॥ श्रीमत् शंकराचार्य विरचित ॥

सदाचार

या ग्रंथावर श्री हंसराजस्वामीकृत मराठी पद्य टीका



सच्चिदानंदकंदाय जगदंकुरहेतवे ।
सदोदिताय पूर्णाय नमोऽनंताय विष्णवे ॥ १ ॥
सर्ववेदांतसिद्धांत ग्रथितं निर्मलं शिवम् ।
सदाचारं प्रवक्ष्यामि योगिनां ज्ञानसिद्धये ॥ २ ॥
प्रातः स्मरामि देवस्य सवितुर्भर्ग आत्मनः ।
वरेण्यं तद्धि यो यो नः चिदानंदे प्रचोदयात् ॥ ३ ॥
अन्वय व्यतिरेकाभ्यां जाग्रत् स्वप्नसुषुप्तिषु ।
यदेकं केवलं ज्ञानं तदेवाह परं बृहत् ॥ ४ ॥
ज्ञानाज्ञानविलासोऽयं ज्ञानाज्ञाने च पश्यति ।
ज्ञानाज्ञाने परित्यज्य ज्ञानमेवावशिष्यते ॥ ५ ॥
अत्यंतमलिनो देहो देही चात्यंतनिर्मलः ।
असंगोऽहमिति ज्ञात्वा शौचमेतत्प्रचक्षते ॥ ६ ॥
मन्मनो मीनवन्नित्यं क्रीडत्यानंदवारिधौ ।
सुस्नातस्तेन पूतात्मा सम्यग्विज्ञानवारिणा ॥ ७ ॥
अथाघमर्षणं कुर्यात् प्राणापाननिरोधतः ।
मनः पूर्णे समाधाय मग्नः कुंभो यथार्णवे ॥ ८ ॥
लयविक्षेपयोः संधौ मनस्तत्र निरामिषम् ।
स संधिः साधितो येन स मुक्तो नात्र संशयः ॥ ९ ॥
सर्वत्र प्राणिनां देहे जपो भवति सर्वदा ।
हंसः सोऽहमिति ज्ञात्वा सर्वबंधैः प्रमुच्यते ॥ १० ॥
तर्पणे स्वसुखेनैव स्वेंद्रियाणां प्रतर्पणम् ।
मनसा मन आलोक्य स्वयमात्मा प्रकाशते ॥ ११ ॥
आत्मनि स्वप्रकाशाग्नौ चित्तमेकाहुतिं क्षिपेत् ।
अग्निहोत्री स विज्ञेय इतरे नामधारकाः ॥ १२ ॥
देहो देवालयं प्रोक्तो देही देवो निरंजनः ।
अर्चितः सर्वभावेन स्वानुभूत्या विराजते ॥ १३ ॥
मौनं स्वाध्ययनं ध्यानं ध्येयं ब्रह्मानुचिंतनम् ।
ज्ञानेनेति तयोः सम्यङ् निषेधांतःप्रदर्शनम् ॥ १४ ॥
अतीतानागतं किंचित् न स्मरामि न चिंतये ।
रागद्वेषं विना प्राप्तं भुंजाम्यत्र शुभाशुभम् ॥ १५ ॥
अभयं सर्वभूतानां ज्ञनमाहुर्मनिषिणः ।
निजानंदे स्पृहा नान्ये वैराग्यस्यावधिर्मतः ॥ १६ ॥
वेदांतैः श्रवणं कुर्यात् मननं चोपपत्तिभिः ।
योगेनाभ्यसनं नित्यं ततो दर्शनमात्मनः ॥ १७ ॥
शब्दशक्तेरचिंत्यत्वात् शब्दादेवापरोक्षधीः ।
सुषुप्तः पुरुषो यद्वत् शब्देनैवानुबध्यते ॥ १८ ॥
आत्मानात्मविवेकेन ज्ञानं भवति निर्मलं ।
गुरुणा बोधितः शिष्यः शब्दब्रह्मातिवर्तते ॥ १९ ॥
न त्वं देहो नेन्द्रियाणि न प्राणो न मनो न धीः ।
विकारित्वात् विनाशित्वात् दृष्यत्वाच्च घटो यथा ॥ २० ॥
विशुद्धं केवलं ज्ञानं निर्विशेषं निरंजनम् ।
यदेकं परमानंदं तत्त्वमस्यद्वयं परम् ॥ २१ ॥
शब्दस्याद्यंततोः सिद्धं मनसोऽपि तथैव च ।
मध्ये साक्षितया नित्यं तदेव त्वं भ्रमं जहि ॥ २२ ॥
स्थूलवैराजयोरैक्यं सूक्ष्महैरण्यगर्भयोः ।
अज्ञानमाययोरैक्यं प्रत्यग्‍विज्ञानपूर्णयोः ॥ २३ ॥
चिन्मात्रैकरसे विष्णौ ब्रह्मात्मैकस्वरूपके ।
भ्रम एव जगज्जातं रज्ज्वां सर्पभ्रमो यथा ॥ २४ ॥
तार्किकाणां च जीवेशौ वाच्यावेतौ विदुर्बुधाः ।
लक्ष्यौ च सांख्ययोगाभ्यां वेदांतैरैक्यतानयोः ॥ २५ ॥
कार्यकारणवाच्यांशौ जीवेशौ यौ जहच्च तौ ।
अजहच्च तयोर्लक्ष्यौ चिदंशावेकरूपिणौ ॥ २६ ॥
कर्मशास्त्रे कुतो ज्ञाने तर्के नैवास्ति निश्चयः ।
सांख्ययोगौ द्विधापन्नौ शाब्दिकां शब्दतत्पराः ॥ २७ ॥
अन्ये पाखंडिनः सर्वे ज्ञानवार्तासु दुर्बलाः ।
एकं वेदांतविज्ञानं स्वानुभुत्या विराजते ॥ २८ ॥
अहं ममेत्ययं बंधो नाहं ममेति मुक्तता ।
बंधो मोक्षो गुणैर्भाति गुणाः प्रकृतिसंभवाः ॥ २९ ॥
ज्ञानमेकं सदा भाति सर्वावस्थासु निर्मलम् ।
मंदभाग्या न जानंति स्वरूपं केवलं बृहत् ॥ ३० ॥
संकल्पसाक्षिणं ज्ञानं सर्वलोकैकजीवनम् ।
तदस्मीति च यो वेद स मुक्तो नात्र संशयः ॥ ३१ ॥
प्रमाता च प्रमाणं च प्रमेयं प्रमितिस्तथा ।
तस्य भासावभासेत मानं ज्ञानाय तस्य किम् ॥ ३२ ॥
अर्थाकारा भवेद् वृत्तिः फलेनार्थः प्रकाशते ।
अर्थज्ञानं विजानाति स एवार्थः परं स्मृतः ॥ ३३ ॥
वृत्तिव्याप्यत्वमेवास्तु फलव्याप्तिः कथं भवेत् ।
स्वप्रकाशस्वरूपत्वात् सिद्धत्वाच्च चिदात्मनः ॥ ३४ ॥
अर्थादर्थे यथा वृत्तिः गतुं चलति चांतरे ।
अनाधारा निर्विकारा या दशा सोन्मनी स्मृता ॥ ३५ ॥
चित्तं चिच्च विजानीयात् तकाररहितं यदा ।
तकारो विषयाध्यासो जपारागो यथा मणौ ॥ ३६ ॥
ज्ञेयवस्तुपरित्यागात् ज्ञानं तिष्ठति केवलम् ।
त्रिपुटी क्षीणतामेति ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ ३७ ॥
मनोमात्रमिदं सर्वं चिन्मनो ज्ञानमात्रकम् ।
अज्ञानभ्रम इत्याहुः विज्ञानं परमं पदम् ॥ ३८ ॥
अज्ञानं चान्यथाज्ञानं मायामेतां वदंति ते ।
ईश्वरं मायिनं विद्यान्मायातीतं निरंजनम् ॥ ३९ ॥
सदानंदे चिदाकाशे मायामेघस्तडिन्मनः ।
अहंता गर्जनं तत्र धारासारो हि यत्तमः ॥ ४० ॥
महामोहांधकारेऽस्मिन् देवो वर्षति लीलया ।
अस्या वृष्टेर्विरामाय प्रबोधैकसमीरणः ॥ ४१ ॥
ज्ञानं दृग्‍दृश्ययोर्भानं विज्ञानं दृश्यशून्यता ।
एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन ॥ ४२ ॥
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं तज्ज्ञानं ज्ञानमुच्यते ।
विज्ञानं चोभयोरैक्यं क्षेत्रज्ञपरमात्मनोः ॥ ४३ ॥
परोक्षं शास्त्रजं ज्ञानं विज्ञानं चात्मदर्शनम् ।
आत्मनो ब्रह्मणः सम्यक् उपाधिद्वयवर्जितम् ॥ ४४ ॥
त्वमर्थो विषयज्ञानं विज्ञानं तत्पदाश्रयम् ।
पदयोरैक्यबोधस्तु ज्ञानविज्ञानसंज्ञकम् ॥ ४५ ॥
आत्मानात्मविवेकस्तु ज्ञानमाहुर्मनीषिणः ।
अज्ञानं चान्यथा लोके विज्ञानं तन्मयं जगत् ॥ ४६ ॥
अन्वयव्यतिरेकाभ्यां सर्वत्रैकं प्रपश्यति ।
यत्तु तत् वृत्तिजं ज्ञानं विज्ञानं ज्ञानमात्रकम् ॥ ४७ ॥
अज्ञानध्वंसकं ज्ञानं विज्ञानं चोभयात्मकम् ।
ज्ञानविज्ञाननिष्ठेयं तत् सत् ब्रह्मणि चार्पणम् ॥ ४८ ॥
भोक्ता सत्त्वगुणः शुद्धो भोगानां साधनं रजः ।
भोग्यं तमोगुणं प्राहुः आत्मा चैषां प्रकाशकः ॥ ४९ ॥
ब्रह्माध्ययनसंयुक्तो ब्रह्मचर्यरतः सदा ।
सर्वं ब्रह्मेति यो वेद ब्रह्मचारी स उच्यते ॥ ५० ॥
गृहस्थो गुणमध्यस्थः शरीरं गृहमुच्यते ।
गुणाः कुर्वन्ति कर्माणि नाहं कर्तेति बुद्धिमान् ॥ ५१ ॥
किमुग्रैश्च तपोभिश्च यस्य ज्ञानमयं तपः ।
हर्षामर्षविनिर्मुक्तो वानप्रस्थः स उच्यते ॥ ५२ ॥
देहन्यासो हि संन्यासो नैव काषायवाससा ।
नाहं देहो महात्मेति निश्चयो ज्ञानलक्षणम् ॥ ५३ ॥
सदाचारमिमं नित्यं येऽनुसंदधते बुधाः ।
संसारसागरात् शीघ्रं मुच्यंते नात्र संशयः ॥ ५४ ॥
इति श्रीमत् भगवत्पादादार्यविरचितः सदाचारः संपूर्णः
* * * * *


'सदाचार'वर श्री हंसराजस्वामीकृत मराठी पद्य टीका :


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥
श्री सद्‌गुरुकुलस्वामिने नमः ॥ श्रीमातृपितृभ्यां नमः ॥
कोणीएक देवदत्तनामा । परम अधिकारी महात्मा ।
येऊन आचार्यां साउमा । प्रार्थिता झाला ॥ १ ॥
म्हणे जय जय सद्‍गुरुनाथा । बहुत लाविले परमार्थपंथा ।
तेवीं मज शरणागत अनाथा । प्रीतीं स्वीकारावें ॥ २ ॥
मायामोहार्णवीं बुडालो । निजसुख समीप विसरलों ।
केवळ एकदेशी झालों । दास देहबुद्धीचा ॥ ३ ॥
धन्य आजिचा सुदिन । देखिले स्वामींचे चरण ।
आतां सोडवावें येथून । अनाथबंधो ॥ ४ ॥
नेत्रीं अश्रूंचिया धारा । गात्रें कांपती थरथरां ।
वारंवार नमस्कारा । साष्टांग घाली ॥ ५ ॥
आचार्यीं देखून त समयीं । सप्रेम धरिला हृदयीं ।
पद्मकर ठेविला डोईं । म्हणती ना भीं ॥ ६ ॥
पूर्ण पाहून अधिकार । अन्य साधनें सांडूनि दूर ।
उपदेशिला ज्ञाविचार । वेदांतसंमत ॥ ७ ॥
प्रस्थानत्रय जरी पाहतां । अवधी नसे जीविता ।
या हेतू अल्पसंकेता- । माजी अर्थ बहु ॥ ८ ॥
ऐसा सदाचार उत्तम । ज्ञानाची शीगचि परम ।
श्रवणमननेंचि कळे वर्म । समाधानाचें ॥ ९ ॥
ग्रंथारंभीं मंगलाचरण । स्वकीयमुखें करिती पूर्ण ।
इष्टदेवतेचें स्तवन । नमनादिक ॥ १० ॥
शिष्टाचारपरिपालन । हेंचि मुख्य प्रयोजन ।
बोलिल्या तीतीं ठसावे ज्ञान । सच्छिष्यासी ॥ ११ ॥
निर्विघ्न व्हावी समाप्ती । हें नलगे सार्थ्यवंताप्रती ।
तथापि मागील आली पद्धती । तैसे पुढें वर्तती ॥ १२ ॥
आपणचि ब्रह्म पूर्ण । असतां कैसें घडे स्तवन ।
म्हणाल तरी ऐका वचन । सर्वानुभवें ॥ १३ ॥
आपुलेंचि वदन पाहावें । ऐसें इच्छी स्वभावें ।
तरी आरसियापुढें करावें । देखावें मुख ॥ १४ ॥
तैसें अद्वैत पाहणें जरी । दुसरें करून जाणावें तरी ।
पुम्हां स्वमुखामाझारीं । समरसावें ॥ १५ ॥
अपरोक्ष तें परोक्षरीती । घेतां जव्हे दुजी व्यक्ती ।
हेही ज्ञानाची संपत्ती । अज्ञान कवण म्हणे ॥ १६ ॥
ज्ञानें जरी भिन्न झालें । परी अज्ञान तों संऊळीं गेलें ।
पुढें ज्ञानही मावळलें निजस्वरूफीं ॥ १७ ॥
असो एकपण न मोडतां । वृत्तियोगें आत्मा जाणतां ।
सुखचि दुणावे तत्वतां । ऐका आतां मंगल ॥ १८ ॥


सच्चिदानंदकंदाय जगदंकुरहेतवे ।
सदोदिताय पूर्णाय नमोऽनंताय विष्णवे ॥ १ ॥


सच्चिदानंदपरिपूर्ण । या जगद्‍वृक्षाचे कारण ।
अनंत विष्णुतें नमन । सदोदितासी ॥ १९ ॥
सृष्टिपूर्वीं जें सदोदित । आहेच आहे निभ्रांत ।
जें कां ज्ञानज्ञानातीत । केवळ ब्रह्म ॥ २० ॥
पूर्वीं कांहीं जरी न होतें । तरी जग कासयावरी दिसतें ।
यास्तव आहेच आहे तयातें । नाहीं म्हणे कोण ॥ २१ ॥
पूर्वीं दोरी होती खरी । सर्पकल्पना होय दुसरी ।
तैसी सत्य अधिष्ठानावरी । जगत्‍कल्पना उमटे ॥ २२ ॥
ऐसें उत्पत्तीपूर्वीं संचलें । सृष्टीमध्येंही व्यापलें ।
नामरूप जितुकें झालें । त्या त्या पदार्थीं ब्रह्म ॥ २३ ॥
मृत्तिकाचि असे घटीं । कीं तंतूचि असे पटीं ।
सर्पामाजी गोमटी । दोरीच अवघी ॥ २४ ॥
तैसें पांच भूतें चारी खाणी । दिसती जीं लोचनीं ।
चंचल तत्त्वें भासकपणीम् । आहे तें ब्रह्म ॥ २५ ॥
आहेपणा वेगळा केला । तरी काय सूप असे त्याला ।
विचारें समजून बोला । कोणीतरी ॥ २६ ॥
जैसें नामरूप उद्‌भवलें । तैसेंचि मागुती लया गेलें ।
पुढें ब्रह्मचि संचलें । पूर्व रीतीं ॥ २७ ॥
अवं पूर्वीं तेंचि उपरी । मध्येंही तैसेंचि निर्धारीं ।
तिन्ही कालींही दुसरे । अवस्था नसे ॥ २८ ॥
तरंगापूर्वीं पाणी असे । तरंग होतां माजी दिसे ।
लय होतांही आपैसें पाणीच पाणी ॥ २९ ॥
असो तिन्ही कालीं जें आहे । सद्‌रूप ब्रह्म तेंचि पाहें ।
लक्षण ब्रह्मींचें समजा हें । स्वरूपरूपें ॥ ३० ॥
आतां चिद्‌रूप ब्रह्म बोलिजे । येणें जडत्व निवारिजे ।
लक्षणें भिन्न न होइजे । स्वरूपभेद ॥ ३१ ॥
चोद्‌रूप मायेचें लक्षण । बोलतां बहुत दूषण ।
जयाचे भासा भासमान । या श्रुतीसीं विरोध ॥ ३२ ॥
आणि स्वतंत्र झाली माया । हें बोलणेंचि वायां ।
तरी अवधारा निश्चया । चिद्‍रूप तें ब्रह्म ॥ ३३ ॥
मायेसहित सर्व जडातें ब्रह्मचि स्वप्रभें जाणतें ।
माया चिद्‌रूप ऐसें वाटतें । अहाच बुद्धि ॥ ३४ ॥
उपनेत्रें स्पष्ट दिसतें । परी डोळा नसतां काय पाहतें ।
तैसें सर्वांसीही अनुभविते । ब्रह्म सर्वज्ञपणें ॥ ३५ ॥
सर्व असतां सर्वांतें जाणे । सर्वाचा लय पाहिला जेणें ।
शून्यासही प्रकाश करणें । स्वक्प्रकाशत्वें ॥ ३६ ॥
वृत्ति नसतां सुषुप्तीं । जाणताहे स्वयंज्योती ।
तैसाचि हा चिन्मूर्ती । अभाव देखणा ॥ ३७ ॥
अभाव होतां मायेचा । लय मानिसी ज्ञानाचा ।
ज्ञानाचे नाहींपणाचा । साक्षी कवण ॥ ३८ ॥
चिद्‍रूप दुसरें असतें । तरी ज्ञानलया साक्षी होतें ।
हें तो प्रत्यक्ष कळतें । अनुमान कासया ॥ ३९ ॥
आपुला लय आपण । पाहिला म्हणतां दूषण ।
देखिलें स्वयें आपुलें मरण । कोठें कोणे तरी ॥ ४० ॥
चिद्‌रूपाचा लय झाला । तो सद्‌रूपें जाणितला ।
ऐसें म्हणतांचि सधला । पक्ष आमुचा ॥ ४१ ॥
सद्‍रूपा चिद्‍रूपत्व आलें । तरी चिद्‍रूपचि सत्य झालें ।
आणि सत्याचें जडत्व गेलें । अनायासें ॥ ४२ ॥
एवं सत् तेचि चित् । ब्रह्म जाणावे निश्चित ।
आणि आनंदही प्रतिपादित । लक्षण तिसरें ॥ ४३ ॥
ब्रह्मीं आनंद कैसा । नसे सुखदुःखवळसा ।
हाही तिन्ही काळीं आपैसा । आहेच आहे ॥ ४४ ॥
आहेपणा तेथेंचि ज्ञान । तैसा आनंदही पूर्ण ।
हीं तिन्हीही लक्षणें जाण । एकेचि ठायीं ॥ ४५ ॥
पाणी द्रवत्वगोडी । यांवेगळें कोण निवडी ।
तैसें एक न राहे अर्धघडी । एकेंविण ॥ ४६ ॥
सुखदुःखाभावीं आनंद । तरी जडजाता नसे खेद ।
आणि आहेपणा तेथें प्रसिद्ध । सुखही असावें ॥ ४७ ॥
ऐसें आक्षेपितां बरवें । येविशीं उत्तर ऐकावें ।
जड चेतन हे जाणावे । विकार दोन्ही ॥ ४८ ॥
विकारीं सुखदुःखें असती । यास्तव नसे आनंदव्याप्ती ।
चेतनीं सुखदुःखें दिसती । जडत्वीं गुप्त ॥ ४९ ॥
रंकासी राज्यपद येतां । सुख प्रगटे तत्वतां ।
तेंचि पुन्हां नष्ट होतां । दुःख दिसे ॥ ५० ॥
जड उत्पन्न जेव्हां झालें । तें सुख ऐसे अनुमानलें ।
लय होतां दुःख कल्पिलें । पाहिजे तेथें ॥ ५१ ॥
जेथें सुखदुःखें दिसती । तेथें आनंदाची प्राप्ती ।
विकार जातां आदिअंतीं । प्रगटचि आहे ॥ ५२ ॥
तस्मात् सुखदुःखांचा अभाव । तेचि निजानंदाची ठेव ।
निजदुःख कल्पितां नां व न्। नसे कोथें ॥ ५३ ॥
एवं सत् चित् आनंद । तीन्ही एकचि अभेद ।
याचि हेतु श्लोकीं असे पद । कंद शब्दें ब्रह्म ॥ ५४ ॥
आतां ब्रह्म जाणावें अनंत । सजातीयादिभेदरहित ।
आणि परिच्छेद जेथें न होत । तेंचि तें तिन्ही काळीं ॥ ५५ ॥
येथें आक्षेप असे थोर । सृष्टिपूर्वीं जें साचार ।
तेहें नसे भेदमात्र । परी उत्पत्तिकाळीं असे ॥ ५६ ॥
जीवईश उद्‍भवतां । हा सजातीय भेद तत्त्वतां ।
तैसें जडही दिसतां । विजातीय भेद ॥ ५७ ॥
जोतां स्वरूपस्फुरण । हें स्वगत भेदाचें लक्षण ।
एवं सृष्टिकाळीं भेदभान । तेव्हां अनंत कैसा ॥ ५८ ॥
याचें उत्तर श्रवण करा । जीवेशभेद नव्हे खरा ।
दर्पणींचा भास दुसरा । साह्य कोणी करी ॥ ५९ ॥
तैसें अविद्यामायेंत बिंबलें । तेंचि जीव, शिव ऐसे बोलिलें ।
खोटें साचाऐसें वाटलें । परी तें नव्हे ॥ ६० ॥
उपाधि तोंवरी मिथ्या भास । वाच्य ऐसें म्हणावें त्यास ।
लक्ष्यांश तेंचि एकरस । परब्रह्म ॥ ५१ ॥
यास्तव भेद नव्हे सजातीय । तैसाचि नाहीं विजाईय ।
जडजात हा समुदाय । सत्यत्वें कोठें ॥ ६२ ॥
ब्रह्मसत्यवांचून । जड होय जरी निर्माण ।
ऐसें नसतां भेदभान । विजातीया कैसें ॥ ६३ ॥
स्फुरणीं स्वगतभेद भाविला । तरी सत्यत्व कईचे त्याला ।
स्वरूपाहून भिन्न कळला । कधीं कोणासी ॥ ६४ ॥
असो त्रिविधभेदांचे । सृष्टिकाळींही नांव न वचे ।
आदिअंतीं तों सहजाचें । आनंदत्व पूर्ण ॥ ६५ ॥
त्रिविध भेद न होती जैसे । परिच्छेदही नसती तैसे ।
परिच्छेदाचें रूप कैसें । जाणावें आधीं ॥ ६६ ॥
पर्जन्यकाळीं आहे । उष्णकाळीं नसताहे ।
हा कालपरिच्छेद पाहें । विनाशी वस्तूसी ॥ ६७ ॥
पर्वतावरी भासलें । जळामाजीं हारपलें ।
देशपरिच्छेद या बोलें । मानिजे ऐसा ॥ ६८ ॥
असे पदार्थीं एकादिया । नाढळे पाहतां दुजिया ।
वस्तुपरिच्छेद ऐसिया । लक्षणें समजा ॥ ६९ ॥
ब्रह्म सर्वदा सर्वकाळीं । कालपरिच्छेद नसे समूळीं ।
व्यापकपणें सर्वां स्थळीं । नव्हे देश परिच्छेद ॥ ७० ॥
प्रह्मस्वरूपावांचून । पदार्थचि असे कवण ।
वस्तुपरिच्छेदाचें लक्षण । ब्रह्मीं नाहीं ॥ ७१ ॥
एवं त्रिविध भेदांचें । अथवा तिन्ही परिच्छेदांचें ।
नांवचि नसतां अनंताचें । लक्षण सिद्ध ॥ ७२ ॥
अथवा कवळा नलगे अंत । म्हणोनि नामें अनंत ।
तिन्ही काळीं अबाधित । लक्षण हेंही ॥ ७३ ॥
जितुकें दिसतें भासतें । उद्‍भवून सर्व लया जातें ।
अपूर्ण जाणावे पदार्थ ते ते । पूर्ण तें एक स्वरूप ॥ ७४ ॥
आकाश जरी उपमावें । तेंही एकदेशी स्वभावें ।
ऐसें पूर्णत्व समजावें । लक्षण ब्रह्मींचें ॥ ७५ ॥
एवं सच्चिदानंद तीन । अनंतादि परिपूर्ण ।
हीं इतुकींही ब्रह्मलक्षणें । कृत्रीम असती ॥ ७६ ॥
सदोदितपदीं बोलिलें । येणें हेंचि येथें सुचविलें ।
इतुकिया लक्षणें सत्य केलें । तिन्ही काळीं ॥ ७७ ॥
तिन्ही काळींही लक्षणाचा । ओहटचि नसे त्याचा ।
या नांवें बोलिजे वाचा । स्वभावलक्षणा ॥ ७८ ॥
जैसा प्रकाश वर्तुळ दाहक । तिन्ही लक्षणीं अर्क ।
जें कधीं नव्हे न्यूनाधिक । स्वाभाविक या नांवें ॥ ७९ ॥
आतां आगंतुक लक्षण बोलिजे । तेणेंही ब्रह्म नोळखिजे ।
जें क्षणभरी आणि असिजे । एकदेशी ॥ ८० ॥
ऊखरभूमी मृगजळ । आणि पाहिजे मध्याह्नकाळ ।
स्वकिरणीं दिसे जळ । यास्तव हेतु सूर्य ॥ ८१ ॥
तैसा जगरूप खेळ । मृगजळापरी केवळ ।
परी याचें पाहतां मूळ । अधिष्ठान ब्रह्मचि ॥ ८२ ॥
मध्याह्न पाहिजे मृगजळा । येथें पाहिजे सृष्टिवेळा ।
टळतां मृगजळ न दिसे डोळां । लय होतां जग नाहीं ॥ ८३ ॥
जळ ऊखरभूमीं पडे । जग स्वकर्मीं आतुडे ।
मृगजळ असे एकीकडे । जगही एकदेशी ॥ ८४ ॥
सूर्यावीण मृगजळ भासेना । स्वरूपाविण जग दिसेना ।
उभयकार्यांचे हेतु जाणा । मार्तंड ब्रह्म ॥ ८५ ॥
तस्मात् या सर्व जगाचें । कारण ब्रह्मचि साचें ।
केवळ मूळ उत्पत्तेचें । ऐसें नव्हे ॥ ८६ ॥
जैसें उत्पत्तीसी कारण । तैसे स्थितिलयां प्रयोजन ।
सृष्टिस्थितिसंहार होणें । एका अधिष्ठानीं ॥ ८७ ॥
माया हाचि सूक्ष्म मोड । गुणसाम्य जाणावें खोड ।
त्रिगुणशाखा ह्या वाड । भूतें उपशाखा ॥ ८८ ॥
स्थावरजंगमादि खाणी । पत्रें पुष्पें तयालागुनी ।
सुखदुःखें फळें दोनी । आंठोळी कर्म ॥ ८९ ॥
येथींचा भोक्ता जीव । बरें वाईट ठेऊन नांव ।
असो ऐसा प्रपंच सर्व । वृक्षरूपी ॥ ९० ॥
या जगद्‍रोपाचें कारण । अहंब्रह्म झालें स्फुरण ।
तेचि माया परी जाण । स्वरूपावीण नसे ॥ ९१ ॥
माया म्हणिजे झाली नाहीं । रज्जूवरील जैसा अही ।
परी सत्य अधिष्ठान पाहीं । केवळ ब्रह्म ॥ ९२ ॥
एंचि ब्रह्म जगीं व्यापलें सच्चिद्‍रूपें कोंदाटलें ।
अस्तिभातिवीण देखिले । पदार्थ कोठें ॥ ९५ ॥
म्हणून हेंही लक्षण । आगंतुक जाणावी खूण ।
परी हें ओळखीचें चिन्ह । ब्रह्म जाणावया ॥ ९६ ॥
आधीं या लक्षणें समजावें । मग सच्चिदादि ओळखावें ।
ब्रह्मज्ञान याचि नांवें । वेदांतसिद्ध ॥ ९७ ॥
चतुर्भुज घनसांवळा । कंठी शोभे वनमाळा ।
उभय लक्षणीं जैसा कळला । विष्णु एक ॥ ९८ ॥
तैसें दोन्ही लक्षणेंवीण । नव्हे कदा ब्रह्मज्ञान ।
म्हणून प्रवर्तती सज्जन । येथिंच्या विषयीं ॥ ९९ ॥
असो विष्णु आणि जगहेतु । सच्चिदादि अनंतु ।
या लक्षणेंशीं युक्तु । ब्रह्म जें कां ॥ १०० ॥
ऐसिया स्वरूपाकारणें अनन्यभावें नमन ।
जें मी नव्हे याहून भिन्न । स्वात्मत्वें ऐसें ॥ १ ॥
अदादिरूपें वर्णिलें । हेंचि परादिकीं स्तविलें ।
अंतःकरणें आठविलें । हेंचि स्मरण ॥ २ ॥
नमन तेंचि अभिन्न । त्रिविध मंगलाचें लक्षण ।
ग्रंथारंभीं झालें पूर्ण । एकाग्रभावें ॥ ३ ॥
मंगलाचें करोनि मिष । वर्णिलें ब्रह्म निर्दोष ।
श्रवणमननेंचि भवविष । तत्क्षणीं जाय ॥ ४ ॥
ऐसें करोनि मंगळा । देवदत्ता देखिलें डोळां ।
बद्धांजली उताविळा । अतिश्रवणार्थी ॥ ५ ॥
चातक वांच्छितसे घन । कीं चकोर इच्छी पयःपान ।
तैसा वेदसारार्थ पूर्ण । मनें आकळूं पाहे ॥ ६ ॥
ऐसें देखोनि कृपामूर्ती । सप्रेम द्रवलें चित्तीं ।
सावध सावध गा म्हणती । निरूपिजेल ॥ ७ ॥
येथूनियां श्लोक चौदा । वर्णिजे ज्ञानाची संपदा ।
पुढें कीजेल संवादा । उपदेशक्रमाच्या ॥ ८ ॥
आधीं उपदेश कां न करिती । याचें प्रयोजन ऐका चित्तीं ।
वर्णितां ज्ञानाची स्थिती । अतिआवडी उपजेल ॥ ९ ॥
नव्हे ज्या विषयाचें ज्ञान । त्याचा कासया करील प्रयत्‍न ।
म्हणून ज्ञात्याचें समाधान । कळावें कैसें तें ॥ ११० ॥
कैसा तयाचा आचार । कैसा तयाचा विहार ।
आणि कैसा भोगमात्र । अलिप्तता कैसी ॥ ११ ॥
म्हणून उपदेशक्रम ठेविला । ज्ञात्याचा आचार बोलिला ।
तो चवदा श्लोकीं अवधारिला । पाहिजे पुढें ॥ १२ ॥
प्रथम श्लोकीं प्रतिज्ञा करिती । कीं बोलूं सदाचाररीती ।
अधिकारही कवणाप्रती । असे याचा ॥ १३ ॥


सर्ववेदांतसिद्धांत ग्रथितं निर्मलं शिवम् ।
सदाचारं प्रवक्ष्यामि योगिनां ज्ञानसिद्धये ॥ २ ॥


सर्व वेदार्थ गुंफिला ज्यांत । कल्याणरूप मलरहित ।
जेणें योगिया ज्ञान प्राप्त । सदाचार बोलूं ऐसा ॥ १४ ॥
देवदत्त म्हणे जी श्रीगुरू । सत्‍शब्दें वस्तुनिर्विकारू ।
आचार म्हणता विकारू । क्रियारूप दिसे ॥ १५ ॥
तरी सांगा कृपा करूनी । अति उत्कंठा लागली मनीं ।
ऐसें आचार्यां ऐकोनी । अति संतोष पावले ॥ १६ ॥
म्हणती वत्सा ऐक आतां । निर्विकारचि असे ज्ञाता ।
आचार बोलोका जो तत्त्वतां । रूपक कौतुकार्थ ॥ १७ ॥
क्रियारूप जो आचार । त्याचा अज्ञाना अधिकार ।
ज्ञाता पावला परपार । तेथें क्रिया कैंची ॥ १८ ॥
ज्ञानार्थ जयाची प्रवृत्ती । क्रिया नलगे साधकांप्रती ।
मग ज्ञात्याची निवृत्ती । काय बोलावी ॥ १९ ॥
स्नानशौचादि क्रिया बोलिली । ही कर्माची हेळणा केली ।
कीं हीं सर्वही घडलीं । धात्याप्रती ॥ १२० ॥
हे उगेचि कष्टी होती । व्यर्थचि खटपटीं शिणती ।
यांतील कांहींही फलप्राप्ती । यांसी नसतां ॥ २१ ॥
जैसा वाळूचा घाणा गाळितां । तेल ना पेंडी येतसे हाता ।
अहा कष्ट कष्ट पावतां । कोणी नुमजे ॥ २२ ॥
म्हणती आम्ही सदाचारी । नैष्ठिक आणि अग्निहोत्री ।
बुडतां मृगजळपूरीं । हें कांहीच नेणती ॥ २३ ॥
त्या त्या प्रसंगीं बोलिजेल । तेव्हां तुजसे कळेल ।
संशय अवघा मावळेल । अंतरींचा ॥ २४ ॥
सद्‍रूप जैसें परिपूर्ण । निजांगें ज्ञाता आपण ।
साधका असे ध्येय ध्यान । आचाररूपें ॥ २५ ॥
सिद्धाचें जें लक्षण । बोलतां न ये साधकेंवीण ।
साधकासी लागे करणें ज्ञानियां सहज ॥ २६ ॥
ऐसेंचि पुढेंही समजावें । सिद्ध तें साधकत्वें कळावें ।
येर्‍हवी तेथें काय बोलावें । अनिर्वाच्यासी ॥ २७ ॥
साधकत्व आणि साधन । सांडून साध्यचि परिपूर्ण ।
विचारें अंगेंचि होणें । सदाचार या नांवें ॥ २८ ॥
याचि हेतू विशेषणें । दिधलीं तीं विशद करणें ।
तेंचि निरूपण आदरानें । श्रवण कीजे ॥ २९ ॥
ऋगादि हे वेद चारी । त्यांतील सारांश बहुधापरी ।
असे उपनिषद्‌भागमात्रीं । ऐतरेयादिकीं ॥ १३० ॥
त्यांतील महावाक्यरत्‍नें । काढिलीं असती गाळून ।
त्यांचा अर्थ तो परिपूर्ण । जो प्रत्यगात्मा ब्रह्म ॥ ३१ ॥
ब्रह्मचि आत्मा निश्चय । इतुकाचि वेदांतविषय ।
आणि जितुका संवाद होय । तें उपकरण याचें ॥ ३२ ॥
असो ऐसा वेदांतसार । तेणेंशीं युक्त सदाचार ।
अर्थरत्‍नांचा शब्दें हार । गुंफिला असे ॥ ३३ ॥
वेदांतसिद्धांत हा एक । आत्मा ब्रह्म निश्चयात्मक ।
तयाचेंच ग्रथनकौतुक । सदाचारीं ॥ ३४ ॥
पदीं बोलिलें शिवरूप । म्हणजे कल्याण ज्याचें निजरूप ।
मायाजगताचा आरोप । जेथें नाहीं ॥ ३५ ॥
क्रियादिकांचा नलगे मळ । अहंकृतीचा हौय विटाळ ।
या हेतू बोलिजे निर्मळ । सदाचार हें ॥ ३६ ॥
ऐशिया सदाचारांत । बोलिजेतें निभ्रांत ।
कोण अधिकारी श्रवणातें । निरोपिजे तो ॥ ३७ ॥
वेदांतसिद्ध ज्ञानाची । सिद्धि व्हावी योगियाची ।
त्या योगियाचे लक्षणाची । ओळखी ऐका ॥ ३८ ॥
योगी शब्दें नव्हे ज्ञानी । जो कां पूर्णसमाधानी ।
जरी योजावा अधिकारालागुनी । तरी विरोध ॥ ३९ ॥
ज्ञानसिद्धि व्हावया म्हणतां । अधिकारी नव्हे कीं ज्ञाता ।
हठयोगी कल्पूं आतां । तरी अवधारा ॥ १४० ॥
कोंडून बैसला वारा । केव्हां प्रवर्तावें विचारा ।
त्यासी शून्यामाजी थारा । अधिकारा पात्र नव्हे ॥ ४१ ॥
मुद्रा आसनें करिती । लोली धोती आणि पोती ।
ते देहमळाचे सांगाती । अधिकार कईचा त्यां ॥ ४२ ॥
मंत्र यंत्र जपी तपी । नानासाधनी प्रतापी ।
तीर्थवासी खटाटोपी । अधिकारी नव्हे ॥ ४३ ॥
अविवेकें नागवे झाले । नखें केश वाढविले ।
खाती वृक्षाचे पाले । न होती पात्र ते ॥ ४४ ॥
पात्र नव्हे वेदाध्ययनी । अथवा नव्हे व्याकरणी ।
न्यायाची करी वेवादणी । कुतर्कें तोही नव्हे ॥ ४५ ॥
नानाशास्त्रें अधीत । जयचि इच्छी गर्वित ।
त्यासी कैंचें आत्महित । श्रवणमननें ॥ ४६ ॥
उपासक नव्हे अधिकारी । त्या मायिकाची भीड भारी ।
कर्मी तो नव्हेचि निर्धारीं । फलाभिलाषी ॥ ४७ ॥
काम्य निषिद्ध त्यागिलें । नित्य नैमित्तिक अनुष्ठिलें ।
तेही अधिकारा पात्र झाले ऐसें न घडे ॥ ४८ ॥
तया क्रियेचा अभिमान । न पडावें कांहीं न्यून ।
त्यासी न घडे श्रवणमनन । यथासांग ॥ ४९ ॥
अंतर क्रियेकडे लागलें । वरिवरी श्रवणें काय झालें ।
असो हे अवघे गुंतले । मायिकासी ॥ १५० ॥
आतां कोणता अधिकारी । बोलिजेतो अवधारीं ।
निश्चयेंशीं श्रवण करीं । देवदत्ता ॥ ५१ ॥
जो प्रपंचीं पोळला । त्रिविध तापें तापला ।
अनुतापें अवघा त्याग केला । तोचि अधिकारी ॥ ५२ ॥
सर्वही मिथ्या कळलें । सत्य तें असे एकलें ।
ऐसें जेणें निवडिलें । तोचि अधिकारी ॥ ५३ ॥
द्रव्य दारा देखतां नयनीं । वमनासमान जो मानी ।
पदार्थमात्र न इच्छी मनीं । तोचि अधिकारी ॥ ५४ ॥
मनाचा थार मोडिला । तृष्णेचा घातचि केला ।
स्वप्नजागृति विसरला । तोचि अधिकारी ॥ ५५ ॥
विषयजातातें त्यागिलें । इंद्रियांचें मडगें मोडिलें ।
विवेकें तया दमविलें । तोचि अधिकारी ॥ ५६ ॥
कष्टें शिणतां निजे प्राणी । तैसा सर्व कर्म उपमर्दूनी ।
सुखी झाला स्वात्मशयनीं । तोचि अधिकारी ॥ ५७ ॥
प्रारब्धें सुखदुःख भोगितां । अथवा पूजितां कीं गांजितां ।
निरभिमानें सोसी तत्वता । तोचि अधिकारी ॥ ५८ ॥
गुरुपदीं आवडी कैशी । वियोगे घडी कल्पाऐशी ।
काया अर्पिली सेवेसी । तोचि अधिकारी ॥ ५९ ॥
वेदांतश्रवणीं आवडी । स्वानुभवें तर्क काढी ।
अर्थीं मनें मारिली बुडी । तोचि अधिकारी ॥ ६० ॥
देहाचें सुखदुःख विसरे । मनाची धांव सर्वही पुरे ।
विश्रांती पावला निर्धारें । तोचि अधिकारी ॥ ६१ ॥
हा भवपाश कधीं तुटेल । मोक्ष केव्हां मज होईल ।
अत्यंत साधन फळेल । म्हणे तोचि अधिकारी ॥ ६२ ॥
श्रवण मनन न सांडी । गुरुपदीं मारिली बुडी ।
संशया करी देशोधडी । तोचि अधिकारी ॥ ६३ ॥
बळेंचि ज्ञान आकळी । अज्ञाना कांप सुटे चळीं ।
देहबुद्धीदी खांदली मुळी । तोचि अधिकारी ॥ ६४ ॥
देहावीण जितुकें जग । तो श्रीगुरूचि निःसंग ।
नामरूपाचा सांडिला संग । तोचि अधिकारी ॥ ६५ ॥
माया अविद्या जीव शिव । या अवघ्यांचें मोडोनि नांव ।
एकलाचि उरे गुरुदेव । तोचि अधिकारी ॥ ६६ ॥
सर्व दृश्यातें ग्रासिलें । भासातें वेगळें काढिलें ।
शून्यासही ओलांडिलें ।तोचि अधिकारी ॥ ६७ ॥
श्रीगुरूचिया निजकृपें । भवसिंधु मारिला थापें ।
काळही जयासी कांपे । तोचि अधिकारी ॥ ६८ ॥
परोक्षें सर्वही कळलें । सच्चिदानंद ओळखिलें ।
ऐक्यविचारा प्रवर्तले । तोचि योगी अधिकारी ॥ ६९ ॥
असो ऐसा जया अधिकार । त्या सुगम येथींचा विचार ।
तत्क्षणीं पावे परपार । सद्‌गुरुप्रसादें ॥ १७० ॥
ऐसीं अधिकारचिन्हें ऐकतां । दचक बैसली देवदत्ता ।
विचारें पाहे मागुता । पूर्व केलें तें ॥ ७१ ॥
ऐसें देखोनि कृपापाणीं । थापटून बोलती सुवचनीं ।
आता भीति सांडीं ये क्षणीं । अधिकार तुज असे ॥ ७२ ॥
सद्‌गुरुपदीं अनन्यता । आतां तुज कायसी चिंता ।
संशय सांडीं गा परता । अवधान देईं ॥ ७३ ॥
तुज अधिकार असे म्हणतां । आनंद दाटला देवदत्ता ।
अहो माझिया सुकृता । जोडा नाहीं ॥ ७४ ॥
येर्‍हवी पाहतां मजला । काय अधिकार प्राप्त झाला ।
परी सद्‌गुरूनें दिधला । आपला भाग ॥ ७५ ॥
आतां मज तें काय भय । सद्‌गुरूनें दिधलें अभय ।
आतां कासया संशय । तरणोपायाचा ॥ ७६ ॥
जेव्हां माथां ठेविला कर । तेव्हांचि झालों असें अमर ।
आतांचि हा भवसागर । करीन कोरडा ॥ ७७ ॥
आतां बळ चढलें अपार । करीन अवघ्यांचा संहार ।
आवेशें रगडून अधर । कर चुरून बोले ॥ ७८ ॥
कामाएं जीवें मरूं । कीं क्रोधाचा घात करूं ।
आसडून पाडूं मत्सरू । मोहा हाणूं लाता ॥ ७९ ॥
लोभाचें मूळ उपडूं । कीं शोकातें चिरडूं ।
कीं भयाचें निःशेष मोडूं । असतेपण ॥ १८० ॥
अहंतेची करूं हानी । कीं ममता पाडूं उताणी ।
कीं प्रयत्‍नाची घाणी । करूं आतां ॥ ८१ ॥
इच्छेचा मोडूं मडगा । कीं आशेचा करूं गळगा ।
वासनेसी करवूं शिमगा । लावूं देशोधडी ॥ ८२ ॥
तृष्णेचें करूं निःसंतान । पाताळीं घालूं अभिमान ।
कीं असूयेचें रक्तपान । करूं मुखें ॥ ८३ ॥
इंद्रियांचे पाडूं दांत । कीं प्राणांचें वळूं सूत ।
मनातें बांधूं त्यांत । सहितबुद्धि ॥ ८४ ॥
हें असो संचितातें । बिंदुलें घालूं हातें ।
क्रियमाण मारूं लातें । सहप्रारब्ध ॥ ८५ ॥
गुरूनें थापटितां पाठी । बळ चढलें शतकोती ।
आवेशें उडोनि जगजेठी । पिटी भुजा ॥ ८६ ॥
आतां उपडून काढूं मेरू । कीं आकाशा देऊंधीरू ।
कीं उडवूं सप्त सागरूं । हस्तचपेटें ॥ ८७ ॥
उपडूं सप्तही पाताळ । त्यां दाखवूं सूर्यमंडळ ।
कीं सूर्यासी भूमीचा तळ । दाखवूं आतां ॥ ८८ ॥
नक्षत्रें करूं गोळा । वायूची करूं माळा ।
कीं भूमीचिया चडळा । कालवूं आपीं ॥ ८९ ॥
कीं हीं चवदा भुवनें । वैकुंठकैलासादि स्थानें ।
एकत्र करूं आसनें । देवादैत्यांचीं ॥ १९० ॥
विष्णु शिव दोन्ही धरूं । हृदयामाजी सगळे भरूं ।
कीं काखेंमाजी आवरूं । ब्रह्मदेवा ॥ ९१ ॥
निजानंदक्षीरसागरी । मोक्षसंजीवनीगिरी ।
आणूं क्षणार्धामाझारी । मारुतीऐसा ॥ ९२ ॥
अहंकाररावणें शक्ती । मारिली प्रेमलक्ष्मणाप्रती ।
तो उठवून गुरु रघुपती । भेटवूं आतां ॥ ९३ ॥
भाव भरत अंतरला । दुरीच्या दुरी राहिला ।
आतां निवटूनि राक्षसांला । अनुभूतिसीता आणूं ॥ ९४ ॥
निजसुखविमानारूढ । गुरु रामा करवूं दृढ ।
पुरवूं भरताचें कोड । कौसल्यासुमतीसह ॥ ९५ ॥
ऐसा मुखें बडबडी । हर्षें नाचे मारी उडी ।
हें देखोनि लवडसवडी । सद्‍गुरुनाथ ॥ ९६ ॥
म्हणती यासी ज्ञान नसतां । हर्ष दाटला अवचिता ।
आतां आम्ही उपेक्षितां । बहकेल उन्मत्तपणें ॥ ९७ ॥
ऐसा सच्छिष्य आम्हांसी । कैसा मिळेल पुण्यराशी ।
जयातें देखतां नेत्रांसी । भरतें दाटे ॥ ९८ ॥
आतां याचा हर्षपूर । उतरिला पाहिजे निर्धार ।
म्हणूम पसरूनियां कर । हृदयीं धरिला ॥ ९९ ॥
म्हणती सवध देवदत्ता । मायेनें ग्रासिलें तुज आतां ।
हें आधीं पाहें पुरता । अंतरीं विचारें ॥ २०० ॥
ऐसें ऐकतांचि उत्तर । जिरला आनंदाचा पूर ।
मग भयें कांपे थरथर । सोडवीं सोडवीं म्हणे ॥ १ ॥
राज्यपदीं एकाएकीं । बैसतांचि हर्ष रंकीं ।
वायु भोंक पाडूं मस्तकी । पाहे तेव्हां ॥ २ ॥
तेहें महाभय होतां । तरीच प्राणीं वांचे तत्त्वतां ।
तैसेंचि घडलें देवदत्ता । महापूर ओहटे ॥ ३ ॥
मग सन्मुख वैसविलें । निरूपणातें आरंभिलें ।
आतां सावधान वहिलें । हर्ष-भय टाकीं ॥ ४ ॥
श्रीगुरु विचारिती मनीं । हा अधिकारियांमाजी शिरोमणी ।
उपदेशितां एके वचनीं । सर्व संशय ग्रासील ॥ ५ ॥
परी तेंचि आतां उपदेशितां । धणी न पुरे आमेचे चित्ता ।
हळूहळू ब्रह्मसुख देतां । उभयपक्षीं बरें ॥ ६ ॥
ऐशिया हेतू गुरुराय । सांगती सदाचरणसोय ।
म्हणती सखया सावध होय । श्रवण करीं गा ॥ ७ ॥
येथेऊन बोलिजे सदाचार । तेरा श्लोकीं निर्धार ।
शब्द थोडे अर्थ फार । ज्ञात्यांचीं लक्षणें ॥ ८ ॥
तुवां मागें पुशिलेंहोतें । क्रियेचें कारण कोणतेण् ।
तेंचि स्पष्ट करूं मागुतें । क्रियारूप हेंनव्हे ॥ ९ ॥
प्रातःस्मरण शौच स्नान । अघमर्षण संध्या जप तर्पण ।
अग्निहोत्र अर्चन मौन । ध्यान भोजन बारावें ॥ २१० ॥
नांवे मात्र भिन्न भिन्न । एकरूप असती संपूर्ण ।
विचाररूपें निदिध्यासन । कीं समाधान ज्ञात्यांचें ॥ ११ ॥
पूर्वीं जेव्हां वेदविभाग । करून केले दोन भाग ।
दोघां अधिकारियां मग । उपदेशिले ॥ १२ ॥
अंतःकरणशुद्धि जयाची । होऊन इच्छा व्हावी ज्ञानाची ।
त्यासी क्रियारूप कर्माची । खटाटोपी ॥ १३ ॥
प्रजापति आदिकरूनिई । प्रवर्तती तये आचरणीं ।
मार्ग चालिला तेथूनी । स्वस्वकर्माचा ॥ १४ ॥
जया जाणणें मात्र उरलें । विचारज्ञाना पात्र झाले ।
उपदेशमात्र पावले । समाधान सनकादि ॥ १५ ॥
सर्वांच्या पूर्वींच उत्पन्न । तेव्हांपासून पंचवर्षी वय पूर्ण ।
एवं कल्प जातांही अधिकन्यून । वय तोंनव्हे ॥ १६ ॥
व्रतबंधचि नाहीं मुळीं । कैसे पडती कर्मसांकळीं ।
सदा ब्रह्मानंदकल्लोळीं । विचरती महीं ॥ १७ ॥
हेही परंपरा चालिली । शुकादिकीं आकळिली ।
तयांचे आचरणाची किल्ली । सांगूं तुज ॥ १८ ॥
अधिकारभेदें ब्राह्मण । दोन दोघांचीं लक्षणे ।
वेगळाली क्रिया पूर्ण । त्याची याची ॥ १९ ॥
त्याचे स्मरण प्रातःकाळीं । हा तो असे स्मरणा मुळीं ।
ते काढिती देहाची मळी । हा तरी अवधूत ॥ २२० ॥
हेंही त्या त्या प्रसंगीं । बोलिजेल तुजलागीं ।
परी समजें क्रिया वाउगी । ज्ञात्याचे ठायीं ॥ २१ ॥
आतां अनुक्रमें ऐकावें । स्नानसंध्यादि बरवें ।
प्रातःस्मरण समजावें । तिन्ही स्लोकीं आधीं ॥ २२ ॥
श्रोते ऐका सावधान । आचार्य ओळला कृपाघन ।
तुम्हींही चातक होणें । पांतेकरी देवदत्ता ॥ २३ ॥
उपनिषद्‍रूप धेनूचे । आचार्य दोहिते अर्थदुग्धाचे ।
देवदत्त वत्स तेथिंचे । कल्पिले पाना ॥ २४ ॥
धेनू पान्हावे वत्सासाठीं । परी सर्वांची होतसे पुष्टी ।
म्हणून तुम्हीं उठाउठीं । अर्थपान करा ॥ २५ ॥
प्रस्तुत वेदांची जननी । ब्राह्मणांची कुळस्वामिणी ।
या श्लोकाचे व्याख्यानीं । त्रिपदा असे ॥ २६ ॥
देवदत्ता ऐसें म्हणसी । गायत्री जप ब्राह्माणांसी ।
ते हें आणिले स्मरणासी । याचें प्रयोजन ऐकें ॥ २७ ॥
उत्पन्न होतां हें जग । अज्ञानींच याची वाग ।
नाहीं ज्ञानाचा योग । किंचिन्मात्र ॥ २८ ॥
मग सर्वेश्वरें पाहूनी । प्रेरिली अपौरुषी वाणी ।
ते हे गायत्री प्रणवरूपिणी । विस्तारिली ॥ २९ ॥
सर्वेश्वराचे अंतरींचा । हेतू अवधारीं साचा ।
अर्थ जाणून गायत्रीचा । ज्ञानसंपन्न व्हावें ॥ २३० ॥
सनकादि वेगळे करून । जीव भ्रष्ट केले कामनेनें ।
विचारें आम्हां काय कारण । भोग पाहिजे म्हणती ॥ ३१ ॥
सृष्टिकर्त्यासी संकट तेव्हां । कैसें करावें या जीवां ।
भोग निवर्तवून ज्ञानदिवा । लावी कवण ॥ ३२ ॥
मग वसिष्ठादिकीं जीवांच्या कणवें । गायत्रीचें अनुष्ठान बरवें ।
स्वयें करून लावावें । जनां मार्गीं ॥ ३३ ॥
अर्थेवीण ज्ञान कैचें । हृदयशुद्धिद्वारा पात्र त्यचें ।
होती म्हणून गायत्रीचें । प्रेरण कर्मीं ॥ ३४ ॥
तुज अधिकारी दोन । पूर्वीं सांगितले ब्राह्मण ।
अज्ञानासी अनुष्ठान । वचार तो ज्ञानिया ॥ ३५ ॥
त्या ब्राह्मणा त्रिकाळीं जप । यासी नको क्रियारूप ।
अर्थविचारेंचि अमूप । समाधान पावले ॥ ३६ ॥
तस्मात् विचारवंत नर । प्रातःस्मरणीच त्या अधिकार ।
यास्तव स्मरणरूप विचार । ऐकें गायत्रीचा ॥ ३७ ॥
त्रिपदेचा करून श्लोक । पदें घातलीं सकळिक ।
दोन्ही असती अधिक । अन्वयें कळती ॥ ३८ ॥


प्रातः स्मरामि देवस्य सवितुर्भर्ग आत्मनः ।
वरेण्यं तद्धि यो यो नः चिदानंदे प्रचोदयात् ॥ ३ ॥


परमात्मा आमुच्या बुद्धी । प्रेरीरसे चिदानंदीं ।
तोचि आत्मा निरवधी । प्रभातीं स्मरों ॥ ३९ ॥
स्वप्रकाशक देव । उत्पत्तिकर्त्या सविता नांव ।
सर्वदहनचि स्वभाव । भ्र्ग वरिष्ठ तोचि ॥ २४० ॥
आतां हेंचि एकेक पद । स्पष्ट कीजेल विशद ।
अर्थ जाणतां होय निर्द्वंद्व । श्रवणात्रें ॥ ४१ ॥
प्रातःकालीं स्मरावें । त्या प्रातःस्मरण म्हणावें ।
परी आधीं समजावें । प्रभातासी ॥ ४२ ॥
अज्ञानतमाचा अंत । ज्ञासूर्य प्रभा करीत ।
यासी बोलिजे प्रभात । दोन्हीकडे सारिखा ॥ ४३ ॥
परी ज्ञासूर्या अस्तोदय । ऐसें सर्वथा बोलूं नये ।
जैसा जयांचा अनुभव होय । तैसेंकल्पिती ॥ ४४ ॥
जनां दृष्टी सूर्य न पडतां । म्हणती सूर्य गेला अस्ता ।
तोचि पुन्हां नेत्रें पाहतां । कल्पिती उदय ॥ ४५ ॥
तैसा आत्मा न कळे जनां । त्यासी अज्ञान केली कल्पना ।
परी सर्वदा जो देकणा । त्या अज्ञान केवीं ॥ ४६ ॥
तोचि आत्मा ज्ञानियांसी । प्रगट कळतां अनुभवासी ।
दिसत कल्पना ऐशी । या हेतू केली ॥ ४७ ॥
रात्रचि न देखे सूर्य । तैसाचिही नेणे उदय ।
आत्मा अज्ञानचि न होय । ज्ञान तरी कैसें ॥ ४८ ॥
आत्मत्वीं नसतां ज्ञानाज्ञान । जीवासी दोहोंचा अभिमान ।
यास्तव नेणतां तम अज्ञान । जेचि रात्री ॥ ४९ ॥
अज्ञानरात्री नसे जेथें । ज्ञानदिवसचि असे तेहें ।
यास्तव मुख्य ज्ञाता समर्थ । त्या प्रभात नाहीं ॥ २५० ॥
तो काळाचा महाकाळ । अंगे ब्रह्मचि केवळ ।
तयासी कल्पितां काळ । अति दूषण कीं ॥ ५१ ॥
साधक विचारा प्रवर्तला । तयाचा हा प्रभात बोलिला ।
ज्ञानाचा अरुणोदय जाहला । विचाररूप ॥ ५२ ॥
हाचि ब्राह्ममुहूर्त बोलिजे । येथेंचि स्वमुखा लाहिजे ।
साधक विचारें उमजे । ब्रह्मत्व आपुलें ॥ ५३ ॥
असो ऐसाही प्रभातकाळ । इतरांऐसा नव्हे केवळ ।
तयासी बोलिजे विषमकाळ । हा सुकाळ सर्वदा ॥ ५४ ॥
तो असे घटिका दोन । हा सर्वदा असे परिपूर्ण ।
मध्यसंधींशीं गहन । ज्ञानाज्ञानाच्या ॥ ५५ ॥
असो ऐसा प्रभात बोलिला । पुढें निरूपणीं मन घाला ।
आधीं पदार्थ पाहिजे कळला । स्मरण कैसें तें मग ॥ ५६ ॥
आमुच्या बुद्धी जो प्रेरिता । तोचि आत्मा असंग तत्वतां ।
व्यापोनियां तीन्ही अवस्था । निर्विकारी ॥ ५७ ॥
आकाश जैसें घटांतरीं । तैसा कूटस्थ निर्विकारी ।
आकाश न लिंपे पदार्थमात्रीं । आत्मा वृत्तीशीं अलिप्त ॥ ५८ ॥
बुद्धीचा उद्‍भव हौनी । क्रीडत असे अनुदिनीं ।
जाग्रदादि अवस्था तीन्हीं । बुद्धिवृत्तीच्या ॥ ५९ ॥
जागृति स्वप्न हे दोन्ही । बुद्धीचे व्यापार प्रगट जनीं ।
सुषुप्ति नव्हे म्हणसी मनीं । तरी ऐकावें ॥ २६० ॥
जाग्रत्स्वप्नबुद्धीचा । प्रभाव असे क्रीडेचा ।
ठाव जाणावा विश्रांतीचा । सुषुप्तिकाळ ॥ ६१ ॥
लीन तरी बुद्धी झाली । अवस्था तिशींच लागली ।
तीन्ही वृत्तीं बुद्धि एकली । ज्ञाते बोलती ॥ ६२ ॥
असो तिहेंचाही साक्षी । उदासपणें अवस्था लक्षी ।
असंगत्व आपलें रक्षी । जैसें तैसें ॥ ६३ ॥
प्रेरणा हाचि विकार । म्हणसी कैसा निर्विकार ।
येथें दृष्टांत असे साचार । लोहचुंबकाचा ॥ ६४ ॥
लोह अचेतन जड । स्वतां चळणें अवघड ।
चुंबसन्निधीं वाड । भ्रमण पावे ॥ ६५ ॥
स्वतां चुंबक नव्हे चळण । आणि न घडे चाळकपण ।
परी झालें जें भ्रमण । हा आळ कोणासी ॥ ६६ ॥
वुद्धीसी स्वाअं चळण कुडें । कर्में चाळक म्हणतां तीं जडें ।
माया तरी दोहींची पडे । एकरूपता ॥ ६७ ॥
अविद्या मुळींच कांहीं नेणे । गुण तरी बुद्धीचीं लक्षणें ।
जीव ईश चाळकहोणें । तरी अवधारीं ॥ ६८ ॥
चेतनत्वें दोन्ही समान । परी चळणाकडे आले जाण ।
यांची ही प्रेरणा करी कोण । हेंचि न कळे ॥ ६९ ॥
आत्मत्वीं नसे विकारवार्ता । स्वयें चेष्टेना चेतविता ।
चंचळ स्वभावें न चळे स्वतां । आणि चळण तरी झालें ॥ २७० ॥
आता चाळकाचा संकल्प । कोठें करावा आरोप ।
यास्तवप्रेरक आत्मस्वरूप । उपाधियोगें बोलिलें ॥ ७१ ॥
बुद्धी चळती ऐशी वाटली । यास्तव श्रुतीनें कल्पना केली ।
साधकाची आशंका फेडिली । कीं आत्मा चाळक ॥ ७२ ॥
चळण मुळींच नाहीं झालें । ऐसें जे ज्ञाते समजले ।
त्यांसी प्रेरकत्वही नाथिलें । श्तुरीच प्रतिपादी ॥ ७३ ॥
असो हा प्रस्ताव येथ । प्रसंगाऐसा क्रमणें पंथ ।
बुद्धीचा चाळक समर्थ । परमात्माचि ॥ ७४ ॥
परी बुद्धीऐसा चेष्टेना । अथवा विकारें हालवेना ।
या हेतू असंग जाणा । प्रेरक बुद्धीचा ॥ ७५ ॥
बुद्धि एक उपलक्षण । परी मनाअदि इंद्रियप्राण ।
या सप्तदशांचें चळण । आत्मसत्तें होतसे ॥ ७६ ॥
ज्याच्या योगें मनासी । मननकल्पना झाली ऐशी ।
परी न जाणे अधिष्ठानासी । आपुल्या मन ॥ ७७ ॥
प्राण ज्याच्या सत्तें वावरती । त्या विकार करूं न शकती ।
ज्याच्या सत्तें चक्षु पाहती । न देखती तया ॥ ७८ ॥
श्रोत्रादि ज्ञानेंद्रियें सारीं । व्यापारती स्वरूपसागरीं ।
परी आत्मया कुसरी । नेणती कोणी ॥ ७९ ॥
वाचाआदि कर्मेंद्रियें । ज्याच्या सत्तें पावती उदय ।
तयातें हा समुदाय । उद्‍भव करीना ॥ २८० ॥
ऐसा व्यवहार सूक्ष्माचा । जीवासहित होय साचा ।
उद्‍भव आणि स्थिती लयाचा । अधिष्ठानत्वें साक्षी ॥ ८१ ॥
ऐसा सर्व लिण्गांचा समुदाय । हिरण्यगर्भ जया नांव ।
ईंशासहित लय-उद्‍भव । । जया अधिष्ठानीं ॥ ८२ ॥
ज्या ठायीं हा उद्‍भव झाला । तेथेंच असे वर्तणें याला ।
अधिष्ठानींच लय पावला । नाहीं म्हणसी ॥ ८३ ॥
शक्ति विषयाकार होती । परी अधिष्ठानींच समाप्ती ।
ऐसे हें अज्ञान नेणई । जाणती ज्ञाते ॥ ८४ ॥
याचि हेतू चिदानंद । हें अधिक घातलेंपद ।
उद्‍भव आणि उपमर्द । तयाचे ठायीं ॥ ८५ ॥
प्रेरणा हे चिदानंदीं । बुद्धीचि करी अनादि ।
ऐसिया गा संवादीं । मानवती ज्ञाते ॥ ८६ ॥
आनंदीं कैसा म्हणसी लय । तरी पाहें सुषुप्तीचा समय ।
वृत्तीचा अभाव होय । कवणे ठायीं ॥ ८७ ॥
येणें अर्थें चिदानंदाची । सार्थकता झाली पदाची ।
आतां पुढील निरूपणाची । सोय जाणावी ॥ ८८ ॥
ऐसा जो बुद्धिप्रेरक । तोचि आत्मा स्वप्रकाशक ।
भर्गादि लक्षणें एक । स्त्यावीण कवणा ॥ ८९ ॥
तत् तेंचि गा सद्‍रूप । मागां वर्णिलें त्याचें रूप ।
तिन्ही काळींनव्हे अल्प । अधिक उणें ॥ २९० ॥
हाचि ब्रह्मींचा निर्देश । श्रीकृष्ण सांगे अर्जुनास ।
असो देवशब्दें प्रकाश । सर्वांही करी ॥ ९१ ॥
जो जो व्यवहार जीवाचा होतो । आपुले स्वप्रकाशें जाणतो ।
सर्व लयाचा अंत पाहतो । स्वकीय ज्ञानें ॥ ९२ ॥
यासीच चिद्‍६रूप म्हणावें । मागें निरूपिलें बरवें ।
आतां सवित्याचें जाणावें । रूप कैसें ॥ ९३ ॥
ज्यापासून जग प्रसवे । आहे तों तेहेंच रहावें ।
आणि लय पावती सर्वे । तोचि सविता ॥ ९४ ॥
घट मातीपासून होतो । पृथ्वीवरीच वावरतो ।
पुन्हां लयही पावतो । मातीमाजी ॥ ९५ ॥
तैसा हा सर्व वृत्तांतू । उद्‍भवून लय पावतू ।
यास्तव सविता जगहेतू । लक्षण पूर्वीं बोलिलें ॥ ९६ ॥
सयाउपरी भर्गपद । तयाचा कैसा अनुवाद ।
स्वरूपाहून जितुका भेद । दहनचि करी ॥ ९७ ॥
माया अविद्या काम कर्म । जीव शिव जगद्‍भ्रम ।
अवघियांचें रूप नाम । भस्मचि करी ॥ ९८ ॥
जैसा अग्नि प्रज्वळ । भस्म करीतसे सकळ ।
सन्निधिमात्रें केवळ । अग्नीच होय ॥ ९९ ॥
तेणें रीतीं नामरूपाचा । उरोंचि नेदी ठाव त्याचा ।
अस्तिभातित्वें साचा । आपण उरे ॥ ३०० ॥
अग्नींत पदार्थ राहीना । जग तरी दिसे लोचना ।
करिशी ऐशी जरी कल्पना । तरी सावधान ॥ १ ॥
आत्मस्वरूपीं हें मुळीं नाहीं । भ्रांतीनें दिसे सर्व कांहीं ।
आत्मज्ञान होतांचि पाहीं । तेंही भस्म होय ॥ २ ॥
भ्रांति राख वरी पडली । तेणें दाहकता आच्छादिली ।
ज्ञानें अविद्या निमाली । मग नामरूप कैंचें ॥ ३ ॥
असो ज्या क्षणीं आत्मरूपाचें । परोक्षेंचि ज्ञान साचें ।
तेव्हांचि या नामरूआचे । कोळसे करी ॥ ४ ॥
मग अपरोक्षीं बोलणें काय । संकेत अवघा वायां जाय ।
आतां श्रेष्ठपदाचा अन्वय । बोलिजे अर्थ ॥ ५ ॥
चक्रवर्तीपासूनियां । ब्रह्म्यापावेतों सातिशया ।
आनंदा जाणावें वृत्तीचिया । शतशत गणती ॥ ६ ॥
राजाचें सुख अपार । फिकें होय गंधर्वांसमोर ।
देव आजानदेव पितर । तुच्छ ब्रह्मदेवापुढें ॥ ७ ॥
एक आवडे एक विटे । एक लोपे एक मेटे ।
ऐसें हें सुख गोमटें । परी खोटें सर्वही ॥ ८ ॥
सातिशय म्हणावें यासी । ब्रह्मानंदाच्या एकदेशीं ।
आणि क्षयवृद्धी सर्वांसी । वास्तव हें निकृष्ट ॥ ९ ॥
तैसा ब्रह्मानंद नव्हे । श्रेष्ठता जरी तेथेंचि आहे ।
निरतिशयानंद म्हणताहे । श्रुति तयासी ॥ ३१० ॥
त्याहून दुजा श्रेष्ठ नाहीं । अकृत्रिमानंद पाहीं ।
वरेण्य शब्द अन्या कांहीं । बोलिजेना ॥ ११ ॥
तें सुख जया होय प्राप्ती । ते तद्‍रूपची निश्चितीं ।
न्यूनाधिक नव्हे कल्पांतीं । आहे तैसें असे ॥ १२ ॥
असो वरेण्य तोचि अनंत । मागां बोलिला निश्चित ।
सर्वही पदांचा संकेत । आत्मया साजे ॥ १३ ॥
आत्मा अधिक घातलें पद । येणें सुचविला अभेत ।
इतुक्याही लक्षणीं विशद । परिपूर्ण आत्मा ॥ १४ ॥
ऐसीं हीं पदें सकळ । निर्देश ब्रह्मींचा केवळ ।
याचाचि पुन्हां प्रांजळ । अनुवाद कीजे ॥ १५ ॥
आत्मा बुद्धीचा प्रेरक । तत् ते व्याप्त सद्‍रूप एक ।
देव तोचि प्रकाशक । चिद्‍रूप जें कां ॥ १६ ॥
सविता हाचि जगहेतु । भर्ग शब्दें सर्वां जाळितु ।
आनंद सातिशयरहितु । वरेण्य ऐसा ॥ १७ ॥
तत् देव वरेण्य तीन्ही । जाणिजे हें स्वभावलक्षणीं ।
सविता भर्ग प्रेरकपणीं । आगंतुक लक्षण ॥ १८ ॥
दोन्ही लक्षणांकडून । जाणावें ब्रह्मचि परिपूर्ण ।
एवं गायत्रीचें निरूपण । ब्रह्मावबोधक ॥ १९ ॥
च्यात असों या पदाचा । स्मरतों पर्याय तयाचा ।
इतुकाचि हेतु याचा । जें प्रातः स्मरावें ॥ ३२० ॥
इतुक्याही ब्रह्मलक्षणाची । ओळख परोक्षत्वें साची ।
अपरोक्षालागीं स्मरणाची । अपेक्षा साधका ॥ २१ ॥
हें साधकाचें साधन । सिद्धाचें तों समाधान ।
या अर्थाचें निरूपण । पुढील श्लोकीं असे ॥ २२ ॥
महावाक्य गायत्री कैसी । अपेक्षा असे जरी ऐसी ।
अल्प संकेतें तयासी । बोलिजेतें ॥ २३ ॥
जीव शिव दोन्ही ऐक्य । तया म्हणावें महावाक्य ।
तोचि अर्थ निश्चयात्मक । येथें असे ॥ २४ ॥
तत्पदलक्ष्य परमात्मा । प्रेरक त्वंपदलक्ष्य आत्मा ।
जाणिजे एकचि महात्मा । आत्माचि ब्रह्म ॥ २५ ॥
वाच्यांशचि येथें नसतां । लक्षणेची कासया वार्ता ।
लक्ष्यांश ऐक्य तत्त्वतां । सहज सिद्ध ॥ २६ ॥
एवं महावाक्य त्रिपदा । न कल्पावें कांहीं भेदा ।
आत्माचि ब्रह्मसंवादा । उरी नाहीं ॥ २७ ॥
ऐसी गायत्री वेदमाता । आरंभी प्रगटली तत्त्वतां ।
अर्थविचारें पाहातां । अंगें ब्रह्मचि साधक ॥ २८ ॥
जपमातेंचि शूद्राचा । वर्ण पावे ब्राह्मणाचा ।
हा तों अनुभव सर्वांचा । प्रगट असे ॥ २९ ॥
हा विचार जे करिती । अर्थ स्वानुभवें जाणती ।
ते कां ब्राह्मण न होई । ब्रह्मविद ॥ ३३० ॥
तस्मात् येथील ज्ञानविचार । जाणती तेचि धन्य नर ।
तेचि ब्राह्मण जे इतर । कृपण ऐसें बोलिजे ॥ ३१ ॥
बत इति खेदें टाकुनि श्वास । श्रुति पावली परम त्रास ।
काय करणें ह्मणे जीवांस । मिथ्या भोगास सोकले ॥ ३२ ॥
ब्रह्मामृताचे कल्लोळीं । मुखीं घातली दांतखिळी ।
कीं निधान असतां जवळी । धरिली अंधदशा ॥ ३३ ॥
कामधेनू अव्हेरिली । कामना रासभी पोशिली ।
अहो हे कैसी भ्रमली । नेणती ब्रह्मविद्या ॥ ३४ ॥
विचार करणें सांडिला । मौन जप आरंभिला ।
तया जपें अज्ञानाला । निवर्तन कैसें ॥ ३५ ॥
ज्ञानसूर्य उदयासी । कामादि राक्षस विघ्नें त्यासी ।
करिती यास्तव मानसीं । ज्ञान प्रगटेना ॥ ३६ ॥
म्हणून गायत्री ब्रह्मास्त्र । हेंचि मुख्य महाशस्त्र ।
येणें असुर हे समग्र । मरती अर्घ्यदानीं ॥ ३७ ॥
विचार हाचि अरुणोदय । तो अर्घ्यप्रदानाचा समय ।
तेव्हां स्थूळादि देहत्रय । समर्पणा योजावें ॥ ३८ ॥
मायेसहित असुरांचा । येणें घातचि तयांचा ।
मग सन्निध ज्ञानसूर्याचा । प्रकाश होय ॥ ३९ ॥
ज्या क्षणीं ज्ञान‍उदय । तत्क्षणीं अज्ञान जाय ।
साधक अंगेंचि होय । ब्रह्मरूप ॥ ३४० ॥
देहाभिमान तैसाचि ठेविती । सूर्याकडे जळ सोडिती ।
येणें म्हणती संहारती । राक्षस सर्व ॥ ४१ ॥
अंतरीं वैरियांसी थारा । बाह्य व्यर्थचि पसारा ।
तेथें अर्थज्ञानविचारा । कोण पुसे ॥ ४२ ॥
असो या अज्ञान जनांसी ।ब्रह्मा भीतसे उपदेशीं ।
आतां यांची सुटका कैसी । कोण जाणे ॥ ४३ ॥
धन्य धन्य तेचि नर । विचारें पावले परपास ।
जितुका करण्याचा प्रकार । तितुका तेणें केला ॥ ४४ ॥
तेणें न करून सर्व केलें । येणेंकरून भ्रष्टले ।
सन्निध हातवटी चुकले । म्हणोनियां ॥ ४५ ॥
तस्मात् विचारवंत ब्राह्मण । येर अवघे हे कृपण ।
ऐसें बाह्या उभारून । श्रुति बोलिली ॥ ४६ ॥
ज्ञानसूर्य नाहीं प्रगट । न फुटे विचार हे पाहांट ।
अज्ञानरात्रीं खटपट । करिती तेंही बरें ॥ ४७ ॥
असो आतां स्मरण विचारा । बोलत असतां निर्धारा ।
अन्वयव्यतिरेकद्वारा । आत्मज्ञान कैसें ॥ ४८ ॥
पुढील श्लोकीं हें बोलणें । प्रत्यक्ष आत्मा जाणणें ।
आणि विचारें तया स्मरणें । सावधान ऐका ॥ ४९ ॥


अन्वय व्यतिरेकाभ्यां जाग्रत् स्वप्नसुषुप्तिषु ।
यदेकं केवलं ज्ञानं तदेवाह परं बृहत् ॥ ४ ॥


अन्वयव्यतिरेकांकडून । अवस्थां तिहीं एकलें ज्ञान ।
जे केवळ परब्रह्म पूर्ण । तेंचि मी ऐसें स्मरावें ॥ ३५० ॥
अवस्थेचें जाणिजे रूपक । तेथें कैसें ज्ञान एक ।
अन्वय आणि व्यतिरेक । करितां कळे ॥ ५१ ॥
अंतःकरणवृत्ति इंद्रियद्वारा । प्रवर्ते विषयव्यापारा ।
सुखदुःख घडे प्राणिमात्रां । या नांव जागृति ॥ ५२ ॥
बुद्धि जागृतिसंस्कारें । एकली नाचे विषयाकारें ।
सुखदुःखें होती अपारें । हे स्वप्नावस्था ॥ ५३ ॥
बुद्धि निःशेष होतां लीन । विश्रांति हेंचि सुख पूर्ण ।
दुःख तें कांहींनेणणें । यां नांव सुषुप्ति ॥ ५४ ॥
जागृतिकालीं ज्ञान स्फुरे । या अन्वय बोलिजे बारे ।
स्वप्नामाजी जागृति सरे । हा व्यतिरेक ॥ ५५ ॥
ज्ञानाचें स्फुरण स्वप्नीं । जाणिजे अन्वयालागूनी ।
सुषुप्तिकाळीं स्वप्नहानी । व्यतिरेक हाचि ॥ ५६ ॥
सुखमात्र होतसे भान । हेंचि अन्वयरूप ज्ञान ।
आत्मत्वीं नसे अज्ञान । व्यतिरेक ऐसी ॥ ५७ ॥
एव अवस्थेचा उदय । दुसरीचा होय क्षय ।
परी तिहीं कालीं अद्वय । ज्ञान तें एक ॥ ५८ ॥
तिहींमाजी जें आहे । तेंचि सत्य विचारें पाहें ।
एककाळी एक नव्हे । तें तें मिथ्या ॥ ५९ ॥
जागृति सत्य म्हणावी । तरी स्वप्नामाजी असावी ।
सुषुप्तीमाजी दोन्ही जावीं । हा स्वभाव मिथ्याचा ॥ ३६० ॥
क्षणक्षणां अवस्था नासती । उदय पावून हारपती ।
परी आत्मा स्वयंज्योती । उदय‍अस्तु पावेना ॥ ६१ ॥
लाट बुडबुडे फेंस तिन्ही । त्यांत अन्वयें असे पाणी ।
पाणियामाजी न दिसे नयनीं । तरंगादिक ॥ ६२ ॥
तैसें तिहींमाजी असे ज्ञान । आत्मत्वीं अवस्थेचें अभान ।
यास्तव अवस्था मिथ्या तीन । साचा तो आत्मा ॥ ६३ ॥
समाधीमाजी ध्येय मात्र । स्वानुभवें ज्ञात्यासी गोचर ।
तिन्ही अवस्थांचा केर । तेथ नसे ॥ ६४ ॥
ऐसे अन्यवय व्यतिरेक । करून जाणावें ज्ञान एक ।
अवस्थेमाजीही निष्कलंक । साक्षित्वें असे ॥ ६५ ॥
केवल शब्दें सुचविलें । कीं विकारामाजी असंग राहिलें ।
जैसें आकाश संचलें । जळीं स्थळीं ॥ ६६ ॥
शब्दस्पर्शादि विषयाकार । जालें वाट तत्तदाकार ।
परी तें ज्ञान निर्विकार । साक्षिमात्र असे ॥ ६७ ॥
दीप जैसा प्रकाशी । घरींचिया आणि चोरासी ।
परी त्या त्या कर्मासी । नेंए सहसा ॥ ६८ ॥
तैसे न्याय आणि अन्याय । जें जें देहीं कर्म होय ।
साक्षिमात्रें तेथें काय । पापपुण्य लिंपे ॥ ६९ ॥
ऐसें असून सर्वथा । कर्में स्थापिती आत्मयामाथां ।
तें तें निर्फळ गा वृथा । आत्मत्वीं नलगे ॥ ३७० ॥
मेघगतीनें चंद्रासी । चंद्र धांबतो कल्पना ऐसी ।
या आरोपे काय तयासी । धांवनें खरें ॥ ७१ ॥
असो हा विकारासरिसा । आत्मा नव्हे विकाराऐसा ।
अभंग पूर्ण जैसा तैसा । केवळपणें । ७२ ॥
परब्रह्म जें सर्वांचा । अधिष्ठानरूप साचा ।
जेथें अंत मायेचा । जीवेशांसह ॥ ७३ ॥
त्यासीच बृहत् हा संकेत । केला असे निश्चित ।
जें कां ब्रह्म सदोदित । सच्चिदादि बोलिलें ॥ ७४ ॥
एवं हा साक्षी आत्मा । तो जाणिजे परमात्मा ।
परोक्षापरोक्ष नामा । भेद जाला ॥ ७५ ॥
हें मी हेंचि गा अपरोक्ष । तें ब्रह्म जालें परोक्ष ।
आत्मा ब्रह्म नव्हे हा पक्ष । अर्थात् सिद्ध झाला ॥ ७६ ॥
तरी आतां ऐसें करावें । हें तें दोन्ही शब्द टाकावे ।
एकरूपचि जाणावे । प्रत्यगात्मा ब्रह्म ॥ ७७ ॥
जैसा मी पूर्वीं बाळपणीं । खेळत होतों अनुदिनीं ।
ते व्यक्ति आठवितां मनीं । दुजा झाला ॥ ७८ ॥
परी आतां तरुणकाळीं । व्यक्ति तरी स्पष्ट देखिली ।
इतुकेनें काय भेदावली । तनु पुरुषाची ॥ ७९ ॥
तैसी तो म्हणतां नव्हे भेद । तोचि हा आत्मा अभेद ।
येथें लक्षणेचा संवाद । तो पुढें बोलिला ॥ ३८० ॥
वुचारें प्रभातें स्मरावें । मागील निरूपणा चित्त द्यावें ।
तेंचि येथें अनुभवावें । स्मरण कैसें ॥ ८१ ॥
तिहीं अवस्थांचे ज्ञान । आणि परब्रह्म परिपूर्ण ।
तेंचि मी हें अनुसंधान । अखंड राखावें ॥ ८२ ॥
स्मरणासहित जागें व्हावें । स्मरण धरून झोंपीं जावें ।
यावत्प्राणही राखावें । अनुसंधान साधकें ॥ ८३ ॥
हेचि अवधि असे याची । विचारारुणोदयकाळाची ।
येथें अनुसंधानस्मरणाची । अखंडता ऐसी ॥ ८४ ॥
जागृतिबोजनादि व्यापार । होती जाती अपार ।
परी आत्मतत्त्वाचा विसर । पडोंचि नये ॥ ८५ ॥
ऐसा अभ्यास हा करितां । निःसंशय पावे अपरोक्षता ।
ज्ञानसूर्य प्रगट होतां । अंगेंचि ब्रह्म ॥ ८६ ॥
मग जयातें स्मरावें । तेंचि आपण स्वभावें ।
न करितांही असावें । स्मरणरूप ॥ ८७ ॥
विसरचि मुळीं असावा । तरीच स्मरणाचा प्रस्तावा ।
स्मरणविस्मरणाचा व्हावा । उदय जेथूनि ॥ ८८ ॥
तोचि ज्ञाता आपण । किमपि नसे द्वैतभान ।
हेंचि सिद्धाचें स्मरण । करणें तें साधकां ॥ ८९ ॥
साधकें कैसें स्मरावें । तें स्पष्ट बोलिले आघवें ।
ऐसेंचि अखंड राखावें । साधकीं स्मरण ॥ ३९० ॥
आतां पुढील श्लोकीं बोलिजे । अर्थीं अवधान दीजे ।
तेणें ज्ञात्याचें आकळिजे । समाधान कैसें तें ॥ ९१ ॥
हेंही जाणिजे स्मरणरूप । अंगें ब्रह्म चिद्‍रूप ।
येथें अनुमान न अल्प । साधकीं न करावें ॥ ९२ ॥


ज्ञानाज्ञानविलासोऽयं ज्ञानाज्ञाने च पश्यति ।
ज्ञानाज्ञाने परित्यज्य ज्ञानमेवावशिष्यते ॥ ५ ॥


हा विलास ज्ञानाज्ञानाचा । ज्ञानाज्ञानरूप दिसे साचा ।
वोहट होतांचि चोहींचा । ज्ञानमात्रचि उरे ॥ ९३ ॥
विलासशब्दें जें जें दिसे । आणी सूक्ष्मत्वें जें भासे ।
मा दोहींचेही मूळ असे । ज्ञानाज्ञान ॥ ९४ ॥
अहं ब्रह्म झाले स्फुरण । तेथें असती हे दोन ।
तितुक्या स्फुरणासी जाणोन । हें ज्ञान ओळकीं ॥ ९५ ॥
आपुले पूर्णत्वाचा विसर । हेंचि अज्ञान निर्धार ।
पुढें झालें जें साकार । विपरीत ज्ञान तें ॥ ९६ ॥
पूर्वीं रज्जु देखिली ज्ञानें । परी रज्जुतें रज्जु न म्हणे ।
त्यासी अज्ञान ओळखणें । विपरीत ज्ञानें सर्प झाला ॥ ९७ ॥
ऐसा जो अन्यथाभास । याचेंचि नाअंव विलास ।
दोनी कारणें असती यास । ज्ञानाज्ञानें ॥ ९९ ॥
त्याचि विसालामाझारी । ज्ञानाज्ञानाची सरोभरी ।
नामरूपें दिसती सारीं । ज्ञानाज्ञानरूप ॥ ४०० ॥
ज्ञानें पाहतो नमरूप । परी नेणे वास्तव रूप ।
जेंचि जाणिजे स्वरूप ।ज्ञानाज्ञानाचें ॥ १ ॥
अज्ञाचि जडत्वा आलें । ज्ञानचि अन्यथा भासलें ।
चकारें हेंचि सुचविलें । ज्ञानाज्ञान पाहे ॥ २ ॥
अज्ञान ते आवरणशक्ती । ज्ञानासी विक्षेप म्हणती ।
हेचि कारणें उभय होती । आणि वस्ती दोहींची ॥ ३ ॥
अथवा अज्ञानप्रकृती । ज्ञानपुरुष स्वयंज्योती ।
दोन्ही कारणें आणि वस्ती । विलासीं दोहींची ॥ ४ ॥
दोहींगेगळें तिसरें । न दिसे येथें साकारें ।
सणुसहित ब्रह्मांड बा रे । व्यापिलें दोहींनीं ॥ ५ ॥
ऐशिया भ्रमाचें निरसन । होय जरी आत्मज्ञान ।
रज्जु यथार्थ ओळखणें । येणें सर्पहानि जैसी ॥ ६ ॥
तैसीं नामरूपें मिथ्या असती । अस्तीभातीवरी दिसती ।
यथार्थ ओळखितां जाती । पुढें आत्माचि उरे ॥ ७ ॥
आत्मा जाणिला ज्या ज्ञानें तेंही मिथ्यात्वें त्यागणें ।
कांता काढून कांटियानें दोन्हीही त्यागिजे ॥ ८ ॥
जोंवरी अज्ञान आश्रय । तों काल ज्ञान पावे उदय ।
अज्ञान नासून आपण जाय । त्यासवें नासूनि ॥ ९ ॥
जैसें निवळीबीज जाण । पाणियाचा गाळ नासून ।
आपण नासे परी जीवन । उरे जैसें ॥ १० ॥
येणें रीती ज्ञानाज्ञान । दोहींतेंही त्यागून ।
उरे केवळ ज्ञानघन । निजांगें ब्रह्म ॥ ११ ॥
मग डोळां दृष्य दिसो । अथवा एकदांचि नासो ।
परी आत्म्यावीण अतिसो । दुजा नाहीं ॥ १२ ॥
ऐसा निश्चयचि झाला । संशय अवघाचि मेला ।
ज्ञानाज्ञानेंविण उरला । ज्ञप्तिमात्र आत्मा ॥ १३ ॥
ऐसा ज्ञाता समाधानीं । स्मरणविस्मरणाचा धणी ।
करणें न करणें दोन्ही । समाप्त झालीं ॥ १४ ॥
ऐसें करण्या न करयावीण । अखंड जयाचें स्मरण ।
हें सिद्धाचें समाधान । कळलें कीं तुज ॥ १५ ॥
मागील श्लोकीं विचारसाधन । या श्लोकीं हें समाधान ।
ऐसें हें प्रातःस्मरण । साधक सिद्धाचें ॥ १६ ॥
असो तिहीं श्लोकींचें निरूपण । या रीतीं झालें प्रातःस्मरण ।
हेंचि ज्ञात्याचें आचरण । इतरां कळे ॥ १७ ॥
उगेचि पहांटे उठई । मुखें कांहीं बडबडती ।
आम्ही नैष्ठिक म्हणविती । लोकाचारें ॥ १८ ॥
मन जाआं भलतीकडे । स्मरण तरे कैसें घडे ।
असो हें सर्व कुडें । ज्ञानेंविण ॥ १९ ॥
आतां बोलिजे शौचविधी । जो कां ज्ञात्याचा समधी ।
येथिंच्या अर्थासी आधीं । चित्त द्यावें ॥ ४२० ॥


अत्यंतमलिनो देहो देही चात्यंतनिर्मलः ।
असंगोऽहमिति ज्ञात्वा शौचमेतत्प्रचक्षते ॥ ६ ॥


देह तो मलिन अत्यंत । आत्मा निर्मल सदोदित ।
असंग ऐसा मी जाणत । शौच त्यातें बोलिजे ॥ २१ ॥
देह एक उपलक्षण । परी सर्वही तत्त्वें मलिन ।
जीं व्यापिलीं अविद्येनें । यांसी शुद्धता कैंची ॥ २२ ॥
स्थूल देह अस्थिमांसांचा । सूक्ष्मीं कामादि विकार साचा ।
कारणीं तो अज्ञानाचा । ठावचि असे ॥ २३ ॥
हें विटाळाचें घर । कीं अशुद्धीचें भांडार ।
केवळ जैसें मळमूत्र । अपवित्रपणें ॥ २४ ॥
यासी शुद्धि करूं म्हणतां । त्या लाज न वाटे चित्ता ।
मृत्तिका जीवनें धुतां । कष्टमात्र ॥ २५ ॥
जैसें गाढव धुतलें । पीतांबरें विष्टिलें ।
सोंवळें करून आणिलें । ब्राह्मणपंक्ती ॥ २६ ॥
परी त्या ब्राह्मण शिवती ना । तैसें देह सोंवळें होईना ।
हें ज्ञाते जाणती अज्ञाना । कळे काय ॥ २७ ॥
नानातीर्थीं हें भिजविलें । तप्तमुद्रेने लासिलें ।
जरी वरिवरी तासिलें । तरी शुद्ध नव्हे ॥ २८ ॥
असो हें बोलतां न सरे । वर्णिता ग्रंथ विस्ताते ।
थोडियाचि अनुकारें । समजावें ऐसें ॥ २९ ॥
ऐसिया देहामाजीच राहे । असंग निर्विकारेंच आहे ।
सर्वांतें साक्षित्वें पाहे । तोचि आत्मा निर्मळ ॥ ४३० ॥
जैसा घट बाटला । धुणें न लागे आकाशाला ।
तैसे देहसंबंधें आत्मयाला । प्रायश्चित्त नको ॥ ३१ ॥
आकाश हें नाहीं कोठें । परी त्या त्या पदार्थें न वाटे ।
तैसा आत्मा घन दाटे । पदार्थमात्रीं ॥ ३२ ॥
स्वर्गनरकीं व्यापला । परी न शिवे पापपुण्याला ।
आणि सुखदुःखादि द्वंद्वाला । न लिंपेचि ॥ ३३ ॥
आकाश जरी अतिसुद्ध । परी न्यूनपणें तें अशुद्ध ।
आत्मा सहज शुद्ध बुद्ध । नव्हे आकाशाऐसा ॥ ३४ ॥
नी व तो निःशेष वाळिला । ईश्वरमायेनें बाटविला ।
उपमितां स्वस्वरूपाला । साहित्य न बाटे ॥ ॥ ३५ ॥
असो ऐसा उपमेवीण । निर्मळ असंग पूर्ण ।
मुळीं शुद्धचि त्यासा कवण । शुद्धी करूं शके ॥ ३६ ॥
चकारें निश्चय केला । शुद्धता न येचि देहाला ।
आत्मा निर्मळचि संचला । त्या शुद्धता नलगे ॥ ३७ ॥
तरी शौच कैसा म्हणसी । अवधारीं गा मानसीं ।
मी असंग निश्चयेंसीं । अनुसंधानरूपें ॥ ३८ ॥
देहबुद्धीचें पाप गेलें । अखंड ब्रह्म स्फुरूं लागलें ।
सहज शुद्धता पावले । साधक निदिध्यासें ॥ ३९ ॥
यासी शौच बोलिजे । साधक विचारें उमजे ।
सिद्धत्वीं तों नाहीं दुजें । शुद्ध बुद्धचि तो ॥ ४४० ॥
ऐसें अज्ञान नेणती । देहातें शुद्ध करूं जाती ।
त्रिसप्तकें लावूनि माती । नासिती उदक ॥ ४१ ॥
असो या भ्रमिकासी । काज नसे निश्चयेंसीं ।
ज्ञात्याचे शौचविधीसीं । बोलिले अल्प ॥ ४२ ॥
शौचा‍उपरी स्नान । तयाचें कैसें लक्षण ।
या श्लोकीं हें निरूपण । बोलिजे ज्ञात्याचें ॥ ४३ ॥


मन्मनो मीनवन्नित्यं क्रीडत्यानंदवारिधौ ।
सुस्नातस्तेन पूतात्मा सम्यग्विज्ञानवारिणा ॥ ७ ॥


उत्तम ज्ञानजलें सुस्नात । तेणें होत्साता पूत ।
मन आनंदसमुद्राआंत । नित्य क्रीडत मीनापरी ॥ ४४ ॥
ज्ञानाज्ञान मावळूनि । उरे जें कां पूर्णपणीं ।
त्यासीच बोलती ज्ञानी । विज्ञान उत्तम ॥ ४५ ॥
तया विज्ञानजळें जाण । मनें करूनियां स्नान ।
स्नानशब्देंनव्हे भिन्न । पूर्णपणीं समरसे ॥ ४६ ॥
जेथें अनुभव वेगळा ।उमसूं नेदी एकहेळां ।
लवण जैसें मिळे जळा । ऐसें अभिन्न झालें ॥ ४७ ॥
तेणें पवित्रता कैसी । बोलतां न ये वाचेसीं ।
तिळोदक पापपुण्यासी । दिधलें जेणें ॥ ४८ ॥
निश्चयेंशीं होतां अभिन्न । निःशेष हरपलें द्वैतभान ।
तेंचि पुन्हां उमसून मन । द्वैतेंवीण क्रीडे ॥ ४९ ॥
आनंद मार्गें वर्णिला । हचि सागर संचला ।
सीमाचि नसे जयाला । ऐलपैल ॥ ४५० ॥
मनासी मीन कल्पिलें । यास्तव आनंदसिंधु बोलिलें ।
परी समानत्वें उपमिलें । न वचे कदा ॥ ५१ ॥
ऐसा जो आनंदसागर । नित्य परिपूर्ण अपार ।
त्यामाजी मन हें निरंतर । क्रीडें अनुदिनीं ॥ ५२ ॥
स्वप्न सुषुप्ति जागर । कांहींच नेणें अणुमात्र ।
जो जो देखे पदार्थमात्र । तें चिन्मात्र ब्रह्म ॥ ५३ ॥
जडचेतन हें टाकिलें । नामरूप विसर्जिलें ।
जें जें दृश्य देखिलें । तें तें ब्रह्म ॥ ५४ ॥
अंतरीं कांहीं आठवी । भासमात्रें दिसावी ।
तेथेंही देख गोंसावी । सच्चिदानंद ॥ ५५ ॥
कल्पना जेव्हां सांडी । विज्ञानजळीं मारी बुडी ॥
तेथें नामरूपाची सांकडी । मुळींच नाहीं ॥ ५६ ॥
आतां जागृतीं व्यापारो । अथवा स्वप्नीं वावरो ।
कीं निःशेष जाउनि मुरो । सुषुप्तीमाजी ॥ ५७ ॥
परी सच्चिदानंदावीण । नामरूप न देखे जाण ।
ऐसा निश्चय बाणला पूर्ण । निःसंशय ॥ ५८ ॥
समुद्रामध्यें मासोळी । नव्हे जैसी जळावेगळी ।
तैसें ब्रह्मानंदकल्लोळीं । क्रीडतें मन ॥ ५९ ॥
ऐसें हें स्नान ज्ञात्याचें । पूर्वरीतींच हें दोहींचें ।
करण तेंचि साधकाचें । सिद्धाचें सहज ॥ ४६० ॥
हें काय कळे अज्ञाना । प्रवर्तती जलाच्या स्नाना ।
त्रिकालही करितां जाणा । काय होतें ॥ ६१ ॥
त्यासी यासी महदंतर । ज्ञाती जाणती विचार ।
ज्ञात्याचा जो आचार । अक्रियरूप ॥ ६२ ॥
स्नानकाळीं अघमर्षण । तयाचें कैसें लक्षण ।
येणें श्लोकें निरूपण । ज्ञात्याचें ऐका ॥ ६३ ॥


अथाघमर्षणं कुर्यात् प्राणापाननिरोधतः ।
मनः पूर्णे समाधाय मग्नः कुंभो यथार्णवे ॥ ८ ॥


आतां प्राणापान निरोधून । घट जैसा सागरीं मग्न ।
तैसें पूर्णीं स्थापूनि मन । अघमर्षण कीजे ॥ ६४ ॥
पूरक कुंभक रेचकेंसी । बोलिजे प्राणायामासी ।
योगशास्त्रोक्त जरी म्हणसी । तरी अवधारीं ॥ ६५ ॥
अधोगमन अपानाचें । ऊर्ध्वगमन तें प्राणाचें ।
हेंचि मुख्य रूप त्याचें ओळखावें ॥ ६६ ॥
शक्तिबीज तो सकार । पुरुषबीज तो हकार ।
ऐसीं हीं दोन्ही अक्षरें । अधोर्ध्वगामी ॥ ६७ ॥
हे वायूमध्यें राहती । प्राणासवें येती जाती ।
यांचा ज्ञाते अर्थ जाणती । तो मी ऐसा ॥ ६८ ॥
सकारें नामरूप दिसे । हकारें स्वयेंचे नासे ।
अधऊर्ध्वगमन ऐसें । उद्‍भवलय ॥ ६९ ॥
दोन्ही अक्षरें एक कीजे ।अर्थरूप साक्षी जाणिजे ।
यासी प्राणायाम बोलिजे । निरोधरूपें ॥ ४७० ॥
नमरूप जें गोचर । सांडितां जडभाग साकार ।
हाचि जाणिजे प्रकार । रेचकाचा ॥ ७१ ॥
अस्तिभातिप्रियबुद्धि । जो हकाररूपें साची ।
हा पूरकाचा विधी । साक्षित्वें पाहें ॥ ७२ ॥
चंचल जाणिव दोहींचा । अधिष्ठानरूपें साचा ।
तेथें अंकुर मनाचा । निश्चळ करी ॥ ७३ ॥
हाचि कुंभक निश्चित । जेथें मनाचा अंत ।
त्रिविध प्राणायामांत । ऐसें ओळखावें ॥ ७४ ॥
या प्राणायामेंकरून । पूर्णत्वीं स्थापिलें मन ।
जें कदा नव्हे भिन्न । स्वरूपावेगळें ॥ ७५ ॥
वेगळें तों मुळीं नाहीं । रज्जूवरील जैसा अही ।
डगेंचि कल्पितां पाहीं दिसूं लागे ॥ ७६ ॥
ज्ञानें जाणूनियां स्वरूप । सांडावा मनाचा आरोप ।
पुढें सहज आपेंआप । अधिष्ठानी मुरे ॥ ७७ ॥
भिन्नपणा जैं मोडला । अंकुर तदाकार जाला ।
आत्मरूपीं समरसला । अभिन्नपणें ॥ ७८ ॥
घट जैसा सागरीं । बुडतां जळाअंतबारेही ।
तेणें रीतीं हें निर्धारीं । मन पूर्ण झालें ॥ ७९ ॥
ऐसें स्थापूनियां मन । मग कीजे अघमर्षण ।
जे हें नसे द्वैतभान । पूर्ण अद्वैतीं ॥ ४८० ॥
अघशब्दें पुण्यपाप । दोन्हीं निमालीं आपेंआप ।
हें मुख्य जाणिजे स्वरूप । अघमर्षणाचें ॥ ८१ ॥
पूर्वीं स्नानाची झाली रीती । तदंग अघमर्षण ज्या म्हणती ।
येथें बोलिलें निगुतीं । ज्ञानरूपचि ॥ ८२ ॥
ऐसें हें अघमर्षणयुक्त । जो साध्क स्नान करीत ।
तो निजांगें ब्रह्म होत । अल्पचि काळें ॥ ८३ ॥
जो निजांगें ब्रह्म झाला । सिद्ध ऐसें म्हणावे त्याला ।
तेणें करण्या न करण्याला । उरी नाहीं ॥ ८४ ॥
ऐसें न जाणतां लोक । बलात्कारें धरिती नाक ।
जळामाजी अवश्यक । बुडविती देह ॥ ८५ ॥
एथें अघमर्षण कैचें । पापपुण्यचि वरी साचें ।
नांवमात्र स्नानाचें । परी तें नव्हे ॥ ८६ ॥
असो स्नान अघमर्षण । दोन्हींचे झालें निरूपण ।
आतां संध्याविधी जाण । या श्लोकीं बोलिजे ॥ ८७ ॥


लयविक्षेपयोः संधौ मनस्तत्र निरामिषम् ।
स संधिः साधितो येन स मुक्तो नात्र संशयः ॥ ९ ॥


लय विक्षेपसंधींआंत । मन तेथें विषयरहित ।
तो संधि साधितां मुक्त । येथें संशय नाहीं ॥ ॥ ८८ ॥
लय म्हणजे समाप्ती । विक्षेप म्हणजे उद्‍भवती ।
या संधीमाजी ज्ञप्ती । सामान्य प्रकाश ॥ ८९ ॥
मनादि उद्भवती जेव्हां । विशेषें दिसती तेव्हां ।
तेणें आच्छादन दिसावा । अनन्यभाव ॥ ४९० ॥
ऐसें एकाचें एक दिसतां । नाथिली आली बद्धता ।
यास्तव संधि हा साधितां । सामान्य साक्षी कळें ॥ ९१ ॥
मन होता पदार्थाकार । हा विशेषाचा प्रकार ।
सामान्य तो साक्षीमात्र । ज्ञ्ञाज्ञानाचा ॥ ९२ ॥
जागृतीस्वप्नांच्या अंतीं । सुषुप्ती न ये पुरती ।
या संधीमाजी ज्ञप्ती । सर्वजनांसी ॥ ९३ ॥
तो संधि जरी पाहणें । तरी जागृतीमाजी जाणणें ।
सर्वदा संधि ओळखणें । बोलिजे ऐसा ॥ ९४ ॥
एक कल्पना उठून गेली । दुजी नाही उद्‍भवली ।
येथें विचारें जो मन घाली । त्यासी कळे ॥ ९५ ॥
सत्वगुणाचा होता लय । तमाचा नव्हे उदय ।
त्या संधीमाजी काय । सामान्यावीण ॥ ९६ ॥
एक विषय सांडोनि दृष्टी । दुजियावरी नव्हे पैठी ।
त्या संधीमाजी गोमटी । ज्ञप्ती दाटे ॥ ९९ ॥
एवं मन गुण प्राण । इंद्रियविषय जाण ।
लयोद्‍भवामध्यें सामान्य । प्रगटे साधकां ॥ ५०० ॥
बहु बोलणें काय । सर्वैंद्रियसमुदाय ।
घेती आपुलाला विषय । एकदांचि ॥ १ ॥
तेव्हां मन होय उदास । भांबावून सांडी कल्पनेस ।
ते समयीं सामान्य प्रकाश । ओळखिला पाहिजे ॥ २ ॥
ज्यास्तव योगी शिणती । नेणतां शून्यामजी पडती ।
तो हा लाहिजे स्वयंज्योती । संधीमाजी विचारें ॥ ३ ॥
ऐसिया गा संधीमाजी । मनादिस्फुर्ति नाहीं दुजी ।
विषय सांडून सुखशेजीं । सुखावें मन ॥ ४ ॥
ऐसा संधि जेणें साधिका । विचारें अभिन्नता पावला ।
तोचि एक मुक्त झाला । येथें संशय नाहीं ॥ ५ ॥
नाम रूप भिन्न दिसे । तेहेंचि बद्धता असे ।
अभिन्नपणेंचि होतसे । सहज मुक्त ॥ ६ ॥
अभ्यासें संधि साधतां । प्रकाश दुणावे तत्त्वतां ।
मग लयौद्‍भवीं पाहतां । सामान्यचि ॥ ७ ॥
पाणी वेगळें जाणिलें । मग तरंगींही देखिलें ।
स्वानुभवें सामाव्य कळलें । मग देखे विशेषीं ॥ ८ ॥
जोंवरी उरे अनुभव । तोंवरी सधक ऐसें नांव ।
अभिन्न होतांचि स्वभाव तोचि सिद्ध ॥ ९ ॥
ऐसी हे संध्या पवित्र । जेथें भेद नसे अणुमात्र ।
त्या संध्येमाजी साचार । जपही पाहिजे ॥ ५१० ॥
या श्लोकीं साधन जप । वोलिजे तयाचें रूप ।
साधकीं येथें साक्षेप । मन घालावें ॥ ११ ॥


सर्वत्र प्राणिनां देहे जपो भवति सर्वदा ।
हंसः सोऽहमिति ज्ञात्वा सर्वबंधैः प्रमुच्यते ॥ १० ॥


सर्वत्र प्राणिउयांच्या देहीं । जप चाले सर्वदाही ।
सोहं हंस जाणून पाहीं । सर्वबंधें सोडिजेतो ॥ १२ ॥
प्राणायामाचे उद्योगें । हंसाक्षर बोलिजे मागें ।
प्राणसवेंचि जो वागे । तो मी तो मी ॥ १३ ॥
जितुका हा जंगम प्राणी । जेथें प्राणाची रिघणी ।
तेथें या जपाची मांडणी । अनायासें ॥ १४ ॥
यातें योगी अजपा म्हणती । षट्‍चक्रयोगें साधिती ।
दोन अक्षरें ध्याती । सर्वदाही ॥ १५ ॥
परी हा जप नको ज्ञानिया । असतां अजपा नाम वांया ।
येथीचा अर्थचि समजूनियां । विचारें पाहावा ॥ १६ ॥
यास्तव श्लोकीं जाणून । अर्थ कळतां विचारून ।
तत्काळचि भवबंधन । सोडून पळे ॥ १७ ॥
विचार कैसा हा येथींचा । अवधानें पहावा साचा ।
मागें अर्थ गायत्रीचा । विस्तार केला ॥ १८ ॥
ते हे गायत्री वेदमाय । त्रिपदा दशपदीं अन्वय ।
तोचि अर्थ येथें होय । दों अक्षरेंचि ॥ १९ ॥
ब्रह्मचि प्रत्यगात्मा निश्चय । हींचि जाणा अक्षरें द्वय ।
दशपदीही अर्थ काय यावीअ असे ॥ ५२० ॥
एकाक्षरी ॐआरें । तींचि हीं दोन्ही अक्षरें ।
पुढें पावली विस्तारें । त्रिपदारूपें ॥ ३१ ॥
असो हे हंसगायत्री । तिन्ही पदें असती माझारी ।
अकार उकार मकारीं । समजून पाहा ॥ ॥ ३२ ॥
एवं येथेंचा विचार । केला पाहिजे साचार ।
जपमात्रें भवसागर । न निमे कदा ॥ २३ ॥
आत्मा ब्रह्म अभिन्न । हेंचि विचाराचें लक्षण ।
मागें झालें निरूपण । त्या रीतीं तेथें ॥ २४ ॥
एवं शंध्या जप ऐसे । विचार साधन साधकां दिसे ।
सिद्धाअंगीं अनायासें । सहजगती साधती ॥ २५ ॥
मागें बोलिला ब्राह्मण । दोहींची लक्षणें दोन ।
एका जप अनुष्ठान । विचार एका ॥ २६ ॥
त्यासीं पाहिजेत त्रिकाळ । यासी नको काळ वेळ ।
त्यापाहिजे आसनमाळ । हा मोकळा सदा ॥ २७ ॥
त्या पाणिपात्रें पूर्वमुख । या सदा ब्रह्म सन्मुख ।
त्या बुटबुट पाहिजे देख । येथें वाणी मुराली ॥ २८ ॥
त्यासी करणें लागे खटाटोप । हा सदा अक्रियरूप ।
तेथें असे पुण्य्पपाप । हा निर्लेप दोहिंसीं ॥ २९ ॥
असो संध्याजपाउतरी । तर्पण कसें निर्धारीं ।
तेंही बोलिजेल कुसरी । येणें श्लोकें ॥ ५३० ॥


तर्पणे स्वसुखेनैव स्वेंद्रियाणां प्रतर्पणम् ।
मनसा मन आलोक्य स्वयमात्मा प्रकाशते ॥ ११ ॥


निजतृप्तिसुखाकडून । स्व‍इंद्रियां करी तर्पण ।
मनें मना प्रबोधून । स्वयें आत्मा प्रकाशे ॥ ३१ ॥
परमात्मा जो असंग । निजानंदरूप अभंग ।
तेंचि होतां निजांग । अविट तृप्ती जाहली ॥ ३२ ॥
ऐसिया स्वकीय सुखानें । इंद्रियांसी तृप्त करणें ।
जया तृप्तीनें विशयांकरणें । न इच्छिती पुन्हां ॥ ३३ ॥
सृष्टिकाळीं इंद्रियदेव । निजसुखा इच्छून सर्व ।
म्हणती आम्हां ऐसा ठाव । कोणता मिळे ॥ ३४ ॥
गो अश्वादि देखिल । तेणें देव संकोचले ।
पुरुष देखतां आनंदले । टाळिया पिटती ॥ ३५ ॥
तेथेंही पडिलें अज्ञान । निसुख आच्छादिले पूर्ण ।
तेव्हां देवीं घेतलें रान । विषयसुखाचें ॥ ३६ ॥
दुकाळीं जैसीं मिडलकीं । खाती टरफलें आणि साली ।
तैसी देवां दशा झाली । विषय कोंडा सेविती ॥ ३७ ॥
तेणें पोट कधीं न भरे । अधिक धांवती सामोरे ।
क्षुधा वाढली अपारें । परी अन्न कैंचें ॥ ३८ ॥
अज्जानदुष्काळ गेला । ज्ञासुकाळ प्राप्त झाला ।
निसुखाचा पडदा फोडिला । गेव्हां झडा घालिती ॥ ३९ ॥
निजसुखाची घेआं गोडी । विषय झाले देशधडी ।
पडाली अवघ्यांची मुर्कुंडी । बराडी जैसे ॥ ५४० ॥
ताक इछितां न मिळे शिंप । त्यां सांपडला अमृतकूप ।
मग धांवूनि आपेआप । उड्या घालिती ॥ ४१ ॥
अमृताची बाणतां तृप्ती । काय साली टरफलें इच्छिती ।
ऐसियां देवा तेणें रीतीं । निजसुख लाधलें ॥ ४२ ॥
इच्छा क्षुधाची हरली । परम सुखें तृप्ति झाली ।
इंद्रियां पुष्टी कैसी आली । न बोलवे ते ॥ ४३ ॥
श्रोत्र शब्द ऐकतां । त्रासेंच फिरे मागुता ।
निजसुखाचे आंतौता । जाऊनि पडे ॥ ४४ ॥
ऐसीं त्वचादि ज्ञानेंद्रियें । आणि वाच्यादि कर्मेंद्रियें ।
हीं अवघाचि समुदायें । निजसुखीं रिघती ॥ ४५ ॥
विषय वेगळे सर्वांचे । एकमेकां घेतां नवचे ।
परी नवल या निजसुखाचें । सर्वांसी सारिखें । ४६ ॥
नामरूप कोंडा साधिला । विषयमात्रीं आनंद देखिला ।
मग पाहती जों आपणाला । तों तेंचि अंगें ॥ ४७ ॥
वेगळा भाव जो कल्पिला । तो तत्काळचि निमाला ।
ब्रह्मानंदचि दाटला । इंद्रियविषयावीण ॥ ४८ ॥
आनंदातें सेवूं गेले । तो आनंदेंचि यांसि भक्षिलें ।
विषय इंद्रिय दोन्ही झाले । एकरूप ॥ ४९ ॥
ऐसें निजसुखाकडून । इंद्रियांचें झालें तर्पण ।
हें ज्ञात्याचें समाधान । अज्ञानिया न कळे ॥ ५५० ॥
देव ऋषि आणि पितर । स्वर्गीं असती हे समग्र ।
ऐसें कल्पूनि इतर । तर्पण करिती ॥ ५१ ॥
जल देती उलट्या करें । म्हणती येणें तृप्त पितरें ।
जल तों जलींच संचरे । पितरां अंगोठा ॥ ५२ ॥
असों तेणेसी नसे काज । ज्ञात्याचें तर्पण उमज ।
ऐसिये तृप्तीची चोज । लाधली कैसी ॥ ५३ ॥
म्हणसी तरी ऐकावें । दों रीतीं हें मन जाणावें ।
अविवेकें विषयीं धांवे । तें बोधावें विवेकें ॥ ५४ ॥
दोन्हीपरीं एक मन । तेणेंचि त्यासी प्रबोधून ।
दोन्ही जातां समरसून । स्वयें आत्मा प्रकाशे ॥ ५५ ॥
मी कांही ब्रह्म नव्हे । मज हें सुखदुःख आहे ।
हेंचि अशुद्ध मन पाहें । ओळखूनियां ॥ ५६ ॥
मी आत्माचि असंग । एकलाचि अभंग ।
शुद्ध कल्पनेतें उमग । ऐसिये रीतीं ॥ ५७ ॥
अशुद्ध कल्पना ज्ञानें गेली । शुद्ध कल्पनाही विराली ।
पुढें जे कांहीं उरली । निजात्मप्रभा ॥ ५८ ॥
अहंब्रह्मस्फुरण गेलें । निजांगेंचि ब्रह्म झलें ।
सुखदुःखावीण दाटलें । निजात्मसुख ॥ ५९ ॥
ऐसें होतां समाधान । इंद्रियांसी तृप्ती गहन ।
या नांव जाणिजे तर्पण । पूर्ण ज्ञात्याचें ॥ ५६० ॥
आतां बोलिजे अग्निहोत्र । आचरण जें कां पवित्र ।
ज्ञाअरूपचि स्वतंत्र । नव्हे इतरांऐसें ॥ ६१ ॥


आत्मनि स्वप्रकाशाग्नौ चित्तमेकाहुतिं क्षिपेत् ।
अग्निहोत्री स विज्ञेय इतरे नामधारकाः ॥ १२ ॥


आत्मनि स्वप्रकाशाग्नींत । एकाहुती अर्पिती चित्त ।
ते अग्निहोत्री जाणिजेत । येर हे नामधारी ॥ ६२ ॥
देह कुण्ड हें शुद्ध केलें । विवेकानें सारविलें ।
साधनचतुष्टय मेळविलें उपसाहित्य तेथें ॥ ६३ ॥
आत्मा पूर्वारणी । प्रणव तोचि उत्तरारणी ।
ज्ञानविचार मंथास्थानीं । अनुसंधान मंथन ॥ ६४ ॥
कामादिक इंधनीं । किंचित पडतां ज्ञानाग्नी ।
सन्निध वैराग्य धनमी । फुंकिला नेटें ॥ ६५ ॥
तेव्हां ज्ञानाग्नि धडाडी । ज्वाला धांवती ब्रह्मांडीं ।
आत्मप्रकाशें बापुडीं । गेलीं नामरूपें ॥ ६६ ॥
अग्नि ऐसा प्रगटल्यावरी । आहुतीची जाणावी परी ।
बारा सोळा सांडोनि दूरी । एकाहुती योजिली ॥ ६७ ॥
जेणें नामरूप कल्पिलें । नसतांचि सर्व उभविलें ।
तें हें चित्त जाणा वहिलें । विकाररूपी ॥ ६८ ॥
निजानुभवाचे हातीं । तेचि घेऊन एकाहुती ।
आत्मा अग्नि स्वयंज्योती । टाकिली त्यांत ॥ ६९ ॥
आहुति पडतां अग्नींत । अग्नीच होऊन राहत ।
तेणें नामरूपादि संकेत । त्यासवें गेला ॥ ५७० ॥
पुढें अस्तिभातिप्रियरूप । एकलें एक अमूप ।
उरलें तयचें माप । कोण करी ॥ ७१ ॥
एक वेळे समर्पण । दुजिया काळें नसे जाण ।
आणि आहुतिही आन । दुसती नाहीं ॥ ७२ ॥
ऐसी एक वेळे एकाहुती । चित्त अर्पिलें आत्मज्योती ।
तोचि जाणिजे निश्चितीं । अग्नीहोत्री ॥ ७३ ॥
हें सिद्धाचें लक्षण । साधकाचें याहूनि भिन्न ।
क्षणक्षणां चित्त अर्पण । करी तो अग्नीहोत्री ॥ ७४ ॥
येर हे नामें मिरविती । आम्ही दीक्षित म्हणविती ।
आत्मा अग्नीतें नेणती । फुगती देहाभिमानें ॥ ७५ ॥
दृश्य अग्नीमाजी तूप । तांदुळादि जाळिती अल्प ।
म्हणती हुताशन हा अमूप । फळ देईल आम्हां ॥ ७६ ॥
असो ज्ञात्याची सरी । काय करिती वेषधारी ।
जया आत्मा दुरीच्यादुरी । अंतरला असे ॥ ७७ ॥
अग्निहोत्र झालिया । अर्चन बोलिजे शिष्यराया ।
येणें श्लोकीं न होतां क्रिया । सहजगती ज्ञात्याचे ॥ ७८ ॥


देहो देवालयं प्रोक्तो देही देवो निरंजनः ।
अर्चितः सर्वभावेन स्वानुभूत्या विराजते ॥ १३ ॥


देह देवाल बोलिजे । निरंजन देव ओळखिजे ।
स्वानुभवें अर्चितां विराजे । सर्वात्मभावें ॥ ७९ ॥
देह एक उपलक्षण । परी जें जें डोळियां दिसणें ।
ब्रह्मांड दृश्य हें संपूर्ण । जडरूपें देऊळ ॥ ५८० ॥
पंचभूतें चारी खाणी । देवमानवादि मिळोनी ।
इतुकेही देउळश्तानीं । चिरे शोभती ॥ ८१ ॥
ऐसिया देउळामाझारीं । आत्मा ब्रह्म निर्विकारी ।
एकलाचि चराचरीं । निरंजन देव ॥ ८२ ॥
जितुकीं भासती चंचळ । मायादि तत्त्वें सकळ ।
तें ओळखावें केवळ । पूजासाहित्य ॥ ८३ ॥
अहंकार हा पुजारी । देऊळ आणि सर्व सामुग्री ।
देवामाजी अर्पण करी । आपणासकट ॥ ८४ ॥
जीव ईश्वर मेळविले । हेंचि देवा स्नान झालें ।
जडजात विवेकें उगाळिलें । गंध तें हेंचि ॥ ८५ ॥
चंचळ तितुकीं सुमनें । ओंविलीं चैतन्यतंतूनें ।
सच्चिद्‍रूपी अर्पितां तेणें । अतिशोभा पावलीं ॥ ८६ ॥
अज्ञान धूप जाळिला । ज्ञानदीप उजळिला ।
धुरेंवीण दाटला । प्रकाशचि ॥ ८७ ॥
निजतृप्ति नैवेद्य पूर्ण । तंबूल अखंडैकरस जाण ।
हरपलें जें द्वैतभान । फलादि हेंचि ॥ ८८ ॥
पूर्ण जें कां समाधान । हेंचि दक्षिणाअर्पण ।
एवं झालें हें पूजन । व्यतिरेकरूपें ॥ ८९ ॥
अन्वयरूपें प्रदक्षिणा । नुगवतांही सर्वपणा ।
एकलाचि देवराणा । एकपणेंवीण ॥ ५९० ॥
मा सर्वही आपण । सर्वही देव परिपूर्ण ।
सर्वात्मभावें पूजन । सर्वीं सर्वां ॥ ९१ ॥
ऐसें ज्ञात्याचे पूजन । सर्वभावें स्वानुभूतीनें ।
अस्तिभातिप्रियत्वानें । विराजे अति ॥ ९२ ॥
हें काय कळे अज्ञाना । प्रवर्तती जडाच्या पूजना ।
आम्ही पूजक या भिमाना । बळकट केलें ॥ ९३ ॥
देहबुद्धि पोखितां जाण । मुळीं जड झाला आपण ।
कल्पिलें देव संपूर्ण । जडरूपचि ॥ ९४ ॥
धातु पाषाण गोटे । देव केले थोर धाकुटे ।
अर्चन करिती गोमटें । फलमूलजीवनें ॥ ९५ ॥
सचेतन तुलसी तोडिती । अचेतना मस्तकीं वाहती ।
तेथे देव कैंचा रे भ्रांती । पडली नेणा ॥ ९६ ॥
हे पुरे गा बडबडी । करोत जे जयां आवडी ।
अज्ञानें केलीं वेडीं । करावें काय ॥ ९७ ॥
असो ज्ञात्याचें अर्चन । झालें त्याचें निरूपण ।
पुढिले श्लोकीं मौनध्यान । ऐका कैसें ॥ ९८ ॥


मौनं स्वाध्ययनं ध्यानं ध्येयं ब्रह्मानुचिंतनम् ।
ज्ञानेनेति तयोः सम्यङ् निषेधांतःप्रदर्शनम् ॥ १४ ॥


मौन तेंचि स्वध्यायन । ब्रह्मचिंतन तें ध्यान ।
ज्ञानें वाणी मन निषेधून । दर्शन उत्तम धेयाचें ॥ ९९ ॥
वेदाध्ययन समजावें । वेद काय हें कळावें ।
यास्तव लागे हें बोलावें । अल्प कांहीं ॥ ६०० ॥
सत्य बोलतां मन विटे । असत्य तें वाटे गोमटें ।
मायिकाची भीड न तुटे । म्हणोनियां ॥ १ ॥
जनाचिया विपरीत मती । एकाचे एक भाविती ।
पाणियामाजी निजेला म्हणई । आदिनारायण ॥ २ ॥
वेद प्रगटला त्याचे श्वासीं । आणि म्हणती अपौरुषी ।
हा विरोध न काळतां त्यांसी । वेवादती वाउगे ॥ ३ ॥
असो ऐसे अनधिकारी । त्यां काज नसे निर्धारीं ।
स्वानुभवाचे अनुकारीं । बोलिजे आतां ॥ ४ ॥
अहंब्रह्म झालें स्फुरण । तोचि आदिनारायण ।
वेदही तयापासून । प्रगट झाले ॥ ५ ॥
मुख्य रूप तें वेदाचें । प्रणव रूपचि साचें ।
त्रिमात्रात्मक जयाचें । अंग होय ॥ ६ ॥
तेथें चंचळ आणि जाणता । प्रकृति पुरुष तत्त्वतां ।
प्रकृतिअंग पाहतां । मात्रा तीन ॥ ७ ॥
तोचि जाणिजे सकार । एका पुरुषाचा प्रकार ।
अर्धमात्रा जाणीव हकार । साक्षिमात्रें ॥ ८ ॥
एवं अकार उकार मकार । अर्धमात्रा ते ध्वनिमात्र ।
जाणतां बिंदु साचार । अंगें पांच ऐसीं ॥ ९ ॥
पुरुषामाजी प्रकृती । प्रकृतीमाजी स्वयंज्योती ।
निवडी कोण तयांप्रती । एकरूपचे ते ॥ ६१० ॥
एऐसा प्रणवरूप वेद । स्वयंभ प्रगटला नाद ।
तो विचारितां विशद । दों अक्षरीं दिसे ॥ ११ ॥
पूर्वीं जपप्रसंगीं बोलिलें । हंसाक्षराचें रूप केलें ।
अर्थरूपें निर्धारिलें । ते गायत्री हेचि ॥ १२ ॥
येथून प्रगटल्या मात्रा । वेगळाल्या पन्नास पवित्रा ।
पहिल्या दोन स्वतंत्रा । मेळवितां बावन ॥ १३ ॥
अकारादि वर्ण सोळा । वेगळाल्या पन्नास पवित्रा ।
कादिस्पर्श निर्मळा । हापंचविसांचा मेळा । यरादि सात ॥ १४ ॥
हक्ष हीं दोन्ही अक्षरें । मिळाअं पन्नास होती सारे ।
इतुक्यामाजीही अकारें । वस्ति कीजे ॥ १५ ॥
अकारचि रूप याचें । दिसणें तें उकाराचें ।
कारणत्वें मकाराचें । राहणें असे ॥ १६ ॥
एवं ह्या मातृका सर्व । इतुक्यांचें बीज प्रणव ।
हा अवघा वेदराव । पुरुषकृत नव्हे ॥ १७ ॥
शब्दब्रह्म हा इतुका । वाणी ज्या कां परादिका ।
त्यांमाजी वास्तव्य एका । वेदरायाचें ॥ १८ ॥
मागें पुढें मात्रा उमटत । तेणें शब्द होती अनंत ।
पुढें विस्तारिला बहुत । विरिंच्यादिमुखें ॥ १९ ॥
झालें वेदाचें निरूपण । आतां कैसें अध्ययन ।
त्याचेही प्रकार दोन । साधकसिद्धभेदें ॥ ६२० ॥
उपनिषदांचें पठण । अथवा गुरुमुखें श्रवण ।
अन्य सर्व उपेषून । इतुकाचि छंद ॥ २१ ॥
हें साधकाचें लक्षण । अध्ययन तेंचि मौन ।
आतां ऐका सावधान । मौन ज्ञात्याचें ॥ २२ ॥
अवघें ब्रह्म कळलें । पाप पुण्यही सांडिलें ।
तिळोदकचि दिधलें । उत्तमाधमभावा ॥ २३ ॥
एक ब्रह्म परिपूर्ण । तेथें कैचें द्वैतभान ।
एकला क्रीडे अनुदिन । उत्थान ना समाधि ॥ २४ ॥
अवघ्या ह्या मातृका वेद । निर्धार झाला अभेद ।
मग जो जो मुखीं निघे शब्द । तें तें अध्ययन ॥ २५ ॥
बरें वाईट न म्हणे । सत्य मिथ्या उच्चारूं नेणे ।
मुखा आलें तें बोलणें । हेंचि मौन ॥ २६ ॥
वाणी सैर बडबडी । परी द्वैत झालें देशधडी ।
वीट किंवा आवडी । दोन्ही नाहीं ॥ २७ ॥
ऐसें ज्ञात्याचें मौन । साधकाचें श्रवणमनन ।
एवं झालें निरूपण । मौनाचें ऐसें ॥ २८ ॥
मुखीं घालून दांतखिळी । सैर आशा केली मोकळी ।
तें मौन नव्हे आगळी । अविद्या माया ॥ २९ ॥
असो मनाचें अनुसंधान । जया बोलिजे ब्रह्मचिंतन ।
हेंचि ज्ञानियाचें ध्यान । सर्वदा होय ॥ ६३० ॥
ध्येय ब्रह्म परिपूर्ण । तयचें क्कैसें दर्शन ।
जेथें निवर्ते वाणी मन । ध्याना अवलंब केवीं ॥ ३१ ॥
ऐसें आक्षेपितां परी । बोलिजेतें निर्धारीं ।
जें जें दिसेल आकारीं । तें तें ब्रह्म नव्हे ॥ ३२ ॥
मनासी जितुकें कळलें । तें तेंही सर्व नाथिलें ।
वाणी मनही उपेक्षिलें । विकार म्हणोनी ॥ ३३ ॥
ऐसे नव्हे नव्हे म्हणतां । त्यागिलें वेगळें भासतां ।
जें कां न ये त्यागितां । आणि घेतांही न ये ॥ ३४ ॥
ध्याता आणि ग्राहक । दोन्ही नसतां जें एक ।
उरे निषेध अंतक । अधिष्ठानमात्र ॥ ३५ ॥
ऐसें जें कांहीं उरे । तेंचि ध्येय निर्धारें ।
त्या शून्य म्हणतां उत्तरें । बोलिजे ऐका ॥ ३६ ।
दीप जेणें मालविला । मालविता त्यासवें मेला ।
तरी नाहींपणा देखिला । दीपाच कोणे ॥ ३७ ॥
तैसें मन वाचा त्यागिलें जेणें । त्यागिता विचार त्यासवें जाणे ।
सर्वांचाही अंत देखणें । शून्य तरी तैसा ॥ ३८ ॥
तस्मात मन वाणी विचार । शून्यासहित भास मात्र ।
जातां उरे ज्ञप्तिमात्र । ध्येयरूप ब्रह्म ॥ ३९ ॥
तें निजांगेंचि आपण । निश्चयज्ञानें बाणली खूण ।
याचि नांवे प्रदर्शन । जे भेटी आपुली ॥ ॥ ६४० ॥
व्यतिरेकें ऐसें जाणता । तेंचि देखे कार्याआंतौता ।
सत्यावीण भास के‍उता । दिसे डोळां ॥ ४१ ॥
ऐसे हौनि अन्वय । पदार्थमात्रीं देखे ध्येय ।
हा सर्वदा आठव होय । हेंचि ध्यान ॥ ४२ ॥
चिंतनशब्दें स्फुरण । साधकासी अनुसंधान ।
सिद्धासी सम्रण विस्मरण । दोन्ही नसती ॥ ४३ ॥
एऐसें ज्ञात्याचें ध्यान । नलगे एकांत आसन ।
जेथें जेथें जाय मन । तो तो ब्रह्मसमाधि ॥ ४४ ॥
हें न जाणतां अज्ञान । कळेंचि मन आवरून ।
करिती मूर्तीचें ध्यान । जाउनी एकांती ॥ ४५ ॥
मूर्ती आठवितां अंतरीं । तेथें आली दिव्य नारी ।
तें विवेकें सारिली जरी । तों श्वान देखे ॥ ४६ ॥
पूजासहित्य अर्पितां । सर्प विंचूं होती पाहतां ।
ऐसे तुतक ध्यन करितां । काय होतें ॥ ४७ ॥
जें जें दिसतें भासतें । ब्रह्मचि कां नव्हे तें तें ।
अखंड ध्यानचि निश्चितें । विचारें न कळे ॥ ४८ ॥
अखंड ध्यान हें न कळे । अज्ञानद्वैत न मावळे ।
बळेंचि झांकितां डोळे । ध्यान न घडे ॥ ४९ ॥
असो ये रीतीं मौन । झालें श्लोकीं निरूपण ।
आतां ज्ञात्याचें भोजन । पुढिलें श्लोकीं ॥ ६५० ॥


अतीतानागतं किंचित् न स्मरामि न चिंतये ।
रागद्वेषं विना प्राप्तं भुंजाम्यत्र शुभाशुभम् ॥ १५ ॥


मागील झालें न स्मरतां । होणार न चिंतितां ।
रागद्वेषविण येथें येतां । भोगितों शुभाशुभ ॥ ५१ ॥
मागें भोगिलें राज्यपद । अथवा अत्यंत आपद ।
नाना सुखदुःखद्वंद्व । त्याचें स्मरण् टाकिलें ॥ ५२ ॥
अहा महत्सुख गेलें । अंतरीं दुःखें तळतळिलें ।
कीं दुःख सरतां बरें झालें ।आठवी दोन्ही ॥ ५३ ॥
हेंही स्मरेना ऐसें । कारण त्यां सत्यत्व नसे ।
स्वप्नमाजी भासले जैसे । व्याघ्रस्त्रियादि ॥ ५४ ॥
तोचि जागा होऊनी ।व्याभ्र जातां बरें मानी ।
स्त्रीसुख अंतरलें म्हणोनी । कोणी तळमळीना ॥ ५५ ॥
तैसे हे विषय सर्व । मिथ्य्त्वें गेलें रूपनांव ।
दुःखरूप कीं अपूर्व । सांडिलीं दोन्ही ॥ ५६ ॥
मागें देहा दुःख झालें । अथवा सुखचि भोगिलें ।
स्वप्नापरी तें त्यागिलें । नाठवी मन ॥ ५७ ॥
तैसाचि पुढें कोण समय । सुख कीं दुःख प्राप्त काय ।
याचें चिंतनचि न होय । निर्धारेंसीं ॥ ५८ ॥
होणार जें तें आधीं । न होणार तें नव्हे कधीं ।
ऐसी होतां दृढबुद्धी । चिंतन कासया ॥ ५९ ॥
एवं गेले तें न स्मरे । पुढें न चिंती होणारें ।
प्रारब्धाचेनि अनुकारें । जे जे प्राप्तभोग ॥ ६६० ॥
ते रे द्वेष प्रीति टाकुनी । भोगिता शुभाशुभ दोन्ही ।
पापपुण्याची काहाणी । नेणे सर्वथा ॥ ६१ ॥
प्रारब्ध कैसें ज्ञात्यासी । ऐसें जरी कल्पिसी ।
तरी कर्मावीण देहासी । राहणें न घडे ॥ ६२ ॥
संचित ज्ञानें जळालें । अहंतेवीण क्रियमाण गेलें ।
प्रारब्ध देहासी उरलें । भोगमात्र निमे ॥ ६३ ॥
देहचि आपण नव्हे । तरी प्रारब्ध कोठें आहे ।
देह निमालें कीं राहे । त्या संबंध नसे ॥ ६४ ॥
आत्मा देहरूप होईना । देहासी प्रार्ब्ध सोडीना ।
देहाचें रूप हें जाणा । प्रारब्ध कर्म ॥ ६५ ॥
असो ऐसे प्रारब्ध भोगिआं । सुखदुःख न पावे ज्ञाता ।
हर्षशोकाची नसे वार्ता । प्रियद्वेश्यही नाहीं ॥ ६६ ॥
द्रव्य स्त्रिया प्राप्त होतां । प्रीति उपजेना चित्ता ।
सर्पादि भयंकर पाहतां । द्वेषही न करी ॥ ६७ ॥
अथवा गृह ग्राम त्यजावें । सुखें अरण्य सेवावें ।
हेंही नेणे स्वभावें । प्राप्त तें भोगितो ॥ ६८ ॥
हें पुण्यात्मक आचरावें । हें पापात्मक त्यागावें ।
हेंही नेणें स्वभावें । प्राप्त तें भोगितो ॥ ६९ ॥
अथवा हें पाचि करूण् । पुण्य कदाही नाचरूं ।
ऐसाही नेणे प्रकारू ।प्राप्त तें भोगितो ॥ ६७० ॥
मी भोगितां हें वचन । ज्ञात्यासी कैस अभिमान ।
म्हणसी तरी सावधान । श्रवण करीं ॥ ७१ ॥
आत्मा देहावेगळा असतां । मी देहचि वाटे नेणतां ।
हे मुख्य जाणावी अहंता । बंधासी मूळ ॥ ७२ ॥
मी देह हे जालें दृढ । निरभिमानता दाकह्वी मूढ ।
तो मी मी म्हणतां द्वाड । बंधनींच पडे ॥ ७३ ॥
तैसा हा ज्ञाता नव्हे । निरभिमनता खरी आहे ।
आपण आत्मा हा दृढ राहे । विश्चय बुद्धीसी ॥ ७४ ॥
अहंकारादि देहांअ । जीं जीं तत्त्वें भिन्न भासत ।
तीं तीं मी हा संकेत । स्वप्नींही नव्हे ॥ ७५ ॥
जड चेतन वेगळें केलें । सत्य मिथ्या निवडिलें ।
सत्य तेंचि निश्चया आलें । आपण ऐसें ॥ ७६ ॥
ऐसें झालें ग्रंथिभेदन । चैतन्य आत्मा परिपूर्ण ।
त्याहून वेगळा अभिमान । पुन्हां एक नव्हे। ॥ ७७ ॥
मिथ्यात्वें हा अहंकार । तयाचे दोन प्रकार ।
एक शास्त्रोक्त साचार । दुजा लौकिकी ॥ ७८ ॥
मी असंग परिपूर्ण । ध्येय ध्याता ध्यानेंवीण ।
ऐसेंचि आठवी मन । अभिमान हा शास्त्रोक्त ॥ ७९ ॥
मी पाहतों मी चालतों । मी देतों मीचि घेतों ।
ऐसा लौकिकी बोलतो । परी बंधरूप नव्हे ॥ ६८० ॥
अंतरीं गांठी सुटली । बाह्यव्यवहारी दिसली ।
वरीवरी अहंता दाविली । ते काय तया बाधी ॥ ८१ ॥
असो ज्ञाता सर्व करितां । पापपुण्याची नसे चिंता ।
बरे वाईट भोग येतां । भोगितो सुखें ॥ ८२ ॥
शब्द बोलतां ऐकतो । वस्तुमात्राचा स्पर्श घेतो ।
जें जें दिसेल तें तें पाहतो । बरें कीं वाईट ॥ ८३ ॥
मुखी आतुडें तेंखातो । येईल त्याचा गंध घेतो ।
मुखा आलें तें बोलतो । बरें की वाईट ॥ ८४ ॥
कोणी कांहीं देतां घेतो । कोणी कांहीं मागतां देतो ।
कांहीं करितां करूं लागतो । बरें की वाईट ॥ ८५ ॥
जिकडे पाहिजे तिकडे जातो । भलते स्थानीं विसर्ग करितो ।
अंतःकरणींही आठवितो । बरें की वाईट ॥ ८६ ॥
संकल्प होय तो करितो । त्याचा निश्चयही दृढ होतो ।
आठवेल तें चिंतितिओ । बरें की वाईट ॥ ८७ ॥
आवडे तयाची अहंता । आवडे तयाची ममता ।
वर्तणूक जे पाहतां निराग्रहेंचि ॥ ८८ ॥
पाहिजे तया शिकवितो । पाहिजे तया उपेक्षितो ।
पाहिजे तया सर्व देतो । निराग्रहेंचि ॥ ८९ ॥
पाहिजे तेथें पडतो । पाहिजे तेव्हां उठून जातो ।
पाहिजे तोंवरी राहतो । निराग्रहेंचि ॥ ६९० ॥
कोणी पूजितां पूजा घेतो । कोणी गांजितां सोशितो ।
निंदा स्तवनही ऐकतो । निराग्रहेंचि ॥ ९१ ॥
कोणी घालितां स्नान करितो । कोणी वाढितां अन्न खातो ।
कोणी नेसवितां नेसतो । निराग्रहेंचि ॥ ९२ ॥
बोलाइतां जवळी येतो । ढकलून देतां मागें जातो ।
केव्हां स्वतंत्रही राहतो । निराग्रहेंचि ॥ ९३ ॥
पराधीनचि राहावें । किंवा स्वतंत्रचि असावें ।
ऐसाही नेमु न संभवे । आग्रहावीण ॥ ९४ ॥
असो हें किती बोलावें । जितुकें करणें भोगणें सर्वें ।
पापपुण्यात्मक आघवें । प्राप्त होतां भोगितो ॥ ९५ ॥
प्राप्त तितुकें करावें । अप्राप्त तितुकें त्यागावें ।
केलें तं आतां न स्मरावें । होणारें न चिंती ॥ ९६ ॥
बहु काय स्थिती बोलावी । मागील क्षणही नाठवी ।
पुढील क्षणाची उठाठेवी । सर्वथा नाहीं ॥ ९७ ॥
प्रस्तुत जितुकें पुढें आलें । तें तें सुखेंचि भोगिलें ।
भोगून पाहिजे सारिलें । म्हणोनियां ॥ ९८ ॥
अथवा गतगोष्टी बोलतो । पुढें अमुक करूं म्हणतो ।
परी सुखदुःखें शिणेना तो । इतरांऐसा ॥ ९९ ॥
बाळ जैसा क्रीडतां । करूं न करूं नसे वार्ता ।
पाप कीं पुण्य त्याचे चित्ता । न ये कधी ॥ ७०० ॥
बाळ नेणतेपणें कनिष्ठ । ज्ञाता सर्वज्ञत्वें वरिष्ठ ।
उभयांसी नाहीं कचाट । विधिनिषेधांचें ॥ १ ॥
कांहीं कळे कांहीं न कळे । ज्ञा असून आंधळे ।
विधिनिवेधांचे सांकळे । बांधिले तेचि ॥ २ ॥
ज्ञाता निजांगें पूर्ण ब्रह्म । तेथें कैंचा उरे नेम ।
अवघें जाऊनि रूपनाम । स्व‍इच्छा क्रीडे ॥ ३ ॥
ज्ञानियाची उंच पदवी । पुण्यमार्गीं तनु वर्तावी ।
पापाची प्रवृत्ति न व्हावी । कोणते काळीं ॥ ४ ॥
बाप हो ऐसी आशंका । सर्वथैव करूं नका ।
वर्ततो देहमात्र तितुका । प्रारब्धाधीन ॥ ५ ॥
प्रारब्धभोगाचें अक्षर । पुसी कोण पुरुषार्थी नर ।
मागें झाले पुढें होणार । कर्मगती वर्तती ॥ ६ ॥
प्रारब्ध नासूं म्हणताण् कोडें । तरी जनकादि काय वेडे ।
जो ज्या क्षणीं भोग आतुडे । समानत्वें भोगिती ॥ ७ ॥
चक्र जैसें फिरविलें । उजवें डावें फिरे उगलें ।
तैसे हें कर्माचें प्रेरिलें त्या रीतीं वर्ते ॥ ८ ॥
चक्राचें भ्रमण सरे । तरी आपेंआप थिरे ।
प्रारब्ध भोगोनि वोसरे । मग देह कैंचा ॥ ९ ॥
असो देह मेले कीं राहिले । पुण्यमार्गीं कीं पाप आचरिले ।
तेणे समाधानाचें झाले । उणे काय ॥ ७१० ॥
पापपुण्य हे कल्पना । करून भेडसावी अज्ञाना ।
बागुल जैसा बाळपणा । माजी सत्य ॥ ११ ॥
हें ज्ञानियां नसे सांकडें । नामरूप सर्वही उडे ।
जें जें येतां दृष्टीपुढें । अस्तिभातिप्रियत्वें ॥ १२ ॥
तेणेंवीण नाहीं सर्व । म्हणोनि तेंचि अपूर्व ।
ऐसा बाणला स्वानुभव । निश्चयेंसी ॥ १३ ॥
आतां देह तरी कोठें असे । कोणा प्रारब्ध उरलेंसे ।
ज्ञाता अखंड एकरसें । पूर्णब्रह्म निजांगें ॥ १४ ॥
कैंचा देह कैंचा प्राण । कैंचें इंद्रिय कईचें मन ।
कैंची बुद्धी अंतःकरण । पूर्णब्रह्म ॥ १५ ॥
कैंचा विषय कईची साधनें । कैचें भोग कैंचें भोगणें ।
कैंचा कर्ता भोक्ता जाणणें । पूर्णब्रह्म ॥ १६ ॥
कैचें संचितक्रियमाण । कैचें प्रारब्धीं वर्तन ।
कैचें असे पापपुण्य । पूर्णब्रह्म ॥ १७ ॥
कैंचा आहारविहार । कैंचा घडेल आचार ।
कैंचें बाह्य अभ्यंतर । पूर्णब्रह्म ॥ १८ ॥
कैंचा ग्राम कैंचा देश । कैंची स्त्री अकिंचा पुरुष ।
कैंचा काम कैंचा विलास । पूर्णब्रह्म ॥ १९ ॥
कईची जागृती । कैंचें स्वप्न । कैंची सुषुप्ती अज्ञान ।
कैंची अविद्या बंधन । पूर्णब्रह्म ॥ ७२० ॥
कैंचा बाप कईचा पुत्र । कैंचा शत्रु कईचा मित्र ।
कैंचे स्वजन कुलगोत्र । पूर्णब्रह्न ॥ २१ ॥
कैंची जाति कईचें कर्म । कैंचा अधर्म कैंचा धर्म ।
कैंचा वर्ण कैंचा आश्रम । पूर्णब्रह्न ॥ २२ ॥
कैंचा रंक कैंचा राजा । कैंचे पालन कोठें प्रजा ।
मीतूंपणा कैंचा दुजा । पूर्णब्रह्न ॥ २३ ॥
कैंची भूमि आप कैंचें । कैंचा वायु तेज कैंचें ।
कैंचा शब्द आकाश कैंचें । पूर्णब्रह्न ॥ २४ ॥
कैंचा मेरु कैंचा समुद्र । कईचा सूर्य कैंचा चंद्र ।
कैंचा यम कैंचा इंद्र । पूर्णब्रह्न ॥ २५ ॥
कैंचें वैकुंठ कैंचा कैलास । कैंचा सत्यलोकीं वास ।
कैंचे देवदैत्यराक्षर ।पूर्णब्रह्न ॥ २६ ॥
कैंची शिव कैंचा विष्णु । कैंचा राम कैंचा कृष्णु ।
कैंचा आणिला चतुराननु । पूर्णब्रह्न ॥ २७ ॥
कैंचा वेद शास्त्र कैंचें । कईची विभक्ति ज्ञान कैंचें ।
कैंचे साधन श्रवण कैंचें पूर्णब्रह्न ॥ २८ ॥
कैंचे मनन निदिध्यासें । साक्षात्कार कोठें असे ।
समाधिउत्थान कायसें । पूर्णब्रह्न ॥ २९ ॥
कैंचा बंध कैंचा मोक्ष । कैंचा द्रष्टा कैंचा साक्ष ।
कैंचा सिद्धांत पूर्वपक्ष । पूर्णब्रह्न ॥ ७३० ॥
कैंचें ध्येयध्याताध्यान । कैंचें ज्ञेयज्ञाताज्ञान ।
कैंचे साध्यासाधकसाधन । पूर्णब्रह्न ॥ ३१ ॥
कैंची माया कैंचे गुण । कैंचा जीव कैंचा ईशान ।
कैंचें द्वैताद्वैतभान । पूर्णब्रह्न ॥ ३२ ॥
कैंचा प्रपंच कैंचा परमार्थ । कैंचा अनर्थ कैंचा अर्थ ।
कोण सेवक कैंचा नाथ । पूर्णब्रह्न ॥ ३३ ॥
कैसा मात्रात्मक ॐकारु । कैंचा करणें विचारु ।
कैंच शिष्य कैंचा गुरु । पूर्णब्रह्न ॥ ३४ ॥
कोठें बाळी बुगडी कांकण । एकचि असतां सुवर्ण ।
तैसीं नामें भिन्नभिन्न । एक ब्रह्म असतां ॥ ३५ ॥
त्या त्या पदार्थीं पाहतां । पापरूपाची नसे वार्ता ।
अवघें ब्रह्मचि तत्त्वतां । विलसत असे ॥ ३६ ॥
तोचि गुरु तोचि प्रणव । शिष्यही त्यासीच आले नांव ।
तेचि माया जीवशिव । भेदचि नाहीं ॥ ३७ ॥
तोचि ब्रह्माविष्णुमहेश । तोचि इंद्रचंद्रादिदिनेश ।
दैत्यमानवराक्षस । भेदचि नाहीं ॥ ३८ ॥
पंचभूतें चारी खाणी । स्थावरजंगमादि मिळोनी ।
कीटकपाषाण नाना स्थानीं । भेदचि नाही ॥ ३९ ।
जितुकें दिसएं भासतें । बरें वाईट कल्पिजेतें ।
विषयादि व्यवहारातें । भेदचि नाहीं ॥ ७४० ॥
ऐसा नामरूपेंवीण । प्राप्त विषय भोगी जाण ।
गेलें होणार हें चिंतन । स्मरे ज्ञाता ॥ ४१ ॥
अथवा अतीत अनागत । काय ऐसें कोणी पुसत ।
तरी चिद्‍रूप समस्त । उत्तर दिधलें ॥ ४२ ॥
न स्मरे न चिंती ऐसें नव्हे । तरी स्मरतो चिंतितो सर्वदा हें ।
ऐसा काक्वर्थ येथें वाटतीहे । परी तो आठवून पूर्णाचा ॥ ४३ ॥
तस्मात् मागें झालें पुढे होणार । तें तें ब्रह्मचि चिन्मात्र ।
मध्येंही जो जो भोगमात्र । निजांगें ब्रह्म ॥ ४४ ॥
ऐसें ज्ञात्याचें भोजन । जयाचें पूर्ण समाधान ।
हें न ठकेचि आचरण साधकासीही ॥ ४५ ॥
तया साधनाचा विधी ।विघ्नकर जें त्या निषेधी ।
असो ज्ञात्याचा सामाधी । ज्ञाताची जाणे ॥ ४६ ॥
देवदत्ता सावध अससी । किंवा नाहीं सांग मजसीं ।
बोलिले ज्ञात्याचे आचरणासी ऐकिलें कीं ॥ ४७ ॥
येथें क्रिया ते कोणती । सांग बापा मजप्रती ।
इतुकींही लक्षणें मागुती । अनुवादें बोलूं ॥ ४८ ॥
विचाररूप प्रातःस्मरण । साधकासी अनुसंधान ।
कीं ज्ञात्याचे साधन । लक्षण पहिलें ॥ ४९ ॥
शौचविधि त्याहून काय । भिन्न असे गा उपाय ।
स्नान तेंही अद्वय- । ज्ञानरूपचि ॥ ७५० ॥
अघमर्षण संध्या पवित्र । जप तर्पण अग्निहोत्र ।
ज्ञानरूपचि स्वतंत्र । लक्षण त्याचें ॥ ५१ ॥
अर्चन मौन आणि ध्यान । बारावें असे भोजन ।
काय असे ज्ञानेंवीण । इतुक्या ठायीं ॥ ५२ ॥
नाममात्र वेगळालें । परी तें एकरूप संचलें ।
यासी भेद तरी कोण बोले । क्रियारूप ॥ ५३ ॥
एवं झालें निरूपण । तेरा श्लोकीं आचरण ।
ज्ञानियाचें समाधान । ध्येयध्यान साधका ॥ ५४ ॥
ऐसा बोलून आचार । मौनें राहती शंकर ।
सर्व ऐकोनि साचार । देवदत्तें ॥ ५५ ॥
अंतःकरण कैसें झालें । कीं मेघें भूमीतें भिजविलें ।
तैसें श्रोत्रद्वारा आलें । गुरुवचनामृत ॥ ५६ ॥
बाह्य न जातां एक कण । अर्थ अवघा केला प्राशन ।
त्याचेंचि लागलें ध्यान । चतुष्टयासी ॥ ५७ ॥
इंद्रियां दिधलीं कपाटें । मनादि धांवती नेटें ।
अर्थसमुद्रीं ओहटे । जैसें जलचर ॥ ५८ ॥
कीं आकाशीं पक्षी उडती । अंतःकरणें तैसीं धांवती ।
अर्थसमुद्रीं बुड्या देती । उसळती वरी ॥ ५९ ॥
परी त्या ज्ञानरूप अर्थाचा । लागे कोणा अंत साचा ।
मग तो शिणूनि विस्मयाचा । आश्रय करी ॥ ७६० ॥
म्हणे काय ज्ञात्याचा आचार । काय ज्ञात्याचा विचार ।
काय ज्ञात्याचा प्रकार । बोलिला नवचे ॥ ६१ ॥
अहा अहा हे कोण स्थिती । अहा अहा हे कोण रीती ।
अहा अहा हे सुखमूर्ती । धन्य ज्ञाते ॥ ६२ ॥
धन्य धन्य ते साधक । जयां ध्येयमात्र ब्रह्म एक ।
आतां ऐसें ज्ञानकौतुक । मज प्राप्त कधीं ॥ ६३ ॥
लालुची कैसी गुंतली । कीं दुष्काळीं जैसीं मिडलकलीं ।
अन्न देखतां धांवती वहिलीं । कोणी मारितांही ॥ ६४ ॥
कीं मुंगी जैसीं साखरीं । कीं पतंग दीपावरी ।
कीं व्यभिचारिणी नारी । मनें परपुरुषीं ॥ ६५ ॥
तैसें झालें देवदत्ता । आधीं पावेन अर्थामृता ।
केव्हां सद्‍गुरु होईल दाता । केव्हां भेटेल तें सुख ॥ ६६ ॥
केव्हां जाईल अज्ञान । केव्हां प्रगटेल ज्ञान ।
केव्हां होईल अभिन्न । समाधान केव्हां ॥ ६७ ॥
पुन्हां विचार मनीं । धन्य माझी सुकृतश्रेणी ।
गुरुमूर्ति देखिली नयनीं । आतां मज उणें काय ॥ ६८ ॥
क्षीरसागरीं पडिला । तो कां राहील भुकेला ।
कुबेर जेणें मित्र केला । त्या दरिद्र कैंचे ॥ ६९ ॥
कामचेनूचे वत्सासी । क्षुधेची चिंता कायसी ।
तैसे सद्‍गुरुमाय मजसी । कृपेसहित ओळली ॥ ७७० ॥
तरी आतांचि सद्‍गुरु बोधिती । होईल भावाची समाप्ती ।
सुखेंचि स्वानुभवाप्रती । पावेन आतां ॥ ७१ ॥
आणिक एक खंती वाटली । जे म्यां गुरुसेवा नाहीं केली ।
अहा प्रारब्धा घरबुडी झाली । माझी तेणें ॥ ७२ ॥
गुरु तरी अति कृपाळु । परी मी काय होय दुर्बळु ।
अति लाभ जो दुर्मिळु । तो म्यां अव्हेरिला ॥ ७३ ॥
अहा हे कोण कैंची भ्रांती । ब्रह्मादि सद्‍गुरु सेविती ।
मज वाटे कृपामूर्ती । फळली नाहीं ॥ ७४ ॥
तुज बोधितों म्हणितलें । परी सेवेसी पात्र नाहीं केलें ।
तस्मात् मजसी ठविलें । सद्‍गुरुनाथें ॥ ७५ ॥
तरी मी बळें देउनि झडी । सेवा करीन आवडीं ।
गुरु कोपतांही न सोडीं । मेलियावीण ॥ ७६ ॥
गुरुसेवा हे सांडून । काय करावें कोरडे ज्ञान ।
यावीण कैंचे समाधान । दुसरें असे ॥ ७७ ॥
गुरुसेवा घडे ज्यासी । तोचि केवळ पुण्यराशी ।
ज्ञानभक्ति होती दासी । अनायासें ॥ ७८ ॥
काया वाचा आणि मन । सेवेसी केलें अर्पण ।
आतां माझें हें म्हणता आण । श्रीसद्‍गुरूची ॥ ७९ ॥
काया हे चरणदासी । करून लावीन सेवेसी ।
दिवस कीं नेणतां निशी । सावधान राखीन ॥ ७८० ॥
अरुणोदयापासून अस्ता । पुन्हां अरुणोदय मागुता ।
होंय तोंवरी सेवा करितां उमस नेदीं ॥ ८१ ॥
जेथें सद्‍गुरु दृष्टी पडे । देह धांवेल तयापुढें ।
गुरुमनीं जें जें आवडे । तें तें कोडें करीन ॥ ८२ ॥
मुखीं अमुक ऐसें म्हणतां । करीं हा उच्चार न होतां ।
त्या त्या पदार्थाआंतौता । जाऊन पडेन ॥ ८३ ॥
मीच दास दासी समग्र । पाककर्ता आणि महार ।
मीच असें हकालखोर । झाडेकर मळाचा ॥ ८४ ॥
प्रकार सेवेचा जितुका । एकलाचि करीन तितुका ।
साह्य न करींच अनेकां । विभागियांसी ॥ ८५ ॥
बहु काय बोलणें असे । क्षणही सेवेवीण न सोसे ।
अखंड मस्तकींच सौरसें । आज्ञा वाहीन प्रभूची ॥ ८६ ॥
देहाच्या पादुका सुंदर । गुरुचरणीं शोभती फार ।
केंस हे झाडिती केर । अंगणींचा ॥ ८७ ॥
देह शय्येचा पलंग । देह बैसावया चौरंग ।
देह हेचि सुरंग । चालती भूमि ॥ ८८ ॥
जेथें पडती रजःकण । तेथें माथा वोवडीन ।
गुरु जीवरी करिती स्नान । रंगशिला ती देह ॥ ८९ ॥
जया उदका श्रीगुरूचे । पादपद्म लागती सांचे ।
तेंचि तीर्थ स्नानपानाचें । येर ते अपवित्र ॥ ७९० ॥
बहु काय बोलूं पुढती । गुरुचरणीं देहा ची समाप्ती ।
जेथें रजःकणाची माती । तेथें रक्षा मिळेल ॥ ९१ ॥
हें असो मरणाउपरी । देखें कवण निर्धारीं ।
देह आहे जों तोंवरी । सेवाचि करूं ॥ ९२ ॥
काय करील गुरुसेवा । वाणी रंगेल गुरुनांवा ।
अंतःकरणामाजी ठेवा । गुरुमूर्तीचा ॥ ९३ ॥
जितुका देहांईल समुदाय । तितुकिया सेवाचि उपाय ।
गुरुसेवेपरतें काय । कोणा काज असे ॥ ९४ ॥
देह हेंचि दिच्=व्य देऊळ । हृदय तेंचि अंतरस्थळ ।
प्राण हे भूमि केवळ । उपप्राण चांदोवे ॥ ९५ ॥
मध्यें उंच सिंहासन । तें हें मुख्य अंतःकरण ।
मन बुद्धि चामरें दोन । जीव तो छत्र ॥ ९६ ॥
वित्त होय चोपदार । छडीदार अहंकार ।
बंदीजन गाती बडिवार । चारही वाचा ॥ ९७ ॥
वेदसारांश तांबुलाचा । मुखापासून द्रव त्याचा ।
श्रोत्रेंद्रियां येथींचा । पीकग्रहणाधिकार ॥ ९८ ॥
त्याचा ही घाली विंजणा । चक्षु हा आरिसा देखणा ।
जिव्हा लागलीसे पाना । चरणामृताच्या ॥ ९९ ॥
घ्राण होऊनियां भ्रमर । आमोद घेईल सत्वर ।
पाणींद्रियें राहती दूर । तयां रीग कैंचा ॥ ८०० ॥
तेव्हां होऊनि द्वारपाळ । संतोष पावे केवळ ।
पादेंद्रियें ईं सर्वकाळ । प्रदक्षिणा करिती ॥ १ ॥
सख्य करून जिव्हेचें । उच्छिष्ट पावे रसाचें ।
तेणें सुखें बाहेरी नाचे । उपस्थेंद्रिय ॥ २ ॥
पायूसी अधिकार थोर । सर्व झाडी तेथिंचा केर ।
पंचविषय जे सत्वर । पाहिजे तें पुरविती ॥ ३ ॥
कामासी आवडी भारी । गुरूचा झाला कामारी ।
सेवा चुके जो निर्धारीं । क्रोध त्यावरी योजिला ॥ ४ ॥
असो ऐसे सेवाधार । दिननिशी होती तत्पर ।
वैराग्य विवेक विचार । आले सत्वर धांवूनी ॥ ५ ॥
म्हणती आम्हां सद्‍गुरूची । अवडी मोठी सेवेची ।
कांहीं मुशारा न मागतांची । गुरुसन्निध राहूण् ॥ ६ ॥
मग धांवूनियां चित । हातीं धरूनियां त्वरित ।
गुरुचरणीं केलें रत । अखंड सदा ॥ ७ ॥
जे जे परमार्थीं मिळाले । ते ते सेवाधिकारी केले ।
जें जयासी आवडलें । ते दिधलें तयासी ॥ ८ ॥
ऐसी सेवा पाहतां । आनंद झाला देवदत्ता ।
कांहीं खेदाची नसे वार्ता । जन्ममृत्यूची ॥ ९ ॥
धन्य धन्य सद्‍गुरुनाथा । मह स्वीकारिलें अनाथा ।
आतां प्रपंच कीं परमार्था । चाड नाहीं ॥ ८१० ॥
श्रोते ऐका सावधान । अंतरीं इतुकें झालेंमनन ।
देवदत्तें उघडिलें नयन । तों पुढें गुरुमूर्ति ॥ ११ ॥
मग धांवून चरण धरिले । नेत्रोदकेंचि क्षाळिले ।
अंतःकरण प्रेमें भरलें । उठावें न वाटे ॥ १२ ॥
शंकर मनीं विचारिती । धन्य हा अधिकारी म्हणती ।
परीक्षण एक पाहूं निश्चितीं । कौतुक याचें ॥ १३ ॥
म्हणोनि स्तब्ध राहिले । कांहीं न बोलती उगले ।
पुढें देवदत्तें काय केलें । ऐका सर्व सांगतों ॥ १४ ॥
वारंवार प्रदक्षिणा । पुन्हां घाली लोटांगणा ।
बद्धांजली सन्म्ख जाणा । राहिला उभा ॥ १५ ॥
तों सद्‍गुरु न पाहती । देवदत्त दचकला चित्तीं ।
एकाएकी मस्तकीं शक्ती । पडली जैसी ॥ १६ ॥
कीं मेरु अंगीं कोसळला । किंवा भूमिकंप झाला ।
कीं सहस्र विजांचा पडिला । मेळा मस्तकीं ॥ १७ ॥
प्रळयसूर्य खडतरला । सहस्रावधि मेळा आला ।
अग्नि तया साह्य जाला । जाळूं लागला ब्रह्मांड ॥ १८ ॥
कोरडे झाले सप्तसमुद्र । सूर्यापरी तापला चंद्र ।
कीं अमृताचे पाझर । विषतुल्य झाले ॥ १९ ॥
तप्त पात्रीं फुटे लाही । तैसें चित्त चरफडी पाहीं ।
स्वेदपूर्व चालिले देहीं । थरथरां कांपे ॥ ८२० ॥
नेत्रीं पडली झांपडी । उष्णश्वास घाणें सोडी ।
अंतःकरणें झाली वेडीं । कांहीं न सुचे ॥ २१ ॥
मुद्गलप्रहारें मूर्छितासी । कांहीं न आठवे मानसीं ।
देवदत्ता दशा तैसी । कांहीं स्मरेना ॥ २२ ॥
पंचप्राण एकवटले । नाडीचे द्वार कोंडलें ।
देह काष्ठप्राय झालें । मडें जैसें ॥ २३ ॥
नव्हे स्वप्न नव्हे जागृती । नव्हे मूर्च्छा नव्हे सुषुप्ती ।
नव्हे मरणाची रीती । समाधिही नव्हे ॥ २४ ॥
हे कोण अवस्था म्हणावी । वर्णी ना कोणीही कवी ।
यास्तव अनिर्वाच्य जाणावी । दशा ऐसी ॥ २५ ॥
ऐशा झालिया घटिका दोन । कांहीं सावध जाला प्राण ।
तयासवें किंचित मन । उद्‍भवतें जालें ॥ २६ ॥
घाणीं दाटूनि आला श्वास । जिव्हेचा सर्व गेला रस ।
मस्तकीं झाली कुसमुस । न बोलवे ती ॥ २७ ॥
हस्तें हस्त रगडिले । म्हणे न कळे हें काय झालें ।
देह मरोनियां जन्मलें । कीं हें स्वप्न ॥ २८ ॥
काय झाले प्रयोजन । नेणों कोणतें आलें विघ्न ।
मग करें नेत्र पुसून । पाहिली मूर्ति ॥ २९ ॥
मग आठविलें चित्तीं । जे सद्‍गुरु कांहीं न बोलती ।
या हेतू ऐसी रीतीं । अवस्था जाली ॥ ८३० ॥
पुन्हां झाली कासाविसी । दुःखें तळमळी मानसीं ।
अहा सद्‍गुरूनें मजसी । कां उपेक्षिलें ॥ ३१ ॥
पाहतां सद्‍गुरुकृपेसी । मातेची उपमा कायसी ।
ऐसें असतां या समयासी । विपरीत जालें ॥ ३२ ॥
सहस्र‍अन्यायीं असतां । तयाही नुपेक्षी माता ।
आजिचा हा प्रसंग कोणता । न कळे मज ॥ ३३ ॥
चातकासी ओळला घन । तेथें सुटला प्रभंजन ।
मेघ जाती विरळून । तैसा हा अंतराय ॥ ३४ ॥
या भवानें अति गांजलों । सद्‍गुरूसी शरण आलों ।
गुरूनें उपेक्षितां मेलों । आतां कोण रक्षी ॥ ३५ ॥
हरि हर ज्यावरी रुसले । त्या गुरूनें संरक्षिले ।
गुरूनें जया अव्हेरिलें । तया त्राता कोण ॥ ३६ ॥
परी आतां प्रतिज्ञा ऐसी । सद्‍गुरु वरिलासे मानसी ।
जरी उपेक्षिलें मजसी । तरी पदसी न सोडीं ॥ ३७ ॥
जरी येथें न करिती कृपा । तरी देह कैंचा उरे बापा ।
कोण सोसी या संतापा । देहबुद्धीच्या ॥ ३८ ॥
काय मिळे प्राण सांडितां । ऐसें हें न कल्पीं चित्ता ।
गुरुविहरेंचि मागुता । पावेन मी जन्म ॥ ३९ ॥
कृपा नव्हे एकजन्मीं । तरी सप्त जन्में पावेन मी ।
धरीन गुरुचरण अंतर्यामीं । सहसा न सोडी ॥ ८४० ॥
कृपाघन जरी न ओळे । वांचती काय चातकेमेळे ।
तैसी काऊन प्रपंचफळें । देवदत्त वांचेना ॥ ४१ ॥
जीवनावेगळी मासोळी । वांचे जरी अन्य स्थळीं ।
गुरुकृपेंवीण मायामेळीं । देवदत्त वांचेना ॥ ४२ ॥
मी एकला जरी मरें । काय करतील हे सारे ।
परी उणें आलें साचारें । ब्रीदालागीं ॥ ४३ ॥
बडिवार गात होते वेद । ए व्यर्थचि झाले शब्द ।
तस्मात् जाणिजे अर्थवाद । हाही इतरांऐसा ॥ ४४ ॥
असो आमुचें काय गेलें । जन्मुअमृत्यूच आम्हां भले ।
परी ब्रीदावरी घातलें । बिंदुलें हातें ॥ ४५ ॥
ऐसे न करावें समर्था । कृपादृष्टीं पाहें अनाथा ।
कर ठेऊनियां माथां । कुरवाळी मुख ॥ ४६ ॥
हे सद्‍गुरु कृपापाणी । सत्य करा देववाणी ।
सर्व अन्याया क्षमापुनी । पाहीं दीनातें ॥ ४७ ॥
मग कंठ करोनि मोकळा । दीर्घस्वरें बाहता जाला ।
नेत्रद्वारें पूर चालिला । भूमापावेतों ॥ ४८ ॥
कौतुक आतां पाहसी काय । धांव धांव सद्‍गुरुमाय ।
वत्सालागी जैसी गाय । ह्ंबरून चाटी ॥ ४९ ॥
ऐसें देखोनि श्रीगुरु । सप्रेम दाटले न धरवे धीरु ।
मग उठूनि अति सत्वरु । कंठीं मिठी घालिती ॥ ८५० ॥
गुरुशिष्य एक झाले । सरितासागर मिळाले ।
कीं घटाकाश मेळविलें । महदाकाशीं ॥ ५१ ॥
मग शंकर नेत्र पुसिले । स्वकरें मुख कुरवाळिलें ।
मस्तक अवघ्राण केलें । थापटिली पाठी॥ ५२ ॥
अगा वत्सा परमसखया । कौतुक पाहिलें शिष्यराया ।
आम्हीं दुर्मिळ एकुलतिया । उपेक्षूं कैसें ॥ ५३ ॥
वृद्धपणीं विटाळ जातां । वंध्या जैसी प्रसवे सुता ।
तया कैसी अव्हेरी माता । निर्दयपणें ॥ ५४ ॥
तैसें घडलें आम्हांसी । आतां उपेक्षा ते कैसी ।
निर्भय असावें मानसीं । प्राणापैलीकडे तूं ॥ ५५ ॥
मग देवदतें केले नमन । सुखरूप झालें अंतःकरण ।
प्रेमे सद्‍गद नेत्रीं नीवन । कांहीं बोलवेना ॥ ५६ ॥
सद्‍गुरूंनी धरून हातीं । बैसविलें पूर्वरीतीं ।
हस्तें मुख कुरवाळिती । वारंवार ॥ ५७ ॥
आतां होईं सावधान । बोलिजेतें ब्रह्मज्ञान ।
तुझें कैसें भवबंधन । पाःऊं आतां ॥ ५८ ॥
तुज बोलिलें सदाचरण । तेणें झालें परोक्षज्ञान ।
अपरोक्षाची बाणे खूण । ऐसें आतां उपदेशूं ॥ ५९ ॥
मागें इतुकें निरूपिलें । तें तुवां मौनें श्रवण केलें ।
परी कांहीं नाहीं पुसिलें । मर्यादेस्तव ॥ ८६० ॥
आतां येथें भीड धरिसी । तरी मग कोणा पुसूं जासी ।
यास्तव आठवेल जो मानसीं । प्रश्न करी गा ॥ ६१ ॥
महाप्रसाद जो म्हणोनी । मस्तक ठेविला पुन्हां चरणीं ।
सरसावून बैसला श्रवणीं । बद्धांजली पुढें ॥ ६२ ॥
श्रीगुरु बोलती वचन । ऐक उपदेशाचे लक्षण ।
प्रस्तुत वैराग्य आणि ज्ञान । यांचि अवधि बोलूं ॥ ६३ ॥
सीमा ऐकें ज्ञानाची । तैसीच पूर्ण वैराग्याची ।
एका श्लोकीं दोहींची । स्थिती कैसी ॥ ६४ ॥


अभयं सर्वभूतानां ज्ञनमाहुर्मनिषिणः ।
निजानंदे स्पृहा नान्ये वैराग्यस्यावधिर्मतः ॥ १६ ॥


निर्भयता सर्व भूतांची । ज्ञाते बोलती हेंचि ।
अवधि जाणा वैराग्याची । ब्रह्मीं स्पृहा अन्य नसे ॥ ६५ ॥
भूत म्हणजे झालें । भ्रमेंकरून उद्‍भवलें ।
मायादि नामरूप जेतुलें । जीवेशांसह ॥ ६६ ॥
इतुक्यांचें असतां भय । तें ज्ञानही न होय ।
म्हणोनि बोलिजे निर्भय । ज्ञान तेंचि ॥ ६७ ॥
येथें कोणी मंदमती । एकाचें एक भाविती ।
देह अमर करूं म्हणती । योगाभ्यासें ॥ ६८ ॥
कॄरजाती व्याघ्र सर्प । अथवा वायु अग्नि आप ।
अध्यात्मादि ताप देहा न व्हावे ॥ ६९ ॥
भूतमात्र जितुकें । तेणें देह नासूं न शके ।
तया बोलती कौतुकें ज्ञान ऐसें ॥ ८७० ॥
तरी ऐसें कदा न घडे । देह कधीं तरी पडे ।
काळाचे हातीं सापडे । तेव्हां निर्भय कैसा ॥ ७१ ॥
अरे हें जितुकें उत्पन्न । भय तया असे दारुण ।
तेथें देहाची गणती कोण । निर्भयत्वाची ॥ ७२ ॥
वायु चंद्र आणिअर्क । भयरूपचि असे पावक ।
मृत्यूसीही असे धाक । परमेश्वराचा ॥ ७३ ॥
माया अविद्या नासती । जीवेशही त्यासवें जाती ।
तेथें असे काळभीती । कल्पांतरूप ॥ ७४ ॥
जें जें दिसे भासे । शून्यासहित सर्व नासे ।
कालही भय वाहतसे । महाकाळाचें ॥ ७५ ॥
असो हें सर्व भयरूप । निर्भयत्व नसे अल्प ।
एक जाणिजे स्वस्वरूप । अद्वय जें कां ॥ ७६ ॥
तेंचि एक निर्भय । येर हें बोलणें काय ।
द्वैतीं अवश्य भय होय । बोलिली श्रुति ॥ ७७ ॥
बहु कासया बोलणें । ब्रह जाणे साधकपणें ।
तेंही निर्भय न होणें । भिन्नत्वामुळें ॥ ७८ ॥
यास्तव जो ब्रह्म अभिन्न । सांडूनियां धातृध्यान ।
होय निजांगें आपण । तेंचि ज्ञान निर्भय ॥ ७९ ॥
स्वयें अंगें ब्रह्म झाला । मग कोणाचें भय त्याला ।
सर्व नामरूप भ्रमाला । झालें अधिष्ठान ॥ ८८० ॥
सर्पें रज्जूच खादली । हे वार्ता नाहीं ऐकिली ।
तेवी ब्रह्मीं भीति नाहीं बोलिली । नामरूपाची ॥ ८१ ॥
तस्मात् निर्भय ब्रह्मरूप । तेंचि ज्ञात्याचें स्वरूप ।
सर्व भूतांतें आपेंआप । अभय जालें ॥ ८२ ॥
पूर्ण ज्ञाते ऐसें बोलती । हेचि ज्ञानाची चरम स्थिती ।
यावीण अन्य जें म्हणती । तें विपरीत ज्ञान ॥ ८३ ॥
ऐसी हे सीमा ज्ञानाची । तुज निरूपिली साची ।
आतां अवधि वैराग्याची । सावध ऐकावी ॥ ८४ ॥
नामरूप त्यागावें । अंगें ब्रह्मचि होआवें ।
स्वानुभवें तृप्ती पावावें । स्पृहा ऐसी ॥ ८५ ॥
निजानंदरूपाहूनी । जें जें दिसे भिन्नपणीं ।
तें तें मिथ्यात्वें मानीं । शुक्तिरजत जैसें ॥ ८६ ॥
करूनियां खपुष्पमाळा । कोण शोभे घालितां गळां ।
तैसा हा मायिक मेळा । येथें स्पृहा कैंची ॥ ८७ ॥
तस्मात् मायिकाचा त्याग । ब्रह्मरूप होय अंग ।
हेचि अवधि उमग । वैराग्याची ॥ ८८ ॥
विचारें सर्व त्यागिलें जेणें । त्यागितांही उरूं न देणें ।
साधकही अभिन्न होणें । हेंचि वैराग्य ॥ ८९ ॥
ब्रहादितृणांत । अर्थात् होती मिथ्याभूत ।
मी पणाचा होता अंत । वैराग्य लाभे ॥ ८९० ॥
ऐसिया वैर्ग्यावीण । कदा न राहे ब्रह्मज्ञान ।
आणि पूर्ण नसतां ज्ञान । वैराग्यही नव्हे ॥ ९१ ॥
तस्मात् ज्ञान वैराग्य दोन्ही । एकमेकां साह्यपणीं ।
जैसे अंध पंगूं मिळोनी । मार्ग चालती ॥ ९२ ॥
ज्ञान पंगू वैराग्यावीण । वैराग्य अंध नसतां ज्ञान ।
एवं मिळती हीं जरी दोन । समाधान तेव्हां ॥ ९३ ॥
वैराग्यें नामरूप त्यागावें । ज्ञानें ब्रह्म तें जाणावें ।
पुढें द्वैत टाकून व्हावें । निजांगें ब्रह्म ॥ ९४ ॥
हें ऐकोनि देवदत्त । नम्रपणें प्रश्न करीत ।
जरी निजांगें ब्रह्म होत । तया लाभ दोहींचा ॥ ९५ ॥
तरी आतां जी सद्‌गुरु । सांगा उपाय कोणता करूं ।
निजांगें ब्रह्म निर्धारू । होईन कैसा ॥ ९६ ॥
गुरु म्हणती आधीं जाणावें । ब्रह्मज्ञान प्रांजल व्हावें ।
मग हळू हळू स्वभावें । होइजे अंगें ॥ ९७ ॥
ब्रह्मज्ञान होय कैसें । आक्षेपिसी जरी ऐसें ।
तरी श्रवणमननेंवींअ नसे । साधन दुसरें ॥ ९८ ॥
तेंचि कैसें श्रण मनन । आणि निदिध्यासाचें लक्षण ।
येणें श्लोकीं निरूपण । सावध ऐकें ॥ ९९ ॥


वेदांतैः श्रवणं कुर्यात् मननं चोपपत्तिभिः ।
योगेनाभ्यसनं नित्यं ततो दर्शनमात्मनः ॥ १७ ॥


वेदांतें करावें श्रवण । दृष्टांतयुक्तीनें व्हावें मनन ।
योगें नित्य निदिध्यासन । तेव्हां भेटी आपुली ॥ ९०० ॥
उपनिषद्‌भाव तो वेदांत । प्रत्यगात्मा ब्रह्म निश्चित ।
हाचि विषय निभ्रांत । प्रयोजन ऐकें ॥ १ ॥
वेदांत श्रवण जालिया । फळ काय म्हणसी शिष्यराया ।
जाणिलें असतां अद्वया । मोक्षप्राप्ती ॥ २ ॥
आपण तेंचि असतां ब्रह्म । नाथिला उद्‍भवला भ्रम ।
देहबुद्दीचा संभ्रम । या नांव बंध ॥ ३ ॥
आपण ब्रह्म हें निवळे । तुटती भ्रमाचीं पडळें ।
साधका स्वानंदसोहळे । मोक्ष तो हाचि ॥ ४ ॥
एवं भवबंधुदुःख जाय । स्वात्मसुखें तृप्ति होय ।
हेंचि प्रयोजन उभय । वेदांताचें ॥ ५ ॥
साध्य साधक ध्येय ध्याता । अथवा जाणिजे ज्ञेय ज्ञाता ।
हाचि संबंध तत्त्वतां । साधनरूप ॥ ६ ॥
ऐसिया वेदांताचा । कोण अधिकाराची येथींचा ।
तो पूर्वीं बोलिला साचा । सदाचरणीं ॥ ७ ॥
एवं विषयप्रयोजन । संबंध अधिकारी पूर्ण ।
हें चतुष्टय अनुबंधन । जेथें तो वेदांत ॥ ८ ॥
अथवा सहा चिन्हें आणिक । बोलिजेताती ऐक ।
तयांसीच वेदांत एक । म्हणावें ऐसें ॥ ९ ॥
उपक्रम उपसंआर । तिजी फळश्रुति साचार ।
दृष्टांत आणि प्रकार । अभ्यासाचा ॥ ९१० ॥
येर शास्त्रें सांडावीं । घटपटादि उठाठेवी ।
वेदांतश्रवणींच असावी । आवडी बहु ॥ ११ ॥
ऐसें वेदांतश्रवण जरी । गुरुमुखें सर्वदा करी ।
गुरुवांचून निर्धारीं । प्रतीती न बाणे ॥ १३ ॥
तया गुरूचें लक्षण । पुढें असे निरूपण ।
परी कैसें करावें श्रवण । अवधारीं तें ॥ १४ ॥
हें ब्रह्म प्रत्यक्ष कळावें । नामरूप मिथ्या स्वभावें ।
कांहीं जाणणें न उरावें या नांव श्रवण ॥ १५ ॥
पुढें मननावांचून । न होती संशय भग्न ।
अनेक शास्त्रांचें वेवादन । म्हणोनियां ॥ १६ ॥
येथें दृष्टांत आणि युक्ती । साध्कां घडे मननप्राप्ती ।
संशय अवघे मावळती । लाहे स्थिती आपुली ॥ १७ ॥
शास्त्रीं नाना रीतीं बोलिलें । प्रत्ययेंवीण अवघें फोलें ।
तें तें त्यागून घेतलें । पाहिजे एक ॥ १८ ॥
अचाट बुद्धि खेळवावी । बळें मोक्षश्री वरावी ।
सूक्ष्मविचारें समजावी । पूर्णस्थिति जे ॥ १९ ॥
संशय सर्व निमाले । द्वताचें भान विरालें ।
मननाचें हें रूप झालें । दुसरें साधन ॥ ९२० ॥
हेंचि दृढ व्हावें चित्तीं । तरी अभ्यासीं योगरीती ।
तिसरें साधन निश्चितीं । बोलिजेतें ॥ २१ ॥
ब्रहम्चि सत्य आपण । जग जीव मिथ्या संपूर्ण ।
इतुकें सर्वदा अनुसंधान । स्मरणरूपें ॥ २२ ॥
स्मरण जेथून उद्‍भवतें । पुन्हां जेथें लया जातें ।
निश्चय आपण तेंचि तें । अखंडता ऐसी ॥ २३ ॥
नको प्राणाची निरोधता । नको मनाची स्तब्धता ।
दिसे भासे त्या त्या आंतौता । आपणचि वाटे ॥ २४ ॥
हाचि येथें योगाभ्यास । द्वैताचा नव्हे उमस ।
पूर्णब्रह्म एकरस । तिसरें साधन ॥ २५ ॥
ऐसें श्रवण आणि मनन । तिसरें तें निद्दिध्यासन ।
दृढाभ्यासें स्वयें आपण । आपणा भेटे ॥ २६ ॥
स्मरतां न स्मरतां एक । आपण ब्रह्म निश्चयात्मक ।
साक्षात्काराचें कौतुक । ये रीतीं असे ॥ २७ ॥
सर्व एक मावळलें द्वैताद्वैतभान गेलें ।
परिपूर्ण ब्रह्म संचलेंम् । तिन्ही काळीं ॥ २८ ॥
ऐसा अंगें ब्रह्म झाला । संशय अवघाचि निमाला ।
मग विचारही राहिला । साधरूप ॥ २९ ॥
ऐसें हें गा परमार्थाचें । निरूपण झालें साधनाचें ।
याविरहित साधन कैंचें । असे दुसरें ॥ ९३० ॥
देवदत्त म्हणे जी श्रीगुरु । येथें साधन एक विचारु ।
श्रवणमननें साक्षात्कारु । घडे साधकां ॥ ३१ ॥
परी शब्दें परोक्षतीरीं । कळे ऐसी अनुभूती ।
अपरोक्षज्ञान कोणे रीतीं । शब्दें ब्रह्म होय ॥ ३२ ॥
मन वणी मुरडे जेथें । शब्दप्रवृत्ती कैसी तेथें ।
तरी सांगावें सद्‍गुरुनाथें अपरोक्ष कैसेनि ॥ ३३ ॥
तेव्हां बोलती श्रीशंकर । ऐक अपरोक्षाचा निर्धार ।
येणें श्लोकीं साचार । निरूपिजेल ॥ ३४ ॥


शब्दशक्तेरचिंत्यत्वात् शब्दादेवापरोक्षधीः ।
सुषुप्तः पुरुषो यद्वत् शब्देनैवानुबध्यते ॥ १८ ॥


शब्दाची अचिंत्य रचना । शब्देंचि पावे अपरोक्षज्ञाना ।
जैसा निजेला प्रुष जाणा । शब्दें जागा होय ॥ ३५ ॥
शब्दचि सृष्टीसी मूळ । नामरूपें निर्मी सकळ ।
तोचि तयासी होय काळ । ज्ञानोदयीं ॥ ३६ ॥
जेव्हां अज्ञान असे पाठीं । तेव्हां कल्पी जीवसृष्टी ।
ज्ञानाची फुटतां पांहटी । मिथ्यात्वें सर्वां विदारी ॥ ३७ ॥
तुवां पुसिलें शब्दें येणें । अपरोक्ष अंगें कैसें होणें ।
तरी ऐक सावधपणें बोलिजेतें ॥ ३८ ॥
अंगें अपरोक्ष आहे मुळीं । अज्ञानें झाली वेगळी ।
ब्रह्म नाहीं मुखकमळीं । न दिसे म्हणे ॥ ३९ ॥
दशम आपण विसरला । नवांतें मोजिता झाला ।
म्हणे दहावा नदींत मेला । कोठें न दिसे ॥ ९४० ॥
नाहीं न दिसे दोन्ही परी । हेंचि आवरण अंतरीं ।
दोन्ही प्रकारें संहारी । परोक्षापरोक्ष ॥ ४१ ॥
अस्ति ब्रह्म आहे दशन । हाचि परोक्षाचा उगम ।
तेणें नाहींपणाएं नाम । पुसून टाकिलें ॥ ४२ ॥
प्रत्यक्ष दशम ब्रह्म तूंचि । येणें सिद्धि अपरोक्षाची ।
न दिसे ऐसिया आवरणाची । हानि ते समयीं ॥ ४३ ॥
मुळीं ब्रह्मचि हा न होता । तरी शब्दब्रह्म करी केउता ।
भ्रमें आपणासी चुकतां । भ्रम जातां भेटे ॥ ४४ ॥
तस्मात् शब्दचि कारण यासी । परोक्षापरोक्षज्ञानासी ।
परी वाक्यें असती जैसीं । तैसेंचि होय ॥ ४५ ॥
ब्रह्म हें सच्चिदानंद । आहे ऐसा बोलतां शब्द ।
तेणें नव्हेचि अभेद । अपरोक्षज्ञान ॥ ४६ ॥
तूंचि ब्रह्म स्वयें अससी । महावाक्याची प्रवृत्ति ऐसी ।
गुरुमुखें ऐकतां आपैसी । अपरोक्षता बाणे ॥ ४७ ॥
जैसा कोणी निजेला नर । नाममात्र करितां उच्चार ।
जागा होय झडकर । शब्दें जैसा ॥ ४८ ॥
देवदत्ता ऐसें म्हणसी । नामाची दृढता पुरुषासी ।
ब्रह्मस्थिति कोठें तैसी । पूर्वानुभूत ॥ ४९ ॥
तरी ऐसें न कल्पावें । पूर्वानुभूतचि जाणावें ।
अहंब्रह्मस्फुरण स्वभावें । चाले परेपावेतों ॥ ९५० ॥
पश्यंतीपासून वैखरी । कल्पिली देहबुद्धि दुसरी ।
अज्ञान नुरतां तिळभरी । सहज अपरोक्ष ॥ ५१ ॥
असो तुजला खरें खोटें । प्रस्तुत झालें एकवटें ।
तेणें तुजलागीं न भेटे । अपरोक्षज्ञान ॥ ५२ ॥
तरी अतां ऐकिजे । आत्मानात्म निवडिजे ।
तेणें विवेकें लाहिजे । अपरोक्षज्ञान ॥ ५३ ॥


आत्मानात्मविवेकेन ज्ञानं भवति निर्मलं ।
गुरुणा बोधितः शिष्यः शब्दब्रह्मातिवर्तते ॥ १९ ॥


आत्मानात्मविवेकें करून । तत्काळ होय निर्मळ ज्ञान ।
गुरूनें शिष्य बोधितां जाण । शब्द लंघून अर्थ पावे ॥ ५४ ॥
देवदत्ता हा साख्याचा । पूर्वांगचि वेदांताचा ।
विवेक वोलिजे तुज साचा । अवधान देई ॥ ५५ ॥
आत्मा काय अनात्मा काय । ऐसा विचार अंतरीं होय ।
तस्मात् हे ऐकावी सोय । ओळखी दोहोंची ॥ ५६ ॥
दिसतें भासतें कळून येतें । जड चंचळ विकारवंतें ।
मिथ्यात्वें सुखदुःख उमटतें । तें तें अनात्मा ॥ ५७ ॥
अनात्म्याचा निर्धार । तुज सांगितला साचार ।
इतुक्या चिन्हें जें गोचर । तें तें त्यागीं ये क्षणीं ॥ ५८ ॥
न दिसे न भासे न कळें जें । निर्विकारें सर्वां ओळखिजे ।
सदा सुखमात्र असिजे । तोचि आत्मा ॥ ५९ ॥
ऐसीं हीं चिन्हें बुद्धीनें समजून निश्चय करणें ।
तरी अनायासें पवणें । निर्मळ ज्ञाना ॥ ९६० ॥
जेथें किंचित् भेद नाहीं । तेंचि मिर्मल ज्ञान पाहीं ।
यावीण अपरोक्ष कांहीं । नसे दुसरें ॥ ६१ ॥
जया आत्मानात्मविवेक । तोचि अधिकारी एक ।
मागें बोलिलें रूपक । बहुधा याचें ॥ ६२ ॥
ऐसा जरी अधिकार । तरे पाहिजे गुरुशास्त्र ।
हें तिन्हीही होतां एकत्र । समाधान पावे ॥ ६३ ॥
सच्छास्त्र तो वेदांत । मागें बोलिला निश्चित ।
आतां ऐकें सावचित्त । गुरुलक्षणें कैसीं ॥ ६४ ॥
जो निजांगें ब्रह्म पूर्ण । अभंग जयाचें समाधान ।
स्वानुभवें तृप्ति गहन । तोचि सद्‍गुरु ॥ ६५ ॥
अकुंठित प्रबोधशक्ती । शब्दब्रह्मीं पर्पूर्ण गती ।
ऐसा सद्‍गुरु साधकांप्रती । बोधीं तत्क्षणी॥ ६६ ॥
निजांगेंही ब्रह्म असूनी । शब्दब्रह्मीं शक्ति उणी ।
तेणें नव्हे संशयधुणी । सच्छिष्याची ॥ ६७ ॥
प्रबोधशक्ति असे प्रबळ । अंगें ब्रह्म नव्हे निश्चळ ।
तेणें बोधें अनुभव केवळ । नुमटे सच्छिष्यीं ॥ ६८ ॥
चंद्र जो नेत्रें न देखे । तो कैसा दावील शाखे ।
आणि शाखेवीण दावूं न शके । चंद्र पाहतांही ॥ ६९ ॥
जेणें चंद्र पाहिला दृष्टीं ।तोचि शाखा दावी बोटीं ।
पाहणार तोही उठाउठीं । चंद्रमा देखे ॥ ९७० ॥
तैसें ब्रह्मज्ञान प्रांजळ । शब्दब्रह्म करतळामळ ।
तोचि सद्‍गुरु दयाळ । मेळवी परमार्था ॥ ७१ ॥
ऐसिया गुरूनें शिष्यासी । बोधिले असतां उपदेशीं ।
तत्क्षणी पावे निजार्थासी । शब्दशाखा टकूनि ॥ ७२ ॥
असो तुवां देवदत्ता । थोर आक्षेप केला होता ।
शब्दमात्रें लाभ केउता । त्याचें उत्तर दिधलें ॥ ७३ ॥
यास्तव गा शिष्यराया । उपदेशावीण साधन वायां ।
श्रवणमननादि उपाया । विचारें अपरोक्ष ॥ ७४ ॥
ऐसें ऐकोनि देवदत्त । साष्टांग घाली दंडवत ।
प्रदक्षिणा असे करीत । प्रेमभरित अंतरीं ॥ ७५ ॥
जोडोनियां उभयपाणी । बोलताहे सद्‍गद वाणी ।
जय जय सद्‍गुरो मोक्षदानी । करुणार्णवा ॥ ७६ ॥
मज वत्साची तूं गाय । मज लेकुराची माय ।
आतां कळवळून हृदय । प्रेमें पान्हा घालीं ॥ ७७ ॥
मजवरी कृपा करणें । मातेसी काय बाळ म्हणे ।
परी प्रेमाचें साजणें । माताचि जाणे ॥ ७८ ॥
तैसें म्यां काय बोलावें । हें सर्वज्ञा सर्व ठावें ।
अम्हां नेणतियांचे कणवे । धरिला अवतारु ॥ ७९ ॥
मज बोधावें पूर्ण ज्ञान । हें कैसें बोलावें वचन ।
सद्‍गुरु दयाळ परिपूर्ण । इच्छिती करी करतील ॥ ९८० ॥
चातकें मुखचि पसरावें । हेंब पडती तितुकें घ्यावे ।
तैसे म्यां अवध्यान द्यावे । वचनरहस्य ॥ ८१ ॥
हेही माझी प्रौढी नव्हे । मजसी अधिकार कोठें आहे ।
परी कृपाळुवें लवलाहें । धरिलें हृदयीं ॥ ८२ ॥
आतां सद्‍गुरु जैसे ठेइती । तैसेंचि राहणें द्रुढमती ।
ऐसें बोलोनियां पुढती । नमन केलें ॥ ८३ ॥
ऐसें देखोनि आचार्य । सप्रेम द्रवलें हृदय ।
आतां वत्सा सावध होय । उपदेशक्रमीं ॥ ८४ ॥
तेरा श्लोकीं सदाचरण । जें ज्ञानियाचें समाधान ।
तुज सांगितलें निरूपण । परोक्षरीतीं ॥ ८५ ॥
एक श्लोकीं साचार । ज्ञान वैराग्य निर्धार ।
निरूपिलें अति सुंदर । परोक्षेंचि ॥ ८६ ॥
तेथोनियां श्लोक तेन । मुख्य ज्ञानाचें उपकरण ।
गुरुशास्त्र विचार करणें । सच्छिष्यासी ॥ ८७ ॥
मागें आम्ही आश्वासिलें । तुजसी बोध करूं वहिलें ।
तयाचें विस्मरण झालें । नाही आम्हां ॥ ८८ ॥
परी आतां एक करावें । जें जें आम्ही मुखें बोलावें ।
तें तें तत्त्व अनुभवावें । प्रत्यक्ष पुढें ॥ ८९ ॥
सांडीं म्हणूं तें सांडावें । मिथ्या मिथ्यात्वें त्यागावें ।
ऐसें नेतिमुखें समजावें । स्वरूप आपुलें ॥ ९९० ॥
तत्पद आणि त्वंपद । यांचा कैसा अनुवाद ।
वाच्य टाकून् अभेद । लक्ष्यांशीं कैसा । ९१ ॥
यथाक्रमें हे बोलिजे । येथें अतिसावधान दीजे ।
त्वंपदशोधनींच उमजे । सहज तत्पद ॥ ९२ ॥
यास्तव आधीं त्वंपदाचें तीन श्लोकीं निरूपण साचें ।
बोधिल्या रीतीं बुद्धीचें । अनुसंधान असावें ॥ ९३ ॥
तुझा आम्ही हात धरूनी । पंथ चालिजे येथूनी ।
तुजला तुझें अधिष्ठानीं । नेऊन घालूं ॥ ९४ ॥
जेथवरी मर्यादाभूमी । तेथवरी बोलिजे आम्हीं ।
एकरूप होतां संगमीं । बोलणें कैचें ॥ ९५ ॥
परी न बोलतांही तुजसी । मेळविजे अखंडरसीं ।
हे प्रतिज्ञाचि पाहें ऐसी । येचि क्षणीं गा ॥ ९६ ॥
तेथें आम्ही ढकलून देऊं । मग तुझा तूं जाणें अनुभवू ।
त्याच क्षणीं उत्तीर्ण होऊं । तुझिया ऋणें ॥ ९७ ॥
देहद्वय आधां अवधारीं । तेथें असती कोश चारी ।
ते ते विचरें त्याग करीं । मी नव्हे म्हणोनी ॥ ९८ ॥


न त्वं देहो नेन्द्रियाणि न प्राणो न मनो न धीः ।
विकारित्वात् विनाशित्वात् दृष्यत्वाच्च घटो यथा ॥ २० ॥


तू देह नव्हेसी दृश्य । इंद्रियें प्राण पावती नाश ।
विकारी मन बुद्धि नव्हेस । घटाचे परी ॥ ९९ ॥
ऐकें तुवा देवदत्ता । आपुलें निजरूप नेणतां ।
वाउगी कल्पिली अहंता । मी देह म्हणोनी ॥ १००० ॥
मागें आम्हीं बोलिलें । आत्मानात्म निवडिलें ।
पुन्हां संक्षेपें अवधारिलें । पाहिजे आतां ॥ १ ॥
जड दुःख नाशिवंत । तें तें जाण अनात्मजात ।
अस्तिभाति सदोदित । प्रियरूप आत्मा ॥ २ ॥
सच्चिदानंद जें ब्रह्म । तोंचि स्वयें आत्माराम ।
अस्तिभाति प्रिय परम । असे म्हणोनी ॥ ३ ॥
तेंचि कैसें ओळखावें । तेंही बोलिजेतें बरवें ।
तेणें रीतीं समजावें । आत्मस्वरूप ॥ ४ ॥
मी आहें ऐसें वाटे तुज । मी नाहीं म्हणतां लाज ।
ऐसें सर्वकांईं जें उमप । अस्तिरूप तें ॥ ५ ॥
जें सर्वदा जाणतें । पदार्थमात्रा प्रकाशितें ।
चिद्‍रूपचचि जाणावें तें । भातित्वपणें ॥ ६ ॥
सर्व पदार्थीं ज्याकरितां । आवडी उपजे चित्ता ।
त्या त्या पदार्थीं पाहतां । प्रियत्व कैंचें ॥ ७ ॥
तस्मात् अतिशय जें आवडे । तेंचि आत्म्याचें रूपडें ।
एवं हें बोलणें उघडें । अस्तिभातिप्रियत्व ॥ ८ ॥
तेंचि तुझें मुख्य रूप । येर हा अवघा आरोप ।
दिसे भासे नामरूप । रज्जुसर्पावरी ॥ ९ ॥
ऐसींचि सर्व तत्त्वें उमगें । मी मी तया म्हणसी उगें ।
त्यांमध्येंचि तूं असंगें । ओळखीं त्या ॥ १०१० ॥
मी आत्मा हा दृढनिश्चय । होतां नामरूपाचा क्षय ।
जडासी मी म्हणतां काय । अज्ञान याहुनी ॥ ११ ॥
स्थूल देह अस्थिमांसाचा । जन्मला हा रक्तरेताचा ।
त्यासी मी म्हणतां वाचा । लाज कां न वाटे ॥ १२ ॥
अस्थि त्वचा नाडी मांस । रोमादि भूमीचे अंश ।
मग आत्मा कैसा अविनाश । विचारीं मनीं ॥ १३ ॥
शुक्र शोणित लाळ । स्वेद मूत्रासी आप मूळ ।
हा आत्मा नव्हे केवळ । द्रवत्वरूपें ॥ १४ ॥
क्षुधा तृष्णा निद्र मैथुन । आलस्यादिकां तेज कारण ।
तें आत्मा नव्हे परिपूर्ण । विकार देहाचे ॥ १५ ॥
आकुंचन प्रसरण निरोधन । वायूचें हे चलनवलन ।
या विकारा आत्मा होणें । न घडे कधीं ॥ १६ ॥
काम क्रोध मोह भय । शोकासी आकाश कारण होय ।
हाचि आत्मा निःसंशय । म्हणती मूढ ॥ १७ ॥
एवं पंचभूतांचें निर्मित । मातापित्यांपासून होत ।
षड्‌‍विकार तेथें राहत । तो आत्मा कैसा ॥ १८ ॥
जन्मतो आहे वाढतो । तोचि तरुणत्व जरा पावतो ।
प्राण जातांचि नासतो । हा आत्मा अन्व्हे कधीं ॥ १९ ॥
नाशवंत आणि जड । स्वतां न चळे दगड ।
सदा हें दुःखाचें भांडें । आत्मा नव्हे ॥ १०२० ॥
जागृति अवस्था जडासी । स्वतंत्रता कोठें यासी ।
लिंगदेह मिळतां त्यासी । व्यवहार घडे ॥ २१ ॥
सूक्ष्मासी देहावीण । भोग प्राप्त नव्हे जाण ।
यास्तव स्थूलामाजी राहून । व्यवहार करी ॥ २२ ॥
तस्मात् अवस्था बुद्धीची । स्थूलासी अवस्था कैंची ।
जड दृश्य अन्नमयाची । ओळखी व्हावी ॥ २३ ॥
हस्तपादादि मस्तक । आणि इंद्रियांचे गोलक ।
या इतुकियांसी कौतुक । म्हणसी माझें ॥ २४ ॥
माझें माझें म्हणत असतां । तयासी मी म्हणसी केउता ।
विचारून पाहें पुरता । अंतर्यामीं ॥ २५ ॥
ऐसिया जडामाजी पाहें । तुझा आहेपणा आहे ।
त्यावरी उगेंचि दिसताहे । नामरूप ॥ २६ ॥
अगा सत्यपणावीण । नव्हे भ्रमासी दर्शन ।
ऐसें जें कां अधिष्ठान । तो तूं आत्मा ॥ २७ ॥
जडामध्यें आहेपण । तेंचि आत्मस्वरूप जाण ।
सूक्ष्मदृष्टीं अनुमान । पाहतां येतें ॥ २८ ॥
ऐसा आहेपणा तुजपुढें । आपेआपचि उघडे ।
प्रस्तुत देहाचें मडें । कळलें कीं तुज ॥ २९ ॥
घट जैसा दृष्टी पाहे । डोळा कधींच घट नव्हे ।
तैसा देह दृश्य दिसताहे । नव्हे आत्मा यास्तव ॥ १०३० ॥
तूं म्हणसी आत्मा कोण । देहासी कल्पिसी जडपणें ।
परी मी देह म्हणतां होणें । आरोप आत्म्यासी ॥ ३१ ॥
तस्मात् सांडीं देहबुद्धीसी । तूं आत्मा स्वयें अससी ।
आतां यासी मी म्हणसी । तरी आम्हां शब्द नाहीं ॥ ३२ ॥
तैसेंचि तूं नव्हेसी इंद्रिय । क्रियाशक्तींचा समुदाय ।
कांहीं ज्ञानशक्तिही होय । ज्ञानेंद्रियासी ॥ ३३ ॥
हेंही काय पंचभूतांचें । परी अंश हे रजसत्वाचे ।
द्वास असती निर्गमाचें । मनबुद्धीसीं ॥ ३४ ॥
वाचा अग्नि बोलणें । मातृकेचा उच्चार करणें ।
त्यासी आत्मा कोण म्हणे । विनशियासी ॥ ३५ ॥
उच्चार न होतां मनन । तेंचि मध्यमेचें लक्षण ।
मनन न होतां भासकपण । ते पश्यंती वाचा ॥ ३६ ॥
नव्हे भास नव्हे मनन । उगीच स्फुरे आठवण ।
तेचि परा हे ओळखण । परी ते तूं नव्हेसी ॥ ३७ ॥
पाणी इंद्र देणें घेणें । व्याआरती जडपणें ।
तेंचि तुझें रूप म्हणणें । नव्हे योग्य ॥ ३८ ॥
वामन पादाची क्रिया । गमन ऐसें ओळखीं तया ।
तेंचि तूं गा शिष्यराया । आत्मा नव्हेसी ॥ ३९ ॥
उपस्थेंद्रिय प्रजापति । घेतसे सुखाची रति ।
परी तो विकार स्वयंज्योति । आत्मा केवीं तूं ॥ १०४० ॥
यम गुदाधोद्वारीं । देहमळाचा विसर्ग करी ।
तो कैसा ओसी निर्विकारी । आत्मा तूं गा ॥ ४१ ॥
एवं कर्मेंद्रियें पांची । क्रियारूप ओळखी यांची ।
परी न कळे विषयरुची । व्यापारती जडत्वें ॥ ४२ ॥
आतां ज्ञानेंद्रियें जयां म्हणती । शब्दादिविषय घेती ।
हेही क्रिया परी जाणती । कांहींसें विषया ॥ ४३ ॥
श्रोत्र शब्दासी जाणे । परी अर्थ निवडूं नेणे ।
यास्तव ज्ञानक्रियालक्षणें । दोन्ही असती ॥ ४४ ॥
ऐसेंचि चारीं समजावें । ज्ञानक्रियात्मक ओळखावें ।
परी तें विनाशी स्वभावें । तूं आत्मा नव्हेसी ॥ ४५ ॥
श्रोत्र दिशा ऐकणें । वायु त्वचा स्पर्शणें ।
चक्षु सूर्य देखणें । नव्हे आत्मा ॥ ४६ ॥
जिव्हा वरुण रसस्वाद । अश्विनौदेव घ्रण गंध ।
हेंचि नव्हेसी निर्द्वंद्व । आत्मा तूं गा ॥ ४७ ॥
एवं दहाही विकार । होती जाती व्यापार ।
यांमध्यें तूं निर्विकार । अससी आत्मा ॥ ५१ ॥
त्यामध्यें जो आहेपणा । तोचि तूं आत्मा ऐसी खुणा ।
अधिष्ठानावीण कोणा- । वरी भास होय ॥ ४९ ॥
ज्ञानेंद्रियांमाजी कांहीं । चिद्‍रूपत्वें असे पाहीं ।
परी निःशेषचि नाहीं । कर्मेंद्रियांत ॥ १०५० ॥
एवं इंद्रियेंही दाही । अस्तिरूपत्वें आत्मा पाहीं ।
चिद्‍रूपचि असे कांहीं । तो तूं आत्मा ॥ ५१ ॥
येथें तुज सच्चिद्‍रूप । न कळे जरी त्याचें रूप ।
तरी पुढें आपेंआप । बुझसी तूं गा ॥ ५२ ॥
परी इंद्रियदेवता व्यापार । स्पष्ट कळला कीं विकार ।
यासी मी म्हणतां दूर । राहिला आत्मा ॥ ५३ ॥
तस्मात् हेंचि मी ऐसें । सांडीं गा अनात्मपिसें ।
जड दुःख आणी नासे । तें तेअम् तूं नव्हेसी ॥ ५४ ॥
स्थूल देह दृश्य जैसा । इंद्रियविकार जाणती तैसा ।
यासी किंचित्‌ही मी ऐसा । न म्हणे कधीं ॥ ५५ ॥
हें असो प्राण असतां । देहासी असे जीवत्वता ।
परी तेही जड केउता । आत्मा तूं होसी ॥ ५६ ॥
ऊर्ध्वगती जो चाले । प्राण नांव तया आले ।
परी त्यासी आत्मत्व कल्पिलें । विमूढजनीं ॥ ५७ ॥
अधोगमन अपानाचें ।व्यान सर्वांगीं नाचे ।
कंठी राहणें उदानाचें । समान नाभीं ॥ ५८ ॥
याचा जडत्वेंचि व्यापार । कांहीं न जाणई अणुमात्र ।
म्हणोनि बोलिले विकार । क्रियाशक्तीचा ॥ ५९ ॥
क्षुधा तृषा दोन्ही धर्म । तेणें पोषी इंद्रियग्राम ।
तो नव्हेचि आत्माराम । नासे म्हणोनी ॥ १०६० ॥
येथेंही सद्‍रूपें अससी । सर्पाधिष्ठान रज्जु जैसी ।
तो तूं आत्मा भ्रमासी प्रांअ ऐसे नाम ॥ ६१ ॥
परी या भ्रमातें जाणसी । यास्तव प्राण तूं नव्हेसी ।
तरी तूं आत्मा अविनाशी ।मीच प्राण हें त्यागीं ॥ ६२ ॥
करी संकल्प विकल्प । तेंचि मनाचें रूप ।
जगत्कल्पनेचा आरोप । जेणें केला ॥ ६३ ॥
मुख्य निर्विकल्पस्फुरण । जया नांव अंतःकरण ।
तयाचे भाग झाले दोन । मन बुद्धि नामें ॥ ६४ ॥
चित्तधर्म चिंतनात्मक । तेंही मनाचें रूपक ।
तेंचि आत्मा हें कौतुक । न घडे न घडे ॥ ६५ ॥
संकल्पें होय नव्हे करी । त्याचा अमुक निश्चय धरी ।
त्या वृत्तीसी निर्धारीं । बुद्धि तें नाम ॥ ६६ ॥
अमुक कार्य अगत्य करूं । अमुक हें हातीं न धरूं ।
ऐसें जाणिजे अहंकारू । बुद्दिवृत्तीचा ॥ ६७ ॥
मन बुद्धि चित्त अहंकार । व्यापारभेदें चत्वार ।
परी तीं दोनचि साचार । मन आणि बुद्धि ॥ ६८ ॥
हेंही कार्य भूतांचें । ज्ञानशक्ति सत्वगुणाचें ।
भोग साधन जीवात्मयाचें । चंचल विकारी ॥ ६९ ॥
आत्मप्रकाशावांचून । वृत्तीसी न घडे वर्तन ।
ज्ञानशक्तिया अभिधान । परी परप्रकाश ॥ १०७० ॥
बुद्धि मन ऐसीं दोन्ही । इंद्रियद्वारा निघोनी ।
कीजे विषयांचीं घेणीं । भोग जीवात्मया ॥ ७१ ॥
एवं ऐसी उभयवृत्ती । यासी अंतःकरण म्हणती ।
उद्‍भव आणि समाप्ती । असे यासी ॥ ७२ ॥
पाणियावरी तरंग । कीं आकाशी मेघ ।
विकाररूपचि असंग । आत्मा कैसा ॥७३ ॥
शोक मोह लज्जा भय । कामक्रोधादि अपाय ।
इत्यादि हा समुदाय । बुद्धिवृत्तीचा ॥ ७४ ॥
ऐसिया वृत्तीमाजी जाण । तुज आत्म्यासी व्याप्ती पूर्ण ।
सद्‌रूप चिद्‍रूप दोन । लक्षणें ओळखीं ॥ ७५ ॥
तरंगीं जैसें पाणी । वर्तताहे अखंडपणीं ।
तेवीं तूं या अंतःकरणीं । अस्तित्वें अससी ॥ ७६ ॥
तुझिया प्रकाशामुळें । वृतीलागी ज्ञान कळें ।
भोगिती विषयसोहळे । तेंचि चिद्‍रूप ॥ ७७ ॥
परी आनंद आच्छादिला । अन्यथा विकार झाला ।
सुखदुःखें शीण केला । म्हणोनियां ॥ ७८ ॥
प्रकाश आणि दाहकता । हीं तेजाचीं रूपें तत्त्वता ।
परी चंद्रमंडळीं पाहतां । प्रकाश असे ॥ ७९ ॥
शीतळ उपाधीमुळें । दाहकता हे मावळे ।
तेवीं आनंदरूप झांकोळे । वृत्तीमाजी ॥ १०८० ॥
तस्मात् सच्चिद्‍रूपासी । विकारामाजीं ओळखीं त्यासी ।
असज्जडदुःखात्मकासी । सांडीं परतें ॥ ८१ ॥
सांडीं म्हणतां भाविसी आन । कीं निःशेष काढावें खांदून ।
तरी ऐसें मव्हे ओळखून । मी म्हणणें सांडीं ॥ ८२ ॥
एवं देह इंद्रिय प्राण । आणि मन बुद्धि दोन ।
हें सर्व विकारी दृश्य म्हणून । आत्मा नव्हे ॥ ८३ ॥
जें असत् जड दुःखरूप । तें तें मिथ्या भ्रमरूप ।
अस्तिभातिप्रियरूप । जाणिज आत्मा ॥ ८४ ॥
स्थूल देह अन्नमय । कोश ऐसी संज्ञा होय ।
प्राण आणि कर्मेंद्रिय । प्राणमय कोश ॥ ८५ ॥
ज्ञानेंद्रिय एज मन । मनोमय कोशाचें लक्षण ।
बुद्धिज्ञानेंद्रिय मिळून् ।विज्ञानकोश ॥ ८६ ॥
प्राणमय मनोमय । विज्ञानमय कोशत्रय ।
सप्तदश शब्दांचा समुदाय । लिंगदेह बोलिजे ॥ ८७ ॥
स्थूल जड आत्मा नव्हे । सूक्ष्मीं नाना विकार पाहें ।
याचें रूप सकल आहे । असज्जड दुःखरूप ॥ ८८ ॥
आतां दोन्हींच्या अवस्था । जागृतिस्वप्न व्यवस्था ।
बोलिजे तयांची संख्या । यथाक्रमेंचि ॥ ८९ ॥
अंतःकरणवृत्ती प्राणाधारें ।श्रोत्रादि इंद्रियद्वारें ।
निघोनि होती विषयाकारें शब्दस्पर्शादि ॥ १०९० ॥
याचि नांवें जागृती । सुखदुःखें जीवास होती ।
आता स्वप्नावस्थेची स्थिती । सावध ऐकें ॥ ९१ ॥
इंद्रियांवीण बुद्धिवृत्ती । शब्दादिविषय कल्पिती ।
तेणें सुखदुःखें उमटती । अंतर्यामीं ॥ ९२ ॥
हा संस्कार जागृतीचा । संकल्परूप व्यवहार याचा ।
स्वप्नावस्था बोलिजे वाचा । तयालागीं ॥ ९३ ॥
जागृतीचें नेत्रस्थान । म्हणजें सर्वांगीं असे वर्तणें ।
नेत्र एक उपलक्षण । बोलिलें असे ॥ ९४ ॥
स्वप्नाचें कंठीं बिढार । संकल्परूप जो विकार ।
आतां दोहींचे साचार । बोलिजे अभिमानी ॥ ९५ ॥
अंतःकरणीं प्रतिबिंबलें । तयासी जीवनाम आलें ।
तेंचि तदाकार झालें अभिमानरूपें ॥ ९६ ॥
मी देह माझें स्वजन । मी उत्तमकुलीं उत्पन्न ।
जातिआश्रमादिवर्ण । मज असती ॥ ९७ ॥
ऐसा जो अभिमान धरी । तो विश्वाभिमानीं निर्धारीं ।
मी कर्ता भोक्ता अंतरीं । अभिमान तैजस ॥ ९८ ॥
मी सुखी दुःखी पापी । मी पुण्यात्मा प्रतापी ।
ऐसियाही संकल्पीं । बोलिजे तैजस ॥ ९९ ॥
स्थूल देह मात्र अकार । सूक्ष्म तोचि उकार ।
उभयरूपें प्रणवाक्षर । विभागलें दो ठायीं ॥ ११०० ॥
विषय प्रत्यक्ष जैं भेटती । दृश्यत्वें इंद्रियांसी प्राप्ती ।
तेव्हां सुखदुःखें जीवा होती । स्थूल भोग या नांवें ॥ १ ॥
बुद्धिवृत्तीनेण् आठवितां । विषय भासे आंतौता ।
सुखदुःख उठे चित्ता । हा प्रविविक्त भोग ॥ २ ॥
स्थूल सूक्ष्म जागृति स्वप्न । नेत्र कंठी दोन्ही स्थाने ।
विश्व तैजस अभिमान । आत्मा तूं नव्हेसी ॥ ३ ॥
अकार उकार मात्राद्वय । स्थूल प्रविविक्त भोग होय ।
समजावें हें अज्ञानकार्य । आत्मा अन्व्हेसी ॥ ४ ॥
अगा देवदत्ता इतुकें । निरूपिलें तुज निकें ।
अंतरीं काळलें असे जितुकें । तें बोलोनि दाखवीं ॥ ५ ॥
देवदत्तें करोनि नमन । बोलताहे नम्र वचन ।
अस्तिभातिप्रिय पूर्ण । लक्षण आत्म्याचें ॥ ६ ॥
असज्जड दुःखरूप हें अनात्म्याचें स्वरूप ।
साही लक्षणामाजी अल्प । कळलें तें निवेदूं ॥ ७ ॥
उद्‍भवें तितुकें नासते । यास्तव असत् मनीं वाटतें ।
परप्रकाशें वर्ततें । म्हणोनि जड ॥ ८ ॥
सुखदुःखें शीण पावे । दुःखरूपचि या नांवें ।
हे अनात्मजात आघवें । कळलें ऐसें ॥ ९ ॥
सत्य अधिष्ठानावीण । भ्रमसी नव्हे दिसणें ।
सर्वदा आहे जो पूर्ण । तद्‍रूप आत्मा ॥ १११० ॥
सर्व वृत्तींचा जाणता । हा चिद्‍रूप आत्मा तत्त्वतां ।
परी आनंद नेणें मी कोणता । सप्रतीत ॥ ११ ॥
शंकर म्हणती शिष्यराया । अनुमानें बोलसी वायां ।
यथार्थ बोलिल्या न्याया । तुज नाहीं कळलें कीं ॥ १२ ॥
प्रत्यक्षासी अनुमान । तया म्हणूं न ये ज्ञान ।
आतां होईल सावधान । सप्रतीत बोलूं ॥ १३ ॥
मृत्तिका जया क्षणीं कळे । तत्क्षणीं घटबुद्धि मावळे ।
घटबुद्धि जातां निवळे । मृत्तिका एक ॥ १४ ॥
तैसा अस्तिभातिप्रिय । आत्म्याचा होतां निश्चय ।
असज्जाद दुःख जाय । तत्क्षणींचि ॥ १५ ॥
असज्जड दुःख जयासी । सानुभवें कळे मानसीं ।
अस्तिभातिप्रियरूपासी । प्रगटता आयती ॥ १६ ॥
तस्मात् तुज नाहीं कळलें । म्हणून पाहिजे बोलिलें ।
नामरूप जितुकें झालें । भ्रमें अस्तित्वावरी ॥ १७ ॥
मृत्तिकेवीण घटासी । सांगें रूप आकारासी ।
आंत बाहेर मृत्तिका जैसी । विलसत असे ॥ १८ ॥
तंतूमाजी कापुसावीण । कोणतें होतसे भान ।
तैसे देहे प्राण बुद्धि मन । यांस रूप काय ॥ १९ ॥
सद्‍रूप तरी दिसेना । परी त्यावीण हे भासेना ।
भासासी मूळ कल्पना । परी तें झालेंचि नाहीं ॥ ११२० ॥
जें मुळींचि झालें नाहीं । रज्जूवरील जैसा अही ।
आहे तें स्वरूपचि पाहीं अस्तिस्वरूप ॥ २१ ॥
देवदत्त म्हणे महाराजा । सद्‍रूप होय जी ओजा ।
एकरूप भाव दुजा । झालाचि नाहीं ॥ २२ ॥
जें सर्वदा अखंड असे । आदिअंतीं एकरसें ।
आहे नाहीं दोन्ही ऐसें । बोलतां न ये ॥ २३ ॥
आचार्य म्हणती गा खरें । सद्‍रूप बाणलें निर्धारें ।
मिथ्या मिथ्यत्वें सारें गेलें नामरूप ॥ २४ ॥
परी चिद्‍रूप आणि आनंद । कळला पाहिजे निर्द्वंद्व ।
तरी ऐकावा संवाद । पुढील श्लिकींचा ॥ २५ ॥


विशुद्धं केवलं ज्ञानं निर्विशेषं निरंजनम् ।
यदेकं परमानंदं तत्त्वमस्यद्वयं परम् ॥ २१ ॥


विशुद्ध केवल ज्ञानघन । निर्विशेष जो निरंजन ।
एकचि परमानंद पूर्ण । तें तूं अससी अद्वय ॥ २६ ॥
देवदत्ता पूर्वश्लोकीं । निरूपण केलें कौतुकीं ।
देहद्वय आत्मा नव्हे कीं अस्तिभातिरूप ॥ २७ ॥
अस्तित्व बाणलें तुज । चिदानंदीं नव्हे उमज ।
चिद्‍रूप कळलें म्हणसी मज । परी तें सविशेष ॥ २८ ॥
साखर गोडी एक जैसी । वाटली अविचारबुद्धीसी ।
वृत्ती आणि ज्ञानरूपासी । एकत्र केलें ॥ २९ ॥
साखरेवेगळी गोडी । रसास्वादनीं निवडी ।
तैसें वृत्तीमधून काढीं । स्वानुभवें ज्ञान ॥ ११३० ॥
शब्दामाजी शब्दाकार । तैसेचि स्पर्शादि प्रकार ।
त्या त्या सारिखें साचार । ज्ञान झालें वाटे ॥ ३१ ॥
शब्द स्पर्श टाकावे । रूपरसादि त्यागावे ।
नुसतें ज्ञान अनुभवावें । विशुद्ध जें कां ॥ ३२ ॥
तैसाचि मनाचा संकल्प । सांडावें बुद्धीचें रूप ।
उरे जें कां स्वस्वरूप । ज्ञप्तिमात्र जाणावें ॥ ३३ ॥
चित्त चित्ताचा व्यापार ।मिथ्यात्वें त्यजावा अहंकार ।
उरें जें कां ज्ञानमात्र । तोचि आत्मा चिद्‍रूप ॥ ३४ ॥
विकारवृत्ति झाली जरी । तरीं ते ज्ञान निर्विकारी ।
या हेतू पदांमाझारी । निर्विशेष बोलिलें ॥ ३५ ॥
ऐसें जें पूर्णज्ञान । व्यापून अवस्था तीन ।
परी तया विकारा भिन्न । निर्विशेषत्वें ॥ ३६ ॥
साक्षित्वें जाणें जागृती । जाणे विषयमात्राप्रती ।
तैसीचि स्वप्नाची प्रतीती । त्याचि ज्ञानें होय ॥ ३७ ॥
शब्द जेणें ओळखिला । स्पर्शादि प्रत्यय होय त्याला ।
विषयभेद मात्र झाला । परी ज्ञान अभेद ॥ ३८ ॥
तेणेंचि रीतीं स्वप्नातें । साक्षित्वें जाणे भासातें ।
अवस्थाभेद परी ज्ञान तें । दुसरें नाहीं ॥ ३९ ॥
तेंचि सुषुप्तीतें जाणे । आपुलेनि सर्वज्ञपणें ।
परी ज्ञानासी भेद होणें । न घडे कधीं ॥ ११४० ॥
ऐसें बुद्धिवृत्तीवीण । जें कां असे विशुद्ध ज्ञान ।
तें प्रत्यक्ष अनुभवून । बोलें मजसी ॥ ४१ ॥
देवदत्त तेव्हां विचारी । ज्ञानें दिसती ही सारीं ।
आणि साक्षिही तयामाझारी । अनुभवा येतो ॥ ४२ ॥
परी वृत्तीवीण जें वेगळें । तें तों बुद्धीसी न कळे ।
जाणूं जातां तया बळें । उफाळे विकार ॥ ४३ ॥
तरी आतां जी सद्‍गुरु । येथें न सुचे विचारु ।
केवळ ज्ञानाचा निर्धारु । मज बाणवावा ॥ ४४ ॥
ऐकें देवदत्ता तुजसी । वृत्ति कळताहे आपैसी ।
परी मी नेणें आपणासी । म्हणसी तें अज्ञान ॥ ४५ ॥
तेंचि अज्ञान जैं फिटे । तरीच आपण आपणा भेटे ।
वृत्तिज्ञानही सर्व आटे । तत्क्षणींचि ॥ ४६ ॥
नसतां देहद्वय नामरूप । भासूं लागलें भ्रमरूप ।
यासी कारण स्वस्वरूप । न कळे तें अज्ञान ॥ ४७ ॥
हा कारणदेह तिसरा । सर्प जैसा नेणतां दोरा ।
परी देहद्वयाचा उभारा । येथूनि झाला ॥ ४८ ॥
ज्ञानघन स्वप्रकाश । असून नेणे आपणास ।
हाचि आनंदमय कोश । बोलिजे पांचवा ॥ ४९ ॥
येहील अवस्था सुषुप्ती । जेहें वृत्तीची समाप्ती ।
नव्हे स्वप्न ना जागृती । नेणीवदशा जे ॥ ११५० ॥
जागृतिस्वप्नीं वृत्तीसी । श्रम होती अतिशयेसीं ।
तेव्हां येतसे विश्रांतीसी । आनंदामाजी ॥ ५१ ॥
ऐसी वृत्ती लीन झाली । ते सुषुप्ति नाम पावली ।
तेचि अवस्था कल्पिली । हृदयस्थानीं ॥ ५२ ॥
मकारमात्रा प्रणवाची । अज्ञानरूप बोलिजे साची ।
तेथें प्राज्ञ अभिमानाची । प्रौढी असे ॥ ५३ ॥
तया अज्ञाना जाणतां असून कल्पिली अहंता ।
बळेंचि होय नेणता । प्राज्ञ तोचि ॥ ५४ ॥
कांहीं नसतां विकार । अनुभवीतसे सुखमात्र ।
तयासीच नाम साचार । आनंदभोग ॥ ५५ ॥
असो अज्ञानसुषुप्तिस्थान । मकरमात्रा प्राज्ञाभिमान ।
आनंदबोगही नेणपण । आत्मा नव्हेचि ॥ ५६ ॥
तया अज्ञानातें जाणे । तरी तेंचि आत्मा केवीं म्हणे ।
नेणिवेमाजी ज्ञानलक्षणें । कैसीं तें बोलूं ॥ ५७ ॥
ज्या क्षणीं वृत्ति उमटे । तेव्हां साक्षित्वें ज्ञान भेटे ।
जेधवां वृत्ति ओहटे । तेव्हांही जाणें ॥ ५८ ॥
वृत्तीचा अंत अनुभविला । तो वृत्ति उद्‍भवतां कळला ।
लय अमुक वेळ झाला । आठवीं ज्ञानें ॥ ५९ ॥
लयकाळीं अनुभव नसे । तरी वृत्तिकाळीं ज्ञान कैसें ।
यास्तव जाणता अखंड असे । तिन्ही काळीं ॥ ११६० ॥
वृत्तिपूर्वीं ज्ञानरूप । अखंड असे अमूप ।
उद्‍भवकाळीं आपेंआप । वृत्तीसी जाणे ॥ ६१ ॥
जेव्हां वृत्ति निमाली । त्या क्षणीं ज्ञप्ति उरली । ए
वं तिन्ही काळीं संचली । चित्प्रभा एक ॥ ६२ ॥
ऐसिया गा ज्ञानासी । अज्ञान वृथा आरोपिसी ।
हे भ्रांति सांडीं वेगेंसीं । ज्ञानमात्रचि तूं ॥ ६३ ॥
जो कां वृत्तीसी जाणे । तोचि आत्मा ओळखणें ।
परी वृत्तिविकार त्यागणें । वृत्ति असतांचि ॥ ६४ ॥
साखर सांडून गोडी घ्यावी । तैसी ज्ञानप्रभा ळखावी ।
वृत्तीवीण ही जाणावी । ज्ञप्ति आपुली ॥ ६५ ॥
बहु कासया बोलणें । आत्मा अज्ञान कधीं न होणें ।
सर्वदा ज्ञानघन ओळखणें । चिद्‍रूप आत्मा ॥ ६६ ॥
होय जी म्हणे देवदत । ज्ञानरूप सदोदित ।
आदि अंत अवलोकित । निजात्मप्रभें ॥ ६७ ॥
तस्मात् तिन्ही काळीं एक ज्ञान । जें सर्वदा अखंड पूर्ण ।
परी सद्‍रूपही ज्ञानाहून । वेगळें कोठें ॥ ६८ ॥
आहेपण तेंचि ज्ञान । ज्ञान तेंचि अखंडपण ।
ऐसें ऐकतांचि वचन । सुखावती गुरु ॥ ६९ ॥
भला प्रतीति पावसी । तेणें संतोष आम्हांसी ।
आतां ऐकें आनंदासी । सच्चित् कळलें ॥ ११७० ॥
देहबुद्धी होतां दृढ । स्वसुखासी लावूनि कवाड ।
नानाविषयांचे काबाड । आवडती मनीं ॥ ७१ ॥
तृणापासून विरिंची- । पदापावेतों विषयरुची ।
अधिकाधिक वाढे साची । परी कृत्रिमरूप ॥ ७२ ॥
जे जे पदार्थ आवडती । जयाकरितां इच्छी प्राप्ती ।
तो तरी आवडता किती । म्हणोनियां बोलावा ॥ ७३ ॥
जैसा आपण आवडता । तेवीं नावडती माता पिता ।
पुत्र कन्या स्वजन कांता । नावडती ऐसे ॥ ७४ ॥
द्रव्य पशु राज्यभोग । देव वेद सुख स्वर्ग ।
गुरु शिष्य आवडती सांग । परी आपणाऐसे नाहीं ॥ ७५ ॥
देह इंद्रियें प्राण मन । बुद्धि आणि अंतःकरण ।
आवडला जैसा आपण । तैसें हें सर्व नव्हे ॥ ७६ ॥
ही सर्व जनां प्रतीती । असतांही ऐसें नेणती ।
बळेंचि अन्यत्वीं धांवती । सुख असे म्हणोनी ॥ ७७ ॥
तस्मात् आत्मा आअडता । तोचि सुखरूप तत्त्वतां ।
मी सुखी दुःखी हे वार्ता । वाटे विकारामुळें ॥ ७८ ॥
तो वृत्तिविकार निमे जेव्हां । स्वसुख प्रगट असे तेव्हां ।
सुषुप्तीमाजी सर्व जीवां । वृत्तीवीण आनंद ॥ ७९ ॥
अत्यंत आधि अथवा व्याधी । वृत्ति तोंवरी दुःखें बाधी ।
सुषुप्तीमाजी कोणें कधीं । पाहिलें सुखदुःख ॥ ११८० ॥
तस्मात् सुखरूप सुषुप्ती । सर्व सुखदुःखाची समाप्ती ।
अखंड सुखमात्र अनुभूती । स्वात्मसुखाची ॥ ८१ ॥
जेधवां स्वप्न जागृती । उल्लंघूनि जातां वृत्ती ।
आरंभीं सुखाकार होती । तो वासनानंद ॥ ८२ ॥
तेही वासना जेहें विरे । सुखमात्रचि तेथें उरे ।
परी सुखानुभव स्फुरे । आपुला आपण ॥ ८३ ॥
तेथें जरी न अनुभवितें । तरी उत्थानीं आठवितें ।
अनुभविल्यावीण विषयांएं । स्मरूं शकेना ॥ ८४ ॥
एवं वृत्तीवीण आनंदघन । स्वानुभीति तेंचि ज्ञान ।
सर्वदा असे परिपूर्ण । सद्‍रूपही तेंचि ॥ ८५ ॥
सत् सर्वत्रीं व्यापलें । अंतःकरणीं ज्ञान स्फुरलें ।
सुषुप्तिकाळीं तीन्ही संचले । सच्चिदानंद ॥ ८६ ॥
सच्चिद्‍रूपासी आच्छादन । करूं न शकेचि अज्ञान ।
व्यवहार नव्हे तयावीण । मायादिजगाचा ॥ ८७ ॥
सत् आच्छादी जरी भ्रम । तरी कोठें उद्‍भवे रूप नाम ।
चिद्‍रूप आच्छादितां धर्म । ज्ञानक्रिया कैंची ॥ ८८ ॥
आनंदमात्र विकारांत । आच्छादिल्यापरी वाटत ।
तोही सुषुप्तीमाजी प्रगटत । अनायासें ॥ ८९ ॥
एवं आत्मा सच्चिदानंद । सुषुप्तीमाजी निर्द्वंद्व ।
असज्जड दुःख खेद । किमपि असेना ॥ ११९० ॥
जो सर्वदा आहेच आहे । तो कदाही असत् नव्हे ।
सुखानुभव जाणताहे । तरी नव्हे जडरूप ॥ ९१ ॥
आनंदरूपचि असतां । तरी सुखदुःख कोठें वार्ता ।
एवं सुषुप्तिकाळीं तत्त्वता । द्वैतचि नाहीं ॥ ९२ ॥
अज्ञान नांव जें आलें । ज्ञानें जाणतां व्यर्थ गेलें ।
एवं जडदुःख नाथिलें । सुषुप्तिकाळीं ॥ ९३ ॥
असो तुज सच्चिद्रूप । कळलें तयाचें स्वरूप ।
आनंदाचें माप । पदरीं घेईं ॥ ९४ ॥
वृत्तीसी न कळे म्हणसी । कैसें जाणावें सुखासी ।
तरी अवधारीं मानसीं । एकाग्रपणें ॥ ९५ ॥
जैसें वृत्तीवीण ज्ञान । स्वप्रकाशें परिपूर्ण ।
तैसा हाही अनुभवावीण । आनंद ओळखीं ॥ ९६ ॥
मागें आम्हीं सदाचरणीं । संध्येचिये निरूपणीं ।
संधि साधिल्या मध्यस्थानीं । उद्‍भव लयाच्या ॥ ९७ ॥
हाचि वासनानंद जाण । जागृतिसुषुप्तींचें मध्यस्थान ।
तोचि विचारें पाहतां शोधून । जागरींही कळे ॥ ९८ ॥
वृत्तितरंग सांडावा । दुजा उद्‍भवचि न व्हावा ।
तत्क्षणीं पावे स्वानुभवा । निजात्मसुखाचे ॥ ९९ ॥
उदासवृत्ती सुख उमटे । ध्येयध्यानरूपें भेटे ।
परी तेंही सुख ओहटे । वृत्ति निमतां ॥ १२ ॥
तस्मात् अनुभविती यावीण । अनुभाव्यरूप सुख पूर्ण ।
येणें विचारेंचि अभिन्न । होय देवदत्ता ॥ १ ॥
ऐसा सच्चिदानंदघन । केवळ निर्विशेष पूर्ण ।
विशुद्ध एक दंडायमान । कळला कीं तुज ॥ २ ॥
पर निरंजन पदें दोन । हेंचि ऐकें सावधान ।
मायादिकांचें अधिष्ठान । परब्रह्म जें कां ॥ ३ ॥
उत्पत्तिपूर्वीं जें आहे । तेंचि कार्यामध्यें पाहें ।
प्रलयकालीं संचलें राह । ज्ञानाज्ञानावीण ॥ ४ ॥
ऐसा जो कां परमात्मा । तोचि तूं हा प्रत्यगात्मा ।
अद्वयपदें अभेदवर्मा । कळलें पाहिजे ॥ ५ ॥
एतदर्थ महावाक्यप्रवृत्ती । अभेदीं दृढ व्यावी मती ।
तस्मात् तेंचि तूं गा चिन्मूर्ती । अससी ब्रह्म ॥ ६ ॥
साक्षिमात्र प्रज्ञानघन । ब्रह्म सर्वां अधिष्ठान ।
मीचि एक परिपूर्ण । बाणो तुजप्रति ॥ ७ ॥
अहंशब्दें जें स्फुरण । एंचि ब्रह्म कीं आपण ।
ऐसी हे प्रतीति गहन । बाणो तुजप्रति ॥ ८ ॥
हा आत्मा स्वप्रकाश । अपरोक्ष ब्रह्म अविनाश ।
परिपूर्ण अखंडैकरस । बाणो तुजप्रति ॥ ९ ॥
हे शब्द शाखा तुज दाविली । स्वानुभवचंद्रीं दृष्टी घालीं ।
तो तूं कैसा अमुक खोली । बोलतां न ये ॥ १२१० ॥
यास्तव बोलणें खुंटलें । निरूपण समाप्त झालें ।
पुढें काय जें उरलें । तेम् चिन्मात्र तूंचि ॥ ११ ॥
ऐसी ऐकतां वचनोक्ती । लागली नेत्रांची पाती ।
इंद्रियें मन‍आदि वृत्ती । मिळती परेसी ॥ १२ ॥
तेंही स्फुरण चित्सागरीं । मिळे लवणाचिये परी ।
अखंडैकरस ध्येमात्रीं । समरस झाला ॥ १३ ॥
देह झाला काष्ठवत । निश्चल परिपूर्ण निवांत ।
ऐसा शंकरें देवदत्त । देखिला पुढें ॥ १४ ॥
आनंदें टाळी पिटिली । हस्तें वरी छाटी उडविली ।
म्हणती धन्य आजि हे फळली । वंध्या वाग्धेनु ॥ १५ ॥
मग उठोनियां त्वरित । आनंदें शंकर नाचत ।
धन्य अहा हे देवदत्त । धन्य धन्य आम्ही ॥ १६ ॥
मागें हस्तमालक । तो तरी ज्ञानाचा तिलक ।
तेथें उपदेशाचें कौतुक । पुरलें नाहीं ॥ १७ ॥
परी देवदत्तें धन्य केलें । आमुचें वांझपण फेडिलें ।
यासी ब्रह्मात्मबोधें झालें । अपरोक्ष ज्ञान ॥ १८ ॥
परी आमुचिये वाणीसी । पुरली नाहीं असोसी ।
आणि ज्ञातया हे कायसी । ताटस्थावस्था ॥ १९ ॥
हा आतां झालासे लीन । मागुती होईल उत्थान ।
वृत्तिकालीं हें समाधान । झालें तें निमेल ॥ १२२० ॥
तरी यासी करूं सावध । मागुती करूं दृढ बोध ।
जेणें सर्वत्रीं अभेद । पूर्ण ज्ञान ठसावें ॥ २१ ॥
ऐसें विचारूनि अंतरीं । सप्रेम आलिंगिलें उरीं ।
पाठी थापटिती करीं । कुरवाळिती मुख ॥ २२ ॥
अगा वत्सा हे पाडसा । नेत्र उघडीं गा अमासा ।
तुजवीण आम्हांसी सहसा । न धरवे धीरु ॥ २३ ॥
तूं तों अखंड एकरसीं । पूर्ण निमग्नचि झालासी ।
यास्तव आम्हां विसरलासी । काय गा आतां ॥ २४ ॥
ऐसी सूक्ष्म अंतःकरणीं । पडिली अमृतरूप गुरुवाणी ।
तेव्हां वृत्तिसहित खडबडोनी । उठता झाला ॥ २५ ॥
परी वृत्तिमाजी अपार । दाटला आनंदाचा पूर ।
पुलकांकित सर्व गात्र । सजल नेत्र उघडिले ॥ २६ ॥
तों पुढें गुरुमाय देखिली । पदावरी साष्टांग घाली ।
शंकरें उचलूनि आलिंगिली । तनू देवदत्ताची ॥ २७ ॥
सांडूनियां गुरुशिष्यपण । एकरूप जाले पूर्ण ।
न धरत चालिलें स्फुंदन । उभयतांसी ॥ २८ ॥
मग शंकरें काय केलें । स्वकरें नेत्रांसी पुसिलें ।
हातीं धरूनि बैसविलें । पूर्वरीतीं सन्मुख ॥ २९ ॥
देवदत्त थरथरां कांपे । आनंदामाजी वृत्ति लोपे ।
कंठीं दाॠनि आलीं बाष्पें । न फुटे शब्द ॥ १२३० ॥
मग सांवरूनियां बळें । उघडिता होय नेत्रकमळें ।
परी प्रेमाचे होती उमाळे । उमसूं न लाहे ॥ ३१ ॥
मग पदीं घालूनियां मिठी । मंदमंद बोले ओठीं ।
जय जय सद्‍गुरु उठाउठीं । मोक्षध्वज उभारिला ॥ ३२ ॥
देहबुद्धीचिया रंकासी । दिधलें साम्राज्य एकरसीं ।
अहा हे सद्‍गुरु ब्रीदासी । सत्य केलें ॥ ३३ ॥
विषयकर्दमींची मासोळी । सोडिली ब्रह्मानंदकल्लोळीं ।
काय स्तवावें मुखकमळीं । मौनावले वेद ॥ ३४ ॥
जय जय सद्‍गुरु कृपापाणी । न कळे कृपेची कैसी करणी ।
शब्दमात्रें अखंडपणीं । मेळविलें मज ॥ ३५ ॥
ऐसें जें निर्विकार सुख । जेथें नसती सुखदुःख ।
तेंचि होऊनि अशेख । म्यां सर्वदा असावें ॥ ३६ ॥
नको वृत्तीचा वळसा । नको भिन्नत्वाचा ठसा ।
अखंड निजस्वात्मैक्यरसा । परिपूर्ण व्हावें ॥ ३७ ॥
ऐकोनि देवदत्तवाणी । शंकर बोलती हांसोनी ।
सावध असावें निरूपणीं । पुढील श्लोकाचे ॥ ३८ ॥


शब्दस्याद्यंततोः सिद्धं मनसोऽपि तथैव च ।
मध्ये साक्षितया नित्यं तदेव त्वं भ्रमं जहि ॥ २२ ॥


जो शब्दाचे आदिअंतीं । मनाच्याही तेणेंचि रीतीं ।
मध्यें साक्षी नित्य निश्चितीं । तेंचि तूं हा टाकीं भ्रम ॥ ३९ ॥
अगा तुजसी देवदत्ता । सत्य मिथ्या न कळे तत्त्वतां ।
रज्जु रज्जुत्वेंही जाणतां । सर्प मारूं धांवसी ॥ १२४० ॥
स्थाणू स्थाणुत्वें जरी भेटे । चोरा मारू धांवसी नेटें ।
अहा हें तुजलागी गोमटें । असे कीं ज्ञान ॥ ४१ ॥
मृत्तिएक्वीण घटांत । काय बा असे किंचित ।
तैसें मन प्राणादि समस्त । तुजवीण तेथें काय ॥ ४२ ॥
कापुसावीण सुतासी । काय बा सांगें रूपासी ।
तैसेंचि मनादि सर्वांसी । काय आहे तुजवीण ॥ ४३ ॥
तयातें सांडूं पाहसी । ऐसियाही सांडीं भ्रमासी ।
उद्‍भवतां निमतां काय तुजसी । उद्ंभव लय असे ॥ ४४ ॥
जेधवां वृत्तिविकार होणें । तुजला त्यासवें काय येणें ।
अथवा निमतां नाहीं जाणें । तुजला मागुतीं ॥ ४५ ॥
जोंवरी शब्द नाहीं उठिला । तूं जैसा अससी संचला ।
उठून हरी शब्द निमाला । तरी तूं अखंड ॥ ४६ ॥
मध्येंचि शब्दाची स्थिती । होतां जाणसी तयाप्रती ।
साक्षिमात्रें स्वयंज्योती । तो विकारी नव्हे ॥ ४७ ॥
तेणेंचि रीतीं मनादि । तूं अससी अंतींआदि ।
मध्येंही साक्षी अनादि । निर्विकाररूपें ॥ ४८ ॥
शब्द मन उपलक्षण । परी जीं जीं तत्त्वें निर्माण ।
त्या त्या आदिअंतीं पूर्ण । मध्येंही साक्षिरूपें ॥ ४९ ॥
वायुमेघाचिये गती । भंगेना गगनाची स्थिती ।
तैसे विकार होती जाती । परी तूं जैसा तैसा ॥ १२५० ॥
अगा जेधवां होतें अञान । तेधवां विकारी न होसी पूर्ण ।
घटीं मठीं जैसें गगन । निश्चल तैसा ॥ ५१ ॥
आतां ज्ञान जालियावरी । विकास लाविसी निर्विकारीं ।
हाचि भ्रम गा निर्धारी । पूर्ण ज्ञान नव्हे ॥ ५२ ॥
जळें काय सांडिले तरंग । कीं आकाशें चवडिले मेघ ।
मनादि हें तुझेंचि अंग । केवीं सांडूं पाहसी ॥ ५३ ॥
किरणें सांडितसे तरणी । कीं ज्वाला अव्हेरी अग्नी ।
मनादि हे आत्मपणीं । केंवी सांडूं पाहसी ॥ ५४ ॥
तथापि सांडूं हें समग्र । ऐसा धरिसी अहंकार ।
हाचि निजरूपीं विकार । तुज कां न कळे ॥ ५५ ॥
अगा सांडीमांडी करूं जासी । तों तों विकारा पावसी ।
निजरूपी भिन्न पडसी । समाधान कईचें ॥ ५६ ॥
यासी तत्यत्वें जें भाविलें । आणि आपणासी भिन्न कल्पिलें ।
इतुकेंचि पाहिजे त्यागिलें । सप्रतीतज्ञानें ॥ ५७ ॥
मन प्राण देह इंद्रिय । नामें मात्र कल्पूं न ये ।
असें एं ब्रह्म तूं अद्वय । अससी हा भ्रम टाकीं ॥ ५८ ॥
एवं अहंकारादि देहांत । तूंचि अससी सदोदित ।
सांडीमांडीचा संकेत । भ्र्म हा टाकीं ॥ ५९ ॥
मिथ्या म्हणजे नाहीं झालें दृश्यत्वें जरी तें दिसलें ।
तें तुवां कैसें मानिलें । भिन्न आपणाहूनि ॥ १२६० ॥
ज्वालेसहित अग्नी । कीं तरंगासहित पाणी ।
तैसा तूं आपणालागूनी । जाणें वृत्तीसहित ॥ ६१ ॥
किरणांसहित तरणी । कीं प्रकाशासहित मणी ।
तैसा तूं आपणालागूनी । जाणें वृत्तीसहित ॥ ६२ ॥
एक देहाचा भासला । तुजसी आत्मत्वें दाविला ।
तैसेंचि ब्रह्मांड देखें वहिला । आपुलिये ठायीं ॥ ६३ ॥
एक घट मृत्तिकेचा । कळला जरी असे साचा ।
तरी सर्वां घटी मृन्मयाचा । विचार पाहावा ॥ ६४ ॥
तेंचि कैसें निरूपण । पुढील श्लोकीं सावधान ।
कीजे तत्पदशोधन । त्वंपदावरी ॥ ६५ ॥


स्थूलवैराजयोरैक्यं सूक्ष्महैरण्यगर्भयोः ।
अज्ञानमाययोरैक्यं प्रत्यग्‍विज्ञानपूर्णयोः ॥ २३ ॥


स्थूल विराट एक रीती । सूक्ष्म हिरण्यगर्भाप्रती ।
ऐक्य अज्ञान प्रकृती । प्रत्यग् विज्ञानपूर्णासी ॥ ६६ ॥
देह जड अस्थिमांसाचा । तैसाचि जड समुदाय भूतांचा ।
तेथें विस्तार चहूं खाणींचा । तो हा विराट ॥ ६७ ॥
जडर्वें दोन्ही समान । तेवींच दृश्यत्वें अभिन्न ।
अभेचचि कार्यकारण । ओळखावें तुवां ॥ ६८ ॥
स्थूलदेहीं अवस्था जागृती । तैसीच विराटा उत्पती ।
यासी भेद नाहीं रती । आकारमात्र हे ॥ ६९ ॥
विश्वाभिमानी जो पिंडीं । तोचि असे ब्रह्मा ब्रह्मांडीं ।
स्थूल भोगाची आवडी । सरिखी दोघां ॥ १२७० ॥
सूक्ष्म हिरण्यगर्भ दोन्ही । चंचलत्वें समान मानी ।
सप्तदश तत्त्वांची करणी । कार्यकरणरूपें ॥ ७१ ॥
वायूसी नांव आलें प्राण । चंद्रमा तोचि असे मन ।
बुद्धि तेचि चतुरानन । भेदचि नाहीं ॥ ७२ ॥
श्रोत्र दिशा त्वचा समीर । चक्षु सूर्य जिव्हा रसधर ।
घ्राण अश्विनीकुमार । एकरूपचि ॥ ७३ ॥
वाचा अग्नि पाणी सुरपति । पाद वामन उपस्थ प्रजापति ।
गुदेंद्रिय तो निर्‍ऋति । समान दोहींकडे ॥ ७४ ॥
एवं सप्तदशकलांचा । अपंचीकृत भूतांचा ।
विस्तार कार्यकरणांचा । समान देखें ॥ ७५ ॥
स्वप्नावस्था सूक्ष्मासी । पालन अवस्था जाण तैसी ।
उकार मात्रा हे दोहींसी । समान असे ॥ ७६ ॥
तैजस अभिमानी पिंडीं असे । ब्रह्मांडीं विष्णु पाळीतसे ।
यास्तव कार्यकारण नसे । भेद कांहीं ॥ ७७ ॥
अज्ञानकारणाचे रीतीं । जाणें अव्यकृत प्रकृती ।
हेचि स्वरूपा आवरणशक्ती । सारखीं दोहींकडे ॥ ७८ ॥
प्रलय ते अवस्था सुषुप्ती । एकरूप दोहींची स्थिती ।
मकार मात्रा यासी म्हणती । अज्ञानरूप ॥ ७९ ॥
प्राज्ञ अभिमानचे परी । प्रलयीं रुद्र संहारी ।
ब्रह्मांडाचा अभिमानधरी । तमोगुणरूपें ॥ १२८० ॥
एवं पिंड ब्रह्मांड दोन्हींचें । वाच्यांशीं समानत्व साचें ।
असतां लक्ष्यांसीं कैंचें । भिन्नत्वपण ॥ ८१ ॥
प्रत्यगात्मा विज्ञानरूप । पूर्णब्रह्म स्वस्वरूप ।
यासी न करितां आपेंआप । अभेदता येतसे ॥ ८२ ॥
घटमठचि एक होतां । आकाशा भेद तो केउता ।
झणीं भेद भाविसी आतां । प्रत्यगात्मा ब्रह्मासी ॥ ८३ ॥
हें असो पूर्णब्रह्माहूनी । सर्वांसीही भिन्न न मानीं ।
नामरूप जें दृश्यपणीं । तें तें ब्रह्मरूप ॥ ८४ ॥
याचेंचि निरूपण आतां । श्लोकीं बोलिजे देवदत्ता ।
तेणें तुजसी अभिन्नता । तत्काळ होय ८५ ॥


चिन्मात्रैकरसे विष्णौ ब्रह्मात्मैकस्वरूपके ।
भ्रम एव जगज्जातं रज्ज्वां सर्पभ्रमो यथा ॥ २४ ॥


विष्णु चिन्मात्र एकरस । प्रत्यगात्मा ब्रह्म अविनाश ।
ऐसिया तुझ्याठायीं भ्रमविलास । रज्जुसर्पापरी झाला ॥ ८६ ॥
अगा देवदत्ता तूं अविनाशी । ब्रह्मचि आत्मा एकरसी ।
व्यापकपणें बोलिजे तुजसी । विष्णु हें नाम ॥ ८७ ॥
अखंड एकरस चिन्मात्र । तूचि अससी स्वतंत्र ।
तुझ्या ठायीं हा भ्रममात्र जगविलास दिसे ॥ ८८ ॥
अज्ञानें सर्प रज्जूवरी । जैसा जालासे अंधारीं ।
तैसींचि नामरूपें उभारी । तुजवरी माया ॥ ८९ ॥
रज्जुवेगळें सर्पासी । काढितां न येचि कोणासी ।
तेवींच या जगद्‍भ्रमासी । तुजहून काढील कोण ॥ १२९० ॥
तस्मात् हें वेगळें कांहीं । नामरूप झालेंचि नाहीं ।
तूंचि अससी सर्वदाही । सर्पपणासहित ॥ ९१ ॥
मी ब्रह्म होतां स्फुरण । तेंचि मायेचें लक्षण ।
तयासी भेद असे कोण । स्वरूपावेगळा ॥ ९२ ॥
तेथेंचि ज्ञानाज्ञानरूप । अविद्या मायेचें स्वरूअ ।
त्यासी भेद नसे अल्प । स्वरूपावेगळा ॥ ९३ ॥
तेथील प्रतिबिंबा नांव । ठेविलें असे जीवशिव ।
त्यासी स्वरूपाहून अपूर्व । भेद कोण कल्पी ॥ ९४ ॥
तया प्रकृतीपासून । होती भूतें आणि गुण ।
काय असे स्वरूपावीण । दृश्यामाजीही ॥ ९५ ॥
मग गुण भूतें प्रसवती । भोग्य आणि साधनसंपत्ती ।
जीव भोक्ता तयाप्रती । हे त्रिपुटी ऐसी ॥ ९६ ॥
हें असो प्रथमविकार । आकाशरूप महाथोर ।
गगन हें पावलें नाममात्र । परी तें सद्‍रूप ॥ ९७ ॥
सद्‍रूप वेगळें करितां । आकाशासी नसे वार्ता ।
तस्मात् तूंचि अससी तत्त्वतां । आकाशरूपें ॥ ९८ ॥
तैसेचि वायु अग्नि आप । पांचवें भूमीचें रूप ।
यासी आपणाहूनि अल्प । भेदचि भावूं नको ॥ ९९ ॥
पंचभूतांचें रचिलें । ब्रह्मांड नाम पावलें ।
भेदभाव टाकी वहिलें । तूंचि ब्रह्म अससी ॥ १३०० ॥
चवदा भुवनें सप्त पाताळ । वैकुंठकैलासादि स्थळें ।
स्थावरजंगमादि सकळें । तूंचि ब्रह्म अससी ॥ १ ॥
मेरु समुद्र नद्या पर्वत । तृण पाषाण वस्तुजात ।
जें जें दृश्य भासत । तूंचि ब्रह्म अससी ॥ २ ॥
देव मानव दानव । भूतें राक्षस गंधर्व ।
पक्षीं श्वापदें सर्व । तूंचि ब्रह्म अससी ॥ ३ ॥
जलचर आणि भूचर । दिनचर आणि इशाचर ।
कीटक आणि खेचर । तूंचि ब्रह्म अससी ॥ ४ ॥
तुजवीण कोणतें दुजें । असे म्हणोनि लाहिजे ।
यास्तव अंतरीं पूर्ण समजें । तूंचि ब्रह्म अससी ॥ ५ ॥
हा उत्तम हा अधम । हा कनिष्ठ हा मध्यम ।
हा विषम हा सम । ऐसें भावूंचि नको ॥ ६ ॥
हा थोर हा धाकुटा । हा चांगुला हा खोटा ।
हा श्रीमान् हा करंटा । ऐसें भावूंचि नको ॥ ७ ॥
हा स्वर्ग हा नरक । हा आंधार हा प्रकाशक ।
हा मूर्ख यासी बहु तर्क । ऐसें भावूंचि नको ॥ ८ ॥
हें सुख हें दुःख परम । हा पापरूप अधर्म ।
हें पुण्यात्मक उत्तम । ऐसें भावूंचि नको ॥ ९ ॥
हा पूर्वकषाचा सिद्धांत । हा बद्ध हा जीवन्मुक्त ।
हा साधक हा मोक्ष । ऐसें भावूंचि नको ॥ १३१० ॥
गगनचि जैसें गगनीं । कीं पाणियामाजी पाणी ।
तैसा तूंचि एक एकपणीं । अससी ब्रह्म ॥ ११ ॥
तूचि आंत तूंचि बाहेरी । तूंचि तळीं तूंचि उपरी ।
तूंचि पुढें मागें एकसरी । सव्य अपसव्य तूं ॥ १२ ॥
बहु कासया उच्चारूं । तूंचि वेद अर्थ विचारू ।
तूचि शिष्य तूं श्रीगुरु । अससी ब्रह्म ॥ १३ ॥
ऐसी अभेद जे प्रतीती । नाढळेचि दुजी व्यक्ती ।
एकला एक स्वयंज्योती । तूंचि आत्मा परिपूर्ण ॥ १४ ॥
हा वेदांतसिद्धार्थ काढिला । तुझिये करीं समर्पिला ।
ऐसेंचि देखें गा वहिला । बोलिल्या न्यायें ॥ १५ ॥
सर्वशास्त्रें सांडूनि दूरी । वेदांतसंमती निर्धारीं ।
तुजप्रति बोल्धिलें अंतरीं । आतां करीं हें दृड ॥ १६ ॥
मग देवदत्तें सष्टांग केलें । नेत्रोदकें चरण क्षाळिले ।
महाप्रसाद जी दिधलें । पूर्ण समाधान ॥ १७ ॥
जय जय सद्‍गुरु तुझिये कृपें । संशयासहित अज्ञान लोपे ।
भवसमुद्र मारिला थापें । मशकादिकीं ॥ १८ ॥
समर्थें जया धरिलें करीं । तो कां राहील भिकारी ।
परी एक आटह्वलें अंतरीं । विज्ञापना करूं तें ॥ १९ ॥
मागें आतां निरूपणीं । न्यायही घेतला व्याख्यानीं ।
सांख्य योग हीं शास्त्रें दोन्ही । ग्रहण केलीं ॥ १३२० ॥
तरी सर्व शास्त्रें कैसीं । सांडून जाणावे वेदांतासी ।
निवडून तयाचिये रूपासी । भिन्न भिन्न सांगावें ॥ २१ ॥
ऐसी प्रार्थना ऐकोनी । सद्‍गुरु बोलती सुवचनीं ।
साख्यादि घेतलें व्याख्यानीं । तें प्रयोजन ऐकें ॥ २२ ॥
जैसी मागून आली पद्धती । पुढें चालावें तेणें रीती ।
स्वानुबवानुरूप जे युक्ती । घेती ज्ञानी ॥ २३ ॥
हेंचि आतां निरूपिजे । श्लोकार्थीं अवधान दीजे ।
तेणें तुजलागीं उमजे । टाकणें घेणें ॥ २४ ॥


तार्किकाणां च जीवेशौ वाच्यावेतौ विदुर्बुधाः ।
लक्ष्यौ च सांख्ययोगाभ्यां वेदांतैरैक्यतानयोः ॥ २५ ॥


जीवेश वाच्य बोले न्याय । सांख्ययोगें लक्ष्य प्रत्यय ।
वेदांत ऐक्यत्वनिश्चय । जाणती ज्ञाते ॥ २५ ॥
न्याय म्हणजे अनुमान । दृष्टांतयुक्तीं घडे मनन ।
कांहीं तर्क केलियावीण । अर्थीं दृष्टि नव्हे ॥ २६ ॥
येंएं रीतीं घेतला न्याय । ऐक सांख्याचा उपाय ।
आत्मानात्मनिवाडू होय । लक्ष्य केळे तेणें ॥ २७ ॥
अभ्यासें वृत्तीसी सांडूनी । बलात्कारें समरससी पूर्णीं ॥
यास्तव योगही व्याख्यानीं घेतला असे ॥ २८ ॥
परी विरुद्ध जे वेदांतासी । सांडील त्या त्या सिद्धांतांसी ।
ते ते कोणते जरी म्हणसी । तें पुढें बोलूं तुज ॥ २९ ॥
येथें ग्रहणाचें प्रयोजन । असे तें केलें निरूपण ।
आतां वेदांआचा पक्ष जाण । अवधारीं निश्चित ॥ १३३० ॥
जरी झाली न्याययुक्ती । स्वानुभव नव्हे तयाप्रई ।
सर्वांशवाच्य जीवेशा म्हणती । अंधाचे परी ॥ ३१ ॥
सांख्ययोगें लक्ष्य निवडे । परी ऐक्यतेचें सांकडें ।
यास्तव ज्ञाते रहस्य कोडें । घेती वेदांताचें ॥ ३२ ॥
ब्रह्म प्रत्यगात्मा ऐक्य । हें वेदांततात्पर्य एक ।
त्याहूनि जें जें भेदात्मक । नामरूप मिथ्या ॥ ३३ ॥
इतुकें हें वेदांतसंमत । तेणें ऐक्य साधकां होत ।
सांख्ययोगादि शास्त्रसंकेत । घेती कार्यपरत्वें ॥ ३४ ॥
येथें दवदत्तें पुसिलें । वेदांत ऐक्य जें बोलिलें ।
तेंचि कैसें मजसी वहिलें । लक्षणावृत्ती सांगा ॥ ३५ ॥
बहु बरें म्हणोनि गुरु । लक्षणावृत्तीचा प्रकारु ।
येणें श्लोकीं निर्धारु । बोलते झाले ॥ ३६ ॥


कार्यकारणवाच्यांशौ जीवेशौ यौ जहच्च तौ ।
अजहच्च तयोर्लक्ष्यौ चिदंशावेकरूपिणौ ॥ २६ ॥


वाच्यांश कार्यकारणांचा । त्याग करून जीवेशांचा ।
अत्याग एकरूपीं लक्ष्याचा । चिदंश म्हणोनी ॥ ३७ ॥
त्वंपद बोलिलें जीवासी । तत्पद नाम ईश्वरासी ।
वाच्य लक्ष्य असती दोहींसी । ते वेगळे समजावे ॥ ३८ ॥
अविद्याकामकर्मसमुदाय । स्थूलादि हें देहत्रय ।
अभिमानें जीव भोक्ता होय । हें त्वंपदवाच्य ॥ ३९ ॥
देहत्रया विलक्षण । स्वप्रकाश ज्ञानघन ।
शुद्ध प्रत्यगात्मा पूर्ण । हें त्वंपदलक्ष्य ॥ १३४० ॥
विराटादि देहत्रय । मायेपासून तत्त्वसमुदाय ।
तयाचा नियंता ईश्वर होय । हा तत्पदवाच्य ॥ ४१ ॥
सृष्टिस्थितिप्रलयरहित । परिपूर्ण ब्रह्म सदोदित ।
अखंड अद्वय अनाअंत । हें तत्पदलक्ष्य ॥ ४२ ॥
सगट ऐक्य करूं जातां । विरोधचि होय तत्त्वतां ।
सर्वज्ञ किंचिज्ज्ञ पाहतां । एक नव्हे कधीं ॥ ४३ ॥
यास्तव हे लक्षणावृत्ती । केली पाहिजे निश्चितीं ।
तेचि कैसी जाणिजेती । भागत्यागें ॥ ४४ ॥
जहत् म्हणजे त्याग । अजहत् तेंचि अत्याग ।
जहदजहत् त्यागात्याग । ऐसे तीन प्रकार ॥ ४५ ॥
त्याग म्हणजे टाकावें । मिथ्या मिथ्यात्वें समजावें ।
अत्याग म्हणजे घ्यावें । सत्य तें निवडूनि ॥ ४६ ॥
सर्वांश त्यागिला जरी । सत्य तेंचि म लाभे करीं ।
म्हणोनि येथें हे अव्हेरीं । त्यागलक्षणा ॥ ४७ ॥
वाच्य जरी न टाकितां । लक्ष्यांश न कळे तत्त्वतां ।
निरोधें नव्हे ऐक्यता । यास्तव अत्याग नको ॥ ४८ ॥
तस्मात् येथें त्यागात्याग । लक्षणावृत्ति हे उमग ।
वाच्यत्याग लक्ष्य‍अत्याव । दोहींचेही ॥ ४९ ॥
राजा कोणीएक भला । देवपूजेसी बैसला ।
तोचि उठून शिकारीस गेला । परी राजा तो एकचि ॥ १३५० ॥
तैसें मायेमध्यें बिंबलें । सर्वज्ञत्वादि धर्म झाले ।
तेंचि ईश्वर नाम पावलें । उपाधि तोंवरी ॥ ५१ ॥
तेंचि चैतन्य अविद्येंत । किंचिज्ज्ञादि धर्म उमटत ।
जीवनामांचा संकेत । तया झाला उपाधीनें ॥ ५२ ॥
डोळे झांकून पूजा करी । ठाण मांडिलें आरक्तनेत्रीं ।
तो एक नव्हे निर्धारीं । विरोधामुळें ॥ ५३ ॥
तैसा सर्वज्ञ ईश्वरु । किंचिज्ज्ञ जीव अनीश्वरु ।
हे एक न होई निर्धारु । विरोधास्तव ॥ ५४ ॥
पूजासमय आसन ध्यान । ठाण मांडितां धनुष्य बाण ।
ह्या उपाधि दोन्ही त्यागून । राजा मात्र लक्षावा ॥ ५५ ॥
तैसें मायादि सर्वज्ञपण । अविद्यादि धर्म किंचिज्ज्ञ ।
ह्या उपाधि त्यागून । चैतन्य एक निवडावें ॥ ५६ ॥
वाच्य मिथ्यात्वें जातां । लक्ष्य उरे जें तत्त्वतां ।
तया चिदंशा ऐक्यता । सहजचि होय ॥ ५७ ॥
घट मठ उपाधि दोन्ही । त्यागितां गगन जैसें गगनीं ।
तेवीं जीवेश वाच्य त्यागूनी । आत्मा ब्रह्म अनुभवीं ॥ ५८ ॥
ऐसी भागत्यागलक्षणा । सांगितली तुज जाणा ।
हा पक्ष वेदांताविना । नसे अन्य शास्त्रीं ॥ ५९ ॥
अन्य शास्त्रींचे सिद्धांत । तुजसी होतों बोलत ।
परी तुवां पुसिलें निश्चित । तें किंचित् बोलिलों ॥ १३६० ॥
आतां ऐकें सर्व शास्त्रांचे । सिद्धांत जे जे बोलिले वाचे ।
तेथें असे ज्ञान तें कैंचें । द्वैतचि प्रतिपादिती ॥ ६१ ॥


कर्मशास्त्रे कुतो ज्ञाने तर्के नैवास्ति निश्चयः ।
सांख्ययोगौ द्विधापन्नौ शाब्दिकां शब्दतत्पराः ॥ २७ ॥


कर्मशास्त्रीं कैंचें ज्ञान । तर्कें निश्चय नव्हे जाण ।
सांख्ययोगासी । भेदभान । व्याकरण शब्दीं तत्पर ॥ ६२ ॥
नानायज्ञीं द्रव्य वेंचावें । अमुक अमुक साहित्य व्हावें ।
होता अध्वर्यु असावे । न्यून पडतां प्रायश्चित ॥ ६३ ॥
इतुका करून खटाटोप । परे फल तें पाहतां अल्प ।
देहबुद्धीचा मात्र संकल्प । सदृढ केला ॥ ६४ ॥
आपुलें निजसुख टाकूनी । स्वर्गादि सुखा करी ग्लानी ।
उदंड असतां भुवनीं । नेणोनि भीक मागे ॥ ६५ ॥
असो ऐसे मायाप्रवाहीं । पडिले तयां विसावा नाहीं ।
कर्मशास्त्रीं ज्ञान कांहीं । बोलोंचि नये ॥ ६६ ॥
तार्किक भट्टभास्कर । हेचि म्यायाचे प्रकार ।
तेथेंही ज्ञानाचा निर्धार । होय कैसेनि ॥ ६७ ॥
जन्मांध पाहूं गेले हत्ती । हातीं पडिलें तें चांचपिती ।
कोणी पुसतां सांगती । सुपाऐसा गज ॥ ६८ ॥
तैसे नाना तर्क करिती । नाना दृष्टांत युक्ती ।
प्रत्यक्षासी अनुमानिती । तेथें निश्चय कईचा ॥ ६९ ॥
देहादि जग हें सत्य असे । कारण कीं प्रत्यक्ष दिसे ।
न दिसे तें सत्यही नसे । वंध्यापुत्रापरी ॥ १३७० ॥
ब्रह्म नाहीं दिसेना । खपुष्प किमपि भासेना ।
ऐसे प्रवर्तती अनुमाना । तेथें यथार्थ ज्ञान कैंचें ॥ ७१ ॥
साख्यशास्त्र जैसा हंस । निवडीतसे क्षीरनिरास ।
तेवीं आत्मा आणि अनात्मयास । वेगळें काढी ॥ ७२ ॥
परी आत्मा ब्रह्म अभेदा । न प्रवर्तेचि संवादा ।
जीवईश्वराचिया भेदा । सत्यचि करी ॥ ७३ ॥
आणि माया हे प्रधान । कदा नव्हे अप्रमाण ।
प्रलयकालीं होय लीन । परी अभाव नाहीं ॥ ७४ ॥
अभाव जरी असता । तरी उद्‍भवचि नहोता ।
सुषुप्तिकाळीं पाहतां । वृत्ती जैसी ॥ ७५ ॥
ब्रह्म सच्चिदानंदघन । सर्वशक्तिमान् सर्वज्ञ ।
हे पंचही लक्षण । एकत्र करिती ॥ ७६ ॥
ऐसिया गा सिद्धांतानें वेदांतासी येतें उणें ।
तया विरोधाचीं लक्षणें । कांहींशीं बोलूं ॥ ७७ ॥
ब्रह्म प्रत्यगात्मा भेद होतां । हा सजातीय भेद तत्त्वतां ।
ब्रह्म परोक्षचि घेतां । आत्मा अब्रह्म ॥ ७८ ॥
दुसरें मायेच्या सत्यत्वानें । जग-जीवासी सत्यता होणें ।
जगसत्यत्वें ब्रह्मलक्षणें । प्रगट कैंचीं ॥ ७९ ॥
ब्रह्म ईश्वर एक केले । तरी सत्य मिथ्या एक झालें ।
जडचेतन निवडिलें । कासयावरूनि ॥ १३८० ॥
जैसा पुरुष करितां भोजन । माशी लागतां करी वमन ।
जाली तृप्ति ते जाऊन । तळमळ सुटे ॥ ८१ ॥
तैसा साख्यांचा प्रसंग । जालिया तृप्तीसी भंग ।
तेथें सुख अब्यंग । सुखदुःख भेदें होय ॥ ८२ ॥
प्रकृतिपुरुषांचा विवेक । जयासी घडे कौतुक ।
तयासी मोक्ष हा एक । होय म्हणती ॥ ८३ ॥
विवेक जयासी न घडे । तया बंधाचें सांकडें ।
यास्तव विवेकिया जोडे । म्हणती मोक्षसुख ॥ ८४ ॥
परी तें अवघें ओखटें । ब्रह्म आत्मत्वें न भेटे ।
अज्ञानभ्रांतीच न फिटे । तरी मोक्ष कैंचा ॥ ८५ ॥
तया म्हणूं न ये ज्ञान । सदा द्वैतरूप भान ।
ऐसें सांख्यशास्त्रींचें दूषण । असे बहुत ॥ ८६ ॥
तैसाचि योगशास्त्रीं कांहीं । मुख्यज्ञानाचा लेश नाहीं ।
शून्यीं अथवा वृत्तिप्रवाही । अभ्यासें पडती ॥ ८७ ॥
हठें प्राणासी निरोधी । वृत्ति लीन होय त्या संधीं ।
जळीं तुंबिनी बळें रोधी । सोडितां उफाळे ॥ ८८ ॥
तैसें मन उत्थानकाळीं । उठतां विषय न्याहाळी ।
अधिक देहबुद्धि सळी । सिद्धिबंधनें ॥ ८९ ॥
वृत्ति जेव्हां होय लीन । तेव्हांहीं कैंचें ब्रह्मज्ञान ।
वृत्ति अज्ञानीं निमग्न । सुषुप्तिपरी ॥ १३९० ॥
अथवा मुद्रादि साधन । तेणें आत्म्याचे दर्शन ।
परी तें केवळ दृश्य भान । त्यासी आत्मा भाविती ॥ ९१ ॥
ईश्वरु वेगळा ठेविती । जीवासी असंगही म्हणती ।
तरी ते जाणावे नेणति । अभेद वर्म ॥ ९२ ॥
शब्दज्ञानें लक्ष्य निवडे । तेथें स्वानुभव केवीं जोडे ।
आणि ऐक्यतेचें सांकडें । फिटे कैसेनि ॥ ९३ ॥
तस्मात् योगशास्त्रीं पाहतां । ज्ञानाची नसे वार्ता ।
व्यर्थचि श्रमती केउता । अर्थलाभ तयां ॥ ९४ ॥
व्यर्थ आत्मा म्हणती दूर । अति कठिण मार्ग दुस्तर ।
चार घांट महाथोर । लंघितां भय वाटे ॥ ९५ ॥
आपण आत्मा न कळे । मार्ग क्रमिती आंधळे ।
पडती जाऊनियां बळें । शून्यामाजीं ॥ ९६ ॥
जैसा दूर पंथ चालूनि आला । तो वेशीमध्यें नागविला ।
तैसा प्रसंग येथें घडला । योगाभ्यासें ॥ ९७ ॥
असो बहु बोलणें काये । ग्रंथालागीं विस्तर होये ।
ज्ञानवार्ताही बोलूं न ये । योगशास्त्रीं ॥ ९८ ॥
शब्दींच तत्पर व्याकरणी । बोलतां शिणेना वाणी ।
भवति न भवति अनुदिनीं । तेथें अर्थ कैंचा ॥ ९९ ॥
कण सांडून्न चाळणी । घेतसे भुसाची धणी ।
तेवीं अर्थसार त्यागूनी । घेती शब्दभूस ॥ १४०० ॥
तेथें तरी ज्ञान कैंचें । उगाचि अभिमानें नाचे ।
असो तया बहिर्मुखाचें । काजचि नको ॥ १ ॥
पुढील श्लोकीं पूर्वार्धांत । अन्य पाखांडाचा संकेत ।
उत्तरार्धीं शुद्ध वेदांत । स्तविला असे ॥ २ ॥


अन्ये पाखंडिनः सर्वे ज्ञानवार्तासु दुर्बलाः ।
एकं वेदांतविज्ञानं स्वानुभुत्या विराजते ॥ २८ ॥


अन्य पाखांडी दुर्बळ । ज्ञानवार्तेचा त्यां दुष्काळ ।
एक वेदांतविज्ञान केवळ । स्वानुभूतीनें विराजे ॥ ३ ॥
जेथें ज्ञानाचा विटाळ । ते ते जाण पाखांडी खळ ।
शास्त्रीय लौकिकी सकळ । येणेंचि न्यायें ॥ ४ ॥
देहात्मवादी प्राणवादी । मनचि आत्मा विज्ञानवादी ।
अणु आत्मा शून्यवादी । ते ते पाखांडी ॥ ५ ॥
जड आत्मा माध्यामिक । जड चेतन उभयात्मक ।
आत्मा भाविती सवृत्तिक । ते ते पाखांडी ॥ ॥ ६ ॥
शैव शाक्त वैष्णव । सौर गाणपत्य सर्व ।
जयांसी एकदेशी देव । ते ते पाखांडी ॥ ७ ॥
मल्लार भैरव तृणार्चक । धातुपाषाणपूजक ।
टिळेमाळादि दांभिक । ते ते पाखांडी ॥ ८ ॥
नग्न मौनी जटाधारी । धूम्रपानी वायुआहारी ।
अघोर आणि ठाडेश्वरी । ते ते पाखांडी ॥ ९ ॥
जती जंगम शेवडा । उदासी फकीर कानफाडा ।
माङ्भाव डोईफोडा । ते ते पाखांडी ॥ १४१० ॥
द्रव्यदारेसी विकिले । कामनेसी जे सोंकले ।
वरिवरी नाना सोंगा आणिलें । ते ते पाखांडी ॥ ११ ॥
ऐसें सांगावें तें किती । अवघे देहबुद्धीचे सांगाती ।
उगेचि जन्मूनियां मरती । ते ते पाखांडी ॥ १२ ॥
हें असो अधिकारावीअ । करिती जे कां वेदांतश्रवण ।
मुखें बडबडती ज्ञान । तेही पाखांडी ॥ १३ ॥
गुरु शिष्य शास्त्रभार । स्वानुभवेंवीण केर ।
वाउगा भरला बाजार । तेही पाखांडी ॥ १४ ॥
मुखीं ज्ञान बोले सैरा । अंतरीं असे द्रव्य दारा ।
पुत्रकामीं जो घाबरा । तोही पाखांडी ॥ १५ ॥
रुका वेचितां जाण । सर्व मिथ्या हें बोले वचन ।
आपुले करणीचा साभिमान । तेही पाखांडी ॥ १६ ॥
मी माझें झालें बळकट । मुक्तपणें जें सैराट ।
शब्दज्ञानीं कर्मभ्रष्ट । तेही पाखांडी ॥ १७ ॥
पुरे आतां किती बोल । प्रतीतीविण अवघें फोल ।
तेथें कैंचें हो असेल । शुद्ध ज्ञान ॥ १८ ॥
असो एक वेदांतसार । गुरुमुखें आणि शुद्ध विचार ।
तेथेंचि स्वानुभवें स्थिर । होय विज्ञान ॥ १९ ॥
म्हणून वेदांतपरतें । शास्त्र नाहीं गा कोणतें ।
सर्वांमधें विराजतें । स्वकीय तेजें ॥ १४२० ॥
वेदांतसिंहाचिये आरोळी । सांख्यादि गज कांपती चळीं ।
मग इतर शास्त्रें हीं कोल्हीं । उभ्या प्राण सांडिती ॥ २१ ॥
देवदत्ता दत्तचित्त । जया करणें आत्महित ।
तेणें शुद्ध वेदसिद्धांत । स्वामुभवें आकळावा ॥ २२ ॥
सर्वशास्त्रांसही सांडावें । आणि लौकिकाही त्यजावें ।
सर्वही स्वयेंचि व्हावें । निजांगें ब्रह्म ॥ २३ ॥
मागें बोलिलिया रीतीं । सर्व मीच ऐसी प्रतीती ।
नाठवेचि दुजी व्यक्ती । प्रह्मस्वरूपाविण ॥ २४ ॥
ऐसा जो शुद्ध वेदांत । विज्ञानरूपें विराजत ।
शून्यासहित मावळे द्वैत । सदा परिपूर्ण ॥ २५ ॥
नामरूपें द्वैतभान । याचें करोनियां हनन ।
मग एकचि ब्रह्म आपण । सर्वांमध्यें ॥ २६ ॥
येथेंही कोणी मंदप्रज्ञ । अर्थ एक भाविती आन ।
तयाचें करूं निरूपण । संशयनिरासार्थ ॥ २७ ॥
जग जीव मिथ्यात्वें त्यागावे । आणि सर्व ब्रह्मही अनुभवावें ।
हें दोहींनीं कैसें संभवे । त्यागग्रहण ॥ २८ ॥
सर्व ब्रह्मही म्हणे श्रुती । आणि वाच्य लक्ष्यही निवडिजेती ।
हा विरोध भासे आम्हांप्रती । बोलती मूर्ख ॥ २९ ॥
ऐसें वेदांतासी दूषण । लावूं पाहती मूर्ख जन ।
त्यागग्रहणाची नेणती खूण । सप्रतीत अंगें ॥ १४३० ॥
जन्मांधें दूध कैसें पुसतां । बकाऐसें निरोपितां ।
म्हणे तें तों न येचि खातां । अडकेल कंठीं ॥ ३१ ॥
तैसा मुख्यार्थ न कळे वृत्ती । एकाचे एक भाविती ।
तेथें कैंची हो प्रतीती । स्वात्मत्वें होय ॥ ३२ ॥
त्याग तरी नामरूपाचा । उमसून व्हावा द्वैताचा ।
येथें सर्वपणा आहे कैंचा । कीं टाकावा घ्यावा ॥ ३३ ॥
न सांडितां नामरूपा । सर्व ब्रह्म कैंचें बापा ।
ग्रहण करितां काय सर्पा । रज्जु भेटे ॥ ३४ ॥
तस्मात् नामरूप सांडावें । शुद्ध ब्रह्म अनुभवावें ।
परिपूर्ण एक स्वभावें । एकपणेंवीण ॥ ३५ ॥
द्वैताचा नव्हे उमग । या नांवें बोलिजे त्याग ।
एक ब्रह्मात्मा असंग । सर्व हें नाहीं ॥ ३६ ॥
नानात्व बैसलें वृत्तीसी । यास्तव श्रुति तया उपदेशी ।
जे सर्व सांडूनि सर्वांशीं । स्वात्मत्वें अनुभवीं ॥ ३७ ॥
असो ऐसा जाला प्रकार । संशय निरसिला महाथोर ।
अन्य शास्त्रें सांडोनि दूर । वेदांतचि पाहावा ॥ ३८ ॥
त्वंपदशोधनीं तुजला । अपरोक्ष आत्मा भेटविला ।
जैसा करतळीं आंवळा । तो आला कीं प्रतीती ॥ ३९ ॥
पुढें शोधिलें तत्पद । मिथ्यात्वें एवैताचा उपमर्द ।
ब्रह्मचि आत्मा अभेद । हेंही दाविलें ॥ १४४० ॥
हेंचि सदृढ व्हावें । अभ्यासें वृत्तीसी खलावें ।
जे पुन्हां द्वैत न संभवे । ऐसें करूण् ॥ ४१ ॥
बंध मोक्ष निरूपणव्याजें । द्व्हनितार्थें सर्व बोलिजे ।
तरी आतां अवधान दीजे । पुढील श्लोकीं ॥ ४२ ॥


अहं ममेत्ययं बंधो नाहं ममेति मुक्तता ।
बंधो मोक्षो गुणैर्भाति गुणाः प्रकृतिसंभवाः ॥ २९ ॥


मी माझें हें बंधन । मुक्ति तेचि ययावांचून ।
बंधमोक्षां गुण कारण । गुण तरी प्रकृतीचे ॥ ४३ ॥
देहायेवढेपण । हेंचि आत्मयासी मरण ।
ऐसें जाणावें मीपण । बंधासी मूळ ॥ ४४ ॥
एवं मीपण दृढ होतां । त्यासवें उपजे ममता ।
मग माझें माझें म्हणतां । सदृढ बांधला ॥ ४५ ॥
हेंचि बंधाचें स्वरूप । सुखदुःख भोगी अमूप ।
यावीण मुक्तीचें अल्प । निरूपण कीजे ॥ ४६ ॥
देहादि वेगळे केले । सप्रतीत आपणा ओळखिलें ।
निर्विकारत्वें सदृढ झाले । देहबुद्धीविण ॥ ४७ ॥
मुख्य देहचि मी नसतां । कोणा स्त्रीपुत्रादि ममता ।
ऐसें मी माझें निपटून जातां । मुक्तता हेचि ॥ ४८ ॥
मुक्त तोचि हा साधक । बद्ध तेचि इतर लोक ।
या दोहींमध्यें उभयात्मक । मुमुक्षु ओळखावा ॥ ४९ ॥
एवं बद्ध मुमुक्षु साधक । पूर्वार्धी तिहींचें रूपक ।
उत्तरार्धीं असे कौतुक । सिद्ध लक्षणाचें ॥ १४५० ॥
रजतमें बद्दह्ता जडे । सत्वगुणें मोक्ष जोडे ।
मी असंग ज्ञान उजेडे । म्हणोनियां ॥ ५१ ॥
तस्मात् बंध आणि मोक्ष । गुणांस्तव दोहींचा पक्ष ।
गुण निर्मावयासी दक्ष । ते मायादेवी ॥ ५२ ॥
मूळ माया आणि गुण । मृगजलवत् भासमान ।
रूपनाम कल्पिलें जाण । परी मुळींच नाहीं ॥ ५३ ॥
गुणमायेसीच रूप नव्हे । तरी बंध मोक्ष कोठें आहे ।
निजरूपीं कांहींच न साहे । डोळां कण जैसें ॥ ५४ ॥
ऐसी जेथें दृढ मती । तया ज्ञानिया सिद्ध म्हणती ।
कोणतेही अवस्थेप्रती । द्वैत नुमसे ॥ ५५ ॥
एवं मी माझें हे बद्धता । मी माझें नुमसे चित्ता ।
तेचि जाणिजे मुक्तता । सिद्ध तो दोहींविण ॥ ५६ ॥
मी माझें हें उपलक्षण । मी कर्ता भोक्ताही बंधन ।
मजसी स्वस्वरूपाचें ज्ञान । हाही अभिमान बद्धक ॥ ५७ ॥
मी माझें जें वाटे मनीं । तोचि जागरीं विश्वाभिमानी ।
मी कर्ता भोक्ता सूक्ष्मपणीं । तोचि स्वप्नीं तैजस ॥ ५८ ॥
तें ध्येय मी ध्याता । साधकत्वें ध्यान करितां ।
हा प्राज्ञ अभिमानी तत्त्वतां । अज्ञान सुषुप्ति ॥ ५९ ॥
तस्मात् हे तिन्ही अभिमान । सूक्ष्मत्वें जरी होती स्फुरण ।
तोंवरी असे अज्ञान । मुख्य ज्जान नव्हे ॥ १४६० ॥
हें अज्ञान निपटून जावें । मुख्य अभिना व्हावें ।
तरी अभ्यासेंवीण न संभवे । मंदप्रज्ञासी ॥ ६१ ॥
उपदेश होतांचि क्षणीं । सर्व संशय ग्रासूनी ।
पावे जो पूर्ण समाधानीं । ऐसें विवेकी थोडे ॥ ६२ ॥
तस्मात् देवदत्ता ऐक । अभासाचें रहस्य एक ।
आणि तयाची निश्चयात्मक । अवधिही बोलूं ॥ ६३ ॥
आणि मुमुक्षु साधकाची । कोण काल अवधि त्याची ।
येथें सूक्ष्मनिरूपणाची । सीमाचि असे ॥ ६४ ॥
मुखें देह मी नव्हे म्हणतां । नव जाय गा हे बद्धता ।
येथें अभ्यास दृढ होतां । अहंममता गळे ॥ ६५ ॥
जोंवरी अहंममता दिसे । तोंवरी जागृतीमध्यें असे ।
मी माझें निमतां आपैसें । स्थूलदेहा ओलांडिलें ॥ ६६ ॥
परी अहंममता गेली कैसी । प्रतीति पहावी मानसीं ।
वरिवरी त्यागितां तिसी । निर्मूळता नव्हे ॥ ६७ ॥
येथें प्रकार अभ्यासाचा । अनुसंधानात्मक साचा ।
देहादि सर्व जगाचा । अनुभव मिथ्यारूप ॥ ६८ ॥
मी प्रत्यगात्मा जीव साक्षी । अधिष्ठानचि मात्र लक्षी ।
द्वैत उठतांचि पुन्हां भक्षी । नामरूपातें ॥ ६९ ॥
एकेंचि काळें सर्व द्वैत । मिथ्यात्वें कैसा पाहत ।
आणि साक्षीही अनुभवित । म्हणसी कैसा ॥ १४७० ॥
सर्व हें एकदांचि न स्फुरे । एक उद्‍भवे एक मुरे ।
ज्या क्षणीं जें ये सामोरें । तेव्हां विषय एक ॥ ७१ ॥
शब्द घेतां नव्हे स्पर्श । रूप देखतां नव्हे रस ।
गंध घेतांही अन्यास । मन हें न जाणे ॥ ७२ ॥
सर्व इंद्रियांचे विषय । एकाच काळीं जरी प्रत्यय ।
परी स्फुरण जें कां होय । तें एकाविषयीं ॥ ७३ ॥
तस्मात् ज्या क्षणीं जो विषय । वृत्तीसी होय प्रत्यय ।
त्या क्षणींच मिथ्या निश्चय । केला पाहिजे ॥ ७४ ॥
तितुक्याचि विषयाचा जाणता । श्रम कोणतां अभ्यासितां ।
आणि मिथ्याही पाहतां । काय गा कष्ट ॥ ७५ ॥
एवं इतुकें अनुसंधान । अतुट चाले समान ।
द्वैत मिथ्या अवलोकन । आणि साक्षी स्मरावा । ॥ ७६ ॥
ऐसा अभ्यास दृढ होतां । क्षीण पावे अहंममता ।
मी माझें हें निपटूनि जातां । मुक्तता आयती ॥ ७७ ॥
अहंममता निःशेष गेली । हे कैसी प्रतीति आली ।
म्हणसी तरी अवलोकिली । अंतरीं पाहिजे ॥ ७८ ॥
धनस्त्रीपुत्रहानी । होतां जरी परोक्ष मानी ।
गेलें आलें नाठवे मनीं । तरी माझें गळालें ॥ ७९ ॥
माझें गेलें मुखें बरळे । परी अंतरीं न कळवळे ।
सूक्ष्मरूपें जो कां पिळे । देंठ नाभीचा ॥ १४८० ॥
ममत्व गेलें येणें रीतीं । निरहंकृति ते कोणती ।
कोणतेही अवस्थेप्रती । मी देह वाटेना ॥ ८१ ॥
कोणताही भोगितं विषय । मी ऐसा नव्हे प्रत्यय ।
आपण असंग हा निश्चय । सदृढ झाला ॥ ८२ ॥
ऐसा जो कां दृढभाव । निरहंकृति या नांव ।
विश्वाभिमानियाचा ठाव । पुसिला तेव्हां ॥ ८३ ॥
स्थूलदेह अवस्था जागृती । तेणें ओलांडिली निशिती ।
परी जाणावी प्रतीती । आपुली आपण ॥ ८४ ॥
स्वतां नेणे जो ऐसें अंतरीं । तोचि जाणावा आत्महत्यारी ।
आंत बांधिला म्हणे वरी । मीचि मुक्त ॥ ८५ ॥
तरी साधकें ऐसें न करावें । मुक्त तरी खरेंचि व्हावें ।
मी माझें हे त्यागावें । निपटुन अंतरींचे ॥ ८६ ॥
असो ऐशा अहंममतेची । बेडी तुटली बंधाची ।
आतां पुढे कर्त्या भोक्त्याची । अहंता गळावी ॥ ८७ ॥
होतां देहासी वर्तन । तेथें घडतसे क्रियमाण ।
दिसूं लागले पापपुण्य । आत्मया माथां ॥ ८८ ॥
पुण्यात्मक जरी घडले । तेव्हां म्हणे हें बरें झाले ।
अथवा अहा जें पाप घडलें । ते मनासी खंती ॥ ८९ ॥
ऐसा सूक्ष्म मोड उमटे । अंतरीं सुखदुःख उठे ।
हें जाणावें ओखटें । कर्म तैजसाचें ॥ १४९० ॥
येथेंही अभ्यास बोलिजे ।तेणें रीती साधकें कीजे ।
मग तो मोडचि मुपजे । अहंकर्तृत्वाचा ॥ ९१ ॥
संकल्परूप जें स्फुरण । तेतें जे कां शुद्ध ज्ञान ।
सर्वकाळ अनुसंधान । इतुकेंचि राहे ॥ ९२ ॥
उठो कीं राहो संकल्प । त्यासी काज नसे अल्प ।
आपुला आपण चिद्‍रूप । साक्षी आत्मा ॥ ९३ ॥
स्फुरणासी मिथ्या पाहावें । साक्षिमात्रें आपणा घ्यावें ।
ऐसें चिरकाल अभ्यासावें । अहंकर्तृत्व निमे जों ॥ ९४ ॥
तें निमाल्याची ओळखण । देहासी घडतांही वर्तणें ।
अंतरीं नव्हेचि स्फुरण । मी कर्ता भोक्ता ऐसें ॥ ९५ ॥
पाप तरी खंती नुपजे । पुण्य होतां बरें नेणिजे ।
हेंही अंतरींच समजे । जयाचें तया ॥ ९६ ॥
धीटपणें भलतें करी । मुक्तपणा दावी वरी ।
परी स्मरतसे अंतरीं । बरें अथवा वाईट ॥ ९७ ॥
तो मोड जरी अंतरींचा । स्वानुभवेचि निमे साचा ।
तेव्हां करण्या न करण्याचा । साक्षी आपण ॥ ९८ ॥
अहंता करो वरिवरी । परी खेदचि नाहीं अंतरीं ।
ऐसा ग्रंथिभेद करी । तोचि तारी आपणातें ॥ ९९ ॥
मी कर्ता भोता निमे जरी । तोचि ज्ञाता गा निर्धारी ।
तैजस अभिमानाचे शिरीं । पाय देऊनि नाचतसे ॥ १५०० ॥
तेंएं सूक्ष्म ओलांडिलें । स्वप्नावस्थेतें त्यागिलें ।
स्वानुभव सुकाळीं पडिलें । ठाण बुद्धीचें ॥ १ ॥
ऐसे दों देहीं अभ्यास दोन । सदृढ राखी जो अनुसंधान ।
आणि अवधीही ओळखून । पाहे अंतरीं ॥ २ ॥
ऐसा न करितां अभ्यास । दृढ न आवे अपरोक्षास ।
शब्दज्ञानी परा गतीस । पावेल कैंचा ॥ ३ ॥
बाई मी गुरवीण होईन । फुकाचा नैवेद्य खाईन ।
कांहींच करणें नको शीण । स्वयंपाकाचा ॥ ४ ॥
तैसेंचि जेणें मानिलें । अभासासी अव्हेरिलें ।
घडिभरी श्रवण जरी केलें । वेदांताचें ॥ ५ ॥
तेणें मोक्षश्री वरीना । मिथ्या बद्धता जाईना ।
तरी हें साधकें अभ्यासलक्षणा । अगत्य आदरावी ॥ ६ ॥
देहतादात्म्य झालें दृढ । यास्तव वाटे हें अवघड ।
मीपणाचा झडतां मोड । तरी त्यासी हें सुगम ॥ ७ ॥
असो ऐसे देहद्वयाचे । अभिमानी निमाले साचे ।
लक्षण हेंचि ग्रंथिभेदाचें । जे अहंता चैतन्य मिळेना ॥ ८ ॥
ऐसी बद्धता निमाली । परी मुक्तदशा उरली ।
ते स्थिती जरी न्याहाळिली । तरी मूलाज्ञान असे ॥ ९ ॥
ध्येंय जें ब्रह्म परिपूर्ण । तेंचि अंगें असतां आपण ।
ध्याता वेगळा त्यासी होऊन । ध्यान करी ॥ १५१० ॥
तस्मात् आपणासी नेणतां । ध्यानमिषें वेगळा होतां ।
तेंचि अज्ञान तत्त्वतां । नसतां द्वैत कल्पी ॥ ११ ॥
ब्रह्मसुखाच्या अनुभवें । ध्याता ध्यानेंचि सुखावे ।
तया अभिमानातें जाणावें । प्राज्ञ ऐसें ॥ १२ ॥
निजांगें आपण नाहीं झाला । द्वैतरूपें सेवी सुखाला ।
येथें निर्भयत्व पावला । नवचे साधक ॥ १३ ॥
जरी निजांगें ब्रह्म व्हावें । तरीच निर्भयत्व पावावें ।
यास्तव येथें अभ्यासावें । बोलिजे तैसें ॥ १४ ॥
दृश्य द्रष्टा एक कीजे । साक्ष्य साक्षी कालविजे ।
ध्याता ध्येहही ओळखिजे । एकरूपचि ॥ १५ ॥
दृश्यासी दृश्यत्व नाहीं । तरी द्रष्टा कोठें पाही ।
साक्ष्य जरी असे कांहीं । तरीच साक्षी होय ॥ १६ ॥
जयासी द्य्ॐ जाय ध्याता । तेंचि आपण अंगें तत्त्वतां ।
ऐसें विचारें जाणता । ध्याता वेगळा नुरेचि ॥ १७ ॥
ध्याता तोचि आपण । साक्ष्य साक्षी ब्रह्म पूर्ण । दृ
श्य द्रष्टा चैतन्यघन । भेदचि नाहीं ॥ १८ ॥
ऐसा दृढ होतां निश्चय । मग दृश्याचें दिसणें जें होय ।
आणि भासाचा जरी प्रत्यय । तरी तें ब्रह्मरूप ॥ १९ ॥
नामरूपात्मक स्फुरण । उठतांचि तया ओळखून ।
तें तें मिथ्यात्वें विदारून । निजांगें व्हावें ॥ १५२० ॥
जें जें तत्त्व समोर भेटे । तें तें मीचि ऐसें वाटे ।
तरी मग द्वैताचें तुटे । मूळ अनायासें ॥ २१ ॥
पाणियवरी तरंग । तैसें आपणावरी जग ।
तरंगीं जल अभंग । तेवीं जगीं आपण ॥ २२ ॥
द्वैतभाव सांडूनि दूरी । आपणचि चराचरीं ।
ऐसा अभ्यास जो दृढ करी । निजांगें ब्रह्म होय तो ॥ २३ ॥
कोणतेही अवस्थेप्रती । नुमसे द्वैतप्रतीती ।
निःसंशयत्वें दृढमती । हेचि अवधि याची ॥ २४ ॥
ऐसा निजांगें ब्रह्म झाला । मग ज्ञानाज्ञान कोठें त्याला ।
येणें रीतीं हा निमाला । प्राज्ञाभिमानी ॥ २५ ॥
मी माझें असे जोंवरी । मुमुक्षुत्व जाणावें तोंवरी ।
अहंममता निर्मूळ जरी । होतां मुमुक्षुत्व राहिलें ॥ २६ ॥
पुढें तया नांव साधक । ध्येयध्यानरूपें कौतुक ।
तेंही निमोनि होय एक । निजांगें ब्रह्म ॥ २७ ॥
संशयरहित समाधान । होतां गळालें साधकपण ।
तया सिद्ध हें अभिधान । बोलिलें असे ॥ २८ ॥
एवं मी माझें हेंचि बंधन । मुमुक्षु करी त्याचें अनन ।
निःशेष जातां निपटून । तोचि मुक्त साधन ॥ २९ ॥
बद्धमुक्तदशा ऐसी । निमाली जरी एकरसीं ।
तोचि ज्ञाता निश्चयेंसीं । स्वयें ब्रह्मरूप ॥ १५३० ॥
एवं झालें निरूपण । ये रीतीं अभ्यासी जो पूर्ण ।
तो निजंगेंचि आपण । ब्रह्मरूप होय ॥ ३१ ॥
ब्रह्मरूप मुळींच आहे । परी विचारें कोणी न पाहे ।
याकरितां हा लवलाहें । अभ्यास कीजे ॥ ३२ ॥
ऐसें जे कां न जाणती । तेचि मंदभाग्य निश्चितीं ।
हेंचि बोलिजे अल्परीतीं । पुढील श्लोकीं ॥ ३३ ॥


ज्ञानमेकं सदा भाति सर्वावस्थासु निर्मलम् ।
मंदभाग्या न जानंति स्वरूपं केवलं बृहत् ॥ ३० ॥


अवस्था तिहीं एकलें ज्ञान । निर्मळ निजस्वरूप पूर्ण ।
केवल सदा भासमान । मंदभाग्य न जाणती ॥ ३४ ॥
बृहत् ब्रह्म अस्तित्वेंविषयीं । शब्दस्पर्शादिकांच्या ठायीं ।
आणि अंतःकरणादि समुदायीं । चिद्‍रूप आत्मा ॥ ३५ ॥
जो जो विषयमात्र स्फुरे । तो तो जाणे निर्विकारें ।
आत्मया न कळतां निर्धारें । कोणते कार्य होतें ॥ ३६ ॥
सर्व जागृतीचा जाणता । स्वप्नातें तोचि अवलोकिता ।
सुषुप्तीमाजी टळटळिता । जाणे अज्ञाना ॥ ३७ ॥
एवं सर्व जेणें व्यापिलें । भोक्त्यादि भोग्यीं संचलें ।
तेंचि निजरूप आपुलें । चिन्मात्र ज्ञान ॥ ३८ ॥
सर्वदा जाणे स्वप्रकाशें । सर्व जनांसी असतां ऐसें ।
मंदभाग्यासी अज्ञान कैसें । कीं प्रगट असून दिसेना ॥ ३९ ॥
रज्जुदृष्टीनें पाहे । नेणता म्हणे सर्प आहे ।
तेवीं ब्रह्मरूपासी लवलाहें ॥ नामरूपें कल्पिती ॥ १५४० ॥
आहे तें सांडून ब्रह्म । नाहीं तया ठेऊनि नाम ।
पावती सुखदुःख परम । हा भ्रम तरी कैसा ॥ ४१ ॥
जयाच्या सत्तें असती । जयाच्या प्रकाशें वर्तती ।
जयाच्या सुखार्थ विषय घेती । परी नेणती तया ॥ ४२ ॥
देह तरी अत्यंत मडें । तेथें ज्ञानप्रकाश पडे ।
हें नेणूनियां बापुडे । जाती देव धुंडावया ॥ ४३ ॥
असो मायेनें भुलविले । परतंत्रदशा पावले ।
शास्त्रसंपन्न जरी झाले । तरी हा भ्रम निरसेना ॥ ४४ ॥
ऐसी बद्धता हे नाथिली । ते कांहींशी निरूपिली ।
पुढील स्थिति ऐकिली । पाहिजे मुक्ताची ॥ ४५ ॥


संकल्पसाक्षिणं ज्ञानं सर्वलोकैकजीवनम् ।
तदस्मीति च यो वेद स मुक्तो नात्र संशयः ॥ ३१ ॥



संकल्पसाक्षी जें ज्ञान । हेंचि सर्व लोकांचें जीवन ।
तेंचि मी जया बाणे खूण । निःसंशयी मुक्त तो ॥ ४६ ॥
हा मनाचा संकल्प उमसे । साक्षी जाणेचि तयासरिसें ।
हा मी आत्मा स्वप्रकाशें । अनुभवी आपणा ॥ ४७ ॥
ऐसें जें प्रज्ञानघन । तेंचि या सर्वांचें जीवन ।
तरी सर्वांमाजी मीचि जाण एकला आत्मा ॥ ४८ ॥
येहें कोणी दुजा नाहीं । मीचि असें सर्वदाहा ।
ऐसें ज्ञान जया पाहीं । तोचि मुक्त निश्चयें ॥ ४९ ॥
मीच ब्रह्म सर्वदेशी । निश्चयरूप बुद्धी ऐसी ।
न इच्छितांही मुक्ती त्यासी । बळें माळ घाली ॥ १५५० ॥
तस्मात् देवदत्ता सावधान । मी देह हेंचि बंधन ।
मी ब्रह्म ते मुक्ति जाण । ओळखीं अंतरीं ॥ ५१ ॥
नामरूप मनासी भासे । जाण बंधाचें रूप ऐसें ।
ज्ञानें ब्रह्मचि विलसे । मुक्त स्थिति हेचि ॥ ५२ ॥
वृत्तीसहित ज्ञान स्फुरे । ते जीवन्मुक्ति निर्धारें ।
वृत्तीवीण समाधान बा रे । विदेहस्थिति ते ॥ ५३ ॥
तरी तूं टाकूनि संशय । ज्ञानरूप अससी अद्वय ।
बोलिल्या रीतीं निश्चय । ओळखीं अंतरीं ॥ ५४ ॥
देवदत्तें ऐकतां ऐसें । पुसूं आदरिलें मानसें ।
जीवन्मुक्तीचें लक्षण कैसें । सवृत्तिक ज्ञान ॥ ५५ ॥
परप्रकाशता वृत्तीसी । आत्मयासी जाणे कैसी ।
जो अगोचर वाणीमनांसी । तेथें वृत्तीज्ञान कैसें ॥ ५६ ॥
तोचि सर्वांगी जाणे । तयासी हें कोणी नेणे ।
तरी स्वानुभव जो होणें । तोचि कवणासी ॥ ५७ ॥
यासी कोणएं जी प्रमाण । कीं आत्मयासी करी ग्रहण ।
ऐसें शंकरें ऐकून । परम संतोष पावले ॥ ५८ ॥
सवृत्तिक जें ब्रह्मज्ञान । जीवन्मुकाचें लक्षण ।
पुढें कीजे निरूपण । अनुक्रमेंचि ॥ ५९ ॥
परी तुझिया गा अंतःकरणीं । कोण तत्त्वस्वरूप ग्रहणीं ।
हेंचि आधीं पाहें विचारूनी । ग्रहणाचें काज नको ॥ १५६० ॥
तरी आतां श्लोक दोन । हेंचि ऐकें निरूपण ।
स्वप्रकाशासी करी ग्रहण । ऐसें तत्त्व नाहीं ॥ ६१ ॥


प्रमाता च प्रमाणं च प्रमेयं प्रमितिस्तथा ।
तस्य भासावभासेत मानं ज्ञानाय तस्य किम् ॥ ३२ ॥


प्रमाता प्रमेय प्रमाण । आणि तयाचें वसतें स्थान ।
हें ज्याचे भासा भासमान । त्यासी प्रमाण कासया ॥ ६२ ॥
निर्विकल्पीं हें स्फुरण । जया नांव अंतःकरण ।
तयासी बोलिजे प्रमाण । चंचलरूपें ॥ ६३ ॥
त्यामाजी चैतन्य व्यापलें । त्याऐसें विकारी दिसलें ।
हेंचि प्रतिबिंबत्वें कल्पिलें । तोचि जीव प्रमाता ॥ ६४ ॥
अस्तित्वें जें ब्रह्मरूप । तेथें कल्पिलें नामरूप ।
शब्दस्पर्शादि अमूप । विषय तोचि प्रमेय ॥ ६५ ॥
एवं अंतःकरण प्रमाण । जीव तो प्रमाता जाण ।
प्रमेय ते विषय संपूर्ण । शब्दस्पर्शादि ॥ ६६ ॥
जया तिहींचेंही स्थळ । तो हा अन्नमय स्थूळ ।
तेथें राहूनियां सकळ । विषय सेविती ॥ ६७ ॥
ऐसे प्रमाण प्रमाता । प्रमेय प्रमिति जेणें सत्ता ।
भासती प्रकाशें तत्त्वतां । जयाचेनि ॥ ६८ ॥
तो हा आत्मा ज्ञानघन । सर्वांसी जाणताहे आपण ।
तयासी नेणतीच संपूर्ण । जडरूप तत्त्वें ॥ ६९ ॥
डोळा देखे घटासी । परी घट नेणे नेत्रासी ।
तैसा आत्मा जाणे सर्वांसी । सर्व नेणती तया ॥ १५७० ॥
हाचि अर्थ तुजला पुढें । श्लोकीं बोलिजे निवाडें ।
स्वप्नप्रकाश आणि जडें । प्रगट कळती ॥ ७१ ॥


अर्थाकारा भवेद् वृत्तिः फलेनार्थः प्रकाशते ।
अर्थज्ञानं विजानाति स एवार्थः परं स्मृतः ॥ ३३ ॥


वृत्ति होतां विषयाऐसी । जीव तयातें प्रकाशी ।
स्वप्रकाशें जाणे तिहींसी । अर्थ तोचि परमात्मा ॥ ७२ ॥
जो जो विषय येई समोर । वृत्ति व्यापी तदाकार ।
फेडोनि अज्ञान अंधकार । जीवें स्फुरे अमुक ऐसें ॥ ७३ ॥
वृत्तीसी ज्ञान स्फुरेना । तरी जीव पाहिजे विषयज्ञाना ।
प्रतिबिंब न पडे वृत्तिविना । तरी वृत्तिही पाहिजे ॥ ७४ ॥
एवं परस्परें साह्यभूत । जीव आणि वृत्ति स्फुरत ।
तेणें विषयाचें ग्रहण होत । ऐसा व्यापार तिहींचा ॥ ७५ ॥
कूटस्थ आत्माचि वृत्तिसी । व्यवहार कां न प्रकाशी ।
ऐसें जरी तूं कल्पिसी । तरी अवधारीं ॥ ७६ ॥
चंचलत्वें स्फुरण होय । उद्‍भवूनि होतो लय ।
त्यासवेंचि जीवही जाय । हारपोनियां ॥ ७७ ॥
यास्तव विकारी जीव । विशेषत्वें स्फुरवी सर्व ।
आत्मप्रकाश सदैव । लयकाळींही संचला ॥ ७८ ॥
तस्मात् प्रतिविंबयोगें वृत्ती । सर्व विषयांसी निवडिती ।
सामान्य प्रकाश आदिअंतीं । वृत्ति उद्‍भवलयाच्या ॥ ७९ ॥
एवं जीववृत्ति आणि विषय । इतुकाही भासतां समुदाय ।
आत्मा जाणें प्रकाशमय । सामान्यरूपें ॥ १५८० ॥
वृत्तिसहित सर्वांचा । निर्विकारें जाणता साचा ।
तोचि अर्थ बोलिजे वाचा । परशब्दें अगोचर ॥ ८१ ॥
ऐसीं सर्व तत्त्वें जड । आत्मा चैतन्यघन वाड ।
तेथें ग्रहंआचा पवाड । होईल कैंचा ॥ ८२ ॥
वृत्तीसी सांडूनि दूरी । शून्याचाही ग्रास करी ।
आत्मा आत्मपणें निर्धारीं । निश्चय कळावा ॥ ८३ ॥
वृत्तीनें ग्रहण करूं जातां । आत्मा अपरोक्ष केउता ।
वेगळा राहे अनुभविता । हें परोक्षज्ञान ॥ ८४ ॥
ध्याता जोंवरी वेगळा असे । तोअंवरी कर्तृतंत्रता दिसे ।
वस्तुरूप होतां आपैसें । तें अपरोक्ष ज्ञान ॥ ८५ ॥
येथें ही करिसी कल्पना । वस्तुतंत्र अपरोक्ष ज्ञाना ।
ज्ञाता वेगळा भिन्नपणा । असे तरी ऐक ॥ ८६ ॥
जों जों जाणों जाय ज्ञाता । तों तों वेगळा पडे तत्त्वतां ।
जाणणें नेणणें त्यागितां । तोचि आत्मा आपण ॥ ८७ ॥
बहुत कासया बोलावें । स्वरूपीं जाणणेंचि न संभवे ।
येथें विचारेंचि अभिन्न व्हावें । ज्ञान तेंही टाकूनि ॥ ८८ ॥
तुवां मागें पिउसिलें लक्षण । जीवन्मुक्ता सवृत्तिक ज्ञान ।
परी याचा अर्थ गहन । वृत्तीनें घेणें नव्हे ॥ ८९ ॥
अंगें वस्तुरूप झाला । संशय अवघा निमाला ।
मग जो कार्यभाग दिसला । तो तो आपणचि वाटे ॥ १५९० ॥
आपणामध्यें सर्व जग । कीं जगीं आपण अभंग ।
सर्वावस्थेमाजी उमग । वृत्ति ऐसी ॥ ९१ ॥
सवृत्तिक ज्ञान ऐसें । सर्व दिसतांही भेद नसे ।
स्वरूपीं वृत्तिग्रहण कैसें । संभवे बापा ॥ ९२ ॥
तथापि फिटावया अज्ञान । वृत्तिव्याप्तीचें प्रयोजन ।
असे तेंचि निरूपण । पुढील श्लोकीं ॥ ९३ ॥


वृत्तिव्याप्यत्वमेवास्तु फलव्याप्तिः कथं भवेत् ।
स्वप्रकाशस्वरूपत्वात् सिद्धत्वाच्च चिदात्मनः ॥ ३४ ॥


स्वरूपीं असो वृत्तिव्याप्ती । परी काज नसे जीवाप्रती ।
चिदात्मा स्वप्रकाश संवित्ती । सहज सिद्ध असतां ॥ ९४ ॥
देवदत्ता सावधान । सूक्ष्म येथींचें निरूपण ।
वृत्तिव्याप्तीचेंही कारण । अंगिकारिलें ॥ ९५ ॥
घटपट येतांचि दृष्टीसी । वृत्ति व्यापी तया जैसी ।
स्वरूपीं स्वरूपाकार तिअसी । योजितांचि होय ॥ ९६ ॥
पाणियावरी चक्र उमटे । अमर्याद धांवें नेटें ।
तैसें वृत्तीसीं स्वरूप भेटे । तेव्हां होय तयाऐसी ॥ ९७ ॥
चक्र जैसें वितळून जातां । पाणी पाणीपणें तत्त्वतां ।
तैसी वृत्तीसी लय होतां । मग आत्माचि उरे ॥ ९८ ॥
आधीं स्वरूपीं वृत्ति व्यापे । परी तत्क्षणींच ते हारपे ।
लवण जैसें सागरीं लोपे । पुढें अद्वय आत्मा ॥ ९९ ॥
ऐसी वृत्तीची व्यापकता । बाध नसे अंगीकारितां ।
परी जीवरूपें जो प्रमाता । नलगे व्याप्तीसी ॥ १६०० ॥
बाह्य पदार्थ अवघीं जडें । तेथें जीवाचें काज पडे ।
स्वप्रकाश चैतन्य उघडें । तेथें जीव कासया ॥ १ ॥
चक्षु दिवा मिळे जरी । घटाचें रूप दिसे तरी ।
दीप पहावया निर्धारीं । चक्षुचि एक पुरे ॥ २ ॥
तैसें जडविषीं या दोहींचें । काज असे वृत्तिजीवांचें ।
स्वप्रकाशालागीं साचें । व्त्तिच एक पुरे ॥ ३ ॥
जल तेथें प्रतिबिंब । वृत्ति तेथें जीव आतुडे ।
म्हणसी जरी ऐसें कोडें । तरी दडे जीवत्व ॥ ४ ॥
सूर्यप्रकाशीं जैसा दीप । प्रकाश करीना अल्प ।
तेवीं जीवाचें प्रतिबिंबरूप । मुख्य बिंबींच मिळे ॥ ५ ॥
जोंकाळ मुख्यबिंबाहूनी । वगळें असतां पाणी ।
प्रतिबिंबाचे झडपणी । दिसे तोंवरीच ॥ ६ ॥
पाणी बिंब एक होतां । कैंची उठे प्रतिबिंबता ।
जाणावें याचि दृष्टांता । निजस्वरूपीं ॥ ७ ॥
जोंवरी आत्मरूपाहूनी । वृत्ति असे भिन्नपणीं ।
तोंवरी जीवाची उभवणी । प्रतिबिंबत्वें ॥ ८ ॥
वृत्ति आणि बिंबात्मा । एकत्र मिळतो संगमा ।
तरी प्रतिबिंबरूपें भ्रमा । स्थान कंचें ॥ ९ ॥
एवं प्रतिबिंबरूप जीव । याचा निःशेष अभाव ।
वृत्तिव्याप्तीचा गौरव । असे कांहींसा ॥ १६१० ॥
वृत्ति योजितां निर्विकारीं । अज्ञानाची होय बोहरी ।
तेही होऊन स्वरूपाकारीं । वितुळे तत्क्षणीं ॥ ११ ॥
जरी वृत्तिव्याप्ति होये । परी अमुक ऐसें घेतां न ये ।
न घेतांही मिळून जावे । स्वरूपामाजी ॥ १२ ॥
आकाशीं वायु विरे । पुढें आकाशचि सारें ।
तेवीं चिन्मात्र ब्रह्म उरे । ग्रहणत्यागावीण ॥ १३ ॥
ऐसा निश्चय गा जयासी । अभिन्न होऊन एकरसीं ।
पावला पूर्ण समाधानासी । निर्विकल्परूप ॥ १४ ॥
पुढें उत्थानकालीं वृत्ती । त्याचि सुखा अनुभविती ।
हेचि जाणावी जीवन्मुक्ती । वासनानंदरूपें ॥ १५ ॥
वासना उठे किंवा निमे । व्यवहारे कीं विश्रामे ।
ज्ञाता पडेना संभ्रमें । भिन्नत्वाच्या ॥ १६ ॥
तयाचा निश्चय हा कैसा । अल्पत्वें बोलूं कांहींसा ।
नसे भेदाचा वळसा । कोणते काळीं ॥ १७ ॥
मी अनंत परिपूर्ण । चैतन्यसागर गहन ।
तेथें वृत्तीचें स्फुरण । लहरी जैसी ॥ १८ ॥
उठतांचि चैतन्य खचित । त्यामाजी विश्व हें उमटत ।
परी तेंही पाहे निश्चित । अतिभातित्वें ॥ १९ ॥
आतां वृत्ति हे जरी उठे । तरी आपण आपणा भेटे ।
पुन्हां जरी ते ओहटे । तरी केवळ आत्मा ॥ १६२० ॥
वृत्तीचा उद्‍भव अथवा लय । होतांही आपण अद्वय ।
जीवन्मुक्त निःसंशय । क्रीडे येणें रीतीं ॥ २१ ॥
ग्रहणावीण वृत्तीसहित । अभिन्नपणें जीवन्मुक्त ।
सांगितला अल्प संकेत । हृदयीं धरीं ॥ २२ ॥
आतां कैसी विदेहस्थिती । सांगत असों तुजप्रती ।
तेचि उन्मनी निश्चितीं श्लोकार्थीं कळे ॥ २३ ॥


अर्थादर्थे यथा वृत्तिः गतुं चलति चांतरे ।
अनाधारा निर्विकारा या दशा सोन्मनी स्मृता ॥ ३५ ॥


उभयविषयांचें अंतर । मध्यसंधि निर्विकार ।
जे वृत्तिदशा अनाधार । ते उन्मनी बोलिजे ॥ २४ ॥
विषय पावतां दृष्टीसी । अमुक ऐसें कल्पी मानसीं ।
विशेषत्वें म्हणावें त्यासी । विकाररूपें ॥ २५ ॥
प्रथ विषयवृत्तीनें । सांडूनि दुजियावरी जाणें ।
तोचि संधि अवलोकणें । सूक्ष्म विचारें ॥ २६ ॥
पहिला विषय टाकिला । दुजा जोंवरी नाहीं घेतला ।
तया अनाधार वृत्तीला । उन्मनी ओळखिजे ॥ २७ ॥
जेथें मन असे समान । विकाराचें नव्हे भान ।
हेंचि उन्मनीचें लक्ष्मण । सप्रतीत पाहें ॥ २८ ॥
डोळा देखे सहजगती । अमुक ऐसी नव्हे स्फूर्ती ।
सामान्यत्वें स्वयंज्योती । प्रकाशी ते उन्मनी ॥ २९ ॥
निर्विकल्प ब्रह्मरूप । जेथें उद्‍भवेना नामरूप ।
सागरीं लवण जैसें अल्प । वेगळें न निघे ॥ १६३० ॥
तैसेंचि ज्ञात्याचें मन । उमसूं न लाहे भिन्न ।
तया उन्मनीतें अभिधान । वेदेहस्थिति ॥ ३१ ॥
जो निश्चय जीवन्मुक्ताचा । तोचि निश्चय असे याचा ।
परी सविकल्प निर्विकल्पाचा । मात्रचि भेद ॥ ३२ ॥
विश्व हें आहे कीं नव्हे । वृत्ति गेली कीं उद्‍भवे ।
हें जयासी नाहीं ठावें । ते विदेहस्थिति ॥ ३३ ॥
ब्रह्मरूप आपण आहे । ऐसी वृत्ति जाणों न लाहे ।
कोणताचि संशय न राहे । ते विदेहस्थिति ॥ ३४ ॥
ब्रह्म तरी आठवे चित्तीं । परी मी ऐसी नव्हे स्फूर्ती ।
भिन्नत्वाची झाली समाप्ती । विदेहस्थिति ऐसी ॥ ३५ ॥
तैसेंचे डोळां देखे विश्व । परी उमसूं नेदी रूप नाअंव ।
भिन्नत्वाचा पुसुला ठाव । ते विदेहस्थिति ॥ ३६ ॥
हें सर्व कीं मी एक;ला । हेंही स्फुरेना तयाला ।
देह पडला कीं क्रीडला । नेणेचि तो ॥ ३७ ॥
जैसी देहबुद्धि गेली । तेवीं ब्रह्मबुद्धि मावळली ।
पुढें स्थिति जे उरली । ते बोलतां न ये ॥ ३८ ॥
स्मरण तैसें विस्मरण । पाहणें तैसें न पाहणें ।
व्यवहार तैसें उगेपण । भेदचि नाहीं ॥ ३९ ॥
प्रवृत्ति तैसी निवृत्ति । उद्‍भव तैसी समाप्ती ।
ऐसी जे कां अभेदस्थिति । हे विदेह मुक्तदशा ॥ १६४० ॥
एवं सवृत्तिक जीवन्मुक्ति । निर्विकल्प वेदेहस्थिति ।
देवदत्ता हे तुजप्रति । अभेदरीती सांगितली ॥ ४१ ॥
हेंचि तुजसी दृढ व्हावें । ऐसे बोलिजेतें बरवें ।
जीं जीं भासती रूपनांवें । तीं तीं ब्रह्मरूप ॥ ४२ ॥
मातीवीण नव्हे घट । तंतूवीण नव्हे पट ।
तरी घटपट सांडूनि अवीट । माती तंतू जाणावे ॥ ४३ ॥
ऐसें अन्वयाचें रूप । बोलिजे तुजसी अल्प ।
तेणें कळेल आपेंआप । मुक्तदशा ही ॥ ४४ ॥
ब्रह्मरूप हें आघवें । भिन्न यासी रूपचि नव्हे ।
तीं श्लोकीं निरूपण बरवें । ऐकें सावध ॥ ४५ ॥
प्रथम चित जया नांव । चिद्‍रूपचि याचा स्वभाव ।
भेदकल्पना ते वाव । मुळींच नाहीं ॥ ४६ ॥


चित्तं चिच्च विजानीयात् तकाररहितं यदा ।
तकारो विषयाध्यासो जपारागो यथा मणौ ॥ ३६ ॥


ज्या क्षणीं तकार लोपे । त्या क्षणीं चित्त चिद्‍रूपें ।
तकार विषयाध्यास रूपें । स्फटिकीं जेवीं रक्तरूप ॥ ४७ ॥
कापुसासी पीळ पडे । तयासी तंतू नांव जोडे ।
परी आंतबाहेरी कोडें । कापुस अवघा ॥ ४८ ॥
तैसें ब्रह्मस्फुरण । तया नांव पडिलें भिन्न ।
परी तें पाहतां विचारून । स्वरूपावीण काय ॥ ४९ ॥
अज्ञानें नांव ठेविलें । चिद्‍रूपा चित्त कल्पिलें ।
तें नामचि एक केलें । तरी रूप तो एक ॥ १६५० ॥
एक तकार पडिला अधिक । तेणें भासली वेगळीक ।
तें सांडून पाहतां एक । चित्त तें चिद्‍रूपें ॥ ५१ ॥
एक मात्राचि पुसिली । तेणें मोत्याची माती झाली ।
तेवीं सकारें व्यक्ति कल्पिली । वेगळी चित्ताची ॥ ५२ ॥
तकार तोचि विषयाध्यास । जो कां भासे अन्यथाभास ।
सांडूनि आपुल्या उगमास । विषयाकार झालें ॥ ५३ ॥
अध्यास म्हणजे नव्हे खरा । वाउगा दिसे भास सारा ।
आरक्त दिसे श्वेत हिरा । जपाकुसुमीं ॥ ५४ ॥
रक्तपुष्प केलें वेगळें । तरी श्वेतमणि ऐसा कळे ।
तेवीं तकार सांडितां निवळे । चिद्‍रूप चिद्‍रूपत्वें ॥ ५५ ॥
तंतू अवघाचि कापुस । नाहीं सूतपणा लवलेश ।
तेवीं स्फुरणालागीं भास । चिद्‍रूपेंवीण केवीं ॥ ५६ ॥
चित्त एक उपलक्षण । परी चतुर्विध अंतःकरण ।
आणि इंद्रिये तेंही उपकरण । जें साधन भोक्त्याचें ॥ ५७ ॥
इतुक्यांचेही वेगळे भाव । पुसून टाकीं रूप नांव ।
एकलाचि स्वयमेव । ज्ञानरूप आत्मा ॥ ५८ ॥
वेगळें यासी रूप नाहीं । आहे तें असे सर्वदाही ।
नामें मात्र ठेविलीं तीं हीं । ओळखून सांडावीं ॥ ५९ ॥
पाणियाचेअम्चि अंग । नाम पावलें तरंग ।
तेवीं आत्मा हा असंग । नानात्वें कल्पिला ॥ १६६० ॥
तस्मात् वाउगा हा विकार । नसतांचि झाला भासमात्र ।
परी हा जाणावा निर्विकार । चिद्‍रूप आत्मा ॥ ६१ ॥
केवळ भोक्ताचि चिद्‍रूप आहे । ऐसें हें बोलणें नव्हे ।
भोग्यादि जें जें दिसताहे । तेंही ब्रह्मरूप ॥ ६२ ॥
तकारें झालें जैसें चित्त । त्याचि चित्ताचें हें निर्मित ।
तेंही ब्रह्मरूप निश्चित । बोलिजे श्लोकीं ॥ ६३ ॥


ज्ञेयवस्तुपरित्यागात् ज्ञानं तिष्ठति केवलम् ।
त्रिपुटी क्षीणतामेति ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ ३७ ॥


विषयमात्रांचा करितां त्याग । केवल ज्ञान उरे मग ।
त्रिपुटीचा होतांचि भंग । अंगें ब्रह्म होतसे ॥ ६४ ॥
अहंब्रह्म जें स्फुरण । तयाचेंचि नसतां ज्ञान ।
तेंचि भिन्नत्वें विभागून । विषयाकार झालें ॥ ६५ ॥
पहिलें केवळ सद्‍रूप । त्यावरी कल्पिला आरोप ।
शब्दस्पर्शादि नामरूप । ठेविली असती ॥ ६६ ॥
आपण ब्रह्म हें कळेना । विषय ब्रह्मही निवळेना ।
भिन्नत्व कल्पिलें आपणा । विषयाअंसहित ॥ ६७ ॥
आपण आत्मा हें जाणिकें । चित्त जेव्हां चिद्‍रूप झालें ।
मग विषय तेही देखिले । ब्रह्म चिन्मात्र ॥ ६८ ॥
कापुसाचा तंतू झाला । आडवा उभा विणिला ।
पट हें नाम आलें त्याला । परी तो कापूस ॥ ६९ ॥
तैसें चिद्‍रूप तेंचि चित्त । त्याचें कल्पित विषयाजात ।
तें तें ब्रह्मरूप समस्त । नानारूप त्यागूनि ॥ १६७० ॥
पटीं ओळखावा तंतू । कापूस ओळखावा त्यांतू ।
तेवीं विषयामाजी चित्तू । ओळखावें आधीं ॥ ७१ ॥
तेंचि चित्त चिद्‍रूप । तरी विषय कैंचा नामरूप ।
तस्मात् ज्ञेयामाजीही अल्प । भेदचि नाहीं ॥ ७२ ॥
एवं विषयनाम हें सांडितां । केवल ज्ञान उरे तत्त्वतां ।
तळटळीत चिद्‍रूपता । देखे पदार्थमात्रीं ॥ ७३ ॥
पदार्थ अवधे चिद्‍रूप । तरी कोठें विषयासी रूप ।
भासलें होतें जें अल्प । तेंही नष्ट झालें ॥ ७४ ॥
ऐसा विषयाचा अभाव । भोक्ता तोही समूळ वाव ।
तरी भोगालागीं ठाव । असे कैंचा ॥ ७५ ॥
ज्ञेय सर्व मिथ्या झालें । ज्ञात्याचें भान गळालें ।
तरी मग ज्ञान उरलें । असे कोठें ॥ ७६ ॥
प्रमेयासी रूप नसतां । उद्‍भवेचि ना प्रमाता ।
तरी मग प्रमाणाची वार्ता । नाहींच नाहीं ॥ ७७ ॥
कार्यजात निःशेष नाहीं । कर्ताही उद्‍भवेना कंहीं ।
तरी मग करणें पाहतां तेंही । मिथ्याचि रूप ॥ ७८ ॥
दृश्य जरी मिथ्या अवघें । द्रष्टा इष्टपणें नेघे ।
तरी मग शून्याचें घर रिघे । दर्शन तेंही ॥ ७९ ॥
एवं त्रिपुटी होतां क्षीण । सहज उरे ब्रह्म पूर्ण ।
ऐसें पावती निर्वाण । विचारें सर्व ॥ १६८० ॥
पावावया जाणें नलगे । आधींच आहे तें निजांगें ।
नामरूपाचीं जातां सोंगें । विषयादि ब्रह्म ॥ ८१ ॥
मनमात्र असे जोंवरी । विश्व हें दिसे तोंवरी ।
ते मनचि निमालें जरी । तरी हें ब्रह्मरूप ॥ ८२ ॥
हेंचि आतां श्लोकाआंत । बोलिजेतें गा निभ्रांत ।
सावधान असावें चित्त । एकाग्रभावें ॥ ८३ ॥


मनोमात्रमिदं सर्वं चिन्मनो ज्ञानमात्रकम् ।
अज्ञानभ्रम इत्याहुः विज्ञानं परमं पदम् ॥ ३८ ॥


विश्व हेंचि असतां मन । संकल्पहीन तेंचि ज्ञान ।
विकार तो भ्रम अज्ञान । विज्ञान तें परम पद ॥ ८४ ॥
देवदत्ता हीं नामरूपें । नसतां कल्पिलीं जगरूपें ।
हें अवघें जाण पडपें । एकल्या मनाचें ॥ ८५ ॥
होय नव्हे करी मन । त्यासी साह्य झाला अभिमान ।
तेणें जगद्‌रूप संपूर्ण । सत्यचि केलें ॥ ८६ ॥
ऐसा निश्चय बळावला । तेंचि चिंतूंही लागला ।
यास्तव येथें भास झाला । लोपोनि स्वरूप ॥ ८७ ॥
तस्मात् मनाचा अंकुर । यासी ओळखीं गा निर्धार ।
जो निर्विकारीं विकार । बळेंचि लावी ॥ ८८ ॥
ऐसें मन जोंवरी असे । तोंवरीच हें विश्व दिसे ।
त्या मनाचा अंकुर नासे । तरी लोपे नामरूप ॥ ८९ ॥
जेवीं सुषुप्तिमाजी मन । नसतां कोठें जगभान ।
तस्मात् ब्रह्म हें ओळखून । मनचि मोडावें ॥ १६९० ॥
मन हें कैसें मोडावें । म्हणसी ऐसें स्वभावें ।
स्फुरण चिद्‌रूपें पाहावें । संकल्पावीण ॥ ९१ ॥
होय नव्हे जें जें करी । इतुकेंचि मन हें विकारी ।
ब्रह्मचि ऐसा निश्चय धरी । तरीच मोडे हें मन ॥ ९२ ॥
ब्रह्मचि असे एकलें । होय नव्हे करणे गेलें ।
हेंचि जाणावें मन मेलें । संकल्प सांडितां ॥ ९३ ॥
मग चिन्मात्र उरे स्फुरण । नव्हे द्वैतरूप जगभान ।
तरी तयासी म्हणावें ज्ञान । मन नाम गेलें ॥ ९४ ॥
मन हें नांव आलें अंतरीं । जग नाम कल्पिलें बाहेरी ।
ऐसिया अज्ञानभ्रमपुरीं । वाहतचि गेले ॥ ९५ ॥
तस्मात् भ्रम हा सांडूनी । मीचि ब्रह्म सर्वपणीं ।
पाहसी ऐसें अनुदिनीं । तरी ज्ञान तेंहेंचि ॥ ९६ ॥
ऐसा निश्चय दृढ होतां । भेद अवघा मावळतां ।
ज्ञानस्फुरणही तत्त्वतां । गळे आपेंआप ॥ ९७ ॥
पुढें अखंड एकरस । परब्रह्मचि अविनाश ।
ज्ञाते बोलत असती त्यास । परमपद विज्ञान ॥ ९८ ॥
देवदत्ता तूं हें ऐसें । निश्चयें धरीं मानसें ।
नामरूपाचें सांडीं पिसें । जीवेशांसहित ॥ ९९ ॥
देवदत्तें हें ऐकोनी । पुसूं आदरिलें मनीं ।
जी जी ईश्वर सर्वज्ञपणीं मिथ्या कैसा ॥ १७०० ॥
ऐसें शंकरें ऐकिलें । देवदत्ता सावध वहिलें ।
तुझें मन मायेंत गुंतलें । भीड नुल्लंघिसी ॥ १ ॥
तरी आतां सावधान । श्लोकार्थीं घालावें मन ।
माया जग जीव ईशान । मिथ्याचि अवघे ॥ २ ॥


अज्ञानं चान्यथाज्ञानं मायामेतां वदंति ते ।
ईश्वरं मायिनं विद्यान्मायातीतं निरंजनम् ॥ ३९ ॥


अज्ञान आणि अन्यथाज्ञान । इतुकें मायेचें लक्षण ।
जाणिजे मायावी ईशान । निरंजन तया अतीत ॥ ३ ॥
ब्रह्म सच्चिदानंद नेणें । आत्माचि ब्रह्म न होणें ।
हीं अज्ञानाचीं लक्षणें । पाहें ओळखुनी ॥ ४ ॥
स्वरूपीं व्यर्थ कल्पी जग । जीव ईश्वराचें सोंग ।
हेंचि अंतरीं उमग । अन्यथाज्ञान ॥ ५ ॥
अन्यथाज्ञान आणि अज्ञान । यांसीच माया हें अभिधान ।
जयेचे स्वरूपाची खूण । स्वपुष्पापरी ॥ ६ ॥
या शब्दें हें इतुकें । भासताती नामरूपकें ।
तें नाहींच ऐसें कौतुकें । मा शब्देंचि बोले ॥ ७ ॥
ऐसी मायाच मायेतें । मिथ्यात्व साधी नामसंकेतें ।
नामेंवीण इचे रूपातें । ठावचि नाहीं ॥ ८ ॥
अज्ञान अन्यथा ज्ञानासी । आकार नसे या कार्यासी ।
कारणरूप मायाही तैसी । मिथ्याचि असे ॥ ९ ॥
तया मायेमाजी बिंबलें । ईश्वर त्यासी नाम आलें ।
सर्वज्ञत्वादि उमटले । धर्मही तेथें ॥ १७१० ॥
केवळ सुविद्या उपाधी । ज्ञानचि स्फुरे अनवधी ।
अज्ञान नातळेचि कधीं जीवा ऐसें ॥ ११ ॥
परी अन्व्हे वास्तविक । म्हणोनि बोलिजे मायिक ।
मायेसहित आवश्यक नाशचि आहे ॥ १२ ॥
ईशाचेनि सत्यपणें । जग जीवही सत्य होणें ।
सच्चिदादि ब्रह्मलक्षणें । प्रगट न होती ॥ १३ ॥
सर्पभान खरें असतां । रज्जुज्ञान न ये हाता ।
देवीं नामरूपें सत्य होतां । सच्चिदानंद कोठें ॥ १४ ॥
यास्तव ईश्वर हें नाम । निजरूपी अन्यथा भ्रम ।
या भ्रमासी अतीत परम । निरंजन आत्मा ॥ १५ ॥
मायेसी सत्यत्व असावें तरी प्रतिबिंब सत्य व्हावें ।
तस्मात् मिथ्यात्व ओळखावें । जीवाचेपरी ॥ १६ ॥
लेंकुरांचिया समाजा । जैसा रंक तैसा राजा ।
तेणें रीती भाव दुजा । नसेचि येथे ॥ १७ ॥
ईश्वरसी सत्व म्हाणसी । बळेचि कल्पिसी भेदासी ।
तरी अभेद समाधानासी । पावसी कैसा ॥ १८ ॥
हा सांख्याचा सिद्धांत । येणें लागू पाहे द्वैत ।
तरीं हें सांडीं गा दुर्मत । अभेदब्रह्म होई ॥ १९ ॥
नामरूप गेलिया । तूंचि अवघा शिष्यराया ।
तेथें भिन्न असे कोठोनियां । ईश्वर तुजहूनि ॥ १७२० ॥
नट जैसा आणी सोंग । केव्हां ब्राह्मण केव्हां मांग ।
परी उंच नीच हा भाग । नटासी कैंचा ॥ २१ ॥
तैसा जड जीव ईश्वर । हा तुझा अन्यथा प्रकार ।
उंच नीच ऐसा विकार । नसतां तूंचि सर्व ॥ २२ ॥
अगा ऐसें अभेदज्ञान । सांडूनि कल्पिसी भेदमान ।
तरी मन कैंचें समाधान । अवीट राहे ॥ २३ ॥
तरी आतां ऐसें पाहें । हें सर्वही मीच आहें ।
परा नामरूपचि न साहे । सर्वपणाचें ॥ २४ ॥
ऐसा परिपूर्ण अभंग । एकलाचि तूं निःसंग ।
अभेदभक्ती हे उमग । वेदांतसिद्ध ॥ २५ ॥
ऐसें समाधान दुजें । ज्ञ्~मेंवींअ कोठें लाहिजे ।
हें एक ज्ञानियाचि साजे । राजचिन्हें राजिया ॥ २६ ॥
ज्ञानाऐसें दुसरें नाहीं । परम सुगम ज्ञान पाहीं ।
पडिलें देहबुद्धिप्रवाहीं । तयांमात्र कठिण ॥ २७ ॥
ज्ञान हें पवित्र । ज्ञान हें परम स्वतंत्र ।
धन्य धन्य ते सत्पात्र । जे लाहती ज्ञाना ॥ २८ ॥
ऐसें ज्ञान हें सांडूणी । जे पडती अन्यसाधनीं ।
तयां हतदैवांची मनीं । खंती वाटे ॥ २९ ॥
ज्ञानेंवीण मोक्ष जोडे । हें कालत्रयीं न घडे ।
ऐसे असतांही वेडे । पडती अन्य साधनीं ॥ १७३० ॥
बहु बोलणें हें काय । केलें तितुकें व्यर्थ जाय ।
ज्ञानेंवीण दुजा उपाय । नाहींच नाहीं ॥ ३१ ॥
हेंचि आतां दृढ कीजे । भव हा वृष्टिरूपें बोलिजे ।
प्रबोधवायु न लाहिजे । तरी हा निमेना ॥ ३२ ॥


सदानंदे चिदाकाशे मायामेघस्तडिन्मनः ।
अहंता गर्जनं तत्र धारासारो हि यत्तमः ॥ ४० ॥
महामोहांधकारेऽस्मिन् देवो वर्षति लीलया ।
अस्या वृष्टेर्विरामाय प्रबोधैकसमीरणः ॥ ४१ ॥


चिदानण्ंद शुद्ध गगन । तेथें माया मेघ वीज मन ।
अहंता हे मेघगर्जन । अज्ञान अंधकार ॥ ३३ ॥
महामोह अंधारांत । लीलेनें देव वृष्टि करीत ।
प्रबोधवायु जरी प्राप्त । तरी हे वृष्टि वितुळे ॥ ३४ ॥
सच्चिदानंद ब्रह्म सधन । शुद्ध बुद्ध परिपूर्ण ।
शून्यावांचूनियां गगन । जें अखंड एकरस ॥ ३५ ॥
ऐसिया गा चिदाकाशीं । माया उद्‍भवे मेघाऐसी ।
परी विकार चिद्‌गगनासी । बोलोंचि नये ॥ ३६ ॥
मेघ गगनीं एकदेशी । विकाररूपें माया तैसी ।
जगवृष्टीचे उद्‌भवासी । जे कां कारण ॥ ३७ ॥
मेघांमाजी जें चमके । विद्युल्लता हें मन निकें ।
उद्‌भवूनियां असिकें । नासे तत्क्षणीं ॥ ३८ ॥
अहंता हे देहबुद्धीची । हेचि गर्जना मेघाची ।
उमसूं नेदी कांहींचि । सद्‌भुद्दिविचार ॥ ३९ ॥
ऐसिया मेघमंडपीं । अज्ञानतमाची झांपी ।
गडद पडली तया मापी । ऐसा कवण ॥ १७४० ॥
महामोह खडतरला । अज्ञानतमी मिसळला ।
तेणें अंधकार दाटला । निबिडपणें ॥ ४१ ॥
ऐसा दाटला अंधार । वृष्टि करिताहे ईश्वर ।
अथवा देवशब्दें होणार । कर्म जीवाचें ॥ ४२ ॥
सुखदुःखद्वंद्वें अपार । पर्जन्यधारा पडती सैर ।
पापपुण्याचा महापूर । प्रवाह चालिला ॥ ४३ ॥
मेघें आकाश झांकोळे । वरी अज्ञान अंवसेचें काळें ।
मग असतांही ज्ञान डोळे । न दिसे कांहीं ॥ ४४ ॥
मग वीज चमके जेव्हां । गपगपां डोळे झंकती तेव्हां ।
झांपडी पडे स्वानुभवा । बहिर्मुखत्वें ॥ ४५ ॥
मनाचा अंकुर जैं मोडे । पूर्व रीतीं गडद पडे ।
तेव्हां कैंचा दृष्टी आतुडे । ज्ञानप्रकाश ॥ ४६ ॥
अहंकार हा खवळला । मी मी म्हणतचि उठिला ।
ऐकतां तया गर्जनेला । कानटाळी ॥ ४७ ॥
अहंतेचे गर्जनेपुढें । जीव भ्रमून झाले वेडे ।
सच्छास्त्र शब्द कानीं न पडे । सहसा कांहीं ॥ ४८ ॥
वरी सुखदुःखांच्या धारा । रिचवताती एकसरा ।
नाहीं विश्रांतीसी थारा । निजसुखा मुकले ॥ ४९ ॥
खालीं पाणी वरती गारा । सुखदुःखें आदळती शिरा ।
कामज्वरें कांपती थरथरां । वायु चढे मस्तकीं ॥ १७५० ॥
एक प्रवाहीं वाहती । एक खडकीं अडकती ।
एक शाखा अवलंबिती । प्रपंचवृक्षाच्या ॥ ५१ ॥
स्त्रीपुत्रादि सर्व सुसरी । ओढिती बळें मोहविवरीं ।
गळा येऊनि मिठी मारी । ममताधामीण ॥ ५२ ॥
एक पाताळविवरीं दडाली । क्रोधाजगर तेथें आले ।
मदमत्सरींही वेष्टिले । सर्पादिकीं ॥ ५३ ॥
एक चढे स्वर्गादिशिखरीं । तेथें लोभ व्याघ्र महाभारी ।
सुखदुःखें आदळती शिरीं । थारा न मिळे ॥ ५४ ॥
एवं ऐसी दुर्धर वृष्टी । अडकती वाहती होती कष्टी ।
घाबरून कंठी घालिती मिठी । एकमेकांच्या ॥ ५५ ॥
प्रवाहगतीनें एकत्र होती । तया माझें माझें म्हणती ।
विघड होतां बोंबलती । माझें गेलें म्हणोनी ॥ ५६ ॥
ऐसी वृष्टी महाथोर । अखंड वर्षे अपार ।
येथून सोडविता नर । कोणी आढळेना ॥ ५७ ॥
अवघी पहापूरीं पडिले । कोण कोणासी काढी वहिलें ।
सुखदुःखेंचि भांबावले । अज्ञानांधारीं ॥ ५८ ॥
या वृष्तीचे विरामासी । मूर्ख प्रवर्तले साधनासी ।
नागवे होऊन पोळविती त्यासी । तैसें वरिवरी भजन ॥ ५९ ॥
खालीं पादरक्षा ठेविती । वरवंटा तेथें बैसविती ।
दुसरी पादरक्षा गळती । बांधिती वरी ॥ १७६० ॥
तेवीं प्रतिमेच्या पूजनें । वृष्टी हे न राहे तेणें ।
जप आणि अनुष्ठानें । परी हे निमेना ॥ ६१ ॥
एक महाहटेंकरून । बळें बांधिती पर्जन्य ।
एक करिती दान यज्ञ । तेणें अधिक वाढे ॥ ६२ ॥
एक पडिले नानामतीं । जेवीं वोसणामाजी शिरती ।
न लागती गारा ऐसें म्हणती । आम्ही निर्भय ॥ ६३ ॥
एकासी योगशास्त्र डेरा । म्हणती लाधला आम्हां थारा ।
बळें घुसती त्यामाझारा । म्हणती वृष्टी कोठें ॥ ६४ ॥
सांख्यभोपळा एकासी । लाधला तेणें सुख मानसीं ।
पोंहती बांधून कमरेसी । प्रवाहामाजी ॥ ६५ ॥
द्वैतभक्तीची फुतकी नाव । लाहतां मानिती आम्ही सएऐव ।
धन्य आमुचा ऋणी देव । दृढभाव आम्हांसी ॥ ६६ ॥
परी तेणें वृष्टी निमेना । अभेदज्ञान हें लाहेना ।
असो ऐसें अन्यसाधना । काजचि नको ॥ ६७ ॥
प्रबोधवायु जरी सुटे । तरीच वृष्टी वितळून फाटे ।
प्रवाहरूप पाणी आटे । तत्क्षणींचि ॥ ६८ ॥
सुटतां बोधवायूची झुळी । मेघमाया कांपे चळीं ।
अहंतेसी दांतखिळी । पडे तेव्हां ॥ ६८ ॥
मग राहतांचि गर्जना । उमसूं नेदी चपळ मना ।
महावातें झडपितां जाणा । मायामेघ वितुळे पैं ॥ १७७० ॥
माया निमतांचि कारण । वृष्टिकार्य उरे कोठून ।
सुखदुःखादि पापपुण्यें । एकसरां निमालीं ॥ ७१ ॥
आपण आकाश चैतन्यघन । द्वैतरहित या नांव ज्ञान ।
हाचि महाप्रभंजन । प्रलयकाळींचा ॥ ७२ ॥
स्वप्रकाश प्रगटतां तरणी । अज्ञानतमाची सकार्य हानी ।
झाली भेदाची धूळधाणी । जीवेशांसह ॥ ७३ ॥
बंध मोक्ष दोन्ही निमाले । सुखदुःख त्यांसवें गेलें ।
मग केवळ निजसुख उरलें । निर्भय समाधान ॥ ७४ ॥
एवं ऐसा बोध अनिळ । मायामेघादिकांचा काळ ।
वृष्टिविरामार्थ केवळ । हाचि एक ॥ ७५ ॥
यासी साह्य कोणी नलगे । एकलाचि वीर एकांगें ।
सिंहापुढें जैसीं कागें । तेवीं अन्य साधनें ॥ ७६ ॥
असो तुजला देवदत्ता । बोध हा उपदेशिला आतां ।
जेणें द्वैतभेदाची वार्ता । नुरे किमपि ॥ ७७ ॥
ऐसें अभेदरूप ज्ञान । निःसंशय करीं जतन ।
नामरूपावरी शून्य । घालीं हातें ॥ ७८ ॥
जग जीव आणि ईश्वरू । जितुका नामाचा प्रकारू ।
सत्यत्वें भेद नको करूं । निर्विकारू तूं आत्मा ॥ ७९ ॥
तूचि एक ब्रह्म अद्वय । हेंचि समाधान निर्भय ।
आतां सांडीं गा संशय । आज्ञा आमुची ॥ १७८० ॥
ऐसी ऐकतां अमृतवाणी । देवदत्ता विस्मय मनीं ।
सद्‍गद होऊनी लागे चरणीं । म्हणे धन्य गुरुवर्या ॥ ८१ ॥
धन्य धन्य वेदांतसार । धन्य धन्य हा सद्‌विचार ।
धन्य धन्य आमुचें भाग्य थोर । जें लाधलो महासुखा ॥ ८२ ॥
मीच एक आत्माराम । कोठें जीवशिवादि नाम ।
मायेचें मडें जालें भस्म । तुमचिये कृपें ॥ ८३ ॥
आतां भेदचि नाहीं उरला । निःसंशय प्रत्यय बाणला ।
अवघा ब्रह्मगोळ दाटला । माझिये पुष्टपणें ॥ ८४ ॥
एवढा पूर्ण मी असतां । भ्रमीं गुंतलों नेणतां ।
व्यर्थ मृगजळीं बुडतां । काढिलें स्वामी ॥ ८५ ॥
निजसुखराज्यासी अंतरलों । सुखदुःख भीक मागों गेलों ।
तों तुम्ही पुन्हां बैसविलो । साम्राज्यसिंहासनीं ॥ ८६ ॥
आतां मुखें करूं स्तवन । तरी वाच्य वाचक नव्हे दोन ।
भेदचि जासी खाऊन । तरी स्तवूं कैसा ॥ ८७ ॥
तुज जरी नमूं जावें । तरे चरण मस्तक भेद नव्हे ।
वंद्यवंदकाच्या नांवें । घातलें शून्य ॥ ८८ ॥
जरी आतां मनें स्मरूं । तरी मनासी भेद केवीं करूं ।
बाह्यांतरीं तूं सद्‌गुरु । आतां भिन्न मी कैंचा ॥ ८९ ॥
एवं स्तुति स्मरण वंदन । तुझ्या ठायीं न चले जाण ।
जेथें भेदें वाहिली आण । वचारासहित ॥ १७९० ॥
असो ऐसा तूं भेदरहित । निर्विकार सदोदित ।
मजसी मेळविलें आपणांत । निजकृपाकटक्षें ॥ ९१ ॥
तरंग मेळविला जीवनीं । कीं स्फुल्लिंग मिळे अग्नीं ।
तेवीं मी एक कृपापाणी । मिळालों स्वरूपीं ॥ ९२ ॥
ऐसा कोण असे दाता । दासालागीं निजपद देता ।
असो तूंचि तूं गाअनंता । उपमेरहित ॥ ९३ ॥
शकंरें ऐसें जाणितलें । त्यासी सामाधान बाणलें ।
धांवोनि पोटासीं धरिलें । देवदत्तासी ॥ ९४ ॥
वत्सालागीं धेनु जैसी । गुरुमाय कळवळली तैसी ।
चाटूं पाहे सच्छिष्यासी । सप्रेमभरें ॥ ९५ ॥
हस्तें थापटिली पाठी । प्रेमें धरिली हनुवटी ।
गुरुमाय कृपाळु मोठी । मुखचि चुंबीतसे ॥ ९६ ॥
म्हणती धन्य गा शिष्यराया । देशधडी केली माया ।
पावलासी गा अभया । निःसंदेह ॥ ९७ ॥
हेंचि बापा स्वानुभवज्ञान । हेंचि अपरोक्ष समाधान ।
हेंचि जीवन्मुक्ताची खूण । बाणली तुज ॥ ९८ ॥
हेचि बापा परम तृप्ती । जयेसी निरंकुशा म्हणती ।
ऐसीच दृढ असो तुजप्रती । आमुच्या आशीर्वादें ॥ ९९ ॥
आणिकही आमुचें चित्त । कांहीं बोलावें वांच्छित ।
तृप्तीसी तृप्त करूं पाहात । तरी अवधान देई ॥ १८०० ॥
मागें आम्ही इतुकें । ज्ञानविज्ञानाची रूपकें ।
करूनि बोलिलों कौतुकें । तुजला सप्रतीत ॥ १ ॥
तयाचाचि पुन्हां मागुती । अनुवाद कीजे गा निश्चितीं ।
ज्ञानविज्ञानाची रीती । निवडूनि दावूं ॥ २ ॥
तरी आतां सावध व्हावें । ऐकलेंचि पुन्हां ऐकावें ।
आणि ध्वनितार्थें समजावें । सहजस्थितीसी ॥ ३ ॥
येथूनियां सात श्लोक । ज्ञानविज्ञानाचें रूपक ।
तुझिये तृप्तीवरी अधिक । उपराळ कीजे ॥ ४ ॥


ज्ञानं दृग्‍दृश्ययोर्भानं विज्ञानं दृश्यशून्यता ।
एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन ॥ ४२ ॥


दृश्य द्रष्टा भान तें ज्ञान । दृश्यशून्य तें विज्ञान ।
एक अद्वय ब्रह्म पूर्ण । अन्य किंचित् असेना ॥ ५ ॥
दृश्य मिथ्या हें पाहसी । द्रष्टा द्रष्टेपणें जाणसी ।
ज्ञान ऐसें म्हणावें यासी । सत्य मिथ्या निवडितां ॥ ६ ॥
मिथ्या नव्हें तें उत्पन्न । जरी आहत असती नयन ।
नाहींच तया नामाभिधान । सत्य मिथ्या केवीं ॥ ७ ॥
एवं दृश्यावरी शून्य । सत्य मिथ्या नव्हे भान ।
इकडे द्रष्टाही आपण । द्रष्टेपणा सांडी ॥ ८ ॥
दृश्य द्रष्टा गेलियावरी । जें काय उरे निर्विकारी ।
तेंचि विज्ञान निर्धारीं । निवृत्तिरूप ॥ ९ ॥
अन्य येथें कांहीं नसे । आहे तें ब्रह्मचि असे ।
निश्चयें श्रुति बोलतसे । अद्वय ब्रह्म ॥ १८१० ॥
एवं ऐसें स्फूर्तिवीण । अभेदब्रह्मचि सधन ।
याचि नांवें गा विज्ञान । दृढ अपरोक्ष ॥ ११ ॥
हेंचि आतां अन्यरीतीं । विज्ञान बोलिजे तुजप्रती ।
पूर्वनिरूपण मागुती । श्लोकीं अनुवादूं ॥ १२ ॥


क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं तज्ज्ञानं ज्ञानमुच्यते ।
विज्ञानं चोभयोरैक्यं क्षेत्रज्ञपरमात्मनोः ॥ ४३ ॥


क्षेत क्षेत्रज्ञ जाणिजे । ययासी ज्ञान बोलिजे ।
विज्ञानें दोही ऐक्य कीजे । क्षेत्रज्ञ परमात्मा ॥ १३ ॥
उपदेशक्रमीं देवदत्ता । त्वंपदशोधनीं तत्वतां ।
निवडिली क्षेत्रक्षेत्रज्ञता । वाच्यलक्षण ॥ १४ ॥
वाच्य जें कां देहत्रय । पंचकोशादि समुदाय ।
आणि जीव जो अभिमानी होय । तयासहित हें क्षेत्र ॥ १५ ॥
असज्जडदुःखात्म । अनात्म्याचें हें रूपक ।
तें तें जाण आवश्यक । क्षेत्ररूपें ॥ १६ ॥
लक्ष्य साक्षी प्रत्यगात्मा । कूटस्थ निर्विकारी महात्मा ।
अधिष्ठान या रूपनामा । अस्तिभातिप्रियत्वें ॥ १७ ॥
निर्विकारत्वें सर्वां जाणे । उगेंचि प्रकाशी सामान्यें ।
तोचि जाणिजे क्षेत्रन्य । अंतर्यामी ॥ १८ ॥
एवं क्षेत्रक्षेत्रज्ञ दोन्ही । जाणत असे निवडूनी ।
क्षेत्र पाहे परोक्षपणीं । क्षेत्रज्ञ अपरोक्ष ॥ १९ ॥
ऐसें निवडून जाणिलें । त्यासी ज्ञान हें नाम आलें ।
दृश्य द्रष्टा विभागले । पूर्वरीतीं येथें पैं ॥ १८२० ॥
आतां विज्ञान तें कैसें । बोलिजे तें कांहींसें ।
ब्रह्मा आत्मया भेद नसे । अखंड एक ॥ २१ ॥
त्वंपदावरी तत्पदींचें । वाच्य टाकूनि ईशाचें ।
शुद्ध ज्ञान जें लक्ष्याचें । निवडिलें मागें ॥ २२ ॥
उभयांचें लक्ष्य शुद्ध । आत्मा परमात्मा अभेद ।
अंगेंचि जो सच्चिदानंद । ध्येयध्यानेंवीण ॥ २३ ॥
त्यासीच नांव विज्ञान । जेथें द्वैताद्वैत नव्हे भान ।
हेंचि पुढेंही निरूपण । बोलिजेल श्लोकीं ॥ २४ ॥


परोक्षं शास्त्रजं ज्ञानं विज्ञानं चात्मदर्शनम् ।
आत्मनो ब्रह्मणः सम्यक् उपाधिद्वयवर्जितम् ॥ ४४ ॥


परोक्ष शास्त्रजन्य तें ज्ञान । आत्मदर्शन तें विज्ञान ।
आत्मा ब्रह्म हें अभिन्न । माया अविद्या निसरतां ॥ २५ ॥
गुरुमुखें वेदांतरीती । गुरु शास्त्र दोनी प्रतीई ।
श्रवणमातें अर्थानुभूती । होय तें ज्ञान ॥ २६ ॥
ब्रह्म प्रत्यगात्मा अद्वय । माया अविद्या उपाधिद्वय ।
निरसून आत्मत्वें प्रत्यय । बाणतां विज्ञान ॥ २७ ॥
शात्रीं अभेद प्रतिपादन । शास्त्रप्रतीति हे जाण ।
गुरुमुखेंही तेंचि वचन । ऐकतां ज्ञान विश्वासें ॥ २८ ॥
ऐसें परोक्षें जाणिकें । आत्मा ब्रह्म अभेद कळलें ।
यासीही ज्ञान असे बोलिलें । गुरुशास्त्र प्रतीती ॥ २९ ॥
तेंचि अपरोक्षें बाणतां । विचारें अंगें ब्रह्म होतां ।
आत्मप्रतीती तत्त्वतां । तेंचि आपणा आपण ॥ १८३० ॥
माया अविद्या उपाधी । उत्पन्नचि नव्हे कधीं ।
ऐसी निश्चयें दृढबुद्धी । या नांव विज्ञान ॥ ३१ ॥
अथवा परोक्षे ध्येध्यान । तेंचि जाणावें गा ज्ञान ।
त्रिपुटीरहित समाधान । विज्ञान तेंचि ॥ ३२ ॥
हेंचि आतां मागुती । ज्ञानविज्ञानाची स्थिती ।
बोलिजे यथानिगुतीं । पूर्वानुवादें ॥ ३३ ॥


त्वमर्थो विषयज्ञानं विज्ञानं तत्पदाश्रयम् ।
पदयोरैक्यबोधस्तु ज्ञानविज्ञानसंज्ञकम् ॥ ४५ ॥


मी आत्मा हेंचि ज्ञान । अहंब्रह्म तें विज्ञान ।
उभय ऐक्य समाधान । ज्ञानविज्ञान दोन्ही ॥ ३४ ॥
वाच्य सांडूनि त्वंपदींचें । अपरोक्षें आत्मज्ञान साचें ।
हा मी आत्मा या विषयाचें । नाम असे ज्ञान ॥ ३५ ॥
या सर्व जगाचा हेतु । सच्चिदानंद अनंतु ।
अपरोक्षें तया जो जाणतु । या नांव विज्ञान ॥ ३६ ॥
त्वंपद तत्पद लक्ष्य दोन्ही । अभेदें जाणतसे ज्ञानी ।
तयासी संज्ञा हे मानी । ज्ञानविज्ञानरूप ॥ ३७ ॥
एवं आत्मज्ञान तेंचि ज्ञान । ब्रह्मज्ञान तें विज्ञान ।
उभयात्मक संज्ञा पूर्ण । ज्ञानविज्ञान ऐसी ॥ ३८ ॥
आणीकही ज्ञानविज्ञानाचें । रूपक जाणावें साचें ।
निरूपण ऐकें श्लोकाचें । सावधपणें ॥ ३९ ॥


आत्मानात्मविवेकस्तु ज्ञानमाहुर्मनीषिणः ।
अज्ञानं चान्यथा लोके विज्ञानं तन्मयं जगत् ॥ ४६ ॥


आत्मानात्मविवेकाप्रती । ज्ञान ऐसें ज्ञाते बोलती ।
अज्ञान अन्यथालोकरीती । विज्ञान तें सर्व ब्रह्म ॥ १८४० ॥
असत् जड दुःखानात्मा । अस्तिभातिप्रियरूप आत्मा ।
विवेकें निवडी जो महात्मा । ज्ञाते बोलती हें ज्ञान ॥ ४१ ॥
सत्य मिथ्या एक केलें । एकासी एकचि भाविलें ।
लोकरीतीं जे भुलले । हेंचि अज्ञान ॥ ४२ ॥
रज्जूवरी सर्प नाहीं । जगासी रूप नसे कांहीं ।
ब्रह्मचि जाणें सर्वदाही । दिसे भासे जें ॥ ४३ ॥
सर्व आपणचि ऐसें वाटे । आपाणामामध्यें सर्व उमटे ।
हेंचि विज्ञान गोमटें । जाणिजे तुवां ॥ ४४ ॥
ऐसी ज्ञानविज्ञानाची स्थिती । सांगितली बहुधा रीतीं ।
येथें कोणी मंदमती । भांबावेल ॥ ४५ ॥
कीं ज्ञान आणि विज्ञानाचा । निर्धार एक नव्हे साचा ।
यास्तव पुढील श्लोकींचा । अर्थ निश्चयरूप ॥ ४६ ॥


अन्वयव्यतिरेकाभ्यां सर्वत्रैकं प्रपश्यति ।
यत्तु तत् वृत्तिजं ज्ञानं विज्ञानं ज्ञानमात्रकम् ॥ ४७ ॥


अन्वय आणि व्यतिरेकानें । सर्वत्रीं एकचि पाहणें ।
ज्ञानातें वृत्तीसीं स्फुरणें । विज्ञान तें ज्ञानमात्र ॥ ४७ ॥
कारणरूपें एक हेम । कार्यासी अलंकार हें नाम ।
तेवीं कार्य हाचि जगद्‌भ्रम । ब्रह्म तेंचि कारण ॥ ४८ ॥
सुवर्णावीण अलंकार । कैंचे होती नानाप्रकार ।
तेवीं ब्रह्मरूपावीण आकार । जगासी कईम्चा ॥ ४९ ॥
अलंकारीं सुवर्ण असे । जगामाजीही ब्रह्म तैसें ।
हें अन्वयाचें रूप ऐसें । कार्यामध्यें कारण ॥ १८५० ॥
सुवर्णीं नसती अलंकार । ब्रह्मीं जगाचा नसे विकार ।
हा व्यतिरेकाचा प्रकार । जे कारणीं कार्य नाहीं ॥ ५१ ॥
ऐसें अन्वयव्यतिरेकें । करून पाहावें विवेकें ।
जे सर्वही नामरूपकें । एकब्रह्म चिन्मात्र ॥ ५२ ॥
सोन्यावीण् अलंकार नव्हे । मग तें सुवर्ण कां न म्हणावें ।
अलंकार असतांही पाहावें । सुवर्णचि ॥ ५३ ॥
तेवीं या सर्व जगासी । वेगळें रूपचि नसे यासी ।
तरी हें ब्रह्मचि अविनाशी । कां न म्हणाएं ॥ ५४ ॥
कारणावीण कार्य कांहीं । भिन्नत्वें रूप तया नाहीं ।
तरी हें कारणचि निःसंदेहीं । स्वानुभवें पाहावें ॥ ५५ ॥
ऐसें सर्वत्र ब्रह्म एक । सप्रतीत निश्चयात्मक ।
तया प्रबोधाचें रूपक । द्विविध असे ॥ ५६ ॥
सर्वदा वृत्तीचें स्फुरण । जें सर्वही ब्रह्म आपण ।
वृत्त्यात्मक जें कां लक्षण । ज्ञान तें या नांवें ॥ ५७ ॥
तेही वृत्ति जेथें मुरे । स्फुरण स्फुरणीय थारे ।
सर्व एक दोन्ही विसरे । हें निवृत्तिरूप विज्ञान ॥ ५८ ॥
मागें बहुत केला प्रकार । परी इतुकेचि याचा निर्धार ।
ज्ञान तें सवृत्तिक विचार । ज्ञप्तिमात्र विज्ञान ॥ ५९ ॥
हेंचि आणिक एका श्लोकें । ज्ञानविज्ञान निश्चयात्मकें ।
आणि उभयाचें पळही निकें । बोलिजे ऐकावें ॥ १८६० ॥


अज्ञानध्वंसकं ज्ञानं विज्ञानं चोभयात्मकम् ।
ज्ञानविज्ञाननिष्ठेयं तत् सत् ब्रह्मणि चार्पणम् ॥ ४८ ॥


अज्ञान नाशितें ज्ञान । विज्ञान दोहींसी अधिष्ठान ।
हे ज्ञानविज्ञान निष्ठा अर्पण । एक परब्रह्मीं ॥ ६१ ॥
आपण ब्रह्मही न कळे । हींचि अज्ञानाचीं पडळें ।
मी ब्रह्म ज्या क्षणीं निवळे । या नांव ज्ञान ॥ ६२ ॥
सूर्य‍उदय होतांक्षणीं । अंधार नासे निपटूनी ।
तेवीं ज्ञान प्रगटतां मनीं । अज्ञान सर्व जळे ॥ ६३ ॥
मी ब्रह्मप्रतीति लाहे । तरी मी कोण कोठें राहें ।
ऐसें अज्ञानध्वांसक पाहें । ज्ञान हेंचि निश्चयें ॥ ६४ ॥
अज्ञान जातां ज्ञानवृत्ती । गळून विज्ञानरूप होती ।
जेवीं कापुरासवें समाप्ती । महातेजीं अग्नीची ॥ ६५ ॥
पुढें निर्विकार परब्रह्म । स्फूर्तिरहित आत्माराम ।
अज्ञान ज्ञानाचा उपरम । निःशेष होय ॥ ६६ ॥
ध्येय ध्यान सर्व गळालें । द्वैताद्वैत भान गेलें ।
नुसते परब्रह्म उरलें । हेंचि विज्ञान ॥ ६७ ॥
ज्ञानाज्ञानाच्या स्फूर्ती । जया अधिष्ठानीं उमटती ।
तेथें विरोध नसे रती । ज्ञानाज्ञानाचा ॥ ६८ ॥
प्रकाश आणि अंधकारा । दोहींसीही गगन थारा ।
तेवीं ज्ञानाज्ञानविकारा । अधिष्ठान ब्रह्म ॥ ६९ ॥
त्यासीच नांव विज्ञान । ज्ञानाज्ञानासी अधिष्ठान ।
एव उभयात्मकाची खूण । बोलिली श्लोकीं ॥ १८७० अ॥
तस्मात् जाणणें तेंचि ज्ञान । विज्ञान तेंचि ब्रह्म अभिन्न ।
सातां श्लोकींही निरूपण । परी निश्चय इतुका ॥ ७१ ॥
ज्ञानविज्ञाननिष्ठा ऐसी । मेळवीतसे अखंड रसीं ।
स्वरूपावीण साधकासी । उरोंचि नेदी ॥ ७२ ॥
तत् तेंचि सत् परिपूर्ण । ब्रह्मचि एक दंडायमान ।
याचि नांवें गा अर्पण । जे भिन्न नाम नुरे ॥ ७३ ॥
अज्ञान ज्ञानें जळालें ।ज्ञान विज्ञानीं मिळालें ।
मग विज्ञान नामही उरलें । नसेचि भिन्न ॥ ७४ ॥
शंकर म्हणती शिष्यराया । इतुकें हें बोलिले कासया ।
याचें प्रयोजन लवलाह्या । सांगूं तुजप्रती ॥ ७५ ॥
ऐसी ज्ञानविज्ञानस्थिती । दृढ निश्चय जयाच्या मती ।
तया कोणेही अवस्थेप्रती । उत्थानचि नव्हे ॥ ७६ ॥
मनादि इंद्रियव्यापारें । होत असती पूर्व संस्कारें ।
ज्ञाता मानी जरी विकारें । उत्थान तें या नांव ॥ ७७ ॥
मृगजळापरी वृत्ति उठे । व्यवहारून तत्काळ आटे ।
सत्यमिथ्या विकार नुठे । हे सहज समाधि ॥ ७८ ॥
ध्यानीं किंवा व्यवहारीं । किंवा सुषुप्तिमाझारीं ।
वृत्तीची असतां भलती परी । तरी निश्चय एकरूप ॥ ७९ ॥
तरंग उठतांही पाणी । निमतांही जीवन जीवनीं ।
तैसी वृत्तीची उभवणी । होतां जातां आपण ॥ १८८० ॥
समाधीमाजी जें समाधान । तोचि निश्चय व्यवहारीं पूर्ण ।
जागृति सुषुप्ति कीं स्वप्न । एकरूप सर्वदा ॥ ८१ ॥
वृत्तीचा विकारचि वेगळा । स्वरूपावीण न दिसे डोळां ।
भेदचि गिळिला सगळा । नामरूपाचा ॥ ८२ ॥
संशयचि निपटून गेला । देखेना उद्‍भव लयाला ।
वृत्तिरहित संचला । आपुला आपण ॥ ८३ ॥
ऐसा निश्चयचि जयासी । समाधि उत्थान नसे त्यासी ।
स्वलीला वर्तणूक जैसी । होय तोचि विधि ॥ ८४ ॥
एणें अमुक करावें । आणि अमुक न करावें ।
ऐसा नेमचि न संभवे । इतरांऐसा ॥ ८५ ॥
त्याचा विषय तो एकांत । व्यवहारतांही निवांत ।
मुखें जें जें बडबडत । तेंचि मौन त्याचें ॥ ८६ ॥
सहजीं सहज जें होतां । करूं न करूं नसे वार्ता ।
चांगलें वाईट ही चिंता । किमपि नसे ॥ ८७ ॥
ऐसी हे सहजस्थिती । मगें निरूपिली तुजप्रती ।
सदाचरणीं भोजनसंकेतीं । जें प्राप्त तें भोगितो ॥ ८८ ॥
तेणें रीईं समजावें । आतां कासया विस्तारावें ।
परी मुख्य वर्म कळावें । सहजस्थितीचें ॥ ८९ ॥
अगा जो ब्रह्मचि अंगें । तयासी वकृत्वही नलगे ।
हीं वाउगींच सोंगें । नामरूपाचीं ॥ १८९० ॥
बंधचि मुळीं नसतां । तेथें कैंची असे मुक्तता ।
जेथें ज्ञातृत्वाची वार्ता । नसे किमति ॥ ९१ ॥
जीवन्मुक्ति विदेहस्थिती । सहजस्थिती नित्यमुक्ती ।
ह्याही अवधिया सांगाती । सोपाधिकाच्या ॥ ९२ ॥
असे ऐसा जो ज्ञानी पूर्ण । निजांगें ब्रह्म अभिन्न ।
त्यासी आपुला म्हणे कोण । अविषय सर्वांचा ॥ ९३ ॥
त्यासी कोणीही जाणेना । तयासी कोणी देखेना ।
तयासी अवलंबूंही शकेना । आपुलें म्हणोनी ॥ ९४ ॥
ज्ञाता नव्हे मातापित्यांचा । ज्ञाता नव्हे पतिव्रतेचा ।
ज्ञाता नव्हेचि पुत्राचा । आपुला म्हणावया ॥ ९५ ॥
बंधु स्वजन आप्ताचा ।मित्र सुहृद कुलगुरूचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ ९६ ॥
देशाचा कीं ग्रामाचा । किंवा सार्वभौम राजाचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ ९७ ॥
जाति वर्ण आश्रमाचा । कुळगोत्र सपिंडाचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ ९८ ॥
सुखाचा किंवा दुःखाचा । पापाचा किंवा पुण्याचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ ९९ ॥
कर्म अकर्म निष्कर्माचा । धर्म आणि अधर्माचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ १९०० ॥
बंधाचा कीं मोक्षाचा । समाधि कीं उत्थानाचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ १ ॥
ऊर्ध्व कीं अधोगतीचा । जन्माचा कीं मृत्यूचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ २ ॥
भूतांचा कीं गुणांचा । देहाचा कीं प्राणाचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ ३ ॥
इंद्रियांचा कीं मनाचा । अहंकाराचा कीं बुद्धीचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ ४ ॥
कामादि दुर्जनांचा । कीं विवेकादि सज्जनांचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ ५ ॥
इहलोक परलोकींचा । देव ऋषि पितरांचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ ६ ॥
ब्रह्माआदि विष्णूचा । रुद्र किंवा ईश्वरचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ ७ ॥
शास्त्रविचार वेदाचा । विधि किंवा निषेधाचा ।
ज्ञाता नव्हेचि कोणाचा । आपुला म्हणावया ॥ ८ ॥
असो हें किती बोलावें । ज्ञाता कोणाचाचि नव्हे ।
जेथें स्वानुभवही न संभवे । वेगळा उमसूं ॥ ९ ॥
सर्वांमाजी तरी एकला । परी नातळेचि नामरूपाला ।
तेथें अमुक हें म्हणावयाला । लाहे कवण ॥ १९१० ॥
तेथें कैंची स्थिती गती । तेथें कैंची विचारतीती ।
तेथें बापिडी हे मुक्ती । नाम केवीं मिरवी ॥ ११ ॥
देवदत्ता ऐसी स्थिती । आकळीं गा हे दृढमती ।
जेथें समाधि उत्थानभीती । अंग मिरवावया ॥ १२ ॥
आणिक तुज खूण । अंतरींची सांगूं पूर्ण ।
तेही दृढ करीं जतन । अंतर्यामीं ॥ १३ ॥
ब्रह्मज्ञान उपजे जेव्हां । ऐसी स्थिति लाहे तेव्हां ।
ऐसें नव्हे पाहें अनुभवा । पूर्वींच आत्मा अलिप्त ॥ १४ ॥
आकाश जैसें घटांतरीं । न लिंपेचि त्या त्या विकारीं ।
तैसा आत्मा चराचरीं । निर्विकाररूपें ॥ १५ ॥
आत्मा अज्ञानकाळीं जरी । अज्ञानें होय विकारी ।
तरी ज्ञान होतां निर्विकारी । होय कैसा ॥ १६ ॥
तस्मात् ज्ञानीं कीं अज्ञानी । एकरूप आती दोनी ।
कीं आत्माचि एक पूर्णपणीं । सर्वांमाजी सारिखा ॥ १७ ॥
या श्लोकीं हेंचि आतां । आत्म्याची कैसी अलिप्तता ।
इतुकें सांगून तत्त्वतां वकृत्व आटोपूं ॥ १८ ॥


भोक्ता सत्त्वगुणः शुद्धो भोगानां साधनं रजः ।
भोग्यं तमोगुणं प्राहुः आत्मा चैषां प्रकाशकः ॥ ४९ ॥


भोक्ता ज्ञानशक्ति सत्वगुण । क्रियाशक्ति रजसाधन ।
भोग्य द्रव्यशक्ति तमोगुण । आत्मा यासी प्रकाशक ॥ १९ ॥
अंतःकरणाच्या वृत्ति दोन । एक बुद्धि एक मन ।
क्रियारहित शुद्ध ज्ञान । हेचि ज्ञानशक्ति ॥ १९२० ॥
सत्त्वगुण म्हणावें यासी । हाचि भोक्ता विषयासी ।
आणि साह्य असे स्फूर्तिसी । प्रतिबिंब जीव तया ॥ २१ ॥
एवं प्रतिबिंब आणि वृत्ती । दोन्ही एकत्र मिळती ।
सुखदुःख भोग निवडती । यास्तव भोक्ता नांव ॥ २२ ॥
इंद्रिय प्राण हीं उपकरणें । या द्वारें वृत्ति येंएं जाणें ।
हे क्रियाशक्ति ग्रहणसाधनें । रजोगुणात्मक ॥ २३ ॥
शब्दस्पर्शादि विषय । तमोगुण भोग्य होय ।
द्रव्यशक्तीचा समुदाय । येणें रीतीं जाणिजे ॥ २४ ॥
वृत्ति प्राणाच्या आधारें । निघोनि इंद्रियांच्या द्वारें ।
विषय घेतां एकसरें । सुखदुःखें होती ॥ २५ ॥
एवं वृत्ति इंद्रिय विषय । हाचि त्रिगुण समुदाय ।
आत्मा यासी प्रकाशमय । साक्षिमात्र ॥ २६ ॥
वृत्ति उठतां जाणावें । इंद्रियांसी प्रकाशावें ।
विषय तेही अवलोकावे । स्वप्र्काशत्वें ॥ २७ ॥
जैसा ठाणबाईचा दिवा । तेणें प्रकाशमात्र करावा ।
घरींचा चोर कीं परावा । नेणावा सहसा ॥ २८ ॥
तेवीं आत्मा ज्ञानरूपक । सामान्यत्वें प्रकाशक ।
परी सुखदुःखाचें कौतुक । साक्षीही नाहीं ॥ २९ ॥
केवळ साक्षीच अलिप्त नसे । प्रतिबिंबाही भोग न दिसे ।
हें दृष्टांतमुखेंचि आपैसें । विवेकें कळे ॥ १९३० ॥
अग्निसंगें लोह तप्त । जडामध्यें अग्नि मिश्रित ।
लोहो घणें जेव्हां पिटित । तें दिसतें अग्नीसी ॥ ३१ ॥
परी जडाचा घाव जड । सोसूं जाणें तेंचि दृढ ।
प्रकाशासी तें अवघड । ओझें घेतां ॥ ३२ ॥
तेवीं सुखदुःखाच्याचि कथा । वाजती वृत्तीच्या माथां ।
परी प्रतिबिंबासी सर्वथा । शिवतीच ना ॥ ३३ ॥
जळीं प्रतिबिंब देखिलें । तयासी काष्ठें जरी मारिलें ।
परी तें जीवनीं आदळलें । नातळे प्रतिबिंबा ॥ ३४ ॥
तस्मात् प्रतिबिंबरूप जीवासी । भोक्तृत्वाची नवचे दशी ।
मग सामान्य जो प्रकाशी । तेणे कोठोनी ॥ ३५ ॥
एवं सुखदुःखात्मक विषय । या ग्रहंआचें साधन इंद्रिय ।
सुखदुःख वृत्तीसी होय । यासी साक्षी आत्मा ॥ ३६ ॥
तस्मात् आत्मा निर्विकारी । कोणतेही अवस्थेमाझारी ।
त्यासी कोण म्हणे विकारी । चरचरीं असतां ॥ ३७ ॥
देवदत्ता आत्मा ऐसा । विकारीच नव्हे सहसा ।
नामरूप दिसतांही ठसा । विकाररूपी ॥ ३८ ॥
आत्मा नव्हेचि अज्ञान । आणि नव्हे ज्ञानसंपन्न ।
सर्वांसी अविरोधी पूर्ण । आत्माचि एक ॥ ३९ ॥
ऐसें निश्चयेंसीं समजें । येथें कोणी नाहीं दुजें ।
एक आत्माचि विराजे । स्थावरजंगमीं ॥ १९४० ॥
आत्माचि सर्वत्रीं असतां । कोणासी सुखदुःखवार्ता ।
कोण मरे कोण जन्मता । नानायोनीं ॥ ४१ ॥
आपण आत्मा हें विसरले । देहाचि मी हें मानिते झाले ।
जन्मती मरती उगले । परे तें सत्य नव्हे ॥ ४२ ॥
तस्मात् सर्व जरी अज्ञानी । परी न जन्मे न मरे कोणी ।
आत्मा जैसा पूर्णपणीं । तैसाचि असे ॥ ४३ ॥
कोणासीच नाही बंधन । कोणासीच नाही पाप पुण्य ।
सुखदुःख भोगही संपूर्ण । नसे कोणासी ॥ ४४ ॥
स्वरूपस्थिति हे ऐसी । बोलत असती पारदर्शी ।
हेंचि दृढ मानसीं । गुझ्य ज्ञात्याचें ॥ ४५ ॥
चराचरीं मीच एक । व्यापूनियां तिन्ही लोक ।
निजप्रकाशें प्रकाशक । निर्विकारत्वें ॥ ४६ ॥
हेचि अनिर्व्याच्य स्थिती । ज्ञानाज्ञानासारिखी गती ।
बंधमोक्षही लागती । एकाचि मार्गें ॥ ४७ ॥
विचार अविचार एकसरी । बद्ध मुक्ता एकचि परी ।
हा निश्चय केलाचि करीं । सदृढ बुद्धि ॥ ४८ ॥
आतां तुझा तूंचि जाण । आम्हीं झालों कीं उत्तीर्ण ।
ऐसें बोलोनियां वचन । स्तब्ध राहिले ॥ ४९ ॥
देवदत्तें सर्व आकळुनी । पावला पूर्ण समाधानीं ।
झाली संशयाची धुणी । सद्‌गुरुप्रसादें ॥ १९५० ॥
पूर्वीपासून निरूपण । त्याचा सारांश आलोडून ।
अंतःकरणीं बाणली खूण । बहु बोलणें नको ॥ ५१ ॥
वारंवार प्रदक्षिणा । वारंवार वंदी चरणा ।
सेवा प्रसाद इच्छी मना । न्याहाळी मुख ॥ ५२ ॥
तों शंकर म्हणती सर्वज्ञा । देवदत्ता दृढप्रज्ञा ।
आतां आमुची घेऊनि आज्ञा । यथासुखें विचरें ॥ ५३ ॥
स्वरूपीं स्वरुपानुभवें । जीवन्मुक्तिसुख भोगावें ।
उरलें प्रारब्ध सारावें । सुखदुःख भोगोनि ॥ ५४ ॥
ऐकतांचि देवदत्त । घाबरा पाहे विस्मित ।
नेत्रीं होतसे अश्रुपात । प्रार्थिताहे सद्‍गद ॥ ५५ ॥
अहा हे सद्‍गुरुराजा । पूर्णब्रह्म मोक्षध्वजा ।
न सोडीं मी चरणांबुजा । देहपातावीण ॥ ५६ ॥
देह वाणी आणि मानस । श्रीचरणींच यांचा न्यास ।
गुरूनें उपेक्षितां यांस । कैसे राहती ॥ ५७ ॥
आतां काज असे कवण । कीं तें म्यां करावें जाऊन ।
सेवाचि इच्छितसे मन । हाचि प्रसाद द्यावा ॥ ५८ ॥
परमप्लावण्या वेव्हाळी । परी ते शोभे पतीजवळी ।
तेवीं मीही चरणातळीं । शोभेन अत्यंत ॥ ५९ ॥
सिंहासन रत्‍नखचित । राजा बाइसतां परम शोभत ।
तैसा मीही देवदत्त । वास वांच्छ्त श्रीचरणीं ॥ १९६० ॥
देह पादुका श्रीचरणीं अवस्था हेंचि वांच्छी मनीं ।
तरी समर्थें कृपा करूनी । दिधलेळ्चि दुयावें ॥ ६१ ॥
देहबुद्ध्या तरी दास । जीवबुद्ध्या तुझा अंश ।
मीचि तूं हा अविनाश । आत्मबुद्धि जेव्हां ॥ ६२ ॥
ऐसें बोलोनि चरण धरी । तथास्तु निघावें मुखोद्‌गारीं ।
सर्वथा वंचनही न करीं । अनाथबंधो ॥६३ ॥
मग उठूनियां शकरें । म्हणती सावधान ऐकें उत्तरें ।
समाधान पावून बा रे । विरोधी बोलसी ॥ ६४ ॥
ऐसें नव्हे समाधान । तुवां वाटून घेतलें रान ।
अभेदासी करिसी भिन्न । हें तुजसी शोभेना ॥ ६५ ॥
इतुकाचि औटहात गुरु । या सर्वांमाजी कोण गा चोरु ।
आणि त्य्झ्या ठायींही विकारु । कोठोनि आला वेगळा ॥ ६६ ॥
आत्मा देहधारी कल्पिसी । तूंही देहायेवढा होसी ।
अहा निकृष्ट कल्पना ऐसी । पूर्णज्ञान विरोध ॥ ६७ ॥
वियोगसंयोगाचा खेद । कोठें असे आत्मा अभेद ।
चराचरीं सच्चिदानंद । नामरूपावीण ॥ ६८ ॥
तोचि गुरु कीं आपण । वेगळें कैंचें गुरुशिष्यपण ।
देह वाणी आणि मन । तेथेंचि तत्पर सर्वदा ॥ ६९ ॥
जरी भिन्नत्वें भावावें । तरीच सेवावंचक व्हावें ।
अभिन्नचि असतां स्वभावें । अखंड सेवा आयती ॥ १९७० ॥
ऐसी अखंड सेवा असता । देहसंबंध घेसी केउता ।
अंतरीं पाहें गा पुरता । स्वस्वानुभवें ॥ ७१ ॥
जडाचा मानिसी संयोग । होय केव्हां तरी वियोग ।
तेव्हां समाधानाचा भंग । होईल बापा ॥ ७२ ॥
दोन काष्ठें प्रवाहें । एकत्र चालतां पाहें । ए
क अटके एक वाहे । परतंत्रतेमुळें ॥ ७३ ॥
देह प्रारब्धाधीन तैसा । एकरूप राहे जैसा । सांडीं ।
सांडीं भेद ऐसा । देहबुद्धीचा ॥ ७४ ॥
ऐक गुरुभक्तीचें लक्षण । निपटूनि जावें । मीपण ।
एक गुरूचि परिपूर्ण । भेदभान न होतां ॥ ७५ ॥
किंवा एकचि पूर्ण आत्मा । कल्पूं न ये रूपनामा ।
हा अभेदशक्तीचा महिमा । दृढ कां न व्हावा ॥ ७६ ॥
देह पडे अथवा राहे । सुख अथवा दुःख साहे ।
परी समाधान भंग नव्हे । हेंचि चिन्ह ज्ञानाचें ॥ ७७ ॥
अगा आकाश तुटोनि पडे । कीं पृथ्वी जळामाजी बुडे ।
परीं समाधान तें न मोडे । हेंचि चिन्ह ज्ञानाचें ॥ ७८ ॥
वियोग किंवा संयोग । अवघें मायिकाचे ढोंग ।
होतां जातां नव्हे भंग । समाधानासी ॥ ७९ ॥
असो हे किती सांगावें । तुजसी सर्व असे ठावें ।
आतां भेदाचियां नांवें । तिलदान देईं ॥ १९८० ॥
सर्वांठायीं एक गुरु । पूर्ण आत्मा निर्विकारु ।
देवदत्त किंवा शंकरु । नाम हें कोठें ॥ ८१ ॥
ऐसा करोनियां निश्चय । निःसंदेह अमुचा आशीर्वाद ।
कालत्रयीं नाहीं भय । तुझें समाधान ॥ ८२ ॥
ऐसा आमुचा आशीर्वाद । प्रसन्नत्वें दिधला प्रसाद ।
आतां उठें टाकीं खेद । हेचि आज्ञा आमुची ॥ ८३ ॥
तुवां जावें येचि क्षणीं । आम्हासीही अल्पादिनीं ।
जाणे असे महाप्रस्थानीं । आतां आग्रह टाकीं ॥ ८४ ॥
ऐसा ऐकतां वृत्तांत । बोलिल्या न्यायें समस्त ।
तथास्तु म्हणे देवदत्त । माथा चरणीं ठेउनी ॥ ८५ ॥
परी आतां एक प्रार्थना असे । सदाचरण बोलिलें जैसें ।
ज्ञानरूप आश्रम तैसे । मजसी निरोपावे ॥ ८६ ॥
बहु बरें म्हणोनियां स्वामी । बोलूं आरंभिती अनुक्रमीं ।
ब्रह्मचर्य श्लोकीं प्रथमीं । अवधारीं आधीं ॥ ८७ ॥


ब्रह्माध्ययनसंयुक्तो ब्रह्मचर्यरतः सदा ।
सर्वं ब्रह्मेति यो वेद ब्रह्मचारी स उच्यते ॥ ५० ॥


तोचि ब्रह्मेति बोलिजे । जेणें सर्व ब्रह्म जाणिजे ।
तेथेंचि अखंड विचरिजे । वेदाध्ययनयुक्त ॥ ८८ ॥
शब्दब्रह्मीं पारंगत । जो कां शुद्ध वेदांत ।
श्रवणमननीं अखंड रत । वेदाध्ययन या नांवें ॥ ८९ ॥
वृत्तिस्वरूपाकारीं । अनुदिनीं अभ्यासें थावरी ।
तोचि जाणिजे ब्रह्मचारी । सर्वदा व्रतस्थ ॥ १९९० ॥
सांडूनियां रूपनाम । अनुभवीतसे सर्व ब्रह्म ।
भेदचि अथवा झाला भस्म । तोचि ब्रह्मचारी ॥ ९१ ॥
येर हे स्थूळाची क्रिया । कोण पुसे ब्रह्मचर्या ।
आतां ऐकें शिष्यराया । गृहस्थ कोणतो ॥ ९२ ॥


गृहस्थो गुणमध्यस्थः शरीरं गृहमुच्यते ।
गुणाः कुर्वन्ति कर्माणि नाहं कर्तेति बुद्धिमान् ॥ ५१ ॥


शरीरगृहीं गुणीं स्थित । तोचि गृहस्थ बुद्धिमंत ।
गुणचि कर्मीं प्रवर्तत । आपण कर्ता असेना ॥ ९३ ॥
पंचीकृत भूतांपासुनी । स्थूल देहाची उभवणी ।
जन्म नाश जयालागुनी । हेंचि गृह बोलिजे ॥ ९४ ॥
ऐसिया देहरूप मंदिरीं । साक्षिमात्रें निर्विकारी ।
तोचि आत्मा गुणां माझारी । अलिप्तत्वें गृहस्थ ॥ ९५ ॥
शब्दस्पर्शादि रूपनाम । सर्व व्यापार हेंचि कर्म ।
हा तों प्रत्यक्ष गुणांचा धर्म । आत्मा तया अलिप्त ॥ ९६ ॥
सत्वगुण अंतःकरण । इंद्रियादि रजोगुण ।
विषयतमाचें निरूपण । पूर्वश्लोकीं जाहलें ॥ ९७ ॥
ऐसी गुणाची प्रवृत्ती । स्वस्वकर्मींच वर्तती ।
सुखदुःखें अभिमाना होती । विश्वतैजसादिकां ॥ ९८ ॥
सहजगति कर्म ऐसे । होय जें जें अनायासें ।
तया कर्तृत्वाचें पिसें । आत्मयासी असेना ॥ ९९ ॥
आपण आत्मा परिपूर्ण । निश्चयेसीं बाणली खूण ।
तरी कर्माचा कर्ता कवण । असे गा ज्ञानोदयीं ॥ २००० ॥
एवं नाहं कर्तृत्वें मती । तोचि बुद्धिमान निश्चितीं ।
गृहस्थ नाम हें तयाप्रती । अत्यंत शोभे ॥ १ ॥
जागृति स्वप्नादि व्यापार । सुषुप्ति समाधि समग्र ।
होती जाती निर्विकार । आपण आत्मा ॥ २ ॥
आपुलेपणा हा विसरे । देहचि मी हें झालें खरें ।
आणि माझीं हीं रांडापोरें । बांधिलीं घरें मातीचीं ॥ ३ ॥
ऐसें मी माझें कल्पूनी । वासना बळाविली द्विगुणी ।
पुनःपुन्हां मरती जन्मुनी । ते गृहस्थ लौकिकी ॥ ४ ॥
असो तयासी नाहीं काज । मुख्य गृहस्थ सांगितला तुज ।
पुढील श्लोकीं आतां समाज । वानप्रस्थ कोणता ॥ ५ ॥


किमुग्रैश्च तपोभिश्च यस्य ज्ञानमयं तपः ।
हर्षामर्षविनिर्मुक्तो वानप्रस्थः स उच्यते ॥ ५२ ॥


उग्र तपें करोनि काय । शुद्ध तप तें ज्ञानमय ।
हर्ष शोक गेले उभय । जयाचे तो वनस्थ ॥ ६ ॥
विवेक सांडूनियां दूरी । वनीं ही जरी वास करी ।
तरी तो नव्हेचि निर्धारीं । वानप्रस्थ ॥ ७ ॥
धूम्रपान पंचाग्निसाधन । नाना उग्रतपें तो तो शीण ।
काय होतसे तेणें । कोरड्या दुराग्रहें ॥ ८ ॥
तस्मात् जयासी ज्ञानतप । जेथें नातळीच पुण्यपाप ।
अंगेंचि ब्रह्म सच्चिद्‍रूप नामरूप सांडूनि ॥ ९ ॥
जेहें द्वैतचि मावळे । त्रिविधा रीतीं मीपण गळे ।
ज्ञानें सहज मुक्त झाले । हर्षविषाद कैंचा ॥ २०१० ॥
ऐसा हर्षविषादावांचुनी । स्वेच्छा क्रीडे निरंजनीं ।
ओळखीं वानप्रस्थालागुनी । ऐक आतां संन्यास ॥ ११ ॥


देहन्यासो हि संन्यासो नैव काषायवाससा ।
नाहं देहो महात्मेति निश्चयो ज्ञानलक्षणम् ॥ ५३ ॥


निश्चयें ज्ञानलक्षण ऐसें । मी देह स्वप्नींही नुमसे ।
तोचि महात्मा न्यासी असे । काषायवासें नव्हेचि ॥ १२ ॥
अगा ज्ञानाचें लक्षण । पूर्वापर वेदांतकथन ।
जितुकें झालें निरूपण । परी निश्चय ऐसा ॥ १३ ॥
ब्रह्म प्रत्यगात्मा अभिन्न । ध्येय ध्याता ध्यानेंवीण ।
वृत्तिरहित समाधान । सारांश इतुका ॥ १४ ॥
ऐसी दृढतर बुद्धि झाली । संशयाची मुळी खांदिली ।
तिन्ही काळीं स्थिति एकली । एकपणेंवीण ॥ १५ ॥
कोणतेही अवस्थेप्रती । देहबुद्दीची समाप्ती ।
विश्वतैजसप्राज्ञरीती । उरली नाहीं ॥ १६ ॥
मी माझें निःशेष जातां । विश्वाभिमानाची नुरे वार्ता ।
अकार स्थूल हा तत्त्वतां । स्वानुभवें न्यासिला ॥ १७ ॥
मी कर्ता भोक्ता निमतांक्षणीं । तैजस अभिमानाची हानी ।
उकार सूक्ष्म देहालागुनी । सर्वथा न्यासिलें ॥ १८ ॥
मी ध्याताचि वेगळा नुरे । त्या क्षणींच प्राज्ञ हा मरे ।
कारणदेह सह मकारें । न्यासिलें खरें ते समयीं ॥ १९ ॥
देहत्रय जैसें पिंडीं । तेवीं तीन देह ब्रह्मांडीं ।
विराट हिरण्यगर्भ परवडी । तिजा अव्याकृत ॥ २०२० ॥
पिंडींचा अभिमान निमतां । समष्टिअभिमान गळे तत्त्वतां ।
श्रम नसेचि न्यासितां । ब्र्ह्मादि अभिमानिया ॥ २१ ॥
ऐसा नामरूपाचा त्याग । करून आत्मा उरे असंग ।
तिन्ही अवस्थेसीं मग । मी देह वाटेना ॥ २२ ॥
एवं देहत्रयाची न्यासी । तोचि महात्मा संन्यासी ।
सांगितला धरी मानसीं । निश्चयरूप ज्ञाता ॥ २३ ॥
येर हे वेषधारी भगवे । दंडकमंडलु मिरवावे ।
परी ज्ञानविचाराच्या नांवें । शून्याकार ॥ २४ ॥
ते ते नव्हेति संन्यासी । व्यर्थ त्यागिलें शिखासूत्रासी ।
ओझें मिरविती अपेशी । काष्ठ खापराचें ॥ २५ ॥
महावाक्य आणि योगपट । मुखें करोनियां पाठ ।
स्वानुभवें पुसतां सपाट । हा संन्यास केवीं ॥ २६ ॥
असो हे ज्ञानविहीन । तयांसी असे काज कोण ।
तुज सांगितलें ज्ञानलक्षण । संन्यासी तो निश्चयें ॥ २७ ॥
ब्रह्मचर्य किंवा गृही । वनस्थ किंवा संन्यास पाहीं ।
हें लक्षण अन्यास नाहीं । एक ज्ञात्यावांचुनी ॥ २८ ॥
पूर्वील सदाचरणरीती । स्नानसंध्यादि जितुकीं होती ।
तितुकीं घडती ज्ञानाप्रती । येरां फजिती कष्टमात्र ॥ २९ ॥
हेंही ज्ञानियच्या ठायीं । यथार्थ नव्हे निःसंशयीं ।
बोधक्रिया अभिप्रायीं । आरोपिलें रूपक ॥ २०३० ॥
आत्मत्वें क्रिया असे जरी । ज्ञाताही क्रियारूप तरी ।
नामसंकेत निर्विकारीं । आरोपिजे वृथा ॥ ३१ ॥
ज्ञाता ज्ञातेपणें वेगळा । उमसूं न लाहे हेळा ।
तेथें आचरणाचा सोहळा । केवीं लागे ॥ ३२ ॥
अगा अज्ञान नव्हे । तरी उत्पन्न केवीं आधवें ।
मग बंध मोक्ष संभवे । कोठें कोणा ॥ ३३ ॥
नसतां बद्धपणाची वार्ता । मुमुक्षु बोलावा केउता ।
साधक सिद्ध हीं पाहतां । नाम कें कवण ॥ ३४ ॥
आत्म्यासी नहीं आत्मस्मरण । तरे कैंचें प्रातःस्मरण ।
स्नानसंध्यादि सदाचरण । कोठें भिन्न नामक्रिया ॥ ३५ ॥
तैसेचि ब्रह्मचर्य गृहस्थ । संन्यासी कीं वानप्रस्थ ।
हें नामरूप समस्त । ज्ञात्यासे नलगे ॥ ३६ ॥
अगा हें बोलणें जितुकें । अर्थ घेतां अवघें फिकें ।
तोही अर्थ वृत्त्यात्मकें भेदचि करी ॥ ३७ ॥
तेही वृत्ति ग्रासूनी । स्वानुभवें समाधानी ।
त्या स्वानुभवासी मिळणी । अखंडैकरसीं जेव्हां ॥ ३८ ॥
ते स्थितीसी म्हणों काय । सरला वाचेचा उपाय ।
देवदत्ता हेचि निर्भय । समाधाना समाधि ॥ ३९ ॥
ऐसी हे अद्वैतसंपदा । तुजसी वरील देवदत्ता ।
हा प्रसाद घेईं तत्त्वतां । नव्हे अन्यथा कल्पांतीं ॥ २०४० ॥
हा तुमचा आमुचा संवाद । जितुका झाला अनुवाद ।
याचें अनुसंधान जे विशद । श्रवणमननें राखिती ॥ ४१ ॥
त्यांसी कायफलप्राती । हेंचि श्लोकीं निरोपिजेती ।
तेथून ग्रंथाची समाप्ती । परिपूर्ण झाली ॥ ४२ ॥


सदाचारमिमं नित्यं येऽनुसंदधते बुधाः ।
संसारसागरात् शीघ्रं मुच्यंते नात्र संशयः ॥ ५४ ॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीमच्छंकर भगवता कृतं सदाचारस्तोत्रं संपूर्णम् ॥


ऐसिया सदाचरणासी । जे ज्ञाते धरितील मानसीं ।
ते शीघ्र सुटती निश्चयेंसीं । संसारसिंधूपासुनी ॥ ४३ ॥
पूर्वी वर्णिला अधिकार । योगिशब्दें प्राप्त विचार ।
ऐसे जे कां ज्ञाते नर । साधनचतुष्टययुक्त ॥ ४४ ॥
बोलिल्या रीतीं सदाचरण । अभ्यासयुक्त श्रवणमनन ।
दृढ धरिती अनुसंधान । योषा जरापरी ॥ ४५ ॥
ते शीघ्रचि भवापासूनी । सागररूप संसाराहूनी ।
मुक्त होती येथें कोणीं । संशयो न करावा ॥ ४६ ॥
अधिकार नाहीं जयासी । आणि न प्रवर्तती अभ्यासीं ।
ते वरपडे होती पाषांडासी । उगे शब्द ऐकतां ॥ ४७ ॥
अस्मात् ऐसें न करावें । खरेंचि जयासी मुक्त व्हावें ।
तेणें अगत्य अभ्यासावें । बोलिल्या रीतीं ॥ ४८ ॥
अभ्यासीं होय प्रवृत्ती । चढती क्षणक्षणां प्रीती ।
तेणें कर्माची समाप्ती । करोनि हेंचि आदरावें ॥ ४९ ॥
ऐसें न होतां उगें ऐकोनी । कर्म त्यागील जो कोणी ।
शपथ असे तयालागूनी । ब्राह्मण्याची ॥ २०५० ॥
कारण कीं यथार्थ ज्ञान नव्हे आणि कर्मापासूनि भ्रष्टावें ।
तेणें इहपरत्र मुकावें । हें नव्हेचि विहित ॥ ५१ ॥
पूर्ण समाधान ज्ञानें होय । त्यासी त्यागा म्हणणें काय ।
आपेंआप सोडोनि जाय । कर्मचि साधकां ॥ ५२ ॥
पर्वतीं लागतां अग्न । श्वापदासी जा म्हणे कोण ।
तेवीं यथार्थ होतां ज्ञान । तरी मग क्रिया कोठें ॥ ५३ ॥
ज्ञानें कर्म हें गळेना । आणि अज्ञानबंध तुटेना ।
तरी आडनांव ऐसें ज्ञाना । कां न म्हणावें ॥ ५४ ॥
परे साधकें एकाग्रभावें । अनुसंधान दृढ धरावें ।
मग निपटूनि जाती आघवें । परिपक्वदशा होतां ॥ ५५ ॥
जैसी शेंद पिकतांक्षणीं । वेगळी होय देंठाहूनी ।
तेवीं साधक अभ्यासेंकरूनी । कर्मापासूनि मुक्त होय ॥ ५६ ॥
तस्मात् अभ्यास करावा । तोचि एक मुक्त व्हावा ।
येथें संशयो न धरावा । मुमुक्षु साधकें ॥ ५७ ॥
देवदत्ता आतां तुवां । जतन करोनि ज्ञानदिवा ।
भोगीं स्वात्मसुखाचा ठेवा । आज्ञा घेऊनि आमुची ॥ ५८ ॥
मग करोनि साष्टांग नमना । सव्य घालूनि प्रदक्षिणा ।
देवदत्त मागील चरणा । आज्ञा वंदूनि निघाला ॥ ५९ ॥
मागेंपुढें आंतबाहेरीं । अथवा गुरूचि चराचरीं ।
वियोगसंयोगाचा निर्धारीं । नुरेचि खेद ॥ २०६० ॥
सर्वसंगपरित्याग । करूनि उरला अभंग ।
जळीं फिरे जेवीं तरंग । तेवीं देह विचरे ॥ ६१ ॥
एवं शकरें वेदार्थ संस्कृतीं । काढिला वेदांतसंमतीं ।
त्याचाचि अर्थ हा प्राकृतीं । हेही कृती स्वामींची ॥ ६२ ॥
ग्रंथ संपतां स्तुतिउत्तरें । बोलताती अपारें ।
परी अर्थासी कारण येरें । चाड नाहीं ॥ ६३ ॥
इति श्रीमच्छंकरविरचित । सदाचार शुद्ध वेदांत ।
त्याचीच टीका हे प्राकृत । सुबोधरूप ॥ २०६४ ॥
हा ग्रंथ आचार्यें आरंभितां । मंगल केलेंसे स्वमुखता ।
त्याहून मुळामाजी इतर नसतां । जें कां होतें अधिक ॥ १ ॥
तें अहिक मंगल शंकरानांदाचें । जें नव्हे मुख्य शंकराचार्यांचें ।
काज नसे येथें तयाचें । हें हंसरायें जाणून ॥ २ ॥
मजशीं आज्ञापिलें येऊन । स्वप्नामाजी दृष्टांतवून ।
कीं सखया तें करीं न्यून । सश्लोक सटीप ॥ ३ ॥
इतुकेनें आम्हां संतोष । होईल जाणून विशेष ।
प्रति करविली हे अशेष । सकल बुधवरदें हंसांकितें ॥ ४ ॥
शके अठराशेंचारोत्तरीं । श्रावणमासीं सुदिनाभीतरी ।
लेखन पूर्ण झालें निर्धारीं । हंसकृपेंकरोनी ॥ ५ ॥

इति सदाचारटीका समाप्ता ॥ श्लोकाः ५४ ॥ ओंवीसंख्या २०६४ ॥ एकूण २११८ ॥
॥ संपूर्णमस्तु । श्रीसद्‌गुरुवर्यार्पणमस्तु ॥
* * * * *


Download PDF

GO TOP