|
अष्टावक्रगीताप्रकरण १६ज्ञानाचे विस्मरण ही मुक्तिच आहे.
आचक्ष्व शृणु वा तात नानाशास्त्राण्यनेकशः । अनुवाद : - हे तात ! अनेक शाखांचे अनेक प्रकारे तू श्रवण अथवा कथन कर परंतु त्या सर्वांच्या विस्मरणाशिवाय तुला शांती मिळणार नाही. विवेचन : - अष्टवक्र महाराज, राजा जनकाला उपदेश देतांना म्हणतात की, अनेक प्रकारचे शास्त्र आहे व प्रत्येक शास्त्राचे मत वेगळे आहे. ही शास्त्रे केवळ मार्गदर्शन करू शकतात. ही शास्त्रे म्हणजे केवळ नकाशांप्रमाणे आहेत कि ज्यामुळे तुम्ही पोहचण्याचा रस्ता निश्चित करू शकता, अन्यथा त्यांचा काही उपयोग नाही. ज्ञान शास्त्रांत नाही, ते तर आपल्याच आंत आहे. आपण ते फक्त जाणून घ्यावयाचे आहे. ते तर स्वतःजवळ उपलब्ध आहे पण आपणच त्याचेकडे पहात नाही. मनाच्या आरशावर धूळ बसल्यामुळे आत्म्याचे प्रतिबिंब त्यात नीट दिसत नाही. ती अज्ञानाची धूळ पुसली म्हणजे ते दिसू लागते. आपले मन वासना व विचारांनी एवढे भरून गेले आहे की आत्म्याच्या प्रतिबिंबाला जागाच उरलेली नाही. म्हणून सर्वप्रथम अंतःकरण निर्मल करून वासनांचा निचरा करून चित्त तरंगशून्य करावयाचे असते. विचारांमुळे तरंग निर्माण होतात. अनेक शास्त्रांच्या अध्ययनाने, ती ऐकल्याने व ऐकविल्याने विचाराच्या लाटा अजूनच वाढतात. त्यातून तर्क, वितर्क, निर्माण होतात. भ्रम निर्माण होतात, पांडित्य निर्माण होते व पांडित्यामुळे अहंकार निर्माण होतो. मन ह्या गोष्टींनी भरून गेल्यावर आत्मज्ञानास मोठाच अडथळा निर्माण होतो. संग्रह व परिग्रह मग तो धनसंपत्तीचा असो, यशाचा असो किंवा मानसन्मानाचा असो किंवा विचारांचा असो, ज्याने संग्रह केला त्याला आत्मज्ञान कधीच मिळत नाही. बाह्य पदार्थांचा त्याग करता येतो पण शास्त्रांच्या अभ्यासाने जे ज्ञान व तर्क प्राप्त झाले आहेत त्यांचेसुद्धा विस्मरण व्हायला हवे, तरच मानसिक स्वास्थ व शांती प्राप्त होईल. संसार बंधन नाही पण त्याचेबद्दलची आसक्ति, वासना व स्मृती (स्मृती) मात्र बंधन आहे. स्मृतीतून मुक्त होऊन चैतन्यरूप आत्म्याशी एकरूप होणे हीच मुक्ति आहे. त्यामुळेच शांती व स्वास्थ्य प्राप्त होते. सत्य काही शाळा कॉलेजच्या पुस्तकांतून मिळत नाही. सत्याची काही विद्यापीठातून डिग्री/पदवी दिली जात नाही. बाह्य अनावश्यक बाबींचे विस्मरण केल्याने आत्म्याचे स्मरण सुलभ होते. चित्ताची निर्विकार अवस्था निर्माण झाल्यावरच त्यात ज्ञान प्रकट होते, त्यासाठी मौन उपकारक ठरते. शास्त्रांची बडबड नव्हे.
भोगं कर्म समाधिं वा कुल विज्ञ तथापि ते । अनुवाद : - हे विज्ञ ! ( हे ज्ञानस्वरूप !) भोग, कर्म वा समाधि यापैकी कशाचाही अवलंब केलास तरी तुझे चित्त सर्व आशय विरहीत झाल्यावर सुद्धा स्वभावतःच लोभाकडे आकर्षित होऊ शकते. विवेचन : - चित्त स्वभावतःच चंचल आहे. ते सदैव विषयांकडे आकर्षित होते. कितीही भोग भोगले तरी चित्त तृप्त होत नाही. वेगवेगळ्या प्रकारची कर्मे करून सुद्धा ते शांत होत नाही. अजून व अजून, अधिक व अजून अधिक, जास्तीत जास्त प्राप्तीची त्याची इच्छा नेहमी कायम रहाते. एवढेच काय समाधित सुद्धा त्याची चंचलता शांत होत नाही. थोडा वेळ तिचे नियंत्रण होते परंतु बीजरूपाने शिल्लक राहिलेली चंचलता नष्ट होत नाही. म्हणून समाधीमधे सर्व लौकिक जगाबद्दल उदासीन झाल्यावर सुद्धा वेळ येताच ते पुन्हा विषयांकडे वळते. म्हणून हे राजा तू विज्ञ म्हणजे ज्ञानस्वरूप - जाणता असल्याने चित्ताची ही चंचलता जाणून तिच्यापासून दूर रहा.
आयासात्सकलो दुःखी नैनं जानाति कश्चन । अनुवाद : - प्रयत्नांमुळेच सर्व लोक दुःखी आहेत, हे कोणीच जाणत नाही. ह्या उपदेशामुळे भाग्यवान लोक मुक्ति प्राप्त करून घेतात. विवेचन : - प्रयत्न केल्यामुळे या लौकिक व ऐहिक जगाचीच प्राप्ती होते. धन, यश, पद, प्रतिष्ठा, ज्ञान, विद्वता, ऐश्वर्य, समृद्धी हे सर्व प्रयासांनी प्राप्त होते. विनाप्रयास या जगात काहीच मिळत नाही. वैज्ञानिक शोध, शेती, प्रवास, व्यापार, ह्या क्षेत्रातील आपल्या देशातील जी प्रगती आज आपण पहातो आहे ती सर्व गेल्या कित्येक पिढ्यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ आहे. जर मनुष्याने प्रयत्न केले नसते तर हे जग आज जेवढे सुंदर व उपयोगी झाले आहे तेवढे कधीच होऊ शकले नसते. निसर्गाचे शोषण करून मिळालेले फायदे व तंत्रज्ञानाचा मानवी प्रयत्नांमुळे झालेला विकास यामुळे मनुष्यावर या प्रयत्न करण्याच्या प्रवृत्तीचा एवढा परिणाम झाला आहे की तो परमेश्वराला सुद्धा प्रयत्नांनी मिळवू इच्छितो. ज्याप्रमाणे अणु, परमाणूचा शोध लावला त्याचप्रमाणे तो परमेश्वराचा शोधसुद्धा पदार्थात करू पहातोय. जप, तप, ध्यान, धारणा, भजन-पूजन, किर्तन, आदि प्रयत्नांनी तो ईश्वराला प्राप्त करू इच्छितो. परंतु परमात्मा अशा प्रयत्नांनी मिळत नाही व शोधल्याने सुद्धा मिळत नाही. कारण तो मुळी हरवलेलाच नाही. तो तर आपल्याच आत आहे. आपण फक्त शुद्ध व निर्मळ अंतःकरणाने त्याचे दर्शन करण्याची आवश्यकता आहे. ज्याला आपण विसरलो आहोत, त्याचे मनःपूर्वक स्मरण करावयाचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणे हा रस्ता नसून अ-प्रयास हाच रस्ता आहे. चित्ताची शांत अवस्था व जागृत अवस्था हाच परमात्मा प्राप्तीचा उपाय आहे. प्रयत्नामुळे तणाव निर्माण होतो, विचार निर्माण होतात, तर्क वितर्क निर्माण होतात. ह्या प्रयासांमुळेच सुख-दुःख निर्माण होतात, त्यामुळे मनात पर्याय निर्माण होतात व त्यांत आत्म्याचे दर्शन होणे अशक्य होते. परमात्मा प्राप्तीसाठी संघर्ष नव्हे तर समर्पणाची गरज असते. प्रयत्न करण्यात कर्तेपण आहे ज्यामुळे अहंकार वाढतो व तोच तर मुख्य अडथळा आहे. अहंकार आणि परमात्मा एकत्र येऊ शकत नाही. अडथळा असलेला हा मीपणाच प्रयत्नात अधिक पक्का होत जातो. अहंकार नाहीसा झाल्यावर परमेश्वराची प्राप्ती होते. अन्यथा प्रयत्न करणारा साधक रस्ता हरवून बसतो, तो या प्रयासात व सिद्धितच अडकतो, पण भक्त मात्र समर्पणाद्वारे परमेश्वराजवळ पोहोचतो. जगातील रूढ पद्धतीपेक्षा ही पद्धत वेगळी आहे. संकल्प, पर्याय, विचार, सिद्धान्त संप्रदाय या सर्वांपासून चित्त वेगळे व मुक्त करणे म्हणजेच त्यात तरंग निर्माण होणे बंद करणे होय. हाच रस्ता आहे. म्हणून अष्टवक्र महाराज म्हणतात की प्रयत्नांमुळे सर्व लोक दुःखी आहेत, अशांत आहेत, तणावग्रस्त आहेत, ह्यामुळेच त्यांच्या मनात अहंकार व तरंग निर्माण होतात व ते आत्मबोधाला बाधक ठरतात. हे कुणी जाणून घेत नाही. जर हे रहस्य जाणून घेतले तर तो चित्तशांती द्वारा आत्मज्ञानाकडे जाऊ शकतो. काही भाग्यवान लोकच ह्या उपदेशामुळे मुक्ति प्राप्त करून घेतात. समर्पण हे परमेश्वराचे दार आहे तर प्रयत्न व संघर्ष हे जगाचे द्वार आहे. हेच रहस्य आहे.
व्यापारे खिद्यते यस्तु निमेषोन्मेषयोरपि । अनुवाद : - डोळे उघडणे व बंद करणे या क्रियेने सुद्धा ज्याला दुःख होते, ते तर आळशी शिरोमणी माणसाचे सुख आहे. दुसऱ्या कुणाचे नाही. विवेचन : - स्वामी अष्टवक्र म्हणतात की सर्व लोक प्रयत्नांमुळे दुःखी आहेत. प्रयत्न हेच दुःखाचे कारण आहे. प्रयास करण्यात कर्तेपण असते त्यामुळे दुःख निर्माण होते. कर्तेपणाच्या भावनेने केलेल्या कर्मामागे फळाची आकांक्षा असते, अपेक्षा असतात व त्या पुऱ्या झाल्या नाही तर दुःख होते. 'मी करतो' या कर्तेपणाच्या भावनेमुळे, अहंकारामुळे तणाव निर्माण होतो. काम करण्यात आनंद वाटणार नाही. वेठबिगाराप्रमाणे ते काम मनुष्य जणू काही शिक्षा आहे ह्या भावनेने करेल, कारण नजर कामावर नसून फळावर आहे. असा माणूस काम करून साधणारे कौशल्य प्राप्त करू शकत नाही. गीतेने सांगितले आहे की 'योग हे कर्मातील कौशल्य आहे'. या उलट फळाची चिंता न करता स्वाभाविक वृत्तीने कर्म करणारा, कर्म आनंदपूर्वक पार पाडणारा, कर्म ही ईश्वराची आज्ञा समजून करणारा मात्र नेहमी सुखी, तणावमुक्त व आनंदी रहातो. ज्ञान प्राप्तीसाठी सुद्धा कर्म त्याज्य नाही पण प्रयास त्याज्य आहेत. अहंकार त्याज्य आहे. याप्रमाणे जे कर्म प्रयासरहित आहे जे कर्म करण्यासाठी कोणतेही प्रयास करावे लागत नाहीत, त्यात कर्तेपण नसल्याने त्याचे ओझे वा कष्ट वाटत नाही. जबरदस्तीने अशी कामे बंद पाडायला सुद्धा प्रयास करावे लागतील म्हणून त्यांना थांबवणे हा सुद्धा अडथळा होऊन बसेल. उदाहरणार्थ, श्वास घेणे व सोडणे, रक्ताचे शरीरातील अभिसरण, डोळे उघडणे - बंद करणे, हे सर्व स्वाभाविकपणे होत असते. म्हणून याप्रमाणे कार्य करणाऱ्या व्यक्ति कधी दुःखी होत नाही. स्वामी अष्टवक्र म्हणतात की ह्या स्वाभाविक कर्मांचे सुद्धा ज्याला ओझे होते व जो डोळ्यांची उघडझाप करणे सुद्धा बंद करतो ते तर आळशी शिरोमणीचे सुख आहे. ते ज्ञानी माणसाचे सुख नाही. याचा अर्थ एवढाच की ज्ञानी माणूस प्रयासरहित अशी कर्मे प्रयास रहित होऊन, स्वाभाविक वृत्तीने करतो. अपेक्षा व अहंकार रहित कर्मे केल्याने प्रयास होत नाही. आणि कर्म बंधनसुद्धा तयार होत नाही. यामुळे ज्यांना हे ज्ञान प्राप्त झाले ते तर परम्-भाग्यशालीच होय. अशी माणसे सर्व कर्मे ही परमात्म्याची कामे मानून, सर्व वासनांचा त्याग करून त्यामुळे सर्व ताण-तणाव व चिंता यापासून मुक्त राहून कर्मात आनंदाने रमतात. याउलट जे दुर्भागी लोक परमेश्वर नाहीच या जगात, मीच आहे असे म्हणतात ते मात्र कार्याच्या ओझ्याने दबून जातात, चांगल्या वाईट फळाच्या चिंतेने ताण-तणावात सापडतात, जीवनातला व कामातला त्यांचा आनंदही नाहीसा होतो. सदैव चिंताग्रस्त राहतात व मृत्यूनंतर सुद्धा कर्मांचा भार वाहत राहतात. यास्तव परमेश्वराचे अस्तित्व मान्य करून जगणेच परम-भाग्याची गोष्ट आहे.
इदं कृतभिदं नेति द्वैन्द्वैर्मुक्तं यदा मन: । अनुवाद : - हे कार्य केले व हे कार्य केले नाही ह्या द्वंद्वातून जेंव्हा मन मुक्त होते तेंव्हाच ते धर्म, अर्थ, काम व मोक्षाबद्दल सुद्धा उदासीन होते. विवेचन : - जी कर्मे आपण पूर्ण करतो त्यांचे फळ कोणते मिळणार, किती मिळणार या विचारांनी मन नेहमी विचलित रहाते. चांगल्या-वाईट कृत्यांचे फळसुद्धा चांगले किंवा वाईट असते. व त्यानुसार सुखाचा किंवा दुःखाचा अनुभव येतो. शिवाय मनुष्य सतत अधिक चांगल्या फळासाठी, अधिक सुखासाठी व दुःखाच्या निवृत्तीसाठी सतत प्रयत्न करत असतो, त्यामुळे मन कधीच शांत होत नाही. जी कामे आपण करतो, त्यांचा परिणामसुद्धा मनावर रहातो व त्यालाच संस्कार म्हणतात. हे संस्कार अनेक जन्म आपल्या सोबत राहतात. त्यांना भोगल्याशिवाय मुक्ति नसते. परंतु जे काम आपण करू शकलेलो नाही, केवळ त्यांच्याबद्दल विचार केला आहे, त्यांचेमुळे सुद्धा मन वारंवार विचलित, आंदोलित होत रहाते त्यामुळे सुद्धा मन अशांत होते. भोग भोगणारे तर दुःखी होतातच पण ज्यांना काही भोगायला मिळाले नाही, त्यांची मानसिक अवस्था फार त्रासदायक असते. जगात सर्वात जास्त वेड्यांची व मूर्खांची संख्या ह्याच प्रकारातल्या लोकांची आहे. स्वामी अष्टवक्र महाराज म्हणतात की जी कृत्ये केली व जी केली नाहीत त्यांच्या द्वंद्वातून मुक्त झाल्यावरच मन धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांच्या प्राप्तीबद्दल सुद्धा उदास होते.जरी धर्माची व मोक्षाची जरी इच्छा असेल तरी ती एक प्रकारची वासना आहे. म्हणून मोक्षाची इच्छा सुद्धा मन अशांत करते म्हणून सर्व प्रकारच्या कृत्यातून मन निवृत्त करणे हीच मुक्ति आहे. कार्ये करावी लागतात पण त्यात फळाची आकांक्षा न ठेवणे म्हणजेच मन निवृत्त करणे होय.
विरक्तो विषयद्वेष्टा रागी विषयलोतलुप: । अनुवाद : - विषयांचा द्वेष करणारा माणूस विरक्त आहे. विषयलोलुप व्यक्ति आसक्त (रागी) आहे. जो स्वीकार आणि त्याग या दोन्हीतून मुक्त आहे, तो विरक्त नाही व आसक्त (रागी) नाही. विवेचन : - जो विषयांच्या उपभोगात रमला आहे तो आसक्त (रागी) आहे. तो सदैव भोगांच्या आकांक्षेत अडकलेला असतो. त्याचे सर्व विचार अधिकाधिक भोग कसे प्राप्त करता येतील याबद्दलच असतात. दुसऱ्याचे सुख ओरबडून सुद्धा स्वतःचे भोग पूर्ण करण्यास त्याची तयारी असते. अशा विषयासक्त माणसाला वाईटातले वाईट व घृणास्पद कृत्य करायलासुद्धा लाज वाटत नाही. अशा दुर्वर्तनाचे भोग भोग्गून सुद्धा त्याची विषयलोलुपता कमी होत नाही तर ती अधिकच वाढत जाते. चोरी करून कमावलेल्या पैश्यातून लाच देण्याने त्याची लोलुपता अधिकच वाटते व त्यामुळे अधिक पैसा कमावण्याची इच्छा निर्माण होते. याचप्रमाणे जो विषयांचा द्वेष करतो तो विरक्त असतो. अशा स्वरूपातला विरक्त सुद्धा मनाने शांत नसतो. विषयांचा धिक्कार करण्यातच त्याचे मन सदैव व्यग्र असते. जग, परिवार, धन-दौलत, पत्नी, मुले, काम, क्रोध या सर्वांचा निषेध करण्यात व त्यांच्याबद्दल वाईट बोलण्यातच त्याला आनंद वाटतो. त्यामुळे भोगणाऱ्याप्रमाणेच, भोगांचा द्वेष करणारा म्हणजे न भोगणारासुद्धा अशांत राहतो. दोघांचीही मने समान प्रमाणात क्षुब्ध राहतात. पण मोक्षावस्थेत तर मन पूर्णपणे शांत होते. द्वंद्वविरहीत होते, विचार व शंका-पर्याय यापासून मुक्त होते. म्हणून अष्टवक्र म्हणतात की जो राग व विराग, स्वीकार व त्याग संसार व संन्यास, भोग व त्याग, आसक्ति व विरक्ती ह्या प्रकारच्या सर्व द्वंद्वातून मुक्त आहे तोच वितरागी आहे, तोच खरा अनासक्त आहे, तोच निर्द्वंद आहे. त्यालाच मानसिक शांती प्राप्त होते व तीच मोक्ष अवस्था आहे. मोक्ष ही काही मुक्कामाला पोहचण्याची एखादी जागा नाही; ती तर चित्ताची अशी शांत अवस्था आहे की जी प्राप्त केल्यास स्वीकार व त्याग दोन्ही ही वितरागी वृत्तीमुळे निरर्थक होतात.
हेयोपादेयता तावत्ससारविटपाङ्कुर: । अनुवाद : - जोपर्यंत तृष्णा ( स्पृहा) जीवित आहे तोपर्यंत अविवेकाची स्थिती कायम आहे व तोपर्यंत त्याग व स्वीकार सुद्धा जीवंत आहे. हे स्वीकार व त्यागच संसाररूपी वृक्षाचे बीज व अंकुर आहे. विवेचन : - जोपर्यंत मनात त्याग किंवा स्वीकार, चांगले किंवा वाई शुभ व अशुभ, ह्या प्रकारच्या भावना शिल्लक आहेत तोपर्यंत इच्छा (वासनारूपी स्पृहा) जीवंत आहे. या वासनारूपी तृष्णेमुळेच त्याग व स्वीकार करण्याचे विचार मनात निर्माण होतात. केवळ स्वीकाराची वा प्राप्तीची इच्छा हीच तृष्णा नसून त्याग करण्याची भावनासुद्धा तृष्णेमुळेच निर्माण होते. तृष्णा नसेल तर त्याग करण्याचीसुद्धां भावना उत्पन्न होत नाही. ही वेगळ्या प्रकारची पण आसक्तीच आहे, वेगळ्या प्रकारचा मोह आहे. जेंव्हा एखाद्या बाबीची आम्ही निंदा करतो तेंव्हा त्यांतसुद्धा आमचा छुपा स्वार्थ असतो. त्याबद्दलची वासना असते, काहीतरी मिळैण्याची इच्छा अपुरी राहील्याने त्याची आपण निंदा करतो. ही तृष्णा म्हणजे विवेक नसल्याचे लक्षण आहे. उच्च दर्जाच्या भोगासाठी म्हणजे मोक्ष, स्वर्ण, मुक्ति यासाठी जरी त्याग केला तरी मोक्ष व मुक्ति ही तर मोठीच तृष्णा आहे. प्रापंचिक माणूस तर छोट्याशाच स्वार्थाची अपेक्षा करतो, थोड्याशाच तृष्णेची भोगाची लालसा मनी बाळगतो. उदाहरणार्थ घरदार, मुले, धन, सुख, नोकरी वगैरे. पण त्यागी (!) तर या क्षुद्र भोगांची, पोकळ सुखांची, चोरीने कमविलेल्या सुखाची इच्छा त्यागून स्वर्ग व मोक्षाची मोठी तृष्णा महा-उपभोगाची लालसा बाळगतो. दोन-चार रूपयाचे नारळ अर्पण करून स्वर्गाची मोबदला म्हणून अपेक्षा करतो. अष्टवक्र म्हणतात की ही सर्व अविवेकाची स्थिती आहे. कोणत्याही स्वरूपाची वासनारूपी तृष्णा जीवंत असेल तर या संसाररूपी वृक्षाचा अंकुर तिच्या रूपाने जीवंत आहेच. तो अंकुर वाढून पुन्हा वृक्ष तयार होईल. तृष्णा म्हणजेच संसार आहे, संसाराची आसक्ति आहे, तिचा त्याग करणे हीच मुक्ति आहे. सांसारिक पदार्थ व वस्तू सोडून दिल्याने मुक्ति मिळत नाही. कोणताही वेडा वेडेपणाच्या सटक्यात वस्त्राचा त्याग करून विवस्त्र होतो म्हणून काही त्याला मुक्ति मिळत नाही. परंतु तृष्णेचा त्याग केल्याशिवाय मुक्ति मिळणार नाही. तृष्णेमुळेच मनात लाटा निर्माण होतात. जोपर्यंत ह्या इच्छांच्या लाटा निर्माण होत आहेत तोपर्यंत शांती मिळणार नाही.
प्रवृती जायते रागो निवृतौ द्वेष एव हि । अनुवाद : - प्रवृत्ती मुळे राग (आसक्ति) आणि निवृत्ती (त्यागा) मुळे द्वेष निर्माण होतो. म्हणून बुद्धिमान पुरूष, द्वंद्वमुक्त असणाऱ्या बालकाप्रमाणे सरळ व स्वाभाविक जीवन जगतो.
विवेचन : - संसारातून मुक्ति मिळविण्यासाठी दोन प्रकारचे रस्ते सांगितले जातात. एक मार्ग आहे प्रवृत्तीचा व दुसरा मार्ग आहे निवृत्तीचा. प्रवृत्तीमार्गाचे समर्थक सांगतात की भोगांमुळेच मुक्ति मिळते. प्रारब्धातील कर्मसंचितामुळेच हे जीवन मिळाले आहे म्हणून हा कर्मभोग भोगल्याशिवाय मुक्ति नाही. आत्मज्ञानी माणसाला सुद्धा प्रारब्ध-कर्मे भोगल्याशिवाय सुटका नाही. जो हा कर्मभोग भोगण्याचे नाकारून, संसाराचा त्याग करून निघून जातो त्याच्या या त्यागातही त्याचा अहंकार असतो.
हातुमिच्छति संसार रागी दुःखजिहासया । अनुवाद : - आसक्त पुरुष दुःखापासून बचाव करण्यासाठी संसाराचा त्याग करू इच्छितो परंतु वीतरागी दुःखमुक्त होऊन संसारात राहूनसुद्धा खेद करत नाही. विवेचन : - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की दुःखापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जो पुरुष संसाराचा त्याग करतो तोसुद्धा आसक्तच आहे. जो असे म्हणतो की संसार म्हणजे दुःखच दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, जन्म दुःख आहे, जगणे दुःख आहे, मरणे दुःख आहे संसार ही दुःखाची खाण आहे म्हणून तिच्यापासून दूर पळा, तो माणूस सुद्धा आसक्त आहे. जो पुरुष असे म्हणतो की घरदार सोडा, पत्नी-मुले सोडा, धन-दौलत सोडा कारण हे सर्व दुःखाचे कारण आहेत, तो पुरुषसुद्धा आसक्त आहे. हे सर्व सोडल्याने दुःख संपत नाहीतच. संसाराचा त्याग केल्याने सुख प्राप्त होत नाही. दुःखांचे खरे कारण शरीर व मन आहे, वासना व तृष्णा आहे. वासना व तृष्णा शिल्लक आहे तोपर्यंत जंगलात राहूनसुद्धा शांती मिळणार नाही. तिथे अजून मन जास्त बेचैन होते. राग (प्रिती) जर सुख आहे तर विराग सुद्धा दुःख आहे. आसक्ति जर दुःखाचे कारण आहे तर विरक्तिसुद्धा दुःख आहे, संसार जर दुःख आहे तर संन्यास सुद्धा दुःख आहे, संग्रह जर दुःख आहे तर संग्रह-त्याग सुद्धा दुःख आहे. कारण आतमध्ये वासना शिल्लक आहे. संसाराची तृष्णा त्यागून मोक्षाची तृष्णा बाळगणे सुद्धा दुःख आहे. यास्तव वितरागता हेच दुःख निवारणांचे खरे स्वरूप आहे, वितरागतेमुळेच दुःखातून सुटका होते. राग ( प्रेम) उपाय नाही व विराग ( द्वेष) सुद्धा उपाय नाही, जो वासनेतून मुक्त झाला, तो वितरागी संसारात राहून सुद्धा दुःखी होत नाही आणि त्यागी (!) व विरागी म्हणवणारा हिमालयाच्या जंगलात राहूनसुद्धा दुःखीच रहातो. तेंव्हा सुख दुःख हे आपल्या मालकीच्या पदार्थात नसून आपल्याच मनःस्थितीत आहेत. विषयासक्त माणूस त्याची पूर्ती न झाल्याने दुःखी होतो व त्याग करतांनासुद्धा दुसऱ्या कशाची तरी अभिलाषा बाळगतो.
यस्थाभिमानो मोक्षेऽपि देहेऽपि ममता तथा । अनुवाद : - ज्याला मोक्षाबद्दल अहंकार आणि शरीराबद्दल ममता आहे, तो योगीही नाही व ज्ञानीही नाही. तो केवळ दुःखाचा अधिकारी आहे. विवेचन : - विधीपूर्वक क्रिया पार पाडत योगीपद प्राप्त होते. योगी प्रथम अष्टांग योगाची साधना करतो, यम, नियम, आसन, प्राणायाम व अन्य क्रियांद्वारे योगी वरचे पद प्राप्त करतो. हे वरचे पद एक योगस्थिती असते. विधीपूर्वक एक एक शिडी पार करत तो ह्या स्थितीपर्यंत पोहचत असल्याने खाली कोसळण्याची भिती नसते. खाली घसरला तरी एकच पायरी खाली येतो. जेथून सुरवात केली तेथपर्यंत खाली घसरत नाही. योगभ्रष्ट अवस्थेत सुद्धा पूर्णजन्माचे संस्कार तर कायमच असतात त्यामुळे तेथूनच पुन्हा प्रवास सुरू होतो. दुसरा आहे ज्ञानी पुरुष जो ह्या क्रिया वा विधी वगैरे काही न करता उच्च स्थितीला पोहचतो. केवळ 'बोध' झाल्याने त्याला ही उच्च स्थिती प्राप्त होते. तो अस्तित्वातून अन-अस्तित्वातील क्षेत्रात उडी मारतो. तो तर क्रिया व साधनेला सुद्धा बंधन मानतो. कारण सर्व क्रिया अहंकार वाढवतात. क्रिया व विधी करणाऱ्यांना क्रियांबद्दलच आसक्ति निर्माण होते, तो स्वतःला ज्ञानी, योगी मानू लागतो. याप्रमाणे अहंकार वाढू लागतो. याप्रमाणे संसाराचा त्याग करणारा, भगवे कपडे घालणारा सुद्धा स्वतःला साधू, संत व महात्मा समजू लागतो, त्यागी समजू लागतो. यामुळे सामान्य प्रापंचिक अहंकारापेक्षाही त्याचा अहंकार जास्त उंच होतो. त्याला त्याचाच मोह निर्माण होतो. म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की जर ज्ञानप्राप्ती झाल्यावर मोक्षप्राप्ती झाल्याचा अहंकार झाला की मी आता मुक्त झालो, कैवल्यधारी झालो, सिद्धशिलेवर आसनस्थ झालो, मी ब्रह्म झालो, आता माझ्यापेक्षा मोठा कुणी नाही किंवा शरीराप्रती ममता निर्माण झाली की लोकांनी आपल्या शरीराची पूजा करावी, बंड बाजे वाजवून मिरवणूक काढावी, मला तिर्थंकर, गुरू, ईश्वर मानावे तर अशी व्यक्ति योगी पण नाही व ज्ञानी पण नाही. तो फक्त दुःखच प्राप्त करतो.
हरो यद्युपदेष्टा ते हरि: कमलजोऽपि वा । अनुवाद : - जरी तुझा उपदेशक ( गुरू) शिव असला, विष्णू असला किंवा ब्रह्मा असला तरी त्या सर्वांना विसरल्याशिवाय तुला स्वास्थ (शांती) मिळणार नाही. विवेचन : - अष्टवक्र महाराज म्हणतात की मुक्तिचा अर्थ आहे विस्मरण. जे या जगात संस्काराद्वारे प्राप्त केले आहे ते सर्व विसरून जाणे हीच मुक्ति आहे. जोपर्यंत त्यांची थोडी जरी आठवण शिल्लक आहे, तोपर्यंत मोक्ष मिळत नाही. कारण संसार बंधन नसून त्याची आठवणच बंधन आहे. त्यापासूनच मुक्त व्हायचे आहे. हे जगच नव्हे तर ईश्वर, आत्मा, परमात्मा यांची आठवणसुद्धा एक अडथळा आहे. कारण मुक्तिमधे 'मी' मी रहातच नाही. मग आठवण कोण करणार ? स्मरण, आठवण याचा अर्थ आहे की 'दोन' गोष्टी अस्तित्वात आहे. एक आठवण करणारा व दुसरा तो, ज्याची आठवण स्मरण केले जाते तो. म्हणून दोन असतील तर मुक्ति होऊ शकत नाही. ज्या गुरूच्या कृपेने ज्ञान प्राप्त झाले आहे. त्याला सुद्धा स्मरणात ठेवता कामा नये अन्यथा गुरुसुद्धा बंधन होतो. गुरू अगदी शिव, ब्रह्मा किंवा विष्णू कां असेना त्याचे विस्मरण करणे जरूरीचे आहे. त्याच्याशिवाय शांती, मुक्ति मिळणार नाही. |