राजाज्ञया श्रीराममानेतुं सुमन्त्रस्य तद्भवने गमनम् -
|
सुमंत्राचे राजाच्या आज्ञेने श्रीरामाला बोलाविण्यासाठी त्यांच्या महालात जाणे -
|
ते तु तां रजनीमुष्य ब्राह्मणा वेदपारगाः ।
उपतस्थुरुपस्थानं सह राजपुरोहिताः ॥ १ ॥
|
ते वेदात पारंगत असणारे ब्राह्मण तथा पुरोहित ती रात्र घालवल्यावर प्रातःकाळी (राजाच्या प्रेरणेनुसार) राजद्वारावर उपस्थित झाले होते. ॥१॥
|
अमात्या बलमुख्याश्च मुख्या ये निगमस्य च ।
राघवस्याभिषेकार्थे प्रीयमाणाः सुसंगताः ॥ २ ॥
|
मंत्री, सेनेचे मुख्य मुख्य अधिकारी आणि मोठे मोठे व्यापरी- सावकार राघवाच्या अभिषेकासाठी अत्यंत प्रसन्नतेने तेथे एकत्रित झाले होते. ॥२॥
|
उदिते विमले सूर्ये पुष्ये चाभ्यागतेऽहनि ।
लग्ने कर्कटके प्राप्ते जन्म रामस्य च स्थिते ॥ ३ ॥
अभिषेकाय रामस्य द्विजेन्द्रैरुपकल्पितम् ।
काञ्चना जलकुम्भाश्च भद्रपीठं स्वलंकृतम् ॥ ४ ॥
रथश्च सम्यगास्तीर्णो भास्वता व्याघ्रचर्मणा ।
गंगायमुनयोः पुण्यात् संगमादाहृतं जलम् ॥ ५ ॥
|
निर्मल सूर्योदय झाल्यानंतर दिवसा ज्यावेळी पुष्य नक्षत्राचा योग आला तथा श्रीरामाच्या जन्माचे कर्क लग्न उपस्थित झाले, त्या समयी श्रेष्ठ ब्राह्मणांनी रामाच्या अभिषेकासाठी सारी सामग्री एकत्र करून तिला तपासून ठेवले होते. जलांनी भरलेले सोन्याचे कलश, उत्तम प्रकारे सजविलेले भद्रपीठ , चमकणार्या व्याघ्रचर्माने उत्तम तर्हेने आवृत्त रथ, गंगा- यमुनेच्या पवित्र संगमांतून आणलेले जल - या सर्व वस्तु एकत्र करून ठेवलेल्या होत्या. ॥३-५॥
|
याश्चान्याः सरितः पुण्या ह्रदाः कूपाः सरांसि च ।
प्राग्वाहाश्चोर्ध्ववाहाश्च तिर्यग्वाहाश्च क्षीरिणः ॥ ६ ॥
ताभ्यश्चैवाहृतं तोयं समुद्रेभ्यश्च सर्वशः ।
क्षौद्रं दधि घृतं लाजा दर्भाः सुमनसः पयः ॥ ७ ॥
अष्टौ च कन्या रुचिरा मत्तश्च वरवारिणा ।
सजलाः क्षीरिभिश्छन्ना घटाः काञ्चनराजताः ॥ ८ ॥
पद्मोत्पलयुता भान्ति पूर्णाः परमवारिणा ।
|
याशिवाय ज्या अन्य नद्या, पवित्र जलाशय, कूप आणि सरोवरे आहेत तथा ज्या पूर्वेकडे वाहणार्या (गोदावरी, कावेरी आदि) नद्या आहेत; वरील बाजूला प्रवाह असणारी जी (ब्रह्मावर्त आदि) सरोवरे आहेत तथा दक्षिण आणि उत्तरेकडे वाहणार्या ज्या (गण्डकी एवं शोणभद्र आदि) नद्या आहेत, ज्यात दुधासमान निर्मल जल भरलेले वाहात असते, त्या सर्वांतून आणि समस्त समुद्रांतूनही जे जल आणले गेले होते, तेथे त्यांचा संग्रह करून ठेवण्यात आला होता. या अतिरिक्त दूध, दही, तूप, मधु, लाह्या, कुश, फूल, आठ सुंदर कन्या, मदमत्त गजराज आणि दूध असणार्या वृक्षांच्या पल्लवांनी झाकलेले सोन्याचांदीचे जलपूर्ण कलशही तेथे विराजमान होते, जे उत्तम जलाने भरलेले असूनही त्याच बरोबर पद्म आणि उत्पलांनी संयुक्त असल्याने फारच शोभून दिसत होते. ॥६ - ८ १/२॥
|
चन्द्रांशुविकचप्रख्यं पाण्डुरं रत्नभूषितम् ॥ ९ ॥
सज्जं तिष्ठति रामस्य वालव्यजनमुत्तमम् ।
|
श्रीरामासाठी चंद्रम्याच्या किरणाप्रमाणे विकसित कांतिने युक्त श्वेत पीतवर्णाची रत्नजडित उत्तम चवरी सुसज्जित रूपाने ठेवली गेली होती. ॥९ १/२॥
|
चन्द्रमण्डलसङ्काशमातपत्रं च पाण्डुरम् ॥ १० ॥
सज्जं द्युतिकरं श्रीमदभिषेकपुरस्सरम् ।
|
चंद्रमण्डला समान सुसज्जित श्वेत छत्रही अभिषेकाच्या सामग्रीसह शोभून दिसत होते जे परम सुंदर आणि प्रकाश पसरविणारे होते. ॥१० १/२॥
|
पाण्डुरश्च वृषः सज्जः पाण्डुराऽश्वश्च संस्थितः ॥ ११ ॥
|
सुसज्जित श्वेत वृषभ आणि श्वेत अश्वही तेथे उभे होते. ॥११॥
|
वादित्राणि च सर्वाणि वन्दिनश्च तथा परे ।
इक्ष्वाकूणां यथा राज्ये सम्भ्रियेताभिषेचनम् ॥ १२ ॥
तथाजातीयमादाय राजपुत्राभिषेचनम् ।
ते राजवचनात् तत्र समवेता महीपतिम् ॥ १३ ॥
|
सर्व प्रकारची वाद्ये तेथे उपस्थित होती. स्तुति-पाठ करणारे बंदी तथा अन्य मागध आदिही उपस्थित होते. इक्ष्वाकुवंशी राजांच्या राज्यात जशा अभिषेक- सामग्रींचा संग्रह होणे आवश्यक आहे, राजकुमाराच्या अभिषेकाची तशीच सामग्री बरोबर घेऊन ते सर्व लोक महाराज दशरथांच्या आज्ञेस अनुसरून तेथे त्यांच्या दर्शनासाठी एकत्रित झाले होते. ॥१२- १३॥
|
अपश्यन्तोऽब्रुवन् को नु राज्ञो नः प्रतिवेदयत् ।
न पश्यामश्च राजानमुदितश्च दिवाकरः ॥ १४ ॥
यौवराज्याभिषेकश्च सज्जो रामस्य धीमतः ।
|
द्वारावर राजा न दिसल्याने ते म्हणू लागले - "कोण महाराजांजवळ जाऊन त्यांना आमच्या आगमनाची सूचना देईल. आम्ही महाराजांना येथे पहात नाही आहोत. सूर्योदय झाला आहे आणि बुद्धिमान रामाच्या यौवराज्याभिषेकाची सारी सामग्री जमविली गेली आहे.' ॥१४ १/२॥
|
इति तेषु ब्रुवाणेषु सर्वांतांश्च महीपतीन् ॥ १५ ॥
अब्रवीत् तानिदं वाक्यं सुमन्त्रो राजसत्कृतः ।
|
ते सर्व लोक ज्यावेळी या प्रकारच्या गोष्टी करीत होते, त्याच वेळी राजा द्वारा सन्मानित सुमंत्रांनी तेथे उभे असलेल्या त्या समस्त भूपतिंनाही गोष्ट सांगितली - ॥१५ १/२॥
|
रामं राज्ञो नियोगेन त्वरया प्रस्थितो ह्यहम् ॥ १६ ॥
पूज्या राज्ञो भवन्तश्च रामस्य च विशेषतः ।
अयं पृच्छामि वचनात् सुखmaaयुष्मतामहम् ॥ १७ ॥
|
मी महाराजांच्या आज्ञेवरून श्रीरामास बोलावून आणण्यासाठी लगेच जात आहे. आपण सर्व लोक महाराजांना आणि विशेषतः श्रीरामचंद्रांना पूजनीय आहात. मी त्यांच्या वतीने आपणा समस्त चिरंजीवी पुरुषांचा कुशल समाचार विचारीत आहे. आपण सुखात आहात ना ? ।१६- १७॥
|
राज्ञः सम्प्रतिबुद्धस्य चानागमनकारणम् ।
इत्युक्त्वान्तःपुरद्वारमाजगाम पुराणवित् ॥ १८ ॥
|
असे म्हणून आणि जागे झालेले असूनही श्रीमहाराजांच्या बाहेर न येण्याचे कारण सांगून पुरातन वृत्तांताला जाणणारे सुमंत्र पुन्हा अंतःपुराच्या द्वाराशी परत आले. ॥१८॥
|
सदा सक्तं च तद् वेश्म सुमन्त्रः प्रविवेश ह ।
तुष्टावास्य तदा वंशं प्रविश्य स विशाम्पतेः ॥ १९ ॥
|
ते राजभवन सुमंत्रासाठी सदा खुले राहात असे. त्यांनी आत प्रवेश केला आणि प्रवेश करून महाराजांच्या वंशाची स्तुति केली. ॥१९॥
|
शयनीयं नरेन्द्रस्य तदासाद्य व्यतिष्ठत ।
सोऽत्यासाद्य तु तद् वेश्म तिरस्करणिमन्तरा ॥ २० ॥
|
त्यानंतर ते राजांच्या शयनगृहाच्या जवळ जाऊन उभे राहिले. त्या घराच्या अत्यंत निकट पोहोंचून जेथून मध्ये केवळ चिकाच्या पडद्याचे अंतर राहिलेले होते, तेथे उभे राहून ते गुणवर्णनपूर्वक आशीर्वाद सूचक वचनांच्या द्वारे राघवाची (रघुकुळनरेश दशरथांची) स्तुति करू लागले. ॥२०॥
|
आशीर्भिर्गुणयुक्ताभिरभितुष्टाव राघवम् ।
सोमसूर्यौ च काकुत्स्थ शिववैश्रवणावपि ॥ २१ ॥
वरुणश्चाग्निरिन्द्रश्च विजयं प्रदिशन्तु ते ।
|
'काकुस्थ ! चंद्रमा, सूर्य, शिव, कुबेर, वरूण, अग्नि आणि इंद्र आपल्याला विजय प्रदान करोत. ॥२१ १/२॥
|
गता भगवती रात्रिरहः शिवमुपस्थितम् ॥ २२ ॥
बुध्यस्व राजशार्दूल कुरु कार्यमनन्तरम् ।
|
'भगवति रात्र निघून गेली आहे. आता कल्याणस्वरुप दिन उपस्थित झाला आहे. राजसिंह , निद्रेचा त्याग करुन जागे व्हावे आणि आता जे कार्य प्राप्त झाले आहे ते करावे. ॥२२ १/२॥
|
ब्राह्मणा बलमुख्याश्च नैगमाश्चागतास्त्विह ॥ २३ ॥
दर्शनं प्रतिकाङ्क्षन्ते प्रतिबुध्यस्व राघव ।
|
'ब्राह्मण, सेनेचे मुख्य अधिकारी आणि मोठमोठे शेट- सावकार येथे आलेले आहेत. ते सर्व लोक आपल्या दर्शनाची इच्छा करीत आहेत. रघुनंदन ! जागे व्हा.' ॥२३ १/२॥
|
स्तुवन्तं तं तदा सूतं सुमन्त्रं मन्त्रकोविदम् ॥ २४ ॥
प्रतिबुध्य ततो राजा इदं वचनमब्रवीत् ।
|
मंत्रणा करण्यात कुशल सूत सुमंत्र जेव्हा या प्रकारे स्तुति करू लागले तेव्हा राजांनी जागे होऊन त्यांना याप्रकारे सांगितले - ॥२४ १/२॥
|
राममानय सूतेति यदस्यभिहितो मया ॥ २५ ॥
किमिदं कारणं येन ममाज्ञा प्रतिवाह्यते ।
न चैव सम्प्रसुप्तोऽहमानयेहाशु राघवम् ॥ २६ ॥
|
'सूत ! श्रीरामाला बोलावून आणा' - हे जे मी तुम्हांला सांगितले होते, त्याचे पालन का झाले नाही ? असे कोणते कारण आहे की ज्यामुळे माझ्या आज्ञेचे उलंघन केले जात आहे ? मी झोपलेला नाही. तुम्ही शीघ्र राघवाला येथे बोलावून आणा.' ॥२५- २६॥
|
इति राजा दशरथः सूतं तत्रान्वशात् पुनः ।
स राजवचनं श्रुत्वा शिरसा प्रतिपूज्य तम् ॥ २७ ॥
निर्जगाम नृपावासान्मन्यमानः प्रियं महत् ।
प्रपन्नो राजमार्गं च पताकाध्वजशोभितम् ॥ २८ ॥
|
याप्रकारे राजा दशरथांनी जेव्हा सूताला फिरून उपदेश केला तेव्हा ते राजाची आज्ञा ऐकून मस्तक नमवून तिचा सन्मान करीत राजभवनातून बाहेर पडले. ते मनातल्या- मनात आपले महान प्रिय झाले असे मानू लागले. राजभवनांतून निघून सुमंत्र ध्वजा- पताकांनी सुशोभित राजमार्गावर आले. ॥२७ -२८॥
|
हृष्टः प्रमुदितः सूतो जगामाशु विलोकयन् ।
स सूतस्तत्र शुश्राव रामाधिकरणाः कथाः ॥ २९ ॥
अभिषेचनसंयुक्ताः सर्वलोकस्य हृष्टवत् ।
|
ते हर्ष आणि उल्हासाने भरून सर्वत्र दृष्टी टाकीत शीघ्रतापूर्वक पुढे चालू लागले. सूत सुमंत्र तेथे मार्गात सर्व लोकांच्या मुखांतून निघणार्या रामाच्या राज्याभिषेकाच्या संबंधी आनंददायक गोष्टी ऐकत चालले होते. ॥२९ १/२॥
|
ततो ददर्श रुचिरं कैलाससदृशप्रभम् ॥ ३० ॥
रामवेश्म सुमम्त्रस्तु शक्रवेश्मसमप्रभम् ।
महाकपाटपिहितं वितर्दिशतशोभितम् ॥ ३१ ॥
|
तदनंतर सुमंत्रांना कैलास पर्वता प्रमाणे श्वेत प्रभेने प्रकाशित होणारे ते इंद्रभवनाप्रमाणे दीप्तिमान श्रीरामाचे सुंदर भवन दिसू लागले. त्याचे महाद्वार विशाल दरवाजांनी बंद केलेले होते. (त्याच्या आंतील लहान द्वारच उघडलेले होते.) शेकडो वेदिका त्या भवनाची शोभा वाढवित होत्या. ॥३०-३१॥
|
काञ्चनप्रतिमैकाग्रं मणिविद्रुमतोरणम् ।
शारदाभ्रघनप्रख्यं दीप्तं मेरुगुहासमम् ॥ ३२ ॥
|
त्याचा मुख्य अग्रभाग सोन्याच्या देव-प्रतिमांनी अलंकृत होता. त्याच्या बाहेर महाद्वारा मध्ये मणि आणि पोवळी जडविलेली होती. ते सर्व भवन शरद ऋतूतील मेघाप्रमाणे श्वेत कांतिने युक्त, दीप्तिमान आणि मेरूपर्वताच्या गुहेप्रमाणे शोभायमान होते. ॥३२॥
|
मणिभिर्वरमाल्यानां सुमहद्भिः अलङ्कृतम् ।
मुक्तामणिभिराकीर्णं चन्दनागुरुभूषितम् ॥ ३३ ॥
|
सुवर्णनिर्मित पुष्पांच्या माळांमध्ये ओवल्या गेलेल्या बहुमूल्य मण्यांनी ते भवन सजलेले होते. भिंतीमध्ये जडविलेल्या मुक्ता- मण्यांनी व्याप्त होऊन ते झगमगत होते. (अथवा तेथे मोती आणि मण्यांचे भांडार भरलेले होते. ) चंदन आणि अगुराचा सुगंध त्याची शोभा वाढवत होता. ॥३३॥
|
गंधान् मनोज्ञान् विसृजद् दार्दुरं शिखरं यथा ।
सारसैश्च मयूरैश्च विनदद्भिर्विराजितम् ॥ ३४ ॥
|
ते भवन मलयाचलाच्या समीपवर्ती असलेला दर्दुर नामक चंदनगिरीच्या शिखराप्रमाणे सर्व बाजूस मनोहर सुगंध पसरवीत होते. कलरव करणारे सारस आणि मयूर आदि पक्षी त्याची शोभा वाढवीत होते. ॥३४॥
|
सुकृतेहामृगाकीर्णंमुत्कीर्णं भक्तिभिस्तथा ।
मनश्चक्षुश्च भूतानामाददत् तिग्मतेजसा ॥ ३५ ॥
|
सोने आदिंच्या सुंदर ढंगाने बनविलेल्या लांडग्यांच्या मूर्तिंनी ते व्याप्त होते. शिल्पकारांनी त्याच्या भिंतीत फार सुंदर नक्षी कोरली होती. ते आपल्या उत्कृष्ट शोभेने समस्त प्राण्यांचे मन आणि नेत्रांना आकृष्ट करून घेत होते. ॥३५॥
|
चन्द्रभास्करसंकाशं कुबेरभवनोपमम् ।
महेन्द्रधामप्रतिमं नानापक्षिसमाकुलम् ॥ ३६ ॥
|
चंद्रमा आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी, कुबेर- भवनाप्रमाणे अक्षय संपत्तिने पूर्ण तसेच इंद्रधामा प्रमाणे भव्य आणि मनोरम अशा त्या रामभवनात नाना प्रकारचे पक्षी किलबिल करीत होते. ॥३६॥
|
मेरुशृङ्गसमं सूतो रामवेश्म ददर्श ह ।
उपस्थितैः समाकीर्णं जनैरञ्जलिकारिभिः ॥ ३७ ॥
|
सुमंत्राने पाहिले - श्रीरामांचा महाल मेरू शिखरा प्रमाणे शोभायमान आहे. हात जोडून श्रीरामास वंदन करण्यासाठी उपस्थित झालेल्या असंख्य मनुष्यांनी ते गजबजलेले होते. ॥३७॥
|
उपादाय समाक्रान्तैस्तदा जानपदैर्जनैः ।
रामाभिषेकसुमुखैरुन्मुखैः समलंकृतम् ॥ ३८ ॥
|
नाना प्रकारचे उपहार घेऊन जनपद- निवासी माणसे त्यासमयी तेथे पोहोंचली होती. रामाच्या अभिषेकाचा समाचार ऐकून त्यांचे चेहरे प्रसन्नतेने प्रफुल्लित झाले होते. सर्वजण तो उत्सव पाहण्यासाठी उत्कठित झाले होते. त्या सर्वांच्या उपस्थितीने त्या भवनांची फार शोभा दिसत होती. ॥३८॥
|
महामेघसमप्रख्यमुदग्रं सुविराजितम् ।
नानारत्नसमाकीर्णं कुब्जकैरपि चावृतम् ॥ ३९ ॥
|
ते विशाल राजभवन महान मेघखण्डा समान ऊंच आणि सुंदर शोभेने सम्पन्न होते. त्याच्या भिंतीत नाना प्रकारची रत्ने जडविलेली होती आणि कुबड्या सेवकांनी ते भरलेले होते. ॥३९॥
|
स वाजियुक्तेन रथेन सारथिः
समाकुलं राजकुलं विराजयन् ।
वरूथिना राजगृहाभिपातिना
पुरस्य सर्वस्य मनांसि हर्षयन् ॥ ४० ॥
|
सारथी सुमंत्र राजभवनाकडे जाणार्या वरूथा (लोखंडाची चादर अथवा गवतांचे बनविलेले आवरण) नी युक्त तथा चांगल्या घोड्यांनी जोडलेल्या रथाच्या द्वारा मनुष्यांच्या गर्दीनी भरलेल्या राजमार्गाची शोभा वाढवीत तथा समस्त नगर- निवासी लोकांच्या मनाला आनंद प्रदान करीत श्रीरामाच्या भवनाच्या जवळ जाऊन पोहोंचले. ॥४०॥
|
ततः समासाद्य महाधनं महत्
प्रहृष्टरोमा स बभूव सारथिः ।
मृगैर्मयूरैश्च समाकुलोल्बणं
गृहं वरार्हस्य शचीपतेरिव ॥ ४१ ॥
|
उत्तम वस्तु प्राप्त करण्यास अधिकारी असलेल्या श्रीरामाचे ते महान समृद्धशाली विशाल भवन शचीपति इंद्राच्या भवनाप्रमाणे सुशोभित होत होते. इकडे तिकडे विखुरलेल्या मृगांनी आणि मयूरांनी त्याची शोभा अधिकच वाढलेली होती. तेथे पोहोचतांच सारथी सुमंत्राच्या शरीरावर अधिक हर्षामुळे रोमाञ्च उभे राहिले. ॥४१॥
|
स तत्र कैलासनिभाः स्वलंकृताः
प्रविश्य कक्ष्यास्त्रिदशालयोपमाः ।
प्रियान् वरान् राममते स्थितान् बहून्
व्यपोह्य शुद्धान्तमुपस्थितो रथी ॥ ४२ ॥
|
तेथे कैलास आणि स्वर्गाप्रमाणे दिव्य शोभेने युक्त, सुंदर सजविलेल्या अनेक देवड्यांना ओलांडून श्रीरामाचंद्रांच्या आज्ञेत वागणार्या बर्याचश्या श्रेष्ठ मनुष्यांना मध्ये सोडून रथासहित सुमंत्र अंतःपुरात द्वारापाशी उपस्थित झाले. ॥४२॥
|
स तत्र शुश्राव च हर्षयुक्ता
रामाभिषेकार्थकृतां जनानाम् ।
नरेन्द्रसूनोरभिमङ्गलार्थाः
सर्वस्य लोकस्य गिरः प्रहृष्टः ॥ ४३ ॥
|
त्या स्थानावर त्यांनी श्रीरामाच्या- अभिषेक संबंधी कर्म करणार्या लोकांच्या हर्षभरित गोष्टी ऐकल्या, ज्या राजकुमार श्रीरामासाठी सर्व बाजूनी मंगलकामना सूचित करीत होत्या. या प्रकारे त्यांनी अन्य सर्व लोकांच्याही हर्षोल्हासाने परिपूर्ण वार्तांचे श्रवण केले. ॥४३॥
|
महेन्द्रसद्मप्रतिमं तु वेश्म
रामस्य रम्यं मृगपक्षिजुष्टम् ।
ददर्श मेरोरिव शृङ्गमुच्चं
विभ्राजमानं प्रभया सुमंत्रः ॥ ४४ ॥
|
श्रीरामाचे ते भवन इंद्रसदनाच्या शोभेला तिरस्कृत करीत होते. मृगांनी आणि पक्ष्यांनी सेवित होण्यामुळे त्याची रमणीयता अधिकच वाढली होती. सुमंत्रांनी ते भवन पाहिले. ते आपल्या प्रभेने प्रकाशित होणार्या मेरूगिरीच्या उंच शिखराप्रमाणे सुशोभित होत होते. ॥४४॥
|
उपस्थितैरञ्जलिकारिभिश्च
सोपायनैर्जानपदैर्जनश्च ।
कोट्या परार्द्धैश्च विमुक्तयानैः
समाकुलं द्वारपदं ददर्श ॥ ४५ ॥
|
त्या भवनाच्या द्वारावर पोहोचून सुमंत्रांनी पाहिले - श्रीरामाची वंदना करण्यासाठी हात जोडून उपस्थित झालेले जनपद- वासी लोक आपापल्या वाहनांतून उतरून हातात नाना प्रकारचे उपहार करोडो आणि परार्धाच्या संख्येत उभे होते. ज्यामुळे तेथे प्रचंड गर्दी जमा झालेली होती. ॥४५॥
|
ततो महामेघमहीधराभं
प्रभिन्नमत्यङ्कुशमत्यसह्यम् ।
रामोपवाह्यं रुचिरं ददर्श
शत्रुञ्जयं नागमुदग्रकायम् ॥ ४६ ॥
|
त्यानंतर त्यांनी श्रीरामाच्या स्वारीसाठी वाहन म्हणून असलेल्या सुंदर शत्रुञ्जय नामक विशालकाय गजराजास पाहिले, जो महान मेघाने युक्त पर्वता समान प्रतीत होत होता. त्याच्या गण्डस्थलातून मदाची धार वहात होती. तो अंकुशाने काबूत येणारा नव्हता, त्याचा वेग शत्रूंसाठी अत्यंत असह्य होता. जसे त्याचे नाम होते तसेच त्याचे गुणही होते. ॥४६॥
|
स्वलङ्कृतान् साश्वरथान् सकुञ्जरा-
नमात्यमुख्यांश्च ददर्श वल्लभान् ।
व्यपोह्य सूतः सहितान् समन्ततः
समृद्धमन्तःपुरमाविवेश ह ॥ ४७ ॥
|
त्यांनी तेथे राजाचे परम प्रिय मुख्य मुख्य मंत्र्यांनाही एकत्र उपस्थित असलेले पाहिले, जे सुंदर वस्त्राभूषणांनी विभूषित होते आणि घोडे, रथ आणि हत्तींच्या सह तेथे आलेले होते. सुमंत्रांनी त्या सर्वांना एका बाजूस सारून स्वयं श्रीरामाच्या समृद्धशाली अंतःपुरात प्रवेश केला. ॥४७॥
|
ततोऽद्रिकूटाचलमेघसंनिभं
महाविमानोपमवेश्मसंयुतम् ।
अवार्यमाणः प्रविवेश सारथिः
प्रभूतरत्नं मकरो यथार्णवम् ॥ ४८ ॥
|
ज्याप्रमाणे मगर प्रचुर रत्नांनी भरलेल्या समुद्रात कुणी न अडवितां प्रवेश करते, त्याप्रकारे सारथी सुमंत्राने पर्वता- शिखरावर आरूढ झालेल्या अविचल मेघाप्रमाणे शोभायमान महान विमाना सदृश सुंदर गृहांनी संयुक्त तथा प्रचुर रत्नभांडारानी भरलेल्या त्या महालात कुणाकडूनही न अडविले जाता बेधडक प्रवेश केला. ॥४८॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् अयोध्याकाण्डे पञ्चदशः सर्गः ॥ १५ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा पंधरावा सर्ग पूरा झाला. ॥१५॥
|