॥ पञ्चदशी ॥
नवमः परिच्छेदः - ध्यानदीपः

संवादिभ्रमवद्ब्रह्मतत्त्वोपास्त्यापि मुच्यते ।
उत्तरे तापनियेऽतः श्रुतोपास्तिरनेकधा ॥ १ ॥
गुरु - एथपर्यत मागील सर्व प्रकरणांत ज्ञान म्हणने काय, तें महावाक्यापासून कसें प्राप्त होतें व त्यापासून मुक्तीची सिद्धि कशी होते, याजविषयीं बरेंच प्रतिपादन केले. आतां या प्रकरणी मुमुक्षूस बुद्धिमांद्यादि प्रतिबंधामुळें ज्ञान न झाल्यास त्यानें तें होण्याविषयी कोणचें साधन करावे, हे आम्ही सांगणार. ते साधन खालीं लिहिलेल्या गुरूशिष्यांच्या संवादावरून लक्षांत येईल.

मणिप्रदीपप्रभयोर्मणिबुद्ध्याभिधावतोः ।
मिथ्याज्ञानाविशेषेऽपि विशेषोऽर्थक्रियां प्रति ॥ २ ॥
शिष्य - ते कृपा करून सांगाल तर मी फार आभारी होईन. गु० -म्हणतात. ज्याप्रमाणें संवादि भ्रमानेच प्रवृत्त झालेल्या पुरुषास इष्टार्थलाभ होतो, त्याप्रमाणें तत्त्वाची उपासना केली असतां जीवास ज्ञान होऊन मोक्षप्राप्ति होते. शि० -असें कोठे सांगितलें आहे. ॥ १ ॥

दीपोपवरकस्यान्तर्वर्तते तत्प्रभा बहिः ।
दृश्यते द्वार्यथान्यत्र तद्वद्दृष्टा मणेः प्रभा ॥ ३ ॥
गुरु -उत्तर तापनीय उपनिषदामध्यें उपासना अनेक प्रकारच्या सांगितल्या आहेत. शि० -संवादिभ्रम म्हणजे काय ? हें मला कृपा करून सांगा. गु० -त्याचें लक्षण आचार्यांचे वार्तिकांत चांगले सांगितलें आहे तेंच मी तुला सांगतो कल्पना कर कीं, 'एक दीपाची प्रभा आणि एक मण्याची प्रभा अशा दोन प्रभा दूर पडलेल्या पाहून दोन पुरुष ते मणीच आहेत असें समजून घ्यावयास गेले. एथे दोघांचेही मिथ्याज्ञान सारखेच आहे. तथापि मणी असें समजून मण्याकडे धावणाऱ्या पुरुषास मात्र मणी मिळतो. व दुसऱ्यास मिळत नाहीं. म्हणून दोघांच्या फलप्राप्तीमध्यें अंतर पडते. ॥ २ ॥

दूरे प्रभाद्वयं दृष्ट्वा मणिबुद्ध्याभिधावतोः ।
प्रभायां मणिबुद्धिस्तु मिथ्याज्ञानं द्वयोरपि ॥ ४ ॥
शि० - हे आम्हाला स्पष्ट करून सांगा. गु० -एका मंदिराच्या एका खिडकीत दिवा असून त्याची प्रभा बाहेर पडली आहे. तसेंच दुसऱ्या खिडकीत मणी असून त्याचीही प्रभा बाहेर पडली आहे. ॥ ३ ॥

न लभ्यते मणिर्दीपप्रभां प्रत्यभिधावता ।
प्रभायां धावतावश्यं लभ्यतैव मणिर्मणेः ॥ ५ ॥
ह्या दोन्हीही प्रभा दुरून दोघां पुरुषांनी पाहिल्या आणि ते दोन्ही मणीच आहेत असें समजून दोघे दोहोंकडे धावले तर एथे दोघांसही झालेली जी मण्याची कल्पना ती मिथ्याज्ञानच आहे परंतु दीपप्रभेकडे धावणाऱ्या पुरुषास मणी मिळत नाहीं. आणि मणीप्रभेकडे धावणाराला तो मिळतो एवढेच काय तें अंतर ॥ ४-५ ॥

दीपप्रभामणिभ्रान्तिर्विसंवादिभ्रमः स्मृतः ।
मणिप्रभामणिभ्रान्तिः संवादिभ्रम उच्यते ॥ ६ ॥
एथें दीपप्रभेवर जी मण्याची कल्पना झाली त्यास विसंवादि भ्रम म्हणतात. आणि मणिप्रभेवर जी मण्याची कल्पना ती संवादिभ्रम होय. ॥ ६ ॥

बाष्पं धूमतया बुध्वा तत्राङ्गारानुमानतः ।
वह्निर्यदृच्छया लब्धः स संवादिभ्रमो मतः ॥ ७ ॥
हें प्रत्यक्ष ज्ञानाचे उदाहरण झालें. आतां अनुमान आणि आगम ह्या दोन्ही प्रमाणांविषयींचीं उदाहरणे ऐक. दूर वाफ उठलेली पाहून तो धूर असें समजून तेथें अग्नि. शोधायाला गेलेल्या मनुष्यास दैववशात् अग्नि मिळाला तर तो संवादभ्रमच ॥ ७ ॥

गोदावर्युदकं गङ्गोदकं मत्वा विशुद्धये ।
सम्प्रोक्ष्य शुद्धिमाप्नोति स संवादिभ्रमो मतः ॥ ८ ॥
तसेंच गोदावरीचे पाणी गंगोदक असें समजून आपली शुद्धि व्हावी असें समजून त्याच्या संप्रोक्षणानें शद्धि पावतो. ॥ ८ ॥

ज्वरेणाप्तः सन्निपातं भ्रान्त्या नारायणं स्मरन् ।
मृतः स्वर्गमवाप्नोति स संवादिभ्रमो मतः ॥ ९ ॥
आणि संनिपात ज्वर झालेला मनुष्य भ्रांतीने नारायणाचें स्मरण करून मरण पावला असतां स्वर्गास जातो. हाही संवादिभ्रमच आहे. ॥ ९ ॥

प्रत्यक्षस्यानुमानस्य तथा शास्त्रस्य गोचरे ।
उक्तन्यायेन संवादिभ्रमाः सन्तीह कोटिशः ॥ १० ॥
याप्रमाणे प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम विषयीं संवादि भ्रमाची उदाहरणे कोट्यवधी आहेत. ॥ १० ॥



अन्यथा मृत्तिकादारुशिलाः स्युर्देवताः कथम् ।
अग्नित्वादिधियोपास्याः कथं वा योषिदादयः ॥ ११ ॥
हा संवादिभ्रम सर्व उपासनांस लागू आहे. येरव्हीं मृत्तिका काष्ठ पाषाण या देवता कशा होतील व स्त्रियादिकांची अग्नित्व बुद्धीनें उपासना कशी घडेल ? ॥ ११ ॥

अयथावस्तुविज्ञानात्फलं लभ्यत ईप्सितम् ।
काकतालीयतः सोऽयं संवादिभ्रम उच्यते ॥ १२ ॥
या संवादिभ्रमाचे थोडक्यांत लक्षण सांगतो. विपरीत ज्ञानापासून काकतालीय न्यायाने जी ईप्सित फलप्राप्ति होते त्यास संवादिभ्रम असें म्हणतात. ॥ १२ ॥

स्वयं भ्रमोऽपि संवादी यथा सम्यक्फलप्रदः ।
ब्रह्मतत्त्वोपासनापि तथा मुक्तिफलप्रदा ॥ १३ ॥
शि० -हें संवादिभ्रमाचें लक्षण मला समजले. पण हें मोक्षप्राप्तीस कसें साधन होतें ? गुरु० हा जो वर संवादि भ्रम सांगितला तो जरी स्वतः भ्रम आहे तरी त्यापासून इष्टफलसिद्धि होते. याप्रमाणे ब्रह्मतत्त्वाची उपासनाही मोक्षरूप फल देते. ॥ १३ ॥

वेदान्तेभ्यो ब्रह्मतत्त्वमखण्डैकरसात्मकम् ।
परोक्षमवगम्यैतदहमस्मीत्युपासते ॥ १४ ॥
शि० -आपण म्हणतां कीं ब्रह्मतत्त्वाची उपासना करावी. ती काय ब्रह्म जाणून करावी कीं न जाणून करावी ? जाणून जर म्हणाल तर ज्ञान झाल्यावर उपासनेची गरज नाहीं, न जाणून जर म्हणाल. तर उपासना कशी होईल ? गु० -ब्रह्माचे जरी प्रत्यक्ष ज्ञान नाहीं तरी गुरुमुखापासून ब्रह्म अखंडैकरसात्मक आहे व तें तूं आहेस असा उपदेश श्रवण करून उत्पन्न होणाऱ्या परोक्ष ज्ञानानें ब्रह्माहमस्मि अशी उपासना करतां येते. ॥ १४ ॥

प्रत्यग्व्यक्तिमनुल्लिख्य शास्त्राद्विष्ण्वादिमूर्तिवत् ।
अस्ति ब्रह्मेति सामान्यज्ञानमत्रं परोक्षधीः ॥ १५ ॥
शि० -ज्या ब्रह्मतत्त्वाची उपासना करावयाची तद्विषयक जें परोक्ष ज्ञान त्याचें स्वरूप मला सांगा. गु० -विष्णू आदिमूर्तीचे प्रतिपादन ज्या शास्त्रांत केलें आहे, त्यापासून उत्पन्न झालेल्या ज्ञानाप्रमाणे या उपासनेंतही प्रत्यग्‌व्यक्तीचा जरी उल्लेख नाहीं तरी केवळ ब्रह्म आहे. असें जें सामान्य ज्ञान. तेंच येथें परोक्षज्ञान समजावे. ॥ १५ ॥

चतुर्भुजाद्यवगतावपि मूर्तिमनुल्लिखन् ।
अक्षैः परोक्षज्ञान्येव न तदा विष्णुमीक्षते ॥ १६ ॥
शि० -तुम्ही जो विष्णुमूर्तीचा दृष्टांत दिलात तें परोक्ष ज्ञान कसें होतें ? गु० -शास्त्रावरून विष्णूच्या मूर्तीचे चतुर्भुजत्वादिरूप प्रत्यक्ष नेत्रांस दिसत नाहीं, तेव्हां तें परोक्ष ज्ञानच म्हटलें पाहिजे. ॥ १६ ॥

परोक्षत्वापराधेन भवेन्नातत्त्ववेदनम् ।
प्रमाणेनैव शास्त्रेण सत्यमूर्तेर्विभासनात् ॥ १७ ॥
शि० -तर मग ते विष्णुमूर्तीचे ज्ञान भ्रांति कशावरून नव्हे ? कारण, तें प्रत्यक्ष झालें नाहीं. गु० - केवळ तें परोक्ष आहे एवढ्याच दोषामुळे तें भ्रांतिज्ञान होत नाहीं. भ्रांतिज्ञानास विषयाची असत्यता पाहिजे. पण येथें तर ज्यावर आम्ही पूर्ण विश्वास ठेवतो अशा शास्त्रानें ती मूर्ति प्रत्यक्ष पाहून आम्हांस तसें वर्णन दिलें तेव्हां ती भ्रांति म्हणतां येत नाहीं. ॥ १७॥

सच्चिदानन्दरूपस्य शास्त्राद्‌भानेऽप्यनुल्लिखन् ।
प्रत्यंचं साक्षिणं तत्तु ब्रह्म साक्षान्न वीक्षते ॥ १८ ॥
एथेंही शास्त्रावरून सचिदानंदरूप ब्रह्माचें भान होऊनही प्रत्यक् साक्षींचे प्रत्यक्ष ज्ञान नसल्यामुळें तें ब्रह्म प्रत्यक्ष होत नाहीं. ॥ १८ ॥

शास्त्रोक्तेनैव मार्गेण सच्चिदानन्दनिर्णयात् ।
परोक्षमपि तज्ज्ञानं तत्त्वज्ञानं न तु भ्रमः ॥ १९ ॥
परंतु शास्त्राच्या सांगण्यावरून सच्चिदानंदरूपाचा निश्चय झाल्यामुळें तें परोक्ष ज्ञान तत्त्वज्ञानच समजले पाहिजे. तो भ्रम नव्हे. ॥ १९ ॥

ब्रह्म यद्यपि शास्त्रेषु प्रत्यक्त्वेनैव वर्णितम् ।
महावाक्यैस्तथाप्येतद्दुर्बोधमविचारिणः ॥ २० ॥
शि० - "सत्यं ज्ञानमनत ब्रह्म" इत्यादि वाक्यांपासून झालेल्र् ज्ञान असें परोक्ष होतें तसें महावाक्यापासून अपरोक्षही होतें. मग तुमची उपासना कशाला पाहिजे ? ॥ २० ॥



देहाद्यात्मत्वविभ्रान्तौ जागृत्यां न हठात्पुमान् ।
ब्रह्मात्मत्वेन विज्ञातुं क्षमते मन्दधीत्वतः ॥ २१ ॥
गुरु - जरी शास्त्राचे ठायीं महावाक्यांनीं ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्याजोगें वर्णन केलें आहे, तरी त्याचा अर्थ मूढास समजत नाहीं. कारण कीं, देहादिकाला मी म्हणणें अशी जी भ्रांति ती सतत असल्यामुळें पुरुषास मी ब्रह्म आहें असें ज्ञान मंदबुद्धीमुळें होत नाहीं. ॥ २१ ॥

ब्रह्ममात्रं सुविज्ञेयं श्रद्धालोः शास्त्रदर्शिनः ।
अपरोक्षद्वैतबुद्धिः परोक्षद्वैतबुद्ध्यनुत् ॥ २२ ॥
शि० -बुद्धिमांद्यामुळें ज्याला अपरोक्ष ज्ञान होत नाहीं त्याला परोक्ष ज्ञान तरी कसें होईल ? गु० - शास्त्रावर जर मनुष्याची श्रद्धा असेल तर तेवढ्याने त्यास ब्रह्माचे परोक्ष ज्ञान होतें. कारण, प्रत्यक्ष देहादिकांचा भ्रम जसा अपरोक्ष ज्ञानाच्या आड येतो तसा परोक्ष ज्ञानाच्या आड येत नाहीं. ॥ २२॥

अपरोक्षशिलाबुद्धिर्न परोक्षेशतां नुदेत् ।
प्रतिमादिषु विष्णुत्वे को वा विप्रतिपद्यते ॥ २३ ॥
प्रतिमेचे ठायीं प्रत्यक्ष जी शिला बुद्धि ती परोक्ष ईश बुद्धीस आड येत नाहीं. विष्णुचे प्रतिमेंत विष्युत्वाविषयीं संशय नाहीं. ॥ २३ ॥

अश्रद्धालोरविश्वासोः नोदाहरणमर्हति ।
श्रद्धालोरेव सर्वत्र वैदिकेष्वधिकारतः ॥ २४ ॥
शिष्य - कित्येकांना त्याविषयी शंका येते. गुरु- ज्याना श्रद्धा नाहीं त्यांना संशय येत असेल, परंतु तो -आम्ही जमेत धरीत नाहीं. कारण, सर्व वैदिक विषयामध्यें श्रद्धाळू पुरुषच अधिकारी आहेत.॥ २४॥

सकृदाप्तोपदेशेन परोक्षज्ञानमुद्‌भवेत् ।
विष्णुमूर्त्युपदेशो हि न मीमांसामपेक्षते ॥ २५ ॥
आप्ताच्या सकृदुपदेज्ञाने जर परोक्षज्ञान होते तर विष्णूमूर्तीच्या शास्त्रोक्त उपदेशाशापासून परोक्ष ज्ञान कां न व्हावें. याविषयी फारसा विचार नलगे. ॥ २५ ॥

कर्मोपास्ती विचार्येतेऽनुष्ठेयाविनिर्णयात् ।
बहुशाखाविप्रकीर्णं निर्णेतुं कः प्रभुर्नरः ॥ २६ ॥
शि० -मग शास्त्रानें तरी त्याचा विचार कां केला ? गु० -ज्या कर्माचे किंवा उपासनेचे अनुष्ठान करावयाचें तें वेदाच्या अनेक शाखांमध्यें निरनिराळ्या रीतीनें सांगितलें आहे. त्याची एकवाक्यता शास्त्रविचारावाचून मनुष्यास होणें कठिण आहे. म्हणून तो विचार अवश्य आहे. याकरिता तसा शास्त्रानें विचार केला. ॥ २६ ॥

निर्णितोऽर्थः कल्पसूत्रैर्ग्रथितस्तावतास्तिकः ।
विचारमन्तरेणापि शक्तोऽनुष्ठातुमञ्जसा ॥ २७ ॥
एरव्ही जो श्रद्धाळू पुरुष आहे त्याला विचाराची गरज नाही. कारण, जैमिन्यादिक आचार्यांनी कल्पसूत्रांही करून ज्या उपासनेचा निर्णय केला आहे तेवढा त्याच्या अनुष्ठानास बस आहे. ॥ २७ ॥

उपास्तीनामनुष्ठानमार्षग्रन्थेषु वर्णितम् ।
विचाराक्षममर्त्याश्च तत्श्रुत्वोपासते गुरोः ॥ २८ ॥
शि० - उपासना करणारास विचारावाचून तिचा प्रकार समजण्यास मार्ग कोणता ? गु० -उपासनेचे अनष्ठान वसिष्ठादि ऋषिप्रणीत ग्रंथामध्यें चांगले सांगितलें आहे. तो प्रकार गुरुमुखापासून ऐकून घेऊन मंद बुद्धीच्या लोकांनी उपासना करावी. ॥ २८ ॥

वेदवाक्यानि निर्णेतुमिच्छन्मीमांसतां जनः ।
आप्तोपदेशमन्त्रेण ह्यनुष्ठानं तु सम्भवेत् ॥ २९ ॥
शि० -तर हलींचेही ग्रंथकार उपासनेचा विचार कां करतात ? गु० -ते केवळ आपल्या संतोषाकरतां करितात. वेदवाक्यांचा निर्णय करावा असें ज्याच्या मनांत आहे त्यानें हवी तर त्यांची मीमांसा करावी. पण अनुष्ठान जर म्हणशील तर तें केवळ गुरूच्या उपदेशमात्रानेच होतें. ॥ २९ ॥

ब्रह्मसाक्षात्कृतिस्त्वेवं विचारेण विना नृणाम् ।
आप्तोपदेशमात्रेण न सम्भवति कुत्रचित् ॥ ३० ॥
पण ब्रह्मसाक्षात्काराची गोष्ट तशी नाहीं. तो होण्यास विचार मनुष्यांनी केलाच पाहिजे. केवळ गुरूच्या उपदेशमात्रेकरूनच तो होईल असें कधीं कोणी समजू नये. ॥ ३० ॥



परोक्षज्ञानमश्रद्धा प्रतिबध्नाति नेतरत् ।
अविचारोऽपरोक्षस्य ज्ञानस्य प्रतिबन्धकः ॥ ३१ ॥
याचे कारण असें आहे कीं, परोक्ष ज्ञानाला प्रतिबंध काय तो अश्रद्धेचा अविचार हा त्याच्या आड मुळींच येत नाहीं. पण अपरोक्ष-ज्ञानाला प्रतिबंध करणारा अविचारच आहे. ॥ ३१ ॥

विचाराप्यपरोक्षेण ब्रह्मात्मानं न वेत्ति चेत् ।
आपरोक्ष्यावसानत्वाद्‌भूयोभूयो विचारयेत् ॥ ३२ ॥
शि० -विचार करूनही अपरोक्ष ज्ञान झालें नाहीं तर कसे करावे. गु० - तसें ज्ञान होईपर्यंत पुनः पुनः विचारच करावा. दुसरा मार्ग नाही'. ॥ ३२ ॥

विचारयन्नामरणं नैवात्मानं लभेत चेत् ।
जन्मान्तरे लभेतैव प्रतिबन्धक्षये सति ॥ ३३ ॥
शि० -पुनः पुनः मरेपर्यंतही विचार करून साक्षात्कार झाला नाहीं तर कसें करावे ? गु० -कांहीं प्रतिबंध असतात ते ह्या जन्मी नष्ट न झाले तर पुढील जन्मी त्यांचा नाश होऊन आत्मप्राप्ति होईल. ॥ ३३ ॥

इह वामुत्र वा विद्येत्येवं सूत्रकृतोदितम् ।
शृण्वन्तोऽप्यत्र बहवो यन्न विद्युरिति श्रुतिः ॥ ३४ ॥
शि० -असें कोठे सांगितलं आहे ? गु० - "इहवाऽमुत्रवाविद्या" असें व्यासाचे सूत्र आहे; तसेंच " शृण्वंतोप्यत्रबहवो यन्न विद्युः " असें श्रुतिप्रमाणही आहे. ॥ ३४ ॥

गर्भ एव शयानः सन्वामदेवोऽवबुद्धवान् ।
पूर्वाभ्यस्तविचारेण यद्वदध्ययनादिषु ॥ ३५ ॥
शि० -असा साक्षात्कार कोणाला झाला ? श्रुतीमध्यें वामदेवाची कथा तूं ऐकलीच असेल. त्याला पूर्वाभ्यासामुळे गर्भांतच असतांना साक्षात्कार झाला, कीं जसे आज पाठ केलेले उद्या आठवते. ॥ ३५ ॥

बहुवारमधीतेऽपि तदा नायाति चेत्पुनः ।
दिनान्तरेऽनधीत्यैव पूर्वाधीतं स्मरेत्पुमान् ॥ ३६ ॥
पुष्कळदा एकच लोक पाठ करूनही जर त्याच दिवशीं तो न आला तरी दुसरे दिवशीं तो आपोआप आठवतो. ॥ ३६ ॥

कालेन परिपच्यन्ते कृषिदर्भादयो यथा ।
तद्वदात्मविचारोऽपि शनैः कालेन पच्यते ॥ ३७ ॥
ज्याप्रमाणें कृषि, गर्भ इत्यादिक पक्व होण्यास काळ लागतो त्याप्रमाणें आत्मविचारही हळू हळूच पक्व होतो. ॥ ३७ ॥

पुनः पुनर्विचारोऽपि त्रिविधप्रतिबन्धतः ।
न वेत्ति तत्त्वमित्येतद्वार्तिके सम्यगीरितम् ॥ ३८ ॥
शि० -पुन; पुनः विचार करूनही ज्ञान होत नाहीं असें कोठे सांगितलें आहे. गु० -तत्त्वज्ञानास अडथळा करणारे तीन प्रकारचे प्रतिबंध आचार्यांनी आपल्या वार्तिकांत चांगल्या रीतीनें सांगितले आहेत. ॥ ३८ ॥

कुतस्तज्ज्ञानमिति चेत्तद्धि बन्ध परिक्षयात् ।
असावपि च भूतो वा भावी वा वर्तते ताथा ॥ ३९ ॥
तेथें ज्ञानाची प्राप्ति कज्ञाने होतें अशा शिष्यप्रश्नावर गुरूंनी उत्तर दिलें आहे कीं, बाबारे ज्ञान होण्यास तीन प्रतिबंध आहेत. एक भावी, दुसरा भूत, तिसरा वर्तमान ॥ ३९ ॥

अधीतवेदवेदार्थोऽप्यत एव न मुच्यते ।
हिरण्यनिधिदृष्टान्तादिदमेव हि दर्शितम् ॥ ४० ॥
मनुष्य वेद पढला तरी मुक्त होत नाहीं. जशाचा तसा कोरडा राहतो. ज्याप्रमाणें धन पुरलेली जागा न समजल्यामुळें त्याला तो ठेवा सांपडत नाहीं. ॥ ४० ॥



अतीतेनापि महिषीस्नेहेन प्रतिबन्धतः ।
भिक्षुस्तत्त्वं न वेदेति गाथा लोके प्रगीयते ॥ ४१ ॥
भूत प्रतिबंधाचें उदाहरण तेथें असें दिलें आहे कीं, कोणी एक मनुष्याची आपल्या म्हशीवर फार प्रीति होती. पुढे त्यानें संन्यास घेतला. वेदांत श्रवणाचे वेळीं ती म्हैस वरचेवर त्याचे डोळ्यांपुढें उभी राहत असे. त्यामुळे तत्त्वविचारास अडथळा येऊन त्याची समजूत चांगली पडेना. ॥ ४१ ॥

अनिसृत्य गुरुः स्नेहं महिष्यां तत्त्वमुक्तवान् ।
ततो यथावद्वेदैष प्रतिबन्धस्य संक्षयात् ॥ ४२ ॥
म्हणून गुरूनी त्याच्या त्या म्हशीवरील प्रीतीलाच अनुसरून त्या म्हशीमध्ये व्यापून असणारेच तूं ब्रह्म आहेस असा उपदेश केल्याने त्यास तो उपदेश चांगला ठसला. ही गोष्ट लोकांत प्रसिद्ध आहे. ॥ ४२ ॥

प्रतिबन्धो वर्तमानो विषयासक्तिलक्षणः ।
प्रज्ञामान्द्यं कुतर्कश्च विपर्ययदुराग्रहः ॥ ४३ ॥
आतां वर्तमान प्रतिबंध विषयासक्ति, बुद्धिमांद्य, श्रुतिविरुद्ध कुतर्क आणि विपरीत भावनेविषयी दुराग्रह ही वर्तमान प्रतिबंधाची उदाहरणे समजावी. ॥ ४३ ॥

शमाद्यैः श्रवणाद्यैश्च तत्र तत्रोचितैः क्षयम् ।
नीतेऽस्मिन्प्रतिबन्धेऽतः स्वस्य ब्रह्मत्वमश्नुते ॥ ४४ ॥
शि० -ह्या वर्तमान प्रतिबंधाचे. निवारणास उपाय कोणते ? गु० -त्यास उपाय दुसरे नाहींत. शमदमादिक साधनांचा अभ्यास आणि श्रवण, मनन, निदिध्यासन यांची योजना यथायोग्य रीतीनें केली असतां त्या प्रतिबंधाचा क्षय होऊन ब्रह्मप्राप्ति होते. ॥ ४४ ॥

आगामिप्रतिबन्धश्च वामदेवे समीरितः ।
एकेन जन्मना क्षीणो भरतस्य त्रिजन्मभिः ॥ ४५ ॥
शिष्य -आतां भावी प्रतिबंधाचें एक उदाहरण द्यावे. गुरु -वामदेव आणि भरत यांची कथा तूं ऐकलीच असशील. पहिल्याला साक्षात्कार होण्यास एक जन्म घ्यावा लागला, आणि दुसऱ्यास तीन जन्म घ्यावे लागले. यांचें कारण असें कीं, हा भावी प्रतिबंध जन्मांतर दिल्यावांचून राहत नाहीं. कारण, तो प्रारब्धशेष आहे; त्या अर्थीं तें भोगलेच पाहिजे. ॥ ४५॥

योगभ्रष्टस्य गीतायामतीते बहुजन्मनि ।
प्रतिबन्धक्षयः प्रोक्तो न विचारोऽप्यनर्थकः ॥ ४६ ॥
शिष्य-असे आणखी कोणच्या तरी प्रसिद्ध ग्रंथांत सांगितलें आहे काय गु० -असें गीतच सांगितलें आहे. गीतेत योगभ्रष्टास मुक्त होण्यास पुढील जन्म घ्यावे लागतात असें जें सांगितलें तो भावी प्रतिबंधच समजला पाहिजे. ॥ ४६ ॥

प्राप्य पुण्यकृतां लोकानात्मतत्त्वविचारतः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ४७ ॥
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
निस्पृहः ब्रह्मतत्त्वस्य विचारात्तद्धि दुर्लभम् ॥ ४८ ॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूयस्तस्मादेतद्धि दुर्लभम् ॥ ४९ ॥
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥ ५० ॥
शिष्य -मग एकूण या जन्मी केलेला विचार निष्फलच म्हणा. गुरु - विचार केलेला कधीं फुकट जाईल काय ? ह्याचा विचार या गीतेतील श्लोकावरून तुला चांगला समजेल. "प्राप्य पुण्यकृतां लोकान्" या श्लोकापासून "ततो याति परां गतिम् " या श्लोकांत्तापर्यंत तुला त्याचा अभिप्रायच सांगतो म्हणजे झालें. योगभ्रष्ट पुरुष आत्मतत्त्व विचाराचे बळाने पुण्यलोकांस जाऊन तेथें यावद्‌भोग सुख अनुभवून पुनः या लोकी शुचिर्भूत व तेजस्वी आईबापांच्या पोटी जन्मास येतो किंवा ब्रह्मतत्त्व विचाराने स्वतः विरक्त होऊन योग्यांच्या घरींच जन्म घेतो. हें जन्म फार दुर्लभ आहे. कारण, तेथें पूर्वदेही संबंधी जो बुद्धीस योगाचा संस्कार असतो तो जशाचा तसाच उठून तो पुढें तसाच प्रयत्न करीत जातो. याचे कारण असें कीं, तो योगभ्रष्ट पूर्व संस्काराच्या स्वाधीन होऊन शेवटीं ब्रह्मप्राप्ति होईपर्यंत तसाच चालतो. ॥ ४७-५० ॥



ब्रह्मलोकाभिवाञ्छायां सम्यक्सत्यां निरुध्यताम् ।
विचारयेद्य आत्मानं न तु साक्षात्करोत्ययम् ॥ ५१ ॥
आणखी एक दांडगा प्रतिबंध आहे तो तुला सांगतो. योग करतां करतां ब्रह्मलोकप्राप्तीची इच्छा झाली म्हणजे तत्त्वविचार कितीही केला तरी त्यास साक्षात्कार होत नाहीं. ॥ ५१॥

वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः इति शास्त्रतः ।
ब्रह्मलोके सकल्पान्ते ब्रह्मणा सह मुच्यते ॥ ५२ ॥
शिष्य -मग त्याला साक्षात्काराची मुळींच आशा नाही कीं काय ? गुरु -त्याला साक्षात्कार मुळीच होत नाहीं असे नाहीं. तरी तेवढ्या इच्छेमुळे मोठ्या गोत्यात पडला. कारण, "वेदांतविज्ञानसुनिश्चितार्था" या श्रुतीप्रमाणे त्यास ब्रह्मलोकप्राति झाल्यानंतर कल्पांतीं ब्रह्मदेवाबरोबरच मुक्ति व्हावयाची. ॥ ५२ ॥

केषांचित्स विचारोऽपि कर्मणा प्रतिबद्ध्यते ।
श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्य इति श्रुतेः ॥ ५३ ॥
परंतु हे जे तीन प्रतिबंध सांगितले ते तत्त्वविचारास आड येणारे आहेत. पण हा तत्त्वविचारही कित्येकांना प्रारब्धवशात् करतां येत नाहीं. यास "श्रवणायापिबहुभिः" या श्रुतीचे प्रमाणें आहे. ॥ ५३ ॥

अत्यन्तबुद्धिमान्द्याद्वा सामग्र्या वाप्यसम्भवात् ।
यो विचारं न लभते ब्रह्मोपासीत सोऽनिशम् ॥ ५४ ॥
शि० -मग अशा पुरुषास मुक्ति कशी मिळावी ? गु० -म्हणूनच आज तुला ब्रह्माची उपासना सांगत आहो. ज्याची बुद्धि अत्यंत मंद असल्यामुळें किंवा गुरुशास्त्रादिक सामग्री अनुकलू नसल्यामुळें ज्यास तत्त्वविचार करणें मुष्कील आहे त्यानें अहोरात्र ब्रह्माची उपासना करावी. ॥ ५४ ॥

निर्गुणब्रह्मतत्त्वस्य न ह्युपास्तेरसम्भवः ।
सगुणब्रह्मणीवात्र प्रत्ययावृत्तिसम्भवात् ॥ ५५ ॥
शि० - होय, पण निर्गुण ब्रह्माची उपासना कशी करावी ? गु० - जशी सगुणाची करावी तशीच निर्गुणाची करावी. उपासना म्हणजे प्रत्ययाची आवृत्ति ती जशी सगुणावर चालते तशी निर्गुणाविषयीही होते. ॥ ५५ ॥

अवाङ्मनसगम्यं तन्नोपास्यमिति चेत्तदा ।
अवाङ्मनसगम्यस्य वेदनं च न सम्भवेत् ॥ ५६ ॥
शि० -होय, पण वाणी आणि मनाला अगम्य अशा ब्रह्माची उपासना कशी करावी ? गु० - असें ब्रह्म जाणावे तरी कसें तें सांग. ॥ ५६ ॥

वागाद्यगोचराकारमित्येवं यदि वेत्त्यसौ ।
वागाद्यगोचराकारमित्युपासित नो कुतः ॥ ५७ ॥
शि० -जाणण्यास कोणती नड आहे. तें वाणीस व मनास अगोचर आहे असें समजणे हेंच त्याला जाणणे. गु० -अशा प्रकारचे ब्रह्म आहे असें समजण्यास असें येते तशीच त्याची उपासनाही करण्यास कोणची नड आहे ? ॥ ५७ ॥

सगुणत्वमुपास्यत्वाद्यदि वेद्यत्वतोऽपि तत् ।
वेद्यं चेल्लक्षणावृत्त्या लक्षितं समुपास्यताम् ॥ ५८ ॥
शि० -ब्रह्म जर उपासनेस विषय होईल तर त्याला सगुणत्व येतें, तसें ज्ञानास विषय झाल्यानेंही सगुणत्व येईल. शि० -लक्षणा वृत्ति म्हणून जी वाक्यार्थ करण्याची रीत आहे तिला अनुसरून जाणल्यास त्यास सगुणत्व येत नाहीं. गु० -मग तशा लक्षणाने लक्षित जे ब्रह्म त्याची उपासना केली असताही सगुणत्व येत नाहीं. ॥ ५८ ॥

ब्रह्म विद्धि तदेव त्वं नत्विदं यदुपासते ।
इति श्रुतेरुपास्यत्वं निषिद्धं ब्रह्मणो यदि ॥ ५९ ॥
शिष्ट तर मग "तदेवं ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदं उपासते" या श्रुतीनं उपासनेचा निषेध कां केला ? गु० - अरे उपासनेचा जसा श्रुतीने निषेध केला आहे, तसा ज्ञानाचाही निषेध श्रुतीने केला आहे. ॥ ५९ ॥

विदितादन्यदेवेति श्रुतेर्वेद्यत्वमस्य न ।
यथा श्रुत्यैव वेद्यं तत्तथा श्रुत्याप्युपास्यताम् ॥ ६० ॥
"अन्यदेव तद्विदितादथोविदितादधीति " ही श्रुति तुला माहीत आहेच. शि० -त्या श्रुतींत जाणलेलेंही नव्हे आणि न जाणलेलेंही नव्हे असें ब्रह्म सांगितलें तसेंच तें जाणले म्हणजे झालें. गु० - मग उपासनाही तशीच करावी. ॥ ६० ॥



अवास्तवी वेद्यता चेदुपास्यत्वं तथा न किम् ।
वृत्तिव्याप्तिर्वेद्यता चेदुपास्यत्वेऽपि तत्समम् ॥ ६१ ॥
शि० -ब्रह्माची वेद्यता कांहीं खरी नव्हे. गु० ब्रह्माची उपास्यता तरी कुठे आम्ही खरी म्हणतो. शि० - ज्ञान होण्यास वृत्तीची व्याप्ति लागते. गु० -उपासनेला ही शब्दबलाने वृत्तीची व्याप्ति लागते. ॥ ६१ ॥

का ते भक्तिरुपास्तौ चेत्कस्ते द्वेषस्तदीरय ।
मानाभावो न वाच्योऽस्यां बहुश्रुतिषु दर्शनात् ॥ ६२ ॥
शि० - गुरु महाराज, उपासनेविषयी आपला इतका आग्रह कां ? गु० -तुझा तरी तिजविषयीं इतका द्वेष कां ? शि० - तिजविषयीं प्रमाण कोठे दिसत नाहीं हो. गु० -हत्‌तिच्या. प्रमाणाला काय तोटा. पुष्कळ श्रुतीची प्रमाणें आहेत. ॥ ६२ ॥

उत्तरस्मिंस्तापनीये शैब्यप्रश्नेऽथ काठके ।
माण्डुक्यादौ च सर्वत्र निर्गुणोपास्तिरीरिता ॥ ६३ ॥
उत्तरतापनीय उपनिषदांत, शैब्य प्रश्नोपनिषदांत, तसेंच काठक मांडुक्य इत्यादिक उपनिषदांमध्यें निर्गुण उपासना सांगितली आहे. ॥ ६३॥

अनुष्ठानप्रकारोऽस्याः पञ्चीकरण ईरितः ।
ज्ञानसाधनमेतच्चेन्नेति केनात्र वर्णितम् ॥ ६४ ॥
शि० -उपासना कशी करावी ? गु. -पंचीकरण ग्रंथांत सांगितली आहे. शि० -मग हें ज्ञानाला साधन तर त्यापासून साक्षात् कांहीं मुक्ति होत नाहीं. गु० -तसें आमचे तरी कोठे म्हणणें आहे, उपासना ही ज्ञानालाच साधन आहे. ॥ ६४ ॥

नानुतिष्ठति कोऽप्येतदिति चेन्नानुतिष्ठतु ।
पुरुषस्यापराधेन किमुपास्तिः प्रदुष्यति ॥ ६५ ॥
शि० -जगामध्ये ही उपासना कोणीच करीत नाहीत. गु० -न करीतना बापडे. कोणी ती न केल्यामुळें उपासनेला दोष येतो काय ? ॥ ६५ ॥

इतोऽप्यतिशयं मत्वा मन्त्रान्वश्याअदिकारिणः ।
मूढा जपन्तु तेभ्योऽतिमूढाः कृषिमुपासताम् ॥ ६६ ॥
मनुष्याची सद्यःफलाकडे नेहमी दृष्टि असते तूं म्हणतोस निर्गुण उपासना करीत नाहींत. पण सगुण उपासना तरी सर्व कुठे करतात ? तिचेही फल मिळण्याला पुष्कळ काळ लागतो. म्हणून सद्यःफलदायी वशीकरणादिकांचे मंत्र जपणारेही मूढ आहेतच. इतकेच नव्हे, यातही नियम पाळण्याचा श्रम ज्यास वाटतो ते त्याहीपेक्षां सद्यःफलदायी जी कृष्यादि कर्मे त्यांचा आश्रय घेतात. म्हणून कोणचेंही कृत्य लोक करीत नाहींत येवढ्याच कारणानें तें त्याज्य होतें असें नाहीं. ॥ ६६ ॥

तिष्ठन्तु मूढाः प्रकृता निर्गुणोपास्तिरीर्यते ।
विद्यैक्यात्सर्वशाखास्थान्गुणानत्रोपसंहरेत् ॥ ६७ ॥
सांसारिक फलाची ज्यास इच्छा आहे ते निर्गुण उपासनेचे अनुष्ठान करीत नाहीत म्हणून मुमुक्षूंनीही त्याचा त्याग करावा कीं काय ? ही मुर्खांची गोष्ट असो. तूर्त आम्ही आमच्या विषयाकडे वळूं. वेदांच्या सर्व शाखांमध्यें विधेय आणि निषेध्य असे जे ब्रह्मावर आरोपित गुण त्या सर्वांचा एकत्र उपसंहार करून एथे निर्गुण उपासना सांगतो. ॥ ६७ ॥

आनन्दादेर्विधेयस्य गुणसङ्घस्य संहृतिः ।
आनन्दादय इत्यस्मिन्सूत्रे व्यासेन वर्णिता ॥ ६८ ॥
ते गुण व्यासांनी आपल्या सूत्रांत संग्रह केले आहेत. त्यापैकी आनंदादिक विधेय गुण "आनंदादय प्रधानस्य" या सूत्रांत सांगितले आहेत. ॥ ६८ ॥

अस्थूलादेर्निषेध्यस्य गुणसङ्घस्य संहृतिः ।
तथा व्यासेन सूत्रेऽस्मिनुक्ताक्षरधियान्त्विति ॥ ६९ ॥
आणि त्याचे अस्थूलादिक निषेध गुण. "अक्षरधियां त्ववरोध सामान्यतद्‌भावाभ्यामौपसदनवदुक्तं" या सूत्रांत एकत्र केले आहेत. ॥ ६९ ॥

निर्गुणब्रह्मतत्त्वस्य विद्यायां गुणसंहृतिः ।
न युज्येतेत्युपालम्भो व्यासं प्रत्येव मां तु न ॥ ७० ॥
शि: -निर्गुण ब्रह्मविद्येचेठायीं गुणांचा उपसंहार कसा केला ? गु० -वर जें आम्ही तुला सांगितलें तें कांहीं आमचे पदरचे नव्हे. व्यासांनी जे गुण आपल्या सूत्रांत दर्शविले तेच तुला आम्ही एथे सांगितले. तेव्हां वरील प्रश्न आम्हाला करूं नको. पाहिजे तर त्यांना जाऊन विचार. ॥ ७० ॥



हिरण्यस्मश्रुसूर्यादिमूर्तीनामनुदाहृतेः ।
अविरुद्धं निर्गुणत्वमिति चेत्तुष्यतां त्वया ॥ ७१ ॥
शि० -आपला अभिप्राय मला समजला. व्यासावर हवाला देण्यांचे कारण मला हे दिसते कीं, 'हिरण्यश्मश्रु' इत्यादि गुणविशिष्ट ज्या सूर्यादि मूर्ति त्यांचें वर्णन तेथे नाही. तेव्हां ती निर्गुण उपासनाच असावी. गु० -असें एकूण तूं समजतोसना ? बरेंच झालें. ॥ ७१ ॥

गुणानां लक्षकत्वेन न तत्त्वेऽन्तःप्रवेशनम् ।
इति चेदस्त्वेवमेव ब्रह्मतत्त्वमुपास्यताम् ॥ ७२ ॥
शि० -पण ते गुण ब्रह्मतत्त्वाला दाखवून देणारे आहेत. त्यांचा त्यांत कांहीं प्रवेश होत नाहीं. ते गुण त्यास लाग पडल्यांवांचून त्याची उपासना कशी करावी ? गु० -उपासनेला ते गुण लागलेच पाहिजेत असें कांही नाहीं. त्या गुणांनी लक्षित जें ब्रह्म त्याची उपासना खचित करतां येते. ॥ ७२ ॥

आनन्दादिभिरस्थूलादिभिःस्वात्मात्र लक्षितः ।
अखण्डैकरसः सोऽहमस्मीत्येवमुपासते ॥ ७३ ॥
शि:- तिचा प्रकार कसा तो सांगावा. गु० -आनंदादिक विधेय गुण आणि अस्थूलादिक निषेध्य गुण यांही या श्रुतीत आत्मा दर्शविला आहे. तो अखंडैकरस मी आहे असें समजून मुमुक्षू उपासना करतात. ॥ ७३ ॥

बोधोपास्त्योर्विशेषः क इति चेदुच्यते शृणु ।
वस्तुतत्न्त्रो भवेद्बोधः कर्तृतन्त्रमुपासनम् ॥ ७४ ॥
शि० -तर मग ज्ञान आणि उपासना यामध्ये भेद कोणचा ? गु० -ज्ञान हे वस्तुतंत्र आहे आणि उपासना ही कर्तृतंत्र आहे. म्हणजे जशाची तशी स्थिति जाणणे यास ज्ञान म्हणतात. आणि उपासना ही ती करणाराच्या भावनेवर अवलंबून आहे. ॥ ७४ ॥

विचाराज्जायते बोधोऽनिच्छा यं न निवर्तयेत् ।
स्वोत्पत्तिमात्रात्संसारे दहत्यखिलसत्यताम् ॥ ७५ ॥
ज्ञान हें विचारापासून होतें. आणखी एक याची अशी मौज आहे कीं, तें एकदा झाल्यावर तें जावे असें जरी मनुष्याच्या मनांत आलें तरी तें जात नाहीं. तें उत्पन्न होतांचा संसाराविषयींची सत्यबुद्धि तत्काल नाहीशी होते. ॥ ७५ ॥

तावता कृतकृत्यः सन्नित्यतृप्तिमुपागतः ।
जीवन्मुक्तिमनुप्राप्य प्रारब्धक्षयमीक्षते ॥ ७६ ॥
एवढ्या तत्त्वज्ञानाने मनुष्य कृतकृत्य होऊन निरंतर तृप्त असतो. मग जीवन्मुक्त होऊन प्रारब्धक्षयाची वाट पहात बसतो. ॥ ७६ ॥

आप्तोपदेशं विश्वस्य श्रद्धालुरविचारयन् ।
चिन्तयेत्प्रत्ययैरन्यैरनन्तरितवृत्तिभिः ॥ ७७ ॥
शि० -हा ज्ञानाचा प्रकार झाला. ज्ञानास जसा विचार पाहिजे तसा उपासनेलाही नको काय ? गु० -उपासनेस त्याची गरज नाहीं. गुरूपदेशावर श्रद्धालु मुमुक्षूने घटपटादिक वृत्तीचे विघ्न मध्ये न येऊ देता एकसारखे विचार न करतां ब्रह्मचिंतन करावे. ॥ ७७ ॥

यावच्चिन्त्यस्वरूपत्वाभिमानः स्वस्य जायते ।
तावद्विचिन्त्य पश्चाच्च तथैवामृति धारयेत् ॥ ७८ ॥
शि० -असें ब्रह्मचिंतन किती दिवसपर्यंत करावे ? गु० -देहाविषतींची अहंबुद्धि जाऊन चिंतनीय ब्रह्माविषयीं अहंबुद्धि उत्पन्न होईपर्यंत तसेंच चिंतन केलें पाहिजे. आणि ती स्थिति मरणकालपर्यत तशीच राखावी. ॥ ७८ ॥

ब्रह्मचारी भिक्षमाणो युतः संवर्गविद्यया ।
संवर्गरूपतां चित्ते धारयित्वा ह्यभिक्षता ॥ ७९ ॥
याच्या उदाहरणार्थ छांदोग्य श्रुतींत एक कथाआहे- कोणी एक ब्रह्मचारी संवर्गविद्या या नांवाची प्राणोपासना करीत होता. त्यानें भिक्षेकरितां राजाकडे जाऊन भिक्षेच्या वेळेस "महात्मनश्चतुरो देव एक: "" हा मंत्र म्हणून आपल्या चित्तांतील संवर्गरूप प्रगट केलें. ॥ ७९ ॥

पुरुषस्वेच्छया कर्तुमकर्तुं कर्तुमन्यथा ।
शक्योपास्तिरतो नित्यं कुर्यात्प्रत्ययसन्ततिम् ॥ ८० ॥
शि० -आपण म्हटले की, तत्त्वज्ञान झाल्यावर तें जावे असें कोणी इच्छिले तरी तें जात नाही हा नियम उपासनेस लागू आहे कीं नाहीं ? गु० -तो उपासनेस लागू नाहीं. म्हणूनच ती कर्तृतंत्र असें आम्ही म्हटलें. कारण मनुष्याच्या इच्छेने उपासना करणें, न करणें, किंवा अन्यथा करणें शक्य आहे. म्हणून तो प्रत्यय नेहमी तसाच ठसवावा. ॥ ८० ॥



वेदाध्यायी ह्यप्रमत्तोऽधीते स्वप्नेऽपि वासितः ।
जपिता तु जपत्येव तथा ध्यातापि वासयेत् ॥ ८१ ॥
ज्याप्रमाणें वेदाचे अध्ययन करणारा किंवा जप करणारा सदा सर्वदा त्यांतच गढून जाऊन स्वप्नांत सुद्धा आपला अभ्यास करतो, त्याप्रमाणें ब्रह्मोपासकानेंही त्यांतच सदा सर्वदा असावे. ॥ ८१ ॥

विरोधिप्रत्ययं त्यक्त्वा नैरन्तर्येण भावयन् ।
लभते वासनावेशात्स्वप्नादावपि भावनाम् ॥ ८२ ॥
शि० -स्वप्रांत देखील ती भावना कशी होते ? गु० -दुसऱ्या विरोधी विषयाचे चिंतन मध्ये न आणता एक सारखी त्याचीच भावना केली म्हणजे ती भावना स्वप्नांत देखील राहते. ह४ याचा अनुभव सर्वत्रांना आहे. ॥ ८२ ॥

भुञ्जानोऽपि निज आरब्धमास्थातिशयतोऽनिशम् ।
ध्यातुं शक्तो न सन्देहो विषयव्यसनी यथा ॥ ८३ ॥
शि० - निरंतर भावनेस प्रारब्ध आड येत नाहीं काय ? गु० -ज्या मनुष्यास मोक्षाची आस्था अत्यंत आहे, त्यास प्रारब्धाचा भोग न सुटतांही ब्रह्मचिंतन करणें शक्य आहे यांत संशय नाहीं. यास दृष्टांत व्यसनी पुरुषाचा. ॥ ८३ ॥

परव्यसनिनी नारी व्यग्रापि गृहकर्मणि ।
तदेवास्वादयत्यन्तः परसङ्गरसायनम् ॥ ८४ ॥
ज्या व्यभिचारिणीचें चित्त परपुरुषावर जडलें, ती घरचा कामधंदा करीत असूनही तें परसंगरसायन आंतून एकसारखी चाखीत असते. ॥ ८४॥

परसङ्गं स्वादयन्त्या अपि नो गृहकर्म तत् ।
कुण्ठी भवेदपि त्वेतदापातेनैव वर्तते ॥ ८५ ॥
शि० -मग तिचे घरचे काम कसें होतें ? गु० -त्या आस्वादनांत घरचे काम कांहीं रहात नाहीं; पण सरासरी चालते. ॥ ८५ ॥

गृहकृत्यव्यसनिनी यथा सम्यक्करोति तत् ।
परव्यसनिनी तद्वन्न करोत्येव सर्वथा ॥ ८६ ॥
आतां कुलीन स्त्री जशी घरच्या कामांत लक्ष ठेवून काम करते तसें मात्र तिला करतां यावयाचे नाहीं. ॥ ८६ ॥

एवं ध्यानैकनिष्ठोऽपि लेशाल्लौकिकमाचरेत् ।
तत्त्ववित्त्वविरोधित्वाल्लौकिकं सम्यगाचरेत् ॥ ८७ ॥
त्याप्रमाणें ध्यानैकनिष्ठ पुरुषाचा संसार सरासरी वेठीनें चालतो. पण तत्त्ववेत्त्याची गोष्ट तशी नाहीं. व्यवहारास आणि ज्ञानास विरोध मुळीच नसल्यामुळे त्याचा व्यवहार यथास्थित चालतो. ॥ ८७ ॥

मायामयः प्रपञ्चोऽयमात्मा चैतन्यरूपधृक् ।
इति बोधे विरोधः को लौकिकव्यवहारिणः ॥ ८८ ॥
कारणसर्व प्रपंच मायामयआहे. आणि चैतन्यरूपीआत्मा खराआहे, असा बोध झाल्यावर त्याला व्यवहाराचा अडथळा मुळींच नाहीं. ॥ ८८ ॥

अपेक्षते व्यवहृतिर्न प्रपञ्चस्य वस्तुताम् ।
नाप्यात्मजाड्यं किंत्वेषा साधनान्येव काङ्क्षति ॥ ८९ ॥
शि० -ज्ञान्यास हा प्रसंग अगदी खोटा आहे असा निश्चय झाल्यावर व्यवहार कसा घडावा ? गु० -व्यवहार करण्याला त्याची जी मुख्य साधने आहेत तीं असली म्हणजे झालें. त्याला म्हणजे प्रपंच खरा आहे, आत्मा जड आहे ही भ्रांतीच असली पाहिजे असें नाहीं. ॥ ८९ ॥

मनोवाक्कायतद्बाह्यपदार्थाः साधनानि तान् ।
तत्त्वविन्नोपमृद्नाति व्यवहारोऽस्य नो कुतः ॥ ९० ॥
शि० -तीं मुख्य साधने कोणती ? गु० -मन, वाणी, शरीर आणि दुसरे बाह्य विषय हीच व्यवहाराचीं मुख्य साधने. तीं म्हणजे ज्ञान होतांच तत्त्वज्ञ पुरुषांची नाहीशी होतात असें कांहीं नाहीं. मग व्यवहाराला हरकत कोणची ? ॥ ९० ॥



उपमृद्नाति चित्तं चेद्ध्यातासौ न तु तत्त्ववित् ।
न बुद्धिं मर्द्दयन्दृष्टो घटतत्त्वस्य वेदिता ॥ ९१ ॥
शि० -तत्त्ववेत्त्याला मनाचा निरोध करावा लागतो. मग त्याचा व्यवहार कसा चालावा ? गु० -ही तुझी गैरसमजूत आहे. तैसा जो निरोध करणारा आहे तो तत्त्ववेत्ताच नव्हे. तो ध्याता असें म्हटलें पाहिजे. अरे घट जाणाराला बुद्धीचें मर्दन केलें पाहिजे काय ? तसें करणारा आम्हाला तर कोठे आढळत नाही. ॥ ९१ ॥

सकृत्प्रत्ययमात्रेण घटश्चेद्‌भासते तदा ।
स्वप्रकाशोऽयमात्मा किं घटवच्च न भासते ॥ ९२ ॥
एकदा प्रत्यय आल्याने जर घट समजतो तर एकदा प्रत्यय आल्याने स्वप्रकाश आत्माही तसाच समजला पाहिजे. ॥ ९२ ॥

स्वप्रकाशतया किं ते तद्बुद्धिस्तत्त्ववेदनम् ।
बुद्धिश्च क्षणनाश्येति चोद्यं तुल्यं घटादिषु ॥ ९३ ॥
शि० -एथे आत्मा स्वप्रकाश म्हणून जें म्हटलें, त्याचें प्रयोजन कांहीं दिसत नाहीं. कारण तो जरी स्वप्रकाश असला, तरी त्यास बुद्धीने व्यापल्यावांचून त्याचें ज्ञानच होणे नाहीं. आणि बुद्धि तर क्षणोक्षणीं नाश पावणारी आहे. म्हणून तिची पुनः पुनः ब्रह्माचे ठायीं स्थापना केलीच पाहिजे. व ती स्थापना निरोधावाचून होत नाहीं. गु० -ही सर्व शंका घटज्ञानालाही लागू आहे ॥ ९३ ॥

घटादौ निश्चिते बुद्धिर्नश्यत्येव यदा घटः ।
इष्टो नेतुं तदा शक्य इति चेत्सममात्मनि ॥ ९४ ॥
शिं० -ती घटज्ञानाला कशी लागू होईल ? कारण घटज्ञान जरी क्षणिक असलें तरी एकदा हा घट असा निश्चय झाल्यावर त्या ज्ञानाचा पाहिजे तेव्हां व्यवहार करतां येतो. म्हणून तेथें चित्तस्थैर्याची गरज नाहीं. गु० -जशी घटपक्षी त्याची गरज नाहीं तशी आत्मज्ञान झाल्यावरही चित्तस्थैर्याची गरज नाहीं. ॥ ९४ ॥

निश्चित्य सकृदात्मानं यदापेक्षा तदैव तत् ।
वक्तुं मन्तुं तथा ध्यातुं शक्नोत्येव हि तत्त्ववित् ॥ ९५ ॥
कारण, एकदा आत्मा असा आहे असा निश्चय झाल्यावर पाहिजे तेव्हां त्याचें ध्यान करण्याला, मनन करण्याला, व वर्णन करण्याला तत्त्ववेत्त्याला येतें. ॥ ९५ ॥

उपासक इव ध्यायं लौकिकं विस्मरेत् यदि ।
विस्मरत्येव सा ध्यानाद्विस्मृतिर्न तु वेदनात् ॥ ९६ ॥
शि० -तत्ववेत्ताही उपासकाप्रमाणें आत्मज्ञानांत निमग्न असतां त्याला जगाची विस्मृति पडण्याचा संभव आहे. गु० -विस्मृति पडेना बापडी. पडली तरी ती ध्यानापाऊन पडते, ज्ञानापासून पडत नाहीं, इतकेंच आमचे म्हणणें आहे. ॥ ९६ ॥

ध्यानं त्वैच्छिकमेतस्य वेदनान्मुक्तिसिद्धितः ।
ज्ञानादेव तु कैवल्यमिति शास्त्रेषु डिण्डिमः ॥ ९७ ॥
शि० -एकूण तर तत्त्ववेत्त्वालाही ब्रह्मध्यान करावे लागतें ? गु० -त्यानें तें केलेंच पाहिजे असें कांहीं नाही तें त्यानें पाहिजे असल्यास करावे. कारण मोक्षप्राति ज्ञानापासूनच होते असा वेदाचा डंका वाजत आहे. ॥ ९७ ॥

तत्त्वविद्यदि न ध्यायेत्प्रवर्तेत तदा बहिः ।
प्रवर्ततां सुखेनायं को बाधोऽस्य प्रवर्तने ॥ ९८ ॥
शितत्त्ववेत्ता जर ब्रह्मध्यान सोडील तर त्याची प्रवृत्ति बाहेर प्रपंचाकडे होईल. गु० -होइना बापडी. तशा प्रवृत्तीनें तत्त्ववेत्त्याचे काय जातें ? ॥ ९८ ॥

अतिप्रसङ्ग इति चेत्प्रसङ्गं तावदीरय ।
प्रसङ्गो विधिशास्त्रं चेन्न तत्तत्त्वविदं प्रति ॥ ९९ ॥
शि० -तशी प्रवृत्ति झाल्यास अति प्रसंगाची ज्ञान्यास भीति आहे. गु० -त्याला प्रसंग असेल तर अतिप्रसंग. प्रथम तूं प्रसंग म्हणजे काय हें मला सांग. शि० -शास्त्राप्रमाणें वागणे गु० -ते तत्त्ववेत्त्याला मुळीच लागू नाहीं. ॥ ९९ ॥

वर्णाश्रमवयोवस्थाभिमानो यस्य विद्यते ।
तस्यैव हि निषेधाश्च विधयः सकला अपि ॥ १०० ॥
वर्णाश्रमादयो देहे मायया परिकल्पिताः ।
नात्मनो बोधरूपस्येत्येवं तस्य विनिश्चयः ॥ १०१ ॥
कारण ज्याला मी अमुक वर्णातला, मी अमुक आश्रमी, मी तरुण, मी वृद्ध, असा अभिमान, त्यालाच काय ते विधिनिषेध. पण तत्त्ववेत्त्याचा तर असा निश्चय असतो कीं, हे वर्णाभश्रमादिक देहाचे ठायीं मायेने कल्पित केले आहेत. त्याचा संपर्क बोधरूप आत्म्याला मुळीच लागत नाहीं. ॥ १००-१०१ ॥



समाधिमथ कर्माणि मा करोतु करोतु वा ।
हृदयेनास्तसर्वास्थो मुक्त एवोत्तमाशयः ॥ १०२ ॥
तो समाधी करो किंवा त्याच्या हृदयातील सर्व आस्थांचा नाश झाल्यामुळें त्याला कशाची गरज नाहीं. ॥ १०२ ॥

नैष्कर्म्येण न तस्यार्थस्तस्यार्थोऽस्ति न कर्मभिः ।
न समाधानजप्याभ्यां यस्य निर्वासनं मनः ॥ १०३ ॥
तो कर्मे करो किंवा संन्यास घेवो; तो समाधि करो, किंवा जप करो; त्याच्या मनांतील सर्व वासना समूळ नष्ट झाल्यामुळें तो कसाही राहिला तरी चालते. ॥ १०३ ॥

आत्मासङ्गस्ततोऽन्यत्स्यादिन्द्रजालं हि मायिकम् ।
इत्यचञ्चलनिर्णिते कुतो मनसि वासना ॥ १०४ ॥
खरेंच आहे कीं, आत्मा असंग आहे आणि त्यावाचून बाकी सर्व मायिक इंद्रजाल आहे, असा ज्या धन्य पुरुषाचा निश्चय झाला, त्याच्या मनांत वासनेचा अंकूर कसा राहील ? ॥ १०४ ॥

एवं नास्ति प्रसङ्गोऽपि कुतोऽस्यातिप्रसञ्जनम् ।
प्रसङ्गो यस्य तस्यैव शङ्क्येतातिप्रसञ्जनम् ॥ १०५ ॥
म्हणून ज्याला प्रसंगच नाहीं त्याला अति प्रसंग तरी कोठून असणार ? जेथें प्रसंग आहे तेथेंच अति प्रसंगाची शंका. ॥ १०५ ॥

विध्यभावान्न बालस्य दृश्यतेऽतिप्रसञ्जनम् ।
स्यात्कुतोऽतिप्रसङ्गोऽस्य विध्यभावे समे सति ॥ १०६ ॥
लहान मलाला कोणच्याही कर्माचा विधिनिषेध नसल्यामुळें अति प्रसंगाचा दोष लागत नाहीं. ॥ १०६ ॥

न किंचिद्वेत्ति बालश्चेत्सर्वं वेत्त्येव तत्त्ववित् ।
अल्पज्ञस्यैव विधयः सर्वे स्युर्नान्ययोर्द्वयोः ॥ १०७ ॥
शि० --बाळ अगदीं अज्ञ असतो म्हणून त्याला तो दोष लागत नाहीं. गु० -तत्त्ववेत्ता सर्वज्ञ असतो म्हणून त्यालाही तो दोष लागत नाहीं. शि० -मग विधिनिषेध कोणी बाळगावेत ? गु० -अल्पज्ञ लोकांनी. ते अज्ञान्यालाही नाहींत, व सर्वज्ञालाही नाहींत. ॥ १०७ ॥

शापानुग्रहसामर्थ्यं यस्यासौ तत्त्वविद्यदि ।
न तत् शापादिसामर्थ्यं फलं स्यात्तपसो यतः ॥ १०८ ॥
शि० -आम्ही असें ऐकतो कीं, शापानुग्रह सामर्थ्य असणें हैं तत्त्ववेत्त्याचे मुख्य लक्षण आहे. तें ज्याला नाहीं तो ज्ञानीच नव्हे. गु० -तसं समजणे ती अगदींच चूक आहे. तें सामर्थ्य ज्ञानाचे फळ नव्हे, तर केवळ तपाचें फळ आहे. ॥ १०८ ॥

व्यासादेरपि सामर्थ्यं दृश्यते तपसो बलात् ।
शापादिकारणादन्यत्तपोज्ञानस्य कारणम् ॥ ।१०९ ॥
शि० -व्यासादिक जे ज्ञानी होऊन गेले त्यांचे आंगी तें सामर्थ्य दिसत होते. गु० -त्याचें कारण असें कीं, ते ज्ञानी असून तपस्वीही होते म्हणून त्यांचे आगी तें सामर्थ्य होतें. पण तें कांहीं ज्ञानाचे फळ नव्हे. ज्ञान होण्यालाही एक प्रकारचे तपच पाहिजे. पण शापादि सामर्थ्यास कारणीभूत तपापासन तें ज्ञानजनक तप निराळे आहे. त्यापासून ज्ञानच होतें. ॥ १०९ ॥

द्वयं यस्यास्ति तस्यैव सामर्थ्यज्ञानयोर्जनिः ।
एकैकं तु तपः कुर्वन्नेकैकं लभते फलम् ॥ ११० ॥
तीं दोन्ही तपें ज्यानें केली असतील त्याला ज्ञान आणि सामर्थ्य ही दोनही फळें मिळतात आणि एकच करणाराला एकच फळ मिळते. ॥ ११० ॥



सामर्थ्यहीनो निन्द्यश्चेद्यतिभिर्विधिवर्जितः ।
निन्द्यन्ते यतयोऽप्यन्यैरनिशं भोगलंपटैः ॥ १११ ॥
शि -विधि-निषेध-रहित अशा तत्त्ववत्त्याच्या आंगी शापादि सामर्थ्य जर नसेल तर त्याची विधिपूर्वक कर्मानुष्ठान करणारे पुरुष निंदा करतात. गु० -करीतना बापडे ! असे निंदा करणारे पुरुष तरी निंदेतून कुठे सुटले आहेत ? त्यांचीही निंदा करण्यास विषयलंपट पुरुष तयार आहेतच ! ॥ १११ ॥

भिक्षावस्त्रादि रक्षेयुर्यद्येते भोगतुष्टये ।
अहो यतित्वमेतेषां वैराग्यभरमन्थरम् ॥ ११२ ॥
शि० -यतींनीं भोगतुष्टीकरितां भिक्षा मागितली व वस्त्रादिकांचें संरक्षण केले म्हणून दोष काय ? गु० -मग त्यांचें यतित्व काय विचारावें ! त्यांचें वैराग्य किती म्हणून वर्णावे . ॥ ११२ ॥

वर्णाश्रमपरान्मूर्खा निन्दन्त्वित्युच्यते यदि ।
देहात्ममतयो बुद्धं निन्दन्त्वाश्रममानिनः ॥ ११३ ॥
शि० -विषयलंपटांनीं केलेल्या निंदेनें वर्णाश्रम पाळणाऱ्या पुरुषाची मुळींच हानि नाहीं. गो० मग देहाला मी म्हणणाऱ्या कमर्ठ पुरुषाने ज्ञान्याची निदा केली असतां त्याचा तरी काय तोटाआहे ? ॥ ११३ ॥

तदित्थं तत्त्वविज्ञाने साधनानुपमर्दनात् ।
ज्ञानिनाचरितुं शक्यं सम्यग्राज्यादि लौकिकम् ॥ ११४ ॥
शि० - तर तुमचे म्हणणें काय तें तरी सांगा ? गु० -आमचें म्हणणें इतकेंच कीं, तत्त्वज्ञान झाल्याने व्यवहाराची देहेंद्रियादिक साधने ज्या अर्थी नष्ट होत नाहींत त्या अर्थीं राज्यादिक व्यवहार करण्यास त्याला कोणची नड आहे असें कांहीं नाही. ॥ ११४ ॥

मिथ्यात्वबुद्ध्या तत्रेच्छा नास्ति चेत्तर्हि मास्तु तत् ।
ध्यायन्वाथ व्यवहरन्यथारब्धं वसत्वयम् ॥ ११५ ॥
शि० -तत्त्ववेत्त्याला सर्व प्रपंच मिथ्या आहे असा निश्चय झाल्यामुळें त्याविषयी त्याची इच्छा कशी राहील ? गु० -राहते असें आमचे तरी कोठे म्हणणें आहे ? तो कांहीं वेळ ध्यानांत व कांहीं वेळ व्यवहारांत अशा रीतीनें प्रारब्धानुसार कालक्षेप करतो. ॥ ११५ ॥

उपासकस्तु सततं ध्यायन्नेव वसेदिति ।
ध्यानेनैव कृतं तस्य ब्रह्मत्वं विष्णुतादिवत् ॥ ११६ ॥
शि० -तर तत्त्ववेत्ता आणि उपासक यामध्ये भेद काय ? गु० -भेद इतकाच कीं, तत्त्ववेत्त्याला जसें पाहिजे तसें राहता येतें तसें उपासकास राहता येत नाहीं. ज्या अर्थी विष्णू आदि दैवतांप्रमाणे त्याचा ब्रह्मपणा ध्यानानेंच केला आहे, त्या अर्थी त्यानें सदा सर्वदा ध्यानातच असलें पाहिजे. ॥ ११६ ॥

ध्यानोपादानकं यत्तद्ध्यानाभावे विलीयते ।
वास्तवी ब्रह्मता नैव ज्ञानाभावे विलीयते ॥ ११७ ॥
शि० -मग त्या ध्यानाने झालेल्या ब्रह्मतेला हानी कोणची ? गु० -ध्यान जोपर्यंत आहे तोपर्यंत कांहीं त्याला हानी नाहीं. ध्यान नष्ट झालें कीं, ती नष्ट झाली. कारण, ती ध्यानाचीच बनलेली आहे. ॥ ११७ ॥

ततोऽभिज्ञापकं ज्ञानं न नित्यं जनयत्यदः ।
ज्ञापकाभावमात्रेण न हि सत्यं विलीयते ॥ ११८ ॥
शि० -ध्यान गेलें असतां जशी ब्रह्मता नाहीशी होते, तशी ज्ञान गेल्यानेंही ती नाहीशी होईल ? गु० -तसे कधींही होणार नाहीं. कारण, ज्ञान्याची ब्रह्मता ज्ञानाने नवीन झाली असें नाही; ती मुळचीच सिद्ध आहे. केवळ ती ज्ञानाने प्रकाशित मात्र केली; म्हणून प्रकाशित करणारे ज्ञान जरी नष्ट झालें, तरी ती जशाची तशीच असते. याकरितां ब्रह्मास दाखविणारे जे ज्ञान तें त्यास नवीन बनवीत नाही. म्हणून तें गेल्याने सत्य ब्रह्मस्वरूप नष्ट होत नाहीं हे उघड आहे. ॥ ११८ ॥

अस्त्येव उपासकस्यापि वास्तवी ब्रह्मतेति चेत् ।
पामराणां तिरश्चां च वास्तवी ब्रह्मता न किम् ॥ ११९ ॥
शि० -ज्ञान्याप्रमाणे उपासकाचीही ब्रह्मता खरीच आहे. गु० -त्या दृष्टीने पाहिले असतां ज्ञानी मनुष्यांची व पशुपक्ष्यादिकांचीही ब्रह्मता खरी आहे. ॥ ११९ ॥

अज्ञानादपुमर्थत्वमुभयत्रापि तत्समम् ।
उपवासाद्यथा भिक्षा वरं ध्यानं तथान्यथः ॥ १२० ॥
शि० -पण त्यांच्या अज्ञानामुळे ती असून नसल्यासारखी आहे. मग त्यांत पुरुषार्थ कोणता ? गु० -ही गोष्ट उपासकासही लागू आहे. कारण, त्यालाही ज्ञान नसतें. शि० -मग उपासना कशास सांगतां ? गु० -आम्ही जी उपासना सांगतो ती केवळ "उपवासात् वरं भिक्षा" या न्यायाने सांगतो उपाशी मरण्यापेक्षा जशी भिक्षा बरी, तसें इतर अनुष्ठामापेक्षा ध्यान बरें. ॥ १२० ॥



पामराणां व्यवहृतेर्वरं कर्माद्यनुष्ठितिः ।
ततोऽपि सगुणोपास्तिर्निर्गुणोपासनं ततः ॥ १२१ ॥
एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेच आहे, अडाण्याच्या व्यवहारापेक्षां कर्मानुष्ठान बरें. त्याहीपेक्षां सगुणोपासना बरी, त्याहीपेक्षा निर्गुण उपासना श्रेष्ठ. ॥ १२१ ॥

यावद्विज्ञानसामीप्यं तावच्छ्रैष्ठ्यं विवर्धते ।
ब्रह्मज्ञानाय ते साक्षान्निर्गुणोपासनं शनैः ॥ १२२ ॥
याप्रमाणे ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत एकावर एक अशा ह्या पायऱ्या आहेत. तुझी निर्गुण उपासना चांगली दृढ झाली म्हणजे त्यापासून ब्रह्मज्ञान होतें. ॥ १२२ ॥

यथा संवादिविभ्रान्तिः फलकाले प्रमायते ।
विद्यायते तथोपास्तिर्मुक्तिकालेऽतिपाकतः ॥ १२३ ॥
ज्याप्रमाणें संवादि-भ्रमापासून फलकाल आला असतां फलप्राप्ति होते, त्याप्रमाणें निर्गुण उपासना पक्व होऊन मोक्षप्राप्तीची वेळ आम्ही म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार होतो. ॥ १२३ ॥

संवादिभ्रमतः पुंसः प्रवृत्तस्यान्यमानतः ।
प्रमेति चेत्तथोपास्तिर्मान्तरे कारणायताम् ॥ १२४ ॥
शि० -संवादिभ्रमानें प्रवृत्त झालेल्या पुरुषाला इंद्रियार्थसंनिकर्षापासून पुढें ज्ञान होतें; पण तो भ्रमच ज्ञान होऊं शकत नाहीं. गु० -उपासनेचीही गोष्ट तशीच आहे. ती तरी स्वतः ज्ञान कोठे आहे ? महावाक्यापासृन् होणाऱ्या अपरोक्ष ज्ञानाला ती कारण आहे. ॥ १२४ ॥

मूर्तिध्यानस्य मन्त्रादेरपि कारणता यदि ।
अस्तु नाम तथाप्यत्र प्रत्यासत्तिर्विशिष्यते ॥ १२५ ॥
शि० -निर्गुण उपासना जशी अपरोक्ष ज्ञानास कारण आहे, तशी मूर्तिध्यानमंत्रादिही ज्ञानास कारण आहेत. मग उपासनेची एवढी प्रतिष्ठा कशाला ? गु० -होय, तूं म्हणतोस तें खरें आहे. पण दोहोंमध्ये भेद इतकाच कीं, निर्गुण उपासना ज्ञानास अगदीं जवळची पायरी आहे. बाकीची मंत्रादि साधने दूरच्या पायर्‍या आहेत. ॥ १२५ ॥

निर्गुणोपासनं पक्वं समाधिः स्याच्छनैस्ततः ।
यः समाधिर्निरोधाख्यः सोऽनायासेन लभ्यते ॥ १२६ ॥
शि० -जवळची पायरी म्हटलें त्याचा अर्थ काय ? गु० - त्याचा अर्थ हाच कीं, निर्गुण उपासना पक्व झाली म्हणजे हळूहळू सविकल्प समाधि साधतो, तो पक्व झाला म्हणजे अनायासाने निर्विकल्प समाधि होतो. ॥ १२६॥

निरोधलाभे पुंसोऽन्तरसङ्गं वस्तु शिष्यते ।
पुनः पुनर्वासितेऽस्मिन्वाक्याज्जायेत तत्त्वधीः ॥ १२७ ॥
तो झाल्यानंतर असंग जी आत्मवस्तू तीच तो पुरुष होतो ही भूमि पुन चांगली दृढ झाल्यावर त्यास महावाक्यापासून तत्त्वज्ञान होतें, ॥ १२७॥

निर्विकारासङ्गनित्यस्वप्रकाशैकपूर्णताः ।
बुद्धौ झटिति शास्त्रोक्ता आरोहन्त्यविवादतः ॥ १२८ ॥
तसें झाल्यानंतर मी निर्विकारी, असंग, नित्य स्वप्रकाश आणि परिपूर्ण आहें, अशीं जी शास्त्रोक्त ब्रह्माची लक्षणें ती त्याच्या बुद्धीत लवकर ठसतात. ॥ १२८ ॥

योगाभ्यासस्त्वेतदर्थोऽमृतबिन्द्वादिषु श्रुतः ।
एवं च दृष्टद्वारापि हेतुत्वादन्यतो वरम् ॥ १२९ ॥
याकरितांच अमृतबिंद्वादि उपनिषदांत योगाभ्यास सांगितला आहे. याप्रमाणे निर्विकल्प समाधिरूप दृष्टफल प्राप्तीच्या संबंधानेही इतर साधनापेक्षा निर्गुण उपासना श्रेष्ठ आहे. ॥ १२९ ॥

उपेक्ष्य तत्तीर्थयात्रां जपादीनेव कुर्वताम् ।
पिण्डं समुत्सृज्य करं लेढीति न्याय आपतेत् ॥ १३० ॥
एवढे निर्गुण उपासनेचे फल असून तिची उपेक्षा करून जे तीर्थयात्रा जपादिक कर्मे करतात त्यांना " पिंड समुत्सृज्य करं लेढि " ( हातांतील लाडू टाकून हात चाटीत बसणे) ही म्हण लागू पडते. ॥ १३० ॥



उपासकानामप्येवं विचारत्यागतो यदि ।
बाधं तस्माद्विचारस्यासम्भवे योग ईरितः ॥ १३१ ॥
शि० -विचार सोडून जे लोक उपासना करतात त्यांस देखील ही म्हण लागू पडत नाही काय ? गु० -नाहीं कोण म्हणतो, त्यासही ती तशीच लागू पडते. जशी तीर्थयात्रेपेक्षा उपासना श्रेष्ठ तसा उपासनेपेक्षां विचार श्रेष्ठ. परंतु आम्ही जो योग (उपासना) सांगितला, तो विचारक्षम पुरुषास नव्हे. ज्यास विचार नाहीं त्यास तो सांगितला. ॥ १३१ ॥

बहुव्याकुलचित्तानां विचारात्तत्त्वधीर्न हि ।
योगो मुख्यस्ततस्तेषां धीदर्पस्तेन नश्यति ॥ १३२ ॥
शि० -कित्येकांस विचार कां होत नाहीं ? गु० -ज्याचे चित्त कामक्रोधादिकांनी गांजले गेलें आहे. त्यांस विचार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें तत्त्वज्ञान होत नाही. म्हणून त्यांस योगच मुख्य आहे. तेणेकरून बुद्धिजाड्य नाहीसे होतें. ॥ १३२ ॥

अव्याकुलधियां मोहमात्रेणाच्छादितात्मनाम् ।
साङ्ख्यनामा विचाराः स्यान्मुख्यो झटिति सिद्धितः ॥ १३३ ॥
आणि ज्यांच्या चित्तांत कामक्रोधादिक नसल्यामुळे आयते वैराग्य आटून केवळ आत्म्याविषयी अज्ञान मात्र आहे, त्यांना सांख्यनामक विचार मुख्य सांगितला. त्यापासून त्यांना लवकर मुक्ति मिळते. ॥ १३३॥

यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ १३४ ॥
यास गीतावाक्य प्रमाण "यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं" या शोकाचा अभिप्राय असा आहे कीं, जें फल सांख्यापासून मिळतें तेंच योगापासून मिळतें. ते दोन्हीही फलत्वेंकरून एकच आहेत असे ज्याला समजते, त्यासच शास्त्रसिद्धांत समजला. ॥ १३४ ॥

तत्कारणं साङ्ख्ययोगाधिगम्यमिति हि श्रुतिः ।
यस्तु श्रुतेर्विरुद्धः स आभासः साङ्ख्ययोगयोः ॥ १३५ ॥
श्रुतींचेही तसेंच प्रमाण आहे. "तत्कारणं सांख्ययोगाधिगम्यं" या श्रुतीचा अर्थ ते जगत्कारण ब्रह्म सांख्य किंवा योगापासून समजतें. शि० -योग आणि सांख्य हे दोनही मुक्तीस जर साधन आहेत, तर त्या शास्त्रात सांगितलेले सर्वच प्रमाण म्हणून समजले पाहिजे. गु० -तसे नव्हे, त्यांत श्रुतिविरुद्ध जे विचार ते आभास म्हणून गाळावे. ॥ १३५ ॥

उपासनं नातिपक्वमिह यस्य परत्र सः ।
मरणे ब्रह्मलोके वा तत्त्वं विज्ञाय मुच्यते ॥ १३६ ॥
शिं० -उपासना करणाराला ज्ञान न होतां मरण आलें तर मोक्षसिद्ध कशी होते ? गु० - ज्याची उपासना या जन्मी पक्व झाली नाहीं त्याला अंतकाली किंवा ब्रह्मलोकी तत्त्वज्ञान होऊन मुक्ति मिळते. ॥ १३६ ॥

यं यं चापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तेवैति यच्चित्तस्तेन यातीति शास्त्रतः ॥ १३७ ॥
मरणकालीं जी मुक्ति होते त्यास प्रमाण, जो जो भाव स्मरून प्राणी देह सोडतो, तो तो भाव त्याला प्राप्त होतो असें गीतेत सांगितलें आहे. "यचित्तस्तेन याति" असेही शास्त्रआहे. ॥ १३७ ॥

अन्त्यप्रत्ययतो नूनं भाविजन्म तथा सति ।
निर्गुणप्रत्ययोऽपि स्यात्सगुणोपासने यथा ॥ १३८ ॥
शि० -तुम्ही म्हणतां कीं, निर्गुण उपासना पक्व झाली तर त्यास मरणकाळीं मुक्ति होते, पण त्याविषयी जी प्रमाणें दिलींत त्यापासून पुनर्जन्म होतो असें सिद्ध होते. तर या विरोधाचा परिहार कसा ? गु० -ते खरे आहे. पणे सगुणोपासनेनें अन्तकालीं जसा सगुणसाक्षात्कार होतो तसा निर्गुणोपासनेनेही निर्गुणसाक्षात्कार झालाच पाहिजे. ॥ १३८ ॥

नित्यं निर्गुणरूपं तन्नाममात्रेण गीयताम् ।
अर्थतोमोक्ष एवैष संवादि भ्रमवन्मतः ॥ १३९ ॥
शि० -तर त्याला निर्गुणरूपाची प्राप्ति होईल मुक्ति कशी मिळेल ? गु० -अरे निर्गुणरूपाची प्राप्ति आणि मुक्ति यांत नाममात्रांचा भेद आहे. परंतु दोन्हीचा अर्थ एकच आहे. मुक्ति म्हणजे स्वरूपावस्थिति. ती येथे प्रात होतेच. ज्याप्रमाणें संवादि भ्रमाला भ्रम हें नाममात्र आहे. ॥ १३९ ॥

तत्सामर्थ्याज्जायते धीर्मूलाविद्यानिवर्तिका ।
अविमुक्तोपासनेन तारकब्रह्म बुद्धिवत् ॥ १४० ॥
शि० -निर्गुण उपासना ही मानसिक क्रियाआहे, तेव्हां ती मुक्तीला साधन कशी होईल ? गु० -ती जरी साक्षात् साधन होत नाहीं, तरी मूळ अविद्येस भस्म करून टाकणारे ज्ञान तिजपासून उत्पन्न होते यास दुसरा दृष्टांत नको. सगुण उपासनेने जशी तारक ब्रह्मबुद्धि होते, तसेंच निर्गुण उपासनेने ब्रह्मज्ञान होतें. ॥ १४०॥



सकामो निष्काम इति ह्यशरीरो निरिन्द्रियः ।
अभयं हीति मुक्तत्वं तापनीये फलं श्रुतम् ॥ १४१ ॥
शि० -यास प्रमाण काय ? गु० -"सोऽकामो निष्काम इति" इत्यादिक श्रुतीने तापनीय उपनिषदांत उपासनेचे मोक्षरूप फळ सांगितलें आहे. ॥ १४१ ॥

उपासनस्य सामर्थ्याद्विद्योत्पत्तिर्भवेत्ततः ।
नान्यः पन्था इति ह्येतच्छास्त्रं नैव विरुध्यते ॥ १४२ ॥
शि० -उपासनेपासून मोक्षप्राप्ति होते असें आपण म्हणतां, त्यास "नान्या पंथाः" या श्रुतीचा विरोध येतो. गु० -तसा विरोध येत नाहीं. कारण उपासनेपासून साक्षात् मुक्ति होते, असें आमचे म्हणणें मुळींच नाही. तिचे सामर्थ्याने ज्ञान होऊन ज्ञानापासून मुक्ति होते. मग विरोध कसचा ? ॥ १४२ ॥

निष्कामोपासनान्मुक्तिस्तापनीये समीरिता ।
ब्रह्मलोकः सकामस्य शैब्यप्रश्ने समीरितः ॥ १४३ ॥
निष्काम उपासनेपासून मोक्षप्राप्ति होते असें तापनीय उपनिषदांत सांगितलें आहें. आणि सकामाला ब्रह्मलोक असे शैव्य प्रश्नांत सांगितलें आहे. ॥ १४३ ॥

य उपास्ते त्रिमात्रेण ब्रह्मलोके स नीयते ।
स एतस्माज्जीवघनात्परं पुरुषमीक्षते ॥ १४४ ॥
शैब्य प्रश्नांत असें सांगितलें आहे कीं, जो 'अँकाराची उपासना करतो तो ब्रह्मलोकास जातो; तो समष्टिरूप उपाधिपासृन मुक्त होऊन परम पुरषाप्रत पावतो. म्हणजे ब्रह्म होतो. ॥ १४४ ॥

अप्रतीकाधिकरणे तत्क्रतुर्न्याय ईरितः ।
ब्रह्मलोकफलं तस्मात्सकामस्येति वर्णितम् ॥ १४५ ॥
"अमतीकालंबनान्नयति" या बादरायणांच्या सूत्रांत क्रतुर्न्याय लाविला आहे. त्याचा अभिप्राय कामानुसारें करून फलप्राप्ति होते असें ठरतें. ॥ १४५ ॥

निर्गुणोपास्तिसामर्थ्यात्तत्र तत्त्वमवेक्षणत् ।
पुनरावर्तते नायं कल्पान्ते तु विमुच्यते ॥ १४६ ॥
शि० -मग त्यांना मुक्ति कशी ? गु० -त्या त्या निर्गुण उपासनेच्या सामर्थ्याने तत्त्वज्ञान होतें. पुनः संसारांत येत नाही. कल्पांती तो मुक्त होतो. ॥ १४६ ॥

प्रणवोपास्तयः प्रायो निर्गुणा एव वेदगाः ।
क्वचित्सगुणता प्रोक्ता प्रणवोपासनस्य हि ॥ १४७ ॥
वेदांमध्ये ज्या प्रणव उपासना सांगितल्या आहेत त्या बहुतेक निर्गुण आहेत. क्वचित् स्थली सगुण सांगितली आहे. ॥ १४७ ॥

परापरब्रह्मरूप ओङ्कार उपवर्णितः ।
पिप्पलादेन मुनिना सत्यकामाय पृच्छते ॥ १४८ ॥
पिप्पलादि मुनीने प्रश्न करणाऱ्या शिष्याला पर आणि अपर ( निर्गुणसगुण) असे दोन प्रकारच ब्रह्मरूप ॐकार वर्णिले आहेत. ॥ १४८ ॥

एतदालम्बनं ज्ञात्वा यो यदिच्छति तस्य तत् ।
इति प्रोक्तं यमेनापि पृच्छते नचिकेतसे ॥ १४९ ॥
"एतदालंबनम्" या वाक्याने जो जें इच्छील तें त्यास मिळतें, असें यमाने नचिकेताला सांगितलें आहे. ॥ १४९ ॥

इह वा मरणे वास्य ब्रह्मलोकेऽथवा भवेत् ।
ब्रह्मसाक्षात्कृतिः सम्यगुपासीनस्य निर्गुणम् ॥ १५० ॥
याकरितां उत्तम प्रकारें निर्गुण उपासना करणारा-ला या जन्मीं किंवा देहांतकाली किंवा ब्रह्मलोकीं ब्रह्मसाक्षात्कार होतो. ॥ १५० ॥



अर्थोऽयमात्मगीतायामपि स्पष्टमुदीरितः ।
विचाराक्षम आत्मानमुपासीतेति सन्ततम् ॥ १५१ ॥
आत्म-गीतेंतही हाच अभिप्राय सांगितला आहे. तेथें असें म्हटलें आहे कीं, विचार करण्यास ज्यांची बुद्धि समर्थ नाहीं, त्यांनीं एकसारखी सतत उपासनाच केली पाहिजे. ॥ १५१ ॥

साक्षात्कर्तुमशक्तोऽपि चिन्तयेन्मामशङ्कितः ।
कालेनानुभवारूढो भवेयं फलतो ध्रुवम् ॥ १५२ ॥
ज्याला साक्षात्कार होत नाहीं त्यानें निःशंकपणे माझें ध्यान केलें असतां काकेकरून त्याच्या अनुभवाला माझें स्वरूप येऊन त्यास खरोखर मोक्षरूप फळ मिळेल. ॥ १५२ ॥

यथागाधनिधेःलब्धौ नोपायः खननं विना ।
मल्लभेऽपि तथा स्वात्मचिन्तां मुक्ता न चापरः ॥ १५३ ॥
ज्याप्रमाणें जमिनींत खोल पुरून ठेवलेला ठेवा मिळण्याला खणण्यावाचून दुसरा उपाय नाही, त्याप्रमाणें माझ्या स्वरूपाची प्राप्ति व्हावी असें ज्याच्या मनांत असेल त्यानें आत्मध्यानच केलें पाहिजे; दुसरा उपाय नाहीं. ॥ १५३ ॥

देहोपलमपाकृत्य बुद्धिकुद्दलकात्पुनः ।
खात्वा मनोभुवं भूयो गृह्णीयान्मां निधिं पुमान् ॥ १५४ ॥
एथे मी हाच कोणी एक ठेवा आहे. त्याजवर बसविलेला देहरूप धोंडा काढून टाकून बुद्धिरूप कुदळीने मनोभूमी पुन: पुन : खणली असतां आत्मठेवा मनुष्यास मिळेलच मिळेल. ॥ १५४ ॥

अनुभूतेरभावेऽपि ब्रह्मास्मीत्येव चिन्त्यताम् ।
अप्यसत् प्राप्यते ध्यानान्नित्याप्तं ब्रह्म किं पुनः ॥ १५५ ॥
दुसरे वाक्याचे याविषयी प्रमाण आहे. तें असें कीं, जरी साक्षात्कार झाला नाहीं तरी ब्रह्मास्मि हें चिंतन सोडू नये. कारण, उपासनेच्या सामर्थ्यानें काष्ठपाषाणांत नसलेले देवपण देखील येतें. मग आयते असले ब्रह्मपण मिळेल हें सांगावयास नको. ॥ १५५ ॥

अनात्मबुद्धिशैथिल्यं फलं ध्यानाद्दिने दिने ।
पश्यन्नपि न चेद्ध्यायेत्कोऽपरोऽस्मात् पशुर्वद ॥ १५६ ॥
ध्यानापासून देहादिकांविषयींचा अभिमान दिवसेंदिवस क्षीण होतो असें प्रत्यक्ष अनुभवास येत असून जो ध्यानाची उपेक्षा करतो त्याहून दुसरा पशु कोणता ? सांग बरे ! ॥ १५६ ॥

देहाभिमानं विध्वस्य ध्यानादात्मानमद्वयम् ।
पश्यन्मर्त्यो मृतो भूत्वा ह्यत्र ब्रह्म समश्नुते ॥ १५७ ॥
ध्यानापासून या मरणशील देहाविषयीचा अभिमान जाऊन मनुष्य अमर होत्साता याच देही ब्रह्मप्राप्तीचा सोहळा भोगतो. ॥ १५७ ॥

ध्यानदीपमिमं सम्यक्परामृषति यो नरः ।
मुक्तसंशय एवायं ध्यायति ब्रह्म सन्ततम् ॥ १५८ ॥
इति ध्यानदीपो नाम नवमः परिच्छेदः ॥ ९ ॥
याप्रमाणे हा ध्यानदीप तुला सांगितला. जो मनुष्य चांगले याचे चिंतन करील तो सर्व संशय जाऊन सदोदित ब्रह्मज्ञानांत त्याचा काल जाईल. ध्यानदीपः समाप्तः ॥ १५ ॥