हरिवंश पर्व

विष्णुपर्व

भविष्यपर्व

हरिवंश पुराण - प्रस्तावना

भारतीय लोक हरिवंशाला पुराण समजतात व हरिवंशपुराण हा महाभारतांतील एक भागच आहे असें मानतात असें जरी आहे तरी हरिवंशाला अठरा पुराणांप्रमाणेंच हें एक आणखी एकोणविसावें पुराण आहे असें मात्र कोणी मानीत नाहींत. हरिवंशाला महाभारताचें परिशिष्ट किंवा खिल असें नांव देतात. हें परिशिष्ट सोळाहजार तिनशें चौर्‍याहत्तर श्लोकांचा एक ग्रंथ आहे. इलियड व ओडेसी हे दोन्ही ग्रंथ जरी एक केले तरी हरिवंशाइतकें भरणार नाहींत, इतका हरिवंश हा ग्रंथ मोठा आहे. ग्रंथ जितका अवाढव्य आहे तितकें वाङ्मयदृष्टया त्याचें महत्त्व मात्र नाहीं. वास्तविक हरिवंश म्हणजे विशेष तर्‍हेचें काव्यहि नाहीं व कोणत्याहि एखाद्या विशिष्ट व्यक्तीची कृति नाहीं. विष्णूचें माहात्म्य वाढविणार्‍या कथांचा, आख्यायिकांचा व स्तोत्रांचा हा एक संग्रह आहे. हरिवंश ही एकाचीच कृति नाहीं. एवढेंच नसून भविष्यपर्वात तर असे पुष्कळ भाग आहेत कीं, ते मागाहून निरनिराळ्या व्यक्तींकडून निरनिराळ्या वेळीं लिहिले गेले आहेत. हरिवंश व महाभारत यांचा बाह्यात्कारी संबंध एवढाच कीं, ज्या वैशंपायनानें जनमेजयाला महाभारत सांगितलें तोच वैंशपायन हरिवंशांत निवेदन करणारा आहे. भारताच्या सुंदर कथा ऐकिल्यानंतर ह्या ग्रंथाच्या आरंभी शौनक उग्रश्रव्याला विनंति करतो कीं, श्रीकृष्ण ज्या कुळांत जन्मला त्या कुळांतील वृष्णि व अंधक यांविषयी माहिती सांग. तेव्हां उग्रश्रवस् म्हणाला कीं, महाभारताचें श्रवण झाल्यानंतर जशी जनमेजयानें वैंशपायनाला विनंति केली तशीच तूंहि करतो आहेस, तस्मात् जें वैशंपायानानें जनमेजयाला कथन केलें तेंच मी तुला निवेदन करितों. म्हणून हरिवंशांतील सर्व कथा वैशंपायनाच्याच तोंडी घातली आहे. याशिवाय या परिशिष्टाच्या प्रथमारंभीच्या कांहीं स्तुतिपर श्लोकांत व तसेंच शेवटीं दिलेल्या लांबलचक स्तोत्रांत महाभारत व हरिवंश यांची स्तुति केलेली आहे. ही स्तुति जरा जास्त झाली आहे. महाकाव्याच्या श्रवणाची फलश्रृति शेवटीं वर्णिली आहे. हाच काय तो महाभारताचा व हरिवंशाचा संबंध. अठरा पुराणांत ज्या कथा सांपडतात त्याच कथा हरिवंशांत आल्या आहेत, तेव्हां महाभारतांतून या कथा हरिवंशात घेतल्या आहेत असें म्हणणेंहि रास्त नाहीं. कारण महाभारतांतच खुद्द ब्राह्मणी कथा व आख्यायिका विपुल सांपडतात. त्याच कथा निरनिराळ्या तर्‍हेनें हरिवंश व इतर अठरा पुराणांत आढळतात.

हरिवंशांत तीन महापर्वे आहेत; पैकीं प्रथम पर्वाला हरिवंशपर्व म्हणतात. हरीचा वंश तो हरिवंश हें नांव सर्व परिशिष्टाला देण्यापेक्षां जर पहिल्याच भागाला किंवा पर्वाला दिलें असतें तर फार संयुक्तिक झालें असतें. यांत पुराणाप्रमाणेच प्रथम विश्वोत्पत्तीची माहिती सांगून सर्व प्रकारच्या दंतकथा दिल्या आहेत. या दंतकथांत ध्रुवाख्यान, दक्षप्रजापति व त्याच्या कथा, सुरासुरांचे पूर्वज वगैरे कथा आलेल्या आहेत व त्यांत विशेषतः यज्ञयागादि क्रिया व वेदांतील तत्त्वें अमान्य करणारा वेन व त्याचा मुलगा पृथु राजा यांची कथा वर्णिलेली आहे. पृथु हा माववांचा पहिला राजा होता. इक्ष्वाकु व त्याचे वंशज ज्या कुळांत जन्मले त्या सूर्यवंशाच्या कथा पुष्कळ सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ विश्वामित्र व वसिष्ठ यांच्या कथाहि यांत आढळतात. तसेंच मूळ वंशाशीं कांही एक संबंध नसलेलें पितृकल्पवर्णन आढळतें. नंतर सोमवंशवर्णन आढळतें. सोमाचा पुत्र अत्रि. शतपथ ब्राह्मणांतील कथेप्रमाणेंच प्रख्यात सोमवंशी राजा पुरूरवा व उर्वशी यांचा प्रेमसंबंध यांत वर्णिलेला आहे. पुरूरव्याच्या कुलांत नहुष व ययाति जन्मले. ययातीचा पुत्र यदु. हाच यादवांचा पूर्वज. याच यादवांपैकीं वसुदेव होता व याच्या पोटीं विष्णूचा अवतार जो कृष्ण तो जन्मास आला. अशा रीतीनें मानव अवतारी श्रीकृष्ण याच्या वंशाचें वर्णन केल्यानंतर भगवान विष्णूची स्तुति केलेली श्लोकमालिका आढळते व या मालिकेंत श्रीकृष्णाचा एक तर्‍हेनें पूर्वेतिहास दिलेला आहे.

हरिवंशाचें दुसरें पर्व विष्णुपर्व होय. या पर्वात भगवान् विष्णूचा जो मानव अवतार श्रीकृष्ण त्याच्याच कथा दिलेल्या आहेत. श्रीकृष्णजन्मवर्णन, श्रीकृष्णाची बाललीला, कृष्णाचीं शौर्याचीं कृत्यें व प्रेमविलास व कृष्ण आणि गवळी यांचें वर्णन सविस्तर दिलें आहे. इतर पुराणांतून कमी अधिक प्रमाणांत आढळणार्‍या कथाहि यांत आहेत. व त्यामुळेंच हिंदुधर्मातील प्रत्येक मनुष्याला कृष्ण हें नांव अतिशय परिचयाचें झालें आहे. वैष्णव संप्रदायांतील तत्त्ववेत्ते हे श्रीकृष्णाला, भगवद्गीतेंत कथन केलेला भक्तिमार्ग शिकविण्याकरितां परमेश्वरानें धारण केलेला अवतार समजतात. हरिवंश व महाभारताखेरीज जीं पुराणें आहेत त्या पुराणांतील कथांमधून ज्या कृष्णाचें वर्णन आढळतें त्या श्रीकृष्णाला सर्वोत्तम परमेश्वर मानून हिंदुस्थानांतील लाखों लोक त्याची भक्ति करतात व त्याची पूजाअर्चा करतात. मनुष्याच्या पूर्णत्त्वाचा पुतळा म्हणजे श्रीकृष्ण; श्रीकृष्णासारखे बनणें हेंच यांचें परमध्येय. वाङ्मयदृष्टया व ऐतिहासिकदृष्टया कृष्णकथा महत्त्वाच्या असल्यामुळें हरिवंशांतील दुसर्‍या पर्वाचें सार पुढें दिलें आहे.

मथुरा नगरींत कंस नांवाचा दुष्ट असुर राजा राज्य करीत होता. ‘देवकीच्या आठव्या पुत्राच्या हातून तूं मारला जाशील’ असें नारदानें कंसास सांगितलें. वसुदेवाची भार्या देवकी ही कंसाच्या बापाची बहीण म्हणजे त्याची आत्या होती. मृत्यु टाळण्याकरितां देवकीचीं सर्व मुलें मारण्याचा कंसानें निश्चय केला व देवकीला बंदिशाळेंत टाकून सक्त पहार्‍यांत ठेविलें. जन्मताक्षणींच तिचीं सहा मुलें त्यानें मारिलीं. पुढें तिला सातवा गर्भ राहिला त्यावेळीं निद्रादेवी योगमायेनें तो गर्भ देवकीचे उदरांतून काढून वसुदेवाची दुसरी बायको जी रोहिणी तिच्या उदरांत नेऊन सोडला. पुढें हें सातवें अपत्य बलराम अथवा बलदेव या नांवानें प्रसिध्द झालें. ज्या दिवशीं देवकीला आठवा गर्भ राहिला त्याच दिवशी तिकडे नंदपत्नी जी यशोदा तिलाही गर्भ राहिला. हा आठवा गर्भ श्रीकृष्ण जेव्हा जन्मास आला त्याच दिवशीं यशोदेनेंहि आपल्या कन्यागर्भास जन्म दिला; श्रीकृष्णाला कंसाच्या तावडींतून जिवंत ठेवण्याकरितां तो जन्मतांच वसुदेवानें त्यास यशोदेपुढें नेऊन ठेविलें व तिची कन्या देवकीपुढें बंदिशाळेंत आणून ठेविली. अदलाबदल केलेल्या लहान बालिकेला कंसानें ताडकन शीलेवर आपटली. पुढें कृष्ण हा गवळ्यांमध्येंच एक गवळी म्हणून वाढला. बलरामाला सुद्धा वसुदेवानें एका गवळ्याच्या घरीं नेऊन ठेविलें. अशा रीतीनें तीं दोन्हीं भावंडें गौळवाड्यांत एकत्र वाढलीं. कृष्ण लहान तान्हें मूल असतांनाच विलक्षण पराक्रम करूं लागला. एके दिवशीं यशोदेनें कृष्णास गाडीच्या खालीं निजविलें. बराच वेळ त्यास अन्नपाणी दिलें नाहीं तेव्हां त्यानें हातपाय झाडण्यास सुरुवात केली व एका लाथेसरशीं त्यानें ती जड गाडी उलथून टाकिली. मोठ्या आनंदानें राम व कृष्ण शेतांमधून व अरण्यामधून हिंडू लागले व भोळ्या गोपींना त्रास देऊं लागले. एकदां तर यशोदेनें त्याच्या कमरेस दोरी बांधून त्याला उखळाली बांधून टाकलें व रागानें म्हणाली पळ आतां कसा पळतोस तें पाहतें. तेव्हां कृष्णानें उखळी ओढण्यास सुरुवात केली. ती उखळी दोन विशाल वृक्षांच्या मध्यें सांपडली तेव्हां कृष्णानें ते दोन्ही वृक्ष मूळासकट उपटून टाकले. यशोदा व गोप घाबर्‍या घाबर्‍या येऊन पाहतात तों श्रीकृष्ण त्यांस झाडांच्या फांद्यांमध्यें खेळताना दिसला. त्यास कोणत्याहि तर्‍हेची इजा झाली नव्हतीं.

याप्रमाणें उभयतां कृष्णसंकर्षणाची बाल्यदशा परिपूर्ण होऊन गोकुळांतच ते सात वर्षांचे झाले. सात वर्षे झाल्यानंतर त्या मुलांनां गौळवाड्याचा कंटाळा आला. तेव्हां श्रीकृष्णानें आपल्या शरीरांतून हजारों लांडगे उत्पन्न केले, त्यांच्यापासून गोपालांनां फार भय प्राप्त झालें. तेव्हां गोपालांनीं ते वन सोडून वृंदावनांत जाण्याचा बेत केला. गोप वृंदावनांत राहवायास आल्यावर ते दोघे वसुदेवाचे सुस्वरूप पुत्र वनामध्यें आनंदानें संचार करूं लागले. वनांत गेला असतां कांही वेळ कृष्ण गायन करी, लहर लागली तर कर्णमधुर पर्णवाद्य वाजवीत बसे, कधीं अत्यंत गोड लागणारी वेणु वाजवूं लागे. एके वेळीं कृष्ण एकटाच यमुना नदीच्या तीरातीरानें हिंडत असतां एक उत्तम खोल डोह त्याच्या नजरेस पडला. यांतच महाभयंकर कालिया नामक सर्पराज आपल्या अनुयायांसह राहत होता; व यानेंच यमुना नदीचें पाणी दूषित करून टाकलें होतें व याच्याच भीतीनें तेथील प्रदेशांत कोणी फिरकत नसे. कालियाचें दमन करण्याकरितां श्रीकृष्णानें डोहांत उडी मारली. तेव्हां खवळून जाऊन तो सर्प जलांतून एकदम वर आला. त्या सर्पाला पांच मुखें असून त्याच्या उच्छवासांतून अग्नि निघत होता. त्यानें व इतर मोठमोठ्या सर्पांनी आपल्या फणांच्या वेगेंमध्यें कृष्णास आवळून टाकलें व तीक्ष्ण दातांनीं दंश केले. नंतर ते सर्पाचें वेष्टण ताडकन तोडून एकदम कालियाच्या मधल्या मोठ्या मस्तकावर श्रीकृष्णानें आरोहण केलें, अशा रीतीनें त्याचें पूर्ण दमन करून त्यास शरण येण्यास लावलें. पुढें तो सर्पराज कालिया आपल्या अनुयायांसह समुद्रांत रहावयास गेला.

नंतर गोवर्धनपर्वतावर गर्दभाच्या रूपानें धेनुक नांवाचा राक्षस राहात होता त्याचा श्रीकृष्णानें वध केला. पुढें प्रलंब राक्षसाचा वध कृष्णाचा भाऊ बलराम यानें केला. त्यानें कृष्ण आपणास आटपणार नाहीं म्हणून त्यास त्रास दिला नाहीं. नेहमीप्रमाणें पुढें गोपांनीं शरदॠतूंत शक्रोत्सव करण्याचें ठरविलें. श्री कृष्णानें शक्रोत्सव करण्याचें नाकारलें व म्हणाला, आपण अरण्यांत वास्तव्य करणारे गोपाल आहोंत, गाईच्या जीवावर नेहमीं आपण आपला निर्वाह करतों, त्यापक्षीं पर्वत, वनें, व गाई हींच आपलीं दैवतें होत. तेव्हां शक्रोत्सव करण्यापेक्षां, गोपहो, आपण पर्वाताप्रीत्यर्थ उत्सव करण्यास सुरुवात केली पाहिजे; कारण गोपाल गिरियज्ञ करतात. तेव्हां गोपालांनीं गिरियज्ञ केला. आपल्या प्रीत्यर्थ होणार्‍या उत्सवामध्यें विघ्न आलें असें पाहातांच इंद्राला अत्यंत क्रोध आला व त्यानें पर्वतावर भयंकर वादळ उत्पन्न केलें. तेव्हां श्रीकृष्णानें एका हातावर पर्वत तोलून धरून त्याचें गोपालावर छत्र धरिलें व त्याचें संरक्षण केलें. याप्रमाणे सात दिवस झाल्यानंतर इंद्रानें निरूपायास्तव वादळ थांबविलें व गोपालकृष्णानेंहि त्या अचलपर्वताची जागच्या जागीं स्थापना केलीं. मग इंद्रानें विनयानें श्रीकृष्ण हा विष्णूचाच अवतार आहे असें कबूल केलें. गोपांनीं कृष्णाची पूजा केली व त्याचीं स्तोत्रें गाइलीं. तेव्हां कृष्ण म्हणाला मी आपला एक आप्त, साधा मनुष्य आहे. कालांतरानें माझ्या खर्‍या स्वरूपाची तुम्हांस ओळख होईल. कृष्ण गवळ्यांच्या पोरांमध्येंच गवळी म्हणून वाढला. त्यानें गोपालांमध्यें निरनिराळ्या तर्‍हेचे खेळ सुरू केले. वृषभांच्या झुंजा लावल्या व कुस्त्या करविल्या. शरदॠतूंत सुंदरशा चांदण्या रात्रीं गोपकन्यांसह कृष्ण क्रीडा करी. कृष्णाशीं रममाण होण्यास उत्सुक झाल्यामुळें त्या त्याच्याभोंवती मंडालाकार उभें राहून त्याच्या मनोरम चरित्राचीं गाणीं म्हणत व तसेंच कृष्णाचें नृत्य, गीत, विलास, स्मित, व वीक्षिप्त इत्यादिकांचें अनुकारण करीत त्या व्रजयोषिता यथेच्छ क्रीडा करीत होत्या.

वरील प्रकारें क्रीडेमध्यें कृष्णाची कालक्रमणा चालली असतां एके दिवशीं अरिष्ट नामक मदोन्मत्त राक्षस वृषभाचें रूप धारण करून व्रजामध्ये येऊन धडकला. तेव्हां कृष्णानें त्या बैलाचें उजवें शिंग उपटून काढून त्याचाच त्याला एक तडाखा लगावला. तो तडाखा बसतांच अरिष्टासुर मरण पावला.

कृष्णाच्या शूर कृत्यांची कीर्ति कंसाच्या कानीं जातांच त्याला अत्यंत उद्वेग उत्पन्न झाला. कृष्ण व बलराम यांनां त्यानें मथुरेस आणवलें व मल्लयुध्द करण्यास सांगितलें. मथुरानगरींत कृष्ण आला नाहीं तोंच त्यानें अचाट कृत्यें करण्यास सुरुवात केली. देवालाहि वांकवण्यास कठिण जाणारें धनुष्य त्यानें सहज वांकविलें व मधोमध मोडून त्याचे दोन तुकडे केले. त्याबरोबर एक भयंकर आवाज झाला. गवळ्याच्या पोरांचे प्राण घेण्याकरितां कंसानें अंगावर सोडलेल्या हत्तीचे दांत उपटून कृष्णानें त्यास ठार मारिलें. व तसेंच कुस्ती खेळण्याकरितां उभे राहिलेल्या दोन मल्लांचाहि त्यानें समाचार घेतला. तेव्हां रागानें कंस राजानें सर्व गोपालांनां आपल्या राज्याच्या बाहेर हांकलून देण्यास आज्ञा केली. कृष्णानें सिंहाप्रमाणें वेगानें उडी मारली व कंसाचे केंस धरून त्यास सभास्थानाच्या मध्यभागीं आणिलें व त्यास ठार मारिलें.

कांही काल लोटल्यावर उभयतां रामकृष्ण अवंती नगरींत राहत असलेल्या सांदीपन नामक नांवाजलेल्या गुरूपाशीं धनुर्विद्या शिकण्याकरितां गेले. त्या गुरूचा दत्त नामक पुत्र समुद्रांत बुडून मरण पावला होता त्यास परत आणावें अशी गुरुदक्षिणा त्यानें कृष्णाजवळ मागितली. तेव्हा कृष्ण यमलोकीं गेला व त्यानें यमधर्माचा पराभव करून गुरूपुत्र परत आणून गुरूच्या घरीं पोंचविला.

कंसाच्या वधाचा सूड उगवण्याच्या हेतूनें कंसाचा सासरा जरासंध राजा यादवांनां जिंकण्याकरितां मोठें थोरलें चतुरंग सैन्य बरोबर घेऊन मथुरेवर गेला. त्यानें मथुरेला वेढा देऊन वारंवार हल्ले चढविले पण कृष्णानें ते सर्व परतविले व त्याचा पराभव केला.

तशीच रुक्मिणीहरणाचीहि कथा सुरस आहे. एकदां विदर्भ देशच्या भीष्मक नांवाच्या राजानें राजकन्या रुक्मिणी ही शिशुपाल राजाला देण्याचें कबूल केलें व लग्न होणार इतक्यांत कृष्ण रामाला बरोबर घेऊन कुंडिनपुरांत आला व त्यानें नवर्‍यामुलीस पळविलें. हें कृत्य पाहून राजांनां राग आला व त्यांनी कृष्णाचा पाठलाग आरंभिला. परंतु रामानें त्या सर्वांचा पराभव केला. नवर्‍यामुलीच्या भावानें म्हणजे रुक्मीनें कृष्णाला मारून आपली भगिनी रुक्मिणी परत आणल्याशिवाय नगरप्रवेश करणार नाहीं अशी शपथ घेतली. कृष्णाबरोबर त्याचें घनघोर युध्द झालें व त्यांत त्याचा पराभव झाला. परंतु रुक्मिणीच्या विनंतीवरून कृष्णानें रुक्मीस जीवदान दिलें. आपली शपथ खोटी ठरेल म्हणून रुक्मीनें नवीन शहर वसविलें. नंतर द्वारकेमध्यें कृष्ण व रुक्मिणी यांचा लग्नसमारंभ झाला. तिला दहा पुत्र झाले. कृष्णानें आणखी सात बायका केल्या. व नंतर सोळा हजार स्त्रियांशीं लग्न केलें व त्यास हजारों पुत्रपौत्र झाले. रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न याचें लग्न रुक्मीच्या कन्येशीं लागलें.

प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुध्द यानें रुक्मीच्या नातीशीं लग्न लाविलें. अनिरुद्धाच्या लग्नाच्या वेळीं अक्षद्यूत खेळत असतांना बलराम व रुक्मि यांच्यामध्यें तंटा उपस्थित झाला व त्या कलहांत रामानें रुक्मीला मारिलें. ही कथा निवेदन करतांना रामाचा अतुल पराक्रम वर्णिला आहे. नंतर नरकवधाची कथा सांगितली आहे. नरकासुर नामक एक राक्षस होता. एकदा त्या दैत्यानें अदिती-मातेची कुंडलें हरण करून नेली; व देवांनां अगदीं त्रासून सोडिलें. तेव्हां इंद्राच्या विनंतीवरून श्रीकृष्णानें नरकासुराचा वध केला. पुढें इंद्र व कृष्ण यांचें युध्द दिलेलें आहे. एकदां नारदाने स्वर्गातील पारिजात वृक्षांची पुष्पें श्रीकृष्णाला दिली. तीं त्यानें आपली पट्टराणी जी रुक्मिणी तिला दिलीं. परंतु कृष्णाची नेहमींची आवडती स्त्री जी सत्यभामा तिला हा आपल्या सवतीचा उत्कर्ष सहन झाला नाहीं. तेव्हां तिनें हट्ट करून पारिजात वृक्ष स्वर्गामधून आणून देईन असें अभिवचन कृष्णाकडून घेतलें. पारिजात न देण्याविषयीं इंद्राचा दृढ निश्चय पाहून कृष्णानें इंद्रास युध्द करण्यास आव्हान केलें. तेव्हां इंद्राचें व कृष्णाचें घनघोर युध्द जुंपलें. शेवटीं अदितिमातेनें दोघांची समजूत घालून युध्द संपविलें. या लांबलचक भागानंतर एक बोधप्रद भाग दिला आहे. हा शृंगारिक भाग खरोखर कामशास्त्राचा आहे. नारदमुनि व सर्व कृष्णस्त्रिया यांच्या संवादांत एक पुण्यद व्रताचे वर्णन दिलें आहे. हें व्रतवर्णन, शंकराची भार्या जी उमा, तिच्या तोंडीं घातलें आहे. सभाग्य व सुंदर बनून भर्त्याची अधिक लाडकी होऊन त्याची मर्जी सुप्रसन्न करावयाची असेल तर हीं पुण्यद व्रतें करावीं. हीं व्रतें सद्गुणी भार्येच्या निष्ठेचीं द्योतक आहेत. या भागांत विवाहित स्त्रियांची कर्तव्यें दिलीं आहेत. पुढील भागांत कृष्णाचें असुरांबरोबर झालेलें युध्द दिलें आहे. षट्पुरांमध्यें राहणार्‍या राक्षसांनीं सन्मार्गस्थ व साधुप्रि ब्रह्मदत्ताची कन्या चोरून नेली, तेव्हां कृष्णानें त्याच्या मदतीस जाऊन ती कन्या, दानवाधिपति निकुंभ यास ठार मारून, सोडविली अशी कथा आली आहे. नंतर शैवमतविषयक वर्णन आलें आहे. परंतु या अध्यायाचा कृष्णवर्णनाशीं कांही एक संबंध नाहीं. यामध्यें शिवानें अंधकासुराचा वध केल्याची कथा आहे. पुढें कृष्णानें निकुंभासुराचा वध केला. एकदां सर्व यादव, बलराम, व श्रीकृष्ण यांजबरोबर पिंडारक तीर्थावरील समुद्रयात्रेस गेले व त्या ठिकाणीं त्यांनीं एक महोत्सव केला. तो असा- सोळा सहस्र स्त्रियांशीं कृष्ण क्रीडा करूं लागला. राम आपल्या एकट्या रेवती नामक स्त्रीसमागमेंच रममाण झाला. यादव- कुमारांनीं जलक्रीडा करण्याकरितां हजारों वेश्या बरोबर नेल्या होत्या. त्यांजबरोबर ते कुमार जलक्रीडा करूं लागले, वेश्या जलामध्यें गाऊं लागल्या व नाचूं लागल्या. मद्यपान व सुग्रास भोजन करून त्यांनीं महोत्सव साजरा केला. यादव क्रीडासक्त झाले असें पाहून निकुंभ दानव यानें भानुमती नामक भानुकन्येचें हरण केलें. कृष्णपुत्र प्रद्युम्नानें असुराचा पाठलाग करून भानुमतीस परत आणिलें; व कृष्णानें निकुंभाचा वध केला. पुढील अध्यायांतून कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न याचेंच वर्णन केलें आहे. वज्रानाभ असुराची कन्या प्रभावती व प्रद्युम्न यांचा विवाह वर्णिला आहे. नलदमयंती आख्यानांत जसे हंस नल व दमयंती यांजमधील प्रेमाचे निरोप पोहोंचवणारे दूत होते तसेच याहि प्रेमसंपादनांत हंसांनीं दूतांची कामगिरी केली. वज्रानाभाच्या राजसभेंत प्रद्युम्न नट म्हणून गेला व त्यानें बरोबर आपले स्नेही नट म्हणून नेले. त्यांनीं निरनिराळे खेळ करून असुरांनां मोहून टाकलें व रात्रीच्या रात्रीं प्रद्युम्नानें प्रभावतीच्या समागमांत घालविल्या. सेवटीं प्रभावतीच्या प्रेमाची बातमी वज्रानाभास कळली व त्यानें प्रद्युम्नास अटकेंत टाकण्याचा प्रयत्न केला परंतु असुरांचा वध व वज्रानाभाचा पराजय करून प्रभावतीसह प्रद्युम्न द्वारकेस गेला. पुढें प्रद्युम्नहरण वर्णन आहे. कृष्णपुत्रास जन्मून सात दिवस पूर्ण झाले तोंच कालशंबरानें त्याचें हरण केलें. पुढें तो बालक मोठा झाला तेव्हां शंबराची बायको मायावती हिजला प्रद्युम्न आपला पति असावा अशी इच्छा उत्पन्न झाली; व तूं माझा पुत्र नसून रुक्मिणीचा पुत्र आहेस असें तिनें त्यास सांगितलें. शंबराबरोबर तुंबळ युध्द करून प्रद्युम्नानें त्यास मारिले; व मयावतीस घेऊन तो कृष्णाच्या नगरीत आला. त्या ठिकाणीं रुक्मिणीनें व कृष्णानें त्याचा गौरव केला. या कथेंत मध्येंच बलरामानें म्हटलेले आन्हिक स्तोत्र दिलें आहे. या स्तोत्राचा मूळ कथेशीं संबंध नसून यांत नुसती देवादिकांचीं नांवें दिलीं आहेत. कृष्णमाहात्म्य कथा वर्णन केल्यानंतर दुसर्‍या पर्वाच्या शेवटच्या भागांत बाणयुध्द दिलें आहे व प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुध्द व बाणासुराची कन्या उषा यांचा विवाह वर्णिला आहे. बाणासुर हा शिवभक्त असल्यामुळें शंकर त्याच्या मदतीस धांवून आले. तेव्हां विष्णूचा अवतार कृष्ण व शंकर हे एकच आहेत असें सांगून त्यांनीं युध्द संपविलें. यालाच जोडून दोन्ही देव एकच आहेत याबद्दल एक स्तोत्र लिहिलेलें आढळतें. अनिरुध्द व उषा यांच्या द्वारावतींत झालेल्या लग्नसमारंभाच्या वर्णनानंतर या दुसर्‍या पर्वाचा शेवट होतो.

वरील हरिहरस्तोत्रावरून हरिवंश नुसतें काव्य नसून धर्मातील निरनिराळ्या ग्रंथांतील तत्त्वांचें एकीकरण झाल्यामुळें हा एक धर्मग्रंथ बनला आहे असें स्पष्ट दिसून येतें.

कृष्णकाव्याचा अवशेष दुसर्‍या पर्वात सांपडतो. कृष्णकाव्य खात्रीनें पूर्वी अस्तित्वांत असलें पाहिजे. हरिवंशाच्या तिसर्‍या पर्वाचें नांव भविष्यपर्व. हें पुराणग्रंथाचा एक लहानसा संग्रह आहे. भविष्यपर्व म्हणजे पुढील काळाबद्दल लिहिलेला भाग. या भागांत पुढील युगांमध्यें घडणार्‍या गोष्टी दिल्या आहेत. या पर्वातील पहिल्या थोड्या अध्यायांनांच भविष्यपर्व हें नांव यथार्थ आहे. या अध्यायांत जनमेजयाच्या अश्वमेधकथेचें वर्णन दिलें आहे. राजसूय यज्ञ करण्याची इच्छा जनमेजयानें दर्शविली तेव्हां व्यासानें त्याला तुझा यज्ञ सफल होणार नाहीं असें अगोदरच सुचविलें. ईशभक्ति व धर्मपरायणता ज्या युगांत राहील असें कृतयुग संपल्यानंतर कलियुग लागेल व या युगांत ईश्वराचें अस्तित्व कोणी कबूल करणार नाहींत. भविष्यपर्व हा एक स्वतंत्र निराळा भाग असून यास महाकाव्य असेंहि म्हणतात. नंतर दोन तर्‍हांनी उत्पत्तीचें वर्णन दिलें आहे. तिसर्‍या भागामध्यें प्रामुख्यानें विष्णूच्या वराह, नृसिंह, व वामन अवतारांचे वर्णन आढळतें. हरिहर हे एकच आहेत असें दाखविण्याचा ज्याप्रमाणें दुसर्‍या पर्वाच्या शेवटीं प्रयत्न केलेला आहे तद्वतच या भागांत प्रयत्न केलेला आढळतो. मधून मधून विष्णूच्या तोंडी शिवस्तोत्र घातलेलें आढळतें व शिवाच्या तोंडी विष्णुस्तोत्र घातलेलें आहे. पुढील अध्यायांत कृष्णाचा पराक्रम वर्णिलेला आहे; त्यांत पौंडू राजाचा वध केल्याचें वर्णन आहे. हरिवंशाच्या तिसर्‍या पर्वाच्या शेवटच्या भागांत हंसभंडकोपाख्यान दिलें आहे, व त्यांत त्यांचा कृष्णानें वध केल्याचें वर्णन आलें आहे. आणखी पुढें एक मोठा अध्याय दिला आहे. त्यांत महाभारतश्रवणाचें पर्वशः फल व वाचकास मिळणारे स्वर्गातील फल दिलें आहे. प्रत्येक पर्व संपल्यानंतर व तसेंच समाप्तीच्या दिवशीं ऐकणारानें वाचकाला कोणकोणतीं दानें करावीं हें सांगितलें आहे. सर्व शास्त्रांमध्यें महाभारत अत्युत्तम, उत्कृष्ट व पवित्र शास्त्रग्रंथ आहे अशी भारताची स्तुति केली आहे. हे भरतकुलश्रेष्ठा, वेद, रामायण आणि पवित्र असें जें भारत या सर्वामध्यें आरंभीं, मध्यें व शेवटीं श्रीविष्णूचें स्तोत्र आहे म्हणून हें एक विष्णुमाहात्म्य आहे. वास्तविक विष्णूच्या माहात्म्याचें वर्णन झाल्यानंतर ग्रंथ संपावयास पाहिजे पण पुढें त्रिपुरासुरवधाचें आख्यान लागतें व त्यांत शिवाची स्तुति केलेली आहे. फिरून शेवटच्या श्लोकांत महायोगी श्रीविष्णूचीच स्तुति केली आहे. सरतेशेवटीं हरिवंशाचा थोडक्यांत वृत्तांतक्रम देऊन फलश्रृति व दानें सांगितलीं आहेत.

दुसर्‍या कित्येक मुख्य मुख्य पुराणांतील व हरिवंशांतील कांही भागाची वाङ्मयदृष्टया जर तुलना केली तर त्यांचे सादृश्य पाहून हरिवंश हें एक स्वतंत्र पुराण आहे असें वाटतें. इतर पुराणांबरोबर हरिवंशाचें वर्णन न करण्याचे कारण इतकेंच कीं हरिवंश महाभारताबरोबर लिहिल्यामुळें महाभारताचा इतिहास व काळ यांचा उल्लेख स्पष्टपणें लक्षांत येतो. केवळ, भारतीय लोक हरिवंशाला भारतांतील एक खिल समजतात म्हणून महाभारताबरोबर हरिवंशाचें वर्णन केलें असें समजूं नये.



GO TOP