गाधेरुत्पत्तिः कौशिक्याः प्रशंसा विश्वामित्रेण कथां समाप्य निशीथस्य वर्णनं सर्वेभ्यः शयितुमनुज्ञां प्रदाय स्वयमपि तस्य शयनम् -
|
गाधिची उत्पत्ति, कौशिकीची प्रशंसा, विश्वामित्रांनी कथा बंद करून अर्ध्या रात्रीचे वर्णन करीत सर्वांना झोपण्याची आज्ञा देऊन शयन करणे -
|
कृतोद्वाहे गते तस्मिन् ब्रह्मदत्ते च राघव ।
अपुत्रः पुत्रलाभाय पौत्रीमिष्टिमकल्पयत् ॥ १ ॥
|
"राघवा ! विवाह करून जेव्हां राजा ब्रह्मदत्त निघून गेला तेव्हा पुत्रहीन महाराज कुशनाभाने श्रेष्ठ पुत्राच्या प्राप्तिसाठी पुत्रेष्टि यज्ञाचे अनुष्ठान केले. ॥ १ ॥
|
इष्ट्यां च वर्तमानायां कुशनाभं महीपतिम् ।
उवाच परमोदारः कुशो ब्रह्मसुतस्तदा ॥ २ ॥
|
तो यज्ञ होत असता परम उदार ब्रह्मकुमार कुशांनी भूपाल कुशनाभास म्हटले - ॥ २ ॥
|
पुत्रस्ते सदृशः पुत्र भविष्यति सुधार्मिकः ।
गाधिं प्राप्स्यसि तेन त्वं कीर्तिं लोके च शाश्वतीम् ॥ ३ ॥
|
'मुला ! तुला स्वतः सारखाच परम धर्मात्मा पुत्र होईल. तू 'गाधि' नामक पुत्र प्राप्त करशील आणि त्याच्या द्वारा तुला जगात अक्षय कीर्ति प्राप्त होईल. ॥ ३ ॥
|
एवमुक्त्वा कुशो राम कुशनाभं महीपतिम् ।
जगामाकाशमाविश्य ब्रह्मलोकं सनातनम् ॥ ४ ॥
|
'श्रीरामा ! पृथ्वीपति कुशनाभाला असे सांगून राजर्षि कुश आकाशात प्रविष्ट होऊन सनातन ब्रह्मलोकात निघून गेले. ॥ ४ ॥
|
कस्यचित् त्वथ कालस्य कुशनाभस्य धीमतः ।
जज्ञे परमधर्मिष्ठो गाधिरित्येव नामतः ॥ ५ ॥
|
'काही काळानंतर बुद्धिमान् राजा कुशनाभाच्या येथे परम धर्मात्मा 'गाधि' नामक पुत्राचा जन्म झाला. ॥ ५ ॥
|
स पिता मम काकुत्स्थ गाधिः परमधार्मिकः ।
कुशवंशप्रसूतोऽस्मि कौशिको रघुनन्दन ॥ ६ ॥
|
'काकुत्स्थ कुलभूषण रघुनंदना ! ते परम धर्मात्मा राजा गाधि माझे पिता होते. मी कुशाच्या कुळात उत्पन्न झाल्याने 'कौशिक' म्हणून ओळखला जातो. ॥ ६ ॥
|
पूर्वजा भगिनी चापि मम राघव सुव्रता ।
नाम्ना सत्यवती नाम ऋचीके प्रतिपादिता ॥ ७ ॥
|
'राघवा ! माझी एक ज्येष्ठ बहिण होती. ती उत्तम व्रताचे पालन करणारी होती. तिचे नाव सत्यवती होते. तिचा विवाह ऋचीक मुनिंशी झाला होता. ॥ ७ ॥
|
सशरीरा गता स्वर्गं भर्तारमनुवर्तिनी ।
कौशिक परमोदारा प्रवृत्ता च महानदी ॥ ८ ॥
|
'आपल्या पतिचे अनुसरण करणारी सत्यवती शरीरासहित स्वर्गलोकास निघून गेली होती. तीच परम उदार महानदी कौशिकीच्या रूपात प्रकट होऊन या भूतलावर प्रवाहित झाली आहे. ॥ ८ ॥
|
दिव्या पुण्योदका रम्या हिमवन्तमुपाश्रिता ।
लोकस्य हितकार्याथं प्रवृत्ता भगिनी मम ॥ ९ ॥
|
'माझी बहिण जगाच्या हितासाठी हिमालयाचा आश्रय घेऊन नदीरूपाने प्रवाहित झाली. ती पुण्यसलिला दिव्य नदी अत्यंत रमणीय आहे. ॥ ९ ॥
|
ततोऽहं हिमवत्पार्श्वे वसामि नियतः सुखम् ।
भगिन्यां स्नेहसंयुक्तः कौशिक्यां रघुनन्दन ॥ १० ॥
|
'रघुनंदना ! मी आपल्या बहिणीवर कौशिकीवर खूप प्रेम करतो, म्हणून मी हिमालयाच्या निकट तिच्याच तटावर नियमपूर्वक अत्यंत सुखाने निवास करतो. ॥ १० ॥
|
सा तु सत्यवती पुण्या सत्ये धर्मे प्रतिष्ठिता ।
पतिव्रता महाभागा कौशिकी सरितां वरा ॥ ११ ॥
|
'पुण्यमयी सत्यवती सत्यधर्मात प्रतिष्ठित आहे. ती परम सौभाग्यशालिनी पतिव्रता देवी येथे सरितांमध्ये श्रेष्ठ कौशिकीच्या रूपात विद्यमान आहे. ॥ ११ ॥
|
अहं हि नियमाद् राम हित्वा तां समुपागतः ।
सिद्धाश्रममनुप्राप्य सिद्धोऽस्मि तव तेजसा ॥ १२ ॥
|
'श्रीरामा ! मी यज्ञासंबंधी नियमाच्या सिद्धिसाठीच आपल्या बहिणीचे सान्निध्य सोडून सिद्धाश्रमात आलो होतो. आत तुझ्या तेजाने मला ती सिद्धि प्राप्त झाली आहे. ॥ १२ ॥
|
एषा राम ममोत्पत्तिः स्वस्य वंशस्य कीर्तिता ।
देशस्य हि महाबाहो यन्मां त्वं परिपृच्छसि ॥ १३ ॥
|
'महाबाहु श्रीरामा ! तू मला जे विचारले होतेस त्याच्या उत्तरात मी तुला शोणभद्र तटवर्ती देशाचा परिचय देत असता याप्रमाणे माझी आणि माझ्या कुळाची उत्पत्ति सांगितली. ॥ १३ ॥
|
गतोऽर्धरात्रः काकुत्स्थ कथाः कथयतो मम ।
निद्रामभ्येहि भद्रं ते मा भूद् विघ्नोऽध्वनीह नः ॥ १४ ॥
|
'काकुत्स्था ! मी कथा सांगता सांगता अर्धी रात्र उलटून गेली आहे. आता थोड्या वेळ झोप घ्या बरं ! तुमचे कल्याण असो ! अधिक जागरणामुळे आपल्या यात्रेत विघ्न न यावे अशी मी इच्छा करतो. ॥ १४ ॥
|
निष्पन्दास्तरवः सर्वे निलीना मृगपक्षिणः ।
नैशेन तमसा व्याप्ता दिशश्च रघुनन्दन ॥ १५ ॥
|
'सारे वृक्ष निष्कंप भासत आहेत. त्यांचे एकही पान हलत नाही. पशु पक्षी आपापल्या निवासस्थानी आश्रय घेत आहेत. रघुनंदना ! रात्रिच्या अंधकाराने सर्व दिशा व्याप्त झाल्या आहेत. ॥ १५ ॥
|
शनैर्विसृज्यते संध्या नभो नेत्रैरिवावृतम् ।
नक्षत्रतारागहनं ज्योतिर्भिरवभासते ॥ १६ ॥
|
'हळू हळू संध्या दूर निघून गेली. नक्षत्रांनी आणि तारकांनी भरलेले आकाश सहस्राक्ष इंद्राप्रमाणे हजारो ज्योतिर्मयी नेत्रांनी व्याप्त होऊन प्रकाशित होत आहे. ॥ १६ ॥
|
उत्तिष्ठते च शीतांशुः शशी लोकतमोनुदः ।
ह्लादयन् प्राणिनां लोके मनांसि प्रभया स्वया ॥ १७ ॥
|
'संपूर्ण लोकांचा अंधार दूर करणारा शीतरश्मि चंद्रमा आपल्या प्रभेने जगताच्या प्राण्यांच्या मनास आल्हाद करीत उदित होत आहे.
[या वर्णनावरून असे दिसून येते की त्या रात्री कृष्णपक्षाची नवमी तिथि होती.] - ॥ १७ ॥
|
नैशानि सर्वभूतानि प्रचरन्ति ततस्ततः ।
यक्षराक्षससङ्घाश्च रौद्राश्च पिशिताशनाः ॥ १८ ॥
|
'रात्री विचरणारे सर्व प्राणी, यक्ष, राक्षसांचे समुदाय तथा भयंकर पिशाच्च इकडे तिकडे विचरत आहेत." ॥ १८ ॥
|
एवमुक्त्वा महातेजा विरराम महामुनिः ।
साधु साध्विति ते सर्वे ऋषयो ह्यभ्यपूजयन् ॥ १९ ॥
|
असे म्हणून महातेजस्वी महामुनि विश्वामित्र गप्प झाले. त्या समयी सर्व मुनींनी साधुवाद देऊन विश्वामित्रांची खूप खूप प्रशंसा केली. ॥ १९ ॥
|
कुशिकानामयं वंशो महान् धर्मपरः सदा ।
ब्रह्मोपमा महात्मानः कुशवंश्या नरोत्तमाः ॥ २० ॥
|
कुशपुत्रांचा हा वंश सदाच महान् धर्मपरायण राहिला आहे. कुशवंशी महात्मा श्रेष्ठ मानव ब्रह्मदेवाप्रमाणे तेजस्वी झाले आहेत. ॥ २० ॥
|
विशेषेण भवानेव विश्वामित्रो महायशः ।
कौशिकी सरितां श्रेष्ठा कुलोद्योतकरी तव ॥ २१ ॥
|
'महायशस्वी विश्वामित्र मुनि ! आपल्या वंशात सर्वात श्रेष्ठ महात्मा तर आपणच आहात तथा सरितांमध्ये श्रेष्ठ कौशिकीही आपल्या कुळाच्या कीर्तिला प्रकाशित करणारी आहे' ॥ २१ ॥
|
मुदितैर्मुनिशार्दूलैः प्रशस्तः कुशिकात्मजः ।
निद्रामुपागमच्छ्रीमानस्तंगत इवांशुमान् ॥ २२ ॥
|
या प्रकारे आनंदमग्न झालेल्या त्या मुनिंच्या द्वारा प्रशंसित श्रीमान् कौशिकमुनि अस्त झालेल्या सूर्याप्रमाणे झोपायला गेले. ॥ २२ ॥
|
रामोऽपि सहसौमित्रिः किंचिदागतविस्मयः ।
प्रशस्य मुनिशार्दूलं निद्रां समुपसेवते ॥ २३ ॥
|
ही कथा ऐकून लक्ष्मणासहित श्रीरामासही थोडा विस्मय वाटला. तेही मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांची प्रशंसा करून झोप घेऊ लागले. ॥ २३ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे चतुस्त्रिंशः सर्गः ॥ ३४ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा चौतिसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ३४ ॥
|