांतत्र विश्वात्मा शंभुरेकादशात्मकः । ब्रह्मा वसति देवेशो ब्रह्मर्षिपरिवारितः ॥ ५६ ॥
|
’तेथे विश्वात्मा भगवान् विष्णु, एकादश रूद्रांच्या रूपात प्रकट होणारे भगवान् शंकर तसेच ब्रह्मर्षिंनी घेरलेले देवेश्वर ब्रह्मदेव निवास करतात. ॥५६॥
|
न कथञ्चन गंतव्यं कुरूणामुत्तरेण वः । अन्येषामपि भूतानां नातिक्रामति वै गतिः ॥ ५७ ॥
|
’तुम्ही लोक उत्तर कुरूच्या मार्गाने सोमगिरि पर्यंत जाऊन त्याच्या सीमेच्या पुढे कशाही प्रकारे जावे. तुमच्या प्रमाणेच दुसर्या प्राण्यांनाही तेथे गति नाही आहे. ॥५७॥
|
स हि सोमगिरिर्नाम देवानामपि दुर्गमः । तमालोक्य ततः क्षिप्रं उपावर्त्तितुमर्हथ ॥ ५८ ॥
|
’तो सोमगिरि देवतांसाठीही दुर्लभ आहे. म्हणून त्याचे केवळ दर्शन तुम्ही लोक लवकर परतून या. ॥५८॥
|
एतावद् वानरैः शक्यं गंतुं वानरपुंगवाः । अभास्करममर्यादं न जानीमस्ततः परम् ॥ ५९ ॥
|
’श्रेष्ठ वानरांनो ! बस, उत्तर दिशेमध्ये इतक्या दूरपर्यंतच तुम्ही सर्व वानर जाऊ शकता. त्याच्या पुढे सूर्याचा प्रकाशही नाही आणि दुसर्या कुठल्या देशाची सीमाही नाही. म्हणून पुढच्या भूमीसंबंधी मी काहीही जाणत नाही. ॥५९॥
|
सर्वमेतद् विचेतव्यं यन्मया परिकीर्तितम् । यदन्यदपि नोक्तं च तत्रापि क्रियतां मतिः ॥ ६० ॥
|
’मी जी जी स्थाने सांगितली आहेत, त्या सर्वामध्ये सीतेचा शोध करा आणि ज्या स्थानांचे नाव घेतले नाही, तेथेही शोध करण्याचा निश्चित विचार करा. ॥६०॥
|
ततः कृतं दाशरथेर्महत् प्रियं महत्प्रियं चापि ततो मम प्रियम् । कृतं भविष्यत्यनिलानलोपमा विदेहजादर्शनजेन कर्मणा ॥ ६१ ॥
|
’अग्नि आणि वायुच्या समान तेजस्वी तसेच बलशाली वानरांनो ! वैदेही सीतेचे दर्शन घेऊन तुम्ही जे जे कार्य अथवा प्रयास कराल त्या सर्वांच्या द्वारा दशरथनंदन भगवान् श्रीरामांचे महान् प्रिय कार्य संपन्न होईल; तसेच त्यामुळे माझे हीप्रिय कार्य पूर्ण होईल. ॥६१॥
|
ततः कृतार्थाः सहिताः सबांधवा मयाऽर्चिताः सर्वगुणैर्मनोरमैः । चरिष्यथोर्वीं प्रतिशांतशत्रवः सहप्रिया भूतधराः प्लवंगमाः ॥ ६२ ॥
|
’वानरांनो ! श्रीरामचंद्रांचे प्रिय कार्य करून जेव्हा तुम्ही परत याल तेव्हां मी सर्वगुणसंपन्न तसेच मनोऽनुकूल पदार्थांच्या द्वारा तुम्हा सर्व लोकांचा सत्कार करीन. तत्पश्चात् तुम्ही शत्रुरहित होऊन आपल्या हितैषींसहित आणि बंधुबांधवांसहित कृतार्थ आणि समस्त प्राण्यांचे आश्रयदाते होऊन आपल्या प्रियतमांसहित सर्व पृथ्वीवर आनंदात विचरण कराल.’ ॥६२॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे त्रिचत्वारिंशः सर्गः ॥ ४३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा त्रेचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥४३॥
|