विष्णुना रक्षसां संहारस्तेषां पलायनं च -
|
भगवान् विष्णुंच्या द्वारा राक्षसांचा संहार आणि पलायन -
|
नारायणगिरिं ते तु गर्जन्तो राक्षसाम्बुदाः । अर्दयन्तोऽस्त्रवर्षेण वर्षेणेवाद्रिमम्बुदाः ॥ १ ॥
|
(अगस्त्य ऋषि म्हणतात - रघुनंदना !) जसे मेघ जलाची वृष्टि करून एखाद्या पर्वताला आप्लावित करतात त्याप्रकारे गर्जना करीत ते राक्षसरूपी मेघ अस्त्ररूपी जलाची वृष्टि करून नारायणरूपी पर्वताला पीडित करू लागले. ॥१॥
|
श्यामावदातस्तैर्विष्णुः नीलैर्नक्तञ्चरोत्तमैः । वृतोऽञ्जनगिरीवायं वर्षमाणैः पयोधरैः ॥ २ ॥
|
भगवान् विष्णुंचा श्रीविग्रह करणारे उज्ज्वल श्यामवर्णाने सुशोभित होता आणि अस्त्र-शस्त्रांचा वर्षाव करणारे ते श्रेष्ठ निशाचर नीळ्या रंगाचे दिसून येत होते, म्हणून जणु काय अञ्जनगिरिला चोहोबाजूनी घेरून मेघ त्याच्यावर जलधारांचा वर्षाव करीत आहेत की काय असे भासत होते. ॥२॥
|
शलभा इव केदारं मशका इव पावकम् । यथामृतघटं दंशा मकरा इव चार्णवम् ॥ ३ ॥ तथा रक्षोधनुर्मुक्ता वज्रानिलमनोजवाः । हरिं विशन्ति स्म शरा लोका इव विपर्यये ॥ ४ ॥
|
ज्याप्रमाणे टोळांचा थवा धान्याच्या शेतात, पतंग आगीमध्ये, दंश करणार्या माश्या मधु भरलेल्या घड्यात आणि मगरी समुद्रात घुसतात त्याप्रकारे राक्षसांच्या धनुष्यातून सुटलेले वज्र, वायु तसेच मनासमान वेग असणारे बाण भगवान् विष्णुंच्या शरीरात प्रवेश करून प्रलयकाळात जसे समस्त लोक त्यांच्यातच प्रवेश करतात त्याप्रमाणे लीन होऊन जात होते. ॥३-४॥
|
स्यन्दनैः स्यन्दनगता गजैश्च गजमूर्धगाः । अश्वारोहास्तथाश्वैश्च पादाताश्चाम्बरे स्थिताः ॥ ५ ॥
|
रथावर बसलेले योद्धे रथासहित, हत्तीस्वार हत्तींसह, घोडेस्वार घोड्यांसहित आणि पायदळ सैनिक पायीच आकाशांत स्थित होते. ॥५॥
|
राक्षसेन्द्रा गिरिनिभाः शरैः शक्त्यृष्टितोमरैः । निरुछ्वासं हरिं चक्रुः प्राणायामा इव द्विजम् ॥ ६ ॥
|
त्या राक्षस राजांची शरीरे पर्वतासमान विशाल होती. त्यांनी सर्व बाजूंनी शक्ति, ऋष्टि, तोमर आणि बाणांचा वर्षाव करून भगवान् विष्णुंचे श्वास घेणे बंद करून टाकले; जसे प्राणायाम द्विजांचा श्वास रोखून धरतो त्याप्रमाणे. ॥६॥
|
निशाचरैस्ताड्यमानो मीनैरिव महोदधिः । शार्ङ्गमायम्य दुर्धर्षो राक्षसेभ्योऽसृजच्छरान् ॥ ७ ॥
|
ज्याप्रमाणे माशांनी महासागरावर प्रहार करावा त्याच प्रकारे ते निशाचर आपल्या अस्त्र-शस्त्रांद्वारे श्रीहरिवर प्रहार करीत होते. त्या समयी दुर्जय देवता भगवान् विष्णुंनी आपल्या शार्ङ्ग-धनुष्याला खेचून राक्षसांवर बाणांचा वर्षाव करण्यास आरंभ केला. ॥७॥
|
शरैः पूर्णायतोत्सृष्टैः वज्रवक्त्रैर्मनोजवैः । चिच्छेद विष्णुर्निशितैः शतशोऽथ सहस्रशः ॥ ८ ॥
|
ते बाण धनुष्याला पूर्णरूपाने खेचून सोडले गेले होते म्हणून वज्रासमान असह्य आणि मनासमान वेगवान् होते. त्या तीक्ष्ण बाणांच्या द्वारा भगवान् विष्णुनी शेकडो आणि हजारो निशाचरांचे तुकडे तुकडे करून टाकले. ॥८॥
|
विद्राव्य शरवर्षेण वर्षा वायुरिवोत्थितम् । पाञ्चजन्यं महाशङ्खं प्रदध्मौ पुरुषोत्तमः ॥ ९ ॥
|
ज्याप्रमाणे वारा, भरून आलेल्या ढगांना आणि पावसाला उडवून लावतो त्याप्रकारे आपल्या बाणांच्या वर्षावाने राक्षसांना पळवून लावून पुरुषोत्तम श्रीहरिंनी आपला पाञ्चजन्य नामक महान् शंख वाजवला. ॥९॥
|
सोऽम्बुजो हरिणा ध्मातः सर्वप्राणेन शङ्खराट् । ररास भीमनिर्हादः त्रैलोक्यं व्यथयन्निव ॥ १० ॥
|
संपूर्ण प्राणशक्तिने श्रीहरिंच्या द्वारा वाजविला गेलेल्या त्या जल-जनित शंखराजाच्या भयंकर आवाजाने तीन्ही लोक व्यथित केले आणि तो निनादत राहिला. ॥१०॥
|
शङ्खराजरवः सोऽथ त्रासयामास राक्षसान् । मृगराज इवारण्ये समदानिव कुञ्जरान् ॥ ११ ॥
|
ज्याप्रमाणे वनांत डरकाळ्या फोडणारा सिंह मत्त हत्तींना भयभीत करून सोडतो, त्याच प्रकारे त्या शंखराजाच्या ध्वनिने समस्त राक्षसांना भयभीत करून सोडले. ॥११॥
|
न शेकुरश्वाः संस्थातुं विमदाः कुञ्जराभवन् । स्यन्दनेभ्यश्च्युता वीराः शङ्खरावितदुर्बलाः ॥ १२ ॥
|
तो शंखध्वनि ऐकून घोडे शक्ति आणि साहसहीन झाल्याने युद्धभूमित उभे राहू शकले नाहीत, हत्तींचा मद उतरून गेला आणि वीर सैनिक रथांतून खाली पडले. ॥१२॥
|
शार्ङ्गचापविनिर्मुक्ता वज्रतुल्याननाः शराः । विदार्य तानि रक्षांसि सुपुङ्खा विविशुः क्षितिम् ॥ १३ ॥
|
सुंदर पंखयुक्त त्या बाणांचे मुखभाग वज्रासमान कठोर होते. ते शार्ङ्ग-धनुष्यातून सुटून राक्षसांना विदीर्ण करत पृथ्वीमध्ये घुसत होते. ॥१३॥
|
भिद्यमानाः शरैः सङ्ख्ये नारायणकरच्युतैः । निपेतू राक्षसा भूमौ शैला वज्रहता इव ॥ १४ ॥
|
संग्रामभूमिमध्ये भगवान् विष्णुंच्या हातांतून सुटलेल्या त्या बाणांच्या द्वारे छिन्न-भिन्न झालेले निशाचर वज्रांनी मारलेल्या पर्वतांप्रमाणे धराशायी होऊ लागले. ॥१४॥
|
व्रणानि परगात्रेभ्यो विष्णुचक्रकृतानि वै । असृक् क्षरन्ति धाराभिः स्वर्णधारा इवाचलाः ॥ १५ ॥
|
श्रीहरिच्या चक्राच्या आघातांनी शत्रुंच्या शरीरात जे घाव झाले होते त्यांतून पर्वतांतून गेरू मिश्रित जलाचा स्त्रोत वाहू लागावा त्याप्रमाणे रक्ताची धार वहात होती. ॥१५॥
|
शङ्खराजरवश्चापि शार्ङ्गचापरवस्तथा । राक्षसानां रवांश्चापि ग्रसते वैष्णवो रवः ॥ १६ ॥
|
शंखराजाचा ध्वनि, शार्ङ्गधनुष्याचा टणत्कार आणि भगवान् विष्णुंची गर्जना - या सर्वांच्या तुमुलनादाने राक्षसांच्या कोलाहलाला दाबून टाकले. ॥१६॥
|
तेषां शिरोधरान्धूतान् शरध्वजधनूंषि च । रथान्पताकास्तूणीरान् चिच्छेद स हरिः शरैः ॥ १७ ॥
|
भगवतांनी राक्षसांची छेदलेली मस्तके, बाण, ध्वजा, धनुष्ये, रथ, पताका आणि तरकस यांना आपल्या बाणांनी तोडून टाकले. ॥१७॥
|
सूर्यादिव करा घोरा वार्योघा इव सागरात् । पर्वतादिव नागेन्द्रा धारौघा इव चाम्बुदात् ॥ १८ ॥ तथा शार्ङ्गविनिर्मुक्ताः शरा नारायणेरिताः । निर्धावन्तीषवस्तूर्णं शतशोथ सहस्रशः ॥ १९ ॥
|
जसे सूर्यापासून भयंकर किरण, समुद्रापासून जलाचे प्रवाह, पर्वतांतून मोठ मोठे सर्प आणि मेघातून जलाच्या धारा प्रकट होतात त्याप्रकारे भगवान् नारायणांनी सोडलेले आणि शार्ङ्गधनुष्यांतून सुटलेले शेकडो आणि हजारो बाण तात्काळ इकडे तिकडे धावू लागले. ॥१८-१९॥
|
शरभेण यथा सिंहाः सिंहेन द्विरदा यथा । द्विरदेन यथा व्याघ्रा व्याघ्रेण द्वीपिनो यथा ॥ २० ॥
द्वीपिनेव यथा श्वानः शुना मार्जारको यथा । मार्जारेण यथा सर्पाः सर्पेण च यथाखवः ॥ २१ ॥ तथा ते राक्षसाः सर्वे विष्णुना प्रभविष्णुना । द्रवन्ति द्राविताश्चान्ये शायिताश्च महीतले ॥ २२ ॥
|
जसे शरभाला सिंह, सिंहाला हत्ती, हत्तीला वाघ, वाघाला चित्ते, चित्त्यांना कुत्रे, कुत्र्यांना बोके, बोक्यांना साप आणि सापांना उंदीर घाबरून पळून जातात, त्याच प्रकारे ते सर्व राक्षस प्रभावशाली भगवान् विष्णूंचा मार खाऊन पळून जाऊ लागले. त्यांनी पळवून लावलेले बरेचसे राक्षस धराशायी झाले. ॥२०-२२॥
|
राक्षसानां सहस्राणि निहत्य मधुसूदनः । वारिजं पूरयामास तोयदं सुरराडिव ॥ २३ ॥
|
हजारो राक्षसांचा वध करून भगवान् मधुसूदनांनी आपला शंख पाञ्चजन्य याला जसे देवराज इंद्र मेघाला जलाने भरून टाकतो त्याप्रमाणे गंभीर ध्वनिने परिपूर्ण केले. ॥२३॥
|
नारायणशरत्रस्तं शङ्खनादसुविह्वलम् । ययौ लङ्कामभिमुखं प्रभग्नं राक्षसं बलम् ॥ २४ ॥
|
भगवान् नारायणांच्या बाणांनी भयभीत आणि शंखनादाने व्याकुळ झालेली राक्षस-सेना लंकेकडे पळून जाऊ लागली. ॥२४॥
|
प्रभग्ने राक्षसबले नारायणशराहते । सुमाली शरवर्षेण निववार रणे हरिम् ॥ २५ ॥
|
नारायणांच्या सायकांनी आहत झालेली राक्षससेना जेव्हा पळून जाऊ लागली तेव्हा सुमालीने रणभूमीमध्ये बाणांचा वर्षाव करून त्या श्रीहरिला पुढे येण्यापासून रोखून धरले. ॥२५॥
|
स तु तं छादयामास नीहार इव भास्करम् । राक्षसाः सत्त्वसम्पन्नाः पुनर्धैर्यं समादधुः ॥ २६ ॥
|
धुके जसे सूर्याला झाकून टाकते त्याप्रमाणे सुमालीने बाणांनी भगवान् विष्णुंना आच्छादित केले. हे पाहून शक्तिशाली राक्षसांनी पुन्हा धैर्य धारण केले. ॥२६॥
|
अथ सोऽभ्यपतद् रोषाद् राक्षसो बलदर्पितः । महानादं प्रकुर्वाणो राक्षसान् जीवयन्निव ॥ २७ ॥
|
त्या बलाभिमानी निशाचराने फार जोराने गर्जना करून राक्षसांमध्ये नूतन जीवनाचा संचार करीत रोषपूर्वक आक्रमण केले. ॥२७॥
|
उत्क्षिप्य लम्बाभरणं धुन्वन् करमिव द्विपः । ररास राक्षसो हर्षात् सतडित्तोयदो यथा ॥ २८ ॥
|
जसा हत्ती सोंड उचलून हलवत राहातो त्याप्रमाणे लटकणार्या आभूषणांनी युक्त हात वर उचलून हलवत तो राक्षस विद्युत् सहित सजल जलधाराप्रमाणे मोठ्या हर्षाने गर्जना करू लागला. ॥२८॥
|
सुमालेर्नर्दतस्तस्य शिरो ज्वलितकुण्डलम् । चिच्छेद यन्तुरश्वाश्च भ्रान्तास्तस्य तु रक्षसः ॥ २९ ॥
|
तेव्हा भगवान् आपल्या बाणांच्या द्वारे गर्जणार्या सुमालीच्या सारथ्याचे झगमगणार्या कुंडलांनी मंडित मस्तक छेदून टाकले. त्यामुळे त्या राक्षसाचे घोडे बेलगाम होऊन चोहीकडे चकरा मारू लागले. ॥२९॥
|
तैरश्वैर्भ्राम्यते भ्रान्तैः सुमाली राक्षसेश्वरः । इन्द्रियाश्वैः परिभ्रान्तैः धृतिहीनो यथा नरः ॥ ३० ॥
|
त्या घोड्यांनी चक्कर मारण्यास आरंभ केल्यावर त्यांच्या बरोबरच राक्षसराज सुमाली चकरा मारू लागला, जसा अजितेंद्रिय मनुष्य विषयात भटकणार्या इंद्रियांच्या बरोबरच स्वतःही भटकत फिरू लागतो अगदी त्याप्रमाणेच. ॥३०॥
|
ततो विष्णुं महाबाहुं प्रपतन्तं रणाजिरे । हृते सुमालेरश्वैश्च रथे विष्णुरथं प्रति ॥ ३१ ॥ माली चाभ्यद्रवद् युक्तः प्रगृह्य सशरं धनुः ।
|
जेव्हा घोडे रणभूमीमध्ये सुमालीच्या रथाला घेऊन इकडे-तिकडे पळू लागले तेव्हा माली नामक राक्षस युद्धासाठी उद्यत होऊन धनुष्य घेऊन गरूडाकडे धावला. राक्षसांवर तुटून पडणार्या भगवान् विष्णुंवर त्याने आक्रमण केले. ॥३१ १/२॥
|
मालेर्धनुश्च्युता बाणाः कार्तस्वरविभूषिताः ॥ ३२ ॥ विविशुर्हरिमासाद्य क्रौञ्चं पत्ररथा इव ।
|
मालीच्या धनुष्यांतून सुटलेले सुवर्णभूषित बाण भगवान् विष्णुंच्या शरीरात जसे पक्षी क्रौञ्चपर्वताच्या छिद्रांत प्रवेश करतात त्याप्रमाणे घुसू लागले. ॥३२ १/२॥
|
अर्द्यमानः शरैः सोऽथ मालिमुक्तैः सहस्रशः ॥ ३३ ॥ चुक्षुभे न रणे विष्णुः जितेन्द्रिय इवाधिभिः ।
|
ज्याप्रमाणे जितेंद्रिय पुरुष मानसिक व्यथांनी विचलित होत नाही त्याचप्रकारे रणभूमिमध्ये भगवान् विष्णु मालीने सोडलेल्या हजारो बाणांनी पीडित होऊनही क्षुब्ध झाले नाहीत. ॥३३ १/२॥
|
अथ मौर्वीस्वनं श्रुत्वा भगवान् भूतभावनः ॥ ३४ ॥ मालिनं प्रति बाणौघान् ससर्जासिगदाधरः ।
|
त्यानंतर खड्ग आणि गदा धारण करणार्या भूतभावन भगवान् विष्णुंनी आपल्या धनुष्याचा टणत्कार करून मालीवर बाणसमूहांची वृष्टि करण्यास आरंभ केला. ॥३४ १/२॥
|
ते मालिदेहमासाद्य वज्रविद्युत्प्रभाः शराः ॥ ३५ ॥ पिबन्ति रुधिरं तस्य नागा इव सुधारसम् ।
|
वज्र आणि वीजेप्रमाणे प्रकाशित होणारे ते बाण मालीच्या शरीरात घुसून त्याचे रक्त पिऊ लागले, जणु सर्प अमृतरसाचे पान करीत होते. ॥३५ १/२॥
|
मालिनं विमुखं कृत्वा शङ्खचक्रगदाधरः ॥ ३६ ॥ मालिमौलिं ध्वजं चापं वाजिनश्चाप्यपातयत् ।
|
शेवटी मालीला पाठ दाखविण्यास विवश करून शंख, चक्र आणि गदा धारण करणार्या भगवान् श्रीहरिंनी त्या राक्षसाचे मुकुट, ध्वज आणि धनुष्य तोडून घोड्यांनाही मारून टाकले. ॥३६ १/२॥
|
विरथस्तु गदां गृह्य माली नक्तञ्चरोत्तमः ॥ ३७ ॥ आपुप्लुवे गदापाणिः गिर्यग्रादिव केसरी ।
|
रथहीन झाल्यावर राक्षसप्रवर माली हातात गदा घेऊन उडी मारून उतरला जणु एखादा सिंह पर्वतशिखरावरून उडी मारून खाली आला असावा. ॥३७ १/२॥
|
गदया गरुडेशानं ईशानमिव चान्तकः ॥ ३८ ॥ ललाटदेशेऽभ्यहनद् वज्रेणेन्द्रो यथाचलम् ।
|
ज्याप्रमाणे यमराजांनी भगवान् शिवावर गदेचा आणि इंद्रांनी पर्वतावर वज्राचा प्रहार केला असावा त्याप्रमाणे मालीने पक्षिराज गरूडाच्या ललाटावर आपल्या गदेने खोल जखम केली. ॥३८ १/२॥
|
गदयाभिहतस्तेन मालिना गरुडो भृशम् ॥ ३९ ॥ रणात् पराङ्मुखं देवं कृतवान् वेदनातुरः ।
|
मालीच्या गदेने अत्यंत आहत होऊन गरूड वेदनेने व्याकुळ झाले. त्यांनी स्वतः युद्धापासून विमुख होऊन भगवान् विष्णुंनाही विमुखसे करून टाकले. ॥३९ १/२॥
|
पराङ्मुखो कृते देवे मालिना गरुडेन वै ॥ ४० ॥ उदतिष्ठन् महाञ्छब्दो रक्षसामभिनर्दताम् ।
|
मालीने गरूडाबरोबरच जेव्हा भगवान् विष्णुंनाही जणु युद्धातून विमुखसे केले तेव्हा जोरजोराने गर्जना करणार्या राक्षसांचा महान् शब्द निनादू लागला. ॥४० १/२॥
|
रक्षसां रवतां रावं श्रुत्वा हरिहयानुजः ॥ ४१ ॥ तिर्यगास्थाय सङ्क्रुद्धः पक्षीशे भगवान् हरिः । पराङ्मुखोऽप्युत्ससर्ज मालेश्चक्रं जिघांसया ॥ ४२ ॥
|
गर्जना करणार्या राक्षसांचा तो सिंहनाद ऐकून इंद्राचे लहान भाऊ भगवान् विष्णु अत्यंत कुपित होऊन पक्षिराजाच्या पाठीवर तिरके होऊन बसले (त्यामुळे त्यांना तो राक्षस दिसू लागला.) त्या समयी पराङ्मुख असूनही श्रीहरिंनी मालीच्या वधाच्या इच्छेने पाठीमागे वळून आपले सुदर्शन चक्र फेकले. ॥४१-४२॥
|
तत् सूर्यमण्डलाभासं स्वभासा भासयन् नभः । कालचक्रनिभं चक्रं मालेः शीर्षमपातयत् ॥ ४३ ॥
|
सूर्यमंडल समान उद्दीप्त होणार्या कालचक्र सदृश्य त्या चक्राने आपल्या प्रभेने आकाशाला उद्भासित करीत तेथे मालीचे मस्तक छेदून खाली पाडले. ॥४३॥
|
तच्छिरो राक्षसेन्द्रस्य चक्रोत्कृत्तं बिभीषणम् । पपात रुधिरोद्गारि पुरा राहुशिरो यथा ॥ ४४ ॥
|
चक्राने कापले गेलेले राक्षसराज मालीचे ते भयंकर मस्तक पूर्वकाळी कापले गेलेल्या राहुच्या शिराप्रमाणे रक्ताची धार वहावत पृथ्वीवर पडले. ॥४४॥
|
ततः सुरैः संप्रहृष्टैः सर्वप्राणसमीरितः । सिंहनादरवो मुक्तः साधु देवेतिवादिभिः ॥ ४५ ॥
|
यामुळे देवतांना फार प्रसन्नता वाटली. त्या साधु भगवन्, साधु ! असे म्हणत सर्व शक्ति लावून जोरजोराने सिंहनाद करू लागल्या. ॥४५॥
|
मालिनं निहतं दृष्ट्वा सुमाली माल्यवानपि । सबलौ शोकसन्तप्तौ लङ्कामेव प्रधावितौ ॥ ४६ ॥
|
माली मारला गेलेला पाहून सुमाली आणि माल्यवान् दोघे राक्षस शोकाने व्याकुळ होऊन सेनेसहित लंकेकडेच पळून गेले. ॥४६॥
|
गरुडस्तु समाश्वस्तः सन्निवृत्य यथा पुरा । राक्षसान् द्रावयामास पक्षवातेन कोपितः ॥ ४७ ॥
|
इतक्यात गरूडाची पीडा कमी झाली, ते पुन्हा सावरून परत आले आणि कुपित होऊन पूर्ववत् आपल्या पंख्याच्या वार्याने राक्षसांना पिटाळून लावू लागले. ॥४७॥
|
चक्रकृत्तास्यकमला गदासञ्चूर्णितोरसः । लाङ्गलग्लपितग्रीवा मुसलैर्भिन्नमस्तकाः ॥ ४८ ॥
|
कित्येक राक्षसांची मुखकमळे चक्राच्या प्रहाराने कापली गेली. गदांच्या आघातांनी अनेकांची वक्षःस्थळे चूरचूर झाली. नांगराच्या फाळांनी कित्येकांचे गळे कापले गेले. मुसळांच्या मारांनी अनेकांच्या मस्तकांच्या चिंधड्या उडाल्या. ॥४८॥
|
केचिच्चैवासिना छिन्नाः तथान्ये शरताडिताः । निपेतुरम्बरात् तूर्णं राक्षसाः सागराम्भसि ॥ ४९ ॥
|
तलवारीच्या आघाताने कित्येक राक्षसांचे तुकडे तुकडे झाले. बरेचसे राक्षस बाणांनी पीडित होऊन तात्काळच आकाशांतून समुद्राच्या जलात जाऊन पडले. ॥४९॥
|
नारायणोऽपीषुवराशनीभि विदारयामास धनुर्विमुक्तैः । नक्तञ्चरान् धूतविमुक्तकेशान् यथाशनीभिः सतडिन्महाभ्रः ॥ ५० ॥
|
भगवान् विष्णुही आपल्या धनुष्यातून सुटलेल्या श्रेष्ठ बाणांनी आणि अशनिंद्वारा राक्षसांना विदीर्ण करू लागले. त्यासमयी त्या निशाचरांचे सुटलेले मोकळे केस वार्याने उडत होते आणि पीतांबरधारी श्यामसुंदर श्रीहरि विद्युन्मालामंडित महान् मेघासमान सुशोभित होत होते. ॥५०॥
|
भिन्नातपत्रं पतमानमस्त्रं शरैरपध्वस्तविनीतवेषम् । विनिस्सृतान्त्रं भयलोलनेत्रं बलं तदुन्मत्ततरं बभूव ॥ ५१ ॥
|
राक्षसांची ती सर्व सेना अत्यंत उन्मत्त झाल्यासारखी प्रतीत होत होती. बाणांनी तिचे छत्र मोडले होते, अस्त्र-शस्त्रे गळून पडली होती, सौम्य वेष दूर झाले होते, आंतडी बाहेर आली होती आणि सर्वांचे नेत्र भयाने चंचल झाले होते. ॥५१॥
|
सिंहार्दितानामिव कुञ्जराणां निशाचराणां सह कुञ्जराणाम् । रवाश्च वेगाश्च समं बभूवुः पुराणसिंहेन विमर्दितानाम् ॥ ५२ ॥
|
ज्याप्रमाणे सिंहाच्या द्वारा पीडित झालेल्या हत्तींचे चीत्कार आणि वेग एकाच वेळी प्रकट होतात, त्याच प्रकारे त्या पुराण प्रसिद्ध नृसिंह वेषधारी श्रीहरिद्वारा तुडविल्या गेलेल्या त्या निशाचररूपी गजराजांचा हाहाकार आणि वेग एकदमच प्रकट होत होते. ॥५२॥
|
ते वार्यमाणा हरिबाणजालैः सबाणजालानि समुत्सृजन्तः । धावन्ति नक्तञ्चरकालमेघा वायुप्रणुन्ना इव कालमेघाः ॥ ५३ ॥
|
भगवान् विष्णुंच्या बाण समूहांनी आवृत्त होऊन आपल्या सायकांचा परित्याग करून ते निशाचररूपी काळे मेघ, वार्याने उडवून लावलेल्या वर्षाकालीन मेघ जसे आकाशात पळून जातांना दिसतात त्याप्रमाणे पळून जात होते. ॥५३॥
|
चक्रपहारैर्विनिकृत्तशीर्षाः सञ्चूर्णिताङ्गाश्च गदाप्रहारैः । अभिप्रहारैर्द्विविधा विभिन्नाः पतन्ति शैला इव राक्षसेन्द्राः ॥ ५४ ॥
|
चक्राच्या प्रहाराने राक्षसांची मस्तके कापली गेली होती, गदांच्या मारांनी त्यांच्या शरीरांचा चुराडा झाला होता, तसेच तलवारींच्या आघातांनी त्यांचे दोन दोन तुकडे झाले होते. याप्रकारे ते राक्षसराज पर्वतांप्रमाणे धराशायी होत होते. ॥५४॥
|
विलम्बमानैर्मणिहारकुण्डलैः निशाचरैर्नीलबलाहकोपमैः । निपात्यमानैर्ददृशे निरन्तरं निपात्यमानैरिव नीलपर्वतैः ॥ ५५ ॥
|
लटकणार्या मणिमय हारांसह आणि कुंडलांसह पाडल्या जाणार्या त्या नील मेघ सदृश्य निशाचरांच्या प्रेतांनी ती रणभूमी भरून गेली होती. तेथे धराशायी झालेले ते राक्षस नील पर्वतांसमान वाटत होते. त्यांच्या योगे तेथील भूभाग अशा तर्हेने आच्छादित झाला होता की कोठेही तीळ ठेवण्यासाठीपुरती जागाही राहिलेली दिसून येत नव्हती. ॥५५॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्तमः सर्गः ॥ ७ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा सातवा सर्ग पूरा झाला. ॥७॥
|