वालिनो वधाय श्रीरामस्याश्वासनं प्राप्य सुग्रीवस्य घोरं गर्जनम् -
|
वाली वधासाठी श्रीरामांचे आश्वासन मिळाल्यावर सुग्रीवाची विकट गर्जना -
|
सर्वे ते त्वरितं गत्वा किष्किंधां वालिपालिताम् । वृक्षैरात्मानमावृत्य व्यतिष्ठन् गहने वने ॥ १ ॥
|
ते सर्व लोक शीघ्रतापूर्वक वालीच्या किष्किंधापुरीमध्ये पोहोचले आणि गहन वनात वृक्षांच्या आड स्वतःला लपवून घेऊन उभे राहिले. ॥१॥
|
विचार्य सर्वतो दृष्टिं कानने काननप्रियः । सुग्रीवो विपुलग्रीवः क्रोधमाहारयद्भृशम् ॥ २ ॥
|
वनाच्या प्रेमी, विशाल ग्रीवा असलेल्या सुग्रीवाने त्या वनात चारी बाजूस दृष्टि फिरविली आणि आपल्या मनात क्रोधाचा अत्यंत संचय केला. ॥२॥
|
ततः स निनदं घोरं कृत्वा युद्धाय चाह्वयत् । परिवारैः परिवृतो नादैर्भिंदन्निवांबरम् ॥ ३ ॥
|
त्यानंतर आपल्या सहाय्यकाकडून घेरले गेलेल्या त्याने आकाशाला आपल्या सिंहनादाने विदीर्ण करीत घोर गर्जना केली आणि वालीला युद्धासाठी ललकारले. ॥३॥
|
गर्जन्निव महामेघो वायुवेगपुरस्सरः । अथ बालार्कसदृशो दृप्तसिंहगतिस्तदा ॥ ४ ॥
|
त्या समयी सुग्रीव वायुच्या वेगासह गर्जना करणार्या महामेघांप्रमाणे भासत होते. आपली अंगकांति आणि प्रताप यांच्यायोगे ते प्रलयकाळच्या सूर्याप्रमाणे प्रकाशित होत होते. दर्पाने भरलेल्या सिंहाप्रमाणे त्यांची चाल प्रतीत होत होती. ॥४॥
|
दृष्ट्वा रामं क्रियादक्षं सुग्रीवो वाक्यमब्रवीत् । हरिवागुरया व्याप्तां तप्तकाञ्चनतोरणाम् ॥ ५ ॥
प्राप्ताः स्म ध्वजयंत्राढ्यां किष्किंधां वालिनः पुरीम् । प्रतिज्ञा या त्वया वीर कृता वालिवधे पुरा ॥ ६ ॥
सफलां तां कुरु क्षिप्रं लतां काल इवागतः ।
|
कार्यकुशल रामचंद्रांकडे पाहून सुग्रीव म्हणाले- ’भगवन् ! वालीची ही किष्किंधापुरी तप्त सुवर्णद्वारा बनविलेल्या नगरद्वाराने सुशोभित आहे. हिच्यामध्ये सर्वत्र वानरांचे जाळे पसरलेले आहे. तसेच ही ध्वज आणि यंत्रांनी संपन्न आहे. आपण सर्व लोक या पुरीत येऊन पोहोचलो आहोत. वीर ! आपण पूर्वीच वाली वधाची प्रतिज्ञा केली होती ती आता लवकरच सफल करावी. आलेला अनुरूप समय ज्याप्रमाणे लतेला फुलाफळांनी संपन्न करतो अगदी त्याप्रमाणे आपण प्रतिज्ञा सफल करावी.’ ॥५-६ १/२॥
|
एवमुक्तस्तु धर्मात्मा सुग्रीवेण स राघवः ॥ ७ ॥
|
सुग्रीवांनी असे म्हटल्यावर शत्रुसूदन धर्मात्मा राघवांनी पुन्हा आपण पूर्वी दिलेल्या वचनाचा पुनरूच्चार करीत सुग्रीवास म्हटले- ॥७॥
|
तमथोवाच सुग्रीवं वचनं शत्रुसूदनः । कृताभिज्ञानचिह्नस्त्वमनया गजसाह्वया ॥ ८ ॥
लक्ष्मणेन समुत्पाट्य यैषा कण्ठे कृता तव । शोभसे ह्यधिकं वीर लतया कण्ठसक्तया ॥ ९ ॥
विपरीत इवाकाशे सूर्यो नक्षत्रमालया ।
|
’वीरा ! आता तर या गजपुष्पी लतेच्या द्वारा तुम्ही ओळखण्यासाठी चिन्ह धारण केले आहे. लक्ष्मणांनी ही उपटून तुमच्या कंठात घातली आहे. तुम्ही कंठात धारण केलेल्या या लतेच्या द्वारे फार शोभून दिसत आहात. जर आकाशांत सूर्यमण्डल नक्षत्रमालेने घेरले जाण्याची विपरित घटना घडली तरच या कण्ठस्थित गजपुष्पी लतेच्या योगे उत्तम प्रकारे सुशोभित होणार्या तुमची सूर्याबरोबर तुलना होऊ शकेल. ॥८-९ १/२॥
|
अद्य वालिसमुत्थं ते भयं वैरं च वानर ॥ १० ॥
एकेनाहं प्रमोक्ष्यामि बाणमोक्षेण संयुगे ।
|
’वानरराज ! आजच मी वालीपासून उत्पन्न झालेले तुमचे भय आणि वैर दोन्ही या युद्धस्थळी एकच बाण सोडून नष्ट करीन. ॥१० १/२॥
|
मम दर्शय सुग्रीव वैरिणं भ्रातृरूपिणम् ॥ ११ ॥
वाली विनिहतो यावद्वने पांसुषु वेष्टते ।
|
सुग्रीवा ! तू मला आपल्या त्या भ्रातारूपी शत्रुला दाखव तर खरा ! नंतर वाली मारला जाऊन वनामध्ये धुळीत पडलेला दिसून येईल. ॥११ १/२॥
|
यदि दृष्टिपथं प्राप्तो जीवन् स विनिवर्तते ॥ १२ ॥
ततो दोषेण मा ऽ ऽगच्छेत् सद्यो गर्हेच्च मा भवान् ।
|
’जर माझ्या दृष्टीस पडल्यावरही तो जिवंत परत गेला तर मग तू मला दोषी समज आणि तात्काळ तुझ्या जीवास वाटेल तितकी माझी निंदा कर. ॥१२ १/२॥
|
प्रत्यक्षं सप्त ते साला मया बाणेन दारिताः ॥ १३ ॥
तेनावेहि बलेनाद्य वालिनं निहतं मया ।
|
’तुझ्या डोळ्यासमोरच मी आपल्या एकाच बाणाने सात सालाचे वृक्ष विदीर्ण केले होते; माझ्या त्याच बलाने आज समरांगणात ( एका बाणानेंच) वालीला मारला गेलेला समज. ॥१३ १/२॥
|
अनृतं नोक्तपूर्वं मे वीर कृच्छ्रे ऽपि तिष्ठता ॥ १४ ॥
धर्मलोभपरीतेन न च वक्ष्ये कथञ्चन । सफलां च करिष्यामि प्रतिज्ञां जहि संभ्रमम् ॥ १५ ॥
|
बराच काळापासून संकटे झेलत असूनही मी कधी खोटे बोललो नाही. माझ्या मनात धर्माचा लोभ आहे म्हणून कुठल्या प्रकारे मी तर बोलू शकत नाही. त्याच बरोबर आपली प्रतिज्ञाही मी अवश्य सफल करीन, म्हणून तू भय आणि घाबरटपणा यांना आपल्या हृदयांतून काढून टाक. ॥१४-१५॥
|
प्रसूतं कलमं क्षेत्रे वर्षेणेव शतक्रतुः । तदाह्वाननिमित्तं त्वं वालिनो हेममालिनः ॥ १६ ॥
सुग्रीव कुरु तं शब्दं निष्पतेद्येन वानरः ।
|
ज्याप्रमाणे इंद्र वर्षा करून, उगवून आलेल्या धान्याच्या शेताला फलांनी संपन्न करतो, त्याप्रमाणे मीही बाणाचा प्रयोग करून वालीच्या वधाद्वारा तुमचा मनोरथ पूर्ण करीन. म्हणून सुग्रीवा ! तू सुवर्णमालाधारी वालीला बोलवण्यासाठी यावेळी अशी गर्जना कर की ज्यायोगे तुझा सामना करण्यासाठी तो वानर नगरांतून बाहेर निघून येईल. ॥१६ १/२॥
|
जितकाशी बलश्लाघी त्वया चाधर्षितः पुरा ॥ १७ ॥
निष्पतिष्यत्यसंगेन वाली स प्रियसंयुगः ।
|
’तो अनेक युद्धात विजय मिळवून विजयश्रीने सुशोभित झालेला आहे. सर्वांच्यावर विजय मिळविण्याची इच्छा ठेवीत आहे आणि त्याने तुझ्याकडून कधीही हार पत्करलेली नाही. याशिवाय युद्धावर त्याचे प्रेम आहे. म्हणून वाली कोठेही आसक्त न होता नगराच्या बाहेर अवश्य निघेल. ॥१७ १/२॥
|
रिपूणां धर्षणं शूरा मर्षयंति न संयुगे ॥ १८ ॥
जानंतस्तु स्वकं वीर्यं स्त्रीसमक्षं विशेषतः ।
|
’कारण की स्वतःचा पराक्रम जाणणारे पुरुष, विशेषतः स्त्रियांच्या समोर युद्धासाठी शत्रूंचे तिरस्कारपूर्ण शब्द ऐकून कदापि सहन करू शकत नाहीत. ॥१८ १/२॥
|
स तु रामवचः श्रुत्वा सुग्रीवो हेमपिङ्गलः ॥ १९ ॥
ननर्द क्रूरनादेन विनिर्भिंदन्निवांबरम् ।
|
श्रीरामांचे हे बोलणे ऐकून सुवर्णाप्रमाणे पिंगटवर्ण असणार्या सुग्रीवाने आकाशाला विदीर्ण करून टाकत असल्याप्रमाणे कठोर स्वरात अत्यंत भयंकर गर्जना केली. ॥१९ १/२॥
|
तस्य शब्देन वित्रस्ता गावो यांति हतप्रभाः॥ २० ॥
राजदोषपरामृष्टाः कुलस्त्रिय इवाकुलाः ।
|
त्या सिंहनादाने भयभीत झालेले मोठमोठे बैल शक्तिहीन होऊन राजाच्या दोषामुळे परपुरुषांच्या द्वारा पकडल्या गेलेल्या कुलांगनांप्रमाणे व्याकुळचित्त होऊन सर्व बाजूस पळू लागले. ॥२० १/२॥
|
द्रवंति च मृगाः शीघ्रं भग्ना इव रणे हयाः । पतंति च खगा भूमौ क्षीणपुण्या इव ग्रहाः ॥ २१ ॥
|
युद्धस्थळात अस्त्र-शस्त्रांच्या आघाताने पळून जाणार्या घोड्यांप्रमाणे तीव्रगतीने मृग पळू लागले, आणि पक्षी ज्यांचे पुण्य नष्ट झाले आहे अशा ग्रहांसमान आकाशांतून पृथ्वीवर पडू लागले. ॥२१॥
|
ततः स जीमूतकृतप्रणादो नादं ह्यमुञ्चत्त्वरया प्रतीतः । सूर्यात्मजः शौर्यविवृद्धतेजाः सरित्पतिर्वानिलचञ्चलोर्मिः ॥ २२ ॥
|
त्यानंतर ज्यांचा सिंहनाद मेघाच्या गर्जनेप्रमाणे गंभीर होता आणि शौर्यामुळे ज्यांचे तेज वाढलेले होते ते सुविख्यात सूर्यकुमार सुग्रीव मोठ्या उतावळेपणाने वारंवार गर्जना करू लागले. जणु वार्याच्या वेगाने चंचळ झालेल्या उत्तुंग तरंगमालांनी सुशोभित सरितांचा स्वामी समुद्र कोलाहल करीत आहे असे वाटू लागले. ॥२२॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे चतुर्दशः सर्गः ॥ १४ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा चौदावा सर्ग पूरा झाला. ॥१४॥
|