श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ द्वाविंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

समुद्रस्य सम्मत्या नलेन सागरोपरि शतयोजन विस्तृत सेतो निर्माणं; तेन श्रीरामप्रभृतिभिः सह वानरसेनायाः परे पारे गमनं तत्र निवेशनं च - समुद्राच्या सल्‍यानुसार नलाच्या द्वारे सागरावर शंभर योजन लांब सेतुची निर्मिती, तसेच त्याच्या द्वारा श्रीराम आदिसहित वानरसेनेचे दुसर्‍या तीरास पोहोचून तळ ठोकणे -
अथोवाच रघुश्रेष्ठः सागरं दारुणं वचः ।
अद्य त्वां शोषयिष्यामि सपातालं महार्णव ॥ १ ॥
तेव्हा रघुकुळतिलक श्रीरामांनी समुद्राला कठोर शब्दात म्हटले - महासागरा ! आज मी तुला पाताळासहित सुकवून टाकीन. ॥१॥
शरनिर्दग्धतोयस्य परिशुष्कस्य सागर ।
मया निहतसत्त्वस्य पांसुरुत्पद्यते महान् ॥ २ ॥
सागरा ! माझ्या बाणांनी तुझी सारी जलराशी दग्ध होऊन जाईल, तू सुकून जाशील आणि तुझ्यामध्ये राहाणारे सर्व जीव नष्ट होऊन जातील. अशा स्थितिमध्ये तुझ्या या जलाच्या ठिकाणी विशाल वालुकाराशी उत्पन्न होईल. ॥२॥
मत्कार्मुकविसृष्टेन शरवर्षेण सागर ।
परं तीरं गमिष्यन्ति पद्‌भिरेव प्लवंगमाः ॥ ३ ॥
समुद्रा ! माझ्या धनुष्याकडून केल्या गेलेल्या बाणांच्या वृष्टिने जेव्हा तुझी अशी दशा होईल, तेव्हा वानरलोक पायीच चालून तुझ्या दुसर्‍या तटावर पोहोचतील. ॥३॥
विचिन्वन्नाभिजानासि पौरुषं नापि विक्रमम् ।
दानवालय संतापं मत्तो नाम गमिष्यसि ॥ ४ ॥
दानवांच्या निवासस्थाना ! तू केवळ चोहोंबाजूनी वहात आलेल्या जलराशीचा संग्रह करतोस. तुला माझ्या बल आणि पराक्रमाचा पत्ता नाही आहे, परंतु याद राख (या उपेक्षेच्या कारणाने) तुला माझ्या कडून भारी संताप प्राप्त होईल. ॥४॥
ब्राह्मेणास्त्रेण संयोज्य ब्रह्मदण्डनिभं शरम् ।
संयोज्य धनुषि श्रेष्ठे विचकर्ष महाबलः ॥ ५ ॥
असे म्हणून महाबली श्रीरामांनी एका ब्रह्मदंडासमान भयंकर बाणाला ब्रह्मास्त्राने अभिमंत्रित करून आपल्या श्रेष्ठ धनुष्यावर चढवून खेचला. ॥५॥
तस्मिन् विकृष्टे सहसा राघवेण शरासने ।
रोदसी संपफालेव पर्वताश्च चकंपिरे ॥ ६ ॥
राघवाद्वारा एकाएकी ते धनुष्य खेचले जाताच पृथ्वी आणि आकाश जणु फाटू लागली आणि पर्वत डगमगू लागले. ॥६॥
तमश्च लोकमावव्रे दिशश्च न चकाशिरे ।
परिचुक्षुभिरे चाशु सरांसि सरितस्तथा ॥ ७ ॥
सर्व संसारात अंध:कार पसरला. कुणालाही दिशांचे ज्ञान राहिले नाही. सरितांमध्ये आणि सरोवरांमध्ये तात्काळ खळबळ उत्पन्न झाली. ॥७॥
तिर्यक् च सह नक्षत्रैः सङ्‌गतौ चन्द्रभास्करौ ।
भास्करांशुभिरादीप्तं तमसा च समावृतम् ॥ ८ ॥
चंद्रमा आणि सूर्य नक्षत्रांच्यासह तिर्यक गतीने चालू लागले. सूर्याच्या किरणांनी प्रकाशित होऊनही आकाशात अंधार पसरला. ॥८॥
प्रचकाशे तदाऽऽकाशं उल्काशतविदीपितम् ।
अन्तरिक्षाच्च निर्घाता निर्जग्मुरतुलस्वनाः ॥ ९ ॥
त्यासमयी आकाशात शेकडो उल्का प्रज्वलित होऊन त्याला प्रकाशित करू लागल्या तसेच अंतरिक्षातून अनुपम आणि भारी गडगडाटासह वज्रपात होऊ लागले. ॥९॥
वपुःप्रकर्षेण ववः दिव्यमारुतपंक्तयः ।
बभञ्ज च तदा वृक्षान् जलदान् उद्‌वहन्मुहुः ॥ १० ॥

अरुजंश्चैव शैलाग्रान् शिखराणि बभञ्ज च ।
परिवह आदि वायुभेदांचा समूह मोठ्‍या वेगाने वाहू लागला. तो मेघांच्या समुदायाला उडवून टाकीत वारंवार वृक्षांना तोडत, मोठ मोठ्‍या पर्वतांना धडका देत आणि त्यांच्या शिखरांना खंडित करून पाडून टाकू लागला. ॥१० १/२॥
दिवि च स्म महामेघाः संहताः समहास्वनाः ॥ ११ ॥

मुमुचुर्वैद्युतानग्नीन् ते महाशनयस्तदा ।
यानि भूतानि दृश्यानि चुक्रुशुश्चाशनेः समम् ॥ १२ ॥

अदृश्यानि च भूतानि ममुचुर्भैरवस्वनम् ।
आकाशात महान्‌ वेगवान्‌ विशाल वज्र मोठ्‍या गडगडाटासह धडका घेत त्या समयी वैद्युत अग्निची वृष्टि करू लागले. जे प्राणी दिसून येत होते आणि जे दिसून येत नव्हते, ते सर्व वीजेच्या कडकडाटाप्रमाणे भयंकर शब्द करू लागले. ॥११-१२ १/२॥
शिश्यिरे चाभिभूतानि संत्रस्तान्युद्विजन्ति च ॥ १३ ॥

संप्रविव्यथिरे चापि न च पस्पन्दिरे भयात् ।
त्यांतील कित्येक तर अभिभूत होऊन धराशायी होऊन गेले. कित्येक तर भयभीत आणि उद्विग्न होऊन गेले. कोणी व्यथेने व्याकुळ होऊन गेले आणि कित्येक तर भयाने जडवत्‌ होऊन गेले. ॥१३ १/२॥
सह भूतैः सतोयोर्मिः सनागः सहराक्षसः ॥ १४ ॥

सहसाऽभूत् ततो वेगाद् भीमवेगो महोदधिः ।
योजनं व्यतिचक्राम वेलामन्यत्र संप्लवात् ॥ १५ ॥
समुद्र आपल्या मध्ये राहणार्‍या प्राणी, तरंग, सर्प आणि राक्षसांसहित एकाएकी भयानक वेगाने युक्त झाला आणि प्रलयकाळा शिवायच तीव्रगतीने आपली मर्यादा ओलांडून एक-एक योजने पुढे सरकला. ॥१४-१५॥
तं तदा समतिक्रान्तं नातिचक्राम राघवः ।
समुद्धतममित्रघ्नो रामो नदनदीपतिम् ॥ १६ ॥
या प्रकारे नद नद्यांचे स्वामी असलेल्या त्या उद्धट समुद्राने मर्यादा ओलांडून वाढू लागल्यावरही शत्रूसूदन श्रीरामचंद्र आपल्या स्थानापासून मागे सरले नाहीत. ॥१६॥
ततो मध्यात् समुद्रस्य सागरः स्वयमुत्थितः ।
उदयाद्रि महाशैलान् मेरोरिव दिवाकरः ॥ १७ ॥
त्या समुद्राच्या मध्यातून सागर स्वयं मूर्तिमान होऊन प्रकट झाला, जणु महाशैल मेरूपर्वताच्या अंगभूत उदयाचलावरून सूर्यदेव उदित झाले होते. ॥१७॥
पन्नगैः सह दीप्तास्यैः समुद्रः प्रत्यदृश्यत ।
स्निग्धवैडूर्यसंकाशो जाम्बूनदविभूषणः ॥ १८ ॥
चमकणारी मुखे असणार्‍या सर्पांसह समुद्राचे दर्शन झाले. त्याचा वर्ण स्निग्ध वैडूर्यमण्यासमान श्याम होता. त्याने जंबूनद नामक सुवर्णाची बनलेली आभूषणे धारण केली होती. ॥१८॥
रक्तमाल्याम्बरधरः पद्मपत्रनिभेक्षणः ।
सर्वपुष्पमयीं दिव्यां शिरसा धारयन् स्रजम् ॥ १९ ॥
लाल रंगाच्या फुलांची माळ आणि लालच वस्त्र धारण केलेले होते. त्याचे नेत्र प्रफुल्ल कमलदलासमान सुंदर होते. त्याने मस्तकावर एक दिव्य पुष्पमाळा धारण केलेली होती, जी सर्व प्रकारच्या फुलांनी बनविलेली होती. ॥१९॥
जातरूपमयैश्चैव तपनीयविभूषणैः ।
आत्मजानां च रत्‍नाानां भूषितो भूषणोत्तमैः ॥ २० ॥
सुवर्ण आणि तापवलेल्या कांचनांची आभूषणे त्याची शोभा वाढवत होती. तो आपल्यातच उत्पन्न झालेल्या रत्‍नांच्या उत्तम आभूषणांनी विभूषित होता. ॥२०॥
धातुभिर्मण्डितः शैलो विविधैर्हिमवानिव ।
एकावलीमध्यगतं तरलं पाण्डरप्रभम् ॥ २१ ॥

विपुलेनोरसा बिभ्रत् कौस्तुभस्य सहोदरम् ।
म्हणून नाना प्रकारच्या धातुंनी अलंकृत हिमवान्‌ पर्वतासमान शोभा प्राप्त करीत होता. त्याने आपल्या विशाल वक्ष:स्थळावर कौस्तुभ मण्याच्या सदृश्य एक श्वेत प्रभेने युक्त मुख्य रत्‍न धारण केलेले होते, जे मोत्यांच्या एकेरी माळेच्या मध्यभागी प्रकाशित होत होते. ॥२१ १/२॥
आघूर्णिततरङ्‌गौघः कालिकानिलसंकुलः ॥ २२ ॥

गंगासिंधुप्रधानाभि आपगाभिः समावृतः ।
चंचल तरंगांनी त्याला घेरलेले होते. मेघमाला आणि वायु यांनी तो व्याप्त होता तसेच गंगा आणि सिंधु आदि नद्या त्याला सर्व बाजूनी घेरून उभ्या होत्या. ॥२२ १/२॥
उद्वर्तितमहाग्राहः सम्भ्रान्तोरगराक्षसः ॥ २३ ॥

देवतानां सुरूपाभिः नानारूपाभिरीश्वरः ।
सागरः समुपक्रम्य पूर्वमामंत्र्य वीर्यवान् ॥ २४ ॥

अब्रवीत् प्राञ्जलिर्वाक्यं राघवं शरपाणिनम् ॥ २५ ॥
त्याच्यामध्ये मोठ मोठे ग्राह उद्‍भ्रांत होत होते; नाग आणि राक्षस घाबरलेले होते. देवतांसमान सुंदर रूप धारण करून आलेल्या विभिन्न रूप असणार्‍या नद्यांसह शक्तिशाली नदीपति समुद्राने निकट येऊन प्रथम धनुर्धर राघवांना संबोधित केले आणि नंतर हात जोडून म्हटले- ॥२३-२५॥
पृथिवी वायुराकाशं आपो ज्योतिश्च राघव ।
स्वभावे सौम्य तिष्ठन्ति शाश्वतं मार्गमाश्रिताः ॥ २६ ॥
सौम्य राघव ! पृथ्वी, वायु आकाश, जल आणि तेज - हे सर्वदा आपल्या स्वभावात स्थित रहातात. आपल्या सनातन मार्गाला कधीं सोडत नाहीत -सदा त्याच्या आश्रित राहातात. ॥२६॥
तत्स्वभावो ममाप्येष यदगाधोऽहमप्लवः ।
विकारस्तु भवेद् गाध एतत् ते प्रवदाम्यहम् ॥ २७ ॥
माझाही हा स्वभावच आहे, जो मी अगाध आणि अथांग आहे. कोणी माझ्या पार जाऊ शकत नाही व जर माझा थांग लागला तर हा विकार माझ्या स्वभावाचा व्यतिक्रमच होईल. म्हणून मी आपल्याला पार जाण्याचा उपाय सांगतो आहे. ॥२७॥
न कामान्न च लोभाद् वा न भयात् पार्थिवात्मज ।
ग्राहनक्राकुलजलं स्तम्भयेयं कथञ्चन ॥ २८ ॥
राजकुमार ! मी मगर आणि नक्र आदिनी भरलेल्या आपल्या जलाला कुठल्या कामनेने, लोभाने अथवा भयाने कुठल्याही प्रकारे स्तंभित होऊ देणार नाही. ॥२८॥
विधास्ये येन गंतासि विषहिष्येऽप्यहं तथा ।
न ग्राहा विधष्यन्ति यावत् सेना तरिष्यति ।
हरीणां तरणे राम करिष्यामि यथा स्थलम् ॥ २९ ॥
श्रीरामा ! मी असा उपाय सांगेन की ज्यायोगे आपण माझ्या पार निघून जाल. ग्राह वानरांना कष्ट देणार नाहीत, सारी सेना पार उतरून जाईल आणि मला ही खेद होणार नाही. मी सहजरीतीने सर्व काही सहन करीन. वानरांना पार जाण्यासाठी ज्याप्रकारे सेतु बनेल, असा प्रयत्‍न मी करीन. ॥२९॥
तमब्रवीत् तदा राम शृणु मे वरुणालयः ।
अमोघोऽयं महाबाणः कस्मिन् देशे निपात्यताम् ॥ ३० ॥
तेव्हा श्रीरामांनी त्यास म्हटले - वरूणालय ! माझे म्हणणे ऐक. माझा हा विशाल बाण अमोघ आहे, सांग याला कुठल्या स्थानावर सोडले जावे. ॥३०॥
रामस्य वचनं श्रुत्वा तं च दृष्ट्‍वा महाशरम् ।
महोदधिर्महातेजा राघवं वाक्यमब्रवीत् ॥ ३१ ॥
श्रीरामांचे हे वचन ऐकून आणि तो महान्‌ बाण पाहून महातेजस्वी महासागराने राघवास म्हटले - ॥३१॥
उत्तरेणावकाशोऽस्ति कश्चित् पुण्यतरो मम ।
द्रुमकुल्य इति ख्यातो लोके ख्यातो यथा भवान् ॥ ३२ ॥
प्रभो ! जसे जगतात सर्वत्र आपण विख्यात तसेच पुण्यात्मा आहात, त्याच प्रकारे माझ्या उत्तरेकडे द्रुमकुल्य नावाने विख्यात एक मोठाच पवित्र देश आहे. ॥३२॥
उग्रदर्शनकर्माणो बहवस्तत्र दस्यवः ।
आभीरप्रमुखाः पापाः पिबन्ति सलिलं मम ॥ ३३ ॥
तेथे आभीर आदि जातीची बरीच माणसे निवास करतात, ज्यांचे रूप आणि कर्म फारच भयानक आहे. ते सर्वच्या सर्व पापी आणि लुटारू आहेत. ते लोक माझे जल पितात. ॥३३॥
तैस्तु संस्पर्शनं पापं सहेयं पापकर्मभिः ।
अमोघः क्रियतां राम तत्र तेषु शरोत्तमः ॥ ३४ ॥
त्या पापाचारी लोकांचा स्पर्श मला प्राप्त होत असतो, या पापाला मी सहन करू शकत नाही. श्रीरामा ! आपण आपल्या या उत्तम बाणाला तेथे सफल करावे. ॥३४॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा सागरस्य महात्मनः ।
मुमोच तं शरं दीप्तं वीरः सागरदर्शनात् ॥ ३५ ॥
महामना समुद्राचे हे वचन ऐकून सागराने दाखविल्यानुसार त्याच देशात श्रीरामांनी तो अत्यंत प्रज्वलित बाण सोडला. ॥३५॥
तेन तं मरुकान्तारं पृथिव्यां किल विश्रुतम् ।
निपातितः शरो यत्र वज्राशनिसमप्रभः ॥ ३६ ॥
तो वज्र आणि अशनि समान तेजस्वी बाण ज्या स्थानी पडला होता ते स्थान त्या बाणामुळेच पृथ्वीवर दुर्गम मरूभूमीच्या नावाने प्रसिद्ध झाले. ॥३६॥
ननाद च तदा तत्र वसुधा शल्यपीडिता ।
तस्माद् व्रणमुखात् तोयं उत्पपात रसातलात् ॥ ३७ ॥
त्या बाणाने पीडित होऊन त्या समयी वसुधा आर्तनाद करू लागली त्याच्या आघाताने जो छेद झाला, त्यातून रसातलाचे जल वर उसळू लागले. ॥३७॥
स बभूव तदा कूपो व्रण इत्येव विश्रुतः ।
सततं चोत्थितं तोयं समुद्रस्येव दृश्यते ॥ ३८ ॥
ते छिद्र विहीरी सारखे झाले आणि व्रण नावाने प्रसिद्ध झाले. या विहीरीतून सदा निघणारे जल समुद्राच्या जलाप्रमाणेच दिसून येत असते. ॥३८॥
अवदारणशब्दश्च दारुणः समपद्यत ।
तस्मात् तद् बाणपातेन अपः कुक्षिष्वशोषयत् ॥ ३९ ॥
त्या समयी तेथे भूमीच्या विदीर्ण होण्याचा भयंकर शब्द ऐकू आला. त्या बाणाला तेथे पाडून तेथील भूतलाच्या कुक्षिमध्ये (तलाव- पुष्करिणी आदि मध्ये) वर्तमान जलाला श्रीरामांनी सुकवून टाकले. ॥३९॥
विख्यातं त्रिषु लोकेषु मरुकान्तरामेव च ।
शोषयित्वा तु तं कुक्षिं रामो दशरथात्मजः ॥ ४० ॥

वरं तस्मै ददौ विद्वान् मरवेऽमरविक्रमः ॥ ४१ ॥
तेव्हा पासून ते स्थान तीन्ही लोकात मरूकांतार या नावानेच विख्यात झाले. जो प्रथम समुद्राचा कुक्षिप्रदेश होता, त्याला सुकवून देवोपम पराक्रमी विद्वान्‌ दशरथनंदन श्रीरामांनी त्या मरूभूमिला वरदान दिले. ॥४०-४१॥
पशव्यश्चाल्परोगश्च फलमूलरसायुतः ।
बहुस्नेहो बहुक्षीरः सुगंधिर्विविधौषधिः ॥ ४२ ॥
ही मरूभूमी पशुंच्यासाठी हितकारक होईल. येथे रोग अल्प असतील. ही भूमी फळ, मूल आणि रसांनी संपन्न होईल. येथे तूप आदि स्निग्ध पदार्थ अधिक सुलभ होतील, दुधाचीही रेलचेल होईल. येथे सुगंध पसरलेला असेल आणि अनेक प्रकारच्या औषधि उत्पन्न होतील. ॥४२॥
एवमेतैश्च संयुक्तो बहुभिः संयुतो मरुः ।
रामस्य वरदानाच्च शिवः पन्था बभूव ह ॥ ४३ ॥
याप्रकारे भगवान्‌ श्रीरामांच्या द्वारा वरदान मिळून तो मरूप्रदेश याप्रकारे बहुसंख्य गुणांनी संपन्न होऊन सर्वांसाठी मंगलकारक मार्ग बनला. ॥४३॥
तस्मिन् दग्धे तदा कुक्षौ समुद्रः सरितां पतिः ।
राघवं सर्वशास्त्रज्ञं इदं वचनमब्रवीत् ॥ ४४ ॥
ते कुक्षिस्थान दग्ध झाल्यावर सरितांचे स्वामी समुद्रांनी संपूर्ण शास्त्रांचे ज्ञाता राघवास म्हटले- ॥४४॥
अयं सौम्य नलो नाम तनुजो विश्वकर्मणः ।
पित्रा दत्तवरः श्रीमान् प्रीतिमान् विश्वकर्मणः ॥ ४५ ॥
सौम्य ! आपल्या सेनेत जो हा नल नामक कांतिमान्‌ वानर आहे, तो साक्षात विश्वकर्म्याचा पुत्र आहे. याला याच्या पित्याने हा वर दिला आहे की तू माझ्या समान समस्त शिल्पकलेमध्ये निपुण होशील. प्रभो ! आपण तर या विश्वाचे स्त्रष्टा विश्वकर्मा आहात. या नलाच्या हृदयात आपल्या प्रति खूप प्रेम आहे. ॥४५॥
एष सेतुं महोत्साहः करोतु मयि वानरः ।
तमहं धारिष्यामि तथा ह्येष पिता तथा ॥ ४६ ॥
हा महान्‌ उत्साही वानर आपल्या पित्यासमान शिल्पकर्मा मध्ये समर्थ आहे, म्हणून तो माझ्यावर सेतु निर्माण करू दे. मी त्या सेतूला धारण करीन. ॥४६॥
एवमुक्त्वोदधिर्नष्टः समुत्थाय नलस्ततः ।
अब्रवीद् वानरश्रेष्ठो वाक्यं रामं महाबलम् ॥ ४७ ॥
असे म्हणून समुद्र अदृश्य झाला. तेव्हा वानरश्रेष्ठ नल उठून महाबली भगवान्‌ श्रीरामांना म्हणाला- ॥४७॥
अहं सेतुं करिष्यामि विस्तीर्णे मकरालये ।
पितुः सामर्थ्यमासाद्य तत्त्वमाह महोदधिः ॥ ४८ ॥
प्रभो ! मी पित्याने दिलेली शक्ति मिळून या विस्तृत समुद्रावर सेतू निर्माण करीन. महासागराने ठीकच सांगितले आहे. ॥४८॥
दण्ड एव वरो लोके पुरुषस्येति मे मतिः ।
धिक् क्षमामकृतज्ञेषु सान्त्वं दानमथापि वा ॥ ४९ ॥
संसारात पुरूषांसाठी अकृतज्ञांच्या प्रति दंड नीतिचा प्रयोगच सर्वात अधिक अर्थसाधक आहे असा माझा विश्वास आहे. अशा लोकांच्या प्रति क्षमा, सांत्वना दाननीतिच्या प्रयोगाचा धिक्कार आहे. ॥४९॥
अयं हि सागरो भीमः सेतुकर्मदिदृक्षया ।
ददौ दण्डभयाद् गाधं राघवाय महोदधिः ॥ ५० ॥
या भयानक समुद्राला राजा सगराच्या पुत्रांनीच वाढविले आहे तरीही याने कृतज्ञतेने नव्हे, दंडाच्या भयानेच सेतुकर्म पहाण्याची इच्छा मनात आणून राघवाला आपला थांग दिला आहे. ॥५०॥
मम मातुर्वरो दत्तो मन्दरे विश्वकर्मणा ।
मया तु सदृशः पुत्रः तव देवि भविष्यति ॥ ५१ ॥
मंदराचलावर विश्वकर्म्यांनी माझ्या मातेला हा वर दिला होता की देवी ! तुझ्या गर्भापासून माझ्याच सारखा पुत्र होईल. ॥५१॥
औरसस्तस्य पुत्रोऽहं सदृशो विश्वकर्मणा ।
स्मारितोऽस्म्यहमेतेन तत्त्वमाह महोदधिः ।
न चाप्यहमनुक्तो वै प्रब्रूयामात्मनो गुणान् ॥ ५२ ॥
याप्रकारे मी विश्वकर्म्यांचा औरस पुत्र आहे आणि शिल्पकर्मात त्यांच्या समान आहे. या समुद्राने आज मला या सर्व गोष्टींचे स्मरण करून दिले आहे. महासागराने जे काही सांगितले आहे ते ठीक आहे. मी न विचारता आपल्याला माझ्या गुणांचे बद्दल सांगू शकत नव्हतो, म्हणून आत्तापर्यंत गप्प होतो. ॥५२॥
समर्थश्चाप्यहं सेतुं कर्तुं वै वरुणालये ।
काममद्यैव बध्नन्तु सेतुं वानरपुङ्‌गवाः ॥ ५३ ॥
मी महासागरावर पूल बांधण्यास समर्थ आहे, म्हणून सर्व वानर आजच पूल बांधण्याच्या कार्यास आरंभ करू देत. ॥५३॥
ततो विसृष्टा रामेण सर्वतो हरिपुंगवाः ।
उत्पेततुर्महारण्यं हृष्टाः शतसहस्रशः ॥ ५४ ॥
तेव्हा भगवान्‌ श्रीरामांनी धाडल्यावर लाखो मोठ मोठे वानर हर्ष आणि उत्साहाने भरून सर्वत्र उड्‍या मारीत गेले आणि मोठमोठ्‍या जंगलात घुसले. ॥५४॥
ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥
ते पर्वतासमान विशालकाय वानरशिरोमणी पर्वतशिखरे आणि वृक्षांना तोडत होते आणि त्यांना समुद्रापर्यंत ओढून आणत होते. ॥५५॥
ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥

बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥
ते साल, अश्वकर्ण, धव, बांबू, कुटज, अर्जुन, ताल, तिलक, तिनिशं, बेल, सप्तपर्ण, फुललेले कण्हेर, आम्र आणि अशोक आदि वृक्षांनी समुद्रास आच्छादून टाकू लागले. ॥५६-५७॥
समूलांश्च विमूलांश्च पादपान् हरिसत्तमाः ।
इन्द्रकेतूनिवोद्यम्य प्रजह्रुर्हरयस्तरून् ॥ ५८ ॥
ते श्रेष्ठ वानर तेथील वृक्षांना मूळापासून उपटून आणत होते किंवा मूळाच्या वरील भागापासून तोडून आणत होते. इंद्रध्वजाप्रमाणे उंच उंच वृक्षांना उचलून घेऊन येत होते. ॥५८॥
तालान् दाडिमगुल्मांश्च नारिकेल विभीतकान् ।
करीरान् बकुलान् निम्बान् समाजह्रुः इतस्ततः ॥ ५९ ॥
ताड, डाळिंबाच्या झाडांना, नारळ आणि बेहेड्‍यांच्या वृक्षांना, करीर, बकुळ तसेच कडु लिंबाच्या वृक्षांनाही इकडून तिकडून तोडून तोडून आणू लागले. ॥५९॥
हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥
महाकाय महाबलाढ्‍य वानर हत्तींप्रमाणे मोठ मोठ्‍या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्रांच्या द्वारा (विशिष्ट साधनांच्या द्वारा) समुद्रतटावर घेऊन येत होते. ॥६०॥
प्रक्षिप्यमाणैरचलैः सहसा जलमुद्धृतम् ।
समुत्ससर्प चाकाशं अवासर्पत् ततः पुनः ॥ ६१ ॥
शिलाखंडांच्या फेकण्यामुळे समुद्राचे जल एकाएकी आकाशात उसळत होते आणि नंतर तेथून परत खाली पडत होते. ॥६१॥
समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥
त्या वानरांनी सर्वत्र दगड टाकून समुद्रात खळबळ माजविली. काही दुसरे वानर शंभर योजने लांब (सूत्र) सूत पकडून होते. ॥६२॥
नलश्चक्रे महासेतुं मध्ये नदनदीपतेः ।
स तथा क्रियते सेतुः वानरैर्घोरकर्मभिः ॥ ६३ ॥
नल, नद आणि नद्यांचे स्वामी समुद्र यांच्यामध्ये महान्‌ सेतुची निर्मिती करत होते. भयंकर कर्म करणार्‍या वानरांनी एकत्र येऊन त्या समयी सेतु निर्माण कार्याचा आरंभ केला होता. ॥६३॥
दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥

मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥
कोणी माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. श्रीरामचंद्रांची आज्ञा शिरोधार्य करून शेकडो वानर, जे पर्वत आणि मेघांसमान प्रतीत होत होते, तेथे गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर पूल बांधत होते. ज्यांच्या अग्रभाग फुलांनी लगडलेला होता, अशा वृक्षांच्याद्वारा ही ते वानर सेतु बांधत होते. ॥६४-६५॥
पाषाणांश्च गिरिप्रख्यान् गिरीणां शिखराणि च ।
दृश्यन्ते परिधावन्तो गृह्य दानवसंनिभाः ॥ ६६ ॥
पर्वतासारखी शिळा आणि पर्वत शिखरे घेऊन सर्व बाजूस धावणारे वानर दानवांसारखे दिसून येत होते. ॥६६॥
शिलानां क्षिप्यमाणानां शैलानां तत्र पात्यताम् ।
बभूव तुमुलः शब्दः तदा तस्मिन् महोदधौ ॥ ६७ ॥
त्यासमयी त्या महासागरात फेकल्या जाणार्‍या शिळा आणि फेकले जाणारे पहाड यांच्या पडण्याने फार भीषण शब्द होत होता. ॥६७॥
कृतानि प्रथमेनाह्ना योजनानि चतुर्दश ।
प्रहृष्टैर्गजसंकाशैः त्वरमाणैः प्लवंगमैः ॥ ६८ ॥
हत्तीसमान विशालकाय वानर मोठ्‍या उत्साहाने आणि वेगाने काम करण्यात मग्न झाले होते. पहिल्या दिवशी त्यांनी चौदा योजने लांब पूल बांधला. ॥६८॥
द्वितीयेन तथैवाह्ना योजनानि तु विंशतिः ।
कृतानि प्लवगैस्तूर्णं भीमकायैर्महाबलैः ॥ ६९ ॥
नंतर दुसर्‍या दिवशी भयंकर शरीराच्या महाबलाढ्‍य वानरांनी वेगाने काम करून वीस योजन लांब पूल बांधला. ॥६९॥
अह्ना तृतीयेन तथा योजनानि तु सागरे ।
त्वरमाणैर्महाकायैः एकविंशतिरेव च ॥ ७० ॥
तिसर्‍या दिवशी शीघ्रतापूर्वक कामात गढलेल्या महाकाय कपिनी समुद्रात एकवीस योजने लांब पूल बांधला. ॥७०॥
चतुर्थेन तथा चाह्ना द्वाविंशतिरथापि च ।
योजनानि महावेगैः कृतानि त्वरितैस्ततः ॥ ७१ ॥
चौथ्या दिवशी महान्‌ वेगवान्‌ आणि शीघ्रकारी वानरांनी बावीस योजन लांब पूल आणखी बांधला. ॥७१॥
पञ्चमेन तथा चाह्ना प्लवगैः क्षिप्रकारिभिः ।
योजनानि त्रयोविंशत् सुवेलमधिकृत्य वै ॥ ७२ ॥
तसेच पाचव्या दिवशी शीघ्रतापूर्वक त्या वानर वीरांनी सुवेल पर्वताच्या जवळपर्यंत तेवीस योजने लांबीचा पूल बांधला. ॥७२॥
स वानरवरः श्रीमान् विश्वकर्मात्मजो बली ।
बबंध सागरे सेतुं यथा चास्य पिता तथा ॥ ७३ ॥
याप्रकारे विश्वकर्म्याचा बलवान्‌ पुत्र कांतिमान्‌ कपिश्रेष्ठ नल याने समुद्रात शंभर योजने लांब पूल तयार केला. या कार्यात ते आपल्या पित्यासमान प्रतिभाशाली होते. ॥७३॥
स नलेन कृतः सेतुः सागरे मकारालये ।
शुशुभे सुभगः श्रीमान् स्वातीपथ इवाम्बरे ॥ ७४ ॥
मकरालय समुद्रात नलाच्या द्वारा निर्मित झालेला तो सुंदर आणि शोभाशाली सेतु आकाशात स्वातीपथासारखा (छायापथा सारखा) सुशोभित होत होता. ॥७४॥
ततो देवाः सगंधर्वाः सिद्धाश्च परमर्षयः ।
आगम्य गगने तस्थुः द्रष्टुकामास्तदद्‌भुतम् ॥ ७५ ॥
त्या समयी देवता, गंधर्व, सिद्ध आणि महर्षि त्या अद्‌भुत कार्यास पहाण्यासाठी आकाशात येऊन उभे राहिले होते. ॥७५॥
दशयोजनविस्तीर्णं शतयोजनमायतम् ।
ददृशुर्देवगंधर्वा नलसेतुं सुदुष्करम् ॥ ७६ ॥
नलाने बनविलेला शंभर योजने लांब आणि दहा योजने रूंद त्या पुलाला देवता आणि गंधर्वांनी पाहिले, ज्याला बनविणे फारच कठीण काम होते. ॥७६॥
आप्लवन्तः प्लवन्तश्च गर्जन्तश्च प्लवंगमाः ।
तमचिन्त्यमसह्यं च ह्यद्‌भुतं लोमहर्षणम् ॥ ७७ ॥

ददृशुः सर्वभूतानि सागरे सेतुबंधनम् ।
वानरलोक इकडे-तिकडे उड्‍या मारत गर्जना करीत त्या अचिंत्य, असह्य, अद्‌भुत आणि रोमांचकारी पूलाला पहात राहिले होते. समस्त प्राण्यांनी समुद्रात सेतु बांधण्याचे हे कार्य पाहिले. ॥७७ १/२॥
तानि कोटिसहस्राणि वानराणां महौजसाम् ॥ ७८ ॥

बध्नन्तः सागरे सेतुं जग्मुः पारं महोदधेः ।
याप्रकारे त्या सहस्त्र कोटि (एक खर्व) महाबली आणि उत्साही वानरांचे दल पूल बांधता बांधताच समुद्राच्या पार जाऊन पोहोचले. ॥७८ १/२॥
विशालः सुकृतः श्रीमान् सुभूमिः सुसमाहितः ॥ ७९ ॥

अशोभत महान् सेतुः सीमन्त इव सागरे ।
तो पूल फारच विशाल, सुंदर रीतीने बनविलेला, शोभासंपन्न, समतल आणि सुसंबद्ध होता. तो महान्‌ सेतु सागरात सीमंतासमान शोभा प्राप्त करत होता. ॥७९ १/२॥
ततः पारे समुद्रस्य गदापाणिर्विभीषणः ॥ ८० ॥

परेषामभिघातार्थं अतिष्ठत् सचिवैः सह ।
पूल तयार झाल्यावर आपल्या सचिवांसहित विभीषण गदा हातात घेऊन समुद्राच्या दुसर्‍या तटावर उभे राहिले, ज्यायोगे शत्रुपक्षीय राक्षस जर पूल तोडण्यासाठी आले तर त्यांना दंड दिला जाऊ शकेल. ॥८० १/२॥
सुग्रीवस्तु ततः प्राह रामं सत्यपराक्रमम् ॥ ८१ ॥

हनुमंतं त्वमारोह अङ्‌गदं चापि लक्ष्मणः ।
अयं हि विपुलो वीर सागरो मकारालयः ॥ ८२ ॥

वैहायसौ युवामेतौ वानरौ धारयिष्यतः ।
तदनंतर सुग्रीवाने सत्यपराक्रमी श्रीरामांना म्हटले - वीरवर ! आपण हनुमानांच्या खाद्यांवर चढून जावे आणि लक्ष्मण अंगदांच्या पाठीवर स्वार होतील, कारण की हा मकरालय समुद्र फारच लांबरूंद आहे. म्हणून हेच दोघे आपणा दोघा भावांना धारण करू शकतील. ॥८१-८२ १/२॥
अग्रतस्तस्य सैन्यस्य श्रीमान् रामः सलक्ष्मणः ॥ ८३ ॥

जगाम धन्वी धर्मात्मा सुग्रीवेण समन्वितः ।
याप्रकारे धनुर्धर तसेच धर्मात्मा भगवान्‌ श्रीराम लक्ष्मण आणि सुग्रीवासह त्या सेनेच्या पुढे पुढे निघाले. ॥८३ १/२॥
अन्ये मध्येन गच्छन्ति पार्श्वतोऽन्ये प्लवंगमाः ॥ ८४ ॥

सलिले प्रपतन्त्यन्ये मार्गमन्ये प्रपेदिरे ।
केचिद् वैहायसगताः सुपर्णा इव पुप्लुवुः ॥ ८५ ॥
दुसरे वानर सेनेच्या मध्ये आणि आगे मागे राहून चालू लागले. कित्येक वानरांनी पाण्यात उड्‍या मारल्या आणि ते पोहोत जाऊ लागले. दुसरे पूलाचा मार्ग पकडून जात होते आणि कित्येक आकाशात उडून जाऊन गरूडाप्रमाणे उडत जात होते. ॥८४-८५॥
घोषेण महता घोषं सागरस्य समुच्छ्रितम् ।
भीममन्तर्दधे भीमा तरन्ती हरिवाहिनी ॥ ८६ ॥
याप्रकारे पार जात असलेल्या त्या भयंकर वानरसेनेने आपल्या महान्‌ घोषाने समुद्राच्या वाढत्या गर्जनेला दाबून टाकले. ॥८६॥
वानराणां हि सा तीर्णा वाहिनी नलसेतुना ।
तीरे निविविशे राज्ञो बहुमूलफलोदके ॥ ८७ ॥
हळू हळू वानरांची सारी सेना नलाने बनविलेल्या पूलावरून समुद्राच्या पार जाऊन पोहोचली. राजा सुग्रीवांनी फळ, मूळ आणि जलाची रेलचेल पाहून सागराच्या तटावरच सेनेचा तळ ठोकला. ॥८७॥
तदद्‌भुतं राघवकर्म दुष्करं
समीक्ष्य देवाः सह सिद्धचारणैः ।
उपेत्य रामं सहसा महर्षिभिः
तमभ्यषिञ्चन् सुशुभैर्जलैः पृथक् ॥ ८८ ॥
भगवान्‌ श्रीरामांचे ते अद्‌भुत आणि दुष्कर कर्म पाहून सिद्ध, चारण आणि महर्षिंच्या सह देवतालोक त्यांच्या जवळ आले तसेच त्यांनी पृथक पृथक पवित्र आणि शुभ जलांनी त्यांना अभिषेक केला. ॥८८॥
जयस्व शत्रून् नरदेव मेदिनीं
ससागरां पालय शाश्वतीः समाः ।
इतीव रामं नरदेवसत्कृतं
शुभैर्वचोभिः विविधैरपूजयन् ॥ ८९ ॥
नंतर म्हणाले- नरदेव ! तुम्ही शत्रूंच्यावर विजय प्राप्त करत रहा. याप्रकारे निरनिराळ्या मंगलसूचक वचनांच्या द्वारा राजसन्मानित श्रीरामांचे त्यांनी अभिनंदन केले. ॥८९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे द्वाविंशः सर्गः ॥ २२ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा बावीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥२२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP