॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ अवधूतगीता ॥

॥ अथ तृतीयोऽध्यायः - अध्याय तिसरा ॥


॥ आत्मासक्ति उपदेश ॥


अवधूत उवाच -
गुणविगुणविभागो वर्तते नैव किञ्चित्
     रतिविरतिविहीनं निर्मलं निष्प्रपञ्चम् ।
गुणविगुणविहीनं व्यापकं विश्वरूपं
     कथमहमिह वन्दे व्योमरूपं शिवं वै ॥ १ ॥
अवधूत म्हणाले, ज्या ठिकाणी गुणदोष इत्यादि विभाग (रहात नाहीत) नसतात, जे प्रीति आणि अप्रीति यांनी रहित आहे, जे निर्मल निष्प्रपंच, सत्त्वादिगुणयुक्तही नाही, व तद्‌रहितही नाही, व्यापक व विश्वतोमुख असे जे आहे, त्या आकाशस्वरूप कल्याणकारक परमात्म्याला मी कसा नमस्कार करावा ? (१)

श्वेतादिवर्णरहितो नियतं शिवश्च
     कार्यं हि कारणमिदं हि परं शिवश्च ।
एवं विकल्परहितोऽहमलं शिवश्च
     स्वात्मानमात्मनि सुमित्र कथं नमामि ॥ २ ॥
पांढरा तांबडा इत्यादि रंगांनी रहित व कल्याणकारक, हेच तत्त्व श्रेष्ठ कार्य कारण रूप आणि कल्याणकारक, याप्रमाणे संकल्प विकल्प रहित असल्यामुळे निर्मल व कल्याणकारक असा जो मी तो मी हे मित्रा, स्वतःलाच स्वतःचे ठिकाणी कसा नमस्कार करू ? (२)

निर्मूलमूलरहितो हि सदोदितोऽहं
     निर्धूमधूमरहितो हि सदोदितोऽहम् ।
निर्दीपदीपरहितो हि सदोदितोऽहं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ३ ॥
अकारण व कारण यांनी रहित असा मी आहे, कारण मी सर्वदा प्रकाशरूप आहे. त्याचप्रमाणे मी सर्वदा प्रकाशरूप असल्यामुळे धूम व धूमराहित्य याहूनही निराळा आहे. तसाच मी प्रकाशरूप असल्यामुळे लौकिकप्रकाश व अप्रकाश (उजेड आणि अंधार) याहून निराळा आहे आणि मी ज्ञानामृतरूप सर्वत्र समरस व गगनासारखा आहे. (३)

निष्कामकाममिह नाम कथं वदामि
     निःसङ्‌गसङ्‌गमिह नाम कथं वदामि ।
निःसारसाररहितं च कथं वदामि
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ४ ॥
ते ब्रह्म निष्काम आहे की सकाम आहे. हे मी कसे सांगू ? तसेच ते निस्संग आहे की संगयुक्त आहे, हे मी कसे सांगावे. आणखी निस्सारता व सारता या धर्मांनी रहित असलेल्या ब्रह्माचे वर्णन मी कसे करावे ? तात्पर्य ज्ञानामृतरूप व समरस आणि गगनासारखा मी आहे. (४)

अद्वैतरूपमखिलं हि कथं वदामि
     द्वैतस्वरूपमखिलं हि कथं वदामि ।
नित्यं त्वनित्यमखिलं हि कथं वदामि
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ५ ॥
सर्वही अद्वैतरूप आहे हे मी कसे बोलावे ? किंवा हे सर्व द्वैतात्मक आहे असे तरी कसे बोलू ? एक नित्य व बाकी सर्व अनित्य असे तरी मी कसे सांगू ? कारण ज्ञानामृत समरस गगनासारखा मी आहे. (५)

स्थूलं हि नो नहि कृशं न गतागतं हि
     आद्यन्तमध्यरहितं न परापरं हि ।
सत्यं वदामि खलु वै परमार्थतत्त्वं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ६ ॥
ते स्थूल नाही, कृश नाही. त्याला गति आणि अगति ही नाही ते जन्मस्थितिनाशरहित आहे. ते पर नाही व अपरही नाही. मी सत्य सांगतो की ते परमार्थतत्त्व ज्ञानामृतरूप समरस व गगनासारखे आहे व तेच 'मी' आहे. (६)

संविद्धि सर्वकरणानि नभोनिभानि
     संविद्धि सर्वविषयांश्च नभोनिभांश्च ।
संविद्धि चैकममलं न हि बन्धमुक्तं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ७ ॥
सर्वही इंद्रिये आकाशसारखी शून्यरूप म्हणजे असत (मिथ्या) आहेत असे समज. सर्वही विषय आकाशाप्रमाणे आहेत असे समज. तात्पर्य एक, निर्मल बंधमोक्ष रहित ज्ञानामृतरूप, समरस गगनासारखा मी आहे (असे समज). (७)

दुर्बोधबोधगहनो न भवामि तात
     दुर्लक्ष्यलक्ष्यगहनो न भवामि तात ।
आसन्नरूपगहनो न भवामि तात
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ८ ॥
मी दुर्बोध नाही, व सुबोध नाही, म्हणून गहनही नाही. त्याचप्रमाणे हे शिष्या, ज्याचे लक्षण करता येत नाही व ज्याचे लक्षण करता येते म्हणून गहन आहे असेही नाही आणि बाबा, मी सर्वांचे अंतःकरणात अगदीच जवळ असल्यामुळे समजण्यास कठीण आहे असे नाही तर मी ज्ञानामृतरूप समरस गगनासारखा असा आहे. (८)

निष्कर्मकर्मदहनो ज्वलनो भवामि
     निर्दुःखदुःखदहनो ज्वलनो भवामि ।
निर्देहदेहदहनो ज्वलनो भवामि
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ९ ॥
कर्मे न करणाच्याही पुरुषांच्या कर्माचे दहन करणारा मी अग्नि आहे. त्याचप्रमाणे निर्दःख विदेही पुरुषांच्या देहाचेही दहन करणारा मी अग्नि आहे तसेच ज्ञानामृत समरस व आकाशासारखा मी आहे. (९)

निष्पापपापदहनो हि हुताशनोऽहं
     निर्धर्मधर्मदहनो हि हुताशनोऽहम् ।
निर्बन्धबन्धदहनो हि हुताशनोऽहं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ १० ॥
निष्पाप व पाप यांना जाळून टाकणारा अग्नि, धर्म व अधर्म यांना जाळून टाकणारा अग्नि आणि बंध आणि निर्बंध यांनाही जाळणारा अग्नि व ज्ञानामृतरूप समरस आणि गगनासारखा मी आहे. (१०)

निर्भावभावरहितो न भवामि वत्स
     निर्योगयोगरहितो न भवामि वत्स ।
निश्चित्तचित्तरहितो न भवामि वत्स
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ११ ॥
अभाव आणि भाव यांनी रहित असा मी नाही. निर्योग किंवा योग यानी रहितही मी नाही आणि बाळा अरे, निश्चित आणि चिंतारहितही मी नाही. तर मी ज्ञानामृतरूप समरस आणि गगनासारखा आहे. (११)

निर्मोहमोहपदवीति न मे विकल्पो
     निःशोकशोकपदवीति न मे विकल्पः ।
निर्लोभलोभपदवीति न मे विकल्पो
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ १२ ॥
निर्मोह व मोह (मार्ग) असा विकल्प मला नाही. त्याचप्रमाणे सुखमार्ग व दुःखमार्ग हाही विकल्प माझे ठिकाणी नाही. निर्लोभमार्ग किंवा लोभमार्ग असा विकल्पही माझे ठिकाणी नाही, तर ज्ञानामृतरूप समरस व आकाशासारखा मी आहे. (१२)

संसारसन्ततिलता न च मे कदाचित्
     सन्तोषसन्ततिसुखं न च मे कदाचित् ।
अज्ञानबन्धनमिदं न च मे कदाचित्
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ १३ ॥
संसार प्रवाहरूपी लता मला कधीही प्राप्त होत नाही. वैषयिक संतोषप्रवाह आणि सुख ही मला नाहीत. आणि हे सर्वानुभूत अज्ञानबंधन मला कधीही प्राप्त होत नाही. तर मी ज्ञानामृतरूप एकरस (समरस) व गगनासारखा आहे. (१३)

संसारसन्ततिरजो न च मे विकारः
     सन्तापसन्ततितमो न च मे विकारः ।
सत्त्वं स्वधर्मजनको न च मे विकारो
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ १४ ॥
संसार प्रवाहांतील रजोगुण हा माझा विकार नव्हे, तसाच त्या त्रिविधसंतापप्रवाहांतील तमोगुण हा माझा विकार नव्हे. स्वधर्मजनक सत्वगुण हाही माझा विकार नव्हे, तर मी ज्ञानामृतरूप, समरस व आकाशासारखा आहे. (१४)

सन्तापदुःखजनको न विधिः कदाचित्
     सन्तापयोगजनितं न च मे कदाचित् ।
यस्मादहङ्कृतिरियं न च मे कदाचित्
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ १५ ॥
संताप व दुःख यांना देव कधी उत्पन्न करीत नाही आणि संतापाच्या योगाने मन कधीही उत्पन्न होत नाही. कारण, सुख दुःख संताप इत्यादि सर्व काही अहंकारच आहे. म्हणून तो माझा नव्हे. मी ज्ञानामृतरूप समरस (ओतप्रोत) गगनासारखा आहे. (१५)

निष्कम्पकम्पनिधनं न विकल्पकल्पं
     स्वप्नप्रबोधनिधनं न हिताहितं हि ।
निःसारसारनिधनं न चराचरं हि
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ १६ ॥
कंपरहित, स्तब्ध, विकल्पात्मक, स्वप्न जागृति मरण, हित व अहित सारराहित्य व सारसर्वस्व, चर अचर यांपैकी काहीही नसून मी ज्ञानामृतरूप समरस व आकाशासारखा आहे. (१६)

नो वेद्यवेदकमिदं न च हेतुतर्क्यं
     वाचामगोचरमिदं न मनो न बुद्धिः ।
एवं कथं हि भवतः कथयामि तत्त्वं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ १७ ॥
हे तत्व इंद्रियादिकांनी जाणण्यास योग्य नव्हे. हे कशाचेही वेदक म्हणजे ज्ञानसाधनही नव्हे. याचा केवळ हेतूवरून तर्क करता येत नाही, वाचा, मन आणि बुद्धि यांना विषय न होणारे असे असताना या तत्त्वाचे मी कसे व्याख्यान करू ? कारण मी ज्ञानामृतरूप समरस व आकाशासारखा आहे.(१७)

निर्भिन्नभिन्नरहितं परमार्थतत्त्व-
     मन्तर्बहिर्न हि कथं परमार्थतत्त्वम् ।
प्राक्सम्भवं न च रतं नहि वस्तु किञ्चित्
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ १८ ॥
भेद व अभेद यांनी रहित असे जे परमार्थ तत्त्व ते जर अंतर्बहिर नव्हे तर ते परमार्थ तत्त्व कसे ? सृष्टि उत्पन्न होण्याच्या पूर्वी ते कशाचाही उपभोग घेत नाही व ते कोणती वस्तुही नव्हे. तर मी ज्ञानामृतरूप समरस व आकाशासारखा आहे. (१८)

रागादिदोषरहितं त्वहमेव तत्त्वं
     दैवादिदोषरहितं त्वहमेव तत्त्वम् ।
संसारशोकरहितं त्वहमेव तत्त्वं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ १९ ॥
राग, लोभ, मोह, मद इत्यादि दोषांनी रहित असा मी म्हणजेच तत्त्व आहे. संचित, क्रियमाण आदिकरून दैवदोषरहित असा जो मी संसारापासून होणार्‍या शोकादिकांनी रहित असा जो मी तेच तत्त्व. सारांश मी ज्ञानामृतरूप समरस गगनोपम आहे. (१९)

स्थानत्रयं यदि च नेति कथं तुरीयं
     कालत्रयं यदि च नेति कथं दिशश्च ।
शान्तं पदं हि परमं परमार्थतत्त्वं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ २० ॥
जाग्रत्, स्वप्न, सुषुप्नि, ही तीन स्थानेच जर नाहीत तर तुरीय कोठून आले ? तसेच भूत भविष्य वर्तमानादि जे कालत्रय जर नाही, तर दिशा कोठून आल्या ? कारण अत्यंत श्रेष्ठ शांतपद जे परमार्थ तत्त्व व जे ज्ञानामृतरूप समरस गगनासारखे आहे, तेच मी आहे. (२०)

दीर्घो लघुः पुनरितीह नमे विभागो
     विस्तारसंकटमितीह न मे विभागः ।
कोणं हि वर्तुलमितीह न मे विभागो
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ २१ ॥
परमार्थिक अवस्थेमध्ये एकदा लघु आणि पुनः दीर्घ असा माझे ठिकाणी विभाग नाही. तसेच त्या अवस्थेमध्ये असताना विस्तृत आणि संकुचित हाही पण माझा विभाग नव्हे. वाकडे तिकडे अथवा वर्तुळ असाही त्या अवस्थेत माझा विभाग नाही. तर ज्ञानामृतरूप समरस गगनासारखा मी आहे. (२१)

मातापितादि तनयादि न मे कदाचित्
     जातं मृतं न च मनो न च मे कदाचित् ।
निर्व्याकुलं स्थिरमिदं परमार्थतत्त्वं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ २२ ॥
आईबाप मुलगा इत्यादिक हे माझे कधीही नव्हेत. कोणी कधी उत्पन्न झाले नाही कोणी कधी मेले नाही. मन हे माझे कधीही नव्हे तर निर्व्याकुल, स्थिर, ज्ञानामृतरूपे समरस व गगनोपम असे हे परमार्थ तत्त्व मी आहे. (२२)

शुद्धं विशुद्धमविचारमनन्तरूपं
     निर्लेपलेपमविचारमनन्तरूपम् ।
निष्खण्डखण्डमविचारमनन्तरूपं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ २३ ॥
ते शुद्ध आहे अथवा अशुद्ध आहे, याविषयी विचार करता येत नाही. ते अनंतरूप आहे. त्याचप्रमाणे ते लिप्त आहे किंवा अलिप्त आहे याचाही विचार करता येत नाही. कारण ते अनंतरूप आहे तसेच ते खंडित किंवा अखंडित याचाही विचार होत नाही. कारण ते अनंतरूप आहे. सारांश ज्ञानामृतरूप समरस गगनासारखे परम तत्व ते मी आहे. (२३)

ब्रह्मादयः सुरगणाः कथमत्र सन्ति
     स्वर्गादयो वसतयः कथमत्र सन्ति ।
यद्येकरूपममलं परमार्थतत्त्वं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ २४ ॥
जर निर्मल एकरूप असे परमार्थ तत्व आहे, तर ब्रह्मा विष्णु इत्यादि सुरगण हे कोठून आले ? तसेच स्वर्गादिक लोक तरी तेथे कसे असणार ? सारांश ज्ञानामृतरूप समरस गगनासारखा मी आहे. (२४)

निर्नेति नेति विमलो हि कथं वदामि
     निःशेषशेषविमलो हि कथं वदामि ।
निर्लिङ्‌गलिङ्‌गविमलो हि कथं वदामि
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ २५ ॥
असा इतिस्वरूप आणि नेतिस्वरूप ज्याचे वर्णन केले जाते, तो स्पष्ट आहे असे मी कसे म्हणू ? तसेच निःशेष व सशेष असल्यामुळे तो निर्मल आहे असे तरी कसे म्हणू ? चिह्नरहित व चिह्नयुक्त असल्यामुळे तो निर्मल आहे हे तरी मी कसे म्हणू. मी ज्ञानामृतपूर्ण समरस असा गगनासारखा आहे. (२५)

निष्कर्मकर्मपरमं सततं करोमि
     निःसङ्‌गसङ्‌गरहितं परमं विनोदम् ।
निर्देहदेहरहितं सततं विनोदं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ २६ ॥
निष्कर्मातील श्रेष्ठ कर्मे मी सर्वदा करतो. निःसंग व संग, निर्देह व देह हे रहित म्हणून सर्वदा आश्चर्यकारक असे जे ज्ञानामृतरूप समरस परम तत्त्व मी आहे. (२६)

मायाप्रपञ्चरचना न च मे विकारः ।
     कौटिल्यदम्भरचना न च मे विकारः ।
सत्यानृतेति रचना न च मे विकारो
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ २७ ॥
प्रपंच रचना माया आहे हा माझा विकार नव्हे. कुटिलता व दंभता, सत्यरचना व असत्यरचना माझा विकार नव्हे. तर मी ज्ञानामृत..आहे.(२७)

सन्ध्यादिकालरहितं न च मे वियोगो
     ह्यन्तः प्रबोधरहितं बधिरो न मूकः ।
एवं विकल्परहितं न च भावशुद्धं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ २८ ॥
संध्यादि कालानीरहित म्हणून कोणाशी वियोग नाही. अंतःकरण प्रबोधरहित असल्यामुळे बधिर किंवा मुका नाही विकल्परहित म्हणून अंतःकरण प्रबोधरहित असा असल्यामुळे बधिर किंवा मुका नाही. विकल्परहित म्हणून अंतःकरण शुद्धिही नाही. सारांश... मी आहे. (२८)

निर्नाथनाथरहितं हि निराकुलं वै
     निश्चित्तचित्तविगतं हि निराकुलं वै ।
संविद्धि सर्वविगतं हि निराकुलं वै
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ २९ ॥
कोणाचाही स्वामी नसणे किंवा असणे, या उभय भावना नसल्याने क्लेशरहित, प्रवृत्ति व निवृत्ति यांनी रहित असल्यामुळे क्लेश रहित, सर्वगत असल्याने निराकुल असे गगनाप्रमाणे असणारे ज्ञानामृतरूप समरस परमतत्व ते मी आहे. (२९)

कान्तारमन्दिरमिदं हि कथं वदामि
     संसिद्धसंशयमिदं हि कथं वदामि ।
एवं निरन्तरसमं हि निराकुलं वै
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ३० ॥
हे अरण्य आहे, मंदिर आहे हे कसे म्हणू ? संशयाने भरलेले तरी कसे म्हणू ? सर्वत्र सारखे निरंतर व निराकुल असे ज्ञानामृतरूप समरस परमतत्व ते मी आहे. (३०)

निर्वाणबन्धरहितं सततं विभाति
     निर्बीजबीजरहितं सततं विभाति ।
निर्वाणबन्धरहितं सततं विभाति
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ३१ ॥
निर्जीव व सजीव, निर्बीज व सबीज, बंध व मोक्ष यांनी रहित असे मला सर्वदा भासते. मी ज्ञानामृत परमतत्त्व आहे. (३१)

सम्भूतिवर्जितमिदं सततं विभाति
     संसारवर्जितमिदं सततं विभाति ।
संहारवर्जितमिदं सततं विभाति
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ३२ ॥
हे तत्त्व जन्मरहित, संसारबंध वर्जित भासते. प्रलय रहित असाही अनुभव येतो. सारांश, ज्ञानामृतरूप समरस परमतत्व ते मी आहे. (३२)

उल्लेखमात्रमपि ते न च नामरूपं
     निर्भिन्नभिन्नमपि ते न हि वस्तु किञ्चित् ।
निर्लज्जमानस करोषि कथं विषादं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ३३ ॥
केवळ निर्देश करण्यापुरतेसुद्धा नामरूप नाही, निर्भिन्न व भिन्न अशी काही तुझी वस्तु नाही असे असता हे निर्लज्ज मना, खेद कशाला ? मी ज्ञानामृतस्वरूप समरस परमतत्व ते आहे. (३३)

किं नाम रोदिषि सखे न जरा न मृत्युः
     किं नाम रोदिषि सखे न च जन्म दुःखम् ।
किं नाम रोदिषि सखे न च ते विकारो
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ३४ ॥
मित्रा ! तुला जरा, मृत्यु, जन्म दुःखही नाही कोणताही विकार नाही मग का बरे रडतोस. मी ज्ञानामृतस्वरूप समरस परमतत्व ते आहे. (३४)

किं नाम रोदिषि सखे न च ते स्वरूपं
     किं नाम रोदिषि सखे न च ते विरूपम् ।
किं नाम रोदिषि सखे न च ते वयांसि
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ३५ ॥
मित्रा ! स्वरूप, विरूप व वयही तुझी नव्हेत तर मग का रडतोस ? मी... आहे. (३५)

किं नाम रोदिषि सखे न च ते वयांसि
     किं नाम रोदिषि सखे न च ते मनांसि ।
किं नाम रोदिषि सखे न तवेन्द्रियाणि
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ३६ ॥
मित्रा, आयुष्य, मन, इंद्रिये तुझी नव्हेत असे असता तू का रडतोस ? कारण मी ज्ञानामृत... आहे. (३६)

किं नाम रोदिषि सखे न च तेऽस्ति कामः
     किं नाम रोदिषि सखे न च ते प्रलोभः ।
किं नाम रोदिषि सखे न च ते विमोहो
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ३७ ॥
मित्रा, काम, लोभ व मोह तुझे नव्हे, असे असून व्यर्थ शोक कां ? कारण मी.... आहे. (३७)

ऐश्वर्यमिच्छसि कथं न च ते धनानि
     ऐश्वर्यमिच्छसि कथं न च ते हि पत्नी ।
ऐश्वर्यमिच्छसि कथं न च ते ममेति
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ३८ ॥
बाबारे ! हे धन तुझे नव्हे, पत्नी तुझी नव्हे माझे म्हणण्यासारखे असे काही नसताना ऐश्वर्याची कशी इच्छा करितोस मी... आहे. (३८)

लिङ्‌गप्रपञ्चजनुषी न च ते न मे च
     निर्लज्जमानसमिदं च विभाति भिन्नम् ।
निर्भेदभेदरहितं न च ते न मे च
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ३९ ॥
लिंगदेह, प्रपंच, जन्म, हे तुझे नव्हेत आणि माझेही नव्हेत. पण हे निर्लज्ज मन हे सर्व भिन्न भिन्न असल्यासारखे भासवते. निर्भेद व भेद यांनी रहित असे तुझे काही नाही व माझेही काही नाही कारण मी... आहे. (३९)

नो वाणुमात्रमपि ते हि विरागरूपं
     नो वाणुमात्रमपि ते हि सरागरूपम् ।
नो वाणुमात्रमपि ते हि सकामरूपं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ४० ॥
तुझे एक अणुमात्रही विरक्त रूप नाही त्याचप्रमाणे एक अणुमात्रही तुझे अनुराग (आसक्तियुक्त) रूप नाही. तसेच एक अणुमात्रही तुझे सकाम रूप नाही. तर मी... आहे. (४०)

ध्याता न ते हि हृदये न च ते समाधि-
     र्ध्यानं न ते हि हृदये न बहिः प्रदेशः ।
ध्येयं न चेति हृदये न हि वस्तु कालो
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ४१ ॥
हृदयामधील ध्याता तुझा नव्हे व समाधि तुझी नव्हे, हृदयातील ध्यानही तुझे नव्हे व अंतःकरणाच्या बाहेरचा प्रदेशही तुझा नव्हे. हृदयातील ध्येय तुझे नव्हे व वस्तु काल हीही तुझी नव्हेत... मी आहे. (४१)

यत्सारभूतमखिलं कथितं मया ते
     न त्वं न मे न महतो न गुरुर्न न शिष्यः ।
स्वच्छन्दरूपसहजं परमार्थतत्त्वं
     ज्ञानामृतं समरसं गगनोपमोऽहम् ॥ ४२ ॥
जे अध्यात्म विद्येतील अति श्रेष्ठ सार तुला मी सांगितले ते तू नव्हेस. मी, दुसरा कोणीही मोठा, गुरू शिष्य नव्हे हे होय. तर स्वतंत्ररूप सहज आकाशासारखे ज्ञानामृत सर्वत्र सारखे, असे जे परमार्थ तत्त्व तेच मी आहे. (४२)

कथमिह परमार्थं तत्त्वमानन्दरूपं
     कथमिह परमार्थं नैवमानन्दरूपम् ।
कथमिह परमार्थं ज्ञानविज्ञानरूपं
     यदि परमहमेकं वर्तते व्योमरूपम् ॥ ४३ ॥
जर श्रेष्ठ एक व आकाशासारख्या अशा तत्त्वरूपाने मी रहातो, तर हे परमार्थ तत्त्व आनंदरूप नव्हे तरी कसे ? त्याचप्रमाणे हे परमार्थ तत्त्व ज्ञान विज्ञानरूप कसे ? (४३)

दहनपवनहीनं विद्धि विज्ञानमेक-
     मवनिजलविहीनं विद्धि विज्ञानरूपम् ।
समगमनविहीनं विद्धि विज्ञानमेकं
     गगनमिव विशालं विद्धि विज्ञानमेकम् ॥ ४४ ॥
ते तत्त्व अग्नि व वायु यांनी रहित व विज्ञान रूप आणि एक आहे असे जाण. तसेच ते पृथ्वी व जल यांनी रहित विज्ञानरूप आहे असे जाण. तसेच निरभ्र, गगन रहित विज्ञानरूप व एक आहे असे जाणे. पण आकाशासारखे विशाल विज्ञान रूप व एक आहे असे जाण. (४४)

न शून्यरूपं न विशून्यरूपं
     न शुद्धरूपं न विशुद्धरूपम् ।
रूपं विरूपं न भवामि किञ्चित्
     स्वरूपरूपं परमार्थतत्त्वम् ॥ ४५ ॥
ते तत्त्व अभाव रूप नव्हे व भाव रूपही नव्हे. शुद्धरूप नव्हे व अशुद्धरूप नव्हे. मी रूप व विरूप असा दोन्ही होत नाही तर हे परमार्थ तत्त्व स्वरूपानेच रूपवान असते. (४५)

मुञ्च मुञ्च हि संसारं त्यागं मुञ्च हि सर्वथा ।
त्यागात्यागविषं शुद्धममृतं सहजं ध्रुवम् ॥ ४६ ॥
संसाराला सोड, तसेच अभिमानाने यज्ञादिक कर्मे करणेही सर्वथैव सोड. सर्वसंग परित्याग केला असता कर्मोपभोगरूप विष हे शुद्ध सहज व नित्य अमृत होते. (४६)

इति अवधूतगीतायां तृतीयोऽध्यायः ॥३॥
ह्या प्रमाणे श्रीदत्तात्रेयकृत अवधूत गीतेतील आत्मासक्ती उपदेश नावाचा तिसरा अध्याय संपूर्ण झाला.





GO TOP