॥ अवधूत गीता ॥

अष्ट अध्यायांनी युक्त अशी ही अवधूत गीता म्हणजे अवधूतांनी किंवा दत्ताने केलेला उपदेश होय. गीतेतील प्रत्येक अध्यायाच्या शेवटी 'दत्तात्रेयविरचितायाम् अवधूतगीतायाम्' असा उल्लेख आला आहे. तर आठव्या अध्यायाच्या अखेरीस 'स्वामिकार्तिक संवादे' अशी यात भर आहे. प्रस्तुत गीतेतील दुसर्‍या व तिसर्‍या अध्यायाचा प्रारंभ 'अवधूत उवाच' असा आहे तर पुढे 'दत्त उवाच' असे म्हणून चौथ्यापासूनचे पुढील अध्याय आहेत. प्रस्तुतच्या गीतेतील सर्व अध्यायांना स्वतंत्र नावे नसली तरी 'आत्मसंवित्त्युपदेश' या नावे पहिला अध्याय आहे. यात ज्ञानी माणसाचे त्याच्या प्रवृत्तीचे वर्णन आले आहे. हे वर्णन 'नेति नेति' अशाच स्वरूपाचे आहे.

दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या अध्यायालाही असेच परतत्वाचे वर्णन आले आहे. तिसर्‍या अध्यायात हेच आत्मतत्त्व म्हणून वर्णिले असल्याने आत्मासक्ती हे त्याचे नाव आहे. तर चौथ्या आत्मस्वरूप नावाच्या अध्यायातही याच आत्मतत्त्वाचे विवेचन आहे, तर पाचव्या अध्यायात या तत्त्वाच्या ज्ञानाने मन सम बनते, मग शोक कोठून ? असाच प्रश्न अध्यायभर केला आहे. हा शमदृष्टी या नावाचा अध्याय होय. मोक्षनिर्णय या सहाव्या अध्यायात अभेदाचे वर्णन करीत जगातील भेददर्शक शब्द उदा. विवेक व अविवेक सुख-दुःख इ. कसे निर्माण झाले ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सातव्या अध्यायातही सर्व प्रकारचे विरुद्ध गुण एकत्र नांदतात अशा प्रकारे बंधनमुक्त अशा तत्त्वाचे वर्णन करून आठव्या अध्यायात मात्र अवधूत या शब्दाचा लाक्षणिक अर्थ सांगितला आहे.

आशापाशरहित व नित्य आनंदात राहणारा या अर्थी 'अ' हे अक्षर तर अवधूतांचे वासनारहितत्व व वर्तमान अस्तित्व दर्शविणारे 'व'कार हे अक्षर आहे. त्यांच्या धूत चित्ताचे आणि धूलिधूसर शरीराचे निदर्शक 'धू' अक्षर आहे तर तमरूपी अहंकार नष्ट झाल्याच तत्त्वचिंतकदर्शक 'त' हे अक्षर होय. अशा रीतीने वेगळ्या रीतीने अवधूताचे स्पष्टीकरण दिल्यावर मन स्त्री देह निंदा करून वासनेत रममाण होणारे नरकात जातात अशाच प्रकारे संपूर्ण अध्यायभर विवेचन येते. या अध्यायाच्या शेवटी या गीतेच्या पठण श्रवणाची फलश्रुतीही सांगितली आहे.

अवधूत गीतेलाच काहींनी दत्तगीता असेही नाव दिले आहे. मात्र मौद्गल पुराणातील दत्तगीता ही याहून बरीत भिन्न आहे. ती पुढे क्रमाने येईलच. पण अवधूत गीतेमधीलच श्लोकांची दुसरी संहिता दत्तगीता म्हणून प्रचलित आहे. त्यातील लोकसंख्येत थोडासा फरक असला तरी मूळ विषय एकच असल्याने ती स्वतंत्रपणे येथे दिलेली नाही. त्या पोथीतही आठ अध्यायच आहेत पण श्लोकसंख्या मात्र २९१ आहे.

GO TOP