रावणेन सीताया अपहरणम् -
|
रावणाद्वारा सीतेचे अपहरण -
|
सा तु ताराधिपमुखी रावणेन समीक्ष्य तम् ।
गृध्रराजं विनिहतं विललाप सुदुःखिता ॥ १ ॥
|
रावणद्वारा मारल्या गेलेल्या गृध्रराजाकडे पाहून चंद्रमुखी सीता अत्यंत दुःखी होऊन विलाप करू लागली - ॥१॥
|
निमित्तं लक्षणं स्वप्नं शकुनिस्वरदर्शनम् ।
अवश्यं सुखदुःखेषु नराणां प्ररिदृश्यते ॥ २ ॥
|
मनुष्यांना सुख-दुःखाच्या प्राप्तीची सूचक लक्षणे, स्वप्ने, पक्ष्यांचे स्वर तसेच त्यांची डावी- उजवीकडे दर्शने आदि शुभाशुभ निमित्ते अवश्य दिसून येत असतात. ॥२॥
|
न नूनं राम न जानासि महद्व्यसनमात्मनः ।
धावन्ति नूनं काकुत्स्थ मदर्थं मृगपक्षिणः ॥ ३ ॥
|
काकुत्स्थ श्रीरामा ! माझ्या अपहरणाची सूचना देण्यासाठी निश्चितच हे मृग आणि पक्षी अशुभसूचक मार्गाने धावत आहेत, परंतु त्यांच्या द्वारा सूचित होऊनही आपल्या या महान् संकटास निश्चितच आपण जाणत नाही आहात. ॥३॥
|
अयं हि कृपया राम मां त्रातुमिह संगतः ।
शेते विनिहतो भूमौ ममाभाग्याद् विहंगमः ॥ ४ ॥
|
हा राम ! माझे कसे अभाग्य आहे की जे कृपा करून मला वाचविण्यासाठी येथे आले होते ते पक्षीप्रवर जटायु निशाचरद्वारा मारले जाऊन पृथ्वीवर पडले आहेत. ॥४॥
|
त्राहि मामद्य काकुत्स्थ लक्ष्मणेति वराङ्गना ।
सुसन्त्रस्ता समाक्रन्दच्छृण्वतां तु यथान्तिके ॥ ५ ॥
|
हे रामा ! हे लक्ष्मण ! आता आपणच दोघे माझे रक्षण करा असे म्हणून अत्यंत घाबरलेली सुंदरी सीता या प्रकारे क्रंदन करू लागली की जे निकटवर्ती देवता अथवा मनुष्य ऐकू शकतील. ॥५॥
|
तां क्लिष्टमाल्याभरणां विलपन्तीमनाथवत् ।
अभ्यधावत वैदेहीं रावणो राक्षसाधिपः ॥ ६ ॥
|
तिचे पुष्पाहार आणि आभूषणे कुस्करली गेल्याने छिन्नभिन्न होऊन गेली होती. ती अनाथाप्रमाणे विलाप करीत होती. त्या अवस्थेतच राक्षसराज रावण त्या वैदेही सीतेकडे धावला. ॥६॥
|
तां लतामिव वेष्टन्तीमालिङ्गन्तीं महाद्रुमान् ।
मुञ्च मुञ्चेति बहुशः प्राप तां राक्षसाधिपः ॥ ७ ॥
|
ती वृक्षाला आलिंगन देणार्या लतेप्रमाणे मोठमोठ्या वृक्षांना आलिंगन देऊन वारंवार म्हणत होती - मला या संकटातून सोडवा. इतक्यातच तो निशाचर तिच्याजवळ जाऊन पोहोंचला. ॥७॥
|
क्रोशन्तीं राम रामेति रामेण रहितां वने ।
जीवितान्ताय केशेषु जग्राहान्तकसंनिभः ॥ ८ ॥
प्रधर्षितायां वैदेह्यां बभूव सचराचरम् ।
जगत् सर्वममर्यादं तमसान्धेन संवृतम् ॥ ९ ॥
|
वनात श्रीराम विरहित होऊन सीतेला राम, राम असा आक्रोश करतांना पाहून त्या काळासमान विक्राळ राक्षसाने आपल्याच विनाशासाठी तिचे केस पकडले. सीतेचा या प्रकारे तिरस्कार झाल्याने समस्त चराचर जगत मर्यादारहित तसेच अंधःकाराने आच्छन्न झाल्यासारखे होऊन गेले. ॥८-९॥
|
न वाति मारुतस्तत्र निष्प्रभोभूद् दिवाकरः ।
दृष्ट्वा सीतां परामृष्टां दीनां दिव्येन चक्षुषा ॥ १० ॥
कृतं कार्यमिति श्रीमान् व्याजहार पितामहः ।
|
तेथे वायुची गति थांबून गेली तसेच सूर्याची प्रभाही फिकी पडली. श्रीमान् पितामह ब्रह्मदेव दिव्य दृष्टीने वैदेही सीतेचा तो राक्षसाच्या द्वारे झालेला केशाकर्षणरूप अपमान पाहून म्हणाले - बस, आता कार्य सिद्ध झाले आहे ॥१० १/२॥
|
प्रहृष्टा व्यथिताश्चासन् सर्वे ते परमर्षयः । ॥ ११ ॥
दृष्ट्वा सीतां परामृष्टां दण्डकारण्यवासिनः ।
रावणस्य विनाशं च प्राप्तं बुध्वा यदृच्छया ॥ १२ ॥
|
सीतेचे केस ओढले गेलेले पाहून दण्डकारण्यात निवास करणारे ते सर्व महर्षि मनातल्या मनात व्यथित होऊन गेले. त्याच बरोबर अकस्मात् रावणाचा विनाश जवळ आला आहे हे जाणून त्यांना फार हर्ष झाला. ॥११-१२॥
|
स तु तां राम रामेति रुदतीं लक्ष्मणेति च ।
जगामादाय चाकाशं रावणो राक्षसेश्वरः ॥ १३ ॥
|
बिचारी सीता हा राम ! हा राम ! असे म्हणत रडत होती. लक्ष्मणासही हाका मारीत होती. त्याच अवस्थेत राक्षसांचा राजा रावण तिला घेऊन आकाशमार्गाने जाऊ लागला. ॥१३॥
|
तप्ताभरणवर्णाङ्गी पीतकौशेयवासिनी ।
रराज राजपुत्री तु विद्युत्सौदामिनी यथा ॥ १४ ॥
|
तापविलेल्या सोन्याच्या आभूषणांनी तिचे सारे अङ्ग विभूषित होते. तिने पिवळ्या रंगाची रेशमी साडी नेसलेली होती. म्हणून त्यावेळी राजकुमारी सीता सुदाम पर्वतापासून प्रकट झालेल्या वीजेप्रमाणे प्रकाशित होत होती. ॥१४॥
|
उद्धूतेन च वस्त्रेण तस्याः पीतेन रावणः ।
अधिकं प्ररिबभ्राज गिरिर्दीप्त इवाग्नीना ॥ १५ ॥
|
तिच्या फडफडणार्या पिवळ्या वस्त्रामुळे उपलक्षित रावण दावानलाने उद्भासित होणार्या पर्वतासमान अधिक शोभून दिसू लागला. ॥१५॥
|
तस्याः परमकल्याण्यास्ताम्राणि सुरभीणि च ।
पद्मपत्राणि वैदेह्या अभ्यकीर्यन्त रावणम् ॥ १६ ॥
|
त्या परम कल्याणी वैदेहीच्या अंङ्गावर जी कमलपुष्पे होती, त्यांच्या किंचित अरूण आणि सुगंधित पाकळ्या विखरून विखरून रावणावर पडू लागल्या. ॥१६॥
|
तस्याः कौशेयमुद्धूतमाकाशे कनकप्रभम् ।
बभौ चादित्यरागेण ताम्रमभ्रमिवातपे ॥ १७ ॥
|
आकाशात उडणारे तिचे सुवर्णसमान कान्तिमान रेशमी पीत वस्त्र संध्याकाळच्या वेळी सूर्य किरणांनी रंगलेल्या ताम्रवर्णाच्या मेघखण्डाप्रमाणे शोभायमान भासत होते. ॥१७॥
|
तस्यास्तद् विमलं वक्रमाकाशे रावणाङ्कगम् ।
न रराज विना रामं विनालमिव पङ्कजम् ॥ १८ ॥
|
आकाशात रावणाच्या अंगावर स्थित सीतेचे निर्मल मुख श्रीरामाविना नालरहित कमलाप्रमाणे शोभून दिसत नव्हते. ॥१८॥
|
बभूव जलदं नीलं भित्त्वा चन्द्र इवोदितः ।
सुललाटं सुकेशान्तं पद्मगर्भाभमव्रणम् ॥ १९ ॥
शुक्लैः सुविमलैर्दन्तैः प्रभावद्भिरलङ्कृतम् ।
तस्याः सुनयनं वक्रमाकाशे रावणाङ्कगम् ॥ २० ॥
|
सुंदर ललाट आणि मनोहर केसानी युक्त, कमलाच्या आतील भागासमान कान्तिमान्, देवी आदिच्या डागांविरहित (अव्रण), श्वेत, निर्मल आणि कान्तिमान् दातांनी अलंकृत तसेच सुंदर नेत्रांनी सुशोभित, सीतेच मुख आकाशात रावणाच्या अङ्गावर जणु मेघांच्या काळ्या घटेला भेदन करीत उदय पावणार्या चंद्रम्याप्रमाणे भासत होते. ॥१९-२०॥
|
रुदितं व्यपमृष्टास्त्रं चन्द्रवत्प्रियदर्शनम् ।
सुनासं चारुताम्रोष्ठमाकाशे हाटकप्रभम् ॥ २१ ॥
राक्षसेन्द्रसमाधूतं तस्यास्तद् वदनं शुभम् ।
शुशुभे न विना रामं दिवा चन्द्र इवोदितः ॥ २२ ॥
|
चंद्रम्याप्रमाणे प्रिय दिसणारे सीतेचे ते सुंदर मुख नुकतेच रडल्यासारखे झाले होते. तिचे अश्रु पुसले गेले होते. तिची नासिका सुंदर होती. तांब्याप्रमाणे लाल लाल मनोहर ओठ होते. आकाशात ते (मुख) आपली सोनेरी प्रभा पसरवीत होते तसेच राक्षसराजाच्या वेगपूर्वक जाण्यामुळे त्याच्यात कंपन होत होते. याप्रकारे ते मनोहर मुखही श्रीरामांच्या विना त्या समयी दिवसा उगविलेल्या चंद्रम्याप्रमाणे शोभाहीन प्रतीत होत होते. ॥२१-२२॥
|
सा हेमवर्णा नीलाङ्गं मैथिली राक्षसाधिपम् ।
शुशुभे काञ्चनी काञ्ची नीलं गजमिवाश्रिता ॥ २३ ॥
|
मैथिली सीतेचे श्रीअङ्ग सुवर्णसमान दीप्तिमान् होते आणि राक्षसराज रावणाचे शरीर एकदम काळे होते. त्याच्या अङ्गावर सीता जणु काळ्या हत्तीला सोन्याची करधनी घातली गेली असावी तशी भासत होती. ॥२३॥
|
सा पद्मपीता हेमाभा रावणं जनकात्मजा ।
विद्युद् घनमिवाविश्य शुशुभे तप्तभूषणा ॥ २४ ॥
|
कमलाच्या केसराप्रमाणे पीत आणि सोनेरी कांति असणारी जनककुमारी सीता तप्त केलेल्या सोन्याची आभूषणे धारण केलेली रावणाच्या पाठीवर, जणु मेघमालेचा आश्रय घेऊन वीज चमकत असावी तशी शोभत होती. ॥२४॥
|
तस्या भूषणघोषेण वैदेह्या राक्षसेश्वरः ।
बभूव विमलो नीलः सघोष इव तोयदः ॥ २५ ॥
|
वैदेहीच्या आभूषणांच्या झणत्कारामुळे राक्षसराज रावण गर्जना करीत असणार्या निर्मल नील मेघाप्रमाणे प्रतीत होत होता. ॥२५॥
|
उत्तमाङ्गच्युता तस्याः पुष्पवृष्टिः समन्ततः ।
सीताया ह्रियमाणायाः पपात धरणीतले ॥ २६ ॥
|
हरण करून नेल्या जाणार्या सीतेच्या मस्तकावरून तिच्या केसात गुंफलेली फुले विखरून जाऊन सर्व बाजूने पृथ्वीवर पडत होती. ॥२६॥
|
सा तु रावणवेगेन पुष्पवृष्टिः समन्ततः ।
समाधूता दशग्रीवं पुनरेवाभ्यवर्तत ॥ २७ ॥
|
चारी बाजूनी होणारी ती फुलांची वृष्टी रावणाच्या वेगामुळे उत्पन्न झालेल्या वायुच्या द्वारा प्रेरित होऊन परत त्या दशाननावरच येऊन पडत होती. ॥२७॥
|
अभ्यवर्तत पुष्पाणां धारा वैश्रवणानुजम् ।
नक्षत्रमाला विमला मेरुं नगमिवोन्नतम् ॥ २८ ॥
|
कुबेराचा लहान भाऊ रावण याच्यावर जेव्हा ती फुलांची धारा पडत होती तेव्हा त्या समयी ती मेरूपर्वतावर उतरणार्या निर्मल नक्षत्रमाले प्रमाणे शोभा प्राप्त करीत होती. ॥२८॥
|
चरणान्नूपुरं भ्रष्टं वैदेह्या रत्न्भूषितम् ।
विद्युन्मण्डलसङ्काशं पपात धरणीतले ॥ २९ ॥
|
वैदेहीचा रत्नजडित नूपुर तिच्या एक पायातून गळून विद्युतमण्डला प्रमाणे पृथ्वीवर पडला. ॥२९॥
|
तरुप्रवालरक्ता सा नीलाङ्गं राक्षसेश्वरम् ।
प्रशोभयत वैदेही गजं कक्ष्येव काञ्चनी ॥ ३० ॥
|
वृक्षाच्या नूतन पल्लवांप्रमाणे किंचित अरूण वर्णाची सीता त्या काळ्याकुट्ट राक्षसराजाला, हत्तीला कसून बांधलेली सोनेरी दोरखंड त्याची शोभा वाढवितो त्याप्रमाणे सुशोभित करीत होती. ॥३०॥
|
तां महोल्कामिवाकाशे दीप्यमानां स्वतेजसा ।
जहाराकाशमाविश्य सीतां वैश्रवणानुजः ॥ ३१ ॥
|
आकाशात आपल्या तेजाने फार मोठ्या उल्केसमान प्रकाशित होणार्या सीतेला रावण आकाशमार्गाचाच आश्रय करून हरून घेऊन गेला. ॥३१॥
|
तस्यास्तान्यग्निवर्णानि भूषणानि महीतले ।
सघोषाण्यवशीर्यन्त क्षीणास्तारा इवाम्बरात् ॥ ३२ ॥
|
जानकीच्या शरीरावर अग्निसमान प्रकाशमान् आभूषणे होती. ती त्या समयी खणखण आवाज करीत एक एक करून पडू लागली, जणु आकाशातून तारेच तुटून तुटून पृथ्वीवर पडत होते. ॥३२॥
|
तस्याः स्तनान्तराद् भ्रष्टो हारस्ताराधिपद्युतिः ।
वैहेह्या निपतन् भाति गङ्गेव गगनच्युता ॥ ३३ ॥
|
त्या वैदेही सीतेच्या वक्षःस्थळाच्या मधून गळून पडणारा चंद्रम्याप्रमाणे उज्वल हार गगनमण्डलातून उतरणार्या गङ्गेप्रमाणे प्रतीत झाला. ॥३३॥
|
उत्पातवाताभिरता नानाद्विजगणायुताः ।
मा भैरिति विधूताग्रा व्याजह्रुरिव पादपाः ॥ ३४ ॥
|
रावणाच्या वेगामुळे उत्पन्न झालेल्या उत्पातसूचक वायुच्या झुळुकांनी हलणार्या वृक्षांवर नाना प्रकारचे पक्षी कोलाहल करीत होते. त्यांना पाहून जणु ते वृक्ष आपली मस्तके हलवून हलवून तू घाबरू नकोस असे संकेत करीत सीतेला सांगत आहेत की काय असे वाटत होते. ॥३४॥
|
नलिन्यो ध्वस्तकमलास्त्रस्तमीनजलेचराः ।
सखीमिव गतोत्साहां शोचन्तीव स्म मैथिलीम् ॥ ३५ ॥
|
ज्यांच्यातील कमळे सुकून गेली आहेत आणि मत्स्य आदि जलचर जीव घाबरून गेले आहेत अशा पुष्करिणी उत्साहहीन झालेल्या मैथिली सीतेला जणु आपली सखी मानून तिच्यासाठी शोक करीत होत्या. ॥३५॥
|
समन्तादभिसम्पत्य सिंहव्याघ्रमृगद्विजाः ।
अन्वधावंस्तदा रोषात् सीताच्छायानुगामिनः ॥ ३६ ॥
|
त्या सीताहरणाच्या समयी रावणावर रोष करीत असल्याप्रमाणे सिंह, व्याघ्र, मृग आणि पक्षी सर्व बाजूनी सीतेच्या पडछायेचे अनुसरण करीत धावत सुटले होते. ॥३६॥
|
जलप्रपातास्रमुखाः शृङ्गैरुच्छ्रितबाहुभिः ।
सीतायां ह्रियमाणायां विक्रोशन्तीव पर्वताः ॥ ३७ ॥
|
जेव्हा सीतेचे हरण होऊ लागले तेव्हा तेथील पर्वत झर्यांच्या रूपाने अश्रु ढाळीत, उंच शिखरांच्या रूपात आपल्या भुजा वर उचलून जणु जोरजोराने चीत्कार करीत होते. ॥३७॥
|
ह्रियमाणां तु वैदेहीं दृष्ट्वा दीनो दिवाकरः ।
प्रतिध्वस्तप्रभः श्रीमानासीत् पाण्डरमण्डलः ॥ ३८ ॥
|
सीतेचे हरण होतांना पाहून श्रीमान् सूर्यदेव दुःखी झाले. त्यांची प्रभा नष्ट झाल्याप्रमाणे झाली तसेच त्यांचे मुखमण्डल पिवळे पडले. ॥३८॥
|
नास्ति धर्मः कुतः सत्यं नार्जवं नानृशंसता ।
यत्र रामस्य वैदेहीं सीतां हरति रावणः ॥ ३९ ॥
इति भूतानि सर्वाणि गणशः पर्यदेवयन् ।
वित्रस्तका दीनमुखा रुरुदुर्मृगपोतकाः ॥ ४० ॥
|
हाय ! हाय ! जेव्हा श्रीरामांची धर्मपत्नी वैदेहीला रावण हरण करून नेऊ लागला तेव्हा असेच म्हणणे भाग पडत आहे की संसारात धर्म नाही आहे, सत्य तरी कोठे आहे ? सरलता आणि दयेचाही सर्वथा लोप झाला आहे. याप्रकारे तेथे झुंडीच्या झुंडी एकत्र येऊन सर्व प्राणी विलाप करीत होते. मृगांची पाडसे भयभीत होऊन दीन मुखाने रडत होती. ॥३९-४०॥
|
उद्वीक्ष्योद्वीक्ष्य नयनैर्भयादिव विलक्षणैः ।
सुप्रवेपितगात्राश्च बभूवुर्वनदेवताः ॥ ४१ ॥
विक्रोशन्तीं दृढं सीतां दृष्ट्वा दुःखं तथा गताम् ।
|
श्रीरामांना जोरजोराने हाका मारणार्या आणि अत्यंत दुःखात पडलेल्या सीतेला आपल्या विलक्षण डोळ्यांनी वारंवार पाहून भयामुळे वनदेवतांची अङ्गे थरथर कापू लागली. ॥४१ १/२॥
|
तां तु लक्ष्मण रामेति क्रोशन्तीं मधुरस्वराम् ॥ ४२ ॥
अवेक्षमाणां बहुशो वैदेहीं धरणीतलम् ।
स तामाकुलकेशान्तां विप्रमृष्टविशेषकाम् ।
जहारात्मविनाशाय दशग्रीवो मनस्विनीम् ॥ ४३ ॥
|
वैदेही आर्त स्वरात हा राम ! ह लक्ष्मण ! अशा हाका मारीत वारंवार भूतलाकडे पहात राहिली होती. तिचे केस सुटून सर्व बाजूस पसरले होते आणि ललटावरील बिंदी पुसली गेली होती. अशाच अवस्थेत दशग्रीव रावण आपल्याच विनाशासाठी मनस्विनी सीतेला घेऊन जात होता. ॥४२-४३॥
|
ततस्तु सा चारुदती शुचिस्मिता
विनाकृता बन्धुजनेन मैथिली ।
अपश्यती राघवलक्ष्मणावुभौ
विवर्णवक्त्रा भयभारपीडिता ॥ ४४ ॥
|
त्या समयी मनोहर दात आणि पवित्र स्मित असणारी मैथिली सीता, जिचा आपल्या बंधुजनांपासून वियोग झाला होता, दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण न दिसल्याने भयाच्या भाराने व्यथित होऊन गेली. तिच्या मुखमण्डलाची कांति फिकी पडून गेली. (ती विवर्ण दिसू लागली.) ॥४४॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे द्विपञ्चाशः सर्गः ॥ ५२ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा बावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५२॥
|