॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. १३ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोकः सविकल्पकजीवोऽयं ब्रह्म स्यान्निर्विकल्पकं ।
अहं ब्रह्मेति वाक्येन सोऽयमर्थोऽभिधीयते ॥ १३ ॥
श्लोकार्थ : हा जीव सविकल्पक असून तोच विकल्परहित ब्रह्म असतो. हाच अर्थ 'अहं ब्रह्माऽस्मि' या वाक्याने स्पष्ट होतो. ॥१३||

टीका : सविकल्पक जीव हा खरा । जो वाउगा मायेस्तव भास दुसरा ।
ब्रह्मात्मा निर्विकल्प निर्धारा । मायातीत अनंत ॥ ९८ ॥
जीव हा मुळात सविकल्प आहे. तो मायेमुळे दुसरा आहे असा भास होतो. ब्रह्मात्मा मायातीत आणि अनंत असा आहे. तो निर्विकल्प आहे. (३५९८)

हाचि अर्थ महावाक्य सांगे । अहंब्रह्मास्मि में निजांगें ।
तस्मात् साधकं विचारून लागवेगें । अभिन्नता वरावी ॥ ९९ ॥
'अहं ब्रह्माऽस्मि' हे महावाक्य हाच अर्थ सांगते तेव्हा साधकाने विचार करून ताबडतोब अभेदाचा स्वीकार करावा. (३५९९)

प्रथम जीवाचे रूप कैसें । कोठोनी कोठवरी असे ।
तें विचारें त्यागून आपैसें । अहंब्रह्म निश्चय व्हावा ॥ ३६०० ॥
प्रथम जीवाचे स्वरूप कसे आहे, ते कोठून कोठपर्यंत आहे. हे जाणन घेऊन त्याचा विचाराने त्याग करून आपणच ब्रह्म आहोत असा निश्चय करावा. (३६००)

चरण : सविकल्पक जीवोऽयं ॥ १३ ॥
चरणार्थ : हा जीव सविकल्पक आहे. ॥१३॥

पूर्वी विक्षेपाचे केलें रूप । तोचि विकारी जीवसंकल्प ।
उठोनियां निमतसे अल्प । खद्योतापरी ॥ १ ॥
पूर्वी विक्षेपाचे स्वरूप सांगितलेले आहे. तोच विकारी असा जीवसंकल्प होय. तो उठतो आणि लगेच काजव्याप्रमाणे नाहीसाही होतो. (३६०१)

वृत्ति उठतां मनबुद्धि उठती । इंद्रियद्वारा विषयी आदळती ।
त्यांत प्रतिबिंबून आभास चिती । किंचित् प्रकाश करी ॥ २ ॥
वृत्ती उत्पन्न होताच मन व बुद्धी ही देखील उत्पन्न होतात, आणि इंद्रियाच्या मार्गांनी विषयावर आदळतात. त्यात प्रतिबिंबित होऊन चिदाभास जीव किंचित प्रकाश निर्माण करतो. (३६०२)

मन तें होय नव्हे करित । अमुक वस्तु हे बुद्धि स्थापित ।
दोहींच्या अनुकारें चिंतितें चित्त । मी स्फुरे तो अहंकारु ॥ ३ ॥
मन, अमुक पदार्थ आहे की नाही, या संशयवृत्तीत अडकून पडते, बुद्धी हा पदार्थ अमुकच आहे असा निश्चय करते, आणि या दोहोंच्या अनुकरणाने चित्त चिंतन करते, आणि 'मी' असे स्फुरण होणे हाच अहंकार होय. (३६०३)

तेथे पाहतां पदार्थ दोन । एक चंचळ दुजे भासचेतन ।
त्या दोहींचे प्रकार विभागून । चतुर्धा जाहले ॥ ४ ॥
येथे खरे पाहता दोनच पदार्थ आहेत. एक चंचल आणि दुसरे भासचैतन्य. त्या दोन्हींचे विभागून चार प्रकार झाले. (३६०४)

मन बुद्धि चित्त अहंकार । चंचलत्व तितुका वृत्तिविकार ।
यासी स्फुरविता असे जो प्रकार । जीव चैतन्याचा ॥ ५ ॥
जेवढे म्हणून वृत्तीचे विकार आहेत, ते सर्व चंचलाचे प्रकार आहेत. त्यामध्ये मन, बुद्धि, चित्त, अहंकार हे अंतःकरण चतुष्टय समाविष्ट आहे यांना स्फुरविणारे तत्त्व म्हणजे जीवचैतन्य होय. (३६०५)

उभय मिळून एक संकल्प । हाचि जीव विकारी रूप ।
उठोनियां निमतसे अल्प । गगनीं जेवीं विद्युल्लता ॥ ६ ॥
हे वृत्तिविकार आणि जीवचैतन्य दोन्ही मिळून एक संकल्प होतो. हाच विकारीरूप जीव होय. हा उत्पन्न होतो आणि आकाशातील विजेप्रमाणे अल्पकाळ लखलखतो आणि लगेच मावळतो. (३६०६)

उठतांचि पदार्थ लखलखिती । अंधकारांत पडे दीप्ती ।
निमिष्यामाजीं होतसे समाप्ति । पुढें अधिक अंधार ॥ ७ ॥
तो उत्पन्न होताच पदार्थ लखलखतात. त्यामुळे अंधारात तेज चमकते पण एका निमिषात त्या दृश्याची समाप्ती होते आणि नंतर अंधार अधिकच वाढतो. (३६०७)

तैसा जीव संकल्प उठतां । अमुक अमुक पाहे पदार्थजाता ।
इतुकेंही स्फुरवून मागुता । निमिष्यांत लय होय ॥ ८ ॥
त्याप्रमाणे जीव संकल्प उत्पन्न होताच अमुक तमुक पदार्थ पाहतो. त्या सर्वांना स्फुरवून (प्रकाशित करून परत एका निमिषात लय पावतो. (३६०८)

हे काय हो होय की नव्हे । हे प्रिय द्वेष्य की उपेक्ष्य नुमजावें ।
हेचि मन संशयी पडावें । बहु वेळ उठतांही ॥ ९ ॥
हे काय आहे हो? हे तेच आहे का? की ते नाहीच? हे प्रिय समजायचे की द्वेष्य, काहीच कळत नाही, यालाच मनाचे संशयात पडणे म्हणतात. तो अनेक वेळा उत्पन्न झाला तरी असेच घडते. (३६०९)

जोवरी बुद्धि निश्चय करीना । तोंवरी उठे निमे क्षणक्षणां ।
परी संशयात्मकता जाईना । जीवस्फुरण असतांही ॥ १० ॥
जोपर्यंत बुद्धी निश्चय करत नाही, तोपर्यंत तो जीवसंकल्प क्षणाक्षणाला उठतो आणि लय पावतो; पण त्याचे जीवस्फुरण असतानाही त्याची संशयात्मकता जात नाही. (३६१०)

तैसेंचि संशयें उठोनि मत । तेंचि मन परी चिंतन जें होत ।
तया नांव ठेविलें चित्त । जें मनाचे रूप दुजें ॥ ११ ॥
संशयाने उठते ते मन. पण वारंवार उत्पन्न होत असल्यामुळे त्याला जे चिंतन घडते, त्यामुळे त्यालाच चित्त असे नाव दिले. ते मनाचे दुसरे रूप होय. (३६११)

पुढे अमुक हा पदार्थ असे । ऐसा बुद्धि निश्चय करीतसे ।
तेव्हां संशयात्मकता नासे । चिंतनासहित ॥ १२ ॥
त्यानंतर हा अमुक अमुक पदार्थ आहे, असा बुद्धी निश्चय करते. तेव्हा त्या मनाची संशयात्मकता त्याच्या चिंतनासहित नष्ट होते. (३६१२)

हे प्रिय खरें तें अंगीकारावें । हे द्वेष्य तें वाटे निपटून जावें ।
हे उपेक्ष्य तें व्यर्थ उपेक्षावें । जें प्रिय ना द्वेष्य ॥ १३ ॥
हे प्रिय आहे. त्याचा स्वीकार करावा, हे द्वेष्य आहे, त्याचा संपूर्ण नाश व्हावा, हे उपेक्षणीय आहे. त्याची उगीच उपेक्षा करावी. कारण ते प्रियही नाही आणि द्वेष्यही नाही. (३६१३)

हा जाणिजे अहंकार । जो बुद्धीचा दुजा प्रकार ।
एवं विकार हे जीवाचे चत्वार । क्षणक्षणां होती ॥ १४ ॥
त्यालाच अहंकार म्हणतात. हा बुद्धीचाच दुसरा प्रकार होय. अशा त-हेने हे मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार असे जीवाचे विकार होत. ते क्षणाक्षणाला होत जात असतात. (३६१४)

हे प्रियकर पदार्थ माझे । येर हे असती दुजे तुझे ।
ऐसें साभिमानें घेतलें वोझें । या विकल्परूप जीवाने ॥ १५ ॥
हे प्रियकर पदार्थ ते सर्व माझे आहेत. त्या व्यतिरिक्त हे जे दुसरे पदार्थ आहेत, ते तुझे आहेत. अशा प्रकारचे हे अभिमानाचे ओझे हा विकल्परूप जीव आपल्या माथ्यावर बळेच घेतो. (३६१५)

हे माझें माझें म्हणावया । प्रयोजन असे शिष्यराया ।
आपण कोण हे नोळखोनियां । देहातें मी म्हणे ॥ १६ ॥
अरे शिष्यराया, त्या पदार्थांना तो माझे का म्हणतो याच्यामागे एक कारण आहे. आपण कोण हे न ओळखता तो देहालाच 'मी' मानून बसलेला असतो. (३६१६)

अहंकारादि देहापर्यंत । हे वेगळाले नेणें समस्त ।
हा इतुकाही मीच भावित । सहित धर्मधर्मी ॥ १७ ॥
अहंकारापासून देहापर्यंत हे सर्व पदार्थ वेगळे आहेत. हे त्याला कळत नसते. हा सगळा संघात आणि त्यातील धर्म, धर्मी हे सर्व मीच आहे, अशी तो कल्पना करतो. (३६१७)

हे सर्व मागें निरूपण । जाहलें असे विस्तारेंकडून ।
या सर्वांसी मी एक म्हणून । बैसला बळे ॥ १८ ॥
हे सर्व मागे विस्ताराने सांगितलेले आहे या सर्व पदार्थांना बळेच 'मी' म्हणून तो बसतो. हाच अहंकार होय. (३६१८)

जाति वर्ण आश्रम सारे । सुंदर वोखटे साचोकारे ।
मीच म्हणून जो हुंबरे । या नांव मीपण ॥ १९ ॥
जात, वर्ण, आश्रम हे सर्व; सुंदर, वाईट, खरे, खोटे हे सर्व मीच असे म्हणून तो हंबरत असतो. यालाच मीपणा म्हणतात. (३६१९)

एवं देह मी आणि हे हे माझें । घेऊन बैसला दृढतर वोझें ।
हाचि विश्वाभिमानी बुझे । जागृति व्यापारी ॥ २० ॥
अशा प्रकारे देह मी आहे आणि हे सर्व माझेच आहे, अशा समजुतीचे जड ओझे तो आपल्या माथ्यावर घेऊन बसतो. हाच जागृतीमधला विश्वाभिमानी होय, हे ध्यानात घे. (३६२०)

मनबुद्ध्यादि जीवासहित । हे क्षणक्षणां उठोनि मावळत ।
परी मीपणाचा नोव्हेचि घात । हे मावळती जरी ॥ २१ ॥
जीवासहित मन आणि बुद्धी हे क्षणाक्षणाला उठतात आणि मावळतात. पण ते मावळले तरी त्याच्या मीपणाचा नाश होत नाही. (३६२१)

ह्मणोनि जीवत्व कदां मरेना । की विकल्पाभावी असे मीपणा ।
जोवरी उत्पत्ति नसे ज्ञाना । तोंवरी असे ॥ २२ ॥
म्हणून जीवत्व कधीच मरत नाही. तसेच मीपणा विकल्पांच्या अभावी असत नाही. (म्हणजे मीपणा असेल तेथे विकल्प असणारच.) जोपर्यंत ज्ञान उत्पन्न होत नाही, तोपर्यंत हे सर्व राहणारच, (३६२२)

तेचि मनबुद्धि इंद्रियांवांचून । स्वतां भास विषयांते कल्पून ।
अंतरी व्यापारती तें स्वप्न । जागतिसंस्कारें ॥ २३ ॥
जागृतीतील तीच मन आणि बुद्धी इंद्रियांवाचून आभासमान विषयांची कल्पना करून अंतरात व्यापार करत असतात. तेच स्वप्न होय. स्वप्नावस्था म्हणजे जागृतीचेच संस्कार घेऊन येते. (३६२३)

तेथील भासविषयातें पाहे । आणि भासरूप एक आपण आहे ।
तोचि सुखदुःखातें लाहे । प्रविविक्त भोगें ॥ २४ ॥
तेथील तैजस अभिमान आभासमान विषयांना पाहतो, आणि भासणारे सर्व स्वतःशी एकरूप असल्याचे त्याला वाटत असते. त्यांच्यापासून होणारी सुखे आणि दुःखे त्याला प्राप्त होतात. तोच त्याचा प्रविविक्त भोग होय. (३६२४)

आणि मागें केलें पुढे करणार । पापपुण्यादि अवघा प्रकार ।
त्यापासून जो सुखदुःख विकार । तयाचाही मी भोक्ता ॥ २५ ॥
मीच मागे केले. मीच ते पुढेही करणार आहे. मीच पाप, पुण्य इत्यादी करणार आहे. त्यांपासून होणारी सुखे, दुःखे, इतर सर्व विकार इ.चा मीच भोक्ता आहे. (३६२५)

एवं कर्ता भोक्ता सर्व कर्मांचा । तोचि तैजस अभिमानी साचा ।
सूक्ष्म देही या विकल्पाचा । उभारा असे ॥ २६ ॥
अशा प्रकारे सर्व कर्माचा कर्ता, भोक्ता तोच तैजस अभिमानी होय. स्वप्नावस्थेतील सूक्ष्म देहात या विकल्पाची प्रवृत्ती (उभारा) असते. (३६२६)

स्वप्नींही संकल्प निमे उठे । परी अभिमान घेतला तो न पालटे ।
हे असो सुप्तीमाजी नेटें । मीपणे व्यापिलें ॥ २७ ॥
स्वप्नामध्येही संकल्प उठतात, नाहीसे होतात; पण जो अभिमान स्वीकारलेला असतो तो बदलत नाही. हे राहू दे. झोपेमध्ये सुद्धा माणसाला मीपणाने व्यापलेले असते. (३६२७)

सुप्ति म्हणिजे व्यापाराविण । मन बुद्धिसहित होती लीन ।
नुसधे नेणीवरूप अज्ञान । उरे कारणरूपी ॥ २८ ॥
सुषुप्तीमध्ये व्यापार होत नाहीत. मन बुद्धीसहित लीन झालेले असते. तिथे केवळ नेणीवरूपी अज्ञान उरलेले असते. ते अज्ञान हाच कारणरूप देह सुषुप्तीमध्ये असतो. (३६२८)

त्या अज्ञानाच्या अवस्था तीन । सुप्ति मुर्छा आणि मरण ।
या तिहींमाजीही असे मीपण । नेणीवरूचि ॥ २९ ॥
त्या अज्ञानाच्या तीन अवस्था आहेत. झोप, मूर्छा आणि मरण. या तीन्हींमध्ये नेणीवरूपाने अज्ञान असतेच. (३६२९)

काय मी सुखी निजेलों होतो । कांहीच न जाणता पदार्थ हा तो ।
ऐसा उत्थानी जेव्हां सांगतो । तेव्हां तेथें मीपण असे ॥ ३० ॥
मी काय सुखाने झोपलो होतो! कोणता पदार्थ काय आहे, हे काहीसुद्धा कळत नव्हते. असे जेव्हा तो जागेपणी सांगतो, तेव्हा तेथे तो मीपणाने असतोच. (३६३०)

तया मीपणा नांव प्राज्ञ । विकल्पाभावी जीव किंचिज्ञ ।
स्वरूपींच मिळे परी अज्ञ । पणा न फिटे ॥ ३१ ॥
त्या मीपणाचे नाव प्राज्ञ असे आहे. विकल्प नसल्यामुळे जीव किंचिज्ज्ञ (अल्पज्ञ) अवस्थेत असतो. तो वास्तविक पाहता स्वरूपातच मिळालेला असतो. पण तो काही जाणत नाही. अज्ञानी असतो. तरीही त्याचा मीपणा फिटलेला नसतो. (३६३१)

शा उत्थानी विक्षेप उठतां । साभिमानातें होय धर्ता ।
हाचि विशेष परी सामान्यता । होता सुप्तीमाजीं ॥ ३२ ॥
उत्थान झाल्यानंतर (झोपेतून उठल्यानंतर) विक्षेप निर्माण होताच तो परत अभिमान स्वीकारतो. हाच विशेष होय. पण झोपेमध्ये मात्र सामान्यताच असते. (३६३२)

ऐसाचि मूर्छाकाळी मी मूर्छित । पडिलों होतो तो जाहलों सावचित्त ।
ऐसा अभिमानाचा नव्हे घात । देह मृतही पावे जरी ॥ ३३ ॥
याप्रमाणेच बेशुद्ध झाला असताना (मूर्छा काळी) मी बेशुद्ध पडलो होतो, आता सावध झालो आहे, असे तो म्हणतो. याप्रमाणे त्याचा अभिमान नष्ट झालेला नसतो. तो मरण पावला तरी त्याचा हा अभिमान नष्ट होत नाही. (३६३३)

प्राणप्रयाणसमयीं आपण । मी मेलों हा भाव घेऊन ।
पावला अत्यंतचि विस्मरण । तें पुढें जन्मतां स्मरे ॥ ३४ ॥
मरणाच्या वेळी 'मी मेलो' असा भाव धरतो. मग त्याला विस्मरण होते. ते पुढे नवा जन्म मिळाल्यानंतर त्याला आठवते. (३६३४)

मागें मेलों होतों तो जन्मलों । गर्मी की यमयातनेसी भ्यालों ।
तया श्रमें बहु आतां भुकेलों । म्हणून मुख पसरी ॥ ३५ ॥
मागे मी मेलो होतो, तो आता जन्मलो आहे. मृत झाल्यानंतर यमयातनेला अथवा गर्भयातनेला खूप घाबरलो. त्या श्रमामुळे मला आता खूपच भूक लागली आहे. असे म्हणून तो आपले तोंड पसरतो. (३६३५)

तस्मात् मरण जाहलियाही मीपणाचा । अभाव नव्हेची साचा ।
जरी अभाव सविकल्पाचा । तरीही हेतु उरे ॥ ३६ ॥
त्यामुळे मरण झाल्यानंतरही मीपणाचा अभाव होतच नाही. तेथे सविकल्पाचा अभाव असतो पण हेतूच्या रूपाने तो उरलेला असतो. (३६३६)

जरी विकल्पाभावी स्वस्वरूप । ओतप्रोत उरे अमुप ।
जीवत्वहि तेथें नसे अल्प । परी हेतु जीवाचा उरे ॥ ३७ ॥
मृतावस्थेत विकल्पाचा अभाव असल्यामुळे स्वस्वरूप अमाप ओतप्रोत उरलेले असते. तेथे जीव थोडासुद्धा उरलेला नसतो. परंतु जीवाचा हेतू राहिलेला असतो. (३६३७)

जागृतींत ज्ञान नाहीं जाहलें । निमतां अज्ञानगी मिळालें ।
तें अज्ञानही वितळून उरलें । नुसधे ब्रह्मात्मत्व ॥ ३८ ॥
मूळ जागृतीतच ज्ञान झाले नव्हते. मरण पावताच सर्व काही अज्ञान गर्भात मिळून गेले. पुढे ते अज्ञानही वितळून गेले. मग केवळ ब्रह्मात्मत्व उरले. (३६३८)

तेंचि उत्थानीं जन्मतां सावधपणीं । विक्षेपाची जाहली उभवणी ।
सामान्य हेतु तो विशेषेकडूनी । स्फुरता जाहला ॥ ३९ ॥
नंतर पुन्हा उत्थान होऊन पुन्हा जन्म होताच सावधपणाने विक्षेपाची उभवणी झाली. त्यामुळे जो सामान्य स्वरूपाचा हेतू होता तो विशेषत्वाने स्फुरू लागला. (३६३९)

एवं सुप्तिमूर्छा आणि मरण । या तिहीं स्थळी होतें मीपण ।
तरी जीवत्व असेचि सनातन । ज्ञानाभावीं प्रलयीही ॥ ४० ॥
अशा प्रकारे सुषुप्ती, मुर्छा आणि मरण या तिन्ही स्थळी मीपण होते. म्हणून जीवत्व हे सनातन असून ज्ञानाच्या अभावी प्रलयकाळी ही असते. (३६४०)

हें तों असे अज्ञान समय । रविदत्ता आतां सावध होय ।
जो कां समाधिरूप उपाय । बोलिला अभ्यास ॥ ४१ ॥
ही गोष्ट झाली अज्ञानी अवस्थेची. पण रविदत्ता, सावधान होऊन ऐक. जो समाधिरूप अभ्यासाचा उपाय तुला सांगितला, (३६४१)

येथेही मीपणा पूर्वरीती असें । कारण की विचारें अज्ञान न नासे ।
उगेंचि स्थिरत्व साधिलें अभ्यासें । तेणें सुखी तो प्राज्ञ ॥ ४२ ॥
तेथेही पूर्वीप्रमाणेच मीपणा असतो. कारण की विचाराच्या साहाय्याने अज्ञानाचा नाश अद्याप झालेला नसतो. अभ्यासाने उगीच थोडेफार स्थिरत्व साध्य झाले की तेवढ्याने सखी होतो. तो प्राज्ञ अभिमानी असतो. (३६४२)

जयासी म्हणावा ब्रह्मानुभव । जो ब्रह्मविद्येचा गौरव ।
तोही मूळाज्ञानाचा ठाव । असे बापा खरा ॥ ४३ ॥
ज्याला ब्रह्मानुभव म्हणतात, जो ब्रह्मविद्येची सर्वोच्च अवस्था समजतात (पहा ओ. ३४७६-७७) तोच मूळ अज्ञानाचे खरे वसतिस्थान आहे. (३६४३)

तेंचि अवधारी सावधान । आरंभी जाहलें संधीचें ज्ञान ।
तयाचा विक्षेपें घे अभिमान । मी समाधिस्थ म्हणोनी ॥ ४४ ॥
तेच कसे ते सावधान होऊन ऐक. प्रथम संधीचे ज्ञान झाले. विक्षेपामुळे त्याचाच प्रथम अभिमान धारण केलास. मला समाधि साधते, असा अभिमान बाळगलास. (३६४४)

मी म्हणिजे हे देहादिक । हाचि विश्वाभिमानी एक ।
जरी देहबुद्धीचा न फिटेचि कळंक । तरी तो समाधि कैंचा ॥ ४५ ॥
मी म्हणजे हे देह इ. हाच विश्वाभिमान होय. जर देहबुद्धीचा कलंक पुसला जात नसेल तर त्याला समाधी कसे म्हणता येईल? (३६४५)

मीच की समाधीचा साधिता । ऐसा साभिमाने जाहला कर्ता ।
मीच ब्रह्मसुखाचा जाहलों घेता । हाचि भोक्ता तेथें ॥ ४६ ॥
मी समाधी लावू शकतो, असा अभिमान धरून तो स्वतःकडे कर्तृत्व घेतो. आणि मला ब्रह्मसुखाचा अनुभव येतो, या भावनेने तो भोक्ताही होतो. (३६४६)

एवं कर्तृत्व भोक्तृत्व बळे घेणें । हेचि तैजस अभिमानाची लक्षणे ।
समाधीमाजी असती पाहणें । विचारून साधकें ॥ ४७ ॥
अशा प्रकारे कर्तत्व आणि भोक्तत्व बळेच स्वतःकडे घेतो. ही तैजस अभिमानाची लक्षणे आहेत. ती लक्षणे समाधीमध्ये असतात. हे साधकाने विचार करून पहावे. (३६४७)

हे विक्षेपामुळे ह्मणसी असती । मनबुद्धीस्तव उठे साहंकृती ।
तरी पाहें विघ्ने जरी नासती । तरी प्राज्ञ हा न मरे ॥ ४८ ॥
ही लक्षणे विक्षेपामुळे येतात, मन बुद्धी आहेत म्हणून अहंकार उत्पन्न होतो. असे म्हणशील तर तू एक गोष्ट लक्षात ठेव. समाधीच्या अभ्यासात चारी विघ्नांचे निरसन झाले तरी प्राज्ञ अभिमान नष्ट होत नाही. (३६४८)

पहिले विघ्न जें विक्षेपरूप । तें अभ्यासें नासतां साक्षेप ।
देहद्वयाचा क्षय आ–आप । होतां विश्वतैजस निमती ॥ ४९ ॥
विक्षेपरूप विघ्न निर्माण झाल्यास ते प्रयत्नपूर्वक अभ्यासाने नष्ट होते. अभ्यासाच्या ओघात दोन्ही देहांचा क्षय झाल्यावर विश्व आणि तैजस हे अभिमान आपोआप लय पावतात. (३६४९)

तेही निःशेष निमतीना । झोंपेंत जेवीं राहती लीनपणा ।
तेवीं लयरूप दुसरीया विघ्ना । माजीं लीन होती ॥ ५० ॥
पण तेही समूळ नष्ट होत नाहीत. ते झोपेत जसे लीन होऊन राहात होते, तसे आता लयरूप दुसऱ्या विघ्नामध्ये लीन होतात. (३६५०)

सुषुप्तीतून जेंवीं उत्थान । पावती विश्वतैजस आपण ।
कारण की निमाला नाहीं प्राज्ञ । नेणीव अभिमानें उरे ॥ ५१ ॥
सुषुप्तीमध्ये प्राज्ञ अभिमान नष्ट झालेला नसतो. तो नेणिवेच्या अभिमानाच्या रूपात उरतो आणि उठल्यानंतर (जागे झाल्यानंतर) माणसाचे विश्व, तैजस हे अभिमानही आपले आपण उत्पन्न होत असतात. त्याप्रमाणे समाधी अवस्थेतही प्राज्ञ अभिमान नेणिवेच्या रूपाने असतो. त्यामुळे समाधीतून उत्थान झाल्यानंतरही विश्व तैजस हे अभिमान उद्भवतात. (३६५१)

शून्य किंवा झोंपें आंत । नेणपणे अभिमान उरत ।
म्हणून विक्षेपाचे उत्थान होत । विश्वतैजसरूपें ॥ ५२ ॥
शून्य वृत्तीमध्ये किंवा झोपेमध्ये अभिमान नेणिवेच्या रूपात उरलेला असतोच. म्हणून उत्थानाच्या वेळी विश्व, तैजस या अभिमानांच्या रूपाने विक्षेप उत्पन्न होत असतात. (३६५२)

लयाऐसाचि असे कषाय । तेथेही नसे ज्ञानरूप उपाय ।
म्हणोनि प्राज्ञाभिमानें होय । उत्थान झडकरी ॥ ५३ ॥
लयासारखाच कषायही असतो. तेथे ज्ञानाचा उपाय लागू होत नाही. म्हणून प्राज्ञाभिमानाच्या रूपाने विक्षेपाचे लवकर उत्थान होते. (३६५३)

हे असो जो रसास्वादु । वृत्तीने घेतला स्वरूपस्वादु ।
तेथेही प्राज्ञ असे सभेदू । कारण उभयांचा ॥ ५४ ॥
हे असू दे. रसास्वाद म्हणजे वृत्तीने घेतलेला स्वरूपाचा आस्वाद. त्यामध्येही विश्व आणि तैजस या दोन अभिमानांचे कारण असलेला प्राज्ञ भेदासहित (विक्षेपासहित) असतोच. (३६५४)

वृत्तीने चिद्गगन लक्षिलें । उठोनि व्यापतां ज्ञान जाहलें ।
हेंचि ब्रह्म ऐसे कळलें । ओतप्रोत अनंत ॥ ५५ ॥
वृत्ती चिद्गगनाला लक्ष्य करून त्याला व्यापून टाकते. त्याबरोबर तिला ज्ञान होते. ओतप्रोत, अनंत असे चिद्गगन हेच ब्रह्म आहे, असे तिला कळते. (३६५५)

चिद्गगनीं वृत्ती पसारे । वायू ऐशी व्यापूनि विरे ।
परी ते ज्ञान पावोनियां मुरे । मागुती तदाकारें उठे ॥ ५६ ॥
चिद्गगनात वृत्ती पसरते. ती वाऱ्याप्रमाणे ते चित्प्रकाश व्यापून लागलीच विरून जाते. पण त्यापूर्वीच तिला ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान झालेले असते आणि नंतर मगच ती विरून जाते. मग पुन्हा ती तदाकार होऊन उठते. (३६५६)

ऐसें ज्ञान होतां स्वरूपाचें । अज्ञान तरी गेलें वृत्तीचें ।
परी तेचि वृत्ति साभिमानें नाचे । ह्मणे म्यां ब्रह्म जाणितलें ॥ ५७ ॥
असे तिला स्वरूपाचे ज्ञान होते. त्या वृत्तीचे अज्ञान तर गेलेले असते. पण त्या ज्ञानाचाच अभिमान घेऊन 'मी ब्रह्म जाणले. मला ब्रह्माचे ज्ञान झाले' असे म्हणत ती नाचत सुटते. (३६५७)

फुजे दाटून सबराभरित । उसळून विक्षेपासी पावत ।
अहंब्रह्म ह्मणूनि विक्षेप होत । हेचि विश्वतैजस ॥ ५८ ॥
त्या अभिमानाने बाह्याभ्यंतर भरून जाऊन ती उसळते. त्यामुळे ती विक्षेपाकडे येते. 'अहं ब्रह्म' असा तिला विक्षेप होतो. तेच विश्व आणि तैजस अभिमान होत. (३६५८)

ब्रह्माकार जे वृत्ति होती । ते उसळोनि जाहली विक्षेपाकृति ।
तरी ते प्राज्ञरूप अहंकृति । नाहीं कैशी ह्मणावी ॥ ५९ ॥
ब्रह्माकार असलेली वृत्ती अशा त-हेने उसळून विक्षेपाकार होते. तिच्या ठिकाणी विश्व, तैजस हे जागृती आणि स्वप्नाचे अभिमान येतात. मग सुषुप्तीचा प्राज्ञ अभिमान तेवढा येत नाही असे कसे म्हणावे? (३६५९)

विश्वतैजस जेव्हां उद्भवती । तेव्हां ते प्राज्ञापासून निघती ।
तस्मात् विशेष रसास्वाद जो निश्चितीं । तेथें वस्ति तिहींची ॥ ६० ॥
कारण विश्व आणि तैजस हे अभिमान मुळातच प्राज्ञाभिमानापासून निर्माण होत असतात. त्यामुळे विशेषत्वाने जेव्हा रसास्वाद निर्माण होतो तेथे या तीन्ही अहंकारांची वसती असतेच. (३६६०)

ज्ञानचि ह्मणसी कैसें अज्ञान । तरी पाहें श्रुतीचे वचन ।
विज्ञात तें अविज्ञात केन । बोले उपनिषद ॥ ६१ ॥
आता ज्ञानच अज्ञान कसे होते, असे म्हणशील तर या बाबतीत श्रुतीचे वचन आहे (केन २.३) श्रुती म्हणते, "विज्ञात तेच अविज्ञात होते" असे केन उपनिषद सांगते. (३६६१)

तेंचि जाणे स्वप्रकाशीं । वृत्तिसहित यया सर्वासी ।
हे कोण जाणती तयासी । हिंपुटी होतां ॥ ६२ ॥
ते ब्रह्म आपल्या प्रकाशाने वृत्तीसहित या सर्व पदार्थांना जाणते. या पदापैकी कोणता पदार्थ त्याला जाणण्यास समर्थ आहे? अर्थात कोणीच नाही. सगळेच त्याला जाणण्याच्या प्रयत्नात कष्टी होतील. (३६६२)

जाणों जातांचि लय वृत्तीचा । पसरूनि तदाकारे मिळे साचा ।
उद्भवतां हेतु घेऊनि जाणिवेचा । वाउगा अभिमान धरी ॥ ६३ ॥
वृत्ती ते जाणण्याचा प्रयत्न करू लागली की ती लय पावते. वृत्ती चिदाकाशात पसरते. ती तदाकार होऊन त्यात मिसळून जाते. पुन्हा उद्भवली की झालेल्या ज्ञानाचा हेतू घेऊन उगाचच खोटा अभिमान धरते. (३६६३)

न कळतांचि कळणे वाटलें । तेंचि की अज्ञान यथार्थ नाहीं कळलें ।
उगेंचि कळलें म्हणून साभिमाने घेतलें । तोचि की प्राज्ञ ॥ ६४ ॥
तिला खरे तर स्वरूप कळलेले नसते पण कळले असे तिला उगाचच वाटते व त्यामुळे ती अभिमान घेऊन बसते. तेच अज्ञान असून त्याचा अभिमान म्हणजेच प्राज्ञ अभिमान होय. (३६६४)

तेचि वृत्ति साभिमानें दाटली । फुजे विक्षेपाकार जाहली ।
विश्वतैजस दोहीतें व्याली । प्राज्ञ अहंकृति माता ॥ ६५ ॥
तीच वृत्ती अभिमानाने दाटते आणि त्या गनि ती विक्षेपाकार होते. ती प्राज्ञ अहंकाररूपी माता विश्व आणि तैजस या अभिमानांना जन्म देते. (३६६५)

तस्मात् विशेषे जो रसास्वादु । अहंब्रह्मास्मिरूप आल्हादु ।
तेथें प्राज्ञरूप हा भेदु । उघड असे ॥ ६६ ॥
म्हणून विशेष रूप झालेला रसास्वाद म्हणजे 'अहं ब्रह्मास्मि' या सुखाचा आनंद जेथे असतो तेथे हा प्राज्ञ अभिमानाच्या रूपाने असणारा भेद अगदी उघड असतो. (३६६६)

आतां सामान्यत्वे रसास्वादाचें । जें कां लक्षण वासनानंदाचे ।
तदाकारचि वृत्ति व्याप्तीचें । संचलें राहे स्वरूपीं ॥ ६७ ॥
आता सामान्यत्वाने असणारा रसास्वाद हे वासनानंदाचे लक्षण आहे. म्हणजेच तदाकार झालेल्या त्तिव्याप्तीचे ते लक्षण आहे. हा रसास्वाद स्वरूपामध्ये (ब्रह्मसुखामध्ये) व्यापून राहतो. (३६६७)

वृत्ति पसरे किंवा मावळे । उठे किंवा सहज झांकोळे ।
परी ब्रह्माकारत्वें स्वयें निवळे । अहंकृति ही न घेतां ॥ ६८ ॥
वृत्ती पसरलेली असो की मावळलेली असो, ती उत्पन्न झालेली असो की झाकोळलेली असो, ती ब्रह्माकार होऊन वरील प्रकारचा अहंकार न घेता स्थिर राहिलेली असते. (३६६८)

ध्येयरूप एक चिद्गगन । ध्याता लक्षीतसे एकतान ।
नाहींच दुजें ध्यातों म्हणून । उद्गारही किंचित ॥ ६९ ॥
अशा वेळी ध्याता आपले ध्येय जे चिद्गगन त्याचे एकतान होऊन ध्यान करत असतो. आपण ध्यान करतो आहोत अशा प्रकारचा दुजेपणाचा उद्गारही त्याच्या मनात किंचितसाही उठत नाही. (३६६९)

ध्येयाकार चिद्गगना आंत । वृत्ति एकदेशी सहज उठत ।
परी हे उठली ऐसा संकेत । स्फुरूंही नेणें ॥ ७० ॥
ध्येयाकार चिद्गगनामध्ये वृत्ती एकदेशित्वाने सहज उठते. परंतु ही वृत्ती आता उठली आहे अशी जाणीव तो स्फुरू देत नाही. (३६७०)

की हे वृत्तीने स्वरूप जाणिलें । ऐसेही स्फूर्तीसी नाही उभवलें ।
अथवा उठोनी वितळूनी फाटलें । तेंही नेघे स्फूर्ती ॥ ७१ ॥
वृत्तीला स्वरूपाचे ज्ञान झाले असे स्फुरणही त्याला होत नाही किंवा वृत्ती उत्पन्न होऊन विरून फाटली याचेही स्फुरण त्याला होत नाही. (३६७१)

ऐसी एकरूप ध्यानस्थिति । ध्यात्याची ध्येयाकार अनुवृत्ति ।
असतां या ध्यातेपणाची सोहंकृति । सामान्य नेघे ध्याता ॥ ७२ ॥
अशी ही ध्यात्याची एकरूप ध्यानस्थिती असते. तिच्यात ध्यात्याची वृत्ती ध्येयाकार झालेली असते. त्यावेळी ध्यातेपणाचा अहंकार ह्या सामान्यत्वाने ध्यान करणाऱ्या ध्यात्याला मुळीच होत नाही. (३६७२)

ऐशिया तदाकारत्वस्थितीसी । निर्विघ्नतासमाधि नाम तियेसी ।
तेथील सुखाकारत्वें ग्रहणासी । वासनानंद नाम ॥ ७३ ॥
अशा तदाकार ध्यानस्थितीला निर्विघ्नता समाधी असे नाव आहे. तेथील सुखाचा आनंद घेण्याला वासनानंद असे नाव आहे. (३६७३)

वृत्ति सुखदुःख विसरली । एक सुखाकारें सुखी मिळाली ।
तेचि होऊन तेथें उरली । तेचि सदृढ वासना ॥ ७४ ॥
वृत्तीला सुखदुःख या भावनांचा विसर पडतो. ती सुखाकार होऊन सुखानुभवात मिसळून जाते, आणि ते सुख स्वतः होऊन तेथेच स्थिरावते. तीच सुदृढ वासना होय. (३६७४)

तया वासनेसी तदाकारत्व । ह्मणोनि वासनानंद आरोपित्व ।
तेंचि वृत्तिव्याप्तीचे महत्त्व । ब्रह्माकार एकरूप ॥ ७५ ॥
ती वासना ब्रह्माकार झालेली असते. म्हणून तिच्यावर वासनानंद म्हणून आरोप करतात. ब्रह्माकार होऊन एकरूप होणे हेच वृत्तिव्याप्तीचे महत्त्व आहे. (३६७५)

असो ऐसी स्थिति जे समाधीची । एकतान ध्येयाकारत्वाची ।
परी रविदत्ता तेथेही प्राज्ञाची । गुप्तत्वें प्रौढी असे ॥ ७६ ॥
असो, रविदत्ता, ही ध्येयाकार झालेली एकतान समाधीची स्थिती आहे. पण तिच्यातही प्राज्ञ अभिमान गुप्तरूपात असतो. एवढा तो प्रभावी आहे. (३६७६)

तेचि कैशी प्राज्ञाची प्रौढी । ऐकावी सावधान अर्धघडी ।
प्रत्यक्ष नसे परी परबडी । अनुमाना योग्य ॥ ७७ ॥
आता तो कसा प्रभावी आहे. हे सांगतो. थोडा वेळ नीट लक्ष देऊन ऐक. हा प्रकार प्रत्यक्ष नसला तरी तो आहे असे अनुमान करता येते. (३६७७)

जरी सामान्यत्वेही अभिमान न घेतां । परी तदाकारत्वे असे घ्याता ।
ध्याता तो वृत्ति सापेक्षता । तदवच्छिनें घ्यातसे ॥ ७८ ॥
या समाधीमध्ये ध्याता सामान्य ज्ञानाच्या अवस्थेत असल्याने तो अभिमान घेत नाही. तो तदाकार झालेला असतो. पण ध्यानाला वृत्तीची अपेक्षा असते. तिच्याशिवाय तो ध्यान करू शकत नाही. म्हणून ध्याता ध्येयाहून वेगळा पडतो. आपले वेगळेपण ठेवूनच तो ध्यान करतो. (३६७८)

इकडे घ्याता वेगळा झाला । तिकडे ध्येयरूप पाहे चिद्गगनाला ।
मध्ये ध्यानरूप ऐसिया त्रिपुटीला । भिन्नत्व असे ॥ ७९ ॥
या ध्यानात तो ध्याता म्हणून वेगळा पडतो. पण तो चिद्गगनाला ध्येय करतो. या दोहोंच्या मध्ये ध्यानाची कृती चालू असते. ही उघडउघड त्रिपुटीची अवस्था आहे. त्रिपुटीमध्ये भिन्नत्व असतेच. (३६७९)

निर्विकल्प स्वरूप गोचर । वृत्ति असे ध्येयाकार ।
मी ध्यातसें हा पडे विसर । परी अनुभवी अनुभाव्या ॥ ८० ॥
निर्विकल्प असे स्वरूप हा ध्यानाचा विषय म्हणजे ध्येय असते. वृत्ती ध्येयाकार झालेली असते. आपण ध्यान करतो आहोत याचा साधकाला विसर पडलेला असतो. पण ध्येय रूप अनुभाव्य अशा चिद्गगनाचा तो अनुभव घेत असतो. (३६८०)

ते समयीं आठविना द्वैत । उगी तदाकारें असे निवांत ।
परी उत्थान जेव्हां पावत । तेव्हां परामर्ष करी ॥ ८१ ॥
त्या काळी त्याला द्वैताचे स्मरण नसते. तो तदाकार होऊन निवांत झालेला असतो. पण या समाधीतून त्याचे जेव्हा उत्थान होते तेव्हा मात्र तो त्या अनुभवाचा परामर्श (विचार) करतो. (३६८१)

कीं अमुक वेळ मी ध्येयाकार । वृत्तीविण जाहलों होतो स्थिर ।
किंचितही ध्यातेपणाचा उद्गार । नव्हता मज ॥ ८२ ॥
एवढा वेळ मी ध्येयाकार झालो होतो. मी वृत्तिविरहित होऊन स्थिर झालो होतो. ध्यातेपणाचा किंचितसा देखील उद्गार माझ्या ठिकाणी नव्हता. (३६८२)

ऐसा आठव समाधीचा । उत्थानी करी तदाकारत्वाचा ।
तस्मात् तेथें ध्यातेपणाचा । आहेपणा असे ॥ ८३ ॥
अशा त-हेने उत्थान काळात तो त्या समाधीचे, तिच्यात झालेल्या तदाकारत्वाचे स्मरण करतो. त्याअर्थी त्या समाधीमध्ये ध्यातेपणाचे अस्तित्व असतेच. (३६८३)

हाचि ध्याता तया ध्येयाहून । पडिला की ध्यानास्तव भिन्न ।
हे विचारें पाहता मूलाज्ञान । असे विस्मरणरूप ॥ ८४ ॥
याचाच अर्थ ध्याता ध्यानाच्या कृतीमुळे ध्येयाहून भिन्न झाला. हेच विस्मरणरूप मूलाज्ञान होय. रविदत्ता, हे तू विचारपूर्वक लक्षात घे. (३६८४)

ध्यातेपणा आपण जाहला । तेव्हां आपण ध्येयत्वा विसरला ।
हे विस्मरणरूप मूलाज्ञानाला विचारें पहावें ॥ ८५ ॥
त्याने स्वतःकडे ध्यातेपणा घेतला तेव्हाच तो स्वतःचे ध्येयत्व (आपण ध्येय आहोत असे) विसरला. हेच विस्मरणरूप मूलाज्ञान विचाराने पहावे. (३६८५)

तें आपण असतां स्वतःसिद्ध । ध्यातेपणाचा संबंध ।
तस्मात मलाज्ञान हे प्रसिद्ध । असे तदाकार ध्यानीं ॥ ८६ ॥
ते ध्येय आपणच आहोत हे स्वतःसिद्ध सत्य असताना त्यास स्वतःच्या ध्यातेपणाचा संबंध जोडून स्वतःस वेगळा काढणे हे मूलाज्ञान या तदाकार ध्यानात असते. (३६८६)

जरी मी ध्यातेपणाचे साभिमानें । ऊर्मि न घेतां तदाकार होणे ।
परी उत्थानी मी सुखी होतो म्हणे । तोचि प्राज्ञ अभिमान ॥ ८७ ॥
जरी मी ध्यातेपणाचा अभिमान घेतला आणि तरी तशी वृत्ती न स्वीकारता तदाकार झालो, तरी उत्थानकाळात मी किती सुखी होतो' असे जेव्हा म्हणतो, तेव्हा तोच प्राज्ञ अभिमान होय. (३६८७)

त्या ध्येयाकारें हा सुखी जाहला । केवळ सुखा अभिन्नत्व नाहीं पावला ।
याचि हेतु वासनानंद नाम याला । जेवी जागरसुप्तीची संधी ॥ ८८ ॥
ध्येयाकार झालेल्या त्या साधकाला सुख होते. पण फक्त त्या सुखाशी तो अभिन्नत्वाने राहिला नाही. म्हणूनच त्या अनुभवाला वासनानंद म्हटले आहे. जागृती आणि सुषुप्ती यांच्या संधीत जसा वासनानंद असतो तसाच हाही वासनानंद आहे. (३६८८)

सुप्तीत जैसा अनुभवेंविण । ब्रह्मानंद स्वानंदघन ।
तैसा होय जेधवां अभिन्न । त्रिपुटित्यागें अंगें ॥ ८९ ॥
झोपेमध्ये ज्याप्रमाणे अनुभवरहित (त्रिपुटीरहित) स्वानंदाने परिपूर्ण असा ब्रह्मानंद प्राप्त होतो, त्याप्रमाणे वरील वासनानंद अनुभवणारा साधक त्रिपुटीत्याग करून ब्रह्मात्म्याशी अभिन्न (अद्वय) होईल तेव्हा तो स्वतः ब्रह्मस्वरूप होईल. (३६८९)

तया नांव ब्रह्मानंद । अनुभवेंविण स्वानंदकंद ।
ऐसा निजांगे ब्रह्म प्रसिद्ध । विचारेंवीण नव्हे ॥ ९० ॥
त्यालाच ब्रह्मानंद असे नाव आहे. त्यामध्ये अनुभाव्य, अनुभविता आणि अनुभव अशी त्रिपुटी नसते. तो केवळ स्वानंद परिपूर्ण झालेला असतो. ही स्थिती विचारावाचून प्राप्त होत नाही. तिथे अभ्यास अपुरा पडतो. (३६९०)

अभ्यासें इतुकेंचि साधावें । विघ्ने निरसून तदाकार व्हावें ।
ऐसा चिरकाळ अभ्यास होतां स्वभावें । विचारा पात्र होय ॥ ९१ ॥
अभ्यासाने विघ्नांचा परिहार होऊन होऊन तदाकार होता येते. एवढेच अभ्यासाने साध्य होते. पण असा हा अभ्यास दीर्घकाळ केल्यानंतर तो साधक आपोआपच स्वाभाविकपणे विचारास पात्र होतो. (३६९१)

शुद्ध विचार होईल जेधवां । की आपण त्रिपुटीविण स्वानंद ठेवा ।
तेव्हांचि अभ्यासाचा प्रकार आघवा । गळे स्वयमेव ॥ ९२ ॥
जेव्हा आपण त्रिपुटीमुक्त स्वानंदाचा ठेवाच आहोत असा शुद्ध विचार प्राप्त होईल तेव्हा अभ्यासाचा हा सर्व कार्यक्रम आपोआप गळन पडेल. (३६९२)

तस्मात् विचार होय तोपर्यंत । अभ्यास करावाचि यथायुक्त ।
विचारें अभिन्नता जेधवां प्राप्त । तेव्हां आपैसा गळे ॥ ९३ ॥
म्हणून विचार होईपर्यंत अभ्यास योग्यप्रकारे केलाच पाहिजे. विचाराने अभिन्नता प्राप्त होईल तेव्हा तो आपोआप गळून पडेल. (३६९३)

असो अभ्यास तोंवरी त्रिपुटी असे । त्रिपुटी तोंवरी मूलाज्ञान वसे ।
मूलाज्ञान असतां त्यासहवासें । प्राज्ञ हा आहे ॥ ९४ ॥
अभ्यास जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत त्रिपुटी असणारच. आणि त्रिपुटी जोपर्यंत असेल तोपर्यंत मूलाज्ञानाचे वास्तव्य राहणारच. मूलाज्ञान असेपर्यंत त्याच्या सहवासाने प्राज्ञ अभिमान असणारच. (३६९४)

प्राज्ञ अभिमानी तोचि जीव । असे स्वतःसिद्ध स्वयमेव ।
येथे शंकेचा ऐसा भाव । करील कोणी ॥ ९५ ॥
आणि प्राज्ञ अभिमानयुक्त असणे म्हणजेच जीवदशा अस्तित्वात असणे होय, हे स्वतःसिद्ध आहे. यावर कोणी अशी शंका उत्पन्न करील की, (३६९५)

की वृत्तिव्याप्ति ही असतां । जीवाची नसे फलद्‌रूपता ।
आतां जीव त्रिपुटींत आहे म्हणतां । थोर विरोध आला ॥ ९६ ॥
वृत्तिव्याप्ती होत असता जीवाची फलट्रपता नाही, (जीवाचा काही संबंध नाही) असे मागे सांगितले आहे. (ओ. ३४७९, ३४९५, ३१६ पहा.) आणि आता त्रिपुटी असेपर्यंत जीव आहे असे म्हणता, हा मोठाच विरोध आहे. (ओवी ३६३७ पहा) (३६९६)

तरी याचें उत्तर ऐकावें । समाधींत विकल्परूप जीव नव्हे ।
आतां आहे म्हणे कोण बरवें । परी विकल्पाचा हेतु असे ॥ ९७ ॥
तेव्हा याचे उत्तर ऐका. समाधीमध्ये विकल्परूप जीव नसतो. तेव्हा तो आहे असे कोण म्हणेल? पण समाधीमध्ये विकल्पाचा हेतू असतो. (३६९७)

जैसा देहद्वयांत दोहीं व्यापारीं । जीव विकल्परूप विकारी ।
तैसा कोठे सुषुप्तिमाझारी । परी उरे हेतुरूपर ॥ ९८ ॥
ज्याप्रमाणे स्थूल आणि सूक्ष्म या दोन देहातील व्यापार होत असताना जीव विकल्परूप आणि विकारी स्वरूपाने असतो. पण तो सुषुप्तीमध्ये कुठे असतो? (म्हणजे नसतो). पण तो हेतुरूपाने असतो. (कारण तो विकल्प उद्भवण्याचे कारण या स्वरूपाने असतो. (३६९८)

सर्व विकल्प निपटून गेला । बुद्धीसहित आभास निमाला ।
एकला ब्रह्मानंदचि उरला । परी हेतु जीवाचा न निमे ॥ ९९ ॥
झोपेत जेव्हा सर्व विकल्प निःशेष नाहीसा होतो, त्यावेळी बुद्धीसह हा चिदाभास जीव नाहीसा होतो. आणि फक्त एक ब्रह्मानंद तेवढा उरतो. परंतु जीवोत्पत्तीचे संभाव्य कारण (हेतू) नष्ट झालेले नसते. (३६९९)

तो हेतु तोचि प्राज्ञ अभिमानी । जीव निमाला नेणीव घेऊनी ।
उत्थान पावतांचि विश्वतैजसालागूनी । प्रसवे मागुता ॥ ३७०० ॥
तो हेतू म्हणजेच सुषप्तीच्या अवस्थेतील प्राज्ञ अभिमानी होय. हा प्राज्ञ अभिमानी जीव झोपेत नेणिवेसह नाहीसा होतो. पण झोपेतून उत्थान झाल्याबरोबर (झोपेतून उठल्याबरोबर) तो नंतर विश्व आणि तैजस या जागृतीतील आणि स्वप्नावस्थेतील अभिमानांना जन्म देतो. (३७००)

सुषुप्तींत जीव हा किंचित नसतां । हेतु कल्पावा उत्थान होतां ।
तैसाचि प्राज्ञ अभिमानी तत्त्वतां । कल्पावा तदाकारी ॥ १ ॥
सुषुप्तीत जीव नसताना देखील उत्थानामध्ये (जागे झाल्यावर) ज्याअर्थी जीव उद्भवतो त्याअर्थी त्याचा कारणरूप जीव झोपेत कल्पावा लागतो. त्याप्रमाणे समाधीतील तदाकार स्थितीतही ह्या सुषुप्तीतील प्राज्ञ अभिमानी जीवाची कल्पना करावी लागते. (३७०१)

तदाकारी समाधि आंत । ध्याता ध्येय गोचर निवांत ।
ते समयीं विश्वतैजस निमत । विकल्परूपी जीव ॥ २ ॥
तदाकार अवस्थेत ध्याता, ध्येय, इंद्रियग्राह्य (गोचर) सर्व विषय निवांत झालेले असतात. त्यावेळी विकल्परूप असलेला जीव आणि त्याची विश्व, तैजस ही रूपे निमालेली असतात. (३७०२)

परी या विकल्परूपें जीवाचा । हेतु ठरला ध्येयीं साचा ।
पुन्हां उद्भव होय विश्वतेजसाचा । तया कारण प्रज्ञापासूनी ॥ ३ ॥
पण या ध्यानामध्ये साधक ज्या ध्येयाशी तदाकार झालेला असतो त्या ध्येयामध्येच हेतुरूप प्राज्ञ विकल्प रूपाने उरलेला असतो. अशा त्या कारणरूप प्राज्ञापासूनच विश्व, तैजस या अभिमानी जीवांची उत्पत्ती होत असते. (३७०३)

जया अज्ञाने हे सर्व जाहलें । हे सर्व तरी लय पावलें ।
परी तें प्रयोजन नाहीं निमालें । दृढ अभिन्नज्ञानें ॥ ४ ॥
ज्या अज्ञानामुळे हे सर्व निर्माण होते. ते सर्व लय पावते. पण तरीसुद्धा प्रयोजनरूप प्राज्ञ अभिमान नष्ट झालेला नसतो. परब्रह्माच्या दृढ अभिन्न ज्ञानाने हे कारणरूप अज्ञान मुख्यतः नष्ट झाले पाहिजे. (३७०४)

कळलें तें वृत्तीसि चिद्गगन । तें वृत्ति निमतां जाय मावळून ।
वृत्ति अभावी उरे में अज्ञान । तें शून्यत्व न फिटे ॥ ५ ॥
वृत्तीला जे कळलेले असते ते चिद्गगन म्हणूनच कळलेले असते. पण ती वृत्ती मावळल्याबरोबर ते चिद्गगनही मावळून जाते. आता वृत्ती नाहीशी झाल्यानंतरही तिच्या अभावीही अज्ञान राहिलेलेच असते. ते शून्यरूप असते. ते फिटलेलेच नसते. (३७०५)

जरी वृत्तीसहित वृत्तीचे लयासी । अभाव देखणा ये प्रतीतीसी ।
जेव्हां न कळून कळेल निश्चयेंसी । तेव्हांचि मूलाज्ञान फिटे ॥ ६ ॥
पण वृत्ती आणि वृत्तीचा लय यांना पाहणारा म्हणजे अभावाचा द्रष्टा जेव्हा अनुभवास येतो, म्हणजे न कळणेच निश्चयाने कळून येईल तेव्हाच ते मूळ अज्ञान फिटेल. (३७०६)

तोंवरी मलाज्ञान हेतरूप । जीव संकल्पाचा बाप ।
उरे म्हणोनि भेदपडप । निमालें नाहीं ॥ ७ ॥
तोपर्यंत हे कारणरूप मूल अज्ञान याच्याकडेच जीव संकल्पाचे पितृत्व असते. (म्ह. त्याच्यातूनच जीव संकल्प निर्माण होत असतो.) हा जीवसंकल्पाचा बाप उरलेला असतो म्हणूनच भित्रत्वाचा पडदा दूर झालेला नसतो. (३७०७)

जीव विकल्परूप नसे । परी हेतु विकल्पाचा उरतसे ।
तो हा उभय संधीसी असे । सविकल्पा निर्विकल्पाच्या ॥ ८ ॥
विकल्परूप जीव तेथे नसेल, पण त्या विकल्पाचा हेतू म्हणजे कारण उरलेले असते. हा हेतू सविकल्प निर्विकल्पाच्या दोन्ही संधीत असतो. म्हणजे सविकल्पाच्या आरंभी आणि तो लोप पावल्यानंतर तो असतो. (३७०८)

सविकल्पत्व तया जरी नसतां । परी योजावा सविकल्या आंतौता ।
निर्विकल्पी हेतूचीही वार्ता । सहसा बोलूं नये ॥ ९ ॥
त्याला सविकल्प असे म्हणता येणार नाही, पण त्याची गणना सविकल्पामध्येच करावी. निर्विकल्पाच्या बाबतीत हेतुत्वाचा विषयही तोंडावाटे काढू नये. (३७०९)

वायु आणि वायूचा निरोध । वायूकडे लावितां नाहीं बाध ।
त्यावीण आकाशीं आरोपितां शुद्ध । न स्पर्श गगना ॥ १० ॥
वायू आणि वायूचा निरोध या दोन्हीचीही वायूमध्ये गणना करण्यात काही दोष नाही. पण त्याऐवजी आकाशात त्याची गणना केली तर आकाशाला तो स्पर्शही करू शकत नाही. (म्ह. आकाशाला तो लागू होत नाही.) (३७१०)

तैसाचि सविकल्प जीवाचा हेतु । सविकल्पीच तयाची मातु ।
शुद्ध निर्विकल्प स्वरूपा आंतु । हेतु ना विकल्प ॥ ११ ॥
त्याप्रमाणेच सविकल्प जीवाचे जे कारण त्याची गणना सविकल्पामध्येच करणे योग्य होय. शुद्ध निर्विकल्प स्वरूपामध्य कारणही नसते आणि विकल्पही नसतो. (३७११)

एवं हेतूसहित सविकल्प । हाचि जीव आभासरूप ।
कार्यकारणरूपें असद्‌रूप । वर्ते निर्विकल्प ॥ १२ ॥
अशा प्रकारे सविकल्प आणि त्याचे कारण हे दोन्ही मिळूनच आभासरूप जीव असतो. निर्विकल्पामध्ये तो कार्यकारणरूपाने असद्रूप होऊन असतो. (म्हणजे निर्विकल्प कार्यकारणरूपाने कधीच नसते.) (३७१२)

बुद्धि उद्भवतां विश्वतैजस । उठोनि क्रीडती जागृति स्वप्नास ।
या दोहीं व्यापारी तया विकल्पास । जीवत्वकार्यरूपी ॥ १३ ॥
त्यानंतर बुद्धीचा उदय होताच विश्व आणि तैजस हे उत्पन्न होतात आणि त्यांची जागृती आणि स्वप्न या अवस्थांत क्रीडा चालते. या दोन्हीही अवस्थांमध्ये त्या विकल्पांना कार्यरूपाने जीवत्व येते. (३७१३)

सुप्ति मूर्छा मरणसमयासी । अथवा जागर सुप्तीचे संधीसी ।
विकल्प अभावी विकल्प हेतूसी । नाम कारणरूप प्राज्ञ ॥ १४ ॥
झोप, मूर्छा, मरण या काळी अथवा जागृती आणि सुषुप्ती यांच्या संधिकाळी विकल्प नसताना या विकल्पांचे कारण असलेल्या प्राज्ञाला कारणरूप प्राज्ञ असे नाव आहे. (३७१४)

तेवींच समाधिकाळी अहंब्रह्मास्मि । वृत्तीने घेतली सुखाची ऊर्मि ।
तेचि दोंप्रकारें अनुक्रमी । विशेष सामान्य होती ॥ १५ ॥
त्याप्रमाणेच समाधिकाळात वृत्ती 'अहं ब्रह्मास्मि' असी सुखाची ऊर्मी घेते. ती दोन प्रकारची असते. एक विशेष आणि दुसरी सामान्य. (३७१५)

विशेष स्फूर्ति जे कळों आली । ते विश्वतैजसाकार जाहलीं ।
तेचि कार्यरूपी जीवाची उभवली । विकृति सविकल्पाची ॥ १६ ॥
जिला विशेष स्फूर्ती म्हणून म्हणतात तिचे दोन प्रकार होतात. ते म्हणजे विश्वाकार स्फूर्ती (जागृतीतील जीवत्व) आणि तैजसाकार स्फूर्ती (स्वप्नामधील जीवत्व) यांनाच कार्यरूप जीव असे म्हणतात. हे दोन्ही प्रकार म्हणजे सविकल्पाचे विकार होत. (३७१६)

सामान्यत्वें जे स्वरूपाकार । घ्याता ध्येईं निरंतर ।
तो विकल्पाचा हेतु प्राज्ञ अहंकार । कारणरूपी जाणिजे ॥ १७ ॥
सामान्यत्वाने असणारी जी सुखाची उर्मी ती स्वरूपाकार असून ध्याता आणि ध्येय असा भेद तिच्यामध्ये असतो. हा भेद हेच विकल्पाचे कारण आहे. त्यालाच प्राज्ञ अहंकार असे म्हणतात. (३७१७)

एवं जागृतीपासून समाधीपर्यंत । सविकल्परूपी जीवचि निश्चित ।
हे निरोपिलें बापा यथायुक्त । येथें संशयो नसे ॥ १८ ॥
अशा प्रकारे जागृतीपासून समाधीपर्यंत सर्व अवस्थांमध्ये सविकल्परूपी जीवच सर्वत्र असतो. हे तुला स्पष्ट करून सांगितले. आता याबाबतीत काही संशय असण्याचे कारण नाही. (३७१८)

अहंब्रह्मस्मिरूप अनुभव । सामान्य अथवा विशेष भाव ।
हाचि जीवत्वाचा स्वभाव । तुज कळों येईल पुढें ॥ १९ ॥
'अहं ब्रह्मास्मि' हा अनुभव सामान्यत्वाने असो, वा विशेष रूपाने असो, तो जीवत्वाचाच स्वभाव आहे. हे तुला पुढे कळून येईलच. (३७१९)

अगा रविदत्ता त्वां होतें पुसिलें । की ब्रह्म जीवाचे रूप वेगळालें ।
त्यांत जीवाचं रूप स्पष्ट सांगीतलें । सविकल्परूप ॥ २० ॥
रविदत्ता, तू ब्रह्म आणि जीव यांचे स्वरूप आणि भेद यांच्याबद्दल विचारलेस. त्यापैकी जीवाचे रूप स्पष्ट सांगितले. जीव हा सविकल्परूप आहे (३७२०)

जागृतीपासून मोक्षापर्यंत । हाचि जीव आणि जीवाचें कृत ।
हें श्रुतियुक्ति अनुभवयुक्त । सहेतुक सांगितलें ॥ २१ ॥
जागृतीपासून मोक्षापर्यंत हेच जीव आणि जीवाचे कृत्य असे श्रुतीच्या आणि अनुभवाच्या आधाराने हेतुपुरःसर स्पष्ट केले. (३७२१)

बहु बोलणे बापा कासया । देहापासून स्फूर्तिरूप माया ।
हा अवघा संघ जो तया । सविकल्प जीव ह्मणावा ॥ २२ ॥
अरे, जास्त बोलण्याची गरज नाही, देहापासून ते प्रथम स्फुरणापर्यंतची माया हा जो सर्व संघात आहे. त्याला सविकल्प जीव म्हणावे. (३७२२)

ययापरतें जें एकरूप । तें ब्रह्मात्मत्व निर्विकल्प ।
तेंचि बोलिजे स्वस्वरूप । जीवाचे रूप जाहलें ॥ २३ ॥
या संघातापलीकडे असलेले जे निर्विकल्प ब्रह्मात्मत्व आहे, त्यात स्वरूप असे म्हणतात. जीवाचे स्वरूप तर स्पष्ट केलेच आहे. (३७२३)

आणीक तुझा संशय होता । की ब्रह्मात्मा जो स्फूर्तीहून परता ।
तो अनुभवा न ये यथार्थ तत्त्वतां । स्फूर्तीत साक्षिमात्र कळे ॥ २४ ॥
तुला आणकी एक संशय होता की, स्फूर्तीच्या पलीकडे असलेला तो ब्रह्मात्मा असा अनुभवाला येत नाही. स्फूर्तीत मात्र साक्षित्वाने तो कळतो. (३७२४)

तरी तें आतां निर्विकल्प व्याजें । यथार्थ ज्ञान तें प्रगट कीजे ।
स्फुर्तीविण एकरस सहजें । तें तुजला भेटऊं ॥ २५ ॥
तर आता निर्विकल्पाच्या निमित्ताने त्या ब्रह्मात्मत्वाचे ज्ञान यथार्थ असे स्पष्ट केले जाईल आणि स्फूर्तीहून वेगळ्या अशा या एकमेवाद्वितीय ब्रह्मात्मत्वाशी तुझी भेट करून देऊ. (३७२५)

पद : ब्रह्म स्यानिर्विकल्पकं ॥ १३ ॥
पदार्थ : ब्रह्म हे निर्विकल्प असते ॥१३॥

ब्रह्म केवळ निर्विकल्प आहे । जेथें द्वैताचा हेतुही न साहे ।
आदि मध्य अवसानीं राहे । या जगद्‌रूप भ्रमाच्या ॥ २६ ॥
ब्रह्म हे केवळ निर्विकल्प आहे. तेथे द्वैताचा विषयही सहन होत नाही. ते जगद्रूपी भ्रमाच्या आद्यस्थानी, मध्यस्थानी आणि अन्त्यस्थानीही आहे. (३७२६)

जगभ्रम हा जीवसंकल्प । की हा अवघा जीवरूप विकल्प ।
याचे आदि अंती सच्चिद्‌रूप । निर्विकल्प ब्रह्म ॥ २७ ॥
जगभ्रम हा जीव संकल्प आहे, किंवा हा सर्व जीवरूप विकल्प आहे. याच्या आरंभी अथवा शेवटी सच्चिद्रूप निर्विकल्प ब्रह्म आहे. (३७२७)

जया निर्विकल्पी सविकल्पाची । वार्ताही नसे सहेतुकाची ।
कारण कार्यासहित या भ्रमाची । उत्पत्तीच जाहली नसे ॥ २८ ॥
या निर्विकल्पाच्या ठिकाणी सहेतुक अशा सविकल्पाची वार्ताही नसते. कारण हा जगभ्रम, त्याचे कारण आणि कार्य यांसहित कशाचीही मुळात उत्पत्तीच झालेली नाही. (३७२८)

सविकल्प नव्हे तें निर्विकल्प । तेथें हेतु ना जीवत्वाचा आरोप ।
ऐसें परिपूर्ण एकरूप । आदि मध्ये अवसानीं ॥ २९ ॥
निर्विकल्प हे कधीच सविकल्प नसते. तेथे कारणही नसते आणि जीवत्वाचा आरोपही नसतो. असे ते परिपूर्ण आणि जगभ्रमाच्या आदी, मध्य आणि अंत या सर्व ठिकाणी एकरूप असते. (३७२९)

निर्विकल्प ह्मणतां मानील कोणी । की अंतःकरणा ऐसें विकल्पा वांचोनी ।
उगेंचि सामान्यत्वें स्फुरद्‌रूपपणीं । तरी ऐसें कदा नव्हे ॥ ३० ॥
त्याला निर्विकल्प असे म्हटल्यावर कोणाला वाटेल की ते विकल्परहित अशा अंतःकरणाप्रमाणे असून उगाच सामान्यत्वाने स्फुरणारे काही असेल, पण ते तसे कधीच नसते. (३७३०)

याचि हेतू पूर्वपदांत । हेतूही केला विकल्पी मिश्रित ।
या सर्वांहून अनंत विरहित । जेथें ध्येयत्व न साहे ॥ ३१ ॥
यासाठी पूर्वपदात (सविकल्पकजीवोऽयं) त्या जगभ्रमाचा हेतूही विकल्पात मिश्रित आहे असे सांगितले आहे. आणि अनंत असे ब्रह्म या सर्वांपासून वेगळे आहे. या सर्वांचा त्याच्या ठिकाणी अभाव आहे, अगदी ध्येयत्वही (ध्यान करण्याचा विषय होणे ही) त्याला सहन होत नाही. (३७३१)

येविषयीही शंका कवणासी । होईल की निर्विकल्प जें अविनाशी ।
सर्वांपरतें तें असेल कवणे देशीं । तें पहावया केंवी जावें ॥ ३२ ॥
याबाबतीतही कोणाला शंका येईल की, निर्विकल्प हे अविनाशी असून या सर्वांच्या पलीकडे कुठल्या तरी प्रदेशात (स्थानी) असेल, आणि मग ते पहाण्यासाठी कसे जावे? (३७३२)

तरी ऐसेंही कदापि असेना । त्रिधा परिच्छेदेंविण पूर्णपणा ।
सर्वी अनुस्यूत असून होईना । या विकल्पा ऐसें ॥ ३३ ॥
तर असेही ते नाही. त्याच्या ठिकाणी (देश, काल आणि वस्तु या प्रकारचे) तीन परिच्छेद नसून परिपूर्णत्व आहे. ते सर्व गोष्टींमध्ये अनुस्यूत (व्याप्त) असून विकल्पांसारखे ते कधीच होत नसते. (३७३३)

आकाश कवणे स्थळी नाही । ऐसा पदार्थ नसे कोठेही ।
तैसें निर्विकल्प सर्वी सर्वदांही । अणुही व्यापून असे ॥ ३४ ॥
आकाश कोणत्या ठिकाणी नाही असा पदार्थ कोठेही नाही. त्याप्रमाणे निर्विकल्प सर्वकाळ सर्वांमध्ये व्याप्त असते, अगदी अणूमध्ये सुद्धा ते व्यापून असते. (३७३४)

गगन सर्वी परी सर्वांवेगळं । तैसें ब्रह्म व्यापूनि विकल्पा निराळे ।
वायुवेगें आकाश न चळे । तेवीं विकल्में विकारेना ॥ ३५ ॥
आकाश सर्वांमध्ये असूनही सपिक्षा निराळे असते. त्याप्रमाणे ब्रह्मही सर्व विकल्पांना व्यापून विकल्पांपेक्षा निराळे असते. वाऱ्याच्या वेगाने आकाश जागचे हलत नाही, त्याप्रमाणे ब्रह्म विकल्पांमुळे विकार पावत नाही. (३७३५)

जागृतीपासून मोक्षापर्यंत । विकल्प जीवसहेत ।
जो आतां निरोपिला संकेत । कार्यकारणरूपें ॥ ३६ ॥
जागृतीपासून ते मोक्षापर्यंत सर्व अवस्थांमध्ये विकल्प हे जीवाबरोबर असतात. आता वर जो सहेतुक विकल्परूप जीव सांगितला (ओ. ३७१८, ३७२८ पहा) (३७३६)

इतुकियाही सविकल्पामाझारीं । ब्रह्म निर्विकल्प निर्विकारी ।
आणि या विरहितही निर्धारी । असंभाव्य असे ॥ ३७ ॥
इतक्या सविकल्पामध्ये असूनसुद्धा ब्रह्म निर्विकारी आणि निर्विकल्पच असते. ब्रह्म एवढ्यापुरतेच मर्यादित नाही, तर या सविकल्पाखेरीज असंभाव्य असे उरलेले आहे. (३७३७)

तें सविकल्पासी कळेना । कोणतें तत्व जाणों शकेना ।
आणि जाणल्याविण तो होईना । मुक्त कल्पांती ॥ ३८ ॥
ते सविकल्पाच्या कळण्यापलीकडचे आहे. त्याला इतर कोणतेही तत्त्व जाणू शकत नाही आणि जाणल्याशिवाय तर कल्पान्त आला तरी मुक्त होता येत नाही. (३७३८)

तस्मात् तें जाणिलें पाहिजे । जाणोनि तेंचि होऊन राहिजे ।
तरीच साधका मोक्ष लाहिजे । नातरी बंधन दृढ ॥ ३९ ॥
म्हणून त्याचे ज्ञान तर झाले पाहिजेच. ते जाणून घ्यावे आणि तेच होऊन राहावे असे झाले तरच मोक्ष सिद्ध होतो. नाहीतर दृढ बंधन तर ठरलेलेच आहे. (३७३९)

तेंचि समजावया कारणे । नानापरीची निरूपणे ।
मागें जाहाली पुढेही होणे । श्रुति युक्ति अनुभवें ॥ ४० ॥
तेच समजावून देण्यासाठी सगळी निरूपणे (प्रवचने इ.) चाललेली असतात. श्रुती, युक्ती आणि प्रत्यक्ष अनुभव यांच्या आधाराने अशी निरूपणे मागे पुष्कळ झाली, पुढेही होत राहतील. (३७४०)

विचारवंता इतुकें नलगे । श्रवणमात्रे तया उमगे ।
परी मंदप्रज्ञास्तव प्रसंगें । अभ्यासही कथिला । ॥ ४१ ॥
विचारवंत माणसाला एवढ्या सर्वांची गरज नसते. केवळ एकदा श्रवण झाले की त्याला उमज पडते. परंतु मंदप्रज्ञाला ते सहज शक्य होत नाही. म्हणून प्रसंगपरत्वे त्याच्यासाठी अभ्यासही सांगितले. (३७४१)

अभ्यासें वृत्तिव्याप्तिपर्यंत । पायवाट जाहली यथायुक्त ।
आतां निर्विकल्प तें व्हावें प्राप्त । तें निर्वचनें प्रगटूं ॥ ४२ ॥
अभ्यासाच्या साहाय्याने वृत्तिव्याप्तीपर्यंतची पायवाट स्पष्ट झाली. आता निर्विकल्पाची प्राप्ती कशी करावयाची ते निरूपणाद्वारे स्पष्ट करतो. (३७४२)

अगा रविदत्ता मागें तुजला । तूष्णीभाव जो सांगितला ।
आणि जागरसुषुप्तीचे संधीला । दाविलें निर्विकल्प ॥ ४३ ॥
रविदत्ता, तुला मागे तुष्णीभाव सांगितलेला आहे. (ओ. १०५०-१०५१ पहा) आणि जागृती आणि सुषुप्ती संधिकाळात प्राप्त होणारे निर्विकल्पही तुला सांगितले. (३७४३)

तें तिहीं अवस्थांमाजी एकरूप । अन्वयें व्यापून चिद्‌रूप ।
अवस्था होती जाती परी अल्प । तें न्यूनाधिक नव्हे ॥ ४४ ॥
ते निर्विकल्प जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन्ही अवस्थांमध्ये व्यापून राहते. अवस्थांमध्ये परिवर्तन होत जात असते पण ते चिद्रप थोडेसुद्धा कमी जास्त होत नाही. (३७४४)

जागृदादि अवस्था तिन्ही । स्वभावें असती जीवालागोनी ।
परी आगंतुक मूर्छा समाधि मरणीं । त्यांतही ज्ञान निघोट ॥ ४५ ॥
जागृती इ. तीन अवस्था जीवाच्या बाबतीत स्वाभाविकच आहेत, पण मूर्छा, समाधी आणि मरण या तीन्ही आगंतुक अवस्थांत ही निखळ ज्ञानच (चिद्रूपच) असते. (३७४५)

तेंचि निर्विकल्प ब्रह्म पूर्ण । असे सामान्यत्वें सर्वी सघन ।
या सविकल्पामाजींच निरखून । पाहतां कळे ॥ ४६ ॥
तेच परिपूर्ण असे निर्विकल्प ब्रह्म सामान्यत्वाने सर्वांमध्ये ठासून व्यापलेले असते. या सर्व सविकल्पांमध्येच बारकाईने पाहिल्यास त्याचे अस्तित्व कळून येईल. (३७४६)

परी मंदप्रज्ञासी स्फुरणापरतें । जें निर्विकल्प स्वतःसिद्ध ऐतें ।
तें अनुभविल्याविण सविकल्पा आंतौतें । सहसा जाणवेना ॥ ४७ ॥
परंतु मंदप्रज्ञाला स्फुरणापलीकडचे स्वतःसिद्ध आयते असलेले निर्विकल्प अनुभवल्यावाचून सविकल्पामध्ये सहसा कळून येत नाही. (३७४७)

तस्मात् रविदत्ता सावधान । आतां स्फुरणापरतें तुज दावीन ।
परी तूं स्फूर्ति शाखा हे त्यागून । लक्षी निर्विकल्प चंद्र ॥ ४८ ॥
म्हणून रविदत्ता, सावधान हो. आता तुला स्फुरणापलीकडचे चिद्रूप दाखवीन. पण तू त्यासाठी स्फूर्तिरूप शाखेचा (फांदीचा) त्याग करून निर्विकल्परूपी चंद्र पहाण्याची तयारी ठेव. (३७४८)

परी आरंभी तुवां आधीं । जैसा जैसा साधिला समाधि ।
तो तो अनुभवीत येईं निरवधि । वृत्तिव्याप्तीपर्यंत ॥ ४९ ॥
परंतु आरंभी, तू आधी ज्या क्रमाने समाधी लावत आलास ते ते टप्पे अनुभवीत वृत्तिव्याप्तीपर्यंत सरळ ये. (३७४९)

नेत्र उघडून एकांतीं । संधि ज्या साधिल्या निश्चितीं ।
एक विषय त्यागून वृत्ति । जाऊं पाहे विषयांतरा ॥ ५० ॥
एकान्तात नेत्र उघडून ज्या ज्या संधींचा अभ्यास केला असशील त्या पहा. या अभ्यासात वृत्ती एका विषयाचा त्याग करून दुसऱ्या विषयाकडे जाते. (३७५०)

मध्यसंधीसी विकल्पाविण । सामान्यत्वें स्वप्रकाशमान ।
तेंचि निर्विकल्प ब्रह्म पूर्ण । अनुभविलेंचि असे ॥ ५१ ॥
त्यावेळी दोन विषयांच्या संधीमध्ये जो सामान्य प्रकाश असतो तोच पूर्ण निर्विकल्प ब्रह्म होय. ते तू अनुभवलेच असशील. (३७५१)

तूं ह्मणसी ते सामान्य वृत्ति । विकल्पाविण पसरे स्फूर्ति ।
तरी ते जड करीना दीप्ति । तस्मात् प्रकाशक ब्रह्म ॥ ५२ ॥
तू म्हणशील की ती सामान्यवृत्ती होती. त्यावेळी स्फूर्ती विकल्परहित होऊन पसरत जाते. पण ती स्फूर्ती जड असल्यामुळे तिच्यात प्रकाशित करण्याचे सामर्थ्य नव्हते. प्रकाशित करण्याचे कार्य निर्विकल्प ब्रह्मच करत असते. (३७५२)

अथवा वृत्ति व्यापून मावळे । तेंचि मावळणे जया कळे ।
तें कळणे सहज निश्चळे । ब्रह्मात्मयाचें ॥ ५३ ॥
अथवा वृत्ती पसरत जाऊन मावळते. ते तिचे मावळणे (वृत्तिलय) ज्याला कळते, त्याचे ते कळणे म्हणजे निश्चितपणे ब्रह्मात्म्याचेच ज्ञान होय. (३७५३)

किंवा वृत्ति सामान्य पदार्थी व्यापतां । बुद्धीचा विकल्प उद्भवला नसतां ।
ते सहज प्रकाशिली अज्ञातता । जेणें तें निर्विकल्प ब्रह्म ॥ ५४ ॥
किंवा सामान्य वृत्तीने पदार्थाला व्यापले असताना, आणि बुद्धीचा विकल्प उद्भवला नसताना, जी अज्ञाततेची स्थिती ज्याने प्रकाशित केली तेच निर्विकल्प ब्रह्म होय. (३७५४)

विकल्प होऊन मावळून जाय । उगीच वृत्ति पदार्थमय ।
ते ज्ञातता जेणें प्रकाशित होय । तें निर्विकल्प ब्रह्म ॥ ५५ ॥
विकल्प निर्माण होऊन मावळतो. आणि केवळ एकटी वृत्तीच पदार्थाला व्यापून असते. ती ज्ञाततेची स्थिती ज्यामुळे प्रकाशित होते तेच निर्विकल्प ब्रह्म होय. (३७५५)

अगा पदार्थ आणि पदार्थसंधि । सविकल्पत्वें जीव आणि बुद्धि ।
पुढे ज्ञातता अज्ञातता आधीं । सामान्य वृत्तीसहित ॥ ५६ ॥
अरे रविदत्ता, पदार्थ आणि पदार्थांचा संधी, सविकल्पत्वाने जीव आणि बद्धी. त्यानंतर अज्ञातता आणि ज्ञातता आणि सामान्य वृत्ती यांना (३७५६)

हे एकदांचि जेणें प्रकाशिलें । प्रकाशून विकारा नाहीं पावलें ।
तेंचि निर्विकल्प ब्रह्म संचलें । विकल्पा आदिअंती ॥ ५७ ॥
ज्याने एकदम प्रकाशित केले आणि प्रकाशित केल्यानंतरही ज्याच्यात काहीही विकार उत्पन्न झाला नाही, तेच निर्विकल्प ब्रह्म विकल्पाच्या आरंभी आणि अंती व्यापून असते. (३७५७)

एवं डोळे उघडूनियां बैसतां । या रीतीं अनुभविली निर्विकल्पता ।
तेचि नेत्र लावोनी अंतरा आंतोता । कल्पनेसी अनुभविसी ॥ ५८ ॥
अशा प्रकारे डोळे उघडे ठेवून समाधीला बसल्यानंतर निर्विकल्पतेचा अनुभव घेतला. मग तोच अनुभव डोळे मिटून अंतःकरणामध्ये कल्पनेने घेतला. (३७५८)

एक कल्पना उठोनि गेली । दुजी नाहीं जो उठिली ।
ते संधि जेणें प्रकाशिली । तें निर्विकल्प ब्रह्म ॥ ५९ ॥
एक कल्पना उद्भवली आणि नाहीशी झाली आणि अजून दुसरी कल्पना उठलेली नाही असा जो संधिकाळ ज्याने प्रकाशित केला, तेच निर्विकल्प ब्रह्म होय. (३७५९)

तेथीलही ज्ञातता अज्ञातता । मागें ज्या रीती सांगितल्या तत्त्वतां ।
त्या प्रकाशिल्या जेणें समस्ता । तें निर्विकल्प ब्रह्म ॥ ६० ॥
तेथील ज्ञातता आणि अज्ञातता ज्या मागे स्पष्ट करून सांगितल्या आहेत (ओ. ३१०९ ते ३१२३ पहा) त्या सगळ्या ज्याने प्रकाशित केल्या तेच निर्विकल्प ब्रह्म होय. (३७६०)

अंतरींचे कल्पित विषय । कल्पक बुद्धि आणि जीव तन्मय ।
वृत्ति ज्ञानाज्ञान जेणे हा समुदाय । एकदांचि प्रकाशिला ॥ ६१ ॥
त्या स्वप्न अवस्थेत मनातले कल्पित विषय, कल्पना करणारी बुद्धी, जीव, त्यांच्याशी तन्मय झालेली वृत्ती, ज्ञान आणि अज्ञान हा सर्व समुदाय ज्याने एकदमच प्रकाशित केला, (३७६१)

प्रकाशी परी त्या त्या ऐसा । कदापि नव्हे विकारी सहसा ।
वायुमाजी गगनातें जैसा । किंचित् पालट नव्हे ॥ ६२ ॥
आणि प्रकाशित करूनही त्या त्या पदार्थाप्रमाणे केव्हाही विकारी झाला नाही, आणि वारा सुटला असताना आकाशात ज्याप्रमाणे काहीही बदल होत नाही; (३७६२)

एवं जागृतीस्वप्न व्यापारीं । जेधवां जीवत्व विकल्पागारी ।
तितुकें व्यापूनि सहज निर्विकारी । ब्रह्मात्मा परिपूर्ण ॥ ६३ ॥
त्याप्रमाणे जागृती आणि स्वप्न यांच्या व्यापारांमध्ये जीव विकल्पाकार झालेला असतो (विकल्पागारी असा पाठ घेतल्यास - जीव जेव्हा विकल्पांच्या आगारात तद्रूप झालेला असतो) तेव्हा जीवासकट त्या सर्व पदार्थांना व्यापूनही परिपूर्ण असा ब्रह्मात्मा निर्विकारी राहिलेला असतो. (३७६३)

तेथील विश्वतैजस अभिमान । धरि तो जीवचि एक आपण ।
इतुकेंही निर्हेतुत्वें प्रकाशवून । निर्विकल्पत्वे असे ॥ ६४ ॥
तेथील विश्व. तैजस हे अभिमान जीव धारण करतो. त्या सगळ्यांना निर्हेतुकपणे प्रकाशित करूनही ब्रह्मात्मा निर्विकल्पत्वाने राहतो. (३७६४)

एवं विक्षेपकाळी विक्षेपाकार । ब्रह्म नोव्हेचि कदा अणुमात्र ।
तो विक्षेप निमतांही समग्र । लय जो होय ॥ ६५ ॥
अशा प्रकारे विक्षेप निर्माण झाले असता ब्रह्म केव्हाही कणभरही विक्षेपाकार होत नाही. तो विक्षेप मावळल्यानंतर संपूर्णपणे जी लयाची अवस्था येते. (३७६५)

शून्याकार स्तब्धता की झोंप । तयाचा नेणता जीव हेतुरूप ।
जयासी प्राज्ञ नामाचा जल्प । इतुकें प्रकाशिलें जेणे ॥ ६६ ॥
त्या लयाचे तीन प्रकार होत. शून्याकार (मनाची शून्य स्थिती) स्तब्धता अथवा झोप. त्या अवस्थेत जीव कारणदेहात असून त्यावेळी त्याला प्राज्ञ असे नाव आहे. सुषप्तीमध्ये तो अज्ञान दशेत असतो. या सर्वांना जो प्रकाशित करतो; (३७६६)

तेथील सामान्य वृत्ति अज्ञातता । आणि जीवही लीनत्वे नेणता ।
परी तयासी निर्विकल्पं जाणता । तो अन्यथा नव्हे ॥ ६७ ॥
तेथील सामान्य वृत्ती, अज्ञातता, आणि लीन झाल्यामुळे अज्ञानी जीव पण या सर्वांना निर्विकल्प राहन जो जाणतो त्या ब्रह्मामध्ये काहीही बदल होत नाही. (३७६७)

पुढे कषाय जेव्हां उमटती । ते रंग आणि उसळे वृत्ति ।
तिचे जाणणे आणि आपुली भ्रांति । त्यातेंही प्रकाशी निर्विकल्प ॥ ६८ ॥
त्यानंतर कषाय नावाचे विघ्न उपस्थित होते. त्यामध्ये डोळ्यांसमोर निरनिराळे रंग दिसू लागतात. आणि त्याप्रमाणे वृत्तीही तदाकार होते. त्या वृत्तीचे जाणणे आणि साधकाचा भ्रम यांनाही निर्विकल्पच प्रकाशित करते. (३७६८)

इतुकेंही आत्मयाने प्रकाशिलें । परी वाउगेंचि नेणपण धरिलें ।
त्या प्राज्ञासही जेणें जाणिलें । अकृत्रिमपणे ॥ ६९ ॥
हे सर्व ब्रह्मात्म्यानेच प्रकाशित केलेले असते. परंतु सुषुप्तीत प्राज्ञाभिमानी जीव उगीचच नेणतेपणा स्वतःकडे घेतो. त्या प्राज्ञाभिमानी जीवालाही स्वाभाविकपणे ब्रह्मच प्रकाशित करते. (३७६९)

आतां अहंब्रह्मास्मि जे स्फूर्ति । विशेषे उठे अहंकृति ।
हाचि रसास्वादु विघ्नकर निश्चिती । परी प्रकाशी निर्विकल्प ॥ ७० ॥
आता समाधीमध्ये 'अहं ब्रह्मास्मि' अशी जी स्फूर्ती उत्पन्न होते आणि तिच्या रूपाने जो विशेष अहंकार उत्पन्न होतो, त्यालाच रसास्वाद म्हणतात. तो निश्चितपणे विघ्न करणारा आहे. पण त्यालाही निर्विकल्पच प्रकाशित करते. (३७७०)

जरी विश्वतैजसाकार जाहला । विकल्प जीवत्वें विकारला ।
तरी तो विकारही सर्व प्रकाशिला । निर्विकल्प ब्री ॥ ७१ ॥
जागृती आणि स्वप्न या अवस्थांमध्ये जरी जीवाने विश्व आणि तैजस हे अभिमान घेतले, विकल्पाच्या ठिकाणी जीवत्वाचा विकार झाला, तरी तो सर्व विकारच निर्विकल्प ब्रह्मात्म्याने प्रकाशित केलेला असतो. (३७७१)

अथवा प्राज्ञाकार होऊनी । जीवत्व उरे नेणपणीं ।
तयाही नेणतियालागूनी । निर्विकल्प प्रकाशी ॥ ७२ ॥
अथवा सुषुप्तीत प्राज्ञाकार धारण करून अज्ञानाच्या स्वरूपात जीवत्व उरले, तरी त्या अज्ञानी जीवालाही निर्विकल्प ब्रह्मच प्रकाशित करत असते. (३७७२)

पुढें अभ्यासें तदाकारता । जो सामान्य रसास्वादु तत्त्वतां ।
ब्रह्म ध्येयाकारत्वें ध्याता । विशेष स्फूर्तीविण ॥ ७३ ॥
पुढे अभ्यासाने चिद्गगनाशी तदाकारता प्राप्त होते. त्यावेळी सामान्य रसास्वाद नावाचे विघ्न उत्पन्न होते. त्यामध्ये ब्रह्म ध्येयाकार झालेले असते आणि ध्याता विशेष स्फूर्तीवाचून असतो. (३७७३)

येथील निरूपण तों प्रांजळ । केलेंचि करूं पुन्हा सकळ ।
कारण की स्फुरणापरतें जें निश्चळ । प्रतीतीस आले पाहिजे ॥ ७४ ॥
येथपर्यंतचे निरूपण स्पष्ट केले आहे. आता तेच सगळे निरूपण पुन्हा एकदा पाहू. कारण की त्यामुळे स्फुरणाच्या पलीकडचे जे ब्रह्म त्याची प्रचीती आली पाहिजे. (३७७४)

वृत्ति उठोनि चिद्गगनीं । पसरतां आकळी ध्येयालागूनी ।
तदाकारें तद्‌रूपचि होऊनी । ध्यातेपणाही विसरे ॥ ७५ ॥
वृत्ती उठल्यानंतर चिद्गगनात पसरते आणि आपल्या ध्येयाचे आकलन करते. ती तदाकार तद्रूप होते आणि आपल्या ध्यातेपणालाही विसरते. (३७७५)

जरी मी ध्यातसें हे स्फूर्ति उठेना । परी ध्यानी अवलंबितां ध्येया पूर्णा ।
ध्याता होतसे वृत्तिअवच्छिन्ना । तेव्हां ध्यान घडे ॥ ७६ ॥
जरी समजा, 'मी ध्यान करतो' अशी ध्यातेपणाची स्फूर्ती उठली नाही तरी ध्यानामध्ये ध्येयाचे पूर्णपणे अवलंबन करण्याचा प्रकार होतोच. पण ध्याता वृत्तीपासून पूर्णपणे वेगळा निघाल्यानंतरच खरे ध्यान घडते. (३७७६)

तें ब्रह्मसुख हा ग्रहणकर्ता । तरी वेगळा जाहला ध्येयासी ध्याता ।
तिसरें ध्यान हे त्रिपुटीची वार्ता । उद्भवे ध्याने ॥ ७७ ॥
ते ब्रह्मसुख आणि हा ते घेणारा असे जोपर्यंत आहे तोपर्यंत ध्याता ध्येयापासून वेगळाच राहिलेला असतो. आणि तिसरे ध्यान (ध्यान प्रक्रिया) लक्षात घेतले की, या ध्यानाची त्रिपुटी उत्पन्न झालीच म्हणावे. (३७७७)

तें ब्रह्म येणें अनुभविलें । तरी अनुभाव्य अनुभविते दोन जाहले ।
तिसरा अनुभव हे वेगळाले । होतसे अनुभवें ॥ ७८ ॥
ते ब्रह्म याने अनुभवले असे म्हणताच अनुभाव्य आणि अनुभविता असे दोन वेगळे झाले. त्याचबरोबर तिसरा अनुभवही निर्माण झाला. अशा प्रकारे अनुभवाची त्रिपुटी निर्माण झाली. (३७७८)

तें ज्ञेय येणे जाणतां । ज्ञेयाहून भिन्न पडे ज्ञाता ।
मध्ये तिसरे ज्ञान तत्त्वतां । हे उद्भवे त्रिपुटी ॥ ७९ ॥
ते ज्ञेय आणि हा जाणता ज्ञाता असे म्हणताच ज्ञेयाहन ज्ञाता वेगळा पडतो. आणि तिसरे ज्ञान हे मधले लक्षात घेता त्रिपुटी निर्माण होते. (३७७९)

या साधकें तें साध्य साधिलें । तरी साध्य साधक भिन्न पडिले ।
तस्मात् त्रिपुटीयोगें ऐक्य पावले । कदापि नाहीं ॥ ३७८० ॥
ते साध्य या साधकाने साधले असे म्हणताच साध्य आणि साधक भिन्न होतात. त्याचीही त्रिपुटी होते. त्या त्रिपुटीमुळे ब्रह्मात्मैक्य कधीही साध्य होत नाही. (३७८०)

ऐसें वेगळेपणे ध्येयध्याता । अथवा साध्य साधक ज्ञेय ज्ञाता ।
किंवा अनुभाव्य अनुभविता । भिन्न तोंवरि फळ काय ॥ ८१ ॥
ध्येय-ध्याता, साध्य-साधक, ज्ञेय-ज्ञाता किंवा अनुभाव्य-अनुभविता असे जोपर्यंत भिन्न आहेत तोपर्यंत कोणते फळ मिळणार आहे? (३७८१)

ब्रह्मात्मा कोणी एक भिन्न असे । आणि आपणही कोणी एक होतसे ।
हेंचि की मूलाज्ञान उमसे । ऐक्य नव्हे म्हणोनी ॥ ८२ ॥
ब्रह्मात्मा कोणी एक भिन्न पदार्थ आहे, आणि आपणही कोणी एक भिन्न आहोत अशी समजूत हेच मुळात मूलाज्ञान आहे. कारण या समजुतीमुळे ब्रह्मात्मैक्य शक्य नाही. (३७८२)

ऐसें कोटि जन्में ध्यान करितां । कदापि संभवेना ऐक्यता ।
तस्मात् विचारें कैशी ते अभिन्नता । वोळखिली पाहिजे ॥ ८३ ॥
अशा द्वैतभावनेने कोटी जन्म जरी ध्यान केले तरी ऐक्यभाव कधीच प्राप्त होणार नाही. म्हणून विचाराच्या साहाय्याने अभिन्नता कशी असते ते ओळखले पाहिजे. (३७८३)

येथें विरोध मानिसी सध्यां । की हे वर्णिली मागें ब्रह्मविद्या ।
अचुक पाववीतसे अनाद्या । आतां म्हणतां ऐक्य नव्हे ॥ ८४ ॥
यावर तुझ्या मनात विरोध निर्माण होईल. तो असा की या त्रिपुटीचे तुम्ही मागे ब्रह्मविद्या म्हणून वर्णन केले आहे. (ओ. ३५२४ ते ३५३१ पहा) ती ब्रह्माची अचूकपणे प्राप्ती करून देते म्हणून त्यावेळी सांगितलेत आणि आता ऐक्य सिद्ध होत नाही म्हणून कसे म्हणता? (३७८४)

तरी हे ब्रह्मविद्या बापा खरी । सेव्यमान असे ऋषिसुरनरीं ।
इच्या योगें पावले निर्विकारी । परी विचारद्वारा ॥ ८५ ॥
तर याचे उत्तर असे की, अरे, ही ब्रह्मविद्या खरीच आहे. सर्व ऋषी, देव, मानव हिची सेवा करत असतात. हिच्या साहाय्याने ते सर्व निर्विकार ब्रह्माची प्राप्ती करू शकले. पण केवळ ब्रह्मविद्या हे काम करू शकत नाही. तिला विचाराची जोड पाहिजे. ते सर्वजण विचाराच्या साहाय्यानेच शेवटी ब्रह्मप्राप्ती करू शकले. (३७८५)

जोवरी विचार उद्भवेना । तोवरी ऐक्य कदा घडेना ।
कर्तृतंत्ररूप अनुसंधाना । विचार होय तों असायें ॥ ८६ ॥
जोपर्यंत विचार उत्पन्न होत नाही, तोपर्यंत ब्रह्मात्मैक्य केव्हाही होऊ शकणार नाही. म्हणून विचार होईपर्यंत कर्तृतंत्ररूप अनुसंधान चालूच ठेवावे. (३७८६)

येवढी ज्ञानाची दृढता जाहली । ते कदापि न जाय व्यर्थ गेली ।
विचार होऊन ऐक्यता पाहिली । होईलचि निःसंशय ॥ ८७ ॥
एवढी ज्ञानाची दृढता झाली ती केव्हाही व्यर्थ होणार नाही. विचार होताच ऐक्यता होईलच, यात काही संशय नाही. (३७८७)

हे अन्यथा नव्हे कल्पांतीं । एवं हे ब्रह्मविद्या मोक्षदाती ।
परी जोवरी विचारा अनुत्पति । तोवरी भिन्न असे ॥ ८८ ॥
हे कल्पान्तीही कधी खोटे होणार नाही. ब्रह्मविद्या खरी मोक्ष देणारीच आहे. पण जोवर विचार उत्पन्न होत नाही, तोपर्यंत ती ब्रह्मात्मैक्यापासून भिन्न आहे, असे समज. (३७८८)

आणीक म्हणसी की भिन्न असतां । ध्यात्यासी नसे सुखाची वार्ता ।
तरी ऐसे नव्हे सुखरूप तत्त्वतां । जाहला असे तदाकारें ॥ ८९ ॥
तू आणखी असे म्हणशील की, असे भिन्नत्वाने राहिल्याने ध्यान करणाऱ्यास सुख मिळणारच नाही. तर असे होणार नाही. अरे, तो जेव्हा तदाकार झालेला असतो, तेव्हाच अगोदरपासूनच सुखरूप झालेला असतो. (३७८९)

हे वृत्ति त्या ब्रह्मसुखासी । विसरली होती निजात्मयासी ।
तेणें पावली होती सुखदुःखासी । अनंत कल्प ॥ ९० ॥
ही वृत्ती निजात्मरूप अशा त्या ब्रह्मसुखास विसरली होती. त्या योगाने अनंत कल्पेपर्यंत ती सुखदुःखे भोगत राहिली होती. (३७९०)

ते प्रतिदिनी ब्रह्मसुखीं मिळे । व्यापारी शिणोनि सुप्तीचे मेळं ।
परी सुख ऐसें ज्ञाने न कळे । म्हणोनि अप्राप्त ॥ ९१ ॥
दिवसाचे व्यापार करून शिणल्यानंतर झोपेची भेट झाल्यावर दररोज तिला ते ब्रह्मसुख मिळत होते. परंतु ते सुख आहे असे ज्ञान नसल्यामुळे तिला कळत नव्हते. म्हणून ते सुख तिला मिळत नव्हते. (३७९१)

तरी रविदत्ता तुवां समजावें । न कळून मिळतां सुखातें पावे ।
आणि समजून अभ्यासें सुखही न व्हावें । हे केवीं घडेल ॥ ९२ ॥
तर रविदत्ता, असे लक्षात आण की, जर ज्ञानाभावी कळत नसतानासुद्धा तिला ते सुख मिळत होते, तर मग आता ज्ञान झाल्यानंतर समजून उमजून केलेल्या अभ्यासाने तिला ते सुख मिळणार नाही, असे कसे होईल? (३७९२)

अरे सुप्तिजागृतीचिये संधी । सुख जें होतसे सामान्यबुद्धि ।
तें त्यागून परतवेना कधी । हे प्रसिद्ध सर्व जना ॥ ९३ ॥
अरे झोप आणि जागृती यांच्या संधीमध्ये सामान्य अनुभवाच्या योगाने बुद्धीला जे सुख मिळत होते त्याचा त्याग करून ती माघारी फिरायला तयार नसते हे सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध आहेच. (३७९३)

सुप्तींत तो केवळ ब्रह्मानंद । त्रिपुटीविण स्वानंदकंद ।
असतां तदाकारी परमानंद । नाहीं कवण म्हणे ॥ ९४ ॥
झोपेत तर त्रिपुटीरहित केवळ स्वानंदकंद असा ब्रह्मानंदच मिळत होता. मग वृत्ती तदाकार झाल्यानंतर तो श्रेष्ठ आनंद मिळणार नाही, असे कोण बरे म्हणेल? (३७९४)

येथेही कोणी मंदमति । मानिती की येवढी सुखानुभूति ।
असतां ज्ञाते कैसे परतती । व्यापाराकडे सुखत्यागें ॥ ९५ ॥
येथे एखादा मंदबुद्धीचा माणूस म्हणेल की, एवढा सुखाचा अनुभव असताना त्या सुखाचा त्याग करून ज्ञानी लोक व्यापाराकडे कसे परत येतात? (३७९५)

तरी याचे उत्तर ऐकावें । प्रारब्धभोगास्तव लागे भोगावें ।
जैसें सर्व जने जागे व्हावें । सुप्तिसुख त्यागूनी ॥ ९६ ॥
तर याचे उत्तर ऐक. सर्वच लोक ज्याप्रमाणे झोपेचे सुख सोडून जागे होतात त्याप्रमाणे ज्ञानी लोकांना प्रारब्धभोगासाठी व्यापारातील सुखदुःखे भोगावी लागतात. (३७९६)

सुप्तींतून जरी जागे जाहले । तरी कां तेथील सुख नाहीसें जाहलें ।
तैसें साधक समाधींतून उत्थान पावले । तरी ब्रह्मसुख उणे नव्हे ॥ १७ ॥
आपण झोपेतून जागे झालो म्हणजे झोपेतले सुख नष्ट झाले काय? त्याप्रमाणे साधकांना समाधीतून उत्थानदशेत यावे लागले म्हणून त्यांच्या ब्रह्मसुखात काही उणेपणा येत नाही. (३७९७)

जैसें नीड टाकनी पक्षी जाती । चारापाणी घेऊन येती मागतीं ।
तरी कां नीडी न म्हणावी विश्रांति । स्थळ त्या पक्षिया ॥ ९८ ॥
ज्याप्रमाणे पक्षी आपले घरटे सोडून बाहेर जातात, चारा पाणी घेऊन परत घरट्यात येतात, तेव्हा त्या घरट्यात त्या पक्ष्यांना विश्रांतीचे स्थळ मिळत नाही असे का म्हणावे? (३७९८)

तैसे साधक व्यापारें शिणतां । समाधींत पावती विश्रामता ।
मागुतीं प्रारब्ध वोढी प्रवृत्ति आंतोता । परी तेथें सुख अपार ॥ ९९ ॥
त्याप्रमाणे साधकही व्यापारात शिणल्यानंतर त्यांना समाधीमध्ये विश्रांती मिळते, पुन्हा प्रारब्धामुळे ते प्रवृत्तीमध्ये ओढले जातात, तरी समाधीतील सुख अपार असते. (३७९९)

सुखदुःखें वृत्ति शिणली होती । ते ब्रह्माकार जाहली फिटून भ्रांति ।
तयेसीच म्हणावी वृत्तिव्याप्ति । की पसरली ब्रह्मीं ॥ ३८०० ॥
सुखदुःखांनी वृत्ती शिणली होती, तिची भ्रांती दूर होऊन ती ब्रह्माकार झाली, हीच वृत्तिव्याप्ती होय. ती वृत्तीच ब्रह्मावर पसरते. (३८००)

ऐशी वृत्तिव्याप्ति ब्रह्मीं व्यापतां । हेंचि मी ब्रह्म कळे तत्त्वतां ।
तेव्हां न कळणे वृत्तीचे पाहतां । गेलें आवरण ॥ १ ॥
अशा प्रकारे वृत्ती ब्रह्माच्या ठिकाणी व्यापून राहिल्यानंतर तिला आपणच ते ब्रह्म आहोत, असे कळते. तेव्हा न कळणे हे वृत्तीचे आवरण जाते. (३८०१)

एवं अज्ञान जातां वृत्तीचें । तदाकारत्व जाहलें ब्रह्मींचें ।
हेंचि रूप ब्रह्मविद्येचे । त्रिपुटीसहित ॥ २ ॥
अशा प्रकारे वृत्तीचे अज्ञानत्व जाताच तिकडे ब्रह्माच्या ठिकाणी तिला तदाकारता प्राप्त होते. हेच ब्रह्मविद्येचे त्रिपुटीसहित रूप होय. (३८०२)

आधीच सुखदुःखें शिणली होती । ते मीनली ब्रह्मसुखी वृत्ति ।
तेणे अति आवढी वासनेप्रति । ह्मणोनि वासनानंद ॥ ३ ॥
वृत्ती अगोदरच सुखदुःखांनी शीण पावली होती. ती आता ब्रह्मसुखात मिसळली. त्यामुळे वासनेला अतिशय आनंद होतो. म्हणून त्या आनंदाला वासनानंद असे म्हणतात. (३८०३)

अन्य प्रीति सर्व विषयांची । विटूनि ब्रह्मसुखाची वाढली रुचि ।
तेथेंचि वासना दृढतर साची । मीनली तो वासनानंद ॥ ४ ॥
इतर सर्व विषयांच्या प्रीतीला विटल्यानंतर आता ही ब्रह्मसुखाची आवड वाढली. त्या ब्रह्मसुखाची वासना दृढ झाली. तोच वासनानंद होय. (३८०४)

जैसा जागृतिसुप्तीचा संधी । आनंदें सुखी जाहली बुद्धि ।
तैशीच तदाकारत्वें आधीं । वासना सुखरूप ॥ ५ ॥
ज्याप्रमाणे जागृती आणि सुषुप्तीच्या संधिकाळात बुद्धी सुखी झाली होती, त्याप्रमाणे या समाधीत वृत्ती तदाकार झाल्याने वासना सुखरूप होते. (३८०५)

तस्मात् ब्रह्मविद्या ते वृत्तिव्याप्ति । तोचि वासनानंद निश्चितीं ।
त्रिपुटीरूप ब्रह्मानुभूती । ध्येयाकारें ध्यान हेंची ॥ ६ ॥
त्यामुळे ब्रह्मविद्या हीच वृत्तीव्याप्ती होय. तोच निश्चयपूर्वक वासनानंदच होय. त्यामध्ये ब्रह्मानुभव त्रिपुटीच्या स्वरूपात असतो. त्यालाच ध्येयाकार झालेले ध्यान म्हणतात. (३८०६)

पुढे विचारें जेव्हां ब्रह्माभित्र । होय स्वयें त्रिपुटी त्यागून ।
तयासी नांव पूर्ण विज्ञान । वस्तुतंत्ररूप ॥ ७ ॥
पुढे विचाराच्या योगाने साधक जेव्हा त्रिपुटीचा त्याग करून ब्रह्माशिन्न (ब्रह्माशी एकरूप) होतो आणि त्याला वस्तुतंत्ररूप पूर्ण विज्ञान प्राप्त होते; (३८०७)

तोचि निर्विकल्प ब्रह्मानंद । अनुभवाविण केवळ निद्व ।
जैसा सुषुप्तिकाळीचा शुद्धबुद्ध । संचला उरे ॥ ८ ॥
तोच निर्विकल्प ब्रह्मानंद होय. तो अनुभवरहित (त्रिपुटीरहित) निखळ अद्वय असा असतो आणि ज्याप्रमाणे सुषुप्तीच्या अवस्थेत शुद्धबुद्ध (पूर्णज्ञान स्वरूपी) केवळ ब्रह्मरूपस्थिती असते तीच येथे प्राप्त होते. (३८०८)

परी सुषुप्तिकाळी नेणीव न फिटे । ह्मणोनि प्राज्ञाभिमानी न पालटे ।
तेथें मूलाज्ञान निःशेष आटे । अभिन्न समाधानें ॥ ९ ॥
फरक एवढाच की, सुषुप्तीत अज्ञान फिटलेले नसते, म्हणून प्राज्ञ अभिमानी जीवाचे स्वरूप काही बदलत नाही. हे मूळ अज्ञान केवळ अभिन्नत्वाच्या समाधानानेच निःशेष आटू शकते. (३८०९)

पहिले ब्रह्मविद्येने अज्ञान नाशिलें । अज्ञान जातां ज्ञान वितुळलें ।
पूर्ण विज्ञान ब्रह्मीं लय पावलें । उर्वरित तें विज्ञान ॥ १० ॥
प्रारंभीचे अज्ञान ब्रह्मविद्येने नष्ट होते, अज्ञान नाहीसे झाल्यानंतर ज्ञानही ओसरते. त्यानंतर उरलेले पूर्ण विज्ञान ब्रह्मस्वरूपात लय पावते मग जे उरते ते निखळ विज्ञान होय. (३८१०)

जैसें निवळींचे बीज पूर्ण । पाणियाचा गाळ नासून ।
आपणही नासे परी जीवन । शुद्ध उरे जैसें ॥ ११ ॥
ज्याप्रमाणे निवळीचे बी पूर्वीच्या गढूळ पाण्यातील गाळ नष्ट करून नंतर आपणही नष्ट होते. पण पाणी मात्र शुद्ध स्वरूपात पूर्ववत राहाते. (३८११)

तैसे अज्ञान ब्रह्मज्ञाने गेलें । त्यासवेंचि ज्ञानही मावळलें ।
पुढें अविनाश उर्वरित उरलें । चिद्‌रूप निर्विकल्प ब्रह्म ॥ १२ ॥
त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाने अज्ञान जाते त्याबरोबर ज्ञानही मावळते. त्यानंतर अविनाशी, चिद्रप, निर्विकल्प ब्रह्मच फक्त उरते. (३८१२)

आतां तें निर्विकल्प ब्रह्म सहज । त्रिपुटीविण जें सुषुप्तींत सतेज ।
आणि जें वाणीमनासी अचोज । तेंचि तूं प्रतीति बाणवू ॥ १३ ॥
आता ते जे निर्विकल्प, सहज ब्रह्म ते सुषुप्तीमध्ये त्रिपुटीवाचून स्पष्ट आहे. ते वाणी, मन यांना अनाकलनीय आहे. त्याचा तुला प्रत्यक्ष अनुभव करून देतो. (३८१३)

रविदत्ता तुवां मागें । प्रश्न केला होता अंगें ।
की स्फूर्तीपरतें जें अभंगे । अनुभवा न ये ॥ १४ ॥
रविदत्ता, तू मागे स्वतः प्रश्न केला होतास की स्फूर्तीपलीकडे असलेले ते अखंडित ब्रह्म अनुभवाला येत नाही. (३८१४)

आणि म्हणसी सुषुप्तिकाळींचा । ब्रह्मानंद त्रिपुटीविण साचा ।
तो अनुमाने जाणता नेणीवेचा । कळे उत्थानी ॥ १५ ॥
आणि आता म्हणत आहेस की, सुषुप्तीकाळीचा त्रिपुटीशिवाय असलेला ब्रह्मानंद खरा आहे. तो नेणिवेचा आनंद झोपेनंतर जागे झाल्यानंतर अनुमानाने कळतो. (३८१५)

हेंचि तुझें विरोधी बोलणें । सुषुप्तीचें ह्मणसी कळे अनुमानें ।
आणि समाधि घेतां पूर्णपणे । स्फुरणापरतां न कळे केवीं ॥ १६ ॥
या तुझ्या बोलण्यात विरोध आहे. झोपेतील आनंद अनुमानाने कळतो, असे तू म्हणतोस. मग समाधी घेतल्यावर स्फूर्तीच्या पलीकडील तो आनंद कळत नाही असे कसे असेल? (३८१६)

जैसा सुषुप्त्यानंद उत्थानीं । अनुभविला अनुमाने कडोनि ।
तैसा स्फूर्तित्यागें जो पूर्णपणीं । स्फूर्ति उत्थानीं कां न कळे ॥ १७ ॥
ज्याप्रमाणे सुषुप्त्यानंद (झोपेतील आनंद) उत्थान झाल्यानंतर अनुमानाने अनुभवता आला, त्याप्रमाणे स्फूर्तीच्या उत्थानानंतर स्फूर्तीचा त्याग केल्यानंतर जो ब्रह्मानंद पूर्णपणे अस्तित्वात असतो (स्फूर्तिकाळी तो स्फूर्तीच्या व्याप्ती एवढाच मर्यादित असतो) तो का कळणार नाही? (३८१७)

तथापि तुझा संशय न फिटे । तरी सावधान असावें नेटें ।
तुझें तुज रूप घनदाटें । संचलें तें दावू ॥ १८ ॥
तथापि तुझा संशय फिटला नाही असे दिसते. तरी निश्चयपूर्वक सावधान रहा. तुझे स्वरूप सर्वत्र कसे घनदाट व्यापलेले आहे ते तुला आता दाखवतो. (३८१८)

परी त्वां समाधि जो साधिला । वृत्तीने घेसी ध्येयाकाराला ।
आतां किंचित् अभ्यास तुजला । त्याहून विलक्षण सांगू ॥ १९ ॥
पण आतापर्यंत तू जी समाधी लावत होतास, तीमध्ये वृत्तीच्या साहाय्याने ध्येयाकार गाठणे या स्वरूपाची होती. आता त्या समाधीपेक्षा किंचित वेगळा असा अभ्यास तुला सांगतो. (३८१९)

येथेही तूं विरोध मानिसी । की मागा निरोपिलें निश्चयेंसी ।
वृत्ति-व्याप्ती पुढे अभ्यासासी । प्रयोजन नाहीं ॥ २० ॥
आता तुला यात काही विरोध जाणवेल. तू म्हणशील की 'मागे वृत्तिव्याप्तीच्या अभ्यासानंतर पुढे अभ्यासाचे कारण नाही असे आपण निश्चयपूर्वक सांगितले होते. (३८२०)

एक पुढें विचार पाहिजे । विचारेंचि अभिन्नता लाहिजे ।
आतां अभ्यास कांहीसा कीजे । ऐसा विरोध मानिसी ॥ २१ ॥
त्या अभ्यासानंतर फक्त विचाराची अपेक्षा आहे. विचारानेच अभिन्नता (अद्वय स्थिती) प्राप्त करावी असे सांगितल्यानंतर आता थोडा अभ्यास करावा असे सांगत आहात.' असा विरोध तुला जाणवेल. (३८२१)

तरी याचे उत्तर ऐकावें । हे भिन्न अभ्यासाचे रूप नव्हे ।
विचाराचे अंगचि समजावें । जेणे वृत्तीपरतें भेटे ॥ २२ ॥
तर याचे उत्तर ऐक. हे वेगळ्या अभ्यासाचे रूप नाही. ते विचाराचेच एक अंग समजावे. त्यायोगाने वृत्तीच्या पलीकडचा तो ब्रह्मानंद तुला प्राप्त होईल. (३८२२)

तस्मात् रविदत्ता हा अभ्यास । साधीं समाधिसमयास ।
हा ठसावतां विचार अनायास । होय अभिन्नत्वाचा ॥ २३ ॥
तेव्हा रविदत्ता, समाधीच्या वेळी आता हा अभ्यास कर. तो अभ्यास चांगला रुळला की अनायासे अभिन्नत्वाचा विचार साध्य होईल. (३८२३)

वृत्तीकडून ध्येयाकडे पाहसी । तेणें ध्याता तूं वेगळा ध्येयासी ।
तरी ते पाहणें त्यागी या समयासी । सांगतों तैसें करीं ॥ २४ ॥
तू आतापर्यंत वृत्तीकडून ध्येयाकडे पाहात होतास, त्यामुळे तू ध्याता होऊन ध्येयापेक्षा वेगळा राहात होतास. तर आता तशा पाहण्याचा त्याग कर, आणि मी आता सांगतो तसे कर. (३८२४)

ओतप्रोत जें चिद्गगन । त्यामध्ये वृत्ति पसरे उठून ।
ते वृत्ति पाहे अवलोकून । दृष्टीने ध्येयाच्या ॥ २५ ॥
चिद्गगन ओतप्रोत आहे. त्यामध्ये वृत्ती उठून पसरते ती वृत्ती त्या चिद्गगनाकडे ध्येयाच्या दृष्टीने पहाते. (३८२५)

ध्येयरूप में चिद्गगन । तें ओतप्रोत होऊन आपण ।
त्या आपणामध्ये पहावें स्फुरण । उठे पसरे केवीं ॥ २६ ॥
आतापर्यंत जे ओतप्रोत चिद्गगन ध्येयरूप होते ते आता आपण स्वतःच व्हावे, ओतप्रोत (सर्वव्यापी) व्हावे. आणि त्या आपल्या परिपूर्ण व्याप्त स्वरूपात स्फुरण कसे उठते, ते कसे पसरते, हे पहावे. (३८२६)

स्फुरण उठतां कळे आपणा । पसरतांही आपण देखणा ।
मावळे तरी लय साक्षी जाणणा । उरे स्फूर्तिअभावीं ॥ २७ ॥
स्फुरण कसे उठते ते आपल्याला कळते, ते कसे पसरते ते हेही आपण पाहतो, ते मावळते तेव्हा ही स्फूर्तीच्या अभावी तिच्या लयाचा साक्षी होऊन केवळ आपणच ज्ञातृस्वरूपात उरतो. (३८२७)

वृत्तीकडून ध्येयासी पाहणें । व्यापे तोंवरी होय जाणणे ।
वृत्ति मावळतां होय नेणणे । तेणें शून्य संदेह ॥ २८ ॥
वृत्तीच्या साहाय्याने ध्येयाकडे पाहिले, तर ती जेथपर्यंत व्यापू शकते तेथपर्यंतच ज्ञान होते आणि वृत्ती मावळताच पुढचे ज्ञान संभवत नाही आणि नेणतेपण स्वीकारावे लागते. त्यामुळे शून्यत्वाचा संशय निर्माण होतो. (३८२८)

वृत्ति निमतां ध्येय हरपलें । उगेंचि शून्याकार जाहलें ।
मागुती वृत्तीनें उठोनि देखिलें । पुन्हां निमतां शून्य ॥ २९ ॥
वृत्तीचा लोप होताच ध्येयही हरवते आणि उगीचच शून्याकार प्राप्त होतो. मग वृत्तीने पुन्हा उत्पन्न होताच ती ते ध्येय (चिद्गगन) पुन्हा पाहू लागते. पण ती लोपताच पुन्हा शून्याकार निर्माण होतो. (३८२९)

शून्य ह्मणिजे कांही नाहीं । नाहीं तेंचि ब्रह्म वाटे असोनिही ।
ऐशिया निश्चयें सर्वथाही । पुन्हां प्रवाही पडे ॥ ३० ॥
शून्य म्हणजे काहीच नाही आणि नाही तेच ब्रह्म वाटायला लागते. वास्तविक पाहता ब्रह्माला सत्ता आहे. ते शून्य नाही. पण ब्रह्म शून्यरूप मानन साधक पन्हा त्याच प्रवाहात सापडतो. (३८३०)

वृत्ति उठतां ज्ञान उद्भवें । तें ज्ञातृत्व वृत्तीचे समजावें ।
तें वृत्तिज्ञान सहज नाश पावे । मग शून्यपणे नेणीव ॥ ३१ ॥
वत्ती उठताच ज्ञान उत्पन्न होते. पण हे ज्ञातेपण वृत्तीचे समजावे. आणि वृत्तीचे ज्ञान सहज नष्ट होऊ शकते. ते नष्ट झाल्यावर शून्यत्व आणि त्यामुळे नेणीव क्रमप्राप्तच आहे. (३८३१)

वृत्तिरूप जो कां ध्याता । वृत्ति तोवरी ध्येयाकारता ।
दोनी निमती वृत्ति निमतां । पुढे शून्य उरे वाटे ॥ ३२ ॥
जो साधक वृत्तिरूपाने ध्यान करतो त्याला वृत्ती असेतोपर्यंत ध्येयाकरता येते. वृत्ती मावळताच ध्येय आणि ध्याता दोन्ही मावळतात आणि पुढे शून्यच उरले असे वाटते. (३८३२)

कांही ध्येयाकारें सुख वाटलें । तेंही वृत्ति निमतां मावळलें ।
एवं वासनानंदासी कल्पिलें । शून्यत्वाचि सुख ॥ ३३ ॥
ध्येयाकार झाल्यामुळे काही सुख झाल्यासारखे वाटते. पण वृत्ती मावळताच ते सुख मावळते. अशा प्रकारे वासनानंदास आणि शून्यत्वालाच सुख असे मानावे लागते. (३८३३)

ऐसें वृत्तीकडून ध्येयाकार । पाहे जरी होऊन एकाग्र ।
तरी परिणाम याचा साचार । शून्यत्व पावे ॥ ३४ ॥
अशा प्रकारे वृत्तीकडून ध्येयाकाराकडे एकाग्र होऊन पाहिले तर त्याचा शून्यत्व प्राप्ती हा परिणाम अटळ आहे. (३८३४)

यथार्थ ब्रह्म तें नाहीं कळलें । नसून शून्य ब्रह्म भाविलें ।
तेव्हां ज्ञान तें वृत्तीसी आलें । ब्रह्म जड सहज ॥ ३५ ॥
त्यामुळे यथार्थ ब्रह्म तर कळतच नाही आणि शून्यात्वालाच ब्रह्म मानले जाते, आणि ते ज्ञान वृत्तीलाच झालेले असते. तेव्हा सहजच ब्रह्म जड आहे असे ठरते. (३८३५)

सुखही वृत्ति उद्भवतां असे । ब्रह्म कांही सुखरूप नसे ।
एवं असज्जड दुःखात्मक ऐसें । निश्चया दृढ आलें ॥ ३६ ॥
वृत्ती उत्पन्न झाल्यावर ध्येयाकार होऊन तिला सुख वाटू लागते आणि त्यामुळे ब्रह्म हे सुखरूप आहे असे तिला वाटते. पण ब्रह्म तर सुखरूप नसते. आणि सुखही वृत्ती असेपर्यंतच असते. ती वृत्ती मावळल्यावर मग शून्य अज्ञानच उरते. अशा त-हेने ब्रह्म असत्, जड, आणि दुःखात्मक आहे असा दृढ निश्चय होतो. (३८३६)

वृत्तीच सच्चित्सुखरूप । वाउगा कल्पून बैसे आरोप ।
तयासी उत्थानीं उठतां संकल्प । पुर्ववत् दुःख होय ॥ ३७ ॥
ब्रह्माऐवजी सच्चित्सुखरूपता वृत्तीकडे येते. वृत्ती तशी नसताना तिच्यावर हा व्यर्थ आरोप होतो. मग या वृत्तिरूप ध्यात्याला उत्थानानंतर पुन्हा संकल्प उठतो आणि पुन्हा पूर्वीप्रमाणेच दुःख होते. (३८३७)

इतुके सायासें अभ्यास केले । ते शून्यब्रह्मीं वरपडे जाहले ।
तरी त्या अभ्यासासी व्यर्थत्व आलें । कां न म्हणावे ॥ ३८ ॥
म्हणजे इतके परिश्रम घेऊन अभ्यास केले. पण अखेरीस शून्य ब्रह्मच पदरी आले. तेव्हा ते अभ्यास व्यर्थ झाले असे का म्हणू नये? (३८३८)

ऐसा शून्य संदेहीं साधक । समाधिस्थ राहे जरी कल्प एक ।
तरी तो बापुडा निश्चयात्मक । कदा मुक्त नव्हे ॥ ३९ ॥
साधक जर अशा शून्यसंदेहामध्ये पूर्ण कल्पपर्यंत जरी समाधी लावून बसला तरी बिचाऱ्याला केव्हाही मुक्त होता येणार नाही. (३८३९)

ऐसा रविदत्ता घात होतसे । वृत्तिरूपाचिये अभ्यासें ।
तस्मात् विचारा उपयोगी असे । ध्येयाकडून वृत्ती पाहतां ॥ ४० ॥
तेव्हा रविदत्ता, वृत्तिरूपाच्या अभ्यासाने असा घात होतो. त्यामुळे ध्येयाकडून वृत्तीस पहाण्याचा अभ्यास विचाराच्या उपयोगाचा आहे. (तो अभ्यास, तू कर.) (३८४०)

ध्येय ब्रह्म जें परिपूर्ण । त्यामध्ये वृत्तीचे एकदेशी भान ।
उठतां पसरतां होय अवलोकन । तरी लयही जाणों लागे ॥ ४१ ॥
या अभ्यासामध्ये परिपूर्ण ब्रह्मच ध्येय आहे. त्यामध्ये वृत्तीचे एकदेशी भान होते. ती वृत्ती उठते कशी, पसरते कशी याचे अवलोकन करावे. तसे करताना त्या वत्तीचा लयही कळू लागतो. (३८४१)

ध्येयाच्या ज्ञानें वृत्ति जाणिली । की हे वृत्ति मज चिद्गगनीं उठली ।
मग ते वृत्ति जरी पसरून मेली । तरी ज्ञान उरे लयसाक्षी ॥ ४२ ॥
ध्येयाच्या ज्ञानाने ज्ञात्याला वत्तीचेही ज्ञान होते. ती वत्ती चिदगगन जो मी त्याच्या ठिकाणी उत्पन्न होते. मग ती वत्ती चिदगगनात पसरते. ती पसरून पढे नष्टही होते. तरी त्या लयाचा साक्षिदार म्हणून ज्ञान मागे शिल्लक राहतेच. (३८४२)

वृत्तीचा अंत मध्य उद्भव । आपुले दृष्टी पाहतसे सर्व ।
तिचा निःशेष जरी होतां अभाव । ज्ञानघन आपण उरे ॥ ४३ ॥
या प्रकाराच्या समाधीत वत्तीचा अंत. मध्य आणि उद्भव हे सर्व आपल्या दृष्टीस पडते. ती वृत्ती अगदी पूर्णपणे नष्ट झाली तरी ज्ञानघन चिद्रूप स्वतः शिल्लक राहतेच. (३८४३)

आपण ज्ञानघन जो कां उरला । तो जाणिल्यावीण प्रतीतीस आला ।
तरी वृत्तीचा मिथ्यापणा पाहिला । जरी उठे स्फूर्तिरूप ॥ ४४ ॥
मागे राहिलेले चिद्रूप त्याचा जाणीवरहित अनुभव जरी आला तरी त्यामुळे स्फुरणरूप वृत्ती जरी उठली तरी तिचे मिथ्यात्व आपण पाहिलेलेच असते. (३८४४)

वृत्तीसी असद्‌रूपता आली । अर्थात् सद्‌रूपता ब्रह्मींचि संचली ।
ऐशी प्रतीति बाणूं लागली । वृत्तीचे अभावींही ॥ ४५ ॥
वृत्तीचे असद्रप अनुभवास आले म्हणजे ब्रह्माची सद्रूपता सर्वत्र व्यापून कशी राहिलेली आहे, मग ती वृत्ती असो नसो, हे आपल्या प्रत्ययास येते. (३८४५)

वृत्तीचा अभाव जेणे पाहिला । तो ज्ञानघन ब्रह्मात्मा संचला ।
अर्थात वृत्तीचा पाहूं लागला । जडपणा सहज ॥ ४६ ॥
वृत्तीचा अभाव ज्याने पाहिला ते ज्ञानघन चिद्रूपच सर्वत्र व्यापून राहिलेले असते. याचा अर्थ असा की त्याने साहजिकच वृत्तीचे जडत्वही पाहिलेले असते. (३८४६)

जयाच्या सुखें हे वृत्ति पसरोनी । सुखरूप जाहली होती चिद्गगनीं ।
तो सुखैकघन पूर्णपणीं । वृत्तीसी सुख कैचें ॥ ४७ ॥
ज्याच्या सुखरूप असण्याने ही वृत्ती पसरून चिद्गगनात सुखरूप झाली होती ते सुखरूप पूर्णपणे त्या ब्रह्माचेच होते. ते तर सुखैक घन आहे. वृत्तीला सुख कसे असेल? ती तर जड आहे. (३८४७)

एवं ध्येयाकडोनी वृत्तिसी जाणतां । वृत्तीसी असज्जड दुःखरूपता ।
कळे आपुली प्रतीति बाणतां । अस्तिभातिप्रियरूप ॥ ४८ ॥
अशा प्रकारे ध्येयाकडून वृत्तीचे ज्ञान होऊ लागले की, वृत्ती कशी असत्, जड आणि दुःखरूप आहे हे कळते आणि त्याबरोबरच आपले म्हणजे ब्रह्मात्म्याचे अस्ति, भाति आणि प्रियरूप बाणू लागते. (३८४८)

वत्तीचा अभाव जो जाणता । तो आहे म्हणोन जाहला देखता ।
आहेपणा तो सद्‌रूपें तत्त्वतां । जाणता तो चिद्‌रूप ॥ ४९ ॥
वृत्तीच्या अभावाला जो जाणतो तो आहे म्हणूनच तो पाहणाराही होतो. आहेपणा ही त्याची सद्रूपता होय. आणि पाहणे अथवा जाणणे हे त्याचे चिठ्ठप होय. (३८४९)

वृत्ति अभावीं सुखवृत्तीचें । मावळून निजसुख उरे साचें ।
तया अनुभविता कोणी नवचे । तोचि ब्रह्मानंद ॥ ५० ॥
वृत्तीच्या अभावामुळे जी सुखरूपता जाणवत होती, ती मावळते आणि खरे स्वात्मसुख तेवढे उरते. त्याचा 'अनुभव' घेणारा कोणीच नसतो. (म्हणजे अनुभवाला आवश्यक अशी त्रिपुटी तेथे नसतेच). ते स्वात्मसुख म्हणजे ब्रह्मानंद होय. (३८५०)

एवं सच्चिदानंद आपण एक । वृत्ति असज्जड दुःखात्मक ।
ऐसा या अभ्यासाचा विवेक । प्रतीति येतसे ॥ ५१ ॥
अशा प्रकारे आपण आणि सच्चिदानंद ब्रह्मात्मा एकरूपच असून वृत्ती मात्र असज्जड दुःखात्मक आहे. असा या अभ्यासातील विचार आपल्या अनुभवास येतो. (३८५१)

जरी एकाएकी वृत्तीचा । अभाव कळू न ये साचा ।
तरी वृत्तीचिये संधीचा । प्रकार पहावा ॥ ५२ ॥
जर वृत्तीचा अभाव एकदम कळला नाही तर वृत्तीच्या संधीचे अवलोकन करावे. (३८५२)

एक वृत्ति पसरून चिद्गगनीं । वितळून जात असे ज्ञान पावोनी ।
दुसरी जोवरी उठे मागुनी । तोंवरी संधि दिसे ॥ ५३ ॥
एक वृत्ती उठते, ती चिद्गगगनात पसरते. तिला चिद्गगनाचे ज्ञान होते आणि ती वितळून जाते. त्यानंतर दुसरी वृत्ती जोपर्यंत उठत नाही, तोपर्यंत संधीचे अवलोकन करता येते. (३८५३)

त्या संधीसीच ह्मणावा लय । तितुका कळू आला प्रत्यय ।
तें वृत्तीवांचून कळणें जें होय । तें चिद्‌रूप ब्रह्मींचे ॥ ५४ ॥
या संधीलाच वृत्तीचा लय म्हणावे. जितका वेळ हा संधिकाल असतो तोपर्यंत ह्या लयाचा प्रत्यय येतो. या प्रकारचे वृत्ती नसताना जे कळते, ते जाणणे हेच ब्रह्माचे चिद्रूप होय. (३८५४)

तें चिद्‌रूप ब्रह्मींचे ह्मणतां । भावील ब्रह्म वेगळे तत्वतां ।
ऐसें नव्हे लक्ष्यलक्षण विचारितां । चिद्‌रूपचि ब्रह्म ॥ ५५ ॥
ते ब्रह्माचे चिद्रूप असे म्हणताच ब्रह्म वेगळे आणि चिद्रूप वेगळे असावे अशी कल्पना होते. पण ते तसे नसते. येथे लक्ष्य ब्रह्म आणि त्याचे लक्षण म्ह. चिद्रप ही दोन भिन्न नाहीत. तर ब्रह्माच्या संदर्भात लक्ष्य आणि लक्षण दोन्ही एकवटलेली आहेत. म्हणून चिद्रूप हेच ब्रह्म आहे. (३८५५)

जैसा राहोचें शिर तोचि राहो । तेथें भिन्नपणाचा नसे संदेहों ।
तैसाचि चिद्‌रूप ब्रह्मात्मा निःसंदेहो । लक्ष्यलक्षणरूप ॥ ५६ ॥
ज्याप्रमाणे राहूचे शिर म्हणजे राहूच होय, त्यामध्ये भिन्नपणा नाही. त्याप्रमाणे चिद्रूप हेच निःसंशयपणे ब्रह्मात्मा होय. येथे लक्ष्य आणि लक्षण दोन्ही एकरूपच आहेत. (३८५६)

असो संधिचियाही अवसरीं । स्फूर्ति असे चिद्गगनाकारी ।
ज्ञातता अज्ञाततेची परी । पहावी साधकें ॥ ५७ ॥
हे असू देत. पण संधीच्या काळात सुद्धा वृत्ती चिद्गगगनाकार झालेली असते. त्यावेळी साधकाने ज्ञातता अज्ञातता या अभ्यास प्रकारांना अनुभव घ्यावा. (३८५७)

वृत्ति उठतांचि प्रथमतां । ब्रह्म न कळणे ते अज्ञातता ।
पुढें हेंचि ब्रह्म ऐसें कळतां । ज्ञातता तया नांव ॥ ५८ ॥
प्रथम ज्यावेळी वृत्ती उठते. त्यावेळी ब्रह्म कळत नाही. ही अज्ञातता होय. नंतर हेच ते ब्रह्म' असे कळते. हीच ज्ञातता होय. (३८५८)

एवं वृत्ति उठणे पसरणे । आणि मावळोनि लय होणे ।
संधीचाही प्रत्यय बाणें । ज्ञातता अज्ञातताही कळे ॥ ५९ ॥
अशा प्रकारे वृत्तीचे उठणे, पसरणे, मावळणे म्ह. तिचा लय होणे, या गोष्टी या समाधीत पाहता येतात. त्याचप्रमाणे ब्रह्मात्म्याकडून वृत्तीकडे पाहण्याच्या अभ्यासाने संधीचाही अनुभव बाणतो, आणि ज्ञातता व अज्ञातताही कळतात. (३८५९)

इतुकेंही कळलें जयासी । तो चिद्‌रूप ब्रह्मात्मा अविनाशी ।
आत्मा ह्मणिजे आपण निश्चयेंसी । जें ब्रह्म निर्विकल्प ॥ ६० ॥
एवढे सगळे ज्याला कळले तो स्वतः चिद्रूप, अविनाशी ब्रह्मात्माच असतो. आत्मा म्हणजे आपण स्वतःच निर्विकल्प ब्रह्म निश्चितपणे होतो. (३८६०)

तया ब्रह्मात्मयावांचून । लय न कळे वृत्तीलागून ।
ज्ञातता अज्ञातताही प्रकाशमान । प्रकाशें जयाच्या ॥ ६१ ॥
त्या ब्रह्मात्म्याशिवाय वृत्तीचा लय कळत नाही. ज्ञातता, अज्ञातता या अवस्थाही त्याच्याच प्रकाशाने प्रकाशमान होतात. (३८६१)

वृत्तीचेंही उठणे पसरणे । हेही चिद्रूपेंचि वोळखणे ।
परी वृत्ति आहे तोवरी अनुमानें । संशय असे ॥ ६२ ॥
वृत्तीचेही उत्पन्न होणे, पसरणे हेही चिद्रूपालाच कळते. पण वृत्ती असेतोपर्यंत अनुमानाने ते कळते. पण त्या अनुमानातही संशयाला जागा राहते. (३८६२)

ब्रह्मींचे कळणे खरें कळलें । वृत्तीचें जडत्व प्रतीती आलें ।
मग वृत्ति उठतांही कळू लागलें । की देखणे निर्विकल्पाचें ॥ ६३ ॥
नंतर ब्रह्मच खरे जाणणारे आहे, हे कळले. वृत्तीचे जडत्व अनुभवास आले, की त्यानंतर मात्र वृत्ती उठल्यानंतरही कळू लागते की पाहणे, जाणणे हे ब्रह्माचेच असते. (३८६३)

परी हा प्रत्यय बाणे तोंवरी । वृत्तिच वाटे जाणती खरी ।
पर वृत्तीला लय जो निर्धारी । वृत्ति न देखे कदा ॥ ६४ ॥
पण हा अनुभव बाणेपर्यंत वृत्तीच खरी जाणणारी आहे, असे वाटत असते. पण वृत्तीचा लय वृत्तीला कधीही कळत नाही, हे लक्षात घे. (३८६४)

तस्मात् वृत्तिलयाचा जो देखणा । तोचि ब्रह्मात्मा पूर्णपणा ।
हे सत्य सत्य सत्य त्रिवचना । अन्यथा नव्हे नव्हे ॥ ६५ ॥
तेव्हा वृत्तिलय जो पाहतो तोच परिपूर्ण असा ब्रह्मात्मा आहे, हे त्रिवार सत्य आहे. ते कधीही खोटे ठरणार नाही. (३८६५)

रविदत्ता आतां तुजसी । पुसेन तें सांगें वेगेंसी ।
वृत्तीचा लय जो अनुभवासी । तुझिया आला की नाहीं ॥ ६६ ॥
रविदत्ता, आता मी तुला काही प्रश्न विचारतो. त्यांची उत्तरे तू लागलीच दे. वृत्तीचा लय हा तुझ्या अनुभवाला आला की नाही? (३८६६)

लय जरी त्वां असेल पाहिला । तरी विचार पुढील सांगू तुजला ।
नातरी मागुती अभ्यास करीं वहिला । ध्येयाकडून पाहण्याचा ॥ ६७ ॥
जर वृत्तीचा लय तू अनुभवला असशील, तर त्याच्या पुढचा विचार तुला सांगेन. तसे नसेल तर ध्येयाकडून वृत्तीची उत्पत्ती, प्रसरण आणि लय पाहण्याचा अभ्यास पुन्हा एकदा कर. (३८६७)

तंव रविदत्त करून नमन । विनवीतसे कर जोडून ।
वृत्तिलयाचे होतसे ज्ञान । परी ब्रह्मात्मा कैसा न कळे ॥ ६८ ॥
तेव्हा रविदत्ताने नमस्कार करून हात जोडून विनंती केली. तो म्हणाला, "मला वृत्तिलयाचे ज्ञान होते, पण ब्रह्मात्मा कसा आहे ते कळत नाही. (३८६८)

इतुकें प्राथून पुन्हां नमी । तें ऐकोन बोलती स्वामी ।
आतां येचि क्षणीं निजधामीं । तुझे तुजसी घालवू ॥ ६९ ॥
अशी प्रार्थना करून त्याने पुन्हा नमस्कार केला. ते ऐकून स्वामी म्हणाले, "आता याच क्षणाला तुला तुझ्या निजधामाला पाठवतो. (३८६९)

अगा रविदत्ता अज्ञान अंवस । परवां सरली कालिंचा जो दिवस ।
पाडवाही गेला समाधि अभ्यास । आज स्वानुभूति बीज ॥ ७० ॥
अरे रविदत्ता, अज्ञानरूपी अमावास्या परवा संपली. कालचा दिवस पाडव्याचा होता. तो म्हणजे समाधीचा अभ्यास. तो काल संपला. आता आज स्वानुभवरूपी द्वितीया उजाडली आहे. (३८७०)

ऐशी शुद्धबीज उदेली । वृत्तीचे संधीची वेळ आली ।
जेथे ज्ञातता अज्ञाततेची प्रगटली । झावळी वेळ ॥ ७१ ॥
अशी शुक्ल पक्षातली द्वितीया आज उजाडली आहे. वृत्तीच्या संधी पहाण्याचा अभ्यास ही ती द्वितीया होय. त्याच निमित्ताने या समाधिप्रकारातील ज्ञातता आणि अज्ञातता यांची झावळी वेळ प्रगटली आहे. (३८७१)

ऐशिये समयीं ब्रह्मात्मा चंद्र । चिद्गगनीं उदेला पश्चिमे समोर ।
तूं मात्र न पाहसी सत्वर । दृष्टि चिद्गगनीं पसरली ॥ ७२ ॥
अशा या वेळी पश्चिमेला ब्रह्मात्मारूपी चंद्र चिद्गगनात उगवलेला आहे. तुला मात्र तो लवकर दिसणार नाही. कारण तुझी दृष्टी चिद्गगनात पसरली आहे. (३८७२)

तरी पाहे स्फूर्ति पसरली या रुखा । जेथून उद्भवली सूक्ष्म शाखा ।
तिजहून पाहें अति सूक्ष्म रेखा । ब्रह्मात्मया चंद्राची ॥ ७३ ॥
तर तू असे पहा की, पसरलेली स्फूर्ती ही वृक्ष होय. त्या वृक्षाची एक बारीक फांदी त्या वृक्षावर उगवली आहे. तिच्यावरून ब्रह्मात्मारूप चंद्राची अति सूक्ष्म कोर तू पहा. (३८७३)

हे विचाररूप निज अंगुली । दाविली अनुभाव्य अंतराळीं ।
तरी आतां तिचे दृष्टीने न्याहाळीं । तयासी विचारें ॥ ७४ ॥
अशा विचाररूपी स्वतःचे बोट स्वामींनी अनुभाव्य अशा अंतराळात दाखवले. आता या बोटाच्या दिशेने तू निरीक्षण कर. आणि विचाराच्या साहाय्याने ब्रह्मात्मारूपी चंद्राचे निरीक्षण कर. (३८७४)

यापरतें बापा आह्यासी । दावितां न ये न बोलवे वाचेसी ।
आतां तुझा तूंचि चंद्र अविनाशी । पाहें आह्यां शब्द नाही ॥ ७५ ॥
अरे, यापेक्षा अधिक काही आम्हाला दाखवता येणार नाही. किंवा शब्दांनीही सांगता येणार नाही. तर या सांगितलेल्या खुणांच्या साहाय्याने तूच तुझा अविनाशी असा चंद्र पहा. आता आम्हांला दोष देऊ नकोस. (३८७५)

आणीकही तुजला खूण । सांगतों यथार्थ निर्वाण ।
पाहें म्हणतां भावोनि आन । पहावया जाशी ॥ ७६ ॥
आणखीही एक खूण तुला सांगतो. ती खूण म्हणजे खऱ्या अथनि मोक्षच आहे. ती 'मी' पाहतो असे म्हणून दुसऱ्याच कशाची तरी कल्पना करून पाहायला जाशील. (३८७६)

पाहशी अथवा जाणों जाशी । किंवा लक्षांशेंही लक्षिशी ।
तरी वृत्तियोगचि अवलंबिशी । तेणें त्रिपुटीच होय ॥ ७७ ॥
तू तो चंद्र पाहशील अथवा पाहायचा प्रयत्न करशील किंवा लक्षाशाने पाहू जाशील तर ते तुझे पाहणे वृत्तीच्याच साहाय्याने होणार आहे. त्यामुळे पुन्हा त्रिपुटीच्या फेऱ्यात सापडशील. (३८७७)

त्रिपुटीही होऊन पूर्ववत । होईल विज्ञात तेंचि अज्ञात ।
आणि वृत्ति निमतांचि अकस्मात । शून्यसंदेहीं पडसी ॥ ७८ ॥
मग त्या त्रिपुटीमुळे तुझी स्थिती पूर्वीसारखीच होईल. आणि जेवढे काही तुला 'विज्ञात' झाले होते म्हणजे कळले होते तेही नष्ट होऊन त्याचे रूपान्तर ‘अज्ञाता'त होईल. तुझे गाडे पूर्वपदावर येईल. आणि ती वृत्ती नष्ट होताच तू 'शून्य' संदेहात पडशील.(३८७८)

तस्मात् पाहणे अथवा जाणणें । किंवा लक्षांशी अनुभवणे ।
यया मार्गीच न जाणे । भिन्नत्वाच्या ॥ ७९ ॥
तेव्हा पाहणे अथवा जाणणे किंवा लक्षांशाने अनुभवणे या भिन्नत्वाच्या मार्गांनी जाऊच नकोस. (३८७९)

येथे विचारचि करावा । जाणण्याचा मार्ग त्यागावा ।
तरीच हा मायिकाचा गोंवा । तुटेल सर्व ॥ ८० ॥
तर अशा प्रसंगी विचाराचाच अवलंब करावा. जाणण्याचा मार्ग सोडून दे. तसे केलेस तरच हा मायिकाचा (मिथ्या गोष्टींचा) गुंता सर्व तुटून जाईल. (३८८०)

नातरी जाणण्याचे मार्गे चालतां । विचारा न पविजे कल्पाता ।
जंव जंव जाणों जाय ज्ञाता । तों तों भिन्न पडे ॥ ८१ ॥
तसे नाही केलेस आणि जाणण्याच्या मार्गाने (म्ह. त्रिपुटीच्या मागनि) गेलास तर कल्पांतापर्यंत चाललास तरी विचार तुला प्राप्त होणार नाही. कारण त्या मागनि जाणू पाहणारा ज्ञाता जेव्हा जेव्हा जाणण्याचा प्रयत्न करील तेव्हा तेव्हा ब्रह्मात्म्यापासून वेगळा पडत राहील. (३८८१)

तस्मात् रविदत्ता विचार करीं । जाणते वृत्तीचा त्याग करीं ।
तो विचारही येणे अवसरीं । तुज बोलून दावू ॥ ८२ ॥
म्हणून रविदत्ता, विचार कर, जाणू पाहणाऱ्या वृत्तीचा त्याग कर. तो विचारही कसा करायचा हे या प्रसंगी तुला शब्दांच्या साहाय्याने सांगतो. (३८८२)

तुवां वृत्तीचा लय पाहिला । तो वृत्तीसि तों नाही कळला ।
त्या वृत्तीचा शून्यपणा जाहला । तरी त्या कळेना अभाव ॥ ८३ ॥
तू वृत्तीचा लय पाहिलास, तो वृत्तीला कळला नाही. ती वृत्ती मावळन तिचे शन्यपणात रूपान्तर झाले. त्या शून्यपणाला वृत्तीचा अभाव कसा कळेल? (३८८३)

तस्मात् तूं जो असंग ब्रह्मात्मा । अखंडैक रस परमात्मा ।
तयाची निजदृष्टीची गरिमा । असे लयसाक्षित्वाची ॥ ८४ ॥
तेव्हा तू जो स्वतःच असंग ब्रह्मात्मा आहेस, अखंडरस असा परमात्मा आहेस, त्यालाच आत्मदृष्टीच्या वैभवाने लय साक्षित्वाचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. (३८८४)

वृत्तीविण वृत्तीचा लय । जाणे जो स्वतां अद्वय ।
तेंचि चिद्रूप निःसंशय । देखणा शून्याचा ॥ ८५ ॥
तो ब्रह्मात्मा स्वतः अद्वय असून तो वृत्तीच्या अभावी वृत्तीचा लय पाह शकतो. तोच निःसंशयपणे स्वतः चिद्रूपच आहे. आणि तोच शून्याचा सुद्धा द्रष्टा आहे. (३८८५)

म्हणसी ब्रह्मात्मा जाणे लयासी । परी ब्रह्मात्मा कैसा ये प्रतीतीसी ।
तरी तो जाणावा कोणे अविनाशी । हे सांगे विचारूनी ॥ ८६ ॥
यावर तू म्हणशील की ब्रह्मात्मा वृत्तिलय अथवा शून्य यांना जाणेल, पण स्वतः ब्रह्मात्म्याची ओळख कशी पटत नाही? तो अविनाशी कोठे जाणावा? हे विचारपूर्वक मला सांग. (३८८६)

वृत्तीने तो कोटि वर्षे धुंडितां । कळला नाही जीवंत असतां ।
आतां तों गेली मेली बुडाली वार्ता । तरी पहावया योग्य नाहीं ॥ ८७ ॥
वृत्तीच्या साहाय्याने ती जिवंत असता कोट्यवधी वर्षे त्याचा शोध घेतला, पण तो कळला नाही. आता ती गोष्ट संपली, ती मेली, बुडाली; तरी तिला तो ब्रह्मात्मा पहाता येणार नाही. (३८८७)

तो जो वृत्तीचा लय जाहला । अभावशून्य म्हणावें तयाला ।
तया शून्यासी जाईल कळला । हें न घडे कल्पांती ॥ ८८ ॥
तो जो वृत्तीचा लय झाला त्याला वृत्तीचा अभाव किंवा वृत्तिशून्यता म्हणावे. पण त्या शून्याला तो ब्रह्मात्मा कळू शकेल, हे कल्पान्तीही घडणार नाही. (३८८८)

वंध्येचा पुत्र टकमकां पाहे । आकाशाचा रेणु लवलाहें ।
हे कधीही बोलणें न साहे । तेवीं शून्य जाणेना ॥ ८९ ॥
वांझ स्त्रीचा पुत्र जन्मल्याबरोबर आकाशाच्या कणाकडे टकमक पाहू लागला; असे बोलणे क्षणभरही कोणी सहन करणार नाही. त्याप्रमाणे शून्याला ब्रह्मात्मा कधीच जाणता येणार नाही. (३८८९)

अरे जें उत्पन्नचि जाहलें नसतां । तें अंध ना डोळस तत्त्वतां ।
तें केवी जाणेल अनंता । परमात्मयासी ॥ ९० ॥
अरे, जे उत्पन्नच झाले नाही, जे आंधळेही नाही, आणि डोळसही नाही, ते अनंत परमात्म्याला कसे जाणू शकेल? (३८९०)

तस्मात् शून्य शून्यपणे देखेना । वृत्तीही ब्रह्मात्मया जाणेना ।
वृत्तीने जाणिलें तें असेना । सत्य कदापि ॥ ९१ ॥
म्हणून शून्य शून्यपणामुळे पाहू शकत नाही, वृत्तीदेखील ब्रह्मात्म्याला जाणत नाही; आणि वृत्तीला जे जाणवते ते कधीही सत्य असणार नाही. (३८९१)

तरी आतां कवणे जाणावें । हे यथार्थ पुरतें विचारावें ।
जरी म्हणसी ब्रह्म अवलोकावें । ब्रह्मरूपेंची ॥ ९२ ॥
तर मग आता ते कोणाला कळेल? हे पूर्ण विचार करून सांगावे. जर तू म्हणशील की, ब्रह्म ब्रह्मरूपानेच पहावे; (३८९२)

तरी ऐकावें सावधान । हेही न घडे विरोधी वचन ।
बोलसी की आपणासी आपण । जाणावें स्वतां ॥ ९३ ॥
तर सावध होऊन ऐका, असे विरोधी बोलणे कधी शक्य होणार नाही. आपणच स्वतः आपल्याला कसे जाणावे? (३८९३)

डोळियासी डोळा दिसेना । रसनेसी रसना चाखवेना ।
आपुलीये खांदा बैसवेना । आपणासी कष्टी होता ॥ ९४ ॥
आपल्या डोळ्याला आपण स्वतः पाहू शकत नाही. जिभेला प्रत्यक्ष जिभेचा आस्वाद घेता येणार नाही. आपल्याला आपल्याच खांद्यावर बसता येणार नाही, उलट आपल्यालाच कष्टी मात्र व्हावे लागेल. (३८९४)

डोळा जरी आरशियास्तव । पाहे तरी तें मिथ्या सर्व ।
आरशिया मुळीच डोळ्यांचा अभाव । तरी पाहिला तो मिथ्या ॥ ९५ ॥
डोळा आरशात स्वतःला पाहू शकेल, पण ते पहाणे मिथ्या असते. आरशात डोळा मुळीच नसतो. तेव्हा जो पाहिला तो मिथ्या ठरतो. (३८९५)

तो आरसा आणि आरशियाचा । डोळा पाहिला तो आभासाचा ।
परी डोळियासी डोळा जो असे साचा । तो न देखे सहसा ॥ ९६ ॥
आरशात डोळा पाहिला तो आभासरूप डोळा होता, पण खरा डोळा खऱ्या डोळ्याला कधीच पाहू शकणार नाही. (३८९६)

तैसा ब्रह्मात्मा जो परिपूर्ण । आपणा अमुकसा न जाणे आपण ।
जरी वृत्ति उठतां होय भासमान । ज्ञाता ध्याता साधक ॥ ९७ ॥
त्याप्रमाणे परिपूर्ण असलेला ब्रह्मात्मा, आपण अमुक अमुक आहोत म्हणून जाणू शकत नाही. वृत्ती उठल्यानंतर तो भासमान झाला. तिच्या साहाय्याने तो ज्ञाता, ध्याता, साधक इ. होतो. त्यांना तो जाणताच येणार नाही. (३८९७)

तया वृत्तीसी आणि भासमानासी । जाणतचि असे आत्मा अविनाशी ।
परी तें मिथ्याचि तरीते कायशी । जाणण्याची मात ॥ ९८ ॥
पण त्या वृत्तीला आणि भासमान होणाऱ्या ज्ञाता, ध्याता, साधक इ. ना तो अविनाशी आत्मा जाणतच असतो. पण मुळात ते भासमानच असल्यामुळे मिथ्याच असतात. तेव्हा त्याच्या त्या जाणण्याला काय अर्थ असतो? (३८९८)

त्याविरहित जो आपण उरला । तें तो जाणतां न ये तयाला ।
डोळा न देखेचि डोळियाला । तेवींच ब्रह्म ब्रह्मासी ॥ ९९ ॥
ती वृत्ती, तो भासमान, स्वतः ज्ञाता यांच्याही पलीकडे जे उरते ते मात्र या कोणालाही जाणता येत नाही. डोळा प्रत्यक्ष डोळ्याला पाहू शकणार नाही, तसे ब्रह्म ब्रह्माला जाणू शशकणार नाही. (३८९९)

जरी न देखे आपआपणासी । परी जाणतसे वृत्ति वृत्तिगतासी ।
डोळा न पाहे जरी डोळियासी । परी आरसा आभासा पाहे ॥ ३९०० ॥
जरी आपण आत्म्याला जाणू शकत नसलो तरी वृत्ती वृत्तीत पडलेल्या आभासाला पाहू शकते. डोळा डोळ्याला पाहू शकत नाही म्हणून काय झाले? आरसा तरी आभासाला पाहू शकतो ना! (३९००)

डोळा न देखे जरी डोळिया । तरी तें देखणें न ह्मणावें वायां ।
तैसें ब्रह्म ब्रह्मीचे न ये प्रत्यया । तरी चिद्रूप अन्यथा नव्हे ॥ १ ॥
डोळा जरी डोळ्याला पाहू शकत नसला तरी त्याचे पाहणे व्यर्थ आहे असे म्हणता येणार नाही. त्याप्रमाणे ब्रह्माला ब्रह्म अनुभवता आले नाही तरी चिद्रप खोटे आहे असे म्हणता येणार नाही. (३९०१)

कारण की डोळा अंधारा पाहे । तैसा वृत्तीचा लय जाणताहे ।
अंधार की लय जया कळताहे । हे तों नव्हे अन्यथा ॥ २ ॥
कारण की डोळा अंधाराला पाहू शकतो, त्याप्रमाणे ब्रह्मात्मा वृत्तीचा लय जाणतो. ज्याला अंधार कळतो किंवा ज्याला वृत्तीचा लय कळतो. त्यांना असत्य म्हणता येणार नाही. (३९०२)

जोंवरी दीप न लागे । तोवरी अंधार पाहूं लागे ।
तैशी जोंकाल वृत्ति नुमगे । तोंकाल लया जाणे ॥ ३ ॥
जोपर्यंत दिवा पेटलेला नसतो, तोपर्यंत डोळा अंधार पाहत असतो. त्याप्रमाणे वृत्ती जोपर्यंत उठत नाही, तोपर्यंत चिद्रप ब्रह्मात्माच लय पाहत असतो. (३९०३)

दीप लागतां अंधार नासे । तेव्हां डोळा प्रकाशा पाहतसे ।
तैशी वृत्ति जेव्हां उमसे । ती प्रकाशे जयाचेनी ॥ ४ ॥
दिवा लागताच अंधार नष्ट होतो. त्यावेळी डोळा प्रकाश पाहत असतो. त्याप्रमाणे वृत्ती जेव्हा उत्पन्न होते, ती त्या ब्रह्मात्म्यामळेच प्रकाशित होते: (३९०४)

मंदिरींचे पदार्थ सान थोर । मिळतां दीप आणि नेत्र ।
दिसू लागती जे जे समोर । अंधाराभावीं ॥ ५ ॥
मंदिरात अनेक लहानथोर पदार्थ असतात तेथे दिवा आणि डोळे यांचा संयोग होताच जे जे समोर येईल ते ते दिसू लागते. त्यावेळी तेथे अंधार नसतो. (३९०५)

तैसे बुद्धीनें कल्पिले विषय । जे जे उद्भवती स्वप्नमय ।
ते ते पाहताति मिळोनि उभय । ब्रह्म आणि वृत्ति ॥ ६ ॥
त्याप्रमाणे स्वप्नातील विषय बुद्धिकल्पित असतात. ते उत्पन्न होताच ब्रह्म आणि वृत्ती दोन्ही मिळून ते पदार्थ पाहतात. (३९०६)

पुस्तक वाचावया प्रसंगें । डोळा उपनेत्रही लागे ।
तिजा दीप मिळोनियां वेगें । मग पाहणे घडे ॥ ७ ॥
जेव्हा पुस्तक वाचायचा प्रसंग येतो तेव्हा डोळा आणि त्याच्याबरोबर चष्म्याची गरज असते. डोळा, चष्मा आणि तिसरा दीप असा मेळ जमताच पहाण्याची क्रिया होते. (३९०७)

तैसे जागृतीचे व्यापार होतां । ब्रह्मात्मा आणि वृत्तिसापेक्षता ।
बुद्धिज्ञानेंद्रिय सर्व मिळतां । घडती व्यापार ॥ ८ ॥
त्याप्रमाणे जागृतीचे व्यापार होतात तेव्हा ब्रह्मात्मा आणि वृत्ती यांच्या जोडीला बुद्धी आणि ज्ञानेंद्रिये यांची साथ लागते. तेव्हाच ते व्यापार होऊ शकतात. (३९०८)

दीप अयनकही असोनी । पाहणें तें होय एका नयनीं ।
नेत्र नसतां व्यर्थचि दोनी । दीप की उपनेत्र ॥ ९ ॥
दिवा, आणि चष्मा असूनसुद्धा पाहण्याची कृती करणारे फक्त डोळेच असतात. ते डोळेच नसतील तर दिवा आणि चष्मा (उपनेत्र) दोन्हीही व्यर्थच होत. (३९०९)

तैसे वृत्ति बुद्धि ज्ञानेंद्रिय । इतुका जरी असतां समुदाय ।
परी जाणणें तें एक अद्वय । ब्रह्मात्मयाचे ॥ १० ॥
त्याप्रमाणे वृत्ती बुद्धी आणि ज्ञानेंद्रिये एवढा सर्व समुदाय जरी असला तरी जाणण्याची क्रिया फक्त अद्वय ब्रह्मात्म्याचीच असते. (३९१०)

जाणणें ब्रह्मात्मयाचें खरें । परी हे उद्भवलें विशेषाकारें ।
तेणें सामान्य आच्छादून एकसरें । पाहती वाटती ज्ञानेंद्रिय ॥ ११ ॥
ब्रह्मात्माच जाणतो हे खरे असले तरी ते विशेष आकाराच्या संपर्काने होते. त्या विशेषाकारामुळे सामान्य झाकले जाऊन ज्ञानेंद्रिये एकटीच जाणताहेत असे वाटते. (३९११)

जैसे डोळियाचे पाहणे लोपलें । उपनेत्रचि पाहावया पुढे आले ।
परी ते परीक्षवंत जाणती भले । पाहणे कवणाचें तें ॥ १२ ॥
ज्याप्रमाणे डोळ्याचे पाहणे लोपले असे मानले तर साहजिकच उपनेत्रांना पाहण्याचे श्रेय द्यावे लागते. पण खरे परीक्षवंत जे असतात ते पाहणे कुणाचे आहे ते जाणतात. (३९१२)

तैसे विचारवंत ते जाणती । कीं जाणता ब्रह्मात्मा चिन्मूर्ति ।
हे जरी वृत्ति बुद्धि इंद्रिये असती । परी उपकरणे सर्व ॥ १३ ॥
त्याप्रमाणे खरे विचारवंत हे जाणतात की खरा जाणता (ज्ञाता) आहे तो चिद्रूप ब्रह्मात्माच आहे. त्याच्या जोडीला वृत्ती, बुद्धी आणि ज्ञानेंद्रिये यांचा लवाजमा जरी असला तरी ती सर्व दुय्यम साधने होत. (३९१३)

उपनेत्र नसतां सूक्ष्माक्षर । न दिसे दीप आणि असतां नेत्र ।
परी पहातसे पदार्थमात्र । तेंही पाहणें नेत्राचे ॥ १४ ॥
जर उपनेत्रे नसतील तर दिवा आणि डोळे असूनसुद्धा सूक्ष्म पदार्थ दिसणार नाहीत. परंतु इतर पदार्थ मात्र त्यांच्यामुळे दिसू शकतात. अर्थात ते पाहणे मुख्य डोळ्यांचेच असते. (३९१४)

तैसें ज्ञानेंद्रियावांचोनी । नेघे जागृतीचे व्यापारालागूनी ।
परी भासविषय वृत्ति सापेक्षूनी । जाणता ब्रह्मात्मा ॥ १५ ॥
त्याप्रमाणे ज्ञानेंद्रियांवाचून जागृतीचे व्यापार होत नाहीत. पण वृत्तीच्या सहकार्याने जाणता ब्रह्मात्मा स्वप्नातील भासमान वि जाणून घेऊ शकतो. (३९१५)

पदार्थजात कांही नसतां । एक दीप मात्र सदना आंतौता ।
परी तयासीही प्रकाशासहिता । पाहणार डोळाचि ॥ १६ ॥
पदार्थ वगैरे काहीच नाहीत आणि एक दिवाच फक्त घरात आहे. पण दिव्याला त्याच्या प्रकाशासहित पाहणारे; फक्त डोळेच असतात. (३९१६)

तैसे बुद्धीसहित भास निमाले । एक स्फुरण वृत्तीचें मात्र उरलें ।
परी ते वृत्ति आणि वृत्तिगता जाणिलें । आभासा ब्रह्मे ॥ १७ ॥
त्याप्रमाणे बुद्धीसहित सर्व भासमान विषय नाहीसे झाले. फक्त वत्तीचे स्फूरण तेवढे राहिले; पण ती वृत्ती आणि तिच्यातील आभास यांना एकटे ब्रह्मच जाणत असते. (३९१७)

तो दीपही सदनींचा निमाला । उगाचि अंधार मात्र दाटला ।
परी तो अंधारही नेत्रीं पाहिला । स्वयें डोळियाने ॥ १८ ॥
घरातला तो दिवाही विझला आणि घरभर अंधार दाटला, पण तो अंधारसुद्धा डोळ्यांनीच फक्त प्रत्यक्ष पाहिला. (३९१८)

तैशी स्फूर्ति मावळून गेली । तिच्या अभावा शून्यदशा बोलिली ।
परी ते लयस्थिति स्वयें अनुभविली । ज्ञानमात्रे ब्री ॥ १९ ॥
त्याप्रमाणे ती स्फूर्ती (वृत्ती) मावळली, तेव्हा तिच्या अभावाला आपण शन्य दशा असे म्हणतो. पण ती वृत्तिलयाची स्थिती केवळ ज्ञानस्वरूप ब्रह्मात्म्यानेच जाणली. (३९१९)

अंधार जेणे पाहिला । तोचि डोळा अंध नाहीं जाहला ।
तैसा लय जेणे स्वयें अनुभविला । तो चिद्रूप नव्हे कैसा ॥ २० ॥
अंधार ज्याने पाहिला तो डोळा आंधळा नसतो. त्याप्रमाणे वृत्तीचा लय ज्याने साक्षात अनुभवला तो ब्रह्मात्मा चिद्रप नाही असे कसे म्हणता येईल? (३९२०)

पाहें अंधार पहावयासी । कोणतें साहित्य दुजें नेत्रासी ।
तैसा वृत्तीचा लय जाणावयासी । कोणतें उपकरण आत्मया ॥ २१ ॥
असे पहा की, अंधार पाहण्यासाठी डोळ्याला दुसऱ्या कोणत्या साहित्याची गरज असते? त्याप्रमाणे वृत्तीचा लय जाणण्यासाठी आत्म्याला दुसऱ्या कोणत्या साधनाची गरज असेल? (अर्थात अशी गरजच नसते.) (३९२१)

साहित्याविण देखे तो डोळा खरा । उपकरणेंविण तोचि जाणता निर्धारा ।
येर साहित्य उपकरणे ही पसारा । परी देखणे जाणणे एक ॥ २२ ॥
जो इतर साहित्याशिवाय पाह शकतो तोच खरा निर्दोष डोळा होय. तो डोळा इतर साधनांचे साहाय्य न घेता जाणू शकतो. या ज्या साहाय्यक गोष्टी, साधने आहेत, तो सर्व पसारा आहे. पण पाहणे, जाणणे ही कार्ये करणारा तो एकच डोळा (डोळा हे इंद्रिय) होय. (३९२२)

डोळा डोळिया मात्र न देखे । आत्मा आत्मयासी नोळखे ।
इतुकेंने पाहणे जाणणें जें सारिखें । उणे नव्हे सहसा ॥ २३ ॥
पण डोळ्याला डोळा पाहू शकत नाही. त्याप्रमाणे आत्माच आत्म्याला ओळखू शकत नाही. पण असे असूनही पाहणे, जाणणे यात काही फरक पडत नाही. ते सर्वकाळ सारखेच असते. (३९२३)

तस्मात् रविदत्ता ब्रह्म जाणावया । अपेक्षा करणे तेंचि वायां ।
कोणी जाणताही नसतां लया । वृत्तीच्या तो जाणे ॥ २४ ॥
म्हणून हे रविदत्ता, ब्रह्म 'जाणण्याची' अपेक्षा करणेच व्यर्थ होय. वृत्तीचा लय इतर कोणीही जाणू शकत नाही, पण तो ब्रह्मात्मा मात्र जाणू शकतो. (३९२४)

अरे हेंचि जाणणे स्वरूपाचे खरें । की लयही जाणें जो निधरिं ।
हा प्रत्ययचि की साचोकारें । की लय जाणता तो हा ॥ २५ ॥
अरे, स्वरूपाचे, ब्रह्माचे जाणणे असेच असते. ते वृत्तीचा लय निश्चितपणे जाणू शकते. लय जाणणारा तो हाच हा प्रत्ययच खरा आहे. (३९२५)

अंधार पाहे तो हा डोळा । प्रत्यक्ष की देखणा निर्मळा ।
तैसाचि हा लयाचा टळटळा । जाणता ब्रह्मात्मा ॥ २६ ॥
अंधार जो पाहू शकतो तोच डोळा होय. तो प्रत्यक्ष पाहो अथवा जाणो; त्याचप्रमाणे हा ब्रह्मात्मा वृत्तीचा लय स्पष्टपणे जाणू शकतो. (३९२६)

डोळा न देखोनि हा देखिला । आत्मा न जाणोनि हा जाणिला ।
प्रत्यक्ष अपरोक्ष समजला । विचारें ज्ञानघन ॥ २७ ॥
जसा डोळा न पाहता पाहिला जातो, तसा आत्मा न समजताही समजलेला असतो. हा ज्ञानघन आत्मा विचाराने अगदी साक्षात प्रत्यक्ष कळला. (३९२७)

ऐसें न जाणोनि जाणणे । हेंचि ज्ञान श्रुति अनुभवानें ।
येर जाणणे तेंचि नेणणें । म्हणती श्रुति आणि ज्ञाते ॥ २८ ॥
असे न जाणून जाणणे हेच ज्ञान होय; असेच श्रुती सांगते, अनुभवही तसाच आहे. हे जे लौकिक जाणणे आहे ते न जाणण्यासारखेच आहे. वेद आणि ज्ञाते लोक असेच म्हणत आहेत. (पहा केन २.३) (३९२८)

एक लय मात्र खरा जाणावा । वृत्ति स्फूर्तिचिया अभावा ।
तरीच केला तो विचार बरवा । मोक्षरूप ज्ञानाचा ॥ २९ ॥
वत्ती स्फर्तीच्या अभावी वत्तीचा लय जाणणे हेच खरे जाणणे होय. तो लय जाणता आला तरच मोक्षरूप ज्ञानाचा साधकाने योग्य विचार केला असे समजावे. (३९२९)

रविदत्ता तुजला वृत्तीचा लय । जरी खरा आला नसेल प्रत्यय ।
तरी मागुती सांगू उपाय । लयप्रतीतीचा ॥ ३० ॥
रविदत्ता, तुला वृत्तीच्या लयाचा खरा प्रत्यय आला नसेल, तर त्या लयाच्या अनुभवाचा विचार पुन्हा एकदा सांगतो. (३९३०)

वृत्ति जेथून उद्भवती । आणि होतसे कोठे समाप्ति ।
ते अवलोकावीं यथारीतीं । ब्रह्मरूपें तुवां ॥ ३१ ॥
वृत्ती कोठून उत्पन्न होते, आणि तिची समाप्ती कोठे होते हे तू स्वतः ब्रह्मरूप होऊन योग्य रीतीने अवलोकन करावेस. (३९३१)

वृत्ति उठतां वृत्तीचा तळवट । धरून बैसावा ज्ञानघनदाट ।
वृत्तीसवें उसळू नये अफाट । पसरता क्षणीं ॥ ३२ ॥
वृत्ती उठताच आपण वृत्तीचा तळवट धरून बसावे. तो वृत्तीचा तळ म्हणजेच निखळ ज्ञानरूप असा ब्रह्मात्माच होय. असा तळवट धरून राहिल्यानंतर वृत्ती उठून पसरल्यावर देखील आपण तिच्याबरोबर उसळू नये. (३९३२)

जैसा पाणबुडा पाणियाचा । तळ धरोनि बैसे साचा ।
तेव्हां गमावलिया वस्तूचा । लाभ होतो ॥ ३३ ॥
पाणबुडा पाण्याचा तळ धरून बसतो तेव्हाच त्याला हरवलेल्या वस्तूची प्राप्ती होते. (३९३३)

तैसें वृत्तीचें जें अधिष्ठान । धरून बैसावें स्वरूप आपण ।
वृत्ति जरी उठे उसळून । तरी तिजसवें न उसळावें ॥ ३४ ॥
त्या पाणबुड्याप्रमाणे आपणही वृत्तीचे अधिष्ठान जे चिद्रूप ब्रह्म त्याला घट्ट धरून बसावे. वृत्ती जरी उसळून वर उठली तरी तिच्याबरोबर आपण उसळू नये. (३९३४)

पाणियाचा स्वभावचि वरुती । उसळून आणावें बुडाल्याप्रती ।
तैसा वृत्तीचा स्वभावचि निश्चिती । वरुती वोढावें ॥ ३५ ॥
बुडालेल्या माणसाला उसळून वर आणावे हा पाण्याचा स्वभावच आहे. त्याप्रमाणे वृत्तीचाही स्वभाव आपल्याबरोबर साधकालाही वर ओढावे असा आहे. (३९३५)

पाणबुडा वरुती पाणिया । फेंकितां तळ धरवे तया ।
तैसें वृत्तीसी वरुती फेंकोनियां । आपण तळवटीं दडावे ॥ ३६ ॥
पाणबुडा तळाशी राहण्यासाठी पाणी वर फेकत असतो. तसे केल्याने त्याला तळ घट्ट धरून ठेवता येतो. त्याप्रमाणे वृत्तीच्या मुळाशी राहण्यासाठी वृत्तीला वर फेकत राहावे, म्हणजे आपल्याला तिच्या मुळाला पकडून राहता येईल. (३९३६)

पाणी जरी खालीं वोढितां । आपण उसळून येतसे वरुता ।
तैसें वृत्तीसी बळें जरी आकळितां । आकळणारासह उसळे ॥ ३७ ॥
जर त्याने पाणी खाली दाबले तर तो उसळून वर येतो त्याप्रमाणे वृत्तीला बळजबरीने आकळावयास गेले तर आकलन करू पाहणाऱ्यासह वर उसळून येते. (३९३७)

तस्मात् पाणी वरुतीच फेंकावें । तरीच तयासी तळवट फावे ।
तैसें वृत्ती उसळणेंचि त्यागावें । आपण उरावें तळवटीं ॥ ३८ ॥
म्हणून पाणी वरच फेकत राहावे. तरच पाणबुड्याला तळ सापडेल. त्याप्रमाणे वृत्तीचे उसळण्याचा त्याग करावा. म्हणजे आपण आपोआप तिच्या तळाशी राहतो. (३९३८)

आपण तरी तळींच असे । वृत्तीसवें नुसळे अल्पसें ।
परी वाउगेंचि साधका वाटतसे । की वृत्तीसवें आलों ॥ ३९ ॥
वास्तविक पाहता आपण तळाशीच असतो. वृत्तीबरोबर थोडे देखील उसळत नसतो. पण साधकाला मात्र उगीचच वाटत असते की, आपण वृत्तीबरोबर वर येत आहोत. (३९३९)

तें वाटणे त्यागावें आपण । तरी तळवटींच उरे ब्रह्म चिद्घन ।
तेणें आपणासमोर वृत्ती उठणें । आणि निमणे कळे ॥ ४० ॥
तर त्या वाटण्याचा त्याग करावा. म्हणजे चिद्घन ब्रह्म तळाशीच राहील. त्या योगाने आपल्याला वृत्तीचे उठणे आणि मावळणे या गोष्टी समजू शकतील. (३९४०)

आपण वृत्तींत जरी न ये । तरी उठतांचि वृत्ति मावळून जाये ।
मग तो प्रत्यक्ष अनुभवा लय । येतसे जाणत्याच्या ॥ ४१ ॥
आपण वृत्तीत राहून जर वर आलो नाही तर ती वृत्ती उठताच मावळून जाते. तेव्हा तो वृत्तीचा लय साधकाला प्रत्यक्ष अनुभवता येतो. (३९४१)

तोचि लय चिरकाळ जाणावा । वृत्ति उठतांही निमेल स्वभावा ।
तया लयाचा जो जाणता बरवा । तोचि ब्रह्मात्मा निर्विकल्प ॥ ४२ ॥
असा लय बराच काळ अनुभवावा. जाणून घ्यावा. वृत्ती उठताच ती तिच्या स्वभावानुसार मावळून जाते. तिच्या लयाचा जो चांगला ज्ञाता असतो, तोच स्वतः निर्विकल्प ब्रह्मात्मा असतो. (३९४२)

ऐसा लयाचा खरा प्रत्यय । टळटळीत जाणावा निश्चय ।
तोचि लय देखणा निःसंशय । ब्रह्मात्मा निर्विकल्प ॥ ४३ ॥
असा लयाचा खरा प्रत्यय टळटळीत (स्पष्ट) जाणावा. निर्विकल्प ब्रह्मात्माच खरा लयाचा द्रष्टा असतो. (३९४३)

तया देखणियासी कदां । लोपचि नाहीं सर्वदां ।
अंधार देखण्या डोळ्यासी आपदा । न ये अंधत्वाची जेवीं ॥ ४४ ॥
त्याच्या त्या पाहण्याला कधी लोपच नाही. नेहमीच अंधार पाहणाऱ्या डोळ्याला अंधत्वाचे संकट कधी वाटेल काय? (३९४४)

ऐसें चिद्र्पज्ञान ब्रह्मात्मयाचें । स्वभावलक्षण देखणे लयाचें ।
कळेल जया साधका साचें । तोचि ज्ञाता वास्तव ॥ ४५ ॥
असे हे ब्रह्मात्म्याचे चिद्रूप ज्ञान आहे. लयाचे द्रष्टेपण हे त्याचे स्वरूप (स्वाभाविक) लक्षण आहे. ज्या साधकाला हे सत्यत्वाने कळेल तोच खरा ज्ञाता होय. (३९४५)

ऐशिया चिद्रूप निर्विकल्पा । यथार्थ ज्ञान ह्मणावे बापा ।
हेचि ज्ञान संसारखेपा । तोडील साधकाच्या ॥ ४६ ॥
अशा निर्विकल्प चिद्रूपालाच यथार्थ ज्ञान म्हणावे. हेच ज्ञान साधकाच्या संसारखेपा खंडित करील. (चुकवील, बंद करील) (३९४६)

हेंचि लय जाणतें चिद्रूप । सर्वदा सघन उणे नव्हे अल्प ।
तस्मात् तेंचि त्रिकालाबाधित सद्रूप । जें आहेच आहे सर्वदा ॥ ४७ ॥
हेच लय जाणणारे चिद्रूप होय. ते सर्वकाळ ज्ञानाने परिपूर्ण असते. ते केव्हाही थोडेसुद्धा कमी होत नाही. त्यामुळे ते त्रिकालाबाधित सद्रूप आहे. ते नेहमी आहेच आहे. (३९४७)

ऐसें असोनियां मंदमति । वृत्ति अभावीं नाहींच ह्मणती ।
लयही न कळे अविचाराप्रती । तेव्हां कल्पिती नेणीव ॥ ४८ ॥
असे असूनही मंदबुद्धीचे लोक, त्याच्या (सद्रूपाच्या ठिकाणी) वृत्तीचा अभाव असल्यामुळे त्याची त्रिकालाबाधित सत्ता मानायला तयार होत नाहीत. त्यांना लयाचे ज्ञान नसते. त्यामुळे ते अविचारी लोक त्या सद्रूपाच्या ठिकाणी अज्ञानाची कल्पना करतात. (३९४८)

ब्रह्मात्मा तरी शून्य की नेणता । नव्हेचि नव्हे येणे जरी कल्पितां ।
परी तेचि मुकले असती स्वहिता । अति प्रयत्नही साधूनी ॥ ४९ ॥
पण त्या मंदमती मूढाने जरी त्याच्या (सद्रूपाच्या) विषयी अज्ञानाची कल्पना केली असली तरी ब्रह्मात्मा शून्यही नाही किंवा अज्ञानही नाही. पण एवढा प्रयत्न करूनही ते मंदमती आपल्या हिताला मुकले आहेत. असे समजावे. (३९४९)

असो तया मूढांसी काय काज । परी खन्या साधका निरवणे आज ।
की शून्य संदेह न व्हावा सहज । असे तो ज्ञानघन कळावा ॥ ५० ॥
असो, त्या मूर्खाशी आपल्याला काय कर्तव्य आहे? पण खऱ्या साधकाला मात्र आज हे सांगणे आहे की, एकदम स्वत:ला शून्य संदेह होऊ देऊ नकोस. जो सहज स्पष्ट आहे, तो ज्ञानघन तेवढा समजून घ्यावास. (३९५०)

ह्मणोनि शून्य खंडन यथामति । कीजे कळावया साधकाप्रती ।
परी आधी आशंका जे करिती । शून्यवादी ते ऐका ॥ ५१ ॥
म्हणून साधकांना कळण्यासाठी मी यथामती (माझ्या बुद्धयनुसार)शून्याचे खंडन करतो. पण तत्पूर्वी शून्यवादी लोक ज्या शंका काढतात ते आधी ऐका. (३९५१)

असतचि पूर्वी आहे । ऐशी श्रुतीच ह्मणताहे ।
आणि अनुभवही लाहे । वृत्तीविण समाधींत ॥ ५२ ॥
पूर्वी असतच होते. (पहा छान्दोग्य ६.२.१) असे श्रुतिवचन आहे. आणि समाधीमध्ये वृत्तिलयाचा जो अनुभव येतो तोही तसाच आहे. समाधीत वृत्तीचा लय झाल्यानंतर सर्व शून्यच होते. (३९५२)

वृत्ति तोंवरी जाणणे घडे । वृत्तिअभावीं शून्य उघडे ।
आहे तरी अनुभवा न जोडे । तस्मात् शून्यरूप ब्रह्म ॥ ५३ ॥
वृत्ती असेल तोवर जाणण्याची प्रक्रिया चालू असते. वृत्ती नष्ट होताच सर्व शून्यच उघडे होते. आता त्यावेळी काही आहे असे म्हणावे तर तसा अनुभव येत नाही. म्हणून ब्रह्म शून्यरूपच आहे. (३९५३)

ऐशिये आशंकेचे उत्तर । ऐकावें होऊनि निरुत्तर ।
श्रुति जरी बोले असदेवअग्र । परी तात्पर्य वेगळे ॥ ५४ ॥
आता या आशंकेला निरुत्तर करणारे उत्तर ऐकावे. श्रुती जरी 'असदेव अग्र आसीत' (प्रारंभी सर्व असतच होते) असे म्हणत असली तरी तिचा अभिप्राय वेगळा होता. (३९५४)

हे हे स्फूर्तीपासून ऐलीकडे । जितकें देहादि जग उघडे ।
हे सर्व आहे वाटे तें मोडे । असद्रप होतें ॥ ५५ ॥
स्फूर्तीपासून अलीकडे असलेले देहादिक असे जे स्पष्ट दिसणारे आहे ते सर्व आहेसे वाटते. ते सर्व नष्ट होणारेच असते. म्हणून ते असदरूपच होते. (३९५५)

हें कांही जाहले नव्हतें । उत्पत्तिपूर्वी असतचि होतें ।
पढ़ें सष्टिकाळीं जाहलें दिसतें । आहे ह्मणावया ॥ ५६ ॥
हे सर्व काही मुळात झालेलेच नव्हते. त्याची उत्पत्ती होण्यापूर्वी ते 'असत्'च होते. पुढे विश्वाच्या निर्मितीच्या वेळी ते झाल्यासारखे दिसते. त्यामुळे ते आहे (सत्) असे म्हणता येते. (३९५६)

तस्मात हे हे नव्हतें ह्मणन । श्रति बोले याचे होय शून्य ।
येरवी ब्रह्म पूर्वी जें सच्चिद्घन । तया शून्यत्व ह्मणेना ॥ ५७ ॥
म्हणून हे हे सर्व स्फूर्तीपूर्वी काहीच नव्हते या अभिप्रायाने श्रुती हे सर्व असत्' म्हणजे शून्यच होते असे म्हणते. येरवी जे ब्रह्म सच्चित् आणि दाट भरलेले आहे त्याला उद्देशून श्रुती 'शून्य' (असत्) हा शब्द वापरत नाही. (३९५७)

ऐसें श्रुतीचे तात्पर्य वेगळे । या मूढाप्रति तें यथार्थ न कळे ।
ब्रह्मचि शून्य ह्मणूनि निराळे । पडिले कल्पवरी ॥ ५८ ॥
असे श्रुतीचे तात्पर्य वेगळे आहे. शून्यवादी मूढांना त्याचा अभिप्राय यथार्थ कळलेला नाही. आणि ब्रह्मालाच त्यांनी शून्य ठरवले. असे ते कल्पभर म्हणत राहिले. (३९५८)

जरी श्रृतीचा भावार्थ ऐसा । नसे जरी यदर्थी अल्पसा ।
तरी सतचि पूर्वी आहे कैसा । उच्चार करिती ॥ ५९ ॥
श्रुतीचा भावार्थ (म्हणण्याचा आशय) या स्वरूपाचा अल्पांशानेही नव्हता. तसे नसते तर त्याच श्रुतीने 'सदेव सौम्य इदम् अग्रे आसीत्' (हे सर्व सद्रूप ब्रह्मच प्रारंभी होते) असा उच्चार कसा केला असता? (३९५९)

तस्मात् श्रुति असत् होतें ह्मणून । हे हे पदार्थ नव्हते संपूर्ण ।
ब्रह्म तें सद्रूप आहे पूर्ण । ऐसे तात्पर्य श्रुतीचें ॥ ६० ॥
तेव्हा हे दिसणारे सर्व काही पूर्वी असद्रूप होते. ते सगळे पदार्थ आरंभी नव्हते. फक्त ब्रह्मच तेवढे सद्रूप असे आहे, असा श्रुतीचा अभिप्राय आहे. (३९६०)

तथापि शून्यवादी नायकती । तरी पुसावें हे तयांप्रती ।
इदं इदं याची काय गति । श्रुति बोलिली जे ॥ ६ ॥
तरीसुद्धा शून्यवादी ते मान्य करत नाहीत. तेव्हा त्यांना असे विचारावे की, श्रुती आपल्या मंत्रात जो इदम् इदम् (हे हे) असा प्रयोग करते, त्याचा तुम्ही काय अर्थ करता? (३९६१)

इदं इदं नव्हतें ह्मणतां । शून्य आलें यया समस्तां ।
येन्हवी इदंतेची वार्ता । ब्रह्मी शून्यासहित नसे ॥ ६२ ॥
'इदमइदम् नव्हते म्हणता म्हणजे या सर्व गोष्टींना शून्यत्व आले असे निष्पन्न होते. पण ब्रह्माच्या ठिकाणी इदम्' आणि 'शून्य' या शब्दांपैकी कशाचाच संबंध येत नाही. (३९६२)

हेंही असो, असत आहे । हा तों विरोध प्रत्यक्ष पाहे ।
अंध डोळस मुका बोलका हे । तैसेंचि हेही वचन ॥ ६३ ॥
हेही असतच आहे' असे म्हणत असाल तर हे वचन विरोधी असते. 'आंधळा डोळस आहे' किंवा 'मुका बोलका आहे' असे म्हणण्यासारखेच हे वचन आहे. (३९६३)

आहे तें नाहीं कदा न होय । नाहीं तें आहे हा नव्हे प्रत्यय ।
एकासीच हे रूप उभय । हा केवढा विरोध ॥ ६४ ॥
जे 'आहे' हे केव्हाही 'नाही' होत नाही. जे 'नाही' ते केव्हाही 'आहे' असा प्रत्यय येत नाही. एकाच पदार्थासाठी आहे' आणि 'नाही' असे विरोधी वचन वापरता हा केवढा विरोध आहे! (३९६४)

ऐशिया विरोधाकरितां । शून्य आहे न ये स्थापितां ।
तरी दोहींतून एकचि आतां । सांगा ह्मणावें निवडूनी ॥ ६५ ॥
असा विरोध आहे म्हणन 'शून्य आहे' हे विधान सिद्ध होऊ शकत नाही. तेव्हा या 'आहे' 'नाही' मधून एकाची निवड करून नेमके सांगा. (३९६५)

नाहींच ह्मणून जरी सांगसी । तरी शून्य नाहींच कल्पांतेसीं ।
हें तों इष्टचि असे आह्मासी । शून्य नाहीं तें नाहीं ॥ ६६ ॥
हे असत् नाही' असे जर सांगत असाल तर मग शून्य कल्पान्तीही असत नाही, असे ठरते. असे असेल तर आमच्या पक्षी हेच इष्ट आहे आणि शून्य हे नाहीच असे ठरते. (३९६६)

आतां शून्य आहे बोलशी जरी । तरी विरोधचि सांगितल्यापरी ।
तथापि सताच्या योगें बोलतां उत्तरीं । हेही तों अति इष्ट ॥ ६७ ॥
'आता शून्य आहेच' असे जर म्हणत असाल तर अगोदर सांगितल्याप्रमाणे त्यात विरोधच दिसतो. तरीसुद्धा सताच्या साहचर्याने शून्य असले पाहिजे असा दावा केल्यास तसे सांगणे आम्हालाही इष्टच आहे. (३९६७)

जैसें जगही सताच्या योगें । आहे ह्मणून बोलावया जोगें ।
तैसें शून्यही असो प्रसंगें । येणेसत तै सिद्ध जाहलें ॥ ६८ ॥
ज्याप्रमाणे जगाचे अस्तित्व सताच्या योगाने आहे असे म्हटल्यास जगाचे अधिष्ठान सत् आहे, असे सिद्ध होते त्याप्रमाणे सताच्या योगाने असत् चे अस्तित्व आहे असे म्हटल्यास असत् चे अधिष्ठान सत् हेच आहे असे मान्य केल्याप्रमाणे आहे. (३९६८)

रज्जु असून सर्प ह्मणतां । परी दोरी आहे ती न सारी परता ।
तैसें सताच्या योगें शून्य भावितां । सद्रूप तया अधिष्ठान ॥ ६९ ॥
रज्जूही आहे आणि सर्पही आहे असे म्हणत असाल तर तुम्ही दोरीचे अस्तित्व नाकारीत नाही. त्याप्रमाणे सताच्या बरोबर शून्यही असे म्हटल्याने त्या शून्याचे अधिष्ठान सत् हेच ठरते. (३९६९)

मागुती वादी कोणी ह्मणती । की सताचा योग कासया निश्रितीं ।
असतचि आहे ब्रह्म चिन्मूर्ती । विरोध तरी कैंचा ॥ ७० ॥
यावर शून्यवादी म्हणतील की सताच्या योगाने असत् आहे याचा अर्थ तुम्ही असत्चा 'सत्'शीच संबंध जोडला पाहिजे असे नाही. आमचे असत् हेच चिद्रूप ब्रह्म असे म्हटल्याने तुम्ही म्हणता तसा विरोध येत नाही. (३९७०)

तरी अवधारा सूर्यचि अंधार । हा कधी तरी होईल निर्धार ।
अथवा राहेल दिनकरासमोर । हेही न घडे ॥ ७१ ॥
यावर उत्तर असे की, सूर्यच अंधार आहे असा निर्णय कधी खरा ठरेल काय? किंवा अंधार सूर्याबरोबर उभा राहील असे म्हटल्यानेही ते खरे ठरणार नाही. (३९७१)

तैसें ब्रह्म तो नव्हेची शून्यरूप । जें लयसाक्षीज्ञानस्वरूप ।
अथवा शून्यसंयोगीही नव्हे अल्प । कीं सद्रूपी उरेल ॥ ७२ ॥
त्याप्रमाणे ब्रह्म तर शून्यरूप होऊच शकणार नाही, कारण ते लय साक्षी असून ज्ञानस्वरूप आहे. तसेच शून्यही सत्शी थोडासुद्धा संयोगी होऊ शकत नाही. मग ते सद्रूप कसे ठरेल? (३९७२)

एवं शून्य नाहीं तें नाहींच नाही । आहे तें आहेच सर्वदांही ।
येथे शंका कवणाचीही । न चले सर्वथैव ॥ ७३ ॥
अशा प्रकारे शून्य नाहीच हे त्रिवार सत्य आहे. आणि जे आहे ते असणारच आहे. याबाबतीत कोणाचीही शंका चालणार नाही. (३९७३)

ऐसें श्रुति युक्ति या उभयान । शून्याचे न घडेचि संभवणे ।
आतां अनुभव नाही जरी ह्मणे । तरी याचे उत्तर ऐका ॥ ७४ ॥
अशा प्रकारे श्रुती आणि तर्क या दोहोंच्या आधारावर शून्य संभवतच नाही. आता असा अनुभव नाही' असे म्हणत असाल तर त्याचे उत्तर ऐका : (३९७४)

वृत्तीचा अभाव जो जाहला । तो शून्य ह्मणून भाविला ।
त्या शून्याचा प्रत्यय आला । की नाहीं त्या पुसावें ॥ ७५ ॥
आता वृत्तीचा अभाव होतो. त्यामुळे त्याला 'शून्य' असे मानले तर, 'त्या शून्याचा अनुभव आला की नाही?' असे त्या शून्यवाद्याला विचारावे. (३९७५)

ह्मणतां शून्याचा प्रत्यय नाहीं । उगाचि वृत्ति उद्भवतां मानिला तोही ।
की लय वृत्तीचा तोंवरी कांही । न होतेंचि तेथें ॥ ७६ ॥
त्याने जर म्हटले की शून्याचा अनुभव आला नाही, पण उगीच राहिलो असता सहजच वृत्ती उद्भवली तेव्हा ते शून्याचे अस्तित्व उगीचच मानले. कारण वृत्तीचा लय झाला तेव्हा तिच्या जागी काहीच नव्हते. म्हणून तेथे शून्य मानले. (३९७६)

ऐशिया विकल्पी तों आधीं । शून्य नाहींच नाही जाहलें कधीं ।
वृत्तीचा आहेपणा जो बुद्धि । तोचि नाहींसा जाहला ॥ ७७ ॥
अशा विकल्पाने तर शून्य कधीच सिद्ध होत नाही. वृत्तीचा जो आहेपणा बुद्धीला वाटत होता तोच तेवढा नाहीसा झाला. (३९७७)

अर्थात् हे अवघे नाहीं जाहलें । वृत्तीसह सर्वां शून्यत्व आलें ।
तेंचि शून्य ह्मणून अनुमानलें । सद्रूप संचलें तें शून्य नव्हे ॥ ७८ ॥
अर्थात हे अवघे नाही असे झाले. वृत्तीसह सर्वांस शून्यत्व आले. त्यालाच शून्य म्हणून अनुमानाने ठरविले. पण सद्रूप तर सर्वत्र भरून राहिलेले आहे हे शून्य नाहीच. (३९७८)

ह्मणतां शून्याचा प्रत्यय आला । वृत्तिअभावीं शून्यपणा जाणिला ।
याही विकल्पी तो जाणता जाहला । शून्याचा आत्मा ॥ ७९ ॥
त्याने शून्याचा प्रत्यय आला असे म्हटले तर त्याचा अर्थ एवढाच की, वृत्तीचा अभाव झाला त्यालाच शुन्यपणा असे मानले. पण याही विकल्पाने असे ठरते की त्या शन्याचा जाणता कोणी तरी होता. तोच आत्मा होय. (३९७९)

अर्थात् शून्यरूप वृत्तीचा लय । जाणिला जेणें तो एक अद्वय ।
तोचि लय साक्षीचा प्रत्यय । जयासी तो शून्य कैसा ॥ ८० ॥
अर्थात् शून्यरूप वृत्तीचा लय ज्याने जाणला तोच एकमेवाद्वितीय असा आत्मा होय. असा लयसाक्षीपणाचा प्रत्यय ज्याला येतो त्याला शून्य कसे म्हणता येईल? (३९८०)

एवं श्रुतियुक्ति अनुभवेंकडून । शून्य संभवेना असें ह्मणून ।
तथापि शून्यवादी बळें स्थापन । करिती ते करोत ॥ ८१ ॥
अशा प्रकारे श्रुती, तर्क (युक्ती) आणि अनुभव या तिन्ही मार्गांनी शून्य संभवतच नाही. तथापि शून्यवाद्यांनी हट्टाने त्या शून्याची कल्पना केली तर ते खुशाल करोत. (३९८१)

परी रविदत्ता तुवां विचारावें । लयसाक्षित्व खरें जाणावें ।
जाणतां तो कदा शून्य नव्हे । आहे तोचि लयसाक्षी ॥ ८२ ॥
पण रविदत्ता, तू विचार कर. तू लय साक्षित्व खरे समजून घे. ते समजले तर शून्य कधीच जाणवणार नाही. जे सत् आहे तेच लयसाक्षी असते. (३९८२)

मालविलें जेणें दीपासी । तो उरे मालवितां आहेपणेंशी ।
दीपासवें मरे जरी अंधारासी । मग पाहेल कोण ॥ ८३ ॥
ज्याने दिवा मालविला तो मालवणारा आहेपणाने उरलेला असतोच. दीपाबरोबर तोही जर मरण पावला तर अंधाराला कोण पाहील? (३९८३)

तैसा वृत्तीचा जो लय जाहला । तो सद्रूप साक्षीने देखिला ।
तयासी शून्यपणा जरी आला । तरी अभाव पाहिला कोणे ॥ ८४ ॥
त्याप्रमाणे वृत्तीचा जो लय झाला, तो सद्रूप साक्षी असणाऱ्या तत्त्वाने पाहिला. त्यालाच जर शून्यपणा आला तर मग वृत्तीचा अभाव कोणी पाहिला? (३९८४)

लय वोळखिला जयानें । तोचि साक्षी चिद्रूप देखणेपणे ।
आहे तोचि जाणता होणें । जाणता तोचि आहे ॥ ८५ ॥
वृत्तीचा जो लय झाला तो सद्रूप साक्षीने पाहिला. तो पाहणारा साक्षी म्हणजेच चिद्रूप होय. जो आहे (सद्रूप) तोच जाणता (चिद्रूप) होऊ शकतो. आणि जाणता आहे (चिद्रूप) तोच असतो (सद्रूप) (३९८५)

एवं चिद्रूप तोचि सद्रूप । तोचि ब्रह्मात्मा निर्विकल्प ।
आणि तोचि एक आनंदरूप । स्वभाव लक्षण हेही ॥ ८६ ॥
अशा प्रकारे चिद्रूप असणाराच सद्रूप असतो. तोच निर्विकल्प ब्रह्मात्मा होय. आणि तोच एकमेव आनंदरूपही असतो. ब्रह्माची हीच स्वभावलक्षणे होत. (३९८६)

वृत्ति उद्भवतां वृत्तीपासोनी । ऐलाड जितुकी तत्त्वश्रेणी ।
तितुकीही सुखदुःखें व्यापूनी । असती सर्व ॥ ८७ ॥
वृत्ती उत्पन्न झाल्यानंतर तिच्या अलीकडची जेवढी तत्त्वे आहेत ती सर्व सुखदुःखांनी व्यापलेली आहेत. (३९८७)

तया वृत्तीचाचि संबंध जयासी । नसे किमपि तिहीं काळेंसी ।
तरी सुखदुःखें अविनाश स्वरूपासी । स्पर्शती कैशीं ॥ ८८ ॥
त्या वृत्तीचाच संबंध ज्याच्याशी भूत, वर्तमान, भविष्य या तिन्ही काळात किंचितसुद्धा आला नाही त्या अविनाशी ब्रह्मात्म्याला सुखदुःखे स्पर्श तरी कसा करतील? (३९८८)

तस्मात् सखदःखाविण एक । तेंचि निजसख निश्चयात्मक ।
ब्रह्मानंद निर्विकल्पक । त्रिकालाबाधित ॥ ८९ ॥
त्यामुळे जे एकमेव तत्त्व निश्चितपणे सुखदुःखविरहित आहे तेच निजसुख (आत्मसुख) आहे असे निश्चितपणे समजावे. तोच निर्विकल्प असा ब्रह्मानंद होय आणि तो त्रिकालाबाधित (कधीही नष्ट न होणारा) आहे. (३९८९)

कोणी तयासी अनुभवीना । अनुभविलिया नांव वासना ।
तो वासनानंद जेथें उरेना । ध्यातेपणासह ॥ ९० ॥
त्याचा अनुभव मात्र कोणालाही घेता येत नाही. कारण ते आत्मसुख त्रिपुटीरहित असते. आणि जो कोणी अनुभव घेतो त्याचा तो अनुभव वासना या नावाने ओळखला जातो. निजसुखामध्ये ध्यातेपणासहित वासनानंदाला थारा नाही. (३९९०)

केवळ उर्वरित ब्रह्मानंद । त्रिपुटीविण स्वानंदकंद ।
असेचि असे पूर्ण विशद । तिहींही काळीं ॥ ९१ ॥
असा उर्वरित जो ब्रह्मानंद तो त्रिपुटीरहित निखळ स्वानंदाचा कंदच असा, तो तिन्ही काळी परिपूर्ण असतो. (३९९१)

जैसें सद्रूप शून्याविण । आहेचि आहे परिपूर्ण ।
परी वृत्तीसी नेणवे अमुकसें ह्मणून । ग्रहणही नव्हे ॥ १२ ॥
ज्याप्रमाणे शून्यविरहित असे सद्रूप परिपूर्ण आहे, पण वृत्तीला मात्र ते अमुक म्हणून ज्ञात होत नाही, आणि वृत्तीला त्याचे ग्रहणही करता येत नाही. (३९९२)

तेंचि चिद्रूपही असतां । वृत्तीसी न कळे तत्त्वतां ।
तैसाचि आनंदही अनुभवितां । नये वृत्तीसी ॥ ९३ ॥
जे सद्रूप आहे तेच चिद्रूप आहे. त्यामुळे ते चिद्रूपही वृत्तीला कळत नाही. आणि त्याच कारणामुळे (म्हणून सद्रूप हेच आनंदमयही असल्यामुळे) आनंदमय रूपही वृत्तीला अनुभवता येत नाही. (३९९३)

सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप । तिहीं लक्षणीं ब्रह्म निर्विकल्प ।
वृत्तीसी अमुकसें न कळे अल्प । निर्विकल्प याचि हेतू ॥ ९४ ॥
ब्रह्मस्वरूप हे निर्विकल्प आणि सत्, चित् आणि आनंद या तिन्ही लक्षणांनी युक्त आहे. ते वृत्तीला अमुक म्हणून किंचितही कळत नाही आणि म्हणूनच ते निर्विकल्प आहे. (३९९४)

वृत्ति जरी तयासी अनुभवी । तरी निर्विकल्पकता केवीं बोलावी ।
तस्मात् त्रिपुटीविण स्वतःसिद्ध गोसांवी । सच्चिदानंद ॥ ९५ ॥
वृत्ती जर त्याचा अनुभव घेऊ शकत असेल तर ते निर्विकल्प आहे असे कसे म्हणता येईल? त्यामुळे ते ब्रह्म त्रिपुटीरहित, सच्चिदानंद, स्वतःसिद्ध, स्वतंत्र असे आहे. (३९९५)

लयसाक्षीचा जो प्रत्यय । तोचि चिद्रूपपणे अद्वय ।
आहे तोचि लया जाणता होय । आणि तोचि सुखरूप ॥ ९६ ॥
त्याचा लयसाक्षित्वाचा अनुभव हा चिद्रप आणि अद्वय आहे. तो चिट्रप परमात्माच लयाचा ज्ञाता असतो, आणि तोच सुखरूप असतो. (३९९६)

तयासी कोणी अनुभविना । आणि आपण आपणाही जाणेना ।
याचि हेतू निर्विकल्प वचना । बोलिलें मूळ श्लोकीं ॥ ९७ ॥
त्याचा अनुभव कोणालाही घेता येत नाही आणि स्वतःही स्वतःला जाणू शकत नाही. त्याच कारणाने मूळ श्लोकात निर्विकल्प असा शब्द वापरला आहे. (३९९७)

स्यात् म्हणिजे आहेचि आहे । तेंचि शून्यातीत ब्रह्म पाहे ।
सर्वा अभावीं उर्वरित राहे । सच्चिदानंद ब्रह्म ॥ ९८ ॥
त्या श्लोकातील 'स्यात्' शब्दाचा अर्थ तो ब्रह्मात्मा आहेच आहे (सद्रूप). तोच शून्यरहित ब्रह्म आहे. तेथे सर्व तत्त्वांचा अभाव असल्यामुळे ते ब्रह्म केवळ एकटे (एकमात्र) राहिलेले असते. ते सत्, चित् आणि आनंद या स्वरूप लक्षणांनी युक्त आहे. (३९९८)

अगा रविदत्ता ऐसें जें स्वरूप । सच्चिदानंद ब्रह्म निर्विकल्प ।
तेंचि तूं आत्माराम एकरूप । त्रिविधा प्रतीति ॥ ९९ ॥
तेव्हा हे रविदत्ता, असे जे सच्चिदानंद, निर्विकल्प, एकरूप स्वरूप तेच आत्माराम आहे. आणि तोच तू आहेस, हेच शास्त्रप्रतीती, गुरूप्रतीती आणि आत्मप्रतीती या प्रतीतींनी सिद्ध होते. (३९९९)

तुवां निर्विकल्प अनुभविलें । लयसाक्षित्व न जाणोनि जाणिलें ।
निश्चयेंसी सदृढ बाणलें । या नांव आत्मप्रतीति ॥ ४००० ॥
तू निर्विकल्पाचा अनुभव घेतला आहेस. लयसाक्षित्व न जाणून जाणले आहेस. आणि हा अनुभव निश्चितपणे तुझ्या ठिकाणी बाणला आहे. याला आत्मप्रतीती असे म्हणतात. (४०००)

आतां आलीं पूर्वीपासून । जें जें केलें सांग निरूपण ।
विवेचन अथवा अभ्यासलक्षण । यथायुक्त ज्यारीतीं ॥ १ ॥
आता आम्ही पूर्वीपासून जे संपूर्ण निरूपण केले, विवेचन केले, योग्यप्रकारे अभ्यासस्वरूप समजावून सांगितले, ज्या रीती सांगितल्याः (४००१)

त्या त्या रीतीं तुवा विश्वास । असंभावना टाकून एकरसें ।
धरिलें असेल दृढमानसें । तेचि गुरुप्रतीति ॥ २ ॥
त्या त्या रीती तू संशय टाकून विश्वासपूर्वक, एकचित्ताने दृढ निश्चयाने स्वीकारल्यास त्यालाच गुरुप्रतीती असे म्हणतात. (४००२)

आह्मीं जरी जितुकें निरोपिलें । अप्रमाण एकही नाहीं बोलिलें ।
शास्त्ररीतींच युक्तींने बिंबविलें । या नांव शास्त्रप्रतीति ॥ ३ ॥
आम्ही जरी इतके सांगितले, तरी त्यातील एकही गोष्ट अप्रमाण नव्हती. शास्त्राला धरूनच युक्तीप्रयुक्तीने तुझ्या ठिकाणी बिंबविले. त्यालाच शास्त्रप्रतीती म्हणतात. (४००३)

इतुक्याही प्रत्ययाचे सार । जें निर्विकल्प ब्रह्म निर्विकार ।
विवेचनें आणि अभ्यासप्रकार । व्यतिरेकें भेटविले ॥ ४ ॥
या सर्व अनुभवांचे सार हेच की, निर्विकार, निर्विकल्प ब्रह्म विवेचनाने आणि अभ्यास प्रक्रियेने व्यतिरेक पद्धतीने आम्ही तुला भेटविले. (४००४)

हेही महावाक्ये वेदाचीं । बोलत असती अर्थ हाची ।
तत्वमस्यादिकडोनि साची । तत्वमेव ह्मणोनी ॥ ५ ॥
वेदातील महावाक्ये हाच अर्थ सांगत आली आहेत. 'तत्त्वमसि' (ते तू आहेस) इ. वाक्ये तूच ते (ब्रह्म) आहेस असेच सांगतात. (४००५)

आह्मीं उपदेशरीती सांगितलें । तें तुवां अनुभवें पाहिजे घेतलें ।
ह्मणोनि यजुर्वेद महावाक्य बोले । हाचि अर्थ प्रगट ॥ ६ ॥
आम्ही उपदेशाच्या मार्गाने तुला जे सांगितले आहे, ते तू प्रत्यक्ष अनुभवाने स्वीकारावेस. म्हणून यजुर्वेदाचे महावाक्य जे 'अहं ब्रह्मास्मि' (मी ब्रह्म आहे) ते हाच अर्थ प्रकट करीत आहे. (४००६)

चरण : अहं ब्रह्म इति वाक्येन सः अयं अर्थः अभिधीयते । ॥ १३ ॥
चरणार्थ : 'अहं ब्रह्म' या वाक्याने हाच अर्थ सांगितला आहे. ॥१३॥

अहं ब्रह्मास्मि हें प्रसिद्ध वचन । तोचि हा अर्थ या वाक्येंकडून ।
बोलिजेत आहे निवडून । जें निर्विकल्प ब्रह्म तूं ॥ ७ ॥
'अहं ब्रह्मास्मि' हे जे प्रसिद्ध वचन आहे ते तोच अर्थ निवडपूर्वक सांगत आहे. ते निर्विकल्प ब्रह्म तूच आहेस. (४००७)

जो सविकल्पांत नाही आला । बत्तिसातीत असंभाव्य संचला ।
वृत्तीही न जाणे तयाला । तोचि हा अर्थ आत्मा ॥ ८ ॥
जो सविकल्पामध्ये समाविष्ट होत नाही, बत्तीस तत्त्वांच्या पलीकडचा असून अमाप दाटून राहिला आहे, वृत्तीही त्याला जाणू शकत नाही, तोच हा आत्मा होय. (४००८)

जो वृत्तीसी तरी कळेना । परी वृत्तीचा लय जो देखणा ।
तोचि हा अर्थ पूर्णपणा । आत्मा ब्रह्म निजांगें ॥ ९ ॥
तो वृत्तीला जरी कळला नाही तरी तो वृत्तीचा लय पाह शकतो. तोच हा परिपूर्ण असा आत्मा स्वतः ब्रह्मच आहे. (४००९)

तोचि मी जरी प्रतीति घेतली । तरी ते ग्राहकता जीवाकडे आली ।
नुसधी जे निर्विकल्पता संचली । तो तूं ब्रह्म आत्मा ॥ १० ॥
तो आत्मा मीच आहे असा अनुभव घेतला तरी तो अनुभव घेणारा जीवच ठरतो. तो जीव वगळून केवळ निर्विकल्पता उरते ती म्हणजे ब्रह्मात्मा होय. तो तूच आहेस. (४०१०)

अथवा स्फूर्तीपासून जागृतीपर्यंत । व्यापकत्वें निर्विकल्प व्याप्त ।
परी त्या त्या विकल्पां न पावत । तो तूं ब्रह्म आत्मा ॥ ११ ॥
किंवा स्फूर्तीपासून जागृतीपर्यंत जे निर्विकल्प तत्त्व व्यापकपणामुळे व्यापून असते पण त्या विकल्पापासून जे अलिप्त असते, ते तत्त्व म्हणजे ब्रह्मात्मा होय, तो ब्रह्मात्मा तूच आहेस. (४०११)

जैसा दीप पदार्थ उपनेत्राहूनी । डोळा एकरूप असतां स्वस्थानीं ।
तो पहावा ऐशी इच्छा धरोनी । परतला मागे ॥ १२ ॥
खोलीत दीप, इतर पदार्थ, चष्मा आणि डोळा अशा गोष्टी आहेत. यांमध्ये डोळा एकरूप असून स्वतःच्या ठिकाणी स्थिर आहे. म्हणून डोळ्याला वाटले त्याचे दर्शन घ्यावे. म्हणून दीप, चष्मा इ. पदार्थ न पाहता डोळा माघारी फिरला. (४०१२)

उपनेत्र आणि अक्षरें पोथीची । दीपप्रकाशी की पदार्थे मंदिरींची ।
इतुकें दिसती तया डोळियासीची । परी हे तया न पाहती ॥ १३ ॥
उपनेत्र आणि पोथीची अक्षरे आणि इतर पदार्थ इतके त्या डोळ्याला दिसत आहेत, पण ते पदार्थ मात्र त्या डोळ्याला पाहत नाहीत. (४०१३)

ऐसा प्रत्यक्ष डोळा उघडा । परी अप्रत्यय ह्मणून जाहला वेडा ।
तेव्हां दीपही मालवूनि कोडा । अंधार नेत्रा दाविला ॥ १४ ॥
असा हा डोळा प्रत्यक्ष उघडा आहे. पण त्याला स्वतःचा अनुभव घेता येत नाही, म्हणून तो वेडा झाला आहे. तेव्हा पडताळा पहाण्यासाठी सहज म्हणून दिवा मालवून त्या डोळ्याला अंधार दाखविला. (४०१४)

तेव्हां तो अधिकचि भांबावला । ह्मणे कांही न दिसे अंधार दाटला ।
तंव कोणे एके हाटकिला । की अंधार दिसे कवणा ॥ १५ ॥
तेव्हा तो अधिकच भांबावला आणि म्हणाला, "मला काही दिसत नाही, सगळीकडे अंधार दाटला आहे." तेव्हा कुणा एकाने त्याला हटकून विचारले की, "अंधार कोणाला दिसतो आहे?" (४०१५)

जयासी अंधार प्रत्यक्ष दिसे । तोचि की डोळा देखणा असे ।
मग डोळिया डोळा न भासे । परी डोळा तो हाची ॥ १६ ॥
ज्याला अंधार प्रत्यक्ष दिसत आहे. तो डोळाच असून तो खरा पाहणारा आहे. तेव्हा डोळा डोळ्याला दिसला नाही तरी अंधार पाहतो तोच खरा डोळा होय. (४०१६)

ऐसें अन्याचे ऐकोनि वचन । पाहता जाहला विचार करून ।
तंव अंधार देखणा हाचि नयन । हा प्रत्यय बाणला त्या ॥ १७ ॥
असे इतरांचे बोलणे ऐकून त्या डोळ्याने विचार करून पाहिले, तेव्हा अंधार पाहतो तोच डोळा' हा प्रत्यय त्याच्या मनावर ठसला. (४०१७)

ऐशिया दृष्टांता पडिपाडें । दार्टान्तीही पहा उघडें ।
स्फूर्तिपासूनियां ऐलीकडे । जागृतीपर्यंत ॥ १८ ॥
अशा दृष्टान्ताप्रमाणे दार्टातात आपण पाहिले तर असे लक्षात येईल की, स्फूर्तीपासून अलीकडे जागृतीपर्यंत, (४०१८)

दीप अयनक आणि पुस्तकाक्षर । वाची तैसाचि जागृतीचा प्रकार ।
वृत्ति बुद्धि इंद्रियादि व्यवहार । प्रत्यक्ष विषय घेणे ॥ १९ ॥
डोळा दीप, उपनेत्र (चष्मा), पुस्तकाक्षरे सर्व पाहू शकतो. तसाच प्रकार जागृतीत ब्रह्मात्मा वृत्ती, बुद्धी, इंद्रियांचे व्यवहार, प्रत्यक्ष विषय या सर्वांना जाणतोच. (४०१९)

हे पूर्वीच असे स्पष्ट केलें । जागृतीसी पुस्तक पाहणे कल्पिलें ।
आणि मंदिरींचे पदार्थ दीपें पाहिले । तैशी स्वप्नावस्था ॥ २० ॥
हे सर्व अगोदरच स्पष्ट केले आहे. जागृतीमध्ये डोळ्याने पुस्तकाक्षरे वाचली अशी कल्पना केली. आणि स्वप्नात चष्म्याशिवाय मंदिरातील पदार्थ पाहिले असा फरक आहे. (४०२०)

असो वृत्ति बुद्धि इंद्रियें विषय । हाचि जागृतीचा समुदाय ।
इतुकियाचा जाणता अद्वय । निर्विकल्प आत्मा ॥ २१ ॥
असो, तर वृत्ती, बुद्धी, इंद्रिये आणि विषय हा जागृतीचा समुदाय आहे. अद्वय, निर्विकल्प असा ब्रह्मात्मा या सर्वांना जाणतो. (४०२१)

ऐसा तूं सहजचि अससी । स्वप्रकाशें सर्वां जाणशी ।
परी मज मी नेणे ह्मणोनि पुसों येशी । गुरुत्व आम्हां भावोनी ॥ २२ ॥
तूही स्वाभाविकपणे असाच आहेस. स्वप्रकाशाने तू या सर्वांना जाणतोस परंतु आम्हाला गुरुत्व देऊन 'मला काही कळत नाही' म्हणून विचारायला येतोस. (४०२२)

मग आम्हीही तुजला बहु प्रकारें । सांगितले विवेचन विस्तारें ।
परी तूं न जाणशी साचोकारें । मंदप्रज्ञ ह्मणोनि ॥ २३ ॥
म्हणून आम्हीही तुला अनेक प्रकारांनी विस्ताराने विवेचन करून समजावून सांगितले. परंतु तुला तू मंदप्रज्ञ असल्यामुळे ते कळले नाही. (४०२३)

तेव्हां अभ्यास समाधीचा । सांगितला विवेचनासह साचा ।
हे वृत्ति बुद्धि इंद्रियविषयांचा । प्रत्यक्षपणा दाविला ॥ २४ ॥
तेव्हा आम्ही तुला समाधीचा अभ्यास विवेचनासह सांगितला. वृत्ती, बुद्धी, इंद्रिये आणि विषय यांचा प्रत्यक्षपणा दाखवून दिला. (४०२४)

हे जड परप्रकाशक सर्व । यांचा जाणता तूंचि सदैव ।
हे दाखविले वेगळाले स्वभाव । परी तुज नुमजे ॥ २५ ॥
हे सर्व जड असून परप्रकाशक आहेत. त्यांचा तूच एकमेव भाग्यशाली जाणकार आहेस. त्या जड पदार्थांच्या आणि तुझ्या स्वभावातील भेद तुला सांगितला पण तुला ते कळत नाही आहे. (४०२५)

मग पुढे कल्पना जे अंतरीं । विषयाध्यासें स्वप्नानुकारी ।
याचाही जाणता तूंचि निर्धारी । हेही दाखविलें ॥ २६ ॥
तेव्हा स्वप्नावस्थेत केवळ विषयांचा ध्यास घेऊन मनात उठणाऱ्या कल्पनाविश्वाचाही जाणकार तूच आहेस हेही स्पष्ट केले. (४०२६)

तरीही तुज उमजेना । तेव्हां बुद्धीची सारोनी कल्पना ।
दाखविलें नुसधिया स्फुरणा । मध्य संधीसहित ॥ २७ ॥
तरीही तुला उमज पडली नाही. तेव्हा ही बुद्धिकृत कल्पना बाजूला सारून तुला केवळ स्फुरण अथवा स्फूर्ती हिची मध्यसंधीसहित माहिती दिली. (४०२७)

त्या वृत्तीमुळे वृत्तीच जाणती । वाटती जाहली तुजप्रती ।
मग पुढे दाविली तिची समाप्ति । शून्याकारता ॥ २८ ॥
त्या वृत्तीमुळे वृत्तीच जाणती असे तुला वाटले. त्यामुळे पुढे तिची समाप्ती कशी होते आणि तिला शून्याकारता कशी येते हेही तुला दाखविले. (४०२८)

तेव्हां तों अधिकची गडद पडे । वृत्तीचे साक्षित्वही मोडे ।
लय जाणणे असोनि उघडें । शून्यदशा भाविसी ॥ २९ ॥
त्यावेळी तर अधिकच दाट काळोख पडला. वृत्तीचे साक्षित्वही गेले. वास्तविक वृत्तीचा लय जाणण्याची संधी आली होती. पण तिला तू शून्यदशा समजलास. (४०२९)

मग येथील जो कां विचार । लयाचा तरी कळे निर्धार ।
न कळणे तों नाहींच साचार । नेणणे कळे तें ज्ञान ॥ ३० ॥
मग लयाचा तरी निर्धार होईल असा येथील विचार तुला सांगितला. त्यात न कळणे हे सत्य नव्हेच, पण नेणणे कळणे हेच खरे ज्ञान असा विचार तुला सांगितला. (४०३०)

ऐसा विचार जेव्हां सुचविला । जेवीं डोळा पाहे अंधाराला ।
तेव्हां तुज लय प्रतीतीस आला । तो प्रत्यय जया तोचि तूं ॥ ३१ ॥
अंधार पाहतो तोच खरा डोळा होय. त्याप्रमाणे तुला वृत्तिलयाचा प्रत्यय आला. तो प्रत्यय ज्याला आला तोच तू आहेस. (आणि लयाचा जाणता जो तोच ब्रह्मात्माही तूच आहेस. हेही सांगितले.) (४०३१)

अगा रविदत्ता खरें की खोटें । विचारून पाहें हें गोमटें ।
लयरूप शून्य जें तुजला भेटे । तें शून्यासी की अन्यासी ॥ ३२ ॥
अरे रविदत्ता, हा सुंदर विचार खरा की खोटा, हे विचार करून पहा. लयरूप शून्य जे तुला भेटले ते शून्याला भेटले की दुसऱ्या कोणाला? (४०३२)

हाचि प्रकार तुजला मागें । विचाररूप विवेचनाचे प्रसंगें ।
सांगितला होता तो उमगे । आतां अभ्यास जाहलिया ॥ ३३ ॥
हाच प्रकार तुला मागे विचाररूप विवेचनाच्या ओघात सांगितला होता तो आता तुला समजला असेल, कारण आता तुझा अभ्यास झालेला आहे. (४०३३)

तेव्हां हा आत्मा ह्मणोनि प्रत्यक्ष । दाविला होता स्वप्रकाश अपरोक्ष ।
परी तुझी वृत्ति अभ्यासें दक्ष । नव्हती सूक्ष्मत्वें ॥ ३४ ॥
त्यावेळी हाच स्वयंप्रकाशित आत्मा म्हणून तुला प्रत्यक्ष आणि अगदी समोर असा दाखविला होता. पण तुझी वृत्ती जाणण्याविषयी सूक्ष्म अभ्यासाने दक्ष झालेली नव्हती. (४०३४)

ह्मणोनि तुजला तये समयीं । प्रतीती न ये निःसंशयीं ।
कारण कीं वृत्त्यादिकांचे समुदायीं । नेणपणे पडसी ॥ ३५ ॥
म्हणून तुला त्या वेळी निःसंशय असा अनुभव आलेला नव्हता. कारण तू अज्ञानामुळे वृत्यादिकांच्या समुदायात पडत होतास. (४०३५)

आतां अभ्यासें तुजला । वृत्तीचा लय प्रत्यया आला ।
तस्मात् मागील निरूपणाला । आलोढून पहावें ॥ ३६ ॥
आता अभ्यासाने तुला वृत्तीचा लय प्रत्ययाला आला आहे, त्यामुळे मागील निरूपणाची उजळणी करून पहा. (४०३६)

तें निरूपण कोणतें ह्मणसी । तरी जे अयमात्मा या वाक्यासी ।
स्पष्ट केलें देऊनि दृष्टांतासी । याचि डोळियाच्या ॥ ३७ ॥
ते निरूपण कोणते, असे म्हणशील तर 'अयमात्मा ब्रह्म' या महावाक्याचे याच डोळ्याचा दृष्टान्त देऊन स्पष्टीकरण केले होते. (पहा. ओवी क्र. २४२७) त्यावेळचे निरूपण होय. (४०३७)

दीप अयनकामुळे पदार्थ । अथवा पुस्तकाक्षरें अर्थ ।
कळती परी नेत्रचि समर्थ । स्वप्रकाशक ॥ ३८ ॥
दिवा, आणि उपनेत्रा (चष्म्या)मुळे पदार्थ, पुस्तकातील अक्षरे, त्यांचा अर्थ कळतात परंतु खरा पहाणारा स्वयंप्रकाशी डोळाच होय. (४०३८)

दीप अयनकही तया नेत्रासी । सहाकारी परी परप्रकाशता तयासी ।
ते नसतांही नेत्र अंधारासी । पाहे तो स्वप्रकाशक ॥ ३९ ॥
दिवा, उपनेत्र हे त्या डोळ्याचे साहाय्यक आहेत, पण ते परप्रकाशित आहेत. ते नसतांनाही स्वयंप्रकाशी डोळा अंधाराला पाहू शकतो. (४०३९)

तैसा लयसाक्षी जो देखणा । स्वप्रकाश अपरोक्ष पूर्णपणा ।
येर हे वृत्तीपासून या सर्व गणा । आत्मप्रकाश पाहिजे ॥ ४० ॥
त्याप्रमाणे जो लयसाक्षी असतो तो खरा देखणा (पाहणारा) असतो. तो स्वयंप्रकाशी, साक्षात, आणि परिपूर्ण असतो. बाकीच्या वृत्तीसह बत्तीस तत्त्वांपासूनच्या सर्व समुदायांना आत्मप्रकाशाची गरज असते. (४०४०)

वृत्ति उठे जेव्हां चिद्गगनीं । ते वृत्तीसी अनुभवेना जडपणीं ।
आत्मप्रकाशाच्या योगेंकडोनी । जाणतसे तदाकारत्व ॥ ४१ ॥
चिद्गगनात ज्यावेळी वृत्ती उठते, तेव्हा त्या वृत्तीला जडपणामुळे त्या चिद्गगनाचा अनुभव घेता येत नाही. पण आत्मप्रकाशामुळे ती तदाकार होऊन (त्याच्याशी एकरूप होऊन) तदाकारत्वाचा अनुभव घेते. (४०४१)

अथवा मन बुद्धि उठूनी । भासविषय भासवी स्वप्नीं ।
तयासी जाणती हे दोनी । परी आत्मप्रकाशें ॥ ४२ ॥
किंवा मन, बुद्धी उत्पन्न होऊन स्वप्नामध्ये भास विषयांचा भास निर्माण करतात. ही दोन्ही तत्त्वे त्या भास विषयांना जाणतात, पण आत्मप्रकाशाच्याच साहाय्याने. (४०४२)

जेवीं सदनींचे पदार्थ दीपयोगें । डोळाचि एक पाहूं लागे ।
तैसे वृत्तिबुद्धीचेही प्रसंगें । आत्माचि देखणा ॥ ४३ ॥
ज्याप्रमाणे घरातले पदार्थ दिव्याच्या साहाय्याने डोळाच पाहू शकतो, त्याप्रमाणे वृत्तिबुद्धी यांच्या वेळी सुद्धा एक आत्माच तेवढा देखणा असतो. (४०४३)

आतां जागृतीचे तों व्यापारा । इतुकेंही पाहिजे साहाकारा ।
वृत्ति बुद्धि पंचज्ञानेंद्रियद्वारा । जीवासहित विषय घेती ॥ ४४ ॥
जागृतीच्या व्यापारात वृत्ती, बुद्धी, पंच ज्ञानेंद्रिये, आणि जीव यांसह सर्व तत्त्वे विषय घेतात. म्हणजे विषयांचे ग्रहण करण्यास बुद्धी, वृत्ती, पंच ज्ञानेंद्रिये या समुदायाची गरज असते. (४०४४)

जैशी पोथी वाचावयासी । पाहिजे दीप अयनक नेत्रासी ।
वृत्ति बुद्धि इंद्रियें तैशीं । मिळतां भोग घडे ॥ ४५ ॥
ज्याप्रमाणे पोथी वाचण्यासाठी दिवा, उपनेत्र यांची डोळ्याला साथ लागते. त्याप्रमाणे बुद्धी, वृत्ती, इंद्रिये यांचा समुदाय जमल्यानंतरच त्या विषयाचा भोग घडतो. (४०४५)

परी दीप आणि अयनक । हे उघडचि परप्रकाशक ।
स्वप्रकाशक नेत्रचि एक । स्पष्टत्वे असे ॥ ४६ ॥
पण दिवा, उपनेत्र हे उघडउघड परप्रकाशक असतात. एक डोळा तेवढा स्वयंप्रकाशी असतो. (४०४६)

तैसे वृत्ति बुद्धि आणि इंद्रिय । इतुकाही जाणण्याचा समुदाय ।
परी एक आत्मत्वाचा अन्वय । असतां जाणों शकती ॥ ४७ ॥
त्याप्रमाणे बुद्धी, वृत्ती आणि इंद्रिये ही सर्व ज्ञानाची साधने आहेत. पण त्यांचा आत्म्याशी संबंध आला तरच ती जाणू शकतात, एरवी नाही. (४०४७)

तैसें आत्मया कोणतें उपकरण । असे पहावया लयसाक्षिज्ञान ।
ह्मणोनि तोचि एक स्वप्रकाशमान । येर हे परप्रकाशक ॥ ४८ ॥
त्याप्रमाणे लयसाक्षिज्ञान पहावयास आत्म्याला कोणत्या उपकरणाची गरज आहे? अर्थात कोणत्याही उपकरणाची गरज नसते. याचा अर्थ तोच एकटा स्वयंप्रकाशी आहे. हे इतर घटक परप्रकाशक आहेत. (४०४८)

तस्मात् हे जड आणि आपणाहूनी । भिन्न असती कळती ह्मणोनी ।
स्वतां जाणेना आपणा लागूनी । परी भिन्न पाहे सर्वां ॥ ४९ ॥
त्यामुळे ते पदार्थ जड आहेत. ते आपल्याला कळतात म्हणून ते भिन्न आहेत. आत्मा स्वतःला जाणू शकत नाही पण इतर सर्वांना भिन्न ठरवून पाहतो. (४०४९)

एवं जड भिन्न आणि परोक्ष । हे वृत्तिसहित सर्व प्रत्यक्ष ।
एकचि स्वप्रकाश अपरोक्ष । आत्मा ब्रह्म ॥ ५० ॥
अशा प्रकारे हे पदार्थ जड आणि भिन्न असून परोक्ष आहेत. वृत्तीसह ते सर्व पदार्थ प्रत्यक्ष आहेत म्हणून भिन्न आहेत. एक ब्रह्मात्मा तेवढा स्वप्रकाशी, अपरोक्ष असा आहे. (४०५०)

हाचि अर्थ मागां जो निरोपिला । अयमात्मा या वाक्ये बोलिला ।
तोचि मागुती येथे स्पष्ट केला । या अभ्यासप्रसंगें ॥ ५१ ॥
हाच अर्थ मागे सांगितला आहे. 'अयमात्मा ब्रह्म' या वाक्याने तोच सांगितला आहे. (पहा ओवी क्र. २४२७) तोच या अभ्यासाच्या निमित्ताने स्पष्ट केला आहे. (४०५१)

तोचि अर्थ अहंब्रह्मास्मि । वाक्यही सांगतसे अनुक्रमीं ।
की साधकें धरावें अंतर्यामी । जें निर्विकल्प ब्रह्म स्वयें ॥ ५२ ॥
'अहं, ब्रह्मास्मि' याही महावाक्याचा हाच अर्थ आहे. ते वाक्य या संदर्भात सांगते की, साधकाने आपण स्वतः निर्विकल्प ब्रह्म आहोत. हे अंतर्यामी धरावे. (४०५२)

जो अर्थ अयमात्मा या वाक्याचा । तोचि असे अहंब्रह्मास्मीचा ।
स्वप्रकाश अपरोक्ष जो साचा । तोचि मी ब्रह्म ॥ ५३ ॥
'अयमात्मा ब्रह्म' या वाक्याचा जो अर्थ आहे. तोच 'अहं ब्रह्मास्मि' या वाक्याचाही अर्थ आहे. म्हणजे स्वयंप्रकाशी अपरोक्ष असा जो ब्रह्मात्मा तोच मी आहे. (४०५३)

तोचि अर्थ तत्त्वमसि म्हणोनी । उपदेशिलें आह्मीं विवेचनीं ।
आणि अभ्यासें लयसाक्षित पूर्णपणीं । भेटविलें जें तेंचि तूं ॥ ५४ ॥
तोच अर्थ 'तत्त्वमसि' या वाक्याचाही आहे, म्हणून आमच्या विवेचनात आम्ही त्याचाही उपदेश केला. आणि अभ्यासाच्या साहाय्याने लयसाक्षित्व म्हणजे काय तेही पूर्णपणे स्पष्ट केले. तेच तू आहेस. वरील महावाक्याचा अर्थ आणि लयसाक्षित्व ही दोन्ही एकच होत. (४०५४)

आणि चौथेही प्रज्ञानब्रह्म । तोही हाचि अर्थ बोले निःसीम ।
तस्मात् तो हा अर्थ सुखधाम । साध्यरूप साधका ॥ ५५ ॥
आणि चौथे 'प्रज्ञानं ब्रह्म' हे महावाक्यदेखील हाच अभिप्राय सांगते. त्यामुळे सुखधाम (सर्व सुखांचे निवासस्थान) असलेला ब्रह्मात्मा हे साधकाचे साध्य असायला हवे. (४०५५)

येथेही तूं ऐसें ह्मणसी । अयमात्मा ब्रह्म या वाक्यासी ।
प्रत्यक्ष ऐक्यता पूर्णब्रह्मासी विरोधाहीविण ॥ ५६ ॥
येथे तू शंका काढशील की, 'अयमात्मा ब्रह्म' या वाक्यात पूर्ण ब्रह्माशी प्रत्यक्ष ऐक्य सांगितले आहे. त्यात कोठेही विरोध नाही. (४०५६)

तैसा अविरोध या तिहीतें । कोठे असे वाच्यलक्षातें ।
वाच्य जेव्हां बाधिजेतें । तेव्हांचि लक्षांशी ऐक्य ॥ ५७ ॥
त्यासारखा अविरोध (विरोध नसण्याची परिस्थिती) या तीन वाक्यांच्या लक्ष्यात कोठे आहे? वाच्यार्थांचा निरास करून जो सूचित अर्थ घेतला जातो त्याला लक्ष्यार्थ म्हणतात. पण या तीन्ही वाक्यांच्या लक्ष्यार्थात ऐक्य दिसत नाही. (४०५७)

म्हणोनि चारी वाक्यांसी एकार्थता । नव्हेसी शंका मानिसी तत्त्वतां ।
की अहं हेंचि सविकल्पता । तेणें निर्विकल्पी ऐक्य नोव्हे ॥ ५८ ॥
म्हणून या चारी वाक्यांचा अर्थ एक नाही अशी शंका तू मनात बाळगशील. तुला वाटत असेल की, 'अहम्' शब्दामध्ये सविकल्पता आहे. तिच्या योगाने निर्विकल्पाशी ऐक्य होऊ शकत नाही. (४०५८)

तरी याचे उत्तर अवधारावें । . अहं ह्मणोनि स्फूर्तीत न घ्यावें ।
स्फूर्तीपरतें जें निर्विकल्प स्वभावें । तोचि ब्रह्मात्मा आपण ॥ ५९ ॥
तरी याचे उत्तर नीट ऐक. 'अहम्' या शब्दाने स्फूर्ती असा अर्थ तू घेऊ नकोस. स्फूर्तीच्या पलीकडे असलेला जो निर्विकल्प ब्रह्मात्मा तोच आपण आहोत, असा त्या वाक्याचा अर्थ येथे घ्यावा म्हणजे सविकल्पकतेचा दोष टळेल. (४०५९)

वृत्तीपासून इंद्रियांपर्यंत । जो जीवत्वें प्रतिबिंबित ।
जेणे देहबुद्धि होती अखंडित । तो त्रिविध अहंकार नव्हे ॥ ६० ॥
बुद्धीपासून इंद्रियांपर्यंत जो जीव होऊन प्रतिबिंबित झालेला आहे, ज्याच्यामुळे प्राणिमात्रांच्या ठिकाणी देहबुद्धी अखंडितपणे वास्तव्य करते तो तीन प्रकारचा (विश्व, तैजस, प्राज्ञ) अहंकार हा अर्थ येथे घेऊ नकोस. (४०६०)

सर्व मिथ्यात्वे त्यागिलें । दृश्य जड परप्रकाशें वर्तले ।
तयाचें अहंपण कवण बोले । ब्रह्म ह्मणोनी ॥ ६१ ॥
सर्व तत्त्वांचा मिथ्या म्हणून त्याग केला, दृश्य जड परप्रकाशित आहे असे निश्चित झाले. अशा वेळी त्या त्याज्य पदार्थांविषयीच्या अहंकाराला ब्रह्म म्हणून कोण सांगेल? (४०६१)

अरे जेथें ध्याता वेगळा । तोही प्राज्ञ म्हणोनि केला निराळा ।
उरे लयासाक्षिपणे केवळा । तोचि ब्रह्मात्मा मी स्वयें ॥ ६२ ॥
अरे, जेथे ध्याता वेगळा असतो त्याला प्राज्ञ असे म्हणून बाजूला काढला. मग केवळ लयसाक्षित्वाने जो उरतो, तो ब्रह्मात्मा मी स्वतः आहे. (४०६२)

येथे कोणतें गा वाच्य असे । लक्ष तरी ह्मणणे काइसें ।
त्रिपुटीविण अखंडैकरसें । तोचि ब्रह्मात्मा मी स्वयें ॥ ६३ ॥
या अनुभवात कशाला वाच्य म्हणावे? लक्ष्य तरी कशाला म्हणावे? जेथे त्रिपुटी नाही असा अखंड एकरस ब्रह्मात्मा मी स्वतःच आहे. (४०६३)

विद्या अविद्या स्फूर्ति उठतां । बोलूं येती कारणात्मता ।
त्यामाजीं प्रतिबिंबरूपता । उमटे जीवेशाची ॥ ६४ ॥
विद्या आणि अविद्या या प्रकारची स्फूर्ती निर्माण होताच त्यामध्ये प्रतिबिंबरूपाने ईश्वर आणि जीव यांची निर्मिती होते. त्यामुळे विद्या आणि अविद्या या ईश्वर आणि जीव यांची कारणे ठरतात, असे म्हणता येते. (४०६४)

तिथे एक सर्वज्ञ एक किंचिज्ज्ञ । एक निरभिमान एक साभिमान ।
एवं विरोध हे वाच्यालागून । ह्मणोनि बाधिजेते ॥ ६५ ॥
तेथे ईश्वर हा सर्वज्ञ आणि जीव हा किंचिज्ज्ञ, ईश्वर हा निरभिमानी तर जीव हा साभिमानी; असा भेद असल्यामुळे दोहोंच्या वाक्यार्थांमध्ये विरोध येतो. म्हणून त्यावेळी त्या वाच्यार्थांचा त्याग करावा लागतो. (४०६५)

या पक्षी तों स्फुर्तिरूपवृत्ति । तिचाही लय जाणता स्वयंज्योति ।
तोचि आपण अनुभाव्य निश्चितीं । अनुभवित्याविण ॥ ६६ ॥
पण प्रस्तुत ठिकाणी जी स्फूर्तिरूप वृत्ती असते, तिचाही लय होतो आणि स्वयंप्रकाशी ब्रह्मात्मा हा त्या लयाचा एकमेव जाणता आहे. तोच साधकाच्या दृष्टीने अनुभाव्य आहे. त्या अनुभवात त्रिपुटी नसते. म्हणून त्याला अनुभवविरहित अनुभाव्य म्हटले आहे. तेथे अनुभविता कोणी नाही. (४०६६)

जेथें माया स्फुर्तिचा अभाव । तेथें कैसें असती जीवशिव ।
मा ते खंडिजेती विरोधास्तव । ऐसें तों नाहीं ॥ ६७ ॥
तेथे मायारूप स्फूर्तीचाच अभाव असतो तेथे जीव आणि ईश्वर यांचे तरी अस्तित्व कसे असेल? मग त्यांच्यात विरोध येतो म्हणून त्यांचे खंडन करावे, अशी परिस्थितीदेखील नाही. (कारण मुळातच जे उत्पन्न झालेले नाहीत. (४०६७)

तथापि विद्या अविद्या स्फूर्तिसहित । जीवेश उभयीं प्रतिबिंबित ।
परी हे प्रतिबिंब ज्याचे निश्चित । तो ब्रह्मात्मा मी स्वयें ॥ ६८ ॥
तरीसुद्धा मिथ्यात्वाने विद्या अविद्या निर्माण होतात, त्यांच्यामध्ये ईश्वर आणि जीव अशी प्रतिबिंबे उमटतात. पण आपण तर त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत. ईश्वर आणि जीव ही प्रतिबिंबे ज्याची आहेत तो ब्रह्मात्माच मी स्वतः आहे. (४०६८)

हे अर्थातचि मिथ्या जाहली । पूर्वीच बत्तीसही निषेधिलीं ।
एकली लयसाक्षी चित्प्रभा उरली । ते संचली स्थिती स्वयें ॥ ६९ ॥
ही तत्त्वे त्यामुळे आपोआप मिथ्या ठरतात. त्याअगोदर मागे बत्तीस तत्त्वांचाही निषेध केला आहे. तेव्हा लयसाक्षी असलेले एकटे चिद्रूप तेवढे उरते. ते चिद्रूप आपण स्वतः होऊन राहिललो आहोत. (४०६९)

तस्मात् अहं ब्रह्मास्मि वाक्येकडून । हाचि अर्थ बोलिला निवडून ।
हा ब्रह्मात्मा स्वप्रकाश पूर्ण । लयसाक्षी अपरोक्ष ॥ ७० ॥
त्यामुळे 'अहं ब्रह्मास्मि' या वाक्याच्या द्वारे स्वप्रकाशक. अपरोक्ष, लयसाक्षी हाच खरा ब्रह्मात्मा आहे' हाच अर्थ निवडून सांगितला आहे. (४०७०)

चारीही महावाक्यांचा अर्थ । एकचि ह्मणती ज्ञाते समर्थ ।
कोठे प्रत्यक्ष कोठे बाधिती अनर्थ । परी परिणाम एकरूप ॥ ७१ ॥
चारीही महाकाव्यांचा अर्थ - एकच आहे, असे समर्थ ज्ञाते सांगतात. त्यातून चुकीचा अर्थ निघेल तर कोठे त्याचा बाध करतात. तर कोठे प्रत्यक्षपणे वाच्यार्थ स्वीकारतात. या दोन्ही प्रकारांचा परिणाम मात्र एकरूपच असतो. (४०७१)

यास्तव सारांश हा तुजला । मथितार्थ काढोनियां दिधला ।
तरी विसरूंच नको भलते अवस्थेला । निर्विकल्प मी करी दृढ ॥ ७२ ॥
यासाठी सारांशाने त्यांचा मथितार्थ तुला काढून दिला. तर आता तू कोणत्याही अवस्थेत 'मीच ब्रह्मात्मा' या अर्थाचे विस्मरण पडू देऊ नकोस. मीच निर्विकल्प ब्रह्म आहे, हे दृढ कर. (४०७२)

मागुतींही एक आशंका । वाटेल मनीं ते आधीं ऐका ।
की वाक्ये एकार्थ सांगितला निका । वाच्याविण एकरूप ॥ ७३ ॥
यानंतरही तुझ्या मनात आशंका वाटेल की, चारी महावाक्यांनी एकच एक अर्थ सांगितला आहे. त्यांचा वाच्यार्थ वगळता लक्ष्यानि ती सर्व एकरूपच आहेत. (४०७३)

जेथें त्रिपुटीही उद्भवेना । वाच्यलक्ष सहसा असेना ।
तरी ऐसें कासया बोलिलें वचना । तो हा अर्थ ह्मणोनी ॥ ७४ ॥
जेथे त्रिपुटीही उत्पन्न होत नाही. वाच्य लक्ष्य असा भेदही असत नाही, मग तो हा अर्थ असे का म्हणालात? ब्रह्माच्या बाबतीत हा - तो असा भेद असण्याचे कारणच नाही. (४०७४)

तो हा ह्मणतां परोक्षापरोक्ष । होत असती वाच्यलक्ष ।
याचे उत्तर कैसें तें प्रत्यक्ष । बोलिजे ऐका ॥ ७५ ॥
तो - हा असा भेद केल्याने परोक्ष-अपरोक्ष, अथवा वाच्य-लक्ष्य असे भेद मानावेच लागणार. याचे उत्तर आता प्रत्यक्षच सांगतो, ऐका (४०७५)

जो सृष्टिपूर्वी सदोदित । सच्चिदानंद त्रिकालाबाधित ।
तो आतां उपाधि असतां निवांत । लय साक्षी प्रगटे ॥ ७६ ॥
जो सृष्टीपूर्वी सदोदित त्रिकालाबाधित होता, तो लयसाक्षी आता उपाधी असताना निवांत प्रगटला. (४०७६)

सृष्टिपूर्वी जो कां अविनाशी । तो शब्द प्रवर्तत असे तयासी ।
हा जो आतां जाणे लयासी । तोचि हा ब्रह्मात्मा ॥ ७७ ॥
सृष्टीपूर्वी जो अविनाशी होता त्याच्याबद्दल तो या शब्दाचा प्रयोग होतो. हा या शब्दाचा प्रयोग आता जो वृत्तीच्या लयाचा साक्षी (जाणता) आहे त्या ब्रह्मात्म्याबद्दल होतो. (४०७७)

जैसे घटमठेवीण गगन । तेंचि घटी जळी प्रतिभासी सघन ।
व्यापलें जें निश्चळ पूर्ण । तेंचि हे ह्मणावें ॥ ७८ ॥
पण दोन्ही एकच आहेत. ज्याप्रमाणे घट आणि पट नसतानाचे आकाश आणि आताचे घटातील पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेले आकाश यात आपण भेद करतो. पण वास्तवात व्यापक आकाश तेच हे घटातील आकाश होय. (४०७८)

जें पाणी तरंगाविरहित । तयासी तें ह्मणोनि बोलों येत ।
तेंचि तरंगी विकारारहित । ह्मणोनि तेंचि हे पाणी ॥ ७९ ॥
ज्याप्रमाणे तरंग नसलेले पाणी जे असते त्याला आपण 'ते' या शब्दाने निर्दिष्ट करू शकतो. पण तेच पाणी तरंग उठल्यानंतर त्यात काही बदल (विकार) होत नसल्यामुळे आपण म्हणतो तेच हे पाणी' (४०७९)

न पडतां वृक्षीं बैसला असे । तोचि प्रवाही पडिला भासे ।
मागुती कळतां जेथींचा तेथें वसे । तोचि हा वृक्षस्थ ॥ ८० ॥
जो पाण्यात पडलेला नसून वृक्षावर बसलेला आहे, तोच प्रवाहात पडल्यासारखा भासतो. मागून कळते की वृक्षस्थ आपल्या जागेवर स्थिर आहे. मग आपण म्हणतो, तो वृक्षस्थ हाच पाण्यातील आभासरूप वृक्षस्थ होय. (४०८०)

सर्पापूर्वी जे दोरी होती । तेथें सर्प भासून मावळे मागुतीं ।
पहिली तैशीच कळल्यावरुती की तेचि हे दोरी ॥ ८१ ॥
सर्प पाहण्यापूर्वी जी दोरी होती तिच्या जागी सर्प भासतो आणि दोरी मावळते. पण नंतर ती दोरी आहे. हे कळल्यानंतर आपण म्हणतो की, तीच ही दोरी. (४०८१)

इत्यादी या दृष्टांतासम । बत्तिसांपूर्वी जो आत्मा ब्रह्म ।
तो आतां हें जातां रूपनाम । प्रत्यया लय साक्षी आला ॥ ८२ ॥
या वरील दृष्टान्ताप्रमाणे बत्तीस तत्त्वे उत्पन्न होण्यापूर्वी जो ब्रह्मात्मा होता तोच आता हे रूप आणि नाम गेल्यानंतर हा लयसाक्षी म्हणून अनुभवास येतो आहे. (४०८२)

जो सृष्टीपूर्वी सृष्टीच्या लयाचा । जाणता उपकरणेंविण साचा ।
तोचि हा जाणता लयवृत्तीचा । कीं तो हा ब्रह्मात्मा ॥ ८३ ॥
जो सृष्टीपूर्वी सृष्टीच्या लयाचा कोणत्याही साधनावाचून जाणता होता तोच हा लयवृत्तीचा जाणता ब्रह्मात्मा होय. (४०८३)

किंवा पुढे सर्व लया जातां । जो एकला उरे सर्वापरता ।
तोचि हा प्रतीतीस आला आतां । समाधीमाजीं ब्रह्मात्मा ॥ ८४ ॥
किंवा नंतर पुढे सर्व लयाला गेल्यानंतर जो सर्वातीत असा एकटाच उरणार आहे, तोच हा आता समाधीमध्ये ब्रह्मात्मा या रूपात प्रत्ययास येतो. (४०८४)

अथवा मागे जे जे ज्ञाते जाहले । ते ते जयाच्या ज्ञाने समाधान पावलें ।
तेंचि ब्रह्मात्मरूप मज कळलें । तोचि हा अर्थ प्रगटला ॥ ८५ ॥
किंवा मागे जे जे ज्ञाते झाले ते ज्याच्या ज्ञानाने समाधान पावले तोच हा ब्रह्मात्मरूपाने मला कळला. हेच ज्ञान आज मला झाले. (४०८५)

अथवा मागे जाहलें पुढे होणार । सर्वांचे एकचि निजसार ।
तेथेंचि पावलों मी त्यागोनि येर । यास्तव तो हा ब्रह्मात्मा ॥ ८६ ॥
अथवा मागे झाले आणि आता पुढे होणार आहेत, त्या सर्वांचे एकच स्वात्मसुख हे ध्येय आहे. मीही इतर सर्व उपाधींचा त्याग करून ते प्राप्त करून घेतले तोच हा ब्रह्मात्मा होय. (४०८६)

एवं तोचि ब्रह्मात्मा आपण । सांडोनियां बत्तिसांचे मीपण ।
अहं ब्रह्म हे स्फूर्तिविण । अंगें होणे हे प्रतीती ॥ ८७ ॥
अशा प्रकारे तोच ब्रह्मात्मा इतर बत्तीस तत्त्वाबद्दलच्या अहंकाराचा त्याग केल्यानंतर स्फूर्तिरहित अशा 'अहं ब्रह्म' अशा स्वरूपात प्रत्यक्ष अनुभवणे ही प्रतीती होय. (४०८७)

अगा रविदत्ता तोचि तूं ब्रह्म । त्रिपुटीविण आत्माराम ।
न जाणोनि जाणणे हे उत्तम । तुझेंचि तुजसी अद्वय ॥ ८८ ॥
अरे रविदत्ता, तेच ब्रह्म तू आहेस, त्रिपुटीरहित असा आत्माराम आहेस. हे तुझे अद्वय रूप न जाणून जाणणे (त्रिपुटीवाचून जाणणे) हा उत्तम मार्ग होय. (४०८८)

तोचि तूं या सर्व जगासी । अधिष्ठानरूप अविनाशी ।
सर्व लय होवोनियां उरसी । सच्चिदानंद ब्रह्मात्मा ॥ ८९ ॥
तोच तू या सर्व जगाचे, अविनाशी असे अधिष्ठान आहेस. सर्व सृष्टीचा लय झाला तरी तूच उरणारा आहेस. कारण तूच सत् चिद् आनंदरूप ब्रह्मात्मा आहेस. (४०८९)

ब्रह्मादि कीटकान्त हे जग । या सर्वांचे निजरूप अभंग ।
तोचि तूं ब्रह्मात्मा असंग । त्रिकालीं एकरूप ॥ ९० ॥
ब्रह्मापासून ते कीटकांपर्यंत हे सर्व जग या सर्वांचे मूळ अभंग असे रूप असा, तिन्ही काळी एकरूप असणारा ब्रह्मात्मा तूच आहेस. (४०९०)

देवभक्त स्वामी सेवक । गुरुशिष्य की राजा रंक ।
अवघा तूंचि ब्रह्मात्मा एक । हें तें नामरूपत्यागें ॥ ९१ ॥
देव-भक्त, स्वामी-सेवक, गुरू-शिष्य, राजा अथवा रंक हे-ते इ. भिन्न नामरूपांचा त्याग केल्यानंतर अवघा तूच एक ब्रह्मात्मा आहेस. (४०९१)

हे सर्व नामरूपें सविकल्पक । न होऊन जाहली असती अनेक ।
परी तूं याचे अधिष्ठान एक । निर्विकल्पत्वें ब्रह्मात्मा ॥ ९२ ॥
ही सर्व नामरूपे सविकल्प असून न होऊन अनेक झाली आहेत. (कारण ती भासरूप आहेत). पण तू मात्र या सर्वांचे अधिष्ठान असा एकमेव निर्विकल्प ब्रह्मात्मा आहेस. (४०९२)

अनंत कल्पें होती जाती । परी निर्विकल्पता तुझी ऐती ।
जेथे बद्धता ना नसे मुक्ति । तो तूं ब्रह्मात्मा असंग ॥ ९३ ॥
अनंत कल्पे होतील. जातील, पण तझी निर्विकल्पता स्वतःसिद्ध आणि अबाधित आहे. तुझ्या ठिकाणी ना बद्धता ना मोक्ष. तू तर असंग असा ब्रह्मात्मा आहेस. (४०९३)

हाचि अर्थ चारी वाक्यांचा । आणि हाचि विषय जो वेदान्ताचा ।
हाचि आशय सर्व ज्ञात्यांचा । भूत भावीं वर्तमानीं ॥ ९४ ॥
हाच चारही महावाक्यांचा खरा अभिप्राय आहे. हाच वेदान्ताचा विषय आहे. आणि भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळातील सर्व ज्ञात्यांचा हाच आशय आहे. (४०९४)

हाचि अर्थ कळावयासाठीं । गुरुशिष्य सच्छास्त्रांच्या थाटी ।
शब्दार्थरचना अनंत कोटी । इतुकियाकरितां ॥ ९५ ॥
हाच अर्थ कळण्यासाठी गुरू-शिष्य, सच्छास्त्रे यांचे समुदाय आहेत. आणि अनंत कोटी विस्ताराची शब्दार्थ रचना केवळ एवढ्याचसाठी आहे. (४०९५)

बहु कासया बा बोलावें । सर्व करणे येथें समाप्ति पावे ।
वेदें पाह्न जेथें मौन राहावें । तो तूं हा ब्रह्मात्मा ॥ ९६ ॥
जास्त काय सांगू. सर्व करणे (क्रिया) येथे समाप्त होतात. वेदांनी ज्याकडे पाहून मौन धरले आहे, असा हा ब्रह्मात्मा तूच आहेस. (४०९६)

तोचि अर्थ न बोलोनि आह्मी । बाणविला तुज सुखैकधामीं ।
तस्मात् सांडोनियां सर्व ऊर्मि । तेंचि होऊन राहे ॥ ९७ ॥
तोच अर्थ या समाधिरूप निखळ सखांच्या अद्वितीय घरात आम्ही न बोलून तुझ्या ठिकाणी बिंबवला आहे. तेव्हा सर्व ऊमींचा (वृत्तींचा) त्याग करून तू त्या अर्थाशी एकरूप होऊन रहा. (४०९७)

येरां बत्तिसांचे मीपण त्यागी । तो ब्रह्मात्मा चि होय निजांगी ।
तरीच तूं निर्भय होसी जगीं । सत्य सत्य त्रिवाचा ॥ ९८ ॥
ही जी मायिक बत्तीस तत्त्वे आहेत. त्यांच्याबद्दलचे मीपण आणि माझेपण यांचा त्याग कर. आणि स्वतः तो ब्रह्मात्माच होऊन रहा. तरच तू या जगात निर्भय होशील. हे माझे वचन त्रिवार सत्य आहे. (४०९८)

आतां निष्कर्षे पाठी थापटूनी । सांगत असों निर्वाणवचनीं ।
लय साक्षी ब्रह्मात्मा पूर्णपणीं । तो तूं अद्वय आहेसी ॥ ९९ ॥
आता तुझी पाठ थापटून तुला निष्कर्षात्मक एवढेच निर्वाणीचे सांगणे आहे. तूच लयसाक्षी, अद्वय, पूर्ण, असा ब्रह्मात्मा आहेस. (४०९९)

आतां बोलणे सर्व खंटलें । ऐकणे त्यासवें पांगुळलें ।
उर्वरित सहजी सहज उरलें । तों तूं ब्रह्मात्मा ॥ ४१०० ॥
आता सर्व बोलणे खुंटले आहे. त्याबरोबरच ऐकणेही पांगुळले आहे. आता स्वाभाविकपणे जो सहजपणे सहज उरला आहे, तो ब्रह्मात्मा तूच आहेस. (४१००)

इतुके बोलोनि श्रीशंकर । मौनें राहते झाले स्थिर ।
इकडे रविदत्ताचे अंतर । ब्रह्माकार जाहलें ॥ १ ॥
इतके बोलून श्री शंकराचार्य मौन धरून स्वस्थ बसले. त्यावेळी इकडे रविदत्ताचे अंतःकरण ब्रह्माकार झाले. (४१०१)

लय साक्षित्वें चिद्रूप चिद्रपें । वृत्तिज्ञान तो सर्व हारपे ।
उठे जरी तें पसरोनि लोपे । भित्रपणे न होतां ॥ २ ॥
लयसाक्षी झाल्यामुळे चिद्रूप चिद्रूपच राहते. वृत्तिज्ञान तर सर्व लोपले. ते जरी उत्पन्न झाले तरी ते पसरते आणि लागलीच लोप पावते. या उठण्या मावळण्यामुळे ते लयसाक्षीच्या अनुभवापासून भिन्न पडत नाही. (४१०२)

उगीच स्तब्धता मात्र उरली । तया स्तब्धतेची जाणीव संचली ।
ते जाणती कळा परी प्रतीति आली । नाही स्फूर्तिरूप ॥ ३ ॥
रविदत्ताला हाच अनुभव आला. त्याच्या समाधीत एक स्तब्धता मात्र उरली. त्या स्तब्धतेची जाणीव त्याच्या ठिकाणी व्यापून राहिली. ती जाणीव म्हणजेच जाणती कळा असली तरी ती स्फूर्तिरूपाने त्याच्या अनुभवाला येत नव्हती. (४१०३)

अनुभविता तो अनुभाव्यरूप । होऊन ठेला भिन्न नव्हे अल्प ।
सुख सुखाकारें सुखरूप । गगन गगनीं जेवीं ॥ ४ ॥
प्रत्यक्ष अनुभव घेणारा अनुभाव्य (ज्याचा अनुभव घेतो तो विषय) झाला पण थोडादेखील त्यापासून भिन्न राहिला नाही. शुद्ध सुख सुखाच्याच आकाराने सुखरूप राहिले. आकाश देखील आकाशाच्याच आकाराने राहाते तसा हा प्रकार होय. (४१०४)

वृत्ति निमग्न जाहली तिकडे । मन बुद्धि कासया उद्भवे इकडे ।
इंद्रियांची लागली कवाडें । देहही स्तब्ध केला ॥ ५ ॥
जेव्हा वृत्तीच त्या चिद्रूपामध्ये बुडून गेल्यावर मन बुद्धीचा इकडे उदय तरी होईल का? इंद्रियांची दारें बंद झाली आणि त्यामुळे त्याचा देहही स्तब्ध झाला. (४१०५)

प्राणही मंदत्वे जाहला स्थिर । वाहे परी नव्हेचि गोचर ।
ऐसा रविदत्त देखिला समोर । सद्गुरुनाथें ॥ ६ ॥
प्राणही मंद चालल्यामुळे स्थिर झाला. तो वाहत होता पण जाणवत नव्हता. रविदत्ताची ही अवस्था सद्गुरूंनी पाहिली. (४१०६)

आनंदें मग टाळी पिटिली । ह्मणती उपदेशाची सफळता जाहली ।
अनन्यासी परिपूर्ण लाधली । जे आपुली पूर्वभूमी ॥ ७ ॥
त्यांनी मग आनंदाने टाळी वाजविली. आणि 'आपला उपदेश सफळ झाला' असे ते म्हणाले. रविदत्त अनन्य झाल्यामुळे (ब्रह्मानुभवापासून वेगळा न राहिल्यामुळे) तो आपल्या मूळ स्थानाप्रत गेला असा विचार त्यांनी केला. (४१०७)

पुत्रासी राज्यपद प्राप्त होतां । अति सुखावती मातापिता ।
तैशी रविदत्तासी स्वरूपाकारता । पाहोनि आनंदती गुरु ॥ ८ ॥
पुत्राला राज्यपद मिळाल्यानंतर मातापित्यांना अतिशय आनंद होतो. त्याप्रमाणे रविदत्ताला स्वरूपाकारता प्राप्त झाली हे पाहून सद्गुरूंना आनंद झाला. (४१०८)

रविदत्त तो अखंड सुखरसीं । निमग्न असे तदाकारत्वेंसी ।
जैसा गज बुडाला अक्षोभ्य सागरासी । अति तापा भिऊनी ॥ ९ ॥
रविदत्त तर अखंड सुखरसात तदाकार होऊन बुडून गेला होता. त्याची अवस्था सूर्याच्या उष्णतेला घाबरून एखदा हत्ती जसा खोल जलाशयात बुडी घेतो त्याप्रमाणे झाली. (४१०९)

अविद्यावनी त्रिविधतापें । जीव तापला सुखदुःखविकल्पें ।
तो भेद सांडोनी एकरूपें । चिद्रूपी लीन जाहला ॥ १० ॥
अज्ञान (अविद्या) रूप जंगलात त्रिविध तापांनी (आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक) सुखदुःखरूप विकल्पांनी जीव होरपळल्यामुळे त्याने ब्रह्मात्याशी एकरूप होऊन सर्व भेदाचा त्याग केला. आणि तो चिद्रूपात लीन झाला. (४११०)

तेथोनि उसळे जरी वृत्ति । तरी तेथेंचि होय समाप्ति ।
ध्येयाकारताचि उरे ज्ञप्ति । परी ध्यातृत्व नुमसे ॥ ११ ॥
त्या लीन अवस्थेत वृत्ती जरी उसळली तरी जागच्या जागी नष्ट होत होती. त्याची जाणीव ध्येयाकार होऊन गेली. पण आपण ध्याता आहोत अशी वृत्ती मात्र उठत नव्हती. (४१११)

प्रळयोदकी वायु घोंटाळे । तैशी वृत्ति स्वरूपींच मिसळे ।
हेलावून आनंदें उफाळे । परी गळे तत्क्षणीं ॥ १२ ॥
प्रलयकाळचा वारा प्रलयकाळच्या जळातच घोटाळत राहतो तशी त्याची वृत्ती स्वरूपातच मिळून जात होती. ती आनंदाने हेलावून उफाळून येत होती पण त्याच क्षणी गळून जात होती. (४११२)

किंचित् निर्विकल्पी स्थिरावे । किंचित् सविकल्पाकार व्हावें ।
सविकल्प होतां जरी स्वभावें । अहंस्फूर्ति असेना ॥ १३ ॥
ती काही काळ निर्विकल्पामध्ये स्थिर होत होती. किंचित् सविकल्पाकार होत होती. ती सविकल्प जरी झाली तरी तिच्यात 'अहं' (मीपणाची) स्फूर्ती नव्हती. (४११३)

ऐसें मुहर्त एक जाहलिया । उत्थान पावतसे आपसया ।
बुद्धि मन ही उद्भवोनिय । सुखाकारें हेलावती ॥ १४ ॥
असे एक क्षणभर झाल्यानंतर ती वृत्ती आपोआप उठत होती. बुद्धी मन ही देखील उत्पन्न होऊन सुखाकार होऊन हेलावत होती. (४११४)

परी जे निर्विकल्पी सुखावली । ते वृत्ति सुखासहीत उफाळली ।
मन बुद्धि व्यापून दशधा दाटली । इंद्रियांपर्यंत ॥ १५ ॥
परंतु निर्विकल्पामध्ये ती वृत्ती सुखासहित उफाळली. तिने मन बुद्धी यांना व्यापून ती दाही इंद्रियापर्यंत दहा प्रकारे पसरली. (४११५)

तेणें गाने कापूं लागती । रोमांचही थरारिले वरुती ।
बाष्पें दाटून नेत्रांप्रती । अश्रुधारा चालिल्या ॥ १६ ॥
त्यामुळे त्याची इंद्रिये कापू लागली. रोमांचही शरीरावर उभे राहिले. डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले. डोळ्यातून अणूंच्या धारा वाहू लागल्या. (४११६)

मागुती वृत्ति स्वरूपी मिळे । पुन्हां हेलावूनियां उफाळे ।
तेणें अधिकाधिक उचंबळे । सुख वृत्यानंदाचें ॥ १७ ॥
त्यानंतर वृत्ती स्वरूपात मिळून गेली. पुन्हा ती हेलावून वर उठली. त्यामुळे वृत्त्यानंदाचे सुख अधिकाधिक उफाळून आले. (४११७)

बळें नेत्रही उघडित । परी स्वरूप सुखेंचि वृत्ति व्याप्त ।
दिशा विदिशाही नाढळत । चिद्रूपावांचोनी ॥ १८ ॥
त्याने बळेच डोळे उघडले. पण त्याची वृत्ती स्वरूपाच्या सुखानेच व्यापलेली होती. त्याला चिद्रूपाशिवाय दिशा, उपदिशा काहीच कळत नव्हत्या. (४११८)

अंतरीं जरी वृत्ति जातसे । तरी ध्येयाकारेंचि समरसे ।
इकडे दृश्याकार जरी होतसे । तरी चिद्गगगनरूप ॥ १९ ॥
वृत्ती अंतर्मुख झाली तरी ध्येय जे ब्रह्म त्यातच ती समरस होऊ लागली. ती दृश्याकार जरी झाली तरी आता ते दृश्य चिद्गगन झाल्यामुळे ती चिद्गगनरूप झाली. (४११९)

मागे पुढे अधोर्ध्व दिशेसी । सव्य अपसव्य देखतां सर्वांसी ।
चिद्गगनचि दाटलें एकरसीं । दुजें अमुक न स्फुरे ॥ २० ॥
मागे, पुढे, अधः, ऊर्ध्व या दिशांना डावीकडे उजवीकडे पाहताना त्याला सगळीकडे चिद्गगनच सर्वत्र व्यापून राहिल्याचे दिसले. त्यामुळे ही दुसरी वस्तू आहे' असे स्फुरणसुद्धा त्याला होईना. (४१२०)

तेणें मन बुद्धि वेडावली । इंद्रियें बापुडी भांबावलीं ।
बोलों जातां बोबडी वळली । कांही स्मरेना ॥ २१ ॥
त्यामुळे त्याची मन बुद्धी दोन्ही वेडावून गेली. बिचारी इंद्रिये बावचळून गेली. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याची बोबडी वळली, त्याला काहीदेखील आठवेना. (४१२१)

मग ऐसा रविदत्त भांबावला । देखोनि शंकरें आलिंगिला ।
पाठी थापटूनि म्हणती भला । सावधान होई ॥ २२ ॥
रविदत्ताची अशी भांबावलेली अवस्था पाहून श्री शंकराचार्यांनी त्याला आलिंगन दिले. त्याची पाठ थोपटून ते त्याला म्हणाले. "तू धन्य आहेस. ऊठ, सावध हो." (४१२२)

मस्तक हुंगूनि मुखासी । कुरवाळूनी पुशिती नेत्रांसी ।
ह्मणती सांडी सांडी वृत्त्यानंदासी । हें निर्विकल्प नव्हे ॥ २३ ॥
त्यांनी त्याचे मस्तक हंगले, त्याचे तोंड कुरवाळले, त्यांनी त्याचे डोळे पुसले ते त्याला म्हणाले, "अरे, हा वृत्त्यानंद आहे. त्याचा त्याग कर. तुझा हा अनुभव निर्विकल्पाचा नाही."(४१२३)

परी रविदत्ता कांही स्मरेना । आनंदें फुजे अश्रु नयना ।
थरथरां कांपे कांही वचना । न फुटे शब्द ॥ २४ ॥
पण रविदत्ताला काही स्मरेना. तो आनंदाने भरून आला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्याचे अंग थरथर कापत होते. तो बोलण्यासाठी प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडून शब्दही फुटेना.(४१२४)

मग वाढ वेळां सावरोनी । वृत्त्यानंदातें त्यागूनी ।
उठोनि नमिता जाहला चरणीं । साष्टांग भावें ॥ २५ ॥
मग काही वेळाने तो सावरला. त्याने त्या वृत्त्यानंदाचा त्याग केला. मग तो उठला आणि आचार्यांच्या पायांवर त्याने साष्टांग नमस्कार घातला. (४१२५)

प्रदक्षणा करून पुन्हां नमी । सन्मुख बैसोनि बोले अनुक्रमीं ।
बोलता बोलतां वृत्ति सुखधामीं । मिळोनि मागुती उठे ॥ २६ ॥
त्याने आचार्यांच्या भोवती प्रदक्षिणा घातली, आणि पुन्हा एकदा नमस्कार घातला. मग तो त्यांच्या पुढ्यात बसून बोलू लागला. तो बोलत असतानाच त्याची वृत्ती उठून सुखाचे धाम जो ब्रह्मात्मा त्यात मिसळून गेली. आणि परत उत्पन्न झाली. (४१२६)

तैसेंचि बलात्कारेंकडोनी । विनविताहे हस्त जोडोनी ।
परी अश्रुधारा चालेल्या नयनीं । कंठ दाटूनी येतसे ॥ २७ ॥
मग बळेच जोर करून त्याने दोन्ही हात जोडून त्यांना विनंती केली. पण त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याचा गळा दाटून आला. (४१२७)

ह्मणे जयजय सद्गुरुनाथा । कृपाघना स्वामी समर्था ।
मज रंक दुर्बळासी अनाथा । साम्राज्यपद दीधलें । ॥ २८ ॥
तो म्हणाला, “सद्गुरुनाथा, तुमचा जयजयकार असो, हे कृपाघना, स्वामी समर्था, आपण माझ्यासारख्या गरीब, दुर्बळ अनाथावर दया करून मला साम्राज्यपद दिले आहे. (४१२८)

अनंत कल्प या देहबुद्धीची । दरिद्रविपत्ती सुखदुःखाची ।
भोगिलीच भोगितां विश्रांतिची । सहसा वार्ता नसे ॥ २९ ॥
अनंत कल्पेपर्यंत या देहबुद्धीचे सुखदुःखरूप दारिद्र्य आणि संकटे भोगत राहिलो. ती भोगताना विश्रांतीची गोष्टही काढता आली नाही. (४१२९)

ऐशिया अनाथा राज्यपदवी । स्वसुखसंपत्ती नित्य नवी ।
हे एक सद्गुरुनाथेंचि द्यावी । येर बापुडे देवादि ॥ ३० ॥
अशा या अनाथाला आपण राज्यपदवी दिलीत. आणि आत्मसुखाची नित्य नवी संपत्ती दिलीत. हे एक सद्गुरूनाथच जाणोत. त्यांच्यापुढे इतर देव बापडे ठरतात. (४१३०)

धन्य धन्य आजि आमुचें । भाग्य उदेले वर्णिलें नवचे ।
एकाएकी सरिसें कृपेचें । मेलन जाहलें स्वरूपीं ॥ ३१ ॥
आज मी धन्य झालो आहे. माझे भाग्य उदयाला आले आहे. त्या भाग्याचे मी वर्णन करू शकत नाही. सदरूंनी कृपा केल्याबरोबर लागलीच माझी स्वरूपाशी मिळणी झाली. (४१३१)

आपआपणा होतों चुकलों । सन्निधचि बहु दिन की मुकलों ।
तो दयाळा सहजी भेटविलों । एकाएकी कृपेसरिसा ॥ ३२ ॥
इतके दिवस मी स्वतःलाच विसरलो होतो. माझे स्वरूप अगदी जवळच असूनही मी त्यास बरेच दिवस पारखा झालो होतो. दयाळू गुरूनाथा, तुम्ही कृपा करताक्षणीच माझी त्या स्वरूपाशी भेट घडवून आणली आहे. (४१३२)

आतां काय व्हावें उतराई । स्तवन करावें तरी काई ।
माथाचि समर्पावा पाईं । की पादुका देहाच्या ॥ ३३ ॥
आता या एवढ्या मोठ्या उपकाराचा मी कसा उतराई होऊ? तुमचे स्तवन तरी कसे करू? माझा माथाच आपल्या चरणांवर ठेवू की देहाच्या पादुका करू? (४१३३)

वृत्तीपासून मजला पुढे । लोटून दिधलें निर्विकल्पी कोडें ।
शून्याचेही फेडून सांकडें । जोडे चिद्रूप चिद्रूपा ॥ ३४ ॥
वृत्तीपासून मला दूर सारून मोठ्या कौतुकाने आपण निर्विकल्पामध्ये लोटून दिलेत. तेथे शून्याचे मोठे संकट निर्माण झाले होते, ते दूर करून आपण माझ्या चिद्रूपाची चिद्रूपाशी भेट घडवून आणलीत. (४१३४)

तया निर्विकल्पा तरी मजसी । वृत्ति जाणेना किमपि आभासी ।
शून्य तों बापुडें नाहींच त्यासी । काय कळे अभाव ॥ ३५ ॥
असा मी निर्विकल्प झालो परंतु मिथ्यारूप (आभास) वृत्तीला माझे ज्ञान होत नव्हते. शून्य तर बिचारे अस्तित्वातच नाही, त्याला मी कसा कळणार? (४१३५)

म्यांही मजसी नाहीं जाणिलें । कारण की दृश्य नव्हे निजरूप आपुलें ।
परी लयासी तों म्यां वोळखिलें । आपुले सर्वज्ञपणे ॥ ३६ ॥
मी देखील मला जाणले नाही. कारण की आपले स्वरूपच मुळी दृश्य नसते. पण वृत्तीच्या लयास मात्र मी ओळखले. कारण की मी (ब्रह्मात्मा) सर्वज्ञ आहे. (४१३६)

लयसाक्षीचा आठव होता । वृत्ति निर्विकल्पी बुडाली तत्त्वतां ।
तेथोनि उसळतांचि मागुता । आरोळी नेटें दीधली ॥ ३७ ॥
लय साक्षीची आठवण होताच रविदत्ताची वृत्ती निर्विकल्पामध्ये बुडून गेली. तेथून उठल्याबरोबर त्याने नेटाने आरोळी दिली. (४१३७)

देह उसळून रविदत्ताचा । उडोनि पडला चरणी साचा ।
थरथरां कापे नेत्री अणूंचा । पूरही चालिला ॥ ३८ ॥
त्यासरशी रविदत्ताचा देह उसळून तो गुरुदेवांच्या पायांवर पडला. तो थरथरा कापत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूचा पूरही चालला होता. (४१३८)

तया नेत्रोदकें श्रीचरणांसी । अभिषेक केला आदरेंसी ।
जयजयकारें गर्जना वाचेसी । हाचि रुद्राध्याय ॥ ३९ ॥
डोळ्यातील अणूंनी श्रीगुरूंच्या चरणांवर आदराने अभिषेक सुरू केला. वाचेने तो श्रीगुरूंचा जयजयकार करत होता. हे त्याचे रूद्राध्याय पठन होते. (४१३९)

ऐशिया सच्छिष्यासी पानी । सद्गुरुनाथे कळवळोनी ।
गाढ आलिंगिला हृदयस्थानीं । कुर्वाळून बोलती ॥ ४० ॥
अशा सच्छिष्याला पाहून सगुरूंनी कळवळा येऊन त्याला आपल्या हृदयाशी धरले. त्याला गाढ आलिंगन दिले. ते त्याला कुर्वाळून म्हणाले. (४१४०)

ह्मणती सखया अवस्था सांवरी । नांगीकाराव्या वृत्त्यानंदलहरी ।
आपुल्या स्वानुभवें परत्या सारी । स्वकीय सुखें असावें ॥ ४१ ॥
ते म्हणाले, “बाळा, तुझी ही अवस्था सावर. या वृत्त्यानंदाच्या लहरी आहेत. त्यांचा स्वीकार करू नकोस. आपल्या स्वानुभवाने त्या दूर सार आणि स्वतःच्या सुखाने रहा. (४१४१)

या वृत्तीसीही करी निवांत । बोलें निर्विकल्पत्वाची मात ।
लयसाक्षी कैसा केवीं अनुभूत । हें सर्व श्रुत करीं मज ॥ ४२ ॥
ही वृत्तीसुद्धा आता शांत कर. आणि निर्विकल्पाचा जो अनुभव तू घेतलास तो सांग. लयसाक्षी कसा झालास? तू त्याचा अनुभव कसा घेतलास, हे सर्व तू मला सांग. (४१४२)

मग रविदत्ते श्रीगुरुचें । पादपद्म वंदोनि साचें ।
हेलावे त्यागोनि वृत्तीचे । बोलता जाहला ॥ ४३ ॥
मग रविदत्ताने श्रीगुरूंच्या चरणकमलांना वंदन करून आणि वृत्तीच्या हेलाव्यांचा त्याग करून बोलण्यास सुरुवात केली. (४१४३)

वृत्तिलय शून्याचा घात । मज ज्ञानघना स्पष्ट अनुभूत ।
जरी मज मी न कळे अनंत । परी लय तो स्पष्ट कळे ॥ ४४ ॥
मी प्रत्यक्ष ज्ञानघन असा ब्रह्मात्माच असल्यामळे वृत्तीचा लय आणि शन्याचा अभाव यांचा मला चांगला अनुभव आहे. जरी मला मी अनंत आहे, हे कळत नसले तरी वृत्तीचा लय मात्र स्पष्ट कळतो. (४१४४)

वृत्तीचा लय तो उपकरणेंविण । स्पष्ट जाणतसें मी ज्ञानघन ।
तोचि मी निर्विकल्प उघडा आपण । लोपलों ना प्रगटलों ॥ ४५ ॥
मी ज्ञानघन असल्यामुळे मला वृत्तीचा लय कोणत्याही उपकरणावाचून कळतो. मी स्पष्टपणे निर्विकल्प असून सर्वथा प्रकट आहे. मी लोपलोही नाही आणि प्रगटलोही नाही. (४१४५)

डोळा जैसा अंधार देखणा । न पाहतांही नयन नयना ।
असेचि असे संशयाविना । हे उघड प्रतीति ॥ ४६ ॥
डोळा ज्याप्रमाणे स्वतःला पाहू शकत नाही पण तो अंधाराला पाहू शकतो. पण तो असतोच, यात काही संशय नाही. हा प्रकट अनुभव आहे. (४१४६)

तैसा मी अनंत लयसाक्षीचा । देखणा उपकरणेंविण साचा ।
हाचि की मी उघड प्रतीतीचा । लोप असे कोठे ॥ ४७ ॥
त्याप्रमाणे मी अनंत असून कोणत्याही उपकरणावाचून लयाचा साक्षीदार आहे, हीच माझी स्पष्ट प्रतीती आहे. मी नित्य प्रगट असून माझा लोप कसा होईल? (४१४७)

हा उघड माझा स्वानुभव । त्रिपुटीविरहित स्वयमेव ।
लय किंवा उद्धवती सर्व । तें मी जाणे स्वप्रकाशें ॥ ४८ ॥
मी उघडा असून माझा स्वानुभव त्रिपुटीविरहित आणि स्वतंत्र आहे. मी स्वतःच्या प्रकाशाने उत्पत्ती आणि लय जाणतो. (४१४८)

हेंचि निर्विकल्प ज्ञान चिद्रप । तिहींकाली नव्हे अधिक अल्प ।
तेंचि त्रिकालाबाधित सद्रूप । आहेचि आहे सर्वदां ॥ ४९ ॥
हे निर्विकल्प, चिद्रूप असे ज्ञान वर्तमान, भूत आणि भविष्य या तीन्ही काळात वाढतही नाही अथवा घटतही नाही. हे ज्ञान म्हणजेच त्रिकालाबाधित असे सद्रूप आहे. ते आहेच आणि सर्व काळ असणारही आहे. (४१४९)

वृत्ति बापुडी जेथें आटली । तिजसवें सुखदुःखें मेलीं ।
केवळ निजानंदता संचली । ग्राह्यग्राहकाविण ॥ ५० ॥
बिचारी वृत्ती जेव्हा लय पावली, तेव्हाच तिच्याबरोबर सुखदुःखेही मेली. ग्राह्य आणि ग्राहक या स्वरूपाच्या संबंधांनी विरहित अशी केवळ निजानंदता सर्वत्र भरून राहिली आहे. (४१५०)

ऐसा मी सच्चिदानंदघन । अनंत अपार परिपूर्ण ।
न कळोनिही प्रतीतीसी गहन । अपरोक्षं आलें ॥ ५१ ॥
असा मी अनंत, अपार, परिपूर्ण आणि घनवटलेला सच्चिदानंद (ब्रह्मात्मा) असून अत्यंत गहन अशा त्या तत्त्वाचा कळण्यावाचून (त्रिपुटीरहित) साक्षात् अनुभव घेतला आहे. (४१५१)

लय आणि वृत्तीपासून । जे जे जाहले भ्रमेंकडून ।
ते ते टळटळीत दिसती संपूर्ण । मज ज्ञानघनासी ॥ ५२ ॥
ज्ञानघन असलेल्या मला लय आणि वृत्तीपासून जे जे भ्रमाने निर्माण झाले ते ते अगदी स्पष्टपणे (टळटळीत) सर्व दिसत आहेत. (४१५२)

जे जे दिसती मज प्रत्यक्ष । ते ते मजहून परोक्ष ।
याचे लयासहित जाणता अपरोक्ष । आत्मा ब्रह्म मी स्वयें ॥ ५३ ॥
मला जे जे प्रत्यक्ष दिसतात ते ते सर्व मला परोक्ष म्ह. दूरचे आहेत. त्या सर्वांचा लय मला अपरोक्षत्वाने कळतो. मी स्वतः ब्रह्मात्मा आहे. (४१५३)

ऐशी प्रतीति माझी मज । यथार्थ बाणली अहो महाराज ।
परी एक असे संशयासी बीज । तें विनवू चरणीं ॥ ५४ ॥
अहो महाराज, अशी अनुभूती माझी मला येत आहे. पण संशयाचे एक बीज माझ्या मनात निर्माण झाले आहे, ते आपल्या पायाशी विनंतीपूर्वक सांगतो. (४१५४)

निर्विकल्पी स्थिरत्व पावतां । निमिष्य एक होतसे तत्त्वतां ।
तत्क्षणींच उफाळे वरुता । वृत्त्यानंद विकल्प ॥ ५५ ॥
निर्विकल्पामध्ये स्थिरत्व पावल्यानंतर एक निमिष झाल्यानंतर तत्क्षणीच वृत्त्यानंदाचा विकल्प वर उफाळून येतो. (४१५५)

मागुती निर्विकल्प जरी व्हावें । तरी तेव्हांचि विकल्पें उसळावें ।
परी निवांत एकतान समरसावें । ऐसें घडेना ॥ ५६ ॥
त्यानंतर परत निर्विकल्प होण्याचा प्रयत्न करायला जावे तर नेमके त्याच वेळेला विकल्प उसळून वर येतात. त्यामुळे निवांतपणे, एकतान होऊन समरसून निर्विकल्प झालो आहे, असे कधी घडत नाही. (४१५६)

वृत्ति आनंद उसळतां क्षणीं । सर्व विकारा पावती उठोनि ।
मज वाटे हा रसास्वाद अझोनी । विघ्न करी समाधीसी ॥ ५७ ॥
वृत्त्यानंद उसळल्याबरोबर मन, बुद्धी इ. सर्व विकार उसळून वर येतात. मला असे वाटते की, अजून हा रसास्वाद समाधीस विघ्न करीत आहे. (४१५७)

तरी हे विघ्न वृत्त्यानंदात्मक । निरसून अवघे हे सविकल्पक ।
निवांत उर्वरित उरावें एक । निर्विकल्पत्वें ॥ ५८ ॥
तरी वृत्त्यानंदाचे हे सर्व सविकल्पक विघ्न निरसून जावे आणि उर्वरित एका निर्विकल्पकत्वाने निवांत राहावे. (४१५८)

ऐशी कृपा मजवरी करावी । की सविकल्पाची वार्ता नुरावी ।
अखंडैकरसी स्थिरता व्हावी । निर्विकल्परूप ॥ ५९ ॥
माझ्यावर गुरूमहाराजांनी एवढी कृपा करावी की, सविकल्पाची वार्तासुद्धा राहू नये, आणि निर्विकल्प होऊन अखंड एका रसात स्थिरता व्हावी (४१५९)

ऐसें विनवून चरण धरिले । इतुकें ऐकूनि सद्गुरु हांसिले ।
म्हणती तुझें ज्ञान कळलें । जें बाणलें तुजप्रती ॥ ६० ॥
अशी विनंती करून त्याने सद्गुरूंचे पाय धरले. हे सर्व ऐकून सद्गुरू हसले आणि म्हणाले की, तुझ्या अंतःकरणात जे ज्ञान ठसले आहे. त्याचे स्वरूप कळले. (४१६०)

तुजला तुझी यथार्थ प्रतीति । जाहली असे बोलिल्या रीतीं ।
जैसा वृक्षस्थ बैसला सहजगती । तो कळला ज्याचा त्या ॥ ६१ ॥
तुला तुझी सांगितल्याप्रमाणे यथार्थ प्रतीती आलेली आहे. आपण झाडावर सुखरूपपणे बसलेले आहोत, हे ज्याचे त्याला कळलेले आहे. (४१६१)

अविज्ञात तेंचि विज्ञात । ऐसा जो श्रुतीचा संकेत ।
आणि ज्ञात्याचा जो त्रिपुटीरहित । अनुभव अनुभवाविण ॥ ६२ ॥
जे माहीत नव्हते ते माहीत झाले, असा श्रुतीचा जो भावार्थ आहे आणि ज्ञात्याचा जो त्रिपुटीरहित आणि अनुभवयुक्त अनुभव आहे. (४१६२)

ऐसा उभय प्रमाणयुक्त । तुज प्रत्यय बाणला निश्चित ।
लय जाणता तो अपरिमित । जाणिला न जाणोनी ॥ ६३ ॥
असा दोन्ही प्रमाणांनी युक्त असा तुला प्रत्यय आला आहे. हे निश्चित आहे. लय जो जाणतो तो अपरिमित असा परमात्मा जाणण्यावाचून तुला कळला आहे. (४१६३)

परी म्हणसी निर्विकल्प । चिरकाळ असावें एकरूप ।
निःशेष हारावें हें सविकल्प । उद्भवूच नये ॥ ६४ ॥
पण निर्विकल्पाचा अनुभव हा एकरूपपणे चिरकाळ असावा, या सविकल्पाचा संपूर्णपणे बिमोड व्हावा, ते पुन्हा कधी उद्भवूच नये, असे जे तू म्हणतो आहेस, (४१६४)

जैसा वृक्षस्थ हा मी जो बैसलों भला । तया न दिसावा किमपि पडिला ।
तैसाचि तूं जाणोनि निर्विकल्पाला । विकल्प न व्हावा म्हणसी ॥ ६५ ॥
मी झाडावर बसलेलो आहे. त्या मला पाण्यात पडलेला तो दुसरा दिसूच नये, असे वृक्षस्थाला वाटते. त्याप्रमाणे तुला निर्विकल्प जाणून घेतल्यानंतर विकल्प होऊच नयेत असे वाटते आहे. (४१६५)

ऐशिया संशयात्मका तुज । प्रश्न करणे असे सहज ।
ते ते सांगे बापा मज । विकल्प करून पुसों ॥ ६६ ॥
असा संशय तुझ्या मनात राहिल्यामुळे तू वरील प्रश्न विचारला आहेस, ते ठीक आहे, पण मी आता विकल्पासंबंधी जे जे विचारीन त्याची तू आता उत्तरे दे. (४१६६)

अरे तुज निर्विकल्परूपासी । विकल्प दिसला जो निजदृष्टीसी ।
त्या विकल्पं सविकल्पता तुजसी । आली की काय ॥ ६७ ॥
अरे, निर्विकल्परूप असताना तुला तुझ्या दृष्टीला जो विकल्प दिसला, तेवढ्या त्या विकल्पाने तुला सविकल्पता आली काय? (४१६७)

किंवा सविकल्पें त्या निर्विकल्पा । वोढोनि आणिलें आपणपां ।
अथवा उद्भवतां निमतां खेपा । निर्विकल्पा होती ॥ ६८ ॥
किंवा त्या सविकल्पाने तुझ्या त्या निर्विकल्पाला स्वतः ओढून आणले काय? अथवा उत्पन्न व्हावे आणि मावळून जावे अशा खेपा त्या निर्विकल्पाला होतात काय? (४१६८)

ऐशिया तिहीं प्रकारें । तुज गमलें तें सांग खरें ।
निर्विकल्प जाहलें सविकल्पाकारें । तरी वाणीची हानि ॥ ६९ ॥
या तीन प्रकारांनी तुझ्या बाबतीत काय घडले ते खरे खरे सांग. निर्विकल्पाने सविकल्पाचा आकार घेतला, असे म्हणशील, तर त्या योगाने भाषेची हानी झाली (भाषा निरर्थक झाली) असे म्हणावे लागते. (४१६९)

मुखीं म्हणसी जें निर्विकल्प । तें जाहलें ह्मणतांचि सविकल्प ।
मग निर्विकल्प म्हणणें जें जल्प । व्यर्थचि जाहलें ॥ ७० ॥
तोंडाने ज्याला निर्विकल्प म्हणतोस ते सविकल्प झाले असेही म्हणतोस तर मग त्याला निर्विकल्प असे जे म्हणतोस ते शब्द व्यर्थच झाले नाही का? (४१७०)

सविकल्पत्व आले जयासी । तरी तया निर्विकल्पता कैशी ।
ऐशियाची प्रतीति जरी तुजसी । तरी सार्थक काय ॥ ७१ ॥
ज्याला सविकल्पता आली त्याच्या ठिकाणी निर्विकल्पता कशी असेल? अशाच गोष्टीची तुला प्रतीती आली असेल तर त्यात सार्थकता कसली? (४९७१)

तस्मात् यथार्थ ज्ञान निर्विकल्पाचें । जाहलें नाही वाटे साचें ।
जाहलें तें रूप सविकल्पाचें । जें विकारा पावे ॥ ७२ ॥
त्यामुळे तुला निर्विकल्पाचे यथार्थ ज्ञान झाले नाही असे वाटते. ज्याचे ज्ञान तुला झाले. ते सविकल्पाचेच एक रूप होते. त्यामुळे त्याच्यात विकार उत्पन्न झाले. निर्विकल्पात विकार होत नाहीत. (४१७२)

आतां दुसरा तुझा विकल्प । कीं उठतांचि हा सविकल्प ।
घेऊन येतसे आ–आप । तया निर्विकल्पा । ॥ ७३ ॥
आता तुझ्या मनातला दुसरा विकल्प असा की, हा सविकल्प उत्पन्न होताच त्या निर्विकल्पाला आपल्या सोबत घेऊन येतो. (४ १७३)

तरी काय आकाशीं उठोनी । वायु आपुलीये बळेंकडोनी ।
गगनासी नेतसे उडवोनी । की निश्चळ तें चंचळ केलें ॥ ७४ ॥
यावर उत्तर असे की, वायू आकाशात उत्पन्न होतो. तो वायू आपल्या सामर्थ्याने आकाशाला उडवून नेतो किंवा जे निश्चळ होते ते चंचळ केले असे म्हणण्यासारखे वरील विधान आहे. (४१७४)

तैसें निर्विकल्प जें निश्चळ । तेथें उद्भवून सविकल्प चंचळ ।
प्रवाहीं वोढी तया बरळ । तरी तें निश्चळ कैसें ॥ ७५ ॥
त्याप्रमाणे निर्विकल्प निश्चळ असते त्यात चंचळ सविकल्प उद्भवले. आणि त्याने त्या निश्चळ निर्विकल्पाला प्रवाहात ओढून नेले, मग त्याला निश्चळ कसे म्हणता येईल? (४१७५)

सविकल्पं निर्विकल्पासी । विकल्परूपता केली आपणाऐशी ।
तरी विकल्पताचि होणें जयासी । तस्मात् निर्विकल्प कैंचें ॥ ७६ ॥
सविकल्पाने निर्विकल्पाला आपल्यासारखी विकल्परूपता दिली असेल तर ज्याला विकल्परूपता येते त्याला निर्विकल्प कसे म्हणता येईल? (४१७६)

आतां तिसरिया विकल्पा । कीं सविकल्पास्तव निर्विकल्पा ।
उद्भव निमणे रूप खेपा । असती तरी ऐकें ॥ ७७ ॥
आता तिसरा विकल्प असा होता की सविकल्पामुळे निर्विकल्पाच्या उत्पत्ती आणि लोप अशा खेपा होतात. असे असेल तर ऐक. (४१७७)

तरंग उद्भवतां पाणी जन्मलें । कीं तरंग राहतां पाणी राहिलें ।
अथवा तरंग निमतां पाणी मेलें । हे सांगें बापा ॥ ७८ ॥
लाटा निर्माण झाल्या म्हणून पाण्याचा जन्म झाला. किंवा लाटा थांबल्याबरोबर पाणी थांबले, किंवा तरंग निमाल्याबरोबर पाणी मेले, यापैकी काय झाले, हे सांग (४१७८)

मेघ उद्भवतां गगन जन्मे । कीं मेघ तोंवरी राहणे संभ्रमें ।
अथवा मेघ वितुळतां गगन निमे । हे पाहें विचारें ॥ ७९ ॥
मेघ उत्पन्न झाले म्हणून आकाश जन्माला आले, की मेघ असेतोपर्यंतच ते राहते का मेघ वितळ्याबरोबर आकाश नष्ट होते यापैकी नेमके काय होते, हे विचार करून सांग. (४१७९)

तैसेंचि सविकल्प उद्भवोनी । निर्विकल्पा जन्ममरण दोनी ।
होती जरी पूर्वीपासूनी । तरी मुक्ति केवीं साधका ॥ ८० ॥
त्याप्रमाणे विकल्प निर्माण झाल्यामुळे निर्विकल्पाला जन्म मरण या दोन्ही गोष्टी प्राप्त होतात. अशी जर स्थिती पूर्वीपासूनच असेल तर साधकाला मोक्ष कसा मिळणार? (४१८०)

ऐसे तिहीं प्रकारें विकल्पासी । दोष असती बहु तयासी ।
तस्मात् स्थिर होणे जे कल्पना ऐशी । सहसा न करावी ॥ ८१ ॥
असे तीन प्रकारचे पर्याय असले तरी त्या तिहींमध्ये पुष्कळ दोष आहेत. तेव्हा निर्विकल्प स्थिर व्हावे अशी कल्पना करू नकोस. (४१८१)

आणीकही पुसू तुज एक । स्थिरत्व होणे वाटे आवश्यक ।
तें सविकल्पे व्हावें निश्चयात्मक । किंवा निर्विकल्पें ॥ ८२ ॥
तुला आणखीही एक विचारतो. स्थिरत्व होणे हे आवश्यकच असेल तर ते कोणाच्या बाबतीत व्हावे? ते निश्चितपणे सविकल्पाच्या ठिकाणी असावे की निर्विकल्पाच्या ठिकाणी? (४१८२)

निर्विकल्पं निर्विकल्प व्हावें । ऐसें जरी म्हणसी स्वभावें ।
तरी आजि काय निर्विकल्पत्व नवें । साधिसी निर्विकल्पा ॥ ८३ ॥
निर्विकल्पाने निर्विकल्प व्हावे असे जर म्हणत असशील तर आजच निर्विकल्पाला कोणते नवे निर्विकल्पत्व देशील? (४१८३)

पहिलेंचि निर्विकल्प असतां । आजि निर्विकल्प करिसी केउता ।
विचारें आदि मध्य अवसानी तत्त्वतां । निर्विकल्प तें निर्विकल्प ॥ ८४ ॥
ते अगोदरपासूनच निर्विकल्प असताना तू आज त्याला आणखी निर्विकल्प कसे करशील? विचार करून असे पहा की, निर्विकल्प हे आरंभी, मध्ये आणि शेवटीसुद्धा निर्विकल्पच असणार आहे. (४१८४)

तथापि निवांतचि करू म्हणसी । तरी निर्विकल्प कळलें नाहीं तुजसी ।
न कळतां वायुरोध जरी करिसी । शतवर्षे तरी अनुपयोग ॥ ८५ ॥
तरीसुद्धा निर्विकल्पच करू म्हणत असशील तर तुला निर्विकल्प कळलेच नाही. ते न कळता शंभर वर्षेपर्यंत जरी तू प्राणनिरोध करत बसलास तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. (४१८५)

आतां सविकल्पातें निवांत करावें । ऐसेंचि मानिसील स्वभावें ।
तरी सविकल्प तें निर्विकल्प नव्हे । उपाधि तोंवरी ॥ ८६ ॥
आता सविकल्पालाच निर्विकल्प करावे असेच जर तू मानत असशील तर सविकल्प हे उपाधी असेतोपर्यंत कधीही निर्विकल्प होणार नाही. (४१८६)

उखर बूमि मध्याह्नकाळ । तोंवरी दिसेलचि मृगजळ ।
कोणी सत्य मानोत या बरळ । की कोणी खोटें ॥ ८७ ॥
खाचखळग्यांची जमीन (उखर), मध्यान्हाची वेळ असेल तोपर्यंत मृगजळ दिसणारच. मग हे कुणाला सत्य वाटो, वेडेपणाचे वाटो अथवा खोटे वाटो. वरील परिस्थिती मृगजळ दिसणारच. (४१८७)

तैसे देहप्राणादि उपाधित जोवरी । सविकल्पता उठेलचि तोंवरी ।
मग तें सत्य मानो कोणी अंतरीं । कोणी निर्धारो असत्प ॥ ८८ ॥
त्याप्रमाणे देह, प्राण इ. उपाधी जोपर्यंत असतील तोपर्यंत सविकल्पता उठणारच. मग ते कुणाला सत्य वाटो अथवा कोणी त्याला असत्य ठरवो. (४१८८)

परी ते उद्भवतां न राहती । ज्ञात्याज्ञात्याची समानगति ।
परी जे मिथ्या पाहती ते मुक्त होती । सत्य मानिती ते बद्ध ॥ ८९ ॥
पण ती सविकल्पता उठत राहणारच आणि विशेष म्हणजे ज्ञाता असो वा अज्ञाता, दोघांच्याही बाबतीत हेच सत्य आहे. पण जे त्या सविकल्पाकडे मिथ्या म्हणून पाहतील ते मुक्त होतील आणि सत्य मानतील ते बद्ध होतील. (४१८९)

तस्मात् आपुलें निर्विकल्पत्व खरें । विचारें जाणावें साचोकारें ।
मग हे सविकल्प उठे की मरे । तया चाड नाहीं ॥ ९० ॥
तेव्हा आपले निर्विकल्पत्व तेवढे खरे समजावे. विचाराने तेच खरे आहे. मग सविकल्प उठो किंवा मरो, त्याची चाड धरू नये. (४१९०)

मात्र सत्यत्व न यावें तयासी । मग उद्भवेना निमेना आपैसी ।
हें निमावेंचि जरी मानिसी । तेव्हां तें सत्य जाहलें ॥ ९१ ॥
मात्र त्या सविकल्पाला सत्यत्व देऊ नये. मग ते खुशाल उत्पन्न होवो अथवा आपोआप लयाला जावो. पण ते निमावेच (नष्टच व्हावे) असे मानशील तेव्हा ते सत्यच क. (सत्य असल्यासारखे होईल) आणि ती उपाधी ठरेल. (४१९१)

सत्यत्व देऊनि जरी रोधिसी । तरी बद्धता न चुके कल्पांतेंसी ।
मिथ्या समजून जरी अव्हेरिसी । तरी ते असतांचि मुक्त ॥ ९२ ॥
त्याला सत्य ठरवून त्याचा निरोध करू पाहशील तर मग तुझी बद्धता कल्पान्तापर्यंत देखील चुकणार नाही. मिथ्या समजून त्याचा अव्हेर करशील तर ते असतानाही तू मुक्तच असशील. (४१९२)

तस्मात् आपुलें निर्विकल्पत्व समजावें । यथार्थ ज्या रीतीं बोलिलें स्वभावें ।
मग हे सविकल्प असो नसो नुरावें । यासी काज काई ॥ ९३ ॥
म्हणून तुला स्वतःचे निर्विकल्पत्व समजले पाहिजे. सांगितलेल्या रीतीने ते समजून घे. मग हे सविकल्प असो नसो, ते उरणारच नाही. कारण आता त्याची गरजच नाही. (४१९३)

तूं ह्मणसी हा रसास्वादु उठे । समाधीसी विघ्न करी नेटें ।
तरी ऐकावें वचन गोमटें । यथार्थ सांगों ॥ ९४ ॥
तो म्हणतोस की हा रसास्वाद उठतो आणि समाधीमध्ये विघ्न निर्माण करतो. तर आता मी तुला योग्य ती गोष्ट सांगतो. ती ऐक. (४१९४)

जोंवरी निर्विकल्पाची प्रतीति । बाणली नाहीं यथार्थ निश्चिती ।
तोंवरी बाधक सहजगती । की ज्ञान होऊ नेदी ॥ ९५ ॥
जोपर्यंत निर्विकल्पाची प्रतीती यथार्थपणे बाणली नाही, तोपर्यंत हा रसास्वाद बाधक आहे. तो खरे ज्ञान होऊच देत नाही. (४१९५)

वृत्ति उसळतां प्रवाही पडे । तेणें किमात्मक निर्विकल्पक न जोडे ।
म्हणोनि हे सर्व सारोनि एकीकडे । निर्विकल्प साधावें ॥ ९६ ॥
वृत्ती उसळताच जीव वृत्तीच्या प्रवाहात पडतो. त्यामुळे निर्विकल्प कसे आहे ते कळत नाही. म्हणून सर्व सविकल्प एकीकडे सारून निर्विकल्प प्राप्त करून घ्यावे. (४१९६)

तें निर्विकल्प यथार्थ एक वेळे । कळती जरी लयसाक्षीचे डोळे ।
पुढे हे उद्भवें की मावळे । परी विघ्नकर नव्हे ॥ ९७ ॥
निर्विकल्प म्हणजे लयसाक्षीचे जणू डोळेच होत. ते डोळे जर एकदा यथार्थ कळले तर मग हे सविकल्प उद्भवले की मावळले, त्यांनी काही विघ्न होणार नाही. (४१९७)

स्फूर्तीपासोन देहापर्यंत । मिथ्यात्वें पहावें सदोदित ।
हे आपणा निर्विकल्पा अबाधित । उठतां की निमतां ॥ ९८ ॥
स्फूर्तीपासून देहापर्यंत सगळ्यांकडे नेहमी मिथ्यात्वाने पहावे. ही तत्त्वे उठली काय किंवा लोपली काय आपल्याला आणि निर्विकल्पाला त्याची काही बाधा नाही. (४१९८)

यासी मीपणे जरी घेसी । तरीच बाधक होईल तुजसी ।
तस्मात् निर्विकल्प तें आपण ऐशी । दृढता करी ॥ ९९ ॥
या तत्त्वांना मीपणाने जर घेतलेस तरच ती तुला बाधक होतील. तेव्हा त्यांच्याबद्दल मीपणा बाळगू नकोस. आणि आपणच निर्विकल्प आहोत अशी भावना दृढ कर. (४१९९)

तुझी तुज निर्विकल्पाची । प्रतीति बाणली हे कळली साची ।
परी किंचित न कळून या विकल्पाची । अहंता घेतली ॥ ४२०० ॥
तुझी तुला निर्विकल्पाची प्रतीती बाणली ही सत्यत्वाने कळली, हे चांगले झाले. पण काही गोष्टी न कळल्यामुळे या विकल्पांची अहंता तू घेतलीस. (४२००)

लयसाक्षीची प्रतीति होता । वृत्तीसी कळलें हे मी तत्त्वतां ।
तेणें सुखें उसळली वरुता । हाचि वासनानंद ॥ १ ॥
लयसाक्षीची ओळख पटली. त्यावेळी वृत्तीला वाटले की 'हे मीच आहे' त्या सुखाने ती वर उसळली. हाच वासनानंद होय. (४२०१)

बहुतां दिवसां वृत्तीचे वृत्तीला । अधिष्ठान कळलें सांडोनि मिथ्याला ।
तेणें सुखें दाटूनि उसळला । वासनानंद ॥ २ ॥
अनेक दिवसांनंतर वृत्तीला स्वतःलाच मिथ्याचा त्याग घडून स्वतःचे अधिष्ठान कळले. त्या सुखाने दाटून जोवरती उसळला तोच हा वासनानंद होय. (४२०२)

हा स्वभावचि तरी वृत्तीचा । जरी घेईल आल्हाद सुखाचा ।
तरीच तिचा संशय बद्धतेचा । फिटोनि मुक्तता वरी ॥ ३ ॥
हा तर वृत्तीचा स्वभावच आहे की जर तिने सुखाचा आल्हाद घेतला तरच तिचा बद्धतेचा संशय फिटतो आणि त्यामुळे तिला मोक्षप्राप्ती होते. (४२०३)

तूं ब्रह्मानंदरूप जैसा । आहेसि त्या रीतींच अससी तैसा ।
परी उठतांचि वृत्तीचे सहवासा । वाटे मीचि उसळलों ॥ ४ ॥
तू ब्रह्मानंदरूप जसा आहेस तसाच आहेस. पण वृत्ती उठताच वृत्तीच्या सहवासाने तुला वाटते की मीच उसळलो. (४२०४)

मीचि जाहलों होतों निवांत । निमिष्यभरी तों मी उत्थान पावत ।
ऐसा गुप्तत्वें मीपणाचा हेत । होतां प्रवाही पडसी ॥ ५ ॥
मीच निवांत जाहलो होतो. मी, एक क्षणापुरता तर उत्थान पावलो होतो. अशा प्रकारे गुप्तत्वाने मीपणाचा हेतू उत्पन्न होताच प्रवाहात पडतोस. (४२०५)

तस्मात् तुझें निर्विकल्पत्व तुजसी । कळलें परी बाणेना स्थिति जैशी ।
संकल्पाकार होय पूर्वाध्यासीं । ह्मणोनि पावसी उत्थाना ॥ ६ ॥
तेव्हा तुजे निर्विकल्पत्व तुझे तुला कळले आहे, पण ती स्थिती अजून असावी तशी बाणली नाही. पूर्वीच्या ध्यासाने (संस्काराने) वृत्ती संकल्पाकार होऊन तू उत्थान पावतोस. (४२०६)

तरी आतां मागुती निरूपण । सांगू तें ऐकें सावधान ।
सविकल्प निर्विकल्प हेचि दोन । स्पष्टतर करूं ॥ ७ ॥
त्यामुळे आता पुन्हा एकदा निरूपण करतो. तू सावधान होऊन ऐक. त्यातून सविकल्प निर्विकल्प या दोन संकल्पना स्पष्ट करू. (४२०७)

GO TOP