|
॥ श्रीहरिविजय ॥
॥ श्रीहरिः शरणम् ॥
अहं भक्तपराधीनो ह्मस्वतन्त्र इव द्विज ।
साधुभिर्ग्रस्तहदयो भक्तैर्भक्तजनप्रिय : ॥ ९. ५. ६३ ॥
साधवा हृदयं मह्य साधूनां हृदयं त्वहम् ।
मदन्यतू ते न जाननि नाहे तेभ्यो मनागपि ॥ ९. ५. ६८ ॥
श्रीमद्भागवतात श्रीभगवान स्वतः दुर्वासऋषींना म्हणतात, ' 'हे ऋषे ! मी भक्तांच्या अधीन इतका आहे की, मला जणू स्वातंत्र्यच नाही. भक्तांनी माझे मन आपल्या ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे भक्तच मला प्रिय आहेत. भक्त हेच माझे हृदय असून भक्तांचे हृदय मी आहे. त्यामुळे ते माझ्याशिवाय दुसरे काहीच जाणत नाहीत आणि मी त्यांच्याशिवाय दुसऱ्या कशाचाच विचार करीत नाही.
एका बाजूने श्रीभगवंत भक्तांचे मोठेपण स्वःच्या मुखाने सांगतात, तर दुसऱ्या बाजूने त्या भगवंतांची भक्तपराधीनता, कृपालुता, भक्तांवरील निःसीम प्रेम इत्यादी प्रकारचा भगवन्महिमा सामान्य जनांपर्यंत स्वानुभवाने पोचविण्याचे व भक्तिमार्गाने वाल्या कोळ्यासारख्या सुदुराचाऱ्यांनाही भगवत्प्राप्ती करून देण्याचे कार्य भक्त करतात. जगात भगवन्महिमा वाढवण्यासाठीच भक्तांचे अवतार होत असतात.
अशाच अनेक भगवत्प्राप्त भक्तजनांपैकी एक श्री. प. प. श्रीधरस्वामी. कवी श्रीधरांचा जन्म माण नदीच्या काठी असलेल्या नाझरे या गावी इ. स. १६५८ मध्ये झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव श्रीधर नारायणशास्त्री देशपांडे नाझरेकर असे होते. त्यांचे वडील नारायणशास्त्री तथा ब्रह्मानंद हे त्यांचे केवळ जन्मदातेच नव्हते, तर त्यांच्या आनंद संप्रदायाच्या परंपरेतील त्यांचे आध्यात्मिक गुरूही होते. त्यामुळेच श्रीधरांनी प्रत्येक अध्यायाच्या शेवटी व क्वचित प्रारंभीही ब्रह्मानंदांचा उल्लेख करून त्यांना भक्तिभावाने वंदन केले आहे. वयाच्या वीस वर्षांपर्यंत श्रीधरांनी अनेक संस्कृत व प्राकृत महान ग्रंथांचा अभ्यास केला. त्यावेळीच त्यांची गणना विद्वानांत होऊ लागली. त्याच सुमारास ते पंढरपुरात स्थाइक झाले.
प्रथमपासूनच श्रीकृष्णांची भक्ती त्यांच्या अंतःकरणात घर करून राहिली होती. त्यात पंढरपुरात वास्तव्य झाल्यामुळे ती अधिकच बहरून आली. तेथे ते पुराणप्रवचने व कीर्तने करू लागले. हे करण्यामागे भक्तिमार्गाचा प्रसार करणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते. वाणी रसाळ असल्यामुळे त्यांच्या कीर्तनाला लोकांची अलोट गर्दी होऊ लागली. आपण जे कथा-कीर्तनातून सांगतो, ते ग्रंथबद्ध केल्यास अनेक लोकांना व अनेक काळपर्यंत त्याचा लाभ घेता येईल, हा विचार मनात येताच त्यांनी पुराणकथा स्वतःच्या शैलीत ओवीबद्ध करण्यास सुरुवात केली. त्यांच्या या प्रयत्नवृक्षाला आलेले पहिले मधुर फळ म्हणजे 'श्रीहरिविजय '.
८१३९ ओव्यांचा हा ग्रंथ त्यांनी इ. स. १७०२ मध्ये वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी रचला. यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या अवतारपूर्वकालीन भूतलावरील स्थितीपासून प्रारंभ करून भगवानांचे पंढरपुरला दिंडीरवनात पुंडलिकाला वर देण्यासाठी पांडुरंगरूपात येण्यापर्यंतच्या चरित्राचे आगळे-वेगळे वर्णन आपल्याला वाचावयास मिळते. या चरित्राचे दुसरे वैशिष्ट्य असे आहे की, यात कवीने हरिवंश, भागवत, नारदपुराण, पद्यपुराण इत्यादी ग्रंथांचा आधार घेतला असून वाचकांना अविश्वास वाटू नये, यासाठी ती कथा कोणत्या पुराणात आली आहे, याचा कवी उल्लेख करतो. यामध्ये मुख्यतः भक्तिरस धबधब्याने वाहात असला, तरी त्याला पुष्ट करणारे अन्य नऊ रसांचे झरे झुळझुळ वाहाताना आढळतात. श्रीज्ञानेश्वरमाउली म्हणतात,
वाचे बरवें कवित्व । कवित्वी बरवें रसिकत्व ।
रसिकत्वीं परतत्त्व - । स्पर्श जैसा । । ज्ञानेश्वरी - १८. ३४७ ॥
"गद्यवाणीहून कविता अधिक श्रेष्ठ आहे. त्या काव्यात रसाळपणा असणे हे अधिक चांगले. त्या रसाळपणाला ब्रह्मनिरूपणाची जोड असेल, तर मग काय विचारावे ?''
या माउलींच्या सांगण्याप्रमाणे श्रीधरांच्या काव्यात काव्यगुण, विविध रस व त्याबरोबरच ब्रह्मनिरूपण असा त्रिवेणीसंगम झालेला आढळतो. श्रीधरांचे शब्दप्रभुत्व थक्क करून सोडणारे आहे. संस्कृत भाषेच्या वैशिष्ट्याचा उपयोग करून आपल्या काव्यातील पात्रांसाठी त्यांनी निरनिराळी विशेषणे तयार केलेली आहेत. हीच पहा ना भगवान श्रीकृष्णांची विशेषणे - रमाधव, चतुराननजनक, भीमकजामात, क्षीराब्धिजामात, चैतन्याची बुंथी, जगज्जीवन, कमळाधव, राजीवनेत्र, यादवेंद्र, त्रिभुवनसुंदर इत्यादी इत्यादी हजारो नावे यांत आपल्याला आढळतील आणि अशीच इतर पात्रांचीही. केवळ एवढेच नव्हे तर हा व कवीचे इतर ग्रंथ वाचताना कवीचा साही शास्त्रे, चौदा विद्या, चौसष्ट कला यांचा गाढा अभ्यास प्रत्ययाला आल्याशिवाय राहात नाही. इतके असूनही कवी हा ग्रंथ स्वत: केला असे मानीत नाही. कवी म्हणतो,
छत्तीस अध्याय ग्रंथ तत्त्वतां । प्रीती पावो पंढरीनाथा ।
या ग्रंथासी मूळ कर्ता । पंढरीनाथ जाणिजे ॥ ३६. २१२ ॥
जें जें विठ्ठलें कर्णीं सांगितलें । तें तें येथें पत्रीं लिहिलें ।
न्यून अथवा आगळें । त्याचें तोचि जाणे पैं ॥ ३६. २१३ ॥
दशम आणि हरिवंश । पद्यपुराणींच्या कथा विशेष ।
त्याचि हरिविजयीं सुरस । श्रोतीं सावकाश परिसाव्या ॥ ३६. २१४ ॥
शेवटी याची फलश्रुती सांगताना कवी म्हणतो,
छत्तीस अध्याय हरिविजय । पांडुरंगासी परम प्रिय ।
हा ग्रंथ संग्रहितां तें घर निर्भय । सदा विजय होइजे ॥ ३६. २१५ ॥
श्रीमद्भगवद्गीतेत सांगितलेल्या ज्ञान, कर्म, भक्ती, अष्टांग या योगांचा लोकांत प्रसार व्हावा, त्याविषयी सद्भक्ताची रुची वाढावी, अभक्तांच्या मनातही भक्ती उत्पन्न व्हावी, या हेतूने आम्ही निरनिराळे धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक ग्रंथ प्रकाशित करीत असतो. महाराष्ट्रात ग्रामीण भागातील जनमानसातही स्थान मिळालेल्या या हरिविजयाचे प्रकाशनही यासाठीच आम्ही करीत आहोत.
या ग्रंथात प्रारंभी अध्यायवार विषयानुक्रमणिका दिली असून अर्थज्ञानासाठी काही तळटीपाही दिलेल्या आहेत. या ग्रंथाचे श्रावण महिन्यात पारायण करण्याची प्रथा आहे. त्यानुसार भाविकांनी श्रावण वद्य प्रतिपदा ते नवमी या श्रीकृष्णनवरात्रात दररोज चार अध्याय वाचून पारायण करावे किंवा पूर्ण महिनाभर यथाशक्ती वाचन करावे. हा ग्रंथ तयार करण्यात ज्यांनी ज्यांनी सहयोग दिला, त्या सर्वांवर भगवान श्रीहरीनी कृपा करावी, ही त्यांच्या चरणकमळीं प्रार्थना.
प्रकाशक - गीताप्रेस - यांच्या प्रास्ताविक निवेदनवरून उद्धृत् -
GO TOP
|