श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। पञ्चषष्टितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्वामित्रस्योग्रं तपस्तस्य ब्राह्मणत्वलाभस्तं मुनिवरं प्रशस्य तेन विसृष्टस्य राज्ञो जनकस्य राजभवनं प्रति गमनम् - विश्वामित्रांची घोर तपस्या, त्यांना ब्राह्मणत्वाची प्राप्ति तथा राजा जनकांनी त्यांची प्रशंसा करून त्यांचा निरोप घेऊन राजभवनास परत जाणे -
अथ हैमवतीं राम दिशं त्यक्त्वा महामुनिः ।
पूर्वां दिशमनुप्राप्य तपस्तेपे सुदारुणम् ॥ १ ॥
[शतानन्द सांगत आहेत] 'श्रीरामा ! पूर्वोक्त प्रतिज्ञेनंतर महामुनि विश्वामित्र उत्तर दिशा त्यागून पूर्व दिशेला निघून गेले आणि तेथे राहून अत्यंत कठोर तपस्या करू लागले. ॥ १ ॥
मौनं वर्षसहस्रस्य कृत्वा व्रतमनुत्तमम् ।
चकाराप्रतिमं राम तपः परमदुष्करम् ॥ २ ॥
'रघुनन्दना ! एक सहस्र वर्षेपर्यंत परम उत्तम मौन व्रत धारण करून ते परम दुष्कर तपस्या करीत राहिले. त्यांच्या तपाची कशाशीही तुलना करता येण्यासारखी नव्हती. ॥ २ ॥
पूर्णे वर्षसहस्रे तु काष्ठभूतं महामुनिम् ।
विघ्नैर्बहुभिराधूतं क्रोधो नान्तरमाविशत् ॥ ३ ॥
एक हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत ते महामुनि काष्ठाप्रमाणे निश्चेष्ट बनून राहिले. मधे मधे त्यांच्यावर अनेक विघ्नांचे आक्रमण झाले. परंतु क्रोध त्यांच्या अंतरात प्रवेश करू शकला नाही. ॥ ३ ॥
स कृत्वा निश्चयं राम तप आतिष्ठताव्ययम् ।
तस्य वर्षसहस्रस्य व्रते पूर्णे महाव्रतः ॥ ४ ॥

भोक्तुमारब्धवानन्नं तस्मिन् काले रघूत्तम ।
इन्द्रो द्विजातिर्भूत्वा तं सिद्धमन्नमयाचत ॥ ५ ॥
'श्रीरामा ! आपल्या निश्चयावर अटळ राहून त्यांनी अक्षय तपाचे अनुष्ठान केले. त्यांचे एक सहस्त्र वर्षांचे व्रत पूर्ण झाल्यावर ते महान् व्रतधारी महर्षि व्रत समाप्त करून अन्न ग्रहण करण्यास उद्यत झाले. रघुकुलभूषणा ! त्याच समयी इंद्राने ब्राह्मणाच्या वेषात येऊन त्यांच्याकडे पाकसिद्ध अन्नाची याचना केली. ॥ ४-५ ॥
तस्मै दत्त्वा तदा सिद्धं सर्वं विप्राय निश्चितः ।
निःशेषितेऽन्ने भगवानभुक्त्वैव महातपाः ॥ ६ ॥
तेव्हां त्यांनी तयार केलेले सर्व भोजन त्या ब्राह्मणाला देण्याचा निश्चय करून त्यास ते देऊन टाकले. त्या अन्नांपैके काहीही शेष उरले नाही म्हणून महातपस्वी भगवान् विश्वामित्र न खाता-पिताच राहिले. ॥ ६ ॥
न किञ्चिदवदद् विप्रं मौनव्रतमुपस्थितः ।
तथैवासीत् पुनर्मौनमनुछ्‍वा‍सं चकार ह ॥ ७ ॥
तरीही त्यांनी त्या ब्राह्मणाला काही म्हटले नाही. आपल्या मौनव्रताचे यथार्थ पालन केले. त्यानंतर पुनः श्वासोच्छवास रहित मौनव्रताचे अनु‍ष्ठान करण्यास आरंभ केला. ॥ ७ ॥
अथ वर्षसहस्रं च नोच्छ्‍वसन् मुनिपुङ्‍गवः ।
तस्यानुच्छ्‍वसमानस्य मूर्ध्नि धूमो व्यजायत ॥ ८ ॥
पूर्ण एक हजार वर्षेपर्यंत त्या मुनिश्रेष्ठाने श्वास सुद्धा घेतला नाही. याप्रमाणे श्वास न घेतल्यामुळे त्यांच्या मस्तकातून धूर निघू लागला. ॥ ८ ॥
त्रैलोक्यं येन सम्भ्रान्तमातापितमिवाभवत् ।
ततो देवर्षिगन्धर्वाः पन्नगोरगराक्षसाः ॥ ९ ॥

मोहितास्तेजसा तस्य तपसा मन्दरश्मयः ।
कश्मलोपहताः सर्वे पितामहमथाब्रुवन् ॥ १० ॥
त्यामुळे तिन्ही लोकातील प्राणी घाबरून गेले व सर्व संतप्त होऊ लागले. त्या समयी देवता, ऋषि, गंधर्व, नाग, सर्प आणि राक्षस, सर्व मुनिंच्या तपस्येने मोहित (थक्क) झाले. त्यांच्या तेजापुढे सर्वांची कान्ति निस्तेज भासू लागली. ते सर्वच्या सर्व दुःखाने व्याकुळ होऊन पितामह ब्रह्मदेवांना म्हणाले - ॥ ९-१० ॥
बहुभिः कारणैर्देव विश्वामित्रो महामुनिः ।
लोभितः क्रोधितश्चैव तपसा चाभिवर्धते ॥ ११ ॥
'भगवन् ! विश्वामित्रांचा तपोभंग व्हावा या हेतूने अनेक प्रकारे अनेकविध प्रयत्‍न केले गेले, तथापि मुनि आपल्या तपोतेजाने सदा अग्रेसर होत आहेत. ॥ ११ ॥
न ह्यस्य वृजिनं किञ्चिद् दृश्यते सूक्ष्ममप्युत ।
न दीयते यदि त्वस्य मनसा यदभीप्सितम् ॥ १२ ॥

विनाशयति त्रैलोक्यं तपसा सचराचरम् ।
व्याकुलाश्च दिशः सर्वा न च किञ्चित् प्रकाशते ॥ १३ ॥
'आम्हाला त्यांच्या ठिकाणी यत्‌किंचितही कोणता दोष दिसून येत नाही. जर त्यांना मनोवांच्छित वस्तु दिली गेली नाही तर ते आपल्या तपस्येने चराचर प्राण्यांसहित तिन्ही लोकांचा नाश करून टाकतील. या समयी सर्व दिशा धूमाने आच्छादित झालेल्या आहेत. कुणाला काही सुचत नाहिसे झाले आहे. ॥ १२-१३ ॥
सागराः क्षुभिताः सर्वे विशीर्यन्ते च पर्वताः ।
प्रकम्पते च वसुधा वायुर्वातीह संकुलः ॥ १४ ॥
'समुद्र क्षुब्ध झाला आहे. सर्व पर्वत विदीर्ण होऊ लागले आहेत.धरती डगमगू लागली आहे, आणि प्रचंड वादळ सुरू झाले आहे. ॥ १४ ॥
ब्रह्मन् न प्रतिजानीमो नास्तिको जायते जनः ।
सम्मूढमिव त्रैलोक्यं सम्प्रक्षुभितमानसम् ॥ १५ ॥
'ब्रह्मन् ! आम्हाला या उपद्रवाच्या निवारणाचा कोणताही उपाय समजून येत नाही. सर्व लोक नास्तिकांच्या प्रमाणे कर्मानुष्ठानापासून विरत होऊ लागले आहेत. तिन्ही लोकांतील प्राण्यांचे मन क्षुब्ध झालेले आहे. सर्व किंकर्तव्यमूढ झाल्यासारखे झाले आहेत. ॥ १५ ॥
भास्करो निष्प्रभश्चैव महर्षेस्तस्य तेजसा ।
बुद्धिं न कुरुते यावन्नाशे देव महामुनिः ॥ १६ ॥

तावत् प्रसादो भगवान्नग्निरूपो महाद्युतिः ।
'महर्षि विश्वामित्रांच्या तेजाने सूर्याची प्रभा फिकी पडली आहे. भगवन् ! हे महाकान्तिमान् मुनि अग्निस्वरूप होऊ लागले आहेत. देव ! महामुनि विश्वामित्र जोपर्यंत जगताच्या विनाशाचा विचार करीत नाहीत तोपर्यंतच त्यांना प्रसन्न करून घेतले पाहिजे. ॥ १६ १/२ ॥
कालाग्निना यथा पूर्वं त्रैलोक्यं दह्यतेऽखिलम् ॥ १७ ॥

देवराज्यं चिकीर्षेत दीयतामस्य यन्मनः ।
जसे पूर्वकाली प्रलयकालीन अग्निने संपूर्ण त्रैलोक्याला दग्ध करून टाकले होते, त्याप्रमाणेच हेही सर्वांना जाळून भस्म करून टाकतील. जर ते देवतांचे राज्य प्राप्त करू इच्छित असतील तर तेही त्यांना दिले जावे. त्यांच्या मनांत जी काही अभिलाषा असेल ती पूर्ण केली जावी. ॥ १७ १/२ ॥
ततः सुरगणाः सर्वे पितामहपुरोगमाः ॥ १८ ॥

विश्वामित्रं महात्मानं वाक्यं मधुरमब्रुवन् ।
तद्‌नंतर ब्रह्मदेव आदि सर्व देवता महात्मा विश्वामित्रांच्या जवळ जाऊन मधुर वाणीने म्हणाल्या - ॥ १८ १/२ ॥
ब्रह्मर्षे स्वागतं तेऽस्तु तपसा स्म सुतोषिताः ॥ १९ ॥

ब्राह्मण्यं तपसोग्रेण प्राप्तवानसि कौशिक ।
'ब्रह्मर्षे ! तुमचे स्वागत आहे. आम्ही तुमच्या तपस्येने फार संतुष्ट झालो आहोत. कुशिकनन्दना ! तुम्ही आपल्या उग्र तपस्येने ब्राह्मणत्व प्राप्त केले आहे. ॥ १९ १/२ ॥
दीर्घमायुश्च ते ब्रह्मन् ददामि समरुद्‍गणः ॥ २० ॥

स्वस्ति प्राप्नुहि भद्रं ते गच्छ सौम्य यथासुखम् ।
ब्रह्मन् ! मरुद्‌गणांसहित मी तुम्हाला दीर्घायुष्य प्रदान करीत आहे. तुमचे कल्याण होवो. सौम्य ! तुम्ही मंगलाचे भागी बना आणि तुमची जेथे जाण्याची इच्छा असेल तेथे सुखपूर्वक जा.' ॥ २० १/२ ॥
पितामहवचः श्रुत्वा सर्वेषां च दिवौकसाम् ॥ २१ ।

कृत्वा प्रणामं मुदितो व्याजहार महामुनिः ।
पितामह ब्रह्मदेवांचे हे म्हणणे ऐकून महामुनि विश्वामित्रांनी अत्यंत प्रसन्न होऊन संपूर्ण देवतांना प्रणाम केला आणि म्हटले - ॥ २१ १/२ ॥
ब्राह्मण्यं यदि मे प्राप्तं दीर्घमायुस्तथैव च ॥ २२ ॥

ओङ्‍कारोथ वषट्कारो वेदाश्च वरयन्तु माम् ।
क्षत्रवेदविदां श्रेष्ठो ब्रह्मवेदविदामपि ॥ २३ ॥

ब्रह्मपुत्रो वसिष्ठो मामेवं वदतु देवताः ।
यद्येवं परमः कामः कृतो यान्तु सुरर्षभाः ॥ २४ ॥
'देवगणहो ! जर मला आपल्या कृपेने ब्राह्मणत्व मिळाले आहे आणि दीर्घ आयुष्यही प्राप्त झाले आहे; तर ॐकार, वषट्कार, आणि चारी वेदांनी स्वयं येऊन माझे वरण करावे. या शिवाय जो क्षत्रिय वेद (धनुर्वेद आदि) तथा ब्रह्मवेद (ऋक् आदि चारी वेद) यांच्या ज्ञात्यामध्येही सर्वांत श्रेष्ठ जे आहेत त्या ब्रह्मपुत्र वसिष्ठांनी स्वयं येऊन असे म्हणावे (की तुम्ही आता ब्रह्मर्षि झाला आहात). जर असे घडेल तर मी समजेन की माझा उत्तम मनोरथ पूर्ण झाला आहे. त्या परिस्थितीत (असे झाल्यास) आपण सर्व श्रेष्ठ देवगण येथून जाऊ शकता. ॥ २२-२४ ॥
ततः प्रसादितो देवैः वसिष्ठो जपतां वरः ।
सख्यं चकार ब्रह्मर्षिरेवमस्त्विति चाब्रवीत् ॥ २५ ॥
तेव्हां देवतांनी मंत्रजप करणार्‍यांमधे श्रेष्ठ वसिष्ठ मुनिंना प्रसन्न केले. त्यानंतर ब्रह्मर्षि वसिष्ठांनी 'एवमस्तु' म्हणून विश्वामित्रांचे ब्रह्मर्षि होणे स्विकृत केले आणि त्यांच्याबरोबर मैत्री स्थापित केली. ॥ २५ ॥
ब्रह्मर्षिस्त्वं न संदेहः सर्वं सम्पद्यते तव ।
इत्युक्त्वा देवताश्चापि सर्वा जग्मुर्यथागतम् ॥ २६ ॥
'मुने ! तुम्ही ब्रह्मर्षि झाला आहात यात संदेह नाही. तुमचे सर्व ब्राह्मणोचित संस्कार संपन्न झाले आहेत.' असे म्हणून संपूर्ण देवता जशा आल्या होत्या तशा परत गेल्या. ॥ २६ ॥
विश्वामित्रोऽपि धर्मात्मा लब्ध्वा ब्राह्मण्यमुत्तमम् ।
पूजयामास ब्रह्मर्षिं वसिष्ठं जपतां वरम् ॥ २७ ॥
या प्रकारे उत्तम ब्राह्मणत्व प्राप्त करून धर्मात्मा विश्वामित्रांनीही मंत्रजप करणार्‍यांत श्रेष्ठ ब्रह्मर्षि वसिष्ठांचे पूजन केले ॥ २७ ॥
कृतकामो महीं सर्वां चचार तपसि स्थितः ।
एवं त्वनेन ब्राह्मण्यं प्राप्तं राम महात्मना ॥ २८ ॥
आपला मनोरध सिद्ध झाल्यावरही तपस्येत रत राहूनच ते संपूर्ण पृथ्वीवर विचरण करू लागले. श्रीरामा ! या प्रकारे कठोर तपस्या करून या महात्माने ब्राह्मणत्व प्राप्त केले. ॥ २८ ॥
एष राम मुनिश्रेष्ठ एष विग्रहवांस्तपः ।
एष धर्मः परो नित्यं वीर्यस्यैष परायणम् ॥ २९ ॥
रामा ! हे विश्वामित्र समस्त मुनींच्यामधे श्रेष्ठ आहेत. हे तपस्येचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. उत्तम धर्माचा साक्षात् विग्रह आहेत. आणि पराक्रमाचा परम निधि आहेत. ॥ २९ ॥
एवमुक्त्वा महातेजा विरराम द्विजोत्तमः ।
शतानन्दवचः श्रुत्वा रामलक्ष्मणसन्निधौ । । ३० ॥

जनकः प्राञ्जलिर्वाक्यमुवाच कुशिकात्मजम् ।
असे म्हणून महातेजस्वी विप्रवर शतानन्द गप्प झाले. शतानन्दांच्या मुखाने ही कथा ऐकून महाराज जनकांनी श्रीराम आणि लक्ष्मणाच्या समीप विश्वामित्रांना हात जोडून म्हटले - ॥ ३० १/२ ॥
धन्योऽस्म्यनुगृहीतोऽस्मि यस्य मे मुनिपुङ्‍गव ॥ ३१ ॥

यज्ञं काकुत्स्थसहितः प्राप्तवानसि कौशिक ।
पावितोऽहं त्वया ब्रह्मन् दर्शनेन महामुने ॥ ३२ ॥
'मुनिप्रवर कौशिक ! आपण काकुत्स्थ श्रीराम आणि लक्ष्मणासहित माझ्या यज्ञात आलात त्यामुळे मी धन्य झालो आहे. आपण माझ्यावर मोठी कृपा केली आहे. महामुने ! ब्रह्मन् ! आपण दर्शन देऊन मला पवित्र केले आहे. ॥ ३१-३२ ॥
गुणा बहुविधाः प्राप्तास्तव सन्दर्शनान्मया ।
विस्तरेण च वै ब्रह्मन् कीर्त्यमानं महत्तपः ॥ ३३ ॥

श्रुतं मया महातेजो रामेण च महात्मना ।
सदस्यैः प्राप्य च सदः श्रुतास्ते बहवो गुणाः ॥ ३४ ॥
आपल्या दर्शनाने मला मोठा लाभ झाला आहे. अनेक प्रकारचे गुण उपलब्ध झाले आहेत. ब्रह्मन् ! आज या सभेत येऊन मी महात्मा राम तथा अन्य सदस्यांसह आपल्या महान् तेजाचे (प्रभावाचे) वर्णन ऐकले आहे; बरेचसे गुण ऐकले आहेत. ब्रह्मन् ! शतानन्दांनी आपल्या महान् तपाचा वृत्तांत विस्तारपूर्वक सांगितला आहे. ॥ ३३-३४ ॥
अप्रमेयं तपस्तुभ्यमप्रमेयं च ते बलम् ।
अप्रमेया गुणाश्चैव नित्यं ते कुशिकात्मज ॥ ३५ ॥
कुशिकनन्दन ! आपली तपस्या अप्रमेय आहे. आपले बल अनंत आहे, तथा आपले गुणही सदा माप संख्येच्या पलिकडील आहेत. ॥ ३५ ॥
तृप्तिराश्चर्यभूतानां कथानां नास्ति मे विभो ।
कर्मकालो मुनिश्रेष्ठ लम्बते रविमण्डलम् ॥ ३६ ॥
प्रभो ! आपल्या आश्चर्यमयी कथांच्या श्रवणाने माझी तृप्ति होत नाही. परंतु मुनिश्रेष्ठ ! यज्ञाचा समय आलेला आहे. सूर्यदेव ढळू लागला आहे. ॥ ३६ ॥
श्वः प्रभाते महातेजो द्रष्टुमर्हसि मां पुनः ।
स्वागतं तपतां श्रेष्ठ मामनुज्ञातुमर्हसि ॥ ३७ ॥
जप करणारात श्रेष्ठ महातेजस्वी मुने ! आपले स्वागत आहे. उद्या प्रातःकाळी परत मला दर्शन द्यावे. या समयी मला जाण्यास आज्ञा प्रदान करावी. ॥ ३७ ॥
एवमुक्तो मुनिवरः प्रशस्य पुरुषर्षभम् ।
विससर्जाशु जनकं प्रीतं प्रीतमनास्तदा ॥ ३८ ॥
राजाने असे म्हटल्यावर मुनिवर विश्वामित्र मनांतल्या मनांत फार प्रसन्न झाले. त्यांनी प्रेमाने नरश्रेष्ठ राजा जनकाची प्रशंसा करून शीघ्रच त्यांना निरोप दिला. ॥ ३८ ॥
एवमुक्त्वा मुनिश्रेष्ठं वैदेहो मिथिलाधिपः ।
प्रदक्षिणं चकाराशु सोपाध्यायः सबान्धवः ॥ ३९ ॥
त्या समयी मिथिलापति विदेहराज जनकाने मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना पूर्वोक्त गोष्ट सांगून आपले उपाध्याय आणि बंधुबांधवांसह त्यांची शीघ्र परिक्रमा केली आणि नंतर ते निघून गेले. ॥ ३९ ॥
विश्वामित्रोऽपि धर्मात्मा सहरामः सलक्ष्मणः ।
स्ववासमभिचक्राम पूज्यमानो महात्मभिः ॥ ४० ॥
तद्‌नंतर धर्मात्मा विश्वामित्रही महात्मांच्याकडून पूजित होऊन राम लक्ष्मणांसह आपल्या विश्रांति स्थानास परत गेले. ॥ ४० ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे पञ्चषष्टितमः सर्गः ॥ ६५ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा पासष्टावा सर्ग समाप्त झाला. ॥ ६५ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP