॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ अयोध्याकाण्ड ॥ ॥ पंचमः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] भगवंतांचे वनगमन - श्रीमहादेव उवाच - आयान्तं नागरा दृष्ट्वा मार्गे रामं सजानकीम् । लक्ष्मणेन समं वीक्ष्य ऊचुः सर्वे परस्परम् ॥ १ ॥ कैकेय्या वरदानादि श्रुत्वा दुःखसमावृताः । बत राजा दशरथः सत्यसन्धं प्रियं सुतम् ॥ २ ॥ स्त्रीहेतोरत्यजत्कामी तस्य सत्यवता कुतः । कैकेयी वा कथं दुष्टा रामं सत्यं प्रियङ्करम् ॥ ३ ॥ विवासयामास कथं क्रूरकर्मातिमूढधीः । हे जना नात्र वस्तव्यं गच्छमोऽद्यैव काननम् ॥ ४ ॥ यत्र रामः सभार्यश्च सानुजो गन्तुमिच्छति । पश्यन्तु जानकीं सर्वे पादचारेण गच्छतीम् ॥ ५ ॥ पुंभिः कदाचिद्दृष्ट्वा वा जानकी लोकसुन्दरी । सापि पादेन गच्छन्ती जनसङ्घेष्वनावृता ॥ ६ ॥ श्रीमहादेव म्हणाले - हे पार्वती, जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह मार्गावरून जाताना रामचंद्रांना पाहून, आणि कैकेयीला दशरथांनी दिलेले वरदान इत्यादी ऐकून, सर्व नगरवासी लोक दुःखाने व्याकूळ होऊन गेले आणि ते एकमेकांना म्हणू लागले "हाय ! हाय ! कामी राजा दशरथांनी आपल्या सत्यप्रतिज्ञ प्रिय पुत्राला एका स्त्रीसाठी सोडून दिले. त्यांची सत्यपरायणता कुठे उरली ? आणि दुष्ट कैकेयीनेसुद्धा सत्यवादी आणि प्रिय करणार्या रामांना कसे बरे वनात हाकूलन दिले ? ती तर नेहमी श्रीरामांची प्रशंसा करीत असे. ती आज कशी बरे अशी क्रूर कर्म करणारी आणि मूढबुद्धी झाली ? लोकहो, आता आपण येथे राहावयाचे नाही, आजच जेथे आपली पत्नी आणि धाकटा भाऊ लक्ष्मण याचेसह श्रीराम जाणार आहेत, आपणसुद्धा तेथे वनात जाऊ या. हाय ! पाहा ना ! आज जानकी पायी चालत आहेत ! पूर्वी कधीतरी कुणातरी पुरुषाने जगत्सुंदरी जानकीना पाहिले तरी होते काय ? त्या आज पडदा न घेता जमावातून पायी चालत आहेत. (१-६) रामोऽपि पादचारेण गजाश्वादिविवर्जितः । गच्छति द्रक्ष्यथ विभुं सर्वलोकैकसुन्दरम् ॥ ७ ॥ लोकहो, सर्व लोकांमध्ये अद्वितीय सुंदर असलेल्या रामांना तुम्ही पाहा ना ! तेसुद्धा आज हत्ती व घोडे यांशिवाय पायी निघाले आहेत. ७ राक्षसी कैकेयीनाम्नी जाता सर्वविनाशिनी । रामस्यापि भवेद्दुःखं सीतायाः पादयानतः ॥ ८ ॥ कैकेयी नावाची राक्षसी (जणू) सर्वाचा नाश करण्यासाठीच जन्माला आली आहे. सीता देवींना पायी चालताना पाहून श्रीरामांनासुद्धा दुःख झाले असणार. (८) बलवान् विधिरेवात्र पुंप्रयत्नो हि दुर्बलः । इति दुःखाकुले वृन्दे साधूनां मुनिपुङ्गवः ॥ ९ ॥ अब्रवीद्वामदेवोऽथ साधूनां सङ्घमध्यगः । मानुशोचथ रामं वा सीतां वा वच्मि तत्त्वतः ॥ १० ॥ (परंतु काय करावे ?) या बाबतीत दैव हेच बलवान आहे. त्यापुढे पुरुषाचा प्रयत्न हा बलहीन ठरतो." अशा प्रकारे बोलत त्या सज्जन माणसांचा समुदाय दुःखाने व्याकूळ झाला असताना, मुनिश्रेष्ठ वामदेव त्या सज्जन लोकांच्या समूहामध्ये येऊन त्यांना सांगू लागले, "तुम्ही श्रीराम अथवा सीता यांच्याबद्दल मुळीच शोक करू नका. मी तुम्हांला खरीखुरी गोष्ट सांगतो, ती ऐका. (९-१०) एष रामः परो विष्णुरादिनारायणः स्मृतः । एषा सा जानकी लक्ष्मीर्योगमायेति विश्रुता ॥ ११ ॥ हे श्रीराम म्हणजे श्रेष्ठ असे आदिनारायण भगवान विष्णू आहेत, असे म्हटले जाते आणि ही जानकी म्हणजे योगमाया या नावाने प्रसिद्ध असणारी विष्णूची लक्ष्मी आहे. (११) असौ शेषस्तमन्वेति लक्ष्मणाख्यश्च साम्प्रतम् । एष मायागुणैर्युक्तस्तत्तदाकारवानिव ॥ १२ ॥ आणि या वेळी लक्ष्मण हे नाव असणारा शेष त्या रामांच्या मागोमाग जात आहे. परमात्मा हाच आपल्या मायेच्या गुणांनी युक्त होऊन जणू त्या त्या शरीरधारी व्यक्तीप्रमाणे भासतो. (१२) एष एव रजोयुक्तो ब्रह्माभूद्विश्वभावनः । सत्त्वाविष्टस्तथा विष्णुस्त्रिजगत्प्रतिपालकः ॥ १३ ॥ रजोगुणाने युक्त होऊन हाच परमात्मा विश्व निर्माण करणारा ब्रह्मदेव झाला आहे आणि सत्त्वगुणाने संपन्न होऊन तोच तीन लोकांचे पालन करणारा भगवान विष्णू बनतो. (१३) एष रुद्रस्तामसोऽन्ते जगत्प्रलयकारणम् । एष मत्स्यः पुरा भूत्वा भक्तं वैवस्वतं मनुम् ॥ १४ ॥ नाव्यारोप्य लयस्यान्ते पालयामास राघवः । समुद्रमथने पूर्वं मन्दरे सुतलं गते ॥ १५ ॥ अधारयत्स्वपृष्ठेऽद्रिं कूर्मरूपी रघूत्तमः । मही रसातलं याता प्रलये सूकरोऽभवत् ॥ १६ ॥ तोलयामास दंष्ट्राग्रे तां क्षोणीं रघुनन्दनः । नारसिंहं वपुः कृत्वा प्रह्लादवरदः पुरा ॥ १७ ॥ तसेच कल्पाच्या शेवटी तमोगुणाचा आश्रय घेऊन हाच जगाच्या प्रलयाचे कारण असणारा रुद्र बनतो. पूर्वी या रघुनाथांनीच मत्स्यरूप घेऊन आपला भक्त वैवस्वत मनू याला प्रलय-समयी नावेत बसवून त्याचे रक्षण केले. पूर्वी समुद्रमंथनाच्या वेळी मंदर पर्वत हा सुतल लोकाप्रत गेला असता, कूर्मरूपी रघुश्रेष्ठाने त्या पर्वताला आपल्या पाठीवर धारण केले. प्रलयकाळी जेव्हा पृथ्वी रसातळाला गेली तेव्हा रघुनंदन वराह झाले आणि त्यांनी आपल्या सुळ्याच्या टोकावर धरून पृथ्वीला वर आणले. तसेच पूर्वी नरसिंहाचे रूप धारण करून त्यांनी प्रल्हादाला वर दिला. (१४-१७) त्रैलोक्यकण्टकं रक्षः पाटयामास तन्नखैः । पुत्रराज्यं हृतं दृष्ट्वा ह्यदित्या याचितः पुरा ॥ १८ ॥ त्या वेळी त्यांनी तिन्ही लोकांना काट्याप्रमाणे सलणार्या त्या दैत्यराज हिरण्यकशिपूला आपल्या नखांनी फाडून टाकले. अदितीने एकदा इंद्र या आपल्या पुत्राचे राज्य हरण केले गेले आहे असे पाहून श्रीरामांची प्रार्थना केली. (१८) वामनत्वमुपागम्य याञ्चया चाहरत्पुनः । दुष्टक्षत्रियभूभारनिवृत्त्यै भार्गवोऽभवत् ॥ १९ ॥ तेव्हा वामनरूप धारण करून बळी राजाकडे याचना करून, त्यांनी पुनः ते इंद्राचे राज्य मिळवले व इंद्राला दिले. दुष्ट अशा क्षत्रियांमुळे झालेल्या पृथ्वीच्या भाराचे निवारण करण्यासाठी श्रीराम भृगुपुत्र परशुराम झाले. (१९) स एव जगतां नाथ इदानीं रामतां गतः । रावणादीनि रक्षांसि कोटिशो निहनिष्यति ॥ २० ॥ तेच जगाचे स्वामी असलेले परमात्मा आता श्रीराम झाले आहेत. आता तेच रावण इत्यादी कोट्यवधी राक्षसांना ठार करणार आहेत. (२०) मानुषेणैव मरणं तस्य दृष्टं दुरात्मनः । राज्ञा दशरथेनापि तपसाराधितो हरिः ॥ २१ ॥ पुत्रत्वाकाङ्क्षया विष्णोस्तदा पुत्रोऽभवद्धरिः । स एव विष्णुः श्रीरामो रावणादिवधाय हि ॥ २२ ॥ गन्ताद्यैव वनं रामो लक्ष्मणेन सहायवान् । एषा सीता हरेर्माया सृष्टिस्थित्यन्तकारिणी ॥ २३ ॥ त्या दुरात्म्या रावणाचे मरण माणसाच्या हातूनच होईल, असे ठरले आहे. तसेच आपल्या पूर्वजन्मात विष्णू हा आपला पुत्र व्हावा, म्हणून महाराज दशरथांनी विष्णूची आराधना तपस्येच्या द्वारा केली होती. म्हणून हरी त्या दशरथांचे पुत्र झाले आहेत. तेच हे विष्णू म्हणजे श्रीराम होत. आता ते रावणाचा वध करण्यासाठी लक्ष्मणाला बरोबर घेऊन आजच वनात जाणार आहेत. ही सीता म्हणजे जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारी भगवान विष्णूची साक्षात माया आहे. (२१-२३) राजा वा कैकेयी वापि नात्र कारणमण्वपि । पूर्वेद्युर्नारदः प्राह भूभारहरणाय च ॥ २४ ॥ या रामांच्या वनगमनाच्या बाबतीत राजा दशरथ किंवा कैकेयी हेसुद्धा अणुमात्रही कारण नाहीत. कारण पृथ्वीचा भार उतरविण्यासाठी नारदांनी कालच रामांची प्रार्थना केली होती. (२४) रामोऽप्याह स्वयं साक्षाच्छ्वो गमिष्याम्यहं वनम् । अतो रामं समुद्दिश्य चिन्तां त्यजत बालिशाः ॥ २५ ॥ त्या वेळी स्वतः श्रीरामांनीसुद्धा नारदांना सांगितले होते की 'मी उद्याच वनात जाईन.' म्हणून हे भोळ्या लोकांनो, रामांच्या बाबतीत तुम्ही चिंता करणे सोडून द्या. (२५) रामरामेति ये नित्यं जपन्ति मनुजा भुवि । तेषां मृत्युभयादीनि न भवन्ति कदाचन ॥ २६ ॥ या पृथ्वीवर जे लोक नित्य 'राम राम' असा जप करतील, त्यांना कधीही मृत्यूचे भय इत्यादी असणार नाही. (२६) का पुनस्तस्य रामस्य दुःखशङ्का महात्मनः । रामनाम्नैव मुक्तिः स्यात्कलौ नान्येन केनचित् ॥ २७ ॥ अशा स्थितीत त्या महात्म्या श्रीरामांना दुःख होईल, अशी शंका तरी करणे, कसे बरे शक्य आहे ? कलियुगात केवळ प्रभू रामांच्या नामानेच मुक्ती प्राप्त होऊ शकते; अन्य कोणत्याही उपायाने नाही. (२७) मायामानुषरूपेण विडम्बयति लोककृत् । भक्तानां भजनार्थाय रावणस्य वधाय च ॥ २८ ॥ भक्तांना भगवंतांच्या गुण कीर्तनाचा सुयोग देण्यासाठी आणि रावणाचा वध करण्यासाठी जगाचे कर्ते प्रभू रामचंद्र माया-मानुष-रूप धारण करून या जगात लीला करीत आहेत. (२८) राज्ञश्चाभीष्टसिद्ध्यर्थं मानुषं वपुराश्रितः । इत्युक्त्वा विररामाथ वामदेवो महामुनिः ॥ २९ ॥ तसेच राजा दशरथांचे मनोरथ सिद्ध होण्यासाठी यांनी मनुष्य शरीर धारण केले आहे." असे नगरवासी लोकांना सांगून महामुनी वामदेव थांबले. (२९) श्रुत्वा तेऽपि द्विजाः सर्वे रामं ज्ञात्वा हरिं विभुम् । जहुर्हृत्संशयग्रन्थिं राममेवान्वचिन्तयन् ॥ ३० ॥ असे ऐकल्यावर श्रीराम हेच सर्वव्यापक विष्णू भगवान आहेत, हे सर्व द्विजांना कळले. मग आपल्या मनातील संशय त्यांनी सोडला आणि ते श्रीरामचंद्रांचेच चिंतन करू लागले. (३०) य इदं चिन्तयेन्नित्यं रहस्यं रामसीतयोः । तस्य रामे दृढा भक्तिर्भवेद्विज्ञानपूर्विका ॥ ३१ ॥ राम आणि सीता यांच्या या रहस्याचे मनन जो कोणी नित्य करेल त्याची श्रीरामांचे ठायी विज्ञानपूर्वक दृढ भक्ती होईल. (३१) रहस्यं गोपनीयं वो यूयं वै राघवप्रियाः । इत्युक्त्वा प्रययौ विप्रस्तेऽपि रामं परं विदुः ॥ ३२ ॥ "तुम्ही सर्वजण रामांना प्रिय आहात. म्हणून मी हे सांगितले आहे, परंतु हे रहरय गुप्त राखावे. " असे सांगून ते विप्रश्रेष्ठ वामदेव तेथून निघून गेले. तेव्हा श्रीराम हे परमात्माच आहेत असे त्या पौरजनांनासुद्धा कळून आले. (३२) ततो रामः समाविश्य पितृगेहमवारितः । सानुजः सीतया गत्वा कैकेयीमिदमब्रवीत् ॥ ३३ ॥ नंतर लक्ष्मण आणि सीता यांच्यासह श्रीराम कोणताही अडथळा न येता आपल्या पित्याच्या महालात गेले आणि ते कैकेयीला म्हणाले. (३३) आगताः स्मो वयं मातस्त्रयस्ते सम्मतं वनम् । गन्तुं कृतधियः शीघ्रमाज्ञापयतु नः पिता ॥ ३४ ॥ "मातोश्री, तुमच्या इच्छेप्रमाणे वनवासास जाण्याचा निश्चय करून आम्ही तिघेजण येथे आलो आहोत. आता चटदिशी पिताजींनी आम्हांला आज्ञा करावी." (३४) इत्युक्ता सहसोत्थाय चीराणि प्रददौ स्वयम् । रामाय लक्ष्मणायाथ सीतायै च पृथक्पृथक् ॥ ३५ ॥ श्रीरामांनी तिला असे सांगितल्यावर कैकेयी झटदिशी उठली आणि तिने स्वतःच राम, लक्ष्मण व सीता यांना वल्कले दिली. (३५) रामस्तु वस्त्राण्युत्सृज्य वन्यचीराणि पर्यधात् । लक्ष्मणोऽपि तथा चक्रे सीता तन्न विजानती ॥ ३६ ॥ तेव्हा रामचंद्रांनी आपली राजोचित वस्त्रे काढून टाकली व वल्कले धारण केली. लक्ष्मणानेसुद्धा तसेच केले. परंतु सीता मात्र ती वल्कले परिधान करण्याचे जाणत नव्हती. (३६) हस्ते गृहीत्वा रामस्य लज्जया मुखमैक्षत । रामो गृहीत्वा तच्चीरमंशुके पर्यचेष्टयत् ॥ ३७ ॥ म्हणून वस्त्रे हातात घेऊन ती लाजेने श्रीरामांच्या मुखाकडे पाहू लागली. तेव्हा श्रीरामांनी ती वल्कले घेऊन, सीतेच्या रेशमी वस्त्रावरच गुंडाळून टाकली. (३७) तद्दृष्ट्वा रुरुदुः सर्वे राजदाराः समन्ततः । वसिष्ठस्तु तदाकर्ण्य रुदितं भर्त्सयन् रुषा ॥ ३८ ॥ कैकेयीं प्राह दुर्वृत्ते राम एव त्वया वृतः । वनवासाय दुष्टे त्वं सीतायै किं प्रयच्छसि ॥ ३९ ॥ ते पाहून सर्व राजस्त्रिया सर्व बाजूंनी रडू लागल्या. तेव्हा तो रडण्याचा आवाज ऐकून वसिष्ठांनी रागाने कैकेयीची निर्भर्त्सना करीत म्हटले, "अग दुष्ट स्त्रिये, तू फक्त रामासाठीच वनात जाण्याचा वर मागितलेला आहेस ना ? तर मग तू सीतेलासुद्धा वनात जाण्यास योग्य अशी वल्कले का बरे देत आहेस ? (३८-३९) यदि रामं समन्वेति सीता भक्त्या पतिव्रता । दिव्याम्बरधरा नित्यं सर्वाभरणभूषिता ॥ ४० ॥ रमयत्वनिशं रामं वनदुःखनिवारिणी । राजा दशरथोऽप्याह सुमंत्रं रथमानय ॥ ४१ ॥ जर पतिव्रता सीतेलाही भक्तीने श्रीरामाच्या मागोमाग जाण्याची इच्छा असेल तर ती सतत दिव्य वस्त्रे धारण करून आणि सर्व अलंकारांनी विभूषित होऊन, श्रीरामांचे वनातील दुःख हरण करीत रात्रंदिवस रामांना आनंदित करू दे." नंतर महाराज दशरथसुद्धा सुमंत्राला म्हणाले, "सुमंत्रा, तू रथ घेऊन ये. (४०-४१) रथमारुह्य गच्छन्तु वनं वनचरप्रियाः । इत्युक्त्वा राममालोक्य सीतां चैव सलक्ष्मणम् ॥ ४२ ॥ दुःखान्निपतितो भूमौ रुरोदाश्रुपरिप्लुतः । आरुरोह रथं सीता शीघ्रं रामस्य पश्यतः ॥ ४३ ॥ वनवासी लोकांना प्रिय असणारे राम इत्यादी रथात बसून जाऊ देत. " असे बोलून आ णि लक्ष्मणासह रामांना तसेच सीतेला पाहून, ते दुःखाने जमिनीवर पडले आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ते रडू लागले. मग श्रीरामांच्या देखतच सीता चटदिशी रथात चढली. (४२-४३) रामः प्रदक्षिणं कृत्वा पितरं रथमारुहत् । लक्ष्मणः खड्गयुगलं धनुस्तूणीयुगं तथा ॥ ४४ ॥ गृहीत्वा रथमारुह्य नोदयामास सारथिम् । तिष्ठ तिष्ठ सुमंत्रेति राजा दशरथोऽब्रवीत् ॥ ४५ ॥ नंतर पित्याला प्रदक्षिणा करून राम रथात चढले. दोन तलवारी, दोन धनुष्ये आणि बाणांचे दोन भाते घेऊन लक्ष्मणाने रथात आरोहण केले आणि त्याने सारथ्याला रथ हाकण्याची प्रेरणा दिली. तेव्हा राजा दशरथ म्हणू लागले, "अरे सुमंत्रा, थांब, थांब." (४४-४५) गच्छ गच्छेति रामेण नोदितोऽचोदयद्रथम् । रामे दूरं गते राजा मूर्च्छितः प्रापतद्भुवि ॥ ४६ ॥ परंतु 'नीघ, नीघ' असे म्हणत श्रीरामांनी सुमंत्राला रथ हाकण्यास प्रेरणा केली. श्रीराम दूर निघून गेल्यावर महाराज दशरथ मूर्च्छित होऊन धरणीवर पडले. (४६) पौरास्तु बालवृद्धाश्च वृद्धा ब्राह्मणसत्तमाः । तिष्ठ तिष्ठेति रामेति क्रोशन्तो रथमन्वयुः ॥ ४७ ॥ नंतर 'हे रामा, थांब थांब' असा आक्रोश करीत सर्व नगरवासी, बाल, वृद्ध आणि श्रेष्ठ ब्राह्मण रथाच्या मागोमाग निघाले. (४७) राजा रुदित्वा सुचिरं मां नयन्तु गृहं प्रति । कौसल्याया राममातुरित्याह परिचारकान् ॥ ४८ ॥ खूप वेळ रडून झाल्यावर राजा दशरथ आपल्या सेवकांना म्हणाले, "मला राममाता कौसल्येच्या महालाकडे न्या. (४८) किञ्चित्कालं भवेत्तत्र जीवनं दुःखितस्य मे । अत ऊर्ध्वं न जीवामि चिरं रामं विना कृतः ॥ ४९ ॥ तेथे काही काळपर्यंत माझे हे जीवन दुःखातून टिकू शकेल. यानंतर रामाच्या वियोगामुळे मी फार काळ जिवंत राहू शकणार नाही." (४९) ततो गृहं प्रविश्यैव कौसल्यायाः पपात ह । मूर्च्छितश्च चिराद्बुद्ध्वा तूष्णीमेवावतस्थिवान् ॥ ५० ॥ त्यानंतर कौसल्येच्या महालात प्रवेश करताच राजा मूर्च्छित होऊन पडले. नंतर पुष्कळ वेळाने शुद्धीवर आल्यानंतर ते गप्पच पडून राहिले. (५०) रामस्तु तमसातीरं गत्वा तत्रावसत्सुखी । जलं प्राश्य निराहारो वृक्षमूलेऽस्वपद्विभुः ॥ ५१ ॥ सीतया सह धर्मात्मा धनुष्पाणिस्तु लक्ष्मणः । पालयामास धर्मज्ञः सुमंत्रेण समन्वितः ॥ ५२ ॥ इकडे श्रीरामचंद्र तमसा नदीच्या तीरावर पोचले आणि तेथे सुखाने राहिले. रात्रीचे वेळी कोणताही आहार न करता केवळ पाणी पिऊन, राम सीतेसह एका वृक्षाच्या खाली झोपी गेले. तेव्हा धर्मात्मा आणि धर्मज्ञ असा लक्ष्मण हातात धनुष्य घेऊन सुमंत्रासह श्रीरामांचे रक्षण करीत राहिला. (५१-५२) पौराः सर्वे समागत्य स्थितास्तस्याविदूरतः । शक्ता रामं पुरं नेतुं नोचेद्गच्छामहे वनम् ॥ ५३ ॥ इति निश्चयमाज्ञाय तेषां रामोऽतिविस्मितः । नाहं गच्छामि नगरं एते वै क्लेशभागिनः ॥ ५४ ॥ भविष्यन्तीति निश्चित्य सुमंत्रमिदमब्रवीत् । इदानीमेव गच्छामः सुमंत्र रथमानय ॥ ५५ ॥ सर्व नगरवासी लोकही तेथे आले आणि ते रामांच्याजवळ राहिले. श्रीरामांना अयोध्या नगरीला परत तरी नेऊ; नाहीतर आपणही त्याचेबरोबर वनात जाऊ, असा त्यांचा निश्चय कळताच रामांना अतिशय आश्चर्य वाटले. "काही झाले तरी मी अयोध्या नगरीत परत जाणार नाही. तेव्हा हे लोक माझ्याबरोबर वनात येऊन क्लेशच भोगतील." असा विचार करून राम सुमंत्राला म्हणाले, "हे सुमंत्रा, तू रथ घेऊन ये. आपण आता ताबडतोब निघू या." (५३-५५) इत्याज्ञप्तः सुमंत्रोऽपि रथं वाहैरयोजयत् । आरुह्य रामः सीता च लक्ष्मणोऽपि ययुर्द्रुतम् ॥ ५६ ॥ श्रीरामाची अशी आज्ञा झाल्यावर सुमंत्रानेसुद्धा रथाला घोडे जोडले. मग राम, सीता, ल क्षमण हे सुद्धा चटदिशी रथात चढले आणि तेथून झपाट्याने निघून गेले. (५६) अयोध्याभिमुखं गत्वा किञ्चिद्दूरं ततो ययुः । तेऽपि राममदृष्ट्वैव प्रातरुत्थाय दुःखिताः ॥ ५७ ॥ अयोध्येकडे तोंड करून काही अंतर गेले. नंतर ते दूर वनात निघून गेले. प्रातःकाल होताच नगरवासी लोक उठले पण त्यांना राम कुठेच न दिसल्याने ते सर्वजण फार दुःखी झाले. (५७) रथनेमिगतं मार्गं पश्यन्तस्ते पुरं ययुः । हृदि रामं ससीतं ते ध्यायन्तस्तस्थुरन्वहम् ॥ ५८ ॥ रथाच्या धावेने आक्रमिलेला मार्ग पाहात पाहात ते अयोध्या नगरीत पोचले. नंतर दररोज सीतेसह रामांचे ध्यान मनात करीत ते तेथेच राहू लागले. (५८) सुमंत्रोऽपि रथं शीघ्रं नोदयामास सादरम् । स्फीताञ्जनपदान्पश्यन् रामः सीतासमन्वितः ॥ ५९ ॥ गङ्गातीरं समागच्छच्छृङ्गवेराविदूरतः । गङ्गां दृष्ट्वा नमस्कृत्य स्नात्वा सानन्दमानसः ॥ ६० ॥ इकडे सुमंताने सुद्धा आदरपूर्वक रथ वेगाने चालविला. नंतर विस्तृत असा ग्रामीण भाग पाहात पाहात, सीतेसहित श्रीराम शृंगवेर नगरापासून अगदी जवळच असणार्या गंगा नदीच्या तीरावर पोचले. गंगा नदी पाहून त्यांनी आनंदाने तिला नमरकार केला आणि गंगेत स्नान केले. (५९-६०) शिंशिपावृक्षमूले स निषसाद रघूत्तमः । ततो गुहो जनैः श्रुत्वा रामागममहोत्सवम् ॥ ६१ ॥ सखायं स्वामिनं द्रष्टुं हर्षात्तूर्णं समापतत् । फलानि मधुपुष्पादि गृहीत्वा भक्तिसंयुतः ॥ ६२ ॥ नंतर रघुश्रेष्ठ राम शिसवी वृक्षाच्या सावलीत बसले. त्या वेळी लोकांच्या मुखातून रामांच्या आगमनाचा मंगल समाचार ऐकल्यावर निषादराज गुह आनंदाने आपले स्वामी आणि मित्र असलेल्या श्रीरघुनाथांना भेटण्यास भक्तीने युक्त होऊन, फळे, मध, फुले इत्यादी घेऊन, सत्वर तेथे येऊन पोचला. (६१-६२) रामस्याग्रे विनिक्षिप्य दण्डवत्प्रापतद्भुवि । गुहमुत्थाप्य तं तूर्णं राघवः परिषस्वजे ॥ ६३ ॥ नजराण्याची सामग्री पुढे ठेवून तो श्रीरामांपुढे दंडवत जमिनीवर पडला. तेव्हा गुहाला त्वरित उठवून श्रीरघुनाथांनी आलिंगन दिले. (६३) संपृष्टकुशलो रामं गुहं प्राञ्जलिरब्रवीत् । धन्योऽहमद्य मे जन्म नैषादं लोकपावन ॥ ६४ ॥ त्यानंतर श्रीरामांनी त्याचे कुशल विचारले. मग हात जोडून गुह म्हणाला, "हे लोकपावन रामा, आज मी धन्य झालो. आज निषाद जातीतील माझा जन्म सफल झाला. (६४) बभूव परमानदः स्पृष्ट्वा तेऽङ्गं रघूत्तम । नैषादराज्यमेतत्ते किङ्करस्य रघूत्तम ॥ ६५ ॥ त्वदधीनं वसन्नत्र पालयास्मान् रघूद्वह । आगच्छ यामो नगरं पावनं कुरु मे गृहम् ॥ ६६ ॥ हे रघुश्रेष्ठा, तुमच्या शरीराचा स्पर्श झाल्याने मला फार मोठा आनंद झाला आहे. हे रघुवरा, तुमच्या सेवकाचे हे निषाद-राज्य तुमचेच आहे. म्हणून हे रघुनाथा, आता येथेच राहून तुम्ही आमचे पालन करा. या, आपण माझ्या नगरात जाऊ. तुम्ही माझे घर पावन करा. (६५-६६) गृहाण फलमूलानि त्वदर्थं सञ्चितानि मे । अनुगृह्णीष्व भगवन् दासस्तेऽहं सुरोत्तम ॥ ६७ ॥ हे भगवन, जी काही फळे, मुळे इत्यादी मी तुमच्यासाठी गोळा केली आहेत, ती तुम्ही घ्या. हे सुरश्रेष्ठा, मी तुमचा दास आहे. तुम्ही माझ्यावर कृपा करा. " (६७) रामस्तमाह सुप्रीतो वचनं शृणु मे सखे । न वेक्ष्यामि गृहं ग्रामं नव वर्षाणि पञ्च च ॥ ६८ ॥ अतिशय प्रसन्न झालेले श्रीराम त्याला म्हणाले, "मित्रा, प्रतिज्ञा पालन करण्यासाठी चौदा वर्षे मी कोणत्याही गावात अगर घरात प्रवेश करणार नाही. (६८) दत्तमन्येन नो भुञ्जे फलमूलादि किञ्चन । राज्यं ममैतत्ते सर्वं त्वं सखा मेऽतिवल्लभः ॥ ६९ ॥ तसेच दुसर्या कोणी दिलेली कोणतीही फळे आणि मुळे मी खाणार नाही. तुझे हे संपूर्ण राज्य माझेच आहे. कारण तू माझा अतिशय लाडका मित्र आहेस." (६९) वटक्षीरं समानाय्य जटामुकुटमादरात् ।
बबन्ध लक्ष्मणे नाथ सहितो रघुनन्दनः ॥ ७० ॥ जलमात्रं तु सम्प्राश्य सीतया सह राघवः । आस्तृतं कुशपर्णाद्यैः शयनं लक्ष्मणेन हि ॥ ७१ ॥ सीतेबरोबर श्रीराम फक्त पाणी प्याले. तितक्यात कुश, पाने इत्यादींच्या सहाय्याने लक्ष्मणाने जमिनीवर शम्या तयार केली. (७१) उवास तत्र नगरप्रासादाग्रे यथा पुरा । सुष्वाप तत्र वैदेह्या पर्यङ्क इव संस्कृते ॥ ७२ ॥ पूर्वी ज्याप्रमाणे अयोध्या नगरीतील प्रासादातील महालामध्ये जनकनंदिनीसहित राम शृंगारलेल्या अशा पलंगावर झोपत होते, त्या प्रमाणे त्या कुश-शय्येवर राम सीतेसह सुखाने पहुडले. (७२) ततोऽविदूरे परिगृह्य चापं सबाणतूणीरधनुः स लक्ष्मणः । ररक्ष रामं परितो विपश्यन् गुहेन सार्धं सशरासनेन ॥ ७३ ॥ त्यानंतर जवळच, धनुष्यधारी गुहाबरोबर बाण, भाता व धनुष्य घेतलेला लक्ष्मण धनुष्य सज्ज ठेवून, सर्वत्र पाहात पाहात श्रीरामचंद्रांचे रक्षण करू लागला. (७३) इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥ अयोध्याकाण्डातील पाचवां सर्गः समाप्त ॥ ५ ॥ |