गङ्गायाः कार्तिकेयस्योत्पत्तेः प्रसङ्गः -
|
गंगेपासून कार्तिकेयाच्या उत्पत्तिचा प्रसंग -
|
तप्यमाने तदा देवे सेन्द्रा साग्निपुरोगमाः ।
सेनापतिमभीप्सन्तः पितामहमुपागमन् ॥ १ ॥
|
ज्यावेळी महादेव तपस्या करीत होते त्या समयीच इंद्र आणि अग्नि आदि सर्व देवता आपल्या सेनापतीची इच्छा घेऊन ब्रह्मदेवाजवळ आल्या. ॥ १ ॥
|
ततोऽब्रुवन् सुराः सर्वे भगवन्तं पितामहम् ।
प्रणिपत्य सुराराम सेन्द्राः साग्निपुरोगमाः ॥ २ ॥
|
देवतांना आराम देणार्या श्रीरामा ! इंद्र आणि अग्निसहित समस्त देवतांनी भगवान् ब्रह्मदेवांना प्रणाम करून म्हटले - ॥ २ ॥
|
येन सेनापतिर्देव दत्तो भगवता पुरा ।
स तपः परमास्थाय तप्यते स्म सहोमया ॥ ३ ॥
|
"प्रभो ! पूर्वकाली ज्या भगवान महेश्वरांनी आम्हाला (बीजरूपाने) सेनापति प्रदान केला होता, ते उमादेवीसह उत्तम तपाचा आश्रय घेऊन तपस्या करीत आहेत. ॥ ३ ॥
|
यदत्रानन्तरं कार्यं लोकानां हितकाम्यया ।
संविधत्स्व विधानज्ञ त्वं हि नः परमा गतिः ॥ ४ ॥
|
'विधि विधानाचे ज्ञाता पितामह ! आता लोकहितासाठी जे कर्तव्य प्राप्त असेल ते पूर्ण करावे, कारण आपणच आमचा परम आश्रय आहात." ॥ ४ ॥
|
देवतानां वचः श्रुत्वा सर्वलोकपितामहः ।
सान्त्वयन् मधुरैर्वाक्यैस्त्रिदशानिदमब्रवीत् ॥ ५ ॥
|
देवतांचे हे म्हणणे ऐकून संपूर्ण लोकांचे पितामह ब्रह्मदेव मधुर वचनांच्या द्वारे त्यांचे सांत्वन करीत म्हणाले - ॥ ५ ॥
|
शैलपुत्र्या यदुक्तं तन्न प्रजाः स्वासु पत्निषु ।
तस्या वचनमक्लिष्टं सत्यमेव न संशयः ॥ ६ ॥
|
'देवतांनो ! गिरिराजकुमारी पार्वतीने जो शाप दिला आहे त्यास अनुसरून तुम्हाला तुमच्या पत्नींच्या गर्भापासून आता कुठलेही संतान होणार नाही. उमादेवीची वाणी अमोघ आहे म्हणून ती सत्यच ठरणार यात संशय नाही. ॥ ६ ॥
|
इयमाकाशगङ्गा च यस्यां पुत्रं हुताशनः ।
जनयिष्यति देवानां सेनापतिमरिंदमम् ॥ ७ ॥
|
'ही आहे उमेची ज्येष्ठ बहिण आकाशगंगा, जिच्या गर्भात शंकरांचे ते तेज स्थापित करून अग्निदेव एक अशा पुत्राला जन्म देतील की जो देवतांच्या शत्रूंचे दमन करण्यात समर्थ सेनापति होईल. ॥ ७ ॥
|
ज्येष्ठा शैलेन्द्रदुहिता मानयिष्यति तं सुतम् ।
उमायास्तद्बहुमतं भविष्यति न संशयः ॥ ८ ॥
|
ही गंगा गिरिराजाची ज्येष्ठ कन्या आहे म्हणून आपल्या लहान बहिणीच्या त्या पुत्राला आपल्या पुत्राप्रमाणेच मानेल. उमेलाही हे फार प्रिय वाटेल यात संशय नाही.' ॥ ८ ॥
|
तच्छ्रुत्वा वचनं तस्य कृतार्था रघुनन्दन ।
प्रणिपत्य सुराः सर्वे पितामहमपूजयन् ॥ ९ ॥
|
'रघुनन्दना ! ब्रह्मदेवांचे हे वचन ऐकून सर्व देव कृतकृत्य झाले. त्यांनी ब्रह्मदेवांना प्रणाम करून त्यांचे पूजन केले. ॥ ९ ॥
|
ते गत्वा परमं राम कैलासं धातुमण्डितम् ।
अग्निं नियोजयामासुः पुत्रार्थं सर्वदेवताः ॥ १० ॥
|
'श्रीरामा ! विविध धातुंनी अलंकृत उत्तम कैलास पर्वतावर जाऊन त्या सर्व देवतांनी अग्निदेवाला पुत्र उत्पन्न करण्याच्या कार्यात नियुक्त केले. ॥ १० ॥
|
देवकार्यमिदं देव समाधत्स्व हुताशन ।
शैलपुत्र्यां महातेजो गङ्गायां तेज उत्सृज ॥ ११ ॥
|
ते म्हाणाले - 'देवा ! हुताशना ! हे देवतांचे कार्य आहे, हे सिद्ध करावे. भगवान् रुद्राच्या त्या महान् तेजाला आता तू गंगेत स्थापित कर. ॥ ११ ॥
|
देवतानां प्रतिज्ञाय गङ्गामभ्येत्य पावकः ।
गर्भं धारय वै देवि देवतानामिदं प्रियम् ॥ १२ ॥
|
तेव्हां देवतांना 'अति उत्तम' असे म्हणून अग्निदेव गंगेच्या निकट आला आणि म्हणाला, "देवि ! तू हा गर्भ धारण कर. हे देवतांचे प्रिय कार्य आहे.' ॥ १२ ॥
|
इत्येतद् वचनं श्रुत्वा दिव्यं रूपमधारयत् ।
स तस्या महिमां दृष्ट्वा समन्तादवशीर्यत ॥ १३ ॥
|
अग्निदेवाचे म्हणणे ऐकून गंगादेवीने दिव्यरूप धारण केले . तिचा हा महिमा, तिचे रूप, वैभव पाहून अग्निदेवाने त्या रुद्र तेजाला तिच्या सर्व बाजूंनी विखरून टाकले. ॥ १३ ॥
|
समन्ततस्तदा देवीमभ्यषिञ्चत पावकः ।
सर्वस्रोतांसि पूर्णानि गङ्गाया रघुनन्दन ॥ १४ ॥
|
'रघुनन्दना ! अग्निदेवांनी जेव्हां गंगादेवीला सर्व बाजूंनी रुद्रतेजेद्वारा अभिषिक्त केले, तेव्हां गंगेचे सारे स्त्रोत त्या तेजाने परिपूर्ण झाले. ॥ १४ ॥
|
तमुवाच ततो गङ्गा सर्वदेवपुरोगमम् ।
अशक्ता धारणे देव तेजस्तव समुद्धतम् ॥ १५ ॥
दह्यमानाग्निना तेन सम्प्रव्यथितचेतना ।
|
तेव्हां गंगेने समस्त देवतांच्या अग्रभागी अग्निदेवास या प्रकारे सांगितले - 'देवा ! आपल्या द्वारे स्थापित केले गेलेल्या या वाढलेल्या तेजास धारण करण्यास मी असमर्थ आहे. त्याच्या आंचेने मी जळत आहे आणि माझी चेतना व्यथित झालेली आहे. ॥ १५ १/२ ॥
|
अथाब्रवीदिदं गङ्गां सर्वदेवहुताशनः ॥ १६ ॥
इह हैमवते पार्श्वे गर्भोऽयं संनिवेश्यताम् ।
|
तेव्हां सर्व देवतांच्या हविष्याला भोगणार्या अग्निदेवाने गंगादेवीस म्हटले - 'देवि ! हिमाय पर्वताच्या पार्श्वभागी या गर्भाला तू स्थापित कर.' ॥ १६ १/२ ॥
|
श्रुत्वा त्वग्निवचो गङ्गा तं गर्भमतिभास्वरम् ॥ १७ ॥
उत्ससर्ज महातेजाः स्रोतोभ्यो हि तदानघ ।
|
'निष्पाप रघुनन्दना ! अग्निचे असे म्हणणे ऐकून महातेजस्विनी गंगेने त्या अत्यंत प्रकाशमान गर्भास आपल्या स्तोत्रांतून काढून यथोचित स्थानावर ठेऊन दिले. ॥ १७ १/२ ॥
|
यदस्या निर्गतं तस्मात् तप्तजाम्बूनदप्रभम् ॥ १८ ॥
काञ्चनं धरणीं प्राप्तं हिरण्यमतुलप्रभम् ।
ताम्रं कार्ष्णायसं चैव तैक्ष्ण्यादेवाभिजायत ॥ १९ ॥
|
गंगेच्या गर्भापासून जे तेज निघाले, ते तापविलेल्या जाम्बूनद नामक सुवर्णाप्रमाणे कांतिमान् दिसू लागले (गंगा सुवर्णमय मेरुगिरि पासून प्रकट झाली आहे, म्हणून तिचे बालकही तशाच रूप रंगाचे झाले). पृथ्वीवर जेथे जेथे तो तेजस्वी गर्भ स्थापित झाला तेथील भूमि तसेच प्रत्येक वस्तु सुवर्णमय झाली. तिच्या आसपासचा प्रदेश अनुपम प्रभेने प्रकाशित होणार्या रजताचा झाला. त्या तेजाच्या तीव्रतेने दूरवर्ती भूभागातील वस्तु तांबे आणि लोह यांच्या रूपात परिणत झाल्या. ॥ १९ ॥
|
मलं तस्याभवत् तत्र त्रपु सीसकमेव च ।
तदेतद्धरणीं प्राप्य नानाधातुरवर्धत ॥ २० ॥
|
त्या तेजस्वी गर्भाचा जो मळ होता तो तेथेच कथील आणि शिसे झाला. या प्रकारे पृथ्वीवर पडून ते तेज नाना प्रकारच्या धातूंच्या रूपाने वृद्धि पावले. ॥ २० ॥
|
निक्षिप्तमात्रे गर्भे तु तेजोभिरभिरञ्जितम् ।
सर्वं पर्वतसन्नद्धं सौवर्णमभवद् वनम् ॥ २१ ॥
|
तो गर्भ पृथ्वीवर ठेवला जाताच त्याच्या तेजाने व्याप्त होऊन पूर्वोक्त श्वेतपर्वत आणि त्याच्याशी संबंधीत असणारे सारे वन सुवर्णमय होऊन झगमगू लागले. ॥ २१ ॥
|
जातरूपमिति ख्यातं तदाप्रभृति राघव ।
सुवर्णं पुरुषव्याघ्र हुताशनसमप्रभम् ।
तृणवृक्षलतागुल्मं सर्वं भवति काञ्चनम् ॥ २२ ॥
|
पुरुषसिंह रघुनन्दना ! तेव्हांपासून अग्निसमान प्रकाशित होणार्या सुवर्णाचे नाव जातरूप असे झाले. कारण, त्यावेळीच सुवर्णाचे तेजस्वी रूप प्रकट झाले होते. त्या गर्भाच्या संपर्काने तेथील तृण, वृक्ष, लता आणि गुल्म - सर्व काही सोन्याचे होऊन गेले. २२ ॥
|
तं कुमारं ततो जातं सेन्द्राः सह मरुद्गणाः ।
क्षीरसम्भावनार्थाय कृत्तिकाः समयोजयन् ॥ २३ ॥
|
त्यानंतर इंद्र आणि मरुद्गणांसहित सर्व देवतांनी तेथे उत्पन्न झालेल्या कुमाराला दूध पाजण्यासाठी सहा कृत्तिकांना नियुक्त केले. ॥ २३ ॥
|
ताः क्षीरं जातमात्रस्य कृत्वा समयमुत्तमम् ।
ददुः पुत्रोऽयमस्माकं सर्वासामिति निश्चिताः ॥ २४ ॥
|
तेव्हां त्या कृत्तिकांनी 'हा आमचा सर्वांचा पुत्र व्हावा' अशी उत्तम अट घालून आणि या गोष्टीसंबंधी निश्चित विश्वास उत्पन्न झाल्यावर त्या नवजात बालकाला आपले दूध प्रदान केले. ॥ २४ ॥
|
ततस्तु देवताः सर्वाः कार्तिकेय इति ब्रुवन् ।
पुत्रस्त्रैलोक्यविख्यातो भविष्यति न संशयः ॥ २५ ॥
|
त्या समयी सर्व देवता म्हणाल्या, 'हा बालक कार्तिकेय म्हणून संबोधला जाईल आणि हा तुमचा त्रिभुवन विख्यात पुत्र होईल, यात संशय नाही. ॥ २५ ॥
|
तेषां तद् वचनं शृत्वा स्कन्नं गर्भपरिस्रवे ।
स्नापयन् परया लक्ष्म्या दीप्यमानं यथानलम् ॥ २६ ॥
|
देवतांचे ते अनुकूल वचन ऐकून, शिव आणि पार्वती यांच्यापासून स्कन्दित (स्खलित) आणि गंगेच्या द्वारा गर्भस्राव झाल्यावर प्रकट झालेल्या अग्निसमान उत्तम प्रभेने प्रकाशित होणार्या त्या बालकाला कृत्तिकांनी न्हाऊ घातले. ॥ २६ ॥
|
स्कन्द इत्यब्रुवन् देवाः स्कन्नं गर्भपरिस्रवे ।
कार्तिकेयं महाबाहुं काकुत्स्थ ज्वलनोपमम् ॥ २७ ॥
|
काकुत्स्थकुलभूषण श्रीरामा ! अग्नितुल्य तेजस्वी महाबाहु कार्तिकेय गर्भस्त्रावकालांत स्कन्दित झाले होते म्हणून देवतांनी त्यांना 'स्कन्द' म्हणून संबोधले. ॥ २७ ॥
|
प्रादुर्भूतं ततः क्षीरं कृत्तिकानामनुत्तमम् ।
षण्णां षडाननो भूत्वा जग्राह स्तनजं पयः ॥ २८ ॥
|
तदनंतर कृत्तिकांच्या स्तनांत परम उत्तम दूध प्रकट झाले. त्यावेळी स्कन्दाने आपली सहा मुखे प्रकट करून त्या सहाजणींचे एकाच वेळी स्तनपान केले ॥ २८ ॥
|
गृहीत्वा क्षीरमेकाह्ना सुकुमारवपुस्तदा ।
अजयत् स्वेन वीर्येण दैत्यसैन्यगणान् विभुः ॥ २९ ॥
|
एकच दिवस दूध पिऊन त्या सुकुमार शरीराच्या शक्तिशाली कुमाराने आपल्या पराक्रमाने दैत्यांच्या सार्या सेनांवर विजय प्राप्त केला. ॥ २९ ॥
|
सुरसेनागणपतिमभ्यषिञ्चन्महाद्युतिम् ।
ततस्तममराः सर्वे समेत्याग्निपुरोगमाः ॥ ३० ॥
|
त्यानंतर अग्नि आदि सर्व देवतांनी मिळून त्या महातेजस्वी स्कन्दाचा देवसेनापतिच्या पदावर अभिषेक केला. ॥ ३० ॥
|
एष ते राम गङ्गाया विस्तरोऽभिहितो मया ।
कुमारसम्भवश्चैव धन्यः पुण्यस्तथैव च ॥ ३१ ॥
|
श्रीरामा ! ही मी तुला गंगेची चरित्रकथा विस्तारपूर्वक सांगितली आहे. त्याच बरोबर कुमार कार्तिकेयाच्या जन्माचाही प्रसंग ऐकविला आहे; जो श्रोत्याला धन्य आणि पुण्यात्मा बनविणारा आहे. ॥ ३१ ॥
|
भक्तश्च यः कार्तिकेये काकुत्स्थ भुवि मानवः ।
आयुष्मान् पुत्रपौत्रैश्च स्कंदसालोक्यतां व्रजेत् ॥ ३२ ॥
|
काकुत्स्थ ! या पृथ्वीवर जो मनुष्य कार्तिकेयाच्या ठिकाणी भक्तिभाव ठेवतो, तो या लोकात दीर्घायु आणि पुत्र-पौत्रांनी संपन्न होऊन मृत्युनंतर स्कन्दलोकास जातो. ॥ ३२ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे सप्तत्रिंशः सर्गः ॥ ३७ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सदतीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३७ ॥
|