॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
सुंदरकांड
॥ अध्याय चौतिसावा ॥
श्रीरामांचे समुद्रतीरावर आगमन
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
लंकेतील हनुमंताच्या विक्रमाचे सिंहावलोकन
ब्रह्मा म्हणे ब्रह्मलिखितीं । कपीची लिहिली अल्पकीर्ती ।
त्याहून अगाध हनुमंताची ख्याती । किर्ती किती लिहावी ॥ १ ॥
श्रीरामा तुझें हें वानर । लंके आलें पालेखाइर ।
त्याची कीर्ति अति दुर्धर । मज साचार लिहवेना ॥ २ ॥
अठरा लक्ष दीपिका पूर्ण । कपीनें पुच्छें विझवोन ।
रावणसभा करोनि नग्न । दशानन गांजिला ॥ ३ ॥
रिघोन रावण शयनस्थाना । परिसोनि मंदोदरीचें स्वप्ना ।
सीता शुद्धी आणी मना । अशोकवना कपि आला ॥ ४ ॥
देवोनियां श्रीराममुद्रा । सुखी करोनि सीता सुंदरा ।
गांजावया राक्षसेंद्रा । केला तरूवरा नवभंग ॥ ५ ॥
मारिलें वनकरां किंकरां । पंच सेनानी प्रधानपुत्रां ।
जंबुमाळीं करोनि पुरा । निशाचरां निर्दळिलें ॥ ६ ॥
मुख्य मारावया धुरा । प्रथम बोहणी अखया कुमरा ।
इंद्रजितासी लावोनि भेदरा । अदटा वीरां मारिलें ॥ ७ ॥
राक्षससैन्याचिया श्रेणीं । अर्बुदांत पाडिल्या रणीं ।
रूधिरप्रवाहो धरणीं । भूतां पारणीं मेदमांसे ॥ ८ ॥
रणनदी रूधिरस्नान । मेदमासें आतृप्ति भोजन ।
भूतें प्रेतें पिशाचगण । रणनर्तन ते करिती ॥ ९ ॥
दशमुखाची दाढी जाळिली । लंकापुराची करोनि होळी ।
हनुमान आला तुजजवळी । आतुर्बळी महावीर ॥ १० ॥
ब्रह्मा म्हणे माझे युक्तीं । धरविली ते लिहिली कीर्ती ।
मजही न कळे कपीची ख्याती । मी लिखितीं केंवी लिहूं ॥ ११ ॥
जैसा अवतार श्रीरामचंद्र । तैसाच हनुमंत साचार ।
वीर धीर महाशूर । गुणगंभीर गांभीर्यें ॥ १२ ॥
श्रीराम देव हनुमंत भक्त । दोहींच्या स्वरूपाचा इत्यर्थ ।
करूं नेणती श्रुतिशास्त्र । इत्थंभूत केंवी मी जाणे ॥ १३ ॥
श्रीराम जीव हनुमान प्राण । श्रीराम शिव हनुमान ज्ञान ।
श्रीराम ब्रह्म हनुमान पूर्ण । दोघे परिपूर्ण परब्रह्म ॥ १४ ॥
ब्रह्मलिखित पत्रश्रवणाने श्रीरामांस आनंद व मारूतीस आलिंगन
ब्रह्मयानें लिहिलें ब्रह्मलिखितीं । ऐकोनि हनुमंताची ख्याती ।
संतोषोनि रघुपती । अति प्रीतीं आलिंगीं ॥ १५ ॥
ह्रदया ह्रदय लागतां देख । दोन्ही ह्रदयीं श्रीराम एक ।
एक तोचिं पैं अनेक । अनेकीं एक श्रीराम ॥ १६ ॥
हनुमान अवघाचि रामाआंत । हनुमान सबाह्य श्रीरघुनाथ ।
लवण समुद्रीं एक होत । तैसा हनुमंत श्रीरामीं ॥ १७ ॥
देवाभक्ताची जाली भेटी । निर्विकल्पें पडली मिठी ।
परमानंदें कोंदली सृष्टीं । आनंदकोटी सुग्रीवा ॥ १८ ॥
विजयी आमुचा हनुमान वीर । वानर करिती भुभुःकार ।
अवघीं केला जयजयकार । श्रीरामचंद्र स्मरोनी ॥ १९ ॥
अगाध हनुमंताती ख्याती । ऐकोनियां श्रीरघुपती ।
स्वमुखें आदरिली स्तुती । अति प्रीतीं हनुमंता ॥ २० ॥
वानितां हनुमंताची कीर्ती । करितां हनुमंताची स्तुती ।
धणी न पुरे श्रीरघुपती । तेचि श्लोकार्थी अनुवादो ॥ २१ ॥
श्रुत्वा हनूमतः कीर्ति यथावदभिभाषितम् ।
रामः प्रीतिसमायुक्तं वाक्यमुत्तरमब्रवीत् ॥१॥
नूनं हनूमतः कृत्यं सुमहद्भुवि दुष्करम् ।
मनसापि यदन्येन न शक्यं धरणीतलें ॥२॥
नहि तं प्रति पश्यामि यस्तरेत महार्णवम् ।
अन्यत्र गरूडाद्वायोरन्यत्र च हनूमतः ॥३॥
देवदानवयक्षाणां गन्धर्वोरगरक्षसाम् ।
अप्रवेश्या पुरी लंका रावणेनाभिपालिता ॥४॥
गुप्ता दुर्गगिरेर्मूर्न्घि वीरेणैकेन धर्षिता ॥५॥
श्रीरामांनी केलेली हनुमंताची प्रशंसा :
उल्लंघोनि अपांपती । लंके जावोनिया मारूतीं ।
अतर्क्य श्रुतिशास्त्रप्रयुक्ती । ते ते ख्याती येणें केली ॥ २२ ॥
एकें उड्डाणें समुद्रलंघन । करी ऐसा आहे कोण ।
गरूड वायु कीं वायुनंदन । अन्यत्रा गमन न करवे ॥ २३ ॥
गरूडागमन पक्षगतीं । वायूसी सर्वत्र गमनशक्ती ।
एकें उड्डाणें हा मारुती । समुद्रीं ख्याती करोनि गेला ॥ २४ ॥
सुरसा सिंहिका मैनाकगिरीं । कपीचा मार्ग रोधला सागरीं ।
एका सोडी एका मारी । एकाचा गर्व हरी स्पर्शमात्रें ॥ २५ ॥
अगाध उड्डाणाची थोरी । लंका सांडोनि माघारी ।
जावोनि पडलंकेभीतरीं । कौंचा सहपरीवारीं वधियेली ॥ २६ ॥
लंकादुर्ग सागरोदरीं । रावण रक्षी सहपरिवारीं ।
अति दुर्गम गिरिशिखरीं । दुर्धर थोरी गर्वाची ॥ २७ ॥
जया दुर्गाची निरवडी । देव बंदी तेहतीस कोडी ।
नवग्रहांचे पायी बेडी । येरां बापुडीया कोण पुसे ॥ २८ ॥
देव दैत्य गुह्यक दानव । यक्ष रक्ष सिद्ध गंधर्व ।
पन्नग ऋषीश्वर मानव । कांपती सर्व लंकेशा ॥ २९ ॥
ऐसिया दुर्धर लंकेप्रती । नाहीं साह्य ना सांगाती ।
एकला रिघोनियां मारूती । अभिनव ख्याती येणें केली ॥ ३० ॥
इंद्रजितें दांती धरिलें तृण । ऐसें दुर्धर केलें रण ।
रावणाचें मुख जाळोन । केलें दहन लंकेचें ॥ ३१ ॥
सीतेची सावकाश घेवोन भेटी । तिच्या पुसोनि गुह्य गोष्टी ।
मणि घेवोनि जग जेठी । उठाउठीं येथें आला ॥ ३२ ॥
रणकंदन सीताशुद्ध्यर्थ । सुखी सुग्रीव कपिनाथ ।
ऐकोनि सीतानिजगुह्यार्थ । श्रीरघुनाथ सुखी जाला ॥ ३३ ॥
ऐकोनि सीताअनुतापवचनें । लक्ष्मण सुखावें जीवें प्राणें ।
वानरां होतसे सुखपारणें । कपींचें बोलणे ऐकोनी ॥ ३४ ॥
लघुत्व न येतां वानरजाती । कपीनें केली रणख्याती ।
तेणें सुग्रीव वानरपती । सुखसंवित्ती पावला ॥ ३५ ॥
करोनि राक्षसकंदनार्थ । कपीनें आणिला सीताशुद्ध्यर्थ ।
आम्हां अवघियां पुरूषार्थ । संरक्षित हनुमंत ॥ ३६ ॥
हनुमंताकडून श्रीरामनामास्तवन
श्रीरामें करितां स्तुती । हनुमान अति विनतवृत्ती ।
लोटांगणें घालोनि क्षितीं । स्वयें रघुपतीतें विनवी ॥ ३७ ॥
श्रीरामा तुझी नामशक्ती । तेणें म्यां केली लंकेची ख्याती ।
त्या मज रंकाची स्तुती । केंवी रघुपति तूं करिसी ॥ ३८ ॥
ऐकोनि हनुमंताचें वचन । संतोषोनि श्रीरघुनंदन ।
पुढतीं पुसतसे आपण । दुर्गलक्षण लंकेचें ॥ ३९ ॥
श्रीरामांना लंकादुर्गाविषयी माहिती
लंकादुर्ग हें कैसें काये । कोणाची कैसें आहे ।
दुर्गींचें बळ दळसमुदाय । साभिप्राय मज सांगें ॥ ४० ॥
दुर्गद्वारीं क्रियास्थिती । दुर्गाचीं यंत्रें गुप्तगती ।
द्वाररक्षण सैन्यसंपत्ती । रिघूं निघूं युक्ती मज सांगें ॥ ४१ ॥
दुर्ग शोधिलें तुवां समूळीं । घेतली लंकेची घरधांडोळी ।
किती सैन्य रावणाजवळी । आतुर्बळी वीर किती ॥ ४२ ॥
आम्हांसीं मांडिलिया रण । संमुख येती कोण कोण ।
तूं तंव तेथींचा रणप्रवीण । रणलक्षण मज सांगें ॥ ४३ ॥
श्रीराम राजपुत्र सज्ञान । हनुमंत अनुलक्षोन ।
पुसिला लंकादुर्गप्रश्न । तेंवी आपण कपि सांगें ॥ ४४ ॥
लंका दुर्गीं समुद्र आगड । तेणें करितां अति अवघड ।
न कळें सुरासुरांची घडमोड । परम गूढ समुद्रीं ॥ ४५ ॥
मत्त गजांचिया हारी । मद स्त्रवती लंकानगरीं ।
मदगंध न माये अंबरीं । मत्त भ्रमरीं झंकार ॥ ४६ ॥
अश्वरथांचियां थाटी । पदरज न माये अंबुटीं ।
सैन्य असंख्य कोट्यनुकोटी । वीर जगजेठी राक्षस ॥ ४७ ॥
लंकादुर्ग अतिशय दुर्धर । खंदकीं जळ अपरंपार ।
माजी मीन नक्र मगर । जळीं जळचरें असंख्य ॥ ४८ ॥
उभवोनि यंत्रावरी यंत्र । परसैन्याचें देखोनि भार ।
दुरोनि करिती चकचूर । यंत्रभार महागोळा ॥ ४९ ॥
नावानिगिया अति मर्दनी । ज्या शतघ्नी सहस्त्रघ्नी ।
दुर्ग चौफेर चहूं कोनीं । यंत्रश्रेणीं मारका ॥ ५० ॥
चोरद्वारांची व्युत्पत्ती । इंद्रजित कपटी गुप्तगती ।
घाला घालोनी रातोरातीं । धुरा मारिती अस्त्रबंधें ॥ ५१ ॥
दुर्गीं शतानुशत दारवंटे । मुख्य वागणें चहूं वाटे ।
आगळा सांखळा घडघडाटें । दृढ कपाटें लोहबंधें ॥ ५२ ॥
श्रीरामासीं करावया युद्ध । रावणासी अति आल्हाद ।
सैन्य सन्नद्ध बद्ध । द्वंद्वयुद्ध धुरेसीं ॥ ५३ ॥
लंकेची निर्मिती व संरक्षणाची व्यवस्था :
समुद्रमध्यगिरीचे माथां । वसावया लंकानाथा ।
लंका करवी विधाता । दुर्गकर्ता विश्वकर्मा ॥ ५४ ॥
विश्वकर्मा निजव्युत्पत्ती । लंका निर्मीं दुर्गम गती ।
ते लंकेची दुर्गम ख्याती । म्यां तुजप्रती सांगितलीं ॥ ५५ ॥
चहूं द्वारीं संरक्षण । भट सुभट वीर दारूण ।
रावणें ठेविले आपण । रक्षोगण ते ऐका ॥ ५६ ॥
पूर्वद्वारीं दहा सहस्त्र । निधडे निःशंक निशाचर ।
शूळहस्ती खड्गधर । अति दुर्धर ते द्वारीं ॥ ५७ ॥
पश्चिमद्वारीं महाशूर । अर्बुदांत महावीर ।
शस्त्रास्त्रीं प्रवीण निशाचर । ते द्वारीं द्वार रक्षिती ॥ ५८ ॥
लक्षानुलक्ष निधडे वीर । रथ गज वाजी महाशूर ।
ते रक्षिरी दक्षिणद्वार । अहोरात्र गर्जोनी ॥ ५९ ॥
उत्तरद्वाराचा पैं धाक । स्वयें वाहे दशमुख ।
येणें द्वारें रघुकुळटिळक । आवश्यक येईल ॥ ६० ॥
शतानुशतें शतानुसहस्त्रीं । गुल्मागुल्मीं हारोहारीं ।
स्वयें रावण सहपरिवारीं । उत्तरद्वारीं संरक्षी ॥ ६१ ॥
लंकासमुद्राचे बेटीं । वसताहे गिरि त्रिकूटीं ।
भोंवतीं राक्षसांची घरटी । पारखें दृष्टीं केंवी देखें ॥ ६२ ॥
लंकादुर्ग अति गूढं । ऐकतां वाटे अवघड ।
तोही केला म्यां निवाड । कडेफोड दुर्गाची ॥ ६३ ॥
मारूतीच्या लंका दहनामुळे दुर्ग घेणे सोपे झाले
लंकादुर्ग श्रीरघुपती । म्यां पाहिलें जाण निश्चितीं ।
म्हणसी चोरोनि रातीं बितीं । वीरां रणख्याती लावोनी ॥ ६४ ॥
रावणें पुच्छा लावितां आगीं । लंका जाळितां उभयभागीं ।
वीर मारिलें ते प्रसंगीं । रणरंगी भिडोनी ॥ ६५ ॥
उपर्या धवलारें गोपुरें । सप्तखणी दामोदरें ।
लंका जाळिली घरोनघरें । राजमंदिरं मुख्यत्वें ॥ ६६ ॥
आगळा सांखळा दुर्गांचे ओटे । लोहनिबद्धें कपाटें ।
जाळिले दुर्गांचे दारवंटे । श्रीराममर्कटें हनुम्यानें ॥ ६७ ॥
मत्स्यमगरकुळीं । खंदक भरले होते जळीं ।
ते म्यां बुजिले समूळीं । दुर्गाच्या पौळी पाडोनी ॥ ६८ ॥
दुर्ग जाळिता नानापरी । मुख्य दुर्गवस्तीचा जो गिरी ।
तो म्यां जाळिला पुच्छेंकरीं । करोनि महामारी राक्षसां ॥ ६९ ॥
रावण करोनियां दीन । म्यां जाळिलें लंकाभुवन ।
राखिलें बिभीषणाचें सदन । तो भक्त पूर्ण परमार्थीं ॥ ७० ॥
जो जो श्रीरामाचा भक्त । तो तो आमचा परम आप्त ।
रावणाच्या राण्या समस्त । त्याच्या घरांत वांचविल्या ॥ ७१ ॥
श्रीराम रिघावया समदळीं । सदुर्ग लंका केली होळी ।
समुद्र तरलिया गोळांगूळीं । लंका तत्काळीं घेतील ॥ ७२ ॥
समुद्रापलीकडे जाण्याच्या योजना :
समुद्रपारीं निश्चितीं । लंकादुर्गीं रावणा वसती ।
नावांची तेथें न चले गती । मत्स्य गिळिती महामीन ॥ ७३ ॥
मत्स्य मीन आणि मगर । नावा गिळिती महानक्र ।
समुद्र अतिशयेंसीं दुर्धर । केंवी परपार पावाल ॥ ७४ ॥
समुद्र तरावया आतां । उपाव चिंतावा सर्वथा ।
दुस्तर सांगतां हनुमंता । आलें रघुनाथा स्फुरण ॥ ७५ ॥
सोडोनियां अग्निबाण । करीन समुद्राचें शोषण ।
जळजंतूंचे जातील प्राण । तरी मी आन न करीन ॥ ७६ ॥
तीव्र तप सत्वनिष्ठ । समुद्रीं करोनि पायवाट ।
वानरवीर सुखें संतुष्ट । परतट पावती ॥ ७७ ॥
समुद्रलंघन तें किती । त्यास कां वेंचूं तप : संपत्ती ।
सेतु बांधोनि सिंधूप्रती । नेईन जुत्पती परतटा ॥ ७८ ॥
विजयादशमीच्या मुहूर्तावर मध्यान्ही प्रयाण करण्याचा सुग्रीवाचा आदेश
सुग्रीवास पाचारोन । गर्जोनि सांगे श्रीराम पूर्ण ।
आजचि करावें प्रयाण । रणीं रावण मारावया ॥ ७९ ॥
विजयादशमी सुमुहूर्ती । जयो पावला रघु चक्रवर्तीं ।
प्रपितामह तो आम्हांप्रती । त्याची ख्याती तूं ऐकें ॥ ८० ॥
शमीतळीं प्रथमवस्तीं । धनेश्वर तेचि रातीं ।
अपार वर्षला संपत्ती । विखुतलें क्षितीं बहुधन ॥ ८१ ॥
तैपांसोनि अद्यापि जाण । आणावया बहुसाल धन ।
विजयादशमीस सीमोल्लंघन । शमीपूजन जन करिती ॥ ८२ ॥
पूर्वजांचे सुमुहूर्त । आजि मज जाले प्राप्त ।
लंकेसी जावया त्वरित । सेना समस्त सिद्ध करीं ॥ ८३ ॥
रणीं दंडावया लंकापती । शुभ लोचन माझे लवती ।
आलिंगावया सीता सती । बाहुस्फुरती स्वानंदें ॥ ८४ ॥
मध्यान्हीं येतांचि आदित्य । रणविजयीं अभिजित ।
प्रयाण करावे निश्चित । ऐसें रघुनाथ बोलिला ॥ ८५ ॥
सुग्रीव अंगद वगैरे वीरांना आनंद व प्रयाणा करितां सैन्यरचना
ऐकोनि श्रीरामाचें वचन । सुग्रीवा आलें अति स्फुरण ।
भेरी त्राहाटिल्या निशाण । लंकाप्रयाण गडगर्जें ॥ ८६ ॥
अंगद हर्षला तत्काळीं । वानरसेनेंत पिटिली टाळीं ।
रावण मारोनि महाबळी । जनकबाळी आणावया ॥ ८७ ॥
सुग्रीवराजाज्ञेची नीती । वानरांची निघती स्थिती ।
ज्यासी जैसी नेमिली गती । तिहीं त्या रीतीं चालावें ॥ ८८ ॥
वानरसेना आज्ञावर्तीं । नीळ महावीर सेनापती ।
तेणें चालावें ऐसिया रीतीं । मार्गगती शोधोनि ॥ ८९ ॥
धाडोनि तरस्वी तराळ । फळ मूळ जळ स्थळ ।
सेना चालवावी सुखसमेळ । यावें तत्काळ पाहोनि ॥ ९० ॥
जिकडें नाही फळ मूळ जळ । तिकडे चालवितां दळ ।
वानर कष्टतील सकळ । सेना विकळ होवों नेदीं ॥ ९१ ॥
यालागीं शोधोनि मार्गस्थिती । वानरां पदोपदीं विश्रांती ।
सेना चालवावी ऐसिया रीतीं । सेनापती सज्ञानें ॥ ९२ ॥
एकोनि श्रीरामाचा वचनार्थ । वानर हर्षले समस्त ।
बाप कृपाळु श्रीरघुनाथ । आम्हीं सनाथ श्रीरामें ॥ ९३ ॥
जरी आम्हीं वानरें उद्धत । तरी म्हणती रामदूत ।
हरिखें रामनामें गर्जत । आम्ही सनाथ श्रीरामें ॥ ९४ ॥
मार्गगतीचें लक्षण । श्रीराम वदला आपण ।
नीळें घालोनि लोटांगण । मस्तकीं चरण वंदिलें ॥ ९५ ॥
नीळासवें निजपरिवार । शतसहस्त्र वानरवीर ।
अवघ्यांपुढें चाले भार । जयजयकार करोनी ॥ ९६ ॥
गज गवाक्ष शरभ वीर । नीळामागें सहपरिवार ।
चालिला तिघांचा संभार । जयजयकार करोनी ॥ ९७ ॥
गाईंमागें जैसे गोर्हें । नीळामागें तेणें प्रकारें ।
वानर चालिलें निजभारें । जयजयकारें गर्जती ॥ ९८ ॥
ऋषभवीर वानरवोधीं । तेणें चालावें दक्षिण भागीं ।
गंधहस्तीं गंधमदान दोघीं । वामभागीं चालावें ॥ ९९ ॥
कोट्यनुकोटी वानरभार । युवराज राजकुमर ।
अंगदें घेवोनि सहपरिवार । केला नमस्कार श्रीरामा ॥ १०० ॥
निशाणें त्राहाटिल्या भेरी । तडक फुटला एकसरीं ।
काहाळा चिनका हाळा थोरी । रणमोहरी गर्जतीं ॥ १०१ ॥
जाला तुरांचा गजर । सुग्रीवराजा सहपरिवार ।
वानरीं केला जयजयकार । संख्यासंभार अवधारा ॥ १०२ ॥
शतानुशत श्याममुख वानर । गोळांगूळें शतसहस्त्र ।
कोट्यनुकोटी केवळ शुभ्र । असंख्य वानर हेमवर्णीं ॥ १०३ ॥
एक ते डाळिंबीकुसुमाकार । शेंदुरवर्णी वीर अपार ।
सुनीळ निळे वानरभार । अंजनाकार असंख्य ॥ १०४ ॥
एक बालार्कसम तांबडे । एक ते चंद्रबिंबसम चोखडे ।
इंद्रचापा समान वेगाढे । एक रोकडे स्फटिकाचें ॥ १०५ ॥
कोट्यनुकोटी अयुतें प्रयतुतं । अर्बुदे अर्बुदांतशतानुशतं ।
वानरवीर असंख्यात । हरि गर्जत रामनामें ॥ १०६ ॥
ऐसे वानरराजभार । शशाकच्छत्र युग्मचामर ।
सुग्रीव निघाला राज्यधर । जाला गजर वाद्यांचा ॥ १०७ ॥
वृक्ष फळित पुष्पित । किंशुकफुलें झेलित ।
टकेपताका त्या सैन्यांत । वीर गर्जत रामनामें ॥ १०८ ॥
वानरवीरां अत्यंत हरिख । मारोनियां दशमुख ।
सीता आणावी आवश्यक । देती हाक श्रीरामें ॥ १०९ ॥
एक रामनामें उपरमत । एक ते आनंदें नाचत ।
वानरसैन्य उल्लासत । अभिषेकार्थ रामसीता ॥ ११० ॥
श्रीरामांकित आम्ही जुत्पती । रावण बापुडें तें किती ।
आणोनियां सीता सती । श्रीरघुपती अभिषेकूं ॥ १११ ॥
ऐसा देखोनि सुग्रीवभार । संतोषला श्रीरामचंद्र ।
निघावया अति सत्वर । केलें विचित्र तें ऐका ॥ ११२ ॥
हनुमंतावर श्रीराम व अंगदावर लक्ष्मण आरूढ होऊन त्यांचे प्रयाण
इंद्र चढे ऐरावता । तैसा श्रीराम पुढे हनुमंता ।
अंगद अति उल्लासता । होय उचलिता सौमित्रा ॥ ११३ ॥
जैसा भूतारूढ भूतनाथ । तैसा अंगदीं ऊर्मिळाकांत ।
देखोनि उल्लासे श्रीरघुनाथ । अति उल्लासित सुग्रीव ॥ ११४ ॥
दक्षिण दिशेला गमन
श्रीरामलक्ष्मण वीर वरिष्ठ । सुग्रीवराजा तयांनिकट ।
दक्षिणपंथें घडघडाट । वीर उद्भट चालिले ॥ ११५ ॥
सुषेण आणि जांबुवंत । जांबुवंताचा ज्येष्ठ भ्रात ।
जो कां ऋक्षाराज विख्यात । नामसंकेत धूम्राक्ष ॥ ११६ ॥
सुषेण वीर जगजेठी । जांबुवंत वीर निकटी ।
श्रीराम लक्षोनियां दृष्टी । सुखसंतुष्टी चालिले ॥ ११७ ॥
श्रीरामाचे पाठीं जाण । जांबुवंत आणि सुषेण ।
हेही चालती सावधान । यांसी हे स्थान नेमस्त ॥ ११८ ॥
वानरवीर श्रेष्ठ श्रेष्ठ । त्यासी वांटोनि देती वाट ।
ऐका सांगेन तें स्पष्ट । वीर वरिष्ठ मार्गभागीं ॥ ११९ ॥
शतबळीं नामें कपीश्वर । सेना दशकोटी परिवार ।
श्रीरामाचा दक्षिणपार । राखें वानर उल्लासें ॥ १२० ॥
केशरी हनुमंताचा पिता सावत्र । अंजनीचा पूर्व भ्रतार ।
सेना शतकोटिसंभार । वीर वानर आतुर्बळीं ॥ १२१ ॥
त्याहीसवें वीर प्रबळ । गज गवाक्ष वीर अतिबळ ।
गवय वानर अति विक्राळ । सकळ दळ संरक्षी ॥ १२२ ॥
उल्कामुखनामें महावीर । प्रभवनामा अति दुर्धर ।
इंद्रजानु त्याहूनि थोर । आला सत्वर रामकाजा ॥ १२३ ॥
दधिमुख प्रजंघ जंघ । शरभ क्षुरभ कपी अनेग ।
श्रीरामाचें सैन्य सांग । अष्टदिग्भाग रक्षिती ॥ १२४ ॥
रामाज्ञा दुर्धर गाढी । नेमिल्या मार्गाच्या परवडी ।
चालती वानरांच्या कोडी । समुद्रथडी लक्षोनी ॥ १२५ ॥
मार्ग शोधण्यासाठी व रस्ते करण्यासाठी पुढे सैनिक पाठविले
समस्तही सीताप्राप्त्यर्थ । वानरां उल्लास अत्यद्भुत ।
येरयेरांपुढे उडत । उपरमत उल्लासें ॥ १२६ ॥
येरयेरांवरी चडती । येरयेरांवरी उडती ।
येरयेरांते पाडिती । आसुडती येरयेरां ॥ १२७ ॥
येरयेरां तिरस्कारिती । येरयेरां निखंदिती ।
येरयेरां कुस्ती घेती । नोकोचिती येरयेरां ॥ १२८ ॥
येरयेरां दाविती वांकुली । येरयेरां करिती गुदगुली ।
रामनामेंगर्जती महाबळी । गगनीं आरोळी न समाये ॥ १२९ ॥
वांकुल्या दाविती सुग्रीवाकडे । पिलंगतीं वाडेंकोडें ।
अवघे नाचती रामापुढें । मातलीं माकडें रामनामें ॥ १३० ॥
सैरां जातां वानरपंक्ती । निशाचरां शिंतरती ।
मार्ग शोधावयाचे अर्थीं । पुढें जुत्पती पाठविलें ॥ १३१ ॥
राक्षस मारोनि उद्भट । पुढील शोधावया वाट ।
नळ वीर अति उद्भट । वीरवरिष्ठ पैं पनस ॥ १३२ ॥
राक्षसांची गती अगती । पनस जाणे अतर्क्यवृत्ती ।
कुमुद वीर महामती । राक्षसजातिघातक ॥ १३३ ॥
मार्ग शोधावया जाण । स्वयें श्रीरामें आपण ।
तिघे धाडिलें वीर दारूण । वानरसैन्यसमवेत ॥ १३४ ॥
वानरसेनासमुद्रजळा । नीळ सेनानीं तोचि वेळा ।
आंवरोनि सकळ दळा । वीरार्गळा प्रतापी ॥ १३५ ॥
नीळाची निग्रहआज्ञावृत्ती । ऋक्ष वानर आणि जुत्पती ।
कोणी उल्लंघूं न शकती । प्रतापमूर्ति सेनानी ॥ १३६ ॥
मध्ये न थांबता नीट जाण्याचा आदेश :
नेमूनि बोलिलो श्रीरघुपती । मध्यें न करोनि वस्ती ।
आजिचे आजि लंकेगती । शीघ्रगतीं स्वयें जाणें ॥ १३७ ॥
ऐकोनि श्रीरामउत्तर । पृथ्वी कवळोनि समग्र ।
चालिले वानरांचें भार । हातेरें नखदंष्ट्रा ॥ १३८ ॥
श्रीरामनामाचा गुणगुणाचार । चालिले रीस अपार ।
नामें गर्जती वानर । असंख्यभार चालिलें ॥ १३९ ॥
नदनदिया देशोदेशीं । गिरिकंदरीं विवरासीं ।
वानर आले रामकाजासीं । मही चौपासीं कवळोनी ॥ १४० ॥
चारी बोटें रिती क्षिती । नाहीं उरली वानरांहातीं ।
सोडवावया सीता सती । शीघ्रगती चालिले ॥ १४१ ॥
वानर वीर चालतां धरणीं । रज : कण कोंदलें गगनीं ।
सूर्य लोपला मध्यान्हीं । काळाच्या मनीं चळकांप ॥ १४२ ॥
सूर्य लोपतां माध्यान्हीं । गाई परतल्या गोठणीं ।
पक्षी कळकळती गगनीं । देवाविमानीं कांपती ॥ १४३ ॥
वानरवीर अहोरात्रीं । वाटे न घेवोनि विश्रांती ।
सोडवावया सीता सती । शीघ्रगती निघालें ॥ १४४ ॥
श्रीरामकार्याचे निजसुख । वानरां नाठवे तहानभूक ।
निद्रा विसरोनि निःशेष । दक्षिणामुख चालिले ॥ १४५ ॥
विंध्याद्री, मध्याद्री व विविध वने-उपवने उल्लंघून समुद्रतीरावर आगमन
उल्लंघोनि विंध्याद्री । उल्लंघोनि मलयाद्री ।
नाना वनें वानरीं । क्षणामाझारीं लंघिलीं ॥ १४६ ॥
नदी नद थोरथोर । क्षणें उतरोनि वानर ।
तंव पुढें देखिला सागर । गर्जत घोर गडगर्जे ॥ १४७ ॥
ऐकोनि समुद्राचा गजर । श्रीरामनामें घेती वानर ।
अवघीं केला भुभुःकार । नादें अंबर कोंदलें ॥ १४८ ॥
नामें कोंदलें अंबर । नामें कोंदला सागर ।
नामें कोंदलें चराचर । नामें वानर गर्जती ॥ १४९ ॥
गिळोनि समुद्राचा ध्वनीं । नाम कोंदलें जीवनीं ।
नामें कोंदली अवनीं । नाम त्रिभुवनीं कोंदलें ॥ १५० ॥
रामसेना व सागर यांची तुलना
पुढें जलाब्धि महासागर । पाठीसीं वानरसेनासमुद्र ।
मध्यें शोभे श्रीरामचंद्र । मर्यादामेरू धैर्याचा ॥ १५१ ॥
गंगायमुनासंगमांत । शोभे प्रयागवाट मध्यस्थ ।
तेंवी सैन्यजलसिंधूआंत । शोभे रघुनाथ प्रतापें ॥ १५२ ॥
पावोनियां समुद्रतीर । कटक उतरलें समग्र ।
उल्लंघावया सागर । वानरवीर उल्लासी ॥ १५३ ॥
समुद्रीं महामीन चवकत । तैसेचि वानर तळपत ।
समुद्रीं मत्स्य उल्लाळें देत । कपि उपरमत आकाशीं ॥ १५४ ॥
अतिशयें निबरा पाठीं । कमठ देखोनियां दृष्टीं ।
शिळा बांधोनियां पाठीं । वानरकोटीं नाचती ॥ १५५ ॥
तीक्ष्णदंत देखोनि मगर । दांत विचकोनि वानर ।
स्वयें धांवती त्यांसमोर । कपिपुच्छाग्र तोचि फडा ॥ १५६ ॥
समुद्रीं मत्स्यांचीं चळवळ । तैसीं वानरां कळवळ ।
आणावया जनकबाळ । उतावीळ अवघेही ॥ १५७ ॥
समुद्रीं येती दुर्धर लाटा । तैसा वानरीं प्रताप लाठा ।
वेगीं जावोनि परतटा । दशकंठा मारावया ॥ १५८ ॥
जेंवी रेखा नुल्लंघवे सागरा । तेंवी श्रीरामाआज्ञा वानरां ।
अवघें आले समुद्रतीरा । लंकापुरा जावया ॥ १५९ ॥
एकाजनार्दना शरण । पुढें गोड निरूपण ।
श्रीरामा भेटेल बिभीषण । सेतुबंधन अवधारा ॥ १६० ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे सुंदरकांडे एकाकारटीकायां श्रीरामसमुद्रतीरागमनं नाम चतुस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥ ३४ ॥
॥ ओव्यां १६० ॥ श्लोक ४८ ॥ एवं संख्या २०८ ॥
GO TOP
|