॥ श्रीपांडुरंग प्रसन्न ॥

श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अलौकिक चरित्र

भगवंत म्हणतात -
तेणेंसी आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र ।
परि तयाचें चरित्र । ऐकती जे ॥ ज्ञा. १२.२२६ ॥
तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें ।
जे भक्तचरित्रातें । प्रशंसती ॥ ज्ञा. १२.२२७ ॥

पूर्ववृत्तांत - श्रीमहाविष्णु भगवंताच्या चरणांपासून निघून भगवान् श्रीशंकरांच्या जटेंत प्रकटलेली ती गौतमऋषींच्या प्रार्थनेवरून नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वरक्षेत्राच्या लगतच्या ब्रह्मगिरीवरून वाहात आलेली गंगा तीच महानदी गोदावरी होय. तिच्या कांठी दक्षिणेकडील काशीक्षेत्र समजलेले असें फार पुरातनचे वसलेले एक महान् क्षेत्र, त्याचें नांव पैठण. इथून जवळच अदमासें चार कोसांवर, ज्याला पूर्वीं आपस्तंब क्षेत्र म्हणत तेंच आपेगांव. हेंही गोदावरी या महानदी तीर्थावरचें, म्हणून क्षेत्रांत गणले जाते. याच आपेगांवांत वत्सगोत्री माध्यंदिन शाखेचे यजुर्वेदी ब्राह्मणाचे बर्‍याच प्राचीन कालचें कुलकर्णवृत्तीचें एक घराणें. या घराण्यांत हरिपंतांचे पणतु त्र्यंबकपंत नांवाचे मोठे कुलदीपक गृहस्थ जन्माला आले. हेच आमच्या चरित्रनायकाचे म्हणजे श्रीज्ञानेश्वर महाराजांचे पणजोबा. ते पुढें लवकरच वेदशास्त्रसंपन्न झाले. आपल्या कुलकर्णपणाच्या कामांतही त्र्यंबकपंत हे अतिशय दक्ष असत. तसेच त्यांचा ते फार शूर व पराक्रमी असल्याचा लौकिक तेथल्या सर्व पंचक्रोशींत सर्वत्र विश्रुत होता. याच वेळीं भगवान् श्रीकृष्णाच्या वंशजातल्या यादव घराण्यांतला जयत्रपाळ नांवाचा अकराव्या शतकांतल्या मध्यांत मोठा धार्मिक, प्रजापालनदक्ष राजा राज्य करीत होता. त्याच्या कानापर्यंत त्र्यंबकपंतांच्या शूर व पराक्रमी स्वभावाची व लौकिकाची हकीकत गेलेली होती. म्हणून राजानें त्र्यंबकपंतांना दरबारी बोलावून घेऊन त्यांचेवर बीडप्रांताचा सर्व अधिकार पांच वर्षांच्या मुदतीचा सोंपवला, व त्याबद्दल त्र्यंबपंतांनी एकदम एकाच वेळी दहा हजार मुद्रा 'कर' म्हणून दरबारच्या खजिन्यांत भरावयाच्या होत्या. त्या त्यांनी भरल्यावर त्यांना राजाकडून अधिकार वस्त्रें पण लगेच देण्यांत आली. पुढें पांच वर्षेपर्यंत त्यांनी विशेष दक्षतेनें बीड राज्याचा कारभार चालवून सर्व प्रजाजनांचा मोठ्या जिव्हाळ्याचा व आदराचा लौकिक संपादून त्यांतून ते निवृत्त होऊन आपेगांवी येऊन राहिलें.

त्र्यंबकपंतांना गोविंदपंत व हरिपंत असे दोन मुलगे. त्यांपैकी धाकटे हरिपंत. हे सिंधणराजाचे सेनापति असून ते एका लढाईच्या हातघाईच्या प्रसंगांत कामी आले. त्र्यंबकपंतांच्या उतारवयांतल्या मानसिक स्थितीवर त्याचा फार परिणाम झाला. त्यांनी सर्व कारभार आतां त्यांचे थोरले चिरंजीव गोविंदपंतांच्यावर सोंपवला आणि आपण स्वतः श्रीगोरखनाथांच्या योगवैभवांतल्या सहवासांत तसेंच गुरुपरंपरेतल्या श्रीकृष्णाच्या उपासनेंतल्या आध्यात्मिक श्रवण मनन निदिध्यासनपूर्वक आत्मचिंतनांत सदैव घालवूं लागल्यानें पुढें पुढें ते अगदी स्थितप्रज्ञाच्या त्या उन्मनींतल्या अंतरंगांत निमग्न असत. तें इतकें कीं याच परिणत अवस्थेंत ते नंतर एका मोठ्या तुळशीवृंदावनांतल्या सारख्या जागेंत जिवंत समाधींत कायमचेच बसले. यांत त्यांच्या कंबरेपासूनचा वरचा भाग पिंडीसारखा व खालचा शाळुंका होऊन शिवलिंग बनत असलेला या तुळशीवृंदावनाच्या जीर्णोद्धारकालीं प्रत्यक्ष पाहिल्याचा अलिकडचा दाखला आहे.

त्र्यंबकपंतांच्या मागे त्यांचे चिरंजीव गोविंदपंत हे महान् भगवद्‍भक्त असून घरचे कुलकर्णपणही पहात असत. त्यांची भार्या नीरूबाई (नीरादेवी) ह्याही मोठ्या साध्वी होत्या. असें हें एक सात्त्विक जोडपें होते.

श्रीगोरखनाथांचे परमशिष्य श्रीगहिनीनाथ हें एकदां फिरत फिरत आपेगांवी आले. त्या वेळी त्यांनी गोविंदपंतांचा अधिकार पाहून त्यांना सोहंस्वरूपाची ओळख करून देऊन नाथपंथांतली श्रीकृष्णाची उपासना सांगून त्यांना कृतार्थ केले होते. तथापि त्यांना संतान नसल्यामुळे तीं उभयतां अगदी उदासीन असत. त्यासाठी त्यांना गहिनीनाथांनी सांगितल्यावरून त्यांनी गायत्री पुरश्चरण केलें आणि गायत्रीपुरश्चरणाच्या योगानें, गायत्रीदेवीच्या प्रसन्नतेमुळें गोविंदपंतांना नंतर पुत्रसंतान लाभले. त्याचे नांव विठ्ठल ठेवण्यांत आले. ज्योतिष्यांनी त्या वेळी भविष्यही वर्तविले होते कीं हा मुलगा मोठा तपस्वी व विरक्त राहील व याच्या वंशांत हरिहर, विधि अवतरतील. गायत्रीदेवीच्या प्रसादाचा प्रभाव असा कीं, लहानपणापासूनच या मुलाचें खाण्यापिण्याकडे किंवा खेळण्याकडे लक्ष नसून अखंड हरिभजनाकडेच लागलेलें दिसून येई. सातव्या वर्षी विठ्ठलाची मुंज झाली. नंतर पैठणास मातुलगृही त्याची अध्ययनास सुरुवात झाली. एक वेळ दिलेला पाठ लगेच त्याने मुखोद्‍गत म्हणून दाखवावा. विठ्ठलाची अशी उपजत ग्रहणशक्ति व तीव्रबुद्धि पाहून पैठणचे शास्त्रीपंडितही चकित होत. लवकरच ते वेदसंहिता षडंगपरायण होऊन न्याय, वेदांत, योग, सांख्य, मिमांसादि शास्त्रांत तसेच भारत, भागवत, योगविसिष्ठ व शारीरभाष्यांत पारंगत झालेले आणि अनेक गायत्री पुरश्चरणांच्यामुळें तेजःपुंज तपोनिष्ठ बनलेले परमविरक्त आत्मनिष्ठ असले विठ्ठलपंत आतां आपल्या घरी पैठणाहून आपेगांवी आले. गायत्री पुरश्चरणानंतर ब्रह्मचाऱ्यास तीर्थाटन अवश्य असल्याचें त्यांचे ध्यानी येतांच लगेच त्यांचा तीर्थयात्रेस निघण्याचा बेत झाला. वृद्ध आईवडिलांची परवानगी, तीही मोठ्या कष्टानें मिळवून ते लवकरच बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्या मातुश्री उद्‍गारल्या, "बाळ, आम्ही दोघेही आतां वृद्ध झालो आहोत, हें लक्षांत घेऊन लवकरच तूं आपली तीर्थयात्रा संपवून परतावें. वाटेंत तुला क्षुधा, तृषा, ऊन, वारा, पाऊस इत्यादि सर्व सोसावें लागेल, तरी नीट जपून असावे. संध्याकाळ होतांच पुढें प्रवास न करतां तिथेंच थांबून दुसऱ्या दिवशी सकाळीं पुढें जाण्याचे करावे, असो. आमची आठवण तुला असूं दे" असे म्हणून आईनें पंतांच्या पाठीवरून हात फिरवून त्यांस कुरवाळलें व गहिंवरून त्यांना यात्रेस जाण्याचा निरोप मोठ्या कष्टानें, पण दिला. मग मातापित्यांना वंदन करून पंत यात्रेस निघाले. पावलोंपावलीं श्रीहरीचें ध्यानपूर्वक मुखीं नामस्मरण करीत करीत मार्ग क्रमून ते लवकरच द्वारकेस पोंचले. येथें भगवंत द्वारकाधीशाची आनंदमय मूर्ति दृष्टीस पडतांच प्रेमाश्रूंनी त्यांचा कंठ दाटून आला. सर्वांगावर हर्षभरित रोमांच उभे असलेल्या स्थितींतच ते कांही काळ तसेच आनंदभरित अगदीं स्तब्ध अवस्थेंत होते. द्वारकेस तीन रात्र राहून नंतर पिंडारक, सुदामपुरी, प्रभासतीर्थ, सोरटीसोमनाथ करून सप्तशृंगीच्या भगवती देवीचे दर्शन घेऊन नाशिक पंचवटींतल्या रामरायाची भेट होऊन पुढें त्र्यंबकेश्वरीं कुशावर्तांत स्नान करून ब्रह्मगिरीस उजवी घालून तो ओलांडून ते भीमाशंकरावरून पंढरीस जाण्याच्या वाटेवरील आळंदीस येऊन थांबले. तिथें आल्यावर भगवान् श्रीशंकराच्या प्रसन्नतेनें इंद्रास वर मिळून झालेले तीर्थ इंद्रायणी ही प्रतिगंगाच असल्यानें इथें स्नान करणाराचें शरीर निर्मळ होऊन मनाला प्रसन्नता प्राप्त होते असे पुराणांतरी वाचल्याचे त्यांना स्मरले. आळंदीतले ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिद्धेश्वरमंदिरांतील सुवर्ण पिंपळालगतच्या एका ओंवरींत पंतांचा आतां मुक्काम झाला होता. दुसऱ्या दिवशी ते तेथून तीर्थस्नानादि उरकून पुढें पंढरीकडे निघणार होते.

आळंदीस सिद्धेश्वर ऊर्फ सिद्धोपंत नांवाचे चोवीस गांवचे वतनदार, मोठे संपन्न, सदाचारी, सत्पुरुषवृत्तीचे व परंपरागतचे कुळकर्णपण असलेले सद्‍ग्रहस्थ. त्यांची साध्वी भार्या उमाबाई. यांची एकुलती एक जिवलग सद्‍गुणी मुलगी रुक्मिणी. आपले नित्याचे ब्रह्मकर्म उरकल्यावर भोजनापूर्वीं सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन झाल्यावर तिथे कुणी एखादा पांथस्थ आला असल्यास त्याची विचारपूस करण्याचा सिद्धोपंतांचा नित्याचा क्रम असे. आज ते नित्याप्रमाणे मंदिरांत गेले असतां त्यांना कुणीतरी तेजःपुंज तपोनिष्ठ ब्रह्मचारी यात्रेकरी ध्यानस्थ असल्याचे आढळून आल्यावर ते तिथें कांही वेळ थांबले. नंतर विचारपूस होऊन त्यांची खात्री झाल्यानें त्या यात्रेकरूस त्यांनी जेवायचा बराच आग्रह करून आपल्या घरीं घेऊन गेले. जेवणाच्या वेळी विठ्ठलपंतांची ती अंतरंगी ध्यानस्थ वृत्ति पाहून व जेवणाखाण्याकडे त्यांचे विशेष लक्ष नसल्याचे दिसून येतांच हा मोठा शांत, गंभीर, सात्त्विक स्वभावाचा पण अत्यंत विरक्त पुरुष असावा असे सिद्धोपंतांचे ध्यानांत आले. आपली रुक्मिणी पण आतां अगदीं उपवर झाली असून तिला आज कित्यके दिवस योग्य वर शोधण्याचे आपलें चाललें आहेच. तरी हा वर तिला योग्य होईल आणि अनायासेंच योगही पण जुळून आल्यासारखें दिसत आहे. तरी ईश्वरी इच्छा काय असेल तसें घडून येईल, असो. जेवणानंतर विठ्ठलपंतांना त्यांच्या तीर्थयात्रेच्या प्रवासाची हकीकत सिद्धोपंतांनी विचारतांच ते उद्‍गारले, "पैठणजवळच्या आपेगांवचे आम्ही कुलकर्णी. आमचे गोत्र वत्स. आम्ही यजुर्वेदी माध्यंदिन शाखीय ब्राह्मण. माझें नांव विठ्ठल. घरीं वृद्ध आईवडील. वडिलांचे नांव गोविंतपंत व आईचें नांव नीराबाई. पैठणास माझें षडंगशाखाध्ययन व षट्शास्त्रांचेही अध्ययन झाले आहे. गायत्री पुरश्चरणानंतर ब्रह्मचाऱ्यास तीर्थयात्रा अवश्य असल्यानें त्याप्रमाणे यात्रेस निघालों असून येथून पुढें पंढरीस जाऊन रामेश्वरची यात्रा पुरी करून घरीं परतणार आहे". ही हकीकत ऐकून सिद्धोपंतांच्या मनाचा हा वर आपल्या रुक्मिणीला योग्य असल्याचा निश्चय झाला व याला त्यांच्या भार्येची व घरांतील व गांवांतील इतर मंडळीचीही संमति मिळाली. तथापि वराच्या बाजूनें इथें दुसरें कुणी त्याचे आप्त नाहींत व त्याचे आईवडील तर फारच दूरच्या अंतरावरचे. आणि लग्नाच्या तिथि तर संपत आल्या असून एकच व तीही शेवटचीच. अशा विशेष चिंतेंत ते असतांनाच त्याच रात्रीं त्यांना श्रीपंढरीरायाचा दृष्टांत झाला "हा वर तूं निश्चित करून यालाच आपली मुलगी द्यावी. हिच्या पोटीं हरि-हर-ब्रह्माचे अवतार जन्मास येणार आहेत." हा स्वप्नदृष्टांत सिद्धोपंतांनी दुसऱ्या दिवशीं उजाडतांच घरांतील सर्वांस तसाच तो विठ्ठलपंतांनाही सांगितला. त्यावर विठ्ठलपंत बोलले कीं मला तसा कांही दृष्टांत झाला नही. तथापि आमची यात्रा संपून झाल्यावर मग याचा विचार करतां येईल. पण दैवी घटना कांही निराळी असल्यानें विठ्ठलपंतांनाही त्या रात्री तुळशीवृंदावनाशी ते निजले असतांना श्रीपांडुरंगाचा दृष्टांत झाला कीं, "तूं सिद्धोपंतांच्या मुलीचें पाणिग्रहण करून मग यात्रेस जावें. हिच्या पोटीं हरिहरब्रह्मा अवतार घेऊन धर्मरक्षणाकरितां येणार आहेत." हा आपला दृष्टांत विठ्ठलपंतांनी दुसऱ्या दिवशी सकाळीं उठतांक्षणींच सर्वांना सांगून टाकला. त्यामुळें पुढें लगेच सिद्धोपंतांनी वधूवरपक्षाची दोन्हीकडील तयारी आपणच करून लग्नसमारंभाचा सोहळा अतिशय उत्साहपूर्वक चार दिवसपर्यंत मोठ्या थाटाचा केला.

याप्रमाणे विधिपूर्वक वेदीवर सप्तपदी होऊन वरानें पाणिग्रहण करून होतांच सिद्धोपंतांना धन्यता वाटली व ही सर्व कांही पंढरीरायाचीच घटना होय असे त्यांचे उद्‍गार निघतांच त्यांचे डोळे त्यामुळें आनंदाश्रूंनी भरून गेलेले सर्वांस दिसत होते. नंतर वैदिक, शास्त्री, आप्त‍इष्ट, स्नेहीजन व आश्रित लोक या सर्वांना यथाधिकार देकार देऊन सिद्धोपंतांनी त्याचा आदरपूर्वक सन्मान केला. पुढें लगेच आषाढी एकादशी निमित्त पंढरीस जाण्याची व नवीन लग्नकार्य घरांत झाल्यास जोडपें श्रीपांडुरंग दर्शनास नेण्याची परंपरागत चाल सिद्धोपंतांच्या घराण्यांत असल्याची, जामात विठ्ठलपंत यांचे कानावर त्यांनी घालतांच ते ही निघण्यास फार उत्सुक दिसले. त्याप्रमाणे सर्व मंडळीसह ठिकठिकाणी मुक्काम करीत करीत सिद्धोपंत पंढरीस येतांच रा‍उळांत श्रीपंढरीनाथ चरणीं कन्या जामाताची बडव्यांच्याकरवी भेट करविली. पुढें काल्यापर्यंत पंढरीस राहून सर्व सोहळा पाहून कन्या, भार्या व आश्रितजन या सर्वांसह ते आळंदीस येण्यास परतले. आणि विठ्ठलपंत आपल्या पूर्वीच्या संकेताप्रमाणे रामेश्वर यात्रेस सर्वांच्या संमतीने निघाले. शिवकांची, विष्णुकांची, गिरीचा बालाजी, सेतुरामेश्वर करून गोकर्ण महाबळेश्वरावरून परतून कोल्हापुरीं महालक्ष्मीचें दर्शन घेऊन माहुलीच्या संगमतीर्थीं स्नान करून आळंदीस येऊन पोंचले. ते येतांच त्यांचा सिद्धोपंतांनी मोठा सत्कार करून त्यांना राहवून घेतलें. तथापि मातापितरांच्या दर्शनास जाण्याची विठ्ठलपंतांनी आपली बरीच निकड दर्शवितांच सिद्धोपंतांनीही त्यांना प्रोत्साहन देऊन आपण सर्वच आपेगांवी जाऊं असें जावयास सांगितलें. आणि नंतर ती सर्व मंडळी आपेगांवास येऊन दाखल झाली. मग सिद्धोपंतांनी दृष्टांतापासूनची तें लग्नमुहुर्त अखेरचा अगदीं घाईचा तो साधण्यापर्यंतची सर्व हकीकत गोविंदपंतांना निवेदून आपली चूक झाल्याचें त्यांना मोठ्या आर्जवानें गहिंवरून सांगितलें व व्याही-विहिणींची क्षमा मागितली. सुनेला पाहून गोविंदपंतांना समाधान वाटले, आणि आश्वासून म्हणाले, " अहो तुमचे तसें आमचेंही पण तें लेंकरूंच कीं ! तरी आपल्या कन्येची आपण कांहीही काळजी करूं नका व झाल्या गोष्टी सर्व विसरून जा. जें कांही होत असते ते परमेश्वरी योजनेनेंच होत असतें. आपण मात्र निमित्त होत असतो, असो. " यानंतर सिद्धोपंतांनी व्याहीविहिणींचा व त्यांच्या आप्त-इष्टांचा देकारपूर्वक सन्मान करून चार दिवस राहून ते आपेगांवी परतले आणि सर्व कांही यथास्थित झाल्याचें समाधान वाटून ते निश्चिंत झाले होते.

विठ्ठलपंतांना आपेगांवी लोटून कांही दिवस झाले आणि सृष्टीक्रमानुसार त्यांची वृद्ध माता व पिता दोन्ही दिवंगत झालीं. आतां प्रपंचाचा भार त्यांच्या शिरावर पडला होता खरा. तथापि त्यांच्या ध्यानींमनीं सदासर्वदा श्रीपंढरीनाथाचें चिंतन असल्यानें व स्वभावतःच ते अगदीं विरक्त म्हणून त्यांचे लक्ष प्रपंचाकडे नसेंच. याचा परिणाम रुक्मिणींच्या मनावर फारच होऊन त्या अहोरात्र सचिंत असत. हें वर्तमान आळंदीस सिद्धोपंतांस कळतांच ते आपेगांवी येऊन जावयाची वृत्ति पाहून त्यांच्यासह कन्येला घेऊन आळंदीला आले. "आणि सर्व कांही श्रीपंढरीरायाच्या प्रेरणेनेंच होत असते, तरी त्याच्यावर विसंबून राहावें." असे सिद्धोपंतांनी सांगून रुक्मिणीचे समाधान केले. "प्रभु सर्व ठीक करील. तरी तूं कांही चिंता करूं नकोस." असे ते उद्‍गारले.

विठ्ठलपंतांचा आतांचा आळंदीस आल्यानंतरचा दररोजचा कार्यक्रम म्हणजे सकाळी प्रातःस्नानानंतर गायत्रीचा एक हजार जप, सूर्यनमस्कार, गीतापठण, भागवत, भारत, योगवसिष्ठ यांचे वाचन आणि "श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे " हे अहोरात्र मुखांत चाललेलेंच. ते दरसालच्या आषाढी कार्तिकेच्या पंढरीच्या यात्रेस जात. असा हा क्रम त्यांचा पुष्कळ वर्षें चालतच होता. पण आतां उतार वय होत चालल्याने संततीचा योग नाही असा निश्चय होऊन वाटूं लागलें कीं संन्यास घ्यावा, हे बरें. पण याला स्त्रीची संमति असावी लागते. म्हणून त्यांनी ही गोष्ट रुक्मिणींच्याजवळ एकदां काढून पाहिलेंही. "पुत्रसंतानावांचून पितृऋण फिटत नसते, यामुळें संन्यास घेतां येत नाही," असे रुक्मिणींनी निक्षून सांगितले. कांही दिवस थांबून नंतर विठ्ठलपंतांनी मधून मधून पण एकसारखा संन्यास घेण्याच्या परवानगीचा लकडा रुक्मिणींच्या पाठीमागें सुरूच ठेवला. तो इतका कीं एके दिवशी त्या अत्यंत घाईच्या कामांत असतांना विठ्ठलपंत म्हणाले कीं, "गंगास्नान करून येतो बरं कां !" " या, हं " असे त्या सहज नकळत बोलून गेल्या मात्र, की विठ्ठलपंतांनी दरकूच करीत करीत थेट काशीच्या श्रीपाद रामानंदस्वामींचा मठ गाठला. तिथें लग्न न झाल्याचा बहाण करून विठ्ठलपंतांनी थोड्याच दिवसांत श्रीपादस्वामींची मर्जी संपादून संन्यास ग्रहण करून चैतन्य नांव धारण केलेले ते स्वामी होऊन बसले.

आळंदीस रुक्मिणीबाई पतीची वाट पाहून पाहून दमल्या. आणि शेवटीं निरूपाय होऊन त्यांनी सिद्धेश्वर मंदिरांतील सुवर्ण अश्वत्थनारायणाची सेवा दररोज सकाळपासून तें दुपारच्या बारावाजेपर्यंत प्रदक्षिणा घालण्याची सुरुवात केली. एके दिवशी त्यांच्या कानावर विठ्ठलपंत काशीस असून संन्यास ग्रहण करून आहेत असें आलें व आपल्या नशिबीं पतिसुख नाहीं याचा त्यांना राहून राहून खेद वाटे. ही बातमी लगेच त्यांनी वडीलांच्या कानांवर घातली. त्यामुळें त्यांनाही फार दुःख होऊन पश्चात्ताप वाटूं लागला. तथापि रुक्मिणींनी दृढनिश्चयानें अश्वत्थसेवा चालविलीच होती. त्या अश्वत्थ नारायणास दररोज नाक घासून विनवीत कीं, "नारायणा, त्यांच्या ठिकाणचें तें तीव्र वैराग्य पार लोपून जाऊन त्यांनी पुन्हां संसाराकडे वळावे " हीच या अनाथ दासीची तुला हात होडून प्रार्थना आहे. साध्वी पतिव्रतेच्या या प्रार्थनेचा परिणाम पण अखेरीस झालाच.

काशीस श्रीपादस्वामींच्या मनांत एकाएकीं आलें कीं आपण रामेश्वर यात्रेस निघावें व त्याप्रमाणे मठाची सर्व व्यवस्था, त्यांची मर्जी संपादून विश्वासास पात्र झालेल्या चैतन्यावर सोपवून ते लगेंच शिष्यमंडळीसह संचारार्थ बाहेर पडून दर मुक्काम करीत करीत वाटेवरील आळंदीस अवचित सहजच येऊन पोंचले. इथें ते एका प्रसिद्ध मारुतीच्या मंदिरांत उतरले होते व याच मारुतीला रुक्मिणींचा दररोज दर्शनास जाण्याचा नियम म्हणून त्या आजही आल्या. त्या वेळीं त्यांना कुणी एक स्वामी दिसले म्हणून त्या स्वामींना वंदन करीत असतांच "पुत्रवती भव" म्हणून स्वामीमहाराज उद्‍गारले. तेव्हां रुक्मिणी ह्या आश्चर्यचकित होऊन संकोचल्यासारख्या दिसल्या. तेव्हां स्वामींनी कारण विचारतांच त्या उद्‍गारल्या, "आज बारा वर्षे झाली पतिदेवाचा पत्ता नाही. तथापि ते काशीस श्रीपादस्वामींच्या कडून संन्यास घेऊन असल्याचें नुकतेंच ऐकले. " तात्काळ स्वामींच्याही लक्षात येऊन चुकलेंच कीं, "चैतन्य म्हणून जो तोच हा." असा निश्चय होऊन स्वामींनी रामेश्वर यात्रेचा बेत रहित करून सिद्धोपंतांची गांठ घेऊन ते रुक्मिणीसह काशीस तसेच परतले. सिद्धोपंत व रुक्मिणी यांची उतरण्याची व्यवस्था लावून स्वामींनी चैतन्यास पुकारून खरी कहीकत काय आहे हें सांगण्यास मोठ्या रागाच्या आवेशानें विचारलें असतां चैतन्यांनी सर्व खरी हकीकत सांगून झाल्यावर सिद्धोपंतांना बोलावून रुक्मिणीला चैतन्यांच्या स्वाधीन करून स्वामी म्हणाले, "स्वस्त्रीची आज्ञा नसतांना घेतलेला संन्यास शास्त्रविरुद्ध ठरतो. म्हणून तूं खुशाल गृहस्थाश्रम स्वीकारून राहावें. व हिच्या पोटी 'हरिहरब्रह्मदेव' अवतरून येणार आहेत' , अशी पुढील भविष्याची त्यांस जाणीव करून दिल्यानंतर ती सर्व मंडळी आळंदीस येऊन दाखल झाली. त्या आधींच विठ्ठलपंतांनी संन्यास घेतलेला तो टाकून देऊन पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्याची बातमी आळंदीस येऊन पोंचली होती. त्यामुळे सिद्धोपंत गांवी येतांच त्यांच्यावर बहिष्कार घालण्यांत येणार असल्याचे त्यांस व विठ्ठलपंतांना कळतांच विठ्ठलपंतांनी आपण होऊनच सहकुटुंब गांवाबाहेर सिद्धबेटांत राहण्याचे ठरविले आणि ते तसे निघाले. तिथे त्यांनी झाडाच्या फांद्यांच्या लाकडांची, पानांनी आच्छादलेली एक झोंपडी तयार करून तींत उभयतां राहूं लागले. तरीसुद्धां ते कोरान्न भिक्षेस गांवांत जात त्यावेळी त्यांची उघड उघड तोंडावर निंदा होऊन त्यांना छळ सोसावा लागल्याने त्यांचे फार हाल होत. पुरेशी भिक्षा मिळत नसे. म्हणून कधीं नुसत्या पाण्यावर तर कधीं रानांतल्या कंदमुळें फळांवर ते दिवस काढीत. असे काही दिवस जातांच रुक्मिणींच्या ठिकाणी गर्भधारणा झाली. नऊ महिने पुरे होतांच त्या पुत्ररत्न प्रसवल्या. ते प्रत्यक्ष शंकर भगवानच अवतरून येणार असल्याचे आधींच विठ्ठलपंतांना व रुक्मिणींना स्वप्नांतल्या दृष्टांताने सूचित झाले होतें. म्हणून त्यांनी या सुंदर तेजःपुंज मनोहर बाळाचे नांव 'निवृत्ति' ठेवले. हा दिवस माघ वद्य प्रतिपदा, सोमवार, प्रातःकाळ, श्रीमुख संवत्सर शके अठराशें नव्वद असावा. दुसरे अपत्य श्रावण, वद्य गोकुळ अष्टमी, गुरुवार, मध्यरात्र, युवानाम संवत्सर, शके अकराशे त्र्याण्णवांत जन्मले. ते भगवान महाविष्णुच प्रत्यक्ष अवतरून आलेले. या बाळाचे नांव दृष्टांताप्रमाणे `ज्ञानदेव' ठेवण्यांत आले. तिसरे अपत्य जन्मले तो दिवस कार्तिक, शुद्ध पोर्णिमा, रविवार, प्रहररात्र, ईश्वरनाम संवत्सर, शके अकराशे शाण्णव. हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवच प्रकटलेले. यांचे नांव 'सोपान'. चवथ्या भगवती चित्कला `मुक्ताबाई' नांवाने प्रसिद्धी पावल्या. हा दिवस आश्विन शुद्ध प्रतिपदा, शुक्रवार, मध्यान्ह, प्रमाथिनाम संवत्सर, शके अकराशें नव्याण्णव. हे शक ज्ञानेश्वरीचे लेखक सच्चिदानंदबाकृत 'ज्ञानेश्वरविजय' यांतील आहेत.

ज्ञानेशो भगवान् विष्णुः निवृत्तिर्भगवान् हरः ।
सोपानो ब्रह्मदेवश्च मुक्ताख्या चित्कला च सा ॥
ऐसी इच्छेसारखीं बाळें । बालार्कसम तेजाळें ।
पाहुनी मातापित्यांचे डोळे । भरती सदा आनंदे ॥ १ ॥
असो संतति जन्मली भली । मातापिता सुखावली ।
परी झाली जातीवेगळी । म्हणुनी कष्टी उभयतां ॥ २ ॥
कांही सुचेना पुढील उपाय । तिळतिळ तुटे त्यांचे हृदय ।
मुलांचा उपनयन समय । सन्निध येत चालला ॥ ३ ॥
मग ब्रह्मसभा मेळविली । वर्तली मात जाणविली ।
गुर्वाज्ञेनें मज घडली । प्रपंचस्थिती यति म्हणे ॥ ४ ॥

यावर सभास्थानी जमलेल्या वैदिक, शास्त्री, पंडित, धर्मनिष्ठ, तपोनिधि तसेंच ब्रह्मनिष्ठ, तत्त्ववेत्ते अशा सर्व अधिकारांच्या ब्रह्मवृंदांनी सर्व शास्त्रार्थाचा साधक बाधक विचार करून मग एकमतानें आपला निर्णय विठ्ठलपंतांना सांगण्यांत आला - "तुम्ही एकदां गृहस्थाश्रम सोडून विधिपूर्वक संन्यास घेतल्यानंतर त्या यतिधर्माचा त्याग केव्हांही करतां येत नाही. तो तुम्ही टाकून देऊन पुन्हा गृहस्थी झालांत; हें करणे अत्यंत निंद्य असून तुमचे कडून हे घोर पातक घडलें आहे म्हणून याला देहांतप्रायश्चित्त घेण्याखेरीज अन्य उपाय नाहीं. प्रयागतीर्थीं गंगाप्रवेश करून मुक्त होणें, हेंच एक प्रायश्चित्त."

ब्रह्मवृंदांचा हा कठोर निर्णय कानीं पडतांच विठ्ठलपंतांनी सर्वतोपरी त्रस्त होऊन स्त्रीमुलांसह वर्तमान आळंदीक्षेत्र सोडून ते त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीस जाऊन त्याला सर्वांच्यासह प्रतिदिनीं एक प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. असा कांही दिवस क्रम चालला होता. एके दिवशी प्रदक्षिणा करते समयी एका वाघाच्या डरकाळीनें सर्वच भयभीत होऊन पांगले असतांना त्या निवृत्तिनाथांना एक गुहा दिसली. तींत आंत प्रवेश करतांच तिथें गहिनीनाथ सहजावस्थेंतल्या परमानंदांत एकासनीं स्थित होते. त्यांना साष्टांग प्रणिपात करून हात जोडून निवृत्तिनाथ उभे असतांना प्रार्थना करून म्हणाले -


म्हणे मी बाळ अल्पमती । उपदेशावी योगमुक्ति ।
जेणें मज स्थितप्रज्ञस्थिति । प्राप्त होये सवेग ॥ १ ॥
मग सप्तदिनपर्यंत । पाजिले त्यासि तत्त्वमस्यादि बोधामृत ।
निवृत्ति झाला योगी पूर्ण ज्ञानवंत । गुरुकृपें करूनी ॥ २ ॥
श्रीकृष्णाची उपासना । करावी ऐसे निवृत्तीच्या मना ।
बिंबवूनि धाडिला स्वस्थाना । गहिनीनाथें तयासी ॥ ३ ॥
हेंचि तत्त्वज्ञान पुढती । आपुल्या सहोदरांप्रती ।
उपदेशावें त्वां निगुती । ऐसे तया आज्ञापिलें ॥ ४ ॥

अशा रीतीनें गहिनीनाथांच्या सहवासांत त्या गुहेंत निवृत्तिनाथ सात दिवस राहून तेवढ्या अवकाशांत त्यांची कुंडलिनी जागृत होऊन प्राणस्थैर्यानें मनोजयामुळें त्यांना अंतर्मुखता प्राप्त झाली व सद्‍गुरुकृपाकटाक्षद्वारां ते उन्मत्त बनले ते कायमचेच. आणि हाच आमचा प्रसाद भावंडांना पोंचव अशी त्यांना गहिनीनाथांनी शब्दशक्ति पण देऊन ठेवली होती. नंतर गहिनीनाथांची आज्ञा होऊन ते गुहेबाहेर येतांच त्यांना अंतर्ज्ञानानें आपली मातापितरें व भावंडे ज्या ठिकाणीं होतीं तें कळल्यानें ते नेमके तिथें गेले. मग निवृत्तिनाथांची सर्वांशी भेट होतांच सर्वांना खूप संतोष झाला. नंतर निवृत्तिनाथांनी गहिनीनाथ कसे भेटले आणि त्यांचेकडून कसा उपदेश मिळाला हा सर्व वृत्तांत सांगितला. ही शुभ वार्ता ऐकून तर सर्वांचा आनंद द्विगुणित झाला. यावर सर्वांना उद्देशून विठ्ठलपंत म्हणाले कीं देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी मी आतां प्रयागास जात आहे. तरी तुम्ही सर्वांनी आपल्या जन्मभूमीस आळंदीस जावे. तेव्हां रुक्मिणी म्हणाल्या जिकडे पतिदेव जातील तिकडे मीही जाणार. विठ्ठलपंत मग त्र्यंबकेश्वर सोडून आपल्या चारी मुलांना घेऊन वाराणसींस जावयास निघाले. मग वाटेंत आपेगांवी आपली चारी मुलें ठेवून `यापुढें मुलांच्या दैवांत जसे असेल तसें घडेल' असा विचार करून आपेगांवाहून रुक्मिणी देवींच्यासह प्रयागाकडे निघाले व तिथें त्या दोघांनी एकदम गंगाप्रवेश करून ते दोघे जलतत्त्वरूप असे आपोनारायण झाले.


आपेगांवी ब्रह्मवृंदसभेस निवृत्तिनाथ प्रार्थून म्हणाले कीं, "आतां आमची गति काय ?" त्यावर मग विचारविनिमय करून निर्णय होईना तेव्हां ब्रह्मवृंदांनी एक पत्र देऊन "हे पैठण क्षेत्रीच्या ब्रह्मवृंदांना दाखवा, तेच निर्णय करतील" असे सांगितले. त्याप्रमाणें आपेगांवच्या ब्रह्मवृंदांचे पत्र घेऊन हीं भावंडे पैठणक्षेत्री आल्यावर आपल्या आजोळच्या घरीं उतरलीं आणि लगेंच तें आपेगांवचें आणलेले पत्र पैठणच्या ब्राह्मणसभेस दाखविलें. त्यांनी सांगितले "तुम्हांस असल्या पातकाचे प्रायश्चित्ताचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे `हरिभक्ति' करणे. त्यायोगेंच तुम्ही सद्‍गती पावाल असा हा एकच विधि दिसतो आहे." हें ऐकून चारी भावंडांचे हृदय आनंदाने उचंबळले, कारण त्यांच्या दृष्टीनें त्यांना जे प्रिय होते तेंच त्यांना मिळाले.


नंतर ही भावंडे आपल्या आजोळच्या बिऱ्हाडीं परत जाण्यास निघण्याच्या बेतांत असतांना तेथल्या एका ब्राह्मण सभासदानें या मुलांना त्यांची नांवे काय म्हणून सहज कौतुकानें विचारले. निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता अशी मोठमोठी नांवे ऐकतांना त्याच वेळी तिथून एक पखालवाहक रेडा चालला होता. त्याला पाहून एकानें चेष्टेनें ज्ञानदेवास म्हटले कीं या रेड्याचेंही नांव `ज्ञाना-ग्याना' असें आहे. तुमची नांवे तर थोर थोर आहेत. ह्या रेड्याचेही नांव `ज्ञाना' आहे मग याच्या मुखी वेद म्हणवून दाखवा बघू. ज्ञानदेव म्हणतात, "सर्व देहांतील आत्मा तर एकच आहे, मग याने ऋग्वेद म्हणावा यांत विशेष असे काय ? " तेव्हां दुसरा एक पंडित बोलला, "निश्चितच चैतन्य सर्वगत आहे. पण त्याचा कांहीतरी अनुभव यायला पाहिजे ना ? " असे म्हणून त्याने पखालवाल्याचा आसूड घेऊन रेड्यास तडाखे मारूं लागतांच त्याचे सर्व वळ मात्र ज्ञानोबांच्या पाठीवर उमटून दिसूं लागले. सर्व विप्रवृंद हे नवल पाहून आश्चर्यचकित झाले. तरीपण त्यांचे समाधान होईना. त्यांनी रेड्याचे मुखांतून वेदध्वनि काढून दाखवावे अथवा आपले नांव सोडून द्यावे असे सांगितलें. ज्ञानदेवांनी रेड्याच्या पाठीवरून हात फिरविला आणि म्हणाले "ज्ञाना, यांना वेद म्हणून दाखव ना ?" पशु तो, पण त्यानें जेव्हां ऋगेदाच्या प्रथम अष्टकांतील प्रथम सूक्त 'अग्निमिळे पुरोहितं' म्हणायला सुरुवात केली आणि त्या पाठोपाठ यजुर्वेदांतील व सामवेदांतील ही काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. रेड्याच्या मुखातून निघणाऱ्या ऋचा इतक्या सुस्वर होत्या कीं तेथील कित्येक विप्र देखील त्याप्रमाणे म्हणण्यास असमर्थ होते.


अशा प्रकारचा तो रेड्याच्या मुखांतून वेदघोष एकसारखा अस्खलित एक प्रहर चाललेला पाहून त्या सर्व पंडितांचा गर्व हरण होऊन ते त्या आश्चर्यानें अगदीं लज्जित होऊन गेले. सभेतील थोर विप्रही म्हणूं लागले कीं हे विधिहरिहर, देवांचे अवतार आहेत यांत शंकाच नाही. साक्षात विष्णुच अवतार घेऊन श्रीज्ञानदेवांच्या रूपाने प्रकट झाले आहेत. अशा ईश्वरविभूति यांना आतां शुद्धिपत्र देऊन पावन करण्याचें कोणास सामर्थ्य आहे ? यावर श्रीज्ञानदेव मोठ्या आदरयुक्त लीनतेनें उद्‍गारले कीं हा सर्व महिमा आपल्या सर्व सज्जनांच्या कृपेचाच होय.


ऐशी ऐकुनी विप्रभाषणें । तयांसी ज्ञानदेव म्हणे ।
केवळ आपल्या आशिर्वचनें । घडले असें समग्र ॥

ज्ञानदेवांचे तें दैवी तेज प्रत्यक्ष अवलोकून त्या सर्व अधिकार संपन्न ब्राह्मण सभासदांची पूर्ण खात्री होऊन गेल्यानें त्यांनी ज्ञानदेवांची समक्ष प्रार्थना केली कीं आम्हां ब्रह्मवृंदांस आत्मदर्शनाचा लाभ होण्याविषयींचे आपल्याकडून मार्गदर्शन व्हावें. "कुंडलिनी जागृत होऊन प्राणाचा प्रवेश सुषुम्नेंत झाल्यानें भृकुटींतल्या अंतरांतल्या मनोजयामुळें साहजिकच लाभणारें आत्मसुख प्राप्त व्हावें" अशी त्यां पंडितजनांनी आपली अपेक्षा असल्याचें ज्ञानदेवांना दर्शविलें. त्या सर्व पंडितांच्या आग्रहावरून -

असें भक्तिमार्गीं जन । लावावया प्रतिदिन ।
ज्ञानदेव कीर्तन पुराण । करूं लागले त्या स्थळी ॥ १ ॥
भागवत योगवसिष्ठ । गीता ब्रह्मसूत्र ग्रंथ श्रेष्ठ ।
वाचुनी पुराण उत्कृष्ट । ज्ञानेश्वर सांगती ॥ २ ॥
ऐसा कीर्तनपुराण द्वारें । भक्ति आणि योगपंथ ज्ञानेश्वरें ।
संस्थापिला त्यासि अत्यादरें । जन सारें अनुसरलें ॥ ३ ॥

आतां या सर्व भावंडांचा प्रभाव लक्षात घेऊन पैठणांतल्या साऱ्या ब्रह्मवृंदांनी सभा भरवून एकमतानें शुद्धिपत्र लिहून तें त्यांचा मोठ्या उत्साहपूर्वक गौरव करून निवृत्तिनाथांच्या हातीं देऊन आदरयुक्त प्रेमानें अर्पण केलें, तेव्हां निवृत्तिनाथांनी ते मोठ्या नम्रतेनें शिरसा वंदिले आणि ते उद्‍गारले - आपण म्हणतां तसे कसलेंच सामर्थ्य आमच्या अंगी नाही. हा सर्व आपल्या संतजनांच्या चरणांचा महिमा आहे जो खुद्द ब्रह्मदेव सुद्धां जाणत नाही. पैठणक्षेत्रीचा हा रेड्यामुखी वेद बोलवल्याचा दिग्‍विजय सर्वत्र महशूर झाल्यामुळे या अवतारी महात्म्यांच्या दर्शनास झुंडीच्या झुंडी लोटूं लागल्या. आता ही मंडळी नेवाशाला निघण्याच्या बेतांत असतांनाच ज्यांच्या घरी ते उतरले होते, तिथें दुसऱ्या दिवशीं श्राद्ध होतें. पण संन्याशाचीं मुलें घरांत ठेवणाऱ्या त्याला गांवच्या कांही टवाळ्यांच्या कडून त्या श्राद्धाला ब्राह्मण मिळूंच नयेत अशी मोठी खटपट झाली होती. हे ज्ञानेश्वर महाराजांस कळतांच त्यांनी स्वर्गलोकांतून त्या ब्राह्मणाच्या पितरांना आमंत्रण देऊन मग प्रत्यक्ष पितरच येऊन जेवून गेले. हे सर्व टवाळखोर लोकांनी दाराच्या फटींतून अवलोकिल्यामुळें तर सर्वांची आतां तर या विभूतिसंबंधींची त्यांच्या ठिकाणी कर्तुमर्तुम् सामर्थ्य असल्याची पूर्ण खात्री होऊन ते सर्वच ज्ञानदेवांच्या आतां भजनी लागलें. असा हा भक्ति-ज्ञान-वैराग्याचा सोहळा थाटून तेथल्या पैठणच्या आबालवृद्धांचा निरोप घेऊन ही मंडळीं नेवाशास वेद पढलेल्या `ग्यान्या' रेड्यासह येऊन पोंचली. "पैठणीचे नारी नर । दुःखित झाले अपार । ज्ञानेश्वर गेले दूर । हळहळ सर्वांसी लागली ॥" असो.

नेवाशास येऊन उतरल्यावर यांच्या मुक्कामाच्या ठिकाणावरून एक स्त्री पतीच्या प्रेताबरोबर सहगमन करीत असलेली तिनें या दिव्यमंडळीस पाहतांच पुढें येऊन वंदन केलें. म्हणून ज्ञानदेवांनी `पुत्रवती भव' असा तिला आशिर्वाद देतांच तिने पतीच्या प्रेताकडे बोट करून दर्शविले तोंच श्रीज्ञानदेव प्रेताजवळ जाऊन त्याचें नांव विचारतांच -

शवाचें नांव सच्चिदानंद । ऐकूनी झाले ज्ञानदेव सखेद ।
काय सत्-चित्-आनंद । प्रेतरूप जाहला ॥ १ ॥
मग निकट जाऊनी ज्ञानदेव । चाळवूनी पाहिलें शव ।
तव देह जाहला सजीव । उठूनी उभा राहिला ॥ २ ॥
ज्ञानेश्वरीचा लेखक । म्हणौनी ज्याचा उल्लेख ।
त्यां ग्रंथांती केला सकौतुक । सच्चिदानंदबाबा तोच हा ॥ ३ ॥

श्रीज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या अखेरीस त्यांचा उल्लेख असा केला आहे -
"शके बाराशते बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें ।
सच्चिदानंदबाबा आदरें लेखकु जाहला ॥ ";

नेवाशास मोहनीराज म्हणून प्रसिद्ध असलेली श्रीम्हाळसादेवी - तिचें वर्णन ज्ञानेश्वरीत आलेले ते - त्रैलोक्यांत पवित्र व अनादि पंचक्रोश क्षेत्र नेवासे, ज्या ठिकाणीं सर्व जगताचें जीवनसूत्र श्रीमोहनीराज आहेत - "त्रिभुवनैक पवित्र । अनादि पंचक्रोश । जेंथ जगाचें जीवनसूत्र । श्रीमहालया असे ।" या मंदिरांत याच सच्चिदानंदबाबांच्या लेखणीतून भगवान श्रीज्ञानेश्वर महाराजांनी अभूतपूर्व अलौकिक अशा `ज्ञानेश्वरी' व `अमृतानुभव' या दोन्ही ग्रंथांची निर्मिती केली. श्रीकृष्णप्रभूच्या भगवद् गीतेंतल्या त्या त्या भूमिका आणि ते भाव अतीव स्पष्ट करणारी ती ज्ञानेश्वरी, आणि श्रुतींच्या अर्थाचा विरोधपूर्वक विपर्यास होत असलेला त्याचा परिहार करून एकवाक्यतेनें समन्वय करणारा ग्रंथ अमृतानुभव तो हा अमृतानुभव होय. नेवाशास महान् महान् तपस्वी, योगी, भक्त, ज्ञानी, विरक्त, हंस, परमहंस, संन्यासी, जीवन्मुक्त अशा मोठ्या थोरल्या मेळाव्यांत चर्चापूर्वक या प्रासादिक ग्रंथांची निर्मिती झाली. पुढें नेवाशाहून या विभूति आळंदीस येत असतां वाटेंत अळ्यास आल्यावर `ग्यान्या' रेड्याचें देहावसान झालें म्हणून त्यास श्रीज्ञानराजांनी स्वहस्तें समाधी दिली. तो आजपावेतो नवसास पावणारा असा त्या गांवची देवतांच झालेला आहे. तिथें आतां श्रीज्ञानेश्वरमहाराजांची मनोहर सुबक संगमरवरी मूर्ति मुद्दाम जयपूरहून तयार करवून आणून या `ग्यानी' देवाच्या समाधीचा जीर्णोद्धार नुकताच आळ्यास झाला त्या वेळीं गांवकरी मंडळींनी ती मोठ्या समारंभानें बसविली. या बालसंत मंडळींनी पैठणास मोठा दिग्विजय करून शुद्धिपत्र मिळविल्याची बातमी आळंदीस आधींच येऊन पोंचली असल्याने सर्व लहानथोर आळंदीकर त्यांना मोठ्या उत्साहपूर्वक सामोरे जाऊन अगदीं थाटाच्या मिरवणुकीनें त्यांना गांवांत आणलें व त्यांच्या सन्मानार्थ सर्व गांवभर दिवाळीसारखा समारंभ झाला.

आळंदीस येऊन कांही दिवस झाल्यावर पुढें दिवाळीचा सण आला. त्यानिमित्त मांडे खाण्याची श्रीनिवृत्तिनाथांना इच्छा झाली. म्हणून त्यासाठी डेरा लागतो, तो आणण्याकरितां मुक्ताबाई कुंभारवाड्याकडे जात असतां वाटेत विसोबा खेचर या अत्यंत कर्मठाची गांठ पडतांच त्यानें अगदीं रागाच्या आवेशांत येऊन संन्याशाची पोरटी म्हणून मुक्ताबाईंना ताकीद देऊन परतविले, त्यामुळें त्यांना अतिशय वाईट वाटले. ती हकिकत ज्ञानदेवांना कळतांच त्यांनी योगबलानें आपली पाठ लाल करून त्यावर मुक्ताबाईंनी लगेच मांडे भाजून तयार करून ते निवृत्तिनाथ महाराजांना यथेच्छ वाढून ते अगदीं तृप्त झालें. हें सर्व विसोबांनी दाराच्या फटींतून पाहिलें, तोंच त्यांची पुण्य फलोन्मुख भावना जागृत झाली. ते एकदमच जोरानें दार उघडून आंत प्रवेशून भानरहित अशा अवस्थेंत जें कांही अवशेष `प्रसाद' म्हणून मिळाले ते भक्षण करीत असतांनाच श्रीज्ञानेश्वर "परता सर खेचरा" - "चिदाकाशांत प्रवेशून राहणारा ऐस" - असें उद्‍गारतांच तीच विसोबांची कायमची अवस्था होऊन गेली. पुढें ते औंढ्या नागनाथीं असतांना नामदेवांना यांनीच कृतार्थ केले.

पैठणक्षेत्री रेड्याच्या मुखांतून श्रीज्ञानेश्वरांनी एक प्रहरपर्यंत वेदांतील अनुवाक अस्खलित बोलविल्याचे आश्चर्य एका यात्रेकरी ब्राह्मणानें प्रत्यक्ष पाहिल्याचे तो चांगदेवांच्या गांवी गेला असतां त्यांना तें ऐकविलें. तेव्हां चांगदेवानें अंतर्दृष्टीने पाहतांच त्यास समजले कीं, हे हरिहरब्रह्मा अवतरून आले आहेत. म्हणून त्यांचे दर्शनास जाण्याची त्यास तात्काळ उत्सुकता लागली. तथापि आधीं पत्र पाठवून खुलासा मागवावा म्हणून हातीं कागद घेतला, तोंच त्यांच्या मनांत आलें कीं नमस्कार लिहावा तर आपण चौदाशें वर्षांचा. म्हणून आशीर्वाद लिहावा तर त्या तर सर्व थोर विभूति. तेव्हां अशा गोंधळलेल्या अवस्थेत त्याने शिष्याहातीं कोराच कागद पाठविला असतां तो आळंदीस येतांच त्याला प्रथम भेटल्या त्या मुक्ताबाईच. त्यांनी तो कोरा कागद तसाच श्रीज्ञानेश्वरमहाराजांना दाखवून त्या उद्‍गारल्या कीं दादा, हा चौदाशें वर्षांचा योगी अजून कोराच राहिलेला दिसतो. हें वर्तमान निवृत्तिनाथांनी ऐकतांच ते ज्ञानराजांना बोलले कीं चांगदेवाला बोधपर उत्तर पाठवावें. तो बोध श्रीज्ञानेश्वरांनी पांसष्ट ओव्यांत केलेला असून त्यालाच 'चांगदेव पासष्टी' म्हणतात. चांगदेवाला हें पासष्ट ओव्यांचे पत्र मिळतांच त्याचा अर्थ कळावा म्हणून तो आपल्या नेहमींच्या डहाण्या व्याघ्रवाहनावर आरूढ होऊन हातांत मोठ्या नागाचा आसूड घेतलेला आपल्या चौदाशें शिष्यांसह आळंदीस ज्ञानदेवांच्या दर्शनास येऊन पोंचला. सकाळची वेळ असल्यामुळें हीं भावंडें एका लहानशा भिंतीवर ऊन खात बसलेली असतांनाच चांगदेव येत असल्याचे समजले. म्हणून त्याला आडवें जाण्यासाठी ज्ञानदेवांनी त्या भिंतीलाच म्हटलें, "चल बये", तोंच ती तुरू तुरू चालू लागून चांगदेवाला सामोरी झाली. हे दृष्य चांगदेवानें पाहून तो फार खजील होऊन त्यानें त्या आक्राळ व्याघ्रावरून चटकन् खालीं उतरून त्या बालविभूतींना साष्टांग घातलें. तेव्हां -

ऐसी चांगदेवाची अहंता दूर । सांडूनी गेली त्याचें शरीर ।
ज्ञानदेवें फिरविला कर । त्याच्या देहावरोनी ॥ १ ॥
पांसष्टीचा तुज भावार्थ । मुक्ताबाई करील व्यक्त ।
तरी तियेसी तुवां त्वरित जाऊंनिया प्रार्थावे ॥ २ ॥
मग मुक्ताबाईनें पांसष्टीचा अर्थ विशद । करूनी केला त्यासी अर्थ बोध ।
चांगया पावे परमानंद । कृतार्थ झालों बोलिला ॥ ३ ॥
 

पंढरीस दरसालच्या कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्रीज्ञानेश्वरादि संतमंडळी जमून काला झाल्यावर श्रीपंढरीनाथ चरणीं काशीयात्रेला नामदेवांना घेऊन जाण्याचा आपला मानस ज्ञानराजांनी निवेदिला. तेव्हां मोठ्या कष्टानें देवानें नामदेवास ज्ञानदेवांच्या बरोबर जाण्याचा निरोप दिला.

"जीवनमुक्त जरी झालें पावन । तरी देवतीर्थ भजन न सांडिती ॥" याप्रमाणे देवाची आज्ञा घेऊन ही संत मंडळी द्वारकेस श्रीकृष्णदर्शन घेऊन प्रभास, उज्जयनी, प्रयागावरून काशीक्षेत्रीं आली. तिथें मनकर्णिकेच्या घाटावरील मुद्‍गलाचार्यांनी चालविलेल्या यज्ञांतल्या अग्रपूजेचा मान कोणास द्यावा या वादाचा निर्णय हत्तिणीनें त्या समारंभांतल्या समुदायांतील श्रीज्ञानेश्वरांच्या गळ्यांत नेमकी माळ घातल्यानें वाद आपोआपच मिटून अग्रपूजेचा मान श्रीज्ञानेश्वरांना मिळून तो यज्ञसमारंभ पूर्ण झाला. नंतर ही मंडळी पंजाबांतल्या आज ज्या अमृतसरच्या शिखांच्या गुरुसाहेबग्रंथांत गुरुनामदेवांचा उल्लेख आहे, त्या शिखांच्या सुवर्णमंदिरास भेट देऊन दिल्ली, मथुरा पाहून मारवाडांतून परत येत असतां वाटेंतल्या अतिशयच खोल विहिरीचे पाणी तें आंत उतरून पिण्यास कठीण म्हणून नामदेवांनी धांवा करतांच तें वर उचंबळून येऊन त्यानें सर्व तृप्त झाले.

महाशिवरात्रीच्या रात्रीं औंढ्यानागनाथीं नामदेवांचे कीर्तन चालूं असतांना तें नागनाथास महारुद्राचा अभिषेक करीत असलेल्या वैदिकांनी त्यांना अडथळा होतो म्हणून मंदिराच्या पिछाडीला करण्यास सांगितलें. म्हणून नामदेव कीर्तनास मागील बाजूस वळून गेले आहेत तोंच सर्व मंदिरच गरकन फिरून नामदेवांसमोर झालें, तें अद्यापही तसेंच आहे. नंतर ही संतमंडळी यात्रा परिपूर्ण होऊन पंढरीस आल्यावर एक मोठें थोरलें मांवदें झालें. (मी यात्रा केल्याचें "मा वद" - बोलूं नकोस असा याला लाक्षणिक अर्थही लावतात).

नंतर लगेचच दर वर्षींचा कार्तिक यात्रेचा सोहळा असल्यानें कार्तिक शुद्ध नवमीपासून सर्व संतमंडळी पंढरीस यात्रेस जमूं लागली. दशमीच्या दिवशीं श्रीज्ञानेश्वर महाराजांसह चंद्रभागेचें स्नान उरकून पुंडलीक महामुनीचें दर्शन घेऊन श्रीरुक्मिणीपांडुरंगाचें भेटीस ही मंडळी राउळांत जमली. सर्वांचे हितगुज पंढरीरायाशीं आलिंगनपूर्वक सांगून झालें. दुसरे दिवशीं एकादशीनिमित्त वाळवंटांत आपआपले फड उभारून दिंड्या पताकांच्या थाटांत तो भाग किर्तन भजनांनी दुमदुमून जाऊन तिथें रात्रभर हरिजागर झाला. द्वादशीस पारणें होऊन चातुर्मास्य संपल्याचा प्रबोध उत्सव झाला -

त्रयोदशीचे दिनीं । सप्रेम देवीरुक्मिणी ।
षड्रस पक्वान्न भोजनीं । तोषवी ज्ञानदेवांसहित ॥ १ ॥
मग ज्ञानेश ज्ञानमणि । मस्तक ठेवी विठ्ठलचरणीं ।
वंदिली भावें सती रुक्मिणी । `येतो' ऐसें बोलतां ॥ २ ॥
सर्वांसी आला गहिंवर । कंठ दाटला अपार ।
नयनीं लोटले बाष्पनीर । कळवळलें हृदय चवघांचें ॥ ३ ॥
तेव्हां वदे रुक्मिणीपती । `तुम्ही कष्टी न व्हावें चित्तीं ।
तुम्हांमागें शीघ्रगती । आळंदीस आम्ही येतसो' ॥ ४ ॥
ऐसें बोलुनी दिधला वर । `शुक्ल एकादशी पंढरपूर ।
कृष्णपक्षीची आळंदीक्षेत्र । कार्तिकी यात्रेसी नेमिली' ॥ ५ ॥
तेव्हां सकल संतवृंद । देवाचे ऐकुनी शब्द ।
टाळ्या पिटुनी अत्यानंद । जयजयकारें पावले ॥ ६ ॥

आळंदीस निघण्याच्या वेळीं श्रीज्ञानराजांनी देवास विनवून प्रार्थिलें कीं देवा, तुमचें सुंदर सगुणरूपाचें सुख मी आतापर्यंत खूप उपभोगलें. आतां निरंतरच्या निर्विकल्प चिन्मयसुखांत मला ठेवावें. ही ज्ञादेवांची प्रार्थना ऐकल्यावर देवाला संतोष वाटून देव उद्‍गारले कीं -

देव म्हणती तुझी कामना । आधींच आहे पुरविली ॥ १ ॥
गोडी आणि गूळ । कापूर आणि परिमळ ।
परस्पर एकचि केवळ । तुम्ही आम्ही त्यापरी ॥ २ ॥
ऐकूनी देवाचें वचन । ज्ञानेश्वरें केले वंदन ।
पुनः पुन्हा धरिले चरण । रोमांच अंगी ताठले ॥ ३ ॥
आला प्रेमाचा उमाळा । मिठी दिधली चरणकमळा ।
तेव्हां परमात्मा सांवळा । उठवी ज्ञानदेवासी ॥ ४ ॥
हा प्रसंग पाहुनी डोळां । नामदेवाचा दाटला गळा ।
नेत्री वाहे जळ खळखळां । आवरेना मन त्याचें ॥ ५ ॥
तेव्हां वदे रुक्मिणीकांत । कां नामया होसी सचिंत ।
मी आणि ज्ञानेश्वर निश्चित । एकरूप जाण तूं ॥ ६ ॥
आतां मदंश जो ज्ञानराय । आत्मस्वरूपीं पावेल लय ।
यासाठीं तूं निजहृदय । कष्टमय करूं नको ॥ ७ ॥

मग श्री ज्ञानराज आपल्या भावंडांसह आळंदीस येतांच सिद्धेश्वर मंदिरांतली सिद्धेश्वर सन्मुख असलेली जागा पाहून झाल्यावर तिथे गुहा तयार करून होतांच पुढें त्रयोदशीला आंतमध्यें नामदेवांच्या दोन्ही मुलांनी दर्भ पसरून त्यांवर दुर्वा, तुळशी, बेल अंथरून याप्रमाणे समाधीची तयारी केली. नामदेव रुक्मिणींसह देवही पंढरीहून लगेच आले होतेच. " समाधीसी ज्ञानेश्वर । बैसेल शीघ्र साचार । जाणुनी आळंदीसी सत्वर । रुक्मिणीवर पातला ॥ देखावया समाधिसोहळा । सकल संतांचा मेळा । आणि इतर भक्त झाले गोळा । आळंदीसी तेकाळीं ॥ "

श्रीज्ञानेश्वर माउलीचे समाधिसोहळ्याचे अखेरचे दर्शन घडावें म्हणून लंबलांबची मंडळी येऊन दाखल झाली. त्यांतले मुख्य गोरोबा, सांवतोबा, विसोबा खेचर, जनाबाई, चांगदेव, कान्होबा पाठक, तसेच अनेक साधुसंत, ज्ञानी, योगी, सिद्ध, महंत, हरिदास, आत्मनिष्ठ, वैदिक, शास्त्री, पंडितजन अशा लांबलांबच्या झुंडीच्या झुंडी आळंदीस येऊन दाखल झाल्या.

संतभक्त येऊनी थोर थोर । हरिनामाचा केला गजर ।
अहोरात्र दिवस चार । आळंदीक्षेत्र गजबजलें ॥ १ ॥
एकादशीसी गजर । नामदेवें केली कथा सुंदर ।
द्वादशीसी दोन प्रहर- । पर्यंत घडलें पारणें ॥ २ ॥
तेचि रात्री प्रासादिक । हरिदास कान्हु पाठक ।
कीर्तन करिती परम भाविक । श्रोते कथेसी रंगले ॥ ३ ॥

समाधींत बसण्याची वेळ साधली जावी म्हणून माध्यान्हीं सूर्य आला असल्याचें देवांनीं सुचवितांच श्रीज्ञानराज ती वेळ साधण्यासाठीं लगेंच उठले आणि त्यांनी सोपान, मुक्ताबाईस पोटाशीं धरून कुरवाळलें तोंच त्यांनी हंबरडा फोडला. तेव्हां जवळच श्रीनिवृत्तिनाथ बसले होते. ते सुद्धां आपल्या नेहमीच्या उन्मनींत असलेल्या अवस्थेंतून यावेळी विचलित होऊन ज्ञानेश्वरांना डोळे भरून पाहून अगदीं गहिंवरून पाझरून गेले. मग श्रीपंढरीरायांनीं ज्ञानरायांच्या कपाळीं केशराचा मळवट व सर्वांगास तीच उटी स्वतः हातानें लावून त्यांना पीतांबर नेसवून अंगावर शाल पांघरून गळ्यात तुळशीचे हार घालून झाल्यावर रुक्मिणीमातेनें नीरांजनानें त्यांस ओवाळलें. नंतर ज्ञानराजांनी समाधिस्थानास तीन प्रदक्षिणा घातल्या. तेव्हां देव बोलले - "ज्ञानदेवें समाधिस्थाना । केल्या तीन प्रदक्षिणा । तंव देव बोलिले कष्ट नाना । जगासाठीं त्वां केले ॥" मग देवांनी ज्ञानराजांचा एक हात व दुसरा हात निवृत्तिनाथांनी धरून सर्वजण हळू हळू समाधिस्थानी उतरून झाल्यावर तेथल्या एका व्यासपीठासारख्या लांबरुंद चौरंगावर ज्ञानराजांनी उत्तराभिमुख होऊन पद्मासन घालून अर्धोन्मीलित दृष्टीनेंच निवृत्तिनाथांना व देवाला पाहून हात जोडून त्रिवार नमस्कार करून होतांच ते एकदम अंतरंगी चित्तासह प्राणास आत आकर्षून सर्वरूपपरायण होऊन गेले. "मग देव आणि निवृत्तिनाथ । समाधीसी शिळा त्वरित । घालिती ते देखूनि भक्त । खेद अत्यंत पावले ॥" मग सर्व मंडळींनी भजन करून समाधीवर सर्वांची पुष्पवृष्टी करून झाल्यावर त्यांनी "जय हरि विठ्ठल" या नामाचा एकसारखा जयघोष केला. "तेव्हां देव म्हणे पंढरपुरीं । सख्या नामा जाऊं सत्वरी ॥" असे देवांचे म्हणून होतांच सर्व मंडळी आपआपल्या स्थानी जावयास निघाली. खालीलप्रमाने या सर्वांचे समाधिशक व त्यांच्या यात्रातिथि व स्थानें आहेत :--

श्रीज्ञानेश्वर महाराज - शक १२१५, कार्तिक वद्य १३, आळंदी.
श्रीसोपानकाका - शक १२१५, मार्गशीर्ष वद्य १३, सासवड.
श्रीमुक्ताबाई - शक १२१६, वैशाख वद्य १२, मेहुण (तापीतीरीं)
श्री निवृत्तिनाथ महाराज - शक १२१६,ज्येष्ठ वद्य ११, त्र्यंबकेश्वर.
श्रीचांगदेव - शक १२१५, माघ वद्य १३, पुणतांबे (नाशिक)

या विभूति विषयींचे नामदेवरायांचे शेवटचे उद्‍गार -

गेले दिगंबर ईश्वरविभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥ १ ॥
वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानीं । आतां ऐसे कोणी होणें नाहीं ॥ २ ॥
'सांगतील ज्ञान म्हणतील खूण' । नयेची साधन निवृत्तीचें ॥ ३ ॥
'परब्रह्म डोळां दाऊं ऐसे म्हणती' । कोणा न ये युक्ति ज्ञानोबाची ॥ ४ ॥
'करतील अर्थ, सांगतील परमार्थ' । न ये पा एकांत सोपानाचा ॥ ५ ॥
नामा म्हणे देवा सांगूनियां कांही । न ये मुक्ताबाई गुह्य तुझें ॥ ६ ॥
पूर्वी अनंत भक्त जाहले । पुढेंही भविष्य बोलिलें ।
परी निवृत्ति-ज्ञानदेवें सोडविलें । अपार जीवजंतु ॥ ७ ॥
ऐसे ज्ञानेश्वर माहात्म्य अगाध । कथा ऐकतां होईल बाध ।
तैसाचि उपजेल परमानंद । पातकें हरतील सर्वथा ॥ ८ ॥

व्यासमहर्षींनी कर्म-उपासना-ज्ञान अशा प्रवृत्ति निवृत्तिधर्मांतील रहस्य वैदिक धर्मीयांना समजावून देऊन त्याचें योग्य रीतीनें परिपालन व्हावें म्हणून भारत, भागवत असे राष्ट्रीय ग्रंथ निर्माण केले. उपनिषदांतील श्रुतिवाक्यांच्या अर्थाचा विपर्यास करणारे जैन, बौद्ध, पाशुपत, चार्वाक, कपिल, कणाद अशांच्या विरोधाचा परिहार करून त्यांच्या मतांचे अप्रत्यक्ष रीत्या खंडन व्हावें म्हणून `ब्रह्मसूत्र' नांवाचा ग्रंथ निर्माण करून वैदिक धर्माचा पाया स्थिर केला. त्यानंतर आद्य श्रीशंकराचार्यांनी भगवद् गीता, दशोपनिषदें, ब्रह्मसूत्र या ग्रंथांवर विस्तारपूर्वक भाष्यें लिहून अनात्मवादी परमतांचा खरपूस समाचार घेऊन अध्यात्मज्ञान प्राप्तीचे निशाण सर्व भारतभर फडकविलें. हेंच धर्म प्रचाराचे कार्य स्वयंसिद्ध अशा नवनाथांनी प्रकट अप्रकट असें करून ठेवले होते. त्याचा श्रीज्ञानराजांनी मोठ्या विस्तारानें परधर्मीयांच्या हल्ल्याचे पाऊल कितीही जोरानें पडत राहिलें तरी त्याचा परिणाम टिकून राहूं नये, यासाठीं सर्व महाराष्ट्रभर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, पासष्टी, अभंगगाथा, हरिपाठ यांची निर्मिती केली. अशा ग्रंथद्वारां मराठी भाषेंतल्या प्रांतांत ब्रह्मसाम्राज्य निर्मून सततच्या प्रचाराचे कार्य म्हणून 'माझे जिवींची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ॥' पंढरीच्या आषाढी- कार्तिकीच्या वारीसाठी दरवर्षी मोठ्या सोहळ्यानें आळंदीपासून तें थेट पंढरीपर्यंत स्वतः दर मुक्कामांत भजन, कीर्तन, प्रवचनांच्या गजरांच्या द्वारां हजारों वारकऱ्यांकडून पंढरीच्या वारीचें हें व्रत धारण करविले. श्रीहरिभक्तीच्या या भगवतधर्माचा संप्रदाय वाढवून पाया पक्का घालून ठेवला व भागवत वारकरी संप्रदायधर्माची परंपरा एकसारखी, अव्याहत खेडोंपाडींसुद्धां चालत राहावी एवढें मोठें कार्य सुरू करून ठेवल्यानें तें आज जवळ जवळ सातशें वर्षें चालत आलें आहे. आतांपर्यंत राजकारणांतल्या कितीतरी उलाढाली होऊन गेल्या व यापुढें त्या होत राहिल्या तरी या भक्तिप्रधान मार्गांतल्या संप्रदायाला खेडुतातल्या अडाणी वर्गांपासून ते वरच्या थरांतल्या सर्व दर्जांच्या व्यक्तींना केव्हांही सुलभ वाव असल्यानें त्यांतल्या निर्मळ, निर्विकार प्रेमळपणामुळें तो असाच वाढत्या प्रमाणावर एकसारखा चालतच राहावा अशी घटना श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या अवतारकार्यानें निर्माण झालेली आहे.

श्रीज्ञानराजांच्या सहज अंगभूत वैभवाचें तुकोबाराय वर्णन करतात -

जयाचिया द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥ १ ॥
करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ २ ॥
जयानें घातली मुक्तीची गवादी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥ ३ ॥
तुका म्हणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया ॥ ४ ॥

संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥ १ ॥
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ॥ २ ॥
नामा तयाचा किंकर । तेणें केलासे विस्तार ॥ ३ ॥
जनार्दन एकनाथें । ध्वज उभारिला भागवत ॥ ४ ॥
तुका झाला तेथें कळस । भजन करावें सावकाश ॥ ५ ॥

GO TOP



* * * समाप्त * * *

[ श्री. दत्तात्रय केशव पाठक यांचे 'अमृतानुभव' - (प्रथमावृत्ति शके १८७८) या पुस्तकावरून ]