आपले वेद - सामवेद प्रस्तावना

चार वेदांमध्ये साम हा तिस‍र्‍या क्रमांकाचा वेद आहे. भगवद्‌गीतेमध्ये श्रीकृष्णाने त्याच्या विशेष विभूतिंचे वर्णन करतांना ’वेदानां सामवेदोऽस्मि’ म्हणून सामवेदाचा गौरव केला आहे. साम म्हणजे गायचा मंत्र व गान असे दोन्हीही असल्यामुळे सामवेदाचे दोन मुख्य भाग आहेत. मुख्य भागाला आर्चिक म्हणतात व दुसर्‍या भागाला ’गान’ म्हणतात. आर्चिक म्हणजे ऋचांनी बनलेली गानयोग्य मंत्रांची संहिता. याचे भाग दोन - पूर्वार्चिक व उत्तरार्चिक. दोन्ही भागात मिळून एकूण मंत्रसंख्या १८७५ आहे. ऋग्वेदात जसे मंडल, सूक्त, मंत्र अशी रचना आहे तसे पूर्वार्चिकात ६ अध्याय आहेत आणि त्यात सहा प्रपाठक (याला काण्ड असेही म्हणतात) आहेत, अर्ध, दशति आणि मंत्र अशी रचना आहे. काही प्रपाठकांत केवळ ’प्रथमार्ध’च आढळतो. वेगवेगळ्या ऋषींनी एका देवतेला उद्देशून व एकाच छंदात रचलेल्या साधारणपणे १०-१० मंत्रांच्या समूहाला ’दशति’ म्हटले आहे. साधारणपणे म्हणण्याचे कारण काही दशतिंमध्ये कमी जास्त मंत्रांची संख्या दिसते. पूर्वार्चिकातील पहिल्या प्रपाठकात अग्निदेवतेवर मंत्र असल्यामुळे त्यास अग्निकाण्ड म्हटले आहे. प्रपाठक २ ते ४ ही इंद्रदेवतेवर असल्यामुळे त्यास ऐन्द्रकाण्ड म्हटले आहे. पाचव्या प्रपाठकात सोमदेवतेला उद्देशून मंत्र आलेले असल्यामुळे त्याला पावमान काण्ड म्हटले आहे. सहाव्या प्रपाठकात विविध ऋषि, छंद व देवता असल्यामुळे त्यास आरण्यक काण्ड म्हटले आहे. त्यानंतर ’महानाम्यार्चिक’ म्हणून दहा ऋचांचे एक परिशिष्ट जोडले आहे. पूर्वार्चिकामध्ये एकून ६५० मंत्र आहेत.

महाप्रलयकाळी ’वेद’ अव्यक्त अवस्थेत असतो. सर्गाच्या, उत्पत्तीच्या आरंभी परमेश्वर सर्वप्रथम ब्रह्मदेवाला उत्पन्न करतो आणि त्याला वेद देतो. या वेदांच्या साहाय्याने ब्रह्मदेव सृष्टीची (सृष्टींची) उत्पत्ती करतो. अशा प्रकारचे वर्णन पुरातन ग्रंथांतून पाहायला मिळते (श्वेतावतार उप., वंशब्राह्मण, पुराणे, भगवद् गीता इ.). आणखी काही ठिकाणी वेगवेगळे उल्लेख सापडतात - अजपृश्नि नामक ऋषि आपल्या तपोबळाने वेदांना प्रसाद रूपाने प्राप्त करता झाला. अशाच रीतीने अंगिरा नामक ऋषिसही वेद प्राप्त झाला. कुठे म्हटले आहे, भगवंताने मत्स्य अवतारी वेदांचे प्रतिअध्यायन केले. सांख्य व योग दर्शनकारांच्या मते वेद-कर्त्त्याचा पत्ताच लागत नाही म्हणून ते अपौरुषेय आहेत. तसेच वैशेषिक दर्शनकार व वैय्याकरण मतवादी अर्थरूप व ज्ञानरूप वेदांना अपौरुषेय मानतात. मीमांसा शास्त्रानुसार वर्णमालेची कधी उत्पत्ती होत नसते. ते कण्ठ, तालु इ. अभिव्यंजक उपकरणांनी अभिव्यक्त होतात. मूलतः वर्ण (अर्थात् वाक्) नित्यच आहे. जैमिनी मीमांसकार तर शब्दासहित शब्दार्थही नित्य आहेत असेच म्हणतात.

गानदृष्ट्या पूर्वार्चिकातील प्रत्येक ऋचेवर निरनिराळ्या ऋषींनी रचलेल्या गानांची स्वरांकनासह (notation सह) एकत्रित मांडणी गानग्रंथांमध्ये केलेली आहे. पहिल्या पाच प्रपाठकांतील मंत्रांवरील गाने ’ग्रामेगेय’ या ग्रंथात आहेत तर आरण्यक प्रपाठकांतील मंत्रांवरील गाने ’अरण्ये गान’ ग्रंथात आहेत.

उत्तरार्चिकात २१ अध्याय ९ प्रपाठकात विभागलेले आहेत. यात एकूण १२२५ मंत्र आहेत. उत्तरार्चिकातील मंत्र यज्ञांना अनुसरून एकत्र केलेले आहेत. सोमयागातील स्तोत्रे साधारणतः तीन ऋचांवर गायली जातात. त्यामुळे उत्तरार्चिकात बहुशः तृच म्हणजे ३-३ ऋचांची मांडणी केलेली असते. ही स्तोत्रे पूर्वार्चिकातील एकर्च गानांनुसार गायिली जातात. म्हणजेच गानमंत्र किंवा चीज उत्तरार्तिकातील तर गानपद्धति, model किंवा राग पूर्वार्चिकातील, अशाप्रकारे स्तोत्रगायन केले जाते. उत्तरार्चिकातील तृचांपैकी पहिली ऋचा पूर्वार्चिकात येते. अशा २८७ ऋचा उत्तरार्चिकात पुन्हा येतात. त्यामुळे चोन्ही आर्चिक संहिता मिळून एकूण मंत्रसंख्या जरी १८७५ असली तरी पुनरावृत्त २८७ ऋचा वगळून एकूण १५०४ च होतात. त्यापैकी ९९ ऋचा सध्या उपलब्ध असलेल्या ऋग्वेद संहितेत आढळत नाहीत.

( to be continued... )

GO TOP