गोलोक खण्ड ( १ )

वृंदावनखण्ड ( २ )

गिरिराजखण्ड ( ३ )

माधुर्यखण्ड ( ४ )

मथुराखण्ड ( ५ )

द्वारकाखण्ड ( ६ )

विश्वजित्‌खण्ड ( ७ )

बलभद्रखण्ड ( ८ )

विज्ञानखण्ड ( ९ )

अश्वमेधखण्ड ( १० )

श्रीगर्गसंहिता - प्रस्तावना

’गर्गसंहिता’ हा ग्रंथ यदुकुळाचे आचार्य महामुनि गर्गाचार्य यांनी रचला आहे. अगदी नामकरणापासून त्यांनी श्रीकृष्णाच्या सर्वलीला पाहिल्या होत्या. म्हणून हा ग्रंथ श्रीकृष्णाच्या मधुर लीलांनी परिपूर्ण आहे. श्रीमद् भागवत महापुराणात श्रीकृष्ण चरित्रातील कितीतरी प्रसंग सूत्ररूपाने आढळतात. त्या सर्व प्रसंगांचे विशद वर्णन या ग्रंथात आढळते. कंस महाबलाढ्य होता एवढेच भागवतात कंसासंबंधी एक महाबलाढ्य दैत्य एवढेच वर्णन आढळते. श्रीकृष्णाकडून उद्धार झालेले अनेकानेक दैत्य, जे स्वतः महाबलाढ्य होते, ते सर्व कंसाच्या अधिपत्याखाली कसे आले, ते सर्व महापापी दैत्य असून त्यांचा उद्धार भगवान श्रीकृष्णाकडून का व्हावा, हे कोडे या ग्रंथात उलगडते. त्या सर्वच दैत्यांचे पूर्वचरित्र इत्यादींचे वर्णन इथे सापडते.

सर्व गोपीका पूर्वाश्रमी कोण होत्या, राधिकेचा जन्म, तिचे चरित्र, तिला मिळालेला श्रीकृष्ण विरहासंबंधी शाप, तिच्या बरोबर श्रीकृष्णाने तसेच गोपीकांबरोबर केलेल्या रासलीलांचे वर्णन किमान तीन ठिकाणी आढळते. इतर पुराणांप्रमाणे या ग्रंथातही अनेक तीर्थांचे वर्णन आहेच.

गर्गसंहिता या ग्रंथात भगवान् राधामाधवाच्या लीलालाघवाचे भक्तिरसपूर्ण रमणीय चरित्र अवतरले आहे. त्याचे दिव्य अवतारित्व, अद्भुत बाळलीला, अलौकिक पराक्रम, दैत्यबुद्धि बाळगणाऱ्या सत्तांधांचा त्यांनी केलेला परिहार, गोपकुळावरचे प्रेम, अद्वैतरूप असलेल्या राधेशी द्वैतवृत्तीने केलेली अद्वितीय प्रेमलीला, दृष्टांचा केलेला, संहार, नि भक्तांचे केलेले परित्राण या सर्व कृष्णपैलूंचा नि कृष्णलीलांचा रसाळ कथाभाग यात वर्णिलेला आहे. संपूर्ण कथनालाच भक्तीची डब दिलेली आहे. गोलोक, वृंदावने, गिरिराज, माधुर्य व द्वारका अशा सहा खंडात त्या सर्वव्यापी परमात्म्याला सामावून घेतले आहे. सर्व भर त्याच्या दिव्यत्वावर आहे. त्याचे विश्वमंगलदायक अवतारित्व एकदा गृहित धरले की, सर्व विस्मयजनक बाबी नैसर्गिक वाटू लागतात. हे सर्व कथन अद्भुतरम्य व रंजक तर आहेच; पण नवरस रांगडा प्रभु त्याचा नायक असल्यामुळे भक्तिप्रधानही आहे. अनायासे वाचकांनाही भाविकाची पदवी प्राप्त होऊन पुण्याचा लाभ होण्याची आशा आहे. हे भावमधुर संकीर्तन श्री गर्गाचार्यांनी केले आहे. या गर्गाचार्यांचा नेमका शोध लागणे सोपे नाही. कारण भिन्न भिन्न गर्गाचार्य आढळून येतात. ऋग्वेदाच्या सहाव्या मंडलात याच नावाचा एक सूक्तकार ऋषि आहे. १४७ वे सूक्त त्याच्या नावावर आहे.

या सूक्तात सोमप्रशंसा आहे. श्रौत संस्थेत गर्ग या नावाला एक विशिष्ट स्थान आहे. गर्गत्रिरात्र नावाचा एक सोमयागच श्रौतग्रंथात वर्णिलेला आहे. सोमवंशामध्ये एक अश्वशास्त्री व आयुर्वेद विशारद गर्ग आढळतो. हा भूमन्यूचा पुत्र होता. याने शालिहोत्रकाकडून अश्ववैद्यक ग्रहण केले. गर्गाचार्यांचा एक अवतार वास्तुविद्याविशारद म्हणूनही पुराणात प्रसिद्ध आहे. अग्नि पुराणात गृहनिर्माणकलेचा उल्लेख गर्गविद्या असा आला आहे. बृहत्संहिता, विश्वकर्मप्रकाश, सनत्कुमार वास्तुशास्त्र या ग्रंथामध्ये गर्गाचार्यनिर्मित वास्तुविद्येचा उल्लेख येतो. कृषिशास्त्रवेत्ता म्हणूनही गर्गाचार्यांची नोंद आहे. महाभारत, भागवत, मत्स्यपुराण या ग्रंथामध्ये ज्योतिर्विद म्हणून |गर्गाचार्यांचे स्थान आहे. शुभाशुभ शकुनांचा जाणकार म्हणून विष्णुपुराणात ह्यांचा उल्लेख येतो. हरिवंशात बृहस्पतीच्या वंशातील वितथाच्या पुत्राचे नाव गर्गाचार्यच आहे. भागवतामध्ये हा यदुवंशाचा पुरोहित म्हणून सर्वज्ञात आहे. वसुदेवाच्या निमंत्रणावरून हा गोकुळात येऊन रोहिणी व देवकीच्या मुलांचे अनुक्रमे संकर्षण व कृष्ण असे नामकरण करतो, असे वर्णन आहे. ज्योतिषशास्त्रात एक गर्गाचार्याचा मुहूर्त सांगितला आहे. चरित्रनायकाप्रमाणेच चरित्र्यकर्त्याचेही अवतार व रूपे वेगवेगळी असावीत हा योगायोग एखाद्याला लक्षणीय वाटेल. ही सर्वरूपे एकाच गर्गाचार्यांची असतील तर कृष्णासारख्या पूर्णावताराचे रहस्य कळण्याचा व ते सांगण्याचा त्यांचा अधिकार प्रणामपूर्वक मान्य करावा लागेल.



GO TOP