प्रथमः अंशः ( १ )

द्वितीयः अंशः ( २ )

तृतीयः अंशः ( ३ )

चतुर्थः अंशः ( ४ )

पञ्चमः अंशः ( ५)

षष्ठः अंशः ( ६ )



विष्णुपुराण - प्रस्तावना

एक महापुराण. विष्णुपूजक वैष्णव यांचा हा मुख्य ग्रंथ असून वेदांतसूत्रावरील आपल्या भाष्यांत रामानुजानें या पुराणांतून प्रमाणभूत म्हणून वाक्यें घेतलीं आहेत. विष्णु हाच एक देव, जगदुत्पत्ति- स्थितीस कारण तोच आणि ब्रह्मदेव व शंकर हेहि याहून निराळे नाहींत, अशा आशयाचें वर्णन यांत सांपडेल. तथापि या पुराणांत विष्णवीं विशिष्ट व्रतें, विधी वगैरे, किंवा विष्णुक्षेत्रांची माहिती, इत्यादि कसलेंहि वर्णन नाहीं. यावरून हें पुराण फार प्राचीन असावें असें ठरतें याची रचना 'पुराणा'च्या व्याख्येला धरून आहे.

या पुराणाचे ६ सहा अंश आहेत, व आरंभींच वसिष्ठाचा नातू पराशर व त्याचा शिष्य मैत्रेय यांचा संवाद दिला आहे. व्यासांनीं सर्व पुराणें सांगितलीं. पण या पुराणाचा कर्ता पराशर असल्याचें दाखविलें आहे. यांत जगाच्या उत्पत्तीची माहिती व देव, दानव, मानवजातीचे मूळ पुरूष यांच्या उत्पत्तीच्या वर्णनाला जोडून प्राचीन ऋषींच्या व जुन्या राजांच्या कथा, व बर्‍याच रूपकात्मक गोष्टी दिल्या आहेत. त्यांपैकीं बर्‍याच महाभारतांत आढळतात. विष्णुपुराणाच्या दुसर्‍या अंशांत जगाचें फारच चमत्कारिक वर्णन दिलेलें आहे. पृथ्वीवरील सप्तखंडे व सप्तसमुद्र दिलेले आहेत. सर्वांच्या मध्यभागीं जें जंबुद्वीप आहे त्याचें भौगोलिक वर्णन आहे. जंबुद्वीपांत 'भारतवर्ष' अथवा 'हिंदुस्थान' आहे. त्यांतील प्रदेश, पर्वत, नद्या यांचीं नांवें दिलीं आहेत. नंतर पाताळाचें व खगोलाचें वर्णन दिलें आहे. या अंशाच्या शेवटी सांगितलें आहे कीं, सर्व जग म्हणजे विष्णुच; विष्णु एक सत्य, बाकी सर्व मिथ्या. भारतवर्षाच्या वर्णनाबरोबर प्राचीन भरत राजाची गोष्ट दिली आहे. परंतु या गोष्टीची प्रस्तावना करून, मुख्यत: उपनिषदांतहि असलेला, सर्व ऐक्यभाव सांगणारा वैष्णवपंथाला धरून असा तत्त्वज्ञान विषयक एक संवाद दिलेला आहे. या भागांतील वर्णनपध्दति उपनिशदांतल्यासारखी आहे.

भारतानें पुढें सवैंक्याचें तत्त्व समजावून देण्याकरितां ऋभु वा दाघ यांची पुढील गोष्ट सांगितली: प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा मुलगा जो पवित्र व ज्ञानी ऋभु तो निदाघाचा गुरू होता. एक हजार वर्षांनीं त्यानें आपल्या शिष्यास एकदां भेट दिली, त्यावेळीं मोठ्या आदरानें निदाघानें त्याचे स्वागत केलें, आणि कोठें असतां, कोटून आला, कोठें जाणार वगैरे प्रश्न त्याला विचारले. तेव्हां ऋभूनें उत्तर दिलें. ''मनुष्य आत्मासर्वत्र आहे, त्याचें जाणें आणि येणें, असें कांहीं नाहीं; तेव्हां तसले प्रश्न विचारणें अविचाराचें आहे.'' आणि त्यांनीं 'सवैंक्यभाव' हें तत्त्व निदाघाला इतकें उत्तम समजावून दिलें कीं त्याला अगदीं ब्रह्मानंद झाला. तो ऋभूच्या पायां पडला आणि त्यानें त्याला 'तुम्ही कोण आहा' असा प्रश्न केला. तेव्हां त्याला कळून आलें कीं ते आपलेच पूर्वीचे गुरू ऋभु ऋषि असून आपणाला खरें ज्ञान पुन्हां सांगण्याकरता आले आहेत. पुढें पुन्हा हजार वर्षांनीं निदाघ राहत होता त्या गांवात ऋभुऋुषि आले. तेथें लोकांचा मोठा जमाव झाला असून राजा आणि परिवार त्या नगरात प्रवेश करीत होते. या गर्दीपासून लांब बाजूला त्यांचा शिष्य निदाघ उभा होता. ऋभु ऋषींनीं जवळ जाऊन त्यास बाजूला उभें राहण्याचें कारण विचारलें. तेव्हां निदाघ म्हणाला, '' राजा नगरांत प्रवेश करीत आहे, तेथे फार गर्दी झाली आहे, म्हणून मी बाजूस उभा राहिलों आहें.'' त्यावर ऋभूनीं विचारलें, 'त्यांतला राजा कोणता' ? निदाघ म्हणला, ''मोठ्या हत्तीवर बसलेला आहे तो राजा.'' ऋभु म्हणाले ''पण हत्ती कोणता आणि राजा कोणता''? निदाघ म्हणाला ''खालीं आहे तो हत्ती, व वर बसला आहे तो राजा.'' ऋभु म्हणाले ''खाली म्हणजे काय, आणि वर म्हणजे काय''? तेव्हां निदाघानें ऋभूच्या पाठीवर उडी मारली, आणि उत्तर दिलें, ''राजाप्रमाणें मी वर आहे; आणि हत्तीप्रमाणें तुम्ही खालीं आहा.'' तेव्हा ऋभु म्हणाले, '' हे प्रिय शिष्या, आतां आपल्यापैकीं तू आणि मी म्हणजे कोण, तें सांग.'' इतकें झालें तेव्हां निदाघानें आपल्या जुन्या गुरूंनां ओळखिलें, कारण त्याच्या इतकी ऐक्यबुध्दि दुसर्‍या कोणांतच बाणलेली नव्हती. ह्या वेळीं मात्र निदाघाच्या मनांत विश्व-ऐक्याचें तत्व इतकें ठसलें कीं, त्यावेळेपासून सर्वांठायीं तो आत्मबुध्दीनें पाहूं लागला, आणि शेवटीं त्याला कायम मुक्ति मिळाली.

विष्णुपुराणाच्या तिसर्‍या अंशाच्या आरंभीं मनुष्य-जातीचे आद्यपुरूष मनु, त्यांच्या कारकीर्दी अथवा मन्वंतरें, यांचें वर्णन आहे. नंतर चार वेद; व्यास व त्यांचे शिष्य यांनीं केलेले वेदाचे विभाग, आणि वैदिक पंथाचा उगम, यांवरील विवेचन आलें आहे. याला जोडून अठरा पुराणांची यादी व शास्त्रांची नांवें दिलीं आहेत. नंतर विष्णुच्या भक्ताला मोक्ष कसा मिळतो या प्रश्नाची चर्चा केली आहे. या ठिकाणीं मृत्यूची देवता यम व त्याचा एक किंकर यांचा एक सुंदर संवाद दिला आहे, त्यांत असें सांगितलें आहे कीं, जो शुध्द अन्त:करणाने पवित्र पुण्याचरण करतो, सतत विष्णुचें ध्यान करतो, तो खरा विष्णुभक्त, व तोच यमपाशांतून मुक्त होतो. याला धरूनच, चार वर्ण व चार आश्रम यांच्या धर्मांचें वर्णन, जन्म-मृत्यूसंस्कार, विधी, प्रायश्चित्तें, नित्ययज्ञ, आतिथ्यधर्म, भोजनसमयींचा आचार वगैरे विषयांवर विवेचन आलें आहे. पुढें श्राध्दकर्माविषयीं सविस्तर विवेचन करून व विष्णुभक्तीचा योग्य मार्ग म्हणजे वैदिक ब्राह्म धर्माचार पाळणें, असें सांगून हा अंश संपविला आहे.

वैदिक धर्माविरूध्द असणारे परधर्मी जे जैन व बौध्द ते अत्यंत घोर पातकी होत, असें वर्णन या अंशाच्या शेवटच्या दोन भागांत केलें आहे. अशा परधर्मी लोकांशी व्यवहार करणें हें केवढें पातक आहे हें दाखविण्याकरतां प्राचीन शतधनु-राजाची गोष्ट दिली आहे.

विष्णुपुराणाच्या चवथ्या अंशात मुख्यत: प्राचीन राजांची वंशावळी, सूर्यापासून निघालेला सूर्यवंश, सोमापासूनचा तो सोमवंश, यांची माहिती आहे. या बहुतेक काल्पनिक, व क्वचित् ऐतिहासिक राजांच्या नामावळीमध्यें मधून मधून एखाद्या राजाची कथा दिली आहे. या सर्व कथांमध्यें अद्भुत चमत्कारच फार भरलेले आहेत. ब्रह्म्याच्या उजव्या आंगठ्यापासून जन्मलेला दक्ष; मागाहून पुरूष बनलेली मनूची मुलगी इला, ब्रह्मदेवानें सुचविलेला नवरा मिळावा म्हणून आपल्या मुलीसह स्वर्गांत गेलेला राजा रैवत आणि स्वत:च गरोदर होऊन पुत्राला जन्म देणारा राजा युवनाश्व; इंद्राचे बोट तोंडांत घालून स्तनपानाप्रमाणें तें चोखणारें बालक, इत्यादि गोष्टी यांत आल्या आहेत.

या अंशात महाकाव्यांतून पूर्वीच आलेल्या अशा पुष्कळ दन्तकथा आहेत, उ. पुरूरवस् आणि उर्वशी, ययाति, इत्यादिकांच्या गोष्टी. श्रीरामकथाहि येथें थोडक्यांत दिली आहे. तसेंच पांडव, कृष्ण यांच्या जन्मकथा आणि थोडक्यांत महाभारतांतील कथाहि दिली आहे. याच्या शेवटीं पुढें होणार्‍या मगध, शैशुनाग, नंद, मौर्य, शुंग, काण्वायन आणि आंध्रभृत्य या राजांबद्दल, आणि त्यांच्यामुळे सुरू झालेल्या भयंकर युगाबद्दल, आणि धर्महीन, नीतिहीन अशा त्या युगाच्या शेवटीं होणार्‍या विष्णुच्या 'कल्की' अवताराबद्दलहि भविष्ये वर्तविलीं आहेत.

पांचव्या अंशांत स्वतंत्रच विषय आहे. यांत गोपाल कृष्णाची सविस्तर कथा दिली आहे. व त्यांत 'हरिवंशात' येणार्‍याच गोष्टीं त्याच क्रमानें सांगितल्या आहेत. सहावा अंश अगदींच लहान आहे. यांत पुन्हां एकदां कृत, त्रेता, द्वापार व कलि या युगांची आठवण देऊन कलियुगांत घडणार्‍या गोष्टीचें भविष्य कथन केले आहे; व त्याला जोडून जगाच्या निरनिराळ्या प्रलयावस्था वर्णन केल्या आहेत.

नंतर नैराश्य- वादित्य पत्करून या जीविताचीं दु:खें, जन्म, बालपण, तरूणपणं, वार्धक्य, मृत्यू यांचे क्लेश, नरकांतील यातना, स्वर्गसुखाची अपूर्णता यांचें वर्णन करून सर्वाचें ताप्तर्य असें काढलें आहे कीं, शाश्वत परमोच्च सुख म्हणजे पुनर्जन्मापासून मुक्ति. पण हें सुख प्राप्त होण्यास देवाविषयीं सम्यकज्ञान झालें पाहिजे, कारण परिपूर्ण ज्ञान असें तेंच; त्यानेंच ईश्वरदर्शन होतें. बाकी सर्व अज्ञान. विष्णुचें ध्यान व योग या मार्गानें तें ज्ञान प्राप्त होतें. शेवटच्या अध्यायापूर्वीच्या दोन अध्यायांत या साधनाचें-विष्णु-भक्तिचें वर्णन आहे. शेवटच्या अध्यायांत सर्व पुराणांचें थोडक्यांत सार दिलें आहे; आणि शेवटीं विष्णुची स्तुति व शेवटची प्रार्थना करून पुराण संपविलें आहे.

संदर्थः - केतकरकोश



GO TOP