॥ अथर्ववेदः ॥


सामान्य स्वरूप - अथर्ववेदांत अभिचारमंत्र आहेत. हा अथर्वन् लोकांचा वेद आहे. प्राचीन कालीं, अग्निउपासक पुरोहितास अथर्वन् असें म्हणत व हें नांव बहुतेक सरसकट सर्व उपाध्यायांनां फार पुरातन कालीं लावूं लागले असावेत, कारण हा ‘अथर्वन्’ शब्द पर्शुभारतीय काळचा आहे. अवेस्तामधील अथ्रवन् लोक व हिंदू अथर्वन् लोक ह्यांच्यांत बरेंच साम्य आहे. अग्निपूजक नांवानें प्रसिद्ध असलेल्या प्राचीन इराणी लोकांइतकेंच प्राचीन भारतीयांच्या दैनिक कृत्यांत अग्निपूजेचें माहात्मय असे. हे प्राचीन अग्निपूजक, अमेरिकेंतील इंडियनांच्या वैद्यांप्रमाणें, किंवा उत्तर आशियांतील ‘शामन’ लोकांप्रमाणें जादूटोणा जाणणारेही होते. हे पुरातन अग्निपूजेचे उपासक जारणमारण विद्येचेहि उपासक असत; म्हणजे एकाच व्यक्तीच्या ठिकाणीं आचार्यत्व व अमिचारकत्व हीं दोन्हीं असत; मिडिया देशांतील अथ्रवन् लोकांस “मगी” (जादू टोणा जाणणारा अग्निपूजक) असें म्हणत, ह्यावरून आचार्यत्व अभिचार यांचे पुरोहितवर्गांत सहास्तित्व सिद्ध होतें. तसेंच हेहि उघड होतें कीं, अथर्वन् हें नांव अथर्वन् लोकांच्या किंवा “आचार्य अमिचारकां” च्या मंत्रांनांहि (अमिचारानांहि) लावीत. भारतीय वाङ्मयांत या वेदाचें अतिशय जुनें असें नांव म्हणजे अथर्वांगिरस. इतिहासास ज्ञात अशा कालापूर्वीं अंगिरस् म्हणून एक अग्निउपासकांचा वर्ग होता व अथर्वन् शब्दाप्रमाणेंच ह्या शब्दाला “जारणमारणादि मंत्र” हा अर्थ आला. तथापि अथर्वन् व अंगिरस् हे दोन निराळे मंत्रवर्ग आहेत. अशी एक कल्पना होते कीं, ब्राह्मणजातीचा उद्भव होण्यापूर्वीं ज्या लोकांकडे भारतीयांचें पौरोहित्य होतें त्यांस अथर्वण हेंच नांव असे. आणि असेंहि शक्य आहे कीं, ज्याप्रमाणें पर्शूंचे आचार्य परजातीय होते त्याप्रमाणें हिंदूंचे आचार्यहि कांहीसे परजातीय असावेत. निदान पररजातीय लोक यांच्या वर्गांत बरेचसे घुसले असावेत. या प्रश्नाचें विवेचन सविस्तरपणें ‘ब्राह्मणजातीचा उदय’ या प्रकरणांत करावयाचें आहे. अथर्वन् मंत्र सुखकारक व पवित्र आहेत, तर त्याच्या उलट अंगिरस् हे मंत्र अघोर पीडाकर आहेत. ह्याला उदाहरण म्हणजे, अथर्वन् मंत्रामध्यें रोगनिवारक विधी आहेत, तर अंगिरस् मंत्रांमध्यें आपलें द्वेष्टे, शत्रू, दुष्ट मायावी लोक व इतर तशाच प्रकारची मंडळी ह्यांनां शाप देण्याचे विधी सांगितले आहेत. अथर्ववेदांत मुख्यतः अथर्वन् व अंगिरस् हे दोन प्रकारचे मंत्रविधी आहेत व म्हणून ह्या वेदाचें जुनें नांव अथर्वांगिरस असें आहे. अथर्ववेद हें नांव नंतरचें आणि अथर्वांगिरसवेद या नांवाचें संक्षिप्त रूप आहे. अथर्ववेदसंहितेच्या एका प्रतींत एकंदर सातशें एकतीस सूक्तें व अजमासें सहा हजार ऋचा आहेत. ह्या वेदाचीं वीस कांडें आहेत व ह्यांपैकीं विसावें तर बरेंच अलीकडे जोडलें आहे व एकोणिसावें कांड सुद्धां पूर्वीं ह्या संहितेंत नव्हतें. विसाव्या कांडांतील बहुतेक सर्व सूक्तें ऋग्वेदसहितेंतूनच अक्षरशः घेतलीं आहेत. ह्याखेरीज अथर्ववेद संहितेचा अजमासें १/७ भाग ऋग्वेदावरूनच घेतला आहे. ऋग्वेद व अथर्ववेद ह्या दोहोंत सापडणार्‍या ऋचांतील निम्यांहून अधिक ऋचा ऋग्वेदाच्या दहाव्या मंडळांत दिसून येतात व बाकी राहिलेल्या बहुतेक ऋचा त्याच्या पहिल्या व आठव्या मंडळांत सांपडतात. अथर्ववेदाच्या मूळ अठरा कांडांतील सूक्तांची रचना पद्धतशीर व फार काळजीपूर्वक केलेली दिसून येते. पहिल्या सात कांडांत पुष्कळ लहान लहान सूक्तें आहेत; पहिल्या कांडांतील सूक्तें सामान्यतः चार चार ऋचांचीं, दुस-यांतील पांच ऋचांचीं, तिस-यांतील सहांचीं, चवथ्यांतील सातांचीं असा क्रम दिसतो. पांचव्या कांडांतील सूक्तांच्या ऋचा कमींत कमी आठ व जास्तींत जास्ती अठरा आहेत. सहाव्या कांडांत बहुतेक तीन ऋचांचीं अशी एकंदर एकशें बेचाळीस सूक्तें आहेत व सातव्या कांडांत एक किंवा देन ऋचांचीं अशी एकशें अठरा सूक्तें आहेत. आठ ते चवदा कांडें आणि सतरावें व अठरावें कांड ह्यांतून लांबलांब सूक्तें आहेत ह्या वरील कांडमालिकेंतील सर्वांत लहान सूक्त (एकवीस ऋचांचे) म्हणजे आठव्या कांडांतील पहिलें व सार्वांत लांब सूक्त (एकूणनव्वद ऋचांचें) म्हणजे अठराव्या कांडांतील शेवटचें (चवथें) पंधरावें कांड पूर्ण व सोळाव्या कांडांतील बराचसा भाग एवढाच मध्यें गद्यात्मक आहे. ह्यांतील भाषा व घाटणी ब्रह्मणग्रंथांप्रमाणें आहे. ह्या वरील सर्व गोष्टी पहिल्या म्हणजे संहिताकाराची बह्या रचनेवर व ऋचांच्या संख्येवर विशेष दृष्टि होतीसें दिसतें. पण अंतर्रचनेंत सुद्धां त्यानें हेळसांड केलेली नाहीं. दोन, तीन, चार किंवा अधिक एकाच विषयावरील सूक्तें बहुतेक एका ठिकाणीं घातलेलीं आढळून येतात. कधीं कधीं कांडांतील पहिल्या सूक्तास तें स्थान देण्याचें कारण त्यांतील विषय असावा असें दिसतें. उदाहरणार्थ, दुसर्‍या, चवथ्या, पांचव्या आणि सातव्या कांडाच्या सुरवातीला ब्रह्मविद्याविषयक सूक्तें घातलेलीं आहेत, तीं निःसंशय सहेतुक घातलीं आहेत. तेरा ते अठरा यांपैकीं प्रत्येक कांडांत बहुतेक एक एक स्वतंत्र विषय आहे. चवदाव्या कांडांत नुसतीं विवाहवचनें आहेत, तर अठराव्या कांडांत फक्त अंत्यविधीबद्दलच्या ऋचा आहेत. ह्यावरून वरील विधानाची सत्यता पटेल. अथर्ववेदांतील सूक्तांची भाषा व वृत्तें हीं प्रधानतः ऋग्वेदसंहितेप्रमाणेंच आहेत. तथापि अथर्ववेदांत कांहीं रूपें निःसंशय ऋग्वेदकाळाच्या नंतरचीं आहेत. तसेंच यांतील भाषेंत लोकभाषेंतील शब्द व प्रयोग ऋग्वेदापेक्षां अधिक आढळतात व ह्याखेरीज या वेदांत ऋग्वेदाप्रमाणें वृत्ताकडे बारकाईनें लक्ष पुरविण्यांत आलेलें दिसत नाहीं. पंधरावें कांड सर्व व सोळाव्याचा बहुतेक भाग गद्यात्मक आहे, हें वर सांगितलेंच आहे. याशिवाय इतर कांडांतूनहि मधून मधून गद्याभाग आलेला आहे. पुष्कळ ठिकाणीं तर अमुक एक भाग रचना नीट न साधलेलें पद्य आहे किंवा उत्तम गद्य आहे, याचा निर्णय करणें कठिण होतें. कधीं कधीं असेंहि दिसून येतें कीं, मुळांतील वृत्त निर्दोष असून त्याचा प्रक्षेप किंवा विक्षेप यामुळें भांग झालेला आहे. कांहीं कांहीं ठिकणीं भाषा व वृत्त यांवरून ते भाग अलीकडेच आहेत हें थोडेंफार ओळखतां येतें. तथापि भाषा व वृत्त यांवरून सूक्तांच्या कालाबद्दल निश्चित सिद्धांत बांधतां येत नाहीं, व यामुळें अर्थातच संहितेचाहि कालनिर्णय करितां येत नाहीं. ऋग्वेदसूक्तें व अथर्ववेदमंत्र ह्यांत जो फरक अथर्ववेदांतील भाषावैचित्र्य व वृत्तस्वातंत्र्य ह्यामुळें पडलेला आहे, तो फरक या दोहोंतील कालभेदामुळें आहे किंवा यज्ञिक व सामान्य लोकांच्या प्रबंधांत साहजिक पडणारें अंतर ह्याच्या बुडाशीं आहे, हा मोठा वादाचा प्रश्न आहे. अथर्वसंहिताकाल.– आतां कांहीं पुरावे मात्र असे सांपडतात कीं, त्यांवरून अथर्ववेदसंहिता ही ऋग्वेदसंहितेच्या मागाहूनची आहे हें निर्विवादपणें सिद्ध होतें. असा पहिला पुरावा म्हणजे ऋग्वेद व अथर्ववेदांतील भौगोलिक ज्ञान व संस्कृति. यांच्याकडे लक्ष्य दिलें असतां अथर्ववेदसंहितेचा काळ ऋग्वेदकाळाच्या नंतरचा आहे असें दिसून येतें. त्या वेळीं आर्य लोकांनीं आग्नेयीकडे पुढें सरकत सरकत गंगा नदी कांठचा प्रदेश व्यापिला होता. बंगाल्यांत दलदलीच्या अरण्यांतून राहणारा वाघ ऋग्वेदांत दृष्टीस पडत नाहीं, पण अथर्ववेदांत त्याचें वर्णन आढळतें. तो हिंस्त्र पशूंमध्यें सर्वांत बलाढ्य व भीतिप्रद आहे व राज्यभिषेकाच्या वेळीं अतुल राजबलदर्शक चिन्ह म्हणून राजाच्या पायांखालीं व्याघ्रचर्म हांतरतात व राजा त्यावर पदन्यास करितो. अथर्ववेदकालीं ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चार वर्ण होते इतकेंच नव्हें, तर ब्राह्मणांनां उच्च स्थानीं बसविलें आहे व त्यांस भूदेव असें म्हटलें आहे. अथर्ववेदाच्या अभिचारऋचांतील विषयांकडे पहिलें असतां त्या फार प्राचीन असून सामान्य जनांत प्रचलित होत्या असें स्पष्ट दिसतें. परंतु अथर्ववेदसंहितेंतच त्यांनां ब्राह्मणी स्वरूप प्राप्त झालेलें आहे. इतर देशांतील लोकांनां ज्याप्रमाणें आपले अभिचारमंत्र, मोहिनीमंत्र, वगैरेंचा उत्पादक कोण हें माहीत नसतें, परंतु हे मंत्र सामान्यतः सर्व लोकांच्या प्रचारांत असतात, त्याप्रमाणेंच अथर्ववेदांतीलहि होते, परंतु या वेदाच्या संहिताकालांतच ते बरेचसे सामान्य जनांच्या कक्षेबाहेर गेले होते. हा संग्रह ब्राह्मणानीं केला असून पुष्कळशीं सूक्तेंहि ब्राह्मणांनींच रचिलीं आहेत, असें वाचकांस पदोपदीं दिसून येतें. विशेषणें व उपमा देण्याच्या कामीं तर वारंवार अथर्ववेदसूक्तांच्या संग्रहकारांची व थोड्या बहुत प्रमाणानें लेखकांची ही ब्राह्मणी दृष्टि चांगलीच दिसून येते. उदाहरणार्थ, क्षेत्रकृमींविरूद्ध जो मंत्र आहे त्यांत संस्कारानें शुद्ध न केलेल्या अन्नाला ज्या प्रमाणें ब्राह्मण शिवत नाहीं, त्याप्रमाणें क्षेत्रकृमींनीं क्षेत्रांतील धान्यास स्पर्श करूं नये असें म्हटलें आहे. ब्राह्मणांनां जेवूं घालणें, यज्ञांत त्यांनां दक्षणा देणें वगैरे ब्राह्मणांच्या हिताच्या गोष्टी असलेला असा जो एक सूक्तांचा भाग अथर्ववेदांत आहे, तो ब्राह्मणांनींच रचिला असला पाहिजे यांत संशय नाहीं. आतां, जसें जुन्या अभिचारमंत्रांनां ब्रह्मणी स्वरूप प्राप्त होणें हें नंतरच्या कालाचें दर्शंक आहे, तसें अथर्ववेदांत वैदिक देवतांच्या कृतीचें जें वर्णन आहे त्यावरूनहि ही संहिता ऋग्वेदसंहितेनंतर तयार झाली हें स्पष्ट होतें. अग्नि, इंद्र वगैरे ऋग्वेदांतील देवता ह्या वेदांतहि दिसून येतात, पण यांचें वैशिष्ट नष्ट झालें असून त्या सर्व येथें जवळ जवळ सारख्याच दिसतात. निसर्गांतील शक्तीं या नात्यनें मूळ जें त्यांनां महत्त्व होतें, तें पुष्कळ अंशीं नष्ट होऊन ह्या वेदांतील मंत्र राक्षसांचें निरसन व नाश ह्याकरितांच असल्याकारणानें, या कामाकरितां मात्र देवतांनां आव्हान करण्यांत येतें. म्हणजे अथर्ववेदांत देवता या निवळ राक्षससंहारक बनल्या आहेत. सरतेशेवटीं, अथर्ववेदांतील देवविषयक व जगदुत्पत्तिविषयक कल्पनांवरूनहि त्यांतील मंत्र ऋग्वेदानंतरचे आहेत हें सिद्ध होतें. ह्या वेदांत तत्त्वज्ञानपरिभाषेचा चांगलाच विकास झालेला आहे, व ईश्वर सर्वव्यापी आहे या काल्पनेचें जें परिणत स्वरूप उपनिषदांमध्यें आढळतें तेंच जवळ जवळ येथेंहि आढळतें. तत्त्वज्ञानविषयक सूक्तें सुद्धां अभिचारमंत्र म्हणून उपयोगांत आणलेलीं आहेत. उदाहरणार्थ, तत्त्वविद्येंतील “आसत्” ची मूळ कल्पना, राक्षस, शत्रु आणि अभिचारी ह्यांचा नाश करण्याच्या कामीं योजिलेली दिसून येते. यावरून या वेदांत जे अभिचार, मंत्र तंत्र इत्यादि अंतर्भूत झालेले आहेत, ते जुन्या काळीं सामान्य जनांत प्रचलित असलेल्या साध्या जादूटोण्याची नंतरच्या कल्पना जोडून तयार केलेली कृत्रिम आवृत्ति होत हें स्पष्ट होतें. अथर्ववेदाचें स्थान.- पुष्कळ दिवसपर्यंत भारतीय लोक अथर्ववेदाला पूज्य व पवित्र मानित नव्हते, व अजून सुद्धां ह्याविषयीं अनेक वेळां लढा पडतो, म्हणून हा वेद मागाहूनचा आहे, असें कांहीं निश्चित म्हणतां येणार नाहीं. ह्या वरील गोष्टीला कारण म्हणजे अथर्ववेदांतील विषयच आहे. ह्या वेदाचा हेतु (शांतिपौष्टिकाभिचार कर्म) अनिष्टशांति, इष्टपूर्ति व शुत्रपीडा हे आहेत. अभिशाप व भूतापसारण यांसंबंधीं मंत्रविधी अपवित्र मंत्रवर्गांत येत असल्यानें ब्राह्मणांनीं आपल्या ब्रह्मणधर्मापासून त्यांनां दूर ठेवण्याचा प्रयत्‍न केला. एकंदरींत पाहूं जातां, परमार्थसाधन व जादूविद्या ह्यांत तत्त्वतः मुळींच फरक नाहीं. दोन्ही अतींद्रिय सूष्टीवर तावा चालवूं पाहतात. शिवाय आचार्य जादूगार मूळांत एकच आहेत. परंतु प्रत्येक देशांतील लोकांच्या इतिहासांत असा एक काल येतो कीं, त्या वेळेस परमार्थसंप्रदाय व मंत्रविद्या एकमेकांपासून विमक्त होऊं पाहतात. त्यांत सर्वस्वी यश येत नाहीं ही गोष्ट निराळी. देवांशीं सख्य ठेवणारा पुरोहित, पिशाच्यांशीं संबंध ठेवणार्‍या जादूगाराचा अनादर करितो आणि त्याला आपल्यापेक्षां कमी प्रतीचा लेखतो. हिंदुस्थानांत सुद्धां हें दोघांतील अंतर वाढत गेलें आहे. अथर्ववेदांतील अभिचारांपासून व मंत्रविद्येपासून अलिप्त राहण्याविषयीं बौद्ध व जैन भिक्षूंनां सक्त ताकीद असते इतकेंच नव्हे, तर ब्राह्मणी धर्मशास्त्रांतून सुद्धां चेटूक हें पाप मानिलें आहे, व चेटूक करणाराला दगलबाज व पाखंडी ह्यांच्या पंक्तीला बसवून त्यांनां शिक्षा करणयाची या शास्त्रानें राजाला आज्ञा केली आहे. उलटपक्षीं, ब्राह्मणांच्या धर्मशास्त्रांतून कांहीं ठिकाणीं, शत्रूविरूद्ध अथर्ववेदांतील अभिचारमंत्रांचा उपयोग करण्यविषयीं स्पष्ट परवानगी दिली आहे; आणि मोठमोठ्या यज्ञांचें वर्णन असलेल्या सूत्रग्रंथांतून पुष्कळसे भूतापसारणमंत्र आणि शत्रूंचा (योऽस्मान् द्वेष्टि यं च वयं द्विष्मः) नायनाट करण्यास समर्थ अशा मंत्रविधींचीं वर्णनें आढळतात. तरीपण ह्या अभिचारवेदाविषयीं त्रैविद्य पुरोहितवर्गामध्यें एक प्रकारचा तिटकारा उत्पन्न झाला; हा वर्ग अथर्ववेदाला सत्य व प्राचीनत्व या दृष्टींनीं कमी प्रतीचा लेखीत असें म्हणून पवित्र धर्मग्रंथांत त्याचा समावेश करण्याचें पुष्कळ वेळां टाळलेलें आढळतें. मुळापासूनच पवित्र धार्मिक वाङ्मयांत ह्याचें स्थान अनिश्चित असून त्यासंबंधाच्या कल्पना कांहींशा चमत्कारिक दिसतात. जेथें जेथें म्हणून जुन्या ग्रंथांतून पवित्र धार्मिक विद्या म्हणून उल्लेख आला आहे, त्या त्या ठिकाणीं ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद ह्या “त्रयी विद्ये” चा पहिल्यानें नामनिर्देश केलेला आढळतो; या त्रयी विद्येंनंतर अथर्ववेदाचा उल्लेख सांपडला तर सांपडतो. कधीं कधीं असेंहि होतें कीं, वेदांगें व इतिहासपुराणें हीं सुद्धां धर्मिक ग्रंथमालिकेंत दृष्टीस पडतात, पण अथर्ववेद मात्र वगळला जातो. शांखायनाच्या गृह्यसूत्रामध्यें (१.२,४,८) एक संस्कार वर्णन केला आहे; तो नवीन जन्म पावलेल्या मुलांच्या ठायीं वेदाधिक्षेपण करण्याचा होय. हें अधिक्षेपण विधियुक्त करण्यांत येतें व त्या वेळीं मंत्र म्हणवयाचा तो असा– “मी तुझ्या ठिकाणीं ऋग्वेदाधिक्षेपण करतों, मी तुझ्या ठिकाणीं यजुर्वेपाधिक्षेपण करतों, मी तुझ्या ठिकाणीं सामवेदाधिक्षेपण करतों, मी तुझ्या ठिकाणीं कथापुराणाधिक्षेपण करतों, मी तुझ्या ठिकाणीं सर्व वेदाधिक्षेपण करतों.” या ठिकाणीं तर अथर्ववेदाला मुद्दाम वगळलेलें दिसतें. जुन्या बोद्ध ग्रंथांतून सुद्धां विद्वान् ब्राह्मणांविषयीं उल्लेंख करितांना ते तीन वेदांत पारंगत आहेत असें म्हटलें आहे. आतां अथर्ववेदाचा वरील सर्व ठिकाणीं उल्लेख केलेला नाहीं म्हणून अथर्ववेदासंहिता या सर्वांच्या मागाहूनची आहे असें म्हणणें निखालस चुकीचें ठरेल; कारण कृष्णयजुर्वेदाच्या एका संहितेंत, आणि कोठें कोठें ब्राह्मणें, उपनिषदें वगैरे ग्रंथांतून अथर्व वेदाचा इतर तीन वेदांबरोबर उल्लेख केलेला आढळतो. अथर्ववेदसंहितेची उपलब्ध प्रत ऋग्वेदसंहितेच्या मागाहूनची आहे हें जरीं खरें आहे, तथापि ह्यावरून असें कांहीं निघत नाहीं कीं, त्यांतील सर्वच सूक्तें ऋग्वेदसूक्तांनंतरचीं आहेत. फक्त एवढें सिद्ध होतें कीं, अथर्ववेदांतील सर्वांत मागाहूनचीं सूक्तें हीं ऋग्वेदांतील सर्वांत मागाहूनच्या सूक्तांनंतरचीं आहेत. ज्याप्रमाणें अथर्ववेदांतील बरींचशीं सूक्तें पुष्कळशा ऋग्वेदसूक्तांनंतरचीं आहेत, त्याचप्रमाणें अथर्ववेदांतील अमिचारऋचा या ऋग्वेदांतील यज्ञसंबंधीं ऋचांपेक्षां जरी जास्त जुन्या नसल्या तरी त्यांच्या इतक्याच जुन्या आहेत हेंहि निश्चत आहे व अथर्ववेदांतील अनेक सूक्तें ऋग्वेदांतील जुन्यांत जुन्या सूक्तांइतकींच प्राचीन, त्याच अज्ञात प्रागैतिहासिक कालांतील, आहेत. ‘अथर्ववेदाकाल’ म्हणून ठराविक मर्यांदित काल असा नाहीं. ऋग्वेदसंहितेप्रमाणें अथर्ववेदांतील कांहीं कांहीं सूक्तांच्या रचनाकालामध्यें कित्येक शतकांचें अंतर आहे. आणि म्हणून अथर्ववेदाच्या शेवटचीं शेवटचीं सूक्तेंच काय तीं ऋग्वेदसूक्तेंच्या धर्तींवर रचलीं आहेत, असें म्हणतां येईल. हिंदुस्थानांतील अतिशय जुने अभिचार गद्यात्मक होते आणि पद्यमय ऋचा व सूक्तें हीं सर्व ऋग्वेदांतील यज्ञविषयक सूक्तांच्या धर्तीवर रचलीं आहेत” हें ओल्डनबर्गचें मत डॉ. विटरनिट्झला चुकीचें वाटतें. ऋग्वेदांतील विषय व कल्पना हीं अथर्ववेदाहून अगदीं निराळीं आहेत. ऋग्वेदांतील सृष्टि निराळी व अथर्ववेदांतील निराळीं. एकांत पंचमहाभूतात्मक मोठमोठे देव आहेत, गायक त्यांचा जयजयकार व स्तुति करीत आहे, त्यांच्या प्रीत्यर्थ यज्ञ करीत आहे; ते फार बलाढ्य संकटसमयीं धांवून येणारे कांहींसे उदार मनाचे, बहुतांशीं आनंद व प्रकाशदायी असे आहेत; तर इकडे दुसर्‍या सृष्टींत, मनुष्य जातीवर संकटें व पीडा आणणार्‍या दुष्ट आसुरी शक्ती, भयप्रद पिशाच्चें, त्यांच्यावर उग्र शाप सोडणारे किंवा त्यांची मिथ्या प्रशंसा करून त्यांचें शमन व निराकरण करूं पाहणारे मंत्रिक इत्यादि आढळतात. या वेदांतील पुष्कळशीं सूक्तें व तत्संबंधीं तंत्रविधी या गोष्टी अशा प्रकारच्या कल्पनांच्या वर्गांत मोडतात कीं त्या कल्पना पृथ्वीवरील अगदीं मिन्न संस्कृतीच्या लोकांत आढळत असून त्यांजमध्यें विलक्षण सादृश्य असतें. उदाहरणार्थ, उत्तर अमेरिकेंतील इंडियन, आफ्रिकेंतील नीग्रो, मलायी व मोंगल, पुरातन ग्रीक व रोमन, आणि यूरोपखंडांतील आजकालचे कृषीवल या सर्व लोकांच्या जारणमारणविषयक कल्पना, व मंत्रतंत्र आणि त्यांमधील विचारांच्या विलक्षण उड्या ह्या सर्व गोष्टी पुरातन हिंदू लोकांच्या अथर्ववेदांतल्याप्रमाणेंच दिसततात. तेव्हां, अथर्ववेदांतील पुष्कळशा ऋचांचे विषय व त्यांचें स्वरूप अमेरिकन इंडियन वैदूलोक व तार्तरशामन ह्यांचे मंत्र, व अति प्राचीन जर्मन काव्यावशेषांत आढळणारे मर्सेबर्ग मंत्र, यांच्याशीं बहुतेक जुळतें, उदाहरणार्थ, मर्सेबर्ग मंत्रसंग्रहांत एक मंत्र असा आहे कीं, वोडन (Woden) या मांत्रिकानें बाल्डर (Balder) याच्या शिंगराचा मुरगळलेला पाय खलील मंत्रानें बरा केला. ‘हाडाशीं हाड, रक्ताशीं रक्त, अवयवाशीं अवयव अगदीं चिकटविल्याप्रमाणें (एकजीव होवो)’ अगदीं ह्यासारखाच मंत्र अथर्ववेदांत (४.१२), पाय मोडलेल्यावर आहे. सं ते मज्जा मज्ज्ञा भवतु समु ते परूषा परूः। सं ते मांसस्य विस्त्रस्तं समस्थपि रोहतु।।३।। मज्जा मज्ज्ञा संधीयतां चर्मणा चर्म रोहतु। असृक् ते अस्थि रोहतु मांसं मांसेन रोहतु।।४।। लोम लोम्ना सं कल्पया त्वचा सं कल्पया त्वचम्। असृक् ते अस्थि रोहतु च्छिन्नं सं घेह्योषधे।।५।। अथर्व.४.१२. तुझ्या शरिरांतील मज्जांशीं ह्या तुटलेल्या मज्जा, व अवयवांशीं तुटलेला अवयव जोडला जावो. शरिरांतील नाहींसें झालेलें मांस व मोडलेलें हाड पुन्हां वाढो.३. मज्जांत मज्जा मिळून जावोत. फाटलेलें कातडें पुन्हां एक होवो. तुझ्या शरिरांतील नाहींसें झालेलें रक्त व मोडलेलें हाड पुन्हां उत्पन्न होवो आणि मांसांची वाढ होवो. ४. हे वनस्पतें, नाहींसे झालेले केस तुझ्यामुळें पुन्हां येवोत, कातड्याशीं कातडें मिळून जावो. रक्त व हाड वाढो; आणि याप्रमाणें झालेली जखम पूर्ण बरी होवो. ५. अथर्ववेदसंहितेला जें विशेष महत्त्व प्राप्त झालें आहे तें खालील गोष्टीमुळें होय भूतपिशांच्चें, मुंजे, राक्षस वगैरे पुष्कळ निरनिराळ्या योनींसंबंधानें आणि यज्ञसंस्था तसेंच तत्त्वज्ञानयुक्त विचार यांपासून पृथक्त्वानें वागत असलेल्या लोकांच्या निरनिराळ्या काय समजुती होत्या याबद्दलचें यथार्य ज्ञान मिळण्यास हें अमूल्य साधन आहे. हें ज्ञान मानववंशशास्त्र व देवविषयक कल्पनांचा इतिहास यांच्या अभ्यासकांस अत्यंत महत्त्वाचें आहे हें उघड आहे. मनुष्य जातीचा बौद्धिक इतिहास जाणूं इच्छिणार्‍या शास्त्राज्ञाला अथर्ववेदाचें ज्ञान किती आवश्यक आहे हें त्यांतील कांहीं निरनिराळ्या प्रकारच्या सूक्तांचा विचार केला असतां दिसून येईल.



GO TOP