॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अयोध्याकाण्ड ॥

॥ अष्टमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



भरताचे वनाकडे प्रस्थान, वाटेत गुह व भरद्वाज यांची भेट आणि चित्रकूटदर्शन -


श्रीमहादेव उवाच -
वसिष्ठो मुनिभिः सार्धं मंत्रिभिः परिवारितः ।
राज्ञः सभां देवसभासन्निभामविशद्विभुः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- एके दिवशी मुनीश्वर आणि मंत्री यांच्यासह भगवान वसिष्ठ हे देवसभेप्रमाणे असणाऱ्या राजसभेत प्रविष्ट झाले. (१)

तत्रासने समासीनश्चतुर्मुख इवापरः ।
आनीय भरतं तत्र उपवेश्य सहानुजम् ॥ २ ॥
चतुर्मुख ब्रह्मदेवांप्रमाणे असणारे वसिष्ठ तेथे आसनावर विराजमान झाले. नंतर त्यांनी शत्रुघ्नासह भरताला तेथे बोलावून घेतले आणि त्याला आसनावर बसविले. (२)

अब्रवीद्वचनं देशकालोचितमरिन्दमम् ।
वत्स राज्येऽभिषेक्ष्यामस्त्वामद्य पितृशासनात् ॥ ३ ॥
नंतर देश व काल यांना उचित असे वचन वसिष्ठ शत्रुघातक भरताला बोलले, "वत्सा, तुझ्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे आज आम्ही तुला राज्यपदावर अभिषेक करणार आहोत. (३)

कैकेय्या याचितं राज्यं त्वदर्थे पुरुषर्षभ ।
सत्यसन्धो दशरथः प्रतिज्ञाय ददौ किल ॥ ४ ॥
हे पुरुषश्रेष्ठा, तुझ्यासाठी कैकेयीने राज्य मागून घेतले होते, म्हणून सत्यप्रतिज्ञ राजांनी प्रतिज्ञा करून ते राज्य तुला दिले आहे. (४)

अभिषेको भवत्वद्य मुनिभिर्मंत्रपूर्वकम् ।
तच्छ्रुत्वा भरतोऽप्याह मम राज्येन किं मुने ॥ ५ ॥
म्हणून आता मुनींच्या द्वारा मंत्रोच्चारपूर्वक राज्याभिषेक होऊ दे." ते वचन ऐकून भरतसुद्धा म्हणाला, "अहो मुनिनाथ, मला राज्य कशाला ? (५)

रामो राजाधिराजश्च वयं तस्यैव किङ्‌कराः ।
श्वःप्रभाते गमिष्यामो राममानेतुमञ्जसा ॥ ६ ॥
अहं यूयं मातरश्च कैकेयीं राक्षसीं विना ।
हनिष्याम्यधुनैवाहं कैकेयीं मातृगन्धिनीम् ॥ ७ ॥
किन्तु मां नो रघुश्रेष्ठः स्त्रीहन्तारं सहिष्यते ।
तच्छ्‍वोभूते गमिष्यामि पादचारेण दण्डकान् ॥ ८ ॥
शत्रुघ्नसहितस्तूर्णं यूयमायात वा न वा ।
रामो यथा वने यातः तथाहं वल्कलाम्बरः ॥ ९ ॥
फलमूलकृताहारः शत्रुघ्नसहितो मुने ।
भूमिशायी जटाधारी यावद्‍रामो निवर्तते ॥ १० ॥
खरे म्हणजे श्रीराम हेच राजाधिराज आहेत आणि आम्ही त्यांचेच सेवक आहोत. म्हणून मी, तुम्ही आणि राक्षसिणीसारख्या कैकेयीखेरीज इतर माता, असे आपण सर्व जण रामांना परत आणण्यासाठी उद्या सकाळीच त्वरेने वनाकडे जाऊ या. नाममात्र माता असणार्‍या कैकेयीला मी आत्ताच ठार केले असते. परंतु स्त्रीची हत्या केल्यास मला रघुश्रेष्ठ राम क्षमा करणार नाहीत. तेव्हा उद्याचा दिवस उजाडताच मी शत्रुघ्नासह पायी पायी दंडकारण्यात जाणार आहे. तुम्ही या अगर येऊ नका. ज्या प्रकारे राम वनात गेले त्याच प्रकारे राम परत येत नाहीत तोपर्यंत, शत्रुघ्नासह मी वल्कले आणि जटा धारण करून, फळे, मुळे यांचाच आहार करीत जमिनीवर झोपेन." (६-१०)

इति निश्चित्य भरतस्तूष्णीमेवावतस्थिवान् ।
साधुसाध्विति तं सर्वे प्रशशंसुर्मुदान्विताः ॥ ११ ॥
असा आपला निश्चय सांगून भरत गप्प बसला. 'छान ! छान !' असे म्हणत आनंदाने युक्त होऊन सर्व लोकांनी त्याची प्रशंसा केली. (११)

ततः प्रभाते भरतं गच्छन्तं सर्वसैनिकाः ।
अनुजग्मुः सुमंत्रेण नोदिताः साश्वकुञ्जराः ॥ १२ ॥
त्यानंतर दुसरे दिवशी प्रातःकाळी भरत निघाल्यावर, सुमंत्राने प्रेरणा दिलेले सर्व सैनिक, हत्ती व घोडे यांच्यासह त्याच्या मागोमाग निघाले. (१२)

कौसल्याद्या राजदारा वसिष्ठप्रमुखा द्विजाः ।
छादयन्तो भुवं सर्वे पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ॥ १३ ॥
कौसल्या इत्यादी राजस्त्रिया, वसिष्ठ इत्यादी द्विजगण असे सर्व जण पृथ्वीला आच्छादित करीत, त्याच्या मागे, पुढे, दोन्ही बाजूंनी यथायोग्य रीतीने निघाले. (१३)

शृङ्‌गवेरपुरं गत्वा गङ्‌गाकूले समन्ततः ।
उवास महती सेना शत्रुघ्नपरिचोदिता ॥ १४ ॥
शंगवेर नगरीस पोचल्यावर, शत्रुघ्नाने प्रेरणा दिलेली ती मोठी सेना गंगानदीच्या तीरावर सगळीकडे तळ ठोकून राहिली. (१४)

आगतं भरतं श्रुत्वा गुहः शङ्‌कितमानसः ।
महत्या सेनया सार्धमागतो भरतः किल ॥ १५ ॥
पापं कर्तुं न वा याति रामस्याविदितात्मनः ।
गत्वा तद्‍धृदयं ज्ञेयं यदि शुद्धस्तरिष्यति ॥ १६ ॥
गङ्‌गा नो चेत्समाकृष्य नावस्तिष्ठन्तु सायुधाः ।
ज्ञातयो मे समायत्ताः पश्यन्तः सर्वतोदिशम् ॥ १७ ॥
भरत आला आहे हे ऐकल्यांवर, गुहाच्या मनात शंका आली की मोठी सेना बरोबर घेऊन भरत येथे आला आहे. श्रीरामांना काहीच कल्पना नाही, असे काहीतरी वाईट कृत्य करण्यास तर तो आले ला नसेल ना ? तेव्हा त्याच्याजवळ जाऊन त्याचे मन जाणून घ्यावयास हवे. जर त्याचा भाव शुद्ध असेल तरच तो माझ्या मदतीने गंगा नदी ओलांडून जाईल. नाहीतर माझे ज्ञातिबांधव हातात शस्त्रे घेऊन, नावा खेचून काढून उभ्या करतील आणि सगळ्या विशांकडे लक्ष ठेवून सावध राहतील. (१५-१७)

इति सर्वान्समादिश्य गुहो भरतमागतः ।
उपायनानि संगृह्य विविधानि बहून्यपि ॥ १८ ॥
अशा प्रकारे आपल्या सर्व ज्ञातिबांधवांना आज्ञा करून आणि नाना प्रकारचे पुष्कळ नजराणे घेऊन गुह भरताकडे गेला. (१८)

प्रययौ ज्ञातिभिः सार्धं बहुभिर्विविधायुधैः ।
निवेद्योपयानान्यग्रे भरतस्य समन्ततः ॥ १९ ॥
दृष्ट्‍वा भरतमासीनं सानुजं सह मंत्रिभिः ।
चीराम्बरं घनश्यामं जटामुकुटधारिणम् ॥ २० ॥
राममेवानुशोचन्तं रामरामेति वादिनम् ।
ननाम शिरसा भूमौ गुहोऽहमिति चाब्रवीत् ॥ २१ ॥
विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रे धारण करणार्‍या ज्ञातिबांधवांसह तो भरताकडे पोचला आणि भरताच्या पुढे त्याने सर्व नजराणे ठेवले. जेव्हा त्याने सगळीकडे पाहिले तेव्हा त्याला दिसले की वल्कल वस्त्र धारण केलेला, मेघाप्रमाणे श्याम, जटारूपी मुकुट धारण करणारा, रामांबद्दल शोक करणारा, 'राम राम' असे तोंडाने म्हणणारा व धाकटा भाऊ बरोबर असणारा भरत मंत्र्यांच्या समवेत बसलेला आहे. ते पाहून निषादराज गुहाने जमिनीवर मस्तक ठेवून 'मी गुह आहे' असे म्हणून भरताला नमस्कार केला. (१९-२१)

शीघ्रमुत्थाप्य भरतो गाढमालिङ्‌ग्य सादरम् ।
पृष्ट्‍वानामयमव्यग्रः सखायमिदमब्रवीत् ॥ २२ ॥
झट्दिशी गुहाला उठवून आदरपूर्वक भरताने त्याला आलिंगन दिले आणि शांतपणे त्याचे कशल विचारले. नंतर मोकळ्या मनाने तो गुहाला मित्रत्वाने म्हणाला. (२२)

भ्रातस्त्वं राघवेणात्र समेतः समवस्थितः ।
रामेणालिङ्‌गितः सार्द्रनयनेनामलात्मना ॥ २३ ॥
"हे बंधो, तू रामचंद्रांबरोबर येथे राहिला होतास. आणि निर्मळ मनाच्या हर्षाश्रुपूर्ण नेत्र असलेल्या श्रीरामांनी तुला आलिंगन दिले होते. (२३)

धन्योऽसि कृतकृत्योऽसि यत्त्वया परिभाषितः ।
रामो राजीवपत्राक्षो लक्ष्मणेन च सीतया ॥ २४ ॥
लक्षमण व सीता बरोबर असणार्‍या, कमलपत्राप्रमाणे नेत्र असणार्‍या श्रीरामांनी तुझ्याबरोबर संभाषण केले होते. यामुळे तू धन्य झाला आहेस, तुझे जीवन सफल झाले आहे. (२४)

यत्र रामस्त्वया दृष्टस्तत्र मां नय सुव्रत ।
सीतया सहितो यत्र सुप्तस्तद्दर्शयस्व मे ॥ २५ ॥
हे सुव्रता, तू श्रीरामांना जेथे पाहिलेस तेथे तू मला ने. तसेच सीतेसह राम जेथे झोपले होते, ते स्थान तू मला दाखव. (२५)

त्वं रामस्य प्रियतमो भक्तिमानसि भाग्यवान् ।
इति संस्मृत्य संस्मृत्य रामं साश्रुविलोचनः ॥ २६ ॥
तू रामांचा प्रियतम मित्र आणि रामांची भक्ती करणारा आहेस. म्हणून तू भाग्यवान आहेस." असे बोलताना श्रीरामांची पुनः पुनः आठवण केल्याने, भरताचे डोळे अश्रूंनी भरून गेले. (२६)

गुहेन सहितस्तत्र यत्र रामः स्थितो निशि ।
ययौ ददर्श शयनस्थलं कुशसमास्तृतम् ॥ २७ ॥
सीताऽऽभरणसंलग्नस्वर्णबिन्दुभिरर्चितम् ।
दुःखसन्तप्तहृदयो भरतः पर्यदेवयत् ॥ २८ ॥
रात्री राम जेथे झोपले होते तेथे भरत गुहाबरोबर गेला. नंतर ज्यावर कुश गवत पसरले होते आणि सीतेच्या अलंकारातून गळून पडलेल्या सुवर्ण- मण्यांनी जे सुशोभित झाले होते, असे ते रामांचे शयन-स्थान भरताने पाहिले. तेव्हा दुःखाने व्याकूळ झालेला तो भरत शोक करू लागला. (२७-२८)

अहोऽतिसुकुमारी या सीता जनकनन्दिनी ।
प्रासादे रत्‍नपर्यङ्‌के कोमलास्तरणे शुभे ॥ २९ ॥
रामेण सहिता शेते सा कथं कुशविष्टरे ।
सीता रामेण सहिता दुःखेन मम दोषतः ॥ ३० ॥
"अहो ! अतिशय सुकुमार जनककन्या सीता प्रासादातील मऊ आवरण असणार्‍या व सुंदर अशा रत्‍नजडित पलंगावर रघुनाथासह झोपत असे, तीच माझ्यामुळे रामासह कुशांच्या बिछान्यावर दुःखाने कशी बरे झोपली असेल ? (२९-३०)

धिङ्‌मां जातोऽस्मि कैकेय्या पापराशिसमानतः ।
मन्निमित्तमिदं क्लेशं रामस्य परमात्मनः ॥ ३१ ॥
माझा धिक्कार असो ! पापाच्या राशीप्रमाणे असणार्‍या कैकेयीपासून मी उत्पन्न झालो. म्हणूनच माझ्या निमित्तानेच परमात्म्या रामांना हे क्लेश सहन करावे लागले. (३१)

अहोऽतिसफलं जन्म लक्ष्मणस्य महात्मनः ।
राममेव सदान्वेति वनस्थमपि हृष्टधीः ॥ ३२ ॥
अहाहा ! जो लक्ष्मण आनंदित मनाने वनातही श्रीरामांच्या मागोमाग नेहमी जातो; त्या महात्म्या लक्ष्मणाचा जन्म अतिशय सफल होय. (३२)

अहं रामस्य दासा ये तेषां दासस्य किङ्‌करः ।
यदि स्यां सफलं जन्म मम भूयान्न संशयः ॥ ३३ ॥
श्रीरामांचे जे दास आहेत त्यांच्या दासांचा दास जर मी होईन, तरच माझा जन्म सफल होईल, यात संशय नाही. (३३)

भ्रातर्जानासि यदि तत्कथयस्व ममाखिलम् ।
यत्र तिष्ठति तत्राहं गच्छाम्यानेतुमञ्जसा ॥ ३४ ॥
हे बंधो गुहा, जर तुला माहीत असेल तर मला सांग की श्रीराम कुठे आहेत ? त्यांना लगेच परत नेण्यासाठी मी तेथे जाणार आहे." (३४)

गुहस्तं शुद्धहृदयं ज्ञात्वा सस्नेहमब्रवीत् ।
देव त्वमेव धन्योऽसि यस्य ते भक्तिरीदृशी ॥ ३५ ॥
रामे राजीवपत्राक्षे सीतायां लक्ष्मणे तथा ।
चित्रकूटाद्रिनिकटे मन्दाकिन्यविदूरतः ॥ ३६ ॥
मुनीनामाश्रमपदे रामस्तिष्ठति सानुजः ।
जानक्या सहितो नन्दात्सुखमास्ते किल प्रभुः ॥ ३७ ॥
भरताचे हृदय शुद्ध आहे हे पाहून गुह स्नेहपूर्वक त्याला म्हणाला,"स्वामी, कमलपत्राप्रमाणे नेत्र असणारे श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या ठिकाणी तुझी अशी शुद्ध भक्ती आहे. तू खरोखर धन्य आहेस. मंदाकिनी नदीच्या जवळील चित्रकूट पर्वताच्याजवळ, श्रीराम आपल्या लहान भावासह मुनींच्या आश्रमस्थानी राहात आहेत. तेथे जानकीसह प्रभू श्रीराम आनंदाने सुखात राहात आहेत. (३५-३७)

तत्र गच्छामहे शीघ्रं गङ्‌गां तर्तुमिहार्हसि ।
इत्युक्त्वा त्वरितं गत्वा नावः पञ्चशतानि ह ॥ ३८ ॥
समानयत्ससैन्यस्य तर्तुं गङ्‌गां महानदीम् ।
स्वयमेवानिनायैकां राजनावं गुहस्तदा ॥ ३९ ॥
चल. आपण तेथे लवकर जाऊ. प्रथम येथे गंगा नदी पार करून घे." असे सांगून तो त्वरित निघून गेला. सैन्यासह भरताला महानदी गंगा तरून जाता यावी म्हणून त्याने पाचशे नौका आणवून घेतल्या, आणि राजाला शोभेल अशी एक नौका त्या वेळी गुहाने स्वतःच आणली. (३८-३९)

आरोप्य भरतं तत्र शत्रुघ्नं राममातरम् ।
वसिष्ठं च तथान्यत्र कैकेयीं चान्ययोषितः ॥ ४० ॥
त्या नावेत त्याने भरत, शत्रुघ्न, रामाची माता आणि वसिष्ठ यांना बसविले. आणि दुसर्‍या एका नावेत त्याने कैकेयी आणि अन्य राजस्त्रियांना बसविले. (४०)

तीर्त्वा गङ्‌गां ययौ शीघ्रं भरद्वाजाश्रमं प्रति ।
दूरे स्थाप्य महासैन्यं भरतः सानुजो ययौ ॥ ४१ ॥
गंगा नदी झटपट पार करून भरत भरद्वाजांच्या आश्रमाकडे निघाला. आश्रमापासून एका दूर स्थानी आपले मोठे सैन्य ठेवून, शत्रुघ्नासह भरत त्या आश्रमाकडे निघाला. (४१)

आश्रमे मुनिमासीनं ज्वलन्तमिव पावकम् ।
दृष्ट्‍वा ननाम भरतः साष्टाङ्‌गमतिभक्तितः ॥ ४२ ॥
प्रज्वलित अग्नीप्रमाणे तेजस्वी असणार्‍या त्या मुनींना आश्रमात बसलेले पाहून, भरताने अतिशय भक्तीने साष्टांग प्रणिपात केला. (४२)

ज्ञात्वा दाशरथिं प्रीत्या पूजयामास मौनिराट् ।
पप्रच्छ कुशलं दृष्ट्‍वा जटावल्कलधारिणम् ॥ ४३ ॥
राज्यं प्रशासतस्तेऽद्य किमेतद्वल्कलादिकम् ।
आगतोऽसि किमर्थं त्वं विपिनं मुनिसेवितम् ॥ ४४ ॥
तो राजा दशरथांचा पुत्र आहे हे कळल्यावर, त्या वेळी त्या मुनीश्वरांनी त्याचा प्रेमाने सत्कार केला व त्याचे कुशल विचारले. नंतर जटा आणि वल्कले धारण करणार्‍या त्या भरताला पाहिल्यावर ते मुनी म्हणाले, "राज्याचे प्रशासन करणार्‍या तू आज ही वल्कले इत्यादी का धारण केली आहेस ? आणि जेथे मुनी आश्रय घेतात अशा या वनात तू का आला आहेस ?" (४३-४४)

भरद्वाजवचः श्रुत्वा भरतः साश्रुलोचनः ।
सर्वं जानासि भगवन् सर्वभूताशयस्थितः ॥ ४५ ॥
तथापि पृच्छसे किञ्चित्तदनुग्रह एव मे ।
कैकेय्या मत्कृतं कर्म रामराज्यविघातनम् ॥ ४६ ॥
वनवासादिकं वापि न हि जानामि किञ्चन ।
भवत्पादयुगं मेऽद्य प्रमाणं मुनिसत्तम ॥ ४७ ॥
भरद्वाजांचे वचन ऐकल्यावर, डोळ्यांत अश्रू आणून भरत बोलला, "अहो भगवन, सर्व भूतांच्या मनात राहणार्‍या तुम्हांला सर्व काही माहीत आहे. तथापि तुम्ही पृच्छा करीत आहात, ही गोष्ट म्हणजे तुमचा माझ्यावर थोडासा अनुग्रहच आहे. श्रीरामांच्या राज्याभिषेकात विघ्न आणणे आणि रामाला वनवास देणे इत्यादी जे काही कर्म कैकेयीने केले, त्या बाबतीत मला काहीही माहीत नव्हते. या बाबतीतही हे मुनिश्रेष्ठा, तुमचे पादयुगुल हेच मला आज प्रमाण आहेत." (४५-४७)

इत्युक्त्वा पादयुगलं मुनेः स्पृष्ट्‍वार्त्तमानसः ।
ज्ञातुमर्हसि मां देव शुद्धो वाशुद्ध एव वा ॥ ४८ ॥
असे सांगून आर्त चित्त झालेल्या भरताने मुनींच्या चरण युगुलाला स्पर्श करून म्हटले, "हे देवा, मी दोषी आहे की निर्दोष आहे हे जाणण्यास तुम्हीच योग्य आहात. (४८)

मम राज्येन किं स्वामिन् रामे तिष्ठति राजनि ।
किङ्‌करोऽहं मुनिश्रेष्ठ रामचन्द्रस्य शाश्वतः ॥ ४९ ॥
अहो स्वामी, महाराज राम विद्यमान असताना, मी राज्य का करावे ? अहो मुनिश्रेष्ठा, मी श्रीरामचंद्रांचा नित्य वारा आहे. (४९)

अतो गत्वा मुनिश्रेष्ठ रामस्य चरणान्तिके ।
पतित्वा राज्यसम्भारान् समर्प्यात्रैव राघवम् ॥ ५० ॥
म्हणून हे मुनिश्रेष्ठा, श्रीरामांच्या चरणांजवळ जाऊन, मी त्यांच्या पाया पडीन, आणि येथेच सर्व राज्याभिषेकाची सामग्री श्रीरामांना अर्पण करीन. (५०)

अभिषेक्ष्ये वसिष्ठाद्यैः पौरजानपदैः सह ।
नेष्येऽयोध्यां रमानाथं दासः सेवेतिनीचवत् ॥ ५१ ॥
वसिष्ठ इत्यादी तसेच नगरवासी व ग्रामवासी यांच्यासह मी रामांना अभिषेक करीन आणि त्यांना अयोध्येला नेईन. नंतर अतिशय सामान्य माणसाप्रमाणे त्यांचा दास होऊन मी त्या लक्ष्मीपती श्रीरामांची सेवा करीन." (५१)

इत्युदीरितमाकर्ण्यं भरतस्य वचो मुनिः ।
आलिङ्‌ग्य मूर्ध्न्यवघ्राय प्रशशंस सविस्मयः ॥ ५२ ॥
भरताने उच्चारले वचन ऐकल्यावर अत्यंत आश्चर्यचकित होऊन मुनींनी त्याला आलिंगन देऊन त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले, त्याची स्तुती केली आणि त्याला म्हटले. (५२)

वत्स ज्ञातं पुरैवैतद्‌भविष्यं ज्ञानचक्षुषा ।
मा शुचस्त्वं परो भक्तः श्रीरामे लक्ष्मणादपि ॥ ५३ ॥
" वत्सा, हे मी पूर्वीच ज्ञानदृष्टीने जाणले होते. तू शोक करू नकोस. लक्ष्मणापेक्षासुद्धा तू श्रीरामांचा श्रेष्ठ भक्त आहेस. (५३)

आतिथ्यं कर्तुमिच्छामि ससैन्यस्य तवानघ ।
अद्य भुक्त्वा ससैन्यस्त्वं श्वो गन्ता रामसन्निधिम् ॥ ५४
हे पुण्यशील भरता, तुझ्या सैन्यासह तुझा आदर-सत्कार करण्याची माझी इच्छा आहे. आज तू सैन्यासह येथेच भोजन करून उद्या रामांजवळ जावेस." (५४)

यथाज्ञापयति भवांस्तथेति भरतोऽब्रवीत् ।
भरद्वाजस्त्वपः स्पृष्ट्‍वा मौनी होमगृहे स्थितः ॥ ५५ ॥
"जशी आपली आज्ञा." असे भरत म्हणाला. त्यानंतर पाण्याने आचमन करून, मौन धारण करून, मुनी भरद्वाज यज्ञशाळेमध्ये बसले. (५५)

दध्यौ कामदुघां कामवर्षिणीं कामदो मुनिः ।
असृजत्कामधुक्सर्वं यथाकामं अलौकिकम् ॥ ५६ ॥
आणि त्यांनी सर्व इच्छा पूर्ण करणार्‍या कामधेतूचे ध्यान केले. तेव्हा त्या कामधेनूने सर्वांच्या इच्छेनुसार सर्व अलौकिक खाद्य पदार्थ निर्माण केले. (५६)

भरतस्य ससैन्यस्य यथेष्टं च मनोरथम् ।
यथा ववर्ष सकलं तृप्तास्ते सर्वसैनिकाः ॥ ५७ ॥
सैन्यासकट भरताच्या इच्छेप्रमाणे त्या कामधेनूने सर्व मनोरथ अशा प्रकारे पूर्ण केले की सर्व सैनिक संतुष्ट झाले. (५७)

वसिष्ठं पूजयित्वाग्रे शास्त्रदृष्टेन कर्मणा ।
पश्चात्ससैन्यं भरतं तर्पयामास योगिराट् ॥ ५८ ॥
त्यानंतर शास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे प्रथम त्या योगिराज मुनींनी वसिष्ठांची पूजा केली आणि सर्व सैन्यासह भरताला तृप्त केले. (५८)

उषित्वा दिनमेकं तु आश्रमे स्वर्गसन्निभे ।
अभिवाद्य पुनः प्रातर्भरद्वाजं सहानुजः ।
भरतस्तु कृतानुज्ञः प्रययौ रामसन्निधिम् ॥ ५९ ॥
त्यानंतर स्वर्गसदृश अशा त्या आश्रमात एक दिवस राहून, प्रातःकाळी पुनः भरद्वाजांना अभिवादन करून व अनुज्ञा घेऊन, भरत आपल्या धाकट्या भावासह रामांजवळ जाण्यास निघाला. (५९)

चित्रकूटमनुप्राप्य दूरे संस्थाप्य सैनिकान् ।
रामसंदर्शनाकाङ्‌क्षी प्रययौ भरतः स्वयम् ॥ ६० ॥
चित्रकूट पर्वताच्याजवळ पोचल्यावर, सर्व सैनिकांना दूरच थांबण्यास सांगून श्रीरामांच्या दर्शनासाठी भरत स्वतःच पुढे निघाला. (६०)

शत्रुघ्नेन सुमंत्रेण गुहेन च परन्तपः ।
तपस्विमण्डलं सर्वं विचिन्वानो न्यवर्तत ॥ ६१ ॥
शत्रुघ्न, सुमंत्र आणि गुह यांच्यासह शत्रुपीडक भरताने सर्व तपस्वी लोकात शोध घेतला. पण राम न दिसल्याने तो परत फिरला. (६१)

अदृष्ट्‍वा रामभवनमपृच्छदृषिमण्डलम् ।
कुत्रास्ते सीतया सार्धं लक्ष्मणेन रघूत्तमः ॥ ६२ ॥
श्रीरामांची कुटी न दिसल्याने त्याने ऋषिमंडळींना विचारले, "सीता आणि लक्ष्मण यांच्यासह असणारे रघूत्तम राम कुठे राहात आहेत ?" (६२)

ऊचुरग्रे गिरेः पश्चाद्‍‌गङ्‌गाया उत्तरे तटे ।
विविक्तं रामसदनं रम्यं काननमण्डितम् ॥ ६३ ॥
ते म्हणाले, "पुढे दिसणार्‍या पर्वताच्या पलीकडील बाजूस, गंगेच्या उत्तर तटावर, वनामध्ये शोभणारी व रम्य अशी रामाची कुटी एकांत स्थानी आहे. (६३)

सफलैराम्रपनसैः कदलीखण्डसंवृतम् ।
चम्पकैः कोविदारैश्च पुन्नागैर्विपुलैस्तथा ॥ ६४ ॥
फळांनी भरलेल्या, आंबे व फणस वृक्षांनी आणि पुष्कळ चंपक, कोविदार तसेच पुन्नाग आणि केळी यांनी वेढलेली अशी कुटी आहे." (६४)

एवं दर्शितमालोक्य मुनिभिर्भरतोऽग्रतः ।
हर्षाद्ययौ रघुश्रेष्ठ भवनं मंत्रिणा सह ॥ ६५ ॥
अशा प्रकारे मुनींनी सांगितल्यावर, मंत्र्यांचे सह भरत आनंदाने सर्वात प्रथम रघुनाथांच्या निवासस्थानाकडे निघाला. (६५)

ददर्श दूरादतिभासुरं शुभं
     रामस्य गेहं मुनिवृन्दसेवितम् ।
वृक्षाग्रसंलग्नसुवल्कलाजिनं
     रामाभिरामं भरतः सहानुजः ॥ ६६ ॥
पुढे गेल्यावर दुरूनच भरत-शत्रुघ्न यांनी अतिशय प्रकाशमान, अतिशय सुंदर, आणि मुनिजनांनी सेविलेला श्रीरामांचा आश्रम पाहिला. तेथे वृक्षाच्या शाखांवर चांगली वल्कले आणि मृगाजिने टांगलेली होती आणि श्रीरामांच्या निवासाने ते स्थान रमणीय झाले होते. (६६)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
अयोध्याकाण्डे अष्टमः सर्गः ॥ ८ ॥
इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डातील आठवा सर्गः समाप्त ॥ ८ ॥


GO TOP