श्रीहंसराजस्वामीकृत 'लघुवाक्यवृत्ति' - ग्रंथपरिचय


परंड्याला असताना हंसराजस्वामींनी एका उत्कृष्ट ग्रंथाची रचना केली. तो म्हणजे लघुवाक्यवृत्ती होय, श्री शंकराचार्यांच्या लघुवाक्यवृत्ती नावाच्या एका प्रकरणावरील पदबोधिनी नावाची ही टीका आहे. ही टीका काशीनाथबाबा दीक्षित यांच्यासाठी लिहिली गेली आहे, असे हंसपद्धती सांगते. डॉ. वि. रा. करंदीकरांनी 'आपले पट्टशिष्य रघुनाथशास्त्री गोडबोले यांच्यासाठी हा ग्रंथ स्वामींनी लिहिला' असे म्हटले आहे (मराठी वाङ्‌मयाचा इतिहास खंड ४ था, २ री आ. पृ. ६०८) पण ते बरोबर नाही. स्वामींच्या एकूण ग्रंथांमध्ये याच ग्रंथाला सर्वाधिक लोकप्रियता लाभली. सावंत, गोंधळेकर, आवटे अशा भिन्न भिन्न प्रकाशकांनी तिच्या आवृत्त्या काढल्या आहेत. सावंतांनी किती आवृत्त्या काढल्या हे समजत नाही. गोंधळेकरांची २री आवृत्ती १९१० इ. स. मधली आहे. आवटे यांची तिसरी आवृत्ती १९६६ मधली आहे. याशिवाय या ग्रंथाचा गुजराती भावानुवादही प्रसिद्ध झाला आहे. तो ज्योतिदेवी या साधक स्त्रीने केला असून इ. स. १९५५ मध्ये राजकुमारी आनंदकुवरबा सा. संतरामपूर स्टेट यांनी प्रसिद्ध केला आहे.

शंकराचार्यांची 'वाक्यवृत्ती आणि 'लघुवाक्यवृत्ती' अशी दोन प्रकरणे आहेत. वाक्यवृत्तीचे ५३ श्लोक असून लघुवाक्यवृत्तीचे १८ श्लोक आहेत. दोहोंचा आशप सारखाच आहे. उपनिषदातील १) ज्ञानं ब्रह्म (ऐतरेय), २) अहं ब्रह्मास्मि (बृहदारण्यक), ३) तत्त्वमसि (छान्दोग्य) आणि ४) अयमात्मा ब्रह्म (माण्डूक्य) या चार महावाक्यांपैकी 'तत्त्वमसि' आणि 'अहं ब्रह्मास्मि' या दोन महावाक्यांचे मोठ्या वाक्यवृत्तीत विवरण केलेले असून लघुवाक्यवृत्तीमध्ये 'अहं ब्रह्मास्मि' याच वाक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. या छोट्याशा ग्रंथात ब्रह्मात्मैक्याचे विवेचन आणि त्याच्या प्राप्तीसाठी करावा लागणारा अभ्यास या दोहोंचाही समावेश आहे.

हंसराजस्वामींनी टीकेसाठी हे प्रकरण निवडताना त्याच्या या दोन्ही अंगांचा विचार केला असला पाहिजे.

'अभ्यास आणि विवेचन । केवळ स्पष्ट असे परिपूर्ण ।
अष्टादश श्लोकही सघन । ब्रह्मात्मरसें भरले । । (वाक्य. ५५९१)


असे त्यांनी लघुवाक्यवृत्ती या आचार्यांच्या प्रकरणाबद्दल म्हटले आहे. त्यांच्या मते चारी वेदांचा अर्थ चार महावाक्यांत सामावलेला आहे, आणि तोच शंकराचार्यांनी या अठरा श्लोकांच्या छोट्याशा प्रकरणात सांगितला आहे. (वाक्यवृत्ती ५४८१-५४८२) शंकराचार्यांनी वेदान्ताची प्रतिष्ठापना करण्यासाठी प्रस्थानत्रयीवर भाष्यग्रंथ लिहिले, पण आकाराने मोठे असलेले हे ग्रंथ सामान्य लोकांच्या आटोक्याबाहेरचे आहेत, हे जाणून त्यांनी सदाचारादी प्रकरणग्रंथ लिहिले, असे सांगून स्वामी म्हणतात,

"सान ग्रंथ म्हणोनि कधी । अर्थ सान नसे त्रिशुद्धी ।
वाक्यार्थरूप वाक्यांची प्रसिद्धी । सर्वामाजी सारिखी । (५५८७)
त्यामाजी ही लघुवाक्यवृत्ती । चहूं सार अनुभूती ।
विवेचन आणि अभ्यास रीती । बहू स्पष्ट येथे असे ॥" (वाक्यवृत्ती) (५५८८)


सदाचार इ. ग्रंथ उत्तम अधिकाऱ्यांना उपयुक्त असून वाक्यवृत्ती मात्र मंद अधिकाऱ्यांना उपयुक्त आहे, असे स्वामी म्हणतात. (वाक्यवृत्ती ५५८९-५५९०)

या ग्रंथाला वाक्यवृती असे नाव का देण्यात आले. त्याबद्दलचे स्वामींचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे :

"चहू वेदांची वाक्ये चार । यांचा अर्थ तो एक साचार ।
की जीवब्रह्मैक्य निर्धार । हा विषय वेदान्तींचा ॥ ३४॥
त्यांत उपदेशवाक्य तत्त्वमसि । तें विचारूनि घ्यावें गुरूसी ।
मग अहं ब्रह्मास्मि या वाक्यासी । वृत्तीने दृढ करावें ॥३५॥
मी ब्रह्म आत्मा स्वतःसिद्ध । एकरूप असंग अभेद ।
ओळखून घेई प्रमाद । देहबुद्धीचा सांडुनी ॥३६॥
हेचि 'अहं ब्रह्मास्मि' निश्चिती । वाक्यार्थाची जे अनुभूती ।
ऐशी वृत्ति ते वाक्यवृत्ति । हा वृत्तीसी अभ्यास ॥३७॥ (वाक्य, ३४-३७)


'अहं ब्रह्मास्मि' या वाक्याचा खरा अर्थ जाणून त्याची वृत्तीच्या साहाय्याने प्रत्यक्ष अनुभूती म्हणून जी साधना करावयाची ती शंकराचार्यांच्या प्रकरणाच्या अनुषंगाने हंसराजस्वामींनी येथे सांगितली आहे. या टीकेचे नाव 'पदबोधिनी' असे असले तरी ती केवळ प्रतिपद टीका नाही. हे तिच्या विस्तारावरूनच समजते. मूळ अठरा श्लोकांच्या या प्रकरणाचा स्वामींनी एकूण ५६०० ओव्यांत विस्तार केला आहे. हा विस्तार भाष्यस्वरूप आहे. स्वामींनी या भाष्यात मूळ श्लोकाचा नाममात्र आधार घेऊन वेदान्ताचे सारे शास्त्र तपशीलवार सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच हंसपद्धतीचे प्रस्तावनाकार श्री. पारखेशास्त्री या ग्रंथाला 'सर्व सिद्धान्त संग्रह' असे म्हणतात.

मूळ लघुवाक्यवृत्तीमध्ये प्रथम तीन देह व त्यात असणारा जीव यांची स्वरूपे सांगितली आहेत. आत्मा हा त्या सर्वाहून वेगळा असून तो तिन्ही देह व त्यांच्या तिन्ही अवस्था यांना व्यापून असतो. जागृती आणि स्वप्न या अवस्थांमध्ये त्याचे अस्तित्व जाणवत नाही. कारण या दोन अवस्था जीवाच्या विशेष प्रकाशाने भासमान झालेल्या असतात. सुषुप्तीत जीवाचा लोप झाल्यामुळे तेथे केवळ आत्मप्रकाश असतो. जागृतीमध्येही विकल्परहित अवस्थेमध्ये आत्मप्रकाशाचे अस्तित्व अनुभवास येते. या विवेचनानंतर ह. आत्मप्रकाश कळण्यासाठी कोणती साधना करावी हे शंकराचार्य सांगतात.

ही विकल्परहित अवस्था प्राप्त करण्यासाठी शंकराचार्यांनी दोन विकल्पांच्या संधीचे निरीक्षण करण्याचा अभ्यास सांगितला आहे. हा अभ्यास हळूहळू वाढवत न्यायचा असतो. पूर्ण निर्विकल्प साधणे म्हणजे समाधिअवस्था प्राप्त होणे होय. ही समाधी योग्यांना अत्यंत प्रिय असते. अशा समाधीमध्ये साधकाला ब्रह्मात्मत्वाचा अनुभव येतो. त्याची आरंभीची देहात्मत्वाची अवस्था जाऊन ब्रह्मात्मत्वाची अवस्था येते. ही अवस्था दृढ झाली की, साधक मुक्तच होतो. अशी साधना सांगितल्यानंतर शंकराचार्यांनी वाक्यवृत्तीचा समारोप केला आहे.

या छोट्याशा बीजभूत आशयाचे स्वामींनी ५६०० ओव्यांच्या विस्तृत वटवृक्षात रूपांतर केले आहे. खरे तर ती एक स्वतंत्रच मांडणी आहे. हंसराज स्वामींनी मूळ ग्रंथातील तत्त्वज्ञान आणि अभ्यास या द्विविध विषयांच्या अनुषंगाने या ग्रंथाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केले आहेत. पूर्वार्धात एकूण २८७५ ओव्या असून पहिल्या दहा श्लोकांवरील भाष्याचा त्यात समावेश आहे. उत्तरार्धात बाकीच्या आठ श्लोकांवरचे भाष्य असून त्याच्या एकूण २७२५ ओव्या आहेत.

शंकराचार्यांचा मूळ ग्रंथ खूप संक्षिप्त असून सूत्रमय आहे. स्वामींनी त्याच्यावर भाष्य करताना मूळ ग्रंथात नसलेल्या पण विषयाच्या पूर्ण आकलनाला आवश्यक अशा कितीतरी विषयांची त्यात भर घातली आहे किंवा सूत्रमय आशयाचा स्पष्टीकरण रूपाने विस्तार केला आहे. पहिल्याच श्लोकामध्ये 'स्थूलो मांसमयो देहः' असे सूत्र आहे. स्वामींनी त्याचा विस्तार करताना वेदान्तातील विश्वनिर्मितीची सर्व प्रक्रिया स्पष्ट केली आहे. मूळ ग्रंथात 'रूपादौ गुणदोषाभ्यां विविक्ता केवला चितिः' (श्लोक ८ वा) असे सूत्र आहे. आत्मतत्त्व हे नामरूपे व त्यांचे गुणदोष यांहून भिन्न आहे. या कल्पनेचा विस्तार स्वामींनी १४९३ ते २३१५ या ८२३ ओव्यांत केला आहे. त्यात वेदान्तातील आत्मानात्मविवेक निरनिराळ्या प्रकारांनी त्यांनी मांडला आहे. त्यात सर्व विश्वाचे ईश्वरसृष्ट व जीवसृष्ट असे विभाग पाडून आत्मस्वरूपाहन ते कसे भिन्न आहेत, हे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे विश्वाची ३२ तत्त्वांत विभागणी करून त्या सर्वाहून आत्मतत्त्वाचा वेगळेपणा स्पष्ट केला आहे. त्याच निमित्ताने पंचकोशांचीही स्वामींनी चर्चा केली आहे. अशा त-हेने वेदान्तातील सत्य-मिथ्या, नित्य-अनित्य अशा दोन पदार्थाची भिन्न भिन्न प्रकारांनी स्वामींनी मांडणी केली आहे. त्या निमित्ताने या विषयासंबंधीची वेदान्ताची सर्व प्रक्रिया त्यांना स्पष्ट करणे शक्य झाले आहे. हा विस्तार करताना आपण हे विषयान्तर करत नसून मूळ पदातच हा विषय सूचित झाला आहे, असेही स्वसमर्थन ते मधून मधून करताना आढळतात. मूळ श्लोकामध्ये (८ वा श्लोक) पंचकोशांचे विवेचन नसताना आपण हे विवेचन का करता?' असा आक्षेपकाचा प्रश्न उपस्थित करून स्वामी उत्तर देतात"चित्प्रभा ही पंचकोशात्मक बत्तीस तत्वांहून वेगळी आहे असे श्लोकपदातच सूचित केले आहे. मी वेगळे काही निरूपण करत नाही.' (वाक्यवृत्ती २१४२-२१४९)

मूळ ग्रंथात शंकराचार्यांनी केवळ विकल्प संधींचा अभ्यास करावा असा साधनमार्ग सांगितला आहे. (श्लोक ९ ते १६) पण मंदप्रज्ञाला एवढे ज्ञान पुरत नाही व ते संदिग्ध आहे. म्हणून स्वामींनी कापूस पिंजावा तसा या अभ्यासमार्गाचा विस्तार केला आहे. प्रथम उघड्या डोळ्यांनी पदार्थ पाहात असता त्यांचे संधी पाहावेत, नंतर डोळे मिटावेत व उठणाऱ्या विकल्पांच्या संधींवर लक्ष केंद्रित करावे; या संधींच्या अभ्यासाला ज्ञातता आणि अज्ञातता या दोन्ही अवस्थांच्या अभ्यासाची जोड द्यावी; असा हा अभ्यास क्षणाक्षणांनी वाढवीत जावा, इ. मार्गदर्शन स्वामींनी तपशिलाने केले आहे. हा अभ्यास करत असता विक्षेप, लय, कषायादी विघ्ने येतात त्यांच्यावर मात करून पूर्ण निर्विकल्पस्थिती साध्य करून घ्यावी; पण ही निर्विकल्पस्थिती प्रारंभी स्थिर राहू शकत नाही. तेव्हा उत्थानस्थितीत ज्ञात्याचा आचार कसा असावा इ. आवश्यक अशा मुद्द्यांचे सविस्तर विवेचन स्वामींनी केले आहे. या सर्व विवेचनाला मुळात केवळ नाममात्र आधार आहे. पण स्वामींनी केलेला त्याचा विस्तार साधकाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.

असा विस्तार करताना स्वामींनी मुळात नसलेल्या शंकराचार्य आणि रविदत्त अशा गुरुशिष्यांच्या व्यक्तिरेखा निर्माण करून त्यांच्या संवादातून संपूर्ण ग्रंथाचे निरूपण केले आहे. असे करण्याने ही सबंध चर्चा जिवंत झाली आहे. त्यातून गुरुशिष्यांचे संबंध स्पष्ट होतात. त्याचप्रमाणे अज्ञानावस्थेतून मोक्षदशेपर्यंत प्रवास करणाऱ्या संवेदनाक्षम मनाची विविध अवस्थांतून होणारी स्पंदने दाखवून ग्रंथात सूक्ष्म नाट्य निर्माण केले आहे. रविदत्ताला त्याच्या योग्यतेनुसार आचार्य त्याला टप्प्याटप्यांनी उपदेश करत आहेत. प्रत्येक टप्प्यावर थांबून त्याची तयारी कितपत झाली आहे, याचा अंदाज घेत घेत त्यांचे निरूपण चालले आहे. हे सर्व निरूपण म्हणजे शिक्षकांनी पाठ्य विषयाची मांडणी कशी करावी याचा वस्तुपाठच आहे. रविदत्ताला जे सांगितले ते त्याच्या कितपत पचनी पडले हे ते चाचपून पाहात आहेत, त्याच्याकडून आलेला अनुभव पुन्हा पुन्हा वदवून घेत आहेत, तो चुकतो आहे असे दिसताच त्याला परत सावध करत आहेत, त्याच्या शंकांचे योग्य प्रकारांनी निरसन करत आहेत, एका मार्गावर त्याची गती चालत नाही, असे पाहाताच त्याला झेपेल असा दुसरा मार्ग सुचवत आहेत. अशा त-हेने तो 'पावला पूर्ण समाधानी । चरमस्थिती ज्ञात्याची॥ (५५७१) अशी खात्री होईपर्यंत ते त्याचा पाठपुरावा करत आहेत, अशा त-हेने गुरुशिष्य संबंधाचे एक वेगळे वातावरण स्वामींनी येथे निर्माण केले आहे. अर्थात ते हे सांगायला चुकत नाहीत, की येथे रविदत्त हे एक उपलक्षण असून त्याच्या निमित्ताने त्याच्यासारख्या सर्व मंदप्रज्ञ अधिकाऱ्यांसाठी हा उपदेश आहे. 'चातकासाठी वर्षे घन । परी सर्वासीच होय जीवन । तेवीं रविदत्ताचे निमित्तेकडोन । सर्वही अवधारा॥' (वाक्यवृत्ती ४९) अशा त-हेने रविदत्त आणि शंकराचार्य यांच्यातील संवादाच्या साहाय्याने स्वामींनी वेदान्तासारखा रूक्ष विषय जास्तीत जास्त आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला आहे.

पण आकर्षकतेपेक्षा स्वामींचा मुख्य भर ग्रंथ सुगम करण्याकडे आहे. स्पष्टीकरणासाठी ते काव्यमय दृष्टान्तांच्या नादी लागत नाहीत. संदर्भाला आवश्यक तेवढेच व योग्य तेवढेच दृष्टान्त ते निवडतात. एकदा एक दृष्टान्त श्रोत्यांच्या मनावर ठसला म्हणजे पुढच्या विवेचनात सुद्धा त्या दृष्टान्ताचा ते पुन्हा पुन्हा आधार घेतात. त्यामुळे श्रोत्यांच्या मनात कोणताही गोंधळ न राहाता विषयाचे स्वरूप पक्के ठसते. उदा. वृक्षस्थाचा दृष्टान्त. वृक्षावर बसून त्याखालच्या नदीच्या पाण्यात आपले प्रतिबिंब पाहणाऱ्या माणसाला आपणच पाण्यात पडलो आहोत, असे वाटले व तो भीतीने ओरडू लागला. एका त्रयस्थाने त्याला 'तू पाण्यात पडलेला नसून सुरक्षित आहेस, तुझं प्रतिबिंब पाण्यात पडलेले आहे आणि तो केवळ भास आहे' असे सांगितले. त्याप्रमाणे उपाधींच्या योगाने आत्म्याला जीवावस्था येऊन तो सुखदुःखे भोगत असल्यासारखा दिसतो, पण वास्तविक पाहता आत्मा विकारातीत असतो, हे स्वामींना या दृष्टान्ताद्वारे सांगावयाचे आहे. (वाक्यवृत्ती ४०५-४१७) अशाच त-हेचा दशमाचा दृष्टान्त (वाक्यवृत्ती ४२२१-२४) हा स्वामींचा फार आवडता दृष्टान्त आहे. तसेच आत्म्याच्या सामान्य ज्ञानाचे वर्णन करताना स्वामी सूर्याचा सामान्य प्रकाश, विशेष प्रकाश यांचे वर्णन करणारा सूर्य, आरसा, भिंतीवरील कवडसा इ.चा दृष्टान्त देतात. त्याचाही उपयोग उल्लेख अनेक ठिकाणी करतात.

शिक्षकाची भूमिका घेतल्यामुळे शिष्याला समजेपर्यंत शिकविणे हे स्वामींनी ध्येय मानलेले दिसते. त्यामुळे अनेक वेळा पुनरुक्ती झालेली दिसते. कधी शिष्याला झालेल्या ज्ञानाची उजळणी करून घेण्याच्या निमित्ताने (२७००-२७६५), कधी आढावा घेण्याच्या निमित्ताने (३१६०-३१९२), कधी पुढील निरूपणाला आधार म्हणून (३२१३-३२१७) स्वामी पुनरावृत्ती करतात. ही सर्व पुनरावृत्ती जाणीवपूर्वक केलेली असते. मिथ्याभूत सृष्टीची ३२ तत्त्वे स्वामींनी कल्पिलेली आहेत. प्रथम स्वामी त्या तत्त्वांचे स्वरूप सांगतात (१४९१-१५७५), नंतर त्यांच्या धर्माचे निरूपण करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांची यादी सांगतात (१५६३१६३५), या तत्त्वांहून ब्रह्म भिन्न आहे, हे स्पष्ट करण्यासाठी आणखी एकदा त्या तत्त्वांची नोंद होते (१६५७-१७२२), या मिथ्याभूत तत्त्वांच्या धर्माहून ब्रह्म भिन्न आहे, हे सांगण्यासाठी आणखी एकदा त्यांची पुनरावृत्ती होते (१७५०-१८१३) आणि या तत्त्वांच्या निस्तत्त्वपणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांचे तपशीलवार वर्णन (२३१७-२३५७) स्वामी करतात, अशा त-हेने या बत्तीस तत्वांच्या यादीची अनेकवेळा पुनरावृत्ती झाली आहे. पण प्रत्येक वेळी ती वेगवेगळ्या संदर्भात होत असल्याने जाणवत नाही. एरवी ती कंटाळवाणी झाली असती.

या ग्रंथाचा एक आल्हादकारक विशेष म्हणजे शुद्ध वेदान्ताच्या भूमिकेवरून अनेक परंपरागत विचारांचा स्वामींनी केलेला ऊहापोह. अशा वेळी स्वामी तर्काला पटेल अशाच मतांचा पुरस्कार करतात, परंपरागत समजुतींना धक्के देतात. 'वेद हे आदिनारायणाचे निःश्वास होत किंवा ब्रह्मदेवाने ते निर्माण केले' या समजुतीवर त्यांनी टीका केली आहे आणि वेदनिर्मितीची स्वतंत्र उपपत्ती मांडली आहे. साकार एकदेशी देव मिथ्या असल्यामुळे तो वेद निर्माण करणार नाही. वेद निर्माण करणाऱ्या ईश्वराला निःश्वासादी एकदेशी तत्त्वाचे धर्म लागू नाहीत, वेद हे प्रणवस्वरूप असून प्रणव म्हणजेच परब्रह्माचे मूलस्फुरण होय. त्या मूलस्फुरणापासून अकारादी मातृका निर्माण होऊन त्यापासून शब्दब्रह्माचा विस्तार झाला, अशा त-हेची व्यापक भूमिका त्यांनी मांडली आहे. (१२४७-१२८०) तसेच ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, हे मत त्याज्य ठरवून सृष्टीचा निर्माणकर्ता ईश्वरच असून ब्रह्मदेव फक्त संकल्पाचा धनी आहे, असे सांगितले आहे (१२८८-१३१२). काही वेदान्तग्रंथांत सुषुप्तीच्या पलीकडची तुर्यावस्था अशी चौथी अवस्था मानून तिच्यासाठी महाकारणदेह असा देहाचा चौथा प्रकार मानण्यात आला आहे. स्वामींनी या विचाराचे खंडन करून फक्त तीनच देह मानले आहेत. (२२००-२२४०).

क्वचित स्वामी पारंपरिक विचारसरणीतील विसंगतीवर पांघरूणही घालताना दिसतात. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांचे क्रमशः सत्त्व, रज आणि तम असे गुण मानण्यात येतात. पण समष्टीतील याच अवस्थांचे वर्णन करताना विष्णू ही स्वप्नावस्थेची अभिमानी देवता मानली आहे. पण विष्णू तर सत्त्वगुणी आहे. ही उघड विसंगती आहे. पण स्वामी म्हणतात, "असो मिथ्यासी कोणतेही बोलता । विरोध न कल्यावा चित्ता । ज्या समयी जो प्रसंग अपेक्षिता । मगजलवत् बोलावे॥" (वाक्यवृती २२०२). म्हणजे मिथ्या तत्त्वांच्या विवेचनात अशी विसंगती क्षम्य आहे. असे त्यांचे मत दिसते.

वाक्यवृत्ती हा ग्रंथ स्वामींच्या सर्व ग्रंथांत लोकप्रिय असून त्यातील अभ्यास निरूपण हे त्या लोकप्रियतेचे मुख्य कारण होय. संपूर्ण मराठी वाङ्गयात हे अभ्यास निरूपण अपूर्व आहे. हे निरूपण म्हणजे हंसराजस्वामींनी मराठीतील तात्विक वाङ्याला दिलेली अमोल देणगी आहे. खुद्द हंसराजस्वामींच्या काळातही या ग्रंथाच्या या वैशिष्ट्याची जाणीव त्यांच्या शिष्यवर्गात होती. म्हणून हंसपद्धतीत या ग्रंथाबद्दल खूप गौरवपूर्ण उद्गार आढळतात. उदा. "अद्भूत निरूपण वाक्यवृत्तीचे । काय हो अभ्यास स्पष्टतर साचे । ऐसे कोठे कोणे बोलिले न वचे । भूत भावी की वर्तमानी ।" (हं. प. १२.५.१०७). स्वामींचे पट्टशिष्य रघुनाथशास्त्री गोडबोले वाक्यवृत्तीसंबंधी म्हणतात, "(स्वामींचे) सर्व ग्रंथ वाचण्यास सवड नसल्यास स्वामींचा 'वाक्यवृत्ती' हा एकच ग्रंथ वाचला व कृतीत उतरविला तरी जन्माचे सार्थक होईल." स्वामींच्या हयातीनंतरही आजसुद्धा वाक्यवृत्तीची अशीच प्रसिद्धी आहे. श्री. पारखेशास्त्री यांनी वाक्यवृत्तीचा 'भाषासौंदर्याने नटलेला, श्रुतिसंमत तर्कावर आधारलेला, आत्मानात्मविचारसरणीने थाटलेला, अभ्यासाच्या युक्त्या-प्रयुक्त्यांनी भरलेला व समर्पक उपमा दृष्टान्तांनी शृंगारलेला असा ग्रंथ" अशा शब्दांत गौरव केला आहे. श्री. न. र. फाटक म्हणतात, "वेदान्त विषयाचा हंसराजांचा किती गाढ अभ्यास होता, या संबंधाचे अनुमान त्यांची वाक्यवृत्तीवरील टीका वाचताना सहज गळी उतरते. मूळचा विषय सुबोध नाही. परंतु हंसराजांची तो जिज्ञासूंच्या गळी उतरविण्याची शैली सुबोध आहे यात संशय नाही." (वाक्यवृत्ती प्रस्तावना, आवटे प्रत) श्री. श्रीपादशास्त्री किंजवडेकर म्हणतात, "केवल तत्त्वज्ञानच नव्हे तर साधनामार्ग सांगणारा हा ग्रंथ म्हणूनच साधकांना सदैव दीपस्तंभासारखा पथप्रदर्शक ठरेल, असा आम्हांला पूर्ण भरवसा वाटतो." (वाक्यवृत्ती प्रास्ताविक - आवटे प्रत). डॉ. वि. रा. करंदीकर म्हणतात, "आध्यात्मिक विषयावर जुन्या मराठीत विपुल लेखन झालेले असले तरी तत्त्वज्ञानातील सिद्धान्तांचे तर्कशुद्ध पद्धतीने नटलेले असे ग्रंथ फार थोडे आढळतात. अशा ग्रंथात हंसराजांच्या लघुवाक्यवृत्ति टीका या ग्रंथाचा क्रम बराच वरचा लागेल." (मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड चौथा, आ. २ री, पृ. ६१२)

अशा त-हेने अनेक मान्यवरांनी हा ग्रंथ गौरविलेला आहे. स्वामींनी तो मंदप्रज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी लिहिला, अत्यंत सुबोध शैलीने सादर केला, चपखल दृष्टान्तांनी सजविला. तथापि वेदान्तात रस असणाऱ्या जिज्ञासू वृत्तीच्या श्रद्धाशील वाचकालाच त्याची गोडी समजू शकेल, अन्य वाचकांना नव्हे, हे मात्र मान्य केलेच पाहिजे."

- कल्याण काळे.

GO TOP