॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय अकरावा ॥

कालियामर्दन, कृष्णाने वणवा पिऊन टाकणे -


श्रीगणेशाय नमः ॥
जय जय इंदिरावरा श्रीरंगा । निजजनहृत्पद्मनीलभृंगा ।
अज अजिता अव्यंगा । सकलरंगातीत तूं ॥१॥
नीलग्रीवभूषणारिरोहणा । पयोब्धिहृदयरत्‍नमनमोहना ।
सरसिजोद्‌भवजनका नीलवर्णा । सप्तावरणांवेगळा तूं ॥२॥
अनंतकोटिकामसुंदरा । सकलरंगचालका परम उदारा ।
अमला पराभारतीअगोचरा । निर्विकारा निर्द्वंद्वा ॥३॥
भवनागविदारकपंचानना । विद्वज्जनमनमांदुसरत्‍ना ।
नाकळसी पंचास्याच्या ध्याना । सकलकल्याणनिकेतना तूं ॥४॥
दुर्जनदानवकुलनिकृंतना । अरिवर्गप्रतापभंजना ।
गहनमायाविपिनदहना । तमनाशना ज्ञानसूर्या ॥५॥
अगम्य तूं दशशतनयना । न वर्णवसी दशशतवदना ।
दशशतहस्ताचिया किरणां । नाढळसी तूं शोधितां ॥६॥
निकटभीमातटविहारा । आदिपुरुषा श्रीदिगंबरा ।
ब्रह्मानंदा श्रीधरवरा । पुढें चरित्र चालवीं ॥७॥
दशमाध्यायाच्या अंतीं कथा । हरीसी स्तवोनि नारदपिता ।
गोप-वत्सें देऊनि मागुता । निजस्थानासी पावला ॥८॥
यावरी प्रातःकाळीं एके दिवशीं । गोगोप घेऊनि वैकुंठविलासी ।
आला तमारिकन्यातीरासी । लावण्यराशि जगदात्मा ॥९॥
उष्णकाल वसंतमास । मध्यान्हासी आला चंडांश ।
त्याच्या करप्रतापें सकलांस । तृषा विशेष वाढली ॥१०॥
धांवती गाईंचे कळप । कृतांतभगिनीतीरासमीप ।
पया र्‍हदीं कालिया दुष्ट सर्प । महादुर्मति वसे तेथें ॥११॥
जगद्वंद्यास टाकूनि मागें । गो-गोप पुढें धांवती वेगें ।
हरि समीप नसतां कर्मभोगें । प्राप्त झालें दुःख पैं ॥१२॥
सेवितांचि यमुनाजीवन । गो-गोप झाले गतप्राण ।
यमानुजातीरीं मृत्युशयना । सकळीं केलें एकदां ॥१३॥
दुरावतां धराधरतनुशयन । अकल्पित विघ्नें पडती दारुण ।
यालागीं कमलपत्राक्षाचे चरण । न विसंबावे सर्वदा ॥१४॥
हातीं वंशवाद्य घेऊन । तेथें पावला पद्माक्षीरमण ।
तंव ते अनाथ प्रेतें होवोन । गो-गोपाल पडियेले ॥१५॥
ऐसें देखोनि कृपार्णवें । निजवल्लभें कमलाधवें ।
करुणाकरें विलोकितां आघवे । निद्रिस्तापरी ऊठती ॥१६॥
अनंतब्रह्मांडींचे प्राणी । जीववी जो कृपावलोकनीं ।
तेणें गोप धेनु तेच क्षणीं । कृपाकटाक्षें उठविलीं ॥१७॥
मग उठोनि ते वेळां । तटस्थ विलोकिती तमालनीला ।
म्हणती याचे हातीं जीवनकला । सकल जीवांच्या असती हो ॥१८॥
आम्ही प्राशितां विषजीवन । समस्त पडिलों कुणपें होऊन ।
येणें कृपेचें करुनि निकेतन । आमुचे प्राण रक्षिले ॥१९॥
असो मनीं विचारी जगदात्मा । कालिंदीर्‍हदीं हा दुष्टात्मा ।
यास दवडावें न करावी क्षमा । तरीच सर्वां सुख होय ॥२०॥
परमदुष्ट हा अहि साचार । सळसळां पुढें यमुनेचें नीर ।
जिकडे उदकावरुनि जाय समीर । तिकडे संहार चराचरजीवां ॥२१॥
अंतरिक्षें द्विज जातां उडोन । मृत्यु पावती चडफडोन ।
कालियानयनींचा पेटतां अग्न । वनें जळोनि भस्म होतीं ॥२२॥
तेथींचा जिकडे जाय प्रभंजन । तिकडे वृक्ष जाती जळोन ।
मग तें कोण प्राशील जीवन । स्पर्शही जाण न करवे ॥२३॥
त्याचि डोहीं येऊन । कालिया वसावया काय कारण ।
पूर्वीं सर्व उरग मिळोन । माधववहना शरण गेले ॥२४॥
म्हणती तूं आमुचा संहार करिसी । तरी अभय देईं एक आम्हांसी ।
तवं सुपर्ण म्हणे प्रतिवर्षीं । पूजा नेमेंसीं पैं देणें ॥२५॥
सर्वीं मान्य केलें वचनासी । भाद्रपदशुद्ध पंचमीचे दिवसीं ।
आदरें पूजावें विनायकासी । तरीच सर्पांसी निर्भय ॥२६॥
एक रथभरी अन्न । त्यावरी एक उरग ठेवून ।
देती खगपतीस नेऊन । नेमेंकरुन प्रतिवर्षीं ॥२७॥
तों हा कालिया मदेंकरून । न पूजी अरुणानुजालागून ।
तें विहंगोत्तमें ऐकोन । म्हणे जिवें मारीन कालिया ॥२८॥
अंडजप्रभुभेणें लपावया । ठाव कोठें न मिळे कालिया ।
तों यमुनाडोहीं त्या पक्षिवर्या । शाप होता पूर्वींचा ॥२९॥
यमुनाजीवनींचे मत्स्य काढोनी । उरगरिपु भक्षीं अनुदिनीं ।
तों तेथें सौभरी नामें महामुनी । भानुजातीरी तप करी ॥३०॥
मत्स्य अवघे मिळोन । सौभारीस गेले शरण ।
म्हणती तूं साधु येथें असोन । आम्हांलागून गरुड मारी ॥३१॥
मग मत्स्यकैवारें वदे सौभर । येथींच्या जीवना स्पर्शतां खगेंद्र ।
तत्काळ मृत्यु पावेला साचार । ऐकोनि मत्स्य सर्व तोषले ॥३२॥
तें विष्णुवहनें जाणोन । पुनः त्यजिलें तें स्थान ।
त्या र्‍हदीं कालिया म्हणून । राहिला येऊन द्विजेंद्रभयें ॥३३॥
असो ऐसा दुष्ट अही । नेत्र उघडोनि जिकडे पाही ।
वृक्षवनें जळती सर्वही । पाषाणही उलती हो ॥३४॥
एक कदंबवृक्ष राहिला । वरकड वृक्षांचा संहार जाहला ।
तरी त्यावरी पूर्वीं खगपति बैसला । सुधारसघट नेतां हो ॥३५॥
घट ठेविला होता पलमात्र । तेणें अमर झाला तरुवर ।
यालागीं कालियाविष दुर्धर । न जाळी त्या कदंबा ॥३६॥
सिंहावलोकनें तत्त्वतां । श्रोते हो परिसा मागील कथा ।
यमुनातीरीं जगत्पित्याचा पिता । उठवीं प्रेतें सकलही ॥३७॥
मनांत इच्छी स्कंदतातमित्र । हा काढावा येथूनि अमित्र ।
म्हणोनि कदंबावरी श्रीधर । चढे साचार तेधवां ॥३८॥
उदयाचलावरी सहस्रकार । तैसा दिसे क्षीराब्धिजावर ।
कीं ऐरावतारुढ सहस्रनेत्र । त्रिभुवनेश्वर तैसा दिसे ॥३९॥
तो वैकुंठींचा सुकुमार । श्यामसुंदर नन्दकुमर ।
कदंबावरी श्रीधर । दीनोद्धार शोभतसे ॥४०॥
कालियामर्दन आरंभिलें जेव्हां । सहा वर्षांची मूर्ति तेव्हां ।
ऊर्ध्ववदनें कमलाधवा । गोप सर्व विलोकिती ॥४१॥
परम सुवास पीतवसन । दृढ कशिलें स्वकरेंकरुन ।
सुरंग पदर खोवून । मुक्तमाळा सांवरिल्या ॥४२॥
कटिसूत्र सरसाविलें । कर्णीं रुळती दिव्य कुंडलें ।
आकर्णपर्यंत नेत्रोत्पलें । मुख विकासिलें सुहास्य ॥४३॥
सुनीळ रसें ओतिले अखंड । तैसे आजानुबाहु दंड ।
ते बळें वाजवूनि प्रचंड । हांक फोडिली तेधवां ॥४४॥
तों वैकुंठींचा वेल्हाळ । सुकुमारतनु तमालनीळ ।
उडी घातली तात्काळ । गोप सकळ पाहती ॥४५॥
उडीसरसें जीवन त्या वेळे । शतधनुष्य उंच गेलें ।
कल्लोळ तीरास आदळले । विषनीराचे तेधवां ॥४६॥
परम अद्‌भुत केलें गोपाळें । अदितिसुत सकळ धांवले ।
विमानारुढ पाहों लागले । अद्‌भुत कर्तव्य हरीचें ॥४७॥
मृडानीसहित मदनदहन । शचीसहित सहस्रनयन ।
सावित्रीसहित कमलासन । कौतुक पाहों धांविन्नले ॥४८॥
मित्रकन्या-जीवनीं जगज्जीवन । भुजदंड आफळी क्रोधायमान ।
परम दारुण घोष ऐकोन । धांवे दुर्जन अही तो ॥४९॥
महाकपटी सर्प काळा । शत फणा ताठरा विशाळा ।
धुधुःकारासरशा ज्वाळा । महाकराळा उठती पैं ॥५०॥
नेत्रीं देखिला जगन्मोहन । मायाचक्रचालक शुद्धचैतन्य ।
जें मीनकेतनारीचें देवतार्चन । सनकादिक ध्याती जया ॥५१॥
सनकादिकांच्या हृदयसंपुटीं । जे का पहुडे मूर्ति गोमटी ।
पद्मोद्‌भव आणि धूर्जटी । वाहती मुकुटीं आज्ञा ज्याची ॥५२॥
असो ऐसिया मुरमर्दना । राजीवनेत्रा सुपर्णवहना ।
कालिया देखोनि व्रजभूषणा । धांवोनि डंखी वर्मस्थळीं ॥५३॥
दंश करुनि स्थळीं स्थळीं । वेढे घालूनि मूर्ति आंवळी ।
सच्चिदानंदतनू सांवळी । आच्छादिली काळसर्पें ॥५४॥
जो विद्वज्जनमानसमराळ । अनंत-कल्याणदायक घननीळ ।
जो पुराणपुरुष भक्तवत्सल । सर्पें सकळ आंवळिला ॥५५॥
राहूनें वासरमणी । केतु रमाबंधूसी झांकी गगनीं ।
कीं ईश्वरास माया वेष्टूनी । आपुली करणी दावीत ॥५६॥
कीं पूर्वी दशराथात्मजांसी । पाकशासनशत्रु बांधी नागपाशीं ।
तैसें कालियानें जगद्वंद्यासी । वेढे घालूनि आंवळिलें ॥५७॥
भुजंगें वेष्टिला परमपुरुष । न हाले न बोले हृषीकेश ।
लीलावतारी जगन्निवास । लीला भक्तांस दावीतसे ॥५८॥
ऐसा देखतां श्रीपती । गोप तीरीं पाहती ।
महाआक्रोशें हांक देती । हृदय पिटिती धबधबां ॥५९॥
गगनीं पाहती निर्जर । देवललना देखती समग्र ।
त्यांच्या नेत्रीं वाहे नीर । शोक अपार जाची तयां ॥६०॥
तटस्थ पाहती नयनीं । भुजंगें वेष्टिला चक्रपाणी ।
त्या दुःखेंकरुनि धरणी । उलों पाहे तेधवां ॥६१॥
हा यमुनेसी जाहला वृत्तांत । गोकुळीं काय वर्तली मात ।
दुश्चिन्हें परम अद्‌भुत । जाणवती लोकांतें ॥६२॥
चपला पडती कडकडोन । अद्‌भुत सुटला प्रभंजन ।
उडुगण पावती पतन । लोक शोकें विव्हळ ॥६३॥
कांपों लागली धरित्री। उगेच अश्रु येती जननेत्रीं ।
कलाहीन नरनारी । भय अंतरीं वाटतसे ॥६४॥
कमलापतीची जननी । परम विव्हळ शोकेंकरूनी ।
तिडकूं लागले स्तन दोन्ही । अश्रु नयनी वाहती ॥६५॥
मिळाले गौळी गोपी समस्त । नंदही धांवे भयभीत ।
यशोदा बाहेर आली धांवत । रोहिणी येत लवलाहें ॥६६॥
घरीच होता संकर्षण । बाहेर आली धांवोन ।
यशोदा म्हणे जगज्जीवन । कोण्या वनांत गेला रे ॥६७॥
सांडूनियां घरदार । वनांत जाती लोक समग्र ।
बाळें संगती जाती सत्वर । श्यामसुंदर पहावया ॥६८॥
वृद्धें सांडूनि देहगेह आशा । पाहों इच्छिती परमपुरुषा ।
म्हणती काय जाहलें हृषीकेशा । कोण्या वनीं पाहावें ॥६९॥
तों ध्वजवज्ररेखाचिन्ह । हरिपदमुद्रा देखती जन ।
भोंवतीं गोपदें सघन । पुढें गोचरण उमटले ॥७०॥
जिकडे उमटले गाईंचे खूर । त्याच पंथें गेला मुरहर ।
जैसे वेदश्रुतींचे भार । स्वरुप निर्धार दाविती ॥७१॥
असो नंद यशोदा सकळ जन । आले यमुनातीरा धांवोन ।
तंव तेथें गोप शोकेंकरुन । मूर्च्छा येऊन पडताती ॥७२॥
तों भुजंगें वेष्टिला वनमाळी । सर्वीं देखिला तेचि वेळीं ।
एकचि हांक तेव्हां जाहली । तो शोक वर्णिला नव जाय ॥७३॥
यशोदा म्हणे गा कान्हया । आतां तुज कोठें पाहूं तान्हया ।
बा रे धांव कां लवलाह्या । विसांविया गोपाळा ॥७४॥
स्तनीं दाटलासे पान्हा । कोणास पाजूं राजीवनयना ।
माझिया पाडसा मनमोहना । निजवदना दावीं रें ॥७५॥
धांव धांव गे माझे कान्हाई । सांवळे सुकुमारे सखे बाई ।
उदार डोळसे कृष्णाबाई । कोणे ठायीं पाहूं तूंतें ॥७६॥
दधि दुग्ध तूं सर्व खासी साई । राजसा मी तुज न बोलें कांहीं ।
पाडसा एकदां भेट देईं । धांवोनियां मज आतां ॥७७॥
तुज म्यां बांधिलें उखळासी । म्हणवूनि सखया रुसलासी ।
आग लागो माझिया हातांसी । श्रीकृष्णासी बांधिलें म्यां ॥७८॥
काय काय आठवूं बा रे तव गुण । उर्वी न पुरे करितां लेखन ।
सकळ गोपी शोकेंकरुन । मस्तकें अवनीं आपटिती ॥७९॥
एक वक्षःस्थळें पिटिती । एक दीर्घस्वरें हांक देती ।
नंदाचे नेत्रीं अश्रु वाहती । पडे क्षिती मूर्च्छित ॥८०॥
हंबरडा फोडोनि बोभाती गाई । अश्रु वाहती नेत्रीं पाहीं ।
यशोदा म्हणे आतां सर्वही । प्राण देऊं येथेंचि ॥८१॥
सकळ स्त्रियांसमवेत कृष्णमाया । चालिली डोहामाजी प्रवेशावया ।
तंव बळिराम आडवा येऊनियां । म्हणे ऐका गोष्टी एक ॥८२॥
त्रिभुवननायक हा वनमाळी । त्यास भय नाहीं कदाकाळीं ।
कृतांतही कांपे चळवळीं । कृष्णप्रताप देखतां ॥८३॥
बळिभद्राचें वचन ऐकोनी । सकळांसौख्य वाटे मनीं ।
त्याच्या वचनीं विश्वास धरुनी । तटस्थ नयनी पाहती ॥८४॥
असो इकडे कालिंदीजीवनीं । कालियें हरि बांधिला आंवळोनी ।
यावरी श्रीकृष्ण प्रतापतरणी । काय करिता जाहला ॥८५॥
दृढ वेढें घातलें भुजंगें । शरीर फुगविलें रमारंगें ।
कालियादेह तडतडीं वेगें । वेढें काढिले तेधवां ॥८६॥
जरी क्षणभरी न काढिता वेढे । तरी ठायीं ठायीं होते तुकडे ।
महाविखारें त्या प्रचंडें । भयें वेढे काढिले ॥८७॥
हरीस सांडूनि ते वेळां । भुजंग जाहला हो वेगळा ।
भडभडां गरळज्वाळा । मुखावाटे सोडीतसे ॥८८॥
मडकें भाजलें जैसे तप्त । तैसे नेत्र दुष्टाचे आरक्त ।
नासिकाद्वारें उष्ण श्वास सोडीत । प्रळयाग्नीच्या शिखा जैशा ॥८९॥
जिव्हा सुळसुळीत दुधडा । शतफणा कराळ प्रचंडा ।
पर्वतशृंगें जेवीं दाढा । दंत तीक्ष्ण तयाचे ॥९०॥
परम भ्यासुर अधरप्रांत । ते जिव्हेनें क्षणक्षणां चाटीत ।
करकरां क्रोधें दांत खात । हरीस लक्षोनि सक्रोध ॥९१॥
क्रोधें थरथरां अंग कांपत । नेत्र गरगरां भोवंडीत ।
पुढें दंश करावया जपत । मग रमानाथ काय करी ॥९२॥
सहा वर्षांची मूर्ति होय । पुरुषार्थ ब्रह्मांडीं न समाय ।
झेपा घालोनि लवलाहें । धरिला भुजंगम पुढती तो ॥९३॥
आधीं गरगरां भोंवंडूनी । बळें आफळी यमुनाजीवनीं ।
निर्भय निःशंक चक्रपाणी । वेदपुराणी वंद्य जो ॥९४॥
जो उरगांचा काळ पूर्ण । त्यावरी बैसोनि करी गमन ।
तो हा पुराण पूतनाप्राणहरण । जन्ममरण त्या नाहीं ॥९५॥
क्षणक्षणां आफळूनि सर्प । हरिला समूळ बलप्रताप ।
गळाला दुर्जनाचा दर्प । जाहलें भ्रमित अंग पैं ॥९६॥
सवेंचि शिरीं पाय देऊनि भगवंतें । पुच्छ धरिलें वामहस्तें ।
तांडवनृत्य श्रीजगन्नाथें । आरंभिलें तेधवां ॥९७॥
निजपदघातेंकरुनी । शतफणा लववी मोक्षदानी ।
सप्त तालसांवरूनी । नृत्य करी भगवंत ॥९८॥
जो क्षीराब्धिशायी वैकुंठविहारी । तो चपळ नृत्य करी कालियाफणांवरी ।
फणा लववी यमुनानीरीं । श्वास उदरीं न समाये ॥९९॥
चुकवूनि पळों पाहे भुजंग । परी न सोडी भक्तभवभंग ।
जो कां फणांवरी व्यंग । टांच हाणोनि तुडवीतसे ॥१००॥
जो सर्वांतरात्मा भगवान । जो कां पूर्णब्रह्म सनातन ।
तो कालियाशिरीं नृत्य करून । पाहतां भक्त सुखी होती ॥१०१॥
नृत्य करी भगवंत । गोकुळींचे जन तटस्थ पाहात ।
विमानीं सुरवर विस्मित । न हालत नेत्रपातीं ॥१०२॥
आनंदें टाळ विणे वाजविती । मृदंगवाद्यें झणत्कारिती ।
एक करटाळिया पिटिती । नृत्यगति पाहोनियां ॥१०३॥
मदनमनोहर वेधक मूर्ती । कल्याणदायक अगाध कीर्ती ।
पहावया अष्टनायिका धांवती । विस्मित होती किन्नर ॥१०४॥
नृत्य करितां भगवंत । वांकीं नेपुरें रुणझुणत ।
सुरंग पीतांबर रुळत । कटिमेखळा झळके वरी ॥१०५॥
हस्तसंकेत दावी वनमाळी । मुद्रिका झळकती दशांगुळीं ।
दिव्य पदक वक्षःस्थळीं । मुक्तामाळा डोलती ॥१०६॥
मंदस्मित सुहास्यवदन । आकर्ण विराजती राजीवनयन ।
कर्णी कुंडलें देदीप्यमान । निढळीं केशर झळकतसे ॥१०७॥
रत्‍नजडित मुकुट माथां । ऐसी मूर्ति नृत्य करितां ।
नानागती नाचतां नाचतां । चक्राकार दिसतसे ॥१०८॥
मग दिव्य सुमनांचे संभार । वर्षताती सकल निर्जर ।
देखोनि मूर्ति मनोहर । देवांगना वेधल्या ॥१०९॥
म्हणती तनुमनधनेंसीं अभिमान । सांडावा यावरूनि ओवाळून ।
अनंत जन्मींचें तपाचरण । तरीच जगज्जीवन प्राप्त होय ॥११०॥
असो नृत्य करितां त्रिभुवनपती । टाळ मृदंग देव वाजविती ।
कालियाचे प्राण निघों पाहती । सकल शक्ति आकर्षिल्या ॥१११॥
मुखीं शोणित वाहत । उरग पडिला मूर्च्छित ।
विराली अहंकृति समस्त । गर्वरहित झाला कालिया ॥११२॥
श्वासोच्छ्‌वास सोडावया । जंव शिर जाय उचलाया ।
हरी तें टांचें रगडूनियां । पुन्हां हालवेनासें करी ॥११३॥
भुजंग आठवी श्रीजगन्निवासा । धांव धांव बापा पुराणपुरुषा ।
जगत्पालका रमाविलासा । सोडवीं दासासी येथूनियां ॥११४॥
मी करितों ज्याचिया स्मरणा । तो शिरीं नाचतो समजेना ।
त्रिभुवनाचा भार सोसेना । प्राण सोडूं पहातसे ॥११५॥
अनंत ब्रह्माडें ज्याचें पोटीं । तो मस्तकीं नाचे जगजेठी ।
असो कालिया होऊनि कष्टी । मूर्च्छागत पडियेला ॥११६॥
मग त्या भुजंगाच्या नितंबिनी । करीं रत्‍नदीप आरत्या घेऊनी ।
शरण येती तेचि क्षणीं । भक्तवल्लभा हरीतें ॥११७॥
देव करिती स्तुतीतें । शिवविरिंचिआदि गाती ज्यातें ।
हें कळलें नागकन्यांतें । कीं जगदात्मा हाचि पैं ॥११८॥
कालिया झाला भ्रमें मूर्च्छित । जवळी असतां नेणे भगवंत ।
सुर विमानीं स्तुति करीत । तेंही श्रवणीं पडेना ॥११९॥
शरण आल्या आपुल्या स्त्रिया । हेंही न समजेचि कालिया ।
केवळ मूढदशा पावोनियां । जगत्पतीस नेणेचि ॥१२०॥
जैसें जवळीं दिव्यरत्‍न असोनी । अंधासी कदा न दिसे नयनीं ।
कीं पिशाचासी न समजे मनीं । आपण कोण आहों तें ॥१२१॥
कीं जो सुषुप्तिडोहीं बुडाला । त्यास सहस्राक्ष प्रसन्न होऊं जरी आला ।
परी न कळे जैसें त्याला । तैसें झालें कालियातें ॥१२२॥
असो देखोनि शारंगपाणी । शरण येती भुजंगकामिनी ।
गेल्या देह विसरोनी । पतिभयें अति विव्हळ ॥१२३॥
न सांवरती कबरीभार । गळोनि पडती अलंकार ।
ढळले वक्षःस्थळींचे पदर । विव्हळ शरीर जाहलें ॥१२४॥
एकीचीं लेंकुरें करिती स्तनपाना । ते युवती दावी जगन्मोहना ।
कीं लेंकुरें देखोनि व्रजभूषणा । कृपा येईल म्हणोनि ॥१२५॥
एक पसरोनि अंचळा । चुडेदान मागती तमालनीळा ।
अश्रु वाहती एकीच्या डोळां । करुणा गोपाळा दाविती ॥१२६॥
एकी उभ्या ठाकती बद्धांजळी । एकी दृढ लागती चरणकमळीं ।
एकी काकुळती येती वनमाळी । दे म्हणती पतिदान ॥१२७॥
श्रीकृष्णपदकमळावरी । उरगतनया झाल्या भ्रमरी ।
तेथींचा मकरंद अंतरीं । सांठविती प्रीतीनें ॥१२८॥
एक करिती स्तवना । ब्रह्मानंदा जगज्जीवना ।
दीनवत्सला पीतवसना । शकटमर्दना श्रीहरे ॥१२९॥
हे सिंधुजापति जगन्निवासा । हे योगिमानसराजहंसा ।
हे घोर अविद्यावनहुताशा । परमपुरुषा विलासिया ॥१३०॥
हे गोपीमानसचकोरचंद्रा । सच्चिदानंदा आनंदभद्रा ।
हे समरधीरा प्रतापरुद्रा । मन्मथजनका जगद्गुरो ॥१३१॥
बाळक करी बहुत अन्याय । परी क्षमा करी निजमाय ।
महादुर्जन हा अहि निर्दय । तव पदरजें उद्धरला ॥१३२॥
जे दुसर्‍याचा करुं इच्छिती घात । त्यांस शासनकर्ता तूं जगन्नाथ ।
परी येणें पूर्वीं तप बहुत । किती केलें न कळे तें ॥१३३॥
बहुत केलें पुरश्चरण । कीं साधिलें पंचाग्निसाधन ।
कीं केलें सद्‌गुरुभजन । साधुसेवा प्रीतीनें ॥१३४॥
कीं ब्रह्मचर्य आचरला । कीं वानप्रस्थधर्मी राहिला ।
कीं चतुर्थाश्रम अवलंबिला । तरी पावला पद तुझें ॥१३५॥
तुझ्या आंगींची चित्कळा । तेचि चरणीं राहिली कमला ।
तिजपरीस भाग्यें आगळा । कालिया आम्हां वाटतो ॥१३६॥
एवढा अन्याय करूनि क्षमा । वज्रचुडेदान देईं आम्हां ।
हा तों परम मूढ दुष्टात्मा । तुझा महिमा नेणेचि ॥१३७॥
हे अनंत ब्रह्मांडपाळका । देवशिखामणि गजरक्षका ।
येवढा अन्याय कमलानायका । घालीं पोटांत आतांचि ॥१३८॥
भृगूनें तुज मारिली लात । परी तूं जगदात्मा पूर्ण शांत ।
तैसे अन्याय याचे समस्त । क्षमा करीं गोविंदा ॥१३९॥
ऐशा उरगकन्याविनविती । अहिशिरीं नाचे जगत्पती ।
तों कालियाचे प्राण निघों पाहती । नेत्रीं तंद्री लागली हो ॥१४०॥
देखोनियां अंतसमया । करुणा भाकिती भोगितनया ।
करुणालया यादवराया । प्राण जाती कीं याचे ॥१४१॥
हरीपुढें पदर पसरिती । करिती नाना काकुळती ।
दीनवदनें मुख विलोकिती । दीनबंधूचें तेधवां ॥१४२॥
अहा श्रीकृष्णा आत्मयारामा । प्रेतदशा आली भुजंगोत्तमा ।
आमुची निराशा सर्वोत्तमा । झाली आतां येथूनियां ॥१४३॥
आम्ही भणंगें अनाथ दीन देख । पतिप्राणाची मागतों भीक ।
तूं उदार जगत्पालक । कां कृपणता धरियेली ॥१४४॥
स्वामी त्वां ध्रुवास अढळपद दिधलें । शक्रारिजनकानुजा त्वांचि स्थापिलें ।
आतां कृपण चित्त कां केलें । ब्रीद आपुलें सांभाळीं ॥१४५॥
ऐसी ऐकूनि करुणा । कृपा उपजली व्रजभूषणा ।
पुरें करूनि कालियामर्दना । भक्तवचना पाळिलें ॥१४६॥
सर्प मूर्च्छागत जाहला । तैसाचि पायें परत लोटिला ।
जयजयकार करीत ते वेळां । नागकन्या ओंवाळिती ॥१४७॥
तव कालिया अत्यंत क्षीण । हळूच उघडोनि पाहे नयन ।
तों देव विमानीं करिती स्तवन । तें श्रवण ऐके भुजंग ॥१४८॥
वैकुंठनाथ हा परमात्मा । तेव्हां कळलें भुजंगमा ।
स्तवावया वैकुंठधामा । तत्काळ जाहला नररूप ॥१४९॥
जैसें व्यथाभूत बाळक जाण । वदे मंजुळ मंजुळ वचन ।
तैसे भुजंग हरिपद धरून । करी स्तवन तेधवां ॥१५०॥
जय जय यादवकुलतिलका । नंदकुमारा व्रजपालका ।
त्रैलोक्यनाथा चित्तचालका । शरणागता रक्षीं तूं ॥१५१॥
प्राण्याचे जे जे जैसे संस्कार । चराचर जीव नाना विकार ।
ते ते सुटती निर्धार । जातिस्वभावेंकरूनियां ॥१५२॥
तुवां सकळ जाती निर्मोनी । आम्हांस घातलें सर्पयोनीं ।
महातामस पापखाणी । सदा मनीं द्वेष वाढे ॥१५३॥
वेष्टिलें बहुत कामक्रोधें । नागविलें मत्सरदंभमदें ।
यालागीं तुझीं चरणारविंदें । भ्रमेंकरूनि नोळखों जी ॥१५४॥
अहा लागली प्रपंचाची गोडी । पायीं ठोकिली अज्ञानबेडी ।
फेरे फिरतां जाहलों वेडीं । न भजों आवडीं कदा तूतें ॥१५५॥
हरि म्हणे कालियाला । बहुत न बोलें वेळ जाहला ।
तूं परिवारेंसीं येचि वेळां । जाय सत्वर सागराप्रति ॥१५६॥
जरी उरगरिपुभेणें पाहीं । तूं लपलासी यमुनाडोहीं ।
तुज आतां तो न करी कांहीं । सुखी राहें येथूनियां ॥१५७॥
माझ्या पदमुद्रा तुझें शिरीं । यालागीं खगेंद्र तुज न मारी ।
मम वरें त्या सागरीं । सुखें राहें कालिया ॥१५८॥
तुज म्यां केलें शासन । ही लीला गाती जे अनुदिन ।
त्यांस तुम्हीं न डंखावें पूर्ण । पळावें उठोन देखतां ॥१५९॥
हे कालियामर्दनकथा सत्य । त्रिकाल जो पुढे पुण्यवंत ।
त्याचे दृष्टीनेंचि त्वरित । महाविष उतरेल ॥१६०॥
कालियामर्दनपुस्तक । जो गृहीं संग्रही भाविक ।
तें गृह सोडूनि तात्कालिक । सर्प जाती तेथोनियां ॥१६१॥
जेणें ऐकिलें कालियामर्दन । त्यास काळ करुं न शके बंधन ।
मग कैंचें सर्पदंशाचें विघ्न । त्यासी बाधक होईल ॥१६२॥
जो सर्प आज्ञा न मानी प्रमाण । त्याचें मस्तक होईल चूर्ण ।
असो कालिया आज्ञा वंदून । करी पूजन हरीचें ॥१६३॥
अर्पूनि षोडशोपचार पूजा । प्रदक्षिणा करी गरुडध्वजा ।
म्हणे लक्ष्मीविलासा महाराजा । कृपा बहुत असो दे ॥१६४॥
ऐसें बोलोनि सहपरिवारें । विखार सागरा गेला त्वरें ।
यमुना अमृतमय नीरें । वाहो लागली ते क्षणीं ॥१६५॥
जैसा परीस झगटतां पूर्ण । लोह होय तत्काळ सुवर्ण ।
कीं मित्रकुलभूषणपदरजेंकरून । विरिंचितनया उद्धरली ॥१६६॥
त्याचपरी हो श्रीदीननाथें । शुद्ध केलें यमुनार्‍हदातें ।
मुरली वाजविली स्वहस्तें । ऐलतीरा आला जगद्गुरु ॥१६७॥
म्हणती आला आला वनमाळी । पूर्ण ब्रह्मानंद जाहला ते वेळीं।
दुंदभी गर्जती निराळीं । सुमनें भूतळीं वर्षती ॥१६८॥
समीप देखोनि अनंता । सद्गदित जाहली माता ।
धांवोनि भेटली जगन्नाथा । दृष्टांत आतां काय देऊं ॥१६९॥
चतुर्दश वर्षें वनीं क्रमून । अयोध्येसी आला रघुनंदन ।
कौसल्या माता धांवोन । तैसाचि कृष्ण आलिंगिला ॥१७०॥
पाहोनियां कृष्णवदना । स्तनीं दर्दरोनि फुटला पान्हा ।
आडवे घेवोनि जगन्मोहना । प्रेमें माया न सोडी ॥१७१॥
नेत्रीं सुटल्या अश्रुधारा । तेणें अभिषेक जाहला श्यामसुंदरा ।
म्हणे माझिया सांवळ्या श्रीधरा । कैसा वांचोनि आलासी ॥१७२॥
जैसें कृपणाचें ठेवणें चुकलें । तें बहु श्रमतां सांपडलें ।
कीं जहाज बुडतां कडे लागलें । तैसें जाहलें मायेसी ॥१७३॥
कीं चोरीं मारितां अरण्यांत । एकाएकीं धांवणें धांवत ।
त्याच्या सुखासी नसे अंत । तैसें जाहलें मायेसी ॥१७४॥
कीं प्राण जातां एकाएकीं । सुधारस घातला मुखीं ।
तो प्राणी जैसा होय सुखी । तैसें मायेसी जाहलें ॥१७५॥
कीं वणव्यामाजी जळतां । घन वर्षे कां अवचिता ।
तैसें देखतां श्रीकृष्णनाथा । जाहलीं माता सुखी ते ॥१७६॥
मातेच्या चरणांवरी । नमन करी मधुकैटभारी ।
तों नंद येऊनि झडकरी । हृदयीं धरीं श्रीरंगा ॥१७७॥
नंद हृदयीं ऐसें भावित । कीं त्रिभुवनीं मीच भाग्यवंत ।
नंद आनंदें नाचत । सुख गगनांत न समाये ॥१७८॥
की शक्तीनें भेदिला सुमित्रासुत । औषधि घेऊनि आला हनुमंत ।
अनुज उठतां आनंदें रघुनाथ । नंद आनंदे त्यापरी ॥१७९॥
कीं साधूनि मंत्र संजीवनी । गुरुसुत आला परतोनी ।
जेवीं सहस्राक्ष भेटे धांवोनी । नंदाचें मनीं तेवीं वाटे ॥१८०॥
असो हरीनें नमिलें नंदातें । तों बळिराम धांवे भेटावयातें ।
हांसो आलें संकर्षणातें । हरिमुखातें पाहोनियां ॥१८१॥
तरी कां संकर्षण हांसिन्नला । काय तो अर्थ सुचविला ।
कीं म्यां शोक नाहीं केला । प्रताप अद्‌भुत जाणोनि ॥१८२॥
कृतांतासही शासनकर्ता । मग शोक कां करावा वृथा ।
आदि अंत मध्य पहातां । तुजपरता कोण असे ॥१८३॥
देखोनियां त्रिभुवनायका । प्रेमें सद्गदित झाल्या गोपिका ।
आंगीं तटतटिल्या कंचुका । हर्ष पोटीं न समाये ॥१८४॥
दंडकडीं रत्‍नजडित । मणगटापाशीं तीं दाटत ।
गोपी येऊनि चरणीं लागत । ब्रह्मानंदेंकरूनियां ॥१८५॥
सकळ गौळियां लहानथोरां । भेटला परात्परसोयरा ।
जो दुर्लभ सकळ सुरवरां । सुलभ झाला तो गोकुळीं ॥१८६॥
तंव अस्तमाना गेला गभस्ती । तेथेंचि लोकीं केली वस्ती ।
सकळ निद्रार्णवीं निमग्न होती । चिंता चित्तीं नसेचि पैं ॥१८७॥
अस्ताचळा जातां वासरमणी । द्विज बैसती स्थळीं येऊनी ।
मिलिंद वारिजकोशीं प्रवेशूनी । आमोदातें सेविती ॥१८८॥
तरुण जे जे विषयपर । त्यांचें हृदयीं चंचरे पंचशर ।
रात्र झाली दोन प्रहर । श्वापदें दुधर्र बाहती ॥१८९॥
परम दाटली घोर रजनी । द्विजांच्या उठती नाना ध्वनी ।
रिसें वाघुळा मिठी घालूनी । वृक्षडाहाळिये लोंबती ॥१९०॥
वनदेवता गंधर्व यक्षिणी । गोंधळ घालिती महावनीं ।
आसरा जाज्वल्यरूप दावूनी । तेचि क्षणीं गुप्त होती ॥१९१॥
नाना वल्लींचे भंबाळ । दिसतीं अवचितेंचि कल्लोळ ।।
प्रेतगण मिळाले सकळ ॥ भ्यासुर केवळ दिसतीं पैं ॥१९२॥
विकार करिती भूतें प्रेतें । छळिती अमंगळ अपवित्रातें ।
दिवाभीतांचे घुंघाट तेथें । पिंगळे थोर किलबिलती ॥१९३॥
भालुवा भुंकती क्षणक्षणीं । टिटवे शब्द करिती गगनीं ।
करुणास्वरेंकरूनी । चक्रवाकें बाहती ॥१९४॥
चंद्रकुमुदिनी विकासती । भ्रमर तेथें पाहों येती ।
उरग बाहेर निघती । सैर हिंडती चहूंकडे ॥१९५॥
निधानें चरावया निघती । क्षणक्षणां प्रभा दाविती ।
सभाग्यास बोलाविती । येऊं म्हणती गृहा तुझ्या ॥१९६॥
तंव तो वसंत ऋतु उष्णकाल । वनें वाळूनि गेलीं सकळ ।
पूर्वींच कालियाचा मुखानळ । जाळीत होता वनातें ॥१९७॥
तों अद्‌भुत वात सुटला । अग्नि गौळियांवरी परतला ।
सभोंवतीं वेढा पडिला । आंत झांकळिला पर्वत ॥१९८॥
आकाश कवळिलें ज्वाळें । तडतडां फुटती वेळूनळे ।
पाळती पक्षियांचे पाळे । आहाळोनि माजीं पडताती ॥१९९॥
एकाएकीं निदसुरे गौळी । आरडत उठती ते वेळीं ।
तों आकाश झांकिलें अग्निकल्लोळीं । ठाव नाहीं पळावया ॥२००॥
जाग्या झाल्या गौळिणी । हडबडोनि उठे नंदराणी ।
म्हणे कोठें लपवूं चक्रपाणी । देईं मेदिनी ठाव आतां ॥२०१॥
गौळी गौळिणी करिती चिंता । आमुचे प्राण जावोत आतां ।
परी कैसें करावें कृष्णनाथा । वांचेल कैसा नेणवे ॥२०२॥
गौळी करिती थोर धांवा । धांवें वैकुंठपते कमलाधवा ।
विश्वव्यापका केशवा । कृष्ण आमुचा वांचवीं ॥२०३॥
दीनवदनें हांक फोडिती । ज्वाळा आल्या आल्या म्हणती ।
एकावरी एक पडती । दुर्धर गति ही ओढवली ॥२०४॥
मायेनें हरि धरिला हृदयीं । म्हणे कृष्णा वांचवा रे या समयीं ।
पळावया ठाव नाहीं । धांव लवलाही भगवंता ॥२०५॥
देखोनि तयांची करुणा । कृपा उपजली कमलनयना ।
सांगे अवघ्या व्रजजनां । झांका नयनां समस्तही ॥२०६॥
हरिवदनीं विश्वास धरूनी । नेत्र झांकिले समस्त जनीं ।
ब्रह्मांडनायक त्याची करणी । शिव विरिंचींसी कळेना ॥२०७॥
असंभाव्य पसरिलें वदन । जो विराट्‌स्वरूपी भगवान ।
द्वादशगांवें महाअग्न । न लगतां क्षण गिळियेला ॥२०८॥
मागुती झाला सहा वर्षांचा । साही शास्त्रां न कळे अंत ज्याचा ।
हरि सकळांस वदे वाचा । नेत्र उघडा सर्वही ॥२०९॥
सकळीं उघडिले नयन । अणुमात्र कोठें न दिसे अग्न ।
गौळी भेटती हरीस येऊन । म्हणती महिमा न कळे तुझा ॥२१०॥
तों सवेंचि झाली प्रभात । जान्हवीवरून येत वात ।
दानवगुरु उदय पावत । अरुण प्रकाशे पाहीं पां ।२११॥
कीं पूर्वदिशेनें मुख धुतलें । आरक्त कुंकुम निढळीं रेखिलें ।
उडुगणतेज हरपलें । ज्ञानें निसरलें अज्ञान जेवीं ॥२१२॥
पक्षी उडोनि चालिले । भ्रमर कमळांतूनि मुक्त झाले ।
तस्कर ठायीं ठायीं लपाले । हिंडों लागले श्रेष्ठ पैं ॥२१३॥
निजगृहास येऊनि जार । मांडिला दांभिक आचार ।
जे स्मशानीं जप करणार । कुटिल नर पळतासी ॥२१४॥
कुक्कुट काग बाहती । चिमण्या ठायीं ठायीं गुजगुजती ।
अग्निहोत्री स्नान करिती । होम द्यावयाकारणें ॥२१५॥
कापडी तीर्थपंथें जाती । भक्तप्रातःस्मरणें गर्जती ।
वैष्णव विष्णूतें चिंतिती । शैव ध्याती शिवातें ॥२१६॥
हातीं घेऊनि अर्घ्यजल । सौर पाहती सूर्यमंडल ।
गाणपत्य परम सुशील । गणपतीतें चिंतिती ॥२१७॥
शाक्त चिंतिती शक्तीतें । गुरुभक्त आठविती गुरुचरणांतें ।
विद्यार्थी नानापरींचे एकचित्तें । विद्याभ्यास करिताती ॥२१८॥
गृहींगृहींच्या ललना उठती । अंग प्रक्षालूनि कुंकुमें रेखिती ।
सडासंमार्जनें करूनि निश्चितीं । घालिती रंगमाळा ॥२१९॥
करूनियां गोदोहन । वेगीं आरंभिती घुसळण ।
असो उदय पावला सहस्रकिरण । गौळी तेथूनि निघाले ॥२२०॥
घेऊनियां तमालनीळा । समस्त चालिले मग गोकुळा ।
वाद्यांचा गजर ते वेळां । अति जाहला सधन पैं ॥२२१॥
मोहरी पांवे मृदंग । डफडीं सनया उपांग ।
मिरवत जातसे श्रीरंग । नंदयशोदेस हित पैं ॥२२२॥
कृष्णावरी पालव छत्रें । गौळी धरिती अत्यादरें ।
चंद्रप्रभेऐसीं चामरें । एक वरि धरिताती ॥२२३॥
सहा वर्षांची मूर्ती । केली अद्‌भुत त्रिभुवनीं कीर्ती ।
कर्णीं कुंडलें ढाळ देती । नयन विकासती आकर्ण ॥२२४॥
कपाळीं त्रिपुंड्र रेखिला । सर्वांगीं चंदन चर्चिला ।
चिमणीच मुरली सांवळा । चिमण्या स्वरें वाजवीत ॥२२५॥
पुढें चिमणे गोप मिळोनी । हुंबरी घालिती छंदेंकरूनी ।
एक सामोर्‍या येती गौळणी । आरत्या घेऊनी हरीतें ॥२२६॥
यशोदा करी निंबलोण । हरी घेतला कडे उचलोन ।
गृहीं प्रवेशले शेषनारायण । धन्य भाग्य नंदाचें ॥२२७॥
हरीचे अवतार सर्व उत्तम । परी ये अवतारींचें जें कर्म ।
अत्यद्‌भुत लीला परम । जे न वर्णवे शेषातें ॥२२८॥
दिवसदिवसाप्रती । अद्‌भुत लीला अद्‌भुत कीर्ती ।
शिणल्या व्यासादिकांच्या मती । तेथें मी पामर काय वर्णूं ॥२२९॥
ऐसा थोर पवाडा दाविला । केवळ काळ कालिया मर्दिला ।
द्वादश गांवें अग्नि गिळिला । वांचवूनियां सकळांसी ॥२३०॥
कलियुगीं भवनदीपूर । अत्यंत दाटला दुर्धर ।
हरिविजयग्रंथ थोर । नौका तेथें तरावया ॥२३१॥
भाविक हो धांवा लवकरी । सत्वर बैसा या नौकेवरी ।
प्रेमाचा ध्वज निर्धारीं । अति सतेज फडकत ॥२३२॥
ही नाव परतीरा न्यावया त्वरित । नावडी येथें सद्‌गुरुनाथ ।
तो ब्रह्मानंद स्वामी समर्थ । भीमातीरविहारी जो ॥२३३॥
ब्रह्मानंदस्वामीचे चरण । हेंचि कमळ सुवासिक पूर्ण ।
तेथें श्रीधर भ्रमर रिघोन । मकरंद पूर्ण सेवीत ॥२३४॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
प्रेमळ परिसोत पंडित । एकादशोऽध्याय गोड हा ॥२३५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥



[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]


श्रीगणेशाय नमः । गोकुळातून कृष्ण रोज वृंदावनात गाई चारायला घेऊन जात असे. आणि गोप बालकांबरोबर अनेक खेळ खेळत असे. एकदा काय झाले, उन्हाळ्याच्या दिवसात गुरांना व मुलांना तहान लागली. तेधून जवळच यमुनेचा एक डोह होता. मुले गुरांना घेऊन पाणी पिण्यास तेथे गेली. पण तेथे एक नाग रहात असे. त्याचे नाव कालिया असे होते. त्याच्या विषाने गुरे आणि वासरे तसेच गोपाळ गतप्राण झाले. बिचारे अज्ञानामुळे प्राणास मुकले हे पाहून कृष्णाला त्यांची दया आली. त्याने आपल्या प्रेममय दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा मुले डोळे चोळीत उठली. जणू काही झोपेतून जागी झाली होती ! गुरेही उडून उड्या मारू लागली. मग सारी कृष्णाभोवती जमली. त्यांनी ओळखले, पाणी पिताच आपण मेलो होतो. आणि कृष्णाने आपल्याला पुन्हा जिवंत केले.

कालियाचे विष फार भयंकर होते. त्याच्या फूत्कारानेच झाडाची पाने काळी पडत. डोहावरून उडणारे पक्षीही मरून पडत. गरूड व साप यांचे वैर असते. गरूड नेहमी पूर्वी सापांना खात असे. पण ऋषीपंचमीच्या दिवशी सापांनी गरूडासाठी एक रथ भरून अन्न ठेवावे, एक साप ठेवावा आणि पूजा द्रव्य ठेवावे अशी गरूडाने सापांना अट घातली. त्या अटीवर त्याने सापांना मारण्याचे बंद केले होते. पण कालियाने तसे केले नाही. तो यमुनेच्या या डोहात लपून बसला. सौभरी नावाच्या ऋषींना जलचर व मासे शरण गेले, गरुडापासून आपले रक्षण करावे अशी त्यांनी विनंती केली. तेव्हा त्यांनी हा समेट घडवून आणला होता. "त्या डोहाकडे तू फिरकशील तर मरशील" असा ऋषींनी गरुडाला शाप दिला होता. त्या डोहात कालिया आपल्या परिवारासह राहात होता. त्या डोहा शेजारी एक कदंब वृक्ष होता. तो मात्र कोळपून गेला नव्हता. कारण गरुड अमृत हरण करताना त्या वृक्षावर काही वेळ बसला होता.

कृष्णाने आपल्या सवंगड्यांना व गुरांना होणारा कालियाचा त्रास दूर करावा असे ठरविले. त्यासाठी त्याने डोहात शिरण्याचा बेत केला. तो चेंडूने खेळू लागला. त्याने चेंडू त्या डोहात उडवला. आणि "चेंडू पडला तो काढतो" असे म्हणून कदंबाच्या झाडावर तो चढला. तेथून त्याने डोहात उडी झोकून दिली. ते पाहून गोप बालक ओरडू लागले. कृष्ण डोहात बुडाला असे पाहून ते धावत गोकुळात गेले आणि यशोदेला रडत रडत सांगू लागले. "माई, माई धावा ! कान्हा कालियाच्या डोहात बुडाला !" यशोदा घाबरली. जिकडे तिकडे आरडा-ओरडा झाला. सारे गोकुळ यमुनेच्या तीरावर धावले. कृष्ण कोठेच दिसत नव्हता. यशोदा तर वाळूवर लोळण घेऊन रडू लागली. गोप-गोपी आक्रोश करू लागल्या. तेवढ्यात डोहातून कृष्ण वर आला व पुन्हा खाली गेला.

यशोदा आपण कृष्णाला किती वेळा रागावलो त्याच्या आठवणी काढून स्वतःला दोष देऊ लागली. कृष्णाला अनेक नावांनी ती हाका मारू लागली. "मी आता तुला उखळीशी बांधणार नाही, दहीदूध खाल्लेस तरी रागावणार नाही" असे काकुळतीने म्हणू लागली. बेफाम होऊन जीव देण्यासाठी डोहाकडे धावू लागली. गोपीही धावू लागल्या. पण बलरामाने मोठ्या प्रयासाने त्याना अडविले. तो म्हणाला "थांबा ! अधीर होऊ नका. ज्याने पूतनेचे विष नाहीसे केले त्याच्यावर कालियाच्या विषाचा काही परिणाम होणार नाही. कृष्ण तर जगाचा शास्ता आहे. कालियाला मारूनच तो बाहेर येईल पहा !"

इकडे डोहात कालियाने कृष्णाला विळखा घालून पक्के आवळून टाकले होते. पण कृष्ण वेगाने त्याला घेऊनच पृष्टभागावर आला. कृष्णाने एकदम आपले अंग फुगविले. कालियाला तो ताण सहन झाला नाही. त्याने कृष्णाला सोडले, पण संतापाने त्याला चावण्याचा प्रयत्‍न केला. कृष्णाने त्याचा दंश चुकविला. त्याला पकडले आणि पाण्याच्या पृष्टभागावर त्याला आपटून त्याचीं दमछाट केली. त्याचे शेपूट पकडून कृष्ण त्याच्या फण्यावर चढला. आपल्या शरीराचा भार खूप वाढवून त्याने कालियाच्या फण्यांवर थयथय नाचण्यास सुरूवात केली. कालियाला अत्यंत वेदना झाल्या. त्याचा दर्प नष्ट झाला. फणे ठेचले जाऊन तोडातून रक्त येऊ लागले. त्याच्या स्त्रिया व मुले कृष्णासमोर येऊन त्याची प्रार्थना करु लागली. कृष्णाला कालियाची दया आली. त्याने त्याला ठार न मारता जीवदान दिले. कालिया शुद्धीवर आला. कृष्ण हाच विष्णु आहे हे त्याला कळून आले. सर्पयोनीतून आपला उद्धार करावा अशी प्रार्थना करीत तो कृष्णाच्या पाया पडला. गरुडाच्या भीतीने मला हा डोह सोडून बाहेर जाता येत नाही. सर्प योनीत तर क्रोध व मत्सर हे विकार फार असतात. "प्रभो, माझा उद्धार करा, उद्धार कर !" असे तो विनवू लागला.

तेव्हा कृष्ण त्याला म्हणाला, "आता तुला गरुडाची भीती नाही. कारण माझ्या पावलांच्या खुणा तुझ्या फण्यावर आहेत. त्या पाहून तो तुला मारणार नाही. तू आता तुझ्या परिवारासह सागरात रहायला जा !" त्याची आज्ञा मानून कालिया निघून गेला. कृष्णाने डोहातील सर्व विष योगमायेने नष्ट केले. तो तीरावर येऊन धावत धावत यशोदेकडे गेला तो काय ! सारे गोप त्याचा जयजयकार करू लागले. कृष्ण मुरली वाजवू लागला. आनंदाश्रूंचा वर्षाव होत होता. नंदाला तर अपरिमित आनंद झाला. तो काय वर्णावा !

सारे दमले होते. भीती, शोक आणि कृष्ण परत आल्यावरचा आनंद यांनी आणि ग्रीष्मातील उन्हाळ्यामुळे गोकुळात परत जाण्याऐवजी यमुनातीरावरील रानातच निजावे असे सर्वांनी ठरविले. सारे झोपले होते तेव्हा अचानक रानात वादळ झाले. रात्री काही दिसत नव्हते. काही गोप खडबडून जागे झाले. तो त्यांना आपल्याभोवती वणवा पेटला आहे असे दिसले. केव्हांतरी लाकडावर लाकडे घासून ठिणगी पेटली होती. आरडा ओरडा करून गोपांनी सर्वांना उठविले. आग भराभर पसरत होती. त्यात झाडे आणि वेली पेटून पशुपक्षी निराधार होऊन जागा सोडून पळू लागले व उडू लागले. एकच कोलाहल माजला. कित्येक पशूपक्षी जळून मेले. धुराने काही दिसेनासे झाले. गोपगोपी किंचाळू लागल्या. नंदा-यशोदा, कृष्ण आणि बलराम एक ठिकाणी उभे होते. त्यांच्याभोवती सारे जमले. आणि "वाचवा-वाचवा" म्हणू लागले. आपले काय होणार आणि गोकुळात राहणार्‍या गाईगुरांचे काय होणार या चिंतेत लोक पडले. कृष्णाने सर्वांना धीर दिला आणि म्हटले, "घाबरू नका. तुम्ही जर सर्वांनी डोळे मिटलेत तर मी तुम्हाला वाचवीन. माझ्यावर विश्वास ठेवा." आता कृष्णावर सर्वांचा पूर्ण भरवसा होता. सर्वांनी आपले डोळे मिटून घेतले. एकीकडे आगीत झाडे, पालापाचोळा जळून जात होता, कडकड आवाज होत होता. वणव्याची धग लागत होती. त्यावेळी कृष्णाने विराटरूप धारण करून सारा वणवा पिऊन टाकला आणि मग सर्वांना डोळे उघडायला सांगितले. सर्वांनी डोळे उघडून पाहिले तो अग्नी पूर्णपणे शमला होता. वणव्यातून कृष्णाने आपल्याला कसे सोडविले हे कुणालाही कळले नाही. सारेजण कृष्णाभोवती जागत बसले. कारण तोपर्यंत पहाट झालीच होती.

सकाळ झाली. गोपाळ, नंद, यशोदा, बलराम, कृष्ण लवकर लवकर गोकुळात परत आले. गाईगुरे हंबरू लागली. काही वासरांनी दावी तोडून पान्हा पिऊन इकडे तिकडे हुंदडण्यास सुरुवात केली होती. सारे आपापल्या घरी जाऊन घरातली व गोठ्यातली कामे करू लागले. त्या वणव्याची आणि कालियाची आठवण काढीत गोपांनी तो दिवस घालविला. रोजच्या प्रमाणे गाईंना चारायला सवंगड्यांसह कृष्ण, बलराम गेले. वणव्याने भस्मसात झालेल्या जागा त्यांनी एकमेकांना दाखविल्या, व वारंवार नवल केले.

श्रोतेजनहो, क्रोध मत्सर हाच कालिया हृदयरूपी यमुनेच्या डोहात येऊन बसतो. त्यावर श्रीहरि म्हणजे सन्मतीचा प्रभाव पडला पाहिजे. म्हणजे कालिया निघून जाईल. हा संसाररूपी वणवा लागला आहे. तुम्ही झोपून राहू नका. श्रीकृष्णाला शरण जा म्हणजे तो तुम्हाला वाचवील.
अध्याय ११ समाप्त
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP