॥ श्रीरामविजय ॥
॥ अध्याय चवथा ॥
श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
चतुर श्रोते करिती प्रश्न ॥ तृतीयाध्यायीं हनुमंतजनन ॥ सांगितलें तुवां संपूर्ण ॥ कथा अद्भुत नवलचि ॥१॥ आणिके पुराणीं साचार ॥ हनुमंतजन्मकथाप्रकार ॥ वेगळाचि असे विचार ॥ पृथक् पृथक् कथियेला ॥२॥ तरी पुराणांतरी विपरीत ॥ कथा पडावया काय निमित्त ॥ याचें प्रत्युत्तर यथार्थ ॥ सांग समस्तां कळावया ॥३॥ ऐसें श्रोतयांचें वाग्जाळ ॥ परिसोनियां कवि कुशळ ॥ शब्द बोले अति रसाळ ॥ परिसा सकळ श्रोते हो ॥४॥ अनादिसिद्ध अवतारमाळा ॥ जगदीशें गुंफिल्या अवलीळा ॥ जैसें तरंगापूर्वीं जळा ॥ व्यापोनियां असणें कीं ॥५॥ जैशी रहाटघटमाळिका ॥ तेंविं हें अवतारचरित्र देखा ॥ कीं भगणें मित्र मृगांका ॥ प्रदक्षिणा करणें मेरूची ॥६॥ कीं जपमाळेचे मणी ॥ तेचि येती परतोनि ॥ तैसे अवतार ब्रह्मांडभुवनीं ॥ फिरती माळेसारिखे ॥७॥ तरी कल्पपरत्वें अवतार ॥ जे जे वेळे जें जें चरित्र ॥ तैसेंचि बोलिला सत्यवतीकुमर ॥ कथा साचार तितुक्याही ॥८॥ एके अवतारीं वर्तलें एक ॥ तों दुसरे अवतारीं विशेष कौतुक ॥ तरी तितुकेंही सत्य देख ॥ विपरीतार्थ न मानिजे ॥९॥ रणामाजी एकांग वीर ॥ तैसा जाणिजे कवीश्वर ॥ बहुत श्रोतयांचे भार ॥ परम चतुरसागर जे ॥१०॥ सभानायक प्रवीण अत्यंत ॥ करीं संदेहधनुष्य घेत ॥ प्रश्नावर शर सोडित ॥ आशंकासमय लक्षोनियां ॥११॥ मग कवीनें धैर्यठान मांडून ॥ चढविलें स्फूर्तीचें शरासन ॥ शास्त्रसंमताचे बाण ॥ सोडी अभंग अनिवार ॥१२॥ सत्त्व ओढी काढूनि सत्वर ॥ क्षमावेशें सोडी शर ॥ परम कौशल्यें साचार ॥ प्रश्नबाण छेदित ॥१३॥ श्रोत्यावक्त्यांचें संधान ॥ तटस्थ पाहती विचक्षण ॥ धन्य धन्य रे म्हणोन ॥ तर्जनी मस्तक डोलविती ॥१४॥ आवेशा चढले दोघेजण ॥ सप्रेम करित नामस्मरण ॥ तो घनघोष ऐकून ॥ आशंकाश्वापदें दूर पळती ॥१५॥ वक्त्यांचे वाग्बाण अत्यंत ॥ अर्थगौरवमुख लखलखित ॥ पद्यरचना पक्षमंडित ॥ सुरंग मिरवत साहित्य ॥१६॥ ऐसे शर सुटतां अपार ॥ भेदलें श्रोतयांचें अंतर ॥ डोलविलें तेणें शिर ॥ सुखोर्मीचेनिभरें पैं ॥१७॥ वैरभाव नसतां किंचित ॥ हें आनंदाचें युद्ध होत ॥ क्षीराब्धीच्या लहरी मिळत ॥ जैशा एकमेकांसी ॥१८॥ निष्कपट श्रोता पुसत ॥ निरभिमान वक्ता बोलत ॥ शब्दकौशल्य युद्ध सत्य ॥ जाणती पंडित विवेकी ॥१९॥ देवभक्तांचा अनुवाद ॥ तेथें काय आहे वैरसंबंध ॥ कीं गुरुशिष्यांचा संवाद ॥ आनंदयुक्त शब्दांचा ॥२०॥ असोत ह्या बहुत युक्ती ॥ चातुर्यसिंधुमंथनपद्धती ॥ वर्म जाणिजे पंडितीं ॥ चातुर्यरीती कळा ज्या ॥२१॥ कवीची घडामोडी बहूत ॥ युक्तिसागरींचीं रत्नें काढित ॥ एक गव्हांचे प्रकार बहुत ॥ करी जैसी सुगरिणी ॥२२॥ एके मृत्तिकेचे घट अपार ॥ एका तंतूचे पट विचित्र ॥ एक हेम बहुत अलंकार ॥ हाटकघडणार करी जैसा ॥२३॥ एके काष्ठीं शिल्पकार ॥ युक्ति दाखवी अपार ॥ जैसा जो कवि चतुर ॥ शब्दसाहित्य विवरी पैं ॥२४॥ असो हें चातुर्य कारणें ॥ बोलावें लागलें श्रोतियांकारणें ॥ पुढें रघुनाथकथा परिसणें ॥ श्रीधर चतुरां विनवीतसे ॥२५॥ मागील कथानुसंधान ॥ तृतीयाध्यायीं निरूपण ॥ सांगितलें हनुमंतजन्मकथन ॥ मूळग्रंथआधारें ॥२६॥ सिंहावलोकनें तत्वतां ॥ श्रोतीं परिसिजे मागील कथा ॥ तिघी राण्या जाहल्या गर्भस्था ॥ कौसल्या सुमित्रा कैकयी ॥२७॥ जैसा शुद्ध बिजेचा मृगांक ॥ दिवसेंदिवस कळा अधिक ॥ कीं पळोपळीं चढे अर्क ॥ उदयाद्रीहूनि पश्चिमे ॥२८॥ कीं करितां संतसमागम ॥ दिवसेंदिवस वाढे प्रेम ॥ कीं औदार्येंकरूनि परम ॥ किर्ति वाढे सत्वर ॥२९॥ तैसे राणियांचे गर्भ वाढती ॥ तों वसिष्ठ बोले दशरथाप्रति ॥ राया धर्मशास्त्रीं ऐशी रीति ॥ डोहळे स्त्रियांसी पुसावे ॥३०॥ ऐसें बोलतां ब्रह्मऋषि ॥ हर्ष वाटला रायासी ॥ नमोनि वसिष्ठचरणांसी ॥ राजेंद्र तेव्हां चालिला ॥३१॥ जैसा शचीचिया मंदिरांत ॥ वृत्रासुरशत्रु प्रवेशत ॥ तैसाचि अजपाळसुत ॥ कैकयीसदनीं प्रवेशे ॥३२॥ पिंडप्राशनाचे काळीं ॥ कैकयी होती रुसली ॥ म्हणोनि राजेंद्र ते वेळीं ॥ तिचे सदनीं प्रवेशला ॥३३॥ दूती जाणविती स्वामिनीतें ॥ डोहळे पुसावया तुम्हांतें ॥ नृपती स्वयें येतसे येथें ॥ सुमुहूर्त पाहोनियां ॥३४॥ सुंदरपणाचा अभिमान ॥ त्याहीवरी कैकयी गर्भिण ॥ जैसी अल्पविद्या गर्व पूर्ण ॥ तैसें येथें जाहलें ॥३५॥ जैसी गारुडीयांची विद्या किंचित ॥ परी ब्रीद्रें बांधिती बहुत ॥ कीं निर्नासिक वाहत ॥ रूपाभिमान विशेष पैं ॥३६॥ बिंदुमात्र विष वृश्चिका ॥ परी पुच्छाग्र सदा वरुतें देखा ॥ किंचित ज्ञान होतां महामूर्खा ॥ मग तो न गणी वाचस्पतीतें ॥३७॥ खडाणे धेनूसी दुग्ध किंचित ॥ परी लत्ताप्रहार दे बहुत ॥ अल्पोदकें घट उचंबळत ॥ अंग भिजत वाहकाचें ॥३८॥ तैसें कैकयीस जाहलें तये वेळीं ॥ प्रीतीनें दशरथ आला जवळी ॥ आपण सेजेवरी निजली ॥ नाहीं धरिली मर्यादा ॥३९॥ स्त्री सेवक अपत्य दासी ॥ श्वान मर्कट कुरूपियासी ॥ मर्यादा तुटतां मग सकळांसी ॥ ते अनिवार जाणिजे ॥४०॥ म्हणोनि मर्यादा कांहीं तेथ ॥ कैकयी न धरी देखतां दशरथ ॥ तिसी डोहळे पुसे नृपनाथ ॥ उभा समीप राहोनि ॥४१॥ म्हणे कैकयी बोले वचन ॥ तुज जें आवडे मनांतून ॥ तें मी समस्त पुरवीन ॥ सत्य जाण प्रियकरे ॥४२॥ मग काय बोले ते वेळे ॥ तुम्ही काय पुरवाल डोहळे ॥ माझे मनींचे सोहळे ॥ पूर्णकर्ता दिसेना ॥४३॥ मग बोले अजनंदन ॥ तुजकारणें वेंचीन प्राण ॥ परी तुझे डोहळे पुरवीन ॥ सत्य जाण सुकुमारे ॥४४॥ मग ती म्हणे जी नृपवरा ॥ डोहळे हेचि माझे अवधारा ॥ कौसल्या सुमित्रेचिया कुमरां ॥ दिगंतरा दवडावें ॥४५॥ पाठवावे दूर कानना ॥ त्यांचा समाचार पुनः कळेना ॥ आमचें वर्तमान त्यांचिया कर्णा ॥ सहसाहि न जावें ॥४६॥ राज्य द्यावें माझियां पुत्रा ॥ हेचि डोहळे होती राजेंद्रा ॥ तुम्ही म्हणाल अधर्म खरा ॥ तरी तो दोष मजवरी घालिजे ॥४७॥ मज निंदतील सकळ लोक ॥ तों तों वाटेल परम सुख ॥ समस्त जनां व्हावें दुःख ॥ हेंचि मजला आवडे ॥४८॥ ऐसें कैकयी वदे ते अवसरीं ॥ ऐकतां नृप खोंचला अंतरीं ॥ कीं काळिजी घातली सुरी ॥ कीं अंगावरी चपळा पडे ॥४९॥ वचन नव्हे तें केवळ ॥ दुःखवल्लीचें श्रेष्ठ फळ ॥ कीं संचरलें हाळाहाळ ॥ हृदयीं वाटे दशरथा ॥५०॥ वाटे पर्वत कोसळला ॥ कीं काळसर्प जिव्हारी झोंबला ॥ कीं तप्तशस्त्रघाय पडला ॥ अंगावरी अकस्मात ॥५१॥ कैकयीवचन कलशोद्भव पूर्ण ॥ प्राशिलें आयुष्यसागरजीवन ॥ राव घाबरा होय जैसा चतुरानन ॥ वेद हरण केले जेव्हां ॥५२॥ परम खेद पावला नृपवर ॥ तीस नेदीच प्रत्युत्तर ॥ मग सुमित्रेचें मंदिर ॥ प्रवेशता जाहला ॥५३॥ संसारतापें जे संतप्त ॥ ते संतसमागमें जैसे निवत ॥ तैसाचि राजा दशरथ ॥ सुमित्रासदनीं सुखावला ॥५४॥ तिचें नाम सुमित्रा सती ॥ परी नामाऐशीच आहे रीति ॥ वरकड नांवें जीं ठेविती ॥ तीं तों व्यर्थचि जाणिजे ॥५५॥ नांव ठेविलें उदार कर्ण ॥ आडका वेचितां जाय प्राण ॥ बृहस्पति नाम ज्यालागून ॥ धड वचन बोलतां न ये ॥५६॥ कमलनयन नाम विशेष ॥ परी दोहीं डोळ्यां वाढले वडस ॥ क्षीरसिंधु नाम पुत्रास ॥ परि तक्र तयासी मिळेना ॥५७॥ नांव ठेविले पंचानन ॥ परी जंबुक देखतां पळे उठोन ॥ जन्म गेला मानतां कोरान्न ॥ सार्वभौम नाम तयातें ॥५८॥ नाम ठेविले जया मदन ॥ तो निर्नासिक कुलक्षण ॥ तैसी सुमित्रा नव्हे पूर्ण ॥ करणी नामासारखी ॥५९॥ नृप आला ऐकतां कर्णीं ॥ समोर आली हंसगामिनी ॥ दशरथाचिये चरणीं ॥ मस्तक ठेवी सद्भावें ॥६०॥ स्त्रियांस देव तो आपुला नाथ ॥ पुत्रांसी माता पिता सत्य ॥ शिष्यासी गुरु दैवत ॥ गृहस्थासी दैवत अतिथी पैं ॥६१॥ म्हणोन सुमित्रेनें अजनंदन ॥ पूजिला षोडशोपचारेंकरून ॥ उभी ठाकली कर जोडून ॥ अधोवदन सलज्ज ॥६२॥ कैकयीडोहळ्यांचें दुःख प्रबळ ॥ राव विसरला हो सकळ ॥ जैसा बोध ठसावतां निर्मळ ॥ तमजाळ वितुळे पैं ॥६३॥ राजा म्हणे सुमित्रेशीं ॥ काय डोहळे होताती मानसीं ॥ ते मज सांग निश्चयेंसीं ॥ कुरंगनेत्रे सुमित्रे ॥६४॥ मग किंचित हास्य करून ॥ बोले सलज्ज अधोवदन ॥ जें ऐकतां सुखसंपन्न ॥ अजनंदन होय पैं ॥६५॥ म्हणे हेच आवडी बहुवस ॥ कौसल्यागर्भीं जगन्निवास ॥ अवतरेल जो आदिपुरुष ॥ जगद्वंद्य जगदात्मा ॥६६॥ त्याची अहोरात्र सेवा बरवी ॥ वाटे मम पुत्रेंचि करावी ॥ जाणीव शहाणीव आघवी ॥ ओंवाळावी तयावरूनि ॥६७॥ सेवेपरतें थोर साधन ॥ मम पुत्रासी न माने आन ॥ आपुले अंगाचें आंथरुण ॥ ज्येष्ठसेवनालागीं करूं ॥६८॥ त्रिभुवनराज्य तृणासमान ॥ त्याहूनि अधिक ज्येष्ठ भजन ॥ चारी मुक्ति वाटती गौण ॥ ज्येष्ठसेवेपुढें पैं ॥६९॥ सुधारस त्यजोनि निर्मळ ॥ कोणास आवडेल हाळाहळ ॥ उत्तम सांडूनि तांदुळ ॥ सिकता कांहो शिजवावी ॥७०॥ त्यजोनि सुंदर रायकेळे ॥ कोण भक्षील अर्कफळें ॥ कल्पद्रुमीं जो विहंगम खेळे ॥ तो नातळे बाभुळेसी ॥७१॥ मानससरोवरींचा हंस पाहीं ॥ तो कदा न राहे उलूकगृहीं ॥ बुडी दीधली क्षीराब्धिडोहीं ॥ दग्ध वन नावडे तया ॥७२॥ नंदनवनींचा भ्रमर कदाकाळीं ॥ अर्कपुष्पीं रुंजी न घाली ॥ जेणें इंद्रभवनीं निद्रा केली ॥ खदिरांगारीं न निजे तो ॥७३॥ रंभेतुल्य जाया चांगली ॥ सांडोनि प्रेत कोण कवळी ॥ तैसी भजनीं आवडी धरिली ॥ कदा विषयीं न रमे तो ॥७४॥ म्हणोनि चक्रचूडामणी ॥ माझी आवडी ज्येष्ठभजनीं ॥ ऐसें सुमित्रेचे शब्द कर्णी ॥ आकर्णिले दशरथें ॥७५॥ वाटे अमृत प्राशन केलें ॥ कीं त्रिभुवनराज्य हातासी आलें ॥ तैसें नृपाचें मन संतोषलें ॥ आलिंगिलें सुमित्रेसी ॥७६॥ म्हणे ऐक सुकुमार राजसे ॥ चंपककळिके परम डोळसे ॥ तुवां डोहळे इच्छिले जे मानसें ॥ ते मी सर्वस्वें पुरवीन ॥७७॥ नानाभूषणें अलंकार ॥ ओंवाळी तिजवरूनि नृपवर ॥ दानें देवविलीं अपार ॥ सुमित्रेहातीं याचकां ॥७८॥ याउपरी ज्येष्ठ राणी ॥ कौसल्या नामें ज्ञानखाणी ॥ जे पुराणपुरुषाची जननी ॥ ख्याति त्रिभुवनीं जियेची ॥७९॥ जे परब्रह्मरसाची मूस ॥ की निजप्रकाशरत्नमांदुस ॥ क्षीराब्धिहृदयविलास ॥ जिनें अंतरीं सांठविला ॥८०॥ जो इंदिरावर त्रिभुवनेश्वर ॥ ज्याचे आज्ञाधारक विधी शचीवर ॥ हृदयीं ध्यान अपर्णावर ॥ कौसल्याउदरनिवासी तो ॥८१॥ असो कौसल्येचे मंदिरीं ॥ प्रवेशता जाहला श्रावणारी ॥ सेवक राहविले बाहेरी ॥ द्वारमर्यादा धरोनियां ॥८२॥ कौसल्या ज्ञानकळा परम ॥ तीस अंतर्बाह्य व्यापला राम ॥ चराचर अवघे परब्रह्म ॥ न दिसे विषम कदाहि ॥८३॥ सांडोनि जागृति सुषुप्ति स्वप्न ॥ नयनीं ल्याली ज्ञानांजन ॥ चराचर अवघें निरंजन- ॥ रूप दिसे कौसल्ये ॥८४॥ दशरथ प्रवेशोनी अंतरीं ॥ पाहे स्थूळ ओसरीवरी ॥ मग सूक्ष्मदेह माजघरीं ॥ न दिसे कदा कौसल्या ॥८५॥ कारण कोठडींत पाहे सादर ॥ तंव तेथें अवघा अंधार ॥ मग महाकारण उपरी थोर ॥ त्यावरी नृप चढिन्नला ॥८६॥ तेथेंहि न दिसे कौसल्या सती ॥ मग चकित पाहे नृपति ॥ जिचे उदरीं सांठवला जगत्पति ॥ तिची स्थिति कळेना ॥८७॥ मग परात्परसांत ॥ प्रवेशता होय अजपाळसुत ॥ तों बैंसली समाधिस्त ॥ निर्विकल्पवृक्षातळीं ॥८८॥ अंतरीं दृष्टि मुरडली ॥ वरदळ स्वनाम विसरली ॥ ब्रह्मानंदरूप जाहली ॥ न चाले बोली द्वैताची ॥८९॥ जैसा परम सतेज मित्र ॥ तेथें डाग न लागे अणुमात्र ॥ स्वरूपीं पहुडतां योगेश्वर ॥ ज्ञान राहे ऐलीकडे ॥९०॥ कल्पांतविजूस मशक गिळी ॥ पिपीलिका मेरु कक्षेसी घाली ॥ धेनुवत्स मृगेंद्रा आकळी ॥ एखादे वेळे घडेल हें ॥९१॥ परी चतुरा विश्वरूपावरी ॥ दृष्टांत न चाले निर्धारीं ॥ श्रोतियांचे यज्ञशाळेभीतरीं ॥ कोठें महारी प्रवेशेल ॥९२॥ वडवानळापुढें कर्पूर जाण ॥ कीं जलनिधिमाजी लवण ॥ तैशी बुद्धि आणि मन ॥ स्वसुखावरी विरालीं ॥९३॥ असो स्वानंदसागरांत ॥ कौसल्या पूर्ण समाधिस्थ ॥ जवळी उभा ठाकला दशरथ ॥ पाहे तटस्थ उगाचि ॥९४॥ कौसल्या स्वस्वरूपीं लीन ॥ हे दशरथासी नेणवे खूण ॥ म्हणे हे रुसली संपूर्ण ॥ तरीच वचन न बोले ॥९५॥ म्हणून राजचक्रचूडामणि ॥ कौसल्येजवळ स्वयें बैसोनी ॥ स्नेहें तीस हृदयीं धरूनी ॥ समाधान करीतसे ॥९६॥ तरी न उघडी नयन ॥ नाहीं शरीराचें भान ॥ मी स्त्रीपुरुषस्मरण ॥ गेली विसरोन कौसल्या ॥९७॥ अलंकार कैंचे एक सुवर्ण ॥ तरंग लटके एक जीवन ॥ तैसे विश्व नाहीं एक रघुनंदन ॥ आनंदघन विस्तारला ॥९८॥ ऐसी कौसल्येची स्थिति जाहली ॥ राजा म्हणे हे झडपली ॥ कीं महद्भूतें पूर्ण घेतली ॥ ओळखी मोडली इयेची ॥९९॥ राजा म्हणे देव ऋषि सिद्ध ॥ इहीं दीधला आशीर्वाद ॥ कीं पोटा येईल ब्रह्मानंद ॥ आदिपुरुष श्रीराम ॥१००॥ ऐकतां रामनामस्मरण ॥ कौसल्येनें उघडिले नयन ॥ तों जगदाभास संपूर्ण ॥ रघुनंदनरूप दिसे ॥१॥ राजा म्हणे हो नितंबिनी ॥ कुरंगनेत्रे गजगामिनी ॥ काय जे आवडी असेल मनीं ॥ डोहळे पुरवीन सर्व ते ॥२॥ भ्रम टाकीं बोलें वचन ॥ तों कौसल्या बोले गर्जोन ॥ मी जगदात्मा रघुनंदन ॥ कैंचें अज्ञान मजपासीं ॥३॥ स्थूळ लिंग आणि कारण ॥ यांहून माझें रूप भिन्न ॥ महाकारण हें निरसून ॥ आत्माराम वेगळा मी ॥४॥ द्वैताद्वैत महाद्वैत ॥ याहून वेगळा मी अतीत ॥ सच्चिदानंद शब्द जेथ ॥ खुंटोनियां राहिला ॥५॥ जीव शिव हे दोन्ही पक्ष ॥ ध्याता ध्यान लय लक्ष ॥ यांवेगळा मी सर्वसाक्ष ॥ अचिंत्य अलक्ष श्रीराम ॥६॥ राजा म्हणे कौसल्ये ऐकें ॥ मी कोण आहें मज ओळखें ॥ डोहळे पुसावया महासुखें ॥ तुजजवळी बैसलों ॥७॥ येरी म्हणे ज्ञाता ज्ञेय ज्ञान ॥ हें सर्व गेलें आटोन ॥ नाहीं स्त्रीपुरुषनपुंसकपण ॥ मी तूंपण तेथें कैंचें ॥८॥ नृप म्हणे हे महद्भूतें घेतली ॥ ओळखी सर्व मोडली ॥ मग पुसे गोष्ट मागली ॥ धाकुटपणींची तियेतें ॥९॥ राजा म्हणे शशांकवदने ॥ गुणसरिते पद्मनयने ॥ वऱ्हाड बुडवोनि तुज रावणें ॥ नेलें होतें आठवतें कीं ॥११०॥ शत्रूचें नाम ऐकतां कर्णीं ॥ हाक फोडिली भुजा पिटोनी ॥ म्हणे धनुष्यबाण दे आणोनी ॥ टाकीन छेदोनि दाही शिरें ॥११॥ ताटिका मारूनियां आधीं ॥ ऋषियाग पाववीन सिद्धी ॥ महाराक्षस वधोनि युद्धीं ॥ गाधितनय तोषवीन ॥१२॥ शिवचाप परम प्रचंड ॥ मोडोनि करीन दुखंड ॥ माझी ज्ञानशक्ति जे अखंड ॥ पणें जिंकोन आणीन ते ॥१३॥ जेणें निःक्षत्री केली अवनी पूर्ण ॥ त्याचा गर्व हरीन न लागतां क्षण ॥ मी एकपत्नीव्रत रघुनंदन ॥ पितृवचन पाळीन मी ॥१४॥ मी सेवीन घोर विपिन ॥ परिवारेंसी त्रिशिरा खर दूषण ॥ क्षणमात्रें टाकीन वधोन ॥ अग्नि तृण जाळी जेवीं ॥१५॥ रिसां वानरांहातीं ॥ लंका घालीन पालथी ॥ माझा वज्रदेही मारुती ॥ परम पुरुषार्थी महावीर ॥१६॥ क्षणें जाळील राक्षसनगर ॥ शत्रूंचीं शिरें छेदीन अपार ॥ पाषाणीं पालाणोनि समुद्र ॥ लंकापुर घेईन मी ॥१७॥ कौसल्या हाक फोडी दारुण ॥ लंकेपुढें माजवीन रण॥ महाढिसाळ कुंभकर्ण ॥ टाकीन छेदून क्षणार्धें ॥१८॥ सहपरिवारें वधोनि दशशिर ॥ बंदीचे सोडवीन सुरवर ॥ माझा बिभीषण प्रियकर ॥ छत्र धरवीन तयावरी ॥१९॥ स्वपदीं स्थापोनि निजभक्त ॥ मी अयोध्येसी येईन रघुनाथ ॥ आधि व्याधि जरा मृत्य ॥ याविरहित करीन प्रजा ॥१२०॥ स्त्रीपुरुषनपुंसकभेद ॥ यावेगळा मी ब्रह्मानंद ॥ मायाचक्रचाळक शुद्ध ॥ निष्कलंक अभेद पैं ॥२१॥ मी प्रळयकाळासी शासनकर्ता ॥ आदिमायेचा निजभर्ता ॥ कर्ता हर्ता पाळितां ॥ मजपरता नसेचि ॥२२॥ मी अज अजित सर्वेश्वर ॥ मी नटलों चराचर ॥ धरोनि नाना अवतार ॥ मी मजमाजीं सामावें ॥२३॥ ऐसें ऐकतां दशरथ ॥ म्हणे हे भूतें घेतली यथार्थ ॥ फांटा फुटलासे बहुत ॥ बडबडत भलतेंचि ॥२४॥ पंचाक्षरी आणा पाचारून ॥ महाराज सद्गुरु ज्ञानघन ॥ तो सरसिजोद्भवनंदन ॥ बोलावून आणा वेगीं ॥२५॥ जेणें दर्भावरी धरिली अवनी ॥ कमंडलु ठेविला सूर्यासनीं ॥ इंद्रसभेसी नेला वासरमणी ॥ अद्भुत करणी जयाची ॥२६॥ वसिष्ठ आला धांवोन ॥ राजा दृढ धरी चरण ॥ म्हणे कौसल्येसारखें निधान ॥ भूतें संपूर्ण ग्रासिलें ॥२७॥ म्यां याग केला सायासीं ॥ कीं पुत्र होईल कौसल्येसी ॥ तों मध्येंच हे विवशी ॥ उठली ऋषि काय करूं ॥२८॥ मग म्हणे ब्रह्मसुत ॥ इच्या पोटा येईल रघुनाथ ॥ तीस गोष्टी ये विपरीत ॥ कालत्रयीं घडेना ॥२९॥ अंधकूपीं पडेल तरणी ॥ कोरान्न मागेल चिंतामणी ॥ सुधारस गेला कडवटोनी ॥ हें कालत्रयीं घडेना ॥१३०॥ क्षुधेनें पीडिला क्षीरसागर ॥ सुरतरूसी येईल दरिद्र ॥ तीव्र तपेल रोहिणीवर ॥ हें कालत्रयीं घडेना ॥३१॥ असो वसिष्ठ कौसल्येजवळी ॥ येऊनि विलोकी तयेवेळी ॥ तंव ती श्रीरामरूप जाहली ॥ अंतबार्ह्य समूळ ॥३३॥ न दिसे स्त्रियेसी आकृति ॥ धनुष्यबाण घेऊनि हातीं ॥ आकर्ण नयन विराजती ॥ देखे मूर्ति जगद्वंद्य ॥३४॥ मूर्ति पाहतां आनंदघन ॥ सद्गद जाहला ब्रह्मनंदन ॥ अष्टभाव दाटले पूर्ण ॥ गेला विसरोनि देहभाव ॥३५॥ वसिष्ठ कौसल्या ते अवसरी ॥ मुरालीं ब्रह्मानंदसागरीं ॥ दशरथ परम अंतरीं ॥ घाबरा जाहला नेणोनियां ॥३६॥ वसिष्ठासारखा महामुनी ॥ भूतें झडपिला येक्षणीं ॥ या भूताची करिता झाडणी ॥ कोणी त्रिभुवनीं दिसेना ॥३७॥ मी हतभाग्य संपूर्ण ॥ मज कैचें पुत्रसंतान ॥ कौसल्याही गेली झडपोन ॥ ब्रह्मानंदें मूर्च्छित ॥३८॥ निरपराध वधिला श्रावण ॥ तेणें हें दुःख दारुण ॥ ऐसा तो महाराज अजनंदन ॥ जळाला पूर्ण अंतरीं ॥३९॥ तों स्वानंदलहरी जिरवून ॥ वसिष्ठें उघडिले नयन ॥ राजा धांवोन धरी चरण ॥ आनंद न माय अंतरीं ॥१४०॥ रायासी कैसी परी जाहली ॥ कीं पुरीं बुडतां नौका आली ॥ अंधकूपीं पडतां तात्काळीं ॥ हस्त सूर्यें दीधला ॥४१॥ सर्पे डंखितां गरुड धांवे ॥ गर्जे कोंडितां केसरी पावे ॥ कीं क्षुधितांपुढें हेलावे ॥ क्षीरसागर येऊनियां ॥४२॥ कीं वणव्यांत जळतां वरुषे घन ॥ कीं हुडहुडी भरतां कृशान ॥ कीं दरिद्रें पीडितां लक्ष्मी आपण ॥ घरीं येऊनि बैसली ॥४३॥ ऐसा आनंदला राजा दशरथ । म्हणे सद्गुरु स्वामी तूं समर्थ ॥ मज नवल हें वाटत ॥ तुजही भूतें झडपिलें ॥४४॥ आम्ही अत्यंत भाग्यहीन ॥ कैंचें देखो पुत्रसंतान ॥ मग हांसिन्नला ब्रह्मनंदन ॥ काय गर्जोन बोलत ॥४५॥ जो नीलग्रीवहृदयरत्न ॥ जो कमलोद्भवाचें देवतार्चन ॥ सनकादिक करोनी यत्न ॥ हृदयसंबळींत वाहती पैं ॥४६॥ तो वैकुंठपुरविलासी ॥ आला कौसल्येच्या गर्भासी ॥ मारूनि सकळ दुष्टांसी ॥ देव सोडवील बंदीचे ॥४७॥ जें जें कौसल्या बोलिली सत्य ॥ तितुकें होईल यथार्थ ॥ तुज होतील चार सुत ॥ सत्य वचनार्थ राजेंद्रा ॥४८॥ शंख चक्र शेष नारायण ॥ चर्तुधा रूपें प्रकटेल जगज्जीवन ॥ ज्याची कथा ऐकतां पापी जन ॥ उद्धरोनि तरतील ॥४९॥ माध्यान्हा येईल चंडकिरण ॥ पुष्य नक्षत्र साधून ॥ अवतरेल रघुनंदन ॥ पूर्णब्रह्म जगद्गुरू ॥ १५० ॥ ऐसी वसिष्ठांचीं वचनें ॥ कीं स्वानंदनभींचीं उडुगणें ॥ कीं सत्यवैरागरींचीं रत्नें ॥ निवडोनि दीधलीं दशरथा ॥५१॥ तेणें कर्णद्वारें त्वरित ॥ सांठविलीं हृदयसंदुकेंत ॥ धांवोनि गुरूचे पाय धरित ॥ म्हणे कृतार्थ जाहलों मी ॥५२॥ असो भरलिया नवमास ॥ प्रसूतिसमय कौसल्येस ॥ कवण ऋतु कवण दिवस ॥ सावकाश ऐका तें ॥५३॥ वसंतऋतु चैत्रमास ॥ शुक्लपक्ष नवमी दिवस ॥ सूर्यवंशीं जगन्निवास ॥ सूर्यवासरीं जन्मला ॥५४॥ माध्यान्हा आला चंडकिरण ॥ पुष्य नक्षत्र साधून ॥ अवतरला रघुनंदन ॥ पूर्णब्रह्म जगद्गुरु ॥५५॥ श्रीराम केवळ परब्रह्म ॥ त्यासी जाहला म्हणतां जन्म ॥ संत हांसतील परम ॥ तत्त्वज्ञानवेत्ते जे ॥५६॥ ज्याची लीला ऐकतां अपार ॥ खंडे जन्म मृत्यु दुर्धर ॥ त्या रामासी जन्मसंसार ॥ काळत्रयीं घडेना ॥५७॥ दाविली लौकिक करणी ॥ कीं कौसल्या जाहली गर्भिणी ॥ तो ब्रह्मानंद मोक्षदानी ॥ जन्मकर्म त्या कैंचें ॥५८॥ क्षीरसागरींहून नारायण ॥ येऊन अयोध्येसी जाहला सगुण ॥ शेष लक्ष्मीसहित जगज्जीवन ॥ तैसाचि तेथें संचरला ॥५९॥ जे अनंत कल्याणदायक ॥ अज अजित निष्कलंक ॥ भक्त तारावयासी देख ॥ जगन्नायक अवतरला ॥१६०॥ देव करिती जयजयकार ॥ करोनि राक्षससंहार ॥ म्हणती आतां अवतरेल हा रघुवीर ॥ बंधमुक्त करील आम्हां ॥६१॥ असो अयोध्यापुरीं निराळीं ॥ विमानांची दाटी जाहली ॥ दुंदुभीची घाई लागली ॥ पुष्पें वर्षती अपार ॥६२॥ असो ते कौसल्या सती ॥ बैसली असतां एकांतीं ॥ तों अष्टदश वरुषांची मूर्ति ॥ सन्मुख देखे अकस्मात ॥६३॥ निमासुर वदन सुंदर ॥ तेजें भरलें निजमंदिर ॥ ज्या तेजासी शशी मित्र ॥ लोपोनि जाती विलोकितां ॥६४॥ पदकमलमकरंदसेवना ॥ भ्रमरी जाहली क्षीराब्धिकन्या ॥ कदाही न विसंबे चरणां ॥ कृपण धनालागीं जैसा ॥६५॥ संध्याराग अरुण बालार्क ॥ दिव्य रत्नांचे काढिले रंग देख ॥ तळवे तैसे सुरेख ॥ श्रीरामाचे वाटती ॥६६॥ चंद्र क्षयरोगें कष्टी होऊनि ॥ निजांगाची दश शकलें करोनि ॥ सुरवाडला रामचरणीं ॥ स्वानंदधणी घेतसे ॥६७॥ रमा पदीं रंगली दिवसनिशीं ॥ तों बंधु पाहुणा आला शशी ॥ तोही राहिला अक्षय व्हावयाची ॥ नव जायची माघारा ॥६८॥ ध्वज वज्रांकुश पद्म ॥ ऊर्ध्वरेखा चक्रादि चिन्हें उत्तम ॥ यांचा अर्थ ऐकतां परम ॥ सुख होय भक्तांसी ॥६९॥ सात्त्विक प्रेमळासी देखा ॥ ऊर्ध्व संकेत दावी ऊर्ध्वरेखा ॥ सत्यशील धार्मिकां भाविकां ॥ ऊर्ध्वपंथ दाविती ॥१७०॥ विद्यामंदें मत्त गज ॥ एक भाग्यमंदें डुलती सहज ॥ त्यांसी आकर्षावया सहज ॥ अंकुश पायीं झळकतसे ॥७१॥ पायीं झळके दिव्य पद्म ॥ तें पद्मेचें राहतें धाम ॥ ते जगमाउली सप्रेम ॥ तये पदीं सुरवाडली ॥७२॥ अहंकार जड पर्वत ॥ शरणागतां बाधक यथार्थ ॥ तो फोडावयासी तळपत ॥ वज्र पायीं रामाच्या ॥७३॥ भवसागर तरावया गहन ॥ जहाज अद्भुत रामचरण ॥ त्यावरी ध्वजविराजमान ॥ रात्रंदिन तळपतसे ॥७४॥ काम क्रोध दुर्धर असुर ॥ त्यांचें छेदावया शिर ॥ दैदीप्यमान दिव्य चक्र ॥ रामतळवां झळकतसे ॥७५॥ मळरहित प्रपद सुंदर ॥ घोंटीव त्रिकोणयंत्राकार ॥ इंद्रनीळ उपमा साचार ॥ न पुरती कठीण म्हणोनियां ॥७६॥ पदतलें आरक्त साजिरीं ॥ वसे तेथें सरसिजोद्भवकुमरी ॥ विश्रांति घ्यावया अहोरात्रीं ॥ रामचरणीं रंगली हो ॥७७॥ किती पापें हरावीं दिवरजनीं ॥ म्हणोनि श्रमली जन्हुनंदिनी ॥ शुभ वांकी होऊनी ॥ रामचरणीं विराजे ॥७८॥ मांड्या सुकुमार सांवळिया ॥ तेथें सुरवाडली मित्रतनया ॥ कीं यमानुजा अपवाद चुकवावया ॥ महदाश्रय करीतसे ॥७९॥ ऐशी रामपदीं त्रिवेणी साचार ॥ प्रयाग तीर्थराज पावन थोर ॥ प्रेमें माघमासीं सभाग्य नर ॥ प्रातःस्नानासी धांवती ॥१८०॥ भक्त मुमुक्षु साधक संत ॥ हेचि राजहंस विराजत ॥ वांकीवरी रत्नें तळपत ॥ तेचि तपस्वी तपताती ॥८१॥ चरणध्वज झळके स्पष्ट ॥ तोच जाणिजे अक्षय वट ॥ जेथें सनकादिक वरिष्ठ ॥ क्षेत्रसंन्यासी जाहले ॥८२॥ प्रयागीं मोक्ष देह त्यागितां ॥ येथें मोक्ष श्रवण करितां ॥ देहीं असतां विदेहता ॥ येते हाता भक्तांच्या ॥८३॥ त्या प्रयागीं कष्ट बहुत ॥ येतां जातां भोगिती अमित ॥ हा प्रयाग ध्यानीं अकस्मात ॥ प्रकटे सत्य भक्तांच्या ॥८४॥ तोडर वांकी नूपुरें ॥ असुरांवरीं गर्जती गजरें ॥ वाटे नभ गाळोनि एकसरें ॥ पोटऱ्या जानू ओतिल्या ॥८५॥ की सरळ कर्दळीचे स्तंभ ॥ कीं गरुडपाचूंचे उगवले कोंभ ॥ कीं इंद्रनीळ गाळोनि सुप्रभ ॥ जानू जंघा ओतिल्या ॥८६॥ मिळाल्या सहस्र चपळा ॥ तैसा कांसे झळके पीतांबर पिवळा ॥ वरी तळपे कटिमेखळा ॥ पाहतां डोळां आल्हाद ॥८७॥ कटिमेखळेवरी महामणी ॥ कीं पंक्ती बैसले वासरमणी ॥ दाहकत्व सांडूनि जघनीं ॥ श्रीरामाच्या लागले ॥८८॥ वेदांतींच्या श्रुति गहन ॥ अर्थ बोलती जेवि शोधून ॥ तैशा क्षुद्रघंटा रुणझुण ॥ शब्द करिती रसाळ ॥८९॥ देखून कटिप्रदेश सुकुमार ॥ लाजोनि वना गेला मृगेंद्र ॥ वाटे त्या दुःखें स्वशरीर ॥ वाहन केलें दुर्गेचें ॥१९०॥ गंभीरावर्त नाभिस्थान ॥ जेथें जन्मला चतुरानन ॥ सत्व रज तम गाळून ॥ त्रिवळी उदरीं विराजे ॥९१॥ कौस्तुभतेज अपार ॥ पाहतां भुलती शशिमित्र ॥ गुणीं ओंविलीं नक्षत्रे समग्र ॥ मुक्ताहार डोलती तेंवि ॥९२॥ कीं त्या मुक्तांच्या माळा बहुत ॥ रघुपतीच्या गळां डोलत ॥ कीं मुक्तारूपें समस्त ॥ अनंत ब्रह्मांडें गुंफिलीं ॥९३॥ मुक्तामाळांचें तेज गहन ॥ परी त्यांचा पालटला वर्ण ॥ दिसती इंद्रनीळासमान ॥ श्यामलांगीं रघुपतीच्या ॥९४॥ नीळ गगनावरी सुंदर ॥ मंदाकिनीओघ दिसे शुभ्र ॥ तैसा अम्लान सुमनहार ॥ श्यामतनूवरी शोभत ॥९५॥ श्यामलांगी अति निर्मळ ॥ वरी डोले वैजंतीची माळ ॥ पुष्करीं शक्रचाप सुढाळ ॥ सुरंग जैसें मिरवतसे ॥९६॥ कीं मेघीं स्थिरावली क्षणप्रभा ॥ तैशी वैजयंतीची शोभा ॥ सहस्रमुखाच्या जिभा ॥ गुण वर्णितां शिणल्या हो ॥९७॥ अनंत भक्त हृदयीं धरिले ॥ तरीच वक्षःस्थळ रुंदावलें ॥ ब्रह्मानंद मुरोनि ओतिलें ॥ हृदयस्थान सत्य पैं ॥९८॥ श्रीवत्स झळके सव्यांगीं ॥ श्रीनिकेतन वामभागीं ॥ उटी शोभे श्यामलांगीं ॥ कोण्या दृष्टांतें तें ऐका ॥९९॥ मित्रकन्येवरी जान्हवीजळ ॥ कीं राकाइंदुप्रभेनें शोभे निराळ ॥ कीं दैदीप्य मणि इंद्रनीळ ॥ आवरण त्यावरी काश्मिराचें ॥२००॥ कीं हळाहळ जाहले अपार ॥ म्हणोनि धांवला कर्पूरगौर ॥ चंदनरूपें तो प्राणमित्र ॥ श्यामलांगीं जडला हो ॥१॥ तैसी उटी दिसे सुढाळ ॥ कीं चंद्रबिंब उकले निर्मळ ॥ कीं मुक्ताफळांचा गोळा सुढाळ ॥ इंद्रनीळा चर्चियेला ॥२॥ शंख चक्र धनुष्य बाण ॥ चोहों हस्तीं शोभायमान ॥ हस्तकटकांचे तेजे करून ॥ उजळीत नभातें ॥३॥ क्षणप्रभेचीं चक्रें तळपती ॥ तैशा मुद्रिका करीं झळकती ॥ किंवा औपासक यंत्रें रेखिती ॥ तेचि गति येथें दिसे ॥४॥ प्रळयग्नीनें उघडिले नयन ॥ तेंवि कीर्तिमुखें परिपूर्ण ॥ कीं निष्कलंक रोहिणीरमण ॥ पदक हृदयीं डोलतसे ॥५॥ कंबुकंठ अति शोभत ॥ नासिक सरळ सुकुमार बहुत ॥ मंदस्मितवदन विराजत ॥ कोटि मन्मथ ओंवाळिजे ॥६॥ विद्रुमवर्ण अधर सतेज ॥ माजी ओळीनें झळकती द्विज ॥ त्या तेजें शशी नक्षत्रें तेजःपुंज ॥ झांकोळती पाहतां ॥७॥ त्रैलोकींचा मेळवोनि आनंद ॥ ओतिलें रामाचें वदनारविंद ॥ आकर्ण नेत्र भ्रुकुटी विशद ॥ धनुष्याकृति शोभती ॥८॥ स्वानंदसरोवरींचीं कमलदलें ॥ तैसे आकर्ण नयन विकासले ॥ त्या कृपादृष्टीनें निवाले ॥ प्रेमळ जन सर्वही ॥९॥ कुंडलें तळपती मकराकार ॥ कीं जडले रविरोहिणीवर ॥ कीं अंगिरापुत्र भृगुपुत्र ॥ विचार पुसती रामातें ॥२१०॥ कीं वेदसागरींच्या रत्नज्योती ॥ पूर्वउत्तर मीमांसा निश्चिती ॥ कुंडलरूपें जाणविती ॥ अर्थ विशेष स्वामीतें ॥११॥ श्रीरामतनु सुकुमार ॥ तेणें शोभती अलंकार ॥ पीतवर्ण टिळक सुंदर ॥ अनुपम्य रेखिला ॥१२॥ सुवर्णोदक नदीचा पूर ॥ नीळगिरीपाठारीं निरंतर ॥ तैसा टिळक सुंदर ॥ विशळभाळीं झळकतसे ॥१३॥ जैसा कल्पांतींचा दिनकर ॥ तैसा मुकुट दिसे जाज्वल्य सुंदर ॥ तेज तळपतसे अपार ॥ चक्रामाजी न समाये ॥१४॥ दावाग्नीचा कल्लोळ भडकत ॥ तैसें उत्तरीय वस्त्र रुळत ॥ दशांप्रति मुक्तें झळकत ॥ कृत्तिकापुंज जयापरी ॥१५॥ तें परम तेजाळ क्षीरोदक ॥ कीं शुभ्र यशा चढलें बीक ॥ शुभ्र श्वेत मृडानीनायक ॥ कर्पूरेंकरूनि उटिला कीं ॥१६॥ कीं दिव्य रजततगट घडलें ॥ कीं पारदें कैलास डवरिलें ॥ कीं जान्हवीतोयें ओपविलें ॥ दिनकरनाथें स्वहस्तें ॥१७॥ सच्चिदानंदतनु सगुण ॥ अतसीकुसुमाभास पूर्ण ॥ त्याचि रंगेकरून ॥ नीलोत्पलें राबविलीं ॥१८॥ नभासीं चढला तोच रंग ॥ त्याचि प्रभेनें रंगले मेघ ॥ इंद्रनीळही सुरंग ॥ त्याच प्रकाशें प्रकाशले ॥१९॥ तेथींचें सौंदर्य अद्भुत ॥ गरुडपाचूंसी तेज दिसत ॥ मर्गजासी बीक चढत ॥ तनु सांवळी देखोनीयां ॥२२०॥ तो वैकुंठीचा वेल्हाळ सुंदर ॥ भक्तमंदिरांगणमंदार ॥ कुरवंडी करूनि सांडावे साचार ॥ कोटि मकरध्वज वरोनियां ॥२१॥ ब्रह्मांड फोडोनि बाहेरी ॥ आंगींचा सुवास धांवत वरी ॥ लावण्यामृतसागर कैटभारी ॥ लीलावतारी साधक जो ॥२२॥ पूर्णब्रह्मानंद रघुवीर ॥ लीलाविग्रही श्रीधरवर ॥ हृदयीं रेखिला निरंतर ॥ निजभक्तीं प्रेमभरें ॥२३॥ असो कौसल्या बोले ते अवसरीं ॥ भक्तवत्सला मधुकैटभारी ॥ तूं आतां बाळवेष धरीं ॥ माझें उदरीं अवतरें ॥२४॥ लोक म्हणतील कौसल्यानंदन ॥ ऐसा होय तूं मनमोहन ॥ अमलदल राजीवनयन ॥ हास्यवदन विलोकीं ॥२५॥ सजलजलदवर्ण कोमळ ॥ तो कौसल्येपुढें जाहला बाळ ॥ तंव ते परम सुवेळ ॥ पुष्यार्कयोग ते समयीं ॥२६॥ जो क्षीरसागरवासी तमालनीळ ॥ तो कौसल्येपुढें जाहला बाळ ॥ चरणांगुष्ठ धरोनि कोमळ ॥ मुखकमळीं घालीतसे ॥२७॥ भक्त चरणीं लागले बहुत ॥ गोड म्हणोन वाखाणित ॥ यालागीं गोडी रघुनाथ ॥ स्वयें पाहत चाखोनियां ॥२८॥ कीं स्वचरणगोडी सेवित ॥ भक्तांसी लोभ लागावया बहुत ॥ म्हणोनियां कौसल्यासुत ॥ कौतुकार्थ दावीतसे ॥२९॥ पुत्र जाहला कौसल्येस ॥ लागला वाद्यांचा एकचि घोष ॥ सुरांसहित सुराधीश ॥ जयजयकार नभीं करिती ॥२३०॥ सुमनसंभार ते अवसरीं ॥ देव वर्षती अयोध्येवरी ॥ दुंदुभिनाद अंबरीं ॥ न मायेचि तेधवां ॥३१॥ हळदीकुंकुमें ताटें भरूनी ॥ बिदोबिदी धांवती सुवासिनी ॥ पावल्या कौसल्येच्या सदनीं ॥ वेगेंकरोनि तेधवां ॥३२॥ मंगळतुरांचा एकचि नाद ॥ घरोघरीं ब्रह्मानंद ॥ ते समयींचा आनंद ॥ भोगींद्र वर्णूं शकेना ॥३३॥ आनंदला ब्रह्मनंदन ॥ चहूंकडोन धांवले ब्राह्मण ॥ जैसा क्षीरसागर देखोन ॥ क्षुधार्थी वेगें पावती ॥३४॥ कीं महापर्वकाळ प्रकटला ॥ प्रयागासी धांवे भक्तमेळा ॥ कीं गांवासमीप परिस निघाला ॥ दुर्बळ धांवती लोह घेऊनी ॥३५॥ कीं तृषाक्रांत गोभार सकळी ॥ धांवती जैसे गंगाजळीं ॥ कीं वृक्ष दाटले देखून फळीं ॥ विहंगम जैसे झेंपावती ॥३६॥ तैसी ब्राह्मणांची ते काळीं ॥ दाटी जाहली राजाजवळी ॥ पुत्रमुख पहावया ते वेळीं ॥ दशरथराव चालिला ॥३७॥ दशरथ म्हणे याचकांसी ॥ जे जे इच्छा असेल मानसीं ॥ ते ते मागा मजपाशीं ॥ येच समयीं देईन ॥३८॥ भांडारें फोडिलीं बहुत ॥ याचकांसी म्हणे दशरथ ॥ मोटा बांधोनि अमित ॥ आवडे तितुकें न्या आतां ॥३९॥ समागमें घेऊन ब्राह्मण ॥ महाराज तो अजनंदन ॥ प्रवेशला आनंदेकरून ॥ कौसल्यासदनीं तेधवां ॥२४०॥ दशरथें करोनियां स्नान ॥ केलें आधीं पुण्याहवाचन ॥ पहावयासी पुत्रवदन ॥ राजा जवळी पातला ॥४१॥ श्रीरामवदन ते अवसरीं ॥ न्याहाळितां तोषला अंतरीं ॥ मधुबिंदु घालोनि मुखाभीतरीं ॥ मधुकैटभारि तृप्त केला ॥४२॥ श्रीरामाचें जातक ॥ करी तेव्हां नृपनायक ॥ गो भूरत्नें असंख्य ॥ मग देत याचकांसी ॥४३॥ रत्नजडित सिंहासन ॥ त्यावरी माय बैसली राम घेऊन ॥ मृगांकवर्ण चामरें जाण ॥ दोघी ढाळिती दोहींकडे ॥४४॥ पीकपात्र घेऊनि हातीं ॥ समीप विलसे एक दूती ॥ कनकांबराची घेऊन बुंथी ॥ बैसली सती कौसल्या ॥४५॥ भोंवते वेष्टिले विद्वज्जन ॥ त्यांसी भूतभविष्यवर्तमानज्ञान ॥ सातशतें स्त्रिया धांवोन ॥ येत्या जाहल्या दशरथाच्या ॥४६॥ जैशा केवळ विद्युल्लता ॥ तैशा अलंकारवस्त्रमंडिता ॥ पाळां कौसल्येभोंवता ॥ शोभेल कैसा ते वेळीं ॥४७॥ महामाया आदिभगवती ॥ तीभोंवत्या मिळाल्या अनंतशक्ति ॥ कीं सूर्यचक्रासी वेष्टिती ॥ किरणें जैसी तयापरी ॥४८॥ वसिष्ठ गुरु होऊन पुढें ॥ विलोकी श्रीरामाचें रूपडें ॥ जे जे जन्मकर्मनिवाडे ॥ ते रायापुढें सांगत ॥४९॥ म्हणे हा क्षीरसागरविहारी ॥ जन्मला कौसल्येचें उदरीं ॥ निजजन तारावयासी निर्धारीं ॥ अवतरला आदिपुरुष ॥२५०॥ द्वादश वर्षे यासी भरतां ॥ एक द्विज येईल अवचिता ॥ प्रार्थोनियां दशरथा ॥ घेऊन यासी जाईल ॥५१॥ आरंभीं सोडोनि एक बाण ॥ राक्षसी वधील दारुण ॥ गोब्राह्मणमखपाळण ॥ करील जाण पुत्र तुझा ॥५२॥ कृशान प्रवेशे शुष्कविपिनीं ॥ तैसा जाळील राक्षस मुखरक्षणीं ॥ पुढें चरणस्पर्शेकरूनी ॥ एक ललना उद्धरील ॥५३॥ परम प्रचंड कोदंड ॥ तें स्वदंडबळें करील दुखंड ॥ एकपत्नीव्रत प्रचंड ॥ वीर होईल त्रिभुवनीं ॥५४॥ महायोद्धा एक ब्राह्मण ॥ त्यास जिंकील न लगतां क्षण ॥ बंधुसहित परतोन ॥ अयोध्येसी येईल ॥५५॥ राज्यीं बैसतां हा वरिष्ठ ॥ एक होईल महा अरिष्ट ॥ नगरलोक पावतील कष्ट ॥ खेद उत्कट करितील ॥५६॥ हा नरवीर पंचानन ॥ प्रेमें पाळील पितृवचन ॥ मग स्त्रीसमवेत कानन ॥ चतुर्दश वर्षें सेवील ॥५७॥ हा नसतां आश्रमांत ॥ एक राक्षस येईल अकस्मात ॥ याचे स्त्रियेस नेईल सत्य ॥ षण्मासपर्यंत निर्धारें ॥५८॥ मग हा स्त्री शोधित अरण्यांत ॥ वानर मिळतील अकस्मात ॥ एक वानर उन्मत्त ॥ त्यास मारील हा न कळतां ॥५९॥ ब्रह्मांड नाचवील नखाग्नीं ॥ ऐसा एक वानरकेसरी ॥ जाऊन समुद्रसंभवपुरीं ॥ महाप्रळय करील तो ॥२६०॥ शुद्धि आणितां राघवेंद्र ॥ पाषाणीं पालाणील समुद्र ॥ शरण येईल एक रजनीचर ॥ चिरंजीव त्यासी करील हा ॥६१॥ मारूनि राक्षसां सकळां ॥ सोडवील सुरांच्या बंदिशाळा ॥ मागुती येईल स्वस्थळा ॥ अयोध्यापुरा गजरेंसीं ॥६२॥ अकरा सहस्र संवत्सर ॥ राज्य करील हा राजेंद्र ॥ पुढें पुत्रासी युद्ध थोर ॥ करील कौतुकें करूनियां ॥६३॥ शेवटीं अयोध्या विमानीं घालोनी ॥ नेऊन ठेवील वैकुंठभुवनीं ॥ ऐसें जातक ऐकोनि कर्णीं ॥ राव दशरथ तोषला ॥६४॥ स्तनपान करितां रघुनंदन ॥ पाहे वसिष्ठाकडे परतोन ॥ कीं वाल्मीकभाष्य संपूर्ण ॥ कथिलें येणें अवलीलें ॥६५॥ तों सुमित्रेसी जाहला पुत्र ॥ म्हणोनि धांवत आले विप्र ॥ क्षीरसागरींहूनि श्रीधर ॥ कौसल्येमंदिरी पातला ॥६६॥ तंव तो भोगींद्र पाळती घेत ॥ पाठिराखा पातला त्वरित ॥ सुमित्रेचे शेजे रिघत ॥ बाळदशा धरोनियां ॥६७॥ सुमित्रा स्वप्न देखत ॥ कीं मज जाहला सुलक्षण सुत ॥ सावध होवोनियां पाहत ॥ पुढें खेळत बाळक तो ॥६८॥ ऐसा जन्मला सुमित्रानंदन ॥ विप्रांसहित दशरथ येऊन ॥ तात्काळ केलें पुण्याहवाचन ॥ जातकर्मादि सर्वही ॥६९॥ कैकयीस जाहले दोन कुमर ॥ ते विष्णूचे शंखचक्र अवतार ॥ परी कैसे जन्मले तो विचार ॥ कैकयीस नेणवे ॥२७०॥ सुषुप्तीमाजी कैकयी निमग्न ॥ जैसा पंकगर्तेत पाषाण ॥ पुत्र येऊनि दोघेजण ॥ दोहींकडे खेळताती ॥७१॥ दासी येऊन कैकयीप्रति ॥ थापटोनि जागी करिती ॥ दोघे पुत्र जन्मले निश्चितीं ॥ सावध होऊन पाहें पां ॥७२॥ कैकयी पाहे पुत्रमुख ॥ तों मित्र आणि मृगांक ॥ तेंवि दोघे खेळती बाळक ॥ देखतां सुख वाटलें ॥७३॥ रायें तेथेंही येऊन ॥ अवलोकिले दोघे नंदन ॥ सुखी केले याचकजन ॥ वस्त्राभरणें करूनियां ॥७४॥ बारा दिवसपर्यंत ॥ महोत्साह राव करित ॥ मंगळतुरे गर्जत ॥ रात्रंदिवस राजगृहीं ॥७५॥ तेरावे दिवशीं वसिष्ठऋषि ॥ नामकरण ठेवी चौघांसी ॥ कौसल्येचा राम तेजोराशी ॥ जो वैकुंठवासी जगदात्मा ॥७६॥ सुमित्रेचा नंदन ॥ त्याचें नाम ठेविलें लक्ष्मण ॥ जो काद्रवेयकुलभूषण ॥ विष्णु शयन ज्यावरी करी ॥७७॥ कैकयीचे जे कां सुत ॥ भरत शत्रुघ्न निश्चित ॥ चौघे दशरथी जगविख्यात ॥ ऐका चरित्र तयांचें ॥७८॥ ज्यांची जन्मकर्मलीला ऐकतां ॥ पळ सुटे सर्व दुरितां ॥ जैसा महाप्रभंजन सुटतां ॥ जलदजाळ वितळे पैं ॥७९॥ श्रीरामकथा मानससरोवर ॥ तुम्ही संत श्रोते राजहंस चतुर ॥ साहित्य मुक्तें सुढाळ थोर ॥ सेवा निरंतर आदरें ॥२८०॥ श्रीरामकथा सुधारस ॥ तुम्ही पंडित श्रोते त्रिदश ॥ प्राशन करा सावकाश ॥ अति सुरस ग्रंथ हा ॥८१॥ पुराणपुरुष परात्पर ॥ तो ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ अयोध्येंत अवतरला साचार ॥ त्याचें चरित्र परिसा पुढें ॥८२॥ स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ चतुर्थोऽध्याय गोड हा ॥२८३॥ ॥ श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥ |