श्रीसमर्थ रामदास स्वामीकृत
॥ आत्माराम ॥
समास पहिला : त्याग निरूपण
॥ श्रीराम समर्थ ॥
Download mp3
जयास लटिका आळ आला । जो माया गौरीपासूनि जाला ।
जालाचि नाही तया अरूपाला । रूप कैंचें ? ॥ १ ॥
तेथें स्तवनाचा विचार । न घडे निर्विकारी विकार ।
परी तयास नमस्कार । भावबळें माझा ॥ २ ॥
जयाचेनि वेद शास्त्रें पुराणें । जयाचेनि नाना निरूपणें ।
जयाचेनि स्वसुखा लाधणें । शब्दी निःशब्द ॥ ३ ॥
जेंशब्दांस आकळेना । जें शब्दविण सहसा कळेना ।
कळेना ऐसेंहि घडेना । जये स्वरूपी ॥ ४ ॥
ऐसें सर्वत्र संचलें । तर्का न जाय अनुमानलें ।
तें जयेचेनि प्राप्त जालें । आत्मरूप ॥ ५ ॥
नमन तियेचे निजपदा । माया वाग्देवी शारदा ।
जिचेनि प्रवर्तती संवादा । संत महानुभाव ॥ ६ ॥
वंदीन सद्गुरुस्वामी । जेथें राहिलें मी तो तो मी ।
निवारिलीं निजधामीं । पांचही जणें ॥ ७ ॥
तया निजपदापैलीकडे । आनंदें वृत्ती वावडे ।
पद लाधलिया जोडे । तद्रूप होवोनी ॥ ८ ॥
स्वामीकृपेचा लोट आला । मानससरोवरीं सामावला ।
पूर्ण होतां उचंबळला । आनंदउद्गार माझा ॥ ९ ॥
सद्गुरुकृपेचें बळ । माझें ठायीं जालें तुंबळ ।
तेणें गुणें स्वानंदजळ । हेलाऊं लागे ॥ १० ॥
आतां नमस्कारीन राम । जो योग्याचें निजधाम ।
विश्रांतीचा निजविश्राम । जयें ठायीं ॥ ११ ॥
जो नांवरूपावेगळा । जो मायेहूनि निराळा ।
जेथें जाणिवेची कळा । सर्वथा न चले ॥ १२ ॥
जेथें भांबावला तर्क । जेथे पांगुळला विवेक ।
तेथें शब्दाचें कौतुक । केवीं घडे ॥ १३ ॥
जयाकारणें योगी उदास । वनवासी फिरती तापस ।
नाना साधनें सायास । ज्या कारणें करिती ॥ १४ ॥
ऐसा सर्वात्मा श्रीराम । सगुण निर्गुण पूर्णकाम ।
उपमाचि नाहीं निरुपम । रूप जयाचें ॥ १५ ॥
आता वंदीन सज्जन श्रोते । जे कृपाळू भावाचे भोक्ते ।
माझीं वचनें प्राकृतें सांगेन तयांसीं ॥ १६ ॥
तयांचें वर्णावें स्वरूप । तरी ते स्वरूपाचे बाप ।
जें वेदास सांगवेना रूप । तें जयांपासोनि प्रगटे ॥ १७ ॥
आतां शिष्या सावधान । ऐक सांगतों गुह्य ज्ञान ।
तेणें तुझें समाधान । अधिक होय ॥ १८ ॥
तूं आशंका नाहीं घेतली । परी चिंता मज लागली ।
जे तुझी भ्रांती फिटली । नाहीं अद्यापि ॥ १९ ॥
दासबोधींचे समासीं । निर्मूळ केलें मीपणासी ।
त्या निरूपणीं वृत्तीसी । पालट दिसेना ॥ २० ॥
म्हणोनी न पुसतां सांगणें । घडलें शिष्या तुजकारणें ।
आतां तरी सोय धरणें । श्रवणमननीं ॥ २१ ॥
चातकपक्षी वरचेवरी । चंचू पसरोनि थेंब धरी ।
जीवन सर्वही अव्हेरी । भूमंडळीचें ॥ २२ ॥
तैसा शब्दवर्षाव होतां । असों न द्यावी व्यग्रता ।
श्रवणपुटीं सामावितां । मनन करावें ॥ २३ ॥
लाग जाणोनि शब्दाचा । आवांका धरावा मनाचा ।
शब्दातीत गर्भाचा । सांठा धरावा ॥ २४ ॥
अरे तूं कोण कोणाचा । कोठून आलासि कैंचा ।
ऐसा विचार पूर्वींचा । घेईं बापा ॥ २५ ॥
अरे तुवां जन्मांतर घेतलें । काय मानितोसि
आपुलें । ऐसें तुवां विचारिलें । पाहिजे आतां ॥ २६ ॥
येथें तुझें कोणी नाहीं । भुलला आहेस काई ।
चुकोनि आलासी जाईं । जेथील तेथें ॥ २७ ॥
तूं समर्थाचें लेंकरूं । अभिमानें घेतला संसारूं ।
तो टाकितां पैलपारू । पावसी बापा ॥ २८ ॥
ईश्वरापासोनि जालासी । परंतु त्यास चुकलासी ।
म्हणोनि हें दुःख भोगिसी । वेगळेपणें ॥ २९ ॥
आणि विश्वाससी या बोला । तरी मी घालीन रे तुजला ।
लाधसी सकळ वैभवाला । जेथिंचा तेथें ॥ ३० ॥
तुझें अढळपद गेलें । तुज मायेनें वेड लाविलें ।
तें जरी तुझें तुज दिधलें । मज काय देशी ॥ ३१ ॥
जितुकें कांहीं नासोन जाईल । जे अशाश्वत असेल ।
तुजसमागमें न येईल । तितुकें देईं ॥ ३२ ॥
मजही तें कासया व्हावें । तुजपासूनि टाकावें ।
तुवां टाकिलें तरी न्यावें । तुज समागमें ॥ ३३ ॥
भूषण भिक्षेचें टाकिलें । अमरपद प्राप्त जालें ।
तरी तुझें काय गेलें । सांग बापा ॥ ३४ ॥
नाशिवंत तितुकें देशी । तरी पद प्राप्त निश्चयेंसी ।
यामध्यें लालुच [=लोभ] करिसी । स्वहित न घडे ॥ ३५ ॥
तंव शिष्य म्हणे जी दिधलें । स्वामी म्हणती पद लाधलें ।
आतां तूं आपुलें । मानूंचि नको ॥ ३६ ॥
इतुके स्वामी बोलले । अज्ञान घेऊन निघाले ।
तंव शिष्यें आक्षेपिलें । विनीत होवोनी ॥ ३७ ॥
आतां पुढिलिये समासीं । संवाद होईल उभयांसी ।
तेणें स्वानंदसिंधूसी । भरितें दाटे ॥ ३८ ॥
इति श्रीआत्माराम । रामदासीं पूर्णकाम ।
ऐका सावध वर्म । सांगिजेल ॥ ३९ ॥
समास दुसरा : माया निरूपण
॥ श्रीराम समर्थ ॥
Download mp3
जय जय जी सच्चिदानंदा । जयजयाजी निजबोधा ।
जयजयाजी आनंदकंदा । परमपुरुषा ॥ १ ॥
अनंत ब्रह्मांडें ढिसाळें । मायेने रचिली विशाळें ।
तुमचे कृपेचेनि बळें । विरतीं स्वानंदडोहीं ॥ २ ॥
आतां स्वामीनें जें इच्छिलें । तें पाहिजे अंगिकारलें ।
शरणागत आपुलें । समर्थें उपेक्षूं नये ॥ ३ ॥
नाशिवंत काय टाकावें । तें मज स्वामींनीं सांगावें ।
मज दातारें करावें । आपणाऐसें ॥ ४ ॥
ऐकोन शिष्याचें बोलणें । स्वामी म्हणती सावध होणें ।
अवधान देऊनी घेणें । आनंदपद ॥५ ॥
शिष्या बहुत मन घालीं । आतां बाष्कळता राहिली ।
येथें वृत्ती चंचळ केली । तरी बुडसी ॥ ६ ॥
अग्निसंगें लोह पिटे । पिटतां तयाचा मळ तुटे ।
परिसासि झगडतां पालटे । लोहपण तयाचें ॥ ७ ॥
जयाचा मळ जळेना । अभ्यंतरही वळेना ।
तरी ते सहसा पालटेना । मृत्तिकारूपें ॥ ८ ॥
नाशिवंत तितका मळ । तुवां त्यजावा अमंगळ ।
तो गेलीया तूंचि सकळ । आहेसि बापा ॥ ९ ॥
नासिवंत तूं जाण माया । मायीक जाईल विलया ।
ते मायाचि प्राणसखया । ऐक सांगतो ॥१० ॥
अहं ऐसें जें स्फुरण । तेंचि मायेचें लक्षण ।
मायेपासून त्रिगुण । गुणांपासोनि भूतें ॥ ११ ॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश । सृष्टी रचिली सावकाश ।
एवं दृश्य आणि अदृश्य । सकळ माया ॥ १२ ॥
येक माया दों ठाईं वांटिली । प्रकृति आणि पुरुष झाली ।
जैसी दोदिवसांची बोली । येकचि परवां ॥ १३ ॥
माया ज्ञाताज्ञेयज्ञान । माया ध्याता ध्येयध्यान ।
माया हेंचि समाधान । योगियांचें ॥ १४ ॥
ऐशी माया सच्चिदानंद । माया आनंदाचा कंद ।
माया हेचि निजबोध । शब्दरूपें ॥ १५ ॥
आत्मा ब्रह्मस्वरूप । हें मायेचें निजरूप ।
रूप आणि अरूप । सकळ माया ॥ १६ ॥
जीव शिव आणि ईश्वर । हाही मायेचा विस्तार ।
शिवरूप विश्वंभर । अवघी माया ॥ १७ ॥
माया मानसीं चाळक । माया बुद्धीस व्यापक ।
माया अनेकीं येक । ऐसें बोलणें ॥ १८ ॥
माया देहास चालवी । माया शब्दास बोलवी ।
माया द्रष्ट्यास दाखवी । नेत्रीं रिघोनियां ॥ १९ ॥
मायेनें माया चाले । मायेनें माया बोले ।
मायेनें माया हाले । वायुरूपें ॥ २० ॥
तंव शिष्य म्हणे जी ताता । ’माया चाले स्वरूपसत्ता’ ।
’अरे सत्ता ती तत्त्वता । माया जाण’ ॥२१ ॥
तरी मायेनें स्वइच्छा असावें । स्वरूपसत्तेनें नसावें ।
मनास आलें तैसें करावें । हें केविं घडे ? ॥ २२ ॥
लटिक्यावरी खरें चाललें । लटिकें मर्यादेनें राहिलें ।
तें गर्भांधें देखिलें । हे अघटित वार्ता ॥ २३ ॥
तैसी माया ही मानिली । स्वरूपसत्तेनें चालली ।
तुवां गर्भांधें देखिली । हे वार्ता सांगसी ॥ २४ ॥
जें जालेंचि नाहीं सर्वथा । तयावरी निर्गुणाची सत्ता ।
ऐसें हें ज्ञातेपणें बोलतां । तुज लाज नाहीं ॥ २५ ॥
सकळ माया म्हणतां । आणि जालीच नाहींही सांगतां ।
तरी म्यां काय करावें आतां । सांगा स्वामी ॥२६ ॥
अरे जें जें मनास अनुभवलें । तें तें माईक नाथिलें ।
तितुकें तुवां टाकिलें । पाहिजे स्वानुभवें ॥ २७ ॥
सकळही माया नाथिली । स्वरूपीं नाहीं राहिली ।
एवं नाहीं हे बोली । माया जाणावी ॥ २८ ॥
एवं सांगतों तें ऐकावें । मायिक मायेतें जाणावें ।
आतां मनन करावें । सावध होवोनी ॥ २९ ॥
मायेकरितां माया दिसे । मायेकरितां माय भासे ।
मायेकरितां लाभ नसे । परमार्थाचा ॥ ३० ॥
माया भवसिंधूचें तारूं । माया पाववी पैलपारू ।
मायेवीण उद्धारू । प्राणियासि नाहीं ॥ ३१ ॥
मायेकरितां देव भक्त । मायेकरितां ज्ञाते विरक्त ।
मायेकरितां जीवन्मुक्त । होती स्वानुभवें ॥ ३२ ॥
मायेकरितां वेदश्रुती । मायेकरितां व्युत्पत्ती ।
मायेकरितां होती । मूढ ते विवेकी ॥ ३३ ॥
माया परमार्थाचें अंजन । मायेकरितां जोडे निधान ।
मायेकरितां सावधान । साधक स्वरूपीं ॥ ३४ ॥
मायेकरितां स्वहित घडे । मायेकरितां भ्रांती उडे ।
मायेकरितां विघडे । प्रपंचभान ॥ ३५ ॥
मायेवीण ज्ञान कैंचें । माया जीवन सकळांचें ।
मायेवीण साधकांचें । कार्य न चले ॥ ३६ ॥
मायेवीण परमार्थ जोडे । ऐसें हें कधींच न घडें ।
मायेवीण सहसा नातुडे । गुज योगियांचें ॥ ३७ ॥
माया योग्याची माउली । जेथील तेथें नेऊन घाली ।
कृपाळूपणें नाथिली । आपण होय ॥ ३८ ॥
सकळ मायेचें रूप जालें ।त्यात तुझेंही रूप आलें ।
हें इतुकेंही आपुलें । मानूंचि नको ॥ ३९ ॥
आतां सांगतों तुज खूण । त्वां नाशिवंत केलें मदर्पण ।
आतां करिशी हलकेंपण । तरी मज शब्द नाही ॥ ४० ॥
संग तितुका नाशिवंत । निःसंग शब्द अशाश्वत ।
म्हणोनि संगनिःसंगातीत । होवोनि राहें ॥ ४१ ॥
पुढीले समासी निरूपण । आदरें करावें श्रवण ।
संगातीत होइजे ते खूण । सांगिजेल पुढें ॥ ४२ ॥
इति श्रीआत्माराम । रामदासीं पूर्णकाम ।
योगी पावती विश्राम । जये ठायीं ॥ ४३ ॥
समास तिसरा : ब्रह्म निरूपण
॥ श्रीराम समर्थ ॥
Download mp3
संग तितुका नाशिवंत । सोडून राहावें निवांत ।
येकपणाचा अंत । जालिया समाधान ॥ १ ॥
येकपणाचा उमस । काढितां त्रिपुटी सावकाश ।
होत आहे म्हणोनि ध्यास । येकपणाचा नसे ॥ २ ॥
तो मी आत्मा ऐसा हेतु । हें नाशिवंत टाकी तूं ।
उन्मनी अवस्थेचा प्रांतू । तें स्वरूप तुझें ॥ ३ ॥
ऐसा जो अनुभव जाला । तोही नाशिवंतामध्यें आला ।
अनुभवावेगळा राहिला । तो तूं आत्मा ॥ ४ ॥
हेंही न घडे बोलणें । आता पाल्हेरा किती देणें ।
वेदशास्त्रें पुराणें । नासोनि जाती ॥ ५ ॥
ग्रंथमात्र जितुका बोलिला । आत्मा त्यावेगळा राहिला ।
हे मायेचा स्पर्श जाला । नाहींच तयासी ॥ ६ ॥
स्वरूप निर्मळ निघोट । स्वरूप शेवटा शेवट ।
जिकडे तिकडे नीट । सन्मुख आहे ॥ ७ ॥
जें बहू दुरीच्या दुरी । निकट जवळीं अंतरीं ।
दुरी आणि अभ्यंतरीं । घटणी नाहीं ॥ ८ ॥
जें सकळांपरीस मोठें । जेथें हें सकळ आटे ।
अकस्मात येकसरां तुटे । मूळ मायेचें ॥ ९ ॥
जें सकळांहून मृदु कोवळें । सकळांहून अत्यंत जवळें ।
जें सकळामध्यें परि निराळें । अलिप्तपणें ॥ १० ॥
जें हाले ना चाले । जें बोले ना डोलें ।
आवघें आपण संचलें । येकटेंचि तें ॥ ११ ॥
आकाश बाहेर भरलें । आकाश जेथें मुरालें ।
आकाश मुरूनि उरलें । येकजिनसी ॥ १२ ॥
जें चळे ना ढळे । अग्नीमध्यें न जळे ।
जें जळीं परि निराळें । उदकीं बुडेना ॥ १३ ॥
ज्यास कोणी नेईना । चोरूं जातां चोरवेना ।
कल्पांतींही वेंचेना । अणुमात्र जें ॥ १४ ॥
चक्षूनें लक्षिलें नवजाय । जेथें आकारु भस्मोनि जाय ।
सांगितलें तें साकार होये । सांगणें न घडे ॥ १५ ॥
ऐसें जरी न बोलावें । तरीं म्यां काय करावें ।
न बोलतां कळावें । तुज कैसें ? ॥ १६ ॥
बोलणें तितुकें व्यर्थ जातें । बोलतां अनुभवा येतें ।
अनुभव सांडितां तें । आपण होईजे ॥ १७ ॥
मायारूप मूळ तयाचें । शोधूं जातां समाधान कैंचें ।
मग लाभ जालिया दुःखाचें । मूळ तुटे ॥ १८ ॥
’अहं ब्रह्मास्मि’ ही गाथा । आली देहबुद्धीच्या माथां ।
देहबुद्धीनें परमार्था । कानकोंडें होइजे ॥ १९ ॥
देहबुद्धी हे टाकावी । हेही मायेची उठाठेवी ।
म्हणोनी काय अंगीकारावी । अंगिकारू न घडे ॥ २० ॥
मायेचे बळें ब्रह्मज्ञान । मायेकरितां ब्रह्मज्ञान ।
मायाचि गोंवी बंधन । तोडी तेही माया ॥ २१ ॥
माया आपणासी गोवी । आपआपणा वेड लावी ।
प्राणी दुःखी होत जीवीं । अभिमानें करुनी ॥ २२ ॥
जैसा सारीपाट खेळती । सारी येकाच्या मागोन आणिती ।
खेळों बैसतां वांटोन घेती । आपुलाल्या ॥ २३ ॥
नस्ता अभिमान माथां ।सारी मरतां परम व्यथा ।
डाव येतां सुखस्वार्था । दोघेही पडिले ॥ २४ ॥
फांशासी दे दे म्हणती । येक ते रडी खाती ।
क्रोधें पेटल्या घेती । जीव येकमेकांचे ॥ २५ ॥
तैशा कन्या पुत्र आणि नारी । वांटून घेतल्या सारी ।
अभिमान वाहती शिरीं । पांग प्रपंचाचा ॥ २६ ॥
इतुकीं वेडें लाविलीं । ते माथा खेळे खेळ येकली ।
ते मायेनेंच विराली । पाहिजे माया ॥ २७ ॥
माया मोडितां अधिक जडे ।म्हणोनि धरिती ते वेडे ।
धरितां सोडितां नातुडे । वर्म कळल्यावांचूनी ॥ २८ ॥
जैसें चक्रव्यूहाचें उगवणें । बाहेर येऊन आंत जाणें ।
कां अंतरीं जाऊन येणें । अकस्मात बाहेरी ॥ २९ ॥
त्या कवाडीच्या कड्या । गुंतगुंतों उगवाव्या ।
तैसी जाण ही माया । गुंतोनि उगवावी ॥ ३० ॥
माया कैशी झाडावी । झाडावी तोडौनि कैशी टाकावी ।
येथें विचारें पहावी । नाथिलीच हे ॥ ३१ ॥
बहूनाटक हे माया । मीपणें न जाय विलया ।
विचार पाहतां इया । ठावचि नाहीं ॥ ३२ ॥
वर्म हेंचि माया मायिक । इचा करावा विवेक ।
विवेक केलीया अनेक । येकीं मुरे ॥ ३३ ॥
येकीं अनेक मुरालें । येकपण अनेकांस वेगळें ।
उपरी जें निःसंग उरलें । तें स्वरूप तुझें ॥ ३४ ॥
तुझें स्वरूप नाकळे । तें जया साधनें आकळे ।
तें साधन ऐक सोहळे । भोगिसी स्वानंदें ॥ ३५ ॥
इति श्रीआत्माराम । सांगिजेल पुढे साधनवर्म ।
जेणें भिन्नत्त्वाचा भ्रम । तुटोनि जाये ॥ ३६ ॥
समास चवथा : साधन निरूपण
॥ श्रीराम समर्थ ॥
Download mp3
जें सकळ साधनांचें सार । जेणें पाविजे पैलपार ।
जेणें साधनें अपार । साधक सिद्ध जाले ॥ १ ॥
ते हें जाण रे श्रवण । करावें अध्यात्मनिरूपण ।
मनन करितां समाधान । निजध्यासें पावती ॥ २ ॥
संत सज्जन महानुभावी । परमार्थचर्चा करीत जावी ।
हयगय न करावी । ज्ञातेपणें करोनी ॥ ३ ॥
परमार्थ उठाठेवी करितां । लाभचि होय तत्त्वतां ।
दिवसेंदिवस जाणतां । पालट होय ॥ ४ ॥
नित्यनेम श्रवणमनन । त्या ऐसें नाहीं साधन ।
म्हणोनि हें नित्यनूतन । केलें पाहिजे ॥ ५ ॥
जैसें ग्रंथीं बोलिलें । तैसें पाहिजे केलें ।
क्रियेच्या माथा आलें । निश्चितार्थ ॥ ६ ॥
जे ग्रंथीं जो विचार । वृत्ती होय तदाकार ।
म्हणोनि निरूपण सार । भक्तिज्ञानवैराग्य ॥ ७ ॥
शिष्य म्हणे जी सर्वज्ञा । सत्य करावी प्रतिज्ञा ।
नाशिवंत घेत साधना । वरपडें न करावें ॥ ८ ॥
अरे शिष्या मन घालावें । नाशिवंत तूं ओळखावें ।
साधन लागे करावे । प्रतिज्ञाच आहे ॥ ९ ॥
प्रतिज्ञा करावी प्रमाण । ऐसें बोलतो हा कोण ।
नाशिवंत केले मदर्पण । यामध्यें तो आला ॥ १० ॥
तूं म्हणसी जें दिलें । घ्यावया कोण उरलें ।
अरे उरलें तें झुरलें । माझेकडे ॥ ११ ॥
तूं नाशिवंतामध्यें आलासी । आपणास कां रे चोरितोसी ।
नाशिवंत देतां कचकतोसी । फट् रे पढतमूर्खा ॥ १२ ॥
शिष्य विचारून बोले । स्वामी कांहीं नाहीं उरलें ।
अरे ’नाही’ बोलणें आलें । नाशिवंतामधें ॥ १३ ॥
’आहे’ म्हणतां कांहीं नाहीं । ’नाहीं’ शब्द गेला तोही ।
नांहीं नांहीं म्हणता कांही । उरलें कीं ॥ १४ ॥
येथें शून्या निरास झाला । आत्मा सदोदित संचला ।
पाहों जातां साधकाला । ठावचि नाहीं ॥ १५ ॥
अभिन्न ज्ञाता तोचि मान्य । साधक साध्य होता धन्य ।
वेगळेपणें वृत्तिशून्य । पावती प्राणी ॥ १६ ॥
वेगळेपणें पाहों जातां । मोक्ष न जोडे सर्वथा ।
आत्मा दिसेना मता । वरपडे होती ॥ १७ ॥
आपुल्या डोळां देखिलें । तें नाशिवंतामध्यें आलें ।
ऐसें जाणोनि धरिलें । ते नाडले प्राणी ॥ १८ ॥
जो पंचभूतांचा दास । तया पंचभूतीं वास ।
भोगी नीच नवी सावकाश । पुनरावृत्ती ॥ १९ ॥
तों शिष्यें विनंती केली । म्हणे आशंका उद्भवली ।
पंचभूतांची सेव केली । बहुतीं कीं ॥ २० ॥
सकळ सृष्टीमध्यें जन । संत साधु आणि सज्जन ।
करिती भूतांचें भजन । धातुपाषाणमूर्ती ॥ २१ ॥
कोणी नित्यमुक्त जाले । तेही धातु पुजूं लागले ।
परंतु ते पुनरावृत्ती पावले । किंवा नाही ? ॥ २२ ॥
ऐसा शिष्याचा अंतर्भाव । जाणोनि आनंदें गुरुराव ।
म्हणे शीघ्रचि हा अनुभव । पावेल आतां ॥ २३ ॥
ऐसें विचारूनि मनीं । कृपादृष्टी न्याहाळुनी ।
शिष्याप्रती सुवचनीं । बोलते जाले ॥ २४ ॥
प्राणी देह सांडून जाती । वासनाशरीरें असती ।
पुनरावृत्ती भोगिती । वासना उरलिया ॥ २५ ॥
मूळ माया स्थूळ देहाचें । लिंगदेह वासनात्मकाचें ।
राहाणें तया लिंगदेहाचें । अज्ञानडोही ॥ २६ ॥
कारणदेह अज्ञान । ज्ञान तो आत्मा जाण ।
तया नांव महाकारण । बोलिजेतें ॥ २७ ॥
जरी मनाचा थारा सुटला । म्हणजे भवसिंधु आटला ।
प्राणी निश्चितार्थें सुटला । पुनरावृत्ती पासोनी ॥ २८ ॥
हेंचि जाण भक्तीचें फळ । जेणें तुटे संसारमूळ ।
निःसंग आणि निर्मळ । आत्मा स्वयें ॥ २९ ॥
संगातीत म्हणजे मोक्ष । तेथे कैंचें देखणें लक्ष ।
लक्ष आणि अलक्ष । दोहींस ठाव नाही ॥ ३० ॥
आत्मा म्हणोनि देखण्यास मिठी । घालूं जातां मोक्षतुटी ।
म्हणोनिया उठाउठी । आत्मनिवेदन करावें ॥ ३१ ॥
प्राप्त जालें अद्वैतज्ञान । अभिन्नपणें जें विज्ञान ।
तेंचि जाण आत्मनिवेदन । जेथें मी नाहीं ॥ ३२ ॥
ऐसी स्थिति जया पुरुषाची । तया पुनरावृत्ती कैंची ।
जाणोनि भक्ति केली दास्याची । देवासी अत्यंत ॥ ३३ ॥
पूर्वीं दासत्व होतें केलें । त्याचें स्वामित्व प्राप्त जालें ।
आणि तयाचें महत्व रक्षिलें । तरी थोर उपकार ॥ ३४ ॥
आतां असो हें बोलणें । नाशिवंताचा विचार करणें ।
आणि मजपाशीं सांगणें । अनुभव आपुला ॥ ३५ ॥
आता पुढिलिये समासीं । शिष्य लाधेल अनुभवासी ।
दृढ करूनियां तयासी । सांगती स्वामी ॥ ३६ ॥
इति श्रीआत्माराम । रामदासीं पूर्णकाम ।
ऐका साधनवर्म । आत्मज्ञानाचें ॥ ३७ ॥
समास पाचवा : स्वानुभव निरूपण
॥ श्रीराम समर्थ॥
Download mp3
जी जी स्वामी सर्वेश्वरा । आम्हां अनाथांचिया माहेरा ।
सार्थक झालें जी दातारा । तुमच्या कृपाकटाक्षें ॥ १ ॥
या मनाचे संगती । जन्म घेतले पुनरावृत्ती ।
माया मायिक असोनि भ्रांती । वरपडा जालों होतों ॥ २ ॥
मी मानवी किंकर । येकयेकीं जालें विश्वंभर ।
संदेह तुटला थोर । यातायाती ॥ ३ ॥
संसाराहून सुटलों । मीच सकळ देहीं विस्तारलों ।
जन्मदुःखापासूनि मुकलों । सर्वांभूतीं ॥ ४ ॥
मी करून अकर्ता । मी भोगूनि अभोक्ता ।
मजमध्यें वार्ता । मीपणाची नाही ॥ ५ ॥
ऐसें जें कां निजबीज । गाळींव मीपणाचा फुंज ।
तो मुरालिया सहज । सीद्धचि आहे ॥ ६ ॥
ऐसा शिष्याचा संकल्पू । म्हणोनि बोले भवरिपु ।
संसारसर्प भग्नदर्पू । केला जेणें ॥ ७ ॥
जें स्वामीच्या हृदयीं होतें । तें शिष्यास बाणलें अवचितें ।
जैसें सामर्थ्यें परीसाचें तें । लोहाअंगीं ॥ ८ ॥
स्वामीपरिसाचा स्पर्श होतां । शिष्य परीस जाला तत्त्वता ।
गुरुशिष्यांची ऐक्यता । जाली स्वानुभवें ॥ ९ ॥
गुज स्वामीच्या हृदयींचें । शिष्यासी वर्म तयाचें ।
प्राप्त जालें योग्यांचें । निजबीज जें ॥ १० ॥
बहुतां जन्मांच्या शेवटीं । जाली स्वरूपाची भेटी ।
येका भावार्थासाठीं । परब्रह्म जोडलें ॥ ११ ॥
जो वेदशास्त्रांचा भावगर्भ । निर्गुण परमात्मा स्वयंभ ।
तयाचा येकसरां लाभ । जाला सद्भावें ॥१२ ॥
जें ब्रह्मादिकांचें माहेर । अनंत सुखाचें भांडार ।
जेणें हा दुर्गम संसार । सुखरूप होय ॥ १३ ॥
ऐसें ज्यासी ज्ञान जालें । तयाचें बंधन तुटलें ।
येर नसोनि पावलें । दृढ अविवेकें ॥ १४ ॥
संदेह हेंचि बंधन । निशेष तुटलें तेंचि ज्ञान ।
निःसंदेहीं समाधान । आपैसें होय ॥ १५ ॥
प्राणियांसी माया सुटेना । अभिमान त्रिपुटी तुटेना ।
वृत्ति स्वरूपीं फुटेना । स्फूर्तिरूपें ॥ १६ ॥
मायाजाळीं जे पडले । ते ईश्वरासि चुकले ।
ते प्राणी सांपडले । वासनाबंधनीं ॥ १७ ॥
ज्याचें दैव उदेलें । तयास ज्ञान प्राप्त जालें ।
तयाचें बंधन तुटलें । निःसंगपणें ॥ १८ ॥
सर्वसाक्षी तुर्यावस्था । तयेचाही तूं जाणता ।
म्हणोनि तुज निःसंगता । सहजचि आली ॥ १९ ॥
आपणासी तूं जाणसी । तरी तूं तें नव्हेसी ।
तूंपणाची कायसी । मात स्वरूपीं ॥ २० ॥
जाणता आणि वस्तु । निमालिया उर्वरीत तूं ।
तूंपणाचीही मातू । सहजची वाव ॥ २१ ॥
असो हा शब्दपाल्हाळ । तुझें तुटलें जन्ममूळ ।
कां जें नाशिवंत सकळ । मदर्पण केलें ॥ २२ ॥
जें जें जाणोनि टाकिलें । तें नाशिवंत राहिलें ।
तुझें तुज प्राप्त झालें । अक्षयपद ॥ २३ ॥
ऐसें बोले मोक्षपाणी । ऐकोनि शिष्य लोटांगणीं ।
निःसंग स्वरूप मिळणीं । दोघे येकचि जाले ॥ २४ ॥
ऐसा कृपाळू स्वामीराव । आदि पुरुष देवाधिदेव ।
शिष्यासी निजपदीं ठाव । ऐक्यरूपें दिल्हा ॥ २५ ॥
जो स्वामीस शरण गेला । तेणें जन्म सार्थक केला ।
संदेहावेगळा जाला । जो देवां दुर्लभ ॥ २६ ॥
ग्रंथ संपतां स्तुतिउत्तरें । बोलिजेती अपारें ।
अर्थासी कारण येरें । चाड नाहीं ॥ २७ ॥
इति श्रीआत्माराम । रामदासीं पूर्णकाम ।
साधकें पाहतां भ्रम । बाधिजेना ॥ २८ ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
॥ आत्माराम ग्रंथ संपूर्ण ॥