[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। । अष्ट्चत्वारिंशः सर्गः । ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पुरवसिनीनां स्त्रीणां विलापः - नगरनिवासिनी स्त्रियांचे विलाप करणे -
तेषामेवं विषण्णानां पीडितानामतीव च ।
बाष्पविप्लुतनेत्राणां सशोकानां मुमूर्षया ॥ १ ॥

अभिगम्य निवृत्तानां रामं नगरवासिनाम् ।
उद्‍गतानीव सत्त्वानि बभूवुरमनस्विनाम् ॥ २ ॥
याप्रकारे जे विषादग्रस्त, अत्यंत पीडित, शोकमग्न आणि प्राणत्याग करण्याच्या इच्छेने युक्त होऊन नेत्रांतून अश्रु ढाळीत होते. श्रीरामांच्या बरोबर जाऊनही जे त्यांना न घेताच परत आलेले होते आणि म्हणून ज्यांचे चित्त ठिकाणावर नव्हते त्या नगरवासी लोकांची अशी दशा झाली होती की जणु त्यांचे प्राण निघून गेले आहेत. ॥१-२॥
स्वं स्वं निलयमागम्य पुत्रदारैः समावृताः ।
अश्रूणि मुमुचुः सर्वे बाष्पेण पिहिताननाः ॥ ३ ॥
ते सर्व आपापल्या घरी जाऊन पत्‍नी आणि पुत्रांनी घेरलेले असता अश्रु ढाळू लागले. त्यांचे मुख अश्रुधारांनी आच्छादित होऊन गेले होते. ॥३॥
न चाहृष्यन् न चामोदन् वणिजो न प्रसारयन् ।
न चाशोभन्त पण्यानि नापचन् गृहमेधिनः ॥ ४ ॥
त्यांच्या शरीरावर हर्षाचे काही ही चिन्ह दिसून येत नव्हते तथा मनात ही आनंदाचा अभावच होता. वैश्यांनी आपली दुकाने उघडली नाहीत. क्रय-विक्रयाच्या वस्तु बाजारांत पसरल्या गेल्या पण त्यांची काही शोभा झाली नाही. (त्यांना घेण्यासाठी ग्राहकच आले नाहीत.) त्यादिवशी गृहस्थांच्या घरी चुली पेटल्या नाहीत. (अन्नच शिजले नाही.) ॥४॥
नष्टं दृष्ट्‍वा नाभ्यनन्दन् विपुलं वा धनागमम् ।
पुत्रं प्रथमजं लब्ध्वा जननी नाप्यनन्दत ॥ ५ ॥
हरवलेली वस्तु मिळाल्यावरही कुणाला प्रसन्नता वाटली नाही, विपुल धन राशी प्राप्त झाल्यावरही कुणी त्याचे अभिनंदन केले नाही. जिने प्रथमच पुत्राला जन्म दिला होता, ती माताही आनंदित झाली नाही. ॥५॥
गृहे गृहे रुदन्त्यश्च भर्तारं गृहमागतम् ।
व्यगर्हयन्त दुःखार्ता वाग्भिस्तोत्रैरिव द्विपान् ॥ ६ ॥
प्रत्येक घरांतील स्त्रिया आपला पति रामांना न घेताच परत आलेला पाहून रडू लागल्या आणि दुखांनी कातर होऊन जणु महावत अंकुशांनी हत्तींना मारतात त्याप्रमाणे कठोर वचनांच्या द्वारा त्यांना शिव्याशाप देऊ लागल्या. ॥६॥
किं नु तेषां गृहैः कार्यं किं दारैः किं धनेन वा ।
पुत्रैर्वापि सुखैर्वापि ये न पश्यन्ति राघवम् ॥ ७ ॥
त्या म्हणाल्या- 'जे लोक राघवाला पहात नाहीत त्यांना घरदार, स्त्री-पुत्र, धन-दौलत आणि सुख भोगांशी काय प्रयोजन आहे ? ॥७॥
एकः सत्पुरुषो लोके लक्ष्मणः सह सीतया ।
योऽनुगच्छति काकुत्स्थं रामं परिचरन् वने ॥ ८ ॥
'संसारात एकमात्र लक्ष्मणच सत्पुरूष आहे, जे सीते बरोबरच रामांची सेवा करण्यासाठी त्यांच्या पाठोपाठ वनात जात आहे. ॥८॥
आपगाः कृतपुण्यास्ताः पद्मिन्यश्च सरांसि च ।
येषु यास्यति काकुत्स्थो विगाह्य सलिलं शुचि ॥ ९ ॥
'त्या नद्या, कमलमण्डित विहिरी आणि सरोवरे यांनी अवश्यच खूप पुण्य केलेले असले पाहिजे की ज्यांच्या पवित्र जलात स्नान करून काकुत्स्थ पुढे जातील. ॥९॥
शोभयिष्यन्ति काकुत्स्थमटव्यो रम्यकाननाः ।
आपगाश्च महानूपाः सानुमन्तश्च पर्वताः ॥ १० ॥
'ज्यांत रमणीय वृक्षवेली शोभून दिसत आहेत त्या सुंदर वनश्रेणी, मोठमोठी कुरणे (मळीच्या जमिनी) असलेल्या नद्या आणि शिखरांनी संपन्न पर्वत श्रीरामांची शोभा वाढवतील. ॥१०॥
काननं वापि शैलं वा यं रामोऽनुगमिष्यति ।
प्रियातिथिमिव प्राप्तं नैनं शक्ष्यन्त्यनर्चितुम् ॥ ११ ॥
'श्रीराम ज्या ज्या वनात अथवा पर्वतावर जातील, तेथे त्यांना आपल्या प्रिय अतिथी प्रमाणे आलेले पाहून ते वन आणि पर्वत त्यांची पूजा केल्याशिवाय राहूच शकणार नाहीत. ॥११॥
विचित्रकुसुमापीडा बहुमञ्जरिधारिणः ।
राघवं दर्शयिष्यन्ति नगा भ्रमरशालिनः ॥ १२ ॥
'विचित्र फुलांचे मुकुट घातलेले आणि बर्‍याचशा मञ्जिरी धारण केलेले भ्रमरांनी सुशोभित झालेले वृक्ष वनात राघवांना आपली शोभा दाखवतील. ॥१२॥
अकाले चापि मुख्यानि पुष्पाणि च फलानि च ।
दर्शयिष्यन्त्यनुक्रोशाद् गिरयो राममागतम् ॥ १३ ॥
'तेथील पर्वत आपल्याकडे आलेल्या श्रीरामांना अत्यंत आदरामुळे असमयी ही उत्तम -उत्तम फुले, फळे दाखवतील. (भेट देतील.) ॥१३॥
प्रस्रविष्यन्ति तोयानि विमलानि महीधराः ।
विदर्शयन्तो विविधान् भूयश्चित्रांश्च निर्झरान् ॥ १४ ॥
'ते पर्वत वारंवार नाना प्रकारचे विचित्र निर्झर दाखवून श्रीरामांसाठी निर्मल जलांचे स्त्रोत वहावतील. ॥१४॥
पादपाः पर्वताग्रेषु रमयिष्यन्ति राघवम् ।
यत्र रामो भयं नात्र नास्ति तत्र पराभवः ॥ १५ ॥

स हि शूरो महाबाहुः पुत्रो दशरथस्य च ।
पुरा भवति नोऽदूरादनुगच्छाम राघवम् ॥ १६ ॥
'पर्वत शिखरांवरील सळसळणारे वृक्ष राघवांचे मनोरंजन करतील. जेथे श्रीराम आहेत तेथे कुठल्याही प्रकारचे भय नाही अथवा कुणाकडून पराभव होण्याचा संभव नाही, कारण दशरथनंदन महाबाहु श्रीराम अत्यंत शूरवीर आहेत. म्हणून जोपर्यत ते आमच्यापासून जास्त दूर निघून गेलेले नाहीत, त्या पूर्वीच आम्ही राघवांजवळ पोहोचून त्यांच्या पाठोपाठ गेले पाहिजे. ॥१५-१६॥
पादच्छाया सुखं भर्तुस्तादृशस्य महात्मनः ।
स हि नाथो जनस्यास्य स गतिः स परायणम् ॥ १७ ॥
'त्यांच्या सारख्या महात्म्यांच्या आणि स्वामींच्या चरणांची छायाच आमच्यासाठी परम सुखद आहे. तेच आमची गति, आमचे रक्षक आणि परम आश्रय आहेत. ॥१७॥
वयं परिचरिष्यामः सीतां यूयं च राघवम् ।
इति पौरस्त्रियोभर्तॄन् दुःखार्तास्तत्तदब्रुवन् ॥ १८ ॥
'आम्ही स्त्रिया सीतेची सेवा करू आणि तुम्ही सर्व लोक राघवांच्या सेवेत रहा. याप्रकारे पुरवासी लोकांच्या स्त्रिया दुःखाने आतुर होऊन आपल्या पतिंना उपर्युक्त गोष्टी सांगू लागल्या. ॥१८॥
युष्माकं राघवोऽरण्ये योगक्षेमं विधास्यति ।
सीता नारीजनस्यास्य योगक्षेमं करिष्यति ॥ १९ ॥
'(त्या पुन्हा म्हणाल्या- ) वनात राघव तुम्हा लोकांचा योगक्षेम सिद्ध करतील आणि सीतादेवी आम्हा स्त्रियांच्या योगक्षेमाचा निर्वाह करील. ॥१९॥
को न्वनेनाप्रतीतेन सोत्कण्ठितजनेन च ।
सम्प्रीयेतामनोज्ञेन वासेन हृतचेतसा ॥ २० ॥
'येथील निवास (वास्तव्य) प्रीति आणि प्रतीति रहित आहे. येथील सर्व लोक चांगले वाटत नाही. तसेच येथे रहाण्याने मन आपली शुद्ध-बुद्ध (भान) हरवून बसत आहे. मग अशा ठिकाणी निवास करून कुणाला प्रसन्नता वाटणार आहे ? ॥२०॥
कैकेय्या यदि चेद् राज्यं स्यादधर्म्यमनाथवत् ।
न हि नो जीवितेनार्थः कुतः पुत्रैः कुतो धनैः ॥ २१ ॥
'जर या राज्यावर कैकेयीचा अधिकार होईल तर हे राज्य अनाथासारखे होऊन जाईल. यात धर्म मर्यादा राहू शकणार नाही. अशा राज्यात तर आम्हाला जिवंत राहण्याचीही आवश्यकता आहे असे वाटत नाही. मग धन आणि पुत्रांशी काय कर्तव्य आहे ? ॥२१॥
यया पुत्रश्च भर्ता च त्यक्तावैश्वर्यकारणात् ।
कं सा परिहरेदन्यं कैकेयी कुलपांसनी ॥ २२ ॥
'जिने राज्य - वैभवासाठी आपल्या पुत्राचा आणि पतिचा त्याग केला ती कुळकळंकिनी कैकेयी दुसर्‍या कुणाचा त्याग करणार नाही ? ॥२२॥
कैकेय्या न वयं राज्ये भृतका हि वसेमहि ।
जीवन्त्या जातु जीवन्त्यः पुत्रैरपि शपामहे ॥ २३ ॥
'आम्ही आपल्या पुत्रांची शपथ घेऊन सांगतो की जो पर्यत कैकेयी जिवंत राहील तोपर्यत आम्ही जिंवत असता कधी तिच्या राज्यात राहू शकणार नाही, मग जरी येथे आमचे पालन पोषण होत असले तरीही आम्ही येथे राहण्याची इच्छा करणार नाही. ॥२३॥
या पुत्रं पार्थिवेन्द्रस्य प्रवासयति निर्घृणा ।
कस्तां प्राप्य सुखं जीवेदधर्म्यां दुष्टचारिणीम् ॥ २४ ॥
'ज्या निर्दय स्वभावाच्या स्त्रीने महाराजांच्या पुत्राला राज्याच्या बाहेर घालवून दिले आहे, त्या अधर्म परायण दुराचारिणी कैकेयीच्या अधिकारात कोण सुखपूर्वक जीवन व्यतीत करू शकेल ? ॥२४॥
उपद्रुतमिदं सर्वमनालम्बमनायकम् ।
कैकेय्यास्तु कृते सर्वं विनाशमुपयास्यति ॥ २५ ॥
'कैकेयीमुळे हे सारे राज्य अनाथ आणि यज्ञरहित होऊन उपद्रवाचे केन्द्र बनून गेले आहे, म्हणून एक दिवस सर्वांचा विनाश होऊन जाईल. ॥२५॥
न हि प्रव्रजिते रामे जीविष्यति महीपतिः ।
मृते दशरथे व्यक्तं विलोपस्तदनन्तरम् ॥ २६ ॥
'श्रीरामचंद्र वनवासी झाल्यावर दशरथ महाराज जिवंत राहाणार नाहीत. या बरोबरच हेही स्पष्ट आहे की राजा दशरथांच्या मृत्युच्या पश्चात या राज्याचाही लोप होऊन जाईल. ॥२६॥
ते विषं पिबतालोड्य क्षीणपुण्याः सुदुःखिताः ।
राघवं वानुगच्छध्वमश्रुतिं वापि गच्छत ॥ २७ ॥
'म्हणून आता तुम्ही हे समजून घ्या की आता आपले पुण्य समाप्त झाले आहे. येथे राहून आपल्याला अत्यंत दुःखच भोगावे लागेल. अशा दशेमध्ये एक तर विष घोटून पिऊन टाका अथवा राघवाचे अनुसरण करा, अथवा अशा एखाद्या देशात निघून जा की जेथे कैकेयीचे नावही ऐकू येणार नाही. ॥२७॥
मिथ्या प्रव्राजितो रामः सभार्यः सहलक्ष्मणः ।
भरते संनिबद्धाः स्मः सौनिके पशवो यथा ॥ २८ ॥
'खोट्या वराची कल्पना करून पत्‍नी आणि लक्ष्मणासह श्रीरामाला देशातून घालवून देण्यात आले आहे आणि आम्हाला भरताशी बांधण्यात आले आहे. आता आमची दशा कसायाच्या घरात बांधल्या गेलेल्या पशूंप्रमाणे झाली आहे. ॥२८॥
पूर्णचन्द्राननः श्यामो गूढजत्रुररिंदमः ।
आजानुबाहुः पद्माक्षो रामो लक्ष्मणपूर्वजः ॥ २९ ॥

पूर्वाभिभाषी मधुरः सत्यवादी महाबलः ।
सौम्यश्च सर्वलोकस्य चन्द्रवत् प्रियदर्शनः ॥ ३० ॥
लक्ष्मणांचे ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांचे मुख पूर्ण चंद्रासारखे मनोहर आहे. त्यांच्या शरीराची कांति श्याम असून, गळ्याजवळील हाडे मांसाने झाकलेली आहे. भुजा गुडघ्यापर्यत लांब आहेत. (ते आजानुबाहु आहेत आणि नेत्र कमलासमान सुंदर आहेत. ते समोर आल्यानंतर प्रथमच तेच बोलावयास प्रारंभ करतात आणि मधुर आणि सत्य वचने बोलतात. श्रीराम शत्रूंचे दमन करणारे आणि महान बलवान आहेत. समस्त जगतासाठी सौम्य (कोमल स्वभावाचे) आहेत. त्यांचे दर्शन चंद्रम्याप्रमाणे प्रिय आहे. ॥२९-३०॥
नूनं पुरुषशार्दूलो मत्तमातङ्‌‍गविक्रमः ।
शोभयिष्यत्यरण्यानि विचरन् स महारथः ॥ ३१ ॥
'मत्त गजराजाप्रमाणे पराक्रमी पुरूषसिंह महारथी श्रीराम भूतलावर विचरण करीत असतांनाच निश्चितच वनस्थलींची शोभा वाढवीत असतील. ॥३१॥
तास्तथा विलपन्त्यस्तु नगरे नागरस्त्रियः ।
चुक्रुशुर्दुःखसन्तप्ता मृत्योरिव भयागमे ॥ ३२ ॥
नगरांतील नागरिकांच्या स्त्रिया याप्रमाणे विलाप करीत असतां दुःखाने संतप्त होऊन याप्रकारे जोरजोराने रडू लागल्या की जणु त्यांच्यावर मृत्युचे भयच उपस्थित झाले आहे की काय ? ॥३२॥
इत्येवं विलपन्तीनां स्त्रीणां वेश्मसु राघवम् ।
जगामास्तं दिनकरो रजनी चाभ्यवर्तत ॥ ३३ ॥
आपापल्या घरात दिवसभर याप्रमाणे स्त्रिया राघवासाठी विलाप करीत राहिल्या होत्या. हळू हळू सूर्य अस्ताचलाकडे निघून गेला आणि रात्र झाली. ॥३३॥
नष्टज्वलनसन्तापा प्रशान्ताध्यायसत्कथा ।
तिमिरेणाभिलिप्तेव सा तदा नगरी बभौ ॥ ३४ ॥
त्यासमयी कुणाच्याही घरात अग्निहोत्रासाठी सुद्धा अग्नि पेटला नाही. स्वाध्याय आणि कथावार्ताही झाली नाही. सारी अयोध्यापुरी अंधःकारानी लिप्त झाल्याप्रमाणे प्रतीत होत होती. ॥३४॥
उपशान्तवणिक्पण्या नष्टहर्षा निराश्रया ।
अयोध्या नगरी चासीन्नष्टतारमिवाम्बरम् ॥ ३५ ॥
वाण्याची दुकाने बंद झाल्याने तेथे काही हालचाल दिसून येत नव्हती. सार्‍या पुरीचा आनंद जणु हिरावून घेतला गेला होता. श्रीरामरूपी आश्रयरहित अयोध्यानगरी, ज्यांतील तारे लोपले आहेत अशा श्रीहीन आकाशासारखी भासत होती. ॥३५॥
तदा स्त्रियो रामनिमित्तमातुरा
     यथा सुते भ्रातरि वा विवासिते ।
विलप्य दीना रुरुदुर्विचेतसः
     सुतैर्हितासामधिकोऽपि सोऽभवत् ॥ ३६ ॥
त्या समयी नगरवासी स्त्रिया श्रीरामासाठी अशाप्रकारे शोकातुर झाल्या होत्या की जणु त्यांचेच सख्खे पुत्र अथवा बंधु यांनाच देशाबाहेर घालवून देण्यात आले आहे की काय ! त्या अत्यंत दीनभावाने विलाप करून रडू लागल्या आणि रडता रडता निश्चेष्ट झाल्या; कारण श्रीराम त्यांना पुत्रांपेक्षा आणि (भावांपेक्षाही) अधिक प्रिय होते. ॥३६॥
प्रशांतगीतोत्सवनृत्यवादना
     विभ्रष्टहर्षा पिहितापणोदया ।
तदा ह्ययोध्या नगरी बभूव सा
     महार्णवः सङ्‌‍क्षपितोदको यथा ॥ ३७ ॥
तेथे गाणे, बजावणे आणि नाचणे आदि उत्सव बंद पडले होते. सर्वांचा उत्साह निघून गेला होता. बाजारांतील दुकाने उघडली नाहीत, या सर्व कारणांमुळे त्या समयी अयोध्यानगरी जलहीन समुद्राप्रमाणे सामसूम, ओसाड वाटत होती. ॥३७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये अयोध्याकाण्डे अष्टचत्वारिंशः सर्गः ॥ ४८ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा अठ्ठेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP