॥ अष्टावक्र गीता ॥

अष्टावक्र गीता म्हणजे भारतीय वेदांत व सनातन धर्माचे सार आहे, नवनीत आहे. ह्या सर्वश्रेष्ठ ग्रंथाची अन्य ग्रंथांबरोबर तुलना करता येत नाही. आत्मज्ञान प्राप्तीचे अनेक मार्ग, अनेक पद्धती आहेत. एक रस्ता ज्ञानाचा, एक कर्माचा, एक भक्तिचा, एक योगाचा, एक प्रार्थनेचा, एक ध्यानधारणेचा असे अनेक रस्ते आहेत. ह्या सर्व पद्धतींमुळे मनुष्याला आत्मस्वरूपाचा बोध होतो. वेगवेगळ्या संप्रदायात वेगवेगळ्या उपासनापद्धतींचा अवलंब केला जातो. परंतु अष्टावक्र मात्र सरळ सरळ अज्ञानावर हल्ला चढवतात. अष्टावक्रांचे मतानुसार आत्मस्वरूपाचा व ज्ञानाचा बोध होण्यासाठी विधि, क्रिया, पूजा, प्रार्थना, ध्यान, कर्म, भक्ति, भजन-किर्तन, हठयोग यापैकी कशाचीही आवश्यकता नाही. हे सारे दिशाभूल करणारे रस्ते आहेत. कोणतीही क्रिया अथवा कर्म अहंकारातून जन्माला येते व ते पुन्हा अहंकाराला खतपाणी घालते. यामुळे साहजिकच आत्म-ज्ञान प्राप्तीत अडथळा निर्माण होतो. उपासना पद्धती केवळ अवडम्बर व देखावा आहेत. यामुळे मनुष्य जणू महान धार्मिक झाल्याचा भास निर्माण होतो पण ज्ञानमार्गातील कोणतीही उपलब्धी साध्य होत नाही. वास्तव व अंतिम स्वरूपाचे ज्ञानाचा बोध हीच उपलब्धी आहे. अंधकार स्वतंत्रपणे कुठेच अस्तित्वात नसतो. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. केवळ अंधार हटविण्याचा प्रयत्‍न करणे मूर्खता आहे. एक दिवा पेटवा, अंधार आपोआप नष्ट होतो, त्यासाठी दुसरा काही खटाटोप करण्याची आवश्यकता नाही. परंतु विविध सांप्रदायीक, पंथातील लोक दिवा पेटविण्याऐवजी अंधार दूर करण्याचे उपाय योजणारी साधना करीत असतात. अशी साधना म्हणजे व्यर्थ परिश्रम व मूर्खता याशिवाय दुसरे काही नाही. केवळ ज्ञानरूपी प्रकाश सारी सिद्धि प्राप्त करून देण्यास समर्थ आहे. त्यामुळे अज्ञानरूपी अंधार नष्ट होईलच शिवाय मनुष्याची स्व-चेतना जागृत होऊन त्यास शांती प्राप्त होईल. ज्ञानप्राप्तीचा उपाय म्हणजे योग्य 'बोध' हाच आहे. आत्मा कुठे काही हरवलेली वस्तू नाही. आपल्याला त्याचा विसर पडतो, त्याची आठवण करावयाची आहे. जर एकदा या आत्मज्ञानाचा बोध व स्मरण झाले तर मायाजालरूपी अंधार क्षणात नाहीसा होतो व मनुष्याला आपल्या वास्तव स्थितीचे ज्ञान होते. दोरीला साप समजून या भ्रमाला घाबरून, काम व क्रोधाचे चटके सहन करता, मृमूच्या भितीने थरथर कापता, दुनियेची फसवणूक करून आपले पोट भरू इच्छितां, चोरी बलात्कार खून करतां, ही सर्व अवनती तुमच्या अज्ञानामुळे होत आहे. जर हे अज्ञान व भ्रांती हटली तर तुम्ही स्वतःच्या खऱ्या रूपाला ओळखू शकाल व स्वतःबद्दल स्वतःलाच हसू येईल की मी हे सारे अज्ञानाच्या प्रभावामुळे कसे काय करीत होतो ? अष्टावक्र मुनीने असा केवळ उपदेश केला नाही, तर वैज्ञानिक दृष्टीने हे सत्य सिद्ध करून दाखविले की ही केवळ सैद्धान्तिक मांडणी नाही तर प्रयोगसिद्ध वैज्ञानिक सत्य आहे. यासाठी त्याने राजा जनकावर प्रयोग करून दाखविला. अष्टावक्राचे प्रतिपादन राजकारणी पुढार्‍यांसारखे नाही किंवा ज्योतिषांच्या भविष्यकथनाप्रमाणे नाही; ते पौराणिक कथांप्रमाणे नाही किंवा वेदांप्रमाणे प्रार्थना नाही. सर्व बाबींपेक्षा वेगळे, अद्वितीय असे अष्टावक्राचे प्रतिपादन सरळ सरळ आत्मबोध जागृत करणारे आहे आणि ह्याच कारणामुळे भारताचाच नाही तर विश्व पातळीवरील अध्यात्म क्षेत्रातला हा शिरोमणी ग्रंथ मानला जातो.

आध्यात्मिक जगात सर्वाधिक महत्त्वाच्या तीन निष्ठा आहेत - ज्ञान, कर्म व भक्ति. माणसांचे दोन प्रकार आहेत - 'अन्तर्मुखी व बहिर्मुखी'. अन्तर्मुखी व्यक्तिंना ध्यान धारणेचा मार्ग सोयीचा असतो तर बहिर्मुखी व्यक्तिंना कर्म व भक्तिमार्ग अनुकूल असतो. बहिर्मुखी व्यक्तिला ज्ञानाचा रस्ता उमजत नाही. ज्ञानाची कास फक्त बुद्धिवान, विद्वान आणि चेतना तत्त्वाचा परिचय असणार्‍या व्यक्तिच धरू शकतात. यामुळेच अष्टावक्र मुनीचे तत्त्वज्ञान व उपदेश सामान्य माणसांच्या जनजीवनात जास्त प्रचलित झाले नाही. अष्टावक्र मुनींची पद्धती ही 'सांख्य' पद्धतीची असून तिच्यात कोणतीही बाह्य क्रिया करावयाची नसून अ-क्रिया हीच पद्धती आहे व आत्म्याचा बोध पुरेसा आहे. मी शरीर, शरीराचे अवयव किंवा मन नसून शुद्ध चैतन्यरूपी आत्मा आहे याचे ज्ञान झाले तर सारे भ्रम नष्ट होतात व 'मोक्ष' सुद्धा हाच आहे. मोक्ष म्हणजे एखादे ठिकाण किंवा जागा नसून चित्ताची एक अवस्था आहे व त्या अवस्थेत जीवाला परम आनंदाचा अनुभव येतो. भगवान श्रीकृष्णाच्या गीतेत ज्ञान, भक्ति, कर्म यांचा समन्यव साधला आहे खरा पण तरीही मुख्य भर आहे तो कर्मावर. अर्जुन कर्म-योगी आहे, क्षत्रिय आहे, युद्धाच्या मैदानात उभा आहे. आततायी दुष्टजनांचा संहार करणे त्याचे कर्तव्य आहे. युद्धवितन्मुख होणे भ्याडपणा आहे. आपले कर्म सत्यतापूर्वक ईमान्नदारीने व पूर्ण-निष्ठेने करणारा स्वर्गावर अधिकार सांगू शकतो. जर फळाची अपेक्षा न ठेवता लोकांच्या भल्यासाठी, ईश्ववराची आज्ञा समजून समर्पित वृत्तीने कार्य करणार्‍यास त्या कर्माचे बंधन होता नाही. अहंकाराने, स्वतःचे स्वार्थाकरितां जे कर्म केले जाते तेच बंधनाचे कारण होते. कृष्णाचा उपदेश संसारी (प्रापंचिक) व्यक्तिंसाठी आहे व तो सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे. परंतु अष्टावक्राचा उपदेश फक्त मोक्ष-प्राप्तीची इच्छा असणार्‍या मुमुक्षु व्यक्तिंसाठीच आहे. म्हणूनच सामान्य व्यक्ति त्याकडे आकषिंक होत नाही. साधु-संन्याशी, ध्यानमग्न-तपस्वी व अन्य साधनारत व्यक्तिंचा खरा मार्गदर्शक म्हणजे अष्टावक्र मुनींचा उपदेश होय. कृष्णाप्रमाणे अष्टावक्र मुनी अनेक पद्धतींचे वर्णन करत नाही. मुनी फक्त एकाच बोधप्राप्तीबद्दल सांगतात जी केवळ अद्वितीय भावातीत असून देश-काळ-समय यांच्याशी काहीही संबंध नसणारी म्हणजेच त्याबाबतीत निरपेक्ष असणारी व पूर्ण वैज्ञानिक आहे. कोणत्याही मालमसाल्याशिवाय, कोणत्याही गोष्टी व दृष्टान्तांशिवाय, कोणतेही तर्कप्रमाण न देता जणू शुद्ध गणिताप्रमाणे असणारे हे सूत्र आहे व तसे ते आध्यात्मिक जगात दुसरे कुणीही प्रतिपादित करू शकले नाही. अध्यात्माचा हा एक असा वारसा आहे की ज्याबद्दल अधिक काही वर्णन करून सांगणे म्हणजे सूर्याला दिवा दाखविण्यासारखे आहे. हे केवळ ऐकण्यासाठी, माहित करून घेण्यासाठी नसून आत्मसात करण्यासाठी आहे. जो फक्त माहित करून घेण्याचा प्रयत्न करेल ते निश्चितच चूक करेल कारण अष्टावक्राच्या ज्ञान सागराला आपल्या चमच्याएवड्या बुद्धिने मोजण्याचाच तो प्रयत्न ठरेल.

अध्यात्माच्या क्षेत्रात भारताने सर्वोच्च शिखर गाठले असून एवढे यश अन्य धर्मांना लाभू शकलेले नाही. हे सर्वोच्च शिखर आहे - अद्वैताचे. अद्वैतानुसार ही संपूर्ण सृष्टी ईश्वराची कृती नसून त्याचीच अभिव्यक्ति आहे. ह्या सार्‍या चराचराची सर्व रूपे त्याचीच आहेत. सृष्टीमध्ये ईश्वर नसून सृष्टीच ईश्वर आहे. आत्मा परमात्मा किंवा ब्रह्म या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. जीव व जगत ह्यात भेद काही नाही. प्रकृती व पुरूष एकच तत्त्व आहे. जड व चेतन ह्या ईशतत्त्वाच्याच दोन अवस्था आहेत, ते काही दोन भिन्न तत्त्व नाही. याच तत्त्व-बोधाच्या आधारावर भारतीय आध्यात्माने 'सर्व खल्विदं ब्रह्म', 'अयमात्मा ब्रह्म', 'ईशाव्व्व्स्यमिदं सर्वं', व 'विश्व-बंधुत्व' या चार महावाक्यांची घोषणा केली. ही काही मनुष्याने आपल्या बुद्धिने केलेली कल्पना मात्र नाही किंवा एखादा सिद्धान्त नाही तर प्रत्यक्ष दर्शनाच्या (ज्ञानानुभवाच्या) आधारावर सुनिश्चित केलेले निष्कर्ष आहेत, निष्पत्तीरूपी सार व परम सत्य आहे.

भारतीय अध्यात्म, स्वर्ग व नरक ह्या मनाच्याच दोन अवस्था आहेत असे मानते. मृत्योपरान्त पुनर्जन्म घेतल्यानंतर आपल्या कर्मानुसार जीवात्मा स्वर्ग किंवा नरकाचा अनुभव घेतो. अवस्थांतराच्या दोन जन्मांच्या मधल्या काळात जीवात्मा आपल्या पहिल्या भौतिक शरीरातून मुक्त होऊन आपल्या वासनांसह सूक्ष्म शरीरात स्थित असतो व योग्य वेळ येताच आपल्या वासनापूर्तीसाठी पुन्हा नवा भौतिक देह धारण करतो. सूक्ष्म देहाच्या म्हणजेच मध्यावस्थेत असतांना जीवात्म्याचा विकासही होत नाही व भौतिक शरीराच्या अभावात तो वासनापूर्ती करू शकत नसल्याने त्यात तीव्र वेदना होतात. पुन्हा भौतिक शरीर धारण कण्याची जीवात्म्याची तीव्र इच्छा असते परंतु त्याच्या कर्मानुसार त्यास भौतिक शरीर एका निश्चित कालावधीनंतरच प्रास होते व तोपर्यन्त त्यास अंतराळात भटकावे लागते. विषयांबद्दल आसक्ति व वासना असल्यामुळेच जीवात्मा या जन्म-मरणाच्या चक्रात अडकतो. भारतीय आध्यात्मशास्त्र स्वर्गालासुद्धा 'वासनां 'चेच रूप मानत असल्याने स्वर्ग ही सुद्धा जीवात्म्याची सर्वश्रेष्ठ स्थिती नाही. असा हा स्वर्गसुद्धा बंधन आहे. त्यापेक्षा उन्नत अवस्था मुक्तीची असते. मुक्तावस्थेत विषय-वासनांपासून जीवात्मा मुक्त होऊन आपल्या स्वतंत्र स्थितीचा अनुभव घेतो. यामुळे जन्म-मरणाच्या फेर्‍यातून त्याची सुटका होते. विविध विषयांबद्दलची आसक्ति व वासनांचा त्याग करण्यासाठी 'वैराग्य' हा एकच उपाय आहे. वैराग्य ही त्यासाठी पहिली अत्यावश्यक अट आहे. तिची परिपूर्ती केल्याने ज्ञान होते व ज्ञानामुळेच मुक्ति होते. हाच अष्टावक्राचा उपदेश आहे व हेच अष्टावक्र गीतेचे सार आहे.

शरीर व सृष्टी यासारख्या बाबी स्थूल असल्याने आपल्या चर्मचक्षूंना दिसू शकतात. परन्तु त्याच्या आत असलेले जे सूक्ष्म तत्त्व आहे ते दिसू शकत नाही. शरीरात आसक्ति निर्माण झाल्यास शरीर भोग-प्रवृत्त होते. आत्या सूक्ष्म आहे व त्याचा प्रत्यक्ष अनुभव नसल्याने मनुष्यास त्याचे ज्ञान होत नाही. या दुनियेत जे काही सारे घडते आहे ते याच आत्म्याबद्दलच्या अज्ञानामुळे निर्माण झाले आहे. परंतु काही जागृत व बुद्धिवान पुरूष या आत्म्याचे स्मरण देउन व्यक्तिला या बंधनातून सोडवून मुक्तिच्या दिशेने घेवून जातात. इतिहासात वेळोवेळी असे अनेक जागृत व बुद्धिवान पुरूष निर्माण झाले आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक जीवात्म्यांचा उद्धार झाला आहे. अष्टावक्रसुद्धा या अशाच महान विभुतिंपैकी होते व म्हणून आध्यात्मीक जगतात त्यांचे नांव आदरपूर्वक घेतले जाते. अष्टावक्रांच्या जीवनासंबंधी तीन कथा प्रसिद्ध आहेत. या कथांमुळे अष्टावक्र मुनी हे ज्ञानी लोकांतले शिरोमणी होते हे स्पष्ट होते. लहान वयातच त्यांना 'आत्म-ज्ञान' प्रासी झाली होती. शरीरात आठ जागी वाकडेपणा होता अशी त्यांच्याबद्दलची एक कथा आहे. आठ ठिकाणी वक्र होण्याचे कारण असे होते की ते जेव्हा मातेच्या उदरात गर्भाशयात होते तेव्हां त्यांचे वडील एक दिवशी वेद पाठ करत होते, तेंव्हा अष्टावक्र मुनींनी गर्भाशयातूनच आपल्या वडलांना सुनावले की, "बंद करा ही निरर्थक बडबड ! शास्त्रात कुठले ज्ञान आहे ? ज्ञान तर आपल्या स्वतःचे आंत असते. सत्य शास्त्रात वसत नसून ते आपल्यातच आहे. शास्त्र म्हणजे केवळ शब्दकोष आहे." हे ऐकताच त्यांचे वडिलांचा अहंकार जागृत झाला. त्यांना आत्मज्ञान तर झाले नव्हते, केवळ विद्वान होते. विद्वानांत अहंकार सर्वात जास्त असतो कारण शास्त्रांची माहिती आपल्यालाच आहे या वृत्तींतून हा अहंकार निर्माण झालेला असतो आणि याच अहंकारामुळे ते आत्मज्ञानाला वंचित झालेले असतात.

आत्मज्ञान होण्यासाठी नम्रता ही पहिली अट असते. अहंकारी व्यक्ति एखादे शिखर असल्याप्रमाणे उंच होत जातो त्यामुळे ज्ञानवृष्टी होऊनसुद्धा हे शिखर कोरडेच रहाते व छोटे-मोठे खड्डे मात्र पाण्याने भरून जातात. अजून गर्भाशयातच असणार्‍या आपल्याच मुलाने आपल्याला उपदेश करावा ह्या विचाराने अष्टावक्र मुनींचे वडील क्षुब्ध झाले कारण त्यांच्या अहंकारावरच अष्टावक्राने आघात केला होता. म्हणून त्यांनी अष्टावक्राला शाप दिला कि तू जेंव्हा जन्माला येशील तेंव्हा आठ ठिकाणी वक्र असशील. तसे खरोखरीच घडल्याने त्याचे नाव अष्टावक्र पडले.

गर्भावस्थेतूनच ज्ञानाचे विवरण सांगण्याची ही गोष्ट बुद्धिला कळू शकणार नाही, तकनिसुद्धा कळू शकणार नाही. परंतु अध्यात्मिक-दृष्टीने मात्र ती समजू शकेल. संपूर्ण वृक्ष - त्याचे खोड, पाने, फुले, फळे सारे काही एका छोट्या बीजात समाविष्ट असते. अप्रकट असते, अजून त्याचा विकास झालेला नसतो, अदृश्यही असते परंतु पूर्ण वृक्ष त्यात स्थित असतो. बी फोडून पाहिले तरी तो वृक्ष डोळ्यांना दिसत नाही. वैज्ञानिकसुद्धा दाखवू शकत नाही. ज्याने बी कधी पाहिलेच नाही व फक्त वृक्षच पाहिला आहे, तो सहज म्हणू शकेल की विशाल वृक्ष या छोट्याशा बी मधून कसा काय प्रकट होउ शकेल ? हजारो तर्क व दृष्टान्तसुद्धा याचे उत्तर देऊ शकणार नाही. वृक्षाचे आयुष्य हजारो वर्षाचे असेल व मनुष्याचे आयुष्य सत्तर, अंशी वर्षाचे असेल तर ते त्या वृक्षाला अनादि मानू लागतील. कारण अनेक पिढ्या ते फक्त वृक्ष पाहतात. ते असेही जाहीर करतील की हा अनादि वृक्ष कोणत्याही बीजापासून उत्पन्न झालेला नाही. याप्रमाणे जगात अनेक भ्रम आहेत. याचप्रमाणे मनुष्याचे सारे व्यक्तिमत्व अप्रकट रूपात गर्भावस्थेतल्या शिशुत समाविष्ट असते. जन्मानंतर वाढत्या वयात जसेजसे शरीर, अवयव व मस्तक यांचा विकास होऊ लागतो तसे तसे ते व्यक्तिमत्त्व हळूहळू प्रकट होऊ लागते. काही व्यक्तित्व अविकसित राहतात, तर काही अर्धविकसित राहतात आणि काहींचा पूर्ण विकास होतो. परंतु जे आत असते त्याचाच विकास होत असतो. बीज रूपाने जे तत्त्व आत नाहीच त्याचा विकास होत नाही किंवा नवे काही बाहेरून जोडता येत नाही. या कथेमुळे हे लक्षात येते की अष्टवक्राने पुस्तकातून, पंडितांकडून किंवा समाजातून ज्ञान प्रास केले नव्हते तर जन्मतःच तो सारे ज्ञान स्वतःबरोबर घेउनच जन्मला होता.

अष्टवक्राबद्दलची दुसरी प्रसिद्ध कथा अशी आहे की को अष्टावक्र बारा वर्षाचे होते तेव्हा राजा जनकाने देशातल्या मोख्योठ्या विद्वानांना आमंत्रित करून तत्त्वज्ञान व शास्त्रार्थ ह्यावर चर्चा करण्यासाठी एका सभेचे आयोजन केले होते. राजा जनकाने अशीही घोषणा केली होती की सोन्याने शिंगणे मढविलेल्या शंभर गायी, या वादविवादात जिंकणार्‍या पंडितास दान केल्या जातील. शास्त्रार्थात भाग घेण्यासाठी देशातील अनेक प्रख्यात व नामवंत विद्वान दाखल झाले. त्यात अष्टावक्रचे वडीलसुद्धा सहभागी झाले होते. शास्त्रार्थ सुरू झाला व दिर्घ काळ चर्चा सुरू होती. संध्यासमयी अष्टवक्राला बातमी समजली की त्यांचे वडील सर्व विद्वानांशी चर्चेत जिंकले पण एका पंडिताबरोबर शास्त्रार्थ करण्यात ते हरू लागले आहेत. ही बातमी ऐकून अष्टवक्रसुद्धा या पंडितांच्या सभेत जाउन पोहचले. सभा पुस्तकी पंडितांचीच होती त्यात कुणालाही आत्मज्ञानाचा लवलेश नव्हता. आपल्या आठ ठिकाणी वाकलेल्या शरीराने वेडेवाकडे चालत अष्टवक्र सभेत पोहोचले तेंव्हा त्यांचे बेढब शरीर व चाल पाहून सर्व पंडित हसू लागले. सर्व पंडित हसण्याचे थांबल्यावर काही सेकंदानंतर त्यांचेकडे पाहून अष्टवक्र मोठ्याने हसले. अष्टवक्राचे हसणे पाहून राजा जनकाने विचारले, 'हे सर्व पंडित कां हसले हे मी समजलो पण अष्टवक्रा, तू कां हसलास हे मला कळले नाही. यावर अष्टवक्राने उत्तर दिले की, "मी या कारणाने हसलो की आज या चर्मकारांच्या सभेत सत्याचा निर्णय होत आहे. हे चर्मकार इथे काय करतायत ?" अवघे बारा वर्षे वय असणार्‍या बालकाचे हे उद्‌गार केवढे आत्मविश्वासपूर्ण होते. केवढा तो बालक आगळा वेगळा व प्रतिभाशाली बुद्धिचा असला पाहिजे की ज्याने क्षणार्धात पंडितांच्या शुष्क विद्वतेची किंमत चर्मकार या एका शब्दात व्यक्त केली. सर्व जण ते उद्‌गार ऐकून स्तब्ध झाले. विद्वान म्हणून ज्यांना राजा जनकाने आमंत्रित केले होते, त्यांना चर्मकार म्हणणे हा राजाचा सुद्धा अपमान होता. विद्वान पंडितांनी आपला क्रोध व्यक्त करण्याच्या आधीच राजा जनकाने प्रसंग निभावून नेण्यासाठी संयमपूर्वक अष्टवक्रास विचारले, "तुला नेमके काय म्हणायचे आहे हे मला समजले नाही." अष्टवक्र उत्तरला, "अगदी सोपी गोष्ट आहे. चर्मकार चामड्याचा जाणकार असतो, त्याला ज्ञानाची काय ओळख ? जे ज्ञानी असतात ते ज्ञानाकडे लक्ष देतात, चामड्याकडे नाही. ह्या पंडितांना माझी कातडी दिसली, माझे वेडेवाकडे शरीर दिसले. चामड्याची यांना उत्तम जाण आहे. यावरून हे ज्ञानी नसून चर्मकार आहेत. हे राजा ! मंदिराची रचना वाकडी असली तर त्यामुळे आकाश वाकडे होत नाही किंवा मंदिर गोल अथवा लांबट असल्याने आकाश गोल अथवा लांबट होत नाही. कारण आकाशाचा मंदिराशी काही संबंध नाही. आकाशाचे कोणतेही अवयव नाहीत पण मंदिराचे आहेत. असाच आत्म्याचा शरीराशी काही संबंध असत नाही. कारण आत्म्याचे अवयव नाहीत पण शरीराचे अवयव आहेत. आत्मा नित्य आहे आणि शरीर अनित्य. शरीराचे वक्र किंवा अन्य गुणधर्म आत्म्याचे असू शकत नाही. हे राजा ! ज्ञानवानाची आत्म-दृष्टी आत्म्याला पाहते पण अज्ञानी व्यक्तिची नजर चामडेच पहाते. ही चर्मदृष्टी अज्ञानी लोकांजवळ असते, ज्ञानी त्या नजरेने पहात नाही." अष्टवक्राचे हे आत्म्याचे बोधप्रद वर्णन करणारे वचन ऐकून राजा जनक प्रभावित झाला. राजा जनक सिंहासन सोडून उठला व त्याने त्या बारा वर्षाच्या बालकाचे पाय धरले व साष्टांग नमस्कार घातला. दुसरे दिवशी ज्ञानोपदेश देण्याकरिता अष्टवक्रास राजाने आपल्या राजमहालात आमंत्रित केले. दुसर्‍या दिवशी अष्टवक्र तेथे पोहोचले तेव्हा त्यांना उच्चासनावर बसवून त्या बालकाच्या चरणाजवळ बसून राजा जनकाने आपल्या जिज्ञासेच्या तृप्तीसाठी अष्टवक्राला विनंतीपूर्वक शंका विचारल्या. याच शंका व त्यांनी उत्तरे 'जनक-अष्टावक्र-संवाद' रूपात अष्टवक्र गीता म्हणून प्रसिद्ध झाले आहेत.

अष्टवक्राचे आत्मज्ञानाची प्रचिती सांगणारी अजून एक कथा ज्ञात आहे. राजा जनकाने आत्म-ज्ञानविषयक अनेक शास्त्रांचा अभ्यास केला होता. एका शास्त्रात लिहिले होते की आत्म-ज्ञान प्राप्त होणे फार साधे सोपे आहे. त्यासाठी कोणतेही कष्ट वा तपस्या करावी लागत नाही. घोड्यावर चढण्यासाठी एका रिकबीत पाऊल ठेवल्यावर दुसर्‍या रिकबीत दुसरे पाउल ठेवण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यापेक्षाही कमी वेळात आत्मज्ञान होऊ शकते. राजा जनक मुमुक्षु होते व त्यास आत्मज्ञानाची ओढ होती. राजाला या शास्त्र वचनाची सत्यता पारखण्याची इच्छा होती. वैज्ञानिक बुद्धिमुळे शास्त्राच्या सत्याचा अंधविश्वासाने स्वीकार करण्यापेक्षा प्रयोगाने सिद्ध करण्याचा त्याचा आग्रह होता. त्यासाठी त्याने देशातल्या मोठमोठ्या विद्वानांना बोलवून हे शास्त्रवचन सिद्ध करण्यास सांगितले. सिद्ध करता येत नसल्यास हे वचन शास्त्रातून रद्द करावे असाही राजाचा आदेश होता. ते सर्व पुस्तकी पंडित होते, आत्म-ज्ञानाशी त्यांचा काही परिचय नव्हता. शास्त्रार्थ करण्यात ते पटाईत होते कारण शास्त्राचे पुस्तकी ज्ञान त्यांना भरपूर होते. त्यामुळे आत्मज्ञानप्राप्तीचे हे रहस्यमयी वचन सिद्ध करण्यास ते असमर्थ होते. ते म्हणाले, "आम्ही फक्त पंडित आहोत, आत्मज्ञान काय असते, ते कसे प्राप्त करायचे हे आम्हाला माहीत नाही." राजाने सर्व पंडितांना तुरूंगात टाकण्याचा आदेश दिला. सर्व पंडित कैदी बनले. हे वृत्त अष्टवक्रास कळाल्यास तो स्वत: राजा जनकाकडे गेला व त्याचे आव्हान स्विकारून तो म्हणाला, "हे राजा जनक, शास्त्रात जे सांगितले आहे ते नक्कीच शक्य आहे. मी ते सिद्ध करतो. तू सर्व पंडितांना मुक्त कर व एक घोडा तयार करून माझ्याबरोबर दूर चल." राजा जनकाने सर्व पंडितांना मुक्त केले व आपला घोडा तयार केला. अष्टवक्राने राजा जनकाला शहरापासून दूर अशा निर्जन ठिकाणी नेले व तेथे घोडा थांबवून राजा जनकाला घोड्याच्या रिकबीत एक पाऊल ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे जनकाने केल्यावर अष्टवक्राने विचारले, "तू शास्त्रात काय वाचलेस ते मला आता सांग पाहू ?" राजाने क्षणार्धात आत्मज्ञान होण्याची गोष्ट सांगितली. अष्टवक्र म्हणाला, 'हे तर सत्य आहे पण याच्यापुढे तू काय वाचलेस ?" जनक उत्तरला, "असे ज्ञान होण्यासाठी पात्रता पाहिजे." अष्टवक्राने लगेच विचारले, "तू ही अट पूर्ण केलीस ? जर ही अट पूर्ण केली नाहीस तर आत्मज्ञान कसे होणार ?" राजा जनक क्षणभर चमकला पण त्याला आत्मज्ञानाची तीव्र ओढ होती. वाटेल ती किंमत देऊन त्याला ते हवे होते. राजा ज्ञान आहे असे केवळ बुद्धिने मानून समाधानी होत नव्हता, त्याचा अनुभव घेण्यासाठी, साक्षात्कारासाठी तो तळमळत होता. ईश्वराला समक्ष पाहण्याची जनकाची इच्छा होती. अष्टवक्रासारखा गुरू मिळाल्यावर ही संधी गमावण्याची त्याची इच्छा नव्हती. शास्त्राचा जाणकार असल्याने राजा जाणत होता की पात्रता निर्माण होण्यासाठी काही आवश्यक असेल तर ते म्हणजे अहंकारापासून पूर्ण सुटका, संपूर्ण समर्पण, शरीर व मनाच्या भावनेतून मुक्ति, शास्त्र किंवा ज्ञान किंवा सर्व प्रकारच्या बाह्य उपाधींपासून स्वतःला मुक्त करणे होय, हीच पात्रता आहे. अहंकारामुळेच आपण मुक्तीपासून दूर रहातो. अहंकार सुटताच अगदी तत्क्षणी व्यक्तिचा स्वतःचे आत्म्याशी संपर्क स्थापित होतो. वेळ लागतो तो फक्त या सार्‍या बाबींप्रती आपली धारणा, आपली दृष्टी बदलण्यासाठी. जर दृष्टी-परिवर्तन घडले तर सारे काही बदलून जाते. हे दृष्टी-परिवर्तन होण्यासाठी बोध होणे जरूरीचे आहे. पण बोध होण्यासाठी साधना (तपस्या) आवश्यक आहे. राजा जनकाला हे सारे काही अष्टवक्राच्या सहवासात उमजते. तो आश्चर्यचकित झाला, लज्जित झाला व विलक्षण नम्र झाला. तत्काळ राजाने अष्टवक्रासमोर गुडघे टेकून हात जोडत स्वतःला समर्पित केले. राजा म्हणाला, "हे ज्ञानसागरा, हे माझे शरीर, मन, बुद्धि, अहंकार सर्व काही मी तुला समर्पित करतो. याचा तुम्ही यापुढे हवा तसा उपयोग करा." ही समर्पणशीलता राजाचे ठायी निर्माण होताच त्याचा अहंकार नष्ट झाला. राजा जनक जणू ज्ञानात विरघळून गेला, वाफेसारखे त्याला तरलपण आले. फ्ल दृष्टीच्या जाणीवेतून बाहेर पडून त्याचा प्रवेश सूक्ष्म जगतात झाला.

राजा जनकाचे ठायी पात्रता निर्माण होताच अष्टवक्राने आपले सारे ज्ञानमर्म त्या सुयोग्य पात्रात ओतले. पात्र जे काही क्षणांपूर्वी रिकामे होते आता पूर्ण भरून गेले. पहिल्यांदा ते अहंकाराने भरलेले होते, स्थूल दृष्टीच्या मोहाने भरले होते म्हणून त्यात ज्ञान-प्रवेश होण्यास जागा नव्हती. समर्पणाच्या क्षणात ते रिकामे झाले. 'भरो होई सो रिताई, रीतो होय भराय.' जे अहंकार, वासना ह्यांनी भरले आहे ते आत्मज्ञानाने रिते आहे व जे संसारिक बाबींतून मुक्त, रिक्त झाले ते आत्मज्ञानाने भरून जाते. पावसात खड्डे भरून जातात आणि पर्वत शिखरे कोरडी राहतात. आध्यात्मिक उपलब्धिचे हेच अद्‌भुत व एकमेव रहस्य आहे. ह्या रिक्त-अवस्थेत राजा जनकाला अष्टवक्राने ज्ञानस्पर्श केला व जनकाला घोड्यांच्या दुसर्‍या रिकवीत पाऊल ठेवण्याच्या आत आत्म-बोध झाला. एका क्षणात घटना घडली व राजा तत्सणी ध्यानस्थ होऊन त्याची समाधी लागली. घोड्याच्या दुसर्‍या रिकबीत पाऊल ठेवण्याचेही भान त्यास राहिले नाही. अष्टवक्र त्याचे शेजारी पद्‌मासन घालून बसले. याप्रकारे तीन दिवस झाले. राज्यात राजाच नसल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही अव्यवस्था पाहून काही मंत्री राजाचा शोध घेण्यासाठी निघाले तेव्हां त्यांना दूरवर राजा एक पाय घोड्याच्या रिकबीत ठेऊन उभा असलेला व अष्टवक्र शेजारी बसलेला असे दृश्य दिसले. दोघेही मीन व शांत होते. एका मंत्र्याने राजाजवळ जाऊन विनंती केली, 'महाराज ! तीन दिवस होऊन गेले. तुम्ही नसल्याने राजकार्यात अव्यवस्था निर्माण झाली आहे. आता आपण पुन्हा राजधानीत चलावे." यावर राजा जनक उतरला, "आता मी राजधानीत कशाला येऊ ? हे शरीर माझे नाही, मन माझे नाही, मी ते गुरूचरणांवर समर्पित केले आहे. आता गुरूचा आदेश होईल तसे मी वागेन." अष्टवक्राने मनोमन जाणले की राजाला समाधी लाभ झाला आहे व आत्म-बोध झाल्याने केवळ एका झटक्यात सारी बंधने तोडून राजा मुक्त झाला आहे. अराजक टाळण्याकरिता अष्टवक्राने राजाला राजधानीत परत जाऊन अनासक्त वृत्तीने राज्याचे स्थिरतेसाठी कर्तव्य कर्म करण्याचा आदेश दिला.

राजा जनकाला पाहतां पाहतां क्षणार्धात आत्म-ज्ञान प्राप्त झाले ही घटना महत्त्वपूर्ण आहे तद्वतच रहस्यमय आहे. आत्मज्ञान ही काही दीर्घ प्रक्रिया नाही तर एक घटना आहे व पात्रता निर्माण झाल्यावर कोणत्याही क्षणी घडू शकते. ज्ञान-प्राप्तीच्या संदर्भात अनेक स्वरूपाच्या श्रद्धा व सिद्धान्त आहेत. योगशास्त्राचा भर क्रियेवर आहे, कर्मावर आहे, तंत्रशास्त्र समर्पणाची आवश्यकता असल्याचे सांगते; पण सांख्य फक्त 'बोध' होण्याकडे निर्देश करते. सांख्य दर्शन असे मानते की आत्मा कुठे हरवलेला नाही. तो आपल्यातच आहे, आपल्याला प्राप्त झाला आहे. पण केवळ त्याचे विस्मरण झाले आहे. या आत्म्याची स्मृती जागृत करायची आहे. यासाठी फक्त 'बोध' पुरेसा आहे. यापेक्षा निराळे असे काही करायचे नाहीये. काही केल्याने अहंकार निर्माण होतो व आत्मज्ञानात याच अहंकाराचा अडथळा होतो. अष्टवक्र म्हणतात, सर्व क्रियाकर्म बंधन आहे. अ-क्रिया हाच मार्ग आहे. काहीही क्रिया न करता स्वतःला रिक्त करणे हाच स्वतःत आत्म-ज्ञान भरण्याचा उपाय आहे. शंकराचार्य म्हणतात, "मोक्ष योगानी प्रास होत नाही किंवा सांख्य पद्धतीने प्राप्त होत नाही, मोक्ष कर्माने प्राप्त होत नाही किंवा विद्येने प्राप्त होत नाही. ब्रह्म आणि आत्मा यांच्या एकतेचे ज्ञान, एकतेचा बोध झाल्याने मोक्ष प्राप्ती होते. यापेक्षा निराळा वा दुसरा रस्ता नाही. "जे. कृष्णमूर्तींचा सर्व विचार सांख्य-विचार आहे; केवळ अ-क्रिया सांगणारा, केवळ 'विचारांचा'. कर्म केल्याने 'संसार' प्राप्त होतो, परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी केवळ अंतःकरणात स्थान निर्माण करणे पुरेसे होते. परंतु हे सांख्य-अक्रिया दर्शन प्रत्येक व्यक्तिसाठी उपयुक्त नाही. तीव्र प्रतिभासंपन्न व प्रखर बुद्धिमत्ता असणारी व्यक्तिच या विधीमार्गाने साध्य प्राप्त करू शकते. सामान्य व्यक्तिला हा अक्रिया विचार उमजणारा नाही. त्याला एखाद्या योग-क्रियेमधून जावे लागते. भक्त हृदयासाठी प्रेमाचा प्रशस्त रस्ता उपलब्ध आहे (जसा तो संत मिराबाईला गवसला होता.) मग तिथे योग, हठयोग, सांख्य या पद्धतींचा उपयोग नसतो. भिन्न भिन्न स्तरातील (भावनिक व आध्यात्मिक जागृतीच्या भिन्न स्तरातील) व्यक्तिंसाठी भिन्न-भिन्न उपाय आहेत. जनक राजात बोध ग्रहण करण्याची पात्रता होती म्हणून अष्टवक्र मुनींच्या प्रभावाला जनक राजाच्या हृदयात स्थान मिळून राजाला ज्ञान झाले. अन्यथा ते शक्य नव्हते. कारण काहीही असो पण सांख्य दर्शनाने सांगितले तसे निर्भेळ सत्य व एकच उपाय (समर्पण व साक्षात्कार) असा कुणी दुसर्‍याने सांगितला नाही. अष्टवक्रसारखा गुरू तर अतिदुर्मिळ पण राजा जनकासारखा शिष्य त्याहूनही दुर्मिळ. सर्वांची पात्रता समान नसते. ही गीता मोक्ष प्राप्तीसाठी उत्सुक झालेल्यांकरिता एखाद्या नावेसारखे आहे, जिच्यात बसून संसार-बंधनातून मुक्त होऊन मोठा लाभ होऊ शकतो व तीच जीवात्म्याची सर्वश्रेष्ठ अवस्था आहे.

सार-संक्षेप

अष्टवक्र गीतेचा प्रारंभ मुमुक्षु राजा जनकाच्या तीन प्रश्नांनी होतो. ज्ञान कसे प्राप्त होते ? मुक्ती कशी प्राप्त होते ? वैराग्य कसे प्राप्त होते ? संपूर्ण अध्यात्माचे सार ह्या तीन प्रश्नांचे उत्तरात सामावलेले आहे. आसक्तिचा त्याग ही आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीच्या मार्गातील पहिली अट आहे. तिच्यामुळे आत्मज्ञान होते व आत्मज्ञानामुळे मुक्ति प्राप्त होते व तीच जीवात्म्याची सर्वश्रेष्ट अवस्था अथवा स्थिती आहे. जनकाच्या तीन प्रश्नांचे समाधान अष्टवक्र मुनींनी तीन वाक्यात केले व त्यांचा उपदेश ऐकता-ऐकता जनकाला आत्मानुभूती प्राप्त झाली. अष्टवक्राचा उपदेश केवढा विलक्षण असेल व राजा जनकाची आध्यात्मिक पात्रता केवढी उच्च दर्जाची असेल याची यावरून कल्पना येते. सत्याचे एवढे शुद्धतम वर्णन आजपर्यंत दुसर्‍या कुण्याही व्यक्तिने केलेले नाही. या सत्य-मार्गाचा विचार आध्यात्मातून वगळून टाकला तर आत्मज्ञानाची प्राप्ती कशी होते याची कल्पना करणे अत्यंत कठीण होईल. वेद, उपनिषदे व पुराणे सुद्धा या सत्य-मार्गापुढे तेजोहीन वाटू लागतात. कृष्णाच्या गीतेचा मुख्य नायक अर्जुन हा वेगवेगळ्या मानसिक समस्यांमधे अडकला आहे. त्याला ज्ञान-प्राप्तीची इच्छा नाही आणि कर्तव्य-बोधही झालेला नाही. अर्जुन क्षत्रिय आहे, युद्धक्षेत्रात उभा आहे; दुष्ट शक्ति व व्यक्तिचे आव्हान त्याचे समोर उभे ठाकले आहे पण आपले कर्तव्यापासून अर्जुन दूर पळून जाण्याची इच्छा बाळगतो व खोटे तर्क सांगतो. कधी पाप-पुण्याची, कधी स्वर्ग-नरकाची, कधी संन्यास घेण्याच्या गोष्टी करतो. परंतु हे सारे कर्तव्य चुकविण्यासाठी आहे, त्यात गुरू-निष्ठा नाही आणि कर्तव्य-परायणताही नाही. भगवान कृष्ण सर्व प्रकारे आध्यात्मिक बाजूंचे स्पष्टीकरण समजावत अर्जुनाला कर्तव्य करण्यास प्रेरित करतात पण अधिक प्रज्ञावान नसल्याने अर्जुन वेगवेगळे तर्क व शंका व्यक्त करतो. अर्जुनाची ही भ्रमीत बुद्धि पाहून आपले सारे सांगणे व्यर्थ आहे हे कृष्णाने ओळखले व म्हणून आपल्या विराट रूपाचे दर्शन अर्जुनाला घडविले. तेंव्हा कुठे अर्जुनाला कृष्णाच्या चराचर व्यापणार्‍या आत्म-शक्तीरूपी स्वरूपाचे ज्ञान होते व त्यामुळे समर्पणवृत्तीने अर्जुन, कृष्णाची दिव्य वाणी ग्रहण करून युद्ध जिंकतो. राजा जनक, अर्जुनापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात नम्र, शुद्ध-चित्त, मुमुक्षु, प्रतिभासंपन्न व गुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवणारा होता. राजा जनकाने शंका कुशंका व्यक्त केल्या नाहीत किंवा खोटे तर्कही सांगितले नाहीत. गुरूले सांगताच समर्पित झाल्याने या समर्पणाच्याच दरवाज्यातून गुरूद्वारा आत्म-ज्ञान जनकाचे आत प्रवेशले. पूर्ण बोध झाला. आत्मज्ञानात अडथळा ज्ञान-प्राप्तीचा नसून आसक्तित अडकलेल्या मनाचा अडथळा आहे. मनाची स्वच्छता करण्यात सारी शक्ति खर्च होते व तरीही हाती काही लागत नाही. आसक्तितून पूर्ण मुक्त, शुद्ध मन हीच अपरिहार्य अट आहे. या अटीची पूर्णता करणार्‍यास गुरूकृपा एका क्षणाचाही विलंब न होता प्राप्त होते. राजा जनकाएवढी पात्रता असेल तर कोणत्याही व्यक्तिच्या जीवनात हे घडू शकते. यात धर्म, देश, जात, काळ यासारख्या कोणत्याही गोष्टीचा अडथळा होत नाही. पुरेशा गांभीर्यने हे सार तत्त्व आपल्या हृदयात स्विकारले तर आत्मबोधाची अनुभूती होऊ शकते. स्वामी विवेकानंद जेंव्हा रामकृष्ण परमहंसांकडे गेले तेंव्हा त्यांनी परमात्म्याचा पुरावा मागितला. परमहंसांनी त्यांना अष्टवक्र गीता देऊन सांगितले की माझी नजर अधू आहे म्हणून तू मला हे पुस्तक वाचून ऐकव. असे म्हणतात की पुस्तक वाचतां वाचतां स्वामी विवेकानंद ध्यानस्थ झाले व त्यांच्या वैचारिक दृष्टीकोनात पूर्ण क्रांती झाली. अध्यात्मिक क्रांतीचा जन्म आत्म-बोधातून होतो. अन्य क्रिया-कर्माचा काही उपयोग नसतो. अष्टवक्राने म्हटले आहे की 'चर्मकार चामडे पहातो व ज्ञानी पुरुष आत्मा पहातो'. आत्मा पहाण्याची क्षमता निर्माण होणे हीच अशी पात्रता आहे की ज्यामुळे आध्यात्मिक मुक्ती मिळू शकते. पूर्व जन्मात प्राप्त केलेली पात्रता असो किंवा या जन्मातील मोक्ष प्राप्तीची तळमळ. ह्या दोन्ही गोष्टी असल्याने घटना तत्काळ घडली. शंभर अंश डिग्रीला पाणी उकळते. ज्यांना नव्याण्णव (९९) अंश तापमान पूर्व जन्मातच प्रात झाले आहे ते या जन्मी केवळ एक अंश उष्णता प्राप्त होताच बाष्प होतात. परंतु ज्यांना पूर्व जन्मात केवळ दहा अंश तापमान प्राप्त झाले आहे त्यांना या जन्मी नव्वद अंश उष्णता प्राप्त करण्याची गरज आहे. उपलब्धीच्या कालावधीत फरक पडल्याचे हेच एक कारण आहे. चार प्रकारची माणसे असतात - ज्ञानी, मुमुक्षु, अज्ञानी आणि मूढ.

ज्ञानी तो आहे ज्याला आत्म-बोध झाला आहे, मुमुक्षु व्यक्ति आत्म-बोधासाठी तळमळत असते, सर्वस्व अर्पूनही आत्म-ज्ञान प्राप्त करण्याची मुमुक्षुची तयारी असते. अज्ञानी माणसाला शास्त्राची माहिती असते परंतु त्याची अंतिम फलश्रुती प्राप्त करण्यात त्याला काही रूची नसते. मूढ व्यक्तिला आध्यात्मिक जगाची ओळखही नसते व ती त्याला करूनही घ्यायची गरज वाटत नाही. पण्माणे शारीरिक गरजा व क्रियांचीं पूर्ती करण्यातच त्याला धन्य वाटते. तो केवळ वासनासक्त शरीर असतो. मूढापेक्षा अज्ञानी बरा, अज्ञानी व्यक्तिपेक्षा मुमुक्षु चांगला आणि मुमुक्षुपेक्षा ज्ञानी श्रेष्ट होय.

काही गोष्टींना अस्तित्व आहे परंतु त्याचा प्रमाण-पुरावा देता येत नाही. ज्या गोष्टी डोळ्यांना दिसू शकतात, ज्यांचा आपण अनुभव घेऊ शकतो त्यांना सिद्ध करण्यासाठी अन्य प्रमाणांची गरज नसते. पण आंधळ्याला कोणताही प्रमाण-पुरावा देऊन सूर्य आहे याची खात्री पटवून देता येत नाही. रंगाचे ज्ञान आंधळ्याला आपण करून देऊ शकत नाही. प्रेम, दया, करूणा, दुःख, वेदना, आनंद ह्या बाबी डोळ्यांनी दाखवता, पाहता येत नाहीत व त्यांना दुसर्‍या कशाच्या आधाराने प्रमाणित करता येत नाही. पण या बाबी ज्याच्या त्याला स्वतःलाच अनुभवता येतात. एका सिमारेषेपर्यंतच बुद्धी निर्णय घेऊ शकते. आत्मा, परमात्मा, ब्रह्म या गोष्टी बुद्धिच्या आवाक्याचे बाहेर आहेत. हे इंद्रियांचे अनुभूतीचे विषय नाहीत. इंद्रियांद्वारे स्थूलाचे ज्ञान होते. सूक्ष्म सुटून जाते. सूक्ष्माचे ज्ञान ग्रहण करण्याची विद्या दुसरीच आहे व तिच्या रस्त्याने गेल्यास सूक्ष्म सुद्धा प्राप्त करता येते. ध्यान व समाधिची ही विद्या आहे. तिच्याद्वारे स्थूल जगताला पार करून सूक्ष्माचे दर्शन करतां येते, बोध प्राप्त करून घेता येतो. स्थूल व सूक्ष्म हे केवळ बाह्यांगाने भिन्न आहेत. स्स्थूल हे सूक्ष्माचेच रूप आहे. जर सूक्ष्म नसते तर स्थूलाचीही निर्मिती अशक्य आहे. अज्ञानी फक्त स्स्थूलालाच ओळखू शकतात व ज्ञानी सूक्ष्माची प्राप्ती करतात. अध्यात्म शास्त्र म्हणजे या सूक्ष्म तत्त्वाच्या प्राप्तीचे शास्त्र आहे. मात्र सूक्ष्माचे ज्ञान होण्यासाठी काही पूर्वशर्ती, अटी आहेत. या अटींची पूर्तता केल्याशिवाय सूक्ष्माचे ज्ञान होऊ शकत नाही. आत्म-ज्ञानासाठी निर्विकारचित्त व साक्षीत्व-वृत्तीची आवश्यकता आहे. महर्षि पातंजलींचे वचन आहे, "योगश्चित्तवृत्तिनिरोध" ( चिताच्या वृत्ती वासनांचा विरोध करणे, त्यांचेवर विजय प्राप्त करणे हाच योग आहे.) या चित्ताच्या प्रवृत्ती थांबवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु उच्च दर्जाचा बोध झाल्यावर या पद्धतींची गरज रहात नाही. जे समजू शकतात त्यांचे साठी ज्ञान-बोध असतो, जे समजू शकत नाही त्यांचेसाठी नाना प्रकारचे विधी असतात. अज्ञानींसाठी बोध काही कामाचा नाही, त्यांच्यासाठी विधी व पद्धतीच उचित आहे. राजा जनकात बोध होता, विद्वत्ता होती, जाण होती म्हणून अष्टवक्राने त्यास कोणताही विधी मार्ग सांगितला नाही. यम-नियम सांगितले नाहीत, आसन-मुद्रा, प्राणायाम सांगितला नाही. गायत्री मंत्राचे उच्चारण सांगितले नाही किंवा पूजा-पाठ शिकविला नाही. सरळ बोध-स्पर्श झाला व राजा जनकाचे 'आत्म'ज्ञान जागृत झाले. ही राजा जनकाची पात्रता व कौशल्य होते की ऐकतांनाच त्याला बोध झाला. वेगळे काही करावे लागले नाही. गुरूने सुद्धा योग्य पात्र पाहून आपल्या पूर्ण शक्तिचा प्रयोग केला म्हणून हे घडू शकले.

अष्टवक्राच्या ज्ञान प्राप्ती बद्दलचा उपदेश एवढाच आहे की आत्मज्ञानासाठी काहीही करावयाचे नाही. सर्व क्रियांची बंधने होतात. क्रियेशी सदैव फळाची इच्छा जोडलेली असते, अपेक्षा जोडलेल्या असतात. प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया जन्माला येते व त्याचे फळ अवश्य मिळते व तेच मुक्तिमध्ये अडथळा होते. अष्टवक्राने समाधीचे अनुष्ठान सुद्धा मुक्तिमधे बाधा आणणारे असल्याचे सांगितले आहे. अष्टवक्राचा सर्व उपदेश बोध-प्राप्तीचा, जागरणाचा आहे. मनुष्य आपले सारे जीवन शरीर, मन, बुद्धि व अहंकार यांच्यातच पहातो. यातूनच त्यास सुख दुःखाचा अनुभव येतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या बाबींशी जोडल्या आहेत. याच करिता तो भोग घेण्यात स्वारस्य घेतो. जीवन काही समस्या नाही पण मनुष्याच्या चुकीच्या दृष्टीकोनामुळे जीवनाला समस्येचे रूप येते. ज्याप्रमाणे भिंतीवरचा कोळी स्वतःच जाळे विणतो व स्वतःच त्यात अडकतो त्याचप्रमाणे हे घडते. दुसरे काही कारण नाही. मनुष्याने स्वतःच सर्व बंधने निर्माण केली आहेत व तोच त्यांच्यात अडकतो. पण माणूस काही शरीर नाही, मन नाही, बुद्धि नाही व अहंकार सुद्धा नाही. माणूस आहे फक्त शुद्ध चैतन्य ! शरीरातील चैतन्य म्हणजे आत्मा आहे आणि विश्वातील समस्त आत्म्यांचे एकत्व म्हणजे ब्रह्म आहे. दोघे एकच आहेत, त्यांच्यात अभिन्नत्व आहे. हे चैतन्य कर्ता नाही आणि भोक्ता नाही. या चैतन्याचे कोणते बंधन नाही व त्याचा कोणताही मोक्ष नाही. ते सर्वांचे साक्षी, निर्विकार, क्रियाविरहित व स्वयंप्रकाशी आहे. ते संपूर्ण सृष्टीत व्याप्त आहे व सर्व सृष्टी त्याच्यात व्याप्त आहे. सृष्टीचा आधार चैतन्य आहे. सृष्टी या चैतन्याची अभिव्यक्ति आहे. सृष्टी अ-नित्य आहे पण चैतन्य नित्य, शाश्वत आहे. हेच मूलतत्त्व आहे. सृष्टी याच सृजनाचा परिणाम आहे. ह्या चैतन्याचा बोध होणे हीच मुक्ती आहे. या मुक्तिकरितां अष्टवक्र सांगतात, "या संसारातल्या विषयांबद्दलची आसक्ति विषाप्रमाणे सोडून द्या, स्वतःला शुद्ध चैतन्यरूपी आत्मा मानून त्यात वृत्ती स्थिर करा. वैराग्य, ज्ञान व मुक्तिचे रहस्य हेच आहे. संपूर्ण अध्यात्माचे रहस्य या तीन वाक्यात प्रकट केले आहे. ही गुरूची महानता व शिष्याची पात्रता जबाबदार आहे की ज्यामुळे राजा जनकाने तत्काळ ज्ञान ग्रहण केले. कोणताही युक्तिवाद केला नाही, कुशंका व्यक्त केली नाही, अविश्वास केला नाही व आपली बुद्धी व शास्त्रीय ज्ञानाचा अडथळा निर्माण होऊ दिला नाही. पूर्ण श्रद्धेने गुरूचा उपदेश अमृताप्रमाणे प्राशन केला. ह्या तीन वाक्यानंतर अष्टवक्र मन, अहंकार, शरीर, चैतन्य, आत्मा यांचे थोडेसे वर्णन (राजा जनकाला नीट आकलन व्हावे या हेतूने) सांगतात. एवढ्या कमी श्रमात राजाला आत्मबोधाची प्राप्ती झाली व तो व्यक्तही करू शकला. राजाला बोध-प्राप्ती झाली याची अष्टवक्राला खात्री पटली होती. परंतु तो बोध अजून बळकट करण्यासाठी जनकाची परीक्षा घेण्यासाठी अष्टवक्र मुनी राजाला अनेक प्रश्न विचारतात. राजा या परीक्षेत पूर्णतया यशस्वी होतो. केवढे अद्‌भुत होते हे गुरू-शिष्य !

एखाद्या छोट्या गोष्टीमुळे एखादे महान कार्य अडून रहाते पण ती छोटी व अनिष्ट बाब एखादा सद्‌गुरूच दूर करू शकतो. हा अज्ञानाचा पडदा आत्म्यावर नसून आपल्याच डोळ्यावर आहे. आत्मा तर निर्वस्त्र, प्रत्यक्ष व डोळ्यासमोर आहे. फक्त आपल्या नजरेत त्याला बघण्याची क्षमता हवी. सद्‌गुरू दृष्टी किंवा बोध देऊन हा पडदा दूर करतो. शिष्याला आत्म-ज्ञान प्राप्ती व्हावी यासाठी सद्‌गुरूची उपस्थिती पुरेशी आहे कारण त्यामुळेच बोध प्राप्ती होते. मीरा, कबीर, रमण, संत ज्ञानेश्वर, विवेकानन्द, भर्तृहारी अशी अनेकांची उदाहरणे आहेत की ज्यांना गुरुमुळेच आत्ममानाचा लाभ झाला. आध्यात्मिक क्षेत्रात दृष्टी लाभ होण्यासाठी गुरूचे स्थान सर्वश्रेष्ट आहे. गुरू म्हणजे जणू ईश्वराचे प्रतिरूप आहे, गुरूचे महत्त्व ईश्वरापेक्षा कमी नाही. ईश्वरसुद्धा गुरूच्या माध्यमातून साहाय्यता करतो. ज्ञानार्थीला गुरूच रस्ता दाखवतो परंतु त्यात बोध प्राप्ती मात्र स्वतःची पात्रता असल्याशिवाय होत नाही. दोन्ही जिथे एकत्र येतात तिथे लोखंड व परिस एकत्र येऊन लोखंडाचे सोने होते. पात्रता निर्माण होण्यासाठी शिष्याजवळ मुमुक्षु, प्रखर बुद्धि, श्रद्धा, समर्पणशीलता, नम्रता व पूर्व-जन्मी संपादित केलेले ज्ञान आवश्यक असते. योगवशिष्ठ ग्रंथात म्हटले आहे की, "शिष्याची विशुद्ध प्रज्ञा हेच साक्षात्काराचे कारण आहे." महर्षि विश्वामित्राने सांगितले आहे की, "गुरूच्या वचनांमुळे जे तत्त्व-ज्ञान होते त्याचे कारण शिष्याची बुद्धिमत्ता हेच आहे." अनेक जन्मात केलेल्या सद्‌कृत्यांमुळे अशी प्रज्ञा प्राप्त होते. जीवन केवळ एक जन्म नाही तर अनेक जन्मांच्या साखळीतील एक कडी आहे. वर्तमान काळातले आजचे जीवन पूर्वजन्माच्या पायावर उभे आहे व पुढील भविष्य घडविणारे आहे. या जीवनात केलेले प्रत्येक कृत्य पुढच्या जीवनावर आपला ठसा निर्माण करणारे आहे. ज्ञानप्राप्तीची जिज्ञासासुद्धा पूर्वीच्या जन्माच्या संस्काराशिवाय होत नाही. जेंव्हा संस्कार तीव्र होतात तेंव्हा ती व्यक्ति सद्‌गुरूच्या कृपेच्या प्रसादाने लाभान्वित होते. जसे जनकाचे बाबतीत घडले तसे सर्वांचे बाबतीत घडू शकते. पण त्यासाठी पात्रता संपादित करण्याची पूर्वशर्त पाळली पाहिजे.
[वे.शा.स. कृ. म. बापटशास्त्री]

GO TOP