वानरैर्मधुवनरक्षकाणां दधिमुखस्य च पराभवः सभृत्यस्य दधिमुखस्य सुग्रीवपार्श्वे गमनं च -
|
वानरांकडून मधुवनाच्या रक्षकांचा आणि दधिमुखाचा पराभव आणि सेवकांसह दधिमुखाचे सुग्रीवाजवळ जाणे –
|
तानुवाच हरिश्रेष्ठो हनुमान् वानरर्षभः ।
अव्यग्रमनसो यूयं मधु सेवत वानराः ॥ १ ॥
अहमावर्जयिष्यामि युष्माकं परिपन्थिनः ।
|
त्यावेळी वानरशिरोमणि कपिवर हनुमान आपल्या साथिदारांना म्हणाला, 'वानरांनो, तुम्ही स्वस्थ मनाने खुशाल मध सेवन करा. तुमच्या आड येणारांचे मी निवारण करीन.' ॥१ १/२॥
|
श्रुत्वा हनुमतो वाक्यं हरीणां प्रवरोऽङ्गदः ॥ २ ॥
प्रत्युवाच प्रसन्नात्मा पिबन्तु हरयो मधु ।
अवश्यं कृतकार्यस्य वाक्यं हनुमतो मया ॥ ३ ॥
अकार्यमपि कर्तव्यं किमङ्गं पुनरीदृशम् ।
|
हे हनुमन्ताचे भाषण ऐकून वानरप्रवर अंगदही प्रसन्नचित्त होऊन म्हणाला—'वानरगणांनी आपल्या इच्छेप्रमाणे मधुपान करावे. हनुमान यावेळी कार्यसिद्ध करून परतले आहेत म्हणून त्यांचे म्हणणे स्वीकार करण्यायोग्य नसले तरीही ते मला अवश्य मान्य केले पाहिजे. मग आताच्या अशा म्हणण्याची तर गोष्टच कशाला पाहिजे ?'॥२-३ १/२॥
|
अङ्गदस्य मुखाच्छ्रुत्वा वचनं वानरर्षभाः ॥ ४ ॥
साधु साध्विति संहृष्टा वानराः प्रत्यपूजयन् ।
|
अंगदाच्या मुखातून हे भाषण ऐकून सर्वश्रेष्ठ वानर हर्षाने प्रफुल्लित झाले आणि 'साधु, साधु' असे म्हणून त्याची प्रशंसा करू लागले.॥४ १/२॥
|
पूजयित्वाऽङ्गदं सर्वे वानरा वानरर्षभम् ॥ ५ ॥
जग्मुर्मधुवनं यत्र नदीवेग इव द्रुतम् ।
|
वानरश्रेष्ठ अंगदाची प्रशंसा करून ते सर्व वानर तटवर्ती वृक्षांकडे नदीचा जलप्रवाह ज्या वेगाने जातो त्याप्रमाणे वेगाने मधुवनाच्या मार्गाने धावू लागले - ॥५ १/२॥
|
ते प्रविष्टा मधुवनं पालानाक्रम्य शक्तितः ॥ ६ ॥
अतिसर्गाच्च पटवो दृष्ट्वा श्रुत्वा च मैथिलीम् ।
पपुः सर्वे मधु तदा रसवत् फलमाददुः ॥ ७ ॥
|
आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर रक्षकांना जमिनीवर लोळवून ते मधुवनामध्ये शिरले. हनुमन्ताला तर मैथिलीचे सीतेचे दर्शन झालेच होते आणि इतरांनी त्याच्या मुखाने सीता लंकेत आहे हे ऐकले होते त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला होता. त्यात युवराज अंगदाचा आदेश ही मिळाला; त्यामुळे ते सामर्थ्यसंपन्न सर्व वानर वनरक्षकांवर पूर्ण शक्तीने आक्रमण करून मधुवनात घुसले आणि इच्छेप्रमाणे मध पिऊ लागले आणि रसाळ फळेही खाऊ लागले. ॥६-७॥
|
उत्पत्य च ततः सर्वे वनपालान् समागतान् ।
ताडयन्ति स्म शतशः सक्तान् मधुवने तदा ॥ ८ ॥
|
त्यांना अडविण्यासाठी त्यांच्याजवळ आलेल्या वनरक्षकांना ते सर्व वानर शेकडोंच्या संख्येने एकत्रित होऊन उड्या मार मारून मारू लागले आणि मधुवनान्तील मध पिण्यात आणि फळे खाण्यात मग्न झाले होते. ॥८॥
|
मधूनि द्रोणमात्राणि बाहुभिः परिगृह्य ते ।
पिबन्ति कपयः केचित् संघशस्तत्र हृष्टवत् ॥ ९ ॥
|
कित्येक वानरांच्या झुंडीच्या झुंडी एकत्र येऊन आपल्या बाहुंनी एकेक द्रोण मधुने भरलेली मधमाशांची पोळी पकडून घेत आणि आनन्दाने मध पिऊन टाकीत.॥९॥
|
घ्नन्ति स्म सहिताः सर्वे भक्षयन्ति तथापरे ।
केचित् पीत्वापविध्यन्ति मधूनि मधुपिङ्गलाः ॥ १० ॥
मधूच्छिष्टेन केचिच्च जघ्नुरन्योन्यमुत्कटाः ।
अपरे वृक्षमूलेषु शाखा गृह्य व्यवस्थिताः ॥ ११ ॥
|
मधाप्रमाणे पिंगट वर्णाचे ते सर्व वानर एकत्रित येऊन मधाच्या पोळ्यांना बडवून काढीत, तर दुसरे वानर तो मध पिऊन टाकीत तर कित्येक जण पिऊन उरलेला मध (खुशाल) फेकून देत. कित्येक वानर मदमत्त होऊन एक दुसर्याला मारीत होते तर कित्येक वानर वृक्षांच्या फान्द्यांना धरून वृक्षाखाली उभे राहिलें होते.॥१०-११॥
|
अत्यर्थं च मदग्लानाः पर्णान्यास्तीर्य शेरते ।
उन्मत्तवेगाः प्लवगा मधुमत्ताश्च हृष्टवत् ॥ १२ ॥
|
कित्येक वानर मदाने अतिशय ग्लानी आल्यानन्तर पाने पसरवून त्यावर झोपले, तर काही मध पिऊन मत्त झालेले उन्मत्त पुरुषाप्रमाणे हसत हसत आपापसात दांडगाई करू लागले. ॥१२॥
|
क्षिपत्यपि तथान्योन्यं स्खलन्ति च तथापरे ।
केचित् क्ष्वेडान् प्रकुर्वन्ति केचित् कूजन्ति हृष्टवत् ॥ १३ ॥
|
कोणी एक दुसर्यावर मधच फेकू लागते तर कुणी चालता चालता अडखळून पडू लागले. काही गर्जना करू लागले तर काही आनन्दाने पक्ष्यांप्रमाणे मञ्जुळ शब्दात कलरव करू लागले.॥१३॥
|
हरयो मधुना मत्ताः केचित् सुप्ता महीतले ।
कृत्वा केचिद्धसन्त्यन्ये केचित् कुर्वन्ति चेतरत् ॥ १४ ॥
|
मधुपानाने मत्त झालेले कित्येक वानर पृथ्वीवरच गाढ झोपी गेले. तर काही धीट होते ते हसू लागले तर काही रडूही लागले.॥१४॥
|
कृत्वा केचिद् वदन्त्यन्ये केचिद् बुध्यन्ति चेतरत् ।
येऽप्यत्र मधुपालाः स्युः प्रेष्या दधिमुखस्य तु ॥ १५ ॥
तेऽपि तैर्वानरैर्भीमैः प्रतिषिद्धा दिशो गताः ।
जानुभिस्तु प्रघृष्टाश्च देवमार्गं च दर्शिताः ॥ १६ ॥
|
काही वानर हाताने एक करून तोंडाने भलतेच बोलू लागले आणि काही जण एक सांगितले असता त्याचा भलताच अर्थ समजू लागले. त्या वनात जे दधिमुखाचे सेवक मधुच्या रक्षणाकरितां नियुक्त केलेले होते तेही या भयंकर वानरांच्या द्वारा अडवले अथवा बडवले बदडले गेल्याने सर्व दिशांना पळून गेले. त्यापैकी काही रक्षकांना अंगदाच्या अनुयायांनी जमिनीवर आपटले आणि गुडघ्याने खूप रगडले (अथवा गुडघे धरून फरफटत नेले.) तर काहींनी त्यांच्या पाठीवर उताणे पाडून आकाश दाखविले.॥१५-१६॥
|
अब्रुवन् परमोद्विग्ना गत्वा दधिमुखं वचः ।
हनूमता दत्तवरैर्हतं मधुवनं बलात् ।
वयं च जानुभिर्घृष्टा देवमार्गं च दर्शिताः ॥ १७ ॥
|
तेव्हा अत्यन्त उद्विग्न होऊन ते सर्व सेवक दधिमुखाजवळ गेले आणि म्हणाले, 'प्रभो ! हनुमानांनी प्रोत्साहन दिलेल्या सर्व वानरांनी बलपूर्वक मधुवनाचा विध्वंस करून टाकला आहे. आम्हाला पाडून गुडघ्याने रगडले, फरफटत नेले. आणि आम्हांला पाठीवर पाडून आकाशाचे दर्शनही घडविले (किंवा आकाशांत उंच फेकून दिले.) ॥१७॥
|
ततो दधिमुखः क्रुद्धो वनपस्तत्र वानरः ।
हतं मधुवनं श्रुत्वा सान्त्वयामास तान् हरीन् ॥ १८ ॥
|
त्यावेळी त्या वनाचा प्रधान रक्षक दधिमुख नावाचा वानर मधुवनाच्या विध्वंसाची वार्ता ऐकून अत्यंत रागावला आणि त्या वानरांचे सांत्वन करीत म्हणाला—॥१८॥
|
इतागच्छत गच्छामो वानरानतिदर्पितान् ।
बलेनावारयिष्यामि प्रभुञ्जानान् मधूत्तमम् ॥ १९ ॥
|
'चला या, या आपण त्या वानरांजवळ जाऊं. त्यांचा गर्व फारच वाढला आहे. गर्वाने चढून जाऊन मधुवनातील उत्तम मधु लुटून खाणार्या त्या सर्वांचे मी आपल्या सामर्थ्याने निवारण करीन.' ॥१९॥
|
श्रुत्वा दधिमुखस्येदं वचनं वानरर्षभाः ।
पुनर्वीरा मधुवनं तेनैव सहसा ययुः ॥ २० ॥
|
हे दधिमुखाचे भाषण ऐकून ते वीर वानरश्रेष्ठ पुन्हा त्याच्या बरोबर मधुवनामध्ये गेले. ॥२०॥
|
मध्ये चैषां दधिमुखः सुप्रगृह्य महातरुम् ।
समभ्यधावन् वेगेन ते च सर्वे प्लवङ्गमाः ॥ २१ ॥
|
त्यांच्यामध्ये उभ्या असलेल्या दधिमुखाने एक विशाल वृक्ष हातात घेऊन अत्यन्त वेगाने हनुमानाच्या दलावर आक्रमण केले. त्या बरोबरच त्याचे सर्व साथीदार वानरही त्या मधुपान करणार्या वानरांवर तुटून पडले. ॥२१॥
|
ते शिलाः पादपांश्चापि पाषाणानपि वानराः ।
गृहीत्वाऽभ्यगमन् क्रुद्धा यत्र ते कपिकुञ्जराः ॥ २२ ॥
|
क्रोधाने सन्तप्त झालेले ते रक्षक वानर शिळा, वृक्ष, पाषाण घेऊन ज्या स्थानी हनुमान आदि कपिश्रेष्ठ मधुपान करीत होते तेथे आले.॥२२॥
|
बलान्निवारयन्तश्च आसेदुर्हरयो हरीन् ।
सन्दष्टौष्ठपुटाः क्रुद्धा भर्त्सयन्तो मुहुर्मुहुः ॥ २३ ॥
|
आपल्या दान्तानी आपले ओठ चावत आणि रागाने वारंवार धमकावत ते सर्व रक्षक त्या वानरांना बलपूर्वक रोखून धरण्यासाठी त्यांच्या जवळ येऊन पोहोचले.॥२३॥
|
अथ दृष्ट्वा दधिमुखं क्रुद्धं वानरपुङ्गवाः ।
अभ्यधावन्त वेगेन हनुमत्प्रमुखास्तदा ॥ २४ ॥
|
दधिमुख संतापलेला आहे हे पाहून हनुमान आदि सर्वश्रेष्ठ वानर त्यावेळी अत्यंत वेगाने त्याच्याकडे धावले. ॥२४॥
|
सवृक्षं तं महाबाहुमापतन्तं महाबलम् ।
वेगवन्तं विजग्राह बाहुभ्यां कुपितोऽङ्गदः ॥ २५ ॥
|
हातात वृक्ष घेऊन येणार्या वेगवान महाबली महाबाहु दधिमुखाला क्रुद्ध झालेल्या अंगदाने दोन्ही हातांनी पकडले. ॥२५॥
|
मदान्धो न कृपां चक्रे आर्यकोऽयं ममेति सः ।
अथैनं निष्पिपेषाशु वेगेन वसुधातले ॥ २६ ॥
|
तो मधु पिऊन मदान्ध झाला होता त्यामुळे 'हे मला पूज्य आहेत' असे जाणूनही त्यांनी त्याच्यावर दया दाखवली नाही. त्यांनी त्वरित अत्यंत वेगाने त्यास पृथ्वीवर आपटून रगडण्यास सुरुवात केली. ॥२६॥
|
स भग्नबाहूरुमुखो विह्वलः शोणितोक्षितः ।
प्रमुमोह महावीरो मुहूर्तं कपिकुञ्जरः ॥ २७ ॥
|
त्यामुळे त्याचे हात, पाय आणि मुख सर्व फुटून रक्ताने भरून गेली आणि तो रक्ताने न्हाऊन निघाला आणि अत्यन्त व्याकुळ झाला. आणि तो महावीर कपिकुञ्जर दधिमुख तेथे दोन घटिकापर्यन्त मूर्च्छित होऊन पडला होता.॥२७॥
|
स कथंचिद् विमुक्तस्तैर्वानरैर्वानरर्षभः ।
उवाचैकान्तमागत्य स्वान् भृत्यान् समुपागतान् ॥ २८ ॥
|
त्या वानरांच्या हातून कशीतरी सुटका झाल्यावर कपिश्रेष्ठ दधिमुख एकीकडे (एकांतात) जाऊन तेथे जवळ आलेल्या आपल्या सेवकांना म्हणाला—॥२८॥
|
एतागच्छत गच्छामो भर्ता नो यत्र वानरः ।
सुग्रीवो विपुलग्रीवः सह रामेण तिष्ठति ॥ २९ ॥
|
'चला या, आता जेथे विशाल कंठ असलेला आपला स्वामी राजा सुग्रीव श्रीरामचन्द्रांसह विराजमान आहे तेथे आपण जाऊ. ॥२९॥
|
सर्वं चैवाङ्गदे दोषं श्रावयिष्यामि पार्थिवे ।
अमर्षी वचनं श्रुत्वा घातयिष्यति वानरान् ॥ ३० ॥
|
'राजाजवळ गेल्यावर हा सर्व दोष अंगदाचा आहे असे त्याला सांगू. सुग्रीव फार रागीट आहे. माझे भाषण ऐकून तो या सर्व वानरांचा वध करील. ॥३०॥
|
इष्टं मधुवनं ह्येतत् सुग्रीवस्य महात्मनः ।
पितृपैतामहं दिव्यं देवैरपि दुरासदम् ॥ ३१ ॥
|
'महात्मा सुग्रीवाला हे मधुवन फारच प्रिय आहे. ते त्याच्या वाडवडिलांपासून त्याच्याकडे चालत आलेले दिव्य वन आहे. त्यात प्रवेश करणे देवतांनाही कठीण आहे. ॥३१॥
|
स वानरानिमान् सर्वान् मधुलुब्धान् गतायुषः ।
घातयिष्यति दण्डेन सुग्रीवः ससुहृज्जनान् ॥ ३२ ॥
|
'या मधुलुब्ध सर्व वानरांचे आयुष्य संपत आले असावे. सुग्रीव यांना कठोर दण्ड देऊन त्यांच्या सुहृदांसहित मारून टाकील.॥३२॥
|
वध्या ह्येते दुरात्मानो नृपाज्ञापरिपन्थिनः ।
अमर्षप्रभवो रोषः सफलो मे भविष्यति ॥ ३३ ॥
|
'राजाच्या आज्ञेचे उल्लंघन करणारे हे दुरात्मे राजद्रोही वानर वधासच योग्य आहेत. त्यांच वध झाल्यावरच माझा असहिष्णुतेमुळे उत्पन्न झालेला रोष सफल होईल.'॥३३॥
|
एवमुक्त्वा दधिमुखो वनपालान् महाबलः ।
जगाम सहसोत्पत्य वनपालैः समन्वितः ॥ ३४ ॥
|
वनाच्या रक्षकांशी असे बोलून त्यांना बरोबर घेऊन महाबली दधिमुख एकदम उड्डाण करून आकाशमार्गाने चालता झाला.॥३४॥
|
निमेषान्तरमात्रेण स हि प्राप्तो वनालयः ।
सहस्रांशुसुतो धीमान् सुग्रीवो यत्र वानरः ॥ ३५ ॥
|
आणि एका निमिषात तो बुद्धिमान सूर्यपुत्र वानरराज सुग्रीव जेथे विराजमान होते तेथे येऊन पोहोंचूला.॥३५॥
|
रामं च लक्ष्मणं चैव दृष्ट्वा सुग्रीवमेव च ।
समप्रतिष्ठां जगतीमाकाशान्निपपात ह ॥ ३६ ॥
|
श्रीराम, लक्ष्मण आणि सुग्रीव यांना दुरून पाहतांच तो आकाशान्तून समतल भूमीवर उतरला. (त्याने जमिनीवर उडी मारली)॥३६॥
|
स निपत्य महावीरः सर्वैस्तैः परिवारितः ।
हरिर्दधिमुखः पालैः पालानां परमेश्वरः ॥ ३७ ॥
स दीनवदनो भूत्वा कृत्वा शिरसि चाञ्जलिम् ।
सुग्रीवस्याशु तौ मूर्ध्ना चरणौ प्रत्यपीडयत् ॥ ३८ ॥
|
वनरक्षकांचे स्वामी महावीर वानर दधिमुख पृथ्वीवर उतरून त्या सर्व रक्षकांनी घेरलेले असे उदास चेहर्याने सुग्रीवाजवळ आले आणि मस्तकावर दोन्ही हात जोडून त्यांच्या चरणी मस्तक नमवून प्रणाम केला.॥३७-३८॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे द्विषष्टितमः सर्गः ॥ ६२ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा बासष्ठावा सर्ग पूरा झाला.॥६२॥
|