हनुमन्नायकत्वे वानराणां रक्षसां च युद्धम्, हनुमतः श्रीरामपार्श्वे निवर्तनमिन्द्रजिता निकुम्भिलामुपेत्य यज्ञस्यानुष्ठानं च -
|
हनुमानांच्या नेतृत्वाखाली वानर आणि निशाचरांचे युद्ध, हनुमानांचे श्रीरामांच्या जवळ परत येणे आणि इंद्रजिताचे निकुम्भलिका - मंदिरात जाऊन होम करणे -
|
श्रुत्वा तु भीमनिर्ह्रादं शक्राशनिसमस्वनम् । वीक्षमाणा दिशः सर्वा दुद्रुवुर्वानरा भृशम् ॥ १ ॥
|
इंद्राच्या वज्राच्या गडगडाटाप्रमाणे तो भयंकर सिंहनाद ऐकून वानर संपूर्ण दिशांकडे पहात जोरजोराने पळू लागले. ॥१॥
|
तानुवाच ततः सर्वान् हनुमान् मारुतात्मजः । विषण्णवदनान् दीनांन् त्रस्तान् विद्रवतः पृथक् ॥ २ ॥
|
त्या सर्वांना विषादग्रस्त, दीन आणि भयभीत होऊन पळतांना पाहून पवनकुमार हनुमानांनी म्हटले -॥२॥
|
कस्माद् विषण्णवदना विद्रवध्वं प्लवङ्गमाः । त्यक्तयुद्धसमुत्साहाः शूरत्वं क्व नु वो गतम् ॥ ३ ॥
|
वानरांनो ! तुम्ही का बरे मुखावर विषाद आणून युद्ध-विषयक उत्साह सोडून पळून जात आहां ? तुमचे ते शौर्य कोठे निघून गेले ? ॥३॥
|
पृष्ठतोऽनुव्रजध्वं मां अग्रतो यान्तमाहवे । शूरैरभिजनोपेतैः अयुक्तं हि निवर्तितुम् ॥ ४ ॥
|
मी युद्धात पुढे पुढे चलतो. तुम्ही सर्व लोक माझ्या मागोमाग या. उत्तम कुळात उत्पन्न शूरवीरांसाठी युद्धात पाठ दाखविणे सर्वथा अनुचित आहे. ॥४॥
|
एवमुक्ताः सुसंहृष्टा वायुपुत्रेण वानराः । शैलशृङ्गान् द्रुमांश्चैव जगृहुर्हृष्टमानसाः ॥ ५ ॥
|
बुद्धिमान् वायुपुत्राने असे म्हटल्यावर वानरांचे चित्त प्रसन्न झाले आणि राक्षसांच्या प्रति अत्यंत कुपित होऊन त्यांनी हातामध्ये पर्वत-शिखरे आणि वृक्ष उचलून घेतले. ॥५॥
|
अभिपेतुश्च गर्जन्तो राक्षसान् वानरर्षभाः । परिवार्य हनूमन्तं अन्वयुश्च महाहवे ॥ ६ ॥
|
ते श्रेष्ठ वानरवीर त्या महासमरात हनुमानांना चोहो बाजुनी घेरून त्यांच्या मागे मागे चालू लागले आणि जोरजोराने गर्जना करत तेथे राक्षसांवर तुटून पडले. ॥६॥
|
स तैर्वानरमुख्यैश्च हनुमान् सर्वतो वृतः । हुताशन इवार्चिष्मान् अदहच्छत्रुवाहिनीम् ॥ ७ ॥
|
त्या श्रेष्ठ वानरांच्या द्वारा सर्व बाजुनी घेरलेले हनुमान् ज्वालामालांनी युक्त प्रज्वलित अग्निप्रमाणे शत्रुसेनेला दग्ध करू लागले. ॥७॥
|
स राक्षसानां कदनं चकार सुमहाकपिः । वृतो वानरसैन्येन कालान्तकयमोपमः ॥ ८ ॥
|
वानर-सैनिकांनी घेरलेल्या त्या महाकपि हनुमानांनी प्रलयकालच्या संहारकारी यमराजासमान राक्षसांचा संहार करण्यास आरंभ केला. ॥८॥
|
स तु कोपेन चाविष्टः कोपेन महाता कपिः । हनुमान् रावणिरथे महतीं पातयच्छिलाम् ॥ ९ ॥
|
सीतेच्या वधामुळे त्यांच्या मनात फार शोक होता आणि इंद्रजिताचा अत्याचार पाहून त्यांचा क्रोधही फारच वाढला होता, म्हणून हनुमानांनी रावणकुमाराच्या रथावर एक फारच मोठी शिळा फेकली. ॥९॥
|
तामापतन्तीं दृष्ट्वैव रथः सारथिना तदा । विधेयाश्वसमायुक्तः विदूरमपवाहितः ॥ १० ॥
|
ती आपल्याकडे येत असलेली पाहून सारथ्याने तात्काळच आपल्या अधीन राहणारे घोडे जुंपलेला तो रथ खूप दूर नेला. ॥१०॥
|
तमिन्द्रजितमप्राप्य रथस्थं सहसारथिम् । विवेशधरणीं भित्त्वा सा शिला व्यर्थमुद्यता ॥ ११ ॥
|
म्हणून सारथ्यासहित रथावर बसलेल्या इंद्रजिताच्या जवळही न पोहोचता ती शिळा जमीन फोडून तिच्या आत सामावली गेली. तिला फेकण्याचा सर्व उद्योग व्यर्थ झाला. ॥११॥
|
पातितायां शिलायां तु व्यथिता रक्षसां चमूः । निपतन्त्या च शिलया राक्षसा मथिता भृशम् ॥ १२ ॥
|
ती शिळा पडल्यावर त्या राक्षस सेनेला फार पीडा झाली. पडणार्या शिळेने बर्याचशा राक्षसांना चिरडून टाकले. ॥१२॥
|
तमभ्यधावञ्छतशो नदन्तः काननौकसः । ते द्रुमांश्च महावीर्या गिरिशृङ्गाणि चोद्यताः ॥ १३ ॥
|
तत्पश्चात् शेकडो विशालकाय वानर हातांत वृक्ष आणि पर्वतशिखरे उचलून गर्जना करीत इंद्रजिताकडे धावले. ॥१३॥
|
क्षिपन्तीन्द्रजितः सङ्ख्ये वानरा भीमविक्रमाः । वृक्षशैलमहावर्षं विसृजन्तः प्लवङ्गमाः ॥ १४ ॥
शत्रूणां कदनं चक्रुः नेदुश्च विविधैः स्वरैः ।
|
ते भवानक पराक्रमी वानरवीर युद्धस्थळी इंद्रजितावर वृक्षांना आणि पर्वतशिखरांना फेकू लागले. वृक्ष आणि शैलशिखरांची भारी वृष्टि करीत ते वानर शत्रुंचा संहार करू लागले आणि निरनिराळ्या आवाजात गर्जना करू लागले. ॥१४ १/२॥
|
वानरैस्तैर्महाभीमैः घोररूपा निशाचराः ॥ १५ ॥
वीर्यादभिहता वृक्षैः व्यवेष्टन्त रणाजिरे ।
|
त्या महाभयंकर वानरांनी वृक्षांच्या द्वारा घोररूपधारी निशाचरांना बलपूर्वक मारून टाकले. ते रणभूमीमध्ये पडून तडफडू लागले. ॥१५ १/२॥
|
स्वसैन्यमभिवीक्ष्याथ वानरार्दितमिन्द्रजित् ॥ १६ ॥
प्रगृहीतायुधः क्रुद्धः परानभिमुखो ययौ ।
|
आपल्या सेनेला वानरांच्या द्वारा पीडित झालेली पाहून इंद्रजित् क्रोधपूर्वक अस्त्रे-शस्त्रे घेरून शत्रुंच्या समोर गेला. ॥१६ १/२॥
|
स शरौघानवसृजन् स्वसैन्येनाभिसंवृतः ॥ १७ ॥
जघान कपिशार्दूलान् स बहून् दृष्टविक्रमः । शूलैरशनिभिः खड्गैः पट्टिशैः शूलमुद्ग१रैः ॥ १८ ॥
ते चाप्यनुचरास्तस्य वानरान् जघ्नुराहवे ।
|
आपल्या सेनेद्वारे घेरले गेलेल्या त्या सुदृढ पराक्रमी वीर निशाचराने बाण-समूहांची वृष्टि करत शूल, वज्र, तलवार, पट्टिश तसेच मुद्गरांच्या माराने बर्याचशा वानरवीरांना हताहत करून टाकले. ॥१७-१८ १/२॥
|
सस्कन्धविटपैः सालैः शिलाभिश्च महाबलः ॥ १९ ॥
हनुमान् कदनं चक्रे रक्षसां भीमकर्मणाम् ।
|
वानरांनी युद्धस्थळी इंद्रजिताच्या अनुचरांना मारले. महाबली हनुमानांनी सुंदर शाखा आणि फांद्या असलेल्या वृक्ष तसेच शिलांच्या द्वारा भीमकर्मा राक्षसांचा संहार करण्यास आरंभ केला. ॥१९ १/२॥
|
स निवार्य परानीकं अब्रवीत्तान् वनौकसः ॥ २० ॥
हनुमान् सन्निवर्तध्वं न नः साध्यमिदं बलम् ।
|
याप्रकारे शत्रुसेनेचा वेग रोखून हनुमानांनी वानरांना म्हटले - बंधुनो ! आता परत चला; आता आपल्याला या सेनेचा संहार करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. ॥२० १/२॥
|
त्यक्त्वा प्राणान् विचेष्टन्तो रामप्रियचिकीर्षवः ॥ २१ ॥
यन्निमित्तं हि युद्ध्यामो हता सा जनकात्मजा ।
|
आपण लोक जिच्यासाठी श्रीरामांचे प्रिय करण्याची इच्छा ठेवून प्राणांचा मोह सोडून पूर्ण प्रयत्नांसह युद्ध करत होता ती जनकनंदिनी सीता मारली गेली आहे. ॥२१ १/२॥
|
इममर्थं हि विज्ञाप्य रामं सुग्रीवमेव च ॥ २२ ॥
तौ यत् प्रतिविधास्येते तत् करिष्यामहे वयम् ।
|
आता या गोष्टीची सूचना भगवान् श्रीराम आणि सुग्रीवांना देणे जरूर आहे. नंतर ते दोघे याचा प्रतिकार कसा करायचा याचा विचार करतील, मग आपणही तेच करूं. ॥२२ १/२॥
|
इत्युक्त्वा वानरश्रेष्ठो वारयन् सर्ववानरान् ॥ २३ ॥
शनैः शनैरसंत्रस्तः सबलः सन्न्यवर्तत ।
|
असे म्हणून वानरश्रेष्ठ हनुमानांनी सर्व वानरांना युद्ध करण्यापासून परावृत्त केले आणि हळू हळू सर्व सेनेसह निर्भय होऊन ते परत आले. ॥२३ १/२॥
|
ततः प्रेक्ष्य हनूमन्तं व्रजन्तं यत्र राघवः ॥ २४ ॥
स होतुकामो दुष्टात्मा गतश्चैत्यनिकुम्भिलाम् ।
|
हनुमानांना राघवांकडे जातांना पाहून दुरात्मा इंद्रजित होम करण्याच्या इच्छेने निकुम्भिला देवीच्या मंदिरात गेला. ॥२४ १/२॥
|
निकुम्भिलामधिष्ठाय पावकं जुहवेन्द्रजित् ॥ २५ ॥
यज्ञभूम्यां ततो गत्वा पावकस्तेन रक्षसा । हूयमानः प्रजज्वाल होमशोणितभुक् तदा ॥ २६ ॥
सार्चिःपिनद्धो ददृशे होमशोणिततर्पितः । सन्ध्यागत इवादित्यः सुतीव्रोऽग्निः समुत्थितः ॥ २७ ॥
|
निकुम्भिला मंदिरात जाऊन त्या निशाचर इंद्रजिताने अग्निमध्ये आहुति दिली. त्यानंतर यज्ञभूमीमध्ये जाऊन त्या राक्षसाने अग्निदेवाला होमाच्या द्वारे तृप्त केले. ते होम शोणितभोजी आभिचारिक अग्निदेव आहुति मिळताच होम आणि शोणिताने तृप्त होऊन प्रज्वलित झाले आणि ज्वालांनी आवृत्त दिसू लागले. ते तीव्र तेज असणारे अग्निदेव संध्याकाळच्या सूर्याप्रमाणे प्रकट झाले होते. ॥२५-२७॥
|
अथेन्द्रजिद् राक्षसभूतये तु जुहाव हव्यं विधिना विधानवित् । दृष्ट्वा व्यतिष्ठन्त च राक्षसास्ते महासमूहेषु नयानयज्ञाः ॥ २८ ॥
|
इंद्रजित यज्ञाच्या विधानाचा ज्ञाता होता. त्याने समस्त राक्षसांच्या अभ्युदयासाठी विधिपूर्वक हवन करण्यास आरंभ केला. त्या होमाला पाहून महायुद्धाच्या प्रसंगी नीति-अनीति, कर्तव्याकर्तव्याचे ज्ञाते राक्षस उभे राहिले. ॥२८॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे द्व्यशीततमः सर्गः ॥ ८२ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा ब्याऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८२॥
|