वानरैः सह श्रीरामेण सुवेलशिखरात् लङ्काया निरीक्षणम् -
|
वानंरासहित सुवेल पर्वताच्या शिखरावरून श्रीरामांनी लंकापुरीचे निरिक्षण करणे -
|
तां रात्रिमुषितास्तत्र सुवेले हरियूथपाः । लङ्कायां ददृशुर्वीरा वनान्युपवनानि च ॥ १ ॥
|
वानर यूथपतिंनी ती रात्र त्या सुवेल पर्वतावरच घालविली आणि तेथून त्या वीरांनी लंकेची वने आणि उपवनेही पाहिली. ॥१॥
|
समसौम्यानि रम्याणि विशालान्यायतानि च । दृष्टिरम्याणि ते दृष्ट्वा बभूवुर्जातविस्मयाः ॥ २ ॥
|
ती खूपच लांबरूंद (चौरस) शांत, सुंदर, विशाल आणि विस्तृत होती तसेच दिसण्यात अत्यंत रमणीय वाटत होती. त्यांना पाहून त्या सर्व वानरांना अत्यंत विस्मय वाटला. ॥२॥
|
चम्पकाशोकबकुल शालतालसमाकुला । तमालवनसञ्छन्ना नागमालासमावृता ॥ ३ ॥
हिन्तालैरर्जुनैर्नीपैः सप्तपर्णैः सुपुष्पितैः । तिलकैः कर्णिकारैश्च पाटलैश्च समन्ततः ॥ ४ ॥
शुशुभे पुष्पिताग्रैश्च लतापरिगतैर्द्रुमैः । लङ्का बहुविधैर्दिव्यैः यथेन्द्रस्यामरावती ॥ ५ ॥
|
चंपा, अशोक, बकुल, शाल आणि ताल वृक्षांनी व्याप्त, तमाल- वनाने आच्छादित आणि नागकेसरांनी आवृत्त लंकापुरी हिंताल, अर्जुन, कदंब, फुललेले सप्तवर्ण, तिलक, कण्हेर तसेच पाटल आदि नाना प्रकारच्या दिव्य वृक्षांनी ज्यांचे अग्रभाग फुलांच्या भाराने लगडलेले होते आणि ज्यांच्यावर लतावल्लरी पसरलेल्या होत्या, इंद्राच्या अमरावती समान शोभा प्राप्त करीत होती. ॥३-५॥
|
विचित्रकुसुमोपेतै रक्तकोमलपल्लवैः । शाद्वलैश्च तथा नीलैः चित्राभिर्वनराजिभिः ॥ ६ ॥
|
विचित्र फुलांनी युक्त, लाल कोमल पालवीने, हिरव्यागार गवतांनी आणि विचित्र वनश्रेणीनी त्या पुरीची शोभा फार वाढली होती. ॥६॥
|
गंधाढ्यान्यभिरम्याणि पुष्पाणि च फलानि च । धारयन्त्यगमास्तत्र भूषणानीव मानवाः ॥ ७ ॥
|
ज्याप्रमाणे मनुष्य आभूषणे धारण करतात त्याप्रकारे तेथील वृक्ष सुगंधित फुले आणि अत्यंत रमणीय फळे धारण करत होते. ॥७॥
|
तच्चैत्ररथसंकाशं मनोज्ञं नन्दनोपमम् । वनं सर्वर्तुकं रम्यं शुशुभे षट्पदायुतम् ॥ ८ ॥
|
चैत्ररथ आणि नंदनवनाप्रमाणे तेथील मनोहर वन सर्व ऋतुमध्ये भ्रमरांनी व्याप्त होऊन रमणीय शोभा धारण करत होते. ॥८॥
|
नत्यूहकोयष्टिभकैः नृत्यमानैश्च बर्हिभिः । रुतं परभृतानां च शुश्रुवे वननिर्झरे ॥ ९ ॥
|
दात्यूह, कोयष्टि, बक आणि नाचणारे मोर त्या वनाला सुशोभित करत होते, वनात निर्झरांच्या आसपास कोकिळेचे कूजन ऐकू येत होते. ॥९॥
|
नित्यमत्तविहङ्गानि भ्रमराचरितानि च । कोकिलाकुलषण्डानि विहगाभिरुतानि च ॥ १० ॥
भृङ्गराजाधिगीतानि कुररस्वनितानि च । कोणालकविधुष्टानि सारसाभिरुतानि च । विविशुस्ते ततस्तानि वनान्युपवनानि च ॥ ११ ॥
|
लंकेची वने, उपवने नित्य मत्त विहंगमांनी विभूषित होती. तेथे वृक्षांच्या फाद्यांवर भ्रमर गुंजारव करत होते. त्यांच्या प्रत्येक खंदात (भागात) कोकिला कुहू कुहू करीत होत्या आणि पक्षी किलबिलत होते, भृङ्गराजाचे गीत मुखरित होत होते. कुररीचे शब्द गुंजत होते, कोणालकाचा कलरव होत होता, तसेच सारसांच्या स्वरलहरी सर्वत्र पसरुन राहात होता. काही वानरवीर त्या वनांत आणि उपवनात घुसून गेले. ॥१०-११॥
|
हृष्टाः प्रमुदिता वीरा हरयः कामरूपिणः । तेषां प्रविशतां तत्र वानराणां महौजसाम्॥ १२ ॥
पुष्पसंसर्गसुरभिः ववौ घ्राणसुखोऽनिलः । अन्ये तु हरिवीराणां यूथान्निष्क्रम्य यूथपाः । सुग्रीवेणाभ्यनुज्ञाता लङ्कां जग्मुः पताकिनीम् ॥ १३ ॥
|
ते सर्व वीर वानर इच्छेनुसार रूप धारण करणारे, उत्साही आणि आनंदमग्न होते. त्या महातेजस्वी वानरांनी तेथे प्रवेश करताच फुलांच्या संसर्गाने सुगंधित तसेच घ्राणेंद्रियाला सुख देणारा मंद वारा वाहू लागला. दुसरे बरेचसे यूथपति त्या वानर वीरांच्या समूहातून निघून सुग्रीवांची आज्ञा घेऊन ध्वजा पताकांनी अलंकृत लंकापुरी मध्ये गेले. ॥१२-१३॥
|
वित्रासयन्तो विहगांन् ग्लापयन्तो मृगद्विपान् । कंपयंतश्च तां लङ्कां नादैः स्वैर्नदतां वराः ॥ १४ ॥
|
गर्जना करणारात श्रेष्ठ ते वानरवीर आपल्या सिंहनादाने पक्ष्यांना घाबरवून सोडत, मृग आणि हत्तींचा हर्ष हिरावून घेत तसेच लंकेला कंपित करीत पुढे जात होते. ॥१४॥
|
कुर्वन्तस्ते महावेगा महीं चरणपीडिताम् । रजश्च सहसैवोर्ध्वं जगाम चरणोत्थितम् ॥ १५ ॥
|
ते महान वेगवान् वानर पृथ्वीला जेव्हा पायाने दाबत त्यासमयी त्यांच्या पायाने उडालेली धूळ एकाएकी वर उडून जात होती. ॥१५॥
|
ऋक्षाः सिंहाश्च महिषा वारणाश्च मृगाः खगाः । तेन शब्देन वित्रस्ता जग्मुर्भीता दिशो दश ॥ १६ ॥
|
वानरांच्या सिंहनादाने त्रस्त आणि भयभीत झालेली अस्वले, सिंह, रेडे, हत्ती, मृग आणि पक्षी दाही दिशांना पळून गेले. ॥१६॥
|
शिखरं तत् त्रिकूटस्य प्रांशु चैकं दिविस्पृशम् । समन्तात् पुष्पसञ्छन्नं महारजतसंनिभम् ॥ १७ ॥
|
त्रिकूट पर्वताचे एक शिखर फारच उंच होते, ते जणु स्वर्गलोकाला स्पर्श करत आहे की काय असे वाटत होते. त्यावर सर्व बाजूस पिवळ्या रंगाची फुले फुललेली होती, ज्यामुळे ते सोन्या सारखेच वाटत होते. ॥१७॥
|
शतयोजनविस्तीर्णं विमलं चारुदर्शनम् । श्लक्ष्णं श्रीमन्महच्चैव दुष्प्रापं शकुनैरपि ॥ १८ ॥
|
त्या शिखरांचा विस्तार शंभर योजने होता. ते दिसण्यात फारच सुंदर, स्वच्छ, स्निग्ध, कांतिमान् आणि विशाल होते. पक्ष्यांसाठीही त्याच्या टोकापर्यंत पोहोंचणे कठीण होते. ॥१८॥
|
मनसाऽपि दुरारोहं किं पुनः कर्मणा जनैः । निविष्टा तत्र शिखरे लङ्का रावणपालिता ॥ १९ ॥
|
लोक त्रिकूटाच्या त्या शिखरावर मनाने चढण्याचीही कल्पना करू शकत नव्हते, मग क्रियेच्या द्वारा त्याच्यावर आरूढ होण्याची तर गोष्टच कशाला हवी ? रावणद्वारा पालित लंका त्रिकूटाच्या त्याच शिखरावर वसलेली होती. ॥१९॥
|
दशयोजनविस्तीर्णा विंशद्योजनमायता । सा पुरी गोपुरैरुच्चैः पाण्डराम्बुदसंनिभैः । काञ्चनेन च सालेन राजतेन च शोभते ॥ २० ॥
|
ती पुरी दहा योजने रूंद आणि वीस योजने लांब होती. पांढरे मेघांप्रमाणे उंच उंच गोपुरे तसेच सोने आणि चांदीचे कोट (तटबंदी) तिची शोभा वाढवत होते. ॥२०॥
|
प्रासादैश्च विमानैश्च लङ्का परमभूषिता । घनैरिवातपापाये मध्यमं वैष्णवं पदम् ॥ २१ ॥
|
ज्याप्रमाणे ग्रीष्माच्या अंतकाळी - वर्षा ऋतुमध्ये घनीभूत मेघ आकाशाची शोभा वाढवतात. त्याच प्रकारे प्रासाद (*१) आणि विमानांनी(*२) लंकापुरी अत्यंत सुशोभित होत होती. ॥२१॥
|
यस्यां स्तंभम्भसहस्रेण प्रासादः समलंकृतः । कैलासशिखराकारो दृश्यते खमिवोल्लिखन् ॥ २२ ॥
|
त्या पुरीमध्ये हजारो खांबानी अलंकृत एक चैत्यप्रासाद होता, तो कैलास शिखराप्रमाणे दिसून येत होता. तो जणु आकाशाचे मोजमाप घेत आहे असा भासत होता. ॥२२॥
|
चैत्यः स राक्षसेन्द्रस्य बभूव पुरभूषणम् । बलेन रक्षसां नित्यं यः समग्रेण रक्ष्यते ॥ २३॥
|
राक्षसराज रावणाचा तो चैत्यप्रासाद लंकापुरीचे आभूषण होता. कित्येक शेकडा राक्षस रक्षणाची सर्व साधने घेऊन प्रतिदिन त्याचे रक्षण करत होते. ॥२३॥
|
मनोज्ञां काननवतीं पर्वतैरुपशोभिताम् । नानाधातुविचित्रैश्च उद्यानैरुपशोभिताम् ॥ २४ ॥
|
याप्रकारे ती पुरी फारच मनोहर, सुवर्णमयी, अनेकानेक पर्वतांनी अलंकृत, नाना प्रकारच्या विचित्र धातुंनी चित्रित आणि अनेक उद्यानांनी सुशोभित होती. ॥२४॥
|
नानाविहगसंघुष्टां नानामृगनिषेविताम् । नानाकाननसंपन्नां नानाराक्षससेविताम् ॥ २५ ॥
|
तर्हे तर्हेचे विहंगम तेथे मधुर बोली बोलत होते. नाना प्रकारचे मृग आदि पशु तिचे सेवन करत होते. अनेक प्रकारच्या फुलांच्या संपत्तिने ती संपन्न होती आणि विविध प्रकारचे आकार असणारे राक्षस तेथे निवास करत होते. ॥२५॥
|
तां समृद्धां समृद्धार्थां लक्ष्मीवान् लक्ष्मणाग्रजः । रावणस्य पुरीं रामो ददर्श सह वानरैः ॥ २६ ॥
|
धनधान्याने संपन्न तसेच संपूर्ण मनोवांछित वस्तुंनी परिपूर्ण त्या रावणाच्या पुरीला लक्ष्मणांचे मोठे भाऊ लक्ष्मीवान् श्रीरामांनी वानरांसहित पाहिले. ॥२६॥
|
तां महागृहसंबाधां दृष्ट्वा लक्ष्मणपूर्वजः । नगरीं त्रिदिवप्रख्यां विस्मयं प्राप वीर्यवान् ॥ २७ ॥
|
मोठ मोठ्या महालांनी घनदाट वसलेली ती स्वर्गतुल्य नगरी पाहून पराक्रमी श्रीराम फार विस्मित झाले. ॥२७॥
|
तां रत्नृपूर्णां बहुसंविधानां प्रासादमालाभिरलङ्कृतां च । पुरीं महायंत्रकवाटमुख्यां ददर्श रामो महता बलेन ॥ २८ ॥
|
याप्रकारे आपल्या विशाल सेनेसह श्रीरघुनाथांनी अनेक प्रकारच्या रत्नांनी पूर्ण, तर्हे तर्हेच्या रचनांनी सुसज्जित उंच उंच महालांच्या रांगांनी अलंकृत आणि मोठ मोठ्या यंत्रांनी युक्त मजबूत द्वारे असलेली ती अद्भुत पुरी पाहिली. ॥२८॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकोनचत्वारिंशः सर्गः ॥ ३९ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा एकोणचाळिसावा सर्ग पूरा झाला. ॥३९॥
|