श्रीरामरावणयोर्घोरं युद्धम् -
|
श्रीराम आणि रावणाचे घोर युद्ध -
|
ततः प्रवृत्तं सुक्रूरं रामरावणयोस्तदा । सुमहद् द्वैरथं युद्धं सर्वलोकभयावहम् ।। १ ।।
|
त्यानंतर श्रीराम आणि रावण यांच्यात अत्यंत क्रूरतापूर्वक महान् द्वैरथ युद्ध आरंभ झाले जे समस्त लोकांसाठी भयंकर होते. ॥१॥
|
ततो राक्षससैन्यं च हरीणां च महद्बलम् । प्रगृहीतप्रहरणं निश्चेष्टं समवर्तत ।। २ ।।
|
त्यासमयी राक्षस आणि वानरांच्या विशाल सेना हातात हत्यारे असूनही निश्चेष्ट उभ्या राहिल्या होत्या, कुणी कुणावर प्रहार करीत नव्हते. ॥२॥
|
सम्प्रयुद्धौ ततो दृष्ट्वा बलवन्नरराक्षसौ । व्याक्षिप्तहृदयाः सर्वे परं विस्मयमागताः ।। ३ ।।
|
मनुष्य आणि निशाचर, दोन्ही वीरांना बलपूर्वक युद्ध करतांना पाहून सर्वांची हृदये त्यांच्याकडेच खेचली गेली म्हणून सर्वच मोठ्या आश्चर्यात पडले. ॥३॥
|
नानाप्रहरणैर्व्यग्रैः भुजैर्विस्मितबुद्धयः । तस्थुः प्रेक्ष्य च सङ्ग्रामं नाभिजग्मुः परस्परम् ।। ४ ।।
|
दोन्ही बाजूच्या सैनिकांच्या हातात नाना प्रकारची अस्त्रे-शस्त्रे विद्यमान् होती आणि त्यांचे हात युद्धासाठी व्यग्र होते तथापि तो अद्भुत संग्राम पाहून त्यांची बुद्धि आश्चर्यचकित होऊन गेली होती, म्हणून ते गुपचुप उभे होते. एक दुसर्यावर प्रहार करत नव्हते. ॥४॥
|
रक्षसां रावणं चापि वानराणां च राघवम् । पश्यतां विस्मिताक्षाणां सैन्यं चित्रमिवाबभौ ।। ५ ।।
|
राक्षस रावणाकडे आणि वानर राघवांकडे पहात राहिले होते. त्या सर्वांचे नेत्र विस्मित होते म्हणून निःस्तब्ध उभ्या असल्यामुळे त्या उभय पक्षाच्या सेना चित्रलिखित सारख्या भासत होत्या. ॥५॥
|
तौ तु तत्र निमित्तानि दृष्ट्वा रावणराघवौ । कृतबुद्धी स्थिरामर्षौ युयुधाते ब्यभीतवत् ।। ६ ।।
|
राघव आणि रावण दोघांनी तेथे प्रकट होणार्या निमित्त्यांना पाहून त्यांच्या भावी फलाचा विचार करून युद्धविषयक विचारांना स्थिर केले. त्या दोघांमध्ये एकामेकाविषयी अमर्षाचा भाव दृढ झाला म्हणून ते निर्भय झाल्या प्रमाणे युद्ध करु लागले. ॥६॥
|
जेतव्यमिति काकुत्स्थो मर्तव्यमिति रावणः । धृतौ स्ववीर्यसर्वस्वं युद्धेऽदर्शयतां तदा ।। ७ ।।
|
श्रीरामचंद्रांना विश्वास होता की माझाच जय होईल आणि रावणाचाही हा निश्चय झाला होता की मला अवश्यच मरावे लागेल म्हणून ते दोघे युद्धात आपला सर्व पराक्रम प्रकट करून दाखवू लागले. ॥७॥
|
ततः क्रोधाद् दशग्रीवः शरान् सन्धाय वीर्यवान् । मुमोच ध्वजमुद्दिश्य राघवस्य रथे स्थितम् ।। ८ ।।
|
त्यासमयी पराक्रमी दशाननाने क्रोधपूर्वक बाणांचे संधान करून राघवांच्या रथावर फडकणार्या ध्वजेला लक्ष्य बनविले आणि ते बाण सोडले. ॥८॥
|
ते शरास्तमनासाद्य पुरन्दर रथध्वजम् । रथशक्तिं परामृश्य निपेतुर्धरणीतले ।। ९ ।।
|
परंतु त्याने सोडलेले ते बाण इंद्राच्या रथाच्या ध्वजेपर्यंत पोहोचू शकले नाहीत. केवळ रथशक्तिला (*) स्पर्श होताच जमिनीवर पडून गेले. ॥९॥ |
ततो रामोऽभिसङ्क्रुद्धः चापमाकृष्य वीर्यवान् । कृतप्रतिकृतं कर्तुं मनसा सम्प्रचक्रमे ।। १० ।।
|
तेव्हा महाबली श्रीरामचंद्रांनीही कुपित होऊन आपले धनुष्य खेचले आणि मनातल्या मनात् रावणाचा बदला घेण्यासाठी त्याचा ध्वज तोडून टाकण्याचा विचार केला. ॥१०॥
|
रावणध्वजमुद्दिश्य मुमोच निशितं शरम् । महासर्पमिवासह्यं ज्वलन्तं स्वेन तेजसा ।। ११ ।।
|
रावणाच्या ध्वजेला लक्ष्य करून त्यांनी विशाल सर्पासमान असह्य आणि आपल्या तेजाने प्रज्वलित तीक्ष्ण बाण सोडला. ॥११॥
|
रामश्चिक्षेप तेजस्वी केतुमुद्दिश्य सायकम् । जगाम स महीं छित्त्वा दशग्रीवध्वजं शरः ।। १२ ।।
|
तेजस्वी श्रीरामांनी त्या ध्वजेला लक्ष्य करून त्या दिशेकडे आपला सायक सोडला आणि तो दशाननाच्या त्या ध्वजेला छेदून पृथ्वीमध्ये सामावून गेला. ॥१२॥
|
स निकृत्तोऽपतद् भूमौ रावणस्यन्दनध्वजः ध्वजस्योन्मथनं दृष्ट्वा रावणः स महाबलः ।। १३ ।।
सम्प्रदीप्तोऽभवत् क्रोधाद् अमर्षात् प्रदहन्निव । स रोषवशमापन्नः शरवर्षं ववर्ष ह ।। १४ ।।
|
रावणाच्या रथाचा तो ध्वज छेदला जाऊन जमिनीवर पडला. आपल्या ध्वजाचा विध्वंस झालेला पाहून महाबली रावण क्रोधाने जळू लागला आणि अमर्षामुळे विपक्षीला जणु जाळून टाकत असल्यासारखा भासू लागला. तो रोषाला वशीभूत होऊन बाणांची वृष्टि करू लागला. ॥१३-१४॥
|
रामस्य तुरगान् दीप्तैः शरैर्विव्याध रावणः । ते विद्धा हरयस्तत्र नास्खलन्नापि बभ्रमुः ।। १५ ।।
बभूवुः स्वस्थहृदयाः पद्मनालैरिवाहताः ।
|
रावणाने आपल्या तेजस्वी बाणांनी श्रीरामांच्या घोड्यांना घायाळ करण्यास आरंभ केला परंतु ते घोडे दिव्य होते म्हणून ते अडखळले नाहीत आणि आपल्या स्थानापासून विचलित झाले नाहीत. ते पूर्ववत् स्वस्थचित्त बनून राहिले. जणु त्यांच्यावर कमलांच्या नालांनीच प्रहार केला गेला होता. ॥१५ १/२॥
|
तेषामसम्भ्रमं दृष्ट्वा वाजिनां रावणस्तदा ।। १६ ।।
भूय एव सुसङ्क्रुद्धः शरवर्षं मुमोच ह । गदाश्च परिघांश्चैव चक्राणि मुसलानि च ।। १७ ।।
गिरिशृङ्गाणि वृक्षांश्च तथा शूलपरश्वधान् । मायाविहितमेतत् तु शस्त्रवर्षमपातयत् । सहस्रशस्तदा बाणान् अश्रान्तहृदयोद्यमः ।। १८ ।।
|
त्या घोड्यांना असंभ्रम (जराही विचलित न झालेले) पाहून रावणाचा क्रोध अधिकच वाढला. तो परत बाणांची वृष्टि करू लागला. गदा, चक्र, परिघ, मुसळ, पर्वत-शिखरे, वृक्ष, शूल, परशु तसेच मायानिर्मित अन्यान्य शस्त्रांची वृष्टि करू लागला. त्याने हृदयात थकव्याचा अनुभव न करता हजारो बाण सोडले. ॥१६-१८॥
|
तुमुलं त्रासजननं भीमं भीमप्रतिस्वनम् । तद् वर्षमभवद् युद्धे नैकशस्त्रमयं महत् ।। १९ ।।
|
युद्धस्थळी अनेक शस्त्रांची ती विशाल वृष्टि फार भयानक, तुमुल, त्रासजनक आणि भयंकर कोलाहलाने पूर्ण होत होती. ॥१९॥
|
विमुच्य राघवरथं समान्ताद् वानरे बले । सायकैरन्तरिक्षं च चकाराशु सुनिरन्तरम् ।। २० ।।
मुमोच च दशग्रीवो निःसङ्गेनाऽन्तरात्मना ।
|
ती शरवृष्टि राघवांचा रथ सोडून सर्व बाजुने वानर सेनेवर पडू लागली. दशमुख रावणाने प्राणांचा मोह सोडून बाणांचा प्रयोग केला आणि आपल्या सायकांच्या वर्षावाने तेथील आकाशास पूर्ण व्याप्त करून टाकले. ॥२० १/२॥
|
व्यायच्छमानं तं दृष्ट्वा तत्परं रावणं रणे ।। २१ ।।
प्रहसन्निव काकुत्स्थः सन्दधे निशितान् शरान् । स मुमोच ततो बाणान् शतशोऽथ सहस्रशः ।। २२ ।।
|
त्यानंतर रणभूमीवर रावणाला बाण सोडतांना अधिक परिश्रम करताना पाहून काकुत्स्थ रामांनी जणु हसत हसत तीक्ष्ण बाणांचे संधान केले आणि त्यांना शेकडो, हजारोच्या संख्येने सोडले. ॥२१-२२॥
|
तान् दृष्ट्वा रावणश्चक्रे स्वशरैः खं निरन्तरम् । ताभ्यां नियुक्तेन तदा शरवर्षेण भास्वता ।। २३ ।।
शरबद्धमिवाभाति द्वितीयं भास्वदम्बरम् ।
|
त्या बाणांना पाहून रावणाने पुन्हा आपल्या बाणांचा वर्षाव केला आणि आकाश इतके भरून टाकले की त्यांत तीळ ठेवण्या इतकीही जागा मोकळी राहिली नाही. त्या दोघांच्या द्वारा केल्या गेलेल्या चमकदार बाणांच्या वृष्टिने तेथील प्रकाशमान आकाश बाणांनी बद्ध होऊन दुसर्याच कुठल्यातरी आकाशा सारखे प्रतीत होऊ लागले. ॥२३ १/२॥
|
नानिमित्तोऽभवद् बाणो नातिर्भेत्ता न निष्फलः ।। २४ ।।
अन्योन्यमभिसंहत्य निपेतुर्धरणीतले । तथा विसृजतोर्बाणान् रामरावणयोर्मृधे ।। २५ ।।
|
त्यांनी सोडलेला कुठलाही बाण लक्ष्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहात नव्हता, लक्ष्याला विंधल्याशिवाय अथवा विदीर्ण केल्याशिवाय थांबत नव्हता तसेच निष्फळही होत नव्हता. याप्रकारे युद्धात शरवृष्टि करणार्या राम आणि रावणाचे बाण जेव्हा आपसात टक्करत असत तेव्हा नष्ट होऊन पृथ्वीवर पडत होते. ॥२४-२५॥
|
प्रायुध्येतामविच्छिन्नं अस्यन्तौ सव्यदक्षिणम् । चक्रतुश्च शरौघोरैः निरुच्छ्वासमिवाम्बरम् ।। २६ ।।
|
ते दोन्ही योद्धे उजव्या - डाव्या बाजूस प्रहार करीत निरंतर युद्धात लागून राहिले होते. त्यांनी आपल्या भयंकर बाणांनी आकाशाला अशा प्रकारे भरून टाकले की जणु त्याच्यात श्वास घ्यावयासही जागा शिल्लक राहिली नाही. ॥२६॥
|
रावणस्य हयान् रामो हयान् रामस्य रावणः । जघ्नतुस्तौ तदान्योन्यं कृतानुकृतकारिणौ ।। २७ ।।
|
श्रीरामांनी रावणाच्या घोड्यांना आणि रावणाने श्रीरामांच्या घोड्यांना घायाळ करून टाकले. ते दोघेही परस्परांच्या प्रहाराचा बदला घेत परस्परांवर आघात करत राहिले. ॥२७॥
|
एवं तौ तु सुसङ्क्रुद्धौ चक्रतुर्युद्धमुत्तमम् । मुहूर्तमभवद् युद्युद्धं तुमुलं रोमहर्षणम् ।। २८ ।।
|
याप्रकारे ते दोघे अत्यंत क्रोधाने भरलेले उत्तम प्रकारे युद्ध करू लागले, एक मुहूर्तपर्यंत त्यांच्यामध्ये असा भयंकर संग्राम झाला की अंगावर रोमांच उभे राहीले. ॥२८॥
|
तौ तथा युध्यमानौ तु समरे रामरावणौ । ददृशुः सर्वभूतानि विस्मितेनान्तरात्मना ।। २९ ।।
|
याप्रकारे युद्धात गुंतलेल्या राम आणि रावणास संपूर्ण प्राणी चकितचित्ताने निरखून पाहू लागले. ॥२९॥
|
अर्दयन्तौ तु समरे तयोस्तौ स्यन्दनोत्तमौ । परस्परमभिक्रुद्धौ परस्परमभिद्रुतौ ।। ३० ।।
|
त्या दोघांचे ते श्रेष्ठ रथ (तसेच त्यात बसलेले रथी) संग्रामभूमीमध्ये अत्यंत क्रोधपूर्वक परस्पराला पीडा देऊ लागले व परस्परावर आक्रमण करु लागले. ॥३०॥
|
परस्परवधे युक्तौ घोररूपौ बभूवतुः । मण्डलानि च वीथीश्च गतप्रत्यागतानि च ।। ३१ ।।
दर्शयन्तौ बहुविधां सूतसारथ्यजां गतिम् ।
|
एक दुसर्याच्या वधाचा प्रयत्न करणारे ते दोन्ही वीर फार भयानक वाटत होते. त्या दोघांचे सारथी कधी रथाला फिरवून दूर घेऊन जात होते, तर कधी सरळ मार्गावर धाववत होते, तर कधी पुढे नेऊन परत मागे आणत होते. या प्रकारे ते दोघे आपले रथ हाकण्यात विविध प्रकारच्या ज्ञानाचा परिचय देऊ लागले. ॥३१ १/२॥
|
अर्दयन् रावणं रामो राघवं चापि रावणः ।। ३२ ।।
गतिवेगं समापन्नौ प्रवर्तननिवर्तने ।
|
श्रीराम रावणाला पीडित करु लागले तर रावण राघवांना पीडा देऊ लागला. याप्रमाणे युद्धविषयक प्रवृत्ति आणि निवृत्तिमध्ये ते दोघे तदनुरूप गतिवेगाचा आश्रय घेत होते. ॥३२ १/२॥
|
क्षिपतोः शरजालानि तयोस्तौ स्यन्दनोत्तमौ ।। ३३ ।।
चेरतुः संयुगमहीं सासारौ जलदाविव ।
|
बाणसमूहांची वृष्टि करत असणार्या त्या दोन्ही वीरांचे ते श्रेष्ठ रथ, जलधारांचा वर्षाव करणार्या दोन जलधारांप्रमाणे युद्धभूमीमध्ये विचरत होते. ॥३३ १/२॥
|
दर्शयित्वा तदा तौ तु गतिं बहुविधां रणे ।। ३४ ।।
परस्परस्याभिमुखौ पुनरेव च तस्थतुः ।
|
ते दोन्ही रथ युद्धस्थळी निरनिराळ्या प्रकारच्या गतिंचे प्रदर्शन केल्यानंतर परत समोर-समोर येऊन उभे राहिले. ॥३४ १/२॥
|
धुरं धुरेण रथयोर्वक्त्रं वक्त्रेण वाजिनाम् ।। ३५ ।।
पताकाश्च पताकाभिः समेयुः स्थितयोस्तदा ।
|
त्या समयी तेथे उभे असलेल्या त्या दोन रथांचे युगंधराशी युगंधर, घोड्यांच्या मुखाशी विपक्षी घोड्यांचे मुख तसेच पताकाशी पताका भिडल्या होत्या. ॥३५ १/२॥
|
रावणस्य ततो रामो धनुर्मुक्तैः शितैः शरैः ।। ३६ ।।
चतुर्भिश्चतुरो दीप्तान् हयान् प्रत्यपसर्पयत् ।
|
त्यानंतर श्रीरामांनी आपल्या धनुष्यांतून सुटलेल्या चार टोंकदार बाणांच्या द्वारा रावणाच्या चार तेजस्वी घोड्यांना माघार घ्यायला विवश केले. ॥३६ १/२॥
|
स क्रोधवशमापन्नो हयानामपसर्पणे ।। ३७ ।।
मुमोच निशितान् बाणान् राघवाय दशाननः ।
|
घोडे मागे सरकल्याने दशमुख रावण क्रोधाच्या वशीभूत झाला आणि राघवांवर तीक्ष्ण बाणांची वृष्टि करू लागला. ॥३७ १/२॥
|
सोऽतिविद्धो बलवता दशग्रीवेण राघवः ।। ३८ ।।
जगाम न विकारं च न चापि व्यथितोऽभवत् ।
|
बलवान् दशाननाच्या द्वारे अत्यंत घायाळ केले गेल्यावरही राघवांच्या चेहर्यावर काहीही विकार प्रकट झाला नाही अथवा त्यांच्या मनात काही व्यथाही उत्पन्न झाली नाही. ॥३८ १/२॥
|
चिक्षेप च पुनर्बाणान् वज्रपातसमस्वनान् ।। ३९ ।।
साराथिं वज्रहस्तस्य समुद्दिश्य दशाननः ।
|
त्यानंतर रावणाने इंद्रांचे सारथि मातलिना लक्ष्य करून वज्राच्या समान शब्द करणारे बाण सोडले. ॥३९ १/२॥
|
मातलेस्तु महावेगाः शरीरे पतिताः शराः ।। ४० ।।
न सूक्ष्ममपि सम्मोहं व्यथां वा प्रददुर्युधि ।
|
ते महान् वेगशाली बाण युद्धस्थळी मातलिच्या शरीरावर पडून त्यांना थोडा सुद्धा मोह अथवा व्यथा करू शकले नाहीत. ॥४० १/२॥
|
तया धर्षणया क्रुद्धो मातलेर्न तथाऽऽत्मनः ।। ४१ ।।
चकार शरजालेन राघवो विमुखं रिपुम् ।
|
रावण द्वारा मातलिच्या प्रति आक्रमणाने राघवांना जसा क्रोध आला तसा स्वतःवर केले गेलेल्या आक्रमणाने आला नव्हता. म्हणून त्यांनी बाणांचे जणु जाळे पसरून आपल्या शत्रूला युद्धापासून विमुख केले. ॥४१ १/२॥
|
विंशतिं त्रिंशतिं षष्टिं शतशोऽथ सहस्रशः ।। ४२ ।।
मुमोच राघवो वीरः सायकान् स्यन्दने रिपोः ।
|
वीर राघवांनी शत्रूच्या रथावर वीस, तीस, साठ, शंभर आणि हजार हजार बाणांची वृष्टि केली. ॥४२ १/२॥
|
रावणोऽपि ततः क्रुद्धो रथस्थो राक्षसेश्वरः ।। ४३ ।।
गदामुसलवर्षेण रामं प्रत्यर्दयद् रणे ।
|
तेव्हा रथावर बसलेला राक्षसराज रावणही कुपित झाला आणि गदा तसेच मुसळांच्या वृष्टिने रणभूमीमध्ये श्रीरामांना पीडा देऊ लागला. ॥४३ १/२॥
|
तत् प्रवृत्तं पुनर्युद्धं तुमुलं रोमहर्षणम् ।। ४४ ।।
गदानां मुसलानां च परिघाणां च निस्वनैः । शराणां पुङ्खवातैश्च क्षुभिताः सप्त सागराः ।। ४५ ।।
|
याप्रकारे त्या दोघांमध्ये पुन्हा फार भयंकर आणि रोमांचकारी युद्ध होऊ लागले. गदा, मुसळे आणि परिघांच्या आवाजाने आणि बाणांच्या पंखांच्या सनसनाटी वार्याने साती समुद्र विक्षुब्ध झाले. ॥४४-४५॥
|
क्षुब्धानां सागराणां च पातालतलवासिनः । व्यथिताः दानवाः सर्वे पन्नगाश्च सहस्रशः ।। ४६ ।।
|
त्या विक्षुब्ध समुद्रांच्या पाताळ तलात निवास करणारे समस्त दानव आणि हजारो नाग व्यथित झाले. ॥४६॥
|
चकम्पे मेदिनी कृत्स्ना सशैलवनकानना । भास्करो निष्प्रभश्चासीद् न ववौ चापि मारुतः ।। ४७ ।।
|
पर्वत, वने आणि काननांसहित सर्व पृथ्वी कापू लागली, सूर्याची प्रभा लुप्त झाली आणि वायुची गतिही थांबली. ॥४७॥
|
ततो देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः । चिन्तामापेदिरे सर्वे सकिन्नरमहोरगाः ।। ४८ ।।
|
देवता, गंधर्व, सिद्ध, महर्षि, किन्नर आणि मोठ मोठे नाग सर्व चिंतेत पडले. ॥४८॥
|
स्वस्ति गोब्राह्मणेभ्यस्तु लोकास्तिष्ठन्तु शाश्वताः । जयतां राघवः सङ्ख्ये रावणं राक्षसेश्वरम् ।। ४९ ।।
|
सर्वांच्या मुखांतून असेच उद्गार निघू लागले - गाई आणि ब्राह्मणांचे कल्याण होवो, प्रवाह रूपाने सदा राहाणार्या या लोकांचे रक्षण होवो आणि राघवांना युद्धात राक्षसराज रावणावर विजय मिळो. ॥४९॥
|
एवं जपन्तोऽपश्यंस्ते देवाः सर्षिगणास्तदा । रामरावणयोर्युद्धं सुघोरं रोमहर्षणम् ।। ५० ।।
|
याप्रकारे बोलत असलेले ऋषिंसहित ते देवगण श्रीराम आणि रावणाचे ते अत्यंत भयंकर तसेच रोमांचकारी युद्ध पाहू लागले. ॥५०॥
|
गन्धर्वाप्सरसां सङ्घा दृष्ट्वा युद्धमनूपमम् । गगनं गगनाकारं सागरः सागरोपमः ॥ ५१ ॥ रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव । एवं ब्रुवन्तो ददृशुः तद् युद्धं रामरावणम् ।। ५२ ।।
|
गंधर्वांचे आणि अप्सरांचे समुदाय त्या अनुपम युद्धाला पाहून म्हणू लागले - आकाश आकाशाशीच तुल्य आहे, समुद्र समुद्रासमानच आहे तसेच राम आणि रावणाचे युद्ध राम आणि रावणांच्या युद्धासारखेच आहे, असे म्हणत ते सर्व लोक राम-रावणाचे युद्ध पाहू लागले. ॥५१-५२॥
|
ततः क्रोधान् महाबाहू रघूणां कीर्तिवर्धनः । सन्धाय धनुषा रामः क्षुरमाशीविषोपमम् ।। ५३ ।।
रावणस्य शिरोऽच्छिन्दत् श्रीमज्ज्वलितकुण्डलम् । तच्छिरः पतितं भूमौ दृष्टं लोकैस्त्रिभिस्तदा ।। ५४ ।।
|
तदनंतर रघुकुळाची कीर्ति वाढविणार्या श्रीरामचंद्रांनी कुपित होऊन आपल्या धनुष्यावर एका विषधर सर्पासमान बाणाचे संधान केले आणि त्याच्या द्वारा झगमगणार्या कुण्डलांनी युक्त रावणाचे एक सुंदर मस्तक छाटून टाकले. त्याचे ते छेदले गेलेले शिर त्या समयी पृथ्वीवर जाऊन पडले, जे तीन्ही लोकांतील प्राण्यांनी पाहिले. ॥५३-५४॥
|
तस्यैव सदृशं चान्यद् रावणस्योत्थितं शिरः । तत् क्षिप्रं क्षिप्रहस्तेन रामेण क्षिप्रकारिणा ।। ५५ ।।
द्वितीयं रावणशिरः छिन्नं संयति सायकैः ।
|
त्याच्या जागी रावणाला तसेच दुसरे नवे शिर उत्पन्न झाले. शीघ्रतापूर्वक हात चालविण्यार्या शीघ्रकारी श्रीरामांनी युद्धस्थळी आपल्या सायकांच्या द्वारा ते दुसरे शिर ही शीघ्रच कापून टाकले. ॥५५ १/२॥
|
छिन्नमात्रं तु तच्छीर्षं पुनरेव प्रदृश्यते ।। ५६ ।।
तदप्यशनिसङ्काशैः छिन्नं रामस्य सायकैः ।
|
ते छाटले जाताच पुन्हा नवे शिर उत्पन्न झालेले दिसून आले परंतु श्रीरामांच्या वज्रतुल्य सायकांनी तेही छाटून टाकले. ॥५६ १/२॥
|
एकवमेव शतं छिन्नं शिरसां तुल्यवर्चसाम् ।। ५७ ।।
न चैव रावणस्यान्तो दृश्यते जीवितक्षये ।
|
याप्रकारे एकसारखीच तेजस्वी त्याची शंभर शिरे कापली गेली तरी त्याच्या जीवनाचा नाश होण्यासाठी त्याच्या मस्तकांचा अंत होतो आहे असे दिसून येईना. ॥५७ १/२॥
|
ततः सर्वास्त्रविद् वीरः कौसल्यानन्दवर्धनः ॥ ५८ ॥ मार्गणैर्बहुभिर्युक्तः चिन्तयामास राघवः ।
|
त्यानंतर कौसल्यानंदवर्धन, संपूर्ण अस्त्रांचे ज्ञाते असलेले वीर राघव अनेक प्रकारच्या बाणांनी युक्त असूनही याप्रकारे चिंता करू लागले - ॥५८ १/२॥
|
मारीचो निहतो यैस्तु खरो यैस्तु सदूषणः ॥ ५९ ॥
क्रौञ्चावने विराधस्तु कबन्धो दण्डकावने । यैः साला गिरयो भग्ना वाली च क्षुभितोऽम्बुधिः ॥ ६० ॥
त इमे सायकाः सर्वे युद्धे प्रात्ययिका मम । किं नु तत् कारणं येन रावणे मन्दतेजसः ।। ६१ ।।
|
अहो ! मी ज्या बाणांनी मारीच, खर आणि दूषण यांना मारले, क्रौञ्च-वनाच्या खड्यामध्ये विराधाचा वध केला, दण्डकारण्यात कबंधाला मृत्युच्या हवाली केले, सालवृक्ष आणि पर्वतांना विदीर्ण केले, वालीचे प्राण घेतले आणि समुद्रालाही क्षुब्ध करून टाकले, अनेक वेळा संग्रामात परीक्षा करून ज्यांच्या अमोघते विषयी विश्वास केला होता, तेच हे माझे सर्व सायक आज रावणावर निस्तेज-कुण्ठित झाले आहेत, याचे काय कारण असू शकते ? ॥५९-६१॥
|
इति चिन्तापरश्चासीद् अप्रमत्तश्च संयुगे । ववर्ष शरवर्षाणि राघवो रावणोरसि ।। ६२ ।।
|
याप्रकारे चिंतेत पडून सुद्धा राघव युद्धस्थळी सतत सावधान राहिले; त्यांनी रावणाच्या छातीवर बाणांची झड लावली. ॥६२॥
|
रावणोऽपि ततः क्रुद्धो रथस्थो राक्षसेश्वरः । गदामुसलवर्षेण रामं प्रत्यर्दयद् रणे ।। ६३ ।।
|
तेव्हा रथावर बसलेल्या राक्षसराज रावणानेही कुपित होऊन रणभूमीवर श्रीरामांना गदा आणि मुसळांनी पीडित करण्यास आरंभ केला. ॥६३॥
|
तत् प्रवृत्तं महद् युद्धं तुमुलं रोमहर्षणम् । अन्तरिक्षे च भूमौ च पुनश्च गिरिमूर्धनि ।। ६४ ।।
|
त्या महायुद्धाने फार भयंकर रूप धारण केले. ते पहात असता अंगावर रोमांच उभे राहात होते. ते युद्ध कधी अंतरिक्षात, कधी भूमीवर तर कधी कधी पर्वत शिखरावर चालू होते. ॥६४॥
|
देवदानवयक्षाणां पिशाचोरगरक्षसाम् । पश्यतां तन्महद् युद्धं सर्वरात्रमवर्तत ।। ६५ ।।
|
देवता, दानव, यक्ष, पिशाच, नाग आणि राक्षसांच्या देखत तो महान् संग्राम सारी रात्र चालू राहिला होता. ॥६५॥
|
नैव रात्रं न दिवसं न मुहूर्तं न च क्षणम् । रामरावणयोर्युद्धं विराममुपगच्छति ।। ६६ ।।
|
श्रीराम आणि रावणाचे ते युद्ध रात्री बंद होत नव्हते किंवा दिवसाही बंद होत नव्हते. एक मुहूर्त तर राहो एका क्षणासाठी ही त्या युद्धाचा विराम झाला नाही. ॥६६॥
|
दशरथसुतराक्षसेन्द्रयोः जयमनवेक्ष्य रणे स राघवस्य । सुरवररथसारथिर्महात्मा रणरतरामं उवाच वाक्यमाशु ।। ६७ ।।
|
एका बाजूस दशरथकुमार श्रीराम होते आणि दुसरीकडे राक्षसराज रावण होता. त्या दोघांमध्ये राघवांचा युद्धात विजय होत नाही हे पाहून देवराजांचा सारथि महात्मा मातलिने युद्धपरायण रामांना शीघ्रतापूर्वक म्हटले - ॥६७॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्ताधिकशततमः सर्गः ।। १०७ ।।
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेसातवा सर्ग पूरा झाला. ॥१०७॥
|