॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. १४ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोकः सविकल्पकचिद्योऽहं ब्रह्मैकं निर्विकल्पकम् । स्वतःसिद्धा विकल्पास्ते निरोद्धव्याः प्रयत्नतः ॥ १४ ॥
श्लोकः सविकल्पकचिद्योऽहं ब्रह्मैव निर्विकल्पकम् ॥ १४ ॥ (पूर्वार्ध)
अर्थ : मी सविकल्पक चैतन्यरूप असा जो आहे, तो मी मुळात निर्विकल्पक ब्रह्मच आहे. त्यासाठी स्वतःच उत्पन्न होणाऱ्या विकल्पांचा प्रयत्नपूर्वक निरोध करावा. ||१४||

सविकल्परूप चिति ते मीची । जरी असो अहं ब्रह्म प्रतीतीची ।
निर्विकल्प ब्रह्म तें एकरूपची । प्रतीति अप्रतीति विलक्षण ॥ ८ ॥
सविकल्पक चैतन्य मीच आहे. जरी ही जाणीव 'अहं ब्रह्म' या प्रतीतीची असली तरी निर्विकल्प ब्रह्म मात्र एकच आहे. त्याच्या बाबतीत अनुभव, अनुभवाचा अभाव या गोष्टी गैरलागू आहेत. ते या दोन्ही गोष्टींपेक्षा वेगळे आहे. (४२०८)

हें निश्चयेंसी सत्य सत्य प्रमाण । गुरु शास्त्र आत्मप्रतीतीकडून ।
हेंचि स्पष्ट करूं निरूपण । जेणे यथार्थ कळे ॥ ९ ॥
हे निश्चयपूर्वक प्रमाणपूर्वक सत्य आहे. त्याला गुरू, शास्त्र, आणि प्रतीती या तीन्ही प्रमाणांचा आधार आहे. हेच निरूपणात स्पष्ट करावयाचे आहे. त्या योगाने योग्य ज्ञान होईल. (४२०९)

चरणार्ध : सविकल्पकचितिः अहं ।
अर्थ : मी सविकल्पक चिद्रूप आहे. ॥१४॥ (पूर्वार्ध)

सविकल्पक अहंतेमुळे । निर्विकल्पत्व सोडोनि उसळे ।
तेंही सविकल्पचि ह्मणोनि चंचळे । निश्चळ तें जैसे तैसें ॥ १० ॥
सविकल्पक, अहंतेमुळे निर्विकल्पत्व सोडून उसळते. ते सविकल्पक असल्यामुळे अर्थातच चंचल असते. पण निश्चळ (ब्रह्म) मात्र जसेच्या तसे अविकृतच असते. (४२१०)

लय साक्षी जो आत्मा ब्रह्म । वृत्तीसी हा मी हे कळलें वर्म ।
हे हे वृत्यादि देहान्त धर्माधर्म । सहित मी नसें ॥ ११ ॥
लयसाक्षी जो ब्रह्मात्मा आहे. तो मीच आहे हे रहस्य वृत्तीला कळले आणि वृत्तीपासून देहापर्यंत हा जो धर्मधर्मीचा गोतावळा आहे तो आपण नाही आहोत (४२११)

ऐशी जे हे प्रतीति बाणली । कीं अनुभवेंवीण अनुभाव्यता संचली ।
तेही सविकल्पताचि स्पष्ट कळली । पाहिजे साधका ॥ १२ ॥
अशी प्रचीती बाणली, अनुभवावाचून अनुभाव्यताच व्यापून राहिली आहे अशी स्थिती जरी झाली तरी तीसुद्धा एकप्रकारची सविकल्पताच आहे, हे साधकाला स्पष्ट कळले पाहिजे. (४२१२)

आरंभी निर्विकारी हे मयास्फूर्ति । न होऊन जाहली जेव्हां उत्पत्ति ।
तेव्हांचि देहादिक जाहली संतति । तिकडे विस्मृति स्वरूपाची ॥ १३ ॥
आरंभी निर्विकार अशा ब्रह्मामध्ये जी माया स्फूर्तीची न होऊन (मिथ्यारूपाने) निर्मिती झाली त्याच वेळी देह इ. तिची संतती उत्पन्न झाली. आणि त्याच वेळी तिला ब्रह्मरूपाचे विस्मरण झाले. (४२१३)

ऐशिये अज्ञानेंकडून । मीच देह जाहला अभिमान ।
हे अवघे पूर्वश्लोकीं निरूपण । जाहलें सविकल्पक जीवाचें ॥ १४ ॥
अशा प्रकारच्या अज्ञानामुळे 'मीच देह आहे' असा अभिमान तिच्या ठिकाणी उत्पन्न झाला. हे सगळे सविकल्प जीवाचे निरूपण अगोदरच्या श्लोकाच्या निरूपणात झाले आहे. (३६०१ ते ३६४५ या ओव्या पहा) (४२१४)

वृत्तीमाजीं जो नसूनी । उत्पन्न जाहला प्रतिबिंबपणीं ।
तया जीवाचें रूपही तुजलागूनी । मागां स्पष्ट सांगितलें ॥ १५ ॥
जो वृत्तीमध्ये मिथ्या प्रतिबिंबाच्या रूपाने उत्पन्न झाला त्या जीवाचे रूपही तुला स्पष्ट सांगितले आहे. (४२१५)

तया जीवासीच बद्धता । जाहली होती घेतां अहंता ।
तोचि जीव पावला मुक्तता । अहंब्रह्म साभिमानें ॥ १६ ॥
त्या जीवाच्याच ठिकाणी देहादिकाबद्दलची अहंता धारण केल्यामुळे बद्धता आली होती. तोच जीव 'अहं ब्रह्मास्मि' या अनुभूतीच्या अभिमानाने मुक्त झाला. (४२१६)

हेही तुज मागे सांगितलें । की जागृदादि मोक्षान्त जेतुलें ।
तें तें सर्व जीवविकल्पाकडे आलें । मुख्य निर्विकल्प तें यापरतें ॥ १७ ॥
हेही तुला मागे सांगितले होते. जागृतीपासून मोक्षापर्यंत जेवढे काही आहे ते सर्व जीव या विकल्पाकडे येते. पण मुख्य निर्विकल्प ते यापलीकडचे आहे. (४२१७)

तेंचि मागुती स्पष्ट करूं । सविकल्प निर्विकल्पाचा निर्धारु ।
अतिशय सावधान सह-विचारू । असावें रविदत्ता ॥ १८ ॥
तेच पुन्हा स्पष्ट करतो. त्या योगाने सविकल्प निर्विकल्प यांचा निर्धार होईल. तेव्हा रविदत्ता, तू विचारपूर्वक अतिशय सावधान होऊन ऐक. (४२१८)

जो देहअभिमान घेऊन बैसला । ती प्रकारें तिही अवस्थेला ।
विश्व तैजस प्राज्ञ नाम पावला । तो हा सविकल्पक जीव ॥ १९ ॥
जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थांमध्ये जो अनुक्रमे विश्व, तैजस आणि प्राज्ञ या प्रकारचे देहाभिमान घेऊन बसतो तोच हा सविकल्पक जीव होय. (४२१९)

येणेंचि यया अहंतागुणें । आकल्प सोसिली जन्ममरणें ।
सुखदुःखात्मक नाना योनी भोगणें । पडिलें अज्ञानास्तव ॥ २० ॥
याच अहंतेमुळे त्याने कल्पान्तापर्यंत जन्म आणि मरणे सोसली. त्याला अज्ञानामुळे सुखदुःखात्मक विविध प्रकारच्या योनीतून जावे लागले. (४२२०)

जैसे दहाजण एका नदीतीरीं । दहा मोजोनि प्रवेशती अंतरी ।
बाहेरी आलिया पुनः मोजिती । रडती ताळ न मिळे म्हणोनि ॥ २१ ॥
दहा माणसे नदीच्या काठावर आली होती. नदीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सर्वांची मोजणी केली होती. आपण दहाजण आहोत याची खात्री करून ते पाण्यात उतरले. कुठल्याही प्रकारचे विघ्न न येता ते परतीरावर सुखरूप पोहोचले. पण परतीरावर त्यांनी पुन्हा एकदा मोजणी केली. ती करताना त्यांना भ्रम पडला. (४२२१)

पुनः पुन्हा मोजोनी पाहती । परी दहाविया आपणा सोडिती ।
ऐशीच दहांसी पडली भ्रांति । आपणा दहावा असतां ॥ २२ ॥
त्यांपैकी प्रत्येक जण एकापासून नवापर्यंत मोजत होता पण दहाव्या आपण स्वतःला मोजायचे विसरत होता. देहात्मवादी जीवाला असाच भ्रम पडलेला असतो. (४२२२)

तैसा स्फूर्तीपासून देहापर्यंत । जितुका मिळाला हा संघात ।
तितुका दशमापरी अधिष्ठानासहित । अविद्यारानी भ्रमती ॥ २३ ॥
त्याप्रमाणे स्फूर्तीपासून देहापर्यंत जेवढा समुदाय मिळालेला असतो तो म्हणजे वरील कथेतील दहाजण होत. हे दहाहीजण आपल्या अधिष्ठानासहित अविद्यारूप रानात हिंडत असतात. (४२२३)

अधिष्ठानासहित ह्मणतां । आत्मा ब्रह्मचि भ्रमेना तत्त्वतां ।
आकाश जैसें चंचळा आंतौता । असोनि अचळ ॥ २४ ॥
अधिष्ठानासहित म्हणण्याचा अभिप्राय असा की, आकाश ज्याप्रमाणे सर्व चंचल पदार्थांच्या समूहात असूनही अचल असते, त्याप्रमाणे ब्रह्मात्म्याला कधी भ्रम होत नाही.. (४२२४)

असो जन्ममरणरूप संसृति । हेचि नदी पुनःपुनः उतरती ।
आपण कोण ह्मणोनी पहावया जाती । मोजिलियापरी ॥ २५ ॥
जन्ममरणरूपी संसार हीच नदी ते चंचल पदार्थ पुनः पुनः उतरत असतात आणि ते दहाजण जसे मोजणी करत होते तसे देहादिक समुदाय आपण कोण म्हणून पहायला लागतात. (४२२५)

परी आपण जो निर्विकल्प अगोचर । कवणासी कळे हे जड समग्र ।
परी आहे जाणणें तो निरंतर । सतत आहेचि आहे ॥ २६ ॥
पण आपण स्वतः जो निर्विकल्प अदृश्य असा ब्रह्मात्मा आहोत. हे कुणाला कळणार? तो सर्व समुदाय जड आहे. पण त्यांना ते कळले नाही म्हणून काय झाले? पण जाणणे तर अखंड आणि शाश्वत आहेच ना! तेच चिद्रप होय. ते निरंतर असणारच आहे. (४२२६)

परी तें असतांही हे जड़ें । कोणी जाणती ना बापुडे ।
आहे ऐसें जे वाटतें निवाडें । परी तें देहादिकाभावी ॥ २७ ॥
पण ते असले तरी या सर्व सृष्ट पदार्थांना ते जड असल्यामुळे ते कसे कळणार? त्यांच्यापैकी कोणालाही ते चिद्रूप समजत नाही. आहे असे जे वाटते ते देहादिकांच्या अनुपस्थितीत जाणवते. (उदा. निद्रा) पण देह असताना त्याची जाणीव नसते. (४२२७)

तस्मात् आहे तो हा देह । हा प्रत्यय बाणला निःसंदेह ।
ऐसें विस्मरण जाहलें पाहे । निजात्मत्वाचें ॥ २८ ॥
म्हणून त्यांना देहादी असताना आहे असे जे वाटते ते देहाबद्दल वाटते. हा निःसंशय प्रत्यय बाणल्यामुळे त्यांना निजात्म्याचे विस्मरण होते. (४२२८)

दहावा असोनि आपणा विसरला । तैसाचि विस्मर आपुला जाहला ।
हेंचि अज्ञान पडिलें या संघाला । जीवात्मकासी ॥ २९ ॥
दहा जणांच्या दृष्टान्तातील प्रत्येक जण दहावा असूनसुद्धा स्वतःला विसरला, त्याप्रमाणे या जीवात्मक संघालाही निजात्म्याचा विसर पडलेला आहे. हेच त्याचे अज्ञान होय. (४२२९)

जीवत्वें आपणचि खरा असें । कारण की हा मी मजला दिसें ।
यापरता आत्मा कोठं नसे । दिसेना म्हणोनी ॥ ३० ॥
त्याला भ्रम होतो की जीवत्वाने मीच खरा आहे, कारण हा मी मला दिसतो. पण आत्मा कोठेच दिसत नाही. त्यामुळे जीवाखेरीज त्यापलीकडचा आत्मा वगैरे काही नाही. (४२३०)

ऐसें आत्मयाचें नाहींपण । दुसरें न दिसणे अभान ।
एवं नास्ति न भाति उभय आवरण । अज्ञानापासून जाहलें ॥ ३१ ॥
अशा प्रकारे त्याने आत्म्याचे नाहीपण मानले आणि आत्मा दिसत नाही म्हणून त्याचे अभानही त्याने मानले. अशा प्रकारे नास्ति (न अस्ति) आणि न भाति अशी दोन आवरणे त्याच्या दोन प्रकारच्या अज्ञानातून निर्माण झाली. (४२३१)

जैसा दहावा नाही दिसेना । उभय रीती केली कल्पना ।
याचि रीतीं पडिलें आवरणा । जीवालागीं ॥ ३२ ॥
ज्याप्रमाणे दहावा नाही आणि तो दिसत नाही अशा दोन्ही अज्ञानजन्य कल्पना त्याने बाळगल्या. याचप्रकारे जीवालाही आवरण पडते. (४२३२)

पहिलें अज्ञान दुसरें आवरण । पडिलें असतां जीवालागून ।
पुढें देहाचाचि घेतला अभिमान । मी म्हणोनि निश्चयें ॥ ३३ ॥
पहिले अज्ञान आणि दुसरे आवरण या दोहोंमुळे जीवाने या देहालाच मी मानून त्याचा निश्चयपूर्वक अभिमान घेतला. (४२३३)

तेणें जितुकी क्रिया देहाची । होय ते करीतसें मीची ।
तेव्हां पापपुण्य सुखदुःखाची । कृतिभुक्ति मजला ॥ ३४ ॥
त्यामुळे देहाच्या जेवढ्या म्हणून क्रिया असतील त्या सर्व मीच करतो. त्यामळे होणारे पाप व पुण्य सखे आणि दःखे ही मीच करतो आणि मीच भोगतो. (४२३४)

मागे केली जी पुण्यपा । तींचि भोगितों आतां अमुपें ।
आतां जी करीन अधिक अल्पें । ती ती भोगीन पुढे ॥ ३५ ॥
मागे जी अनंत पुण्य पापे केली तीच आता भोगत आहे. आता येथून पुढे जी कमी अधिक पापे अथवा पुण्यकर्मे माझ्याकडून होतील ती मी पुढे भोगीन. (४२३५)

या नांवे विक्षेप उद्भवला । हे सर्व जन्ममरण मजला ।
होत असतीं चुकेना कांही केला । उपाय जरी भलतैसा ॥ ३६ ॥
यालाच विक्षेप उद्भवला असे म्हणतात. ही सर्व जन्म मरणे, मलाच होत असतात. ती काही केल्या चुकत नाहीत. कोणताही उपाय केला तरी त्याचा उपयोग होत नाही. (४२३६)

जैसे दहावियाकरितां दाही । मस्तकें ताडिती रडती पाहीं ।
टेंगुळे येऊनियां लवलाहीं । व्रण पडोनि रक्त वाहे ॥ ३७ ॥
ज्याप्रमाणे दहावा हरवला म्हणून दहाही जण डोक्यावर मारून घेत होते आणि रडत होते. त्यामुळे त्यांच्या डोक्यांना टेंगुळे आली, जखमा होऊन रक्तही वाहू लागले. (४२३७)

तैसेचि जीव या संसृतींत । पडिले पुनः पुनः मरती जन्मत ।
सुखदुःख भोगिलेंचि भोगित । उच्च नीच योनी ॥ ३८ ॥
त्याप्रमाणे जीव या संसारात पडल्यावर पुनः पुनः मरताहेत जन्मत आहेत, भोगलेलीच सुखदुःखे भोगत आहेत. निरनिराळ्या उच्च नीच योनीतून फिरत आहेत. (४२३८)

एवं सुखदुःखात्मक विक्षेप । तिसरी अवस्था बोलिली संक्षेप ।
हा जीवचि भोगीतसे अमुप । आत्मत्वीं स्पर्शली नाहीं ॥ ३९ ॥
अशा प्रकारे अज्ञान ही पहिली, आवरण ही दुसरी अशा अवस्था सांगितल्यावर आता ही सुखदुःखात्मक विक्षेपांची ही तिसरी अवस्था संक्षेपाने सांगितली. या तीन्ही अवस्था जीवच भोगतो. आत्म्याला त्यांचा स्पर्शही होत नाही. (४२३९)

अज्ञान आवरण विक्षेप ऐसे । बंधनरूप असती आपैसे ।
हा जीवचि साभिमाने गुंतला असे । यया बंधनीं ॥ ४० ॥
अज्ञान, आवरण आणि विक्षेप हे न जीवच अभिमानामुळे गुंतलेला असतो. (४२४०)

एवं तिन्ही अवस्था बंधकृत । सांगितल्या दशम दृष्टांतयुक्त ।
जैशिया पूर्व अवस्था जीव भोगित । तैसा मोक्षही जिवासी ॥ ४१ ॥
अशा तन्हेने या तिन्ही बंधनरूप अवस्था दशमाच्या दृष्टान्ताच्या साहाय्याने स्पष्ट करून सांगितल्या. जीव ज्याप्रमाणे ह्या तीन अवस्था भोगतो त्याप्रमाणे तो मोक्षही भोगतो. (४२४१)

बंधन जयासी तोचि सुटला । रोगी तोचि पावे आरोग्यतेला ।
भ्रमला तोचि जाय उमजला । तैसा मुक्त होय जीव ॥ ४२ ॥
ज्याला बंधन असते तोच मुक्त होऊ शकतो. जो रोगी असतो तोच आरोग्यप्राप्ती करतो. ज्याला भ्रम होतो त्यालाच उमज पडते. त्याप्रमाणे जीव बंधनग्रस्त असतो म्हणून त्यालाच मोक्ष मिळू शकतो. (४२४२)

जीवावाचोनियां मुक्तत्वाची । आत्मत्वीं वार्ता तरी कैंची ।
दृष्टांतासहित ऐका तेंची । उत्तरावस्था मोक्षरूप ॥ ४३ ॥
जीवाखेरीज मुक्तत्वाची गोष्ट आत्म्याच्या बाबतीत कशी काढता येईल? जीवास मोक्षरूप उत्तरावस्था आहे. आता जीवाच्या मोक्षरूप चार उत्तरावस्था आहेत त्या मी दृष्टान्तांसह सांगतो, ऐका. (४२४३)

मोक्षरूपही अवस्था चार । जीवचि भोगीतसे सुखकर ।
तेंचि ऐकावें सविस्तर । बोलिजे आतां ॥ ४४ ॥
मोक्षरूप अवस्थाही चार आहेत. जीवच त्या सुखकर अवस्था भोगतो. तेच आता सविस्तर सांगतो. त्या ऐका. (४२४४)

बंधनी जो जीव पडिला । अनंत जन्में भ्रमें उगला ।
तो नरदेह कर्मे पावला । येथेही उमजे एखादा ॥ ४५ ॥
जो जीव बंधनात पडला तो अनंत जन्मे भ्रमत आहे. त्याला त्याच्या कमनि नरदेह प्राप्त झाला. या जन्मातही एखाद्यालाच उमज पडते. (४२४५)

अनंत जन्माचे जरी सुकृत । उभे राहिले अकस्मात ।
तरीच एखादिया उद्भवत । अनुताप संसारीं ॥ ४६ ॥
अनंत जन्मांचे पुण्य जर अकस्मात उगवले तर एखाद्याच माणसाला संसारात वैराग्य उत्पन्न होते. त्याला संसाराचा वीट येतो. (४२४६)

तया अनुतापें सर्व कर्मांचा । त्याग करोनि मुमुभु होय साचा ।
पुढे अंकित होऊनि सद्गुरूचा । सेवी दिनदिशीं ॥ ४७ ॥
त्या वैराग्यामुळे तो सर्व कर्मांचा त्याग करून मोक्षप्राप्तीची इच्छा धरतो. त्यानंतर तो सद्गुरूंचे शिष्यत्व पत्करून त्यांची रात्रंदिन सेवा करतो. (४२४७)

श्रवण मनन विवेचन । निदिध्यासें करी आपण ।
तरी तो पावे अपरोक्ष ज्ञान । तीव्रप्रज्ञ जरी ॥ ४८ ॥
तो श्रवण, मनन, निदिध्यास यांच्या साहाय्याने विवेचन करतो. तो जर तीव्रप्रज्ञ असेल तर त्याला एवढ्याने अपरोक्ष ज्ञान प्राप्त होते. (४२४८)

मंदप्रज्ञही जरी असला । तरी अभ्यासें पावे अपरोक्षाला ।
असो सद्गुरूसी जो शरण आला । जीवरूपें साधक ॥ ४९ ॥
तो जरी मंदप्रज्ञ असला तरी अभ्यासाने अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. असो, तर असा जो जीवरूपी साधक सद्गुरूला शरण येतो, (४२४९)

जैसा तया दशमालागीं । अकरावा आप्त भेटला वेगीं ।
तैसा अनंत सुकृताचिये प्रसंगी । सद्गुरुनाथ भेटले ॥ ५० ॥
ज्या प्रमाणे दशमाच्या दृष्टान्तात कोणीतरी वेगळा अकरावा आप्तजन भेटतो आणि त्या दहा जणांना त्यांची चूक समजावून देतो, त्याप्रमाणे अनंत पुण्याईच्या बळाने त्या साधकाला सद्गुरूंची प्राप्ती होते. (४२५०)

तया सच्छिष्याचिये कळवळा । बोधिती सद्गुरू अवलीळा ।
की विवेचून पाहें जाणता आगळा । ब्रह्मात्मा आहे ॥ ५१ ॥
त्या शिष्याच्या कळवळ्याने ते त्या शिष्याला सहज समजावून सांगतात. त्या प्रमाणे त्या कथेतील जाणता माणूस स्पष्ट करून सांगतो की ब्रह्मात्मा वेगळाच आहे. (४२५१)

जैसा आप्त ह्मणे तया दशमासी । दहावा आहे रे निश्चयेंसी ।
तैसा सद्गुरु ह्मणे ब्रह्मात्मा अविनाशी । आहे सर्वव्यापी ॥ ५२ ॥
ज्याप्रमाणे आप्त माणूस त्या दहाव्याला सांगतो की दहावा निश्चयपूर्वक आहेच आहे त्याप्रमाणे सद्गुरू सच्छिष्याला ब्रह्मात्मा अविनाशी आणि सर्वव्यापी असल्याचे पटवून देतात. (४२५२)

विश्वास मात्र दशमासी । असतां आहेसा होय तयासी ।
तैसाचि गुरुवचनीं सच्छिष्यासी । परोक्ष कळे ॥ ५३ ॥
दशमाच्या दृष्टान्तात त्या दहाव्या माणसाला आप्तावर विश्वास असेल तर तो दहावा असल्याचे त्याला जाणवते. त्याप्रमाणे शिष्याचा गुरुवचनावर विश्वास असेल तर सद्गुरूंच्या उपदेशाबरोबर सच्छिष्याला तो ब्रह्मात्मा परोक्षत्वाने (अप्रत्यक्षपणे) कळतो. (४२५३)

परोक्षज्ञानही मोक्षरूप । होतां असदावरणाचा लोप ।
नाहींपणे जो होता आक्षेप । तो आहेपणा जाहला ॥ ५४ ॥
असदावरणाचा लोप झाल्यानंतर होणारे परोक्षज्ञानही मोक्षरूप आहे. अगोदर आत्मा नाहीच असे जो साधक मानीत होता तो आता आत्मा आहे, असे मानू लागतो. (४२५४)

दशम आहेसा कळतांक्षणीं । हर्षचि होय शोक भंगोनी ।
तैसें परोक्षज्ञान साधकालागूनी । सुखदानीच होय ॥ ५५ ॥
दहावा (मित्र) आहे असे कळताक्षणीच अगोदरचा शोक नष्ट होऊन त्याला आनंदच होतो. त्याप्रमाणे परोक्षज्ञानसुद्धा साधकाला मोक्ष देणारे ठरते. (४२५५)

परोक्षज्ञान तरी कोठून । कोठवरी ते पहा विचारून ।
सद्गुरुमुखें करितां श्रवण । विश्वासें बाणे ॥ ५६ ॥
हे परोक्ष ज्ञान कोठून कोठपर्यंत आहे ते विचार करून पहा. सद्गुरुमुखाने श्रवण करताक्षणीच ते सद्गुरूंवरील विश्वासामुळे मनावर ठसते. (४२५६)

देह प्राणादि पंचकोश । जड किंवा परप्रकाश ।
यांत आहे ब्रह्मात्मा अविनाश । अस्ति भाति प्रियत्वें ॥ ५७ ॥
देह, प्राण इ. पंचकोश हे जड अथवा परप्रकाश आहेत. पण त्यात अस्ति भाति प्रियत्वाने अविनाशी ब्रह्मात्मा आहे. (४२५७)

हे निरूपण पूर्वीच जाहलें । तिहीं काली हे लक्षण संचलें ।
जाणणे सर्वांचे प्रत्यया आलें । भिन्न सर्वांनी ॥ ५८ ॥
हे निरूपण मागेच झाले आहे. ब्रह्माचे हे लक्षण तिन्ही काळी अबाधित राहिले आहे. जाणणे म्हणजे चिद्रूप हे या सवपिक्षा भित्र आहे. ही गोष्ट सर्वांच्या अनुभवास आलेली आहे. (४२५८)

तेंचि प्रियतर अखंडित । तेंचि सद्रूप सदोदित ।
येर हे दुःखरूप जड असत । ऐसें खरें कळे ॥ ५९ ॥
चिद्रूप हेच अखंडितपणे प्रियतर राहिले आहे. तेच नेहमी असणारे सद्रूप आहे. त्यावाचून बाकीचे हे सर्व दृश्य विश्व दुःखरूप, असत (न टिकणारे) आणि जड (चिद्रहित) आहे. हे खरे सत्य त्याला कळते. (४२५९)

जे बत्तीस असज्जड दुःखात्मक । तृणादि ईशान्त सकळिक ।
याचा जाणता तो निश्चयात्मक । आहे तो कळे ॥ ६० ॥
बत्तीस तत्त्वे, त्यात समावणारी तृणापासून ते ईश्वरापर्यंतची सर्व सृष्टी ही असत्, जड आणि दुःखात्मक आहे, या सर्वांना जो निश्चितपणे जाणणारा तोच (ब्रह्मात्मा) एक आहे. ते त्याला कळते. (४२६०)

विवेचने किंवा अभ्यासे । देहादि स्फूर्त्यन्त हे फोसें ।
सर्व जाणतसे स्वप्रकाशें । इतुके कळे प्रत्ययें ॥ ६१ ॥
विवेचनाने किंवा अभ्यासाने देहापासून ते थेट मूल स्फुरणापर्यंत हे सर्व निरर्थक आहे हे सर्व तो स्वतःच्या प्रकाशाने जाणतो, याचे अनुभवपूर्वक ज्ञान त्याला होते. (४२६१)

द्रष्टासाक्षी प्रतीति आला । मात्र लयसाक्षी नाही कळला ।
परीक्ष ज्ञान ह्मणावे ययाला । तरी मोक्षकर नव्हे केवीं ॥ ६२ ॥
या परोक्षज्ञानाने द्रष्टासाक्षी कळला, पण लयसाक्षी मात्र कळलेला नाही. येथपर्यंतच्या ज्ञानाला परोक्षज्ञान म्हणावे; ते मोक्षदायक नाही असे कसे म्हणता येईल? (४२६२)

हा आत्मा दृश्याचा देखणा । आहे भाससाक्षी पूर्णपणा ।
आतां कोठे उरला नाहींपणा । तस्मात् मोक्षकर ज्ञान हे ॥ ६३ ॥
हा आत्मा सर्व दृश्याचा देखणा म्हणजे पहाणारा आहे, तो भासमय सृष्टीचा पूर्णपणे साक्षीदार आहे; तेव्हा आता त्याचा नाहीपणा कोठे राहिला आहे? हे सर्व ज्ञान मोक्षदायकच आहे. (४२६३)

एवं अवस्था परोक्ष ज्ञानाची । सुखकरी असे जीवाची ।
दैन्यता फिटली सुखदुःखात्मकाची । देहा विलक्षण कळतां ॥ ६४ ॥
अशा प्रकारे परोक्षज्ञानाची अवस्था जीवाला सुख देणारीच आहे. या ज्ञानाने आत्मा हा देहापेक्षा निराळा आहे. हे कळल्याने सुखदुःखाचे दैन्य फिटले. (४२६४)

ऐसें परोक्षज्ञान ब्रह्मात्मयाचें । जीवालागीं जाहलें साचें ।
आतां ऐका अपरोक्ष ज्ञानाचे । सोहळे जीवासी ॥ ६५ ॥
असे हे ब्रह्मात्म्याचे परोक्ष ज्ञान जीवाला झाले, त्यानंतर पुढे अपरोक्ष ज्ञानाचे सोहळे जीवाला कसे होतात ते ऐका. (४२६५)

गुरु ह्मणती सच्छिष्याप्रती । हे मावळून गेली जरी वृत्ति ।
तरी लयासी जया अनुभूति । तत्वमेव प्रत्यक्ष ॥ ६६ ॥
सदुरू आपल्या सच्छिष्याला म्हणतात की, वृत्ती मावळून गेली तरी वृत्तीच्या लयाचा प्रत्यक्ष अनुभव घेणारा तो तूच आहेस. (४२६६)

जैसा हा जो नवांतें मोजिता । तोचि तूं दहावा तत्त्वतां ।
तैसाचि लयाचा प्रत्यक्ष जाणता । शून्यातीत तोचि तूं ॥ ६७ ॥
नऊ मित्रांना मोजणारा दहावा जसा तूच आहेस, तसा वृत्तिलयाचा प्रत्यक्ष ज्ञाता, शून्यातीत असणारा तूच आहेस. (४२६७)

विवेकें जेवी दहावियासी । वाटे जरी मोजिता मी नवांसी ।
भेटलों की म्हणे चुकलियासी । या आप्ताच्या कृपें ॥ ६८ ॥
विवेकाच्या साहाय्याने दहाव्या गृहस्थाला कळते की मी नवांना मोजणारा असलो तरी चुकलेल्या आपण आपल्याला मी आता प्रत्यक्ष भेटलो, तो या अकराव्या आप्ताच्या कृपेनेच होय. (४२६८)

तैसा विचारवंत खरा साधक । विचारें पाहतां निश्चयात्मक ।
हा मी लयसाक्षी स्वप्रकाशक । न जाणोनि जाणे ॥ ६९ ॥
त्याप्रमाणे खरा विचारवंत साधक जर विचाराने निश्चयपूर्वक पाहील तर मीच स्वतः स्वप्रकाशक लयसाक्षी आहे, असे न जाणून जाणू शकेल. (४२६९)

ऐसा प्रत्यय खरा बाणतां । आनंदें उसळला वृत्ति उद्भवतां ।
हा मी कळलों प्रत्यक्ष स्वतां । सद्गुरुप्रसादें ॥ ७० ॥
असा खरा अनुभव त्याला आला तर वृत्ती उत्पन्न होऊन तो आनंदाने उडी मारतो आणि म्हणतो की सद्गुरूंच्या कृपेने मीच स्वतःला प्रत्यक्ष कळलो. (४२७०)

हाचि मी प्रत्यक्ष असोनी । मानिलें देहादिकां मी म्हणोनी ।
आतां हे मी नव्हे मिथ्यात्वें श्रेणी । मज म्यां वोळखितां ॥ ७१ ॥
हाच मी प्रत्यक्ष असताना देहादिकांना मी म्हणून मानत होतो. आता ही सर्व श्रेणी मिथ्या असल्यामुळे मी ती (श्रेणी) नाही. कारण मी खरा कोण आहे हे मी ओळखळे आहे. (४२७१)

ऐशिया अपरोक्षज्ञानेंकडून । भंगलें अभानरूप आवरण ।
आपुलें आपणासी जें न कळणें । होतें तें मावळलें ॥ ७२ ॥
या अपरोक्ष ज्ञानामुळे अभानरूप आवरण आता नष्ट झाले आहे. आपलेच स्वरूप आपल्याला कळत नव्हते. ते न कळणे (अज्ञान) आता मावळले आहे. (४२७२)

दहावा मीच असें स्वतां । तरी न दिसणे कोठे उरलें आतां ।
तैसा स्वतःसिद्ध लयसाक्षी कळतां । न कळणे कोठे ॥ ७३ ॥
आता मीच स्वतः हरवलेला दहावा आहे. हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे दिसत नाही ही तक्रार आता कोठे राहिली आहे? त्याप्रमाणे स्वतःसिद्ध लयसाक्षी कळताक्षणीच न कळणे कुठून असणार? (४२७३)

परोक्षज्ञानें असत् गेलें । अपरोक्षं अभान नष्ट जाहलें ।
एवं आवरण निःशेष मावळलें । उभय प्रकारेही ॥ ७४ ॥
परोक्ष ज्ञानाने असत् नष्ट झाले. अपरोक्ष ज्ञानाने अभान (आवरण) नष्ट झाले. अशाप्रकारे असत् आवरण आणि अभान + आवरण हे दोन्ही आवरणाचे प्रकार निःशेष नष्ट झाले. (४२७४)

ऐसें हें जें अपरोक्ष ज्ञान । भेटला आपणा आपण ।
हे अवस्था ह्मणसी आत्मयालागून । तरी अवधारीं ॥ ७५ ॥
असे हे अपरोक्ष ज्ञान होय. त्यामुळे आपणच आपल्याला भेटतो. ही अवस्था आत्म्याची आहे असे म्हणशील तर ऐक. (४२७५)

आत्मया ब्रह्मासी न कळणे । कोठे जाहलें होतें विस्मरण ।
हे जाहलें जें जें उत्पन्न । तया जाणतचि असे ॥ ७६ ॥
ब्रह्मात्म्याला न कळणे आणि विस्मरण कधी झाले होते? जे जे म्हणून काही उत्पन्न झाले असे आपण म्हणू ते ते ब्रह्मात्मा जाणतच असतो. (४२७६)

जाणतियाचाचि आहेपणा । तोचि प्रिय आपुले आपणा ।
एवं सच्चिदानंदा अद्वैत पूर्णा । विस्मर ना स्मर ॥ ७७ ॥
आणि अशा जाणणाऱ्यालाच (चित्) आहेपणा असतो. (सत्). तोच आपण आपल्याला प्रिय असतो. अशा रीतीने सच्चिदानंद अद्वय अशा पूर्ण ब्रह्मात्म्याला ना विस्मरण असते ना स्मरण. (४२७७)

जीवचि आभासे उत्पन्न जाहला । तोचि आत्मया ब्रह्मासी विसरला ।
ऐशियां अज्ञानें जन्मला मेला । नाना योनी साभिमानें ॥ ७८ ॥
मूळ जीवच आभासरूप जन्माला आला. तोच ब्रह्मात्म्याला विसरला. अशा प्रकारच्या अज्ञानाने तो जन्मला तसाच मेला. खोट्या अभिमानाने निरनिराळ्या योनीत तो जन्ममरण भोगत राहिला. (४२७८)

तया जीवासीच ब्रह्मात्मयाचें । अपरोक्षं ज्ञान जाहलें साचें ।
तेणेंचि जन्ममृत्यु चुकले याचे । हे सत्य सत्य प्रमाण ॥ ७९ ॥
त्या जीवाला ब्रह्मात्म्याचे खरे अपरोक्ष ज्ञान झाले. त्यासरशी त्याचे जन्ममृत्यू चुकले. हे त्रिवार सत्य आहे. (४२७९)

ऐसें अपरोक्षज्ञान जाहलियावरी । जीवन्मुक्तीचिये अनुकारी ।
उत्तर अवस्था दों प्रकारी । असती जीवासी ॥ ८० ॥
असे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर जीवाला जीवन्मुक्ती प्राप्त होते. तिच्या अनुरोधाने जीवाला दोन प्रकारची उत्तरावस्था असते. (४२८०)

आपणासी आपण जो भेटला । तेणें मागील दुःख विसरला ।
मी जन्मतों मरतों जो उगला । हा मोडला विक्षेप ॥ ८१ ॥
आपणच आपल्याला भेटला त्यामुळे त्याचे मागील दुःख तो विसरला. आणि मी जन्मतो, मी मरतो हा जो विक्षेप उगीचच वाटत होता, तो विक्षेप मोडला (४२८१)

अज्ञाने मी देहचि होतें मानिलें । तेव्हां पापपुण्य साभिमानें म्यां केलें ।
तेणें सुखदुःख जें जें देहा जाहते । तें तें भोगिलें म्यांची ॥ ८२ ॥
अज्ञानामुळे आपण देहच आहोत असे त्याने मानले होते. त्या अभिमानामुळे सर्व पाप, पुण्य आपणच केले असे त्यास वाटत होते. त्या योगाने देहाला जे सुख-दुःख प्राप्त होत होते, ते ते आपणच भोगतो आहोत असे त्यास वाटत होते. (४२८२)

ऐसा शोक जो जाहला होता । तो भंगला अपरोक्षज्ञानें तत्त्वता ।
हा आभास इतुका नव्हेचि मी आतां । तरी याचे सुखदुःख मज केवीं ॥ ८३ ॥
या प्रकारचा जो शोक त्याला झाला होता तो अपरोक्षज्ञानामुळे नष्ट झाला. एवढा सर्व आभासमय पसारा मी नाही. आता त्याबद्दलचे सुखदुःख मला कसे असेल? (४२८३)

मी सच्चिद्घन आत्मा ब्रह्म । हे मी नव्हेचि बत्तीस रूपनाम ।
उगाचि मानिला होता जो संभ्रम तो निमाला या ज्ञानें ॥ ८४ ॥
मी सच्चिद्घन ब्रह्मात्मा आहे. हे बत्तीस प्रकारचे नामरूपात्मक जग मी नाही. पण त्या प्रकारचा जो भ्रम मी उगाच डोक्यात घेतला होता तो भ्रम या ज्ञानाने आता मावळला. (४२८४)

आतां जन्ममृत्यु माझे चुकले । बंधनाचे निसंतान जाहलें ।
ऐसें विक्षेपरूप शोका खंडिलें । ही शोक मोक्ष अवस्था ॥ ८५ ॥
आता माझे जन्ममृत्यू टळले. मला पडलेल्या बंधनाचे निःसंतान झाले (मुळासकट नष्ट झाले). अशा विक्षेपरूपाने असलेल्या शोकाचे खंडन झाले. या अवस्थेला शोकमोक्ष अवस्था म्हणतात. (ही शोकमोक्षाची अवस्था होय.) (४२८५)

जैसा दशमाकरितां शोक केला । रडणें बडबडणें जें दहांला ।
जेव्हां दहावा आपणसा कळला । तो भंगला तत्क्षणीं ॥ ८६ ॥
ज्याप्रमाणे दशम हरवला म्हणून शोक केला, ते सर्व दहाजण रडू लागले, त्यांनी ऊर बडविले: पण जेव्हा दहावा आपणच आहोत असे कळले. तेव्हा तो शोक तत्कक्षणी नष्ट झाला. (४२८६)

तैसाचि हा जीव अज्ञानेंकडून । सोशीत होता जन्ममरण ।
तें एकदांचि भंगलें होतां ज्ञान । आत्मया ब्रह्माचें ॥ ८७ ॥
त्याप्रमाणे हा जीव अज्ञानामुळे जन्ममरण सोशीत होता, ते ब्रह्मात्म्याचे ज्ञान होताक्षणीच एकदम नाहीसे झाले. (४२८७)

उत्तर अवस्थेमाजी पहिली । शोकमोक्षरूप सांगितली ।
दुसरी निरंकुशा तृप्ति ऐकिली । पाहिजे जीवाची ॥ ८८ ॥
जीवाच्या ज्ञानोत्तर अवस्थांमधील पहिल्या शोकमोक्षरूप अवस्थेचे स्वरूप सांगितले. आता दुसरी जी निरंकुशा तृप्ती ही जीवाची दुसरी अवस्था तिचे स्वरूप ऐकले पाहिजे. (४२८८)

ब्रह्मात्मा जो आपुला आपण । असंग अभंग निजांगें पूर्ण ।
जाहला अक्षय ज्ञानेंकडून । साध्य तें साधिलें ॥ ८९ ॥
अक्षय अशा अपरोक्ष ज्ञानामुळे असंग, अभंग, परिपूर्ण असा जो ब्रह्मात्मा तोच आपले आपण बनलो; जे साध्य होते ते साध्य झाले. (४२८९)

आतां कोणतें उरलें पावावयाचें । कीं तें जाऊन साधावें साचें ।
साध्यचि आपुला आपण तरी न वचे । अमुक पावावें म्हणून ॥ ९० ॥
आता अमुक ठिकाणी जाऊन प्राप्त करून घ्यावी अशी कोणती गोष्ट उरली आहे? आपणच स्वतः साध्य आहोत तेव्हा अमुक एक प्राप्त व्हावे म्हणून काही उरलेलेच नाही. (४२९०)

सर्व साधनांचे सफळ जाहलें । करणे तेंही समाप्ति पावलें ।
अमुक करणें नाहीं उरलें । कृतकृत्यता हेची ॥ ९१ ॥
सर्व साधने सफल झाली; जे करावयाचे होते, तेही संपले, अमुक करायचे असे काहीच उरले नाही; तेव्हा हीच कृतकृत्यता होय. (४२९१)

एवं करावयाचें तें संपलें । पावावयाचें तें पावलें ।
कृतकृत्य प्राप्य तें लाधले । सद्गुरुप्रसादें ॥ ९२ ॥
अशा प्रकारे करायचे ते संपले, प्राप्त करायचे ते प्राप्त झाले, सद्गुरुकृपेने ज्याने समाधान होईल असे साध्य ते सिद्धीस गेले. (४२९२)

जैसा दशमाचा लाभ दशमासी । होतां सांडिती सायासासी ।
पावणेही नुरे तयासी । ह्मणती कृतकृत्य जाहलों ॥ ९३ ॥
हरवलेल्या दशमाचा (दहाव्या गृहस्थाचा) लाभ त्या स्वतःस मोजायला विसरलेल्या त्या दहाव्या पुरुषाला मिळाला; तेव्हा त्यांनी दहाव्याचा शोध सुरू केला होता तो थांबिवला, आता काही प्राप्त करण्याजोगे उरले नाही, त्यामुळे आपण कृतकृत्य झालो असे ते म्हणू लागले. (४२९३)

तैसा ब्रह्मात्मा साधावा वेगें । ऐसें जीवें धरिलें प्रसंगें ।
तंव तेंचि जाहला आपण निजांगें । आतां करणें पावणे कोणतें ॥ ९४ ॥
त्याप्रमाणे आपण ब्रह्मात्म्याची प्राप्ती वेगाने करून घ्यावी, असे जीवाने ठरविले, तर तो तेच होऊन बसला. मग त्याच्या दृष्टीने करणे ते कोणते, प्राप्त करावयाचे ते काय राहिले? (४२९४)

राजा पाहून संपत्ति वरावी । ऐसें रकें धरिलें जीवीं ।
तंव तो राजाचि जाहला तरी पावावी । पदवी कोणती तेणें ॥ ९५ ॥
एका रंकाने राजाचे वैभव पाहिले. तेव्हा आपल्यालाही राजासारखी संपत्ती मिळावी अशी त्याला इच्छा झाली. तेव्हा तोच स्वतः राजा झाला. तर मग आता त्याने कोणत्या पदवीची अभिलाषा धरावी? (४२९५)

तैसें जीवाचें करणे संपलें । पावावयाचें नाहीं उरलें ।
ऐसें समाधान में बाणलें । हेचि तृप्ति निरंकुशा ॥ ९६ ॥
त्याप्रमाणे जीवाचे करणे संपले. नवीन काही प्राप्त करायचे राहिले नाही. असे समाधान जेव्हा लाभते, तेव्हा त्याला निरंकुशा तृप्ती असे म्हणतात. (४२९६)

येर तृप्ति ब्रह्यापर्यंत । अतिशय असती बहुत ।
एक पाहतां एक विटत । ह्मणून ते सांकृश ॥ ९७ ॥
तशा ब्रह्मदेवाच्या पदापर्यंतच्या अनेक प्रकारच्या तृप्ती आहेत. परंतु त्या एकाहन एक वरचढ आहेत. एक तृप्तीचा प्रकार पाहिला की पहिल्या तप्तीला मन विटते. अशा प्रकारे उत्तरोत्तर तृप्तीचे प्रमाण वाढत राहते. पण प्रत्येकीचा वीट येत असल्यामुळे त्या तृप्ती सांकुश (मर्यादित, सबाध) आहेत. (४२९७)

तैशी तृप्ति हे नव्हे पूर्ण । अतिशय कोणी नसे इजहून ।
इजपुढे सर्व तृणासमान । यास्तव हे निरंकुशा ॥ ९८ ॥
ही पूर्ण तृप्ती त्या सांकुश तृप्तीसारखी नाही. हिच्यापेक्षा अधिक अशी दुसरी तृप्ती नाही. या तृप्तीपुढे इतर सर्व तृप्ती तृणासमान होत. म्हणून ही निरंकुशा तृप्ती होय. (४२९८)

एवं शोकभंग निरंकुशा तृप्ति । दोनी अवस्थारूप जीवन्मुक्ति ।
होत असती जीवाप्रती । अपरोक्षज्ञान जाहलिया ॥ ९९ ॥
अशा त-हेने शोकभंग आणि निरंकुशा तृप्ती अशा या जीवन्मुक्तीच्या दोन अवस्था होत. या दोन्ही जीवाला प्राप्त होऊ शकतात. त्यासाठी अपरोक्षज्ञान मात्र झाले पाहिजे. (४२९९)

आत्मयाचा शोक नाहीं भंगला । आणि आत्मया आत्मा नाहीं पावला ।
तस्मात उभय अवस्था जीवाला । जीवन्मुक्तीच्याही ॥ ४३०० ॥
आत्म्याला शोकच नसतो त्यामुळे त्याचा शोकभंग होण्याची शक्यता नसते. तसेच आत्म्याला आत्मा भेटण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्याच्या बाबतीत निरंकुशा तृप्तीचीही शक्यता नाही. त्यामुळे शोकभंग आणि निरंकुशा या जीवन्मुक्तीच्या दोन्ही अवस्था जीवालाच प्राप्त होतात. (४३००)

पूर्वी जीव मग सुटती । तये नांवें जीवन्मुक्ति ।
ऐशीच यथार्थ हे युक्ति । अनुभवसिद्ध ॥ १ ॥
आधी जीवदशा आणि नंतर सुटका म्हणून तिला जीवन्मुक्ती असे म्हणतात. ती तर्क आणि अनुभव या दोहोंनी यथार्थ ठरते. (४३०१)

अज्ञान आवरण विक्षेप तिजा । ह्या तीन अवस्था बंधकृत सहजा ।
जीवासीच असती सुखदुःखजा । अन्यथा नव्हे ॥ २ ॥
अज्ञान, आवरण आणि तिसरा विक्षेप या तीन अवस्था बंधनाच्या आहेत. या सुखदुःखांना जन्म देणाऱ्या अवस्था जीवालाच भोगाव्या लागतात. त्यात काही वेगळे होणार नाही. (४३०२)

तैसेंचि परोक्षापरोक्ष । उभय रीती ज्ञान प्रत्यक्ष ।
जीवासीच होतसे मोक्ष- । कारक सुखद ॥ ३ ॥
त्याचप्रमाणे परोक्ष आणि अपरोक्ष अशा दोन प्रकारचे ज्ञान जीवालाच प्रत्यक्ष होते. ते मोक्षदायक आणि सुखद असते. (४३०३)

शोकभंग निरंकुशातृप्ति । हे उत्तर अवस्था जीवन्मुक्ति ।
सविकल्पत्वें जीवरूप चिती । तत्संबंधी अवस्था ॥ ४ ॥
शोकभंग आणि निरंकुशातृप्ती या ज्ञानोत्तर अवस्था जीवन्मुक्तीच्या आहेत. सविकल्पत्वामुळे तत्संबंधीच्या अवस्था जीवरूप चितीच्या म्हणजे जीवरूप चिद्रपाच्याच आहेत. (४३०४)

अमुक एक म्हणावयाजोगें । निर्विकल्प ब्रह्म नसे अंगें ।
केवल निधरिंसी अभंगें । असंग अनिर्वाच्य ॥ ५ ॥
निर्विकल्प ब्रह्म अमुक एक असे म्हणण्याजोगे नाही, तर ते निश्चयपूर्वक अभंग, असंग आणि अनिर्वाच्य आहे. (४३०५)

पद : ब्रह्मैकं निर्विकल्पकम् ॥ १४ ॥
पदार्थ : ब्रह्म एकच निर्विकल्प आहे. ॥१४॥

केवल निर्विकल्प ब्रह्म । सहज पूर्णपणे आत्माराम ।
एवं या अवधारणे संभ्रम । नाहीचं अमुकसा ॥ ६ ॥
निखळ निर्विकल्पक असे ब्रह्म म्हणजे साहजिकच पूर्णपणे आत्मारामच आहे. या निश्चयामुळे तेथे कसल्याही प्रकारचा संशय नाहीच. (४३०६)

जेथें मायाचि हे नुद्भवे । तेथें कैंची असती जीवशिवें ।
वाउगीचि सर्वही रूपनांवें । उमटले रज्जुअहि ॥ ७ ॥
त्यामध्ये मुख्य मायादेखील उत्पन्न होत नाही, मग जीव आणि ईश्वर तरी कसे संभवतील? सर्वच रूपे आणि नावे ही रज्जु (दोरी) साप्रमाणे व्यर्थ (निरर्थक) आहेत. (४३०७)

तया भुजंगाचे जे विकार । रज्जूसी न स्पर्शती अणुमात्र ।
तैसे जीवधर्म हे अन्यथा प्रकार । निर्विकल्पी नसती ॥ ८ ॥
त्या सर्पाचे जे विकार असतील ते रज्जूला अणुमात्र देखील स्पर्श करत नाहीत. त्याप्रमाणे हे जीवधर्म आणि त्यांचे विविध निरर्थक प्रकार निर्विकल्प ब्रह्माच्या ठिकाणी अजिबात नसतात. (४३०८)

मायाचि नसतां उद्भवली । विद्या अविद्या कैशी जाहली ।
तयेविण प्रतिबिंबें पडलीं । जीवशिवांची कोठे ॥ ९ ॥
मायाच उद्भवली नसताना विद्या आणि अविद्या या तरी कशा उत्पन्न होतील? आणि मग त्यांच्या विना जीव शिवांची प्रतिबिंबे तरी कोठे पडतील. (४३०९)

कोठे ईशें जग निर्मिलें । भूतें भौतिक कधी जाहलें ।
पांचा खाणींमाजी प्रवेशलें । हे बोलणेंचि मिथ्या । ॥ १० ॥
मग ईश्वराने तरी जग कोठे निर्माण केले आहे? भूते आणि भौतिक पदार्थ तरी कधी झाले? आणि जीवांनीही पाच खाणींमध्ये प्रवेश केला, हे बोलणेही मिथ्या ठरत नाही काय? (४३१०)

प्रवेश जाहलियाही कवणासी । अज्ञान उद्भवे जे विस्मरे आपणासी ।
कैंचें आवरण उभयरूपेंसी । नास्ति न भाति ॥ ११ ॥
प्रवेशच झाला नाही तर मग विस्मरणरूप अज्ञान कसे उत्पन्न होईल? आणि मग आत्मा नाही हे असदावरण आणि आत्मा दिसत नाही हे अभानावरण ही दोन आवरणे तरी कशी असतील? (४३११)

कवणालागीं विक्षेप जाहला । कवणें देहाचा साभिमान घेतला ।
कवण पुण्यपाप करूं लागला । कोठे संचित सांचलें ॥ १२ ॥
मग विक्षेप तरी कोणाला होईल? आणि देहाचा अभिमान तरी कोणाला वाटेल? कोण पाप आणि पुण्य तरी कोण करील? आणि संचित कर्म तरी कुणाचे आणि कुठे साचलेले आहे? (४३१२)

जयाचे प्रारब्ध होऊनी । जीवासी भोग घडे नानायोनीं ।
उंच नीच मध्यस्थानीं । सुखदुःख भोगिलें ॥ १३ ॥
आणि संचिताचे प्रारब्ध होऊन जीवाला नाना उच्च, नीच, मध्यम योनीत सुखदुःखे कशी भोगावी लागतील? (४३१३)

हा वाउगाचि कल्पित भ्रम । सविकल्पत्वें खरें कैंचें रूपनाम ।
तरी लय अथवा जो उपक्रम । जाहला हे वचन मिथ्या ॥ १४ ॥
हा सगळा व्यर्थ कल्पित भ्रम आहे. रूप नाम हे सविकल्पत्वामुळे असल्याने त्यांना खरेपणा कसा असेल? तेव्हा लय झाला असावा अथवा उत्पत्ती झाली, हे बोलणेही खोटे ठरते. (४३१४)

भ्रमेंकडून जें जें जाहलें । तें काय खरेपणे उद्भवलें ।
तेणें अमुक अमुक कर्म केलें । तें भोगितां न चुके ॥ १५ ॥
जी गोष्ट भ्रमामुळे झालेली असते ती खरेपणाने उद्भवली असे कसे होईल? त्या भ्रमोत्पादित जीवाने अमुक अमुक कर्म केले ते आता भोगल्याशिवाय चुकणार नाही. ही भाषाही व्यर्थ आहे. (४३१५)

सर्प हा कधी खरा जाहला । तेणें अमुकसा डसून मारिला ।
तो बागुलें येऊन उठविला । क्रीडे गंधर्वनगरी ॥ १६ ॥
दोरीच्या जागी भासलेला सर्प कधी खरा असतो काय? त्याने अमक्याला दंश केला आणि त्यामुळे तो मृत्यू पावला, त्या मृत व्यक्तीला बागुलबुवाने येऊन जिवंत केले, मग ती व्यक्ती गंधर्व नगरीत (आकाशातील ढगांच्या आकृतींनी तयार झालेले दृश्य) खेळायला गेली. (४३१६)

तैसें जीवत्वचि नाहीं निर्माण । तरी कवणासी अज्ञान आवरण ।
कवणा विक्षेपरूप साभिमान । कवण जन्मे मरे ॥ १७ ॥
या गोष्टी जशा खोट्या आहेत त्याप्रमाणे जीवत्वच मुळात निर्माण झालेले नाही, तर मग अज्ञान, आवरण या उपाधी कोणाला होतील? विक्षेपरूप अभिमान कोणाला असेल? कोण जन्मणार आणि कोण मरणार? (४३१७)

ऐसा बंधचि नाहीं पावला । तेथें गुरु बागुल कैंचा आला ।
अज्ञानासह जन्ममृत्यु चुकविला । उतरिला रज्जुसर्प ॥ १८ ॥
असा बंधनातच कोणी सापडला नाही तेथे सगुरू काय, नि बागुलबुवा काय कोठून येतील? किंवा अज्ञानासह जन्म मृत्यू यांचा संबंध चुकविला आणि रज्जुसर्याच्या दंशाचे विष उतरविले. (४३१८)

पुढें तो जीवन्मुक्त होऊनी । विचरे गंधर्वनगरजनस्थानीं ।
हें उगेंचि बोलणे होपळपणीं । बंधमुक्तीचे ॥ १९ ॥
पुढे तो जीवन्मुक्त होऊन गंधर्वनगररूपी जनस्थानात संचार करू लागला. या प्रकारचे बंधन आणि मोक्ष या विषयीचे बोलणे निष्फळ ठरते. (४३१९)

हे जीवासी वास्तविक नसती । तरी ब्रह्मात्मत्वीं कैंची वदंती ।
सासी नसतां गमनादि विकृति । तरी रज्जूसी कैंच्या ॥ २० ॥
बंध अथवा मुक्ती या गोष्टी जीवाला वास्तविक पाहता नाहीतच. मग ब्रह्मात्म्याच्या बाबतीत कोठन असतील? मुळात भासमान सर्पाच्या येणे जाणे या विकती नाहीत. मग त्या दोरीच्या ठिकाणी कशा असतील? (४३२०)

आत्मया ब्रह्मासी कैंचा देह । कैंचा अज्ञान आवरणाचा संदेह ।
कैंचा सुखदुःखाचा समूह । विक्षेपरूप ॥ २१ ॥
ब्रह्मात्म्याला देह कसा असेल? (तो निर्गुण निराकार आहे.) त्याला अज्ञान आवरण यांची भीती कशी असेल? आणि विक्षेपरूप सुखदुःखांचा समुदाय तरी त्याला कसा बाधेल? (४३२१)

या संघामाजीं आत्मा ब्रह्म । कधीं जाजावला पावून भ्रम ।
त्रिविधता तापला परम । अनुतापही कधी जाहला ॥ २२ ॥
ब्रह्मात्मा देहादि समुदायामध्ये भ्रम पावून कधी त्रासला असेल? त्रिविध तापांनी (आधिभौतिक, आध्यात्मिक आणि आधिदैविक) अतिशय होरपळल्यामुळे पश्चाताप होण्याची पाळी त्याच्यावर कधी आली असेल? (४३२२)

तेणें साधनचतुष्टयता । अधिकार जो उद्भवला पाहतां ।
तो ब्रह्मात्मयासी नसे तत्त्वतां । शरणही न रिघे ॥ २३ ॥
ब्रह्मात्म्याच्या ठिकाणी पश्चाताप आणि साधनचतुष्टय संपन्नता (नित्यानित्य वस्तुविवेक, इहामुत्रफल भोग विरक्ती, शमादिषट्क संपत्ती, आणि मुमुक्षुत्व) इ. नी येणारा अधिकार ही असत नाही, तसेच ज्ञानप्राप्तीसाठी तो कुणालाही शरण येत नाही. (४३२३)

ब्रह्मात्मा गुरुत्वही न धरी । तरी केवीं होईल मोक्षाधिकारी ।
सेव्यसेवकत्वाची कैंची परी । तस्मात् गुरुशिष्य कैंचे ॥ २४ ॥
किंवा ब्रह्मात्मा स्वतःकडे गुरुत्वही घेत नाही. मग त्याला मोक्षाचा अधिकार तरी कसा येणार? त्याच्या ठिकाणी सेव्य आणि सेवक अशा संबंधाचाच अभाव आहे. तेव्हा गुरुशिष्यभाव तरी कसा असेल? (४३२४)

सद्गुरुनाथें जो बोध केला । की तूं प्रत्यक्ष ब्रह्मात्मा पाहिला ।
हे न घडेचि ब्रह्मात्मयाला । कवणेही काळीं ॥ २५ ॥
सदगुरूनाथांनी जो उपदेश केला होता की, 'तू ब्रह्मात्मा पाहिला आहेस.' पण ब्रह्मात्म्याच्या बाबतीत प्रत्यक्ष पाहिला असा विचार कधीही लागू होत नाही. (४३२५)

ब्रह्म आहेसें परोक्षज्ञान । ब्रह्मात्मया नाहीं जाहलें पूर्ण ।
तेणें केलेंही नाहीं विवेचन । पंचकोशादिकांचे ॥ २६ ॥
'ब्रह्म आहे' असे परोक्षज्ञान ब्रह्मात्म्याला होत नसते. त्याने पंचकोश इ.चे विवेचनही कधी केलेले नसते. (४३२६)

तो मंदप्रज्ञ ना तीव्रतर । तो अभ्यास आणि न करी विचार ।
तेणें लयसाक्षीचा साक्षात्कार । नाहींच जाणिला ॥ २७ ॥
तो मंदप्रज्ञ वा तीव्रतरप्राज्ञही नसतो. तो अभ्यास करीत नाही तसाच विचारही करत नाही. तो लयसाक्षित्वाचा साक्षात्कारही अनुभवत नाही. (४३२७)

तो समाधिस्थ नाहीं बैसला । तो समाधान नाहीं पावला ।
तेणें साभिमानचि नाहीं घेतला । अहंब्रह्मास्मीचा ॥ २८ ॥
तो समाधिस्थ होऊन कधी बसत नाही. तो समाधानही प्राप्त करत नाही किंवा 'अहं ब्रह्मास्मि' असा अभिमानही तो घेत नाही. (४३२८)

पुन्हां उत्थान तो कधीं पावे । समाधिसुखें सुखीच न व्हावें ।
तरी जीवन्मुक्तीचे सुख भोगावें । कासयाचें तेणें ॥ २९ ॥
समाधीचा अनुभवच घेत नाही तर त्याला समाधीतून उत्थानही कसे असेल? समाधीचे सुखही त्याला मिळत नाही तर मग जीवन्मुक्तीचे सुखही तो कसा भोगेल? (४३२९)

कैंचा शोक ब्रह्मात्मयासी । नाशिता जाहला त्या अपरोक्ष ज्ञानासी ।
कवण पावला कोणते साध्यासी । तरी कृतकृत्यता कैंची ॥ ३० ॥
ब्रह्मात्म्याला शोक कसा असेल? त्याच्या त्या अपरोक्षज्ञानाचा नाश कोण करील? (कोणीच करू शकणार नाही.) कोणाला कोणते साध्य गाठता आले? (कोणालाही नाही.) मग कृतकृत्यता तरी कशी वाटेल? (ब्रह्माच्या ठिकाणी साध्य, कृतकृत्यता या गोष्टी संभवतच नाहीत.) (म्ह. ब्रह्मात्म्याला साध्य असे काहीच नसते) आणि मग त्याला कृतकृत्यता तरी कशी असेल? (४३३०)

जीवन्मुक्ति विदेहस्थिति । अलिप्तपणा कैवल्यमुक्ति ।
सहजस्थिति नित्यमुक्ति । निर्विकल्पा केवीं ॥ ३१ ॥
जीवन्मुक्ती, विदेहस्थिती, अलिप्तपणा, कैवल्यमुक्ती, सहजस्थिती, नित्यमुक्ती या अवस्था निर्विकल्प ब्रह्मात्म्याला कशा असतील? (४३३१)

ऐक्यभक्ति समाधान । असंगस्थिति सहजपण ।
हे कोणतेंचि अमुक ह्मणून । ह्मणे कोण निर्विकल्पा ॥ ३२ ॥
ऐक्यभक्ती, समाधान, असंगस्थिती, सहजपण, यांपैकी ब्रह्मात्म्याच्या ठिकाणी अमुक अवस्था आहे असे कोण सांग शकेल? (४३३२)

केवळपणे आदि अंती । तेवींच मध्ये सच्चिन्मूर्ती ।
निर्विकल्प जेथें वदती । सविकल्पत्वें कैंची ॥ ३३ ॥
आदी, अंती आणि मध्ये सच्चिन्मूर्ती ब्रह्म केवळपणाने म्हणजे एकटे होते. ते निर्विकल्प असल्यामुळे त्याच्या ठिकाणी सविकल्पता कशी असेल? (४३३३)

हें जें जें बोलणे पडे । तें तें स्फूर्तीपासून ऐलीकडे ।
तें तें शोभत असे कोडें । यया सविकल्पासी ॥ ३४ ॥
अशा प्रकारे आपण जे जे बोलू ते ते सर्व स्फूर्तीपासून अलीकडचेच (म्हणजे भायिकच) असते ते या सविकल्पालाच शोभून दिसते. (४३३४)

मिथ्यासी मिथ्यात्वें सकळिक । बोलिजे जें जें आवश्यक ।
तें तें सर्वही सहेतुक । सविकल्पा साजे ॥ ३५ ॥
मिथ्या पदार्थांबद्दल मिथ्यात्वानेच आवश्यक तेवढे जे जे बोलू ते ते सर्वही सहेतुक सविकल्पालाच शोभते. (४३३५)

रविदत्ता हें जें निरूपण इतुकें । निवडिलें सविकल्प निर्विकल्पाचें निकें ।
याचा हेतु सावधान ऐकें । बोलिजे संक्षेपें ॥ ३६ ॥
रविदत्ता, हे जे आतापर्यंतचे निरूपण झाले त्यामुळे सविकल्प आणि निर्विकल्प यांचा निवाडा केला. याचा हेतू सावधान होऊन ऐक, ते संक्षेपाने सांगतो. (४३३६)

तुज वाटलें लय साक्षीचें । ज्ञान अपरोक्षं होतां साचें ।
निर्विकल्पचि उरावें सविकल्पाचें । उत्थान न व्हावें ॥ ३७ ॥
तुला असे वाटते की, लयसाक्षीने ज्ञान अपरोक्ष झाले. आता निर्विकल्पच कायम राहावे आणि सविकल्पाचे उत्थानच होऊ नये. (४३३७)

तरी तें निर्विकल्प जैसें पूर्ण । तयासी निर्विकल्प न करी कवण ।
तरी तें सविकल्पत्वें पावले उत्थान । हेचि तुजला भ्रांति ॥ ३८ ॥
तर मग जे पूर्णपणे निर्विकल्प आहे, त्याला निर्विकल्प न व्हावे असे कोण करतो? अर्थात कोणीही त्याच्या निर्विकल्पत्वाला विरोध करील असे नसते. तर सविकल्पत्वाने त्याचे उत्थान होते. हाच तुझा भ्रम आहे. (४३३८)

तो निर्विकल्प ब्रह्मात्मा तूं खरा । अससी एकरूप निर्धारा ।
परी त्वां मानिलें मी म्हणोनी येरा । तो तूं आभासरूपी ॥ ३९ ॥
तो निर्विकल्प ब्रह्मात्मा खरे तर तूच आहेस. तू असा एकरूप असताना भलत्याच गोष्टीला मी म्हणून समजलास. तो जो भलता आहे तो तर निव्वळ आभास आहे. (४३३९)

तया अभासरूप सविकल्पानें । सुखदुःख भोगिलें वेगळेपणे ।
तेणेंचि अभ्यास विचारें वोळखणें । लयसाक्षी निर्विकल्प ॥ ४० ॥
तो आभासरूप सविकल्प वेगळा राहन सुखदुःखे भोगतो. त्याच जीवाने अभ्यासाने आणि विचाराने निर्विकल्प लयसाक्षी ओळखावा. (४३४०)

बहुतां दिवसां या सविकल्पासी । निर्विकल्प अखंडैकरसीं ।
मिळणी जाहली प्रतीती ऐशी । सविकल्पत्यागें ॥ ४१ ॥
मग पुष्कळ दिवसांनी या सविकल्पाला सविकल्पाच्या त्यागाने (विकल्पांच्या त्यागाने) अखंडैकरस, निर्विकल्प अशा ब्रह्मात्म्याची भेट होते, असा अनुभव आहे. (४३४१)

हें इतुकेंही ईशादि तृणान्त । मिथ्यात्वें त्यागिलें येणें समस्त ।
ह्मणिजे हे मी नव्हेचि संशयरहित । तें निर्विकल्प आहे स्वयें ॥ ४२ ॥
हे सगळे ईश्वरापासून ते गवतापर्यंतचे सर्व मायेपासून निर्माण झालेले जे जग त्याचा तो संशयरहित झालेला जीवात्मा हे मी नव्हे', मी स्वतः निर्विकल्प आहे' अशा दृढ विश्वासाने त्याग करतो. (४३४२)

बहुत दिन नवतें कळलें । तें माझें मज गुरूने दिधलें ।
तेणें आनंदें पुन्हां उफाळलें । जें सविकल्प रूप तेंची ॥ ४३ ॥
"मला पुष्कळ दिवस हे कळत नव्हते. पण माझ्या सद्गुरूंनी हे माझे मला प्राप्त करून दिले." असा आनंद त्याला होतो. त्या आनंदाने जे उफाळून येते तेही सविकल्पच असते. (४३४३)

निर्विकल्प नाहीं विकारलें । निर्विकल्पत्वेंचि असे संचलें ।
तें निर्विकल्प सविकल्पाकार जाहलें । वाटे तेचि भ्रांति ॥ ४४ ॥
निर्विकल्पाला विकार होतच नाही. ते निर्विकल्पत्वानेच सर्वत्र दाटून राहिले आहे. ते निर्विकल्पच सविकल्पाकार झाले असे जे वाटते, तो भ्रम होय. (४३४४)

अरे जेधवां या सविकल्परूपासी । अज्ञान होतें वेगळेपणेंसी ।
तेव्हांचि सविकल्पत्व तुज निर्विकल्पासी । किमपि आलें न होतें ॥ ४५ ॥
अरे ज्यावेळी सविकल्परूप अशा तुला वेगळेपणामुळे अज्ञानाने घेरले होते, त्यावेळी सुद्धा तू जो निर्विकल्प होतास त्याला किंचितसुद्धा सविकल्पत्व आले नव्हते. (४३४५)

तें आतां अपरोक्ष ज्ञान जाहलिया । सविकल्प जाहलें हे बोलणें वायां ।
तस्मात् हाचि भ्रम ऐसा टाकोनियां । सविकल्पता सांडी ॥ ४६ ॥
आणि आता अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतरही ते सविकल्प झाले, असे बोलणे व्यर्थ आहे. (निरर्थक आहे) म्हणून हा भ्रम टाकून सविकल्पतेचा त्याग कर. (४३४६)

आहेसी जैसा आदिअंतीं । तैसाचि मध्येही सहजगती ।
त्या रीतींच वोळखी आपणाप्रती । नवी कृति कासया ॥ ४७ ॥
तू आदि, अंती जसा आहेस तसाच मध्ये सुद्धा आहेस. आपण तसेच आहोत याच भावनेने स्वतःला ओळख. त्यासाठी वेगळी कृती करण्याची गरज नाही. (४३४७)

तेंही वोळखी ऐसें ह्मणता । निर्विकल्प वोळखीना तत्त्वतां ।
निर्विकल्प सविकल्पेंचि जाणतां । समाधान बाणतें ॥ ४८ ॥
ते ओळख असे म्हटले खरे. पण निर्विकल्प असे काही ओळखत नसते सविकल्पानेच निर्विकल्प जाणायचे असते. तसे केल्याने त्याच्या ठिकाणी समाधान आपोआप बाणते. (४३४८)

सविकल्पासीच होते अज्ञान । तयासीच निर्विकल्प मी ह्मणून ।
जाहलें असे अपरोक्ष ज्ञान । तस्मात् तयासीच कळावें ॥ ४९ ॥
खरे तर अज्ञान सविकल्पालाच झाले होते. त्यालाच 'मी निर्विकल्प आहे' असे जे अपरोक्ष ज्ञान होते ते त्यालाच (सविकल्पालाच) कळले पाहिजे. (४३४९)

तेणेंचि अज्ञानें देहाभिमान । घेऊन पावलें होतें बंधन ।
तरी तेणेंचि घेतां अहंब्रह्म ह्मणून । मुक्त होय तेंची ॥ ५० ॥
त्यानेच अज्ञानाने देहाभिमान घेऊन बंधन स्वीकारले होते. आता तोच 'अहं ब्रह्म' असा अभिमान घेऊन मुक्त होतो. (या दोन्ही सविकल्पाच्याच आहेत.) निर्विकल्प बंधन आणि मुक्ती यांच्या पलीकडचे असते. (४३५०)

अहंब्रह्मास्मीचा संकल्प । चंचळरूपं घेतसे सविकल्प ।
परी निर्विकल्प तें निर्विकल्प । अल्प चंचळेना ॥ ५१ ॥
हा अहंब्रह्मास्मिचा संकल्प सविकल्पच चंचलपणा (सविकल्पता) घेऊन करत असते. पण निर्विकल्प ते निर्विकल्पच. ते मुळीच चंचळ होत नाही. (४३५१)

तस्मात् चंचळे चंचळपणा घेऊनी । मुक्त जाहला बंधनापासोनी ।
आणि निर्विकल्पाची तों हानि किमपि नसे ॥ ५२ ॥
त्यामुळे चंचल तत्त्वाने चंचलपणा घेऊन पुढे बंधनातून मुक्ती प्राप्त केली यात निर्विकल्पाची थोडीसद्धा हानी झाली नाही. ते अढळच असते. (४३५२)

आपुलें निर्विकल्पत्व न मोडे । आणि सविकल्पा महत लाभ जोडे ।
तरी तो सुखें होईना कोडें । काय गेलें तुझें । ॥ ५३ ॥
आपले निर्विकल्प मोडू न देता सविकल्पास मोठा लाभ होत आहे. तर तो सुखाने होऊ दे ना! त्यात तुझे काय नुकसान आहे? (४३५३)

निर्विकल्पासी त्वां निर्विकल्प । अभ्यासें केलें नाहीं अल्प ।
तें पाहिलेंचि असंभाव्य अमुप । परीपूर्ण जैसे तैसें ॥ ५४ ॥
निर्विकल्पाला तुझ्या अभ्यासाने तू निर्विकल्प केले नव्हतेस. ते पहिल्यापासूनच अफाट सर्वव्यापी आणि जसेच्या तसेच परिपूर्ण आहे. (४३५४)

आतां अभ्यासें या सविकल्पासी । स्थिर करून बहु सायासीं ।
निर्विकल्प आणिलें प्रतीतीसी । की लयसाक्षी अहंब्रह्म ॥ ५५ ॥
आता अभ्यासाने या सविकल्पाला पुष्कळ प्रयत्न करून स्थिर केल्यानंतर निर्विकल्पाचा अनुभव घेतला. आणि लयसाक्षी म्हणजेच परब्रह्म हेही प्रत्ययास आले. (४३५५)

तेणेंचि निर्विकल्प जाणिल्याविण । अनुभविलें लयसाक्षीरूप ज्ञान ।
तत्क्षणी तेथें होतें तेंचि होऊन । आपुले विकल्पत्यागें ॥ ५६ ॥
त्या सविकल्पाने निर्विकल्पाचा त्रिपुटीरहित अनुभव घेतला आणि लयसाक्षीरूप ज्ञानही मिळविले आणि त्याच क्षणी सर्व विकल्पांचा त्याग करून जे वास्तवात होते तेच होऊन राहिले. (४३५६)

तेंचि होऊन जरी असिलें । तरी तें त्रिपुटीविण अनुभविलें ।
तें अनुभवणे सविकल्पाकडे आलें । निर्विकल्प नव्हे ॥ ५७ ॥
तेच होऊन जरी ते राहिले असले तरी त्याने घेतलेला अनुभव पूर्णपणे त्रिपुटीरहित होता. अनुभवणे ही क्रिया सविकल्पाची असते. निर्विकल्पाचा त्यात काही सहभाग नसतो. (४३५७)

हा मी लयसाक्षी निर्विकल्प । न कळोनि कळे जरी अल्प ।
तरी तें सविकल्पाचेंचि रूप । उत्थानी अनुमानिजे ॥ ५८ ॥
हा मी लयसाक्षी निर्विकल्प आहे असा कळण्यावाचून थोडा जरी कळला तरी सामान्यपणे तो सविकल्पच असतो हे वृत्तीच्या उत्थानावरून अनुमानाने कळते. (४३५८)

वृत्तीचे उत्थान होय जेधवां । तो समय आठवीतसे तेव्हां ।
की मी निर्विकल्पचि स्वभावा । ऐक्यत्वे हा काळ होतो ॥ ५९ ॥
जेव्हा वृत्तीचे उत्थान होते तेव्हा समाधिकालाची आठवण होते आणि साधक विचार करतो की, एवढा एवढा काळ मी निर्विकल्पच होतो. (४३५९)

ऐसा उत्थानी प्रत्यय होतां । तेव्हां ते समयीं असे अनुभविता ।
तोचि सविकल्प सामान्यता । असे तत्समयी ॥ ६० ॥
असा अनुभव उत्थानात आल्यानंतर असे लक्षात येते की त्या समाधिकाळात कोणीतरी अनुभवणारा होता. त्या काळी तोच सामान्यत्वाने सविकल्प होता. (४३६०)

तये समयीं असल्याविण । उत्थानीं नव्हे तेथींची आठवण ।
परी तो सविकल्पसा नव्हे असून । लीनत्वें होता ॥ ६१ ॥
त्या काळी मी असल्यावाचून उत्थानकाळी त्या समाधिकालीन निर्विकल्पाची आठवणच झाली नसती. पण तो असला तरी तो सविकल्पासारखा नव्हता. तो तेथे लीनत्वाने होता. (४३६१)

ऐसा जो लीनत्वें सामान्यता । निर्विकल्पाचा निर्विकल्पें अनुभविता ।
तोचि सविकल्प असे तत्त्वतां । हेतु उत्थानाचा ॥ ६२ ॥
असा जो सामान्यत्वाने लीन होता, निर्विकल्पाचा निर्विकल्पानेच अनुभवणारा होता, तोच वास्तविक पाहता सविकल्पच होता. आणि तोच उत्थानाला कारणीभूत होता. (४३६२)

तेणें निर्विकल्याची काय जे गोडी । घेत असतां अति आवडी ।
तेणेंचि उफाळली वृत्ति उघडी । विशेषे उत्थानीं ॥ ६३ ॥
तो निर्विकल्पाची जी काय गोडी असेल ती अतिशय आवडीने घेत होता. त्या योगानेच उत्थान दशेत वृत्ती विशेषत्वाने उसळली. (४३६३)

वृत्ति उसळतांचि मन बुद्धि । उठली घेऊनि अहंब्रह्मशुद्धि ।
सर्व आनंदली परमानंदी । तेणें हेलवती ॥ ६४ ॥
वृत्ती उसळताच मन, बुद्धी ही 'अहं ब्रह्मास्मि' या अनुभवाचा शोध घेत उत्पन्न झाली. सर्वांनाच परम (श्रेष्ठ) आनंद झाला. ती इंद्रिये त्यामुळे हेलावून गेली. (४३६४)

परी ते बुद्धि या देहादिकां । मी ह्मणूनि नेघे कुतर्का ।
अहंब्रह्मचि निश्चय करी निका । जो मुक्तीसी कारण ॥ ६५ ॥
पण ती बुद्धी देहादिकांना 'मीच' अशा कुतर्काने स्वीकारत नव्हती. ती 'अहं ब्रह्म' असाच निश्चय करत होती. असा निश्चयच मुक्तीला कारणीभूत असतो. (४३६५)

तस्मात् देहबुद्धीचा जो अभिमान । तेणेंचि जीवासी होते बंधन ।
तेंचि तुटलें अकस्मात् घेतां भान । अहंब्रह्मास्मीचें ॥ ६६ ॥
म्हणून देहबुद्धीचा जो अभिमान जीव बाळगत असतो. त्यामुळेच जीवाला बांधन प्राप्त होत असते. ते बंधन 'अहं ब्रह्मास्मि'चे भान येताक्षणीच अकस्मात तुटते. (४३६६)

ऐसा सविकल्प तुझिया ज्ञानें । मुक्त जाहला निर्विकल्प साभिमानें ।
तूं जैसा तैसा पूर्णपणे । हालवाल नाहींसी ॥ ६७ ॥
तुझ्या या ज्ञानामुळे आणि तुझ्या निर्विकल्पासंबंधीच्या अहंभावनेमुळे तुझ्या सविकल्पाला (जीवाला)

क्षणभरी सविकल्पचि निश्चळ । होऊनि मागुतीं जाहलें चंचळ ।
तूं जैसा तैसाचि पूर्ण केवळ । असतां होईना सुखें ॥ ६८ ॥
मुक्ती मिळाली. यामध्ये तू जो कोणी आहेस तो जसाच्या तसाच जरादेखील न हलता पूर्णपणे निर्विकार राहिला आहेस. (४३६७)

आणीक एक तुज शंका वाटे । की सविकल्प रोधोनि बळें नेटें ।
केलें होतें निर्विकल्प गोमटें । तरी तैसा कां न स्थिरावे ॥ ६९ ॥
जो काही बदल झाला तो सविकल्पाच्या ठिकाणी. ते सविकल्प क्षणभर निश्चळ होऊन नंतर लगेच चंचळ होते. तू मात्र जसाच्या तसाच केवळ पूर्ण असा निर्विकार असतोस. त्या सविकल्पाची ही परिवर्तने खुशाल होऊ देत ना! तुझे त्यात काय नुकसान आहे? (४३६८)

तेणें भ्रमेंचि बहु दुःख भोगिलें । तयासी अति विश्रांतिस्थळ मिळाले ।
तरी तेथेंचि निवांत कां नाहीं जाहलें । पावलें कां विकार ॥ ७० ॥
तुला आणखी एक शंका वाटत असेल. ती अशी की, आपण सविकल्पाचे एवढ्या परिश्रमाने निरोधन करून इष्ट ते निर्विकल्प साध्य केले होते, मग ते तसेच स्थिर का राहू नये? (४३६९)

महत् लाभ तरी यासी जाहला । तरी तो त्यागून कां उफाळला ।
तैसाचि तेथें कां नाही राहिला । सखरूपपणे ॥ ७१ ॥
त्या भ्रमामुळेच मी पुष्कळ दुःख भोगले. आता कुठे त्या निर्विकल्पाला एक विश्रांतिस्थळ मिळाले होते, पण ते तेथेच निवांत होऊन का राहात नाही? त्याच्यात विकार का निर्माण झाला? (४३७०)

तरी याचे अवधारी उत्तर । हा स्वभावचि वृत्तीचा निरंतर ।
वेगें उसळूनियां झडकर । मावळावें तत्क्षणीं ॥ ७२ ॥
वास्तविक पाहता त्याला मोठा लाभ झाला होता. पण त्याचा त्याग करून ते पुन्हा का बरे उफाळून वर आले? त्याच (निर्विकल्पाच्या ठिकाणी) सुखरूपणे का बरे राहिले नाही? (४३७१)

वृत्ति उठतां मन बुद्धि उठती । तया विकल्पें इंद्रियांच्या विकृति ।
होवोनि सुखदुःखें सर्व भोगिती । प्रारब्धानुकार ॥ ७३ ॥
तर याचे उत्तर आता ऐक. वृत्तीचा हा नेहमीचाच स्वभाव आहे. ती वेगाने उसळून उठते आणि तत्क्षणीच लोपही पावते. (४३७२)

हा प्रारब्धाचाही बळात्कार । वोढोनि काढी असतांही स्थिर ।
सुषुप्तींतून जैसे सर्व नर । बळे येती जागरा ॥ ७४ ॥
मग वृत्ती उठताच मन बुद्धीही उत्पन्न होतात. त्यांच्या विकल्पाने इंद्रियांचे विकार (विकृती) होऊन जीव प्रारब्धानुसार सुखदुःखे भोगतात. (४३७३)

असो जरी उत्थान पावलें । परी तें बाधक नव्हे जरी भोगिलें ।
मी देह ह्मणून साभिमाने घेतलें । तरीच बाधक ॥ ७५ ॥
ज्याप्रमाणे सर्व माणसे झोपेत असताना बळेच जागृतावस्थेत ओढली जातात. त्याप्रमाणे हा प्रारब्धाचा बलात्कार (बळजबरी) आपण स्थिर झालो असताही ओढून काढतो. (४३७४)

अहंब्रह्मास्मि अभिमान घेतां । देहबुद्धीचे होतसे घाता ।
याकरितांचि विस्मृति न पडतां । स्फुरावें अहंब्रह्म ॥ ७६ ॥
असू त, सविकल्प जरी उत्थान पावले तरी ते बाधक नसते. तेव्हा सविकल्पाचा अनुभव घेतल्याने काही बिघडत नाही. अशा वेळी 'मी देह आहे' असा अभिमान बाळगला तरच ते बाधक ठरते. (४३७५)

येथेही तूं संशय मानिसी । की ब्रह्म अभिमान होतां वृत्तीसी ।
विघ्नचि असे देहबुद्धि जैशी । समाधाना भंग ॥ ७७ ॥
याउलट मी ब्रह्म आहे' (अहं ब्रह्मास्मि) असा अभिमान बाळगला तर देहबुद्धीचाच विनाश होईल. म्हणूनच विस्मृती होऊ न देता (न विसरता) 'अहं ब्रह्म' असे स्फुरण होणे आवश्यक आहे. (४३७६)

तरी यथार्थ ज्ञान जाहलियावरी । केवळ सत्याचा अभिमान धरी ।
जें निर्विकल्प लयसाक्षी निर्धारी । तें मी ह्मणे अहंब्रह्म ॥ ७८ ॥
आता तू संशय घेशील की, वृत्तीला आपण ब्रह्म असल्याचा अभिमान झाला तर देहबुद्धीप्रमाणेच हेही विघ्नच ठरेल. त्यामुळे होत असलेले समाधान नष्ट होईल. (४३७७)

जोवरी लयसाक्षीज्ञान न कळे । आणि अहंब्रह्म म्हणोनि उफाळे ।
तें भाविलें होतें अज्ञानबरळें । वृत्ति की शून्यब्रह्म ॥ ७९ ॥
तर यावर असे सांगणे आहे की, यथार्थ ज्ञान झाल्यावर जो अभिमान बाळगशील तो केवळ सत्याचाच अभिमान असेल. जे निर्विकल्प लयसाक्षी ब्रह्म आहे ते मीच आहे असा 'अहं ब्रह्म' या अभिमानाचा अभिप्राय आहे. (४३७८)

याची नांवें अयथार्थ । कळलेंचि नाहीं ब्रह्म यथार्थ ।
जरी अहंब्रह्मास्मीचा घेतां अर्थ । व्यर्थचि जाय ॥ ८० ॥
अद्याप लयसाक्षीज्ञान झाले नाही तरी त्यापूर्वीच 'अहं ब्रह्म' म्हणून वृत्ती उफाळून येत असेल तर ते अज्ञानी माणसाचे वेडे कृत्य ठरेल. आणि वृत्ती शून्यालाच ब्रह्म मानीत होती, असे निष्पन्न होईल. (४३७९)

जैसें देहादिकां ब्रह्मत्व नसे । शून्य की वृत्तीसी अब्रह्मत्व तैसें ।
देहासी ब्रह्म ह्मणून जरी घेतसे । तरी बंधन न चुके ॥ ८१ ॥
याचेच नाव अयथार्थ ज्ञान होय. कारण खरे ब्रह्मच कळले नाही. जीवाने 'अहं ब्रह्मास्मि' असा अभिमान घेतला तरी तो व्यर्थच ठरेल. (४३८०)

तैसेंचि शून्यासी की वृत्तीसी । ब्रह्म ह्मणून कल्पना ऐशी ।
तेणें घोकितां अहंब्रह्मास्मीसी । फळ कदां नव्हे ॥ ८२ ॥
ज्याप्रमाणे देहादिकांना ब्रह्मत्व नसते, त्याप्रमाणे वृत्तीला भासणाऱ्या शून्याला ब्रह्मत्व नसते. आणि देहालाच ब्रह्म म्हणून मानले तरी त्यामुळे बंधन चुकणार नाही. (४३८१)

तस्मात् न कळतां लयसाक्षीब्रह्म । अहंब्रह्मास्मिही बाधक परम ।
तेंचि कळतां यथार्थ वर्म । साभिमानचि मुक्त करी ॥ ८३ ॥
त्याप्रमाणेच शून्याला किंवा वृत्तीला ब्रह्म अशी कल्पना केली तर त्या जीवाने 'अहं ब्रह्मास्मि'चा जरी जप केला तरी त्याला फळ प्राप्त होणार नाही. (४३८२)

याचि हेतू संत सज्जन । बोलताति हें यथार्थ वचन ।
की जो सत्याचा साभिमान । तो निरभिमान जाणावा ॥ ८४ ॥
त्यामुळे लयसाक्षी ब्रह्म कळले नसताना 'अहं ब्रह्मास्मि' असे मानणेही अतिशय बाधक ठरेल. पण ते खरे वर्म कळल्यावर 'अहं ब्रह्मास्मि' असा अभिमानदेखील मुक्त करू शकतो. (४३८३)

तस्मात् अहंब्रह्मास्मि विशेष वृत्ति । घेतली पाहिजे साधकं निश्चित्तीं ।
तरीच क्षीण होईल अवगति । हे देहबुद्धिरूप ॥ ८५ ॥
याच कारणाने संत सज्जन असे यथार्थ वचन सांगतात की, सत्य गोष्टीबद्दलचा अभिमान, हा अभिमान असला तरी तो निरभिमान (अभिमानाचा अभाव) समजावा. (४३८४)

जरी लयसाक्षीज्ञान जाहलें । आणि अहंब्रह्म नाहीं स्फुरलें ।
तरी देहबुद्धीसी क्षीणत्व आलें । न घडे सहसा ॥ ८६ ॥
म्हणून साधकाने 'अहं ब्रह्मास्मि'चा विशेष अभिमान अवश्य धरावा. त्यामुळे देहबुद्धिरूप दुरवस्था क्षीण होईल. (४३८५)

या वृत्तीसी देहबुद्धि कैशी । सदृढ जाहली नुच्चारितां जैशी ।
ब्रह्मबुद्धिही व्हावी तैशी । तरीच निःसंशय ॥ ८७ ॥
जरी लयसाक्षी ज्ञान झाले आणि 'अहं ब्रह्मास्मि' चे स्फुरण झाले नाही, तर देहबुद्धी सहसा क्षीण होत नाही. (४३८६)

हें निरूपण पुढे असे । विस्तारें तें कळेल आपैसें ।
परी दृढ समाधान जें ऐसे । तें खलिल्याविण नव्हे ॥ ८८ ॥
आपल्या वृत्तीला काही उच्चार न करताही देहबुद्धी कशी पक्की झालेली असते त्याप्रमाणेच ब्रह्मबुद्धी देखील तितकीच दृढ व्हावी, म्हणजे मग संशयाला जागा राहात नाही. (४३८७)

वृत्तीसी खल तो हाचि ऐसा । अहंब्रह्मास्मीचिया उल्हासा ।
विस्मरचि न पडावा सहसा । साभिमानही घ्यावा ॥ ८९ ॥
यासंबंधीचे निरूपण पढे येणारच आहे. पढे ते आपोआप विस्ताराने कळेलच. परंतु दृढ समाधान वृत्तीचा खल केल्याखेरीज होणारच नाही. वृत्तीचा खल करणे म्हणजे वृत्ती पुनः पुनः घोटणे होय. (४३८८)

बुद्धीने अथवा मनानें । किंवा नुसधिये वृत्तीनें ।
अहंब्रह्म साभिमान घेणे । तरीच निश्चय दृढ होय ॥ ९० ॥
वृत्तीचा खल असा असतो. 'अहं ब्रह्मास्मि'चा तिला कधीच विसर पडू नये. तसा विसर पडू नये म्हणून तिने 'अहं ब्रह्मास्मि'चा अभिमानही बाळगावा. (४३८९)

जैसा जैसा अहंब्रह्मास्मीचा । अभिमान वाढत जाय साचा ।
तैसा तैसा या देहबुद्धीचा । घात होत जाय ॥ ९१ ॥
बुद्धीने अथवा मनाने किंवा नुसत्या वृत्तीने ‘अहं ब्रह्मास्मि' असा अभिमान धरावा. तरच केलेला निश्चय दृढ (पक्का) होईल. (४३९०)

मुख्य वृत्तीने अज्ञानेंकडून । घेतलें होतें अन्यथाभान ।
तयेसीच दृढ व्हावें खलून । की निर्विकल्प अहं ब्रह्म ॥ ९२ ॥
जसजसा 'अहं ब्रह्मास्मि' असा अभिमान वाढत जाईल तसतसा देहबुद्धीचा नाश होत राहील. (४३९१)

तस्मात् रविदत्ता अपरोक्ष ज्ञान । जाहलियाही धरीं साभिमान ।
निमिष्य एक न पडावें विस्मरण । तरीच देहबुद्धि गळे ॥ ९३ ॥
ज्या मुख्य वृत्तीने अज्ञानामुळे अन्यथा भान (चुकीचा समज) घेतले होते. त्याच वृत्तीला 'आपण निर्विकल्प ब्रह्म आहोत' असे पुनःपुन्हा खल करून दृढ भान झाले पाहिजे. (४३९२)

तंव रविदत्त करी विनंती । सविकल्प में उद्भवलें निश्चिती ।
तें निर्विकल्पाहून भिन्नचि अति । आकाश वायु जैसे ॥ ९४ ॥
तेव्हा रविदत्ता, अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतरसुद्धा तू 'अहं ब्रह्मास्मि' असा अभिमान बाळग. एक क्षणभर देखील त्याचे विस्मरण होऊ देऊ नकोस. असे केलेस तरच तझी देहबद्धी गळन पडेल. (४३९३)

निर्विकल्पाचे वेगळे रूप । हे त्याहून भिन्न सविकल्प ।
तरी हे तया अन्यासी आपेंआप । मी ह्मणोनि घे कैसें ॥ ९५ ॥
तेव्हा रविदत्ताने विनंती करून म्हटले. "अहो महाराज जे सविकल्प निर्माता झाले होते. ते निर्विकल्पापेक्षा, आकाशापेक्षा वायू जसा भित्र असतो, तसे अतिशय वेगळेच आहे. :::: नर्टिकल्पाचे रूप वेगळे असून त्यापेक्षा सविकल्पाचे रूप एकदम वेगळे आहे. मग हे वेगळे - आपल्याहन भिन्न असलेल्या निर्विकल्पाचा मी म्हणून स्वीकार कसा करील? (४३९५)

दुसरियासी मी ह्मणोनी । कैसा घेईल वेगळा असोनी ।
हाचि संशय उद्भवला मनीं । तो फेडावा स्वामी ॥ ९६ ॥
दुसऱ्यापेक्षा वेगळे असल्यामुळे त्या दुसऱ्याला मी म्हणून ते कसे पत्करील? हाच माझ्या मनात संशय निर्माण झाला आहे. आपण तो फेडावा. (४३९६)

ऐसा प्रश्न ऐकोनि स्वामी । बोलते जाहले अनुक्रमीं ।
हे अन्य ह्मणसी घेतली ऊर्मि । तरी हा अन्य कोठे ॥ ९७ ॥
असा रविदत्ताचा प्रश्न ऐकून स्वामी त्याला उत्तरादाखल म्हणाले, "तू सविकल्पाने निर्विकल्पाची ऊर्मी कशी घ्यावी असा विचार करतोस, तर हे दुसरे कुठे आहे? (४३९७)

अन्य मणिजे आपण जैसा । असे तया दुसराही असावा तैसा ।
ऐसें तो नव्हे प्रतिबिंब आरसां । पडिलें तैसें सविकल्प ॥ ९८ ॥
दुसरा म्हणजे आपण जसे आहोत तसेच व्यक्तिमत्त्व आणि सत्ता असलेला दुसरा असेल तरच त्याला दुसरा म्हणता आले असते. पण इथे सविकल्प हे निर्विकल्पाचे, आरशात प्रतिबिंब दिसावे, त्याप्रमाणे केवळ भासमान रूप आहे. (४३९८)

दर्पणीं जें कां प्रतिबिंबलें । तें ह्मणों नये दुसरें जाहलें ।
बिंबाचेचि स्वभाव उमटले । अनुकार प्रतिबिंबीं ॥ १९ ॥
आरशात जे प्रतिबिंब दिसते त्याला दुसरे निर्माण झाले असे म्हणू नये. कारण बिंबाचाच स्वभाव प्रतिबिंबात हुबेहूब उमटलेला असतो. (४३९९)

तैसेंचि निर्विकल्प ब्रह्मात्मयाचें । प्रतिबिंब तें सविकल्प साचें ।
तस्मात् जैसे स्वभाव निर्विकल्पाचे । तैसेचि उमटती येथें ॥ ४४०० ॥
त्याप्रमाणे निर्विकल्प ब्रह्मात्म्याचे प्रतिबिंब म्हणजेच सविकल्प होय. त्यामुळे निर्विकल्पाचे जे स्वभाव आहेत तेच सविकल्पामध्ये उमटलेले असतात. (४४००)

बिंब आणि प्रतिबिंबाचा । सत्यमिथ्या मात्र भेद साचा ।
परी एकसारिखा साकार दोहींचा । किमपि उणे नसे ॥ १ ॥
बिंब आणि प्रतिबिंब यांमध्ये फक्त सत्य आणि मिथ्या असाच खरा भेद असतो. पण दोहोंचीही आकार, रूप ही सारखीच असतात. त्यात थोडासुद्धा फरक नसतो. (४४०१)

ह्मणोनि हा मी नव्हे मिथ्याभास । तरी तोचि मी असें अधिष्ठान यास ।
ऐसा भावितां निर्विकल्पाचा ध्यास । असे युक्त सविकल्पा ॥ २ ॥
म्हणून मिथ्याभ्यास जो आहे तो मी नव्हे, असे आपण म्हटले तरी जो बिंबरूप 'मी' आहे, तोच प्रतिबिंबाचे अधिष्ठान असतो. अशी भावना धरल्यास सविकल्पाने निर्विकल्पाचा ध्यास धरणे युक्त ठरेल. (४४०२)

प्रवाहीं जो पडिला तेणें । वृक्षस्थ मी म्हणून स्वीकार करणे ।
तैसाचि निर्विकल्पा मी म्हणून घेणें । सविकल्प जीवें ॥ ३ ॥
जो प्रवाहात पडलेला आहे, त्याने आपण खरे वृक्षस्थ आहोत, अशी भावना स्वीकारावी, त्याप्रमाणे सविकल्प जीवाने मी निर्विकल्प आहे अशी भावना दृढ धरावी. (४४०३)

सविकल्पाचे मुख्य जें रूप । तें यथार्थ असे की निर्विकल्प ।
म्हणोनि तेंचि मी ऐसें साक्षेप । घेतलेच घ्यावें ॥ ४ ॥
सविकल्पाचे मुख्य रूप जे निर्विकल्प ते यथार्थ अथवा सत्य आहे. म्हणून आपण तेच आहोत असे सविकल्प जीवाने प्रयत्नपूर्वक मानावे. (४४०४)

असो निर्विकल्प अहंब्रह्मास्मि । सविकल्पं घेतां अभिमानें ऊर्मि ।
सविकल्प जाऊनि स्वकीय निजधामीं । ऐक्य पावे निर्विकल्पी ॥ ५ ॥
असे निर्विकल्प ब्रह्म आपण आहोत अशी अभिमानाची ऊर्मी सविकल्प जीवाने धरावी, म्हणजे सविकल्प लोप पावून स्वतःचे मुख्य घर जे निर्विकल्प ते त्याला प्राप्त होईल. (४४०५)

येथेही मानिसी तूं ऐसें । की आपुला घात इच्छून कैसें ।
भावील निर्विकल्पाचे आपैसें । होणे आपणासी ॥ ६ ॥
येथेही तुझ्या मनात शंका येईल की, सविकल्प स्वतःचा घात करून आपण निर्विकल्प व्हावे अशी इच्छा कशी करील? (४४०६)

तरी पाहें पुढे राज्यप्राप्ती । होईल ह्मणोनि कर्वत घेती ।
तैशी निर्विकल्पाची अविनाश संपत्ति । हा लाभ अधिक पाहिला ॥ ७ ॥
तर असा विचार कर की प्रत्यक्ष व्यवहारात सुद्धा माणसं पुढील जन्मी आपल्याला राज्य मिळेल या आशेने आपला देह कर्वतीवर घालतात (आत्महत्या करतात) त्याप्रमाणे निर्विकल्पाची अविनाश संपत्ती प्राप्त होईल हा मोठा लाभ सविकल्पाला जाणवेल. (४४०७)

हें किंचिज्ञ दरिद्र जावें । तें सच्चित्सुख प्राप्त व्हावें ।
ऐशिया हेतू इच्छी स्वभावें । घातही आपुला ॥ ८ ॥
हे किंचिज्ज्ञतेचे दारिद्र्य जावे, आणि सच्चित्सुख प्राप्त व्हावे, अशी इच्छा धरून सविकल्प स्वतःच्या घाताला प्रवृत्त होईल. (४४०८)

तस्मात् तया अहंब्रह्मास्मीचा । विसरचि न पडावा साधका साचा ।
या स्फूर्तीपासून देहादिकांचा । मीपणा किमपि न घ्यावा ॥ ९ ॥
म्हणून साधकाला त्या 'अहं ब्रह्मास्मि'चा विसरच पडू नये, आणि त्याने स्फूर्तीपासून देहादिकांपर्यंत कशाचाही मीपणा थोडासुद्धा घेऊ नये. (४४०९)

आणीक झणसी सर्व व्यापार । होतां मीपण घेईल सत्वर ।
आणि निर्विकल्पाचा पडे विसर । तरी कैसे करावें ॥ १० ॥
तू आणखी असे म्हणशील की, सर्व व्यापार होत असताना जीव मीपणा लगेच घेणारच की! मग त्यावेळी निर्विकल्पाचा विसर पडेल, तेव्हा कसे करावे? (४४१०)

याचे उत्तर ऐक आतां । भीति जरी चित्तीं असतां ।
विस्मरचि न पडे तत्त्वतां । हे मी आठवतां तें स्मरे ॥ ११ ॥
याचे उत्तर ऐक. जर अंतःकरणात सविकल्पाची भीती असेल तर विस्मरण होणारच नाही. व्यापारात मी चे स्मरण झाले की, लगेच मी निर्विकल्प ब्रह्म आहे, असे त्याला स्मरण होईल. (४४११)

जैसा कोणी एक शुद्ध ब्राह्मण । अंत्यजी बाटविला बळेंकडून ।
तो तयापासून निसटून । ब्राह्मणां शरण आला ॥ १२ ॥
एक शुद्ध आचरण असलेला ब्राह्मण होता. त्याला अंत्यजांनी बळजबरीने बाटवले. तो त्यांच्या तावडीतून कसाबसा सुटून ब्राह्मणांना शरण आला. (४४१२)

तो ब्राह्मणी शुद्ध केला । तेव्हां अंत्यजसमुदाय टाकिला ।
पुन्हां जरी अंत्यज दृष्टी पाहिला । तरी पळोनियां जाय ब्राह्मणांत ॥ १३ ॥
त्याला ब्राह्मणांनी शुद्ध करून घेतले. तेव्हा त्याची अंत्यज समुदायापासून सुटका झाली. पण नंतर जर का कोणी अंत्यज त्याच्या दृष्टीस पडला तर लगेच तो तेथून पळून जाईल आणि ब्राह्मणांमध्ये मिसळून जाईल. (४४१३)

तयासी महार दिसतां नयनीं । तत्क्षणी मी ब्राह्मण आठवी मनीं ।
ब्राह्मणसमुदायीं राहे मिळोनी । या रीतींच हे जाणावें ॥ १४ ॥
जर का एखादा महार त्याच्या दृष्टीस पडला तर त्या क्षणी त्याला आपण ब्राह्मण आहोत याचे स्मरण होईल. आणि तो ब्राह्मण समुदायात मिसळून राहील. त्याच प्रकाराने सविकल्प जीव निर्विकल्प रूपात विलीन होऊन जातो, असे जाणून घ्यावे. (४४१४)

आत्म ब्रह्म जो निर्विकल्प । स्वतःसिद्ध आपण निजरूप ।
असतां अज्ञाने जाहला सविकल्प । तेणें जन्मे मरे ॥ १५ ॥
आपण स्वतः निर्विकल्प ब्रह्मात्मा असता, स्वतःसिद्ध ज्ञानरूप असताना अज्ञानाने सविकल्प जीव झाला. तर त्यामुळे त्याला जन्ममरण हे भोगावे लागणारच. (४४१५)

या यातायाती सुखदुःखाच्या । भोगिल्याचि भोगितां असाच्या ।
दुःखाहून दुःखात्मकाच्या । भोगिल्या विकृति ॥ १६ ॥
या सुखदुःखाच्या यातायाती पुनः पुन्हा भोगल्या. त्या यातायाती मुळात भ्रामक आहेत. दुःखापेक्षाही दुःखात्मक जन्मांच्या असंख्य विकृती भोगल्या. (४४१६)

तयासी अनुताप जाहला मनीं । की चुकाव्या ह्या जन्मश्रेणी ।
म्हणोनी सद्गुरूसी शरण जाऊनी । तारा ह्मणे दीनासी ॥ १७ ॥
अशा वेळी त्या जीवाला मनामध्ये पश्चात्ताप झाला. या जन्मांच्या मालिका चुकाव्यात असे त्याला वाटले. म्हणून तो सद्गुरूंना शरण गेला आणि मज दीनाला या दुष्टचक्रातून बाहेर काढा, असे म्हणू लागला. (४४१७)

तेव्हां सद्गुरुनाथें बोधिला । आपुले निजरूपा पावला ।
पुन्हां सविकल्पाचा मेळा देखिला । तरी तो स्मरे तेव्हांची ॥ १८ ॥
तेव्हा सद्गुरूनाथांनी त्याला उपदेश केला. त्याला आपल्या निजरूपाची (स्वरूपाची) प्राप्ती झाली. त्यानंतर जरी सविकल्पाचा मेळा पाहण्याची वेळ आली तरी त्याला आपल्या निजरूपाचे लगेच स्मरण होऊ लागले. (४४१८)

ह्मणे याकरितांचि मजला बंधन । पडिलें होतें अज्ञानेंकड्न ।
तरी आतां मी न घे याचे मीपण । मी तों ब्रह्म निजागें ॥ १९ ॥
तेव्हा तो म्हणू लागला की, यांच्यामुळेच (सविकल्पांमुळे) मला बंधनात पडावे लागले. ते बंधन अज्ञानामुळेच पडले होते. पण आता मी त्यांचे मीपण स्वीकारणार नाही. कारण मी स्वतः ब्रह्मच आहे. (४४१९)

जरी भीति ऐशी अंतरीं । तरी स्मरतसे अति झडकरी ।
मी ब्रह्म निर्विकल्प निर्विकारी । हा संघ मी नन्हें ॥ २० ॥
त्याच्या अंतःकरणात त्याला सविकल्पाची भीती वाटत असली तरी आपल्या निजरूपाचे स्मरण त्याला लगेच होऊ लागले. आणि तो म्हणू लागला, मी ब्रह्म आहे. मी निर्विकल्प निर्विकारी आहे. मी हा सविकल्पांचा समुदाय नाही आहे. (४४२०)

आणीक एक स्मरण व्हावया । प्रयोजन असे शिष्यराया ।
एकदां अपरोक्ष ज्ञान हे जाहलिया । वृद्धीच होतसे ॥ २१ ॥
अरे शिष्यराया, असे स्मरण होण्याचे दुसरे एक प्रयोजन आहे. एकदा का अपरोक्ष ज्ञान झाले की, ते वाढतच जाते. ते कधीही क्षीण होत नाही. (४४२१)

येर विद्या होऊन विसरती । तैशी नव्हे हे अपरोक्ष संपत्ति ।
एकदां जाहलिया वर्धमान होती । कदां क्षीण नव्हे ॥ २२ ॥
इतर विद्या शिकल्यानंतर विसरल्या जातात, पण ही अपरोक्ष ज्ञानाची संपत्ती त्यांच्यासारखी नाही. ती एकदा प्राप्त झाली की, वाढतच जाणार. ती केव्हाही क्षीण होत नाही. (४४२२)

अहंब्रह्म जरी यथार्थ कळे । तरी हे प्रतिदिनी सहज उफाळे ।
अनायासेंचि देहाभिमान गळे । यदर्थी संशय नाहीं ॥ २३ ॥
'अहं ब्रह्म' असे खऱ्या अर्थाने कळले की ते प्रत्येक दिवशी सहज रीतीने उफाळूनच येते.आणि त्यामुळे देहाभिमान आपोआपच गळून पडतो. यात काही संशय नाही. (४४२३)

मौजीबंधनें ब्राह्मण जाहला । तो ब्राह्मणपणा वाढतचि गेला ।
शूद्रपणा जो होता पहिला । तो गळे आ–आप ॥ २४ ॥
मुंज झाल्यानंतर ब्राह्मणत्व येते. तो ब्राह्मणपणा वाढतच जातो. मुंजीपूर्वीचा जो शूद्रपणा होता (पहा - जन्मना जायते शूद्रः संस्काराद्विज उच्यते। विद्यया याति विप्रत्वं त्रिभिः श्रोत्रिय उच्यते।।) तो आपोआप गळून पडतो. (४४२४)

तैसा अहंब्रह्मचि साभिमान । वाढत जाय क्षणाहून क्षण ।
देहबुद्धि हे होईल क्षीण । तैशी तैशीच ॥ २५ ॥
तेव्हा 'अहं ब्रह्म' असा अभिमान क्षणाक्षणाने वाढत जातो. जसजसा तो अभिमान वाढत जातो. तसतशी देहबुद्धी क्षीण होत जाते. (४४२५)

तस्मात् अहंब्रह्मास्मि हा निश्चय । साक्षात् निर्विकल्पचि होय ।
तथापि देहस्फूर्तीचा जरी उदय । तरी नव्हे बाधक ॥ २६ ॥
तेव्हा 'अहं ब्रह्मास्मि' या निश्चयाने साधक निर्विकल्पच होऊन जातो. आणि असे असूनसुद्धा जर कदाचित देहबुद्धी उत्पन्न झालीच तर ती बाधक होणार नाही. (४४२६)

देहव्यापारी मी पाहतों । मी देतों घेतों चालतों ।
ऐसा प्रकार सर्वही होतो । परी आपण सांपडेना ॥ २७ ॥
देहाचे व्यापार पूर्ववत चालूच असतात. त्यांमध्ये मी पाहतो, मी देतो, मी घेतो, मी चालतो यांसारख्या कृती व उक्ती चालूच असतात. पण त्यामध्ये तो अडकून पडत नाही. (४४२७)

कारण की निर्विकल्प आपण भिन्न । येर हे सर्व वेगळे मजन ।
हे निवडिलें खरें विचारेंकडून । तें एकत्र कधी नव्हे ॥ २८ ॥
कारण की, आपण निर्विकल्प असून हे बाकीचे पदार्थ माझ्यापेक्षा वेगळे आहेत. असा निवाडा त्याने विचाराच्या साहाय्याने अगोदरच केलेला असतो. त्यामुळे त्याच्यापक्षी ते पदार्थ आणि साधक हे पुन्हा एक कधीच होत नाहीत. (४४२८)

ऐसा चिदचिद्ग्रंथि तुटतां । मीपण उठे जरी व्यापारतां ।
तें दों रीती जाणावें तत्त्वतां । ज्ञानोत्तरकाळीं ॥ २९ ॥
अशा त-हेने चित् आणि अचित् यांची गाठ तुटल्यानंतर व्यापारामध्ये जरी मीपणा उठला तर ज्ञानोत्तर दशेतील ह्या अभिमानाचे दोन प्रकार असतात. ते जाणून घे. (४४२९)

एक शास्त्रीय एक लौकिकी । उठतसे साभिमानता निकी ।
परी ते दोनी भिन्न भिन्न अवलोकीं । सत्यमिथ्याविभागें ॥ ३० ॥
ही साभिमानता शास्त्रीय आणि लौकिक या दोन प्रकारांनी आविष्कृत होते. त्यांच्यातील सत्य आणि मिथ्या या निकषांमुळे ते दोन्ही प्रकार एकमेकांपासून भिन्न आहेत हे समजून घे. (लौकिक प्रकार मिथ्या असून शास्त्रीय प्रकार सत्य आहे. (४४३०)

मी असंग निर्विकल्प परिपूर्ण । हा शास्त्ररीतीचा अभिमान ।
उठे जेधवां सत्यत्वे आपण । निर्विकल्पता स्थापी ॥ ३१ ॥
मी असंग, निर्विकल्प आणि परिपूर्ण असा ब्रह्मात्मा आहे हा शास्त्रीय पद्धतीचा अभिमान आहे. जेव्हा साधक खरोखर स्वतःची निर्विकल्पता सत्यत्वाने स्थापन करतो तेव्हा तो उद्भवतो. (४४३१)

मी खातों बोलतों या व्यापारीं । लौकिकरीतीं साभिमान धरी ।
मिथ्या स्मरतसे अंतरी । कृति हे जीवाची ॥ ३२ ॥
मी खातो, मी बोलतो या प्रकारच्या व्यापारांमध्ये तो लौकिक प्रकारचा अभिमान घेत असतो. पण आपल्या मनामध्ये ही जीवाची कृती असून ती मिथ्या आहे, याचे त्याला स्मरण असते. (४४३२)

या सविकल्पाचें जें कार्य । तें निर्विकल्पी आरोप न होय ।
आणि असंगत्व जें का शास्त्रीय । आभासा न स्थापी ॥ ३३ ॥
या सविकल्पाचे (जीवाचे) जे कार्य असते त्याचा निर्विकल्प ब्रह्मात्म्यावर आरोप होऊ शकत नाही. आणि असंगत्व हा जो शास्त्रीय प्रकार आहे, त्याचा आभासरूप जीवावर तो आरोप करत नाही. (४४३३)

कार्य जो एकत्र मेळविना । तो एकत्र केवीं करी कारणा ।
तस्मात् असंगी न जाय अहंपणा । अहंपणी असंग न ये ॥ ३४ ॥
अरे, जो कार्यास एकत्र मिळवत नाही, तो कारणांना एकत्र कसे करील? त्यामुळे असंग अशा ब्रह्माच्या ठिकाणी अहंपणा जात नाही, आणि अहंपणा जेथे आहे तेथे असंगत्व येत नाही. (४४३४)

अरे अहंब्रह्मींचा साभिमान । उठे तो सविकल्पी करी स्थापन ।
केवळ निर्विकल्प जो आपण । तेथें अहंस्फूर्ति कैंची ॥ ३५ ॥
अरे, 'अहं ब्रह्म' या जाणिवेत जो अभिमान उत्पन्न होतो, तो अभिमान तो सविकल्पाच्या ठिकाणी स्थापित करतो. कारण जो स्वतः केवळ निर्विकल्प आहे तिथे अहंस्फूर्ती कशी उठणार? (४४३५)

ऐसा सत्याचा साभिमान घेतां । निर्विकल्पी न स्थापी तत्त्वता ।
तरी मग देहादिकांची वार्ता । लावी कैशी निर्विकल्पीं ॥ ३६ ॥
असा सत्याचा अभिमान घेत असताना तो निर्विकल्पाच्या ठिकाणी मात्र त्याची स्थापना करत नाही. मग देहादिकांचा निर्विकल्पाशी संबंध तो कसा काय लावील? (४४३६)

असो दों रीतीं ऐसा अनिमान । ज्ञान जाहलिया ज्ञात्यालागून ।
निर्बाध असे सहजेंकडून । म्हणून अमुख्य ॥ ३७ ॥
असो, अशा प्रकारे ज्ञानी माणसाला ज्ञान झाल्यानंतरसुद्धा दोन प्रकारचा अभिमान होतो. तो ज्ञानी माणसाच्या दृष्टीने बाधक ठरत नाही. म्हणून तो अभिमान अमुख्य म्हणजे मुख्य समजला जात नाही. (४४३७)

मुख्य साभिमान अज्ञानाचा । विचारचि नाहीं या संघाचा ।
कोणता आत्मा आणि अनात्म्याचा । कैंचा असे शोध ॥ ३८ ॥
मुख्य अभिमान हा अज्ञानी माणसाचा अभिमान होय. त्या अज्ञानी माणसाला देहादी समुदायाबद्दल काहीच माहिती नसते. त्याप्रमाणेच आत्मा म्हणजे काय, अनात्मा म्हणजे काय, याची कल्पना तरी कशी असेल? (४४३८)

उगाचि या सर्वही संघासी । मीच ह्मणून घेतलें दिनानेशीं ।
हाचि मुख्य अहंकार या जीवासी । बंधनी घाली बळें ॥ ३९ ॥
तो उगीचच देहादी सर्व संघाला रात्रंदिवस मीच म्हणून मानत असतो. हाच या अज्ञानी जीवाचा मुख्य अहंकार आहे. तोच त्या जीवाला बळजबरीने बंधनात ओढत असतो. (४४३९)

ऐसा मुख्य अहंकार ज्ञानिया । नुपजे कदां ज्ञान जाहलिया ।
ह्मणोनि मख्य ऐसें ह्मणावें तया । साभिमान ज्ञात्याचा ॥ ४० ॥
ज्ञानी माणसाला ज्ञान झाल्यावर असा मुख्य अहंकार कधीच होत नाही. म्हणून त्याच्या अहंकाराला अमुख्य असे म्हटले आहे. तो फक्त ज्ञानी माणसालाच होतो. (४४४०)

तस्मात रविदत्ता लयसाक्षिज्ञान । तेंचि निर्विकल्प ब्रह्म आपण ।
इतुकीच हे खूण करी जतन । निःसंशयेंसी ॥ ४१ ॥
तेव्हा रविदत्ता, लयसाक्षीचे ज्ञान म्हणजे आपण निर्विकल्प ब्रह्म आहोत असे ज्ञान एवढी एकच खूण तू संशय न बाळगता जतन करून ठेव. (४४४१)

हा साभिमान कदां न ह्मणावा । सविकल्पं घेतलाचि घ्यावा ।
निर्विकल्पी निर्विकल्प सदैवा । आहेसि तैसा सिद्ध ॥ ४२ ॥
त्याला अभिमान म्हणू नकोस. सविकल्पाने तो अभिमान पुनःपुन्हा घ्यावा. निर्विकल्पाच्या ठिकाणी तर तू सदैव निर्विकल्प होऊनच सिद्ध असतोस. (४४४२)

तूं तो कदां सविकल्प न होसी । तरी तत्कृति हे काय तुजसी ।
तेचि तुझिया ध्यासें मुक्तता अपैसी । पावोन मिळती तुज ॥ ४३ ॥
असा निर्विकल्प झालेला तू केव्हाही सविकल्प होणार नाहीस. मग सविकल्पाची कृती तुला कशी बाधेल? ते सविकल्पच तुझ्या ध्यासाने मुक्ती प्राप्त करून तुला येऊन मिळेल. (४४४३)

येथे तुझें काय गेलें । होईना जें स्वभावेंचि जाहलें ।
तयाचें मीपण मात्र जरी घेतलें । तरी तें बाधक होय ॥ ४४ ॥
यामध्ये तुझे काहीच नुकसान नाही. ते त्याच्या स्वभावधर्माप्रमाणे जे व्हायचे ते होईल. फक्त त्याचा मीपणा तू घेऊ नकोस. तो घेतलास तर मात्र तो बाधक ठरेल. (४४४४)

तस्मात् तयाचें जें कां मीपण । वाटेल तुज जरी न कळून ।
तितुकें काढावें निवडून । डोळियाचें हरळ जेवीं ॥ ४५ ॥
त्यामुळे त्याचेबद्दल जो काही मीपणा नकळतपणे तुला वाटत असेल तर डोळ्यातील सलणारा कचरा (खडा) ज्याप्रमाणे तत्परतेने काढून टाकतात तसा तो मीपणा निवडून काढून टाक म्हणजे झाले. (४४४५)

आणि असंगत्व जें आपुलें । कदापि न जावें विस्मरलें ।
तरी तुझें निर्विकल्पत्व संचलें । राहे सविकल्प उद्भवतां ॥ ४६ ॥
आणि हे लक्षात ठेव की, आपले असंगत्व कधीही विसरू देऊ नकोस. तरच तुझे निर्विकल्प सविकल्प उठले असताही जसेच्या तसे अबाधित राहील. (४४४६)

पहिलाचि संचला अससी । सविकल्प कधीही न होसी ।
परी भ्रांति उद्भवली सविकल्पा ऐशी । ते सांडोनी स्वस्थ राहें ॥ ४७ ॥
प्रथमपासूनच तू निर्विकल्प आहेसच, तो तू कधीही सविकल्प होणार नाहीस. पण तशा प्रकारची भ्रांती तुझ्या ठिकाणी निर्माण झाली. तेव्हा तिचा त्याग करून स्वस्थ राहा. (४४४७)

अरे डोळा जेव्हां दीप नसतां । अंधार सहजीं देखत होता ।
तो दिवा जरी तेथें लागतां । तरी कां पाहणें दुजें होय ॥ ४८ ॥
अरे, दिवा नव्हता तेव्हा डोळा अंधार पाहाताच होता की नाही? तो दिवा तेथे लावल्यानंतर त्याचे पाहाणे काय वेगळे होणार आहे का? तो तेव्हाही पाहातच होता आताही पाहतच राहणार आहे. (४४४८)

जया पाहण्याने अंधार पहावा । त्याचि देखण्याने देखिजे दिवा ।
गेहें कदापि जुना नवा । न घ्यावा कुतर्क ॥ ४९ ॥
ज्या पाहण्याने अंधार पाहिला, त्याच पाहण्याने आता दिवा पाहिला. दोन्हीकडे पाहणे समान असता घराने उगीच जुना डोळा की नवा डोळा असला कुतर्क करत बसू नये. (४४४९)

तैसा सविकल्पाचा निपटून लय । हा तुज निर्विकल्पा होय प्रत्यय ।
की नाहींच कांही उरे अद्वय । शून्य देखणा सहज ॥ ५० ॥
त्याप्रमाणे सविकल्पाचा समूळ लय पाहिल्यानंतर तू जो निर्विकल्प त्याला असा अनुभव येईल की, एका अद्वैताखेरीज काहीच नाही. तू सहजच शून्याचा पाहणारा होशील. (४४५०)

तें देखणें जैसें निर्हेतुक । केवळ जाणणे निर्विकारक ।
त्याचि ज्ञाने जाणणे कौतुक । वृत्ति उठली जरी ॥ ५१ ॥
ते पाहणे जसे निर्हेतुक असते. तेथे केवळ निर्विकारी ब्रह्माला जाणणे उरते. तसेच वृत्ती जरी उठली तरी त्याच ज्ञानाने तिचे कौतुक पाहून (जाणून) घ्यावे. (४४५१)

शून्य जाणणें तें निर्विकार । वृत्ति उठतां काय जाहला विकार ।
तें जाणणे होतें जें निर्धार । हे काय दुजें जाहलें ॥ ५२ ॥
जर शून्य जाणते त्याला निर्विकारी म्हणावयाचे तर वृत्ती उठल्यानंतर त्याच्यात काय विकार निर्माण होतो? शून्याचे जाणणे याला जर निश्चयपूर्वक ज्ञान म्हणायचे तर वृत्ती उठल्यानंतर ते ज्ञान काय वेगळे झाले? (४४५२)

जें न होतां न विकारतां । जाणण्याची एकरूपता ।
मग लयाचा की वृत्तीचा जाणता । असो कैसाही ॥ ५३ ॥
ते दुसरे झाले नाही व विकार पावले नाही. तरी जाणणे एकरूपच राहिले. मग ज्ञाता लयाचा जाणता असो की वृत्तीचा जाणता असो, तो कसा का असेना, त्याच्यात काही फरक पडत नाही. (४४५३)

तेथें मन बुद्धि जरी उठली । अंतर सृष्टि कल्पिती जाहली ।
ते बुद्धिसृष्टिही जाणिली । तरी ते ज्ञान एकरूप ॥ ५४ ॥
त्याच्या ठिकाणी मन बुद्धी यांचा उदय झाला, किंवा त्याच्या अंतःकरणाने नवीन सृष्टीची जरी कल्पना केली तरी त्याचे ज्ञान एकरूपच असते. (४४५४)

जैसे दीपामुळे पदार्थ मंदिरींचे । दिसती जरी भित्र भिन्न साचे ।
तरी डोळियासी दुजेपण नवचे । देखणें तें पूर्ववत् ॥ ५५ ॥
जरी दीपामुळे घरातील पदार्थ वेगवेगळे दिसू लागले तरी डोळ्यात काही वेगळेपणा येत नाही. त्याचे पाहणे पूर्ववतच असते. (४४५५)

तैशी वृत्तीमुळे बुद्धिआदि सृष्टि । दिसतसे साक्षित्वाचे दृष्टि ।
तरी जाणण्यासी दुसरी गोष्टी । उद्भवली नाहीं ॥ ५६ ॥
त्याप्रमाणे वृत्तीमुळे बुद्धी इ. सृष्टी साक्षित्वाच्या दृष्टीने दिसते तरी जाणण्यामध्ये काही वेगळेपणा दिसून येत नाही. ज्ञान एकरूपच असते. त्याचा दुसरा प्रकार नाही. (४४५६)

पुढें इंद्रियद्वारा निघोनी । प्रत्यक्ष विषयाचे ग्रहणीं ।
ऐशी जागृतीसी दशा जे देखणी । ते असे एकरूप ॥ ५७ ॥
नंतर पुढे जागृतीच्या अवस्थेत ज्ञानेंद्रियांच्या द्वारा निघून प्रत्यक्ष विषयाचे ग्रहण होते. त्याहीवेळी पाहण्याची क्रिया एकच असते. (४४५७)

दीप असोनि पोथी वाचितां । उपनेत्रांसी होय लाविता ।
तरीही नेत्रांसी देखण्यापरता । दुजा कोणता भाव ॥ ५८ ॥
दीप असून पोथी वाचण्याच्या वेळी उपनेत्र (चष्मा) लावले. तरीही डोळ्यांना पाहण्याखेरीज दुसरा कोणता उद्योग आहे? (४४५८)

तैसें वृत्तीपासून विषयान्त । पदार्थ एकलें ज्ञान जाणत ।
मध्ये जीवत्वें जो स्फुरवित । उपनेत्र जैसा ॥ ५९ ॥
त्याप्रमाणे वृत्तीपासून ते विषयांपर्यंत सर्व पदार्थ एकटे ज्ञानच जाणू शकते. मधेच जीवत्व ते पदार्थ विशेषत्वाने स्फुरविते. त्याचे कार्य डोळ्याला लावलेल्या चष्म्यासारखे आहे. (४४५९)

उपनेत्रे की दीपप्रकाशें । पोथी वाची की अन्य पाहतसे ।
परी डोळियाचे देखणें जें असे । तें एकरूप सर्वदा ॥ ६० ॥
चष्म्यामुळे असो की दीपाच्या प्रकाशामुळे असो, पोथी वाचीत असो की अन्य काही पाहात असो, पण डोळ्याचे जे पाहाण्याचे कार्य आहे ते सर्वकाळी एकरूपच आहे. (४४६०)

तैशी वृत्ति आणि मनादि संकल्प । मध्ये आभासे जीव स्फुरद्रूप ।
इंद्रियद्वारा विषय घेती अमुप । परी जाणणे एकरूप सदा ॥ ६१ ॥
त्याप्रमाणे वृत्ती आणि मनादी संकल्प यांमध्ये जीव हा स्फुरणाच्या रूपाने भासमान होत असतो. जीव इंद्रियांच्या मार्गाने अनेक विषयांचा भोग घेत असतात. पण जाणणे मात्र नेहमी एकरूपच असते. (४४६१)

वृत्तिलयाचा जैसा जाणता । तोचि सहजी जाणे वृत्ति उठतां ।
जरी मनादि बाह्य आतौता । परी जाणणे समान ॥ ६२ ॥
जो वृत्तिलयाचा जाणता आहे, तोच वृत्ती उत्पन्न झाल्याबरोबर तिचाही जाणता असतो. जरी त्यापैकी मनादी इंद्रिये अंतःकरणाचे भाग आहेत, डोळा, इ. इंद्रिये बाहेरची आहेत तरी सर्वांचे जाणणे सारखेच असते. (४४६२)

लय अथवा उद्भवकालीं । चिद्रूपता नव्हे न्यूनागळी ।
मग उद्भवो मावळो भलते वेळीं । अकृत्रिम निर्विकल्पता ॥ ६३ ॥
लय असो वा उत्पत्ती असो या सर्व ठिकाणी चिद्रपता कमी अधिक नसते आणि वेगळीही नसते. मग ती वृत्ती उत्पन्न होवो अथवा मावळो, ती कोणत्याही वेळी उत्पन्न होवो अथवा तिचा लय होवो, निर्विकल्पता मात्र अकृत्रिम आहे. (४४६३)

ऐशी निर्विकल्पता सहज संचली । मग सविकल्पता उठे की मावळली ।
तयेनें अहंब्रह्म म्हणोनि घेतली । ऊर्मि साभिमानाची ॥ ६४ ॥
अशी निर्विकल्पता सहजस्थितीत असते. मग सविकल्पता उठली अथवा मावळली किंवा तिने 'अहं ब्रह्म' अशा अभिमानाची ऊर्मी घेतली. (४४६४)

तरी ते सुखरूप घेवो सदां । अथवा देहव्यापाराचा धंदा ।
परी मी निर्विकल्प संचलों तो कदां । किमपि सविकल्प नव्हे ॥ ६५ ॥
तरी तिने ती सुखाने घेवो. ती काही काळापुरती घेवो अथवा नेहमीसाठी घेवो, किंवा देहव्यापाराच्या व्यवसायात गुंतून पडो, तरी मी निर्विकल्प सदा अखंड असतो; मी केव्हाही, थोडासुद्धा सविकल्प होत नाही. (४४६५)

रविदत्ता अति सावधान मानसीं । एका देहाची सविकल्पता जैशी ।
निर्विकारत्वे जाणत अससी । तेवींच जाणता सर्वांचा ॥ ६६ ॥
रविदत्ता, अतिशय सावधान मनाने एका देहाची सविकल्पता जशी निर्विकारपणे जाणतोस त्याच निर्विकारपणे तू सर्वांचा जाणता आहेस. (४४६६)

पाहें ब्रह्मादि पिपीलिकावरी । सविकल्पतेचि एकचि परी ।
लीनत्वे असे मात्र स्थावरीं । परी देखणा तूं लयाऐसा ॥ ६७ ॥
ब्रह्मापासून मुंगीपर्यंत सविकल्पतेचा प्रकार येथून तेथून सारखाच आहे. ती स्थावर पदार्थात मात्र लीनत्वाने असते. पण तू जसा लयाचा पाहणारा आहेस तसाच या सर्व प्रकारच्या सविकल्पतेचाही पाहणारा आहेस. (४४६७)

जंगमी सविकल्प स्वप्न जागृती । जैशियापरी एक पिंडस्थिति ।
स्थावरी जैशी मूर्छा सुप्ति । परी सविकल्पता गूड ॥ ६८ ॥
जंगम पदार्थामध्ये एका पिंडात ज्याप्रमाणे स्वप्न, जागृती या अवस्थांमध्ये सविकल्पता प्रकट रूपाने असते तशी स्थावरांमध्ये ती मूर्छा अथवा सुषुप्ती या अवस्थांतल्याप्रमाणे गूढ रूपात असते. (४४६८)

गूढ झणिजे अज्ञानी लीन । सविकल्पत्व असे अज्ञान घेऊन ।
जंगमीं तों वृत्त्यादि देहांत संपूर्ण । उघड सविकल्पता ॥ ६९ ॥
गूढ म्हणजे अज्ञानात लीन होणे तेच सविकल्पत्व स्थावरात लीनत्वाने आहे. जंगमात तर वृत्तीपासून देहापर्यंत सर्वात सविकल्पत्व उघड आहे. (४४६९)

असो ऐशी स्थावरजंगमात्मक । सृष्टीची रचना सकळिक ।
कीटक किंवा ब्रह्मादिक । एक जिन्नस मासला ॥ ७० ॥
असो, सगळ्या स्थावर जंगमात्मक सृष्टीची रचना अशा प्रकारची आहे. कीटक असोत वा ब्रह्मादिक असोत सर्व सृष्ट पदार्थांचा हाच एक नमुना आहे. (४४७०)

एक पिंडीची सविकल्पता । जाणिली असे जीवसहिता ।
तैशीच सर्वांमाजी एकरूपता । पाहे सविकल्पाची ॥ ७१ ॥
तू एका पिंडातील सविकल्पता जीवासह जशी जाणलीस त्याचप्रमाणे सर्वांमध्ये सविकल्पाची एकरूपता पहा. (४४७१)

सविकल्पत्व ज्या ठाई उद्भवलें । तें अधिष्ठान निर्विकल्प संचलें ।
तें लयसाक्षित्व जैसें आपुलें । तें वोळखी सर्वी ॥ ७२ ॥
सविकल्पत्व ज्या ठिकाणी निर्माण झाले, ते अधिष्ठान निर्विकल्पच आहे. जसे आपले लयसाक्षित्व निर्विकल्प आहे. तसे सविकल्पाचे अधिष्ठान निर्विकल्प सर्वात पाहा. (४४७२)

सर्वांमाजीं निर्विकल्प भिन्न । कदां न पाहे पिंड भिन्न ह्मणून ।
तूं एकलाचि निर्विकल्प आपण । अससी स्थावरजंगमीं ॥ ७३ ॥
प्रत्येक पिंड भिन्न आहे म्हणून सर्व पिंडांतील निर्विकल्पता भिन्न आहे, असे मान नकोस. कारण सर्व स्थावरांत अथवा जंगमात तूच एकटा निर्विकल्पत्वाने व्यापून आहेस. (४४७३)

अरे सर्वांमाजी सविकल्पता समान । मग निर्विकल्पता होईल केवीं भिन्न ।
जळप्रतिबिंब सर्व घटीं अभिन्न । तरी गगन वेगळालें कैसें ॥ ७४ ॥
अरे सर्वांच्यामधली सविकल्पता सारखीच आहे. मग निर्विकल्पता कशी भिन्न असेल? सर्व घटांमधल्या पाण्यातील गगनाचे प्रतिबिंब जर अभिन्न असेल तर गगन कसे भिन्न असेल? (४४७४)

पंचभूतादि तृणापर्यंत । हें तों स्थावरचि बोलिजेत ।
तेवींच जंगमाचे देह समस्त । जडरूप समान ॥ ७५ ॥
पंचभूतांपासून ते तृणांपर्यंत या सर्वांना स्थावरच म्हणावे. त्याप्रमाणे सर्व जंगमाचे देह सारखेच जडरूप आहेत. (४४७५)

सजल अथवा विजल घट । आणि भिंती आदि चौफाळे मठ ।
एकरूप मृत्तिकाचि दाट । इतुकिया माजीं ॥ ७६ ॥
एका चौकोनी घरातील पाण्याने भरलेले काही आणि रिकामे असे काही घट आहेत. हे घर, त्यातील भिंती, घट या सर्वांमध्ये मृत्तिकाच आहे. ती सर्वांची सारखीच एकरूप आहे. (४४७६)

तैसें सर्व भौतिकांसहित । आणि ब्रह्मांड पंचभूत ।
हे जडरूपचि समस्त । एकरूप असती ॥ ७७ ॥
त्याप्रमाणे पंचभूतात्मक ब्रह्मांड आणि त्यातील सर्व भौतिक पदार्थ हे सगळेच जड असून एकरूपच आहेत. (४४७७)

जल तेथें आकाश बिंबलें । विजल तेथे अदृश्य ठेलें ।
तैसें स्फूर्तीपासून प्राणान्त उमटलें । तेथें सविकल्पता स्पष्ट ॥ ७८ ॥
घटाच्या उदाहरणातील ज्या घटांमध्ये पाणी आहे, त्यांत आकाशाचे प्रतिबिंब पडलेले असते, पाणी नसलेल्या घटामध्ये आकाश अदृश्य आहे, त्याप्रमाणे स्फूर्तीपासून प्राणांपर्यंतची तत्त्वे ज्या पिंडात आहेत त्यातील सविकल्पता स्पष्टच आहे. (४४७८)

प्राण जेथें गूढत्वे असे । तेथें सविकल्पता गुप्त वसे ।
मग असोत सान थोर भलतैसे । गगनादि तणान्त ॥ ७९ ॥
ज्या ठिकाणी प्राण गुप्त रूपाने असतात, तेथे सविकल्पता गुप्त रूपाने असते. मग ते गगनापासून तृणापर्यंत सानथोर कसेही असोत. (४४७९)

सप्राण कीटकादि विरंचि । तेथें तों प्रगटता सविकल्पाची ।
जैशी घटजलीं गगनाभासाची । प्रतीति स्पष्ट ॥ ८० ॥
कीटकापासून ब्रह्मदेवापर्यंत या सजीव जंगमांमध्ये सविकल्प प्रकटपणे असते. घटजलामध्ये आकाशाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते, तसाच हा प्रकार आहे. (४४८०)

असो सविकल्पता सर्वी व्यापक । तरी निर्विकल्पता तों अधिष्ठान एक ।
गगन जेवीं घटमठीं सकळिक । पाहती स्पष्ट ॥ ८१ ॥
असो, सविकल्पता सर्वच पदार्थांना व्यापून असते. पण या सर्वांचेच निर्विकल्पता हेच एकमेव अधिष्ठान आहे. आकाश घट, मठ या सर्वांमध्ये स्पष्टपणे दिसते. (४४८१)

एकचि आकाश वेगळाले घटीं । सजली निर्जली समान दाटी ।
परी तें गगन अभिन्न जरी राहटी । भिन्न भिन्न घटांची ॥ ८२ ॥
एकच आकाश सजल आणि निर्जल घटांमध्ये सारखेच व्यापलेले आहे. त्या भिन्नभिन्न घटांची ठेवण जरी वेगवेगळी असली तरी त्यात सामावलेले आकाश अभिन्न असते. (४४८२)

तैसें निर्विकल्प सच्चिद्रूप । स्थावरजंगमीं हें एकरूप ।
जरी हे भिन्न भिन्न नामरूप । सान थोर जड चेतन ॥ ८३ ॥
त्याप्रमाणे निर्विकल्प सच्चिद्रूप सर्व स्थावर आणि जंगम पदार्थांमध्ये (सजीवांमध्ये आणि निर्जीवांमध्ये) एकरूपच आहे. जरी त्यांची नावे आणि रूपे भित्र भिन्न असली, जरी त्यांच्यात लहान मोठे, जड, चेतन असे भेद असले तरी सच्चिद्रूपामध्ये काही फरक पडत नाही. (४४८३)

जैसें निर्विकल्प सर्वी व्यापलें । तैसेंचि सविकल्पही उमटलें ।
सविकल्प तें अहंनिष्ठ राहिलें । निर्विकल्प तें निर्विकल्प ॥ ८४ ॥
ज्याप्रमाणे निर्विकल्प हे सर्वात व्यापलेले आहे, त्याप्रमाणे सविकल्पही सर्वांच्यामध्ये उमटलेले असते. पण सविकल्प अहंनिष्ठ असते. (स्वतःला वेगळे काढून मीपणा घेऊन बसते आणि निर्विकल्प ते निर्विकल्पच राहाते. (४४८४)

जैसें जलासहित प्रतिबिंब चंचळ । उठे आटे हेलावे वरळ ।
तैसें सविकल्प तें कदां निश्चळ । नव्हे कवणांतीलही ॥ ८५ ॥
ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले प्रतिबिंब वर उसळते, संकोचते, वाकडे तिकडे हलते (बरळ) त्याप्रमाणे सविकल्प कोणत्याही ठिकाणचे असो, केव्हाही निश्चळ नसते. (४४८५)

आणि निर्विकल्प जें सर्वी संचलें । तें किमपि नाहीं चंचळ जाहलें ।
जैसे घट मठी गगन दाटलें । परी उपाधीनें हालेना ॥ ८६ ॥
आणि याउलट निर्विकल्प तर सर्वत्र भरून राहिलेले आहे. पण ते मात्र थोडेदेखील चंचल होत नाही. घटात आणि मठात आकाश अगदी ठेचून भरलेले असते. परंतु कोणत्याही उपाधीने ते किंचितही हलत नाही. (४४८६)

एवं पिंड ब्रह्मांडात्मक जड । स्थावर जंगमादि उदंड ।
हे पंचभूतांचे थोतांड । एक देह तैसें सारें ॥ ८७ ॥
अशा त-हेने पिंड ब्रह्मांडात्मक जड सृष्टी, सर्व स्थावर जंगमादी उदंड विश्व हे सर्व पंचभूतांचा विस्तार आहे. आणि एका देहाची जी रचना असते तशीच सर्व ब्रह्मांडाची रचना असते. (४४८७)

स्फूर्तीपासून प्राणापर्यंत । जैसें आपुले देहीं सविकल्प उमटत ।
तैसेंचि तृणादि ब्रह्मदेवासहित । एकरूप पाहें सर्वी ॥ ८८ ॥
आपल्या एका देहात स्फूर्तीपासून प्राणांपर्यंत सविकल्प जसे उमटते त्याचप्रमाणे आपल्या देहाबाहेरही तृणापासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्व पदार्थातही ते उमटतेच. तू सर्व पदार्थ एकरूपच पहा. (४४८८)

निर्विकल्पता तों गगनापरी । एकरूप सर्वांही माझारी ।
तुवां अनुभविली लयसाक्षित्वें अंतरीं । तैशीच अनुभवी सर्वी ॥ ८९ ॥
निर्विकल्पता तर आकाशाप्रमाणे आहे. ती सर्वच पदार्थात व्यापून असतेच. तिचा लयसाक्षी म्हणून जसा तुझ्या अंतःकरणात अनुभव घेतलास तसाच इतर पदार्थांतही अनुभव घे. (४४८९)

मी निर्विकल्पत्वें सर्वी समान । एकरूप नानात्वीं अभिन्न ।
ऐसें आठवी सविकल्पेंकडून । चिद्गगन जेवीं सीं ॥ ९० ॥
मी निर्विकल्पत्वाच्या योगाने सर्व पदार्थांमध्ये सारखाच एकरूप आहे. पदार्थ वेगवेगळे असले तरी मी त्या सर्वांमध्ये अभिन्नत्वाने असतो. चिद्गगन ज्याप्रमाणे सर्व घट मठांना सारखेच व्यापून असते तसा मीही सविकल्पाकडून सर्व पदार्थांमध्ये एकरूपच आहे असे स्मरण कर. (४४९०)

हा सर्वत्री निर्विकल्प ब्रह्मात्मा । एकरूप लयसाक्षी परमात्मा ।
परी या सविकल्पात्मक रूपनामा । स्पर्शला नाहीं ॥ ९१ ॥
हा निर्विकल्प ब्रह्मात्मा, लयसाक्षी परमात्मा सर्वांच्या मध्ये आहे पण या सविकल्पाच्या नामरूपाला त्याने स्पर्शदखील केला नाही. (४४९१)

इतुकियाची अनंत कर्मे । होती जाती धर्मिधर्मे ।
परी सविकल्पक रूपनामें । निर्विकल्पा स्पर्शती ना ॥ ९२ ॥
इतक्या सर्वांची अनंत कर्मे होत जात असतात. ती धर्म धर्मीसह होत असतात. पण ही सर्व सविकल्प नामरूपे निर्विकल्पाला स्पर्शही करत नाहीत. (४४९२)

त्या इतुक्यांमाजी मी असून । नेघे तयाचें पुण्यपाप आचरण ।
तरी या एक देहउपाधीचे चळण । माथां घेऊं कैसें ॥ ९३ ॥
या सर्वांच्यामध्ये मी असून त्यांचे पापपुण्य काही घेत नाही. त्यांचे आचरण घेत नाही, तेव्हा या देह नामक उपाधीचे चळण (चळथ) मी माथ्यावर कसे घेऊ? (४४९३)

सारे देह जैसें परोक्ष । तैसाचि हा देह एक ।
प्रत्यक्षा आणि लयसाक्षी जो मी अपरोक्ष । तेवीं सर्वांतील निर्विकल्प ॥ ९४ ॥
सर्व देह ज्याप्रमाणे मला परके वाटतात त्याप्रमाणे हा देहही प्रत्यक्ष असूनसुद्धा मला परोक्षच आहे. मी लयसाक्षी आणि अपरोक्ष अथवा प्रत्यक्ष आहे. त्याप्रमाणे सर्वांतर्गत निर्विकल्प मला अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष आहे. (४४९४)

देह एक असो प्रत्यक्ष जड । परी अहंस्फूर्ति जे घेतसे वाड ।
ते सविकल्पता चेतनत्वें अजड । या देहांतील तैशी पराची ॥ ९५ ॥
देह एक प्रत्यक्ष जड असू द्या, परंतु अहंस्फूर्ती जी मी घेतो ती केवढी प्रबळ आहे! तिच्या रूपाने जी सविकल्पता चेतन असल्यामुळे जड नाही पण ती जशी मला (आता) परकी आहे,तशीच ती इतरांचीही सविकल्पता मला परकी आहे. (४४९५)

एका देहांतील हे सतिकल्पता । मज निर्विकल्पाहन परोक्ष तत्त्वतां ।
तैशीच सर्वांतील उमटे चंचळता । निर्विकल्पाहून भिन्न ॥ ९६ ॥
एका देहातील ही सविकल्पता निर्विकल्प अशा मला तत्त्वतः परोक्ष आहे. त्याचप्रमाणे सर्वांमध्ये जी चंचलता प्रकट होते ती निर्विकल्पापेक्षा वेगळीच आहे. म्हणून तीही परोक्षच आहे. (४४९६)

सर्वी व्यापक जो ब्रह्म प्रत्यगात्मा । निर्विकल्पें अधिष्ठान या रूपनामा ।
तो मी एकचि अपरोक्ष महात्मा । येर सविकल्प परोक्ष ॥ ९७ ॥
जो ब्रह्म प्रत्यगात्मा या सर्वांमध्ये व्यापून आहे, तो निर्विकल्प असल्यामुळे या नामरूपात्मक सृष्टीचे अधिष्ठान आहे. तो एकमेव मीच आहे. तोच परमात्मा आहे. बाकी सर्व सविकल्प मला परोक्ष म्हणजे परके आहेत. (४४९७)

एवं सविकल्प चिद्रप्रता समस्तांची । ब्रह्मादि कीटकान्त की आपुले देहाची ।
परोक्षचि पाहें वाउगीची । उठे मुरे आपसया ॥ ९८ ॥
अशा प्रकारे सर्वांची सविकल्प चिद्रपता. मग ती ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंतची असो की प्रत्यक्ष आपल्या देहाची असो, ती परोक्षत्वानेच पहा. ती उगीचच उठत असते तशीच आपोआप विरूनही जात असते. (४४९८)

निर्विकल्पत्व सर्वी संचलें । लय जाणे की जाणे सर्व उद्भवलें ।
तेंचि अपरोक्षत्वें रूप आपुलें । तिहींही कालीं समान ॥ ९९ ॥
निर्विकल्प सर्वात व्यापून राहिले आहे. ते लयालाही जाणते तसेच सर्व सविकल्प उत्पन्न झालेलेही जाणते. तेच अपरोक्षत्वाने आपले रूप असून ते तिन्ही काळात समान असते. (४४९९)

ऐसें एकतान अनुसंधान । सर्व तादात्म्याचें राखी स्मरण ।
की लयसाक्षी सर्वत्री एक आपण । येर परोक्ष सविकल्पता ॥ ४५०० ॥
असे सर्व तादात्म्याचे एकतान अनुसंधान राख. असे स्मरण ठेव की, आपण लयसाक्षी असून सर्व पदार्थांमध्ये आपणच एक आहोत. बाकी जेवढे म्हणून सविकल्प आहे ते आपल्या दृष्टीने परोक्ष आहे. (४५००)

ऐसें सविकल्प तें अहंनिष्ठ । निर्विकल्प तों अपरोक्ष स्वयें स्पष्ट ।
हे उभय एकरूप पाहें अविट । ब्रह्मादि तृणांत ॥ १ ॥
अशा प्रकारे जे जे सविकल्प असेल ते ते सर्व अहंनिष्ठ आहे. आणि निर्विकल्प असेल ते सर्व अपरोक्ष आहे हे स्पष्टच आहे. ब्रह्मदेवापासून ते गवतापर्यंतचे हे सर्व सविकल्प आणि निर्विकल्प दोन्ही एकरूपच आहेत. (४५०१)

जड गगनादि तृणावरी । जंगमें ब्रह्मादि कीटकान्त सारी ।
एकरूप पाहें निर्धारी । भलतेही अवस्थे ॥ २ ॥
आकाशापासून तृणापर्यंत सर्व जड पदार्थ, आणि ब्रह्मदेवापासून कीटकापर्यंत या दोहोंना एकरूप म्हणून नेहमी पहा. (४५०२)

निर्विकल्प जो आपण ब्रह्म । ओतप्रोत एकरूप सम ।
यामध्ये सविकल्पाचा उद्गम । आणि स्थिति लय ॥ ३ ॥
आपण निर्विकल्प ब्रह्मच झालेले असतो. आपण संपूर्ण जग व्यापलेले असते. कुठेही कणभर देखील जागा नसेल इतके ओतप्रोत आणि सारखेच समान असतो अशा आपणामध्ये सविकल्प उगम पावते, त्या आपल्यामध्ये स्थिर होते आणि आपल्यामध्येच लय पावते. (४५०३)

सर्व पिंडांसहित सविकल्पता । निर्विकल्प चिद्गगना आंतोता ।
किंवा सविकल्पामध्ये अपरोक्षता । व्यापकपणे निर्विकल्प ॥ ४ ॥
त्या निर्विकल्प चिद्गगनामध्ये सर्व पिंडांसहित सविकल्पता दाटलेली असते. किंवा या सर्व सविकल्पांमध्ये अपरोक्षतेने (प्रत्यक्षपणे) निर्विकल्पच व्यापून आहे. (४५०४)

जैसे घटमठ आकाशाचे पोटी । की घटमठी आकाशाची दाटी ।
तैशी आपणामध्ये जगाची राहटी । की जगामध्ये आपण ॥ ५ ॥
ज्याप्रमाणे घट, मठ इ. हे आकाशाच्या पोटात आहेत किंवा सर्व घटांमध्ये आणि मठांमध्ये आकाशच दाटून भरलेले आहे. दोन्ही एकच. त्याप्रमाणे ब्रह्मात्म्यामध्ये जगाची रहाटी आहे की जगामध्ये आपणच ब्रह्मात्म्याच्या रूपाने आहोत दोन्ही एकच. (४५०५)

सविकल्प तितुकेंचि हे जग । पाणियावरी जैसे तरंग ।
तरंगी पाहतां पाणी अभंग । तैसें सविकल्पी ब्रह्म ॥ ६ ॥
जितके सविकल्प तितकेच हे जग आहे, पाण्यावर जशा लाटा असाव्यात अथवा लाटांमध्ये पाणीच असावे, त्याप्रमाणे सविकल्पामध्ये ब्रह्मच असते. (४५०६)

यापरी जगामध्ये सबराभरित । परिपूर्ण निर्विकल्प अनंत ।
की अनंतामध्ये जग समस्त । उद्भवे राहे मावळे ॥ ७ ॥
त्याप्रमाणे निर्विकल्प अनंत ब्रह्मच जगामध्ये बाह्यांतर परिपूर्ण आहे. किंवा अनंतामध्येच सगळे जग उत्पन्न होते, राहाते आणि मावळते. (४५०७)

सविकल्प उद्भवतां आंत बाहेरी । तैसेंचि सभोंवतें स्थिति जोवरी ।
लय होतां एकरूप निर्विकारी । लयसाक्षी ब्रह्म ॥ ८ ॥
सविकल्प जग उत्पन्न होताच त्याच्या आत, बाहेर, सभोवती लयसाक्षी निर्विकल्प ब्रह्मच व्यापून असते, त्याची (जगाची)

अथवा सविकल्प निर्विकल्प । भिन्न तरी कोठे असती अल्प ।
जग जें उद्भवलें नामरूप । यासी पृथक् सत्व कैंचें ॥ ९ ॥
राहाटी जोपर्यंत आहे, तोपर्यंत ब्रह्म त्याला व्यापून असते आणि त्याचा लय झाला तरी ब्रह्मामध्ये काही बदल होत नाही, ते लय साक्षी म्हणून असतेच असते. ते एकरूप आणि निर्विकारी असते. (४५०८)

यासी आहेपणा परब्रह्माचा । भासती व्यापारती चिद्रूपें साचा ।
प्रियत्व स्वभाव तो आनंदाचा । तरी यासी रूप काय ॥ १० ॥
किंवा सविकल्प आणि निर्विकल्प थोडेतरी कधी भिन्न असतात का? त्याप्रमाणे नामरूपात्मक जे जग निर्माण होते त्याला वेगळे अस्तित्व कसे असेल? (४५०९)

दोरीवांचोनियां सर्पासी । अथवा शिंप त्यागूनियां रजतासी ।
किंवा स्थाणूविरहित पुरुषासी । काय रूप असे भिन्न ॥ ११ ॥
या सविकल्पाला आहेपणा जो आहे तो परब्रह्माच्या सद्रूपामुळेच होय. हे सविकल्प ब्रह्माच्या चिद्रूपामुळेच भासते, व्यवहार करते आणि सविकल्पाचे प्रियत्व हे तर ब्रह्माच्या आनंदरूपाचाच स्वभाव आहे. तेव्हा सविकल्पाच्या ठिकाणी असलेले अस्तिभातिप्रियत्व ही लक्षणे म्हणजे ब्रह्माचीच सच्चिदानंद ही लक्षणे होत. तेव्हा सविकल्पाचे वेगळेपण ते काय? (सविकल्प ब्रह्माहून वेगळे नाहीच.) (४५१०)

तैसें अस्तिभातिप्रियत्वाविण । काय नामरूपांसी वेगळेपण ।
असे म्हणून काढावें भिन्न । अमुक म्हणोनी ॥ १२ ॥
दोरीवाचून साला, शिपीच्या खेरीज रुप्याला, खांब वगळल्यास भासमान पुरुषाला काही वेगळे रूप असते काय? (४५११)

हें असो रज्जुसादिक । दृष्टांत असती विवर्तात्मक ।
परी उद्भवलें जें कां सोपाधिक । तेंही कारणाविण अरूप ॥ १३ ॥
त्याप्रमाणे या नामरूपात्मक जगाला अस्ति भाति प्रिय या ब्रह्माच्या लक्षणांपेक्षा काही वेगळेपण असते काय? त्यामुळे आपण त्याला ब्रह्मापासून अमुक अमुक म्हणून वेगळे काढू शकतो काय? (अर्थात जग हे ब्रह्मापेक्षा वेगळे काढता येत नाही) (४५१२)

मृत्तिकेवांनियां घटें । की कापुसाविण तंतुपटें ।
अथवा सुवर्णरहित चांगुले वाइटे । नगही रूपा येती ॥ १४ ॥
हे राहू दे, हे रज्जुसर्यादींचे दृष्टान्त विवर्ताचे आहेत. पण जे काही उपाधींसह उत्पन्न झाले आहेत ते पदार्थही त्यांच्या कारणाशिवाय अरूपच ठरतील. (४५१३)

पाणियावांचोनि तरंग । की आकाशत्यागें उठती मेघ ।
तेसें निर्विकल्पाहून हे जग । सविकल्पत्वें कोठे असे ॥ १५ ॥
मातीवाचून घटांना रूप प्राप्त होईल काय? कापसाशिवाय सूत, वस्त्रे निर्माण होऊ शकतील काय? किंवा सोने नसेल तर बरे वाईट अलंकारही आकाराला येणार नाहीत. (४५१४)

सादि व्यर्थचि भाविलें । घटादि रूपनाम कल्पिलें ।
परी दोरी की मृत्तिकादि संचलें । सर्पघटादि नासती ॥ १६ ॥
पाण्यावाचून लाटा कशा उठतील? आकाशाला वगळून मेघ कसे अस्तित्वात येतील? त्याप्रमाणे निर्विकल्पाशिवाय हे जग सविकल्पत्वाने कसे निर्माण होईल? (४५१५)

तैसें साकारा आलें तें रूप । नामें अमुक अमुक अमुप ।
परी ते दोनीही असद्रूप । उद्भवले ना राहिले ॥ १७ ॥
दोरीच्या जागी सर्पाची कल्पना उगीचच (पोकळ) ठरली. किंवा घटादी नामरूप व्यर्थ मानले तरी मूळ दोरी आणि मृत्तिका या गोष्टी तरी सत्य असतील की नाही? ती मूळची जशीच्या तशी राहतील आणि कार्यरूप सर्प आणि घट इ. नष्ट होतील (४५१६)

हे अवघी अज्ञानाची कल्पना । येन्हवीं कोणता यासी आहेपणा ।
एवं सर्व नाहींच अस्ति हे नाना । किंचितही सर्व ॥ १८ ॥
त्याप्रमाणे आकाराला आलेली रूपे आणि त्यांची अमुक अमुक अशी नावे निर्माण होतात, ती दोन्हीही असत् आहेत. कारण जे उत्पन्न झाले ते कधीही राहात नाही. (४५१७)

सर्व नाहींच हे बाधा करूनी । सर्व हें ब्रह्म श्रुति वाखाणी ।
तस्मात् एक निर्विकल्पचि पूर्णपणीं । सविकल्प नाहींच नाहीं ॥ १९ ॥
ही नामरूपे म्हणजे अज्ञानाची कल्पना आहे. त्याखेरीज त्यांना अस्तित्व तरी कुठे आहे? अशा प्रकारे हे सर्वही नानात्वाने असणारे मुळात नाहीच. तेव्हा हे सर्व नाहीच. (४५१८)

सर्प नोव्हे अवघी दोरी । रजत नाहींच शिंप सारी ।
तैसें निविकल्प एकरूप निर्धारी । सविकल्प नाहींच नाहीं ॥ २० ॥
हे सर्व नानात्व नाहीच. त्याचे निरसन करून श्रुती हे सर्वच ब्रह्म आहे असे सांगते. त्यामुळे एक निर्विकल्पच पूर्णपणे अस्तित्वात आहे. आणि सविकल्प हे नाहीच. त्याला सत्यत्व नाहीच. (४५२०)

स्थाणूच एक पुरुष हा कोठे । मृत्तिका एक कैंची घटें ।
कापुसचि असे तंतु ना पटें । तेवीं निर्विकल्पचि एक ॥ २१ ॥
एक स्थाणू (खांब) तेवढा सत्य आहे. पुरुष असत्य आहे. (खांबाला पुरुष उभा आहे असे मानण्यात खांब तेवढा सत्य आहे. पुरुष भासरूप आहे.) मृत्तिका तेवढी खरी आहे, त्यामुळे घटांना सत्यत्व कसे येईल? कापूसच तेवढा सत्य आहे. सूत अथवा वस्त्र यांना सत्यत्व नाही. त्याप्रमाणे निर्विकल्पच तेवढे खरे आहे. (४५२१)

अलंकार नसती एक सुवर्ण । कैचे तरंग एकरूप जीवन ।
तैसें कैचें सविकल्प धर्मधर्मी लक्षण । आहे तें निर्विकल्प ॥ २२ ॥
अलंकार नाहीतच सुवर्ण तेवढे खरे आहे. तरंगांना अस्तित्व कुठे आहे? सर्वत्र पाणीच एकरूपत्वाने आहे. त्याप्रमाणे धर्म, धर्मी या प्रकारचे सविकल्प यांना अस्तित्व कोठे आहे? आहे ते सर्व निर्विकल्पच आहे. (४५२२)

घटादिकांच्या ठाईं पाहतां । मृत्तिका आदि भासती तत्त्वतां ।
केवळ मृत्तिकादिकांत अवलोकितां । घटादिकांचा लेश नुरे ॥ २३ ॥
घट इ. मध्ये पाहू गेल्यास मृत्तिका इ.च सत्यत्वाने आढळतात म्हणून केवळ मृत्तिका इ. मध्ये पाह गेल्यास घट इ. चे लेशसुद्धा उरत नाही. (४५२३)

तैसें सविकल्पत्वीं जरी पाहिलें । तरी निर्विकल्प ओतप्रोत संचलें ।
केवळ निर्विकल्पी सविकल्प आटलें । लयसाक्षीच्या अनुभवें ॥ २४ ॥
त्याप्रमाणे सविकल्पात पाहू गेले असता सर्वत्र निर्विकल्पच ओतप्रोत भरलेले आहे. केवळ निर्विकल्पात पाह गेल्यास सविकल्प अदृश्य होते. तेथे फक्त लयसाक्षीचाच अनुभव येतो. (४५२४)

लयसाक्षी निर्विकल्पामाजीं । सविकल्प नाहींच नाही सहजीं ।
उद्भवतांही नाढळतीच दुजीं । एक निर्विकल्प खरें ॥ २५ ॥
लयसाक्षी निर्विकल्पामध्ये सविकल्प नाही ते नाहीच, जरी काही उत्पन्न झालेच तर एका निर्विकल्पाखेरीज दुसरे काही आढळणारच नाही. (४५२५)

ऐसें अन्वय व्यतिरिकेंकडून । पाहतां यथार्थ त्रिधा प्रमाण ।
सविकल्प नाहींच नाहीं काळीं कवण । त्रिकाळ निर्विकल्प ॥ २६ ॥
अशा प्रकारे अन्वय आणि व्यतिरेकाने यथार्थ पाहिले असता तीन्ही प्रमाणांच्या साहाय्याने सविकल्प कोणत्याही काळी नाहीच नाही. तिन्ही काळी केवळ निर्विकल्पच असणार आहे. (४५२६)

ऐशीं नामरूपें विचारें त्यागितां । अवघे अस्तिभातिरूप समस्ता ।
तरी कैचें स्थावरजंगम आतां । भूतभौतिकें कैचीं ॥ २७ ॥
अशा प्रकारे विचाराने नामरूपांचा त्याग केला असता सर्व पदार्थांमध्ये अस्ति भाति प्रियत्वच आढळणार आहे. अशा परिस्थितीत स्थावर अथवा जंगम, भते आणि भौतिकांना अस्तित्व कोठून असेल? (४५२७)

कैचा ब्रह्मा विष्णु महेश । कैचें कीटकान्त पिंड अनेश ।
एकलें निर्विकल्प अविनाश । नाम रूप नाहीं ॥ २८ ॥
मग ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश तरी कसे असतील? कीटकांपासून अनीश्वर पिंडापर्यंत तरी काय असणार आहे? फक्त अविनाशी असे निर्विकल्पच आहे. नामरूपे असणारे काहीच नाही. (४५२८)

तस्मात् आपुला देह आणि जग । उद्भवलेंच नाहीत हे सोंग ।
तरी स्फूर्त्यादि प्राणान्त उमग । राहें कोठे सविकल्पता ॥ २९ ॥
त्यामुळे आपला देह आणि जग ही उत्पन्नच झाली नाहीत. ती केवळ सोंगे आहेत. मग स्फूर्तीपासून प्राणांपर्यंत सर्वांना उत्पत्ती कोठे असेल? सविकल्पताच मुळात कोठे असेल? (४५२९)

एवं सविकल्पत्वाचा अभाव । एक निर्विकल्पचि सर्वदैव ।
तेथे मीतूंपणाचा कोठे भाव । कोठे परोक्षापरोक्ष ॥ ३० ॥
अशा प्रकारे सविकल्पत्वाचा सदैव अभावच आहे. एक निर्विकल्पच सदैव असणार आहे. तेथे मी तू इ. भावना कशा असतील? आणि मग परोक्ष आणि अपरोक्ष तरी कुठून असणार? (४५३०)

ऐसा निश्चयचि बाणून गेला । समाधि उत्थान कैचें त्याला ।
तथापि सविकल्पा उद्भव जाहला । तरीही समाधि न मोडे ॥ ३१ ॥
अशा प्रकारचा निश्चय ज्याचा पक्का झाला असेल, त्याला समाधी आणि उत्थान कसे असतील? तरीसुद्धा सविकल्पाची उत्पत्ती झालीच तरी त्याची समाधी भंग पावत नाही. (४५३१)

लय होऊन जे का निर्विकल्पता । तो असंप्रज्ञात समाधि तत्त्वतां ।
आणि उद्भवोनिही स्थिती एकरूपता । तो संप्रज्ञात समाधि ॥ ३२ ॥
लय होऊन जी निर्विकल्पता येते ती असंप्रज्ञात समाधी होय आणि सविकल्पता उत्पन्न झाली तरी साधकाची एकरूपता कायम राहते, तिला संप्रज्ञात समाधी म्हणतात. (४५३२)

सुवर्णादि आटून जरी पाहे । तरी अलंकारादि लेश न लाहे ।
तैसें सविकल्प न किमपि राहे । तें निर्विकल्प असंप्रज्ञ ॥ ३३ ॥
सोन्याचे अलंकार आटवून पाहिले तरी अलंकारांपैकी काहीही राहात नाही. त्याप्रमाणे सविकल्प किंचितसुद्धा उरत नाही तेच निर्विकल्प असंप्रज्ञ होय. (४५३३)

अलंकारादि असतां । नाम रूपेंविण सुवर्ण तत्त्वतां ।
तैसें निर्विकल्प सविकल्प उद्भवतां । हे सविकल्प संप्रज्ञ ॥ ३४ ॥
अलंकार इ. असताना देखील नामरूपे वगळता केवळ सोने शिल्लक असतेच. त्याप्रमाणे सविकल्प उत्पन्न झाले तरी जे निर्विकल्पच राहाते त्या स्थितीला सविकल्प संप्रज्ञात समाधी म्हणतात. (४५३४)

सविकल्प जरी उद्भवलें । तरी तें मिथ्यात्वें प्रतीतीस आलें ।
त्यामध्ये असून नाहीं हालवलें । निर्विकल्प ते निर्विकल्प ॥ ३५ ॥
सविकल्प जरी उत्पन्न झाले तरी ते मिथ्या आहे. याची प्रचीती येते. निर्विकल्प सविकल्पामध्ये असून देखील किंचितही हलवले जात नाही. निर्विकल्प ते निर्विकल्पच राहते. (४५३५)

अलंकार होता, सुवर्णपणा । जाहलाचि नाही अधिक उणा ।
मग असोत की आटोत नग नाना । सुवर्ण एकरूप ॥ ३६ ॥
सोन्याचे अलंकार घडवले तरी त्याच्या सुवर्णपणाला काहीही बाधा येत नाही. ते अधिक उणे होत नाही. मग सुवर्णाचे अनेक प्रकारचे दागिने असू देत किंवा ते आटवलेले असू देत, सोने हे दोन्ही स्थितीत एकरूपच असते. (४५३६)

तैसें सविकल्प उद्भवतां की निमतां । निर्विकल्प सहज एकरूपता ।
मग दोनी नामें तरी केउता । दोहीही समयीं ॥ ३७ ॥
त्याप्रमाणे सविकल्प निर्माण होवो अथवा लय पावो, निर्विकल्पात काही बदल होत नाही. ते स्वाभाविकपणे एकरूपच असते. मग सविकल्पाच्या वेळेस सविकल्प आणि निर्विकल्पाच्या वेळी निर्विकल्प अशी दोन नावे तरी कशाला हवीत? (४५३७)

निर्विकल्पत्वी ही निर्विकल्प । आणि निर्विकल्पचि उठतां सविकल्प ।
मग ते संप्रज्ञ असंप्रज्ञ जल्प । व्यर्थचि कां न ह्मणावें ॥ ३८ ॥
निर्विकल्पत्वामध्येही ते निर्विकल्पच आहे आणि सविकल्प उठल्यानंतरही ते निर्विकल्पच आहे. मग त्या संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात यांच्या गोष्टी व्यर्थ आहेत असे का म्हणू नये? (४५३८)

परी साधकासी दोन भाव भासले । कीं निर्विकल्प सविकल्प वेगळाले ।
म्हणोनि समाधिसी दों नांवातें ठेविलें । संप्रज्ञ असंप्रज्ञ ॥ ३९ ॥
पण साधकाला मात्र निर्विकल्प आणि सविकल्प असे दोन वेगवेगळे भाव भासतात म्हणून त्या त्या समाधींना संप्रज्ञात आणि असंप्रज्ञात अशी दोन ठेवली. (४५३९)

की सविकल्प अभावी निर्विकल्पता । ते असंप्रज्ञात समाधि तत्त्वतां ।
अथवा सविकल्पांत जे एकरूपता । ते संप्रज्ञात ॥ ४० ॥
सविकल्प नसेल तेव्हा जी निर्विकल्पता येते ती असंप्रज्ञात समाधी होय. किंवा सविकल्पांच्या उपस्थितीतसुद्धा जी निर्विकल्पाची एकरूपता राहाते तिला संप्रज्ञात समाधी असे म्हणतात. (४५४०)

असो उभयकाळीही पूर्ण ज्ञात्यासी । दुजी स्थितीच नव्हे अल्पसी ।
तेचि निरोपिजेल कांहीसी । साधका निश्चय व्हावया ॥ ४१ ॥
ते असो, पण या दोन्हीही काळी पूर्ण ज्ञानी जो असतो त्याला मात्र या दोन्ही एकरूपच आहेत. त्याला दुसरी अवस्था मुळीच अनुभवाला येत नाही. साधकाचा निश्चय व्हावा म्हणून त्याच स्थितीचे थोडेसे निरूपण आता करू. (४५४१)

सविकल्पही निर्विकल्पावाचोन । काय असे अमुक ह्मणून ।
ऐसा अन्वय जो आतां केला कथन । तेणेंसी युक्त पाहतां ॥ ४२ ॥
निर्विकल्पाच्या अभावी सविकल्पक समाधीला ही समाधी म्हणून उल्लेख करता येईल का? तिला तसे काही अस्तित्व असते का? असा जो अन्वयार्थ आता सांगितला, तो लक्षात घेऊन, (४५४२)

सविकल्प नाहींच आदि अंतीं । मध्येही नसेचि जरी उद्भवती ।
आद्यंत निर्विकल्प रूप चिती । तेचि मध्येही परिपूर्ण ॥ ४३ ॥
सविकल्प हे आरंभीही नाही आणि शेवटीही नाही आणि जरी मध्ये उद्भवल्यासारखे वाटत असले तरी ते मध्येही नसते. आरंभी आणि शेवटीही चित्तात निर्विकल्प चिद्रपच असते. तीच परिपूर्ण निर्विकल्पता मध्येही असते. (४५४३)

ऐसा निश्चयचि होऊन गेला । संशय निपटून मावळला ।
मग असो भलतिये अवस्थेला । परी तो सहज समाधि ॥ ४४ ॥
ज्या साधकाचा असा निश्चय झालेला आहे. ज्याचा संशय अगदी नष्ट झाला आहे, तो कोणत्याही अवस्थेत असो, त्याची ती सहज समाधीच असते. (४५४४)

सविकल्प चिद्रूपही असे मीची । निर्विकल्प तो केवळ स्वयेची ।
जैसें नग मोडितां घडितां सुवर्णची । तैसा दुजा भाव नाहीं ॥ ४५ ॥
सविकल्प चिद्रप मीच आहे. निर्विकल्प तर मी स्वतः आहेच. सोन्याचे दागिने घडवले काय किंवा मोडले काय, सोने ते सोनेच असते. त्याच्यात वेगळेपणा नसतोच. तसेच साधक सविकल्प अथवा निर्विकल्प या दोन्ही समाधींमध्ये त्याच्या मनात दुजा भाव नसतोच. (४५४५)

ब्रह्मादि तृणान्त सारें जग । पाहे जरी तरी तें निजांग ।
स्पर्शलाचि नाहीं दुसरा भाग । जड की चेतन ॥ ४६ ॥
ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत सर्व जग त्याने पाहिले तरी ते त्याला स्वरूपच वाटते. ते जड आहे की चेतन आहे असा दुजाभाव त्याच्या मनाला स्पर्शच करत नाही. (४५४६)

सविकल्प निर्विकल्प मात्र दोनी । भाग केलें बोलावयालागुनी ।
परी एकरूपचि सदां ज्ञानी । मीच ह्मणून घेती ॥ ४७ ॥
सविकल्प आणि निर्विकल्प अशी विभागणी फक्त बोलण्यापुरतीच केली आहे. ज्ञानी माणसे दोन्ही प्रसंगी एकरूपच असतात. दोन्ही अवस्थांमध्ये मीच आहे, असे ते मानतात. (४५४७)

स्फूर्तीपासून देहापर्यंत । हे सविकल्प वस्तुजात ।
परी ज्ञाता नामरूपा विरहित । एक निर्विकल्प घेतसे ॥ ४८ ॥
स्फूर्तीपासून ते देहापर्यंत सर्व वस्तू या सविकल्पच आहेत. पण ज्ञाता माज्ञ नामरूपरहित एक निर्विकल्पच म्हणूनच त्यांच्याकडे पाहतो. (४५४८)

कीं सविकल्प चिद्रूपही मी पूर्ण । जैसें नगीं एकरूप सुवर्ण ।
दुसरें किमपि हे नसे भान । नामरूप जगाचें ॥ ४९ ॥
अलंकारांमध्ये सोने जसे एकरूपच असते तसा सविकल्प चिद्रूपही मीच परिपूर्ण आहे. साधकाच्या मनात त्याशिवाय नामरूप जगाचे दुसरे कसलेही भान नसते. (४५४९)

विष्णुआदि पुढे आले । की कीटकादि समोर देखिले ।
परी उंच नीच नाहीं कल्पिलें । एक निर्विकल्प स्वयें । ॥ ५० ॥
विष्णू इ. देव पुढे आले किंवा कीटकादी क्षुद्र जीव समोर पाहिले तरी त्याच्या मनात उच्चनीच अशी भावना येत नाही. तोच स्वतः निर्विकल्प झालेला असतो. (४५५०)

तैसेंचि गगन थोर तृण हे सान । पाहतां भावीना अमुक ह्मणून ।
एकरूपचि निर्विकल्प आपण । निजांगें असे ॥ ५१ ॥
त्याचप्रमाणे आकाश हे थोर असून तृण हे लहान आहे हे तो पाहातो. परंतु त्यांच्यात लहानथोर असा भेद तो करत नाही. तो स्वतःच एकरूप निर्विकल्प झालेला असतो. (४५५१)

जैसा एक देह सर्व संघासहित । मीच ह्मणूनि प्रतीति घेत ।
तैसे ब्रह्मांड समस्त । अपरोक्ष ज्ञानिया । ॥ ५२ ॥
सर्व पदार्थ म्हणजे सर्व संघासहित एकच देह असून तो मीच आहे असा त्याचा अनुभव असतो. याप्रमाणे ज्ञान्याच्या दृष्टीने सर्व ब्रह्मांडच अपरोक्ष असते. (४५५२)

सविकल्पकाळी सर्व सविकल्पा । मीच ह्मणून घेतसे निर्विकल्पा ।
केवळ निर्विकल्पी तो मी तूं या जल्पा । ठाव कैंचा असे ॥ ५३ ॥
सविकल्पाचे उत्थान होते त्यावेळी सर्व सविकल्प मीच आहे असे म्हणून तो निर्विकल्पाचा स्वीकार करतो. आणि निर्विकल्पात तर मी तू अशा बोलण्याला वावच नसतो. कारण तेथे सविकल्पाचा अभावच असतो. (४५५३)

तें स्वयें निजांगेंचि आपण । अनुभवाव्यरूप अनुभवाविण ।
तेथें कैंचे उद्भवे मीतूंपण । सविकल्पा अभावीं ॥ ५४ ॥
तो स्वतःच अनुभवरहित (त्रिपुटीरहित) असा अनुभाव्य (अनुभवाचा विषय) झालेला असतो. तेथे सविकल्पाच्या अभावी मी तू असा भाव कसा उत्पन्न होईल? (४५५४)

सविकल्पी मात्र निर्विकल्प । उद्भवतां घेतसे एकरूप ।
परी उंच नीच हें नामरूप । न स्पर्शती कदा ॥ ५५ ॥
सविकल्प उद्भवल्याबरोबर तो एकरूप निर्विकल्पाचा स्वीकार करतो. परंतु उच्च नीच या प्रकारची नामरूपे त्याच्या मनाला कधी स्पर्शही करीत नाहीत. (४५५५)

आतां हें सविकल्पत्वे असो । की निर्विकल्पी समरसो ।
परी दुसरेपणाचा अतिसो । ज्ञातया नाहीं ॥ ५६ ॥
आता हे सर्व सविकल्पत्वाने असो की निर्विकल्पत्वाने असो, तरी ज्ञात्याच्या मनात दुसरेपणाचा भाव नसतो. (४५५६)

सतरंग अथवा निस्तरंग । सागर जैसा एकरूप अभंग ।
तैसा सविकल्प निर्विकल्पी असंग । निर्विकल्प स्वयें ॥ ५७ ॥
समुद्रात लाटा असोत अथवा लाटा नसोत, समुद्र मात्र एकरूप आणि अभंग असतो, त्याप्रमाणे सविकल्पामध्ये आणि निर्विकल्पामध्ये तो ज्ञाता स्वतः संगरहित निर्विकल्पच असतो. (४५५७)

समेघ अमेघ एक आकाश । न्यूनाधिकाचा नसे लेश ।
तैसा सविकल्प निर्विकल्पी अविनाश । निर्विकल्प स्वयें ॥ ५८ ॥
आकाशात मेघ असोत अथवा नसोत आकाशामध्ये कमी अधिकपणाचा लवलेशही नसतो. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष सविकल्प आणि निर्विकल्प दोन्ही अवस्थांमध्ये स्वतः अविनाशी निर्विकल्पच झालेला असतो. (४५५८)

ज्वाळा असतां की मावळतां । अग्नीसी जेवीं एकरूपता ।
तैसा सविकल्पी निर्विकल्पी तत्त्वतां । निर्विकल्प स्वयें ॥ ५९ ॥
ज्वाळा असताना किंवा मावळल्या असताना अग्नी एकरूपच असतो. त्याप्रमाणे सविकल्पात असो की निर्विकल्पात असो, निर्विकल्प तर सदैव निर्विकल्पातच असते. (४५५९)

मृगजळ पडे किंवा बिघडे । परी निजतेजें असावें मार्तंडें ।
तैसें सविकल्प निर्विकल्पी उघडें । निर्विकल्प स्वयें ॥ ६० ॥
मृगजळ पडो किंवा मोडो, परंतु सूर्य मात्र स्वतेजाने प्रकाशत असतोच. त्याचप्रमाणेच सविकल्पात अथवा निर्विकल्पात निर्विकल्पच स्वतः स्पष्टपणे असते. (४५६०)

मग सविकल्पता उमटली । किंवा निर्विकल्पता असो संचली ।
परी दुसरी स्थिति नाही आली । तरी भेद तो कोणता ॥ ६१ ॥
मग सविकल्पता उद्भवलेली असो किंवा निर्विकल्पताच दाटलेली असो, परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरी स्थिती त्याला येत नाही. तर मग भेद कोणता उरला? (४५६१)

हें जग क्रीडतें कीं पडलें । तेणेंचि रीतीं शरीरही आपुलें ।
परी निर्विकल्प जें स्वयें संचलें । तें जैसे तैसें ॥ ६२ ॥
हे जग क्रीडा करते आहे की पडलेले आहे, तसेच आपल्या शरीराची कोणतीही अवस्था असो, ज्ञानी पुरुषाला तिचे भान नसते. तो निर्विकल्पमयच झालेला असतो. त्याच्यात काहीही फरक पडत नाही. ते निर्विकल्पही जसेच्या तसेच असते. (४५६२)

स्फूर्तीपासून देहापर्यंत । सर्व व्यापारती जागृतींत ।
अथवा क्रीडतसे स्वप्नाआंत । की सुषुप्तीमाजीं लीन ॥ ६३ ॥
स्फूर्तीपासून ते देहापर्यंत सर्वच सजीव जागृतावस्थेत निरनिराळे व्यवहार करत असतात, किंवा स्वप्नांमध्ये सूक्ष्म देहाच्या रूपाने क्रीडा करत असतात, किंवा सुषुप्तीमध्ये ते लीन झालेले असतात. (४५६३)

मूर्छित किंवा मेले । की समाधींत एकाग्र जाहले ।
परी निर्विकल्प एकरूप संचलें । भलतेही अवस्थे ॥ ६४ ॥
ते मूर्छित झालेले असोत, किंवा मृत झालेले असोत, किंवा समाधीमध्ये एकाग्र झालेले असोत, यापैकी कोणत्याही अवस्थेत निर्विकल्प एकरूप होऊन भरून राहिलेले असते. (४५६४)

भलतैसेंही आचरतां । सुखी दुःखी की अभोगी भोगितां ।
निर्विकल्पाची एकरूपता । हे सहजस्थिति ॥ ६५ ॥
ते कसेही आचरण करोत; सुखी असोत, दुःखी असोत, किंवा सुखदुःखे भोगत असताही अभोगी राहात असोत, निर्विकल्प मात्र एकरूपच असते. हीच त्याची सहजस्थिती होय. (४५६५)

सर्व जगरूप एक आपण । की आपणामध्ये जग संपूर्ण ।
तेथें एक देहाचे कर्तेपण । उरेल कैंचें ॥ ६६ ॥
सर्व जगाचे रूप म्हणजे आपणच एक आत्मा आहोत, अथवा आत्मरूप आपल्यामध्येच संपूर्ण जग सामावलेले आहे. अशी जर परिस्थिती असेल तर तेथे एकट्या देहाचे कर्तेपण कोठून उरेल? (४५६६)

जग उद्भवलें की निमालें । जया निर्विकल्पी नाहीं स्पर्शलें ।
तेथें एक शरीराचे व्यापार जाहले । तेणें निर्विकल्प हाले केवीं ॥ ६७ ॥
जग उत्पन्न झाले की लोप पावले, पण ते निर्विकल्पाला जेथे स्पर्श करू शकत नाही तेथे एका शरीराचे काही व्यापार झाले तर निर्विकल्पात काय हालचाल होणार आहे? (४५६७)

आतां उठो की राहो सविकल्प । देहादि जगाचा उद्भव की लोप ।
परी ज्ञात्याची स्थिति एकरूप । हे सहज समाधि ॥ ६८ ॥
आता सविकल्प उठो अथवा राहो, देहादी जगाची उत्पत्ती होवो की ते लोप पावो, परंतु ज्ञानी साधकाची स्थिती एकरूपच असते. ही त्याची सहज समाधी होय. (४५६८)

अगा रविदत्ता हे चरम स्थिति । एकरूप सहजी सहज निश्चितीं ।
चरम म्हणिजे शेवटील इजपरती । वरुती दुजी नसे ॥ ६९ ॥
अरे रविदत्ता, ही चरमस्थिती (अंतिम स्थिती) आहे. ही निश्चितपणे एकरूप अशी सहजस्थिती आहे. चरम म्हणजे शेवटची स्थिती होय. तिच्यापेक्षा वरची अशी दुसरी स्थिती नाही. (४५६९)

जीवन्मुक्ति विदेहस्थिति । अलिप्तस्थिति कैवल्यमुक्ति ।
इजमाजी सर्व असती । वेगळे संपादणे नको ॥ ७० ॥
या सहजस्थिती नावाच्या अंतिम स्थितीमध्ये जीवन्मुक्ती, विदेहस्थिती, अलिप्तस्थिती, कैवल्यमुक्ती या सर्व मुक्ती समाविष्ट आहेत. हे वेगळे स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. (४५७०)

बहु कासया बोलणें । नित्य मुक्तिही या स्थितीच्या गुणें ।
सर्व ज्ञातयांचे घडे वर्तणें । या चरमस्थितीमुळे ॥ ७१ ॥
जास्त काय बोलावे? या मुक्तीमुळेच नित्य मुक्तीही साध्य होते. सर्व ज्ञानी लोकांचे व्यवहार या चरमस्थितीमुळेच चालतात. (४५७१)

ब्रह्मा विष्णु आणि शंकर । या स्थितींने करिती व्यापार ।
वसिष्ठ नारद सनत्कुमार । आणीकही थोर थोर ज्ञाते ॥ ७२ ॥
ब्रह्मा, विष्णू आणि शंकर या स्थितीनेच आपापले व्यापार करतात. तसेच वसिष्ठ, नारद, सनत्कुमार, आणखीही थोर थोर ज्ञाते; (४५७२)

मागें जाहले आतां वर्तमानीं । असती दत्त आदिकरूनी ।
या स्थितीनेंचि वर्तती जनीं । येथे भेद नाहीं ॥ ७३ ॥
मागे झालेले आणि आताही वर्तमानकाळी असलेले दत्त इ. ज्ञातेही जगामध्ये याच स्थितीने वावरतात. यात काही मतभेद नाहीत. (४५७३)

विष्णु शिव हे प्रगट होतां । गुरू विरहित बाणली तत्त्वतां ।
इतरांसी गुरुमुखें हे अभिन्नता । पावली इतुकाचि भेद ॥ ७४ ॥
विष्णू, शिव हे देव प्रकट झाल्यावर त्यांना गुरूशिवाय ही स्थिती बाणली होती. इतर ज्ञात्यांना गुरुमुखाने ती प्राप्त झाली होती हाच या दोन प्रकारातील भेद आहे. (४५७४)

परी स्थितिमाजी अणुमात्र । भेद हा नसे साचार ।
एकरूप सहजस्थिति निर्धार । प्राप्त ज्ञानिया ॥ ७५ ॥
बाकी स्थितीमध्ये अणुमात्रही भेद नाही. ज्ञान्यांना प्राप्त होणारी ही सहजस्थिती एकरूपच असते असे निर्धारपूर्वक सांगता येते. (४५७५)

दुजा कासयासी अतिसो । याचि स्थितीने आह्मींही असों ।
तेचि स्थिति तुजलागीं सांगतसों । प्राप्त व्हावी म्हणोनी ॥ ७६ ॥
फार काय सांगावे, रविदत्ता, आम्हीही (शंकराचार्य) याच स्थितीमध्ये राहतो. तीच स्थिती तुलाही प्राप्त व्हावी म्हणून मी तुला तिचे वर्णन करून सांगत आहे. (४५७६)

अपरोक्ष ज्ञान जया जाहलें । लयसाक्षित्व अभिन्नत्वे कळलें ।
ते ज्ञाते या स्थितीसी नाहीं पावले । ऐसें न घडे कल्पांती ॥ ७७ ॥
ज्यांना अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाले आहे आणि ज्यांना लयसाक्षित्वाने अभिन्नत्वाने ज्ञान झाले आहे त्या ज्ञात्यांना ही स्थिती प्राप्त झाली नाही, असे कधीही घडणार नाही. (कल्पान्त झाला तरी घडणार नाही). (४५७७)

परी कवणासी ज्ञान होतांच प्राप्ति । विचार निश्चयें तत्क्षणीं आकळिती ।
कवण ते वृत्तीच्या ध्यासें दृढ करिती । हळुहळु अभ्यासें ॥ ७८ ॥
पण एखाद्याला ज्ञान होताच ही स्थिती प्राप्त होते. विचाराच्या निश्चयाने ते ही स्थिती प्राप्त करून घेतात. काही लोक वृत्तीच्या ध्यासाने हळूहळू ती दृढ करतात. (४५७८)

जैसें अपरोक्ष ज्ञान पावावया । दोघे अधिकारी शिष्यराया ।
ह्या एक विचारेंचि पावे लवलाह्या । एक अभ्यासें हळुहळु ॥ ७९ ॥
अपरोक्ष ज्ञान प्राप्त होण्यासाठी हे शिष्या, दोनच अधिकारी आहेत. काही जण विचाराच्या साहाय्याने ती ताबडतोब प्राप्त करून घेतात. आणि काही अभ्यासाच्या साहाय्याने हळूहळू ती साध्य करतात. (४५७९)

तैसेंचि अपरोक्ष ज्ञानही जाहलियावरी । उत्तम कनिष्ठ दोन अधिकारी ।
उत्तम तो हे चरमस्थिती वरी । मंद पावे वृत्तिध्यासें ॥ ८० ॥
तसेच अपरोक्ष ज्ञान झाल्यावरही अधिकारी साधकांचे दोन प्रकार होतात. उत्तम आणि कनिष्ठ. उत्तम ही चरमस्थिती ताबडतोब प्राप्त करून घेतो, आणि मंदप्रज्ञ मात्र वृत्तीच्या ध्यासाने (अभ्यासाने) ही स्थिती प्राप्त करून घेतो. (४५८०)

उत्तमाचा निश्चय ऐसा । की मी ब्रह्म निजांगें आपैसा ।
येर हे सविकल्प तें सहसा । जाहलेच नाही ॥ ८१ ॥
उत्तम असा निश्चय करतो की, मी स्वतः ब्रह्मच आहे आता हे सविकल्प मध्येच उद्भवल्यासारखे वाटते. पण ते मुळात झालेच नाही. (४५८१)

अज्ञानें होतें वाउगें कल्पिलें । जग सत्य आणि भिन्नत्व आपलें ।
तें ज्ञान होतांचि दोन्ही गेले । अज्ञानासहित ॥ ८२ ॥
अज्ञानाने त्याची उगीच कल्पना केली. जग सत्य आहे आणि मी कोणी वेगळा आहे या दोन्ही कल्पना ज्ञान होताच अज्ञानासहित निघून गेल्या. (४५८२)

आत्मा ब्रह्म अभिन्न आपण । पहिलाचि असे केला नाहीं नूतन ।
देहासहित जग मिथ्या संपूर्ण । पहिलेंचि असे ॥ ८३ ॥
आत्मा हाच ब्रह्म असून आपण त्याच्याहन भिन्न नाही आहोत. आत्मा पहिल्यापासूनचाच असून त्याला कोणी नव्याने निर्माण केला नाही. देहासह संपूर्ण जग मिथ्या आहे. जगाचे मिथ्यात्व पहिल्यापासूनचेच आहे. (४५८३)

ऐसा निश्चय दृढतरचि केला । अभिन्न तो भिन्न नवचे पडिला ।
सत्यत्व येऊच नेदी सविकल्पाला । भिन्नत्वें जितुकें जग ॥ ८४ ॥
असा ज्ञानी माणसाने पक्का निश्चय केलेला असतो. तो ब्रह्मापासून अभिन्न असल्यामुळे वेगळा पडलेला नसतो. तो सविकल्पाला कधीच सत्यत्व येऊ देत नाही. तोच न्याय जे जग भिन्नत्वाने राहाते त्यालाही लागू आहे. कारण तेही सविकल्पच आहे. (४५८४)

ऐशिये निश्चयें देहादि जगाची । वर्तणूक जितुकी होय सविकल्पाची ।
ते सुखी होईना संशयाची । मुळी खांदिली ॥ ८५ ॥
अशा निश्चयामुळे देहादी जगाची सविकल्पत्वाने वर्तणूक जेवढी काही होत असते, ती सुखाने होऊ देत; त्याने मात्र आपल्या मनातून ती संशयाची मुळी खांदून काढलेली असते. (४५८५)

याचि नांवे सहजस्थिति । अपरोक्ष जाहली याही वरुति ।
पूर्ण विचारवंत तत्क्षणी लाहती । ऐसें मंदासी न घडे ॥ ८६ ॥
यालाच सहजस्थिती असे नाव आहे. ही सहजस्थिती अपरोक्षपणे बाणली पाहिजे. जे पूर्ण विचारवंत आहेत त्यांना ती त्याक्षणी ताबडतोब प्राप्त होते. पण मंदप्रज्ञाच्या बाबतीत असे घडत नाही. (४५८६)

यासी अभ्यासाच्या सायासें । अपरोक्ष ज्ञान जाहलें असे ।
परी तैसाचि निश्चय नसे । संशयामुळे ॥ ८७ ॥
त्याला अभ्यासाच्या प्रयत्नांनी अपरोक्ष ज्ञान झालेले असते. पण त्याचा त्याप्रमाणे निश्चय झालेला नसतो. कारण त्याच्या मनात अद्याप संशय शिल्लक राहिलेला असतो. (४५८७)

क्षणां निर्विकल्प दृढ करावें । क्षणां सविकल्पाकडे ढांसळावें ।
क्षणां वृत्तीने समाधाने असावें । क्षणां तळमळ ॥ ८८ ॥
तो एखाद्या क्षणी निर्विकल्प दृढ करतो, दुसऱ्या क्षणी ते सविकल्पाच्या दिशेने ढासळून पडते. एका क्षणी त्याची वृत्ती समाधानी असते, तर दुसऱ्या क्षणी त्या समाधानाच्या ऐवजी तिच्यात तळमळ होऊ लागते. (४५८८)

ऐसें व्हावया काय कारण । म्हणसी अपरोक्ष जाहलिया ज्ञान ।
तरी ऐकावें एकाग्र होऊन । हा पूर्वील ध्यास ॥ ८९ ॥
असे अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतरही होण्याचे कारण काय, म्हणून विचारशील तर एकाग्रचित्त होऊन ऐक. हा सर्व पूर्वीच्या ध्यासाचा परिणाम होय. (४५८९)

अपरोक्ष ज्ञान जरी जाहलें । परी दृढ अपरोक्षा नाही पावलें ।
तेणें वृत्तीसी पूर्वाध्यास उमटले । जे पहिलें दृढ होतें ॥ ९० ॥
केवळ अपरोक्ष ज्ञान झालेले असते. ते दृढ अपरोक्ष झालेले नसते. त्यामुळे वृत्तीमध्ये पूर्वीचे अध्यास प्रकट होतात. कारण ते अध्यास (भास) मनामध्ये अगोदर पक्के झालेले असतात. (४५९०)

वृत्तीसी मीच देह म्हणून । दृढ अभ्यास जाहला पुरातन ।
आतां संदिसें जाहलें अपरोक्ष ज्ञान । अहंब्रह्मास्मींचें ॥ ९१ ॥
वृत्तीला आपणच देह आहोत हा अभ्यास पूर्वीपासूनच झालेला असतो. अहं ब्रह्मास्मीचे अपरोक्ष ज्ञान हे नुकतेच (संदिसे) कोठे प्राप्त झालेले असते. (४५९१)

इकडे उदय होतां ज्ञानाचा । अहंब्रह्मास्मि निर्विकल्प साचा ।
निमिष्य एक जरी राहतां देहाचा । ध्यास उफाळे तिकडे ॥ १२ ॥
इकडे ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर त्यांच्या मनात 'अहं ब्रह्मास्मि' हा विचार ठसतो. तो लगेच निर्विकल्प होतो. हा निश्चय एखादा क्षणभर टिकतो, की लगेच तिकडे देहाचा ध्यास उफाळून येतो. (४५९२)

ऐसा क्षणक्षणां विक्षेप उठे । पूर्वाध्यासाचिये परिपाठे ।
तें दृढ अपरोक्ष न म्हणावें गोमटें । लयसाक्षित्व मात्र कळलें ॥ ९३ ॥
असा विक्षेप पूर्वाध्यासाच्या सवयीने क्षणाक्षणाला उठत राहतो. त्यामुळे त्याच्या त्या अपरोक्ष ज्ञानाला दृढ अपरोक्ष म्हणता येत नाही. त्याला फक्त लयसाक्षित्व म्हणजे काय ते कळलेले असते. (४५९३)

ऐशिया मंद अधिकारियासी । अभ्यास पाहिजे दृढ अपरोक्षासी ।
तरी हळुहळु दृढावे देहबुद्धि जैशी । ब्रह्मात्मबुद्धि सदृढ ॥ ९४ ॥
अशा मंद अधिकाऱ्याने काय केले पाहिजे? तर अपरोक्षाचा अभ्यास दृढ केला पाहिजे. तरच देहबुद्धी ज्याप्रमाणे दृढ झालेली असते त्याप्रमाणे त्याची ब्रह्मात्मबुद्धी हळूहळू दृढ होत जाईल. (४५९४)

तस्मात् तयासी वृत्तीचा अभ्यास । पाहिजे स्मरणरूप निदिध्यास ।
वाढवावें ब्रह्मात्म निश्चयास । देहबुद्धि क्षीण करावी ॥ ९५ ॥
म्हणून त्याने वृत्तीचा अभ्यास केला पाहिजे. ब्रह्मात्मबुद्धीचा स्मरणरूप निदिध्यास त्याला लागला पाहिजे. त्याने ब्रह्मात्मबुद्धीचा निश्चय वाढवला पाहिजे आणि देहबुद्धी क्षीण केली पाहिजे. (४५९५)

संकल्प उठो की राहो जावो । परी त्या सत्यत्व न द्यावें येवो ।
आणीक दुसरा नाहींच उपावो । स्मरण असावें मिथ्याचें ॥ ९६ ॥
संकल्प उठू देत, राहोत अथवा जावोत, त्याने त्यांना सत्यत्व येऊ देऊ नये. याशिवाय दुसरा उपायच नाही. नित्य त्या संकल्पांच्या मिथ्यात्वाचे स्मरण ठेवावे. (४५९६)

इकडे स्मरावा ब्रह्मात्मा आपण । जो लयसाक्षी निर्विकल्प परिपूर्ण ।
आणि तिकडे उठतांचि संकल्प स्मरण । मिथ्यात्वाचे असावें ॥ ९७ ॥
एकीकडे लयसाक्षी, निर्विकल्प, परिपूर्ण असा ब्रह्मात्मा आपण आहोत, याचे स्मरण ठेवावे आणि दुसरीकडे संकल्प उठताच त्यांच्या मिथ्यात्वाचेही स्मरण ठेवावे. (४५९७)

ऐसा अभ्यास चिरकाळ होतां । वृत्तीची गळे अहंममता ।
देहबुद्धीचा विक्षेप नुठे तत्त्वतां । ब्रह्मात्म निश्चय बाणे ॥ ९८ ॥
असा अभ्यास चिरकाळ झाला तर वृत्तीचा मी आणि माझेपणाचा अहंकार गळून पडेल. देहबुद्धीचा विक्षेप मग उठणार नाही आणि ब्रह्मात्मबुद्धीचा निश्चय वाढेल. (४५९८)

ऐसें ऐकतांचि रविदत्त । नेणपणे असे प्रश्न करीत ।
की दोहींकडील स्मरणाचा संकेत । कासया पाहिजे ॥ ९९ ॥
असे ऐकल्यानंतर रविदत्ताने नेणतेपणाने प्रश्न केला की, असा दुहेरी स्मरणाचा संकेत कशासाठी पाहिजे? (४५९९)

इकडे ब्रह्मात्मत्वाचे स्मरण । तिकडे सविकल्पाचें मिथ्या दर्शन ।
ऐसें दोहींकडे वोडगस्तपण । करावें कासया ॥ ४६०० ॥
एकीकडे ब्रह्मात्म्याचे स्मरण करायचे, तिकडे सविकल्पाच्या मिथ्यात्वाचे दर्शन घेत राहायचे, असा दोन्हीकडील ओढगस्तपणा कशासाठी करावा? (४६००)

यापरी सर्व सविकल्पाचा । निरोधचि कां न करावा साचा ।
उर्वरित उरेल जो साक्षी लयाचा । तो निर्विकल्प आपण स्वतां ॥ १ ॥
त्यापेक्षा सर्वच सविकल्पाचा निरोध का करू नये? त्या निरोधानंतर जो लयसाक्षी उरेल तो निर्विकल्पच असणार हे उघडच आहे. आणि हा निर्विकल्प लयसाक्षी आपण स्वतःच तर आहोत. (४६०१)

तस्मात् सर्व निरोधून सविकल्प । अखंड स्थिर व्हावा निर्विकल्प ।
जो असंप्रज्ञात समाधि अल्प । उत्थान न व्हावें ॥ २ ॥
तेव्हा सर्व सविकल्पाचा निरोध करून निर्विकल्पच अखंडपणे स्थिर का करून घेऊ नये? अशा निर्विकल्प समाधी म्हणजेच असंप्रज्ञात समाधी होय. अशी समाधी प्राप्त झाल्यानंतर थोडेसुद्धा उत्थान होऊ नये. (४६०२)

ऐसें रविदत्ताचे उत्तर ऐकतां । हांसोनि स्वामी बोलती तत्त्वतां ।
हा काय गा प्रश्न करिसी आतां । विरोधात्मक ॥ ३ ॥
असे हे रविदत्ताचे बोलणे ऐकताच स्वामी हसून म्हणाले, "अरे हा असा विरोधात्मक प्रश्न आता का विचारत आहेस? (४६०३)

मागें तुवां पुसिलें होतें । की देहबुद्धि न स्पर्शावी मातें ।
मग दिसेनात मिथ्याभूत समस्ते । मृगजलप्राय ॥ ४ ॥
मागे तू विचारले होतेस की, मला देहबुद्धीचा अजिबात स्पर्श होऊ नये. मग भोवतालचे मिथ्या पदार्थ मृगजलाप्रमाणे खुशाल दिसेनात का? (४६०४)

ते विसरून आतां म्हणसी । कीं निरोध व्हावा सर्व संकल्पासी ।
तरी हे न घडे कल्पांतेंसी । कोंडितां जरी वायु ॥ ५ ॥
ते विसरून आता म्हणत आहेस की, सर्व संकल्पांचा निरोध व्हावा. पण तू जरी वायू कोंडून बसलास तरी कल्पान्तीसुद्धा ते शक्य होणार नाही. (४६०५)

मागुतीं रविदत्त ह्मणतसे । जी जी मज तें विस्मरण नसे ।
परी आपण बोलिला की असे । समाधीचें लक्षण द्विविध ॥ ६ ॥
तेव्हा रविदत्त पुन्हा म्हणाला, "महाराज ती गोष्ट मी विसरलेलो नाही पण आपणच सांगितलेत की, समाधी दोन प्रकारची असते. (४६०६)

एक सविकल्प तें संप्रज्ञ । दुजा निर्विकल्प असंप्रज्ञ ।
हे दों रीतीं समाधीची संज्ञ । असे वेगळाली ॥ ७ ॥
सविकल्प समाधी म्हणजे संप्रज्ञ अथवा संप्रज्ञात समाधी आणि दुसरी निर्विकल्प समाधी म्हणजेच असंप्रज्ञ अथव असंप्रज्ञात समाधी अशा प्रकारे त्या दोन वेगळ्या समाधींची नावे वेगवेगळी आहेत. (४६०७)

म्हणोनि मी केली विनंति । की निर्विकल्पचि असावी स्थिति ।
तरी ते सांगावी कृपामूर्ति । समाधि असंप्रज्ञ ॥ ८ ॥
म्हणून मी विनंती केली की, आपल्याला निर्विकल्प समाधीच प्राप्त व्हावी. ते कृपामूर्ती महाराज, मला त्या असंप्रज्ञात समाधीचे स्वरूप सांगावे. (४६०८)

ऐसें म्हणोनि चरण धरिले । मग श्रीगुरु बोलते जाहले ।
म्हणती वत्सा आम्ही जें बोलिलें । तो भाव वेगळा ॥ ९ ॥
असे म्हणून त्याने आचार्यांचे पाय धरले. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, "अरे बाळा, आम्ही मागे जे म्हणालो, त्याचा अभिप्राय वेगळा होता. (४६०९)

तया असंप्रज्ञात समाधीचें । यथार्थ निरूपण करूं साचें ।
केवळ निर्मूल करणे सविकल्पाचें । ऐसें नव्हे ॥ १० ॥
त्या असंप्रज्ञात समाधीचे यथार्थ निरूपण तुझ्यापुढे आता सांगतो. असंप्रज्ञात अथवा निर्विकल्प समाधी म्हणजे केवळ सविकल्पाचे निर्मूलन करणे एवढेच नाही. (४६१०)

हे देहउपाधि असतां । वृत्ति उठेल सविकल्पता ।
तिजसवें मनबुद्ध्यादिकां समस्तां । उत्पत्ति होय ॥ ११ ॥
ही देहाची उपाधी जोपर्यंत आहे तोपर्यंत सविकल्पता रूप वृत्ती उठणारच. तिच्याबरोबर मन, बुद्धी इ. सगळ्या पदार्थांची उत्पत्ती होणारच. (४६११)

हे मागेंचि तुजला निरोपिलें । आणि ज्ञानाज्ञान वृत्तीकडे आलें ।
अनुभवणे जें निर्विकल्पाचे उमटलें । स्मरण विस्मरणही वृत्तीसी ॥ १२ ॥
हे तर मी तुला मागेच सांगितले आहे. आणखी असे की, ज्ञान आणि अज्ञान म्हटले की त्यांचा वृत्तीशी संबध आलाच. निर्विकल्पाचा अनुभव जो येतो त्याचे स्मरण अथवा विस्मरण ही दोन्ही वृत्तीलाच होतात. (४६१२)

परोक्ष अपरोक्ष शोकभंग । आनिरंकुशा तृप्ति अभंग ।
ह्या मोक्षरूप अवस्था सांग । सविकल्पाच्या असती ॥ १३ ॥
त्याप्रमाणे परोक्ष अनुभव, अपरोक्ष अनुभव, शोकभंग, अभंग अशी निरंकुशा तृप्ती या मोक्षरूप अवस्थाही सविकल्पाच्याच आहेत. (४६१३)

तया वृत्तीसी निरोधितां । उरे अखंडित जे निर्विकल्पता ।
तयासी अज्ञान तरी असे केउता । कीं आतां ज्ञान व्हावें ॥ १४ ॥
त्या वृत्तीचा निरोध केल्यावर जी अखंडित निर्विकल्पता उरते. त्यावेळच्या निर्विकल्पाला अज्ञान कोठे आहे, की ते घालविण्यासाठी आता नव्याने ज्ञान व्हावे? (४६१४)

निर्विकल्प तें निर्विकल्प । तेथे कोणताचि नसे आरोप ।
ज्ञानाज्ञान की स्मरमास्मरण । अल्प नसेचि तेथें ॥ १५ ॥
निर्विकल्प म्हणजे निर्विकल्पच. त्याच्याबद्दल कोणताही आक्षेप चालणार नाही. ज्ञान, अज्ञान, स्मरण, विस्मरण यांचा लेशही तेथे नसतो. (४६१५)

तस्मात् ज्ञानादि अवस्था वृत्तीच्या । होतां मावळती अज्ञानाच्या ।
ज्या का कृति बंधनात्मकाच्या । आवरणविक्षेपादि ॥ १६ ॥
म्हणून वृत्तीच्या ज्ञानादी अवस्था प्राप्त झाल्यावर अज्ञानाच्या आवरण. विक्षेप इत्यादी ज्या काही बंधनात्मक क्रिया असतील त्या मावळतात (नष्ट होतात) (४६१६)

तया वृत्तीसी में निरोधन । तरी ज्ञानाभूतीचे कवणा स्मरण ।
स्मरणावांचून अज्ञानबंधन । फिटेना सहसा ॥ १७ ॥
अशा त्या वृत्तीचे निरोधन केल्यानंतर ज्ञानाच्या अनुभूतीचे स्मरण तरी कोणाला असेल? आणि स्मरणाशिवाय अज्ञानाचे बंधनही सहसा फिटणार नाही! (४६१७)

अज्ञानवृत्तींत तैसेंचि उरलें । उगेंचि बलात्कारें तयेसी रोधिलें ।
तयासी ज्ञान ऐसें कवण बोले । ते समाधि नव्हे झोंप ॥ १८ ॥
वृत्तीत अज्ञान तसेच राहिले आहे आणि ते तसेच ठेवून त्या वृत्तीचे बळजबरीने निरोधन केले तर त्याला ज्ञान असे तरी कसे म्हणता येईल? ती समाधी खऱ्या अर्थाने समाधी होणार नाही. ती झोपच असेल. (४६१८)

सर्व वृत्तीचे अज्ञान जावें । अखंड निर्विकल्प ज्ञान स्फुरावें ।
तेंचि ज्ञान तेणेंचि मुक्त व्हावें । तया निरोधितां व्यर्थ ॥ १९ ॥
वृत्तीचे सर्व अज्ञान जावे आणि त्याजागी तिला अखंड निर्विकल्प ज्ञान स्फुरावे, तेच खरे ज्ञान होय. त्या योगानेच मुक्त होता येते. त्याचे निरोधन करणे व्यर्थ ठरेल. (४८१९)

आणीक हे ईशें जितुके निर्मिलें । ते जीवें काढितां जाती न लोपले ।
मनबुद्ध्यादि तों इशें उभविले । ते निमती कैसे ॥ २० ॥
आणखी असे की, ईश्वराने जे निर्माण केले आहे (ईशसृष्ट) ते जीवाने काढून टाकण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते लोप पावत नाही. मन, बुद्धी इ. तत्त्वे तर ईश्वरानेच निर्माण केली आहेत. ती कशी नष्ट होतील? (४६२०)

यावरी जीवाची कल्पना । असेल बाधकरूप रचना ।
ते त्यागिलीच त्यागितां समाधाना । पात्र होय साधक ॥ २१ ॥
असे असल्यामुळे जीव कल्पनेने जी सृष्टी निर्माण करतो ती जर बाधकरूप असेल तर तिचा त्याग केलाच पाहिजे आणि तिचा त्याग होताच साधक समाधानास पात्र होतो. (४६२१)

तस्मात् स्वतःसिद्ध जे जीवाचे विकल्प । साधकें निरोधावे जे बाधकरूप ।
तेंचि निरोपिजेल आधीं अल्प । पुढे निर्विकल्प कळेल ॥ २२ ॥
म्हणून स्वतःसिद्ध असे जीवाचे विकल्प असतील त्यापैकी जे बाधकरूप असतील आणि साधकाने ज्याचे निरोधन करणे आवश्यक आहे, त्यांचेच आधी निरूपण करू, त्यानंतर पुढे निर्विकल्पाचे स्वरूप कळेल. (४६२२)

श्लोकः - स्वतःसिद्धविकल्पास्ते निरोद्धव्याः प्रयत्नतः ॥ १४ ॥ (उत्तरार्ध)
अर्थ : जे स्वतःसिद्ध विकल्प असतील त्यांचा प्रयत्नपूर्वक निरोध करावा. ॥१४॥ (उत्तरार्ध)

स्वतःसिद्ध जे जे बाधक विकल्प । ते ते निरोधावे नुरावे अल्प ।
जैसा जैसा प्रयत्नाचा साक्षेप । असेल तेणें तेणें रीतीं ॥ २३ ॥
स्वतःसिद्ध असे जे बाधक विकल्प असतील त्यांचे निरोधन करावे. ते थोडेसुद्धा शिल्लक राहू नयेत. जेवढा म्हणून प्रयत्नांचा खटाटोप करता येईल त्या त्या रीतीने तो निरोध करावा. (४६२३)

येर धर्मधर्मीसहित । मनबुझ्यादि इंद्रियें समस्त ।
हे दिसेनात कां मिथ्याभूत । यासी निरोध नको ॥ २४ ॥
बाकीचे धर्म आणि धर्मीसहित (गुण आणि गुणी यांच्यासहित) असणारी मन, बुद्धी इत्यादी सगळी मिथ्याभूत इंद्रिये खुशाल दिसेनात का, त्यांचा निरोध करू नये. (४६२४)

मागें तुजला जीवसृष्टीचें । निरोपण केले प्रांजळ साचें ।
तितुकेंही बाधक असे कैंचें । त्यांतीलही मोक्षा उपयोगी ॥ २५ ॥
यापूर्वी तुला जीवसृष्टीचे स्वरूप स्पष्ट करून सांगितले (ओ. ११९१-११९५, ४४२६-४४५४ आणि आगमसार ५.५.१०-१८ पहा.) ती सगळीच्या सगळी तत्त्वे बाधक कशी असतील? त्यांच्यापैकी काही मोक्षाला उपयोगाची आहेत. (४६२५)

जागृतीपासून मोक्षापर्यंत । हे अवघेचि असे जीवकृत ।
परी शास्त्रीय जें कां मोक्षासी देत । तें त्यागितां मोक्ष कैंचा ॥ २६ ॥
जागृतीपासून मोक्षापर्यंत हे सर्व जीवकृतच आहे. परंतु शास्त्रीय सृष्टी जी आहे ती मोक्ष प्राप्त करून देणारी आहे. तिचा त्याग केल्यावर मोक्ष कसा मिळेल? म्हणून तिचा त्याग करू नये. (४६२६)

श्रवण मनन निदिध्यास । अहंब्रह्मास्मीचा जो अभ्यास ।
हाचि मोक्षद होय साधकास । विचारासहित ॥ २७ ॥
श्रवण, मनन, निदिध्यास, 'अहं ब्रह्मास्मि'चा अभ्यास हे सर्व साधकाला मोक्ष देणारे आहे. मात्र त्याला विचाराची जोड पाहिजे. (४६२७)

वृत्तीचा लय करूनि पाहणें । लयसाक्षित्वाची प्रतीति बाणणे ।
हेही सविकल्प जीवाचे गुणें । अन्यथा न घडे कधीं ॥ २८ ॥
वृत्तीचा लय पाहणे, लयसाक्षित्वाची प्रतीती बाणणे, हे सर्व सविकल्प अशा जीवामुळेच शक्य होते. नाहीतर या गोष्टी शक्य झाल्या नसत्या. (४६२८)

एवं श्रवणापासून लयसाक्षित्वापर्यंत । हे शास्त्रीय जीवाचें जनित ।
हे अज्ञान नासून मोक्षदानी होत । तरी हे निषेधितां न ये ॥ २९ ॥
अशा प्रकारे श्रवणापासून ते लयसाक्षित्वापर्यंत हे सर्व शास्त्रीय जीवसृष्ट होय. ते अज्ञान नष्ट करून मोक्ष देणारे आहे. त्यामुळे त्याचा निषेध करता येत नाही. (४६२९)

ययाची तो अपेक्षा साधका । तरी हे सापेक्षिती देहादिका ।
तस्मात् रोध जो करावा निका । तो सांगे कवणाचा ॥ ३० ॥
या जीवसृष्टाची तर साधकाला गरज आहे. पण या गोष्टी देहादिकांवर अवलंबून आहेत. तेव्हा त्यांचा निरोध करता येत नाही. म्हणून निषेध कुणाचा करायचा ते आधी सांग. (४६३०)

. मुख्य शरीर तो सांग पाहिजे । तरी घडेल साधन केलें जें जें ।
श्रोत्रादि ज्ञानेंद्रिय श्रवण कीजे । प्रवासी वाणी असावी ॥ ३१ ॥
मुख्य शरीराचा सहवास तर पाहिजेच आहे. त्यामुळेच तर साधन घडते. श्रवण इ. करण्यासाठी श्रोत्र (कान) इ. इंद्रिये हवीतच. प्रश्न विचारण्यासाठी वाणी हवीच. (४६३१)

मननासी मन बुद्धि चित्त । पाहिजे तरीच मनन घडत ।
निदिध्यासासी वृत्ति अपेक्षित । अहंब्रह्मास्मिरूपें ॥ ३२ ॥
मनन करण्यासाठी मन, बुद्धी, चित्त यांचीही गरज आहेच. त्यांच्यामुळेच तर मनन घडते. निदिध्यासासाठी 'अहं ब्रह्मास्मि' या स्वरूपाची वृत्ती पाहिजे. (४६३२)

सामान्य अथवा विशेषवृत्ति । परी साभिमाने असावी अहंकृति ।
जरी दृढतर अहंब्रह्म प्रतीति । तरीच देहबुद्धि गळे ॥ ३३ ॥
सामान्य अथवा विशेष वृत्ती पाहिजेत. तसाच अभिमान स्वरूपाचा अहंकारही पाहिजेच. 'अहं ब्रह्मास्मि' अशी प्रतीती जर दृढ असेल तरच देहबुद्धी गळून पडणार ना! (४६३३)

तस्मात् वृत्तीपासून देहादि सकळ । या ईशसृष्टीचे पाहिजें बळ ।
त्यांत प्रतिबिंबत्वें जीव हा केवळ । अपेक्षिजे साधकें ॥ ३४ ॥
म्हणून वृत्तीपासून ते देह इ. पर्यंत या सगळ्या ईशसृष्टीचे पाठबळ साधनासाठी आवश्यक आहे. त्यात बुद्धीत प्रतिबिंबित होणाऱ्या जीवाची तर साधकाला अपेक्षा असतेच. (४६३४)

याचि हेतू वृत्त्यादिकांचा । निरोध न करावा किमपि साचा ।
अशास्त्रीय स्वतःसिद्ध विकल्पाचा । निरोध केलाच पाहिजे ॥ ३५ ॥
याच कारणामुळे वृत्ती इत्यादींचा थोडासुद्धा निरोध करू नये. मात्र अशास्त्रीय स्वतःसिद्ध विकल्पांचा निरोध अवश्य केलाच पाहिजे. (४६३५)

कामादिक हे बाधक असती । आणि मी माझेपणाची प्रीति ।
अथवा कृष्यादिकांची कृति । बळे निरोधिली पाहिजे ॥ ३६ ॥
कामादिक हे बाधक आहेत. (३२७६-३२९१ ओव्या पहा.) तशीच मी आणि माझेपण यांवरची आसक्ती, त्याप्रमाणेच शेती इ. व्यवहार यांचा बळेच का होईना निरोध केलाच पाहिजे. (४६३६)

ऐसे हे बाधक स्वत:सिद्ध विकल्प । मागे त्यांचे केलें स्पष्टरूप ।
ययासी उरों न देतां अल्प । यत्ने निरोधावे ॥ ३७ ॥
असे हे बाधक असणारे स्वतःसिद्ध विकल्प होत. मागे त्यांचे स्वरूप स्पष्ट केले आहे (पहा ३२७६-३२९१). त्यांचा थोडासुद्धा अंश उरू न देता प्रयत्नपूर्वक निरोध केलाच पाहिजे. (४६३७)

निरोध ह्मणिजे विवेकेंकडून । लयचि व्हावयाचा संपूर्ण ।
की उद्भवचि न व्हावा फिरून । घोर मूढ वृत्तीचा ॥ ३८ ॥
निरोध म्हणजे विवेकाच्या साहाय्याने या विकल्पांचा पूर्ण लयच झाला पाहिजे. त्यामुळे घोर, मूढ वृत्तीची पुन्हा उत्पत्तीच न झाली पाहिजे. (४६३८)

हे माझे हे हे तुझे असती । हे चांगले वाईट भाविजेती ।
हेही असे जीवाची कृती । म्हणोनि निरोधावे ॥ ३९ ॥
हे माझे आहेत, हे हे तुझे आहेत; हे वाईट आहेत, हे चांगले आहेत इ. असे मानले जाते. ही सगळी जीवाचीच सृष्टी होय. म्हणून यांचा निरोध केलाच पाहिजे. (४६३९)

हे द्वेष्य हे उपेक्ष हे प्रिय । यापासून होतसे अमुक कार्य ।
हें हैं कांहीच उपेगा नये । हे जीवकृत निरोधावें ॥ ४० ॥
हे द्वेष्य (द्वेष करण्याजोगे) आहेत, हे उपेक्ष्य (दुर्लक्ष करण्याजोगे) आहेत; हे प्रिय आहेत. यांच्यापासून आपले एक काम होणार आहे; असल्या विकल्पांचा साधनेत काहीही उपयोग होत नाही, म्हणून त्या जीवाने केलेल्या कृतींचा निरोध केलाच पाहिजे. (४६४०)

बहुत कासयासी बोलणें । देहबुद्धि वाढेल जेणें गुणे ।
तो स्वधर्म असतांही त्याग करणे । शास्त्रीय अथवा लौकिक ॥ ४१ ॥
जास्त काय सांगू? ज्यामुळे देहबुद्धीचे पोषण होते, त्या गोष्टींचा मग तो स्वधर्म असला तरी, तो प्रकार शास्त्रीय असो वा लौकिक, त्यांचा त्याग केलाच पाहिजे. (४६४१)

जेथे जेथें साभिमान उपजे । पुण्यपापात्मकाची उमटती बीजें ।
तें तें अवश्य बळें त्यागिजे । स्वतःसिद्ध बाधक म्हणोनी ॥ ४२ ॥
जेथे जेथे अभिमान (अहंकार) उत्पन्न होईल, ज्या कृत्यात पापपुण्याची बीजे उमटलेली असतात, त्यांचा स्वतःसिद्ध बाधक म्हणून बळजबरीने सुद्धा त्याग केलाच पाहिजे. (४६४२)

हे बोलतां कधीही न सरे । परी अल्प संकेतें जाणावें सारें ।
स्वतःसिद्ध बाधक असेल साचारें । तितुकें खांदून काढावें ॥ ४३ ॥
हे कितीही सांगितले तरी संपणार नाही. येथे थोडेसे दिग्दर्शन केले आहे. तेवढ्यावरून बाकीचे समजून घ्यावे. जेवढे म्हणून स्वतःसिद्ध बाधक असेल ते सर्व खांदून टाकून द्यावे. (४६४३)

येर हे जीवकृतही असतां । जे बाधक न होती असती सानुकूलता ।
ते ते व्यापारही न येती त्यागितां । स्नानभोजनादिक ॥ ४४ ॥
बाकीचे जे जीवकृत असूनही बाधक नाहीत, आणि अनुकूल असतील तर ते स्नान, भोजन इ. सारखे व्यापारही सोडून देता येत नाहीत. (४६४४)

आणि वृत्तीपासून प्राणापर्यंत । जितुकें हे असे ईशकृत ।
ययाचे निरोधन नको किंचित । साधना उपयोगी ॥ ४५ ॥
आणि वृत्तीपासून प्राणांपर्यंत जेवढे काही ईशकृत असेल, त्यांचे निरोधन किंचितसुद्धा करू नये कारण ते साधनेला उपयोगी असते. (४६४५)

येथेही कोणी मानील मंद । कीं जोवरी लयसाक्षिज्ञान नव्हतें शुद्ध ।
तोंकाल हे वृत्यादि विशद । साधना अपेक्षिजे ॥ ४६ ॥
येथे कोणी मंदबुद्धीचा साधक मानील की. जोपर्यंत शुद्ध लय साक्षीचे ज्ञान होत नाही, तोपर्यंतच वृत्ती इ. स्पष्ट गोष्टींची साधनेसाठी अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही का? (४६४६)

तें लयसाक्षिज्ञान जाहलियावरी । आतां साधनअपेक्षा कासया तरी ।
वृत्यादि न लगतां ज्ञानोत्तरीं । रोधितां बाध काय ॥ ४७ ॥
आणखी असे की, एकदा लयसाक्षिज्ञान झाल्यावर साधनांची अपेक्षा का करावी? वृत्ती इ. ची ज्ञान झाल्यानंतर गरज भासत नाही. तेव्हा त्यांचा निरोध करण्यात काय अडचण आहे? (४६४७)

ऐशिये आशंकेचे उत्तर । देऊं ते ऐकावें निरुत्तर ।
अज्ञान होत तेव्हां विकार । वृत्यादिकांचा नव्हता ॥ ४८ ॥
असल्या आशंकांचे योग्य उत्तर आता देतो, ते लक्ष देऊन ऐक. जोपर्यंत अज्ञान होते तोपर्यंत वृत्त्यादिकांचा विकार नव्हता. (४६४८)

आतां ज्ञान जाहलिया बाधक वाटती । तरी हे ज्ञानचि नव्हे केवळ भ्रांति ।
हे मिथ्या असून सत्य जाइली प्रतीति । आणि त्यागू म्हणे तो साभिमान ॥ ४९ ॥
आणि आता ज्ञान झाल्यावर ते बाधक वाटतात हे कसे? ते बाधक वाटत असतील तर ज्याला ज्ञान म्हणतोस ते खरे ज्ञानच नव्हे. ती केवळ भ्रांती समजावी लागेल; कारण वृत्त्यादिक मिथ्या असताना तू त्यांना सत्य मानत आहेस. आणि त्यांचा त्याग करू पाहतोस हा तुझा अभिमान होय. (४६४९)

इकडे सत्यत्व आलें यया समस्तां । तिकडे बळावली द्वैत अहंता ।
तरी तें अपरोक्षज्ञान असे केउता । हे केवळ भ्रांति ॥ ५० ॥
एकीकडे या सगळ्या मिथ्या गोष्टींना सत्य मानलेस ही एक चूक झाली, आणि दुसरीकडे द्वैतबुद्धीने तुझी अहंता बळावली ही दुसरी चूक होय. अशा परिस्थितीत तुझे ते ज्ञान अपरोक्ष ज्ञान आहे असे कसे म्हणता येईल? ती केवळ भ्रांतीच ठरते. (४६५०)

सर्वांसी सत्यबुद्धि केली दृढ । त्यागितां अभिमान हा भिन्न द्वाड ।
असतां निरोधून बैसतां भ्याड । तो मुक्त नव्हे कल्पांती ॥ ५१ ॥
सर्व गोष्टींना सत्य मानण्याची बुद्धी दृढ केलीत, काही गोष्टींचा त्याग करायला सांगितले तर भेदोत्पादक द्वाड अभिमान आडवा येतो. ज्यांचा त्याग करायची गरज नाही असे सांगताच त्यांचा भित्रेपणाने निरोध करून भ्याडासारखे बसता, अशी माणसं कल्पान्तीही मुक्त होणार नाहीत. (४६५१)

रोगी झांकून मारिले । उपचारें आरोग्य नाही केले ।
तैसें असतां मिथ्यात्व नाही कळले । कोंडून से मूढ ॥ ५२ ॥
रोग्याला उपचार करून स्वास्थ्य द्यायचे तर ते सोडून रोग्यालाच झाकून मारता; त्याप्रमाणे मिथ्यात्व न कळल्यामुळे स्वतःला कोंडून घेऊन बसता; हा मूर्खपणा झाला. (४६५२)

घरासी अग्नि लागला । आणि कपाट देऊन आंत ठेला ।
तैसा जीवत्व साभिमाने बांधला । रोधून बैसे तो आत्मघ्न । ॥ ५३ ॥
घराला आग लागली असता दारं बंद करून घरातच स्वतःला कोंडून घेतले त्याप्रमाणे जीवत्वाच्या अभिमानाने बांधला गेला, अशा वेळी निरोधन करून बसतो तो आत्मघातकी समजावा. (४६५३)

अरे अपरोक्षज्ञान जोवरी नवतें । तोवरी मिथ्यात्वें क्षीण केलीं समस्ते ।
तरी ज्ञान जाहालिया बाधिती केउते । कीं मेले विवेकादि ॥ ५४ ॥
अरे, अपरोक्ष ज्ञान जोपर्यंत झाले नव्हते तोपर्यंत सर्वांना मिथ्या ठरवून क्षीण केले होतेस. आता तर ज्ञान प्राप्त झाले आहे अशा वेळी ती तत्त्वे कशी बाधक ठरतील? बाधक ठरतील म्हणावे तर विवेक इ. साधने नष्ट झालेली असतील का? (४६५४)

अथवा आणीक एक परिहार । सर्वांचा लय करोनी साचार ।
जीवन्मुक्तीचा सुखानुकार । कवणे भोगावा ॥ ५५ ॥
किंवा आणखी एक परिहार करणे शक्य आहे. जर सर्वांचा लय करून बसले तर जीवन्मुक्तीचा आनंद कोणी भोगावा? (४६५५)

प्रजा अवघीच मारावी । तरी केवीं भोगिजे राज्यपदवी ।
तैशी सर्व हे निःशेष लय पावावी । तरी जीवन्ममुक्ति कवणा ॥ ५६ ॥
सगळी प्रजा आधीच मारून टाकल्यावर राज्य पदवी कशी भोगता येईल? (तशा प्रकारच्या प्रजा नसलेल्या राज्य सुखाला काय अर्थ राहिला?) त्याप्रमाणे सर्व पदार्थ निःशेष लय पावतील तर जीवन्मुक्तीचे सुख कोणाला मिळेल? (४६५६)

आणि ज्ञान जाहलिया साधन नलगे । म्हणसी हेचि मुळी अयोग्य ।
देहबुद्धि जे बैसली अव्यंग । ते अभ्यासेंविण न मरे ॥ ५७ ॥
ज्ञान झाल्यावर साधनाची गरज नाही, असे म्हणत असतील तर तेच मुळात अयोग्य आहे. देह बुद्धी ठणठणीत राहन डोक्यात बसली असता ती अभ्यासावातून मरणार नाही. (ज्ञानोत्तर अभ्यास चालू ठेवलाच पाहिजे) (४६५७)

वृत्तीसी अभ्यास देहबुद्धीचा । पडिला असे बहु कल्पांचा ।
ब्रह्म मी ह्मणून घेतला जो साचा । भाव तो होपळ ॥ ५८ ॥
वृत्तीला देहबुद्धीचा अभ्यास अनेक कल्पांपासूनचा आहे. आता मी ब्रह्म आहे' असे म्हणून जो भाव घेतला आहे तो व्यर्थ आहे. (तो फार अल्प काळाचा आहे) (४६५८)

इतुकेनें कृतकृत्य मानोनी । बैसतां सर्व हे निरोधूनी ।
पुढें उत्थान पावतांचि क्षणीं । देहबुद्धि आधीं उठेल ॥ ५९ ॥
एवढ्यावर कृतकृत्य मानून सर्वांचा निरोध करून साधक बसला तर पुढे उत्थान झाल्याबरोबर सर्वात प्रथम ती दाबून ठेवलेली ती देहबुद्धीच उफाळून येईल. (४६५९)

किंचित भाव जो ब्रह्मास्मीचा । लय होवोनियां समूळ तयाचा ।
साभिमान उफाळेल देहाचा । अनावर पूर्ववत ॥ ६० ॥
अहं ब्रह्मास्मि'चा जो किंचित भाव होता त्याचा समूळ लय होऊन देहाचा अभिमान पूर्ववत् अनावर होऊन उफाळून उठेल. (४६६०)

ह्मणसी उत्थान होईल कासया । तरी ऐसें न घडे कल्पी कवणीया ।
उर्वरित प्रारब्ध भोगावया । व्यापारा येणेचि लागे ॥ ६१ ॥
तू असे म्हणशील की उत्थान कसे होईल? ते होणारच नाही. तर असे कोणत्याही कल्पात कधीच होणार नाही. उर्वरित प्रारब्ध भोगण्यासाठी जीवाला व्यापारात यावेच लागते. (४६६१)

तेव्हा हे सर्व सत्य प्रतिपादून । कर्म भोगील देहाभिमान घेऊन ।
जाहलें ज्ञान ते सर्व निमून । अज्ञानें बंधनीं पडे ॥ ६२ ॥
तेव्हा मग व्यापारातील सर्व गोष्टी खऱ्या आहेत असे मानून तो देहाभिमान धारण करून कर्म भोगीत राहील. तेव्हा झालेले ज्ञान लोप पावून अज्ञान घेईल. आणि त्या अज्ञानाने पुन्हा बंधनात पडेल. (४६६२)

ह्मणसी उत्थान पावतां क्षणीं । विवेक करावा मिथ्या म्हणोनी ।
तरी पुढे जो प्रवर्तसी विवेचनीं । तो आतांचि कां न करिसी ॥ ६३ ॥
तू यावर म्हणशील की, उत्थान होताक्षणीच हे सर्व मिथ्या आहे, असा विवेक करावा. तर आमचे म्हणणे असे की, पुढील काळात हा जो विवेक तू करायला निघालास तो विवेक आताच का करत नाहीस? (४६६३)

निरोधून उत्थानी जरी विवेचन केलें । तरी तें विचाराचेंचि फळ पावलें ।
निरोधाने अधिक काय जाहलें । अति कष्ट करोनी ॥ ६४ ॥
आता सगळ्या गोष्टींचा निरोध करून नंतर उत्थान झाल्यावर विवेक केलास तरी त्याचा अर्थ हाच झाला की सर्व विवेकाचेच फळ मिळाले. तेव्हा एवढे कष्ट करून निरोध करून अधिक काय झाले? (४६६४)

तस्मात् सर्व हे असतां वृत्तीनें । खलून ब्रह्मबुद्धि वाढवणे ।
तरीच देहबुद्धि क्षीण होणे । येरव्ही निरोधे नव्हे ॥ ६५ ॥
तेव्हा हे सर्व पदार्थ सभोवती असताना वृत्तीचा खल करून ब्रह्मात्मबुद्धी वाढवावी. तरच देहबुद्धी क्षीण होईल. एरवी केवळ निरोधाने ती क्षीण होणार नाही. (४६६५)

देहबुद्धि बळकट जैशी जाहली । तैशी ब्रह्मबुद्धि पाहिजे दृढ केली ।
हे होईल जरी चिरकाल वृत्ति खलिली । नुसध्या निरोधे नोव्हें ॥ ६६ ॥
देहबुद्धी जशी बळकट होते, तशी ब्रह्मबुद्धी दृढ केली पाहिजे. जर दीर्घकाळपर्यंत वृत्तीचा खल केलास तरच हे शक्य होईल. नुसत्या निरोधाने होणार नाही. (४६६६)

अपरोक्षज्ञान जरी जाहलें । एकदां लयसाक्षी प्रतीती आलें ।
तरीही वृत्तीने पाहिजे घोकिलें । दृढ अपरोक्ष व्हावया ॥ ६७ ॥
अपरोक्ष ज्ञान जरी झाले, एकदा लयसाक्षित्व प्रतीतीस आले तरी वृत्तीने ते पुनःपुन्हा घोटले पाहिजे. तरच ते दृढ अपरोक्ष ज्ञान होईल. (४६६७)

दृढ अपरोक्ष तया ह्मणावें । कीं त्रिधा परीही उत्थान न व्हावें ।
सत्यासी मिथ्यात्व न यावें । आणि मिथ्यात्वा सत्यत्व ॥ ६८ ॥
दृढ अपरोक्ष त्यालाच म्हणावे की, ज्यामुळे तीन्ही प्रकारचे उत्थान होणार नाही. (१) सत्य गोष्टीला मिथ्यत्व येणार नाही आणि मिथ्याला सत्यत्व येणार नाही. (४६६८)

देहाऐशी ब्रह्मात्मबुद्धि । दृढ व्हावी स्वप्नाहीमधीं ।
भलतैसा देह व्यापारो परी कधीं । अहंस्फूर्ति होऊ नये ॥ ६९ ॥
देहासारखी ब्रह्मात्मबुद्धी स्वप्नामध्येही दृढ व्हावी. देह कसेही व्यापार करो, परंतु त्याबद्दल कधीही अहंस्फूर्ती होऊ नये. (४६६९)

ऐसें दृढ अपरोक्ष होय तोपर्यंत । दृढ अभ्यास पाहिजे स्मरणयुक्त ।
म्हणोनि वृत्यादि हे अपेक्षिजेत । लयसाक्षित्व कळतांही ॥ ७० ॥
असे दृढ अपरोक्ष होईपर्यंत दृढ अभ्यास झाला पाहिजे. त्या अभ्यासात ब्रह्मात्मत्वाचे नित्य स्मरण राहिले पाहिजे. म्हणूनच वृत्त्यादिकांची अपेक्षा करावी लागते. लयसाक्षित्व कळल्यानंतरही ती अपेक्षा असतेच. (४६७०)

ऐसें असतां या वृत्यादिकांचें । लयसाक्षित्व कळतां काज नवचे ।
हेंचि बोलणे नव्हे ज्ञातयाचें । भ्रामक बोलावें ॥ ७१ ॥
अशी वस्तुस्थिती असल्यामुळे एकदा लयसाक्षित्व कळल्यानंतर वृत्त्यादिकांचे काही काम नाही, हे ज्ञानी माणसाचे बोलणे नाही. तर ते भ्रम झालेल्याचे बोलणे आहे. (४६७१)

अरे दृढापरोक्षही विज्ञान जाहलिया । सर्व अपेक्षिती वृत्यादिका या ।
श्रवण संवाद करोनि संत समुदाया । आनंदा पावविती ॥ ७२ ॥
अरे, दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर ही सर्वजण या वृत्त्यादिकांची अपेक्षा करतात. त्यांच्या साहाय्याने ते श्रवण करू शकतात, संत समुदायाशी संवाद करू शकतात, सर्वांना आनंद प्राप्त करून देतात. (४६७२)

साधक मुमुक्षूसीही उपदेश । करणे लागे अति सायास ।
तस्मात् ज्ञानोत्तरी नलगे ऐसें फोस । बोलणे जाहलें ॥ ७३ ॥
साधक, मुमुक्षु यांनाही उपदेश करावा लागतो. त्यासाठी खप परिश्रम करावे लागतात. म्हणून ज्ञान झाल्यानंतर वृत्त्यादिकांची गरज नाही, असे बोलणे निरर्थक आहे. (४६७३)

वृत्यादिकांची अपेक्षा नलगे । ऐसें घडेना कवण्याही प्रसंगें ।
म्हणोनि हे असतांचि लागवेगें । मिथ्यात्व स्मरून असावें ॥ ७४ ॥
वृत्त्यादिकांची अपेक्षा नाही, असे कधीही होत नाही. म्हणून वृत्त्यादिक असताच ताबडतोब त्यांच्या मिथ्यात्वाचे स्मरण ठेवावे. (४६७४)

मिथ्यात्वचि दृढ या सर्वांसी । आणि आपण ते नव्हेचि अविनाशी ।
स्वयें आत्मा ब्रह्म अखंडैकरसीं । हे स्मरण विसरूंच नये ॥ ७५ ॥
या सर्व पदार्थांचे निथ्यात्व पक्के आहे, आणि आपण मात्र त्यापैकी नसून आपण अविनाशी, अखंडैकरस ब्रह्मात्मा आहोत, हे स्मरण विसरूच नये. (४६७५)

येथेही म्हणसी की स्वभावें । हे सर्व जरी पूर्ववतचि असावें ।
तरी कामादिक उठती आघवे । स्वतःसिद्ध विकल्प ॥ ७६ ॥
रविदत्ता तू यावर म्हणशील की, हे सर्व स्वाभाविकपणेच पूर्ववत् आहे, त्यामुळे कामादिक स्वतःसिद्ध विकल्प सगळे उत्पन्न होतील (४६७६)

मनबुङ्यादि हे जीवंत असतां । विषयरूप देखेल समस्तां ।
तया विषयांचे चिंतन घडतां । काम हा संभवे ॥ ७७ ॥
मन, बुद्धी जिवंत असल्याने सगळ्या पदार्थांकडे ती आपले विषय आहेत म्हणून त्यांच्याकडे पाहतील, त्या विषयांचे चिंतन झाल्याने काम जागृत होईल. (४६७७)

कामभावीं क्रोध उपजे । क्रोधे मोहसमुद्री बुडिजे ।
तेणे स्मृतिभंगातें पाविजे । स्मृतिभंग तोचि नाश ॥ ७८ ॥
कामभावनेतून क्रोध उत्पन्न होतो. क्रोधामुळे मोहसागरात बुडण्याची वेळ येते. त्या मोहामुळे स्मृतिभंग (स्मृतीचा नाश) होईल आणि स्मृतिभंग म्हणजे तर विनाशच होय. (४६७८)

ऐसा परंपरेनें घात होय । म्हणोनि विकल्प हा उपेगा न ये ।
ऐसा कवणासी जरी संशय । तरी अवधारा एकाग्र ॥ ७९ ॥
अशा प्रकारे एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा अशा परंपरेने घाताची वेळ येते. म्हणून विकल्पाचा उपयोग नाही, असा कोणाला संशयच असेल, तर एकाग्र होऊन ऐका. (४६७९)

इतुका परंपरा अनर्थरूप । उद्भवून येईल जोवरी संकल्प ।
तोंवरी विवेकादिकां येईल झोंप । की ब्रह्मात्मज्ञान लोपलें ॥ ८० ॥
अशी अनर्थरूप परंपरा संकल्प असेपर्यंत उत्पन्न होईल; पण तोपर्यंत विवेकादिकांना झोप आलेली असेल का, किंवा ब्रह्मज्ञान झोपलेले असेल? (४६८०)

अरे विषयचिंतनचि उद्भवतां । आधीं मिथ्यात्व स्मरेल तत्त्वतां ।
इकडे जन्मलाचि नाहीं भोक्ता । तरी इच्छी विषय कवण ॥ ८१ ॥
अरे, विषयांचे चिंतन सुरू झाल्यावर सर्वात अगोदर त्यांच्या मिथ्यात्वाचे स्मरण होईल. आणि दुसरीकडे विषय भोगण्यासाठी भोक्ताच उत्पन्न झाला नाही तर विषयांची इच्छा तरी कोण करील? (४६८१)

इकडे भोक्ताही जन्मेना । तिकडे विषया सत्यत्व संभवेना ।
तरी काम हा उद्भवून होय तरणा । हें कैसें घडेल ॥ ८२ ॥
इकडे भोक्ता जन्माला येत नाही, तिकडे विषयांना सत्यत्व येईना, त्यामुळे काम उत्पन्न होऊन प्रबळ होईल, असे कसे होईल ? (४६८२)

इतुका अवसर पडेल कैसा । की विस्मरण होईल जाहलिया अभ्यासा ।
तस्मात् भेद उठतांही जरी आभासा । स्मरे अहंब्रह्म म्हणोनी ॥ ८३ ॥
झालेल्या अभ्यासाचे विस्मरण होईल एवढा कालावधी त्या कामाला कुठून मिळेल? म्हणून विकल्पांच्या रूपाने भेद उत्पन्न होताच, आणि आभासरूप विषय उत्पन्न होताच तो साधक लगेच 'अहं ब्रह्मास्मि'चे स्मरण करतो. (४६८३)

मी स्वयें ब्रह्मात्मा पूर्ण । भोक्ता नोव्हेचि जीवत्वें आपण ।
आणि हे दृश्यभास संपूर्ण । मिथ्यात्वें स्मरे झडकरी ॥ ८४ ॥
(आग्मसार ७.४.३५ पहा). "मी स्वतः परिपूर्ण ब्रह्मात्माच आहे. जीवरूपाने असणारा मी भोक्ता नाही!" असे तो म्हणतो. सर्व दृश्यभासांची उत्पत्ती होताच ते मिथ्या आहेत असे त्याला स्मरण होते. (४६८४)

जयासी अभ्यासाची उणीवता । तयासी श्रुतिउमाली सांगे तत्वतां ।
कीं आमरण आसप्ति न विसरतां । स्मति सदढ राखावी ॥ ८५ ॥
ज्याचा अभ्यास कमी पडतो त्याला श्रुति माउली सांगते की मरण येईपर्यंत अथवा झोप येईपर्यंत 'अहं ब्रह्मास्मि'चे स्मरण सुदृढ ठेवावे. (४६८५)

किंचितही या कामादिकांसी । अवसर न द्यावा सत्यत्वबुद्धीसी ।
. एकतान स्मरावें दिवानिशीं । ब्रह्म सत्य जग मिथ्या ॥ ८६ ॥
कामादिकांना सत्य मानणाऱ्या बुद्धीला थोडासासुद्धा अवसर देऊ नये. दिवसरात्र 'ब्रह्म हे सत्य असून जग मिथ्या आहे' याचे एकसारखे स्मरण ठेवावे. (४६८६)

हेचि बोलणं बहुधा पुढें । असे ते कळेल साधका कोडें ।
की तच्चितनी तत्कथनीं जो पवाडे । तया विस्मरण नव्हेल ॥ ८७ ॥
हेच पुढे सांगायचे आहे. ते साधकाला कळेलच. त्या ब्रह्मात्म्याच्या चिंतनात, त्या ब्रह्मात्म्याविषयी सांगण्यात जो मग्न आहे, त्याला वरील ओव्यात सांगितल्या प्रमाणे विस्मरण होणार नाही. (४६८७)

प्रस्तुत येथे स्मरण राखावें । स्फूर्तीपर्यंत मिथ्यात्वें पहावें ।
स्मरणमात्र असतां निरोधावें । नलगे सविकल्पा ॥ ८८ ॥
येथे मात्र सर्वांनी स्मरण ठेवावे. स्फूर्तीपर्यंत सर्व पदार्थांकडे मिथ्यात्वाने पाहावे. केवळ स्मरण जर चालू असेल तर सविकल्पाचा निरोध करावा लागत नाही. (४६८८)

सविकल्प पूर्ववतही असतां । अभ्यासाची होतां दृढता ।
निर्विकल्पही असंप्रज्ञता । समाधि प्राप्त होय ॥ ८९ ॥
अभ्यासाची जर दृढता झाली असेल तर, सविकल्प पूर्वीसारखाच जरी असला तरीही असंप्रज्ञात निर्विकल्प समाधी प्राप्त होऊ शकते. (४६८९)

केवळ सविकल्प रोधोनियां । पावेले असंप्रज्ञ समाधीसी तया ।
ऐसें नव्हे वृत्त्यादि सर्व असोनियां । निर्विकल्पता प्रगटे ॥ ९० ॥
केवल सविकल्पाचे निरोध केल्याने असंप्रज्ञात समाधी प्राप्त होईलच असे नाही. परंतु वृत्त्यादी सर्व असूनसुद्धा निर्विकल्पता प्रकट होऊ शकते. (४६९०)

परी अभ्यास मात्र केला पाहिजे । तरी असंप्रज्ञातता लाहिजे ।
तेही सविकल्प समाधीचे व्याजें । घडेल निःसंशय ॥ ९१ ॥
पण त्यासाठी अभ्यास हा केलाच पाहिजे. म्हणजे असंप्रज्ञात समाधी प्राप्त होऊ शकते. आणि तीही सविकल्प समाधीच्या निमित्तानेच घडेल हे निःसंशय. (४६९१)

तेचि आधी सविकल्प संप्रज्ञ । समाधीसी नाम जें संज्ञ ।
निरोपिजेल यथारीतीं मान्य । जें सर्व ज्ञातयां ॥ ९२ ॥
तेव्हा प्रथम तीच संप्रज्ञात सविकल्प समाधी असे जिला म्हणतात तिचे सर्व ज्ञानी लोकांना मान्य असेल अशा पद्धतीने निरूपण आता करतो. (४६९२)

सविकल्प समाधीची ही लक्षणे । दोन असती ते वोळखणें ।
एक दृश्यानुविद्ध साधका बाणे । दुजा शब्दानुविद्ध ॥ ९३ ॥
सविकल्प समाधीची दोन प्रकारची लक्षणे असतात ती प्रथम ओळखून घे. एक दृश्यानुविद्ध समाधी आणि दुसरी शब्दानुविद्ध समाधी होय. साधकांना या समाधी साध्य होणाऱ्या आहेत. (४६९३)

दृश्यानुविद्ध आधी अवधारा । जो अभ्यास पाववीतसे त्वरा ।
अचुक निर्विकल्पत्वा एकसरा । चंचलत्वा उरों नेदी ॥ ९४ ॥
प्रथम दृश्यानुविद्ध समाधी प्रथम समजून घ्या. त्या समाधीचा अभ्यास निर्विकल्पाची एकदम अचकपणे प्राप्ती करून देतो. तो चंचलपणाला अजिबात उरू देत नाही. (४६९४)

येथेही शंका मानील कोणी । की चंचलत्व मुळी सविकल्पालागोनी ।
तयाची लक्षणे हे असतां दोनी । तरी तेही चंचळरूप ॥ ९५ ॥
येथेही काही जणांना शंका वाटेल की, चंचलत्व हा सविकल्पालाच लागू होणारा गुण आहे. त्याचीच हे दोन्ही समाधीचे प्रकार लक्षणे होत. त्यामुळे ते प्रकार चंचलाचेच स्वरूप होत. (४६९५)

ऐशिया चंचळ समाधियोगें । निर्विकल्प केवीं होय अंगें ।
ऐसें मानील कोणी प्रसंगें । तरी याचे उत्तर देऊ ॥ ९६ ॥
अशा चंचल रूप असलेल्या समाधीच्या साहाय्याने निर्विकल्प कसे प्राप्त होऊ शकेल? असे कोणी मानीत असेल तर त्याचे उत्तर देतो. (४६९६)

जैसा शरें शर निरोधावा । मृगेंचि मृग आकळावा ।
अथवा कांट्याने कांटा फेडावा । की मोडावा शब्दें शब्द ॥ ९७ ॥
ज्याप्रमाणे सोडलेला बाण कुठे पडला ते शोधायचे झाल्यास दुसरा बाण त्याच दिशेने आणि त्याच वेगाने सोडावा म्हणजे तो पहिला बाण सापडतो. हरवलेला हरिण शोधायचा झाल्यास दुसऱ्या हरणाच्या साहाय्याने तो शोधतात, किंवा काट्याने काटा काढतात अथवा एखाद्याचा शब्द खोडायचा झाल्यास शब्दाच्याच साहाय्याने ते करता येते. (४६९७)

तैसाचि सविकल्प सविकल्पासी । मोडून दोनी निमती अपैसी ।
पुढे उरेल जें कां एकरसीं । तें निर्विकल्प असंप्रज्ञ ॥ ९८ ॥
त्याप्रमाणे एक सविकल्प समाधीला दुसरी सविकल्प समाधी मोडून काढते आणि स्वतःही मोडून पडते. अशा प्रकारे दोन्ही सविकल्प नष्ट झाल्यावर पुढे जे एकरस निर्विकार अविनाशी तत्त्व उरते तेच असंप्रज्ञ निर्विकल्प होय. (४६९८)

तस्मात् सविकल्प समाधीसी । सविकल्प कल्पू नये मानसीं ।
जें मेळवील निर्विकल्पासी । तें आधीं आदरावें ॥ ९९ ॥
म्हणून सविकल्प समाधीला आपल्या मनाने सविकल्प मानू नये (किंवा सविकल्प मानून तुच्छ ठरवू नये). ती समाधी निर्विकल्पाची प्राप्ती करून देत असल्यामुळे तिच्याबद्दल आदराची भावना ठेवावी. (४६९९)

दृश्यानुविद्ध तो असे कैसा । तो बोलिजेल यया रीती अभ्यासा ।
पुढें शब्दानुविद्ध असेल जैसा । निरोपितां कळेल ॥ ४७०० ॥
आता दृश्यानुविद्ध समाधी म्हणजे काय ते सांगतो. त्या पद्धतीने तिचा अभ्यास करा. त्यानंतर पढे शब्दानविद्ध समाधी निरूपण करत असता कळन येईल. (४७००)

हा दृश्यानुविद्ध समाधि घ्यावया । नलगे एकांत आसनादि तया ।
जें जें दिसेल तें तें पहावें क्रिया । सर्व देहाची होत्साता ॥ १ ॥
ही दृश्यानुविद्ध समाधी घेण्यासाठी एकांतवास, आसन इ. उपचारांची गरज नाही. देहाच्या ज्या ज्या क्रिया होत जातील आणि डोळ्यांनी जे जे दिसेल ते ते सर्व पाहात जावे. (४७०१)

सर्व मिथ्या हे पूर्वीच कळलें । विवेचनें नामरूप विसर्जिलें ।
जैसें सर्प रज्जूवरी नाहींच जाहलें । होतें तें गेलें दीपें ॥ २ ॥
हे सर्व दृश्य मिथ्या आहे, हे अगोदरच कळले आहे. त्याला विचाराची जोड देऊन जे जे नामरूपात्मक असेल त्या त्या सर्वांचा मनाने त्याग केला. दोरीच्या जागी दिसणारा सर्प वास्तविक पाहता झाला नव्हताच. जो दिसत होता तो दीप आणताक्षणीच गेला. (४७०२)

तैसें नसून वाउगें अज्ञानें । कल्पिलें होतें रूपनामाभिधानें ।
तें यथार्थ सत्य स्वरूपज्ञानें । निमाले सर्व ॥ ३ ॥
त्याप्रमाणे जे मुळात नव्हते, उगीच अज्ञानामुळे नामरूपे कल्पिली होती. ते सर्व सत्य स्वरूपाच्या ज्ञानाने नाहीसे झाले. (४७०३)

वृत्तीचा लय होऊन उर्वरित । जें परब्रह्म उरे सदोदि ।
जें सच्चिदानंद लक्षणे युक्त । यथार्थ कळलें ॥ ४ ॥
वृत्तीचा लय झाल्यानंतर राहिलेले जे निर्विकल्प तेच नित्य अस्तित्वात असणारे, सच्चिदानंद या लक्षणांनी युक्त असे परब्रह्म होय, त्याचे यथार्थ ज्ञान झाले. (४७०४)

त्रिकाळी कदापि नासेना । तें सद्रूप असे पूर्णपणा ।
तें असे परी सहसा दिसेना । घेववेना या जडा ॥ ५ ॥
ते तिन्ही काळात नष्ट होत नाही, ते पूर्णपणे सद्रूप आहे, ते आहे परंतु दिसत नाही. आणि जे जड इंद्रियांनी घेता येत नाही. (४७०५)

परंतु लयाचा जो जाणता असे । तो असे म्हणोनि जाणतसे ।
परी तो वृत्यादिकांसी न गवसे । अदृश्य म्हणोनी ॥ ६ ॥
परंतु लयाचा जो जाणता आहे, तो मात्र ते आहे म्हणून जाणतो. पण वृत्त्यादिकांच्या ते हाती लागत नाही. कारण ते अदृश्य आहे. (४७०६)

एवं आहेपणे स्वतःसिद्ध सद्रूप । लय जाणणें तेंचि चिद्रूप ।
तेंहि कळलें नाहीं यया अल्प । तेंचि जाणे सर्वां ॥ ७ ॥
तेव्हा आहे म्हणून त्याचे सद्रूप स्वतःसिद्ध आहे. ते लयाला जाणते म्हणून चिद्रूप आहे. या वृत्त्यादिकांना ते जरासुद्धा कळले नाही, पण ते मात्र सर्वांना जाणते. (४७०७)

तैसाचि आनंदरूपही सदोदित । परी तें सुख न घेववे किंचित् ।
ग्रहणकर्तेचि जड अशाश्वत । तरी न घेतां स्वतःसिद्ध ॥ ८ ॥
तसेच ते नित्य जागृत असून आनंदरूप आहे. पण ते सुख किंचितसुद्धा घेववत नाही. कारण ते घेऊ पाहाणारे वृत्त्यादिक स्वतःच जड आणि अशाश्वत आहेत. तेव्हा त्याचे ते सुख कोणी न घेताच स्वतःसिद्ध आहे. (४७०८)

ऐसें सच्चिदानंद ब्रह्मलक्षण । वृत्तिअभावीं पूर्णपण ।
यथार्त कळलें या नांव ज्ञान । जे मागां निरोपिलें ॥ ९ ॥
अशा प्रकारे सत्, चित्, आनंद ही त्या ब्रह्माची लक्षणे होत. त्या ठिकाणी वृत्तींचा अभाव असल्याने ते स्वयंपूर्ण आहे. असे यथार्थ कळणे यालाच ज्ञान म्हणतात. त्या ज्ञानाचे मागे निरूपण झालेच आहे. (४७०९)

मग वृत्तीसहित सर्व उठतां । रूपचि नाहीं या आकारा समस्ता ।
नामें ठेविली व्यापाराकरितां । परी अद्यापि नाहीं जन्मलीं ॥ १० ॥
मग नंतर वृत्तीसहित सर्व बत्तीस पदार्थ निर्माण झाले. तेव्हा या सर्व आकारांना खरे पाहाता रूपच नाही. केवळ व्यवहाराच्या सोयीसाठी त्यांना नावे देण्यात आली. पण ती खऱ्या अथनि जन्मालाच आलेली नाहीत. (४७१०)

आहेपणा तो सद्रूपाचा । दिसणेपणा चिद्रूपाचा ।
प्रियपणा तो आनंदाचा । या तिहींविण यांत काय ॥ ११ ॥
त्यांचा आहेपणा आहे तो सद्रूपाच्या आहेपणामुळे होय. त्यांचे दिसणे हे चिद्रूपामुळेच होय. त्यांचा प्रियपणा जो आहे तो ब्रह्माच्या आनंदरूप लक्षणामुळे आहे. या तीन गुणांखेरीज त्या पदार्थांत स्वतंपत्रपणे असे काय आहे? (काहीच नाही) (४७११)

तस्मात् नामरूपात्मक सर्व जग । जाहलेंचि नाहीं सर्वथा सोंग ।
आहे तें ब्रह्मचि अभंग । ऐसे सर्वपण विवेचिलें ॥ १२ ॥
म्हणून नामरूपात्मक सर्व जग वास्तविक पाहता झालेच नाही. ते केवळ सोंग आहे. जे काही आहे ते अभंग ब्रह्मच आहे. अशा त-हेने तथाकथित सर्वपणाचे विवेचन केले आहे. (४७१२)

मिथ्या ह्मणिजे जाहलेंचि नाहीं । नाहीं तें नसेचि कदापिही ।
आतां दिसते म्हणून सहसाही । भावचि नुद्भवे ॥ १३ ॥
मिथ्या म्हणजे जे झालेच नाही. जे नाही ते केव्हाही नसतेच. मग त्याबद्दल दिसते असे म्हणण्याचा विचारच मनात येणार नाही. (४७१३)

ऐसा निश्चय दृढ मिथ्यात्वाचा । निःसंशयपणे बाणला साचा ।
मग या ब्रह्मादि तृणान्त दृश्याचा । दिसणेपणा जो साधकां ॥ १४ ॥
असा मिथ्यात्वाचा निश्चय निःसंशयपणे दृढ झाल्यावर मग या ब्रह्मदेवापासून ते तृणापर्यंतच्या सर्व दृश्य पदार्थांचा जो दिसणेपणा आहे, (४७१४)

तें दिसेना हा सर्वथा पाहे । कारण की अमुकशी भावनाचि न लाहे ।
आहे तें सच्चिदानंद ब्रह्म आहे । नामरूपेंविण ॥ १५ ॥
तो साधकाला दिसत नाही. ते पदार्थ साधकाला दिसत असले तरी तो अमुक अमुक आहे अशी भावनाही त्याच्या मनात येत नाही. जे काही आहे ते सर्व नामरूपविरहित सच्चिदानंद ब्रह्मच आहे, अशीच त्याची भावना असते. (४७१५)

एवं दृश्यही पाहत असतां । नामरूपें उद्भवतीना तत्त्वतां ।
हाचि दृश्यानुविद्ध समाधि पाहतां । असे एकरूप ॥ १६ ॥
अशा प्रकारे दृश्य पदार्थ पाहत असताही त्याच्या मनात त्यांची नामरूपे उद्भवतच नाहीत. हीच दृश्यानुविद्ध समाधी होय. ती एकरूपच असते. (४७१६)

कीटकही दृष्टीपुढे आलें । तरी सच्चिदानंदत्वे घेतलें ।
अथवा ब्रह्मा विष्णु शिवादि भेटले । तेही तद्रूपेंची ॥ १७ ॥
कीटक जरी दृष्टीपुढे आले तरी तो सच्चिदानंद म्हणूनच पाहतो. किंवा ब्रह्मदेव, विष्णु, शिव इ. देव जरी भेटले तरी त्याला तेही सच्चिदानंद ब्रह्माच्याच रूपात दिसतात. (४७१७)

कीटक ह्मणोनि सानसा भाव । विष्णु म्हणोनि महान् अपूर्व ।
हा उत्पन्नचि नाहीं कदा गौरव । स्वयमेव सच्चिदानंद ॥ १८ ॥
कीटक म्हणून त्याबद्दल क्षुद्रपणाचा भाव आणि विष्णू म्हणून महान अपूर्व असा भाव असा मोठेपणाचा आदरयुक्त भाव त्याच्या मनात उत्पन्नच होत नाही. कारण तो स्वतःच सच्चिदानंद झालेला असतो. (४७१८)

मुळीच समष्टिरूप सर्व जग । मृगजलवत् सर्वही सोंग ।
त्यांतील मासोळे सान थोर भाग । शिवकीटकादि ॥ १९ ॥
मुळातच समष्टिरूप सर्व जग हेच मगजळाप्रमाणे सोंगासारखे मिथ्या आहे. शिव, कीटक इ. त्या मृगजळातील लहान थोर माशांप्रमाणे होत. (४७१९)

जो जगमृगजला सत्यत्व देखेना । तो त्यांतील मासोळिया सानथोरपणा ।
देखेल कैसा सत्यत्वें नाना । नामरूपांसी ॥ २० ॥
जो मृगजळाला सत्य म्हणून पाहात नाही (मानत नाही), तो त्यातील मासोळ्या लहान आहेत की मोठ्या हे कसे पाहील? निरनिराळ्या नामरूपांना तो सत्यत्वाने कसा पाहील? (४७२०)

एवं विष्णु तैसाचि कीटक । आकाश तैसेंचि तृणही एक ।
जरी दृष्टीसी पडताही अनेक । परी सच्चिदानंद ब्रह्म ॥ २१ ॥
अशा तहेने त्याला विष्णू आणि किडा सारखेच वाटतात. आकाश आणि तृण एकच वाटतात. त्याच्या दृष्टीला अनेक प्रकारचे पदार्थ पडले तरी ते सगळे त्याच्या दृष्टीने एकच सच्चिदानंद ब्रह्म होत. (४७२१)

सर्वपणा सहसा उमसेना । सर्वही दिसतां पदार्थ नाना ।
हाचि दृश्यानुविद्ध समाधि पूर्णा । ज्ञातयासी ज्ञानोत्तरी ॥ २२ ॥
त्याच्या मनात त्या पदार्थांबद्दल सर्वपणाचा भाव उत्पन्न होत नाही. खरे तर सगळे निरनिराळे पदार्थ तो डोळ्यांनी पाहात असतो पण त्यांच्याबद्दल त्याच्या मनात फक्त ब्रह्मत्वाचाच भाव असतो. हीच परिपूर्ण अशी दृश्यानुविद्ध समाधी होय. ज्ञात्याला ही समाधी ज्ञानोत्तर दशेमध्ये प्राप्त होते. (४७२२)

तस्मात् साधकें ऐसा योग । समाधीचा घ्यावा निजांग ।
ऐसा एकरूप न राहतां लागवेग । हळुहळू अभ्यासावा ॥ २३ ॥
म्हणून साधकाने अशा समाधीचा स्वतः स्वीकार करावा. तो एकदम साकल्याने सिद्ध होत नाही. म्हणून त्याचा हळूहळू अभ्यास करावा. (४७२३)

कदाचित नामरूपाची भावना । होती जाहली अंतःकरणा ।
तरी तत्क्षणींच विवेचना । पुनःपुन्हां करावी ॥ २४ ॥
कदाचित् अंतःकरणात नामरूपाची भावना उत्पन्न झालीच तर त्याक्षणीच त्यासंबंधीचे विवेचन पुनःपुन्हा करावे (विवेक करावा) (४७२४)

नामरूप भासतांचि त्यागावें । सच्चिदानंदत्व सर्व स्थापावें ।
दिसेल तें तें सहज पाहावें । आग्रहही टाकूनी ॥ २५ ॥
नामरूपे भासू लागताच त्यांचा त्याग करावा आणि सर्व पदार्थ सच्चिदानंदस्वरूप आहेत अशी भावना त्यांच्या जागी ठेवावी. जे जे दिसेल ते ते आग्रह टाकून सहजरीतीने पाहावे. (४७२५)

स्थावर की उंगम ह्मणूं नये । जड की चेतन असतां उभय ।
एक सच्चिदानंद ब्रह्म अद्वय । नामरूप नाहींचि ॥ २६ ॥
ते स्थावर आहेत की जंगम असा भेद मनात आणू नये. ते जड आहेत की चेतन असा विचार न करता त्या दोहोंनाही एकच सच्चिदानंद स्वरूप आहेत असे मानावे. तेथे नामरूपे नाहीतच, असा विचार मनात दृढ करावा. (४७२६)

देव दैत्य किंवा दानव । पशू पक्षी की मानव ।
एक सच्चिदानंद स्वयमेव । दुजा भाव नाही ॥ २७ ॥
तेथे देव, दैत्य, दानव, पशू, पक्षी, मानव, असा दुजाभाव मनात बाळगू नये. सर्वच सच्चिदानंदरूप आहेत असे मानावे. (४७२७)

ऐसे दृश्य पाहतां सानथोर । त्यांतचि आपुलेंही शरीर ।
नामरूपाचा नाहींच विकार । एक सच्चिदानंद ॥ २८ ॥
अशा प्रकारे लहानमोठी दृश्ये, आपले शरीरही त्यात आलेच, पाहात असता नामरूपाचा विकार मनात येऊ नये. ते सर्व एकच सच्चिदानंद ब्रह्म आहेत, अशी भावना ठेवावी. (४७२८)

सच्चिदानंद आपण एक । सर्व हे नाहींत नामरूपक ।
ऐसे दृश्य पाहतां निश्चयात्मक । ब्रह्मभावना अखंड ॥ २९ ॥
सर्वत्र आपण एकच सच्चिदानंद ब्रह्म आहोत. हे नामरूपक सर्व पदार्थ नाहीतच असे मनात स्मरावे. अशा प्रकारे दृश्य पदार्थ पाहात असता निश्चय करावा. ब्रह्मभावना अखंड ठेवावी. (४७२९)

हाचि दृश्यानुविद्ध समाधि । साधक जो अभ्यासें साधी ।
तयासी कवणे अवस्थे कधीं । एकांतचि सर्वदा ॥ ३० ॥
साधक अभ्यासाने साधू शकेल अशी ही दृश्यानुविद्ध समाधी आहे. ती कोणत्या अवस्थेत, कोणत्या वेळी लावायची याचा काही विधिनिषेध नाही. कारण ज्ञानी माणसाला सर्वकाळ एकांतच असतो. (४७३०)

तुझे माझें कीं तूं तो हा मी । नुमटेचि कदापि ऐशी उर्मी ।
सदां एकतान सुखधामी । विश्रांति पावे ॥ ३१ ॥
तुझे, माझे, तू, तो, हा, मी अशा प्रकारची ऊर्मी त्याच्या मनात कधीच उमटत नाही. तो सर्वकाळ एकसारखा सुखाच्याच घरात विश्रांती घेत असतो. (४७३१)

ऐसा समाधि एकरूप निश्चितीं । सहजींच होतसे ज्ञात्याप्रती ।
साधकें आभ्यासावा लागे वृत्ती । दृढ होतां एकरूप ॥ ३२ ॥
अशी ही समाधी निश्चितपणे एकरूपच असते. ज्ञात्याला ती सहजच प्राप्त होते. एकरूप वृत्ती दृढ होताच साधकाने तिचा अभ्यास करावा. (४७३२)

एवं दृश्यानुविद्ध समाधिप्रकार । सांगितला होत्साता व्यापार ।
याचि प्रकारें शब्दानुविद्ध साचार । तोही निरोपिजेल ॥ ३३ ॥
अशा प्रकारे व्यापार करत असताही दृश्यानुविद्ध समाधीचा हा प्रकार सांगितला. याच प्रकारचा शब्दानुविद्ध हाही समाधीचा आणखी एक प्रकार आहे, तोही आता सांगतो. (४७३३)

शब्दानुविद्धासीही एकांत । बैसणे नको आसनीं निवांत ।
भलतैसा देह जरी वर्तत । तरी अभ्यास घडे ॥ ३४ ॥
या शब्दानुविद्ध समाधीसाठी एकांताची गरज नाही, आसनावर निवांतपणे बसण्याची गरज नाही. शरीर कोणत्याही प्रकारचा व्यापार करत असो, तरासुद्धा या समाधीचा अभ्यास घडू शकतो. (४७३४)

अंतरीं उठे जे मूळस्फूर्ति । जये नामें सामान्यवृत्ति ।
आरंभी दचकसी आठवाकृति । भलतेही प्रकारें ॥ ३५ ॥
अंतःकरणात जी मूळस्फूर्ती उठते, तिला सामान्यवृत्ती म्हणतात. आरंभी कोणत्याही प्रकारच्या स्मरणाच्या रूपाने दचकल्यासारखे वाटते. (४७३५)

भयरूप अथवा हर्षरूप । उगाचि आठव उठे निर्विकल्प ।
शब्द ऐकतां की देखतां रूप । उमटे अंतःकरणी ॥ ३६ ॥
भयरूप अथवा हर्षरूप असा एक निर्विकल्प आठव उत्पन्न होतो. शब्द ऐकला किंवा एखादे रूप पाहिले असता असा आठव अंतःकरणात उमटतो. (४७३६)

अथवा उगेंचि निवांत असतां । उगाचि आठव होय आंतोता ।
मनबुद्धीचाही उद्भव नसतां । सहजगती उठे ॥ ३७ ॥
अथवा उगीच निवांत बसले असता आतून एक आठव उगीचच उत्पन्न होतो. त्यावेळी मन किंवा बुद्धी यांची उत्पत्ती झालेली नसते. तो आठव सहजगतीने उठतो. (४७३७)

हेचि जाणावी परा वाचा । सामान्य हेलावा अंतःकरणाचा ।
अमुकसा विकार नव्हेचि साचा । परी नुसधा आठव स्फुरे ॥ ३८ ॥
या आठवालाच परावाचा असे म्हणतात. परावाचा म्हणजे अंतःकरणाचा सामान्य हेलावा, त्यात अमुक असा विषय किंवा अभिप्राय नसतो. पण केवळ आठव या स्वरूपाने तो स्फुरतो. (४७३८)

पुढे किंचित उद्भवतां मन । पुरता संशय ना निश्चय पूर्ण ।
कांही न कळे अमुक ह्मणून । परी भास होय ॥ ३९ ॥
त्यानंतर पुढे मनाची किंचित उत्पत्ती होते. त्यामध्ये संशयही नसतो किंवा निश्चयही नसतो. अमुक काही चालले आहे इ. काहीच कळत नाही. परंतु काहीतरी भास होत असतो. (४७३९)

तया नाम पश्यंती वाचा । कोमळरूप अंकुर मनाचा ।
परिणाम तरी होय अंतःकरणाचा । परी संशयही स्पष्ट नव्हे ॥ ४० ॥
असे जे वाटते त्याला पश्चन्ती वाचा म्हणतात. हा मनाचा कोमल अंकुर होय. त्याच्या योगाने अंतःकरणाचा परिणाम होतो. पण संशय जो वाटतो तोही स्पष्ट नसतो. (४७४०)

ते पश्यंती वाचा दुसरी । वोळखी पडे पाहतां अंतरीं ।
पुढे मध्यमा वाचा तो तिसरी । स्पष्ट कळे मननरूप ॥ ४१ ॥
ही दुसरी पश्यंती वाचा होय. आपण अंतःकरणात डोकावून पाहताच तिची ओळख पटते. त्यानंतर तिसरी वाचा म्हणजे मध्यमा वाचा होय. ती मननरूप असून आपल्याला ती स्पष्टपणे कळते. (४७४१)

अंतरी कल्पना मननाची । संशय निश्चयात्मक मनबुद्धीची ।
स्वप्नाकारता जे अंतरींचीं । हेचि मध्यमा वाचा ॥ ४२ ॥
ही अन्तर्यामी मननात्मक अशी कल्पना होय. तिच्यामध्ये संशयात्मक मन आणि निश्चयात्मक बुद्धी यांचा सहभाग असतो. ती अंतःकरणातील मननाची स्वप्नरूप आकृतीच होय. तिलाच मध्यमा वाचा म्हणतात. (४७४२)

वैखरी तों स्पष्ट बोलणें । मातृकांचा उच्चार करणे ।
गुप्त भाव तो प्रगट होणें । अन्य अन्यासीही ॥ ४३ ॥
आणि वैखरी म्हणजे स्पष्ट बोलणे होय. त्यामध्ये मातृकांचा म्हणजे मूळ अक्षरांचा स्पष्ट उच्चार होतो. आपल्या मनातील गुप्त विचार परस्परांना प्रकटपणे सांगण्याचा व्यापार तिच्यामध्ये होते. (४७४३)

एवं परा पश्यंती मध्यमा वैखरी । ऐशिया उमटती वाचा च वारी ।
इतुके ठायीं शब्द एक निर्धारी । बहुधा परी उमटे ॥ ४४ ॥
अशा प्रकारे परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी अशा चार वाचा उत्पन्न होतात. या इतक्या ठिकाणी एकच शब्द असूनसुद्धा अनेक प्रकारांनी तो प्रकट होत असतो. (४७४४)

वृत्तीपासूनि प्राणापर्यंत । तत्त्व सामग्री शब्द हा अपेक्षित ।
आणि स्थूलदेहही यथायुक्त । पाहिजे उच्चारा ॥ ४५ ॥
वृत्तीपासून प्राणापर्यंत जेवढी तत्त्वे आहेत त्यांना शब्दाची गरज असते आणि स्थूलदेहामध्ये तर त्याचा योग्य उच्चार होण्याची गरज असते. (४७४५)

ऐसा शब्दरूप हा व्यापार । चारी वाचांचाही गजर ।
बरा वाईट समान विकार । जीवभावनेने होतसे ॥ ४६ ॥
असा हा सर्व व्यवहारच मुळी शब्दरूप आहे. चारी वाचांचा गजर शब्दनिष्ठच आहे. त्याचा बरा वाईट किंवा समान विकार जीवभावनेने घडत असतो. (४७४६)

मुखजिव्हायोगें प्रगट होय । तोचि श्रोत्रद्वारा अंतरीं जाय ।
उपेक्ष्य द्वेष्य किंवा प्रिय । भाव उठती अंतरी ॥ ४७ ॥
शब्द मुख आणि जिव्हा यांच्या द्वारे प्रकट होतो. तो मग कानांच्या द्वारे अंतःकरणात जातो. तेव्हा अंतःकरणात त्याबद्दलची उपेक्षणीय, द्वेष्य (द्वेषास पात्र) किंवा प्रिय यापैकी एखादी प्रतिक्रिया उमटते. (४७४७)

ऐशिया शब्दाकारामाजीं । सच्चिदानंद ब्रह्म सहजीं ।
हे वाउगीची कल्पना उमटली दुजी । नामरूपाची चंचलत्वें ॥ ४८ ॥
अशा याशब्दाच्या आकारामध्ये सच्चिदानंद या लक्षणांनी युक्त असे ब्रह्म सहज रीतीने असतेच. पण त्याच शब्दाद्वारे नामरूपात्मक चंचल अशी वेगळीच पण व्यर्थ (निरर्थक) कल्पना ही उमटते. (४७४८)

शब्दही एक उपलक्षणे । परी पाहणे स्पर्शणें वास घेणे ।
जिव्हेनें रसही चाखणें । आणि क्रिया कर्मेद्रियांच्या ॥ ४९ ॥
येथे शब्द एक उपलक्षणात्मक आहे. (उदाहरणापुरता घेतला आहे) परंतु पाहणे, स्पर्शणे, वास घेणे, जिभेने रस चाखणे इ. ज्ञानेंद्रियाच्या क्रिया, आणि त्यांच्या जोडीला कर्मेन्द्रियांच्याही क्रिया म्हणजे व्यापार (पाचांचे पाच) (४७४९)

एकेक व्यापारा पांच पांचे । तत्त्वे मिळतां होय येरव्हीं न वचे ।
तें मागां निरूपण जाहलें पंचीकृताचें । त्यारीतीं समजावें ॥ ५० ॥
आणि त्यांच्याशी संबंधित पंचभूतादी तत्त्वे यांचा मेळ झाल्यावरच (या सर्व क्रिया) घडतात, अन्यथा त्या होत नाहीत. मागे पंचीकृतांच्या व्यापारांचे हे निरूपण झालेले आहे. ते त्या त्या प्रकारे (येथील ओव्या ३५० ते ३७० पहा) समजून घ्यावे. (४७५०)

ऐसे पंचतत्वांचे पांच व्यापार । एकेकाचे दोन दोन प्रकार ।
मिळून जितुका सूक्ष्माचा व्यवहार । स्थूळीं राहनि होय ॥ ५१ ॥
अशा प्रकारे पाच तत्त्वांचे प्रत्येकी दोन असे प्रकार मिळन दहा प्रकारचा सक्ष्म देहाचा व्यापार स्थल देहात राहन होतो. (४७५१)

तितुकीं तत्त्वे आणि शब्दादि विषय । आणि वचनादि जे क्रिया होय ।
इतुका हा चंचल समुदाय । सर्व मायाजनित ॥ ५२ ॥
ती सर्व तत्त्वे, शब्दादी विषय, बोलणे इ. क्रिया, इ. सर्व चंचल समुदाय हे सर्व मायानिर्मित आहे. (४७५२)

माया जैशी नामरूपात्मक । तैसेंचि चंचळ तत्त्वही सकळिक ।
या सर्व तत्त्वांसी अधिष्ठान एक । सच्चिदानंद ब्रह्म ॥ ५३ ॥
माया जशी नामरूपात्मक तशीच सर्वचंचल तत्वेही नामरूपात्मक आहेत. या सर्व तत्त्वांचे मूल अधिष्ठान एकच सच्चिदानंद ब्रह्म हेच आहे. (४७५३)

आहेपणा सर्वांसी ब्रह्मींचा । चिद्रूपेंही ब्रह्मचि साचा ।
तयाविण प्रियपणा तरी कैंचा । असे नुसध्या नामरूपा ॥ ५४ ॥
सर्व तत्त्वे आहेत (म्हणजे त्यांना सत्ता आहे), हा आहेपणा ब्रह्मामुळेच आला. त्यांचे ज्ञानात्मक किंवा दृश्यात्मक रूप ते त्यांचे चिद्रूप होय. तेही ब्रह्मरूपच आहे. या दोन्हीवाचून या तत्त्वांना प्रियत्व कसे येईल? ते प्रियत्वही ब्रह्मापासूनच आले. अन्यथा ही तत्त्वे म्हणजे केवळ नामरूपात्मकच आहेत. (४७५४)

मृद्गोली मृत्तिका व्यापली । तैशीच घड गाडगियांत आली ।
जैशी मायेंत अस्ति भाति प्रियता दाटली । तेवींच बुद्ध्यादिकीं ॥ ५५ ॥
मातीच्या गोळ्यात मृत्तिका व्यापून राहिलेली आहे. ती तशीच घट, गाडगी यांच्यातही आली. त्याप्रमाणे मायेत जी अस्ति भाति प्रियता ही ब्रह्मलक्षणे व्यापलेली आहेत तीच लक्षणे मायानिर्मित बुद्धी इ. मध्येही आली आहेत. (४७५५)

मृद्गोळियाही मृत्तिकेविण । किमपीही रूप नसे भिन्न ।
तैसेंचि घट गाडगें संपूर्ण । या कार्यासीही रूप काय ॥ ५६ ॥
मातीच्या गोळ्यालाही मातीपेक्षा वेगळे रूप नाही, त्याचप्रमाणे घट, गाडगी इ. सर्व कार्यांना मातीखेरीज दुसरे कोणते रूप आहे? (४७५६)

जैसें मायेसी नामरूप असेना । तैसाचि बुद्ध्यादिकां निस्तत्त्वपणा ।
अस्ति भाति प्रियत्वेंविण दिसेना । अमुक एक पदार्थ ॥ ५७ ॥
ज्याप्रमाणे प्रत्यक्ष मायेलाच काही रूप नाही, त्याप्रमाणे बुद्धि इत्यादी तत्त्वांनाही सत्यत्व नाही. विश्वातील एकही पदार्थ अस्ति, भाति, प्रिय या ब्रह्मलक्षणांवाचून अमुक एक पदार्थ म्हणून वेगळा दिसत नाही. (४७५७)

हेही निरूपण मागां जाहलें । सर्व हे बुद्ध्यादि निस्तवें फोलें ।
उगेंचि नामा मात्र भिन्नभिन्न ठेविलें । परी हे सच्चिदानंद ब्रह्म ॥ ५८ ॥
हेही निरूपण मागे झालेच आहे. (येथेच ओ. ४८८ ते ५४७ पहा) ही सर्व बुद्धी इ. तत्त्वे फोस आहेत. पण त्यांना मात्र उगीच भिन्न भिन्न नावे ठेविली आहेत. पण ती सर्व तत्त्वे सच्चिदानंद ब्रह्मच आहेत. (४७५८)

या सर्वां शब्दादिकांमाजीं । अस्ति भाति प्रियरूप सहजीं ।
केवळ सच्चिदानंद ब्रह्मीं दुजीं । उद्भवतीना नामरूपें ॥ ५९ ॥
या सर्व शब्दादी विषयांमध्ये अस्ति भाति प्रियत्वाने सहजच सच्चिदानंद ब्रह्मच आहे. आणि अशा सच्चिदानंद ब्रह्मामध्ये दुसरी नामरूपे उद्भवतच नाहीत. (४७५९)

जैशी घटगाडगियांत मृत्तिका असे । केवळ मातींत घटादि नसे ।
अन्वय व्यतिरेक हे ऐसे । पाहतां नामरूप मिथ्या ॥ ६० ॥
ज्याप्रमाणे घटांमध्ये, गाडग्यांमध्ये मृत्तिकाच असते. याउलट केवळ मातीमध्ये घट इत्यादी नसतात. असा अन्वय व्यतिरेक पाहता नामरूपे ही मिथ्या होत हे लक्षात येते. (४७६०)

एवं चंचळ तत्त्वे शब्दादि सर्व । वाउगें भासलें जें रूपनांव ।
यांत सच्चिदानंद ब्रह्म स्वयमेव । पाहणें तो शब्दानुविद्ध ॥ ६१ ॥
अशा प्रकारे शब्द इ. सर्व चंचल तत्त्वे आणि त्यांची नामरूपे मिथ्या भासणे, आणि त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष सच्चिदानंद ब्रह्म पाहणे याचे नाव शब्दानुविद्ध समाधी होय. (४७६१)

कवणेही अवस्थेसी सहसा । व्यापारही होत्सातां भलतैसा ।
उद्भवेचना नामरूप ठसा । एकरूप ब्रह्मात्मा ॥ ६२ ॥
या समाधीमध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये, कोणतेही व्यापार होत असता, त्यांच्या नामरूपांचा ठसा उमटतच नाही, सर्व एकरूप ब्रह्मात्माच जाणवत असतो. (४७६२)

आपण बोले किंवा ऐके । हुंगे चाखे स्पर्षे निकें ।
देखे की क्रियारूपी अनेकें । नामरूपा न पाहे ॥ ६३ ॥
आपण बोलत अस किंवा ऐकत अस. हंगत अस. चाखत असू, स्पर्श करत असू. अशा अनेक क्रिया करत अस परंतु त्यांमध्येही साधक नामरूपे पाहत नाही. (४७६३)

अथवा अन्याचे ऐकणे बोलणें । पाहणे चालणें वास घेणें ।
सर्व जितुकी क्रिया होणे । परी नामरूपा स्मरेना ॥ ६४ ॥
आपणाशिवाय दुसरा कोणी बोलत असेल, ऐकत असेल, पाहत असेल, चालत असेल, वास घेत असेल, अशाप्रकारे सर्व प्रकारच्या क्रिया होत असतील तरी त्याच्या नामरूपांचे स्मरण त्याला होत नाही. (४७६४)

एकरूप सच्चिदानंद ब्रह्म । दुजा भेदचि नाहीं रूप की नाम ।
एकतान वोळखे आत्माराम । तूं मी हेही नाठवे ॥ ६५ ॥
त्याच्या दृष्टीने सर्वकाही एकरूप ब्रह्मच असते, दुसऱ्या रूपाचा किंवा नामाचा भेदच त्याला जाणवत नाही, सर्वत्र एकसारखा भरून राहिलेला आत्मारामच फक्त तो ओळखतो, तू, मी हेही त्याला आठवत नाही. (४७६५)

ऐसा निःसंशय ज्ञाता होऊनी । सहजगती एकरूप पूर्णपणीं ।
परी करणे लागे साधकालागूनी । स्मरण धरूनी सर्वदां ॥ ६६ ॥
असा ज्ञाता निःसंशय होऊन सहजरीतीने पूर्णपणे एकरूप झालेला असतो. पण साधकाला त्यासाठी जाणीवपूर्वक स्मरण ठेवून अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास सर्वकाळ करावा लागतो. (४७६६)

नामरूप की तूं मी हे उद्भवतां । माझें की संभवे द्वैतता ।
तत्क्षणी विचारें सारोनि परता । अस्ति भाति प्रिय पहावें ॥ ६७ ॥
मनामध्ये नामरूपाचा विचार आला, किंवा तू मी हा भेद उत्पन्न झाला, माझे की तुझे असा विचार आला. अथवा कोणत्याही प्रकारचे द्वैत निर्माण झाले तर त्याच क्षणी विचारांच्या साहाय्याने ते दूर सारून त्यांमध्ये अस्ति भाति प्रियत्व पाहावे. (४७६७)

जो जो वृत्तीसी ध्यास लागे । अभ्यासपाटवाचे लागवेगें ।
नामरूप द्वैतचि नुमगे । देखे सच्चिदानंद ॥ ६८ ॥
(ओ. ४७३२ पहा). वृत्तीला असा ध्यास जसजसा लागेल, तसेच अभ्यासामध्ये प्रावीण्य येत राहील, तत्परता येत राहील, तसतसे नामरूपाचे द्वैतच उत्पन्न होत राहणार नाही आणि तो सर्वत्र सच्चिदानंद ब्रह्मच पाहत राहील. (४७६८)

आधींच लयसाक्षी ज्ञान । जाहलें विवेचनें अभ्यासेंकडून ।
त्याहीवरी वृत्तीचा खल होणे । तरीकाय एक नव्हेल ॥ ६९ ॥
आधीच लयसाक्षीचे ज्ञान झालेले आहे. त्याचा विवेकपूर्ण अभ्यास झालेला आहे. त्यानंतर वृत्तीचा खल सतत चालू आहे अशी स्थिती असेल तर काय एक साध्य होणार नाही? (४७६९)

पहिले पहिले अभ्यासितां । वारंवार उठेल हे विक्षेपता ।
पुढे पुढे अभ्यासपाटव होतां । मोडे विक्षेप ॥ ७० ॥
सुरुवातीला असा अभ्यास करत असता त्यात विक्षेपरूप अडथळे वारंवार उठत राहतील, पण पुढे अभ्यासात प्रावीण्य येत राहील तसतसे विक्षेप मोडत जातील. (४७७०)

मग असो दृश्यानुविद्ध समाधि । किंवा शब्दानुविद्धाचा विधि ।
हा निश्चयचि वाढत जाय बुद्धि । नामरूपें क्षीण होतीं ॥ ७१ ॥
मग ती दृश्यानुविद्ध समाधी असो, किंवा शब्दानुविद्ध समाधीचा प्रकार असो, हा निश्चय आणि त्यानुसार बुद्धी वाढत जातील. नामरूपे हळूहळू क्षीण होत जातील. (४७७१)

सर्व दृश्य सान थोर न स्मरतां । अखंड एकरूप ते दृश्यानुविद्धता ।
शब्दादि चंचल किमपि नाठवता । एकरूप भासे ॥ ७२ ॥
सर्व दृश्यसृष्टी लहान मोठा अशा भेदाचे स्मरण न होता अखंड, एकरूप भासणे ही दृश्यानुविद्ध समाधी होय; आणि शब्द इ. चे किंचितही स्मरण न होता सर्व ब्रह्मरूपच होणे यास शब्दानुविद्ध समाधी म्हणतात. (४७७२)

एवं अभ्यासासाठी समाधीचे । कथिले प्रकार ब्रह्मरूपाचे ।
तो दृश्यानुविद्ध कधी नवचे । नामरूपाचा विक्षेप ॥ ७३ ॥
अशा प्रकारे समाधीचे हे दोन प्रकार अभ्यासासाठी सांगितले आहेत. असा अभ्यास दृढ झाल्यानंतर नामरूपांचा विक्षेप कधीच होणार नाही. (४७७३)

मूळपदी प्रयत्नेकडून । बोलिलें निरोधावें बळे आपण ।
स्वतःसिद्ध बाधक जे विकल्प संपूर्ण । नुरतां किमपि ॥ ७४ ॥
या श्लोकाच्या मूळ पदामध्ये अशा विक्षेपांचे प्रयत्नपूर्वक बळाने निरोधन करावे असे म्हटले आहे. अशा प्रयत्नपूर्वक अभ्यासाने स्वतःसिद्ध असे बाधक विकल्प मुळीच शिल्लक राहणार नाहीत. (४७७४)

अति प्रयत्न तोचि हा अभ्यास । दृश्यानुविद्ध शब्दानुविद्ध वृत्तिध्यास ।
तेणे स्वतःसिद्ध बाधकरूप विकल्पास । घात निःशेष होय ॥ ७५ ॥
त्यात जे खूप प्रयत्न करावेत असे म्हटले आहे, ते खूप प्रयत्न म्हणजेच हा दृश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध समाधींचा अभ्यास आणि वृत्तीचा ध्यास होय. त्यायोगाने स्वतःसिद्ध, बाधक विकल्पांचा निःशेष घात होतो. (४७७५)

मुख्य बाधक आपुलें विस्मरण । जें ब्रह्मात्मयाचे निःशेष अज्ञान ।
यया बीजें अन्यासी मी म्हणून । सदृढ बंधनीं पडे ॥ ७६ ॥
बाधक विकल्पांमध्ये मुख्य बाधक म्हणजे आपल्याला होणारे विस्मरण हेच होय. विस्मरण म्हणजे ब्रह्मात्म्याचे संपूर्ण अज्ञान होय. या बीजरूप अज्ञानाने भलत्यालाच मी मानून जीव सदृढ अशा बंधनांत पडतो. (४७७६)

मग हीं नामरूपें खरींचि जाहलीं । मी माझें की वाईट चांगुलीं ।
या साभिमाने कामादि बैसलीं । घरे बांधोनी ॥ ७७ ॥
त्यामुळे ही नामरूपे खरी वाटू लागतात, मी-माझे, वाईट-चांगले, अशा अभिमानामुळे काम, इ. षड्रिपू मनात घरे बांधून बसतात. (४७७७)

एवं हेचि स्वतःसिद्ध विकल्प । निरोधी तरीच होय सुखरूप ।
परी हे निरोधितां न जाती अल्प । अज्ञान बीज असतां ॥ ७८ ॥
हेच स्वतःसिद्ध विकल्प होत. त्यांचे निरोधन केले तरच आपण सुखी होऊ. पण अंतःकरणात अज्ञानाचे हे बीज असेल तर निरोधन केल्यानंतरही ते किंचितही नष्ट होत नाहीत. (४७७८)

तस्मात् अज्ञान जें आपुलें विस्मरण । निःशेषचि काढावें खांदून ।
हें जावया हेचि उपाय दोन । विचार किंवा अभ्यास ॥ ७९ ॥
म्हणून आपल्या स्वतःचे विस्मरण असे जे अज्ञान ते समूळ खांदून काढावे. ते जाण्यासाठी दोन उपाय आहेत. विचार किंवा अभ्यास. (४७७९)

विचारें लयसाक्षित्व जाणावें । अभ्यासें तेंचि आपण स्मरावें ।
सदृढ होतां विस्मरणचि नव्हे । मग अन्या मी मी ह्मणेना ॥ ८० ॥
विचाराच्या साहाय्याने लयसाक्षित्व जाणून घ्यावे, अभ्यासाच्या साहाय्याने लयसाक्षी निर्विकल्प ब्रह्म हेच आपण आहोत याचे स्मरण करावे, असे स्मरण सदृढ होताच विस्मरण होणारच नाही, त्यामुळे भलत्याच वस्तूला मी, मी असे जीव म्हणणार नाही. (४७८०)

मुळी स्फूर्तीपासून या सर्वांसी । सत्यत्वचि नये या अभ्यासीं ।
मीपणचि नव्हे देहादिकांसी । आणि माझेपण न स्फुरे ॥ ८१ ॥
मूळ स्फूर्तीपासून ते या सर्वांपर्यंत कशालाच सत्यत्व नाही, या अभ्यासाने देह इ. ना मीपणच येणार नाही आणि माझेपणही स्फुरणार नाही. (४७८१)

तरी कामादि कैंचे उठती । अर्थात् स्वतःसिद्ध विकल्प निरोधती ।
निरोधन ह्मणिजे लयचि पावती । अज्ञानबीजासहित ॥ ८२ ॥
मग काम इ. वड्रिपू कसे उत्पन्न होतील? तेव्हा स्वतःसिद्ध विकल्पांचे अशा प्रकारे निरोधन होईल. आणि हे निरोधन म्हणजे ते अज्ञानरूप बीजासह लयच पावतील. (४७८२)

तस्मात् प्रयत्न तो हाचि असे एक । की विस्मरणचि न पडावें मनाक ।
येणे स्वतःसिद्ध विकल्प सकळिक । नासती हेंचि निरोधन ॥ ८३ ॥
म्हणून आपल्या मनाला थोडेसुद्धा विस्मरण पडू न देणे हाच प्रयत्न होय. त्यामुळे सगळे स्वतःसिद्ध विकल्प नष्ट होतील, हेच निरोधन होय. (४७८३)

तया स्मरणरूप अभ्यासासी । नांवें दोन समाधिरूपासी ।
एक तो दृश्यानुविद्ध दुजियासी । शब्दानुविद्ध बोलती ॥ ८४ ॥
त्या स्मरणरूप अभ्यासाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे दृश्यानुविद्ध समाधी आणि दुसरा म्हणजे शब्दानुविद्ध समाधी, अशी त्यांची नावे आहेत. (४७८४)

दृश्य पाहतां दृश्य न स्फुरावें । हे दृश्यानुविद्धाचे रूप जाणावें ।
यासी हेतु एक वैराग्य असावें । विवेकासहित ॥ ८५ ॥
दृश्य पाहात असताना त्या दृश्याचे स्फुरण होऊ नये हे दृश्यानुविद्ध समाधीचे स्वरूप आहे. हे साधण्यासाठी विवेकासहित वैराग्याची गरज आहे. (४७८५)

तया विवेकवैराग्येंकडून । नामरूपें नुद्भवती आनान ।
अर्थात् अस्ति भाति प्रिय दर्शन । दृढ होय दृश्यानुविद्ध ॥ ८६ ॥
त्या विवेकयुक्त वैराग्यामुळे वेगवेगळी नामरूपे उत्पन्न होत नाहीत. त्यांच्या जागी अस्ति, भाति, प्रिय अशा ब्रह्माची जाणीव होते. त्यामुळे दृश्यानुविद्ध समाधी दृढ होत जाते. (४७८६)

स्फूर्त्यादि चंचळ हे सर्व उठतां । हे मी आणि न यावी या सत्यता ।
मी यांत असून स्मरें या परता । हा शब्दानुविद्ध ॥ ८७ ॥
स्फूर्ती इ. चंचळ सृष्टीची उत्पत्ती होताच हे मीच असे सत्य वाटू नये. मी यात आहे खरा पण मी याच्यापेक्षा निराळा आहे असे स्मरण होणे याला शब्दानुविद्ध समाधी म्हणतात. (४७८७)

यासीही हेतु एक उपरम । ह्मणिजे सदा निश्चळ अहंब्रह्म ।
गगन जैसे एकरूप सम । वायूनेही हालेना ॥ ८८ ॥
ही समाधी साध्य होण्यासाठी उपरमाची गरज आहे. उपरम म्हणजे आकाश जसे एकरूप आणि सर्वत्र सारखे आहे. ते वाऱ्यानेही हलत नाही. त्याप्रमाणे अहंब्रह्म (मी ब्रह्म आहे) हा विचार निश्चल झाला पाहिजे. तो विचार वृत्त्यादी विक्षेपांनी अस्थिर होता कामा नये. (४७८८)

तैसा या वृत्त्यादिकं आपण । ब्रह्मात्मा पावेना चंचळपण ।
ऐशिया निश्चयासी नामाभिधान । उपरम बोलिजे ॥ ८९ ॥
आपण ब्रह्मात्मा आहोत असा विचार वृत्त्यादिकांनी चळणार नाही असा स्थिर राहिला पाहिजे. अशा निश्चयाला उपरम असे नाव आहे. (४७८९)

या उपरमेंकडून स्वतःसिद्ध । सदृढ होय हा शब्दानुविद्ध ।
शब्दादि उठतांही नानाविध । निश्चळ ब्रह्मात्मया स्मरे ॥ ९० ॥
या उपरमामुळे स्वतःसिद्ध अशी शब्दानुविद्ध समाधी दृढ होते. निरनिराळ्या प्रकारचे शब्दादी विक्षेप उठले तरी आपण निश्चल राहन साधक, ब्रह्मात्म्याचे स्मरण करतो. (४७९०)

एवं दृश्यानुविद्ध शब्दानुविद्ध दोन । वैराग्य उपरमें सदृढ होणे ।
मुख्य लयसाक्षिज्ञान प्रयोजन । वरी स्मरणरूप अभ्यास ॥ ९१ ॥
अशाप्रकारे दृश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध असे दोन समाधीप्रकार वैराग्य आणि उपरम यांच्या साहाय्याने सदृढ होतात. मुख्यतः लयसाक्षीचे ज्ञाले पाहिजे. आणि त्यावर हा स्मरणरूप अभ्यासही झाला पाहिजे. (४७९१)

या रीतीं बाह्यव्यापारी जागृतींत । स्मरणरूप अभ्यास घडे यथायुक्त ।
हेचि उभयरीतीं समाधि अंतरांत । साधकें अभ्यासावें ॥ ९२ ॥
या पद्धतीने बाह्य व्यापार करत असता जागृत अवस्थेमध्ये वरीलप्रमाणे स्मरणरूप अभ्यास योग्य प्रकाराने झाला पाहिजे. हेच दोन्ही प्रकारच्या समाधींचे अभ्यास साधकाने अंतर्यामीही केले पाहिजेत. (४७९२)

उगेंचि निवांत बैसतां क्षणीं । विकल्प उठती अंतरांतूनी ।
मनबुद्धियोगें ध्यास दृश्यपणीं । दिसती साचाऐसे ॥ ९३ ॥
उगीच निवांत बसले असताना आतून (अंतःकरणातून) विकल्प उठत असतात. मन आणि बुद्धी यांच्यामुळे साधकाला त्यांचे ध्यास प्रत्यक्ष खन्या दृश्याप्रमाणे दिसत असतात. (४७९३)

ते ध्यासरूपही विषय दिसतां । नामरूपें सारोनि परता ।
अस्ति भाति स्मरावें अखंडितां । हा दृश्यानुविद्ध ॥ ९४ ॥
ते ध्यासरूप विषय दिसत असतानासुद्धा नामरूपे बाजूला सारून त्यांच्याऐवजी अस्तिभातिप्रिय अशा ब्रह्मात्म्याचे अखंडतिपणे स्मरण करावे ही दृश्यानुविद्ध समाधी होय. (४७९४)

कल्पित दृश्यामाजीं शब्दही उठे । आणि चंचलत्वही उमटे ।
या इतुक्या व्यापारामाजी नेटें । स्मरावें अस्तिभाति ॥ ९५ ॥
कल्पित दृश्यामध्ये शब्दही उठतो आणि चंचलत्वदेखील उमटते. इतक्या सर्व व्यापारांमध्ये साधकाने प्रयत्नपूर्वक, नेटाने अस्तिभाति प्रियत्वाचे स्मरण करावे. (मी या व्यापारांपैकी काही नसून केवळ अस्तिभातिप्रियात्मक ब्रह्मात्माच आहे, असे स्मरण राखावे. ही दृश्यानुविद्ध समाधी होय.) (४७९५)

अथवा कल्पनाही नानापरी । मध्यमेपर्यंत उठती सारी ।
तत्क्षणी ते सारोनि दुरी । अस्तिभातित्वें स्मरावें ॥ ९६ ॥
किंवा परा वाचेपासून ते मध्यमेपर्यंत अनेक प्रकारच्या कल्पना उठत असतात. परंतु त्या उठताच त्याचक्षणी त्यांना दूर सारून अस्तिभातिप्रियत्वाचे स्मरण करावे. (४७९६)

तें तें नामरूप की चंचळपण । नाठवावें किमपि आपण ।
एकरूप ब्रह्मात्मयाचे स्मरण । या नांव शब्दानुविद्ध ॥ ९७ ॥
ते ते नामरूप आणि चंचळपणा यांचे आपण काहीही स्मरण करू नये, आणि ब्रह्मात्म्याचे स्मरण करावे. यालाच शब्दानुविद्ध समाधी असे नाव आहे. (४७९७)

ऐसें अंतरीं आणि बाहेरी । दृश्यानुविद्ध शब्दानुविद्धाचे परी ।
अभ्यासें साधी जो साधक निर्धारी । तो निर्विकल्पाही पावे ॥ ९८ ॥
अशा प्रकारे अंतर्यामी आणि बाहेरही या दृश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध यांचा अभ्यास जो साधक निर्धारपूर्वक करील त्याला निर्विकल्पाचीही प्राप्ती होईल. (४७९८)

जो समाधि निर्विकल्प असंप्रज्ञ । सर्वपणाचा लय होऊन पूर्ण ।
तोही घडे याचि अभ्यासेंकडून अति सदृढ होतां ॥ ९९ ॥
याच अभ्यासाने सर्वपणाचा पूर्ण लय होऊन निर्विकल्प असंप्रज्ञात समाधी प्राप्त होऊ शकते. पण त्यासाठी तो अभ्यास अतिशय दृढ झाला पाहिजे. (४७९९)

परी आधी सविकल्प दृढ व्हावा । अभ्यासे विकल्पचि नुद्भवावा ।
तस्मात् सविकल्पचि पुरता साधावा । हरप्रयत्ने साधकें ॥ ४८०० ॥
पण त्याआधी सविकल्प समाधी दृढ झाली पाहिजे. अभ्यासाने विकल्प न उठावा याची दक्षता घ्यावी. म्हणूनच साधकाने हरप्रयत्नाने ही सविकल्प समाधीच पूर्णपणे साधावी. (४८००)

दृश्यानुविद्ध शब्दानुविद्ध हेचि दोन । सविकल्प समाधीचें लक्षण ।
परी या दोहीपरता सविकल्प संप्रज्ञ । असे तो स्पष्ट करूं ॥ १ ॥
सविकल्प समाधीचे दृश्यानुविद्ध आणि शब्दानुविद्ध हेच दोन प्रकार आहेत. पण दोहोंखेरीज आणखी एक सविकल्प संप्रज्ञ समाधी आहे. तिचे स्पष्टीकरण आधी करू. (४८०१)

वृत्ति होतां चिद्गगनाकार । अनुभवीतसे ध्येयमात्र ।
लयही पावोनियां सत्वर । उठोनि चिद्घनी मिळे ॥ २ ॥
वृत्ती चिद्गगनाकार होऊन स्वतःचे जे ध्येय (निर्विकल्प ब्रह्म) त्याचा अनुभव घेते. नंतर लय पावते आणि लगेच उठून चिद्गगनात मिसळते. (४८०२)

हाचि सविकल्प समाधि थोर । ब्रह्मसुखें सुखी तदाकार ।
स्वानुभवी सामान्यवृत्ति गोचर । मागां निरोपिल्यापरी ॥ ३ ॥
हीच सविकल्प समाधी असून ती महत्त्वाची आहे. तीमध्ये सामान्यवृत्ती मागे सांगितल्याप्रमाणे ब्रह्मसुखाने सुखी होऊन तदाकार होते. (४८०३)

तेथें सहज असतां तेंचि होऊनी । सहजींच उठे अहंब्रह्म म्हणोनी ।
तो शब्द उद्गार उठतां क्षणीं । तया शब्दानुविद्ध नाम ॥ ४ ॥
तेथे ती सहजच असते आणि तेच होऊन अहं ब्रह्मास्मि असे म्हणत सहजच उठते. तो जो शब्दाचा उद्गार निर्माण होतो तीच शब्दानुविद्ध समाधी होय (४८०४)

तो शब्द नसतां सहज । सामान्यवृत्तीनें सुख घे अचोज ।
तोचि सविकल्प समाधि निज- । रूपी स्थिरावे ॥ ५ ॥
तो शब्द नसेल तर सामान्यवृत्तीने साधक सहज असे आत्मसुख अनुभवतो. तीच सविकल्प समाधी होय. या समाधीत साधक निजरूपात स्थिरावतो. (४८०५)

शब्देविण ध्येयाकारता । सविकल्पचि होतसे अनुभविता ।
ध्यान भिन्न आणि भिन्न नव्हे ध्याता । परी सुख घे सविकल्प ॥ ६ ॥
अहं ब्रह्मास्मि या शब्दांवाचून साधक सविकल्प असतानाच ध्येयाकारता अनुभवतो. त्यावेळी ध्यान आणि ध्याता भिन्न होत नाहीत. तरीपण वृत्तिरूप विकल्प असतानाच साधक ब्रह्मसुखाचा अनुभव घेतो. (४८०६)

हा समाधि मुख्य सविकल्प । निर्विकल्पी होऊनि निर्विकल्प ।
तेथें शब्द की दृश्य नसे अल्प । म्हणोनि भिन्न दोहींनी ॥ ७ ॥
ही मुख्य सविकल्प समाधी होय. तिच्यामध्ये निर्विकल्पात निर्विकल्प होऊन तो (साधक) त्या सुखाचा अनुभव घेतो. त्या समाधीत शब्दही नसतो किंवा दृश्यही नसते; म्हणून ही समाधी वर वर्णन केलेल्या दोन्ही समाधींपेक्षा भिन्न असते. (४८०७)

एवं शब्दानुविद्ध दृश्यानुविद्ध । तिसरा समाधि सविकल्प शुद्ध ।
या तिहींचे अभ्यासें नामरूपें अशुद्ध । नुद्भवती कदा ॥ ८ ॥
अशा प्रकारे शब्दानुविद्ध, दृश्यानुविद्ध आणि तिसरी शुद्ध सविकल्प या तीन समाधींच्या अभ्यासाने अशुद्ध अशी नामरूपे केव्हाही उद्भवत नाहीत. (४८०८)

देहही व्यापारो भलतैसा । किंवा सूक्ष्म देहाचा वळसा ।
परी नामरूपाचा नुमसे ठसा । एकतान ब्रह्मात्मा ॥ ९ ॥
स्थूल देह कोणत्याही व्यापारात गुंतलेला असो, किंवा सूक्ष्म देहाचा व्यापार चालू असो, तरी नामरूपाचा ठसा मुळीच उमटत नाही. फक्त एकतान ब्रह्मात्माच केवळ असतो. (४८०९)

बाह्यव्यापारी की निवांत स्थानीं । दुसरी ऊर्मीच नसे अंतःकरणीं ।
एकतान ब्रह्म चिद्घनीं । समरसे सदा ॥ १० ॥
बाह्य व्यापारात गुंतलेला असो, किंवा निवांतपणे एकान्तात बसलेला असो, अंतःकरणात दुसरी ऊर्मीच उठत नाही. साधक एकतान चिद्घन ब्रह्मरसात सर्वकाळ सत्रमरसलेला असतो. (४८१०)

ऐसा दृढ होय अखंडैकरसें । यया समाधीचे अभ्यासें ।
दुसरें किमपिही नसे पिसें । द्वैत नामरूपाचें ॥ ११ ॥
या समाधीच्या अभ्यासाने अखंड एकरस अशा ब्रह्मसुखाच्या अनुभवात तो दृढ होतो. द्वैतरूप नामरूपाचे कसलेही वेड त्या ब्रह्मसुखाच्या अनुभवात नसते. (४८११)

संकल्पही कदां रोधीना । दृश्यही परतें सारीना ।
एकरूप ब्रह्मात्मया अभिन्ना । त्यामाजींच पाहे ॥ १२ ॥
तो संकल्पाचेही कधी निरोधन करत नाही, दृश्यालाही बाजूला सारत नाही, तर त्यांच्यामध्येच एकरूप, अभिन्न, अशा ब्रह्मात्म्याला पाहतो. (४८१२)

दृश्यामाजीं दृश्यभान नसे । शब्दांमाजी शब्द हा नुमसे ।
आपणचि ब्रह्मात्मा एकरसें । अवस्थे भलतेही ॥ १३ ॥
दृश्यामध्ये त्या दृश्याचे भान नसते, शब्दांमध्येसुद्धा शब्द उत्पन्न होत नाही, कोणत्याही अवस्थेत तो आपणच एकरस ब्रह्मात्मा झालेला असतो. (४८१३)

एवं सर्व असतां की मावळतां । ब्रह्मात्मयाची एकरूपता ।
दुजेपणाच किमपि न येतां । ऐक्यता सहज ॥ १४ ॥
अशा प्रकारे सर्व असोत की लोप पावोत, ब्रह्मात्म्याच्या या ऐक्यात काहीही दुजेपणाचा स्पर्श न होता सहज एकरूपताच असते. (४८१४)

सर्व निरोधाचें जें फळ । ऐक्यरूपें निर्विकल्प केवळ ।
होत असे तें ऐका प्रांजळ । आणि प्रियकर ज्ञानिया ॥ १५ ॥
सर्व निरोधाचे फळ जे ऐक्यरूपाने निर्विकल्पत्व साधणे हेच आहे. तेच फळ सर्व उपस्थित असताना प्राप्त होते. हीच समाधी ज्ञानी लोकांना अतिशय प्रिय आहे. ते स्पष्ट करतो, ते ऐका. (४८१५)

GO TOP