॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ युद्धकाण्ड ॥

॥ नवमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



मेघनादाचा वध


श्रीमहादेव उवाच
विभीषणवचः श्रुत्वा रामो वाक्यमथाब्रवीत् ।
जानामि तस्य रौद्रस्य मायां कृत्स्नां विभीषणः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, बिभीषणाचे म्हणणे ऐकल्यावर श्रीराम म्हणाले, "अरे बिभीषणा, त्या महाभयंकर दैत्याची संपूर्ण माया मी जाणतो. (१)

स हि ब्रह्मास्त्रविच्छूरो मायावी च महाबलः ।
जानामि लक्ष्मणस्यापि स्वरूपं मम सेवनम् ॥ २ ॥
ज्ञात्वैवासमहं तूष्णीं भविष्यत्कार्यगौरवात् ।
इत्युक्‍त्वा लक्ष्मणं प्राह रामो ज्ञानवतां वरः ॥ ३ ॥
गच्छ लक्ष्मण सैन्येन महता जहि रावणिम् ।
हनूमत्प्रमुखैः सर्वैः यूथपैः सह लक्ष्मण ॥ ४ ॥
तो मेघनाद ब्रह्मास्त्र जाणणारा, शूर, मायावी आणि महाबलशाली आहे. तसेच लक्ष्मणाचे स्वरूप आणि तो करीत असलेली माझी सेवा, हे दोन्हीही मला माहीत आहेत. (लक्ष्मणाने माझ्या सेवेसाठी निद्रा व आहार सोडले आहेत.) हे सगळे माहीत असूनही भविष्य कालीन इंद्रजित वधाचे महत्त्वाचे कार्य लक्षात घेऊन मी त्याला खाण्यापिण्याचा किंवा झोप घेण्याचा आग्रह केला नव्हता." असे बोलून ज्ञानी माणसातील श्रेष्ठ असे राम लक्ष्मणाला म्हणाले, "अरे लक्ष्मणा, हनुमान इत्यादी वानर समूहांचे सर्व नायक आणि मोठी सेना यांना बरोबर घेऊन तू जा आणि मेघनादाला ठार कर. (२-४)

जाम्बवान् ऋक्षराजोऽयं सह सैन्येन संवृतः ।
विभीषणश्च सचिवैः सह त्वामभियास्यति ॥ ५ ॥
सर्व सैन्यासह हा अस्वलांचा राजा जांबवान आणि मंत्र्यांसह बिभीषण हे तुझ्याबरोबर येतील. (५)

अभिज्ञस्तस्य देशस्य जानाति विवराणि सः ।
रामस्य वचनं श्रुत्वा लक्ष्मणः सविभीषणः ॥ ६ ॥
जग्राह कार्मुकं श्रेष्ठं अन्यद्‌भीमपराक्रमः ।
रामपादाम्बुजं स्पृष्ट्वा हृष्टः सौमित्रिरब्रवीत् ॥ ७ ॥
बिभीषण तो प्रदेश जाणणारा आहे, तसेच तेथील लपून राहण्याच्या गुहा त्याला माहीत आहेत. " रामांचे वचन ऐकल्यावर, लक्ष्मण हा बिभीषणासह जाण्यास तयार झाला. भयंकर पराक्रम असणाऱ्या लक्ष्मणाने आपले दुसरे एक उत्तम धनुष्य घेतले. नंतर रामांच्या पदकमलांना स्पर्श करून आनंदित होऊन लक्ष्मण म्हणाला. (६-७)

अद्य मत्कार्मुकान्मुक्ताः शरा निर्भिद्य रावणिम् ।
गमिष्यन्ति हि पातालं स्नातुं भोगवतीजले ॥ ८ ॥
"आज माझ्या धनुष्यावरून सुटलेले हे बाण इंद्रजिताचे भेदन करून, पाताळातील भोगवती नदीच्या पाण्यात स्नान करण्यास जातील." (८)

एवमुक्‍त्वा स सौमित्रिः परिक्रम्य प्रणम्य तम् ।
इन्द्रजिन्निधनाकाङ्‌क्षी ययौ त्वरितविक्रमः ॥ ९ ॥
अशा प्रकारे बोलून, लक्ष्मणाने रामांना प्रदक्षिणा घालून प्रणाम केला आणि इंद्रजिताच्या वधाच्या इच्छेने तो वेगाने निघाला. (९)

वानरैर्बहुसाहस्रैः हनूमान् पृष्ठतोऽन्वगात् ।
विभीषणश्च सहितो मंत्रिभिस्त्वरितं ययौ ॥ १० ॥
अनेक सहस्र वानरांबरोबर हनुमान लक्ष्मणाच्या मागोमाग चालू लागला. मंत्र्यांसह बिभीषणसुद्धा त्वरेने निघाला. (१०)

जाम्बवत्प्रमुखा ऋक्षाः सौमित्रिं त्वरयान्वयुः ।
गत्वा निकुम्भिलादेशं लक्ष्मणो वानरैः सह ॥ ११ ॥
अपश्यद्‌बलसंङ्‌घातं दूरात् राक्षससङ्‌कुलम् ।
धनुरायम्य सौमित्रिः यत्तोऽभूद्‌भूरिविक्रमः ॥ १२ ॥
जांबवान इत्यादी अस्वले सुद्धा त्वरेने लक्ष्मणाच्या मागोमाग निघाली. वानरांसह लक्ष्मण जेव्हा निकुंभिला प्रदेशात पोचला, तेव्हा राक्षसांची गर्दी त्याला दुरूनच दिसली. महापराक्रमी लक्ष्मण धनुष्य सज्ज करून तयार झाला. (११-१२)

अङ्‌गदेन च वीरेण जाम्बवान् राक्षसाधिपः ।
तदा विभीषणः प्राह सौमित्रिं पश्य राक्षसान् ॥ १३ ॥
वीर अंगदासह जांबवानसुद्धा तयार झाला. त्या वेळी राक्षसांचा अधिपती बिभीषण लक्ष्मणाला म्हणाला, "लक्ष्मणा, हे राक्षस बघ. (१३)

यदेतद् राक्षसानीकं मेघश्यामं विलोक्यते ।
अस्यानीकस्य महतो भेदने यत्‍नवान् भवे ॥ १४ ॥
हे जे मेघाप्रमाणे काळे असे राक्षसांचे सैन्य दिसून येत आहे, त्या प्रचंड सैन्याचा नाश करण्याचा प्रयत्न कर. (१४)

राक्षसेन्द्रसुतोऽप्यस्मिन् भिन्ने दृश्यो भविष्यति ।
अभिद्रवाशु यावद्वै नैतत्कर्म समाप्यते ॥ १५ ॥
हे सैन्य नष्ट झाल्यावर मगच मेघनाद तुला दिसू लागेल. जोपर्यंत मेघनादाने सुरू केलेले हवन पूर्ण झालेले नाही, तोपर्यंतच तू ताबडतोब त्याच्यावर चालून जा. (१५)

जही वीर दुरात्मानं हिंसापरमधार्मिकम् ।
विभीषणवचः श्रुत्वा लक्ष्मणः शुभलक्ष्मणः ॥ १६ ॥
ववर्ष शरवर्षाणि राक्षसेन्द्रसुतं प्रति ।
पाषाणैः पर्वताग्रैश्च वृक्षैश्च हरियूथपाः ॥ १७ ॥
निर्जघ्नुः सर्वतो दैत्यांस्तेऽपि वानरयूथपान् ।
परश्वधैः शितैर्बाणैरसिभिर्यष्टितोमरैः ॥ १८ ॥
निर्जघ्नुर्वानरानीकं तदा शब्दो महानभूत् ।
स सम्प्रहारस्तुमुलः संजज्ञे हरिरक्षसाम् ॥ १९ ॥
हे वीरा, हिंसापरायण, अधार्मिक, दुरात्मा अशा मेघनादाला तू त्वरेने ठार कर." हे बिभीषणाचे वचन ऐकल्यावर शुभ लक्षणे असणाऱ्या लक्ष्मणाने मेघनादावर बाणांचा वर्षाव केला. तर वानर समूहांच्या नायकांनी पाषाण, पर्वतशिखरे आणि वृक्ष यांनी दैत्यांवर सर्व बाजूंनी प्रहार केले. तेव्हा त्या राक्षसांनी सुद्धा परशू, तीक्ष्ण बाण, तलवारी आणि तोमर यांनी वानरसमूहांचे नायक व वानर सैन्य यांच्यावर हल्ला केला. त्या वेळी फार कोलाहल झाला. अशा प्रकारे वानर आणि राक्षस यांच्यामध्ये तुमुल युद्ध सुरु झाले. (१६-१९)

इन्द्रजित्स्वबलं सर्वं अर्द्यमानं विलोक्य सः ।
निकुम्भिलां च होमं च त्यक्‍त्वा शीघ्रं विनिर्गतः ॥ २० ॥
आपले सर्व सैन्य सगळीकडून मारले जात आहे हे पाहून, इंद्रजित निकुंभिला आणि होमहवन सोडून सत्वर बाहेर आला. (२०)

रथमारुह्य सधनुः क्रोधेन महतागमत् ।
समाह्वयन् स सौमित्रिं युद्धाय रणमूर्धनि ॥ २१ ॥
अतिशय क्रोधाने धनुष्य घेऊन आणि रथावर आरूढ होऊन तो रणांगणात आला व युद्धासाठी लक्ष्मणाला आव्हान देत म्हणाला. (२१)

सौमित्रे मेघनादोऽहं मया जीवन्न मोक्ष्यसे ।
तत्र दृष्ट्वा पितृव्यं स प्राह निष्ठुरभाषणम् ॥ २२ ॥
"अरे लक्ष्मणा, मी मेघनाद आहे. माझ्याकडून तू आता जिवंत सुटणार नाहीस." आणि तेथेच आपल्या चुलत्याला-बिभीषणाला पाहून तो निष्ठुर शब्द बोलला. (२२)

इहैव जातः संवृद्धः साक्षाद् भ्राता पितुर्मम ।
यस्त्वं स्वजनमृत्सृज्य परभृत्यत्वमागतः ॥ २३ ॥
"अरे काका, तू इ थेच लंकेमध्ये जन्मलास आणि वाढलास. तू माझ्या पित्याचा सख्खा भाऊ आहेस. परंतु आता मात्र तू स्वजनांना सोडून देऊन, शत्रूची सेवा पत्करलेली आहेस. (२३)

कथं द्रुह्यसि पुत्राय पापीयानसि दुर्मतिः ।
इत्युक्‍त्वा लक्ष्मणं दृष्ट्वा हनूमत्पृष्ठतः स्थितम् ॥ २४ ॥
तुझ्या पुत्राप्रमाणेच असलेल्या माझा तू कसा बरे द्रोह करीत आहेस ? तू पापी आणि दुष्ट बुद्धीचा आहेस." बिभीषणाला असे बोलून हनुमानाच्या खांद्यावर बसलेल्या लक्ष्मणाला त्याने पाहिले. २४

उद्यदायुधनिस्त्रिंशे रथे महति संस्थितः ।
महाप्रमाणमुद्यम्य घोरं विस्फारयन्धनुः ॥ २५ ॥
अद्य वो मामका बाणाः प्राणान्पास्यन्ति वानराः ।
ततः शरं दाशरथिः सन्धायामित्रकर्षणः ॥ २६ ॥
ससर्ज राक्षसेन्द्राय क्रुद्धः सर्प एव श्वसन् ।
इन्द्रजित् रक्तनयनो लक्ष्मणं समुदैक्षत ॥ २७ ॥
तेव्हा अनेक आयुधे आणि तलवारी सज्ज करून ठेवलेल्या रथात बसलेल्या मेघनादाने प्रचंड आकाराचे एक धनुष्य उचलून त्याचा भयंकर टणत्कार करून तो म्हणाला, "अरे वानरांनो, आज माझे बाण तुमच्या प्राणांचे प्राशन करतील." त्या वेळी रागाने फूत्कार टाकणाऱ्या सापाप्रमाणे असणाऱ्या आणि शत्रूचे दमन करणार्‍या लक्ष्मणाने धनुष्यावर बाणाचे संधान करून, तो राक्षसश्रेष्ठ इंद्रजितावर सोडला. तेव्हा रागाने डोळे लाल झालेल्या इंद्रजिताने लक्ष्मणाकडे पाहिले. (२५-२७)

शक्राशनिसमस्पर्शैः लक्ष्मणेनाहतः शरैः ।
मुहूर्तमभवन्मूढः पुनः प्रत्याहृतेन्द्रियः ॥ २८ ॥
लक्ष्मणाने सोडलेल्या आणि इंद्राच्या वज्राप्रमाणे कठीण असणाऱ्या बाणांचा प्रहार होताच इंद्रजित एक क्षणभर मूर्च्छित पडला, पण तो पुनः शुद्धीवर आला. (२८)

ददर्शावस्थितं वीरं वीरो दशरथात्मजम् ।
सोऽभिचक्राय सौमित्रिं क्रोधसंरक्तलोचनः ॥ २९ ॥
वीर लक्ष्मण आपणापुढे उभा ठाकला आहे, असे त्या वीर इंद्रजिताला दिसले. तेव्हा रागाने डोळे लाल झालेला इंद्रजित लक्ष्मणावर धावून गेला. (२९)

शरान्धनुषि सन्धाय लक्ष्मणं चेदमब्रवीत् ।
यदि ते प्रथमे युद्धे न दृष्टो मे पराक्रमः ॥ ३० ॥
अद्य त्वां दर्शयिष्यामि तिष्ठेदानीं व्यवस्थितः ।
इत्युक्‍त्वा सप्तभिर्बाणैः अभिविव्याध लक्ष्मणम् ॥ ३१ ॥
दशभिश्च हनूमन्तं तीक्ष्णधारैः शरोत्तमैः ।
ततः शरशतेनैव सम्प्रयुक्तेन वीर्यवान् ॥ ३२ ॥
क्रोधद्विगुणसंरब्धो निर्बिभेद विभीषणम् ।
लक्ष्मणोऽपि तथा शत्रुं शरवर्षैरवाकिरत् ॥ ३३ ॥
आणि धनुष्याला बाण जोडून तो लक्ष्मणाला म्हणाला, " जरी पहिल्या युद्धात तुला दिसला नाही, तरी आत्ता मी तुला माझा पराक्रम दाखवतो. माझ्यापुढे तू आता उभा राहा." असे सांगून त्याने सात बाणांनी लक्ष्मणाला विद्ध केले, तसेच तीक्ष्ण धार असणाऱ्या दहा उत्तम बाणांनी त्याने हनुमानाला विद्ध केले. त्यानंतर वीर्यशाली आणि रागाने ज्याचा उत्साह द्विगुणित झाला होता, अशा इंद्रजिताने अचूक सोडलेल्या शंभर बाणांनी बिभीषणाला विद्ध केले. लक्ष्मणानेसुद्धा त्याचप्रकारे शत्रूवर बाणांचा वर्षाव केला. (३०-३३)

तस्य बाणैः सुसंविद्धं कवचं काञ्चनप्रभम् ।
व्यशीर्यत रथोपस्थे तिलशः पतितं भुवि ॥ ३४ ॥
सोन्याप्रमाणे चमकणारे इंद्रजिताचे चिलखत लक्ष्मणाच्या बाणांनी चांगलेच विद्ध झाल्यामुळे ते फुटले आणि त्याचे तिळाएवढे तुकडे होऊन ते रथाच्या मागील भागात पडून तेधून जमिनीवर पडले. (३४)

ततः शरसहस्रेण सङ्‌क्रुद्धो रावणात्मजः ।
बिभेद समरे वीरं लक्ष्मणं भीमविक्रमम् ॥ ३५ ॥
व्यशीर्यतापतद्दिव्यं कवचं लक्ष्मणस्य च ।
कृतप्रतिकृतान्योन्यं बभूवतुरभिद्रुतौ ॥ ३६ ॥
तेव्हा कुद्ध झालेल्या इंद्रजिताने भयंकर पराक्रमी, वीर अशा लक्ष्मणाला युद्धामध्ये हजारो बाणांनी विद्ध केले. त्यामुळे लक्ष्मणाचे दिव्य कवचही फुटले आणि ते खाली पडले. अशा प्रकारे परस्परांचा प्रतिकार करीत ते दोघे एकमेकांवर धावून जाऊन लढू लागले. (३५-३६)

अभीक्ष्णं निःश्वसन्तौ तौ युध्येतां तुमुलं पुनः ।
शरसंवृतसर्वाङ्‌गौ सर्वतो रुधिरोक्षितौ ॥ ३७ ॥
आणि वारंवार निःश्वास टाकणाऱ्या त्या दोघांचे पुनः तुंबळ युद्ध झाले. दोघांची सर्व अंगे सर्व बाजूंनी बाणांनी झाकली गेली आणि ते दोघेही रक्तात न्हाऊन गेले. (३७)

सुदीर्घकालं तौ वीरौ अन्योन्यं निशितैः शरैः ।
अयुध्येतां महासत्त्वौ जयाजयविवर्जितौ ॥ ३८ ॥
ते दोघे महापराक्रमी वीर दीर्घ काळपर्यंत एकमेकांवर तीक्ष्ण बाण टाकून लढत राहिले. पण कुणाचाही जय अथवा पराजय झाला नाही. (३८)

एतस्मिन्नन्तरे वीरो लक्ष्मणः पञ्चभिः शरैः ।
रावणेः सारथिं साश्वं रथं च समचूर्णयत् ॥ ३९ ॥
दरम्यानच्या काळात वीर लक्ष्मणाने पाच बाणांनी इंद्रजिताचा सारथी आणि घोड्यासहित रथ, यांचे चूर्ण करून टाकले. (३९)

चिच्छेद कार्मुकं तस्य दर्शयन् हस्तलाघवम् ।
सोऽन्यत्तु कार्मुकं भद्रं सज्यं चक्रे त्वरान्वितः ॥ ४० ॥
आणि आपल्या हाताची चलाखी दाखवीत लक्ष्मणाने त्याचे धनुष्य तोडून टाकले. तेव्हा मेघनादाने दुसरे एक उत्तम धनुष्य त्वरेने सज्ज केले. (४०)

तच्चामपि चिच्छेद लक्ष्मणस्त्रिभिराशुगैः ।
तमेव छिन्नधन्वानं विव्याधानेकसायकैः ॥ ४१ ॥
ते धनुष्यसुद्धा लक्ष्मणाने तीन बाणांनी तोडून टाकले आणि ज्याचे धनुष्य तुटले होते अशा मेघनादाला सुद्धा अनेक बाणांनी विद्ध केले. (४१)

पुनरन्यत्समादय कार्मुकं भीमविक्रमः ।
इन्द्रजिल्लक्ष्मणं बाणैः शितैरादित्यसन्निभैः ॥ ४२ ॥
बिभेद वानरान्सर्वान् बाणैरापूरयन्दिशः ।
तत ऐन्द्रं समादाय लक्ष्मणो रावणिं प्रति ॥ ४३ ॥
सन्धायाकृष्य कर्णान्तं कार्मुकं दृढनिष्ठुरम् ।
उवाच लक्ष्मणो वीरः स्मरन् रामपदाम्बुजम् ॥ ४४ ॥
तेव्हा पुनः दुसरे नवीन धनुष्य घेऊन, सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या धारदार बाणांनी, प्रचंड पराक्रम असणाऱ्या इंद्रजिताने लक्ष्मणाला विद्ध केले. तसेच बाणांनी दिशा भरून टाकीत त्याने वानरांनाही विद्ध केले. तेव्हा ऐंद्र बाण धनुष्यावर चढवून व तो इंद्रजितावर रोखून, अतिशय बळकट अशा आपल्या धनुष्याची दोरी त्याने कानापर्यंत ओढली आणि रामांच्या चरणकमळांचे स्मरण करीत वीर लक्ष्मण म्हणाला. (४२-४४)

धर्मात्मा सत्यसन्धश्च रामो दाशरथिर्यदि ।
त्रिलोक्यामप्रतिद्वन्द्वः तदेनं जहि रावणिम् ॥ ४५ ॥
"जर दशरथपुत्र राम धर्मात्मा, सत्यप्रतिज्ञ आणि तिन्ही लोकात प्रतिद्वंद्वीरहित वीर असेल, तर हे बाणा, तू या रावणपुत्र इंद्रजिताला ठार कर." (४५)

इत्युक्‍त्वा बाणमाकर्णाद् विकृष्य तमजिह्यगम् ।
लक्ष्मणः समरे वीरः ससर्जेन्द्रजितं प्रति ॥ ४६ ॥
असे बो लून, तो सरळ लक्ष्याचा वेध घेणारा बाण कानापर्यंत ओढून, वीर लक्ष्मणाने इंद्रजितावर सोडला. (४६)

स शरः सशिरस्त्राणं श्रीमज्ज्वलितकुण्डलम् ।
प्रमथ्येन्द्रजितः कायात् पातयामास भूतले ॥ ४७ ॥
ज्यावर चमचमणारी कांतिमान कुंडले होती, असे इंद्रजिताचे शोभिवंत मस्तक शिरस्त्राणासह धडापासून वेगळे करून, त्या बाणाने ते जमिनीवर पाडले. (४७)

ततः प्रमुदिता देवाः कीर्तयन्तो रघूत्तमम् ।
ववर्षु पुष्पवर्षाणि स्तुवन्तश्च मुहुर्मुहुः ॥ ४८ ॥
तेव्हा आनंदित झालेले देव हे रघूत्तम लक्ष्मणाचे गुणगान करीत आणि वारंवार त्याची स्तुती करीत, त्याच्यावर पुष्पवृष्टी करू लागले. (४८)

जहर्ष शक्रो भगवान् सह देवैर्महर्षिभिः ।
आकाशेऽपि च देवानां शुश्रुवे दुन्दुभिस्वनः ॥ ४९ ॥
देव आणि महर्षी यांच्यासह भगवान इंद्र अतिशय हर्षित झाला आणि आकाशातसुद्धा देवांच्या कुंभीचा निनाद ऐकू येऊ लागला. (४९)

विमलं गगनं चासीत् स्थिराभूत् विश्वधारिणी ।
निहतं रावणिं दृष्ट्वा जयजल्पसमन्वितः ॥ ५० ॥
इंद्रजित मारला गेला, हे पाहून आकाश स्वच्छ झाले, जगाला धारण करणारी पृथ्वी स्थिर झाली आणि सर्वत्र जयजयकार होऊ लागला. (५०)

गतश्रमः स सौमित्रिः शङ्‌खमापूरयद्रणे ।
सिंहनादं ततः कृत्वा ज्याशब्दं अकरोद्विभुः ।
श्रम दूर झाल्यावर लक्ष्मणाने शंख फुंकून त्या नादाने रणांगण भरून टाकले आणि त्यानंतर सिंहाप्रमाणे गर्जना करून, त्या प्रभू लक्ष्मणाने धनुष्याच्या दोरीचा टणत्कार केला. (५१)

तेन नादेन संहृष्टा वानराश्च गतश्रमाः ।
वानरेन्द्रैश्च सहितः स्तुवद्‌भिर्हृष्टमानसैः ॥ ५२ ॥
लक्ष्मणः परितुष्टात्मा ददर्शाभ्येत्य राघवम् ।
हनूमद् राक्षसाभ्यां च सहितो विनयान्वितः ॥ ५३ ॥
ववन्दे भ्रातरं रामं ज्येष्ठं नारायणं विभुम् ।
त्वत्प्रसादात् रघुश्रेष्ठ हतो रावणिराहवे ॥ ५४ ॥
त्या नादाने वानर अतिशय हृष्ट झाले आणि त्यांचे श्रमही दूर झाले. त्यानंतर ज्यांची मने आनंदित झाली होती आणि जे लक्ष्मणाची स्तुती करीत होते अशा वानर श्रेष्ठांसह तसेच हनुमान व बिभीषण यांना बरोबर घेऊन, अतिशय संतुष्ट झालेल्या लक्ष्मणाने रामांजवळ जाऊन त्यांचे दर्शन घेतले आणि मग त्याने विनयपूर्वक साक्षात प्रभू नारायणस्वरूप आपल्या श्रीराम या ज्येष्ठ भावाला वंदन केले आणि म्हटले, "हे रघुश्रेष्ठा, केवळ तुमच्या कृपाप्रसादामुळे इंद्रजित युद्धात ठार झाला." (५२-५४)

श्रुत्वा तल्लक्ष्मणाद्‌भक्त्या तमालिङ्‌ग्य रघूत्तमः ।
मूर्ध्न्यवघ्राय मुदितः सस्नेहमिदमब्रवीत् ॥ ५५ ॥
लक्ष्मणाने भक्तिपूर्वक उच्चारलेले ते वाक्य ऐकून आनंदित झालेल्या रघूत्तमांनी त्याला आलिंगन दिले, त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले आणि प्रेमपूर्व क म्हटले. (५५)

साधु लक्ष्मण तुष्टोऽस्मि कर्म ते दुष्करं कृतम् ।
मेघनादस्य निधने जितं सर्वमरिन्दम ॥ ५६ ॥
" हे लक्ष्मणा, छान- ! छान- ! उत्तम- ! मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. तू फार दुष्कर असे कर्म केले आहेस. मेघनादाचे निधन झाल्यामुळे, हे शत्रुमर्दना, आपण जणू काही सर्व जिंकले आहे. (५६)

अहोरात्रैस्त्रिभिर्वीरः कथञ्चिद्‌विनिपातितः ।
निःसपत्‍नः कृतोऽस्मद्य निर्यास्यति हि रावणः ॥ ५७ ॥
पुत्रशोकान्मया योद्धुं तं हनिष्यामि रावणम् ॥ ५८ ॥
तीन दिवस आणि तीन रात्री युद्ध करून तू कसे का होईना त्या वीर मेघनादाला ठार केले आहेस, त्यामुळे आज तू मला शत्ररहित केले आहेस. आता पुत्राच्या शोकामुळे व्याकूळ झालेला रावण माझ्याशी युद्ध करण्यास नक्कीच लंकेतून बाहेर येईल. तेव्हा मी त्या रावणाचा वध करीन." (५७-५८)

मेघनादं हतं श्रुत्वा लक्ष्मणेन महाबलम् ।
रावणः पतितो भुमौ मूर्च्छितः पुनरुत्थितः ।
विललापातिदीनात्मा पुत्रशोकेन रावणः ॥ ५९ ॥
इकडे लक्ष्मणाकडून महाबलवान मेघनाद मारला गेला, हे ऐकल्यावर रावण मूर्च्छित होऊन जमिनीवर पडला. त्यानंतर शुद्धीवर येऊन तो पुनः उठला आणि पुत्रशोकाने त्याचे मन अतिशय दीन झाल्यामुळे, तो विलाप करू लागला. (५९)

पुत्रस्य गुणकर्माणि संस्मरन्पर्यदेवयत् ।
अद्य देवगणाः सर्वे लोकपाला महर्षयः ॥ ६० ॥
हतं इन्द्रजितं ज्ञात्वा सुखं स्वप्स्यन्ति निर्भयाः ।
इत्यादि बहुशः पुत्र-लालसो विललाप ह ॥ ६१ ॥
आपल्या पुत्राचे गुण आणि कर्मे आठवून तो शोक करीत म्हणाला, "इंद्रजित मारला गेला, हे कळल्यावर आज देवांचे सर्व समूह, सर्व लोकपाल आणि सर्व महर्षी भयरहित होऊन सुखाने झोपतील." अशा प्रकारे नाना पद्धतींनी त्या रावणाने पुत्रावरील प्रेमामुळे पुष्कळ विलाप केला. (६०-६१)

ततः परमसंक्रुद्धो रावणो राक्षसाधिपः ।
उवाच राक्षसान्सर्वान् निनाशयिषुराहवे ॥ ६२ ॥
स पुत्रवधसन्तप्तः शूरः क्रोधवशं गतः ।
संवीक्ष्य रावणो बुद्ध्या हन्तुं सीतां प्रदुद्रुवे ॥ ६३ ॥
त्यानंतर राक्षसांचा राजा रावण अतिशय क्रुद्ध झाला आणि त्याने युद्धामध्ये जणू सर्व राक्षसांचा नाश करण्याच्या इच्छेने त्यांना युद्धाला जाण्याची आज्ञा दिली. त्यानंतर पुत्राच्या वधाने संतप्त झालेल्या आणि क्रोधाच्या आहारी गेलेल्या त्या शूर रावणाने स्वतःच्या बुद्धीने काहीसा विचार केला आणि सीतेचा वध करण्यास तो धावत निघाला. (६२-६३)

खड्गपाणिमथायान्त्तं क्रुद्धं दृष्ट्वा दशाननम् ।
राक्षसामध्यगा सीता भयशोकाकुलाभवत् ॥ ६४ ॥
रागावलेला रावण हातात खड्ग घेऊन आपल्याकडे येत आहे, हे पाहून राक्षसींच्या वेढ्यात बसलेली सीता भयभीत आणि शोकाकुल झाली. (६४)

एतस्मिन्नन्तरे तस्य सचिवो बुद्धिमान् शुचिः ।
सुपार्श्वो नाम मेधावी रावणं वाक्यमब्रवीत् ॥ ६५ ॥
तितक्यात त्या रावणाचा एक बुद्धिमान, शुद्ध आचरणाचा, आणि विचारी सुपार्श्व नावाचा सचिव रावणाला म्हणाला. (६५)

ननु नाम दशग्रीव साक्षात् वैश्रवणानुजः ।
वेदविद्याव्रतस्नातः स्वकर्मपरिनिष्ठितः ॥ ६६ ॥
अनेकगुणसम्पन्नः कथं स्त्रीवधमिच्छसि ।
अस्माभिः सहितो युद्धे हत्वा रामं च लक्ष्मणम् ।
प्राप्स्यसे जानकीं शिघ्रं इत्युक्तः स न्यवर्तत ॥ ६७ ॥
'हे रावणा, खरोखर तुम्ही साक्षात कुबेराचे धाकटे भाऊ आहात, वेदविद्येचे व्रत तुम्ही घेतले आहे. स्वधर्म आचरण्यात पटाईत आहात. शिवाय अनेक गुणांनी संपन्न आहात. अशा स्थितीत तुम्हांला एका स्त्रीचा वध करण्याची इच्छा कशी बरे झाली ? आम्हां सर्वांना बरोबर घेऊन तुम्ही युद्धात राम व लक्ष्मण यांचा वध करा म्हणजे तुम्हांला सीता लगेच प्राप्त होईल." असे सुपार्श्वाने म्हटल्यावर, रावण परत फिरला. (६६-६७)

ततो दुरात्मा सुहृदा निवेदितं
    वचः सुधर्म्यं प्रतिगृह्य रावणः ।
गृहं जगामाशु शुचा विमूढधीः
    पुनः सभां च प्रययौ सुहृद्‍वृतः ॥ ६८ ॥
हितचिंतकाचे ते धर्मानुकूल वचन दुरात्म्या रावणाने मान्य केले. आणि तो चट्‌दिशी आपल्या राजवाड्यात परत गेला. नंतर शोकामुळे बुद्धीमूढ होऊन तो आपल्या सुहृदांसह पुनः राजसभेत गेला. (६८)

इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे
युद्धकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥
इति श्रीमद्‌अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥


GO TOP