॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ किष्किन्धाकाण्ड ॥

॥ अष्टमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



संपातीची आत्मकथा -


अथ ते कौतुकाविष्टाः सम्पातिं सर्ववानराः ।
पप्रच्छुर्भगवन् ब्रूहि स्वमुदन्तं त्वमादितः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले-हे पार्वती, (संपातीचे बोलणे ऐकल्यावर) त्या सर्व वानरांना मोठे कुतूहल वाटले आणि ते संपातीला म्हणाले, "हे भगवन, तू पहिल्यापासून तुझा स्वत:चा सर्व वृतांत सांग." (१)

सम्पातिः कथयामास स्ववृत्तान्तं पुरा कथम् ।
अहं पुरा जटायुश्च भ्रातरौ रूढयौवनौ ॥ २ ॥
बलेन दर्पितौ आवां बलजिज्ञासया खगौ ।
सूर्यमण्डलपर्यंतं गन्तुं उत्पतितौ मदात् ॥ ३ ॥
तेव्हा पूर्वी आपण काय केले होते इत्यादी स्वतःचा वृत्तांत संपाती सांगू लागला. "पूर्वीच्या काळी मी आणि जटायू हे आम्ही दोघे भाऊ भर तारुण्यात आलो असताना, स्वतःव्या सामर्थ्यामुळे उन्मत्त झालो होतो. नंतर आपले सामर्थ्य किती आहे हे जाणून घेण्याच्या इच्छेने आम्ही गर्वाने आकाशातून उडत सूर्यबिंबापर्यंत जाण्यासाठी उड्डाण केले. (२-३)

बहुयोजनसाहस्रं गतौ तत्र प्रतापितः ।
जटायुस्तं परित्रातुं पक्षैराच्छाद्य मोहतः ॥ ४ ॥
स्थितोऽहं रश्मिभिर्दग्ध पक्षोऽस्मिन्विन्ध्यमूर्धनि ।
पतितो दूरपतनात् मुर्च्छितोऽहं कपीश्वराः ॥ ५ ॥
अनेक सहस्र योजने आम्ही उड्डाण केले. त्यानंतर जटायू हा सूर्याच्या उष्णतेने होरपळू लागला. त्याचे रक्षण करण्यासाठी दयेने मी त्याला माझ्या पंखांनी झाकून टाकल्यामुळे सूर्याच्या किरणांनी माझे दोन्ही पंख जळून गेले आणि मी विंध्यपर्वताच्या या शिखरावर पडलो. वानरश्रेष्ठांनो, खूप उंचीवरून खाली पडल्यामुळे मी मूर्च्छित झालो. (४-५)

दिनत्रयात्पुनः प्राण-सहितो दग्धपक्षकः ।
देशं वा गिरिकूटान्वा न जाने भ्रान्तमानसः ॥ ६ ॥
पुढे तीन दिवसांनंतर मी शुद्धीवर आलो. परंतु पंख जळून गेल्यामुळे माझे मन भ्रमिष्ट झाले होते आणि त्यामुळे तो देश कोणता आणि आजूबाजूची पर्वतांची शिखरे कोणती हे मला काहीच समजेनासे झाले. (६)

शनैरुन्मील्य नयने दृष्ट्‍वा तत्राश्रमं शुभम् ।
शनैः शनैराश्रमस्य समीपं गतवानहम् ॥ ७ ॥
मी हळूहळू डोळे उघडले. तेव्हा मला एक पवित्र आश्रम दिसला. मी सावकाश त्या आश्रमाजवळ गेलो. (७)

चन्द्रमा नाम मुनिराड् दृष्ट्‍वा मां विस्मितोऽवदत् ।
सम्पाते किमिदं तेऽद्य विरूपं केन वा कृतम् ॥ ८ ॥
तेथे आश्रमात राहाणारे चंद्रमा नावाचे मुनिराज मला पाहून विस्मित झाले आणि म्हणाले, "अरे संपाती, हे काय ? तुझे रूप कुणी बरे विद्रूप केले आहे ? (८)

जानामि त्वामहं पूर्वं अत्यन्तं बलवानसि ।
दग्धौ किमर्थं ते पक्षौ कथ्यतां यदि मन्यसे ॥ ९ ॥
मी तुला पूर्वी ओळखत होतो. तू पूर्वी अत्यंत बलवान होतास. तुझे पंख कशामुळे जळून गेले ? जर तुला योग्य वाटेल तर तू सर्व काही मला सांग." (९)

ततः स्वचेष्टितं सर्वं कथयित्वातिदुःखितः ।
अब्रवं मुनिशार्दूल दह्येऽहं दाववह्निना ॥ १० ॥
तेव्हा मी त्यांना माझे सर्व कृत्य सांगितले आणि अतिशय दुःखी होऊन त्या मुनिश्रेष्ठाला म्हणालो, "मी आता दावाग्नीत शिरून जळून मरतो. (१०)

कथं धारयितुं शक्तो विपक्षो जीवितं प्रभो ।
इत्युक्तोऽथ मुनिर्वीक्ष्य मां दयार्द्रविलोचनः ॥ ११ ॥
कारण हे प्रभो, पंख नसणारा मी कसा बरे माझ्या जीवनाचे रक्षण क रू शकेन ? " मी असे म्हटल्यावर त्या मुनींनी दयार्द्र दृष्टीने माझ्याकडे पाहिले आणि म्हटले. (११)

शृणु वत्स वचो मेऽद्य श्रुत्वा कुरु यथेप्सितम् ।
देहमूलमिदं दुःखं देहः कर्मसमुद्‌भवः ॥ १२ ॥
'वत्सा, आता माझे वचन ऐक आणि मग जशी तुझी इच्छा असेल तसे तू कर. या दुःखाचे मूळ हा देह असून तो कर्मांमुळे उत्पन्न होतो. (१२)

कर्म प्रवर्तते देहे अहंबुद्ध्या पुरुषस्य हि ।
अहङ्‌कारस्त्वनादिः स्यात् अविद्यासम्भवो जडः ॥ १३ ॥
देह म्हणजे मी, अशी बुद्धी झाली की पुरुषाची कर्मे प्रवृत्त होतात. अहंकार हा अनादी व अचेतन असून तो अविद्येपासून निर्माण होतो. (१३)

चिच्छायया सदा युक्तः तप्तायः पिण्डवत्सदा ।
तेन देहस्य तादात्म्यात् देहश्चेतनवान् भवेत् ॥ १४ ॥
अग्नीने तप्त झालेला लोखंडाचा गोळा ज्या प्रमाणे अग्नीसारखे कार्य करतो, त्या प्रमाणे हा अहंकार सदा चिदाभासाने व्याप्त असून, त्याचे देहाशी तादात्म्य झाले की देह हा चैतन्याने युक्त होतो. (१४)

देहोऽहमिति बुद्धिः स्यात् आत्मनोऽहङ्‌कृतेर्बलात् ।
तन्मूल एष संसार सुदुःखादिसाधकः ॥ १५ ॥
त्या अहंकाराच्या सामर्थ्यानेच 'मी देह आहे' अशी बुद्धी आत्म्याला होते. आणि त्या तादात्म्यामुळेच सुखदुःखे देणारा हा जन्ममरणरूप संसार उत्पन्न होतो व तो प्राण्यांना भोगावा लागतो. (१५)

आत्मनो निर्विकारस्य मिथ्या तादात्म्यतः सदा ।
देहोऽहं कर्मकर्ताहं इति सङ्‌कल्प्य सर्वदा ॥ १६ ॥
जिवः करोति कर्माणि तत्फलैर्बद्‍ध्यतेऽवशः ।
ऊर्ध्वाधो भ्रमते नित्यं पापपुण्यात्मकः स्वयम् ॥ १७ ॥
निर्विकल्प असणार्‍या आत्म्याचे देहाशी चुकीने सदा तादात्म्य होत असल्यामुळे, 'मी देह आहे; मी कर्माचा कर्ता आहे' असा संकल्प सदा करीत, जीव हा नाना प्रकारची कर्म करतो आणि मग तो असहाय्यपणाने त्या कर्माच्या फळांनी बद्ध होतो आणि स्वतःच पापपुण्यांना वश होऊन नेहमी उच्च आणि नीच योनींमध्ये फिरत राहातो. (१६-१७)

कृतं मयाधिकं पुण्यं यज्ञदानादि निश्चितम् ।
स्वर्गं गत्वा सुखं भोक्ष्य इति सङ्‌कल्पवान्भवेत् ॥ १८ ॥
'यज्ञ, दान इत्यादी अनेक पुण्य कर्मे केल्यामुळे मी निश्चितपणे स्वर्गात जाऊन सुख भोगीन' असा संकल्प जीव करतो. (१८)

तथैवाध्यासतस्तत्र चिरं भुक्‍त्वा सुखं महत् ।
क्षीणपुण्यः पतत्यर्वाक् अनिच्छन् कर्मचोदितः ॥ १९ ॥
तथापि देह व आत्मा यांच्या तादात्म्याचा तसाच अध्यास राहिल्यामुळे तेथे स्वर्गात पुष्कळ सुख चिरकाळ भोगल्यावर, मग पुण्याचा क्षय होतो; त्यानंतर प्रारब्ध कर्माच्या प्रेरणेने, इच्छा नसतानाही तो जीव खाली पडतो. (१९)

पतित्वा मण्डले च इन्दोः ततो नीहारसंयुतः ।
भूमौ पतित्वा व्रीह्यादौ तत्र स्थित्वा चिरं पुनः ॥ २० ॥
भूत्वा चतुर्विधं भोज्यं पुरुषैर्भुज्यते ततः ।
रेतो भूत्वा पुनस्तेन ऋतौ स्त्रीयोनिसिञ्चितः ॥ २१ ॥
प्रथम तो चंद्र मंडलावर पडतो. त्यानंतर धुक्याने युक्त होऊन तो (चंद्र किरणांच्या द्वारा) पृथ्वीवर पडतो आणि तेथे तो बराच काळ तांदुळ इत्यादी धान्यांमध्ये राहातो. नंतर तो चार प्रकारचे (-भक्ष्य, भोज्य, लेह्य, चोष्य) भोज्य पदार्थ होऊन अन्नाच्या रूपात पुरुषांकडून खाला जातो; आणि रेताच्या रूपात परिणत होतो. त्यानंतर पुरुषाकडून ऋतुकाळी स्त्रीच्या योनीत घातला जातो. (२०-२१)

योनिरक्तेन संयुक्तं जरायु-परिवेष्टितम् ।
दिनेनैकेन कललं भूत्वा रूढत्वमाप्नुयात् ॥ २२ ॥
तत्पुनः पञ्चरात्रेण बुद्‌बुदाकारतामियात् ।
सप्तरात्रेण तदपि मांसपेशित्वमाप्नुयात् ॥ २३ ॥
पक्षमात्रेण सा पेशी रुधिरेण परिप्लुता ।
तस्या एवाङ्‌कुरोत्पत्तिः पञ्चविंशतिरात्रिषु ॥ २४ ॥
ग्रीवा शिरश्च स्कन्धश्च पृष्ठवंशस्तथोदरम् ।
पञ्चधाङ्‌गानि चैकैकं जायन्ते मासतः क्रमात् ॥ २५ ॥
पाणिपादौ तथा पार्श्वः कटिर्जानु तथैव च ।
मासद्वयार्प्रजायन्ते क्रमेणैव न चान्यथा ॥ २६ ॥
त्रिभिर्मासैः प्रजायन्ते अङ्‌गानां सन्धयः क्रमात् ।
सर्वाङ्‌गुल्यः प्रजायन्ते क्रमान् मासचतुष्टये ॥ २७ ॥
मग ते रेत स्त्रीच्या योनीतील रक्ताशी संयुक्त होते. ते पहिल्याच दिवशी गर्भवेष्टणाने वेढले जाऊन कल (रक्त व रेत यांचे मिश्रण) होते आणि मग ते अधिक घट्ट होते. त्यानंतर पुनः पाच रात्रीत ते बुडबुड्याच्या आकाराचे होते. मग सात रात्री संपल्यावर तेही मांसपेशी बनते. पंधरा दिवसांत ती पेशी रक्ताने भरून जाते. पंचवीस दिवसांनी त्या पेशीपासूनच अंकुराची उत्पत्ती होते. एक महिन्यात एकेक करून क्रमाने मान, डोके, खांदे, पाठीचा कणा आणि पोट हे पाच प्रकारचे अवयव निर्माण होतात. तसेच दोन महिन्यांत क्रमानेच हात, पाय, बरगड्या, कंबर आणि गुडघे उत्पन्न होतात. हे सर्व क्रमाने होते, अन्य प्रकाराने नाही. तीन महिन्यांनी क्रमाने अंगांचे सांधे निर्माण होतात. चौथ्या महिन्यात क्रमाने सर्व बोटे निर्माण होतात. (२२-२७)

नासा कर्णौ च नेत्रे च जायन्ते पञ्चमासतः ।
दन्तपङ्‌क्तिर्नखा गुह्यं पञ्चमे जायते तथा ॥ २८ ॥
पाचव्या महिन्यात नाक, दोन कान आणि दोन डोळे उद्‌भूत होतात. तसेच या पाचव्या महिन्यातच दंतपंक्ती, नखे, आणि गुह्य स्थान उत्पन्न होतात. (२८)

अर्वाक् षण्मासतश्छिद्रं कर्णयोर्भवति स्फुटम् ।
पायुर्मेढ्रमुपस्थं च नाभिश्चापि भवेन्नृणाम् ॥ २९ ॥
सहाव्या महिन्याच्या प्रारंभी त्या गर्भाच्या दोन्ही कानांची भोके स्पष्टपणे दिसू लागतात. याच सहाव्या महिन्यात गुदा तसेच स्त्री व पुरुष या भेदांनुसार योनी, किंवा लिंग आणि बेंबी हे उत्पन्न होतात. (२९)

सप्तमे मासि रोमाणि शिरः केशास्तथैव च ।
विभक्तावयवत्वं च सर्वं सम्पद्यतेऽष्टमे ॥ ३० ॥
सातव्या महिन्यात अंगावरील बारीक लव आणि डोक्यावरील केस निर्माण होतात. मग आठव्या महिन्यात सर्वच अवयव स्पष्ट आणि विभक्त असे होतात. (३०)

जठरे वर्धते गर्भः स्त्रीया एवं विहङ्‌गम ।
पञ्चमे मासि चैतन्यं जीवः प्राप्नोति सर्वशः ॥ ३१ ॥
हे शुभ्र पक्ष्या, या प्रमाणे स्त्रीच्या उदरात गर्भ वाढत जातो. पाचव्या महिन्यात जीवाला संपूर्णपणे चेतनशक्ती प्राप्त होते. (३१)

नाभिसुत्राल्परन्ध्रेण मातृभुक्तान्नसारतः ।
वर्धते गर्भतः पिण्डो न म्रियेत स्वकर्मतः ॥ ३२ ॥
बेंबीत असणार्‍या नाळेच्या सूक्ष्म छिद्रातून येणार्‍या, आईने खालेल्या अन्नाच्या सारामुळे गर्भातील पिंड वाढत राहातो. स्वतःव्या कर्मामुळे तो मरत नाही. (३२)

स्मृत्वा सर्वाणि जन्मानि पूर्वकर्माणि सर्वशः ।
जठरानलतप्तोऽयं इदं वचनमब्रवीत् ॥ ३३ ॥
गर्भात असताना त्याला आपले पूर्वीचे सर्व जन्म आणि पूर्वीची सर्व कर्मे आठवतात. आईच्या जठराग्नीने तापलेला तो जीव असे म्हणू लागतो. (३३)

नानायोनिसहस्रेषु जायमानोऽनुभूतवान् ।
पुत्रदारादिसम्बन्धं कोटिशः पशुबान्धवान् ॥ ३४ ॥
'आजपर्यंत नाना प्रकारच्या हजारो योनींमध्ये जन्म घेऊन मी कोट्यवधी पुत्र, पत्‍नी इत्यादींचे संबंध त्याचप्रमाणे पशू व बांधव यांचा अनुभव घेतला आहे. (३४)

कुटुम्बभरणासक्‍त्या न्यायान्यायैर्धनार्जनम् ।
कृतं नाकरवं विष्णु चिन्तां स्वप्नेऽपि दुर्भगः ॥ ३५ ॥
कुटुंबाचे पोषण करण्याच्या आसक्तीने मी न्याय्य मार्गाने अथवा अन्याय्य मार्गाने धनार्जन केले. परंतु दुर्भाग्यामुळे मी स्वप्नातसुद्धा विष्णूचे चिंतन केले नाही. (३५)

इदानीं तत्फलं भुञ्जे गर्भदुःखं महत्तरम् ।
अशाश्वते शाश्वतवद् देहे तृष्णासमन्वितः ॥ ३६ ॥
म्हणून आता त्याचे फळ म्हणून गर्भवासातील फार मोठे दुःख मी भोगीत आहे. आणि नश्वर देहाला शाश्वताप्रमाणे मानून त्याच्या तृष्णेने युक्त होऊन मी बसलो आहे. (३६)

अकार्याण्येव कृतवान् न कृतं हितमात्मनः ।
इत्येवं बहुधा दुःखं अनुभूय स्वकर्मतः ॥ ३७ ॥
पूर्वी करू नयेत ती कुकर्मे मी केली, पण स्वतःचे कोणतेही हित मात्र केले नाही आणि याच कारणाने मी स्वतःच्या कर्मांनीच नाना प्रकारचे दुःख भोगत आलो आहे. (३७)

कदा निष्क्रमणं मे स्यात् गर्भान्निरयसन्निभात् ।
इत ऊर्ध्वं नित्यमहं विष्णुमेवानुपूजये ॥ ३८ ॥
आता या नरकसदृश अशा गर्भातून मी केव्हा बरे बाहेर पडेन, हे मला माहीत नाही. यानंतर मात्र मी नित्य विष्णूचीच उपासना करीन. ' (३८)

इत्यादि चिन्तयन् जीवो योनियन्त्रप्रपीडितः ।
जायमानोऽतिदुःखेन नरकात्पातकी यथा ॥ ३९ ॥
इत्यादी विचार करणारा तो जीव योनीच्या चिमट्याने पीडित होऊन, ज्याप्रमाणे नरकातून पातकी माणूस बाहेर पडतो त्याप्रमाणे तो अतिशय कष्टाने योनीतून बाहेर पडून जन्माला येतो. (३९)

पूतिव्रणान्निपतितः कृमिरेष इवापरः ।
ततो बाल्यादिदुःखानि सर्व एवं विभुञ्जते ॥ ४० ॥
पुवाने भरलेल्या व्रणातून एखादा कृमी बाहेर पडावा, त्या प्रमाणे तो योनीतून बाहेर पडतो. त्यानंतर बालपण इत्यादी अवस्थांतील सर्वच दुःखे तो भोगतो. सर्व प्राण्यांन ही सर्व दुःखे भोगावी लागतातच. (४०)

त्वया चैवानुभूतानि सर्वत्र विदितानि च ।
न वर्णितानि मे गृध्र यौवनादिषु सर्वतः ॥ ४१ ॥
हे गिधाडा, त्यानंतर तारुण्य इत्यादी अवस्थांतील सर्व दुःखे तू अनुभवली आहेसच आणि ती सर्वांना विदित आहेतच. म्हणून मी त्यांचे वर्णन केलेले नाही. (४१)

एवं देहोऽहस्मित्यस्माद् अभ्यासान्निरयादिकम् ।
गर्भवासादिदुःखानि भवन्त्यभिनिवेशतः । ॥ ४२ ॥
अशा प्रकारे 'मी देह आहे' या खोट्या कल्पनेने येणार्‍या देहाभिमानाच्या अभिनिवेशामुळे नरक इत्यादीतील दुःखे आणि गर्भवास इत्यादी दुःखे जीवाला भोगावी लागतात. (४२)

तस्माद्देहद्वयादन्यं आत्मानं प्रकृतेः परम् ।
ज्ञात्वा देहादिममतां त्यक्‍त्वात्मज्ञानवान् भवेत् ॥ ४३ ॥
म्हणून आत्मा हा स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहांपेक्षा भिन्न आहे आणि तो प्रकृतीच्या पलीकडे आहे हे जाणून, देह इत्यादींवरील ममता टाकून देऊन, माणसाने आत्मज्ञानाने संपन्न व्हावयास हवे. (४३)

जाग्रदादिविनिर्मुक्तं सत्यज्ञानादिलक्षणम् ।
शुद्धं बुद्धं सदा शान्तं आत्मानं अवधारयेत् ॥ ४४ ॥
आत्मा हा जागृती इत्यादी अवस्थांनी रहित, सत्य आणि ज्ञान हे स्वरूप असणारा, शुद्ध बुद्ध आणि सदा शांत आहे, असे जाणावे. (४४)

चिदात्मनि परिज्ञाते नष्टे मोहेऽज्ञसम्भवे ।
देहः पततु वारब्ध कर्मवेगेन तिष्ठतु ॥ ४५ ॥
योगिनो न हि दुःखं वा सुखं वाज्ञानसम्भवम् ।
तस्माद्देहेन सहितो यावत् प्रारब्धसङ्‌क्षयः ॥ ४६ ॥
तावत्तिष्ठ सुखेन त्वं धूतकञ्चुक सर्पवत् ।
अन्यद्वक्ष्यामि ते पक्षिन् शृणु मे परमं हितम् ॥ ४७ ॥
चेतनस्वरूप आत्म्याला जाणल्यावर आणि अज्ञानापासून उत्पन्न होणारा मोह नष्ट झाल्यावर, मग प्रारब्ध कर्मांच्या सामर्थ्याने हा देह पडो अथवा राहो, योगी पुरुषाला अज्ञानापासून निर्माण होणारे कोणतेही सुख किंवा दुःख यांची बाधा होत नाही. म्हणून जोपर्यंत तुझ्या प्रारब्धकर्मांचा नाश होत नाही, तोपर्यंत तू कात सांभाळणार्‍या सापाप्रमाणे, तुझा देह सांभाळीत सुखाने राहा. हे गृध्र पक्ष्या, तुला अतिशय हितकारक असणारी आणखी एक गोष्ट मी सांगतो, ती ऐक. (४५-४७)

त्रेतायुगे दाशरथि भूत्वा नारायणोऽव्ययः ।
रावणस्य वधार्थाय दण्डकान् आगमिष्यति ॥ ४८ ॥
सीतया भार्यया सार्धं लक्ष्मणेन समन्वितः ।
तत्राशमे जनकजां भ्रातृभ्यां रहिते वने ॥ ४९ ॥
रावणश्चोरवन्नित्वा लङ्‌कायां स्थापयिष्यति ।
तस्याः सुग्रीवनिर्देशात् वानराः परिमार्गणे ॥ ५० ॥
आगमिष्यन्ति जलधेः तीरं तत्र समागमः ।
त्वया तैः कारणवशाद् भविष्यति न संशयः ॥ ५१ ॥
त्रेतायुगात राजा दशरथांचे पुत्र राम बनून, अव्यय असे नारायण रावणाच्या वधासाठी दंडकारण्यात येतील. ते श्रीराम आपली पत्‍नी सीता व भाऊ लक्ष्मण यांच्यासह असतील. तेथे ते दोघे भाऊ हजर नसताना वनातील आश्रमामधून रावण एकाद्या चोराप्रमाणे सीतेला पळवून नेऊन लंकेमध्ये ठेवील. त्यानंतर सुग्रीवाच्या आज्ञेने त्या सीतेचा शोध करण्यासाठी काही वानर समुद्राच्या तीरावर येतील. तेथे काही निमित्ताने त्यांच्याबरोबर तुझी भेट होईल, यात संशय नाही. (४८-५१)

तदा सीतास्थितिं तेभ्यः कथयस्व यथार्थतः ।
तदैव तव पक्षौ द्वौ उत्पत्स्येते पुनर्नवौ ॥ ५२ ॥
त्या वेळी तू त्यांना सीतेचा पत्ता बरोबर सांग. त्याच वेळी तुला दोन नवीन पंख फुटतील." (५२)

बोधमायास मां चन्द्र-नामा मुनिकुलेश्वरः ।
पश्यन्तु पक्षौ मे जातौ नूतनौ अतिकोमलौ ॥ ५३ ॥
संपाती म्हणाला - हे वानरांनो, अशा प्रकारे त्या चंद्र नावाच्या मुनिकुळातील श्रेष्ठांनी मला उपदेश केला. (त्या वेळेपासून मी शांत होऊन तुमची वाट पाहात राहिलो.) बघा, आता मला हे दोन नवीन आणि अतिशय कोमल असे पंख फुटले आहेत. (५३)

स्वस्ति वोऽस्तु गमिष्यामि सीतां द्रक्ष्यथ निश्चयम् ।
यत्‍नं कुरुध्वं दुर्लङ्‌घ्य समुद्रस्य विलङ्‌घने ॥ ५४ ॥
तुमचे कल्याण होवो. मी आता जातो. तुम्हांला सीता निश्चितपणे सापडेल यात शंका नाही. तेव्हा आता ओलांडण्यास कठीण अशा समुद्राचे उल्लंघन करण्यासाठी प्रयत्‍न करा. (५४)

यन्नामस्मृतिमात्रतोऽपरिमितं
    संसारवारानिधिं
तीर्त्वा गच्छति दुर्जनोऽपि परमं
    विष्णो पदं शाश्वतम् ।
तस्यैव स्थितिकारिणस्त्रीजगतां
    रामस्य भक्ताः प्रिया
यूयं किं न समुद्रमात्रतरणे
    शक्ताः कथं वानराः ॥ ५५ ॥
अ रे वानरांनो. ज्यांच्या केवळ स्मरणाने दुर्जन माणूससुद्धा अपरंपार असा संसाररूपी सागर तरून जाऊन विष्णूंचे परम व शाश्वत असे पद प्राप्त करून घेतो, त्याच तिन्ही लोकांचे पालन करणार्‍या, श्रीरामांचे तुम्ही प्रिय भक्त आहात. तेव्हा हा क्षुल्लक समुद्र तरून जाण्यात तुम्ही का व कसे बरे समर्थ होणार नाही ?" (५५)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
किष्किन्धाकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥
इति श्रीमद् अध्यात्ममायणे उमामहेश्वरसंवादे किष्किंधाकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥


GO TOP