श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
द्वादशोऽध्यायः


कालियदमनम्

वैशंपायन उवाच
सोऽपसृत्य नदीतीरं बद्ध्वा परिकरं दृढम् ।
आरोहच्चपलः कृष्णः कदम्बशिखरं मुदा ॥ १ ॥
कृष्णः कदम्बशिखराल्लम्बमानो घनाकृतिः ।
ह्रदमध्येऽकरोच्छब्दं निपतन्नम्बुजेक्षणः ॥ २ ॥
कृष्णेन तत्र पतता क्षुभितो यमुनाह्रदः ।
संप्रासिच्यत वेगेन भिद्यमान इवांबुदः ॥ ३ ॥
तेन शब्देन सङ्‌‌‍क्षुब्धं सर्पस्य भवनं महत् ।
उदतिष्ठज्जलात् सर्पो रोषपर्याकुलेक्षणः ॥ ४ ॥
स चोरगपतिः क्रुद्धो मेघराशिसमप्रभः ।
ततो रक्तान्तनयनः कालियः समदृश्यत ॥ ५ ॥
पञ्चास्यः पावकोछ्‍वासश्चलज्जिह्वोऽनलाननः ।
पृथुभिः पञ्चभिर्घोरैः शिरोभिः परिवारितः ॥ ६ ॥
पूरयित्वा ह्रदं सर्वं भोगेनानलवर्चसा ।
स्फुरन्निव च रोषेण ज्वलन्निव च तेजसा ॥ ७ ॥
क्रोधेन ज्वलतस्तस्य जलं शृतमिवाभवत् ।
प्रतिस्रोताश्च भीतेव जगाम यमुना नदी ॥ ८ ॥
तस्य क्रोधाग्निपूर्णेभ्यो वक्त्रेभ्योऽभूच्च मारुतः ।
दृष्ट्‍वा कृष्णं ह्रदगतं क्रीडन्तं शिशुलीलया ॥ ९ ॥
सधूमाः पन्नगेन्द्रस्य मुखान्निश्चेरुरर्चिषः ।
सृजता तेन रोषाग्निं समीपे तीरजा द्रुमाः ॥ १० ॥
क्षणेन भस्मसान्नीता युगान्तप्रतिमेन वै ।
तस्य पुत्राश्च दाराश्च भृत्याश्चान्ये महोरगाः ॥ ११ ॥
वमन्तः पावकं घोरं वक्त्रेभ्यो विशसंभवम् ।
सधूमं पन्नगेन्द्रास्ते निपेतुरमितौजसः ॥ १२ ॥
प्रवेशितश्च तैः सर्पैः स कृष्णो भोगबन्धनम् ।
निर्यत्‍नचरणाकारस्तस्थौ गिरिरिवाचलः ॥ १३ ॥
अदशन् दशनैस्तीक्ष्णैर्विषोत्पीडजलाविलैः ।
ते कृष्णं सर्पपतयो न ममार च वीर्यवान् ॥ १४ ॥
एतस्मिन्नन्तरे भीता गोपालाः सर्व एव ते ।
क्रन्दमाना व्रजं जग्मुर्बाष्पगद्‌गदया गिरा ॥ १५ ॥
गोपा ऊचुः
एष मोहं गतः कृष्णो मग्नो वै कालिये ह्रदे ।
भक्ष्यते सर्पराजेन तदागच्छत मा चिरम् ॥ १६ ॥
नन्दगोपाय वै क्षिप्रं सबलाय निवेद्यताम् ।
एष ते कृष्यते कृष्णः सर्पेणेति महाह्रदे ॥ १७ ॥
नन्दगोपस्तु तच्छ्रुत्वा वज्रपातोपमं वचः ।
आर्तः स्खलितविक्रान्तस्तं जगाम ह्रदोत्तमम् ॥ १८ ॥
सबालयुवतीवृद्धः स च सङ्‌‌‍कर्षणो युवा ।
आक्रीडं पन्नगेन्द्रस्य जलस्थं समुपागमत् ॥ १९ ॥
नन्दगोपमुखा गोपास्ते सर्वे साश्रुलोचनाः ।
हाहाकारं प्रकुर्वन्तस्तस्थुस्तीरे ह्रदस्य वै ॥ २० ॥
व्रीडिता विस्मिताश्चैव शोकार्ताश्च पुनः पुनः ।
केचित्तु पुत्र हा हेति हा धिगित्यपरे पुनः ॥ २१ ॥
अपरे हा हताः स्मेति रुरुदुर्भृशदुःखिताः ।
स्त्रियश्चैव यशोदां तां हा हतासीति चुक्रुशुः ॥ २२ ॥
या पश्यसि प्रियं पुत्रं सर्पराजवशं गतम् ।
स्पन्दितं सर्पभोगेन कृष्यमाणं यथा मृतम् ॥ २३ ॥
अश्मसारमयं नूनं हृदयं ते विलक्ष्यते ।
पुत्रं कथमिमं दृष्ट्‍वा यशोदे नावदीर्यसे ॥ २४ ॥
दुःखितं बत पश्यामो नन्दगोपं ह्रदान्तिके ।
न्यस्य पुत्रमुखे दृष्टिं निश्चेतनमवस्थितम् ॥ २५ ॥
यशोदामनुगच्छन्त्यः सर्पावासमिमं ह्रदम् ।
प्रविशामो न यास्यामो विना दामोदरं व्रजम् ॥ २६ ॥
दिवसः को विना सूर्यं विना चन्द्रेण का निशा ।
विना वृषेण का गावो विना कृष्णेन को व्रजः ।
विना कृष्णं न यास्यामो विवत्सा इव धेनवः ॥ २७ ॥
तासां विलपितं श्रुत्वा तेषां च व्रजवासिनाम् ।
विलापं नन्दगोपस्य यशोदारुदितं तथा ॥ २८ ॥
एकभावशरीरज्ञ एकदेहो द्विधा कृतः ।
सङ्‌‌‍कर्षणस्तु सङ्‌‌‍क्रुद्धो बभाषे कृष्णमव्ययम् ॥ २९ ॥
कृष्ण कृष्ण महाबाहो गोपानां नन्दवर्धन ।
गम्यतामेष वै क्षिप्रं सर्पराजो विषायुधः ॥ ३० ॥
इमे नो बान्धवास्तात त्वां मत्वा मानुषं विभो ।
परिदेवन्ति करुणं सर्वे मानुषबुद्धयः ॥ ३१ ॥
तच्छ्रुत्वा रौहिणेयस्य वाक्यं संज्ञासमीरितम् ।
विक्रम्यास्फोटयद् बाहू भित्त्वा तन्नागबन्धनम् ॥ ३२ ॥
तस्य पद्‌भ्यामथाक्रम्य भोगराशिं जलोत्थितम् ।
शिरस्तु कृष्णो जग्राह स्वहस्तेनावनाम्य च ॥ ३३ ॥
तस्यारुरोह सहसा मध्यमं तन्महच्छिरः ।
सोऽस्य मूर्ध्नि स्थितः कृष्णो ननर्त रुचिराङ्‌‌‍गदः॥ ३४ ॥
मृद्यमानः स कृष्णेन शान्तमूर्धा भुजङ्‍गमः ।
आस्यैः सरुधिरोद्‌गारैः कातरो वाक्यमब्रवीत् ॥ ३५ ॥
अविज्ञानन्मया कृष्ण रोषोऽयं संप्रदर्शितः ।
दमितोऽहं हतविषो वशगस्ते वरानन ॥ ३६ ॥
तदाज्ञापय किं कुर्यां सदा सापत्यबान्धवः ।
कस्य वा वशतां यामि जीवितं मे प्रदीयतां ॥ ३७ ॥
पञ्चमूर्धानतं दृष्ट्‍वा सर्पं सर्पारिकेतनः ।
अक्रुद्ध एव भगवान् प्रत्युवाचोरगेश्वरम् ॥ ३८ ॥
तवास्मिन् यमुनातोये नैव स्थानं ददाम्यहम् ।
गच्छार्णवजलं सर्प सभार्यः सहबान्धवः ॥ ३९ ॥
यश्चेह भूयो दृश्येत स्थाने वा यदि वा जले ।
तव भृत्यस्तनूजो वा क्षिप्रं वध्यः स मे भवेत् ॥ ४० ॥
शिवं चास्य जलस्यास्तु त्वं च गच्छ महार्णवम् ।
स्थाने त्विह भवेद् दोषस्तवान्तकरणो महान् ॥ ४१ ॥
मत्पदानि च ते सर्प दृष्ट्‍वा मूर्धसु सागरे ।
गरुडः पन्नगरिपुस्त्वयि न प्रहरिष्यति ॥ ४२ ॥
गृह्य मूर्ध्ना तु चरणौ कृष्णस्योरगपुङ्‌‌‍गवः ।
पश्यतामेव गोपानां जगामादर्शनं ह्रदात् ॥ ४३ ॥
निर्जिते तु गते सर्पे कृष्णमुत्तीर्य धिष्ठितम् ।
विस्मितास्तुष्टुवुर्गोपाश्चक्रुश्चैव प्रदक्षिणम् ॥ ४४ ॥
ऊचुः सर्वे च संप्रीता नन्दगोपं वनेचराः ।
धन्योऽस्यनुगृहीतोऽसि यस्य ते पुत्र ईदृशः ॥ ४५ ॥
अद्यप्रभृति गोपानां गवां गोष्ठस्य चानघ ।
आपत्सु शरणं कृष्णः प्रभुश्चायतलोचनः ॥ ४६ ॥
जाता शिवजला सर्वा यमुना मुनिसेविता ।
तिरे चास्याः सुखं गावो विचरिष्यन्ति नः सदा ॥ ४७ ॥
व्यक्तमेव वयं गोपा वने यत्कृष्णमीदृशम् ।
महद्भूतं न जानीमश्छन्नमग्निमिव व्रजे ॥ ४८ ॥
एवं ते विस्मिताः सर्वे स्तुवन्तः कृष्णमव्ययम् ।
जग्मुर्गोपगणा घोषं देवाश्चैत्ररथं यथा ॥ ४९ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि
शिशुचर्यायां कालियदमने द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥


कालियामर्दन -

वैशंपायन सांगतातः- असें म्हणून तो चपल कृष्ण नदीच्या काठाजवळ गेला व घट्ट कंबर बांधून त्यानें मोठ्या आनंदाने त्या कदंब वृक्षाच्या शेंड्यावर आरोहण केले. नंतर तो मेघश्याम कृष्ण त्या कळंबाच्या फांदीला धरून लोंबकळत राहिला. आणि तशा स्थितींत त्या कमलनेत्रानें मोठी आरोळी देऊन डोहामध्ये उडी मारली. कृष्णाने आत उडी मारतांक्षणीं तो यमुना नदीचा डोह खळबळून गेला आणि एखादा ढग दुभंग होऊन त्यांतील उदक ज्याप्रमाणें जोराने चोहीकडे उसळते, त्याप्रमाणें त्या डोहांतील पाणी मोठ्या जोराने जिकडे तिकडे उसळून गेलें. तसेंच कृष्णाच्या आरोळीनें त्या डोहांतील सर्पाचे तें भव्य वसतिस्थान खवळन जाऊन तो सर्प जलातून एकदम वर आला. त्याचे नेत्र रागानें लाल झाले होते. त्या कुद्ध झालेल्या सर्पराजाची प्रभा मेघराशीसारखी काळीभोर दिसत होती. त्याचे डोळे अत्यंत लाल दिसत होते. त्याला पांच मुखे असून त्याच्या उच्छ्वासांतून अग्नि ( अग्नीसारखा ऊष्ण वायु ) निघत होता. त्याच्या जिव्हा सारख्या हालत होत्या; त्याची मुखें अग्नीप्रमाणे असून, पांच प्रशस्त व भयंकर फणांनीं तो युक्त होता. त्या अग्नीप्रमाणे प्रखर तेजाच्या सर्पानें तो सर्व डोह व्यापून टाकला होता. तो रागानें फुरफुरत होता. त्याचें तेन जळजळीत होतें. क्रोधाने त्याची आग होत होती. त्यामुळें डोहाचे पाणी देखील आधण आल्याप्रमाणे, सळसळूं लागले. यमुना नदीने सुद्धा भीतीनें आपला प्रवाह बदलला. ( उलट दिशेनें वाहूं लागली. ) क्रोधाग्नीने जळत असलेल्या त्याच्या मुखांतून एकसारखा वायु बाहेर चाललेला होता. डोहामध्ये येऊन कृष्ण लीलेने बालक्रीडा करीत आहे असे पाहण्याबरोबर त्या सर्पराजाच्या तोंडांतून धूर व ज्वाळा निघू लागल्या. त्याच्यापासून उत्पन्न झालेल्या क्रोधाग्नीने तीरावरील वृक्षांची एका क्षणांत राखरांगोळी झाली तेव्हां तो प्रलयकालचा कृतांतच आहे कीं काय असें वाटले. त्याची बायकामुलें, चाकर इत्यादिक इतर मोठमोठे सर्पही आपल्या तोंडांतून विषापासून उत्पन्न झालेला भयंकर अग्नि व धूर ( बाहेर ) टाकू लागले. त्या नवीन उत्पन्न झालेल्या सर्पराजांचे तेज देखील अत्यंत प्रखर होतें. त्या सर्व सर्पांनी श्रीकृष्णाला आपल्या फणांच्या वेंगेमध्यें आवळून टाकले. त्यामुळें त्याला हात-पाय हालवतां येईनासे होऊन तो पर्वताप्रमाणे जागचेजागीं उभा राहिला. ज्यातील विष बाहेर पडल्याकारणानें नदीचे पाणी बिघडलें होतें तसल्या तीक्ष्ण दंतांनी त्या सर्वेंद्रांनी कृष्णाला दंश केले. परंतु त्या योगाने तो महावीर्यशाली कृष्ण कालवश झाला नाहीं. इतकें होत आहे तो त्याच्या बरोबरचे सर्व गोप अत्यंत भयभीत होऊन सद्गदित शब्दानीं ओरडत व्रजांमध्ये जाऊन पोचले.

तेथें जातांच गोप सांगू लागले: - " लोकहो, कृष्णाला भूल पडून त्यानें कालीय सर्प रहातो त्या डोहामध्ये बुडी घेतली आहे व त्या ठिकाणी सर्पराज कालीय त्याला खाऊन टाकीत आहे; म्हणून विलंब न लावता तिकडे चला. सर्पराजानें तुझ्या कृष्णाला डोहामध्ये ओढून नेले आहे हें वर्तमान लवकर नंदराजाला कळवा. " ते वज्राघातासारखे भाषण कानी पडताच नंद अत्यंत व्याकुल झाला. त्याची पावले त्या भयंकर डोहाकडे वळली. तो चालताना अडखळू लागला. आबालवृद्ध स्‍त्रीपुरूष त्याचे पाठीमागून तिकडेच धावू लागले. तरुण बलराम देखील त्या पन्नगराजाच्या डोहांतील विहारस्थानासमीप प्राप्त झाला. नंदप्रभृति सर्व गोपांचे डोळे पाण्यानें भरून गेले होते. व डोहाच्या काठावर उभे राहून त्यांनी सारखा हाहा:कार चालविला. लज्जा, विस्मय व शोक या भिन्न भिन्न विकारांची छाया आळीपाळीने त्यांचे चेहेऱ्यांवर दृग्गोचर होत होती. " हायरे पुत्रा " असें कित्येकजण ओरडू लागले." हायरे, धिःकार असो आम्हांला " असे उद्गार कित्येकांच्या मुखावाटे बाहेर पडू लागले. कोणी म्हणू लागले, " हायरे दुर्दैवा, आम्ही मेल्याहून मेले झालो आहो. " याप्रमाणे सर्वांना अत्यंत दु ख होऊन ते रडू लागले. तेथें जमलेल्या स्‍त्रिया देखील मोठमोठ्यानें आक्रोश करूं लागल्या. त्या यशोदेला उद्देशून म्हणाल्या " ज्या अर्थी आपल्या पोटचा गोळा सर्पराजाच्या तावडीत सांपडलेला पाहण्याचे तुझ्या नशिबीं आलें आहे, त्या अर्थीं तूं खरोखर अत्यंत दुर्दैवी आहेस असे दिसते. अमृतेच्छु सुरासुरांनी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केलें, त्या समयी जसें अमृत हिसळलें गेलें त्याप्रमाणें हा सर्प स्वशरीराने या कृष्णास घुसळीत आहे. त्याने त्याचे धैर्य कांहींसे हलले ( ढळलें )सें दिसत आहे. खरोखर तुझे हृदय पाषाणाचे केलें आहे असें वाटतें. यशोदे, पुत्राची ही कष्टमय स्थिति अवलोकन करून तुझ्या अंतःकरणाचे अद्यापि तुकडे तुकडे कसे झाले नाहीत ? अरेरे, दुःखित झालेल्या नंदानें,डोहाजवळ उभे राहून, पुत्राच्या तोंडाकडे दृष्टि लाविली आहे. एखाद्या अचेतन वस्तूप्रमाणें तो त्या ठिकाणीं दिसत आहे. आणि हा असा प्रकार पाहण्याचे आमच्या नशिबीं आलें आहे ! यशोदेच्या मागोमाग आम्ही पण या कालियाच्या डोहामध्ये उडी घालणार. दामोदराला घेतल्याशिवाय व्रजामध्ये परत जाऊन आम्हांला हीं काळी तोंडे दाखवावयाची नाहीत. सूर्यावाचून दिवसाची, चंद्रावाचून रात्रीची व वृषभाशिवाय गाईची काय , बरे शोभा आहे ? कृष्णावांचून सर्व गोकुळ आम्हांला शून्याकार आहे; म्हणून वत्सरहित धेनूप्रमाणें आम्ही कृष्णाला टाकून गोकुळांत परत जाणार नाहीं."

याप्रक्रारें त्या व्रजवासी स्‍त्रीपुरुषांचे आणि विशेषतः नंद व यशोदा यांचे विलाप ऐकून बलराम, जो मनाने, शरीराने व बुद्धीने कृष्णाशीं एकच होता, व बाह्यतः तरी एकच देह दोन ठिकाणी केल्यासारखा दिसत होता, तो क्रुध्द होऊन अव्यय श्रीकृष्णाला म्हणाला, " हे महाबाहो कृष्णा, तूंच गोपांचा आनंद वृद्धिंगत करणारा आहेस. तर लवकर या विषपूर्ण सर्पराजाचे दमन कर. हे विभो, हे आपले मानुषबुद्धि गोपबांधव, तू इतरांसारखा मनुष्य आहेस या समजुतीने, अत्यंत शोक करीत आहेत."

बलरामाचे हे खुणेचे शब्द कानी पडताच, मोठा पराक्रम करण्याची इच्छा होऊन कृष्णाने दंड थोपटले. नंतर तें सर्पाचे वेष्टण ताडकन् तोडून, पाण्याच्या वर असलेल्या त्या सर्पराजाच्या शरीराच्या भागावर कृष्णाने आपले दोन्ही पाय ठेवले आणि आपल्या हातामध्ये त्याचे मस्तक धरून तें खालीं वांकविलें. मग एकदम त्याच्या मधल्या मोठ्या मस्तकावर श्रीकृष्णाने आरोहण केलें. सुंदर बाहुभूषणांनी युक्त असलेला कृष्ण त्याच्या मस्तकावर उभा राहून नाचू लागला. कृष्णाच्या मर्दनाने त्या भुजंगमाचे मस्तक चळवळेनासें झालें व त्याच्या तोंडांतून रक्त बाहेर पडू लागलें. नंतर अत्यंत भयभीत होत्साता तो कालिय पुढीलप्रमाणे बोलता झाला. "हे कृष्णा, तुझें सत्य स्वरूप न ओळखल्यामुळे मी आपल्या रागाचे आविष्करण केले. हे वरानना, माझे आतां पूर्ण दमन झाले असून, मी निर्विष बनलो आहे. मी आतां तुला शरण आलों आहे. माझी मुले व नातलग यांसह मी काय करावे त्याबद्दल मला आज्ञा कर. त्याप्रमाणेच मी कोणाच्या ताब्यांत राहू तें सांग. हे देवा, मला जीवदान दे." सर्पराजाची पांचीं मस्तकें लीन झाली आहेत असें पाहून, गरुडवाहन भगवान् न रागावता, त्या उरगेश्वराला उद्देशून बोलला, "हे सर्पराजा, तुला मी या यमुना नदीमध्यें वास्तव्य करूं देणार नाही. भार्या व बंधु यांसह तूं सागराच्या जलामध्ये राहण्यास जा. जर कोणी तुझा पुत्र अथवा भृत्य या डोहामध्ये माझ्या दृष्टीस पडला तर मी तत्काल त्याचा वध करीन. या यमुना नदीचे पाणी आतां निर्दोष व सुपेय होवो. तू महासागरामध्ये जाऊन तेथें वास्तव्य कर. यापुढें जर तू येथेच राहिलास तर तुजवर मोठे अरिष्ट येऊन त्यांत तुझा अंत होईल. हे सर्पराजा, सागरामध्ये तुझ्या मस्तकांवर माझी पावले उमटलेली पाहून, पन्नगांचा शत्रु गरुड तुला प्रहार करणार नाहीं."

हें ऐकताच, श्रीकृष्णाच्या चरणांवर मस्तक ठेवून, तो सर्पश्रेष्ठ कालिय सर्व गोपांच्या देखत, डोहांतून निघून गेला; व सर्पराज पराभूत होऊन तेथून निघून गेल्यावर, कृष्ण तीरावर येऊन उभा राहिला. या कृत्याने विस्मित झालेल्या गोपांनी प्रदक्षिणापूर्वक श्रीकृष्णाची स्तुति केली. नंतर संतुष्ट होऊन त्या वनवासी गोपाळांनी नंदाला उद्देशून भाषण केलें. " हे अनघा, अशा प्रकारचा अवतारी पुत्र तुला लाभला असल्याकारणाने खरोखर तुजवर परमेश्वराचा मोठा अनुग्रह झाला आहे, असे आह्मांला वाटतें. तू धन्य आहेस. आजपासून आपल्यावर, आपल्या गाईंवर किंवा व्रजावर कोणतीही आपत्ति ओढवली तर आपण या विशाललोचन प्रभु कृष्णाला शरण जाऊं. या मुनिसेवित यमुना नदीचे जल आतां पूर्णपणें स्वच्छ व मंगलकारक झालें असून, इच्या कांठीं आपल्या गाईंना निर्वेधपणे नेहमी संचार करण्यास हरकत राहिलेली नाहीं .आम्हां वनवासी गोपांना कृष्ण ह्मणजे व्रजामध्यें प्रकट झालेला परमेश्वर ( महद्‌भूत ) आहे, हें झाकलेल्या अग्नीप्रमाणे कळले नाहीं. "

याप्रमाणे आश्चर्यभरित झालेले गोप अव्यय कृष्णाचे स्तोत्र गायन करीत, देव जसे चित्ररथ गंधर्वाच्या उपवनाप्रत जावे तसे आपल्या घोषाचे ठिकाणीं परत गेले.


इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि
कालियदमनं नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
अध्याय बारावा समाप्त

GO TOP