श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ षष्टितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

स्वपरजयेन विषण्णस्य रावणस्यादेशेन सुप्तस्य कुंभकर्णस्य प्रबोधनं तं दृष्ट्‍वा वानराणां भयं च -
आपल्या पराजयाने दुःखी झालेल्या रावणाच्या आज्ञेने झोपलेल्या कुंभकर्णास जागविले जाणे आणि त्याला पाहून वानरांचे भयभीत होणे -
स प्रविश्य पुरीं लङ्‌कां रामबाणभयार्दितः ।
भग्नदर्पस्तदा राजा बभूव व्यथितेन्द्रियः ॥ १ ॥
भगवान्‌ श्रीरामांच्या बाणांनी आणि भयाने पीडित होऊन राक्षसराज रावण जेव्हा लंकापुरीत पोहोचला, तेव्हा त्याचा अभिमान चूर-चूर होऊन गेला होता. त्याची सर्व इंद्रिये व्यथेने व्याकुळ झाली होती. ॥१॥
मातङ्‌ग इव सिंहेन गरुडेनेव पन्नगः ।
अभिभूतोऽभवद् राजा राघवेण महात्मना ॥ २ ॥
ज्याप्रमाणे सिंह गजराजाला आणि गरूड विशाल नागाला पीडित आणि पराजित करून टाकतो, त्याच प्रकारे महात्मा राघवांनी राजा रावणाला अभिभूत करून टाकले होते. ॥२॥
ब्रह्मदण्डप्रतीकानां विद्युच्चलितवर्चसाम् ।
स्मरन् राघवबाणानां विव्यथे राक्षसेश्वरः ॥ ३ ॥
भगवान्‌ श्रीरामांचे बाण ब्रह्मदण्डाचे प्रतीक आहेत असे कळून येत होते. त्यांची दीप्ती विद्युत समान चंचल होती. त्यांचे स्मरण केल्याने राक्षसराज रावणाच्या मनात फार व्यथा झाली. ॥३॥
स काञ्चनमयं दिव्यं आश्रित्य परमासनम् ।
विप्रेक्षमाणो रक्षांसि रावणो वाक्यमब्रवीत् ॥ ४ ॥
सोन्याच्या बनविलेल्या दिव्य आणि श्रेष्ठ सिंहासनावर बसून राक्षसांकडे पहात रावण त्या समयी याप्रकारे बोलू लागला - ॥४॥
सर्वं तत् खलु मे मोघं यत्तप्तं परमं तपः ।
यत् समानो महेन्द्रेण मानुषेण विनिर्जितः ॥ ५ ॥
मी जी फार मोठी तपस्या केली होती, ती सर्व निश्चितच व्यर्थ झाली आहे; कारण आज महेंद्रतुल्य पराक्रमी मला रावणाला एका मनुष्याने परास्त केले आहे. ॥५॥
इदं तद्ब्रह्मणो घोरं वाक्यं मामभ्युपस्थितम् ।
मानुषेभ्यो विजानीहि भयं त्वमिति तत्तथा ॥ ६ ॥
ब्रह्मदेवाने मला सांगितले होते की तुला मनुष्यांपासून भय प्राप्त होईल. ही गोष्ट चांगल्या प्रकारे जाणून घे. त्यांचे ते म्हणणे, ते घोर वचन या समयी सफल होऊन माझ्या समक्ष उपस्थित झाले आहे. ॥६॥
देवदानवगन्धर्वैः यक्षराक्षसपन्नगैः ।
अवध्यत्वं मया प्रोक्तं मानुषेभ्यो न याचितम् ॥ ७ ॥
मी तर देवता, दानव, गंधर्व, यक्ष, राक्षस आणि सर्पांपासून अवध्य होण्याचा वर मागितला होता, मनुष्यांपासून अभय होण्याची वर-याचना केली नव्हती. ॥७॥
विदितं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम् ।
इक्ष्वाकुकुलजातेन अनरण्येन यत्पुरा ॥ ८ ॥

उत्पत्स्यति हि मद्वंश पुरुषो राक्षसाधम ।
यस्त्वां सपुत्रं सामात्यं सबलं साश्वसारथिम् ॥ ९ ॥

निहनिष्यति संग्रामे त्वां कुलाधम दुर्मते ।
पूर्वकाळी इक्ष्वाकुवंशी राजा अनरण्याने मला शाप देतांना म्हटले होते की, राक्षसाधमा ! कुलांगारा ! दुर्मते ! माझ्याच वंशात असा एक श्रेष्ठ पुरूष उत्पन्न होईल, जो तुला पुत्र, मंत्री, सेना, अश्व आणि सारथ्यासहित समरांगणात ठार मारेल. आता कळून येत आहे की अनरण्याने ज्याचा संकेत केला होता, हा दशरथकुमार रामच तो मनुष्य आहे. ॥८-९ १/२॥
शप्तोऽहं वेदवत्या च यदा सा धर्षिता पुरा ॥ १० ॥

सेयं सीता महाभागा जाता जनकनन्दिनी ।
याशिवाय पूर्वकाळी वेदवतीनेही, मी तिच्यावर बलात्कार केल्याने मला शाप दिला होता. असे कळून येत आहे की तीच ही महाभागा जनकनंदिनी सीता होऊन प्रकट झाली आहे. ॥१० १/२॥
उमा नन्दीश्वरश्चापि रम्भा वरुणकन्यका ॥ ११ ॥

यथोक्तास्तन्मया प्राप्तं न मिथ्या ऋषिभाषितम् ।
याच तर्‍हेने उमा, नंदीश्वर, रंभा आणि वरूण-कन्येनेही जसे जसे सांगितले होते, तसाच परिणाम मला प्राप्त झाला आहे.(**) ऋषिंचे वचन कधी खोटे ठरत नाही ही गोष्ट सत्यच आहे. ॥११ १/२॥ (** - उमेने कैलास उचलला त्यावेळी भयभीत होऊन रावणाला शाप दिला होता की तुझा मृत्यु स्त्रीच्या कारणानेच होईल. नंदीश्वराची वानर-मूर्ती पाहून रावण हसला होता म्हणून त्याने म्हटले होते की - माझ्या सारखे रूप आणि पराक्रम असणाराच तुझ्या कुळाचा नाश करील. रंभेच्या निमित्ताने नल-कूबरानी आणि वरूणकन्या पुञ्जिकस्थलेच्या निमित्ताने ब्रह्मदेवांनी शाप दिला होता की अनिच्छेने कुणा स्त्रीबरोबर संभोग केलास तर तुला मृत्यु प्राप्त होईल.)
एतदेव समागम्य यत्‍नंा कर्तुमिहार्हथ ॥ १२ ॥

राक्षसाश्चापि तिष्ठन्तु चर्यागोपुरमूर्धसु ।
हे शापच माझ्यावर भय अथवा संकट आणण्यास कारण झाले आहेत. ही गोष्ट जाणून आता तुम्ही लोक आलेल्या संकटाला टाळण्याचा प्रयत्‍न करा. राक्षसलोकांनी राजमार्गांवर आणि गोपुरांच्या शिखरांवर त्यांच्या रक्षणासाठी सज्ज राहावे. ॥१२ १/२॥
स चाप्रतिमगाम्भीर्यो देवदानवदर्पहा ॥ १३ ॥

ब्रह्मशापाभिभूतस्तु कुंभकर्णो विबोध्यताम् ।
त्याच बरोबर ज्याच्या गांभीर्याची कोठे तुलना नाही, जो देवता आणि दानवांचा दर्प दलन करणारा आहे तसेच ब्रह्मदेवांच्या शापाने प्राप्त झालेली निद्रा ज्यांना सदा अभिभूत करून रहात असते, त्या कुंभकर्णाला ही जागे केले जावे. ॥१३ १/२॥
स पराजितमात्मानं प्रहस्तं च निषूदितम् ॥ १४ ॥

ज्ञात्वा रक्षोबलं भीमं आदिदेश महाबलः ।
द्वारेषु यत्‍नःे क्रियतां प्राकारश्चाधिरुह्यताम् ॥ १५ ॥

निद्रावशसमाविष्टः कुंभकर्णो विबोध्यताम् ।
प्रहस्त मारला गेला आहे आणि मी समरांगणात परास्त झालो आहे ! असे जाणून महाबली रावणाने राक्षसांच्या भयानक सेनेला आदेश दिला की तुम्ही लोक नगराच्या दरवाजांवर राहून त्यांचे रक्षणासाठी यत्‍न करा. तटबंदीवर ही चढून जा आणि निद्रेच्या अधीन झालेल्या कुंभकर्णाला जागा करा. ॥१४-१५ १/२॥
सुखं स्वपिति निश्चिन्तः कालोपहतचेतनः ॥ १६ ॥

नव सप्त दशाष्टौ च मासान् स्वपिति राक्षसः ।
मंत्रयित्वा प्रसुप्तोऽयं इतस्तु नवमेऽहनि ॥ १७ ॥
(मी तर दुःखी, चिंतित आणि अपूर्ण काम होऊन जागत राहिलो आहे आणि) तो राक्षस कामभोगाने अचेत होऊन अत्यंत निश्चिंततेने सुखपूर्वक झोपून राहिला आहे. तो कधी नऊ, कधी सात, कधी दहा तर कधी आठ महिने पर्यंत झोपून रहात असतो. हा आजपासून नऊ महिन्या पूर्वी माझ्याशी सल्ला-मसलत करून झोपला होता. ॥१६-१७॥
तं तु बोधयत क्षिप्रं कुंभकर्णं महाबलम् ।
स तु संख्ये महाबाहुः ककुदं सर्वरक्षसाम् ।
वानरान् राजपुत्रौ च क्षिप्रमेव हनिष्यति ॥ १८ ॥
म्हणून तुम्ही लोक महाबली कुंभकर्णाला शीघ्र जागा करा. महाबाहु कुंभकर्ण सर्व राक्षसांमध्ये श्रेष्ठ आहे. तो युद्धस्थळी वानर आणि त्या राजकुमारांनाही शीघ्र मारून टाकील. ॥१८॥
एष केतुः परं संख्ये मुख्यो वै सर्वरक्षसाम् ।
कुंभकर्णः सदा शेते मूढो ग्राम्यसुखे रतः॥ १९ ॥
समस्त राक्षसांमध्ये मुख्य असलेला हा कुंभकर्ण समरभूमी मध्ये आपल्यासाठी सर्वोत्तम विजय वैजयंती समान आहे; परंतु खेदाची गोष्ट आहे की तो मूर्ख ग्राम्यसुखात आसक्त होऊन सदा झोपून रहात आहे. ॥१९॥
रामेण हि निरस्तस्य संग्रामेऽस्मिन् सुदारुणे ।
भविष्यति न मे शोकः कुंभकर्णे विबोधिते ॥ २० ॥
जर कुंभकर्णाला जागा केला गेला तर या भयंकर समयी मला रामाकडून पराजित झाल्याचा शोक प्राप्त होणार नाही. ॥२०॥
किं करिष्याम्यहं तेन शक्रतुल्यबलेन हि ।
ईद्दशे व्यसने प्राप्ते यो न साह्याय कल्पते ॥ २१ ॥
जर या घोर संकटाच्या समयीही जर कुंभकर्ण माझी सहायता करण्यास समर्थ होत नसेल तर इंद्रतुल्य बलशाली असूनही त्याच्याशी मला प्रयोजन तरी काय आहे - मी त्याला घेऊन काय करू ? ॥२१॥
ते तु तद्वचनं श्रुत्वा राक्षसेन्द्रस्य राक्षसाः ।
जग्मुः परमसंभ्रान्ताः कुंभकर्णनिवेशनम् ॥ २२ ॥
राक्षसराज रावणाचे हे बोलणे ऐकून समस्त राक्षस फार घाबरून जाऊन कुंभकर्णाच्या घरी गेले. ॥२२॥
ते रावणसमादिष्टा मांसशोणितभोजनाः ।
गन्धं माल्यं महद् भक्ष्यं आदाय सहसा ययुः ॥ २३ ॥
रक्त मांसाचे भोजन करणारे ते राक्षस रावणाची आज्ञा मिळताच गंध, माल्य तसेच खाण्या-पिण्याची बरीचशी सामग्री घेऊन एकाएकी कुंभकर्णाच्या जवळ गेले. ॥२३॥
तां प्रविश्य महाद्वारां सर्वतो योजनायताम् ।
कुंभकर्णगुहां रम्यां पुष्पगन्धप्रवाहिनीम् ॥ २४ ॥

कुंभकर्णस्य निश्वासाद् अवधूता महाबलाः ।
प्रतिष्ठमानाः कृच्छ्रेण यत्‍नाात् प्रविविशुर्गुहाम् ॥ २५ ॥
कुंभकर्ण एका गुफेमध्ये रहात होता, जी फारच सुंदर होती आणि तेथील वातावरणात फुलांचा सुंगध पसरून रहात होता. तिची लांबी-रूंदी सर्व बाजूंनी एक एक योजनाची होती तसेच तिचा दरवाजा फार मोठा होता. त्यात प्रवेश करताच ते महाबली राक्षस कुंभकर्णाच्या श्वासाच्या वेगाने एकाएकी मागे ढकलले गेले. नंतर मोठ्‍या कष्टाने तोल सावरून ते पूरा प्रयत्‍न करून त्या गुफेमध्ये घुसले. ॥२४-२५॥
तां प्रविश्य गुहां रम्यां शुभां काञ्चनकुट्टिमाम् ।
ददृशुर्नैर्ऋतव्याघ्राः शयानं भीमविक्रमम् ॥ २६ ॥
त्या गुहेच्या भूमीवर रत्‍ने आणि सुवर्ण जडविले होते. त्यामुळे त्या गुहेची रमणीयता वाढली होती. आत प्रवेश केल्यावर त्या राक्षसांनी पाहिले की, भयानक पराक्रमी कुंभकर्ण झोपेत आहे. ॥ २६ ॥
ते तु तं विकृतं सुप्तं विकीर्णमिव पर्वतम् ।
कुंभकर्णं महानिद्रं सहिताः प्रत्यबोधयन् ॥ २७ ॥
महानिद्रेमध्ये निमग्न झालेला कुंभकर्ण विखुरलेल्या पर्वतासमान विकृतावस्थेमध्ये झोपून घोरत पडला होता; म्हणून ते सर्व राक्षस एकत्र होऊन त्याला जागविण्याचा (उठविण्याचा) प्रयत्‍न करू लागले. ॥२७॥
ऊर्ध्वरोमाञ्चिततनुं श्वसन्तमिव पन्नगम् ।
त्रासयन्तं विनिःश्वासैः शयानं भीमविक्रमम् ॥ २८ ॥
त्याचे शरीर वर उभारलेल्या रोमावलीने भरून गेले होते. तो सर्पाप्रमाणे श्वास घेत होता आणि आपल्या निश्वासांनी लोकांना भ्रमवित होता. तेथे झोपलेला तो राक्षस भयानक बल-विक्रमाने संपन्न होता. ॥२८॥
भीमनासापुटं तं तु पातालविपुलाननम् ।
शय्यायां न्यस्तसर्वाङ्‌गं मेदोरुधिरगन्धिनम् ॥ २९ ॥
त्याच्या नासिकेची दोन्ही छिद्रे फार भयंकर होती. तोंड पाताळासारखे होते. त्याने आपले सारे शरीर शय्येवर ठेवलेले होते; आणि त्याच्या देहापासून रक्त आणि चरबीसारखा गंध प्रकट होत होता. ॥२९॥
काञ्चनाङ्‌गदनद्धाङ्‌गं किरीटेनार्कवर्चसम् ।
ददृशुर्नैर्ऋतव्याघ्रं कुंभकर्णं महाबलम् ॥ ३० ॥
त्याच्या भुजांवर बाजूबंद शोभून दिसत होते. मस्तकावर तेजस्वी किरीट धारण केल्यामुळे तो सूर्यदेवाप्रमाणे प्रभापुंजाने प्रकाशित होत होता. या रूपात निशाचर श्रेष्ठ शत्रुदमन कुंभकर्णास त्या राक्षसांनी पाहिले. ॥३०॥
ततश्चक्रुर्महात्मानः कुंभकर्णस्य चाग्रतः ।
मांसानां मेरुसंकाशं राशिं परमतर्पणम् ॥ ३१ ॥
त्यानंतर त्या महाकाय निशाचरांनी कुंभकर्णाच्या समोर प्राण्यांचे मेरूपर्वताप्रमाणे ढीग लावले, जे त्याला अत्यंत तृप्ति प्रदान करणारे होते. ॥३१॥
मृगाणां महिषाणां च वराहाणां च संचयान् ।
चक्रुर्नैर्ऋतशार्दूला राशिमन्नस्य चाद्‌भुतम् ॥ ३२ ॥
त्या श्रेष्ठ राक्षसांनी तेथे मृग, रेडे आणि डुकरांचे समूह उभे केले, तसेच अन्नाची अद्‌भुत रास एकत्र केली. ॥३२॥
ततः शोणितकुंभांश्च मद्यानि विविधानि च ।
पुरस्तात् कुंभकर्णस्य चकुस्त्रिदशशत्रवः ॥ ३३ ॥
इतकेच नव्हे तर देवद्रोह्यांनी कुंभकर्णासमोर रक्ताने भरलेले बरेचसे घडे आणि नाना प्रकारचे मांसही आणून ठेवले. ॥३३॥
लिलिपुश्च परार्ध्येन चन्दनेन परंतपम् ।
दिव्यैराच्छादयामासुः माल्यैर्गन्धैः सुगन्धिभिः ॥ ३४ ॥

धूपगंधांश्च ससृजुः तुष्टुवुश्च परन्तपम् ।
जलदा इव चोन्नेदुः यातुधानास्ततस्ततः ॥ ३५ ॥
त्यानंतर त्यांनी शत्रुसंतापी कुंभकर्णाच्या शरीरावर बहुमूल्य चंदनाचा लेप दिला. दिब्य सुगंधित पुष्पे आणि चंदन त्याला हुंगविले. धूपांचा सुगंध पसरविला. त्या शत्रुदमन वीराची स्तुति केली तसेच जिथे तिथे उभे राहिलेले राक्षस मेघांसमान गंभीर ध्वनिने गर्जना करू लागले. ॥३४-३५॥
शङ्‌खाश्च पूरयामासुः शशाङ्‌कसदृशप्रभान् ।
तुमुलं युगपच्चापि विनेदुश्चाप्यमर्षिताः ॥ ३६ ॥
(इतक्याने ही जेव्हा कुंभकर्ण उठला नाही, तेव्हा) अमर्षाने भरलेल्या राक्षसांनी चंद्रम्याप्रमाणे श्वेत रंगाचे बरेचसे शंख फुकण्यास सुरूवात केली तसेच सर्वांनी एकदम एकत्रितपणे तुमुल ध्वनिने गर्जना करण्यास सुरूवात केली. ॥३६॥
नेदुरास्फोटयामासुः चिक्षिपुस्ते निशाचराः ।
कुंभकर्णविबोधार्थं चक्रुस्ते विपुलं स्वरम् ॥ ३७ ॥
ते निशाचर सिंहनाद करीत होते, दंड ठोकत होते आणि (शेवटी) कुंभकर्णाच्या विभिन्न अंगाना धक्के देऊन हलवू लागले. त्यांनी कुंभकर्णाला जागे करण्यासाठी अत्यंत जोरजोराने गंभीर ध्वनि केला. ॥३७॥
सशङ्‌खभेरीपणवप्रणादं
आस्फोटितक्ष्वेलितसिंहनादम् ।
दिशो द्रवन्तस्त्रिदिवं किरन्तः
श्रुत्वा विहङ्‌गाः सहसा निपेतुः ॥ ३८ ॥
शंख, भेरी आणि पणव वाजू लागले. षड्‍डू ठोकणे, गर्जना आणि सिंहनाद करणे यांचा शब्द सर्वत्र निनादू लागला. तो तुमुल नाद ऐकून पक्षी समस्त दिशांना पळू लागले आणि आकाशात उडू लागले. उडता उडता ते एकाएकी पृथ्वीवर पडत होते. ॥३८॥
यदा भृशार्तैर्निनदैर्महात्मा
न कुंभकर्णो बुबुधे प्रसुप्तः ।
ततो भुशुण्डीर्मुसलानि सर्वे
रक्षोगणास्ते जगृहुर्गदाश्च ॥ ३९ ॥
जेव्हा त्या महान कोलाहलानेही झोपलेला विशालकाय कुंभकर्ण जागा होऊ शकला नाही तेव्हा त्या समस्त राक्षसांनी आपल्या हातात भुशुण्डी, मुसळे आणि गदा घेतल्या. ॥३९॥
तं शैलशृङ्‌गैर्मुसलैर्गदाभिः
वृक्षैस्तलैर्मुद्‌गरमुष्टिभिश्च ।
सुखप्रसुप्तं भुवि कुंभकर्णं
रक्षांस्युदग्राणि तदा निजघ्नुः ॥ ४० ॥
कुंभकर्ण भूतलावरच सुखाने झोपलेला होता. त्याच अवस्थेत त्या प्रचण्ड राक्षसांनी त्यासमयी त्याच्या छातीवर पर्वतशिखरे, मुसळे, गदा, मुद्‌गर आणि बुक्क्यांनी मारण्यास आरंभ केला. ॥४०॥
तस्य निःश्वासवातेन कुंभकर्णस्य रक्षसः ।
राक्षसा कुंभकर्णस्य स्थातुं शेकुर्न चाग्रतः ॥ ४१ ॥
परंतु राक्षस कुंभकर्णाच्या निःश्वास वायुने प्रेरित होऊन ते सर्व निशाचर त्याच्या समोर उभे राहू शकत नव्हते. ॥४१॥
ततः परिहिता गाढं राक्षसा भीमविक्रमाः ।
मृदङ्‌गपणवान् भेरीः शङ्‌खकुंभगणांस्तथा ॥ ४२ ॥

दश राक्षससाहस्रं युगपत् पर्यवारयत् ।
नीलाञ्जनचयाकारं ते तु तं प्रत्यबोधयन् ॥ ४३ ॥
त्यानंतर आपल्या वस्त्रांनी खूप कसून बांधल्यावर ते भयानक पराक्रमी राक्षस ज्यांची संख्या जवळ जवळ दहा हजार होती, एकाच वेळी कुंभकर्णाला घेरून उभे राहिले आणि काळ्या कोळशाच्या राशीप्रमाणे पडलेल्या त्या निशाचराला जागविण्याचा प्रयत्‍न करू लागले. त्या सर्वांनी एकदमच मृदंग, पणव, भेरी, शंख आणि कुंभ (नगारे) वाजविण्यास आरंभ केला. ॥४२-४३॥
अभिघ्नन्तो नदन्तश्च न च संबुबुधे तदा ।
यदा चैनं न शेकुस्ते प्रतिबोधयितुं तदा ॥ ४४ ॥

ततो गुरुतरं यत्‍नंु दारुणं समुपाक्रमन् ।
याप्रकारे ते राक्षस वाद्ये वाजवत आणि गर्जत होते तरीही कुंभकर्णाची निद्रा मोडली नाही. जेव्हा ते कुठल्याही प्रकारे त्याला जागा करू शकले नाहीत, तेव्हा त्यांनी पहिल्या पेक्षा अधिक जास्त प्रयत्‍न करण्यास आरंभ केला. ॥४४ १/२॥
अश्वानुष्ट्रान् खरान्नागान् जघ्नुर्दण्डकशाङ्‌कुशैः ॥ ४५ ॥

भेरीशङ्‌खमृदङ्‌गांश्च सर्वप्राणैरवादयन् ।
निजघ्नुश्चास्य गात्राणि महाकाष्ठकटंकरैः ॥ ४६ ॥

मुद्‌गरैर्मुसलैश्चैव सर्वप्राणसमुद्यतैः ।
तेन नादेन महता लङ्‌का सर्वा प्रपूरिता ।
सपर्वतवना सर्वा सोऽपि नैव प्रबुध्यते ॥ ४७ ॥
ते घोड्‍यांना, ऊंटांना, गाढवांना आणि हत्तींना काठ्‍यांनी, चाबुकांनी तसेच अंकुशांनी मारमारून त्याच्यावर ढकलू लागले. सारी शक्ती लावून उचलले गेलेले मोठ मोठ्‍या काष्ठांचे समूह (लाकडांच्या मोळ्या), मुद्‌गरे आणि मुसळांनीही त्याच्या अंगावर प्रहार करू लागले. त्या महान्‌ कोलाहलाने पर्वत आणि वनांसहित सारी लंका निनादून गेली, परंतु कुंभकर्ण जागा झाला नाही, जागा झालाच नाही. ॥४५-४७॥
तततो भेरीसहस्रं तु युगपत् समहन्यत ।
मृष्टकाञ्चनकोणानां आसक्तानां समन्ततः ॥ ४८ ॥
तदनंतर सर्व बाजूने हजारो दुंदुभि एकाच वेळी वाजविल्या जाऊ लागल्या. त्या सर्वच्या सर्व निरंतर वाजत राहिल्या. त्यांना वाजविण्यासाठी ज्या काठ्‍या होत्या, त्या सुंदर सुवर्णाच्या बनलेल्या होत्या. ॥४८॥
एवमप्यतिनिद्रस्तु यदा नैव प्रबुध्यते ।
शापस्य वशमापन्नः ततः क्रुद्धा निशाचराः ॥ ४९ ॥
इतके करूनही शापाच्या अधीन तो अतिशय झोपाळू निशाचर जागा झाला नाही. यामुळे तेथे आलेल्या त्या सर्व राक्षसांना फार क्रोध आला. ॥४९॥
ततः कोपसमाविष्टाः सर्वे भीमपराक्रमाः ।
तद् रक्षो बोधयिष्यन्तः चक्रुरन्ये पराक्रमम् ॥ ५० ॥
नंतर ते रोषाने भरलेले सर्व भयानक पराक्रमी निशाचर त्या राक्षसाला जागा करण्यासाठी पराक्रम करू लागले. ॥५०॥
अन्ये भेरीः समाजघ्नुः अन्ये चक्रुर्महास्वनम् ।
केशानन्ये प्रलुलुपुः कर्णावन्ये दशन्ति च ॥ ५१ ॥
कोणी दुंदुभि वाजवू लागले, कोणी महान्‌ कोलाहल करू लागले, कोणी कुंभकर्णाच्या डोक्याचे केस खेचू लागले आणि कोणी दांतानी त्याचे कानास चावू लागले. ॥५१॥
उदकुंभशतान्यन्ये समसिञ्चन्त कर्णयोः ।
न कुंभकर्णः पस्पन्दे महानिद्रावशं गतः ॥ ५२ ॥
दुसर्‍या राक्षसांनी त्याच्या दोन्ही कानात शंभर घडे पाणी ओतले तरीही महानिद्रेला वश होऊन पडलेल्या कुंभकर्णाने हूं की चूं केले नाही. (जराही हालचाल केली नाही). ॥५२॥
अन्ये च बलिनस्तस्य कूटमुद्‌गरपाणयः ।
मूर्ध्नि वक्षसि गात्रेषु पातयन् कूटमुद्‌गरान् ॥ ५३ ॥
दुसरे बलवान्‌ राक्षस कांटेरी मुद्‌गर हातात घेऊन त्याचे मस्तक, छाती तसेच अंगावर पाडू लागले. ॥५३॥
रज्जुबंधनबद्धाभिः शतघ्नीभिश्च सर्वतः ।
वध्यमानो महाकायो न प्राबुध्यत राक्षसः ॥ ५४ ॥
तत्पश्चात्‌ दोरांनी बांधलेल्या शतघ्निंच्या द्वारा त्याच्यावर सर्व बाजुनी आघात होऊ लागले. तरीही त्या महाकाय राक्षसाची झोप मोडली नाही. ॥५४॥
वारणानां सहस्रं तु शरीरेऽस्य प्रधावितम् ।
कुंभकर्णस्तदा बुद्ध्वा स्पर्शं परमबुध्यत ॥ ५५ ॥
यानंतर त्याच्या शरीरावर हजारो हत्ती दौडविले गेले. (धावविले, पळविले गेले) तेव्हा त्याला काही स्पर्श जाणवला आणि तो जागा झाला. ॥५५॥
स पात्यमानैर्गिरिशृङ्‌गवृक्षैः
अचिन्तयंस्तान् विपुलान् प्रहारान् ।
निद्राक्षयात् क्षुद्‌भयपीडितश्च
विजृम्भमाणः सहसोत्पपात ॥ ५६ ॥
जरी त्याच्यावर पर्वतशिखरे आणि वृक्ष टाकले जात होते तरीही त्याने त्या भारी प्रहारांची काहीही पर्वा केली नाही. हत्तींच्या स्पर्शाने जेव्हा त्याची झोप मोडली, तेव्हा तो भुकेने पीडित होऊन, आळस देत एकाएकी उडी मारून उभा राहिला. ॥५६॥
स नागभोगाचलशृङ्‌गकल्पौ
विक्षिप्य बाहू जितवज्रसारौ ।
विवृत्य वक्त्रं वडवामुखाभं
निशाचरोऽसौ विकृतं जजृम्भे ॥ ५७ ॥
त्याचा दोन्ही भुजा नागांचे शरीर आणि पर्वतशिखरांसमान वाटत होत्या. त्याने वज्राच्या शक्तिला पराजित करून टाकले होते. ते दोन्ही बाहु आणि मुख पसरून जेव्हा तो निशाचर जांभई देऊ लागला, त्या समयी त्याचे मुख वडवानलाप्रमाणे विकराळ भासत होते. ॥५७॥
तस्य जाजृम्भमाणस्य वक्त्रं पातालसंनिभम् ।
ददृशे मेरुशृङ्‌गाग्रे दिवाकर इवोदितः ॥ ५८ ॥
जांभई देतांना कुंभकर्णाचे पाताळासारखे मुख मेरूपर्वताच्या शिखरावर उगवलेल्या सूर्यासमान दिसून येत होते. ॥५८॥
स जृम्भमाणोऽतिबलः प्रबुद्धस्तु निशाचरः ।
निःश्वासश्चास्य संजज्ञे पर्वतादिव मारुतः ॥ ५९ ॥
याप्रकारे जांभई देत देत तो अत्यंत बलशाली निशाचर जेव्हा जागा झाला तेव्हा त्याच्या मुखातून जो श्वास निघत होता तो पर्वतावरून येणार्‍या वायुसमान प्रतीत होत होता. ॥५९॥
रूपमुत्तिष्ठतस्तस्य कुंभकर्णस्य तद् बभौ ।
युगांते सर्वभूतानि कालस्येव दिधक्षतः ॥ ६० ॥
झोपेतून उठलेल्या कुंभकर्णाचे ते रूप प्रलयकाळात समस्त प्राण्यांच्या संहाराची इच्छा ठेवणार्‍या कालाप्रमाणे वाटत होते. ॥६०॥
तस्य दीप्ताग्निसदृशे विद्युत्सदृशवर्चसी ।
ददृशाते महानेत्रे दीप्ताविव महाग्रहौ ॥ ६१ ॥
त्याचे दोन्ही मोठ मोठे डोळे प्रज्वलित अग्नि आणि विद्युत्‌ समान दीप्तिमती दिसून येत होते. ते असे दिसत होते की जणु दोन महान्‌ ग्रह प्रकाशित होत आहेत. ॥६१॥
ततस्त्वदर्शयन् सर्वान् भक्ष्यांश्च विविधान् बहून् ।
वराहान् महिषांश्चैव बभक्ष स महाबलः ॥ ६२ ॥
तदनंतर राक्षसांनी तेथे ज्या अनेक प्रकारच्या खाण्यापिण्याच्या वस्तु प्रचुर मात्रेमध्ये ठेवल्या गेल्या होत्या, त्या सर्वच्या सर्व कुंभकर्णाला दाखविल्या. त्या महाबली राक्षसाने पहाता पहाता बरेचसे रेडे आणि डुकरांना खाऊन टाकले. ॥६२॥
अदद् बुभुक्षितो मांसं शोणितं तृषितः पिबन् ।
मेदःकुंभांश्च मद्यांश्च पपौ शक्ररिपुस्तदा ॥ ६३ ॥
त्याला फार भूक लागली होती. म्हणून त्याने पोटभर मांस खाल्ले आणि तहान शमविण्यासाठी रक्तपान केले. त्यानंतर त्या इंद्रद्रोही निशाचराने चरबीने भरलेले कित्येक घडे साफ करून टाकले आणि कित्येक घडे मदिराही पिऊन टाकली. ॥६३॥
ततस्तृप्त इति ज्ञात्वा समुत्पेतुर्निशाचराः ।
शिरोभिश्च प्रणम्यैनं सर्वतः पर्यवारयन् ॥ ६४ ॥
तेव्हा त्याला तृप्त जाणून राक्षस उड्‍या मारमारून त्याच्या समोर आले आणि त्याला मस्तक नमवून प्रणाम करून त्याच्या चारी बाजूला उभे राहिले. ॥६४॥
निद्राविशदनेत्रस्तु कलुषीकृतलोचनः ।
चारयन् सर्वतो दृष्टिं तान् ददर्श निशाचरान् ॥ ६५ ॥
त्यासमयी त्याचे नेत्र निद्रेमुळे अप्रसन्न - थोडे थोडे उघडले गेलेले होते आणि मलिन भासत होते. त्याने सर्व बाजूस दृष्टि टाकून तेथे उभे असलेल्या निशाचरांना पाहिले. ॥६५॥
स सर्वान् सान्त्वयामास नैर्ऋतान्नैर्ऋतर्षभः ।
बोधनाद् विस्मितश्चापि राक्षसानिदमब्रवीत् ॥ ६६ ॥
निशाचरांमध्ये श्रेष्ठ कुंभकर्णाने त्या सर्व राक्षसांना सान्त्वना दिली आणि आपणाला जागे केले जाण्याने विस्मित होऊन त्याने याप्रकारे विचारले- ॥६६॥
किमर्थमहमादृत्य भवद्‌भिः प्रतिबोधितः ।
कच्चित् सुकुशलं राज्ञो भयं वा नेह किंचन ॥ ६७ ॥
तुम्ही लोकांनी याप्रकारे आदर करून मला कशासाठी जागे केले आहे ? राक्षसराज रावण कुशल तर आहे ना ? येथे काही भय तर उपस्थित झालेले नाही ना ? ॥६७॥
अथवा ध्रुवमन्येभ्यो भयं परमुपस्थितम् ।
यदर्थमेवं त्वरितैः भर्भवद्‌भिः प्रतिबोधितः ॥ ६८ ॥
अथवा निश्चितच येथे दुसर्‍यांकडून कुठले तरी महान्‌ भय उपस्थित झालेले आहे, ज्याच्या निवारणासाठी तुम्ही लोकांनी इतक्या उतावळेपणाने मला जागे केले आहे. ॥६८॥
अद्य राक्षसराजस्य भयमुत्पाटयाम्यहम् ।
पातयिष्ये महेन्द्रं वा शातयिष्ये तथाऽनलम् ॥ ६९ ॥
ठीक आहे, आज मी राक्षसराजाच्या भयाला उपटून फेकून देईन. महेंद्राला (पर्वता अथवा इंद्राला) ही चिरून टाकीन आणि अग्निला ही थंड करून टाकीन. ॥६९॥
न ह्यल्पकारणे सुप्तं बोधयिष्यति मादृशम् ।
तदाख्यातार्थतत्त्वेन मत्प्रबोधनकारणम् ॥ ७० ॥
माझ्या सारख्या पुरूषाला कुठल्याही लहान-सहान कारणाने झोपेतून जागे केले जात नाही. म्हणून तुम्ही लोक ठीक-ठीक सांगा, की मला जागविले जाण्याचे काय कारण आहे ? ॥७०॥
एवं ब्रुवाणं संरब्धं कुंभकर्णमरिंदमम् ।
यूपाक्षः सचिवो राज्ञः कृताञ्जलिरभाषत ॥ ७१ ॥
शत्रुसूदन कुंभकर्ण जेव्हा रोषाने भरून याप्रकारे विचारू लागला, तेव्हा राजा रावणाचा सचिव यूपाक्ष हात जोडून म्हणाला- ॥७१॥
न नो देवकृतं किञ्चिद् भयमस्ति कदाचन ।
मानुषान्नो भयं राजम् तुमुलं संप्रबाधते ॥ ७२ ॥
महाराज ! आम्हाला देवतांच्या कडून तर कधी काहीही भय होऊ शकत नाही. यासमयी केवळ एका मनुष्याकडून तुमुल भय प्राप्त झालेले आहे. जे आम्हांला व्यथीत करीत आहे. ॥७२॥
न दैत्यदानवेभ्यो वा भयमस्ति न नः क्वचित् ।
यादृशं मानुषं राजन् भयमस्मानुपस्थितम् ॥ ७३ ॥
राजन्‌ ! या समयी एका मनुष्याकडून आम्हांला जसे भय उपस्थित झालेले आहे तसे कधी दैत्यांकडून आणि दानवांकडूनही झाले नव्हते. ॥७३॥
वानरैः पर्वताकारैः लङ्‌केयं परिवारिता ।
सीताहरणसन्तप्ताद् रामान्नस्तुमुलं भयम् ॥ ७४॥
पर्वताकार वानरांनी येऊन या लंकापुरीला चोहो बाजूनी घेरून टाकले आहे. सीताहरणाने संतप्त झालेल्या रामांकडून आम्हांला तुमुल भय प्राप्त झालेले आहे. ॥७४॥
एकेन वानरेणेयं पूर्वं दग्धा महापुरी ।
कुमारो निहतश्चाक्षः सानुयात्रः सकुञ्जरः ॥ ७५ ॥
प्रथम एकाच वानराने येथे येऊन या महापुरीला जाळून टाकले होते आणि हत्ती तसेच साथीदारांसहित राजकुमार अक्षालाही मारून टाकले होते. ॥७५॥
स्वयं रक्षोधिपश्चापि पौलस्त्यो देवकण्टकः ।
व्रजेति संयुगे मुक्तो रामेणादित्यवर्चसा ॥ ७६ ॥
श्रीराम सूर्यासमान तेजस्वी आहेत. त्यांनी देवशत्रु पुलस्त्यकुलनंदन साक्षात्‌ राक्षसराज रावणालाही युद्धात हरवून जीवित सोडून दिले आणि म्हटले - लंकेला परत जा. ॥७६॥
यन्न दैवैः कृतो राजा नापि दैत्यैर्न दानवैः ।
कृतः स इह रामेण विमुक्तः प्राणसंशयात् ॥ ७७ ॥

महाराजांची जी दशा देवता, दैत्य आणि दानवही करू शकले नव्हते, ती रामांनी करून टाकली. त्यांचे प्राण मोठ्‍या संकटातून वाचले आहेत. ॥७७॥
स यूपाक्षवचः श्रुत्वा भ्रातुर्युधि पराभवम् ।
कुंभकर्णो विवृत्ताक्षो यूपाक्षमिदमब्रवीत् ॥ ७८ ॥
युद्धात भावाच्या पराजयासंबंधित यूपाक्षाचे बोलणे ऐकून कुंभकर्ण डोळे फाडफाडून पाहू लागला आणि यूपाक्षाला याप्रकारे बोलला- ॥७८॥
सर्वमद्यैव यूपाक्ष हरिसैन्यं सलक्ष्मणम् ।
राघवं च रणे हत्वा पश्चाद्द्रक्ष्यामि रावणम् ॥ ७९ ॥
यूपाक्ष ! मी आता सार्‍या वानरसेनेला तसेच लक्ष्मणासहित राघवालाही रणभूमीमध्ये परास्त करून रावणाचे दर्शन करीन. ॥७९॥
राक्षसांस्तर्पयिष्यामि हरीणां मांसशोणितैः ।
रामलक्ष्मणयोश्चापि स्वयं पास्यामि शोणितम् ॥ ८० ॥
आज वानरांच्या मांस आणि रक्ताने राक्षसांना तृप्त करीन आणि स्वतः ही राम आणि लक्ष्मणाचे रक्त पिऊन टाकीन. ॥८०॥
तत्तस्य वाक्यं ब्रुवतो निशम्य
सगर्वितं रोषविवृद्धदोषम् ।
महोदरो नैर्ऋतयोधमुख्यः
कृताञ्जलिर्वाक्यमिदं बभाषे ॥ ८१ ॥
कुंभकर्णाचे वाढलेल्या रोष - दोषाने युक्त अहंकारपूर्ण वचन ऐकून राक्षस योद्धातील मुख्य, महोदराने हात जोडून ही गोष्ट सांगितली- ॥८१॥
रावणस्य वचः श्रुत्वा गुणदोषौ विमृश्य च ।
पश्चादपि महाबाहो शत्रून् युधि विजेष्यसि ॥ ८२ ॥
महाबाहो ! प्रथम येऊन महाराज रावणांचे बोलणे ऐकावे, नंतर गुण-दोषाचा विचार केल्यानंतर युद्धात शत्रूंना परास्त करावे. ॥८२॥
महोदरवचः श्रुत्वा राक्षसैः परिवारितः ।
कुंभकर्णो महातेजाः संप्रतस्थे महाबलः ॥ ८३ ॥
महोदराचे हे बोलणे ऐकून, राक्षसांनी घेरलेला महातेजस्वी महाबली कुंभकर्ण तेथून निघण्याची तयारी करू लागला. ॥८३॥
तं समुत्थाप्य भीमाक्षं भीमरूपपराक्रमम् ।
राक्षसास्त्वरिता जग्मुः दशग्रीवनिवेशनम् ॥ ८४ ॥
याप्रकारे झोपलेल्या, भयानक नेत्र, रूप आणि पराक्रम असलेल्या कुंभकर्णास उठवून ते राक्षस शीघ्रच दशमुख रावणाच्या महालात गेले. ॥८४॥
ततो गत्वा दशग्रीवं आसीनं परमासने ।
ऊचुर्बद्धाञ्जलिपुटाः सर्व एव निशाचराः ॥ ८५ ॥
दशग्रीव उत्तम सिंहासनावर बसलेला होता. त्याच्या जवळ जाऊन सर्व निशाचर हात जोडून म्हणाले- ॥८५॥
कुंभकर्णः प्रबुद्धोऽसौ भ्राता ते राक्षसर्षभ ।
कथं तत्रैव निर्यातु द्रक्ष्यसे तमिहागतम् ॥ ८६ ॥
राक्षसेश्वर ! आपले बंधु कुंभकर्ण जागे झाले आहेत. सांगावे, त्यांनी काय करावे ? सरळ युद्धस्थळावर जावे की आपण त्यांना येथे उपस्थित पाहू इच्छिता ? ॥८६॥
रावणस्त्वब्रवीद्‌धृष्टो राक्षसांस्तानुपस्थितान् ।
द्रष्टुमेनमिहेच्छामि यथान्यायं च पूज्यताम् ॥ ८७ ॥
तेव्हा रावणाने अत्यंत हर्षाने त्या उपस्थित झालेल्या राक्षसांना म्हटले - मी कुंभकर्णाला येथे पाहू इच्छितो. त्यांचा यथोचित सत्कार केला जावा. ॥८७॥
तथेत्युक्त्वा तु ते सर्वे पुनरागम्य राक्षसाः ।
कुंभकर्णमिदं वाक्यं ऊचू रावणचोदिताः ॥ ८८ ॥
तेव्हा, जशी आज्ञा असे म्हणून रावणाने धाडलेले ते सर्व राक्षस पुन्हा कुंभकर्णाजवळ येऊन याप्रकारे बोलले- ॥८८॥
द्रष्टुं त्वां काङ्‌क्षते राजा सर्वराक्षसपुङ्‌गवः ।
गमने क्रियतां बुद्धिः भ्रातरं संप्रहर्षय ॥ ८९ ॥
प्रभो ! सर्व-राक्षस शिरोमणी महाराज रावण आपल्याला पाहू इच्छितात. म्हणून आपण तेथे चलण्याचा विचार करावा आणि येऊन आपल्या बंधुचा हर्ष वाढवावा. ॥८९॥
कुंभकर्णस्तु दुर्धर्षो भ्रातुराज्ञाय शासनम् ।
तथेत्युक्त्वा महावीर्यः शयनाद् उत्पपात ह ॥ ९० ॥
भावाचा हा आदेश मिळताच महापराक्रमी दुर्जय वीर कुंभकर्ण फार चांगले असे म्हणून शय्येवरून उठून उभा राहिला. ॥९०॥
प्रक्षाल्य वदनं हृष्टः स्नातः परमहर्षितः ।
पिपासुस्त्वरयामास पानं बलसमीरणम् ॥ ९१ ॥
त्याने मोठ्‍या आनंदाने आणि प्रसन्नतेने तोंड धुवून स्नान केले आणि पिण्याच्या इच्छेने तात्काळ बलवर्धक पेय घेऊन येण्याची आज्ञा दिली. ॥९१॥
ततस्ते त्वरितास्तत्र राक्षसा रावणाज्ञया ।
मद्यं भक्ष्यांश्च विविधान् क्षिप्रमेवोपहारयन् ॥ ९२ ॥
तेव्हा रावणाच्या आदेशाने ते सर्व राक्षस तात्काळ मद्य तसेच नाना प्रकारचे भक्ष्य पदार्थ घेऊन आले. ॥९२॥
पीत्वा घटसहस्रे द्वे गमनायोपचक्रमे ।
ईषत्समुत्कटो मत्तः तेजोबलसमन्वितः ॥ ९३ ॥
कुंभकर्ण दोन हजार घडे मद्य गट्ट करून चलण्यास उद्यत झाला. यामुळे त्याच्या ठिकाणी काही तरतरी आली आणि तो मत्त, तेजस्वी आणि शक्तिसंपन्न झाला. ॥९३॥
कुंभकर्णो बभौ हृष्टः कालान्तकयमोपमः ।
भ्रातुः स भवनं गच्छन् रक्षोगणसमन्वितः ।
कुंभकर्णः पदन्यासैः अकम्पयत मेदिनीम् ॥ ९४ ॥
नंतर जेव्हा राक्षसांच्या सेनेसह कुंभकर्ण भावाच्या महालाकडे निघाला, त्यासमयी तो रोषाने भरलेल्या प्रलयकालच्या विनाशकारी यमराजासमान भासत होता. कुंभकर्ण आपल्या पायाच्या आघाताने सार्‍या पृथ्वीला कंपित करत होता. ॥९४॥
स राजमार्गं वपुषा प्रकाशयन्
सहस्ररश्मिर्धरणीमिवांशुभिः ।
जगाम तत्राञ्जलिमालया वृतः
शतक्रतुर्गेहमिव स्वयम्भुवः ॥ ९५ ॥
जसे सूर्यदेव आपल्या किरणांनी भूतलाला प्रकाशित करतात त्याचप्रकारे तो आपल्या तेजस्वी शरीराने राजमार्गाला उद्‌भासित करीत हात जोडून आपल्या भावाच्या महालात गेला, अगदी तसाच जसे देवराज इंद्र ब्रह्मदेवांच्या धामी जात असतात. ॥९५॥
तं राजमार्गस्थममित्रघातिनं
वनौकसस्ते सहसा बहिः स्थिताः ।
दृष्ट्‍वाप्रमेयं गिरिशृङ्‌गकल्पं
वितत्रसुस्ते सह यूथपालैः ॥ ९६ ॥
राजमार्गावरून जाते वेळी शत्रुघाती कुंभकर्ण पर्वत शिखरासमान भासत होता. नगरा बाहेर उभे असलेले वानर एकाएकी त्या विशालकाय राक्षसास पाहून सेनापतिंच्या सहित हादरून गेले. ॥९६॥
केचिच्छरण्यं शरणं स्म रामं
व्रजन्ति केचिद् व्यथिताः पतन्ति ।
केचिद् दिशः स्म व्यथिताः पतन्ति
केचिद् भयार्ता भुवि शेरते स्म ॥ ९७ ॥
त्यांतील काही वानर शरणागतवत्सल भगवान्‌ श्रीरामांना शरण गेले. काही व्यथित होऊन जमिनीवर पडले. काही पीडित होऊन संपूर्ण दिशांमध्ये पळून गेले आणि जेथे तेथे धराशायी झाले, आणि कित्येक वानर तर भयाने पीडित होऊन जमिनीवर झोपले. ॥९७॥
तमद्रिशृङ्‌गप्रतिमं किरीटिनं
स्पृशन्तमादित्यमिवात्मतेजसा ।
वनौकसः प्रेक्ष्य विवृद्धमद्‌भुतं
भयार्दिता दुद्रुविरे ततस्ततः ॥ ९८ ॥
तो पर्वत शिखराप्रमाणे उंच होता. त्याच्या मस्तकावर मुकुट शोभत होता. तो आपल्या तेजाने सूर्याला स्पर्श करत असल्यासारखा वाटत होता. त्या वाढलेल्या विशालकाय तसेच अद्‌भुत राक्षसाला पाहून सर्व वनवासी वानर भयाने पीडित होऊन इकडे तिकडे पळू लागले. ॥९८॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे षष्टितमः सर्गः ॥ ६० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा साठावा सर्ग पूरा झाला. ॥६०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP