अकम्पनसम्मत्या रावणस्य सीतापहरणाय गमनं मारीचस्य वचसा तस्य पुनर्लङ्का्यामेव परावर्तनम् -
|
रावणाचे अकंपनाच्या सल्ल्याने सीतेचे अपहरण करण्यासाठी जाणे आणि मारीच्याच्या सांगण्यावरून लंकेला परत येणे -
|
त्वरमाणस्ततो गत्वा जनस्थानादकम्पनः ।
प्रविश्य लङ्कां वेगेने रावणं वाक्यमब्रवीत् ॥ १ ॥
|
त्यानंतर जनस्थानातून अकंपन नामक राक्षस मोठ्या उतावळीने लंकेकडे गेला आणि लवकरच पुरीत प्रवेश करून रावणाला या प्रकारे म्हणाला - ॥१॥
|
जनस्थानस्थिता राजन् राक्षसा बहवो हताः ।
खरश्च निहतः संख्ये कथंचिदहमागतः ॥ २ ॥
|
राजन ! जनस्थानात जे बरेचसे राक्षस राहात होते, ते मारले गेले आहेत. खर युद्धात मारला गेला. मी कसातरी जीव वाचवून येथे आलो आहे. ॥२॥
|
एवमुक्तो दशग्रीवः क्रुद्धः संरक्तलोचनः ।
अकम्पनमुवाचेदं निर्दहन्निव तेजसा ॥ ३ ॥
|
अकंपनाने असे सांगताच दशमुख रावण क्रोधाने संतप्त झाला आणि लाल डोळे करून त्याला या प्रकारे म्हणाला, जणु त्याला आपल्या तेजाने जाळून भस्म करून टाकेल. ॥३॥
|
केन भीमं जनस्थानं हतं मम परासुना ।
को हि सर्वेषु लोकेषु गतिं नाधिगमिष्यति ॥ ४ ॥
|
तो म्हणाला- कोण मृत्यु मुखात जाऊ इच्छित आहे, की ज्याने माझ्या भयंकर जनस्थानाचा विनाश केला आहे ? ज्याला समस्त लोकात कोठेही गति नाही असा दुःसाहसी कोण आहे ? ॥४॥
|
न हि मे विप्रियं कृत्वा शक्यं मघवता सुखम् ।
प्राप्तुं वैश्रवणेनाऽपि न यमेन न विष्णुना ॥ ५ ॥
|
माझा अपराध करून इंद्र, यम, कुबेर आणि विष्णुही सुखाने राहू शकणार नाहीत. ॥५॥
|
कालस्य चाप्यहं कालो दहेयमपि पावकम् ।
मृत्युं मरणधर्मेण संयोजयितुमुत्सहे ॥ ६ ॥
|
मी काळाचाही काळ आहे, आगीलाही मी जाळू शकतो तसेच मरणाला ही मृत्युच्या मुखात घालू शकतो. ॥६॥
|
वातस्य तरसा वेगं निहन्तुमपि चोत्सहे ।
दहेयमपि संक्रुद्धस्तेजसाऽऽदित्यपावकौ ॥ ७ ॥
|
जर मी अत्यंत रागावलो तर आपल्या वेगाने वायुची गति रोखू शकतो, तसेच आपल्या तेजाने सूर्य आणि अग्नि यांनाही जाळून भस्म करू शकतो. ॥७॥
|
तथा क्रुद्धं दशग्रीवं कृताञ्जलिरकम्पनः ।
भयात् सन्दिग्धया वाचा रावणं याचतेऽभयम् ॥ ८ ॥
|
रावणाला या प्रकारे क्रोधाने भडकलेला पाहून भीतीने अकंपनाची वाचाच बंद झाली. त्याने हात जोडून संशययुक्त वाणीने रावणाकडे अभय मांगितले. ॥८॥
|
दशग्रीवोऽभयं तस्मै प्रददौ रक्षसां वरः ।
स विश्रब्धोऽब्रवीद् वाक्यमसन्दिग्धमकम्पनः ॥ ९ ॥
|
तेव्हा राक्षसामध्ये श्रेष्ठ दशग्रीवाने त्याला अभयदान दिले. यामुळे अकंपनाला आपले प्राण वाचतील असा विश्वास वाटला आणि तो संशयरहित होऊन म्हणाला- ॥९॥
|
पुत्रो दशरथस्यास्ते सिंहसंहननो युवा ।
रामो नाम महास्कन्धो वृत्तायतमहाभुजः ॥ १० ॥
श्यामः पृथुयशाः श्रीमानतुल्यबलविक्रमः ।
हतस्तेन जनस्थाने खरश्च सहदूषणः ॥ ११ ॥
|
राक्षसराज ! राजा दशरथांचे नवयुवक पुत्र श्रीराम पंचवटीत राहात आहेत. त्यांच्या शरीराची ठेवण सिंहासमान आहे. त्यांचे खांदे मोठे आणि भुजा गोल आणि लांब आहेत. शरीराचा रंग सावळा आहे. ते फार यशस्वी आणि तेजस्वी दिसून येत आहेत. त्यांच्या बळाला आणि पराक्रमाला कोठे तुलना नाही आहे. त्यांनी जनस्थानात राहाणार्या खर आणि दूषण आदिंचा वध केला आहे. ॥१०-११॥
|
अकम्पनवचः श्रुत्वा रावणो राक्षसाधिपः ।
नागेन्द्र इव निःश्वस्य इदं वचनमब्रवीत् ॥ १२ ॥
|
अकंपनाचे हे बोलणे ऐकून राक्षसराज रावणाने नागराजप्रमाणे (महान सर्पाप्रमाणे) दीर्घश्वास घेऊन या प्रकारे म्हटले- ॥१२॥
|
स सुरेन्द्रेण सुंयुक्तो रामः सर्वामरैः सह ।
उपयातो जनस्थानं ब्रूहि कच्चिदकम्पन ॥ १३ ॥
|
अकंपना ! सांग तरी खरे की राम संपूर्ण देवता तसेच इंद्र यांच्यासह जनस्थानात आलेले आहेत कां ? ॥१३॥
|
रावणस्य पुनर्वाक्यं निशम्य तदकम्पनः ।
आचचक्षे बलं तस्य विक्रमं च महात्मनः ॥ १४ ॥
|
रावणाचा हा प्रश्न ऐकून अकंपनाने महात्मा श्रीरामांच्या बळ आणि पराक्रमाचे पुन्हा या प्रकारे वर्णन केले- ॥१४॥
|
रामो नाम महातेजाः श्रेष्ठः सर्वधनुष्मताम् ।
दिव्यास्त्रगुणसम्पन्नः परं धर्मं गतो युधि ॥ १५ ॥
|
लंकेश्वर ! ज्यांचे नाव राम आहे ते जगातील समस्त धनुर्धरात श्रेष्ठ आणि अत्यंत तेजस्वी आहेत. दिव्यास्त्रांच्या प्रयोगाचा जो गुण आहे त्याने ते पूर्णतः संपन्न आहेत. युद्धाच्या कलेत ते पराकाष्ठेला पोहोंचले आहेत. ॥१५॥
|
तस्यानुरूपो बलवान् रक्ताक्षो दुन्दुभिस्वनः ।
कनीयाँल्लक्ष्मणो भ्राता राकाशशिनिभाननः ॥ १६ ॥
|
श्रीरामांच्या बरोबर त्यांचे लहान भाऊ लक्ष्मण ही आहेत. जे त्यांच्या समानच बलवान आहेत. त्यांचे मुख पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे मनोहर आहे. त्यांचे डोळे किंचित लाल आहेत आणि स्वर दुदुंभिप्रमाणे गंभीर आहे. ॥१६॥
|
स तेन सह संयुक्तः पावकेनानिलो यथा ।
श्रीमान् राजवरस्तेन जनस्थानं निपातितम् ॥ १७ ॥
|
ज्याप्रमाणे अग्नि बरोबर वायु असावा त्याप्रमाणे आपल्या भावाबरोबर संयुक्त असलेले राजाधिराज श्रीमान राम फारच प्रबल आहेत. त्यांनीच जनस्थानाला उजाडून टाकले आहे. ॥१७॥
|
नैव देवा महात्मानो नात्र कार्या विचारणा ।
शरा रामेण तूत्सृष्टा रुक्मपुङ्खाः पतत्रिणः ॥ १८ ॥
सर्पाः पञ्चानना भूत्वा भक्षयन्ति स्म राक्षसान् ।
|
त्यांच्या बरोबर कुणी देवताही नाही अथवा महात्मा मुनिही नाहीत. याविषयात आपण काही विचार करू नये. श्रीरामांनी सोडलेल्या सोन्याचे पंखयुक्त बाण पंचमुखी सर्प बनून राक्षसांना खाऊन टाकत होते. ॥१८ १/२॥
|
येन येन च गच्छन्ति राक्षसा भयकर्षिताः ॥ १९ ॥
तेन तेन स्म पश्यन्ति राममेवाग्रतः स्थितम् ।
इत्थं विनाशितं तेन जनस्थानं तवानघ ॥ २० ॥
|
भयाने कातर झालेले राक्षस ज्या ज्या मार्गाने पळून जात होते तेथे तेथे ते श्रीरामांनाच आपल्या समोर उभे पहात होते. अनघ ! या प्रकारे एकट्या श्रीरामांनीच आपल्या जनस्थानाचा विनाश केला आहे. ॥१९-२०॥
|
अकम्पनवचः श्रुत्वा रावणो वाक्यमब्रवीत् ।
गमिष्यामि जनस्थानं रामं हन्तुं सलक्ष्मणम् ॥ २१ ॥
|
अकंपनाचे हे बोलणे ऐकून रावणाने म्हटले- मी आत्ता लक्ष्मणासहित रामाचा वध करण्यासाठी जनस्थानात जाईन. ॥२१॥
|
अथैवमुक्ते वचने प्रोवाचेदमकम्पनः ।
शृणु राजन् यथावृत्तं रामस्य बलपौरुषम् ॥ २२ ॥
|
त्यानी असे म्हटल्यावर अकंपन म्हणाला - राजन ! श्रीरामाचे बल आणि पुरुषार्थ जसा आहे त्याचे यथावत वर्णन माझ्याकडून ऐकावे. ॥२२॥
|
असाध्यः कुपितो रामो विक्रमेण महायशाः ।
आपगायास्तु पूर्णाया वेगं परिहरेच्छरैः ॥ २३ ॥
सताराग्रहनक्षत्रं नभश्चाप्यवसादयेत् ।
|
महायशस्वी राम जर कुपित झाले तर आपल्या पराक्रमाच्या द्वारे त्यांना कुणीही काबूत राखू शकणार नाही. ते आपल्या बाणांनी भरलेल्या नदीच्या वेगास ही पालटू शकतात तसेच तारे, ग्रह आणि नक्षत्रांसहित संपूर्ण आकाशमण्डलासही पीडा देऊ शकतात. ॥२३ १/२॥
|
असौ रामस्तु सीदन्तीं श्रीमानभ्युद्धरेन्महीम् ॥ २४ ॥
भित्त्वा वेलां समुद्रस्य लोकानाप्लावयेद् विभुः ।
वेगं वापि समुद्रस्य वायुं वा विधमेच्छरैः ॥ २५ ॥
|
ते श्रीमान भगवान राम समुद्रात बुडणार्या पृथ्वीला वर उचलू शकतात, महासागरांच्या मर्यादेचे भेदन करून त्याच्या जलाने समस्त लोकांना आप्लावित करू शकतात तसेच आपल्या बाणांनी समुद्राचा वेग अथवा वायुलाही नष्ट करू शकतात. ॥२४-२५॥
|
संहृत्य वा पुनर्लोकान् विक्रमेण महायशाः ।
शक्तः श्रेष्ठः स पुरुषः स्रष्टुं पुनरपि प्रजाः ॥ २६ ॥
|
ते महायशस्वी पुरुषोत्तम आपल्या पराक्रमाने संपूर्ण लोकांचा संहार करून पुनः नवीन आरंभ करून प्रजेची सृष्टि करण्यास समर्थ आहेत. ॥२६॥
|
न हि रामो दशग्रीव शक्यो जेतुं रणे त्वया ।
रक्षसां वापि लोकेन स्वर्गः पापजनैरिव ॥ २७ ॥
|
दशग्रीव ! ज्याप्रमाणे पापी पुरुष स्वर्गावर अधिकार प्राप्त करू शकत नाही, त्या प्रकारे आपण अथवा समस्त राक्षस-जगत सुद्धा युद्धात श्रीरामांना जिंकू शकत नाही. ॥२७॥
|
न तं वध्यमहं मन्ये सर्वैर्देवासुरैरपि ।
अयं तस्य वधोपायस्तन्ममैकमनाः शृणु ॥ २८ ॥
|
माझ्या समजुतीप्रमाणे संपूर्ण देवता आणि असुर मिळूनही त्यांचा वध करू शकत नाहीत. त्यांच्या वधाचा हा एक उपाय मला सुचला आहे, तो आपण माझ्या मुखाने एकचित्त होऊन ऐकावा. ॥२८॥
|
भार्या तस्योत्तमा लोके सीता नाम सुमध्यमा ।
श्यामा समविभक्ताङ्गी स्त्रीरत्नं रत्नभूषिता ॥ २९ ॥
|
श्रीरामांची पत्नी सीता जगांतील सर्वोत्तम सुंदरी आहे. तिने यौवनाच्या मध्यात पदार्पण केले आहे. तिचे अंग-प्रत्यंग सुंदर आणि सुडौल आहे. ती रत्नमय आभूषणांनी विभूषित राहात असते. सीता संपूर्ण स्त्रियांमध्ये एक रत्न आहे. ॥२९॥
|
नैव देवी न गन्धर्वी नाप्सरा न च पन्नगी ।
तुल्या सीमन्तिनी तस्या मानुषी तु कुतो भवेत् ॥ ३० ॥
|
देवकन्या, गंधर्वकन्या, अप्सरा अथवा नागकन्या कुणीही रूपात तिची बरोबरी करू शकत नाहीत. मग मनुष्य जातीची दुसरी कोणी स्त्री तिच्या समान कशी असू शकेल ? ॥३०॥
|
तस्यापहर भार्यां त्वं तं प्रमथ्य महावने ।
सीतया रहितो रामो न चैव हि भविष्यति ॥ ३१ ॥
|
त्या विशाल वनात जमेल त्या उपायानी आपण श्रीरामांना धोक्यात घालून त्यांच्या पत्नीचे अपहरण करावे. सीतेचा वियोग झाल्यावर श्रीराम कदापि जीवित राहू शकणार नाहीत. ॥३१॥
|
अरोचयत तद्वाक्यं रावणो राक्षसाधिपः ।
चिन्तयित्वा महाबाहुरकम्पनमुवाच ह ॥ ३२ ॥
|
राक्षसराज रावणास अकंपनाची गोष्ट पसंत पडली. त्या महाबाहु दशग्रीवाने थोडा विचार करून अकंपनास म्हटले - ॥३२॥
|
बाढं काल्यं गमिष्यामि ह्येकः सारथिना सह ।
आनयिष्यामि वैदेहीमिमां हृष्टो महापुरीम् ॥ ३३ ॥
|
ठीक आहे. उद्या प्रातःकाळी सारथ्याबरोबर मी एकटाच जाईन आणि वैदेही सीतेला प्रसन्नतापूर्वक या महापुरीत घेऊन येईन. ॥३३॥
|
तदेवमुक्त्वा प्रययौ खरयुक्तेन रावणः ।
रथेनादित्यवर्णेन दिशः सर्वाः प्रकाशयन् ॥ ३४ ॥
|
असे म्हणून रावण गाढवे जुंपलेला सूर्यतुल्य तेजस्वी रथावर आरूढ होऊन संपूर्ण दिशांना प्रकाशित करीत तेथून निघाला. ॥३४॥
|
स रथो राक्षसेन्द्रस्य नक्षत्रपथगो महान् ।
चञ्चूर्यमाणः शुशुभे जलदे चन्द्रमा इव ॥ ३५ ॥
|
नक्षत्रांच्या मार्गावरून विचरत राक्षसराजाचा तो विशाल रथ ढगांच्या आडून प्रकाशित होणार्या चंद्रम्यासारखा शोभत होता. ॥३५॥
|
स दूरे चाश्रमं गत्वा ताटकेयमुपागमत् ।
मारीचेनार्चितो राजा भक्ष्यभोज्यैरमानुषैः ॥ ३६ ॥
|
काही अंतरावर स्थित असलेल्या एका आश्रमात जाऊन तो ताटकापुत्र मारीचास भेटला. मारीचाने अलौकिक भक्ष्य-भोज्य अर्पित करून राजा रावणाचे स्वागत सत्कार केला. ॥३६॥
|
तं स्वयं पूजयित्वा तु आसनेनोदकेन च ।
अर्थोपहितया वाचा मारीचो वाक्यमब्रवीत् ॥ ३७ ॥
|
आसन आणि जल आदिच्या द्वारा स्वयं त्याचे पूजन करून मारीचाने अर्थयुक्त वाणीमध्ये विचारले- ॥३७॥
|
कच्चित् सुकुशलं राजँल्लोकानां राक्षसाधिप ।
आशङ्के नाधिजाने त्वं यतस्तूर्णमुपागतः ॥ ३८ ॥
|
राक्षसराज ! तुमच्या राज्यात लोकांचे कुशल तर आहे ना ? तुम्ही फार उतावळेपणाने येत आहात म्हणून माझ्या मनाला जरा खटकत आहे. मी समजतो आहे की येथील परिस्थिती चांगली नाही आहे. ॥३८॥
|
एवमुक्तो महातेजा मारीचेन स रावणः ।
ततः पश्चादिदं वाक्यमब्रवीद् वाक्यकोविदः ॥ ३९ ॥
|
मारीचाने याप्रकारे विचारल्यावर वाक्यकोविद महातेजस्वी रावणाने या प्रकारे सांगितले - ॥३९॥
|
आरक्षो मे हतस्तात रामेणाक्लिष्टकारिणा ।
जनस्थानमवध्यं तत् सर्वं युधि निपातितम् ॥ ४० ॥
|
तात ! अनायासेच महान पराक्रम दाखविणार्या श्रीरामांनी माझ्या राज्याच्या सीमेचे रक्षक खर-दूषण आदिंना मारून टाकले आहे तसेच जे जनस्थान अवध्य समजले जात होते, तेथील सार्या राक्षसांना त्यांनी युद्धात ठार मारले आहे. ॥४०॥
|
तस्य मे कुरु साचिव्यं तस्य भार्यापहारणे ।
राक्षसेन्द्रवचः श्रुत्वा मारीचो वाक्यमब्रवीत् ॥ ४१ ॥
|
म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी मी त्यांच्या स्त्रीचे अपहरण करू इच्छितो. या कार्यात तुम्ही माझी सहायता करा." राक्षसराज रावणाचे हे वचन ऐकून मारीच म्हणाला- ॥४१॥
|
आख्याता केन वा सीता सा मित्ररूपेण शत्रुणा ।
त्वया राक्षसशार्दूल को न नन्दति नन्दितः ॥ ४२ ॥
|
राक्षस शार्दूल ! मित्राच्या रूपाने तुमचा कोण असा शत्रु आहे ज्याने तुम्हांला सीतेचे हरण करण्याचा सल्ला दिला आहे ? कोण असा पुरुष आहे जो तुमच्या कडून सुख आणि आदर मिळूनही प्रसन्न नाही आहे आणि म्हणून तुमचे वाईट करू इच्छित आहे ? ॥४२॥
|
सीतामिहानयस्वेति को ब्रवीति ब्रवीहि मे ।
रक्षोलोकस्य सर्वस्य कः शृङ्गं छेत्तुमिच्छति ॥ ४३ ॥
|
कोण सांगतो आहे की तुम्ही सीतेचे हरण करून तिला येथे घेऊन या ? मला त्याचे नाव सांगा. हा कोण आहे जो समस्त राक्षस-जगताचे शिंग कापू इच्छित आहे ? ॥४३॥
|
प्रोत्साहयति यश्च त्वां स च शत्रुरसंशयम् ।
आशीविषमुखाद् दंष्ट्रामुद्धुर्तुं चेच्छति त्वया ॥ ४४ ॥
|
जो या कार्यात तुम्हाला प्रोत्साहन देत आहे तो तुमचा शत्रु आहे यात संशय नाही आहे. तो तुमच्या हातांनी विषधर सर्पांच्या मुखातून त्याचे दात उपटू इच्छित आहे. ॥४४॥
|
कर्मणानेन केनासि कापथं प्रतिपादितः ।
सुखसुप्तस्य ते राजन् प्रहृतं केन मूर्धनि ॥ ४५ ॥
|
राजन ! कुणी तुम्हाला असा खोटा सल्ला देऊन कुमार्गावर पोहोचविले आहे ? कुणी सुखपूर्वक झोपलेले असतांना तुमच्या मस्तकावर लाथ मारली आहे ? ॥४५॥
|
विशुद्धवंशाभिजनाग्रहस्त-
तेजोमदः संस्थितदोर्विषाणः ।
उदीक्षितुं रावण नेह युक्तः
स संयुगे राघवगन्धहस्ती ॥ ४६ ॥
|
रावणा ! राघवेन्द्र श्रीराम ते गंधयुक्त गजराज आहेत ज्यांच्या गंध हुंगूनच गजरूपी योद्धे दूर पळून जातात. विशुद्ध कुळात जन्म ग्रहण करणे हा त्या राघवरूपी गजराजाचा शुण्डदण्ड आहे, प्रताप हाच मद आहे आणि सुडौल बाहु हेच दोन दात आहेत. युद्धस्थळी त्यांच्याकडे पहाणे ही तुम्हांला उचित नाही मग झुंजण्याची तर गोष्टच कशाला ? ॥४६॥
|
असौ रणान्तः स्थितिसंधिवालो
विदग्धरक्षोमृगहा नृसिंहः ।
सुप्तस्त्वया बोधयितुं न शक्यः
शराङ्गपूर्णो निशितासिदंष्ट्रः ॥ ४७ ॥
|
ते श्रीराम मनुष्याच्या रूपात एक सिंह आहेत. तो सिंह चतुर राक्षसरूपी मृगांचा वध करणारा आहे. बाणरूपी अङ्गांनी परिपूर्ण आहे तसेच तलवारी ह्याच त्याच्या तीक्ष्ण दाढा आहेत. त्या झोपलेल्या सिंहाला तुम्ही जागे करू शकत नाही. ॥४७॥
|
चापापहारे भुजवेगपङ्के
शरोर्मिमाले सुमहाहवौघे ।
न रामपातालमुखेऽतिघोरे
प्रस्कन्दितुं राक्षसराज युक्तम् ॥ ४८ ॥
|
राक्षसराज ! श्रीराम एक पाताळतलव्यापी महासागर आहे. धनुष्यच त्या समुद्राच्या आत राहाणारा ग्राह आहे. भुजांचा वेग हाच चिखल आहे, बाण ह्याच तरंगमाला आहेत आणि महान युद्धच त्याची अगाध जलराशी आहे. त्याच्या अत्यंत भयंकर मुखात अर्थात वडवानलात उडी घेणे तुमच्यासाठी कदापी उचित नाही आहे. ॥४८॥
|
प्रसीद लङ्केश्वर राक्षसेन्द्र
लङ्कां प्रसन्नो भव साधु गच्छ ।
त्वं स्वेषु दारेषु रमस्व नित्यं
रामः सभार्यो रमतां वनेषु ॥ ४९ ॥
|
लंकेश्वर ! प्रसन्न व्हा ! राक्षसराज सानंद राहा आणि सकुशल लंकेला परत जा. तुम्ही सदा (लंका) पुरीत आपल्या स्त्रियांबरोबर रमण करा आणि राम आपल्या पत्नी बरोबर वनात विहार करोत. ॥४९॥
|
एवमुक्तो दशग्रीवो मारीचेन स रावणः ।
न्यवर्तत पुरीं लङ्कां विवेश च गृहोत्तमम् ॥ ५० ॥
|
मारीचाने असे सांगितल्यावर दशमुख रावण लंकेला परतला आणि आपल्या सुंदर महालात निघून गेला. ॥५०॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे एकत्रिंशः सर्गः ॥ ३१ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकी निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा एकतीसावा सर्ग पूरा झाला. ॥३१॥
|