शंकराचार्यकृत

अद्वैतानुभुति

प्रास्ताविक

आद्य श्रीशंकराचार्यांनी केवलाद्वैत वेदान्तमताचा पुरस्कार आणि प्रचार केला. या मतानुसार ब्रह्म किंवा आत्मा एकमेव सत्य तथा अंतिम तत्त्व आहे; आजूबाजूला दिसणारे जग हे मिथ्या आहे; आणि या जगात जो कोणी जीव म्हणून वावरतो, तो ब्रह्मापेक्षा वेगळा नसून ब्रह्मच आहे. (ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः।) ब्रह्म शब्दाऐवजी कधी आत्मा हा शब्द वापरला जातो; कारण हा 'आत्मा ब्रह्म आहे' (अयमात्मा ब्रह्म), असे उपनिषदे सांगतात. आता, जीव हा जरी मूलत: ब्रह्मरूप आहे तरी अज्ञानाने ते स्व-रूप त्याला समजून येत नाही. परंतु हे अज्ञान दूर होऊन जो जीव ब्रह्म जाणतो, तो ब्रह्मच होऊन जातो (ब्रह्मविद् ब्रह्मैव भवति्) आणि तसे झाले की त्याच्या जीवनाची इतिकर्तव्यता होते.

असे हे तात्त्विक ज्ञान लोकांपुढे मांडण्यास शंकराचार्यांनी अनेक लहानमोठे ग्रंथ लिहिले. त्यांमध्ये 'अद्वैतानुभूति' हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य हे आहे की येथे फार मोठ्या प्रमाणात शंकराचार्यांनी दृष्टांतांचा वापर केलेला आहे.

अद्वैताची संकल्पना आणि अनुभूती या ग्रंथात वर्णिलेली आहे. ब्रह्म किंवा आत्मा अद्वय, एकमेवाद्वितीय म्हणजेच अद्वैत आहे. येथे अद्वैत म्हणजे द्वैतरहित आत्मा असा अर्थ आहे. अशा अद्वैत आत्म्याची अनुभूती म्हणजे "मीच ब्रह्म आहे" (अहं ब्रह्मास्मि) अथवा 'मीच आत्मा/परमात्मा आहे' अशा प्रकारचा जीवाला येणारा अनुभव, म्हणजेच साक्षात्कार. वर्तमान जीवनात ज्याला असा अद्वैत आत्म्याचा साक्षात्कार झाला आहे, चालू जीवनात जो अद्वैत आत्मरूप झाला आहे, तो जीवन्मुक्त होतो. मीच आत्मा आहे या भूमिकेत तो वावरत असतो. आणि त्याचा हा अनुभव प्रस्तुत ग्रंथाच्या पहिल्या श्लोकात शंकराचार्यांनी मांडला आहे. 'अद्वैतानुभूति' ग्रंथाच्या अनुष्टुभ् वृत्तातील ८४ श्लोकांपैकी २२ श्लोकांत 'मी' (अहम्) शब्दाचा वापर करून शंकराचार्यांनी विषयाची मांडणी केली आहे. तसेच जगाविषयी त्यांची भूमिका काय आहे, याचाही विचार येथे आहे. खेरीज आत्मज्ञानी/ब्रह्मज्ञानी/आत्मज्ञ अशासारख्या तृतीय पुरुषी सर्वनामांचा उपयोग करून ५ श्लोकांत विषयाची मांडणी केलेली दिसून येते. तर अन्य स्थळी सरळ 'आत्मा' किंवा 'परमात्मा' शब्दाचा वापर आढळून येतो.

अद्वैत, मिथ्यात्व, इत्यादी विषयांचा उहापोह करताना शंकराचार्यांनी आपल्या तत्त्वज्ञानातील अनेक संकल्पनांचे केवळ निर्देश केले आहेत. सोईसाठी त्यांची सुसंगत माहिती प्रथम येथे दिली आहे :

(१) आत्मा - आत्मा सच्चिदानंद आहे. तो त्रिकालाबाधित सत् असल्याने, तो विकारी व नाशवंत नाही. तो सर्वकाळी आणि सकलस्थळी अस्तित्वात असतो. तो चित् म्हणजे चिद्‌रूप आहे; ज्ञान/चैतन्य हे त्याचे स्वरूप आहे. तो जड/अचेतन अशा सर्व अनात्म पदार्थांपेक्षा भिन्न आहे. आत्मा म्हणजे शाश्वत आनंद. हा आत्मानंद विषय-जन्य आनंदापेक्षा वेगळा आहे.

(२) अनात्मा - आत्म्याखेरीज जे काही भासते ते सर्व अनात्मा आहे. व्यवहारात आत्म्याचे ज्ञान आपणास होत नाही. व्यावहारिक जीवनात दुःखमय, अचेतन, नाशवंत पदार्थांचे ज्ञान आपणास होत असते. याचे कारण आत्म्याविषयीचे अज्ञान. या अज्ञानामुळे आत्म्यावर विश्वाचा आरोप/अध्यास केला जातो. तथापि हे अज्ञान अथवा विश्व हे आत्मा नव्हे. म्हणून आत्म्याखेरीज जे काही अन्य आहे असे वाटते ते सर्व अनात्मा होय.

(३) अध्यास - अज्ञानामुळे आत्म्याचे ज्ञान न होता, आत्म्यावर/ब्रह्मावर विश्वाचा आरोप/अध्यास केला जातो असे वर म्हटले. या अध्यासाची संकल्पना रज्जु-सर्प या दृष्टांताने स्पष्ट करून सांगितली जाते :- अंधुक प्रकाशात दोरी (रज्जु) पडली होती. ती रज्जु या स्वरूपात कुणाला तरी कळली नाही. त्याला तेथे साप पडला आहे असे वाटले. येथे झाले ते असे :-- रज्जूच्या अज्ञानाने त्या माणसाने रज्जूवर सर्पाचा आरोप/ अध्यास केला. मुळात जी वस्तू आहे, तिच्यावर ती नसणाऱ्या अन्य पदार्थाचा आरोप म्हणजेच अध्यास. रज्जू सर्प नाही; तिच्यावर सर्पाचा आरोप म्हणजेच अध्यास. आरोप मिथ्या असतो; परंतु अधिष्ठान मात्र सत्य असते.

वरील प्रकार कधी वेगळ्या भाषेत पुढीलप्रमाणे सांगितला जातो :- अज्ञानात आवरण आणि विक्षेप अशा दोन शक्ती आहेत. अज्ञानाने अधिष्ठानावर – मूळ वस्तूवर आवरण पडल्याने त्याचे ज्ञान होत नाही: त्याचवेळी अज्ञानाच्या विक्षेप शक्तीने त्या अधिष्ठानावर दुसरीच वस्तू दाखविली जाते.

आत्म्याच्या संदर्भात सांगायचे झाल्यास, अज्ञानाने आत्म्यावर आवरण पडून त्याचे ज्ञान होत नाही. आणि अज्ञानाच्या विक्षेपशक्तीने आत्म्यावरच जगाचा आभास उत्पन्न केला जातो. म्हणून वाक्यसुधा (१३) ग्रंथात शंकराचार्य सांगतात - 'विक्षेपशक्तिर्लिंगादि ब्रह्माण्डान्तं जगत् सृजेत् । ' (लिंग म्हणजे सूक्ष्म शरीर; तेथपासून स्थूल ब्रह्माण्डापर्यंतचे विश्व विक्षेपशक्ती निर्माण करते.)

(४) अज्ञान - ज्या अज्ञानामुळे आत्म्यावर आवरण पडून विश्वाची उत्पत्ती होते, त्याला अविद्या, माया असेही म्हटले जाते. या अज्ञानाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. अज्ञान हे सदसद् अनिर्वचनीय, त्रिगुणात्मक, ज्ञान-विरोधी, आणि भावरूप आहे. सत् म्हणजे त्रिकालाबाधित सत्य. या अर्थाने अज्ञान सत् नाही; कारण आत्मज्ञानाने त्याचा नाश होतो. असत् ते की जे कधीच प्रचीतीला येत नाही. उदा. वंध्यापुत्र, शशशृंग इत्यादी. अज्ञान अशाप्रकारचे असत नाही. कारण मी अज्ञानी आहे' अशा स्वरूपात अज्ञान प्रचीतीला येत असते. तसेच असत् मधून काही उत्पन्न होत नाही; परंतु अज्ञानातून विश्व निर्माण होते. म्हणून या दृष्टीनेही अज्ञान हे असत् नाही. अज्ञान हे सत् आणि असत् असे दोन्हीही नाही; कारण सत् आणि असत् हे परस्पर-विरोधी गुणधर्म एकाच अज्ञानात असू शकणार नाहीत. एवं अज्ञान हे सत् व असत् यांपैकी कोणत्याच प्रकाराने सांगता न येणारे असल्याने, ते सदसदनिर्वचनीय आहे, असे म्हटले जाते.

अज्ञान हे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेले आहे. हे तीन गुण अज्ञानाचे घटकभूत आहेत. या गुणांचे नेहमी सह-अस्तित्व असते. तसेच हे गुण स्वत:च्या वर्चस्वासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे कधी सत्त्वगुण तर कधी तमोगुण प्रभावी/प्रधान ठरतो.

अज्ञान हे ज्ञान-विरोधी आहे म्हणून ज्ञानाने नष्ट होणारे आहे. उदा. आत्म्याच्या सम्यग्ज्ञानाने अज्ञान नष्ट होऊन जाते. अज्ञान भावरूप आहे. याचा अर्थ इतकाच आहे की ते काही काळ भासते आणि मग ते ज्ञानाने नष्ट होऊन जाते. या अज्ञानाकडे व्यष्टी आणि समष्टी या दोन दृष्टिकोनांतून पाहता येते. अज्ञान समष्टी ही एकच असते, तर अज्ञान-व्यष्टी अनेक असते. अज्ञान-समष्टी आणि अज्ञान-व्यष्टी या दोहोंची उपाधी ब्रह्माला/आत्म्याला/शुद्ध चैतन्याला येते.

(५) उपाधी - उपाधी शब्दाला केवलाद्वैत वेदान्तात एक विशिष्ट अर्थ आहे. उपाधी म्हणजे एखाद्या पदार्थाला मर्यादित स्वरूपात किंवा वेगळ्या स्वरूपात भासविणारा किंवा दाखविणारा दुसरा एखादा पदार्थ किंवा गुणधर्म. उदा. घट, मठ, यांनी आकाश हे घटाकाश, मठाकाश अशा मर्यादित स्वरूपात दाखविले जाते. म्हणून घट, मठ ही आकाशाची उपाधी होते. तसेच शुभ्र स्फटिकाजवळ लाल फूल ठेवले त्यामुळे स्फटिक लाल आहे असे भासू लागते. येथे लाल फुलाने स्फटिकाचे शुभ्र रूप लाल स्वरूपात भासविले. म्हणून लाल फूल ही स्फटिकाची उपाधी ठरते.

(६) विश्वोत्पत्ती - अज्ञानाची उपाधी आत्म्याला येते असे वर म्हटले होते. तसेच अज्ञानात एखादा गुण प्रधान होतो असेही म्हटले होते. आता, तमोगुण ज्यात प्रधान आहे अशा अज्ञानाची उपाधी आत्म्याला/शुद्ध चैतन्याला आली की सृष्टिनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते. तमोगुण-प्रधान अशा अज्ञानातून प्रथम आकाश उद्भुत होते; मग आकाशातून वायू, वायुतून तेज, तेजापासून जल आणि जलामधून पृथ्वी अशी पाच सूक्ष्म वा अपंचीकृत भूते होतात.
गुणांचे सह-अस्तित्व असल्याने, तमोगुणप्रधान अशा अज्ञानातही सत्त्व आणि रज हे गुण कमी प्रमाणात का होईना असतातच. त्यामुळे हे गुण वर निर्दिष्ट केलेल्या पाच भूतांतही उतरतात. मग या भूतांतील सत्त्व गुणांच्या अंशापासून पाच ज्ञानेंद्रिये आणि सत्त्व-गुण-अंशांच्या मिश्रणाने मन आणि बुद्धी उत्पन्न होतात. याच पाच भूतांतील रजोगुणाच्या अंशापासून पाच कर्मेंद्रिये होतात, आणि रजोगुण अंशांच्या मिश्रणाने पाच प्राण निर्माण होतात. मग पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण, मन आणि बुद्धी मिळून जे सतरा घटक होतात, त्या सतरा घटकांनी पिंड-ब्रह्मांडांच्या संदर्भात सूक्ष्म शरीरे उत्पन्न होतात.

तदनंतर वर उल्लेखिलेल्या आकाश, इत्यादी पाच सूक्ष्म भूतांपासून पंचीकरण-प्रक्रियेने आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही पाच स्थूल भूते वा महाभूते उत्पन्न होतात आणि या पंचमहाभूतांपासून सर्व जड पदार्थ, जारज, इत्यादी प्रकारची स्थूल शरीरे आणि त्या स्थूल शरीरांना आवश्यक ते अन्न-पान निर्माण होतात. ही स्थूल देहांची निर्मिती पिंड-ब्रह्मांडाच्या संदर्भात होते.

(७) उपाधीअंती शुद्ध चैतन्याला येणारी भिन्न नावे - शुद्ध चैतन्याला अज्ञान-समष्टी तसेच अज्ञान-व्यष्टी या उपाधी येतात. अज्ञान-समष्टीला कारण शरीर म्हणतात. त्यातून सूक्ष्म व स्थूल देह निर्माण होतात. या तीनही देहांकडे व्यष्टी व समष्टी या दृष्टिकोनातून पाहता येते. मग त्या देहांची उपाधी आल्यावर, त्या तीन देहाअंती येणाऱ्या तीन अवस्थांचा अभिमान बाळगणारे चैतन्य असा शब्दप्रयोग करता येतो. या तीन देहांमुळे येणाऱ्या अवस्था व त्या अवस्थांचा अभिमान बाळगणारे चैतन्य यांना पुढीलप्रमाणे नावे दिली जातात.

(१) अज्ञान-समष्टी या उपाधीच्या दृष्टिकोनातून --    
शरीर    अवस्था    चैतन्याला दिले जाणारे नाव
कारण    सुषुप्ति    ईश्वर
सूक्ष्म    स्वप्न    सूत्रात्मा, हिरण्यगर्भ
स्थूल    जागृति    विराट, वैश्वानर

(२) अज्ञान-व्यष्टी या उपाधीच्या दृष्टिकोनातून -
शरीर    अवस्था    चैतन्याला दिले जाणारे नाव
कारण    सुषुप्ति    प्राज्ञ
सूक्ष्म    स्वप्न    तैजस
स्थूल    जागृति    विश्व
(पिंडातील वरील तीनही अवस्था आपल्या परिचयाच्या आहेत. ब्रह्मांडातील तीन अवस्था म्हणजे - स्थूल पदार्थ असणारी सृष्टीची म्हणजे जागृती. सूक्ष्म पदार्थ असणारी ती स्वप्न अवस्था; आणि सुषुप्ती अवस्थेत वरील दोनही प्रकारच्या पदार्थांचा लय अज्ञान-समष्टी या कारणात होतो.)

(८) पंचकोष - वर पाहिल्याप्रमाणे आत्म्याला तीन देहांची उपाधी येते आणि हे तीनही देह आत्म्याचे सत्य स्वरूप झाकून टाकतात. म्हणून या तीन शरीरांचा निर्देश कोष या शब्दानेही केला जातो. हे कोष पाच आहेत. अन्नापासून बनलेला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोष होय. सूक्ष्म देहाचे तीन कोष आहेत; ते म्हणजे प्राणमय कोष, मनोमय कोष आणि विज्ञानमय कोष. पाच कर्मेंद्रिये आणि पाच प्राण यांना प्राणमय कोष म्हणतात. पाच ज्ञानेंद्रिये आणि मन यांना मनोमय कोष म्हणतात. आणि पाच ज्ञानेंद्रिये व बुद्धी यांना विज्ञानमय कोष असे म्हटले जाते. तर कारण शरीर हाच आनंदमय कोष होय.

याच संदर्भात पुढील गोष्ट लक्षात घ्यावी - उपर्युक्त तीन शरीरे, पंचकोष, अज्ञान इत्यादीपेक्षा आत्मा वेगळा आहे. तसेच तो तीन अवस्थांचा साक्षी आहे. म्हणून "आत्मा नाम स्थूलसूक्ष्म-कारण-शरीर-त्रय-विलक्षण: पंच-कोष-व्यतिरिक्तः अवस्था-त्रय-साक्षी', असे आत्म्याबद्दल शंकराचार्यांनी आत्मानात्म-विवेक या ग्रंथात म्हटले आहे.



ग्रंथारंभ

अहमानन्द-सत्यादि-लक्षणः केवलः शिवः ।
सदानन्दादि-रूपं यत् तेनाहमचलोऽद्वयः ॥ १ ॥
आनन्द, सत्य इत्यादी स्वरूप असणारा, केवळ, शिव, असा मी सत्, आनंद इत्यादी स्वरूप असणारे जे (ब्रह्म ते) मी आहे; म्हणून मी अचल आणि अद्वय आहे.


स्पष्टीकरण :- येथे मंगलाने ग्रंथाचा प्रारंभ शंकराचार्यांनी केलेला नाही. तर वस्तुनिर्देश करून, त्यांनी ग्रंथाची सुरवात केली आहे.

ब्रह्मरूप/आत्मरूप झालेल्या जीवन्मुक्ताचे तोंडी हा श्लोक आहे. येथे 'अहं' शब्दाने जसा जीवात्मा सूचित होतो, तसाच प्रत्यगात्मा/अंतरात्मा सूचित होतो. प्रत्यगात्मा म्हणजेच परमात्मा/आत्मा. आत्मा सच्चिदानंद आहे. आत्मा हा सत् आहे; आणि सत्‌ तो की जो तीनही काळांत अस्तित्वात असतो; म्हणून तो अविनाशी, कूटस्थ, नित्य आहे. चित् म्हणजे ज्ञानस्वरूप. आत्मा चिद्‌रूप, ज्ञानरूप आहे. आणि आनंद हेही आत्म्याचे स्वरूप आहे. हा आनंद नित्य आहे. आत्मा हा असा सच्चिदानंद आहे. आत्मा हा एकमेवाद्वितीय असल्याने तो केवळ, एकच एक आहे; त्याच्या जोडीला दुसरे कोणतेही अंतिम तत्त्व नाही. म्हणूनच तो अद्वय म्हणजे अद्वैत म्हणजे द्वैतरहित आहे.

अशा या आत्म्याचा निर्देश करण्यास शंकराचार्यांनी येथे 'शिव' हा शब्द उपयोजिला आहे. आत्म्याचा/ब्रह्माचा निर्देश करण्यास शंकराचार्य प्रस्तुत ग्रंथाच्या अन्य भागांतही, तसेच त्यांच्या इतर इतर ग्रंथांतही शिव शब्दाचा वापर करतात. तेव्हा शिव म्हणजेच सच्चिदानंद आत्मा.

ब्रह्म हे सुद्धा सच्चिदानंद-स्वरूप आहे. आत्माही सच्चिदानंद आहे. परंतु ते दोन्ही भिन्न नसून एकच आहेत. म्हणून आत्मा म्हणजेच ब्रह्म असे वेद सांगतो (अयमात्मा ब्रह्म). ब्रह्म हे निर्गुण असल्याने त्याचे वर्णन अशब्द, अस्पर्श, अनंत अशाप्रकारच्या नकारात्मक शब्दांनी केले जाते. ब्रह्मही निर्विकारी, अद्वय इत्यादी आहे. जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मरूपच होऊन जातो (ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति).

ब्रह्मरूप झालेला, आत्मरूप झालेला साक्षात्कारी जीवन्मुक्त पुरुष येथे सांगतो : मीच सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे; मीच अचल, अद्वय, सच्चिदानंद आत्मा आहे. तोच त्याचा अनुभव आहे.

अक्षिदोषाद् यथैकोऽपि द्वयवद् भाति चन्द्रमाः ।
एकोऽप्यात्मा तथा भाति द्वयवद् मायया मृषा ॥ २ ॥
ज्याप्रमाणे चंद्र हा एक असून सुद्धा तो डोळ्यांतील दोषांमुळे (एखाद्या माणसाला) दोन असल्याप्रमाणे भासतो, त्याप्रमाणे आत्मा हा सुद्धा एक असूनही, मायेमुळे मिथ्याच दोन असल्याप्रमाणे भासतो.


स्पष्टीकरण - जर आत्मा हा एकमेवाद्वितीय आहे, तर आपणास द्वैत का भासते, या प्रश्नाचे उत्तर या श्लोकात दिलेले आहे.

माणसाच्या डोळ्यांत जर मोतीबिंदू वगैरेसारखा काही दोष निर्माण झाला तर त्या दोषामुळे त्याला आकाशात एका चंद्राऐवजी दोन चंद्र दिसू लागतात. तथापि तेथे दिसणारा दुसरा चंद्र हा मिथ्या, खोटा आहे. याचप्रमाणे मायेमुळे म्हणजेच माया या दोषामुळे, मायेच्या/अज्ञानाच्या उपाधीमुळे जीवात्मा आणि ईश्वर अशासारखे द्वैत भासू लागते. परंतु ते दोन्हीही मिथ्या आहेत; एक आत्मा तेवढा सत्य आहे.

केवलाद्वैत वेदान्तात मायेलाच कधी कधी अविद्या, अज्ञान असे म्हणतात. या अज्ञानाची उपाधी ब्रह्माला/आत्म्याला आली की आत्म्यावर जगाचा आरोप/अध्यास केला जातो. मग ईश्वर वेगळा आणि विश्व वेगळे असे द्वय (= दोन गोष्टी) भासू लागते. परंतु ते सत्य नाही. विश्व हे अध्यस्त असल्याने, ते मिथ्या आहे. एक आत्मा तेवढा सत्य आहे. माया या दोषामुळे भासणारे द्वैत हे मिथ्या आहे. पारमार्थिक दृष्टीने पाहिल्यास, विश्व असे वेगळे काही नाहीच; ते ब्रह्मच आहे (सर्वं खल्विदं ब्रह्म) हे सर्व विश्व म्हणजे ब्रह्म किंवा आत्माच आहे (इदं सर्वं यदयमात्मा; ऐतदात्म्यमिदं सर्वम्). संक्षेपाने माया-दोषामुळे भासणारे द्वैत हे मिथ्या असून, अद्वैत आत्मा तेवढाच सत्य आहे.

अक्षि-दोष-विहीनानामेक एव यथा शशी ।
माया-दोष-विहीनानामात्मैवैकस्तथा सदा ॥ ३ ॥
ज्याप्रमाणे डोळ्यांतील दोषांनी रहित असणाऱ्या मानवांना फक्त एकच चंद्र दिसतो, त्याप्रमाणे मायारूपी दोषाने रहित असणाऱ्या साक्षात्कारी पुरुषांना नेहमी एकच आत्मा प्रत्ययाला येत असतो.


स्पष्टीकरण :- माया/अज्ञान या दोषामुळे द्वैत भासते. परंतु हा मायादोष ज्या साक्षात्कारी पुरुषांच्या बाबतीत दूर झाला आहे, त्यांना कुठेच द्वैत भासत नाही; त्यांना सर्वत्र द्वैतरहित आत्म्याचाच अनुभव येत असतो. कारण त्यांच्या दृष्टीने आत्म्याखेरीज अन्य काही नाहीच आहे. ज्याप्रमाणे दृष्टि-दोषरहित अशा माणसांना दोन चंद्र न दिसता एकच चंद्र दिसत असतो, त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कारी पुरुषांना द्वैत न दिसता, सर्वत्र केवळ आत्माच दिसत असतो.

द्वित्वं भात्यक्षिदोषेण चंद्रे स्वे मायया जगत् ।
द्वित्वं मृषा यथा चंद्रे मृषा द्वैतं तथात्मनि ॥ ४ ॥
डोळ्यांतील दोषामुळे ज्याप्रमाणे एकाच चंद्राच्या ठायी दोन चंद्र भासतात, त्याप्रमाणे माया-दोषामुळे एकाच आत्म्याच्या ठायी (स्वे) जगत भासते. पण ज्याप्रमाणे एकाच चंद्राच्या ठिकाणी भासणारा दुसरा चंद्र मिथ्या असतो, त्याप्रमाणे एकाच आत्म्याच्या ठिकाणी भासणारे द्वैत हे मिथ्या आहे.


स्पष्टीकरण :- दृष्टिदोषामुळे जरी एकाच चंद्राच्या ठिकाणी दुसरा चंद्र दिसला तरी तो मिथ्या असतो. त्याचप्रमाणे एकाच आत्म्यावर भासणारे जीव-ईश्वर असे द्वैत अथवा विश्व-ईश्वर असे द्वैत हे मिथ्याच आहे. कारण द्वैत हे अज्ञान या दोषामुळे भासत असते. वस्तुतः आत्मा हा एकमेव अद्वितीय आहे; तेथे 'दोन' म्हणून काही नाही.

या श्लोकातील 'स्व' हा शब्द आत्म्याचा बोधक आहे. 'पंचदशी'सारख्या केवलाद्वैत वेदान्तावरच्या प्रकरण ग्रंथात अनेकदा 'स्व' हा शब्द आत्मा या अर्थाने वापरलेला दिसून येतो.

संक्षेपाने माया-दोषामुळे अद्वैत आत्म्यावर भासणारे द्वैत मिथ्या आहे.

आत्मनः कार्यमाकाशो विनात्मानं न संभवेत् ।
कार्यस्य पूर्णता सिद्धा किं पुनः पूर्णतात्मनः ॥ ५ ॥
आत्म्याचे कार्य असणारे आकाश हे आत्म्याविना संभवत नाही. आकाशरूप कार्य पूर्ण आहे हे सिद्ध आहे. मग आत्म्याच्या पूर्णतेबद्दल काय सांगावे ? म्हणजे आत्मा हा पूर्णपणे पूर्ण आहे हे काय सांगावयास हवे ?


स्पष्टीकरण :- खरे म्हणजे केवलाद्वैत वेदान्तात अजनवाद आहे. तथापि व्यावहारिक दृष्टीतून माया/अज्ञान या उपाधीमुळे आत्म्यावर जगाचा आरोप केला जातो; मग व्यावहारिक दृष्टिकोनातून विश्वोत्पत्तीचा क्रमही सांगितला जातो. अज्ञान ही उपाधी असणारे शुद्ध चैतन्य (= आत्मा, ब्रह्म) हे विश्वाचे उपादान कारण तसेच निमित्त कारण मानले जाते. आणि आत्म्यातून प्रथम आकाश हे सूक्ष्म भूत उत्पन्न होते. याचा अर्थ असा की व्यावहारिक दृष्टीने आकाश हे आत्म्याचे कार्य आहे. आता हे आकाशरूपी कार्य पूर्ण मानले जाते. तेव्हा जर आकाशरूपी कार्य पूर्ण आहे, तर ज्या आत्म्याचे कार्य पूर्ण आहे तो कारण-रूप आत्मा हा पूर्ण असणारच, हे सांगण्याची आवश्यकता नाही.

कार्यभूतो यथाकाश एक एव न हि द्विधा ।
हेतुभूतस्तथात्मायमेक एव विजानतः ॥ ६ ॥
आत्म्याचे कार्य या रूपात असणारे आकाश हे दो किंवा दोन प्रकारचे नसून, ते ज्याप्रमाणे एकच आहे, त्याप्रमाणे त्या आकाशाचे कारण असणारा हा आत्मा ज्ञानी माणसाच्य दृष्टीने एकमेवच आहे.


स्पष्टीकरण :- आकाश हे एकच आहे. दोन वा अधिक आकाशे असती तर आकाशाला मर्यादा पडून ते अपूर्ण ठरले असते. पण ते तसे नसून पूर्ण आहे, ते एकच आहे. तसेच आकाशाला घट, मठ इत्यादी उपाधी आली की घटाकाश, मठाकाश अशी भाषा वापरली जाते. पण घट, मठ, इत्यादी उपाधी आली म्हणून आकाश काही अनेक होत नाही. ते एकच एक राहते. त्याप्रमाणे आत्मा हाही एकच आहे. मायेमुळे अज्ञानामुळे जरी आत्म्यावर द्वैत भासले, तरी ते द्वैत मिथ्या आहे (वरील श्लोक २ पहा). अज्ञानी माणसाला द्वैत खरे वाटते. परंतु ज्याला आत्म्याचा साक्षात्कार झाला आहे अशा माणसाला आत्मा एकच एक आहे हे कळून आलेले असते.

कार्यरूप अशा एकाच आकाशाप्रमाणे कारणरूप आत्मा एकच आहे ही गोष्ट आत्मज्ञानी माणसाला कळून चुकलेली असते.

एकोऽपि द्वयवद् भाति यथाकाश उपाधितः ।
एकोऽपि द्वयवद् भाति तथात्मायमुपाधितः ॥ ७ ॥
ज्याप्रमाणे आकाश एक असूनही, ते उपाधीअंती दोन असल्यासारखे वाटते त्याप्रमाणे आत्मा एकच असला तरी उपाधीमुळे तो दोन आहे असे वाटते.


स्पष्टीकरण :- मूलतः आकाश एकच आहे. परंतु त्याला घट, मठ, इत्यादी उपाधी आली की ते घटाकाश, मठाकाश, अशाप्रकारे दोन वा अनेक आहे असे भासू लागते. त्याप्रमाणे भिन्न उपाधींनी आत्मा दोन वा अधिक आहे असे वाटू लागते. उदा - अज्ञानसमष्टी या उपाधीमुळे ईश्वर मानला जातो. स्थूल शरीराच्या उपाधीने 'विश्व' आत्म्याची कल्पना केली जाते. कारण शरीराच्या उपाधीने 'प्राज्ञ' आत्मा आहे असे मानले जाते.

उपाधी या येणाऱ्याजाणाऱ्या, नाशवंत आहेत. तसेच त्यांच्यामुळे मूळ पदार्थांत कोणताच फेरफार घडून येत नाही. म्हणून उपाधींनी मूळ वस्तूला अनेकत्व येऊ शकत नाही. याच कारणाने मूलत: असणारे आकाशाचे तसेच आत्म्याचे एकत्व हे सदोदित आहे तसेच राहते.

येथे शंकराचार्यांनी उपाधी शब्द वापरला आहे. उपाधी या शब्दाला संस्कृत भाषेत जरी अनेक अर्थ असले तरी तो शब्द केवलाद्वैत वेदान्तात विशिष्ट अर्थाने वापरला जातो. उपाधी म्हणजे असा एक पदार्थ अथवा गुणधर्म की ज्याच्यामुळे दुसऱ्या वस्तूला मर्यादा पडली वा तिचे स्वरूप बदलले असे भासते. पण उपाधीने वस्तूच्या मूळ रूपाला बाध येत नाही. उदा. घट, मठ, इत्यादी उपाधी आहेत; कारण त्यांच्यामुळे आकाशाला मर्यादा आली असे भासते. तसेच लाल फूल ही उपाधी आली की शुभ्र असणारा स्फटिक लाल आहे असे भासू लागते.

कारणोपाधि-चैतन्यं कार्य-संस्थाच्चितोऽधिकम् ।
न घटाभ्रान्मृदाकाशः कुत्रचिन्नाधिको भवेत् ॥ ८ ॥
उपाधीने युक्त असणारे कारण-चैतन्य (= आत्मा, ब्रह्म) हे आकाश-रूपी कार्यात असणाऱ्या चैतन्यापेक्षा अधिक म्हणजे वेगळे किंवा निराळे असत नाही. जसे - माती या कारणामधील आकाश हे कार्य-रूपातील घटाकाशापेक्षा कधीही अधिक म्हणजे निराळे असतच नाही.


स्पष्टीकरण :- माया/अविद्या या उपाधीअंती शुद्ध चैतन्य म्हणजे ब्रह्म किंवा आत्मा हे जगाचे उपादान कारण तसेच निमित्त कारण होते. आता, आकाश हे आत्म्याचे कार्य आहे (वरील श्लोक ५ पहा). उपादानकारण म्हणजे ज्या द्रव्यापासून अन्य काही निर्माण होते, ते. उदा. ज्या मातीतून मातीचे घडे निर्माण होतात, ती माती त्या घटांचे उपादानकारण होते. अशी निर्मिती होताना जी कारणे सहाय्यक होतात, त्यांना निमित्त कारण म्हणतात. उदा. मातीतून घडे उत्पन्न होण्याच्या क्रियेत कुंभार हा निमित्तकारण आहे. याचप्रमाणे सोने हे सोन्याच्या अलंकारांचे उपादानकारण असून सोनार हे निमित्तकारण आहे. आता, जे उपादान कारण असते ते आपल्या सर्व कार्यांत अनुस्यूत असते. उदा. सोने हे सोन्याच्या अलंकारात आणि माती ही मातीच्या घटांत अन्युस्यूत असते. कार्य व कारण यांतील माती वा सोने हे भिन्न असत नाही. याचप्रमाणे उपादानकारणभूत असणारे चैतन्य हे आकाशरूपी कार्यात अनुस्यूत आहेच. म्हणजे कारण-चैतन्य हे कार्यातील चैतन्यापेक्षा वेगळे असत नाही. कारण आणि कार्य या दोहोंतही एकच चैतन्य समानपणाने असते. उदाहरणार्थ माती हे घटांचे उपादान कारण आहे, आणि घट हे मातीचे कार्य आहेत. त्या दोहोंतही आकाश आहेच. आणि तेथे मातीतील आकाश हे घटांतील आकाशापेक्षा वेगळे नाही. म्हणजे माती आणि घडे या कार्य-कारणात असणारे आकाश एकच आहे. असाच प्रकार चैतन्याच्या संदर्भातही होतो. उपाधीमुळे चैतन्य हे कारण बनते आणि कार्य निर्माण करते. आणि ते कारण-चैतन्य हे कार्य-चैतन्य या स्वरूपात वेगळे ठरत नाही. कारण व कार्य या दोहोंतही एकच चैतन्य आहे.

निर्गतोपाधिराफाश एक एव यथा भवेत् ।
एक एव तथात्मायं निर्गतोपाधिकः सदा ॥ ९ ॥
ज्याप्रमाणे उपाधी निघून गेल्यावर आकाश हे एकच राहते, त्याप्रमाणे उपाधी दूर गेल्यावर हा आत्मा एकच राहतो.


स्पष्टीकरण :- घट, मठ, इत्यादी उपाधी असताना आकाश वेगळे आणि अनेक वाटत होते. पण त्या उपाधी नष्ट होताच आकाश एकच एक असे राहते. त्याप्रमाणे शरीर इत्यादी उपाधींमुळे आत्मा वेगळा आणि अनेक भासत होता. परंतु त्या उपाधी दूर होताच, आत्मा हा एकमेवाद्वितीय असाच राहतो.

आकाशादन्य आकाश आकाशस्य यथा न हि ।
एकत्वादात्मनो नान्य आत्मा सिध्यति चात्मनः ॥ १० ॥
आकाश हे एकच असल्याने, त्या एका आकाशापेक्षा दुसरे एखादे वेगळे आकाश ज्याप्रमाणे असत नाही, त्याप्रमाणे आत्मा सुद्धा एकच असल्याने, त्या आत्म्यापेक्षा वेगळा असा दुसरा आत्मा सिद्धच होत नाही.


स्पष्टीकरण :- वर श्लोक ६ मध्ये म्हटल्याप्रमाणे आकाश एकच आहे. आणि एकदा का आकाश एकच एक आहे असे म्हटले की त्याच्या जोडीला दुसरे आकाश असूच शकत नाही. बरोबर त्याचप्रमाणे आत्मा हा एकमेवाद्वितीय आहे असे म्हटले की त्याच्या जोडीने दुसरा एखादा तसाच आत्मा सिद्धच होऊ शकत नाही.

मेघयोगाद् यथा नीरं करकाकारतामियात् ।
माया-योगात् तथैवात्मा प्रपंचाकारतामियात् ॥ ११ ॥
मेघाच्या संसर्गाने ज्याप्रमाणे मेघातून पडणारे पाणी हे गारांच्या आकारात परिणत होते, त्याप्रमाणे मायेच्या संसर्गामुळे (= उपाधीमुळे) आत्मा हा प्रपंचाच्या विश्वाच्या पसाऱ्याच्या स्वरूपात जाईल.


स्पष्टीकरण :- येथे मेघाच्या संसर्गाने पाणी हे गारांचे रूप धारण करते, असा दृष्टांत आहे. येथे हे लक्षात ठेवावे :- ज्याला दृष्टांत दिला जातो त्याच्या म्हणजे दार्ष्टांतिकाच्या संदर्भात, तो दृष्टांत सर्वांगांनी घ्यावयाचा नसतो. तसे केल्यास घोटाळा होण्याची शक्यता असते. जसे :- मेघाच्या संसर्गाने पाण्याचे रूपांतर गारांमध्ये होते. हा दृष्टांत जर आत्मा व प्रपंच यांच्या बाबतीत जशाच्या तसा लागू केला, तर आत्म्याचे रूपांतर मायेमुळे प्रपंचात होते असा अर्थ घ्यावा लागेल. पण तसा अर्थ केवलाद्वैत वेदान्तात घेता येत नाही. कारण या वेदान्तात आत्म्याचे रूपांतर होत नाही; आत्मा हा कूटस्थ नित्य असल्याने त्याच्यात विकार संभवत नाही. या वेदान्तात माया/अविद्या या उपाधीमुळे आत्म्यावर प्रपंचाचा/विश्वाचा अध्यास होतो, हे मान्य आहे. म्हणून येथे दृष्टांतातील फक्त 'मेघ-योग' एवढाच अंश घ्यावयाचा आहे. तेव्हा अर्थ असा होतो :- मायेच्या/ अज्ञानाच्या संपर्कामुळे म्हणजे उपाधीमुळे आत्म्यावर विश्वाचा आरोप होतो; आत्म्याच्या अज्ञानामुळे आत्मा जगाच्या स्वरूपात भासतो; प्रत्यक्षात मात्र विश्व वा विश्वाचा पसारा हा आत्म्याचा परिणाम नाही. केवलाद्वैत वेदान्त हा विवर्तवाद मानतो. या विवर्तवादाप्रमाणे तथाकथित कारणात कोणताही फरक/विकार न होताच, अधिष्ठानावर वेगळेच काहीतरी भासू लागते. जसे - रज्जूवर सर्प भासतो. येथे रज्जूचे रूपांतर सर्पात होत नाही. तद्वत् आत्मा हा प्रत्यक्ष प्रपंचाच्या आकारात परिणत होत नाही. (वर श्लोक ५ खाली उल्लेखिली गेलेली आत्म्यापासूनची आकाश इत्यादींची उत्पत्ती ही केवळ व्यावहारिक दृष्टिकोनातून आहे, ती परमार्थतः सत्य नाही, हे येथे लक्षात ठेवावे).

वर्षोपल इवाभाति नीरमेवाभ्र-योगतः ।
वर्षोपल-विनाशेन नीर-नाशो यथा न हि ॥ १२ ॥
आत्मैवायं तथा भाति माया-योगात् प्रपंचवत् ।
प्रपंचस्य विनाशेन स्वात्मनाशो न हि क्वचित् ॥ १३ ॥
मेघाच्या संपर्काने पाणी हेच पर्जन्य-प्रस्तरांप्रमाणे म्हणजे गारांप्रमाणे भासते. (तथापि) गारांच्या नाशाने पाण्याचा नाश होत नाही. त्याप्रमाणे मायेच्या संसर्गाने म्हणजे उपाधीमुळे आत्मा हाच प्रपंचाप्रमाणे - विश्वाच्या पसाऱ्याप्रमाणे - भासतो. तथापि प्रपंचाच्या नाशाने आत्म्याचा नाश कधीही होत नाही.


स्पष्टीकरण :- मेघाच्या संपर्कामुळे पाणी हे गारांप्रमाणे भासते (वर श्लोक ११ वरील स्पष्टीकरण पहा) येथे गारांचा नाश याचा अर्थ 'गारा' या स्वरूपाचा नाश असा घ्यावयाचा आहे. त्यामुळे गारांचे रूप जाते आणि पाणी हे पाणी या स्वरूपात राहते, असा अर्थ घ्यावयास हवा.

आत्म्याच्या बाबतीत घडते ते असे :-- मायेच्या/ अज्ञानाच्या उपाधीमुळे आत्म्यावर प्रपंच भासतो. जसा रज्जूवर सर्प भासतो तद्वत. येथे प्रपंच किंवा सर्प हे केवळ भास असल्याने, त्यांच्या नाशाने अधिष्ठान-रूप आत्मा अथवा रज्जू यांवर काहीच परिणाम होऊ शकत नाही. रज्जूवर भासमान होणाऱ्या सर्पाचा बाध झाला तरी रज्जूचा बाध होत नाही, त्याप्रमाणे आत्म्यावर भासणाऱ्या प्रपंचाचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही.

जलादन्य इवाभाति जलोत्थो बुदबुदो यथा ।
तथात्मनः पृथगिय प्रपंचोऽयमनेकधा ॥ १४ ॥
पाण्यातून उठणारा बुडबुडा ज्याप्रमाणे पाण्यापेक्षा भिन्न भासतो, त्याप्रमाणे (आत्म्यावर) भासमान होणारा हा प्रपंच - विश्वाचा पसारा - जणू तो आत्म्यापेक्षा वेगळा आहे या पद्धतीने नाना प्रकारांनी निराळाच भासतो.


स्पष्टीकरण :- बुडबुडा पाण्याचाच आहे. तथापि तो बुडबुडा पाण्यापेक्षा वेगळा भासतो, इतक्याच अंशाने हा दृष्टांत घ्यावयाचा आहे (वर श्लोक ११ वरील स्पष्टीकरण पहा). आत्म्यावर भासमान होणारा प्रपंच हा भास असल्याने परमार्थतः तो आत्म्यापेक्षा निराळा नाही. आत्माच विश्वरूपाने भासतो (म्हणून 'इदं सर्वं यदयमात्मा' असे म्हटले जाते). परंतु हे परमार्थ तत्त्व अज्ञानामुळे कळून येत नाही. परिणामतः प्रपंच हा आत्म्यापेक्षा वेगळा आहे, असे अज्ञानी माणसाला वाटते.

यथा बुद्‌बुद-नाशेन जलनाशो न कर्हिचित् ।
तथा प्रपंच-नाशेन नाशः स्यादात्मनो न हि ॥ १५ ॥
ज्याप्रमाणे बुडबुड्याच्या नाशाने/फुटण्याने पाण्याचा नाश कधीही होत नाही, त्याप्रमाणे प्रपंचाच्या नाशाने आत्म्याचा नाश कधीच होत नाही. स्पष्टीकरण श्लोक १२-१३ प्रमाणेच ]


अहि-निर्ल्वयनी-जातः शुच्यादिर्नाहिमाप्नुयात् ।
तथा स्थूलादि-संभूतः शुच्यादिर्नाप्नुयादिमम् ॥ १६ ॥
सापाच्या (टाकलेल्या) कातीपासून उत्पन्न होणारे शुद्धी इत्यादी (गुण तसेच दोष) हे सापाप्रत पोचत नाहीत. त्याप्रमाणे स्थूल इत्यादी देह वा वस्तू या पासून निर्माण होणारे शुद्धी इत्यादी (गुण तसेच दोष) या (आत्म्या) प्रत पोचू शकत नाहीत.


स्पष्टीकरण :- सापाने कात टाकली. आता तिचा आणि सापाचा काहीच संबंध राहिला नाही. त्यामुळे त्या कातीचे किंवा कातीपासून निर्माण होणारे बरेवाईट गुणधर्म सापात येत नाहीत. असाच प्रकार आत्म्याच्या बाबतीत होतो. आत्म्यावर प्रपंच भासतो. या प्रपंचात - विश्वाच्या पसाऱ्यात - स्थूल-सूक्ष्म पदार्थ भाणि त्यांचे बरे-वाईट गुणधर्म आहेत. परंतु भासमान प्रपंचातील गुण-दोष हे अधिष्ठान-भूत आत्म्यात शिरत नाहीत. रज्जूवर भासणाऱ्या सर्पाचे विष इत्यादी रज्जूच्या ठिकाणी येत राहीत, तद्वत.

आत्म्यावर भासणाऱ्या प्रपंचात, आत्म्याला स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन देहांची उपाधी येते. पण उपाधीचे गुणधर्म आत्म्यात उतरत नाहीत. जसे, लाल फूल या उपाधीचा लाल रंग स्फटिकात उतरत नाही. संक्षेपाने सांगायचे झाल्यास, प्रपंचातील स्थूल-सूक्ष्म उपाधींचा आत्म्यावर काहीच परिणाम होत नाही; त्यांचे गुणधर्म आत्म्यात येत नाहीत.

टाकलेल्या सापाच्या कांतीचे कोणतेच गुणधर्म सापात येत नाहीत, इतक्याच अंशाने हा दृष्टांत घ्यावयाचा आहे.

त्यक्तां त्वचमहिर्यद्‌वदात्मत्वेन न मन्यते ।
आत्मत्वेन सदाज्ञानी त्यक्त-देह-त्रयं तथा ॥ १७ ॥
टाकलेली कात ही आपली आहे असे साप ज्याप्रमाणे मानीत नाही, त्याप्रमाणे (आत्म-) ज्ञानी पुरुष हा टाकलेले देह आपले आहेत, असे मानत नाही.


स्पष्टीकरण :- जोपर्यंत सापाच्या अंगावर त्याची कात होती, तोपर्यंत तिच्या ठिकाणी त्याचे ममत्व होते; तिला तो आपली मानत होता. तिची सुख-दु:खे, गुणदोष आपले आहेत असे त्याला वाटत होते. पण एकदा का त्याने ती कात टाकली की ती मग आपली आहे असे त्याला वाटत नाही; तिच्यावरचे त्याचे ममत्व उडून जाते. त्या टाकलेल्या कातीचे गुणधर्म आपले आहेत असे त्याला वाटेनासे होते.

बरोबर असाच प्रकार आत्मज्ञानी माणसाच्या बाबतीत होतो. फक्त आत्मा हा एकमेव सत्य आहे; बाकी जे जे भासते ते ते सर्व अनात्मा आहे, आणि आत्मा व अनात्मा यांचा तादृश काहीच संबंध नाही, हे त्याला कळून चुकले आहे. त्यामुळे अनात्मा असणाऱ्या देहांवरचे त्याचे ममत्व वा त्यांनाच आत्मा मानणे हे आता त्याच्या बाबतीत शक्य होत नाही. ते देह इत्यादी त्याला आपले वाटत नाहीत; म्हणून देहांची सुख-दुःखे, गुणधर्म इत्यादी त्याच्याप्रत पोचत नाहीत.

केवलाद्वैत वेदान्तात, स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे तीन देह मानले जातात. सांसारिक अवस्थेत अज्ञानी माणूस देहाला आत्मा मानतो, देह आपले मानतो तसेच त्यांची सुखदु:खे, गुण-दोष हे आपले आहेत, असे त्याला वाटत असते. थोडक्यात संसारातील अज्ञानी माणसाचे देहावर ममत्व असते. असा प्रकार आत्मज्ञानी माणसाच्या बाबतीत घडत नाही. 'त्याने तीन देह टाकले आहेत' असे श्लोकात म्हटले आहे. याचा अर्थ तो 'मृत झाल्यावर' असा अर्थ नाही; कारण तो जीवन्मुक्त आहे. म्हणून त्याने तीन देह टाकले आहेत' याचा अर्थ 'त्याने तीन देहांवरचे ममत्व टाकले आहे' असा आहे. देह म्हणजे आत्मा, देह हे आपले आहेत, अशी भूमिका जीवन्मुक्त अशा आत्मसाक्षात्कारी पुरुषाची नसते. त्यामुळे शरीराचे काहीही बरेवाईट झाले तरी काहीही न वाटणारे जीवन्मुक्त या जगात दिसून येतात.

अहि-निर्ल्वयनी-नाशादहेर्नाशो यथा न हि ।
देह-त्रय-विनाशेन नात्मनाशस्तथा भवेत् ॥ १८ ॥
सापाची कात नष्ट झाल्याने, ज्याप्रमाणे सापाचा नाश होत नाही, त्याप्रमाणे तीन देहांच्या नाशामुळे आत्म्याचा नाश कधीच होत नाही.


स्पष्टीकरण :- सापाने कात टाकल्यावर कात आणि साप यांचा संबंध राहत नाही. त्यामुळे कात नष्ट झाली तरी साप नाश पावत नाही. याचप्रमाणे, अनात्मा असणारे तीन देह आणि आत्मा यांचा काहीच संबंध नाही. फक्त तीन देहांची उपाधी आत्म्याला आली आहे; पण ती उपाधी आत्म्यापेक्षा वेगळी आहे. साहजिकच ती उपाधी नष्ट झाल्यामुळे आत्म्याचा नाश होण्याचे कारणच नाही. जसे घट, मठ इत्यादी उपाधी नष्ट झाली तरी आकाशाचा नाश होत नाही; लाल फुलाची उपाधी नष्ट झाल्याने स्फटिकाचा नाश होत नाही. तद्वत् तीन देहांच्या उपाधीच्या नाशाने आत्मा कधीच नाश पावत नाही.

तक्रादि-लवणोपेतमज्ञैर्लवणवद् यथा ।
आत्मा स्थूलादि-संयुक्तो दूष्यते स्थूलकादिवत् ॥ १९ ॥
मिठाने युक्त अशा ताक, इत्यादींना ते पदार्थ मीठ आहेत वा मीठाप्रमाणे आहेत असा दोष अडाणी माणसे देतात; त्याप्रमाणे स्थूल इत्यादी देहांच्या संपर्कात आलेला आत्मा स्थूल (देह) इत्यादी आहे, असा दोष अज्ञानी माणसे देत असतात.


स्पष्टीकरण :-- मीठ मिसळलेले ताकासारखे पदार्थ मिठासारखे आहेत, मीठ आहेत, असे अडाणी माणसे समजतात. त्याप्रमाणे, स्थूल देह इत्यादिकांच्या उपाधीत सापडलेला आत्मा स्थूल देह इत्यादी आहे असे अज्ञानी माणसे मानतात; कारण उपाधीपेक्षा आत्मा वेगळा आहे हे त्यस कळलेले नसते. खरे म्हणजे देह इत्यादी अनात्मा आहेत; आणि अनात्म पदार्थ कधीच आत्मा होऊ शकत नाहीत: ही गोष्ट ज्ञानी माणसाला माहीत असते; अज्ञानी माणसाला ते कळत नाही म्हणून तो देह इत्यादींनाच आत्मा मानतो. पण ते चूक आहे.

अयःकाष्ठादिकं यद्‌वद् वह्निवद् वह्नियोगतः ।
भाति स्थूलादिकं सर्वमात्मवत् स्वात्म-योगतः ॥ २० ॥
लोखंड, लाकूड, इत्यादी अग्नीच्या संपर्काने ज्याप्रमाणे अग्नीप्रमाणे भासतात, त्याप्रमाणे स्वत:मधील आत्म्याच्या संपर्कामुळे स्थूल इत्यादी (शरीरे) आत्मा आहेत असे भासतात.


स्पष्टीकरण :- या श्लोकात एका शंकेला उत्तर आहे, शंका अशी, आत्मा हा चेतन आहे; शरीर सुद्धा जिवंतपणी चेतनच दिसते. मग शरीराला आत्मा का मानू नये ? या शंकेचे समाधान असे -- लाकूड जळाले किंवा लोखंड तप्त झाले की अग्नीप्रमाणे दिसतात; त्याचे कारण त्यांच्याशी झालेला अग्नीचा संपर्क. प्रत्यक्षात लाकूड व लोखंड अग्नीपेक्षा वेगळे आहेत. तद्वत् आत्म्याच्या संपर्कामुळे शरीर चेतन आहे असे वाटते. शरीराला स्वगत असे चैतन्य नाही. जसे, लाल फुलाई सांनिध्याने शुभ्र स्फटिक लाल भासू लागले. त्याप्रमाणे आत्म्याच्या केवळ सांनिध्याने स्थूल शरीर इत्यादी चेतन आहे असे वाटते. त्यामुळे अज्ञानी माणसे स्थूल इत्यादी शरीरांना आत्मा मानतात. परंतु अनात्मा असणारा देह इत्यादी चेतन आत्म्यापेक्षा वेगळे आहेत, अशी आत्मज्ञानी माणसाची भूमिका असते.

दाहको नैव दाह्यं स्याद् दाह्यं तद्‌वन्न दाहकः ।
नैवात्मायमनात्मा स्यादनात्मायं न चात्मकः ॥ २१ ॥
दाहक (म्हणजे जाळणारा असा अग्नी) हा जाळण्यार' योग्य(असे लाकूड इत्यादी) दाह्य वस्तू कधीच होत नाही; तसे दाह्य वस्तूही कधीही दाहक होत नाही. (त्याच प्रमाणे) हा आत्म कधीही अनात्मा होत नाही आणि अनात्मा हाही कधी आत्मा होत नाही.


स्पष्टीकरण :-- दाह्य व दाहक, प्रकाश-अंधार हे कधीही एक होत नाहीत. तद्वत् आत्मा आणि अनात्मा हे कधीही एक मानता येत नाहीत. त्यामुळे देह इत्यादी अनात्म असणारे पदार्थ हे कधीही आत्मा होऊ शकत नाहीत. त्या दोहोंमध्ये फार मोठा फरक आहे तो असा :- आत्मा हा द्रष्टा आहे; अनात्मा दृश्य उपाधी आहे. आत्मा हा स्थूल-सूक्ष्म-कारण या तीन शरीरांपेक्षा वेगळा आणि सच्चिदानंद आहे. याउलट अनात्मा हा अनृत, जड, आणि व्यष्टि-समष्टी या स्वरूपात असणारे शरीर उपाधी आहे' (शंकराचार्यकृत आत्मानात्मविवेक). आत्मा व अनात्मा हे दोन ध्रुवाप्रमाणे वेगळे आहेत. त्यामुळे आत्मा कधी अनात्मा होत नाही आणि अनात्मा कधी आत्मा होत नाही.

प्रमेयादि-त्रयं सार्थं भानुना घट-कुड्यवत् ।
येन भाति स एवाहं प्रमेयादि-विलक्षणः ॥ २२ ॥
सूर्यामुळे ज्याप्रमाणे घडा, भिंत इत्यादी प्रकाशित होतात, त्याप्रमाणे सार्थ असणाऱ्या प्रमेय, इत्यादी तीन गोष्टी या ज्याच्यामुळे प्रकाशित होतात, तो प्रमेय, इत्यादींपेक्षा वेगळा असा भसणारा (असा आत्मा) मीच आहे.


स्पष्टीकरण :- सूर्याच्या प्रकाशाने घडा, भिंत, इत्यादी वस्तू प्रकाशित होऊन, त्या वस्तू ज्ञानाचा विषय होतात. तथापि त्या सर्व वस्तूंपेक्षा सूर्य हा वेगळा आहे. तोच प्रकार आत्म्याच्या बाबतीत आहे. व्यवहारात ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान अशी त्रिपुटी असते. ती आत्म्यामुळेच प्रकाशित होते. बुद्धीत पडलेला चिदाभास म्हणजे जीव; तोच व्यवहारात ज्ञाता असतो; त्याला व्यवहारात बाह्य वस्तूंचे - प्रमेय पदार्थांचे ज्ञान होते असे आपण म्हणतो. आता जागृतीतील ज्ञान काय किंवा स्वप्नातील ज्ञान काय ते आत्म्यामुळेच होते. इतकेच नव्हे तर सुषुप्ती अवस्थेतील हे अज्ञानही आत्म्यामुळेच होत असते. इतकेच नव्हे तर सुषुप्ती अवस्थेतील अज्ञानही आत्म्यामुळेच कळत असते. संक्षेपाने सांगायचे झाल्यास, प्रमेय इत्यादी गोष्टी आत्म्यामुळेच प्रकाशित होतात. परंतु आत्मा हा त्या सर्वांपेक्षा वेगळा आहे. आणि असा हा जो आत्मा आहे ते आपले स्वरूप आहे असा आत्मसाक्षात्कारी जीवन्मुक्ताचा अनुभव असतो.

भानु-स्फुरणतो यद्वद् स्फुरतीव घटादिकम् ।
स्फुरतीव प्रमेयादिरात्म-स्फुरणतस्तथा ॥ २३ ॥
जसे सूर्याच्या स्फुरण्याने म्हणजे प्रकाशण्याने ज्याप्रमाणे घट इत्यादी जणू चमकतात, प्रकाशित होतात त्याप्रमाणे आत्म्याच्या स्फुरणामुळे - प्रकाशामुळे प्रमेय, इत्यादी (जणू) चमकतात म्हणजे प्रकाशित होतात.


स्पष्टीकरण :- सूर्याच्या प्रकाशाने घट वगैरे ज्ञेय वस्तू प्रकाशित होऊन ज्ञानाचा विषय होतात. त्याप्रमाणे आत्म्याच्या चैतन्याच्या प्रकाशाने प्रमेय इत्यादी प्रकाशित होऊन ज्ञानाचा विषय बनतात.

पिष्टादिर्गुल-संपर्काद् गुलवत् प्रतिमान् यथा ।
आत्मयोगात प्रमेयादिरात्मवत् प्रीतिमन् भवेत् ॥ २४ ॥
गुळाच्या संपर्काने पीठ वगैरे पदार्थ गुळाप्रमाणेच सुखसंतोष देणारे होतात; त्याप्रमाणे आत्म्याच्या सांनिध्याने - संयोगाने प्रमेय इत्यादी पदार्थ हे आत्म्याप्रमाणे प्रीती-सुखआनंद देणारे होतात.


स्पष्टीकरण :- गुळाशी मिश्रण झाल्यामुळे, लाडवातील पीठ वगैरे वस्तू गुळाप्रमाणेच सुख देणाऱ्या होतात. तोच प्रकार आत्म्यामुळे होतो. म्हणजे असे, या जगात आपणास आत्मा हा सर्वांत जास्त प्रिय म्हणून आनंद देणारा आहे. आणि आत्म्यासाठीच - आत्म्यामुळेच इतर सर्व पदार्थ आपणास प्रिय होतात, असे याज्ञवल्क्य ऋषींनी म्हटले आहे (आत्मनस्तु कामाय इदं सर्वं प्रियं भवति । ) म्हणून आत्म्याचे सांनिध्य लाभले की प्रमेय इत्यादी पदार्थ हे आत्म्याप्रमाणेच आपल्याला प्रिय होतात आणि ते सुख देणारे ठरतात. आत्माच नसेल तर ते पदार्थ कुणाला प्रिय होतील ?

घट-नीरान्न-पिष्टानामुष्णत्वं वह्नि-योगतः ।
वह्निं विना कथं तेषामुष्णता स्याद् यथा क्यचित् ॥ २५ ॥
भूत-भौतिक-देहानां स्फूर्तिता स्वात्म-योगतः ।
विनात्मानं कथं तेषां स्फूर्तिता स्यात् तथा क्वचित् ॥ २६ ॥
घडा, पाणी, अन्न, (ओले) पीठ यांच्या ठिकाणची उष्णता ही अग्नीच्या संपर्कामुळे येते; अग्नीविना त्यांची उष्णता कुठे व कशी संभवेल ? त्याप्रमाणे आत्म्याच्या संपर्कामुळे भूते आणि भौतिक देह यांच्या ठिकाणी चैतन्य दृश्यमान होते. आत्म्याशिवाय त्यांचे चैतन्य कुठे आणि कसे बरे संभवेल ?


स्पष्टीकरण :- अग्नीच्या संपर्कामुळे घडा, इत्यादी पदार्थांत उष्णता हा गुण येतो; तो त्यांचा अंगभूत गुण नाही. याचप्रमाणे भूते, व भौतिक देह यांच्या ठायी चेतनत्व हा अंगभूत गुण नाही; तथापि आत्म्याच्या सांनिध्याने त्यांच्या ठिकाणी चैतन्य हा गुण दिसतो- भासतो. उदा. आपणास महाभूतांपासून बनलेला भौतिक स्थूल देह चेतन वाटतो; पण मूलतः तो चेतन नाही. म्हणूनच चैतन्य निघून गेल्यावर निष्प्राण शरीर लाकडाप्रमाणे अचेतन होऊन पडते. याचाच अर्थ असा की केवळ आत्म्याच्या संपर्कामुळे अचेतन पदार्थ चेतनाप्रमाणे भासतात.

नानाविधेषु कुम्भेषु वसत्येकं नभो यथा ।
नानाविधेषु देहेषु तद्वदेको वसाम्यहम् ॥ २७ ॥
नाना प्रकारच्या घड्यांमध्ये ज्याप्रमाणे एकच आकाश (व्यापून) राहते, त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या देहांमध्ये एकटा मीच (म्हणजे आत्मा) राहत असतो.


स्पष्टीकरण -- आत्मरूप झालेल्या जीवन्मुक्ताच्या तोंडी हा श्लोक आहे. येथे पुढील शंकेला उत्तर आहे :-- आत्म्याच्या सांनिध्याने शरीर चेतन भासते. शरीरे अनेक आहेत. तेव्हा नाना देहांप्रमाणे आत्मेही अनेक आहेत काय ? या शंकेचे समाधान येथे केले आहे. एकच आकाश सर्व घड्यांच्या संपर्कात येऊन त्यांना व्यापून टाकते. प्रत्येक घड्यासाठी वेगळे असे आकाश नाही. शरीरालाही कधी कधी घट म्हणतात (पहा - घटघट में रामरमय्या) सर्व प्रकारच्या शरीररूपी घटांमध्ये केवळ एकच आत्मा राहतो; प्रत्येक देहासाठी स्वतंत्र वेगळा आत्मा नाही. म्हणून आत्म्याशी एकरूप झालेला जीवन्मुक्त म्हणतो की मीच म्हणजे आत्मा सर्व देहांत राहत असतो.

नानाविधत्वं कुंभानां न यात्येव यथा नभः
नानाविधत्वं देहानां तद्‌वदेव न याम्यहम् ॥ २८ ॥
आकाश ज्याप्रमाणे घड्यांचे नाना प्रकारांप्रत जात नाही म्हणजे नाना प्रकारचे होत नाही. त्याप्रमाणे (आत्मरूप असणारा असा) मी देहांच्या नाना प्रकारांप्रत जात नाही म्हणजे नाना प्रकारचा होत नाही.


स्पष्टीकरण – नाना प्रकारचे आणि नाना आकारांचे घडे कुंभाराने बनविले आहेत. त्यांतील आकाशाला त्या घटाच्या उपाधीमुळे घटाकाश म्हणतात. परंतु आकाश हे त्या घड्यांचे प्रकार आणि आकार धारण करीत नाही. ते एकरूप आणि एकच एक राहाते. तोच प्रकार आत्म्याच्या बाबतीत होतो. आत्मा हा एकरूप आणि निराकार आहे. त्याला भिन्न देहांची उपाधी येते. तरी त्याला भिन्न शरीरांचे आकार, गुणधर्म येत नाहीत. आत्मा देहरूप होत नाही. आत्मा स्वत:च्या मूळ रूपातच राहतो. हाही श्लोक आत्मरूप झालेल्या जीवन्मुक्ताच्या तोंडी आहे.

यथा घटेषु नष्टेषु घटाकाशो न नश्यति ।
तथा देहेषु नष्टेषु नैव नश्यामि सर्वगः ॥ २९ ॥
घडे नष्ट झाले असताना, ज्याप्रमाणे घटाकाश नाश पावत नाही, त्याप्रमाणे देह नष्ट झाले तरी सर्वव्यापी असणारा असा मी (म्हणजे आत्मा) हा मात्र नष्ट होऊन जात नाही.


स्पष्टीकरण - घटाच्या उपाधीने घटाकाश ही संज्ञा वापरली जाते. वर श्लोक २८ मध्ये म्हटल्याप्रमाणे आकाश हे घट किंवा घट रूप होत नाही. साहजिकच घट नष्ट झाले तरी घटाकाश म्हणजे घटाकाशरूप वाटणारे आकाश नष्ट होत नाही. घटनाशाचा परिणाम घटाकाशावर म्हणजेच आकाशावर होत नाही. कारण आकाश हे घट झालेच नव्हते. त्याप्रमाणे आत्मा जरी देहांच्या उपाधीत सापडला तरी तो देह किंवा देहरूप होत नाही. त्यामुळे देह नष्ट झाले तरी त्यांचा काही परिणाम आत्म्यावर होत नाही. देहांच्या नाशाने आत्म्याचा नाश होत नाही.

आत्मा सच्चिदानंद आहे. तो सत्-अस्तित्व-रूपाने सर्वव्यापक आहे. म्हणून गुरुलिंग गीतेत, श्रीनिंबरगीकर महाराजांनी म्हटले आहे :- सद्‌रूपने शिव पैसावदानू । ' (सद्‌रूपाने शिव म्हणजे आत्मा सर्व काही व्यापून आहे). हाही श्लोक आत्मरूप झालेल्या जीवन्मुक्ताच्या तोंडी आहे.

उत्तमादीनि पुष्पाणि वर्तन्ते सूत्रके यथा ।
उत्तमाद्यास्तथा देहा वर्तन्ते मयि सर्वदा ॥ ३० ॥
एकाच सूत्रावर - दोर्‍यावर त्यावर गुंफलेली उत्तम वगैरे प्रकारची फुले राहतात; त्याप्रमाणे माझ्या म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी (म्हणजे आत्म्याभोवती उपाधी या स्वरूपात) उत्तम इत्यादी प्रकारचे देह राहत असतात.


स्पष्टीकरण - फुलाच्या माळेत बरी-वाईट फुले गुंफली. ती सर्व फुले माळेच्या दोऱ्यावरच असतात. पण फुले म्हणजे दोरा नव्हे, आत्मा हा माळेतील सूत्रासारखा आहे. बरे-वाईट देह हे आत्म्याला उपाधी म्हणून येतात. परंतु ते देह हे मात्र कधीच आत्मा होऊ शकत नाहीत.

यथा न संस्पृशेत् सूत्रं पुष्पाणामुत्तमादिता ।
तथा नैकं सर्वगं मां देहानामुत्तमादिता ॥ ३१ ॥
फुलांचे उत्तमत्व इत्यादी (गुण) (गाळेच्या) दोऱ्याला स्पर्श करू शकत नाहीत, त्याप्रमाणे देहांचे उत्तमत्व इत्यादी गुणधर्म हे एक आणि सर्वव्यापी अशा मला (म्हणजे आत्म्याला) स्पर्श करीत नाहीत.


स्पष्टीकरण - हाही श्लोक आत्मस्वरूप झालेल्या जीवन्मुक्ताच्या तोंडी आहे. माळेतील फुले दोऱ्यावर असली तरी ती दोरा होत नाहीत. तसेच फुलांचे कोणतेच बरे-वाईट गुण त्या दोऱ्यात उतरत नाहीत. त्याप्रमाणे आत्मा जरी देहांच्या उपाधीत असला तरी आत्मा म्हणजे देह नसल्याने, देहाचे कोणतेही बरेवाईट गुणधर्म आत्म्याला चिकटत नाही.

पुष्पेषु तेषु नष्टेषु यद्वत् सूत्रं न नश्यति ।
तथा देहेषु नष्टेषु नैव नश्याम्यहं सदा ॥ ३२ ॥
माळेत गुंफलेली ती फुले नष्ट झाली तरी सूत्र नष्ट होत नाही; तद्वत् देह नष्ट झाले तरी आत्मरूप असा मी कधीच नष्ट होत नाही.


स्पष्टीकरण-- माळेत दोऱ्यावर फुले आहेत. पण ते दोन्ही वेगळे आहेत. त्यामुळे फुले नाश पावली तरी दोरा नष्ट होण्याचे काहीच कारण नाही. तो आहे तसाच राहील. तोच प्रकार आत्मा व शरीरे यांच्या बाबतीत आहे. देहांपेक्षा आत्मा निराळा आहे. त्यामुळे आत्म्याभोवती जरी शरीरांची उपाधी आली असली तरी, देहांच्या नाशाने आत्म्याचा नाश कधीच होत नाही. असा आत्मरूप झालेल्या जीवन्मुक्ताचा अनुभव आहे.

पर्यंक-रज्जु-रंध्रेषु नानेवैकापि सूर्ग-भा ।
एकोऽप्यनेकवद् भाति तथा क्षेत्रेषु सर्वगः ॥ ३३ ॥
पलंगाच्या म्हणजे बाजेच्या दोऱ्यांतील मधल्या मोकळ्या रंध्रांत एकच असणारी सूर्य-प्रभा अनेक आहे असे वाटते. त्याप्रमाणे सर्वव्यापी असणारा आत्मा जरी एक आहे तरी तो अनेक क्षेत्रांमध्ये अनेक असल्याप्रमाणे भासतो.


स्पष्टीकरण -- सूर्याची प्रभा या स्वरूपात ती एकच आहे. पण बाजेच्या दोऱ्यांमधल्या मोकळ्या जागांत ती पडली की ती अनेक आहे असे वाटते. पण ते सत्य नाही. आत्मा हा एकमेव अद्वितीय आहे. तरी अनेक क्षेत्रांत म्हणजे शरीरात तो अनेक -- भिन्न असल्याप्रमाणे भासतो. शरीरालाच अनेकदा क्षेत्र असे म्हणतात.

रज्जु-रंध्रस्थ-दोषादि सूर्य-भां न स्पृशेद् यथा ।
तथा क्षेत्रस्थ-दोषादि सर्वगं मां न संस्पृशेत् ॥ ३४ ॥
ज्याप्रमाणे बाजेच्या दोऱ्यांच्या मधील रंध्रांमध्ये असणारे दोष, (गुण) इत्यादी हे सूर्य-प्रकाशाला स्पर्श करू शकत नाहीत, त्याप्रमाणे क्षेत्रांत म्हणजे देहांत असणारे दोष वगैरे सर्वव्यापी अशा मला (म्हणजे आत्म्याला) स्पर्श करू शकत नाहीत.


स्पष्टीकरण - बाजेच्या दोऱ्यांमधील रंध्रे तसेच अनेक पदार्थ यांवर सूर्य-प्रकाश पडत असतो. परंतु त्या त्या स्थळांचे गुण-दोष सूर्य प्रकाशात शिरू शकत नाहीत; सूर्यप्रकाश त्या सर्वातून अलिप्तच राहतो. तद्वत् त्या त्या शरीरातील गुण-दोष आत्म्याला लागत नाहीत. कारण आत्मा हा असंग आहे. आकाश हे घट, मठ, इत्यादींच्या उपाधींत सापडले तरी त्या उपाधींचे गुणदोष आकाशाला स्पर्श शकत नाहीत. त्याप्रमाणे नाना शरीरांच्या उपाधीत जरी आत्मा सापडला असला तरी त्या उपाधींचे गुणधर्म आत्म्याला चिकटत नाहीत. या श्लोकातही आत्मसाक्षात्कारानंतर आत्मरूप झालेल्या जीवन्मुक्ताचा अनुभव दिला आहे.

तद्‌रज्जु-रंध्र-नाशेषु नैव नश्यति सूर्य-भा ।
तथा क्षेत्र-विनाशेषु नैव नश्यति सर्वगः ॥ ३५ ॥
त्या बाजेच्या रज्जु-रंध्रांचा नाश झाल्यावर सुद्धा सूर्यप्रकाशाचा नाश होत नाही; त्याप्रमाणे भिन्न क्षेत्रांचा म्हणजे शरीरांचा नाश झाला तरी सर्वव्यापी असा आत्मा नष्ट होऊ जात नाही.


स्पष्टीकरण - बाज मोडली; दोऱ्या तुटून गेल्या; रंध्रे दिसेनाशी झाली. तरी सूर्यप्रकाश नष्ट होत नाही. बरोबर याचप्रमाणे शरीरांचा नाश झाला तरी आत्म्याचा नाश होत नाही.

देहो नाहं दृश्यत्वाद् भौतिकत्वान्न चेन्द्रियम् ।
प्राणी नाहमनेकत्वान्मनो नाहं चलत्यतः ॥ ३६ ॥
बुद्धिर्नाहं विकारित्वात् तमो नाहं जडत्यतः ।
देहेंद्रियादिकं नाहं विनाशित्वाद् घटादिवत् ॥ ३७ ॥
आत्मरूप असणारा असा मी देह नाही; कारण देह हा दृश्यमान आहे. मी = आत्मा इंद्रिये नाही; कारण इंद्रिये ही भूतजन्य आहेत. मी म्हणजे आत्मा प्राण नाही; कारण प्राण अनेक आहेत. मी = आत्मा मन नाही; कारण मन हे चंचल आहे. मी आत्मा बुद्धी नाही; कारण बुद्धीही विकार पावणारी आहे. आत्मरूप असणारा मी तम (हा गुण = अज्ञान) नाही; कारण तम हे जड आहे. देह, इंद्रिय, इत्यादी म्हणजे मी = आत्मा नव्हे; कारण ते देह, इत्यादी घट इत्यादी पदार्थांप्रमाणे विनाशी आहेत.


स्पष्टीकरण -- या दोन श्लोकांत कारणे देऊन शरीर इत्यादीपेक्षा आत्मा भिन्न आहे असे दाखविले आहे. येथेही आत्मरूप झालेला जीवन्मुक्त बोलत आहे. त्याचा युक्तिवाद असा आहे : शरीर हे दृश्य आहे म्हणजे ते प्रत्यक्ष ज्ञानाचा विषय आहे म्हणजेच ते ज्ञानेंद्रियांनी कळणारे आहे. आत्मा दृश्य नाही; तो प्रत्यक्ष ज्ञानाने कळत नाही; तो इंद्रिये व मन यांना गोचर नाही, त्यांचा तो विषय होत नाही. म्हणून शरीर म्हणजे आत्मा नव्हे.

इंद्रिये ही भौतिक आहेत म्हणजे भूतापासून उत्पन्न झालेली आहेत. केवलाद्वैत वेदान्तात आकाश, इत्यादी सूक्ष्म भूतांपासून इंद्रिये उत्पन्न होतात असे सांगितलेले आहे. याप्रमाणे आत्मा हा सूक्ष्म भूतांपासून निर्माण होणारा नाही. या उलट आत्म्यापासूनच सूक्ष्म भूते उद्भूत होतात. या कारणास्तव इंद्रिये ही आत्मा होऊ शकत नाहीत.

शरीरात पंच प्राण कार्य करीत असतात. ते पाच आहेत म्हणजे अनेक, एकापेक्षा जास्त आहेत. या उलट आत्मा हा एकच एक आहे. या कारणाने अनेक असणारे प्राण हेही आत्मा होऊ शकत नाहीत.

मन म्हणजे सुद्धा आत्मा नव्हे. कारण मन हे चंचल आहे. याउलट आत्मा हा कूटस्थ नित्य असल्याने तो निश्चळ, निर्विकार आहे.

बुद्धी ही आत्मा होऊ शकत नाही. याचे कारण बुद्धीत अनेक विकार होत असतात; बुद्धीत फरक पडत असतात. याउलट आत्मा हा विकार-रहित, निर्विकार आहे, कारण तो कूटस्थ नित्य आहे.

तम म्हणजे तमोगुण. तमोगुण हा जड आहे असे म्हटले जाते. तेव्हा तमोगुण जड असल्यामुळे तो आत्मा नाही; कारण आत्मा हा चेतन, चैतन्यरूप आहे. याच प्रमाणे रजोगुण आणि सत्त्वगुण हेही आत्मा होऊ शकत नाहीत. रजोगुण हा आत्मा नाही; कारण तो चंचल आहे; याउलट आत्मा हा निश्चल आहे. सत्त्वगुण हा लघु इत्यादी आहे. याउलट आत्म्याजवळ कोणतेच गुण नाहीत; तो निर्गुण आहे. म्हणून सत्त्वगुण हाही आत्मा नव्हे.

देह, इंद्रिये, इत्यादी सर्व मिळून आत्मा होतो असेही म्हणता येत नाही. कारण ते सर्व नाशवंत आहेत. याउलट आत्मा हा नाशरहित, अविनाशी आहे. तो सत् आहे म्हणजे तो तीनही काळांत अस्तित्वात असणारा असा आहे.

संक्षेपाने सांगायचे झाल्यास हे भासमान जग आणि त्यातील कोणताही पदार्थ हा आत्मा होऊ शकत नाही. याचे कारण एकच : आत्मा हा त्या सर्वापेक्षा भिन्न आहे.

देहेंद्रिय-प्राण-मनो-बुद्ध्यज्ञानानि भासयन् ।
अहंकार तथा भामि चैतेषामभिमानिनम् ॥ ३८ ॥
देह. इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी, अज्ञान, आणि या सर्वावर अभिमान ठेवणारा जो अहंकार, त्या सर्वांना प्रकाशित करणारा असा मी = आत्मा स्वयंप्रकाशी आहे.


स्पष्टीकरण-देह, इंद्रिये, प्राण, मन आणि बुद्धी तसेच तम म्हणजे तमोगुण आणि अज्ञान हे आत्मा नव्हेत असे वर ३६-३७ श्लोकांत सांगून झाले. प्रस्तुत श्लोकात अहंकार म्हणजे आत्मा नव्हे हे अभिप्रेत आहे. अहंकार म्हणजे अंत:करणाची अभिमान-वृत्ती. एखादी वस्तू मी आहे असे म्हणणे, एखादी वस्तू माझी आहे, एखादी वस्तू मला पाहिजे, अशा स्वरूपात अहंकार व्यक्त होत असतो. मी-मला-माझे या स्वरूपात अहंकार व्यक्त होतो. अभिमान हे अहंकाराचे स्वरूप आहे. केवलाद्वैत वेदान्त ग्रंथात अनेकदा अहंकार हा स्वतंत्रपणे मानला जात नाही. तर त्याचा अंतर्भाव मन किंवा बुद्धी यांत केला जातो. आणि वर मन व बुद्धी आत्मा नव्हेत हे सांगून झाले. साहजिकच अहंकार म्हणजे आत्मा नव्हे हे स्पष्ट झाले. आणखी एका कारणाने अहंकार हा आत्मा होऊ शकत नाही. ते कारण असे :- 'मी देह आहे, मी लठ्ठ आहे, माझे डोळे तीक्ष्ण आहेत, माझे मन कामात लागत नाही.' अशा स्वरूपात अहंकार हा देह, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी आणि अज्ञान यांवर अभिमान बाळगून असतो. तथापि देह, इंद्रिये, प्राण, मन, बुद्धी आणि अज्ञान आणि त्यांचा अभिमान बाळगणारा अहंकार या सर्वांना प्रकाशित करणारा आत्मा आहे. म्हणजे आत्म्यामुळेच या सर्वांचे ज्ञान होते; आत्म्यामुळेच ते सर्व ज्ञानाचा विषय होतात. ते परप्रकाशी आहेत. याउलट स्वत: सिद्ध असणारा आत्मा स्वयंप्रकाशी आहे.

वरील भाग लक्षात घेतला म्हणजे देह, इंद्रिये इत्यादि वस्तू आत्मा नव्हेत हे सिद्ध होते.

सर्वं जगदिदं नाहं विषयत्वादिदंधियः ।
अहं नाहं सुषुप्त्यादौ अहमः साक्षितः सदा ॥ ३९ ॥
मी = आत्मा म्हणजे हे अंपूर्ण जग नव्हे. कारण हे विश्व बुद्धीचा म्हणजे ज्ञानाचा विषय आहे. अहं(कार) म्हणजे हीमी = आत्मा नव्हे; कारण सुषुप्ती इत्यादी अवस्थांतही मी = आत्मा हा नेहमी अहं(काराचा) साक्षी असतो.


स्पष्टीकरण - आत्मा हा कधीही कोणत्याही ज्ञानाचा विषय होत नाही . याउलट सर्व जग ज्ञानाचा विषय आहे. या कारणाने हे संपूर्ण म्हणजे आत्मा नव्हे.

अहं म्हणजे अहंकार हाही आत्मा होऊ शकत नाही. अहंकाराला प्रकाहित करणारा आत्मा आहे, हे मागील श्लोक ३८ मध्ये सांगून झाले. त्या सुषुप्ति अवस्थेत अहंकार नसतो, तेथे अज्ञान असते. पण जागे झाल्यावर 'मी सुखाने झोपलो होतो' अशी अहंकाराची जाणीव येते. त्या सुषुप्ती अवस्थेत सुद्धा अहंकाराचा प्रकाशित करणारा, अहंकाराचा साक्षी असणारा अस आत्मा आहे. किंबहुना आत्मा हा सर्वसाक्षी आहे.

या श्लोकात आत्मरूप झालेला जीवन्मुक्त स्वतःचे म्हणजे आत्म्याचे इतर सर्वांपासूनचे वेगळेपण दाखवून देत आहे.

सुप्तौ यथा निर्विकारस्तथावस्थाद्वयेऽपि च ।
द्वयोर्मात्राभियोगेन विकारीव विभाम्यहम् ॥ ४० ॥
सुषुप्ती अवस्थेत मी = आत्मा विकार-रहित असतो. त्याचप्रमाणे (जागृती आणि स्वप्न या) दोन अवस्थांमध्येही मी निर्विकारच असतो. तथापि त्या दोन अवस्थांच्या काही भागांशी (मात्रा) संपर्क आल्याने, मी = आत्मा जणू विकारी आहे असा भासतो.


स्पष्टीकरण – व्यवहारामध्ये सुषुप्ती किंवा निद्रा ही ज्ञानशून्य अवस्था आहे. ज्ञानामुळे होणारे कोणतेच विकार त्या अवस्थेत आत्म्यावर आरोपित केले जात नाहीत. म्हणून निद्रावस्थेत आत्मा निर्विकार असतो असे म्हटले आहे. आता खरे म्हणजे जागृती व स्वप्न या दोन अवस्थांतही आत्मा निविकारच असतो. तथापि त्या दोन अवस्थांत त्या अवस्थांच्या काही भागाशी संबंध आल्याने, आत्म्यावर सुख-दु:ख इत्यादींचा आरोप केला गेल्याने तो विकारयुक्त आहे असे वाटते. जागृति अवस्थेत इंद्रिये, मन, बुद्धी कार्यप्रवण असतात. स्वप्न अवस्थेत मन, बुद्धी कार्यप्रवण असतात. दोन्ही अवस्थांत घडणारे विकार हे आत्म्यावर आरोपित केले जातात. पण खोटा असल्याने, या दोनही अवस्थांत आत्मा हा निर्विकारच असतो. आत्मा हा कूटस्थ असल्याने तो कोणत्याही अवस्थेत निर्विकारच राहतो. वर ३९ व्या श्लोकाखाली म्हटल्याप्रमाणे आत्मा हा सर्वसाक्षी आहे. त्याच्यावर कशाचाही परिणाम घडत नाही. म्हणून व्यवहारातील जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांत आत्मा साक्षीभूत असल्याने, तो निर्विकारच राहतो.

या श्लोकात आत्मस्वरूप झालेल्या जीवन्मुक्ताच्या मुखातून आत्म्याची निर्विकरता सांगितली आहे.

उपाधि-नील-रक्ताद्यैः स्फटिको नैव लिप्यते ।
तथात्मा कोशजैः सर्वैः कामाद्यैर्नैव लिप्यते ॥ ४१ ॥
नील, रक्त इत्यादी रंगांच्या उपाधींनी स्फटिक जरी लाल, निळा भासतो, तरी प्रत्यक्षात मात्र स्फटिकाला त्या त्या उपाधीच्या रंगांचा लेप लागत नाही. त्याचप्रमाणे कोशांपासून उत्पन्न होणाऱ्या काम वगैरेसारख्या कोणत्याही विकारांनी आत्म्याला कसलाही लेप लागत नाही.


स्पष्टीकरण – एके ठिकाणी पांढरा शुभ्र स्फटिक आहे. त्याच्या सान्निध्यात निळ्या, तांबड्या रंगांचे पदार्थ ठेवले, तर त्या स्फटिकाला त्या त्या रंगांची उपाधी येते. त्या उपाधींनी स्फटिक लाल, निळा इत्यादी भासतो. तथापि प्रत्यक्षात मात्र ते रंग त्या स्फटिकात येत नाहीत. म्हणजे त्या त्या रंगांचा लेप स्फटिकाला लागत नाही. असाच प्रकार आत्म्याच्या बाबतीत होतो. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन देहांची म्हणजेच अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय या पाच कोशांची उपाधी आत्म्याला येते. या पाच कोशांच्या उपाधीअंती इच्छा, क्रोध, आसक्ती, द्वेष इत्यादी विकार उत्पन्न होतात. आणि व्यवहारात ते विकार आत्म्याचे आहेत, असे अज्ञानी माणसे मानतात. परंतु परमार्थत: ते विकार आत्म्याला चिकटत नाहीत; त्यांचा लेप आत्म्याला लागत नाही. कारण आत्मा हा तीन देहांपेक्षा वेगळा आहे, आणि असंग आहे. आत्म्याला कशाचाही लेप लागत नाही.

फालेन भ्राम्यमाणेन भ्रमतीव यथा मही ।
अगोऽप्यात्मा विमूढेन चलतीय प्रदृश्यते ॥ ४२ ॥
नांगराचा फाळ भरभर फिरविला जात असताना, खाली जमिनीकडे पहाणाऱ्याला जणू भूमीच हालत आहे असे वाटते. त्याचप्रमाणे निश्चल (अग) असणारा आत्मा सुद्धा हलत आहे - चंचल आहे - असे अज्ञानी माणसाला दिसते.


स्पष्टीकरण - आगगाडी पळत असताना, आगगाडीत बसलेल्या माणसाला वाटते की बाजूची झाडे, घरे इत्यादी पळत आहेत. नाव वेगाने जात असताना नदीकाठ पळत आहे असे नावेत बसणाऱ्याला दिसते. वास्तविक तसे काही घडत नसते. असाच प्रकार आत्म्याच्या बाबतीतही दिसून येतो. आत्मा हा मूलतः निश्चळ आहे. तो देहाच्या उपाधीत आहे. या स्थितीत देहाची काही क्रिया घडली की आत्मा क्रियाशील आहे असे अज्ञानी माणसाला वाटू लागते. देहाच्या क्रियांचा तो आत्म्यावर आरोप करू लागतो. तथापि आत्मा मूलत: निश्चळ / क्रियारहित असल्याने, कोणत्याही परिस्थितीत तो तसाच राहतो हे स्पष्ट आहे.

देहत्रयमिदं नित्यमात्मत्वेनाभिमन्यते ।
यायत्तावदयं मूढो नानायोनिषु जायते ॥ ४३ ॥
हे तीन देह म्हणजेच आत्मा असा सतत अभिमान अज्ञानी माणूस जोपर्यंत धारण करतो, तोपर्यंत त्याला तो अभिमान व आसक्ती बाळगून केल्या जाणाऱ्या कर्मांमुळे नाना योनीत जन्म घ्यावा लागतो.


स्पष्टीकरण - स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे तीन देह आहेत. अज्ञानी माणसाला सत्य कळले नसल्याने, तो नेहमीच या तीन देहांना आत्मा मानीत राहतो व अहंकार आणि आसक्ती बाळगून तो या जगात नाना प्रकारची बरीवाईट कर्में करीत राहतो. कर्मवादाच्या सिद्धांताप्रमाणे, त्या त्या कर्मांची फळे भोगण्यासाठी त्याला पुनः पुनः या जगात जन्म घ्यावा लागतो. आपल्याकडे जन्मासाठी ८४ लाख योनी मानल्या गेल्या आहेत. त्यामध्ये तो जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज्ज यांतील कोणत्यातरी प्रकारात मोडतो. आणि जोपर्यंत शरीर म्हणजे आत्मा असे अडाणी माणूस मानीत राहतो तोपर्यंत त्याचे हे संसरण म्हणजे जन्ममरण चुकत नाही.

निद्रा-देहज-दुःखादि जाग्रद्-देहं न संस्पृशेत् ।
जाग्रद्-देहज-दुःखादिस्तथात्मानं न संस्पृशेत् ॥ ४४ ॥
स्वप्नात जो देह असतो त्या देहापासून होणारे दुःख इत्यादी जागृति-अवस्थेतील देहाला स्पर्श करीत नाहीत; त्याप्रमाणे जागृति-अवस्थेतील शरीरापासून होणारे दुःख वगैरे गोष्टी आत्म्याला स्पर्श करीत नाहीत.


स्पष्टीकरण - श्लोकातील निद्रा शब्दाने स्वप्न ही अवस्था दर्शवली आहे. स्वप्नात एक देह वावरत असतो; पण तो देह म्हणजे जागृतीतील देह नव्हे हे अगदी स्पष्ट आहे. आता स्वप्नातील देह तुटला, फुटला, जळला तर त्याला स्वप्नात दुःख होते; अन्य कारणांनी त्याला स्वप्नांत सुखही होऊ शकते. तथापि या सुखदु:खांचा जागृतीतील देहावर काहीही परिणाम होऊ शकत नाही. कारण जागृति-अवस्थेतील देह हा स्वप्नअवस्थेतील देहापेक्षा भिन्न आहे आणि त्यांचा परस्पर काहीही संबंध नाही. असाच प्रकार आत्म्याच्या बाबतीत होतो. तीनही देहांपेक्षा आत्मा वेगळा आहे. साहजिकच तो जागृतीतील स्थूल देहापेक्षा भिन्न आहे. साहजिकच जागृति-अवस्थेत स्थूल देहाला होणारे सुख, दुःख हे आत्म्याला होत नाही. किंबहुना कोणत्याही अवस्थेतील देहजन्य सुख-दु:ख आत्म्यावर परिणाम करू शकत नाही. तसेच आत्मा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांचा साक्षी आहे. त्यामुळे या तीन अवस्था, त्यांतील देह आणि त्या देहाच्या संदर्भात घडणाऱ्या गोष्टी यांचा आत्म्यावर कोणताही परिणाम कधीही घडू शकत नाही हे सत्य आहे.

जाग्रद्-देहवदाभाति निद्रा-देहस्तु निद्रया ।
निद्रा-देह-विनाशेन जाग्रद्-देहो न नश्यति ॥ ४५ ॥
तथायमात्मवद् भाति जाग्रद्-देहस्तु जागरात् ।
जाग्रद्-देह-विनाशेन नात्मा नश्यति कर्हिचित् ॥ ४६ ॥
स्वप्न अवस्थेत स्वप्नातील देह हा जागृति-अवस्थेतील देहाप्रमाणे भासतो. तथापि स्वप्नातील देहाच्या नाशाने जागृतीतील देह नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे जागृति-अवस्थेत जागृति-अवस्थेतील देह हा आत्मा. आहे असे अज्ञानी माणसाला वाटते. परंतु जागृति-अवस्थेतील देहाच्या नाश पावण्याने आत्मा मात्र कधीच नष्ट होऊन जात नाही.


स्पष्टीकरण - येथेही 'निद्रा' म्हणजे स्वप्न असा अर्थ आहे. स्वप्नातील शरीर हे जागृति-अवस्थेतील शरीराहून भिन्न असल्याने, त्याच्या नाशाने जागृतीतील स्थूल देह नष्ट होत नाही.

जाग्रति-अवस्थेतील देह हा अज्ञानी माणसांना आत्मा आहे असे वाटते. परंतु जागृतीतील देहापेक्षा आत्मा हा वेगळाच आहे. त्यामुळे जागृति-अवस्थेतील स्थूल देहाचा नाश झाल्यामुळे आत्म्याचा नाश होण्याचा प्रसंगच उद्भवत नाही.

हित्वायं स्वाप्निकं देहं जाग्रद्‌देहमपेक्षते ।
जाग्रद्देह-प्रबुद्धोऽहं हित्वात्मानं यथा तथा ॥ ४७ ॥
ज्याप्रमाणे हा पुरुष स्वप्नातील देह बाजूला सोडून जागृतीतील देहाची अपेक्षा बाळगतो, त्याप्रमाणे जागृतीतील देहाच्या बाबतीत तो देह आत्म्यापेक्षा वेगळा आहे असे ज्ञान झालेला मी (= ज्ञानी पुरुष) जागृतीतील देह बाजूला सारून, आत्म्याची अपेक्षा धरतो.


स्पष्टीकरण - अज्ञानी माणूस तीन देहांना आत्मा मानीत असतो. तथापि व्यवहारात तो स्वप्नातील देहाला फारसे महत्त्व न देता जागृतीतील देहालाच किंमत देत असतो. स्वाप्निक देहापेक्षा जागृतीतील देह महत्त्वाचा आहे अशी त्याची भूमिका असते; त्यालाच तो आत्मा मानीत असतो.

जागृतीतील देहाच्या बाबतीत ज्ञानी माणसाची भूमिका अशी असते. तीन देहांपेक्षा आत्मा वेगळा आहे. साहजिकच जागृतीमधील देहांपेक्षा आत्मा हा वेगळा आहे हे त्याला ज्ञात असते. त्यामुळे त्या देहाला आत्मा न मानता, त्या देहाला महत्त्व न देता, मी म्हणजे आत्मज्ञानी माणूस आत्म्यालाच महत्त्व देत असतो. आत्म्याचे खरे स्वरूप तो लक्षात घेत असतो. म्हणून मी म्हणजे देह नसून आत्माच आहे अशी त्याची भूमिका असते. साहजिकच त्याच्या दृष्टीने देह हे महत्त्वाचे नसून आत्मा महत्त्वाचा असतो.

स्वप्नभोगे यथैवेच्छा प्रबुद्धस्य न विद्यते ।
असत्स्वर्गादिकेभोगेनैवेच्छा ज्ञानिनस्तथा ॥ ४८ ॥
स्वप्नातून जागे झालेल्या माणसाची स्वप्नातील (असत् अशा) भोगांच्या बाबतीत जशी इच्छा असत नाही, त्याप्रमाणे (आत्म्याचे सत्य) ज्ञान प्राप्त झालेल्या ज्ञानी पुरुषाची नाशवंत असत् अशा स्वर्ग, इत्यादीतील भोगांच्या बाबतीत इच्छा असत नाही.


स्पष्टीकरण - स्वप्नातील भोग खोटे होते हे स्वप्नातून जागे झालेल्या पुरुषाला कळते; त्यामुळे त्या भोगांच्या संदर्भात त्याची इच्छा उरत नाही. तसाच प्रकार आत्मज्ञानी पुरुषाच्या बाबतीत होतो. त्यामुळे या जगातील काय किंवा स्वर्गातील काय, तेथील भोग हे मिथ्या आहेत, हे त्याला ज्ञात झाले असल्याने, त्या भोगांच्या संदर्भात त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा होतच नाही.

भोक्ता बहिर्यथा भोग्यः सर्पोदृषदि कल्पितः
रूप-शीलादयश्चाल्पभोगा भोग्य-स्वरूपकाः ॥ ४९ ॥
एखाद्या भोक्त्याने पाषाणावर कल्पिलेला सर्प हा भोग्य (= भोगाचा विषय या) स्वरूपात भोक्त्याच्या बाहेर म्हणजे भोक्त्यापेक्षा वेगळा असतो. त्याचप्रमाणे रूप, शील इत्यादी लहानसहान भोग हे आत्म्यावर कल्पित असल्याने ते भोग्य (भोगाचा विषय या स्वरूपाचे) आहेत म्हणून ते आत्म्यापेक्षा वेगळे आहेत.


स्पष्टीकरण – भोक्ता व भोग्य पदार्थ हे वेगळे असतात असे येथे सांगावयाचे आहे. खरे म्हणजे आत्मा हा भोक्ता नाहीच. तथापि तो भोक्ता आहे असे मानले तरीसुद्धा व्यवहारात जसे भोक्ता व भोग्य भिन्न असतात, त्याप्रमाणे आत्मा व भोग्य पदार्थ भिन्न आहेत. या श्लोकातील 'पाषाणावर कल्पिलेला सर्प हा भोग्य' ही कल्पना कशीतरीच वाटते. 'दगडावर पूजेसाठी कोरलेला सर्प' असा जरी अर्थ घेतला तरी तेथे तो सर्प पूज्य / पूजेचा विषय होईल, पण भोग्य होणार नाही. ते कसेही असो, चेतन व अचेतन हे भिन्न असतात, हे सांगण्याची भूमिका या श्लोकात दिसते.

ज्ञस्य नास्येव संसारो यद्वदज्ञस्य कर्मिणः ।
जानतो नैव भीर्यद्वद् रज्जुसर्पमजानतः ॥ ५० ॥
अहंकार व आसक्ती धरून कर्मे करणाऱ्या अज्ञानी माणसाला जसा संसार (= जन्ममरणचक्र) असतो, तसा तो ज्ञानी माणसाला असत नाही. रज्जूवर भासणाऱ्या सर्पाचे खरे स्वरूप न जाणणाऱ्या पुरुषाला जशी सापाची भीती वाटते, त्याप्रमाणे रज्जू-सर्पाचे खरे स्वरूप जाणणाऱ्या माणसाला तसली भीती वाटत नाही.


स्पष्टीकरण - अंधुक प्रकाशात पडलेली रज्जू ज्या माणसाला रज्जू म्हणून कळत नाही, त्याला ती सर्प वाटते आणि मग त्याला त्या सापाची भीती वाटते. परंतु ज्या पुरुषाला ती रज्जू रज्जू याच स्वरूपात कळून येते, त्याला तेथे साप भासत नसल्याने त्याला भय वाटत नाही. याचप्रमाणे ज्याला आत्म्याचे स्वरूप उमजले नाही त्या अज्ञानी माणसाला कर्माअंती संसारात म्हणजे जन्ममरण-चक्रात पडावे लागते (श्लोक ४३ पहा). याउलट ज्या पुरुषाला आत्मा कळला आहे, तो जन्ममरणात मुळीच अडकत नाही. तो जन्म-मरण-संसरणातून सुटून आत्मरूपच होऊन जातो.

सैंधवस्य घनोयद्वद् जलयोगाज्जलं भवेत् ।
स्वात्मयोगात् तथा बुद्धिरात्मैव ब्रह्मवेदिनः ॥ ५१ ॥
मिठाचा खडा पाण्याच्या संपर्कात येऊन (पाण्यात मिसळून जाऊन) जलरूप होऊन जातो. त्याप्रमाणे स्वत:च्या आत्म्याशी संपर्क होताच ब्रह्म जाणणाऱ्या पुरुषाची बुद्धी आत्मरूपच होऊन जाते.


स्पष्टीकरण - मिठाचा खडा पाण्यात विरघळून जातो; त्याचे स्वतंत्र अस्तित्व उरत नाही. बुद्धीचेही असेच होते. एका विशिष्ट प्रकारच्या बुद्धिद्वारा ब्रह्मसाक्षात्कार होतो असे उपनिषदे सांगतात. ब्रह्मसाक्षात्कार/आत्मसाक्षात्कार होताच ही बुद्धी स्वतंत्रपणे अस्तित्वात राहत नाही; ती आत्मरूपच होऊन जाते. या श्लोकात आत्मा शब्दाऐवजी ब्रह्म शब्द उपयोजिला आहे.

तोयाश्रयेषु सर्वेषु भानुरेकोऽप्यनेकवत् ।
एकोऽप्यात्मा तथा भाति सर्व-क्षेत्रेष्वनेकवत् ॥ ५२ ॥
ज्यात पाणी भरले आहे अशा सर्वच भांड्यांमध्ये एकच सूर्य अनेक सूर्याप्रमाणे भासतो; तद्वत् आत्मा जरी एकच आहे तरी तो सर्व शरीरांत अनेक असल्याप्रमाणे भासतो.


स्पष्टीकरण - सूर्याचे बिंब जरी एकच असले तरी त्याची प्रतिबिंबे अनेक असू शकतात. अडाणी माणूस सूर्य अनेक आहेत असे मानू लागतो. आत्मा हा सुद्धा एकमेवाद्वितीय आहे. तथापि त्याला शरीरांच्या उपाधी आल्यावर तेथील बुद्धीत आत्म्याची अनेक प्रतिबिंबे पडतात. त्यामुळे प्रत्येक शरीरात एकेक वेगळा आत्मा आहे असे अज्ञानी माणसाला वाटू लागते. पण ते सत्य नाही. आत्मा एकच असला तरी अनेक उपाधींमुळे तो अनेक आहे, असे अज्ञानी माणसाला वाटते.

भानोरन्य इवाभाति जलभानुर्जलेयथा ।
आत्मनोऽन्य इवाभासो भाति बुद्धौ तथात्मनः ॥ ५३ ॥
पाण्यामध्ये प्रतिबिंब-रूपाने असणारा जल-सूर्य हा ज्याप्रमाणे बिंबरूप सूर्यापेक्षा वेगळा आहे असे भासते, त्याप्रमाणे बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेल्या आत्म्याचा आभास हा आत्म्यापेक्षा निराळा आहे असे वाटते.


स्पष्टीकरण - शरीराची उपाधी आत्म्याला आली की आत्म्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडते. बुद्धीत पडलेल्या आत्म्याच्या प्रतिबिंबाला चिदाभास म्हणतात. या चिदाभासालाच जीव असे म्हणतात. बुद्धी अनेक असल्याने चिदाभासही अनेक दिसतात. आणि हे चिदाभास आत्म्यापेक्षा भिन्न आहेत असे वाटू लागते.

मूळ बिंबाविना प्रतिबिंबांना स्वतंत्र असे अस्तित्व नाही, असे पुढील श्लोकात सांगितले आहे.

बिंब विना यथानीरै प्रतिबिंबो भवेत् कथम् ।
विनात्मानं तथा बुद्धौ चिदाभासो भवेत् कथम् ॥ ५४ ॥
एखाद्या वस्तूचे मूळ रूप म्हणजे बिंब नसताना त्याचे पाण्यात प्रतिबिंब कसे बरे पडेल ? त्याचप्रमाणे जर आत्माच नसेल, तर बुद्धीमध्ये आत्म्याचा म्हणजे चैतन्याचा आभास (चिदाभास) कसा बरे अस्तित्वात येईल ?


स्पष्टीकरण – बिंब नसल्यास प्रतिबिंब नाही. म्हणजे बिंबाविना प्रतिबिंबाला स्वतंत्र अस्तित्व नाही. तद्वत् आत्म्याविना त्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडणार नाही. चित् (आत्मा) नसेल तर बुद्धीत चिदाभास कोठून येणार ? आत्मा चित् आहे म्हणून चिदाभास आहे. चित् विना चिदाभासाला स्वतंत्र अस्तित्व नाही.

प्रतिबिंब-चलत्वाद्या यथा बिंबस्य कर्हिचित् ।
न भवेयुस्तथाऽभास-कर्तृत्वाधास्तु नात्मनः ॥ ५५ ॥
प्रतिबिंबाचे चलन-वलन इत्यादी क्रिया ज्याप्रमाणे कधीही बिंबाच्या बाबतीत संभवत नाहीत, त्याप्रमाणे बुद्धीतील चैतन्याच्या आभासाचे कर्तृत्व इत्यादी गुणधर्म हे बिंबभूत अशा आत्म्याच्या बाबतीत कधीही होत नाहीत.


स्पष्टीकरण - पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडले. पाण्याच्या हालचालीने प्रतिबिंबात हालचाल दिसते. तथापि प्रतिबिंबात भासमान होणाऱ्या या क्रिया बिंबात असत नाहीत हे स्पष्ट आहे. तद्वत् बुद्धीत आत्म्याचे प्रतिबिंब पडले. हा चिदाभास म्हणजे जीव. या जीवाच्या ठिकाणी कर्तृत्व इत्यादी मानले जाते. तथापि चिदाभासाच्या क्रिया वा गुणधर्म हे बिंबरूप आत्म्यात नसतात हे उघड आहे.

जले शैत्यादिकं यद्वज्जलभानुं न संस्पृशेत् ।
बुधैः कर्मादिकं तद्वच्चिदाभासं न संस्पृशेत् ॥ ५६ ॥
पाण्यातील थंडपणा, इत्यादी ज्याप्रमाणे प्रतिबिंबरूप सूर्याला स्पर्श करू शकत नाहीत, त्याप्रमाणे बुद्धीतील/बुद्धीचे कर्म इत्यादी गुणधर्म चिदाभासाला स्पर्श करू शकत नाहीत.


स्पष्टीकरण - पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब हे आभासात्मक आहे. त्यामुळे त्याला पाण्याचे थंडपणा, उष्णता इत्यादी गुणधर्म चिकटू शकत नाहीत. याचप्रमाणे बुद्धीतील आत्म्याचे प्रतिबिंब हे आभासात्मक आहे; ते चिदाभास आहे; त्याला बुद्धीचे गुणधर्म स्पर्श करू शकत नाहीत.

बुद्धेः कर्तृत्व-भोक्तृत्व-दुःखित्वाद्यैस्तु संयुतः ॥
चिदाभासो विकारीत शरावस्थांबुभानुवत् ॥ ५७ ॥
पाण्याने भरलेल्या घड्यांतील पाण्यात होणारे विकार/फेरफार हे त्या पाण्यातील सूर्याच्या प्रतिबिंबाला जणू होतात असे वाटते; त्याप्रमाणे बुद्धीतील/बुद्धीचे कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखीदु:खी होणे इत्यादींशी संपर्क आल्याने, चिदाभास हा जणू विकारयुक्त झाला असे वाटते.


स्पष्टीकरण - पाण्यात होणारे फेरफार हे पाण्यात पडलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबाला होतात असे वाटते. प्रत्यक्षात मात्र त्या सूर्यप्रतिबिंबाला काय किंवा सूर्यबिंबाला काय त्या फेरफारांनी काही होत नाही. याचप्रमाणे बुद्धीचे गुणधर्म चिदाभासाचे गुणधर्म आहेत असे वाटू लागते. परंतु प्रत्यक्षात त्या चिदाभासाला अथवा बिंबरूप चैतन्याला त्या गुणधर्मांनी काहीही होत नाही.

शरावस्थोदकेनष्टे तत्स्थो भानुर्विनष्टवत् ।
बुद्धेर्कये तथा सुप्तो नष्टवत् प्रतिभात्ययम् ॥ ५८ ॥
घड्यातील पाणी नष्ट झाले असता, त्या पाण्यातील (प्रतिबिंबरूप) सूर्य नष्ट झाल्यासारखा वाटतो, त्याप्रमाणे सुषुप्ति-अवस्थेत बुद्धीचा लय झाला असता, हा चिदाभास नष्ट झाला असे वाटू लागते.


स्पष्टीकरण - पाणी संपल्यावर तेथे सूर्याचे प्रतिबिंब राहत नाही. पण सूर्यबिंब तसेच राहते. झोपेत ( निद्रा ही मृत्यूशी समान मानली जाते) चिदाभास लीन झाला असे वाटले तरी आत्मा हा आहे तसाच असतो.

जलस्थार्कं जलं चोर्मिं भासयन् भाति भास्करः ।
आत्माभासं धियं बुद्धेः कर्तृत्वादीनयं तथा ॥ ५९ ॥
पाण्यातील प्रतिबिंबरूप सूर्य, ते पाणी, तसेच त्या पाण्यातील लाटा यांना प्रकाशित करीत सूर्य स्वतंत्रपणाने आकाशात प्रकाशमान असतो; त्याप्रमाणे आत्माभास (= चिदाभास), बुद्धी आणि बुद्धीचे कर्तृत्व इत्यादी गुणधर्मांना प्रकाशित करीत बिंबरूप असा आत्मा स्वतंत्रपणाने प्रकाशमान असतो.


स्पष्टीकरण - पाणी, त्यातील लाटा, त्यातील प्रतिबिंब या सर्वापेक्षा बिंबरूप सूर्य वेगळा आहे. त्याप्रमाणे बुद्धी, बुद्धीचे गुणधर्म आणि बुद्धीतील चिदाभास या सर्वांपेक्षा बिंबरूप आत्मा स्वतंत्र आहे.

मेघावभासको भानुर्मेघ-च्छन्नोऽवभासते ।
मोहावभासकस्तद्‌वन्मोहच्छन्नो विभात्ययम् ॥ ६० ॥
मेघाला प्रकाशित करणारा सूर्य हा मेघाने झाकल्याप्रमाणे भासतो. तद्वत् मोहाला म्हणजे अज्ञानाला प्रकाशित करणारा हा आत्मा मोहाने म्हणजे अज्ञानाने झाकल्याप्रमाणे वाटतो.


स्पष्टीकरण – सूर्यामुळेच मेघाचे ज्ञान होत असते. तथापि त्या मेघामुळेच सूर्य कधी झाकल्यासारखा वाटतो. अज्ञानाचे ज्ञानही आत्म्यामुळेच होत असते. तथापि कधी आत्म्याला अज्ञानाने आवरण घातले असे वाटते.

भास्यं मेघादिकं भानुर्भासयन् प्रतिभासते ।
तथा स्थूलादिकं भास्य भासयन् प्रतिभात्ययम् ॥ ६१ ॥
प्रकाशित करण्यास योग्य अशा मेघ इत्यादींना प्रकाशित करीत सूर्य स्वत:च स्वतंत्रपणे प्रकाशमान असतो; त्याप्रमाणे प्रकाशित करण्यास योग्य अशा स्थूल शरीर इत्यादींना प्रकाशित करीत करीत, हा आत्मा स्वयं)प्रकाशमान असतो.


स्पष्टीकरण - मेघ इत्यादी पदार्थ हे भास्य म्हणजे ज्ञेय आहेत; त्यांचे ज्ञान होण्यास सूर्याची गरज आहे पण सूर्याचे ज्ञान होण्यास अन्य कशाचीही गरज आहे; तो स्वयंप्रकाशी आहे. त्याप्रमाणे स्थूल शरीर, पदार्थ इत्यादी ज्ञेय आहेत; त्यांचे ज्ञान आत्म्यामुळेच होते. पण आत्म्याचे ज्ञान होण्यास अन्य कशाचीही जरूरी नाही. आत्मा हा स्वतःप्रकाशी अथवा स्वयंप्रकाशी आहे.

सर्व-प्रकाशको भानुः प्रकाश्यैर्नैव दूष्यते ।
सर्व-प्रकाशकोह्यात्मा सर्वेस्तद्वन्न दूष्यते ॥ ६२ ॥
सर्व वस्तूंना प्रकाशित करणारा सूर्य त्या प्रकाश्य (= प्रकाशित करण्यास योग्य) अशा पदार्थाकडून दूषित केला जात नाही; त्याप्रमाणे सर्व पदार्थांना प्रकाशित करणारा आत्मा त्या सर्व पदार्थांकडून दूषित केला जात नाही.


स्पष्टीकरण -- प्रकाश्य वस्तूंचे बरेवाईट गुणधर्म सूर्याला लागत नाहीत. त्याप्रमाणे प्रकाश्य अशा पदार्थांचे चांगले किंवा वाईट गुणधर्म आत्म्याला चिकटू शकत नाहीत.

मुकुरस्थं मुखं यद्वन्मुखवत् प्रथते मृषा ।
बुद्धिस्थाभासकस्तद्वदात्मवत् प्रथते पृषा ॥ ६३ ॥
आरशातील मुख म्हणजे मुखाचे आरशातील प्रतिबिंब हे खऱ्या मुखाप्रमाणे खोटेखोटेच भासते; त्याप्रमाणे बुद्धीतील चित्‌चा/चैतन्याचा आभास हा खोटेखोटेच आत्म्याप्रमाणे (= चित्‌प्रमाणे) भासतो.


स्पष्टीकरण - तोंडाचे आरशातील प्रतिबिंब हे मूळ मुखाप्रमाणे वाटते; पण ते तसे नसते. तद्वत् बुद्धीतील आत्म्याचे प्रतिबिंब (= चिदाभास) हे आत्म्याप्रमाणे वाटते; पण ते तसे नसते.

मुकुरस्थस्य नाशेन मुखनाशो भवेत् कथम् ।
बुद्धिस्थाभास-नाशेन नाशोनैवात्मनः क्वचित् ॥ ६४ ॥
आरशातील मुख-प्रतिबिंबाच्या नाशाने मूळ बिंबरूप मुखाचा नाश कसा बरे होईल ? त्याप्रमाणे बुद्धीतील चैतन्याच्या आभासाच्या नष्ट होण्याने, आत्म्याचा नाश कधीही होणार नाही.


स्पष्टीकरण - प्रतिबिंब हा भास असतो. प्रतिबिंब नष्ट झाल्याने बिंब नष्ट होतच नाही. तद्वत् बुद्धी ही नाशवंत आहे. तिचा नाश झाला की तिच्यामधील चिदाभासही नष्ट होतो. पण चिदाभास म्हणजे चित् किंवा आत्मा नव्हे. त्यामुळे चिदाभासाच्या नाशाने आत्म्याचा नाश होऊच शकत नाही.

ताम्र-कल्पित-देवादिस्ताम्रादन्य इव स्फुरेत् ।
प्रतिभास्यादि-रूपेण तथात्मोत्थमिदंजगत् ॥ ६५ ॥
तांबे या धातूवर कल्पिलेले देव इत्यादी हे त्यांचे तांब्यातील स्वरूप आभासात्मक असल्यामुळे ज्याप्रमाणे तांबे इत्यादीपेक्षा भिन्न स्वरूपातच जाणिवेत येतात, त्याप्रमाणे आत्म्यापासून उद्भूत झालेले हे जगत् भासात्मक स्वरूप असल्यामुळे आत्म्यापेक्षा भिन्न आहे असे भासते.


स्पष्टीकरण - तांबे इत्यादीसारख्या धातूवर देवादिकांची चित्रे कोरली किंवा छाप मारले; त्यांचे स्वरूप तांबे आहे. पण त्यांचे भासात्मक स्वरूप तांब्यापेक्षा वेगळे भासते. म्हणून तेथे तांब्याचे ज्ञान होत नाही तर देव इत्यादींच्या प्रतिमांचे ज्ञान होते. आणि ते तांब्यापेक्षा वेगळे आहेत असे वाटू लागते. याचप्रमाणे आत्म्याच्या अधिष्ठानावर जग आहे. आत्म्यापासून जग उत्पन्न झाले असे व्यावहारिक दृष्टीने म्हटले जाते. प्रत्यक्षात आत्म्यावर जगाचा आभास होत असतो. जसे - रज्जूवर सर्पाचा आभास होतो. आता आत्मा न कळता जगाचा आभासच प्रत्ययाला येतो. अशाप्रकारे आभासात्मक असणारे जग हे आत्म्यापेक्षा वेगळे आहे, असे अज्ञानी माणसाला वाटू लागते.

ईश-जीवात्मवद् भाति यथैकमपि ताम्रकम् ।
एकोऽप्यात्मा तथैवायं ईश-जीवादिवद् मृषा ॥ ६६ ॥
तांबे जरी एकच आहे तरी ते (त्यावर कोरलेल्या/मुद्रित केलेल्या) ईश्वर (आणि भक्त असा) जीव या स्वरूपात (खोटेच) भासते; तद्वत् आत्मा हा एकमेव (सत्य) असूनही तो ईश्वर, जीव, (जग) इत्यादी स्वरूपांत मिथ्यापणाने भासतो.


स्पष्टीकरण - ईश्वर, जीव इत्यादीप्रमाणे तांबे वाटणे हा आभास आहे (वरील श्लोक ६५ पहा); तसे वाटणे मिथ्या आहे; कारण तेथे प्रत्यक्षात आहे ते फक्त तांबे आहे. असाच प्रकार आत्म्याच्या बाबतीत घडतो. अज्ञान ही उपाधी आत्म्याला येते. अज्ञानाच्या विक्षेप शक्तीमुळे आत्म्यावर जीव, जगत्, ईश्वर भासू लागतात; ते मिथ्या आहेत. आहे तो एकमेव आत्मा आहे. त्याच्या जोडीने कोणतेही अन्य सत्य तत्त्व नाही. त्यामुळे आत्म्यावर जीव, जग, ईश्वर, इत्यादींचा होणारा भास हा खोटा आहे.

यथेश्वरादि-नाशेन ताम्रनाशो न विद्यते ।
तथेश्वरादि-नाशेन नाशो नैवात्मनः सदा ॥ ६७ ॥
तांब्यावर कोरलेल्या वा मुद्रित केलेल्या ईश्वर इत्यादींचा नाश झाला तरी तांब्याचा नाश होत नाही. त्याप्रमाणे आत्म्यावर भासमान होणाऱ्या ईश्वर इत्यादींचा नाश झाला, तरी सदैव अस्तित्वात असणाऱ्या आत्म्याचा नाश केव्हाच होत नाही.


स्पष्टीकरण – तांबे वितळवून किंवा अन्य प्रकारांनी तांब्यावर कोरलेली ईश्वर इत्यादींची चित्रे नष्ट करून टाकली तरी तांबे नष्ट होत नाही. तद्वत् मायेमुळे/अज्ञानामुळे आत्म्यावर कल्पिलेले ईश्वर इत्यादींचा भास संपू शकतो. जसा रज्जूवरील सर्पाचा भास नष्ट होऊ शकतो. परंतु त्या स्थितीत ज्याप्रमाणे रज्जूचा नाश होत नाही, त्याप्रमाणे ईश्वर इत्यादींच्या भासाला अधिष्ठानभूत असणाऱ्या आत्म्याचा नाश होण्याचे कारणच नाही. आत्मा हा सत् असल्याने तो तीनही काळात असतोच; त्याचा नाश होत नाही.

अध्यस्तो रज्जुसर्पोऽयं सत्वद् रज्जुसत्तया ।
तथा जगदिदं भाति सत्यवत् स्वात्मसत्तया ॥ ६८ ॥
रज्जूवर आरोपित केला गेलेला हा साप केवळ रज्जूचे अस्तित्व - अधिष्ठान - असल्यामुळे खरा असल्यासारखा भासतो; त्याप्रमाणे हे जगसुद्धा आत्म्याच्या सत्तेमुळेच - अधिष्ठानामुळेच - सत्य आहे असे वाटते, ते खऱ्याप्रमाणे भासते.


स्पष्टीकरण - रज्जू आहे; तिच्यावर साप भासतो. रज्जूच नसती तर साप भासलाच नसता. तसेच रज्जूचे अज्ञान असल्यामुळे तिच्यावर भासणारा साप खरा वाटतो (अर्थात् रज्जूचे ज्ञान होईपर्यंतच साप सत्य भासतो) याचप्रमाणे अज्ञान उपाधीच्या आवरण शक्तीने आत्मस्वरूप कळत नाही; आणि अज्ञानाच्या विक्षेप शक्तीने आत्म्यावरच जग भासू लागते. आणि आत्मा कळलेला नसल्याने ते खरेच वाटते. आत्म्याचे ज्ञान होईपर्यंत जगत् सत्य वाटत राहते.

अध्यस्ताहेरभावेन रज्जुरेवावशिष्यते ॥
तथा जगदभावेन सदात्मैवावशिष्यते ॥ ६९ ॥
अध्यस्त म्हणजे आरोपित अशा सर्पाचा अभाव झाला तरी तेथे रज्जू हीच शिल्लक राहणारी असते. त्याप्रमाणे (अध्यस्त) जगाचा अभाव झाला, तरी आत्मा हा सतत शिल्लक राहणाराच असतो.


स्पष्टीकरण – रज्जूवर सर्पाचा अध्यास होतो. अध्यास म्हणजे आरोप. त्यामुळे रज्जूचे ज्ञान झाले की तेथे भासणाऱ्या सापाचा अभाव होतो; त्यामुळे रज्जूचा मात्र अभाव होत नाही; रज्जू आहे तशीच राहते; कारण तिच्या अधिष्ठानावरच सर्पाचा आरोप केला गेला होता. असाच प्रकार आत्मा व जग यांच्या बाबतीत होतो. अज्ञानामुळे आत्म्यावर जगाचा अध्यास/आरोप केला जातो. आत्म्याचे ज्ञान झाले की अध्यस्त जगाचा भास नष्ट होऊन जातो. तथापि त्या जगदारोपाचे अधिष्ठान असणारा आत्मा मात्र नष्ट न होता, आहे तसाच राहतो. तो सातत्याने अस्तित्वात असणारा आहे.

स्फटिकेरक्तता यद्वदुपारधेर्नीलताम्बरे ।
यथा जगदिदं भाति तथा सत्यमिवाद्वये ॥ ७० ॥
उपाधीमुळे स्फटिकात लालपणा भासतो; उपाधीमुळे आकाश निळे वाटते. त्याप्रमाणे उपाधीअंती अद्वय अशा आत्म्याच्या ठिकाणी हे जग जणू खरे आहे असे भासते.


स्पष्टीकरण - स्फटिकाला लाल फुलाची/पदार्थाची उपाधी आली की तो लाल दिसू लागतो. उपाधीमुळे आकाश निळे दिसते. तद्वत् अद्वय म्हणजे अद्वैत अशा आत्म्याला अज्ञानाची उपाधी आली की हे जग त्या आत्म्यावरच खरे आहे या स्वरूपात दिसू लागते. (वास्तविक जग सत्य नसून आभासात्मक आहे.)

स्फटिके रक्तता मिथ्या मृषारवे नीलतायथा ।
तथा जगदिदं मिथ्या एकस्मिन्नद्वयेमयि ॥ ७१ ॥
लाल वस्तूच्या उपाधीने स्फटिकात दिसणारा तांबडेपणा मिथ्या आहे, तसेच आकाशाचा भासणारा निळा रंग मिथ्या आहे. त्याचप्रमाणे अद्वय अशा माझ्या = आत्म्याच्या ठिकाणी भासमान होणारे हे जग मिथ्या आहे.


स्पष्टीकरण - उपाधीने एखाद्या पदार्थाचे स्वरूप बदलल्यासारखे वाटते; पण ते खरे नसते. उदा. लाल पदार्थाच्या उपाधीने स्फटिकात भासणारा लालपणा किंवा आकाशात भासणारा निळा रंग. अज्ञान या उपाधीमुळे अद्वय आत्मा जगरूपाने भासतो. आणि भासमान होणारे हे जग खरे नसून मिथ्या आहे. आत्मरूप झालेल्या जीवन्मुक्ताच्या तोंडी हा श्लोक आहे.

जीवेश्वरादि-भेदेन भेदं पश्यति मूढधीः ॥
निर्भेदे निर्विशेषेऽस्मिन् कथं भेदोभवेद् ध्रुवम् ॥ ७२ ॥
मूढ बुद्धीचा माणूस जीव, ईश्वर, इत्यादी भेदांचे द्वारा सर्वत्र भेदच पाहत राहतो. तथापि भेद-रहित आणि विशेष-रहित अशा आत्मवस्तूच्या ठिकाणी खरोखर भेद कसा संभवेल बरे ?


स्पष्टीकरण :- आत्म्याच्या अज्ञानाने जग भासते. भिन्नभिन्न उपाधीअंती तो अज्ञानी माणस ईश्वर, जीव, जग असा भेदच सर्वत्र पाहत राहतो. त्याला आत्म्याचे एकत्व कळून येत नाही. तथापि वस्तुस्थिती अशी आहे की आत्मा हा एकमेव सत्य पदार्थ आहे. आणि हा आत्मा भेदरहित आहे. सजातीय, विजातीय आणि स्वगत अशा तीनही भेदांनी रहित आत्मा आहे. तसेच आत्मा निर्गुण/निर्विशेष असल्याने त्याच्या ठिकाणी भिन्न-भिन्न असे गुणधर्म संभवतच नाहीत. अशा आत्म्याच्या ठिकाणी खराखुरा भेद संभवतच नाही. संक्षेपाने :-- अज्ञानाने भेद भासतो; ज्ञानाने निर्भेद आणि निर्विशेष आत्मा आहे हे समजते; तसेच आत्म्यात भेद नाही हेही कळते.

लिंगस्य धारणादेव शिवोऽयं जीवतां व्रजेत ।
लिंगनाशे शिवस्यास्य जीवतावेशता कुतः ॥ ७३ ॥
लिंग धारण केल्यानेच शिव हा जीव-दशेप्रत जातो. त्या लिंगाचा (च) नाश झाल्यावर, या शिवाची जीवदशा कोठून बरे असेल ?


स्पष्टीकरण - लिंग म्हणजे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर म्हटले की कारण-शरीर आणि स्थूल शरीर हेही प्राप्त होतात. या तीनही शरिरांची उपाधी प्राप्त झाली की शिव म्हणजे शुद्ध चैतन्य/आत्मा हा जीव-रूपाने भासू लागतो. आता, जर या लिंगशरीराचाच नाश झाला तर शिवाला/आत्म्याला जीवदशा कशी संभवेल ? संक्षेपाने :- उपाधीमुळे आत्मा हा जीवरूपाने भासतो. उपाधींचा निरास झाला की तो शिव आहेच. म्हणजे प्रत्यक्षात - परमार्थतः - जीव आणि शिव हे दोघेही भिन्न नाहीतच. हीच गोष्ट पुढील श्लोकात सांगितली आहे.

शिव एव सदा जीवो जीव एव सदा शिवः ।
वेत्त्यैक्यमनयोर्यस्तु स आत्मज्ञो न चेतरः ॥ ७४ ॥
शिव हा नेहमीच जीव आहे. आणि जोव हाही नेहमीच शिव आहे. या दोघांचे ऐक्य जो कोणी जाणतो, तोच खरा आत्मज्ञानी होय, अन्य कुणीही (खरा आत्मज्ञानी) नव्हे.


स्पष्टीकरण -- वर श्लोक ७३ खाली पाहिल्याप्रमाणे, उपाधीअंती जीव आणि शिव अशी भेदाची भाषा संभवते. उपाधी ही आगंतुक आहे, मिथ्या आहे. सत्य-पारमार्थिक सत्य - असे आहे की जीव आणि शिव हे भिन्न नसून ते एकच आहेत. असे त्या दोघांचे ऐक्य ज्याला कळून येते तोच खरा आत्मज्ञानी होतो. जर कुणाला जीव आणि शिव हे खरेच भिन्न आहेत असे वाटत असेल, तर त्याला अद्वय आत्म्याचे खरे ज्ञान झालेले नाही. जीव आणि शिव एकच आहेत हीच गोष्ट 'अहं ब्रह्मास्मि', 'तत्त्वमसि' या उपनिषदांतील महावाक्यात प्रगट झालेली आहे.

क्षीरयोगाद् यथा नीरं क्षीरवद् दृश्यते मृषा ।
आत्मयोगादनात्मायमात्मवद् दृश्यते तथा ॥ ७५ ॥
दुधाशी संयोग झाल्याने पाणी हे खोटे-खोटेच दुधाप्रमाणे दिसते. त्याप्रमाणे आत्म्याच्या संपर्कामुळे हा अनात्म (असणारा) देह खोटे-खोटेच आत्म्याप्रमाणे भासतो.


स्पष्टीकरण - पाणी दुधात मिसळल्यावर ते दुधाप्रमाणे भासते. दृष्टांतातील हा भाग येथे घ्यावयाचा नाही. कारण तसे मिश्रण आत्मा आणि अनात्मा यांच्या बाबतीत होत नाही. तथापि पाणी दुधाप्रमाणे दिसते इतकेच साम्य येथे घ्यावयाचे आहे. शरीर अनात्मा आहे. त्याची उपाधी आत्म्याला येते. त्यामुळे अनात्मा असणारा देह हा अज्ञानी माणसांना आत्माच आहे असे वाटू लागते. परंतु अनात्मा म्हणजे आत्मा हे ज्ञान खोटे आहे.

नीरात् क्षीरं पृथक् कृत्य हंसो भवति नान्यथा ।
स्थूलादेः संपृथक्‌कृत्य मुक्तो भवति नान्यथा । ७६ ॥
पाण्यापासून दूध वेगळे करून (हंस हा) हंस ठरतो; अन्य प्रकाराने नाही. त्याप्रमाणे स्थूल इत्यादी देहांपासून आत्म्याला वेगळे करून जो कोणी आत्म्याला जाणतो तो मुक्त होतो; दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने नाही.


स्पष्टीकरण - संस्कृत कवींचा संकेत आहे की हंस हा दुधातून पाणी वेगळे करू शकतो. तसे जो करू शकतो तोच खरा हंस. अंगाला चुना लावून पांढरा झालेला कावळा हंस होणार नाही. कारण दुधातून पाणी वेगळे करण्याचे कसब त्याच्याजवळ नाही.

व्यवहारात अनात्म देह व आत्मा यांची गल्लत झालेली आहे. त्या स्थितीत शरिरापेक्षा आत्मा भिन्न आहे हे ओळखून जो आत्मसाक्षात्कार करून घेतो तोच मुक्त होतो. अनात्म्यापेक्षा आत्मा वेगळा आहे या ज्ञानाखेरीज मोक्षासाठी दुसरा मार्ग नाही.

नीर-क्षीर-विवेकज्ञो हंस एव न चेतरः ।
आत्मानात्म-विवेकज्ञो यतिरेव न चेतरः ॥ ७७ ॥
दूध व पाणी यांतील फरक जाणणारा फक्त हंस आहे; अन्य कुणीही नाही. (त्याप्रमाणे) आत्मा आणि अनात्मा यांतील भेद / फरक फक्त यति जाणतो, अन्य कुणीही नाही.


स्पष्टीकरण - शंकराचार्यांच्या केवलाद्वैत वेदान्तासाठी साधन-चतुष्टय आवश्यक मानले जाते. ह्यातील गोष्टी संन्याशाला जमण्यासारख्या आहेत. म्हणून येथे यति म्हणजे संन्यासी हाच आत्मानात्म-विवेक करू शकतो असे म्हटले आहे.

प्रपंचात राहूनही आत्मानात्मविवेक करून जीवन्मुक्त झालेले अनेक साधुसंत दिसून येतात. त्यांच्या बाबतीत त्यांनी बाह्य संन्यास न घेता मनाने संन्यास घेतला होता असे म्हणावे लागते.

अध्यस्त-चोरजः स्थाणोर्विकारः स्थान्नहि क्वचित् ।
नात्मनो निर्विकारस्य विकारो विश्वजस्तथा ॥ ७८ ॥
स्थाणूवर आरोपित केलेल्या चोराच्या कल्पनेमुळे निर्माण होणारे विकार हे स्थाणूच्या बाबतीत कधीही होत नाहीत. त्याप्रमाणे (आत्म्यावर आरोपित केलेल्या) विश्वामुळे उत्पन्न होणारे विकार हे विकार-रहित अशा आत्म्याच्या बाबतीत कधीच होत नाहीत.


स्पष्टीकरण – गावाबाहेर झाडाचा सोटवा खांब होता. अंधुक प्रकाशात कुणाला तरी तेथे चोर वाटला. म्हणजे त्याने स्थाणूवर चोराचा आरोप केला. तो चोराला भ्याला किंवा त्याला पकडण्यास धावला. तसेच खऱ्या असणाऱ्या चोराच्या मनातही काही विकार असतातच. पण यांतील कोणतेच विकार स्थाणूच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत. तद्वत् आत्म्यावर आरोपित केलेल्या विश्वामुळे, विश्वात भिन्न भिन्न विकार, फेरबदल इत्यादी मानले जातात. पण ते आत्म्याच्या बाबतीत येऊ शकत नाहीत. आत्म्यावर आरोपित केलेले विश्व मिथ्या आहे. आरोपित विश्वाचे विकार आत्म्याला चिकटत नाहीत.

ज्ञाते स्थाणौ कुतश्चोरश्चोराभावे भयं कुतः ।
ज्ञाते स्वस्मिन् कुतो विश्वं विश्वा भावे कुत्तोऽखिलम् ॥ ७९ ॥
स्थाणूचे ज्ञान झाल्यावर कुठे आहे चोर ? आणि चोराचा अभाव झाल्यावर भय कुठून वाटणार ? तद्वत् आत्मा (स्व) जाणल्यावर विश्व कोठून भासणार ? आणि विश्वाचा अभाव झाला असताना, विश्वात दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी कुठून भासणार ?


स्पष्टीकरण – स्थाणूचे ज्ञान झाल्यावर चोर वगैरे काही नाही. तसे आत्मा कळल्यावर विश्व वगैरे काही नाही. येथे 'स्व' शब्द आत्मा या अर्थाने वापरलेला आहे. 'स्व' शब्दाचा असा उपयोग पंचदशीसारख्या ग्रंथांत आढळून येतो.

गण-वृत्ति-त्रयं भाति परस्पर-विलक्षणम् ।
सत्यात्मलक्षणे यस्मिन् स एवाहं निरंशकः ॥ ८० ॥
ज्या आत्म्याचे स्वरूप (अधिष्ठानभूत) असताना म्हणजेच आत्म्याचे स्वरूपावर परस्परांपेक्षा वेगळे असे जे तीन गुणांचे कार्य भासते, तो निरंश असणारा असा आत्मा मीच आहे.


स्पष्टीकरण- हा श्लोक आत्मसाक्षात्कारी जीवन्मुक्ताच्या तोंडी आहे. आत्म्याला अज्ञानाची उपाधी येते. अज्ञान हे त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेले आहे. तमोगुण-प्रधान अशा अज्ञानातून विश्वाची उत्पत्ती व्यावहारिकदृष्ट्या सांगितली जाते. तमोगुण-प्रधान अज्ञानापासून आकाश, इत्यादी सूक्ष्मभूते उद्भूत होतात. त्यांच्यातील सत्त्वगण अंशापासन ज्ञानेंद्रिये. रजोगण अंशापासून कर्मेंद्रिये इत्यादी, आणि तमोगुणापासून पाच सूक्ष्म भूते होतात. असे हे तीन गुणांचे कार्य आहे आणि ते परस्परविलक्षण आहे. आणि हे सर्व आत्म्यावर म्हणजे आत्म्याचे अधिष्ठान असताना घडून येत असते. तथापि या सर्वांचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. आत्मा हा आहे तसाच निरंश म्हणजे निरवयव आणि भेदरहित राहतो. आत्म्याचे हे स्वरूप आत्मसाक्षात्कारी पुरुषाला प्राप्त झालेले असते.

देहत्रयमिदं भाति यस्मिन ब्रह्मणि सत्यवत् ।
तदेवाहं परं ब्रह्म देह-त्रय-विलक्षणम् ॥ ८१ ॥
ज्या ब्रह्माच्या ठिकाणी हे तीन देह खऱ्याप्रमाणे भासतात, आणि जो जाग्रदादी अवस्थांपेक्षा वेगळा आहे, असा तो परमात्मा मीच आहे.


स्पष्टीकरण - आत्मा म्हणजेच ब्रह्म (अयमात्मा ब्रह्म) येथे शंकराचार्यांनी आत्मा शब्दाऐवजी ब्रह्म शब्दाचा वापर केला आहे. आणि 'हे ब्रह्म मीच आहे' (अहं ब्रह्मास्मि) अशी साक्षात्कारी जीवन्मुक्ताची स्थिती येथे व्यक्त झाली आहे. प्रास्ताविकात पाहिल्याप्रमाणे अज्ञान-समष्टि आणि अज्ञान-व्यष्टि या द्विविध उपाधीमुळे पिंडातील तीन देह आणि ब्रह्मांडातील तीन देह हे या ब्रह्मावर खरे असल्याप्रमाणे भासत असतात. पण ते सत्य नाहीत. त्या देहांपेक्षा वेगळे असे कूटस्थ ब्रह्म आहे. आणि ते परब्रह्म हेच जीवाचे खरेखुरे स्वरूप आहे.

जाग्रदादि-त्रयं यस्मिन प्रत्यगात्मनि सत्यवत् ।
तदेवाहं परं ब्रह्म जाग्रदादि-विलक्षणः ॥ ८२ ॥
ज्या प्रत्यगात्म्यावर (= ब्रह्मावर) जागृती, इत्यादी तीन अवस्था खऱ्याप्रमाणे भासतात आणि जो जाग्रदादी अवस्थांपेक्षा वेगळा आहे, असा प्रत्यगात्मा भीच आहे, (प्रत्यगात्म्याशी एकरूप असणारे जे) ते परब्रह्मही मीच आहे.


स्पष्टीकरण - प्रत्यगात्म्यावर/आत्म्यावर अज्ञानामुळे पिंडातील तीन देह व ब्रह्मांडातील तीन देह हे खऱ्याप्रमाणे भासू लागले (श्लोक ८१ पहा). या तीन देहाअंती जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था खऱ्याप्रमाणे भासू लागल्या. पण त्या खऱ्या नाहीत. त्या अवस्थांपेक्षा आत्मा वेगळा आहे. तो त्या तीन अवस्थांचा साक्षी आहे. तो प्रत्यगात्मा/अंतरात्मा/परब्रह्म मीच आहे, असा जीवन्मुक्ताचा अनुभव असतो.

विश्वादिक-त्रयं यस्मिन् परमात्मनि सत्यवत् ।
स एव परमात्माहं विश्वादिक-विलक्षणः ॥ ८३ ॥
ज्या परमात्म्याच्या ठिकाणी विश्व इत्यादी तीन आत्मे खऱ्याप्रमाणे भासतात आणि जो त्या विश्व इत्यादीपेक्षा वेगळा आहे, असा तो परमात्मा मीच आहे.


स्पष्टीकरण - अज्ञान-समष्टी आणि अज्ञान-व्यष्टी यांची उपाधी परमात्म्याला येते. अज्ञान-व्यष्टी उपाधी अंती तीन देह व तीन अवस्था मानल्या जातात. त्या तीन अवस्थांना धरून, जाग्रती अवस्थेत विश्व. स्वप्न अवस्थेत तेजस आणि सुषुप्ती अवस्थेत प्राज्ञ अशी नावे सुद्ध चैतन्याला/आत्म्याला दिली जातात. (प्रास्ताविक पहा) तथापि शुद्ध चैतन्य/आत्मा हा त्या विश्व इत्यादी तिघांपेक्षाही भिन्नच आहे. तो परमात्मा हेच जीवाचे खरे स्वरूप आहे. म्हणून परमात्मा मीच आहे अशी आत्मसाक्षात्कारी पुरुषाची अनुभूती असते.

विराडादि-त्रयं भाति यस्मिन् साक्षिणि सत्यवत् ।
स एव सच्चिदानंद-लक्षणोऽहं स्वयंप्रभः ॥ ८४ ॥
ज्या साक्षीभूत परमात्म्यावर विराट् इत्यादी तिघे खऱ्याप्रमाणे भासतात, जो सच्चिदानंद-स्वरूपी आहे, आणि जो स्वयंप्रकाशी आहे, असा तो परमात्मा मीच आहे.


स्पष्टीकरण – अज्ञान-समष्टी या उपाधीअंती तीन देह व तीन अवस्था मानल्या जातात. त्या तीन अवस्थांना धरून विराट, सूत्रात्मा आणि ईश्वर अशी नावे शुद्ध चैतन्याला/ परमात्म्याला दिली जातात. (प्रास्ताविक पहा) तथापि शुद्ध चैतन्य हे त्या अवस्थांचे साक्षी आहे; ते त्या विराट् इत्यादी तिघांपासून भिन्न आहे. असे हे शुद्ध चैतन्य/परमात्मा स्वयंप्रकाशी असून ते सच्चिदानंद आहे. असा परमात्मा हेच जीवाचे मूळ, सत्यस्वरूप आहे आणि आत्मसाक्षात्कार झाला की परमात्मा मीच आहे अशी त्या आत्मसाक्षात्कारी पुरुषाची अद्वैतानुभूती असते.

अद्वैतानुभूती या ग्रंथात अनेक दृष्टांत वगैरे देऊन शंकराचार्यांनी जे सांगितले, त्याचे संक्षिप्त सार पुढीलप्रमाणे देता येईल.

स्वयंप्रकाशी आणि सच्चिदानंद असा आत्मा हा एकमेव सत्यतत्त्व आहे. आत्म्याखेरीज जे काही अन्य भासते ते अनात्मा आहे. अनात्म्यापेक्षा आत्मा हा संपूर्णपणे वेगळा आहे. अनात्म्याचे गुणधर्म आत्म्यात येत नाहीत. अनात्म पदार्थांच्या नाशाने आत्मनाश होत नाही. मायेमुळे भासणारे द्वैत हे मिथ्या आहे. अज्ञान-समष्टी आणि अज्ञान-व्यष्टी यामुळे तीन देह, तीन अवस्था, विश्व इत्यादी आत्मे भासतात; पण ते सत्य नाहीत; त्या सर्वांपेक्षा परमात्मा भिन्न आहे. परमात्मा आणि जीव भिन्न नाहीत. म्हणून मी व परमात्मा एकच आहोत. अशी आत्मसाक्षात्कारी पुरुषाची अद्वैतानुभूती असते.
(समाप्त)

GO TOP