श्रीरामगीता

अयोध्या नगरीचा राजा दशरथ होता. राम हा त्याचा ज्येष्ठ पुत्र. रामाचे चरित्र वाल्मीकि ऋषींनी रामायणात गुंफले आहे. या वाल्मीकींच्या रामायणाखेरीज रामचरित्र वर्णन करणारी आणखी काही रामायणे संस्कृत भाषेत आहेत. त्यामध्ये अध्यात्मरामायण हे एक आहे. अध्यात्मरामाणाच्या मते राम हा सर्वोच्च ईश्वर आहे, तो सगुण व निर्गुण आहे आणि तोच अंतिम तत्त्व आहे. तसेच या जगातील रामाचा व्यवहार ही केवळ त्याची लीला आहे.

अध्यात्म रामायण हे भगवान शंकरांनी आपली प्रिय पत्नी पार्वती हिला कथन केले. ते ज्या सात भागांत विभागलेले आहे त्यांना कांड असे म्हणतात. त्यातील शेवटच्या उत्तरकांडात पाचवा सर्ग म्हणजे रामगीता आहे. लंकेत रामाने रावणाचा वध केल्यावर तो अयोध्येत परत आला. मग त्याला राज्याभिषेक झाला. एकदा रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण रामाजवळ येऊन त्याला प्रणाम करतो आणि प्रार्थना करतो, 'संसाररूपी सागर मी कसा तरून जाईन हे मला सांगा.' मग राम त्याला उपदेश करतो. हा रामाचा उपदेश उत्तरकांडाच्या पाचव्या सर्गात आहे. त्यात रामाने लक्ष्मणाला जो उपदेश केला तो म्हणजेच रामगीता. एकूण ६२ श्लोकांत रामाचा हा उपदेश संग्रहीत केलेला आहे.

रामगीतेचा सारांश

राम म्हणतो, या जगात प्राण्यांचा संसार म्हणजे जन्ममरणाचे चक्र आहे. त्या चक्राचे कारण कर्म आहे; तथापि संसाराचे मूळ कारण आत्म्याचे अज्ञान हे आहे. हे अज्ञान कर्म करून नष्ट करता येत नाही. अज्ञान हे आत्मज्ञानाने नष्ट होते. ते प्राप्त करून घेण्याची इच्छा असणाऱ्या माणसाजवळ काही प्राथमिक गोष्टी असणे आवश्यक आहे. त्या मिळवून मग त्याने आत्मज्ञानी गुरुजवळ जाऊन त्याचा उपदेश घ्यावयास हवा. उपनिषदातील 'तत्त्वमसि' वाक्याचा गुरू जो अर्थ सांगतो त्यावरून जीव आणि आत्मा यांचे ऐक्य कळते. हे ऐक्यज्ञान अज्ञानाचा नाश करते. खरे म्हणजे हा संसार आत्म्यावर परमात्म्यावर आरोपित/अध्यस्त आहे; म्हणू तो मिथ्या आहे. परमोच्च परमात्मा हा तीन देह, तीन अवस्था आणि पाच कोश यांपेक्षा वेगळा आहे. ॐकराची उपासना केल्यावर जी निर्विकल्प समाधी प्राप्त होते, तिच्यामध्ये य परमात्म्याचा साक्षात्कार होतो. असा साक्षार्कार झाल्यावर साधक विद्यमान जीवनांतच संसारबंधनातून सुटून मुक्त होतो, म्हणजे तो जीवन्मुक्त होतो. या अवस्थेत प्रारब्ध भोगीत तो जीवन कंठतो आणि देहपातानंतर तो परमात्म्याशी म्हणजेच रामाशी एकरूप होतो. जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य साधण्यास रामाची भक्ति ही सुद्धा उपयोगी पडते.

रामाच्या उपदेशाचे आधार

रामाने जो उपदेश केला त्या संदर्भात राम स्वतःच सांगतो - १) मी जे कतन केले ते विशेष ज्ञान हे श्रुतीचे/वेदांचे सार आहे (श्लोक ६२) २) माझा गुह्य उपदेश म्हणजे श्रुतिवचनांचे सार आहे (श्लोक ५९) ३) श्रुति ही आत्मज्ञानाचे प्रमाण आहे (श्लोक १९, ५७) असे म्हणून राम 'नेति' या श्रुतिवाक्याचा प्रमाण म्हणून निर्देश करतो(श्लोक १७). या सर्वांचा अर्थ असा की रामगीता ही श्रुतीवर आधारलेली आहे.

श्रुति म्हणजे वेद. प्रस्तुत स्थळी वेद शब्दाने वेदाचा अंत्य भाग असणारी उपनिषदे अभिप्रेत आहेत, कारण तिच प्रामुख्याने ब्रह्म/आत्मा परमात्मा या अंतिम तत्त्वाचे निरूपण करतात. या उपनिषदांचा रामगीतावर प्रभाव पुढीलप्रमाणे दिसून येतो. १) जन्म आणि पुनर्जन्म यांचे चक्र हे कर्मामुळे आहे. २) आत्मा/ब्रह्म यांचे वर्णन आणि साक्षात्कार यांचा निर्देश आहे ३) कठ आणि श्वेताश्वतर ही उपनिषदे भक्तीचा उल्लेख करतात. ४) उपनिषदांतील 'नेति' (श्लोक १७), 'तत्त्वमसि' (श्लोक २४) आणि 'तावत्' (श्लोक २१) या वाक्यांचा उल्लेख रामगीता करते. तसेच तैत्तिरीय श्रुतीतील एका वाक्याचा निर्देश आहे. ५) रामगीतेवर शंकराचार्यप्रपति केवलाद्वैत वेदांताचा संपूर्ण प्रभाव आहे. साहजिकच उपनिषदातील ज्या भागांचा उपभोग केवलाद्वैत वेदांत करतो, तोही भाग रामगीतेत वापरला आहे.

रामगीतेवरील केवलाद्वैत वेदांताचा प्रभाव

रामगीतेत जे सांगितले आहे त्यावरून शंकराचार्यांच्या केवलाद्वैत मताचा प्रभाव रामगीतेवर आहे हे दिसून येते. हा प्रभाव कसा आहे हे सांगितले आहे. तसे करताना रामगीतेतील विषय प्रथम दिला आहे. त्यानंतर लगेच कंसात केवलाद्वैत वेदांतावरील ग्रंथाचा निर्देश वा समांतर आवरणे दिली आहेत.

१) कर्मांनी अज्ञानाचा/अविद्येचा नाश होत नाही (श्लोक ९-१०) (पहा - शंकराचार्यकृत आत्मबोध, ३) २) ज्ञान-कर्म-समुच्चयाने मोक्षाची प्राप्ति होत नाही (श्लोक १३) केवलाद्वैत वेदांताला ज्ञान-कर्म-समुच्चय मुळीच मान्य नाही. ३) केवल ज्ञान हेच अज्ञानाचा/अविद्येचा नाश करते (श्लोक १५ पहा - आत्मबोध, ३). ४) अंतिम तत्त्व जे परमात्मा/ब्रह्म आहे त्यावर जगाचा अध्यास होतो (श्लोक ३६); म्हणून जग हे मिथ्या आहे. त्यासाठी रजु सर्प दृष्टांत दिला आहे (श्लोक ३७). केवलाद्वैत वेदांतात नेहमीच रखुसर्प दृष्टांत दिला जातो. ५) 'पंचीकृत' आणि 'अपंचीकृत' हे शब्द (श्लोक २८-२९) हे केवलाद्वैत वेदांतातील पंचीकरण प्रक्रिया दाखवितात. ६) जीव हा परमात्म्याशी एकरूप आहे (श्लोक ४७) (पहा - ब्रह्मज्ञानावलीमाला, २०) ७) उपनिषदांनी वापरलेल्या 'तत्त्वमसि' वाक्याचा अर्थ करताना भागलक्षण स्वीकारावी लागते (श्लोक २४-२७). (पहा - तत्त्वमस्यादि वाक्येषु लक्षणा भागलक्षणा ॥ शंकराचार्यकृत वाक्यवृत्ति, ४८) ८) आत्म्याला स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन देहांची उपाधि येते (श्लोक २८-३०) (पहा : आत्मबोध, १२-१४). ९) तीन देहांच्या उपाधीपेक्षा आत्मा वेगळा आहे (श्लोक ३०). (पहा : उपाधि त्रितयादन्यमात्मानमव धारयेत् । आत्मबोध १४) १०) उपाधींमुळे आत्मा हा कोशांप्रमाणे दिसू लागतो (श्लोक ३१) (पहा - आत्मबोध, १५) ११) आत्मा आणि देह इत्यादि अनात्मा, यांचा परस्परांवर अध्यास होतो (श्लोक ४१ - ब्रह्मसूत्रावरील शंकराचार्यचे अद्यासभाध्य पहा). १२) जीव म्हणजे बुद्धीमध्ये पडलेले चैतन्याचे प्रतिबिंब होय (श्लोक ४०). (पहा - शंकराचार्यकृत वाक्यसुधा, ३६)

वरील परिच्छेदांवरून हे स्पष्ट होते की रामगीता ही श्रुतीवर/वेदांवर आधारित असून, ती केवलाद्वैत वेदांताच्या प्रभावाखाली आहे. आता यापुढे रामगीतेची संस्कृत संहिता, भाषांतर आणि स्पष्टीकरण हे सर्व दिलेले आहेत.

श्री महादेव उवाच
ततो जगन्मगल मंगलात्मना
    विधाय रामायणकीर्ति मुत्तमाम् ।
चचार पूर्वाचरितं रघूत्तमो
    राजर्षिवर्येरभिसेवितं यथा ॥ १ ॥


श्री महादेव म्हणाले - हे पार्वती, जगाच्या मंगलासाठी/कल्याणासाठी धारण केलेल्या आपल्या मंगल देहाचे (मंगलात्मना) रामायण या स्वरूपात उत्तम कीर्ति स्थापन करून, श्रेष्ठ राजर्षींनी पूर्वी जसे आचरण केले होते तसे राम करू लागला (१)


श्री महादेव म्हणजे भगवान शंकर. त्यंनी संपूर्ण अध्यात्मरामायण पार्वतीला कथन केले. म्हणून येथे 'श्री महादेव म्हणाले' हे शब्द वापरले आहेत.

रामगीतेमध्ये राम हा सगुण तसेच निर्गुण असा परमोच्च ईश्वर आहे (श्लोक ६१ पहा). राम या अवतारात त्याने धारण केलेले शरीर मंगल, कल्याणकारी आहे. या शरीराद्वारे रामाने जी कृत्ये केली, त्यांनी जगताचे मंगल/कल्याण झाले.

'रामायण कीर्ति' या शब्दावरून 'रामायणात वर्णिलेली कीर्ति' असाही अर्थ होऊ शकतो. रघुत्तम म्हणजे राम. रघु या नावाचा रामाचा एक पूर्वज होता. रघु हा शब्द रघूचा वंश या अर्थानेही घेतला जातो. रघुवंशात राम हा सर्वोत्तम असल्याने तो रघूत्तम ठरतो.

राजर्षि म्हणजे ऋषीप्रमाण असणारा राजा. राजा आणि ऋषी यांतील साम्य हे तपाचरणाचे संदर्भात आहे. ऋषि तपश्चरण करतो. राजाने स्वतःची कर्तव्ये योग्य रीतीने पाळणे हे त्याचे तप आहे असे मानले गेले आहे.

येथे राजर्षि शब्दाने सामान्यपणे राजर्षि असा अर्थ होईल आणि विशेषपणाने रघुवंशातील राजर्षि असा अर्थ होईल.




रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण. तो अधूनमधून रामाकडे येऊन त्याला काही विचारीत असे. राम त्याला पूर्वीच्या काही कथा सांगत असे,

सौमित्रिणा पृष्ट उदारबुद्धिना
    रामः कथाः प्राह पुरातनीः शुभाः ।
राज्ञः प्रमत्तस्य नृगस्य शापतो
    द्विजस्यनिर्यक्त्वमथाह राघवः ॥ २ ॥


उदार मन असणाऱ्या लक्ष्मणाने कधी विचारले तर राम त्याला पूर्वीच्या काळातील शुभ कथा सांगत असे. उदा० प्रमाद/चूक केलेल्या नृग नावाच्या राजाला कोणा एका ब्राह्मणाच्या शापामुळे तिर्यक् योनि प्राप्त झाली अशा प्रकारची कथा एकदा रामाने (राघव) लक्ष्मणाला सांगितली. ( २)


सौमित्रि म्हणजे लक्ष्मण. सुमित्रा ही दशरथ राजाची एक पत्नी होती. तिचा पुत्र तो सौमित्रि म्हणजे लक्ष्मण.

नृग राजाची कथा संक्षेपाने अशी - नृग हा राजा ब्राह्मणांना गाईचे दान देत असे. एकदा गाईचे दान देताना त्याच्या हातून कळत न कळत प्रमाद घडला. तेव्हा 'तू तिर्यक योनीत जन्माला येशील', असा शाप एका ब्राह्मणाने त्याला दिला. परिणामत नृग राजाला तिर्यक् योनीत जन्म घ्यावा लागला. तिर्यक् योनि म्हणजे माणसापेक्षा खालच्या दर्जाची, कुत्रा, मांजर, इत्यादी. राघव म्हणजे सामान्यतः रघूच्या वंशातील पुरुष. तथापि रूढीने राघव म्हणजे राम असा अर्थ प्रचारात आला.

एकदा लक्ष्मणाला एक गोष्ट रामाला विचारावयाची होती. ती त्याने कोणत्या पद्धतीने विचारली ते पुढील श्लोकात सांगितले.




कदाचिदेकान्त उपस्थितं प्रभुं
    रामं रमालालित पादपङ्‍कजम् ।
सौमित्रिरासादितशुद्धभावनः
    प्रणम्य भक्त्या विनयान्वितोऽब्रवीत् ॥ ३ ॥


ज्याच्या पदकमलांची सेवा रमा लक्ष्मी करीत असे, असा तो प्रभु राम एकदा एकांत स्थानी उपस्थित होता. त्यावेळी ज्याचे मन शुद्ध झालेले होते असा लक्ष्मण रामाजवळ गेला आणि विनयाने युक्त अशा त्याने भक्तिपूर्वक रामाला प्रणाम करून म्हटले (३)


रमा हे लक्ष्मीचे एक नाव आहे. लक्ष्मी ही विष्णूची पत्नी. पुराणांच्या मते लक्ष्मी ही विष्णूच्या पदकमळाची सेवा करीत असते. अध्यात्मरामायणाचे मते, राम हा विष्णू आहे. येथे भावन म्हणजे मन असा अर्थ घेतला आहे. किंवा रामाविषयी ज्याची भावना, विचार शुद्ध होते, असाही अर्थ घेता येईल.

संसार सागरातून पार होण्यास आवश्यक ते ज्ञान रामाकडून प्राप्त करून घेण्यास (श्लोक ५ पहा) लक्ष्मण रामाकडे गुरू म्हणून आला आहे. गुरूची सेवा, गुरूला प्रश्न आणि गुरूला प्रणाम यांच्याद्वारे आवश्यक ते ज्ञान मिळवावयाचे असते असे भगवद्‌गीता सांगते (तद् विद्धिप्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । ४.३४). लक्ष्मणाने या तीनही गोष्टी केलेल्या आहेत. १४ वर्षांच्या वनवासात लक्ष्मणाने रामाची सेवा केली. आत्ता तो भक्तिपूर्वक त्याला प्रणाम करीत आहे. तसेच प्रश्न अध्याहृत असणारी अशी विनंती (श्लोक ५ पहा) तो रामाला करीत आहे. अशा प्रकारे राम या गुरूकडून ज्ञान प्राप्त करून घेण्याची पात्रता लक्ष्मणाजवळ आहे. राम हा परमोच्च परमेश्वर आहे हे लक्ष्मणाला माहित आहे. म्हणून सर्वश्रेष्ठ ईश्वर या दृष्टीने लक्ष्मण रामाची स्मृति पुढील श्लोकात करतो.




त्वं शुद्धबोधोऽसि हि सर्वदेहिनां-
    आत्मास्यधीशोऽसि निराकृतिः स्वयम् ।
प्रतीयसे ज्ञानदृशां महामते
    पादाब्जभृङ्‍गाहित सङ्‍गसङ्‌गिनाम् ॥ ४ ॥


हे महाबुद्धिमान रामा, तू शुद्ध ज्ञान (स्वरूप) आहेस. सर्व देहधारी प्राण्यांचा आत्मा तू आहेस. सर्वांवर सत्ता गाजवणारा असा प्रभु (अधीश) तू आहेस. तू स्वतः निराकार (निराकृति) आहेस. भृंगाप्रमाणे तुझ्या चरण कमलांना जे चिकटले आहेत अशांची संगति ज्यांना प्राप्त झाली आहे आणि ज्यांच्याजवळ ज्ञानदृष्टि आहे, अशांना तुझे ज्ञान आणि प्रतीति (=अनुभव) येते. (४).


रामगीतेमध्ये राम हा सगुण तसेच निर्गुण परमेश्वर आहे (श्लोक ६ पहा). सगुण ईश्वर या दृष्टीने तो सर्वांचा प्रभु/स्वामी आहे. सर्वांचा आत्मा या दृष्टीने तो निराकार आहे. निराकार हा शस्त्र उपलक्षणेने निर्गुण असा अर्थ दाखवितो.

भक्तिशास्त्रात 'ईश्वराच्या भक्तांचा संग' महत्त्वाचा मानला जातो. रामाच्या भक्तीने जीव व ईश्वर यांचे ऐक्य होते असे रामगीता श्लोक ५६ आणि ६१ यामध्ये सांगते. भक्तिपूर्वक नम्रतेने लक्ष्मण रामाजवळ का गेला हे तो असे सांगतो -




अहं प्रपन्नोऽस्मि पदाम्बुजं प्रभो
    भवापवर्गं तव योगिभावितम् ।
यथाञ्जसाज्ञानमपारवारिधिं
    सुखं तरिष्यामि तथानुशाधि माम् ॥ ५ ॥


हे प्रभो, जे तुझे चरण माणसांना संसारातून सोडवितात आणि ज्यांचे ध्यान भक्त, योगी करतात, अशा त्या तुझ्या पदकमळी मी नम्रपणे शरण आलो आहे. ज्याच्यामुळे मी अपार अज्ञानरूपी सागर सहजपणाने आणि सुखाने तरून जाईन, अशा प्रकारचा उपदेश तू मला कर (५).


"भवापवर्ग" शब्दातील अपवर्ग हा शब्द सोडविणारा, नाश करणारा, निरास करणारा या अर्थाने वापरलेला आहे. अपवर्ग शब्दाचा नेहमीचा अर्थ म्हणजे कर्मांतून सुटका अथवा मोक्ष असाही घेता येईल. तो असा - संसारातून (भव) सुटका (अपवर्ग), संसारातून सुटून मोक्षाची प्राप्ति.

भव म्हणजे संसार. संसार म्हणजे जन्ममरणाचे चक्र. 'पुनरपि जननं पुनरपि मरणं इह संसारे' या शब्दांवरून हा अर्थ स्पष्ट होतो. या संसारालाच आध्यात्मिक वाङ्‌मयात अनेकदा "सागर" असे म्हटले जाते.

रामाच्या भक्तीने मोक्ष मिळतो असे रामगीता म्हणते (श्लोक ६१). म्हणून "योगि - भावित" शब्दात योगी म्हणजे भक्तयोगी असा अर्थ घ्यावा लागतो. "अंजसाज्ञानम्" येथे संधि आहे असे मानून "अंजसाअज्ञानम्" असे घेऊन भाषांतराने अर्थ दिला आहे. "अंजसाज्ञानम्" असे घेतल्यास, "अपार संसाराप्रमाणे व्यापक ज्ञान" असा अर्थ होईल. पण त्यापेक्षा "अज्ञान" असे मानून घेतलेला अर्थ पुढील सहाव्या श्लोकाशी सुसंगत ठरतो.

लक्ष्मणाची प्रार्थना ऐकल्यावर रामाने त्याला योग्य ते ज्ञान सांगण्यास प्रारंभ केला, असे पुढील श्लोक सांगतो.




श्रुत्वाथ सौमित्रिवचोऽखिलं तदा
    प्राह प्रान्नार्तिहरः प्रसन्नधीः ।
विज्ञानमज्ञानतमःप्रशान्तये
    श्रुतिप्रपन्नं क्षितिपालभूषणः ॥ ६ ॥


त्यावेळी लक्ष्मणाचे संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर, शरणागताचे दुःख हरण करणारा राम मनात प्रसन्न झाला (प्रसन्न धीः). मग लक्ष्मणाच्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करण्यासाठी, राजांना अलंकारभूत असणाऱ्या रामाने लक्ष्मणाला श्रुतीने प्रसृत केलेले विशिष्ट ज्ञान सांगण्यास प्रारंभ केला. (६).


या श्लोकात 'धी' म्हणजे मन असा अर्थ घेतला आहे. रामगीतेत अनेकदा धी, बुद्धि आणि मन हे शद्ध समानार्थी म्हणून घेतलेले आढळतात. विज्ञान म्हणजे विशिष्ट ज्ञान. हे विज्ञान म्हणजे या जगातील भौतिक विज्ञान नाही. विज्ञान म्हणजे आत्मा/ब्रह्म या परम अंतिम तत्त्वाचे ज्ञान होय. लक्ष्मणाचे अज्ञान दूर करण्यास हेच विज्ञान समर्थ आहे.

येथे अज्ञान शब्दानेही व्यवहारातील अज्ञान अभिप्रेत नसून अंतिम तत्त्वाविषयीचे अज्ञान अपेक्षित आहे. अज्ञानाची तुलना नेहमी अंधकाराशी करून अज्ञानरूपी अंधार असे रूपक केले जाते.

रामाने सांगितलेले विज्ञान हे श्रुतीने प्रसृत केलेले होते असे येथे म्हटले आहे. श्रुति म्हणजे वेद. वेद हे ऋषींना श्रुत झाले असल्याने त्यांना श्रुति म्हणतात. या वेदांच्या अंत्यभागी उपनिषदे येतात. ही उपनिषदे येथे श्रुति शब्दाने अभिप्रेत आहेत. कारण मुख्यतः उपनिषदांमध्येच अंतिम तत्त्वाविषयीच्या ज्ञानाचे विवेचन केलेले आहे.

"श्रुतिप्रपन्न" हा शब्द लक्ष्मणाचे विशेषण म्हणूनही घेता येईल. "रामाकडून ज्ञान ऐकण्यासाठी (श्रुति) जो रामाला शरण गेला होता (प्रपन्न)" असा मग अर्थ होईल.

ज्या माणसाला विज्ञान हवे त्याने काय करावयास हवे आणि त्याच्याजवळ कोणत्या गोष्टी असावयास हव्यात, ते राम पुढील श्लोकात सांगतो.




आदौ स्ववर्णाश्रमवर्णिताः क्रियाः
    कृत्वा समासादितशुद्धमानसः ।
समाप्य तत्पूर्वमुपात्तसाधनः
    समाश्रयेत् सद्‍गुरुमात्मलब्धये ॥ ७ ॥


आपणाला वर्ण आणि आश्रम यांमध्ये जी करावयाची (कर्तव्य) कर्मे वेदशास्त्रांनी वर्णिलेली आहेत ती प्रथम (आदौ) करून, मग विज्ञानप्राप्ती इच्छिणाऱ्या मागासाने प्रथम चित्ताची शुद्धी प्राप्त करून घ्यावयाची आहे. नंतर त्याने ती कर्मे सोडून द्यावीत (समाप्य). (परंतु) तत्पूर्वी शम, दम इत्यादि आवश्यक साधने प्राप्त करून घेऊन, त्याने आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी सद्‌गुरुचा आश्रय घ्यावयास हवा. म्हणजे त्याने सद्‌गुरुला शरण जावयास हवे (७).


ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार वर्णाचे लोक समाजात असतात असे हिंदूंची धर्मशास्त्रे सांगतात. यातील पहिल्या तीन वर्णांसाठी ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे चार आश्रम (अवस्था) धर्मशास्त्रांनी कथन केले आहेत. त्या त्या वर्णातील लोकांनी त्या त्या आश्रमात कोणती कर्तव्ये म्हणून करावयाची हेही धर्मशास्त्रांनी सांगून ठेवले आहे.

आपापली कर्तव्ये निःस्वार्थ बुद्धीने केल्यास चित्त शुद्ध होते असे सांगितले गेले आहे. (आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी चित्ताची शुद्धि अत्यावश्यक मानली जाते (चित्तस्यशुद्‌धये कर्म । शंकराचार्यकृत विवेकचूडामणि- ११).

धर्मशास्त्रांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ मानवी जीवनाची ध्येये सांगितले आहेत. त्यातील मोक्ष मिळवू इच्छिणारा तो मुमुक्षू. त्याला आत्मज्ञानाने मोक्ष मिळतो. पण हे ज्ञान मिळविण्यापूर्वी त्याच्या जवळ काही विशिष्ट गोष्टी - ज्यांना साधन म्हणतात - हव्यात असे सांगितले आहे. ही साधने रामगीता सांगत नाही. परंतु ज्या केवलाद्वैत वेदांताचा प्रभाव रामगीतेवर आहें त्यात जी साधने सांगितली ती रामगीतेला अपेक्षित आहेत असे समजण्यास हरकत नाही. ही साधने चार आहेत, ती अशी: - १) नित्यानित्य-वस्तु-विवेकः - आत्मा/ब्रह्म ही वस्तु एकमेव नित्य आहे, बाकी सर्व (जे दिसते आणि भासते ते) अनित्य आहे, असे तो दोहोंतील फरकाचे निश्चित ज्ञान. २) इहापुत्रार्थ-फल-भोग-विरागः - या लोकातील अथवा परलोकातील पदार्थ भोगण्याच्या इच्छेचा अभाव म्हणजेच वैराग्य. ३) शमादि-षट्कः - शम, दम, तितिक्षा इत्यादि सप्तगोष्टी प्राप्त करून घेणे. ४) मुमुक्षुत्वः - मोक्ष प्राप्त करून घेण्याची इच्छा.

केवलाद्वैतवेदांतात संन्यास म्हणजे कर्माचा त्याग हा ज्ञानप्राप्तीपूर्वी आवश्यक मानला जातो. ती गोष्ट ये थे समाप्य' शब्द सांगतो. समाप्य म्हणजे कर्तव्य कर्माचा योग्य त्या शास्त्रीय पद्धतीने त्याग झाल्यावर.

आत्मज्ञान हे मुमुक्षूने आत्मज्ञानी गुरूकडून मिळवावयाचे आहे. श्रुति सांगते - आचार्यवान् पुरुषोवेद । (छान्दोग्य उपनिषद् ६.१४.२) ; तद्‌विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् । (मुण्डक उपनिषद् १.२.१३). म्हणून मुमुक्षूने आत्मज्ञानी/ब्रह्मज्ञानी गुरुकडे जाणे अत्यावश्यक आहे.

'आत्मलब्धये' म्हणजे 'आत्मज्ञान लब्धये' (आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी). येथे आत्मा म्हणजे 'अंतिम तत्त्व असणारा परमात्मा, परमोच्च ईश्वर, ब्रह्म असा अर्थ आहे. या आत्म्याला रामगीतेत ईश्वर (श्लोक ३७) अथवा परब्रह्म (श्लोक ३२, ३८, ५१) म्हटले आहे. रामगीतेच्या मते राम हाच आत्मा, परमात्मा, परमेश्वर, ब्रह्म, परब्रह्म आहे.

येथेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावयास हवी. गुरुकडे आत्म्याचे शाब्दिक ज्ञान मिळते. त्यानंतर शिष्याने योग्य तो प्रयत्न करून आत्मसाक्षात्कार करून घ्यावयास हवा. आत्मसाक्षात्कारानेच मोक्ष मिळतो.

भव म्हणजे संसार नष्ट करणारे ज्ञान. लक्ष्मणाने मागितले होते (श्लोक ५) ते ज्ञान सांगण्यापूर्वी संसाराचे स्वरूप, त्याचे कारण, इत्यादींचे विवेचन राम पुढील ८ आणि ९ या प्रलोकात करतो.




क्रिया शरीरोद्‌भव हेतुरादृता
    प्रियाप्रियौ तौ भवतः सुरागिणः ।
धर्मेतरौ तत्र पुनः शरीरकं
    पुनः क्रिया चक्रवदीर्यते भवः ॥ ८ ॥


पूर्वीच्या जन्मात केलेली क्रिया (=कर्म) हीच नवीन जन्मातील शरीराच्या उत्पत्तीचे कारण आहे, असे शहाणे लोक म्हणतात. विकारांमध्ये आसक्त असणाऱ्या माणसाच्या (सुरागिणः) प्रिय आणि अप्रिय अशा क्रिया घडतात; त्याच (क्रिया) पुण्य आणि पाप (धर्मेतरौ) बनतात. नंतर तेथे, त्या जन्मात, त्या क्रियांनी पुनः शरीर प्राप्ति होते. मग त्या नवीन शरीराने पुनः क्रिया घडतात. अशाप्रकारे कर्म -शरीर -कर्म -पुनर्जन्म, भव म्हणजे संसार एखाद्या चक्राप्रमाणे फिरत रहातो (८).


भव/संसार म्हणजे जन्म-कर्म-पुनर्जन्म-कर्म या पद्धतीने चालू रहाणारे जणू चक्र आहे. या जन्म-पुनर्जन्माचे कारण क्रिया/कर्म आहे. विषयांमध्ये आसक्ति आणि अहंकार असणारा माणूस बरी वाई ट, पाप पुण्यात्मक कर्में करतो. कर्मवादाच्या सिद्धांताप्रमाणे कर्माचे फळ हे भोगावेच लागते. काही कर्मे ही माणासाला त्याच्या विद्यमान चालू जीवनात कर्मफळे देतात. पण काही कर्मांची फळे चालू जन्मात मिळत नाहीत. म्हणून त्या कर्मांची फळे भोगण्यास माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. या नवीन जन्मात माणूस पुन्हा पुण्य-पापे करतो. त्यांचे फळ भोगण्यास त्याला पनर्जन्म घ्यावा लागतो. अशाप्रकारे कर्म हेच जन्म आणि पुनर्जन्म यांचे कारण आहे आणि मग कर्म-जन्म-कर्म-पुनर्जन्म असे हे कर्म आणि जन्म यांचे चक्र मोक्ष मिळेपर्यंत चालू राहते. कर्म-जन्माचे सातत्याने फिरणारे चक्र म्हणजेच भव/संसार आहे. शंकराचार्यांच्या मतेही 'पुनरपि जननं पुनरपि मरणं' हाच संसार आहे.

जन्म आणि पुनर्जन्म या चे कारण कर्म आहे. तथापि या संसाराचे मूळ कारण आत्म्याचे अज्ञान आहे आणि हे अज्ञान कसे दूर होते ते आता सांगितले आहे.




अज्ञानमेवास्य हि मूलकारणं
    तद्‌धानमेवात्र विधौ विधीयते ।
विद्यैव तन्नाश विधौ पटीयसी
    न कर्म तज्जं सविरोधमीरितम् ॥ ९ ॥


या संसाराचे मूल कारण खरोखर आत्म्याचे अज्ञान हेच आहे आणि त्या बाबतीत त्या अज्ञानाचा नाश हा संसारातून सुटण्याच्या संदर्भात (विधौ) सांगितला गेला आहे. त्या अज्ञानाचा नाश करण्याच्या बाबतीत ज्ञान (विद्या) हेच पूर्णपणे समर्थ (पटीयसी) आहे. कर्मानेच अज्ञानाचा नाश होत नाही याचे कारण असे आहे की त्या अज्ञानापासून उत्पन्न होणारे (तज्जं) कर्म हे त्या अज्ञानाला विरोधी नाही असे सांगितले आहे.


संसाराचे मूळ कारण आत्म्याचे अज्ञान आहे. हे अज्ञान आत्मा/ब्रह्म याची उपाधि बनते (श्लोक २८ पहा). या अज्ञानामुळे ब्रह्मावर जगाचा आरोप अथवा अध्यास होतो (श्लोक ३८ पहा) या अध्यस्त जगात माणसाचा संसार रहातो. अशाप्रकारे अज्ञान हेच संसाराचे मूलभूत कारण आहे.

या अज्ञानाच्या नाशामुळे संसारातून सुटका होते म्हणजे मोक्ष मिळतो असे शास्त्रे सांगतात आणि मोक्ष हा माणसाचा एक पुरुषार्थ आहे. मग प्रश्न असा -या अज्ञानाचा नाश कसा करावयाचा ? याचे उत्तर असे - कितीही कर्मे केली तरी अज्ञानाचा नाश होऊ शकत नाही. याचे कारण असे - कर्म हे अज्ञानापासून उत्पन्न होते आणि ते अज्ञानाला विरोधी नाही. दोन गोष्टी जर विरोधी असतील तर त्या परस्परांचा नाश/निरास करू शकतात. उदा. प्रकाश आणि अंधार हे परस्परविरोधी असल्याने, प्रकाशामुळे अंधाराचा नाश होतो. पण अशाप्रकारचा विरोध अज्ञान आणि कर्म यामध्ये नाही. म्हणून कर्माने अज्ञानाचा निरास होत नाही. याउलट ज्ञान हे मात्र अज्ञानाला विरोधी आहे म्हणून ज्ञानानेच अज्ञानाचा विनाश होतो (पहा - अविरोधि तया कर्म नाविद्यांविनिवर्तयेत् ।) विद्याविद्यां निहंत्येव तेजस्तिमिर-संधवत् ॥ आत्मबोध, ३). ज्ञानानेच अज्ञानाचा नाश होऊन मोक्ष मिळतो (ज्ञानादेव तु कैवल्यम् ।). आता, हे अज्ञान आत्म्याचे असल्यामुळे त्याचा नाश करणारे ज्ञान हे आत्मज्ञान आहे.

कर्माने काय होते हे पुढील श्लोक १० मध्ये सांगितले आहे.




नाज्ञानहानिर्न च रागसंक्षयो
    भवेत्ततः कर्म सदोषमुद्‌भवेत् ।
ततःपुनः ससृतिरप्यवारिता
    तस्माद्‌ बुधो ज्ञानविचारवा भवेत् ॥ १० ॥


कर्मामुळे अज्ञानाचा नाशही होत नाही तसेच जगातील विषयांविषयीच्या माणसाच्या आसक्तीचा (राग) नाशही होत नाही. याउलट त्या कर्मांपासून (ततः) दोषयुक्त असे नवीनच कर्म निर्माण होते. मग त्या नवीन कर्मापासून पुनः नवीन संसार उत्पन्न होणे हे टळत नाही. म्हणून अज्ञानाचा नाश करायचा असल्यास शहाण्या माणसाने ज्ञानप्राप्तीचा विचार करावयास हवा (१०).


आसक्ती आणि अज्ञान यांपासून कर्म उत्पन्न होते (श्लोक ८-९) पहा. ते कर्म आसक्ति आणि अज्ञान यांचा नाश करू शकत नाही. उलट त्या कर्मांमुळे जीवनात नवीन कर्मे उत्पन्न होतात आणि ही नवीन कर्मे पुन्हा जन्ममरणाच्या चक्राला नवीन गती देतात. म्हणजे कर्मांनी संसारच वाढत जातो.

येथे कर्माला सदोष (दोषयुक्त) असे म्हटले आहे. याचे कारण असे - कर्म हे पुण्यात्मक असो अगर पापात्मक असो, ते पुनर्जन्मालाच कारणीभूत होते. माणसाला पुन्हा संसारात पाडणे हाच कर्माचा दोष आहे.

या उलट ज्ञान हे अज्ञानाचा नाश करते. म्हणून माणसाने ज्ञान प्राप्त करून घेण्याचा विचार करावयास हवा.

अज्ञानाचा नाश फक्त ज्ञानाने (श्लोक ६) होतो आणि मोक्ष मिळतो, हे म्हणणे काही लोकांना पटत नाही. त्यांच्या मते कर्माचे साहाय्य घेऊनच ज्ञान हे अज्ञानाचा नाश करून मोक्षप्रत नेते. असे म्हणणारे जे लोक आहेत त्यांना 'ज्ञान-कर्म-समुच्चय - वादिन्' (=ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय आवश्यक असे मानणारे) असे म्हटले जाते. या लोकांनाच पुढे १४ व्या श्लोकात 'वितर्क वादिन्' (चुकीचा वाद करणारे) असे म्हटले आहे. असला ज्ञानकर्मसमुच्चय हा रामगीतेला मान्य नाही; त्याचा निरास रामगीता करते. पण तत्पूर्वी या लोकांचे मत नक्की काय आहे हे रामगीता श्लोक ११ व १२ व्या श्लोकाचे पहिले दोन चरण यामध्ये मांडते.




ननु क्रिया वेद-मुरवेन चोदिता
    तथैव विद्या पुरुषार्थ साधनम् ।
कर्तव्यता प्राणभृतः प्रचोदिता
    विद्या-सहायत्वमुपैति सा पुनः ॥ ११ ॥


ज्ञान-कर्म-समुच्चय-वादिन् लोक म्हणतात - प्राण धारण करणाऱ्या माणसाला ज्याप्रमाणे ज्ञान (विद्या) हे मोक्ष या पुरुषार्थाचे साधन म्हणून वेदाने स्वमुखाने सांगितले आहे त्याचप्रमाणे वेदाने स्वतःच्या मुखाने कर्म करावे अशी प्रेरणा दिली आहे (चोदिता). म्हणून क्रिया (कर्म) ही मनुष्यप्राण्याचे आवश्यक कर्तव्य, अशी वेदाची प्रेरणा आहे (प्रचोदिता). यावरून असे कळून येते की, पुरुषार्थ साधण्याच्या संदर्भात क्रिया कर्म हे ज्ञानाला सहाय्यभूत आहे (११).


धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ साधण्यास वेदाने कर्म आणि ज्ञान हे उपाय सांगितले आहेत. त्यातील पहिले तीन पुरुषार्थ कर्मसाध्य आहेत यात कुणालाच शंका नाही. पण केवळ ज्ञानानेच मोक्ष मिळतो (ज्ञानदेव तु केवलम्) असे म्हणता येत नाही. कारण कर्म हे कर्तव्य म्हणून आवश्यक आहे अशी वेदाची आज्ञा आहे. (पहा - कुर्वन्नेवह कर्माणि जिजीविषेच्छतं समा: । ईशउपनिषद, २) याचा अर्थ असा की ज्ञानाबरोबर, ज्ञानाच्या जोडीने कर्म करणे हेही आवश्यकच आहे. कारण ते दोन्हीही वेदाने सांगिनले आहेत. याचाच अर्थ असा होतो की मोक्ष प्राप्त करून देताना कर्म हे ज्ञानाला सहाय्यक आहे. इतरांचे मत सांगण्यापूर्वी 'ननु' हे अव्यय वापरण्याची पद्धत संस्कृत तात्त्विक ग्रंथात आहे. या श्लोकात 'कर्तव्यता' या शद्वाने 'कर्तव्यतया' (आवश्यक कर्तव्य या स्वरूपात) असा अर्थ घ्यावयाचा आहे.

पुढील १२ व्या श्लोकात पहिल्या दोन चरणांत ज्ञानकर्मसमुच्चय वादीचे मत आणि नंतर पुढील दोन चरणांत त्या विरुद्ध घेता येणाऱ्या आक्षेपांचा निर्देश केला आहे.




कर्माकृतौ दोषमपि श्रुतिर्जगौ
    तस्मात् सदा कार्यमिदं मुमुक्षणा ।
ननुस्वतंत्रा धुवकार्यकारिणी
    विद्या न किंचिन्मवसाप्यपेक्षते ॥ १२ ॥


श्रुतीने असे सुद्धा सांगितले आहे की कर्म न केल्यास (अकृतौ) दोष उत्पन्न होतो. म्हणून मुमुक्षूने सुद्धा हे कर्म करीत राहावयास हवे (कार्य). या म्हणण्यावर कुणीतरी आक्षेप घेतो. ज्ञान (विद्या) हे कर्मापेक्षा स्वतंत्र असून ते मोक्षप्राप्तीचे कार्य निश्चितपणाने (ध्रुवा) करते. आणि म्हणून मनाने सुद्धा त्या ज्ञानाला कर्म इत्यादि अन्य कशाचीही अपेक्षा असत नाही. ( १२)


श्रुतीचे मते कर्म हे आवश्यक कर्तव्य आहे आणि ते न केल्यास विघ्ने, अडचणी वा संकटे असले दोष उत्पन्न होतात. (पहा - अकरणे प्रत्यवाय: ।) याचा अर्थ, मुमुक्षूने सुद्धा कर्म केलेच पाहिजे; कारण ते मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञानाला उपयोगी ठरणारे आहे. असा ज्ञान कर्मसमुच्चयवादी माणसांचा दृष्टीकोन आहे.

या दृष्टिकोनाविरुद्ध कुणीतरी असे म्हणू शकतो - हा दृष्टिकोन बरोबर नाही. कारण ज्ञान आणि कर्म या दोन गोष्टी अगदी वेगवेगळ्या आहेत. ज्ञान हे कर्मापेक्षा संपूर्णपणे वेगळे आहे. कर्माची मदत न घेता, ज्ञान हे स्वतंत्रपणाने स्वतःचे मोक्ष देण्याचे कार्य निश्चितपणे करू शकते; कारण ' ज्ञानादेव तु कैवल्यम्' असे वचन आहे; तेथे कर्माचा संबंध कुठेही येतच नाही. म्हणून मोक्षप्राप्तीच्या संदर्भात ज्ञानाला कर्म अथवा अन्य काहीही यांची अपेक्षाच असत नाही.

वरील मताचा प्रतिवाद करून ज्ञानकर्मसमुच्चयवादी आपले म्हणणे पुन्हा मांडतो. ते पुढील १३ व्या श्लोकात दिले आहे.




न सत्यकार्योऽपि हि यद्‌वदध्वरः
    प्रकांक्षतेऽन्यानपि कारकादिकान् ।
तथैव विद्या विधिनः प्रकाशितै
    र्विशिष्यते कर्मभिदेव मुक्तये ॥ १३ ॥


वर मांडलेला आक्षेप) बरोबर नारी. (याचे कारण असे -) यज्ञ (अध्वर) हा ज्याप्रमाणे स्वतःचे इष्ट कार्य करण्यास जरी खरोखरच समर्थ असला, तरी त्याला इतर काही गौणकारक इत्यादींची अपेक्षा निश्चितच असते, त्याप्रमाणेच वेदाच्या आज्ञेने (विधितः) प्रगट/व्यक्त केलेल्या (प्रकाशितै:) कर्मांनी युक्त असणारे ज्ञान हेच वैशिष्ट्यपूर्ण होते म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ ठरते. अशाप्रकारे मोक्षाच्या सिद्धीसाठी ज्ञानकर्मसमुचय हा आवश्यकच आहे. ( १३)


कर्माच्या मदतीशिवाय ज्ञान हे स्वतंत्रपणे मोक्षाप्रत नेते, या आक्षेपाला ज्ञानमर्कसमुच्चयवादीचे उत्तर असे आहे - हा आक्षेप बरोबर नाही. असे पहा - यज्ञ हा स्वतंत्र आहे आणि तो इष्ट फळ देतो, परंतु तसे करताना त्याल अन्य काही कारक गोष्टींची आवश्यकता असते. कारक म्हणजे मुख्य कर्माची गौण अंगे. जसे यज्ञ या मुख्य कर्माला अग्नि, पुरोहित, मंत्र इत्यादि आवश्यक असतात. बरोबर याचप्रमाणे ज्ञान हे जरी मोक्षदायक असले तरी वेदांनी सांगितलेली उपासना इत्यादि गौण कर्मांचे साहाय्य मिळाल्यावरच - त्या कारकांनी युक्त झाल्यावरच ते ज्ञान मोक्षाप्रत नेते. याचा अर्थ असा की गौणपणाने का होईना ज्ञानाला कर्माची जरूरी आहे. असे आहे ज्ञानकर्मसमुच्चयवादीचे मत. पहाः -उभाम्यामेव पक्षाभ्यां यथा रवे पक्षिणांगतिः । तथेव ज्ञानकर्मभ्यां प्राप्यते ब्रह्मशाश्वतम् ॥)



[ एथवरील अर्थ/विवरण श्री. के. वा. आपटे यांचे आहे. हा भाग संतकृपा फेब्रु/मार्च २०१० मासिकातला आहे. पण संतकृपाने काही भाग न छापता ’एप्रिल्’२०१० व त्या पुढील अंकात श्लोक २४ पासूनचे लेख छापले आहेत. त्यामुळे श्लोक १४ ते २३ वरील अर्थ/विवेचन इतर ग्रंथामधून घेतले आहे ]



वेदविहित कर्मांचा त्याग कसा करावयाचा हे २३ व्या श्लोकाच्या अंतिम चरणात सांगितले आहे. हा त्याग "विधानतः" म्हणजे मनुस्मृतीसारख्या धर्मशास्त्रांनी सांगितलेल्या विधानानुसार विशिष्ट पद्धतीने करावयाचा आहे. मनुस्मृति सांगते - प्राजापत्यस् नावाचा यज्ञ करून, कर्म त्याग करून, गृह सोडून, माणसाने संयास घ्यावा (प्राजापत्यां निरूप्येष्टिं सर्ववेदसदक्षिणम् । आत्मन्यग्नीन्‌समारोप्य ब्राह्मणः प्रव्रजेद्‌गृहात् ॥) श्लोक १८ मध्ये असे सांगितले होते की परमात्मा आणि जीवात्मा हे एकच आहेत. या ज्ञानाने संसाराचे मूळ कारण असणारे अज्ञान नष्ट होऊन जाते आणि त्सेच आत्मज्ञान मोक्षप्रत नेते. या संदर्भात प्रश्न असा येतो - जीव आणि परमात्मा/आत्मा यांच्या ऐक्याचे हे ज्ञान कसे होते ? या प्रश्नाचे उत्तर पुढील श्लोक २४ मध्ये दिले आहे.


श्रद्धान्वितस्तत्त्वमसीति वाक्यतो
    गुरोः प्रसादादपि शुद्धमानसः ।
विज्ञाय चैकात्म्यमथात्मजीवयोः
    सुखी भवेन्मेरुरिवाप्रकम्पनः ॥ २४ ॥


श्रद्धेने युक्त असणाऱ्या आणि शुद्ध मन असणाऱ्या मुमुक्षु-शिष्याने गुरूच्या कृपाप्रसादाने (उपनिषदातील) 'तत्त्वमसि' ( =ते तू आहेस) या वाक्याचा अर्थ समजून घेऊन, आत्मा आणि जीव यांचे एकरूपत्व (ऐकात्म्य) जाणून घ्यावयाचे आहे. हे जाणणारा मुमधु सुखी/आनंदी होतो आणि तो मेरू नावाच्या पर्वता प्रमाणे कंपरहित, स्थिर, निश्चल होतो ( २४)


मुमुक्षूचे मन शुद्ध झाले आहे; त्याची चित्तशुद्धी झाली आहे; त्याने आवश्यक ते साधन -चतुष्ट्यक प्राप्त करून घेतले आहे. मग ज्ञानप्राप्तीसाठी तो ब्रह्मसाक्षात्कारी गुरूकडे गेला आहे (श्लोक ७). शमादि-षट्‌क या साधनातील श्रद्धा त्याचे जवळ आहे. साहजिकच त्याचा वेदांतवाक्ये आणि गुरुवचने यावर दृढ विश्वास आहे. (निगमाचार्य वाक्येषु भक्तिः श्रद्धेति विश्रुता । अपरोक्षानुभूति, ८.) ज्ञानप्राप्तीसाठी श्रद्धेची आवश्यकता भगवद्‌गीता अशी सांगते - श्रद्धावान् लभते ज्ञानम् । (४.३९)

गुरू प्रथम त्याला अध्यारोप आणि अपवाद समजावून सांगतो आणि त्यानंतर तो त्याला 'तत्त्वमसि' वाक्याने बोध करतो. तत्त्वमसि है वाक्य छांदोग्य उपनिषदातील आहे, ते असे - ऐतदात्म्यमिदं सर्वं तत्‌सत्य स आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो । (६. ८. ७). या वाक्यावरून जीवात्मा आणि परमात्मा यांच्या ऐक्याचे ज्ञान होते. या ऐक्य ज्ञानानेच मोक्षाची प्राप्ती होते (तत्त्वमस्यादि वाक्योत्थंयज्जीव परमात्मनोः । तादात्म्यविषयं ज्ञानं तदिदं मुक्तिसाधनम् ॥ - वाक्यवृत्ति, ६)

परमात्मा आणि जीवात्मा यांच्या ऐक्याचे ज्ञान झाल्यावर व असा साक्षात्कार झाल्यावर ता मुमुक्षू सच्चिदानंदस्वरूपी आत्मा होतो; साहजिकच तो सदासुखी, सदा आनंदी होतो.

मोक्ष मिळण्यापूर्वी मुमुदक्षू जगातील टक्क्याटोणप्यांनी अस्थिर, चंचल, हवालदिल होता. मोक्षस्थितीत त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नसल्याने, आता तो व्यावहारिक जगात सुद्धा मेरूपर्वताप्रमाणे अचल, स्थिर होतो. मेरू हा पुराणांनी सांगितलेला एक पर्वत आहे.

तत्त्वमसि वाक्याच्या अर्थाला केवलाद्वैत वेदांतात फार महत्त्वाचे स्थान दिले जाते. तत्त्वमसि वाक्याचा अर्थ कसा केला जातो ते श्लोक २५ सांगतो -




आदौ पदार्थावगतिर्हि कारणं
    वाक्यार्थविज्ञानविधी विधानतः ।
तत्-त्वं -पदार्थौ परमात्म-जीवकौ
    असीति चैकात्म्यमथानयोर्भवेत् ॥ २५ ॥


(कोणत्याही) वाक्याचा अर्थ जाणून घेण्याच्या पद्धतीत (विधौ), अर्थ जाणून घेण्याच्या शास्त्रविधानानुसार (विधानतः), प्रथम त्या वाक्यातील प्रत्येक पदाचा (वाच्य/मुख्य) अर्थ जाणून घेणे, हे आवश्यक कारण असते. आता तत्त्वमसि वाक्यातील शब्दांचे अर्थ असे आहेत = तत् त्वम् आणि या पदांचे ( शब्दांचे) अर्थ अनुक्रमे परमात्मा आणि जीव असे आहेत आणि 'असि' हे पद त्या दोघांच्या अर्थाचे ऐक्य/तादात्म्य ( =ऐकात्म्य) सांगते ( २५).


कोणत्याही वाक्यातील प्रत्येक पदाचा (वाच/मुख्य) अर्थ प्रथम कळला तरच मग त्या वाक्याचा अर्थ कळून येतो. (हेतुःपदार्थावबोधोहि वाक्यार्थावगननेरिह । वाक्यवृत्ति १०) स्वतःचा अर्थ सांगण्यास शब्दाजवळ किमान दोन शक्ति/वृत्ति आहेत. त्यांना अभिधा शक्ति आणि लक्षणा वृत्ति असे म्हणतात. अभिधा ही शब्दाची मुख्य शक्ति आहे; तिच्या साहाय्याने शद्वाचा वाच्य/मुख्य अर्थ कळतो. शब्द एकेताच अथवा वाचताच जो अर्थ लगेच कळतो त्याला मुख्यार्थ/वाच्यार्थ म्हणतात. उदा. वृक्ष हा शब्द ऐकताच झाड हा अर्थ कळतो. ह झाड हा वृक्ष शब्दाचा वाच्य अर्थ होय. तेव्हा वाक्याचा अर्थ कळायचा असेल तर प्रथम त्या वाक्यातील प्रत्येक पदाचा अर्थ कळावयास हवा हे उघड आहे. तथापि कधी असे घडते की वाक्यातील शब्दांचे वाच्यार्थ सुसंगत असा अर्थ देत नाहीत. उदा. घरावरून हत्ती गेला. येथे घरावरून हत्ती जाणे शक्य नसल्याने वाक्याच्या अर्थात संगति येत नाही. अशा स्थितीत वाच्यार्थ सांगणारी अभिधा शक्ति बाजूला सारून सुसंगत अर्थ देऊ शकणारी शब्दाची लक्षणा शक्ति स्वीकारावी लागते. जसे - घरावरून म्हणजे घराच्या जवळून असा अर्थ लक्षणेने घेतला की वाक्यार्थ संगत होतो. येथे हे लक्षात घ्यावे की अतिशय आवश्यक असेल तरच लक्षणा शक्तीकडे वळावयाचे असते (अगत्या लक्षणा ।) कारण लक्षणा ही शब्दाची गौण शक्ति आहे आणि तिचा वापर करताना मुख्य/वाच्य अर्थ सुसंगत नसणे (मुख्यार्थबाध) इत्यादि काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात.

आता तत्त्वमसि या वाक्याकडे वळू या. तत्त्वमसि या वाक्यात तत्, त्वम् आणि असि अशी तीन पदे आहेत. तत् पदाचा (वाच्य) अर्थ परमात्मा असा आहे. हा परमात्मा चैतन्यरूप आहे; पण हे चैतन्य माणसाच्या इंद्रियांना गोचर होत नाही. ते त्याला परोक्ष (इंद्रियांच्या टप्प्याच्या बाहेरचे) आहे. म्हणून तत् पदाचा वाच्यार्थ परोक्ष चैतन्य असा होतो.

आता परमात्मरूप चैतन्याला जेव्हा तीन देह, पाच कोश इत्यादींची उपाधि येते तेव्हा त्या चैतन्याला जीव असे नाव दिले जाते. सांसारिक जीवनात उपाधीत सापडलेले चैतन्य देहात असते आण ते 'मी' अथवा 'तूं' या स्वरूपात आपणांस गोचर होत असते. म्हणून त्याला प्रत्यक्‌चैतन्य असे म्हणतात. म्हणून त्वं (=तू) पदाचा वाच्यार्थ प्रत्यक् चैतन्य असा होतो. तत्त्वमसि वाक्यातील 'असि' हे पद अस् या धातूचे वर्तमानकालीन द्वितीय पुरुषी एक वचनाचे रूप आहे. आणि असि हा शब्द त्वं आणि तत् या दोन पदांचे ऐक्य दाखवितो ( तू ते आहेस).

अशाप्रकारे तत्त्वमसि वाक्यातील तीन पदांचा अर्थ कळल्यावर प्रत्यक् चैतन्य हे परोद्य चैतन्य आहे - ते दोन्ही एकच आहेत - असा अर्थ कळून येतो. हे कळताच हे लक्षात येते की तत् आणि त्वं पदांचे वाच्यार्थ हे परस्पर संगत नाहीत; ते विसंगत आहेत; ते परस्पर विरोधी आहेत. साहजिकच या वाक्याचा सुसंगत अर्थ कळण्यास हा वाच्यार्थ निरुपयोगी आहे. (तांत्रिक भाषेत येथे मुख्यार्थाचा बाध होतो. अशा परिस्थितीत विसंगत वाच्यार्थ बाजूस सारून लक्षणा शक्तीने सुसंगत अर्थ ध्यावा लागतो. तसे केल्यावर तत् आणि त्वम् पदांचे ऐक्य कळू शकते, असे पुढील २६ व्या श्लोकात सांगितले आहे.




प्रत्यक्‍परोक्षादिविरोधमात्मनोः
    विहाय सङ्‍गृह्य तयोश्चिदात्मताम् ।
संशोधितां लक्षणया च लक्षितां
    ज्ञात्वा स्वमात्मानमथाद्वयो भवेत् ॥ २६ ॥


तत्त्वमसि या वाक्यात परमात्मा आणि जीवात्मा या दोन आत्म्यांचे बाबतीत (आत्मनोः) एक प्रत्यक् आणि एक परोक्ष इत्यादि विसंगति टाकून देऊन (विहाय) म्हणजे त्यांचा वाच्यार्थ बाजूला सारून, लक्षणा शक्तीने (लक्षणया) संशोधन करून (संशोधित), ते दोघेही (तयोः) चैतन्यस्वरूप आहेत हे लक्षात घेऊन (चिदात्मनासंगृह्य), परमात्मा (आत्मा) हाच स्वतःचा आत्मा (स्वमात्मानं) म्हणजे जीवात्मा आहे असे जाणून घेतल्यानंतर, मुमुक्षूने अद्वयरूपाने/एकीभावाने रहावे (२६).


या श्लोकात 'प्रत्यक्-परोक्षादि' या समासात, प्रत्यक् आणि परोक्ष या शब्दांनंतर चैतन्य हा शब्द अध्याहृत आहे. 'परोक्ष' नंतर येणारा 'आदि' हा शब्द हा तत् आणि त्वं यांच्या वाच्यार्थांत अधिक भर घालतो. तत् हे सर्वज्ञ, सर्व शक्तिसंपन्न चैतन्य आहे, तर त्वं हे अल्पज्ञ आणि अल्पशक्तिचैतन्य आहे.

तत्त्वमसि वाक्यात तत् चा वाच्यार्थ परोक्ष चैतन्य आणि त्वं चा वाच्यार्थ प्रत्यक् चैतन्य असल्यामुळे, त्या दोहोंच्या वाच्यार्थात विरोध/विसंगति येते; म्हणून त्या दोहोंचे एकत्व सिद्ध होत नाही. म्हणून आपण विचार करतो आणि त्यांच्या अर्थातील विसंगति कशी दूर करता येईल याचा शोध घेतो ? मग आपल्या लक्षात येते की जेव्हा वाच्यार्थ/मुख्यार्थ लागू पडत नाही, तेव्हा आपण शब्दाची लक्षणा घेऊ शकतो. या लक्षणेत परोक्ष आणि प्रत्यक् यांतील विरोध टाकून दिला तर फक्त -चैतन्य असा लक्ष्यार्थ होतो. म्हणजे लक्षणेने तत् म्हणजे चैतन्य आणि त्वं म्हणजे चैतन्य असा लक्ष्यार्थ प्राप्त होतो. आता, तत् आणि त्वं ही दोन्हीही पदे लक्षणेने चैतन्य हा एकच अर्थ बोधित करीत असल्याने, त्या दोन्ही पदांच्या अर्थांचे ऐक्य सिद्ध होते. (पहा - तत्त्वमस्यादिवाक्यंच तादात्म्य प्रतिमादने । लक्षौ तत्त्वंपदार्थौद्वावुपादाय प्रवर्तते ॥ -वाक्यवृत्ति, ४२) जसे तत्=चैतन्यः त्वं=चैतन्य; म्हणून चैतन्य=तत्=त्वम् म्हणजे तत् आणि त्वं पदाच्या अर्थांचे एकत्व प्राप्त होते. अशाप्रकारे तत्त्वमसि वाक्यात, तत् आणि त्वं पदांचा मुख्यार्थ टाकून देऊन, जर लक्षणेने लक्ष्यार्थ घेतला तर ती दोन्ही पदे एकार्थी होतात.

अशाप्रकारे मुमुक्षूने या दोन पदांचे ऐक्य जाणून घेतले तर त्याला कळते की त्याचा स्वतःचा (जीव) आत्मा अणि परमात्मा हे एकच आहेत. याचाच अर्थ तो अद्वय/अद्वैत एकरूप होतो. येथे लक्षणेच्या बाबतीत असा प्रश्न येतो - लक्ष्मणा अनेक प्रकारच्या आहेत. त्यातील कोणती लक्षणा तत्त्वमसि वाक्याचा अर्थ करताना वापरावयाची आहे ? तत्त्वमसि वाक्याचा अर्थ करताना कोणत्या लक्षणा उपयोगी पडत नाहीत आणि कोणती लक्षणा वापरावयाची आहे, हे पुढील श्लोक २७ सांगतो.




एकात्मकत्वाज्जहती न सम्भवेत्-
    तथाजहल्लक्षणता विरोधतः ।
सोऽयं पदार्थाविव भालक्षणा
    युज्येत तत्त्वं पदयोरदोषतः ॥ २७ ॥


तत् आणि त्वं या पदांच्या बाबतीत ज्याप्रमाणे जहती (नावाची) लक्षणा संभवत नाही, कारण त्या दोघांचे स्वरूप एकच (एकात्मकत्यान्) म्हणजे चैतन्य आहे, त्याचप्रमाणे त्या दोहोंच्या वाच्यार्थांत विरोध असल्यामुळे, त्यांच्या बाबतीत अजहवी नावाची लक्षणाही संभवत नाही. म्हणून 'सः अयं (अस्ति) (तो देवदत्त हा देवदत्त आहे) या वाक्यात ज्याप्रमाणे सः आणि अयं या पदांची भागलक्षणा घेतली जाते, त्याप्रमाणे तत्त्वमसि वाक्यात तत् आणि त्वं पदांची भागलक्षणा घेणे योग्य ठरते (युज्येत) कारण तसे केल्यावर कोणताही दोष येत नाही (अदोषतः) (२७)


श्लोक २६ च्या स्पष्टीकरणात पाहिले होते की कोणती तरी लक्षणा घेतली, तर तत् आणि त्वं याचा अर्थ चैतन्य असा होऊन त्यांचे एकत्व सिद्ध होते. आता, जहती अणि अजहती असे जे लक्षणेचे दोन प्रकार आहेत, त्या लक्षणांचा वापर करून पूर्वोक्त अर्थ सिद्ध होत नाही, तर फक्त भागलक्षणा तो अर्थ देऊ शकते असे या श्लोकात सांगितले आहे.

लक्षणा ही जडती, अजहती आणि जहत्याजहती अशी तीन प्रकारची आहे. यातील पहिल्या दोन लक्षणांनी इष्ट अर्थ प्राप्त होत नाही तर तिसरी लक्षणा, जिला केवलाद्वैत वेदांतात भागलक्षणा म्हटले जाते ती घ्यावी लागते. ते असे सांगता येईल - जेव्हा जहती लक्षणा घेतली जाते तेव्हा शब्दाचे वाच्यार्थ संपूर्णपणे सोडून देऊन, एक नवीनच अर्थ लक्ष्यार्थ म्हणून घेतला जातो. अर्थात् हा लक्ष्यार्थ वाटेल तो घेऊन चालत नाही तर तो कोणत्यातरी प्रकाराने वाच्यार्थाशी संबंधित हवा. उदा. गंगायां घोष (गंगेवर गौळवाडा आहे) या वाक्यात गंगा शब्दाचा जलप्रवाह हा वाच्यार्थ घेता येत नाही, कारण पाण्याच्या प्रवाहावर गौळवाडा असूच शकत नाही. म्हणून गंगा शब्दाचा वाच्यार्थ टाकून देऊन, गंगा म्हणजे (गंगेचे) तीर काठ असा लक्ष्यार्थ घ्यावा लागतो. येथे तीर हा लक्ष्यार्थ सान्निध्य या संबंधाने गंगेच्या वाच्यार्थ्याशी संबंधित आहे. या उदाहरणात गंगा शब्दाचा संपूर्ण अर्थ सोडून देऊन लक्ष्यार्थ घेतला असल्याने, येथील लक्षणा जहती (शब्दवाच्यार्थाचा त्याग करणारी) म्हटली जाते. पण असली जहती लक्षणा तत्त्वमसि वाक्यात संभवत नाही. याचे कारण असे - जर तत् आणि त्वं चे परोक्ष चैतन्य आणि प्रत्यक् चैतन्य हे वाच्यार्थ पूर्णपणे टाकून दिले तर त्या वाच्यार्थातील 'चैतन्य' हाही अर्थ सोडावा लागेल. पण तसे करून चालणार नाही कारण वर २६ व्या श्लोकाखाली पाहिल्याप्रमाणे चैतन्य हा अर्थ दोहोत समान असल्याने, तत् आणि त्वं यांचे ऐक्य सिद्ध होऊ शकते. म्हणून तत्त्वमसि वाक्यात जहती लक्षणा घेता येत नाही; कारण तसे केल्यास इष्ट अर्थ प्राप्त होत नाही.

तत्त्वमसि वाक्यात अजहती लक्षणाही घेता येत नाही. अजहती लक्षणेत वाच्यार्थाचा संपूर्ण त्याग केला जात नाही, तर वाच्यार्थ अंतर्भूत असणारा असा लक्ष्यार्थ घेतला जातो. उदा. शोणोधावति (लाल रंग पळतो) या वाक्यात नुसता लाल रंग पळू शकणार नाही हे स्पष्ट आहे. म्हणून मुख्यार्थाचा बाध होऊन लक्षणा घ्यावी लागते. लक्षणेने शोण म्हणजे शोणः अश्वः (लाल घोडा) असा लक्ष्यार्थ घेतला की वाक्यार्थ सुसंगत ठरतो. या लक्ष्यार्थात शोणचा वाच्यार्थ अंतर्भूत आहे. म्हणून येथील लक्षणा अजहती म्हणजे वाच्यार्थ न सोडणारी मानली जाते. पण असली अजहती लक्षणा ही तत्त्वमसि वाक्यात इष्ट अर्थ देऊ शकत नाही. कारण तत् आणि त्वं यांचे वाच्यार्थ जर लक्ष्यार्थात आले तर परोक्ष आणि प्रत्यक् या शब्दांच्या अर्थांचा विरोध तसाच कायम राहतो. म्हणून तत्त्वमसि वाक्याचा अर्थ करताना अजहती लक्षणासुद्धा उपयोगी पडत नाही.

तत्त्वमसि वाक्यातून इष्ट आणि सुसंगत अर्थ देऊ शकणारी फक्त भागलक्षणा आहे (तत्त्वमस्यादि -वाक्येषु लक्षणा भागलक्षणा । सोऽयमित्यादि वाक्यस्थ पदयोरिव नापरा ॥ -वाक्यवृत्ति, ४८) या भागलक्षणेत असे केले जाते - वाच्यार्थात जे विरोधी/असंगत भाग आहेत ते सोडले जातात आणि उरलेले सुसंगत/अविरोधी अर्थ लक्ष्यार्थ म्हणून घेतले जातात. म्हणूनच भागलक्षणेला जहत्यजहती लक्षणा असेही म्हटले जाते. उदा. सोऽयं (देवदत्तः अस्ति) या वाक्यात 'सः' हा शब्द तत् या सर्व नामाचे पुलिंगी प्रथमा एकवचन आहे. तत् सर्वनाम भूतकाळतील दूरचा काळ व स्थळ दाखविते. म्हणून 'सः' चा अर्थ 'भूतकाळातील विशिष्ट स्थानचा' देवदत्त होतो, संक्षेपाने 'भूतकाल -विशिष्ट ' (देवदत्त) असा सः शब्दाचा वाच्यार्थ होतो. आता, अयं हे पद इदम् सर्वनामाचे पुलिंगी प्रथमा एकवचन आहे. इदं सर्वनामाने नजीकचा म्हणजे वर्तमानकालीन काळ व स्थळ बोधित होते. म्हणून वर्तमानकाळातील विशिष्ट स्थानचा (देवदत्त) असा अयंचा वाच्यार्थ होतो. म्हणजे संक्षेपाने 'वर्तमानकालविशिष्ट' (देवदत्त) असा अयं शब्दाचा वाच्यार्थ होतो. सोऽयं देवदत्तः अस्ति या वाक्यात अस्ति हे क्रियापद सः आणि अयं यांचे तादात्म्य/एकत्व दाखविते. पण ते शक्य होत नाही, कारण त्या दोन शब्दांच्या वाच्यार्थांत विरोध/विसंगति आहे. म्हणून येथे मुख्यार्थबाध होऊन लक्षणा घ्यावी लागते. ही लक्षणा जहती अथवा अजहती असू शकत नाही तर ती जहत्यजहती म्हणजे भागलक्षणा आहे. या भागलक्षणेने घडते ते असे - सः आणि अयं या शब्दाच्या वाच्यार्थातील विरोधी असणारे 'भूतकालविशिष्ट ' आणि 'वर्तमानकालविशिष्ट' हे विरोधी भाग सोडून दिले जातात, आणि त्यांच्या वाच्यार्थातील उरलेला 'देवदत्त' हा लक्ष्यार्थ म्हणून घेतला जातो. तसे केल्याने 'देवदत्ताचे एकत्व' असा सुसंगत लक्ष्यार्थ प्राप्त होतो.

सोऽयं (देवदत्तः अस्ति) या वाक्यातल्याप्रमाणेच तत्त्वमसि वाक्यात ही भागलक्षणा घ्यावयाची आहे. मग असे घडते - तत् आणि त्वं यांच्या वाच्यार्थांतील 'परोक्ष' आणि ' प्रत्यक्' हे विरोधी भाग सोडून द्यावयाचे आणि उरलेला 'चैतन्य' हा अर्थ लक्ष्यार्थ म्हणून घ्यावयाचा. तसे केल्यावर तत् आणि त्वं म्हणजे चैतन्य असा अर्थ होतो आणि मग चैतन्य या दृष्टीने तत् आणि त्वं या पदांच्या अर्थांची एकरूपता सिद्ध होते. अशा प्रकारे तत्त्वमसि वाक्यात भाग लक्षणा घेतल्यावर, चैतन्य या एकाच स्वरूपात तत् ( =परमात्मा) आणि त्वं (=जीवात्मा) यांचे तादात्म्य अथवा एकत्व कळून येते.

वर श्लोक २६ व्या प्रारंभिक भागात म्हटले होते कीं चैतन्यरूप अंतिम तत्त्वाच्या-परमात्म्याच्या भोवती देह इत्यादी उपाधि येतात. शुद्ध चैतन्याला येणाऱ्या या उपाधि कोणत्या ते पुढील २८-३० श्लोकात सांगितले आहे.




रसादिपञ्चीकृतभूतसम्भवं
    भोगालयं दुःखसुखादिकर्मणाम् ।
शरीरमाद्यन्तवदादिकर्मजं
    मायामयं स्थूलमुपाधिमात्मनः ॥ २८ ॥


पंचीकरणाने बनलेल्या (पंचीकृत) पृथ्वी (रसा) इत्यादी पाच महाभूतांपासून जे निर्माण झाले आहे, जे सुख, दुःख इत्यादी कर्मांच्या भोगांचा आश्रय आहे, ज्याला उत्पत्ति (आदि), (मध्यस्थिती) आणि अंत (=नाश) आहे, आणि जे पूर्वीच्या (आदि) म्हणजे पूर्वजन्मातील कर्मांनी उत्पन्न आले आहे, आणि जे मायेचे (अविद्येचे) कार्य आहे, असे स्थूल शरीर ही आत्म्याची पहिली उपाधि आहे; असे शहाणे लोक सांगतात.(२८).




सूक्ष्मं मनोबुद्धिदशेन्द्रियैर्युतं
    प्राणैरपञ्चीकृतभूतसम्भवम् ।
भोक्तुः सुखादेरनुसाधनं भवेत्-
    शरीरमन्यद्विदुरात्मनो बुधाः ॥ २९ ॥


मन, बुद्धी, दशेंद्रिये आणि प्राण यांनी युक्त जे आहे, जे (पाच) अपंचीकृत (=सूक्ष्म) भूतांपासून उत्पन्न झाले आहे, जे भोक्त्या अशा जीवाच्या सुख इत्यादि भोगाचे साधन (अनुसंधान) आहे असे ते आणखी (एक) सूक्ष्म शरीर आहे ते आत्म्याची दुसरी उपाधि आहे असे शहाणे लोक मानतात ( २९).


श्लोक २६ व्या स्पष्टीकरणात त्वं म्हणजे प्रत्यक् चैतन्य असे म्हटले होते. याचाच अर्थ असा की त्वं हे उपाधियुक्त चैतन्य आहे. अंतिम शुद्ध चैतन्याला/आत्म्याला स्थूल आणि सूक्ष्म शरीरांच्या उपाधि येतात असे श्लोक २८-२९ मध्ये सांगितले आहे. या स्थूल आणि सूक्ष्म या दोन शरीरांच्या उपाधि आत्म्याला कशा येतात हे जाणून घेण्यास ' पंचीकृत' आणि 'अपंचीकृत' या शब्दांनी सूचित केलेली 'पंचीकरण ' ही प्रक्रिया जाणून घ्यावयास हवी. आणि पंचीकरण जाणून घेण्यास केवलाद्वैत वेदांतात जी अध्यासाची प्रक्रिया सांगितली आहे ती जाणून घेणे आवश्यक आहे.

आत्मा/चैतन्य या अंतिम तत्त्वाचे ज्ञान देताना शिष्याला गुरू हा अध्यारोप आणि अपवाद या प्रक्रियांचा वापर करतो, असे केवलाद्वैत वेदांत सांगतो ( अध्यारोपवादाभ्यां निष्प्रपंचं ???? ।) या वेदांतानुसार आत्मा/शुद्वचैतन्य हे एकमेव सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे (ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या) तथापि सामान्य माणसांना जे जग दिसते/भासते आणि सत्य वाटते त्याचे स्पष्टीकरण करण्यास अध्यारोपाची प्रक्रिया सांगितलेली आहे (नंतर अध्यारोपाचा निषेध अपवाद या प्रक्रियेने केला जातो) ही अध्यारोपाची प्रक्रिया पुढीलप्रमाणे सांगितली जाते -

अनादि असणारी अविद्या ही चैतन्याच्यी उपाधि बनते. उपाधीच्या अर्थ असा - जी वस्तु अथवा विशेषण दुसऱ्या एखाद्या वस्तूला मर्यादित स्वरूपात भासवते अथवा ती दुसरी वस्तु वेगळ्याच स्वरूपाची आहे असे भासविते, त्याला उपाधि म्हणतात. उदा. घटामुळे महाकाश हे घटाकाश (=घटात सापडलेले मर्यादित आकाश) आहे असे वाटू लागते. येथे घटाने महाकाशाला मर्यादा पडल्याने घट ही महाकाशाची उपाधि ठरते. तसेच, शुभ स्वच्छ स्फटिकाजवळ लाल रंगाचे फूल ठेवल्यास तो स्फटिक लाल दिसू लागतो. येथे स्फटिकाचा रंग ज्या लाल फुलामुळे बदलला असे वाटते, ते लाल फूल स्फटिकाची उपाधि बनते. जी अविद्या आत्म्याची उपाधि बनते तिच्या ठिकाणी सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. या अविद्येकडे/अज्ञानाकडे व्यष्टि आणि समष्टि या दोन दृष्टिकोनातून पाहिले जाते. अज्ञान-समष्टिमध्ये सत्त्व हा गुण प्रधान असतो. आता ही अज्ञान-समष्टि जेव्हा शुद्ध निर्गुण चैतन्याची उपाधि बनते तेव्हा ते चैतन्य ( =ब्रह्म, आत्मा) सगुण रूपात भासू लागते. या सगुण रूपाला ईश्वर म्हटले जाते, तो सर्वज्ञ, सर्वशक्तिसंपन्न इत्यादि आहे असे मानले जाते. आणखी असे - अमान समष्टीजवळ आच्छादन घालण्याची आवरण शक्ति आहे तसेच नवीन काही निर्माण करण्याची विक्षेप शक्ति आहे असे मानले जाते.

आवरण शक्तीने आत्म्यावर /ब्रह्मावर/शुद्धचैतन्यावर आच्छादन पडते आणि विक्षेपशक्तीने जगाचा भास निर्माण होतो (सच्चिदानंद स्वरूपं आवृणोति इति आवरण-शक्तीः । ब्रह्मादि स्थावरांतं जगत् जलबुद्‌बुदवत् नामरूपात्मकं विक्षिपति सृजति इति विक्षेपशक्तिः । वेदांत सार ग्रंथावरील विद्वन्मनोरंजनी टीका) या द्विविध शक्तीने युक्त असें अज्ञान ही उपाधि असणारे चैतन्य/ब्रह्म हे स्वतःच्या प्राधान्याने जगाचे निमित्त कारण बनते आणि तमोगुण ज्यात प्रधान आहे अशा विक्षेपयुक्त अज्ञानाच्यी उपाधी असताना, चैतन्य आत्म्यापासून आकाश चे (सूक्ष्म) भूत निर्माण होते. मग आकाशातून वायु, वायूपासून तेज, तेजामधून जल आणि जलापासून पृथ्वी (अशी सूक्ष्म भूते) निर्माण होतात. या पाच सूक्ष्म भूतांपासून एका बाजूने सूक्ष्म शरीरे उत्पन्न होतात. दुसऱ्या बाजूने पंचीकरण प्रक्रियेद्वारा आकाश, वायु, तेज, आणि पृथ्वी अशी पाच स्थूल महाभूते निर्माण होतात. वेदांत सार पहा)

सूक्ष्म शरीर हे पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच प्राण, मन आणि बुद्धि या सतरा घटकांनी बनते. पंचीकरण प्रक्रियेद्वारा आकाश इत्यादी पाच सूक्ष्मभूतांच्या परस्पर मिश्रणाने आकाश इत्यादी स्थूल महाभूते बनतात. या पाच महाभूतांच्या परस्पर मिश्रणांनी जगातील लहानमोठे स्थूल पदार्थ बनतात आणि त्यांच्याच विशिष्ट मिश्रणाने स्थूल देह सिद्ध होतात. पहा -वेदांतसार हा ग्रंथ, तसेच - विक्षेप -शक्तिर्लिंगादि ब्रह्मांडांतं जगत् सृजेत् । वाक्यसुधा, १३)

संपूर्ण विश्वाकडे पिंड आणि ब्रह्मांड या दोन दृष्टिकोनातून पाहिले जाते. आणि त्या दोहोतही वर उल्लेखिलेली स्थूल आणि सूक्ष्म शरीरे असतात आणि ती सुद्धा शुद्धचैतन्याची/आत्म्याची उपाधि बनतात. तसेच ब्रह्मांडात अज्ञान-समष्टि ही 'कारण' नावाचे शरीर मानली जाते. तर पिंडामध्ये अज्ञान-व्यष्टि ही 'कारण' नावाचे शरीर म्हटली जाते. ही 'कारण' शरीरे ही सुद्धा चैतन्याची उपाधि बनतात. या भिन्न उपाधींमळे ब्रह्मांडात व पिंडात चैतन्याला पुढील नावे दिली जातात -

अ) ब्रह्मांडामध्ये -
उपाधीचे नाव-------चैतन्याचे नाव
कारण शरीर--------ईश्वर
सूक्ष्म शरीर---------सूत्रात्मा
स्थूल शरीर---------विराट्

आ) पिंडामध्ये -
उपाधीचे नाव--------चैतन्याचे/आत्म्याचे नाव
कारण शरीर---------प्राज्ञ ( आत्मा)
सूक्ष्म शरीर----------तैजस ( आत्मा)
स्थूल शरीर----------विश्व ( आत्मा)

अध्यारोपाच्या वर दिलेल्या तपशीलावरून स्थूल देह (श्लोक २८), सूक्ष्म देह (श्लोक २९) आणि कारण देह (श्लोक ३०) यांचा खुलासा होतो, तसेच पुढे श्लोक ४९-५१ मध्ये ज्या तीन आत्म्यांच्या पुरुषांचा उल्लेख येतो, त्याचाही खुलासा होतो.

स्थूल देहाच्या संदर्भात श्लोक २८ मध्ये 'पंचीकृत' असा शब्द येतो आणि श्लोक २९ मध्ये सूक्ष्म देहाच्या बाबतीत 'अपंचीकृत' असा शब्द आहे. या दोन्ही शब्दांना 'पचीकरण' प्रक्रिये ची अपेक्षा आहे. या पचीकरण प्रक्रियेचा खुलासा शंकराचार्यांनी आपल्या 'आत्मानात्मविवेक' या ग्रंथात पुढीलप्रमाणे दिलेला आहे (द्विधा विधाय चैकैकं चतुर्धा प्रथमं पुनः ।) स्व-स्वेतर -द्वितीयांशैर्योजनात्‌पंच पंच ते ॥) -१) आकाश इत्यादी प्रत्येक सूक्ष्म भूत हे एकक मानून प्रथम त्याचे दोन समान अर्ध भाग करावयाचे. २) प्रत्येक पहिल्या अर्ध्या भागाचे चार समान भाग करावयाचे. ३) नंतर प्रत्येक सूक्ष्म भूताच्या एका अर्ध्या भागाबरोबर इतर चार भूतांचे एक अष्टमांश भाग मिसळले की पंचीकरण प्रक्रिया पुरी होऊन एकेक स्थूल महाभूत तयार होते. (पंचीकरणाने बनलेल्या प्रत्येक स्थूल महाभूतात इतर चार भूतांचे अंश येतात) हा सर्व भाग भूतांची नावे आणि संख्या घेऊन पुढीलप्रमाणे दाखविता येतो -

१) प्रत्येक सूक्ष्म भूताचे दोन समान अर्धे भाग असे -

आकाश- १ = १/२ आ + १/२आ
वायु- १     = १/२ वा + १/२ वा
तेज-१      = १/२ ते + १/२ ते
जल- १     = १/२ ज + १/२ ज
पृथ्वी- १    = १/२ पृ + १/२ पृ

२) प्रत्येक सूक्ष्म भूताच्या १/२ भागाचे चार समान भाग असे -

१/२ आकाश = १/८ आ + १/८आ + १/८ आ + १/८आ
१/२ वायु       = १/८ वा + १/८ वा + १/८ वा + १/८ वा
१/२ तेज      = १/८ ते + १/८ ते + १/८ ते + १/८ ते
१/२ जल    = १/८ ज + १/८ ज + १/८ ज + १/८ ज
१/२ पृथ्वी    = १/८ पृ + १/८ पृ + १/८ पृ + १/८ पृ

३) आता प्रत्येक भूताच्या १/२ भागाबरोबर इतर चार भूतांचा प्रत्येकी १/८ भाग मिसळून द्यावयाचा. त्यांची बेरीज १ एकक येते. हेच स्थूल आकाश इत्यादींचे एकक होय.

१/२ आ + १/८ वा + १/८ ते + १/८ + १/८ पृ = स्थूल महाभूतआकाश १
१/२ वा + १/८ आ + १/८ ते + १/८ ज + १/८ पृ = स्थूल महाभूत वायु- १
१/२ ते + १/८ आ + १/८ वा + १/८ ज + १/८ पृ = स्थूल महाभूत तेज-१
१/२ ज + १/८ आ + १/८ वा + १/८ ते १/८ पृ = स्थूल महाभूत जल-१
१/२ पृ + १/८ आ + १/८ वा + १/८ ते + १/८ ज= स्थूल महाभूत पृथ्वी-१

ज्या स्थूल महाभूतात सूक्ष्म भूतांचा अंश/भाग अधिक आहे, त्यानुसार त्या भूताचे नाव त्या स्थूल भूताला दिले जाते. पंचीकरणाने स्थूल देह बनतात. या स्थूल देहाचे वर्णन श्लोक २८ मध्ये असे दिले आहे -१) पंचीकरणाने बनलेल्या पाच स्थूल महाभूतांपासून स्थूल देह बनतो. २) स्थूल देह आदि-कर्मज म्हणजे पूर्व जन्मी केलेल्या कर्मामुळे (त्या त्या कर्मांची फळे भोगण्यास तो) निर्माण झाला आहे. (कर्म आणि जन्म यातील कार्यकारणभावासाठी श्लोक ८ पहा). ३) कर्मांमुळे निर्माण होणाऱ्या सुखदुःखांच्या भोगांचे आश्रयस्थान स्थूल देह आहे. कारण स्थूल देहातच हे भोग भोगावे लागतात. (पहा - पंचीकृत महाभूत संभवं कर्मसंचितम् । शरीर सुखदुःखानां भोगायतनमुच्यते ॥ आत्मबोध, १२). ४) हा स्थूल देह मायामय म्हणजे मायाजन्य आहे. येथे माया म्हणजे अज्ञान/अविद्या असा अर्थ आहे. (पहा -अज्ञानं चान्यथा ज्ञानं मायामेतां वदंति ते । सदाचारानुसंधान, ४०) हे अज्ञानच जगाचा विक्षेप करते आणि त्या जगातच स्थूल देह असतो. त्यामुळे माया/अज्ञान ते स्थूलदेहाचे पूर्वगामी पण दूरचे कारण आहे. ५) स्थूल देह हा उत्पन्न होत असल्यामुळे त्याला आदि म्हणजे उत्यत्ति आहे, काही काळ तो रहातो म्हणजे त्याची स्थिती असते आणि शेवटी तो नष्ट होऊन जातो; तो नाशवंत आहे. असा हा स्थूल देह आत्म्याची उपाधि बनतो.

श्लोक २९ हा सूक्ष्म देहाचे वर्णन असे करतो -१) मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये मिळून दहा इंद्रिये आणि पाच प्राण अशा सतरा घटकांनी सूक्ष्म देह बनतो. डोळा, कान, नाक, त्वचा आणि जीभ ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत. हात, पाय, वाणी, गुद आणि शिश्न अशी पाच कर्मेंद्रिये आहेत. पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कमेंद्रिये मिळून दहा इंद्रिये होतात. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान असे पाच प्राण आहेत. २) हे सर्वही सतरा घटक ज्या सूक्ष्म भूतांमध्ये पंचीकरण झालेले नाही (अपंचीकृत) त्यापासून निर्माण होतात. आकाश इत्यादि सूक्ष्म भूतांत अज्ञानाचे सत्त्व, रज, तम हे तीन गुण उतरलेले असतात. आकाश इत्यादी सूक्ष्म भूतांतील सत्त्व गुणांच्या अंशानी पाच ज्ञानेंद्रिये बनतात. आकाश इत्यादी अपंचीकृत भूतातील रजोगुणाच्या अंशापासून कर्मेंद्रिये उत्पन्न होतात. आकाश इत्यादी सूक्ष्म भूतातील सत्त्व गुणांच्या परस्पर मिश्रणातून मन आणि बुद्धि निर्माण होतात. आकाश इत्यादि सूक्ष्म भूतांतील रजोगुणांच्या अंशांच्या परस्पर मिश्रणातून प्राण उद्‌भूत् होतात. ३) सुखदुःखांचा अनुभव येण्यास मन व बुद्धी आवश्यक आहेत. ते भोगाचे साधन आहेत. ते सूक्ष्म शरीरात असल्याने सूक्ष्म शरीराला भोगाचे साधन म्हटले आहे. (पहा -पंच-प्राण-मनो-बुद्धी-दशेन्द्रिये- समन्वितम् । अपंचीकृत-भूतोत्थं सूक्ष्मांगं भोग साधनम् ॥ आत्मबोध, १३) हे सूक्ष्म शरीर आत्म्याची उपाधि बनते.

स्थूल आणि सूक्ष्म देहाप्रमाणेच कारण नावाचे शरीर हेही आत्म्याची उपाधि बनते. तथापि या तीनही उपाधीपेक्षा आत्मावेगळा आहे असे आता सांगितले आहे.




अनाद्यनिर्वाच्यमपीह कारणं
    मायाप्रधानं तु परं शरीरकम् ।
उपाधिभेदात्तु यतः पृथक् स्थितं
    स्वात्मानमात्मन्यवधारयेत्क्रमात् ॥ ३० ॥


वर सांगितलेल्या स्थूल आणि सूक्ष्म शरीरांच्या पलीकडे (पर) म्हणजे त्यांच्या जोडीनेच आत्म्याच्या बाबतीत उपाधि म्हणून आणखी एक (तिसरे) कारण नावाचे शरीरसुद्धा आहे. हे शरीर अनादि, अनिर्वचनीय आणि माया (=अज्ञान) प्रधान असणारे आहे. आता मुमुक्षूने आपल्या मनात (आत्मनि) क्रमाने असे निश्चित करून घ्यावयास हवे की स्वतचा आत्मा (स्वात्मानम्) या तीन शरीरापेक्षा वेगळा रहाणारा आहे (३०).


या श्लोकाच्या पहिल्या दोन चरणात कारण शरीराचे वर्णन आहे. अज्ञान हेच कारण शरीर आहे. म्हणजे असे - आत्म्याला/चैतन्याला अज्ञान ही उपाधि येते असे मागे सांगितले होते. हे अज्ञान अनादि आहे असे म्हटले जाते; कारण हे अज्ञान केव्हापासून आहे हे कुणालाच माहीत नाही; म्हणून ते अनादि आहे असे मानले जाते. हे अज्ञान अनिर्वाच्य आहे म्हणजे ते सत् आणि असत् या शब्दांनी वर्णन करता येणारे नाही. याचे कारण असे - वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तीनही काळात जे अस्तित्वात असते त्याला सत् असे म्हणतात. या अर्थाने अज्ञान हे सत् नाही; कारण ते आत्मज्ञानाने नष्ट होऊन जाते. फक्त आत्मा/चैतन्य सत् आहे, आत्म्याप्रमाणे अज्ञान हे सत् नाही. ज्ञानाच्या टप्प्यात ते कधीच येत नाही ते असत् उदा. वांझ स्त्रीचा पुत्र, सशाची शिंगे, इत्यादी. पण असल्या गोष्टीप्रमाणे अज्ञान हे असत् नाही, याची कारणे दोन - १) 'मी अज्ञानी आहे' या स्वरूपात अज्ञान हे ज्ञानाच्या जाणीवेच्या टप्प्यात येत असते. ज्याची जाणीव येते ते 'असत्' असे म्हणता येत नाही. २) असत् (काही नाही) मधून काहीही निर्माण होत नाही. परंतु अज्ञानामुळे जगाचा विक्षेप होतो. म्हणून अज्ञान हे असत् नाही. ३) अज्ञान हे सत् आणि असत् यांना विरोधी असल्याने ते सत् आणि असत् आहे असे म्हणता येत नाही. ४) सत् आणि असत् या परस्पर विरुद्ध गोष्टी एकाच वेळी एकाच अज्ञानात असतात असेही म्हणता येत नाही. या सर्व कारणांनी अज्ञान हे सत् आणि असत् शब्दांनी वर्णन करता येण्यासारखे नाही - अनिर्वाच्य, सत् - असत् - अनिर्वचनीय असे म्हटले जाते.

श्लोक २८ खाली पाहिल्याप्रमाणे अज्ञानाकडे व्यष्टि आणि समष्टि या दोन दृष्टिकोनातून पाहिले जाते. ब्रह्मांडात अज्ञान आणि समष्टि हे सर्व जगाचे कारण असल्यामुळे तिला कारण शरीर म्हणतात (अखिल कारणत्वात् कारण-शरीरम् । वेदांतसार) त्याचप्रमाणे पिंडामध्ये अज्ञान आणि व्यष्टि ही अहंकार इत्यादींचे कारण असल्यामुळे तिला पिंडात कारण शरीर म्हणतात (अहंकारादि- कारणत्वात् कारण शरीरम् । वेदांतसार) म्हणून या श्लोकात अज्ञानाला अनादि, अनिर्वाच्य कारण शरीर म्हटले आहे. अज्ञानरूपी हे कारणशरीर हेही आत्म्याची उपाधि बनते.

येथे कारण शरीराला 'माया प्रधान' म्हटले आहे. येथे या शब्दाचा अर्थ 'माया-मात्र' असा आहे. कारण मागे पाहिल्याप्रमाणे कारण शरीर हे अविद्या मात्र आहे आणि अज्ञान, अविद्या, माया हे समानार्थी आहेत.

अशाप्रकारे स्थूल, सूक्ष्म आणि कारण ही शरीरे आत्म्याची उपाधि बनतात. पण मुमुक्षूने हे जाणून घ्यावयास हवे की या तीनही शरीरांपेक्षा आत्मा हा संपूर्णपणे वेगळा आहे. जसे माणूस हा वस्त्र, अलंकार इत्यादी उपाधीपेक्षा वेगळा असतो तसा आत्मा हा तीन देहापेक्षा वेगळा आहे. म्हणून मुमुक्षूने क्रमाने असे जाणावे की स्थूल देहापेक्षा आत्मा वेगळा आहे. सूक्ष्म देहापेक्षा आत्मा स्वतंत्र आहे आणि कारण शरीरापेक्षा आत्मा वेगळा आहे. (पहा-अनाद्यविद्यानिर्वाच्या कारणोपाधिरुच्यते । उपाधि-त्रितयादन्यमात्मानमवधारयेत् ॥-आत्मबोध, १४)

आत्म्याची उपाधि बनणारे तीन देह हे आत्म्याला आच्छादित करणारे पाच कोश सूचित करतात आणि व्यावहारिक जीवनात हे पाच कोश म्हणजेच आत्मा असे अज्ञानी माणूस समजू लागतो. पण ते बरोबर नाही. पाच कोशापेक्षा आत्मा भिन्न आहे. हे सर्व पुढील श्लोक ३१ मध्ये सांगितले आहे.




क्रोशेष्वयं तेषु तु तत्तदाकृतिः
विभाति सङ्‍गात्स्फटिकोपलो यथा ।
असङ्‍गरूपोऽयमजो यतोऽद्वयो
विज्ञायतेऽस्मिन्परितो विचारिते ॥ ३१ ॥


ज्याप्रमाणे जवळ असणाऱ्या रंगीत पदार्थाच्या सान्निध्याने संगाने स्फटिक मणि हा वेगळेपणाने, वेगळ्या रंगाचा भासू लागतो, त्याप्रमाणे त्या कोशांच्या संगाने (उपाधीने) हा आत्मा त्या त्या कोशाच्या आकाराचा म्हणजे स्वरूपाचा आहे, असे दैनंदिन जीवनात भासू लागते. परंतु या आत्म्याच्या स्वरूपाचा जर संपूर्णपणे (परितः) नीट विचार केला तर हा (आत्मा) अद्वय/अद्वितीय असल्यामुळे तो असंग स्वरूपाचा आणि अज आहे, हे विचारी माणसाला कळून येते ( ३१).


वर श्लोक २८-३० मध्ये सांगितलेले तीन देह म्हणजे आत्म्याला झाकणारे कोश आहेत आणि त्या कोशाखाली दडलेला आत्मा अज्ञानी माणसाला नेहमीच्या जीवनात समजून येत नाही. कोश म्हणजे आच्छादक, आवरण घालणारा (कोशवद् आच्छादकत्वात् । वेदांत सार) जसे गवसणी तंबोऱ्याला झाकून टाकते म्हणून गवसणी हा कोश किंवा म्यान तलवारीला झाकते म्हणून म्यानाला कोश म्हणतात. तीन देहांचा आणि कोशांचा संबंध असा आहे - स्थू देह हा अन्नाने उत्पन्न होणारा, अन्नाने वाढणारा, अन्नाचा एक परिणाम असल्याने त्यालाच अन्नमय कोश म्हणतात (स्थूल शरीर अन्नादिविकारित्वाद् एव हेतो अन्नमय कोशः । वेदांत सार) सूक्ष्म शरीरात पाच प्राण आणि कर्मेंद्रिये आहेत; त्यांच्या समूहाला प्राणमय कोश म्हणतात. सूक्ष्म शरीरातील मन आणि पाच ज्ञानेंद्रिये मिळून मनोमय कोश होतो. सूक्ष्म शरीरातील बुद्धि ( द्रविज्ञान) आणि पाच ज्ञानेंद्रिये मिळून विज्ञानमय कोश होतो. अशाप्रकारे सूक्ष्म शरीरातच प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय असे तीन कोश आहेत (सूक्ष्म शरीर विज्ञानमयादि कोशत्रयम् । वेदांतसार) आणि कारण शरीर म्हणजेच आनंदमय कोश होय (कारण शरीर.. आनंदमय कोश । वेदांत सार).

आत्मा हा तीनही देहांपेक्षा भिन्न असल्याने तो या पाचही कोशांपेक्षा वेगळा भिन्न आहे (आत्मा नाम स्थूलसूक्ष्मकारण शरीरत्रय विलक्षण पंचकोश व्यतिरिक्तः । आत्मानात्मविवेक) तथापि व्यावहारिक जगात घडते ते असे - अज्ञानामुळे हे पाच कोश म्हणजे मी (=आत्मा असे माणूस मानू लागतो. उदा. माणूस म्हणतो, 'मी उंच आहे.' खरे म्हणजे शरीर उंच आहे. पण शरीर म्हणजेच मी (=आत्मा) अशी समज झाल्याने 'मी उंच आहे' असे मनुष्य म्हणतो. येथे स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश म्हणजे आत्मा असे चुकीने मानले जाते. अशाच प्रकारे 'मी भुकेला आहे' असे म्हणतात. मी (आत्मा) प्राणमय कोश आहे असे मानले गेले आहे (कारण भूक हे प्राणाचे कार्य आहे). 'मी दुःखी आहे' असे म्हणण्यात मनोमय कोश म्हणजे मी (=आत्मा) असे मानले जाते; कारण दुःख हे मनाला होत असते. 'मी निश्चय करतो' असे म्हणण्यात .विज्ञानमय कोश म्हणजे मी (आत्मा) असे मानले जाते, कारण निश्चय करणे हे बुद्धीचे कार्य आहे. मी 'आनंदी आहे' असे म्हणण्यात आनंदमय कोश म्हणजे मी (आत्मा) अशी भूमिका आहे; कारण आनंदमय कोशात आनंद आहे. हे सर्व लक्षात घेऊन, कोशेनुअयंतत्तदाकृतिः ' असे या श्लोकात कथन केले आहे. (पंच कोशादि योगेन तत्तन्मय इव स्थितः । आत्मबोध, १५)

येथे असा प्रश्न येतो - एखादा कोश म्हणजे आत्मा असे कसे मानले जाते ? या प्रश्नाच्या उत्तरादाखल येथे स्फटिक मण्याचे उदाहरण दिले आहे. स्फटिक मूलतः स्वच्छ पांढरा शुभ्र असतो. परंतु तो जर रंगीत पदार्थाच्या सान्निध्यात आला तर तो रंगीत पदार्थ त्या स्फटिकाची उपाधी बनतो आणि त्या उपाधीच्या संगामुळे तो स्फटिक त्या रंगीत वस्तूच्या रंगाने युक्त आहे असे वाटू लागते. या स्फटिक मण्याप्रमाणेच आत्म्याला पाच कोशांच्या उपाधि आल्यामुळे त्या उपाधीच्या सान्निध्याने आत्मा त्या त्या कोशाच्या स्वरूपाचा आहे असे चुकीने भासू लागते. म्हणजे आत्मा जरी स्वतः शुद्ध रंगहीन आहे तरी कोशांच्या उपाधीमुळे/सान्निध्यामुळे तो त्या त्या कोशाप्रमाणे भासू लागतो (पहा - शुद्धात्मातील वस्त्रादि योगेन स्फटिको यथा ॥ आत्मबोध, १५)

आता प्रश्न असा-तीन देह अथवा पाच कोश म्हणजे जर आत्मा नव्हे, तर तो आत्मा आहे तरी कसा ? आणि त्याचे वेगळे स्वरूप कसे कळते ? या प्रश्नाचें उत्तर असे आहे -आत्मा हा मूलतः अद्वय/दोनरहित/अद्वितीय आहे. त्याच्याखेरीज अन्य काही नसल्यामुळे तो असंग आहे. तसेच तो स्वयंसिद्ध, स्वतः सिद्ध असल्याने तो अज म्हणजे जन्मरहित (म्हणून नाशरहित) आहे. गुरूच्या/श्रुतीच्या सांगण्यानुसार आत्म्याविषयी नीट, व्यवस्थितपणे विचार केला तर आत्म्याचे ज्ञान होते (विचाराज्जायते ज्ञानम् ।) आणि मग हे आत्म्याचे खरे स्वरूप कळून येते. व्यावहारिक जीवनात कोणत्यातरी देहाशी अथवा कोशाशी आत्म्याचे तादात्म्य मानल्यामुळे आत्माही तीन अवस्थांतून जातो असे वाटते. पण जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या तीनही अवस्था आत्म्याला मुळीच नाहीत, असे पुढील श्लोक ३२ मध्ये सांगितले आहे.




बुद्धेस्त्रिधा वृत्तिरपीह दृश्यते
स्वप्नादिभेदेन गुणत्रयात्मनः ।
अन्योन्यतोऽस्मिन् व्यभिचारतो मृषा
नित्ये परे ब्रह्मणि केवले शिवे ॥ ३२ ॥


येथे, या जगात सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण असणाऱ्या बुद्धीच्या/मनाच्या स्वप्न इत्यादि भेदांनी तीन वृत्ति सुद्धा आढळून येतात. परंतु त्यातील प्रत्येक अवस्था दुसऱ्या दोन अवस्थांत उपस्थित नसल्यामुळे (व्यभिचारतः), नित्य, एक (केवल) आनंदरूप (शिव), परब्रह्माच्या अपेक्षेने (त्या अवस्था) मृषा/मिथ्या आहेत. म्हणजे त्या अवस्था परब्रह्माशी संबंधित/निगडित नाहीत. ( ३२).


पिंडामध्ये आत्म्याला/परब्रह्माला तीन देहांच्या उपाधि येतात अणि आत्मा म्हणजे पंच कोशातील कोणीतरी एक असे अज्ञानाने माणूस लौकिक व्यवहारात मानतो (श्लोक ३१ पहा.) बुद्धीमध्ये आत्म्याचे प्रतिबिंब पडते आणि त्यालाच जीव असे म्हटले जाते. (श्लोक ४० पहा). अज्ञानात सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत, ते अज्ञानापासून निर्माण झालेल्या बुद्धीमध्येही उतरतात. व्यावहारिक जीवनात बुद्धि हेच जीवाचे साधन आहे. मन व इंद्रिये यांच्या सहकार्याने बुद्धीचे काम चालू असते. अशा स्थितीत इंद्रिये, मन व बुद्धि यांचे कार्य चालू आहे की नाही हे लक्षात घेतले तर माणूस तीन अवस्थांतून जात असतो असे दिसून येते. म्हणजे असे - इंद्रिये (शरीर), मन आणि बुद्धि हे जेव्हा सर्वजण कार्यशील असतात तेव्हा जिला जागृती अवस्था म्हणतात ती अवस्था असते. जेव्हा इंद्रिये व शरीर कार्यरहित असून फक्त मन आणि बुद्धि कार्य करीत असतात तेव्हा त्या स्थितीला स्वप्न अवस्था म्हटले जाते आणि जेव्हा देह, इंद्रिये, मन आणि बुद्धि हे कार्य करीत नसतात त्या स्थितीला अथवा अवस्थेला निद्रा म्हणतात. बुद्धीतील सत्त्व, रज आणि तम या गुणानुसार जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति या अवस्था येतात असा या श्लोकाच्या पहिल्या दोन ओळींचा भावार्थ आहे. सत्त्व व रज हे गुण ज्ञान व क्रिया दाखवितात, ते जागृति व स्वप्न यांत उपस्थित असतात. तम हे अज्ञान आहे. निद्रा अवस्थेत अज्ञान असते. म्हणजे बुद्धीच्या तीन गुणांनुसार या तीन अवस्था येतात असे येथे म्हटले आहे. या तीन अवस्था परस्परांची व्यावृत्ति करणाऱ्या (अनोन्य -व्यभिचार) आहेत. म्हणजे एक अवस्था असताना दुसऱ्या दोन अवस्था असूच शकत नाहीत. उदा. जागृति अवस्था असताना निद्रा अणि स्वप्न या अवस्थांचा अभाव असतो. स्वप्न समयी जागृति आणि निद्रा या अवस्था अनुपस्थित असतात अणि निद्रा ही अवस्था असताना तेथे जागृति व स्वप्न यांचे अस्तित्व नसते. आणखी असे की या अवस्था काही काळापुरत्या असतात.

या तीनही अवस्था आत्म्याच्या (अस्मिन्) संदर्भात असूच शकत नाहीत; या तीन अवस्थांचा आत्म्याशी काही संबंध नाही आणि साहजिकच त्यांचा कोणताही आणि कसलाही परिणाम आत्म्यावर होत नाही. आत्मा या तीन अवस्थांनी रहित आहे. अवस्था तीन आहेत, आत्मा एकमेव एक आहे. या अवस्था तात्कालिक असतात; आत्मा नित्य आहे. निद्रा सोडून अन्य दोन अवस्थांत सुखदुःख असते; आत्मा केवळ आनंदरूप (शिव) आहे त्या आनंदाचा थोडा अंश निद्रेत प्रत्ययाला येतो. आता, आत्मा हाच परब्रह्म असल्याने (पहा -अयमात्माब्रह्म), आत्म्याच्या अपेक्षेने या तीनही अवस्था मृषा आहेत. येथे मृषा हा शब्द पुढील तीन अर्थांनी घेता येईल-१) परिणाम न करणाऱ्या-या तीन अवस्था कोणत्याही प्रकारे आत्म्यावर कसलाही परिणाम/विकार/बदल घडवून आणीत नाहीत. २) असंबंधितः - या तीन अवस्थांचा आणि आत्म्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ३) मिथ्या, खोट्या, अनित्यः - अध्यस्त जगातील या तीन अवस्था मिथ्या, खोट्या, अनित्य आहेत.

संसार/भव म्हणजे जन्ममरणाचे चक्र आहे (श्लोक ७).

कर्मांमुळे जन्म आहे (श्लोक ८, १०). कर्म हे अहंकारामुळे होते श्लोक १४). हा अहंकार बुद्धीमध्ये असतो (पहा-चिच्छायावेशतो बुद्‌धौभानंधीस्तुद्विधास्थिता । -एकाहंकृतिरन्या स्यादितःकरण रूपिणीम् वाक्यसुधा, ६). तेव्हा जोपर्यंत देह, इंद्रिये, मन, बुद्धि आहेत तोपर्यंत संसार संपत नाही. हाच भाग पुढील श्लोक ३३ मध्ये कथन केला आहे.




देहेन्द्रियप्राण मनश्चिदात्मनां
सङ्‍घादजस्रं परिवर्तते धियः ।
वृत्तिस्तमोमूलतयाज्ञलक्षणा
यावद्‌भवेत्तावदसौ भवोद्‌भवः ॥ ३३ ॥


देह, इंद्रिये, प्राण, मन व चेतन आत्मा (चिदात्मा) यांचा संग झाल्यामुळे म्हणजे ते एकत्र आल्यामुळे बुद्धीची वृत्ति सातत्याने बदलत जाते. आता तमोगुण हा या वृत्तीच्या मुळाशी असल्यामुळे, या वृत्ति अज्ञान या स्वरूपाच्या (अज्ञलक्षणा) असतात अणि जोपर्यंत बुद्धीच्या या वृत्ति चालू राहीपर्यंत माणसाच्या संसाराचा, पुनर्जन्माचा उद्‌भव चालूच रहातो (३३).


देहा इंद्रिये, मन, बुद्धि, बुद्धीतील अहंकार आणि चेतन आत्म्याचे बुद्धीतील प्रतिबिंब (=जीव) (श्लोक ४० पहा) आणि चेतन आत्मा हे एकत्र असतात, तोपर्यंत चेतन आत्मा सोडून इतर सर्वांसह बुद्धि आपले कार्य करीत रहाते. या बुद्धीच्या वृत्तीमुळे माणूस नाना प्रकारची कर्मे करतो. या कर्मामुळे माणसाला पुनः पुनः जन्ममरण प्राप्त होते म्हणजेच त्याच्या संसाराचा/भवाचा पुनः पुन्हा उद्‌भव होतो.

या श्लोकात बुद्धीची वृत्ति ही 'तमोमूलतया अज्ञ-लक्षणा' आहे, असे म्हटले आहे. त्याचा खुलासा असा - बुद्धि ही सूक्ष्म शरीराचा एक भाग आहे (पहा -श्लोक २९ ) अज्ञानाच्या तमोगुणातून उत्पन्न झालेल्या आकाश इत्यादि सूक्ष्म तत्त्वांच्या अंशांपासून सूक्ष्म शरीरे उत्पन्न होतात. अज्ञानाचा तमोगुण हा त्याच्या कार्यात उतरतो. म्हणून बुद्धीच्या वृत्तीच्या मुळाशी तमोगुण आहे. तसेच तमोगुण हा अज्ञानात्मक, अज्ञान स्वरूपाचा आहे. सत्त्व आणि रज हे अज्ञानाचे गुणही बुद्धीत आहेतच. तथापि सत्त्व व रज या गुणांपेक्षा तमोगुण प्रधान असल्यामुळे आणि तमोगुण अज्ञानात्मक असल्याने बुद्धीची ही वृत्ति अज्ञानाने युक्त ( अज्ञ-लक्षणा) आहे असे म्हटले आहे. 'अज्ञ -लक्षणा' शब्दातील 'अज्ञ' म्हणजे अज्ञान असा अर्थ आहे.

या श्लोकाचे तात्पर्य असे - जोपर्यंत देह, इंद्रिये इ .एकत्र आहेत आणि जोपर्यंत आत्म्याचे अज्ञान आहे, तोपर्यंत कर्मे रहातात आणि ती कर्मे पुनर्जन्माला जबाबदार होतात.

माणूस मरेपर्यंत देह, इंद्रिये इत्यादि एकत्र रहाणार. मग जन्ममरणचक्र किंवा पुनर्जन्म कसा टाळता येतो ? या प्रश्नाचे उत्तर पुढील श्लोक ३४ मध्ये आहे.




नेतिप्रमाणेन निराकृताखिलो
हृदा समास्वादितचिद्‍घनामृतः ।
त्यजेदशेषं जगदात्तसद्रसं
पीत्वा यथाम्भः प्रजहाति तत्फलम् ॥ ३४ ॥


उपनिषदातील 'न इति' (नेति) या वाक्यप्रमाणाने प्राप्त होणाऱ्या ज्ञानाने संपूर्ण संसाराचे विश्वाचे निराकरण करून, चिद्घन अशा आत्म्याचे अमृत हे माणसाने हृदयात/मनात सेवन करावे (समास्वादित) किंवा माणसाने चिद्‌घन आत्म्याच्या अमृताचा स्वाद मनाने घ्यावा. त्यानंतर नारळाचे वा फळाचे आतील पाणी (अभः) पिऊन आल्यावर माणूस ज्याप्रमाणे त्या पाण्याचे नारळ हे फळ फेकून देतो, त्याप्रमाणे जगाचे सार असणारे सत् (ब्रह्म) प्राप्त करून घेतल्यावर (आत्र) मुमुक्षूने संपूर्ण जगाचा त्याग मनाने करावा म्हणजे संपूर्ण जगाचे बाबतीत उदासीन व्हावे, जगाकडे दुर्लक्ष करावे) ( ३४).


श्लोक २८-२९ खाली पाहिल्याप्रमाणे जग हे परमात्म्यावरचा अध्यारोप/अध्यास असल्याने ते मिथ्या आहे. यास प्रमाण आहे उपनिषदातील 'नेति' हे, वाक्य. नेति शब्द असणारे हे वाक्य असे आहे - स एषनेति नेत्मात्मा अगृह्यः न हि गृह्येत । अत आदेशो नेति नेति । (बृहदारण्यकउपनिषद् ४.५.१५) हे वाक्य संपूर्ण जगाचा निषेध करते. याचा अर्थ असा होतो की या जगात आत्म्याला तीन देहांच्या ज्या उपाधि आल्या आहेत, त्यांचा आत्म्याचे बाबतीत निषेध करावयाचा आहे ( पहा -निषिध्य निखिलोपाधीननेतिनेति इतिवाक्यतः । विद्यादैक्यं महावाक्यैर्जीवात्मपरमात्मनोः ॥ आत्मबोध, ३०) म्हणजे तीन देहांच्या उपाधीपेक्षा आत्मा हा संपूर्णपणे वेगळा आहे, हे जाणून घ्यावयाचे आहे. त्यानंतर मुमुक्षूला कळून येते की तथाकथित जीव हा सच्चिदानंद आत्म्यापेक्षा वेगळा नसून ते दोघेही एक, एकरूप आहेत. म्हणजे 'नेति' या वाक्याने जगाचा/उपाधीचा निषेध केल्यावर, 'तत्त्वमसि' या वाक्यावरून जीव आणि ब्रह्म हे एक आहेत याचा साक्षात्कार मुमुक्षूला होतो. ब्रह्म परमात्मा चिद्‌घन आहे असे येथे म्हटले आहे. या शब्दाने 'सच्चिदानंद-घन' हा अर्थ अभिप्रेत आहे.

यामुळे जीव हा आत्मरूप म्हणजे सच्चिदानंद रूप होतो. जीवाची सच्चिस्दानंद परमात्म्याशी होणारी ही स्थिती येथे लौकिक भाषेत अशी मांडली आहे - जीव हा मनाने (हृदा) परमात्म्याचा, आनंदाचा आस्वाद घेतो. या घटनेसाठी दिलेली उपमा अशी आहे - माणूस नारळातले पाणी पितो आणि निरूपयोगी झालेला नारळ फेकून देतो. म्हणजे माणूस नारळाचे बाह्य कवच/आवरण फेकून देऊन आतील पाणी पितो. त्याप्रमाणे साक्षात्कारी पुरुष आत्म्याभोवतीच्या जगाचा, उपाधीचा त्याग करून, जगाचे सार म्हणजे जगाच्या मागचे सत्य, जगाला आधार असणाऱ्या ब्रह्माचा आनंद उपभोगतो. जगाचे अधिष्ठान असणारे ब्रह्म हे सत्, सत्य असल्याने त्याला येथे जगाचे सार असे म्हटले आहे.

जगाचा निषेध केल्यावर जीव ब्रह्म ऐक्य होते. या संदर्भात दोन प्रश्न येतात - १) ब्रह्माचे/परमात्म्याचे स्वरूप काय आहे, २) ज्या जगाचा निषेध करावयाचा आहे ते जग परमात्म्याचे ऐवजी का आणि कसें दिसते ? पहिल्या प्रश्नाचे उत्तर श्लोक ३५ मध्ये आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर श्लोक ३६ मध्ये दिले आहे.




आत्म्याचे/परमात्म्याचे स्वरूप असे आहे -


कदाचिदात्मा न मृतो न जायते
न क्षीयते नापि विवर्धतेऽनवः ।
निरस्तसर्वातिशयः सुखात्मकः
स्वयम्प्रभः सर्वगतोऽयमद्वयः ॥ ३५ ॥


आत्मा हा कधीही जन्माला आलेला नाही, (साहजिकच) तो कधीही मृत होत नाही, म्हणजे नष्ट होत नाही. तो कधीही क्षीण होत नाही आणि तो कधीही वाढत नाही, वृद्धिंगत होत नाही. तो नवीन नाही (अनवः) म्हणजे तो पुराण आहे. त्याने सर्व प्रकारचे अतिशय/उत्कर्ष दूर केलेले आहेत. किंवा - तो सर्व विशेषणांनी रहित आहे. तो सुख/आनंद आहे आणि तो स्वयंप्रकाशी, सर्वव्यापक आणि द्वैतरहित (अद्वय) आहे. (३५).


जग आणि देह यांच्या अगदी उलट विरोधी स्वरूपाचा आत्मा/परमात्मा आहे. जग आणि देह यांना उत्पत्ति आणि नाश आहे, त्यांच्यात वाढ होते, तसेच ते क्षीणही होतात. त्यांचेमध्ये कमीजास्त गुणावगुण आहेत; त्यांच्यात सुख व दुःख आहे; ते प्रकाशित झाले तर ते दृश्य होतात; ते मर्यादित आहेत आणि ते अनेक आहेत. बरोबर याउलट आत्मा आहे - आत्म्याला जन्म व मरण नाही. आत्म्याला वाढ आणि अपक्षय/क्षीणता नाही. जग आणि देह यांची उत्पत्ति होत असल्याने ते नवीन असतात; आत्मा नवीन नाही तो पुरातन, सनातन आहे. त्याला कोणतीही बरीवाईट विशेषणे नाहीत तो सर्वोत्कृष्ट आहे. आत्मा हा स्वयंप्रकाशी, सर्व ठायी असणारा, अद्वितीय आणि केवळ आनंद स्वरूप असणारा आहे.

यावर प्रश्न असा येतो - हा आत्मा आपणास न दिसता, त्याच्या विरूद्ध स्वरूपांचे जग आत्म्यावर अथवा आत्म्याच्या स्थानी कसे बरे भासते ? या प्रश्नाचे उत्तर श्लोक ३६ मध्ये आहे.




एवंविधे ज्ञानमये सुखात्मके
कथं भवो दुःखमयः प्रतीयते ।
अज्ञानतोऽध्यासवशात् प्रकाशते
ज्ञाने विलीयेत विरोधतः क्षणात् ॥ ३६ ॥


अशाप्रकारच्या ज्ञानाने परिपूर्ण आणि सुखस्वरूप असणाऱ्या आत्म्यावर किंवा आत्म्याचे स्थानी दुःखाने भरलेला हा संसार (विश्वाचा पसारा, भव) कसा बरे प्रचीतिला येतो ? या प्रश्नाचे उत्तर असे - अज्ञानामुळे होणाऱ्या अध्यासाच्या सामर्थ्याने विश्वाचा पसारा आत्म्यावर दृश्य होतो अथवा भासतो. आणि आत्म्याचे ज्ञान होताच एका क्षणात हा विश्वाचा पसारा लय पावतो अदृश्य होतो, भासेनासा होतो; कारण आत्मा आणि संसार हे परस्पर विरोधी (विरोधतः) आहेत. ( ३६).


आत्म्यावर भव संसार/प्रपंच विश्वाचा पसारा भासतो याचे कारण या आत्म्यावर विश्वाचा अध्यास/अध्यारोप होतो (श्लोक ३८ खाली पहा) आणि अध्यास होण्याचे कारण आहे आत्म्याचे अज्ञान. याला उदाहरण असे - जमिनीवर रज्जू पडली होती. ती रज्जू म्हणून कळली नाही. या रज्जूच्या अज्ञानाने रज्जूऐवजी साप दिसू लागला. म्हणजेच सापाचा अध्यास/आरोप रज्जूवर झाला. त्याप्रमाणे आत्मा कळला नाही. आत्म्याच्या अज्ञानाने आत्म्यावर प्रपंचाचा आरोप होतो. तसेच रज्जू ही रज्जू म्हणून कळताच म्हणजे रज्जूचे ज्ञान होताच एका क्षणात सर्प दिसेनासा होतो. त्याप्रमाणे आत्म्याचे ज्ञान होताच संसाराचा लय होतो, संसार दिसेनासा होतो आणि मग संसारात भासणारा जीव हा ब्रह्मरूपच होऊन रहातो. अशा पुरुषाला जीवन्मुक्त म्हणतात. येथे महत्त्वाची गोष्ट अशी - फक्त जीवन्मुक्ताच्या बाबतीत प्रपंचाचा लय होतो; त्याला ब्रह्मापेक्षा/आत्म्यापेक्षा विश्व वेगळेपणाने दिसत नाही. परंतु ज्यांना आत्म्याचे ज्ञान नाही त्यांच्या बाबतीत संसार हा आहे तसाच चालू रहातो.




अध्यासाने आत्म्यावर विश्व भासते. पण हा अध्यास म्हणजे काय, असा प्रश्न येतो. या प्रश्नाचे उत्तर श्लोक ३७ मध्ये आहे.


यदन्यदन्यत्र विभाव्यते भ्रमाद्
अध्यासमित्याहुरमुं विपश्चितः ।
असर्पभूतेऽहिविभावनं यथा
रज्ज्वादिके तद्वदपीश्वरे जगत् ॥ ३७ ॥


भ्रम झाल्यामुळे (भ्रमात) एखादी वस्तु तशी नसणाऱ्या दुसऱ्या वस्तूवर भासते दिसते, या गोष्टीला (अमुं) विद्वान् लोक अध्यास असे म्हणतात. जसे - सर्प नसणाऱ्या (असर्पभूते) रज्जु इत्यादीवर साप दिसतो/भासतो ( अहि विभावत), त्याप्रमाणे ईश्वरावर जग भासते/दिसते ( ३७)


अध्यास शब्दाचे साधारण स्पष्टीकरण असे आहे -एखाद्या वस्तूवर भ्रमाने दुसरी वस्तु भासणे/दिसणे म्हणजे अध्यास (पहा - अध्यासोनाम अतस्मिन् तद्-बुद्‌धिः । शंकराचार्यांचे अध्यासभाष्य) यासाठी येथे रज्जूसर्पाचे उदाहरण दिलेले आहे. जमिनीवर रज्जू पडली होती. खरे म्हणजे रज्जू म्हणजे साप नाही. तथापि अंधुक प्रकाशात रज्जू रज्जू म्हणून न कळल्याने तेथे साप भासतो. म्हणजे येथे रज्जू ही रज्जू म्हणून न कळल्याने म्हणजे तिच्या अज्ञानाने तिच्यावर साप आहे असा आरोप होतो. बरोबर याप्रमाणे ब्रह्माच्या/आत्म्याच्या अज्ञानाने आत्म्यावर जगाचा अध्यास होतो. म्हणजे आत्मा आत्मा म्हणून न कळता तेथे जग दिसू लागते. या श्लोकात ब्रह्म/आत्मा या शब्दाऐवजी ईश्वर हा शब्द वापरला आहे. येथे ईश्वर म्हणजेच परमेश्वर, ब्रह्म, आत्मा असा अर्थ आहे.

'रज्ज्वादिक' शब्दातील 'आदिक' शब्दात 'क' हा स्वार्थे प्रत्यय आहे. म्हणून आदिक म्हणजे आदि. रज्ज्वादिक शब्दातील आदिक शब्द भ्रमामुळे होणाऱ्या अन्य अध्यासाची उदाहरणे सूचित करतो. उदा. शुक्तिवर रजत भासते, स्थाणूवर पुरुष भासतो, इत्यादी. अध्यासाचे सामान्य स्पष्टीकरण श्लोक ३७ मध्ये दिले होते. आता परमात्म्याचे बाबतीत जगाच्या अध्यास कसा होतो हे विशेष उदाहरण ३८व्या श्लोकात आहे.




विकल्पमायारहिते चिदात्मके-
ऽहङ्‍कार एष प्रथमः प्रकल्पितः ।
अध्यास एवात्मनि सर्वकारणे
निरामये ब्रह्मणि केवले परे ॥ ३८ ॥


विकल्परूपी मायेने रहित अथवा-मायारूपी विकल्पाने रहित, चैतन्य हे स्वरूप असणारे, सर्वांचे कारण असणारे, निरायम/विकाररहित, एकमेव एक केवल=अद्वितीय असणाऱ्या अशा आत्मरूप (आत्मनि) परब्रह्मावर सर्व प्रथम अहंकाराच कल्पिला गेला. हाच अध्यास होय (३८)


येथे ब्रह्म हे 'विकल्प-माया-रहित' असे म्हटले आहे. या शब्दाचे तीन अर्थ होऊ शकतात -१) विकल्पापासून जन्मलेल्या मायेने रहित (विकल्पात् जातया माययारहिनम् ।) २) विकल्प निर्माण करणाऱ्या मायेने रहित (विकल्प जनिकया मायारहितम् ।) ३) विकल्परूपीमायेने रहित (विकल्प एव माया, तया रहितम्। ). येथे शेवटचा अर्थ ग्राह्य आहे याचे कारण असे- "एकोऽहं बहु स्यां" (मी अनेक होईन) असा विकल्प/संकल्प प्रथम ब्रह्माचे ठायी निर्माण झाला असे उपनिषदे आणि साक्षात्कारी संत सांगतात. हाच पहिला अहंकार निर्माण झाला (पहा-मुळी ब्रह्म निराकार । तेथे स्फूर्तिरूप अहंकार ॥ रामदासस्वामीकृत दासबोध,४.१.१. स्वस्वरूपाते विसरून । दृढ ते स्फुरे मीपण । तोचि अहंकार जाण ॥ एकनाथी भागवत,२२.३७५) ब्रह्म अद्‌वयत्त्वे परिपूर्ण। ते स्वरूपी स्फुरे जे मीपण । ते मायेचे मूळ स्थान । -एकनाथी भागवत, २ .४५१). हा अहंकार म्हणजे माया आहे. (दासबोध ८.३.५१ ४.१०.२, ११.१.८-९ १२.६.४ १३.३.३; १५.७.२) आता अध्यासामुळे ब्रह्मावर विश्व भासते असे श्लोक ३७ मध्ये म्हटले होते. येथे हा अध्यास म्हणजे (ब्रह्माचा) अहं असा संकल्प, अहंकार म्हणजे माया असा अर्थ होतो. या अध्यासरूपी मायेपासून (=अज्ञानापासून) सर्व विश्व निर्माण होऊन ते अज्ञानी माणसांना भासू लागते. (श्लोक २८-२९ खालील अध्यारोप प्रक्रिया पहा) याचा मतितार्थ असा - अध्यास =ब्रह्माचे ठिकाणचा स्फुरणरूप/संकल्परूप, अहंकार=माया या अध्यासरूप मायेपासून विश्व ब्रह्मावर दिसू लागते.

निरामय म्हणजे शब्दश रोगरहित; अतिदेशाने त्याचा अर्थ परिणाम-रहित, विक्तिया-रहित असा होतो.

अहंकाररूप मायेपासून (अज्ञानापासून - शोक ३८) स्थूल व सूक्ष्मशरीरे असणारे जग निर्माण होते आणि ही शरीरे आत्म्याची उपाधि बनतात (श्लोक २८) त्यानंतर देह, इंद्रिये, मन, बुद्धि आणि चेतन आत्मा हे एकत्र येतात ( श्लोक ३३). या एकत्र येण्याने दोन गोष्टी घडतात - १) चेतन आत्मा आणि अनात्मा (म्हणजे देह, इंद्रिये, मन, बुद्धि इत्यादी) यांचा एकमेकावर अध्यास होतो. २) देह, इंद्रिये, मन, बुद्धि इत्यादींच्या साहाय्याने बुद्धि नानाप्रकारची कर्मे करते आणि त्या कर्मांमुळे जन्ममरणरूप संसार माणसाला येतो. याउलट बुद्धि निष्किय झाली असता माणसाला अजाणता आत्म्याचा आनंद मिळतो. हे सर्व पुढील श्लोक ३९ मध्ये सांगितले आहे.




इच्छादिरागादिसुखादिधर्मिकाः
सदा धियः संसृतिहेतवः परे ।
यस्मात् प्रसुप्तौ तदभावतः परः
सुखस्वरूपेण विभाव्यते हि नः ॥ ३९ ॥


इच्छा इत्यादि (म्हणजे अनिच्छा), प्रेम/आसक्ति इत्यादि म्हणजे आसक्तीचा अभाव, क्रोध, द्वेष, सुख इत्यादि म्हणजे दुःख, विषाद, हे नेहमीचे (सदा) धर्म/गुण असणाऱ्या बुद्धीच्या वृत्ती या संसाराचे मुख्य (पर) कारण आहेत. आणि याच वृत्तींचा आरोप आत्म्यावर केला जात असतो. निद्रा या अवस्थेत (प्रसुप्तौ) त्या वृत्तींचा अभाव झाला असता (तदभावतः) परब्रह्म/परमात्मा/आत्मा (पर) हा सुखस्वरूपाने आपल्या अनुभवाला/प्रतीतीला येत असतो (नः प्रतीयते) ( ३९).


इच्छादि, रागादि आणि सुखादि यातील 'आदि' शब्दाने इच्छा, राग आणि सुख यांचे विरोधी गुण तसेच अन्य काही गुण सुचविले जातात. माणसाच्या जागृति या अवस्थेत इच्छा इत्यादी बुद्धिवृत्तींच्या प्रभावामुळे बुद्धि/मन अनेक प्रकारच्या क्रिया करते. त्या क्रियांमुळे/कर्मांमुळे जन्ममरणरूप संसार (संसृति) प्राप्त होतो आणि या वृत्तींचा आरोप आत्म्यावर केला जात असल्याने, 'मला पैसा पाहिजे', 'मी रागीट आहे', 'मला शत्रूचा द्वेष वाटतो' अशा प्रकारची भाषा आपण अज्ञानी माणसे करीत असतो. स्वप्न अवस्थेतही अहंकार असतोच. परंतु निद्रा अवस्थेत मात्र देह, इंद्रिये, मन, बुद्धि हे सर्वच निष्किय झालेले असतात. निद्रा काळात मनाच्या/बुद्धीच्या वृत्ती लीन झालेल्या असतात. (पहा - रागेच्छा सुख दुःखादि बुद्धौ सत्यां प्रवर्तते । सुषुप्तौ नास्ति तन्नाशे ॥-आत्मबोध, २२) वेगळ्या शब्दांत निद्राकाळी अनात्म असणाऱ्या मन बुद्धीचा आरोप/अध्यास आत्म्यावर असत नाही. साहजिकच आत्मा निद्रेच्या समयी सुखरूपाने प्रगट होतो. पण या आनंदाचा अनुभव घेणारे मन मात्र तेथे नसते; तथापि अजाणता का होईना निद्रेमध्ये आपणास आत्मसुखाचा अनुभव येतो (पहा - छांदोग्य उपनिषद सांगते की झोपेत अजाणता जीवाचा आत्म्याशी संबंध येतो आणि म्हणून त्याला आनंदरूप आत्म्याचा अनुभव मिळतो - सतासोम्य तदा संपन्नो भवति स्वमपीतो भवति ॥ ६.८.१) पुढे झोपेतून जागे झाल्यावर आनंदाची सुखाची स्मृति आपणास येते. आणि आपण म्हणतो 'मी सुखाने झोपलो होतो. मी झोपेत सुखी होतो.' आपणा अज्ञानी मानवांना झोपेत हे जे सुख होते ते आनंदरूप आत्म्यामुळे मिळत असते.

निद्रा या अवस्थेत जीवाला ब्रह्माचे सुख मिळते असे ३९ व्या श्लोकात म्हटले. येथे दोन प्रश्न उपस्थित होतात - १) हा जीव कोण आहे ? २) आणि पिंडात आत्म्याचे स्थान काय आहे ? या दोन प्रश्नांची उत्तरे पुढील श्लोक ४० मध्ये दिले आहे.




अनाद्यविद्योद्‌भवबुद्धिबिम्बितो
जीवः प्रकाशोऽयमितीर्यते चितः ।
आत्मा धियः साक्षितया पृथक् स्थितो
बुद्ध्यापरिच्छिन्नपरः स एव हि ॥ ४० ॥


अनादि अविद्येपासून उद्‌भूत झालेल्या बुद्धिमध्ये चैतन्याचा (=आत्म्याचा) जो प्रकाश (=चैतन्य) प्रतिबिंबित होतो, तो हा जीव असे म्हटले जाते. बुद्धीचा साक्षी या स्वरूपात आत्मा हा बुद्धीपेक्षा वेगळाच रहात असतो. बुद्धीमुळे आत्मा मर्यादित होत नाही कारण तो पर (म्हणजे सर्वव्यापक) आहे (४०).


अनादि अविद्येपासून/अज्ञानापासून बुद्धि उत्पन्न होते असे येथे म्हटले आहे. परंतु मागे एकदा सांगितल्याप्रमाणे बुद्धि ही अविद्येचे साक्षात् कार्य नसून, अविद्येपासून निर्माण होणाऱ्या अनेक कार्यातील एक आहे. (श्लोक २८-२९ चे स्पष्टीकरण पहा). मागे पाहिल्याप्रमाणे आत्म्याला, शुद्ध चैतन्याला स्थूल आणि सूक्ष्म देहांची उपाधि येते. सूक्ष्म देहात बुद्धि आहे. त्या बुद्धीत चैतन्याचा प्रकाश (म्हणजे आत्मचैतन्य) प्रतिबिंबित होते; त्यालाच कधी 'चिदाभास' असे म्हणतात. बुद्धीतील चैतन्याचे हे प्रतिबिंब अथवा चिदाभास म्हणजेच जीव होय (पहा - जीवो धी स्थ चिदाभासो । वाक्यसुधा, ३६).

देहाच्या उपाधीमध्ये आत्मा हा बुद्धीचा साक्षी/द्रष्टा या स्वरूपात असतो. तो बुद्‌धीपेक्षा वेगळा आहे. तो बुद्धीच्या पलीकडे (पर) आहे, तो सर्वव्यापक आहे. म्हणून त्याला बुद्धीमुळे मर्यादा येत नाही.

श्लोक ३९ मध्ये असे सांगितले होते की जागृति अवस्थेत मन-बुद्धीचे जे गुणधर्म आहेत, त्यांचा अध्यास/आरोप आत्म्यावर होतो. आणखी असे की आत्म्याचाही अध्यास मन-बुद्धीवर होतो. म्हणचे आत्मा आणि अनात्मरूपी मन-बुद्धि इत्यादी यांचा परस्परांवर अध्यास होत असतो. ही गोष्ट पुढील श्लोक ४१ मध्ये कथन केली आहे.




चिद्‌बिम्बसाक्ष्यात्मधियां प्रसङ्‍गतः
त्वेकत्र वासादनलाक्तलोहवत् ।
अन्योन्यमध्यासवशात् प्रतीयते
जडाजडत्वं च चिदात्मचेतसोः ॥ ४१ ॥


लोखंड (लोखंडी गोळा) अग्नीशी संयुक्त झाला असता, म्हणजे अग्नीने तापून लाल बुंद झाला असताना तो अग्नीप्रमाणे भासतो आणि अग्नी लोखंडी गोळ्याप्रमाणे भासतो. त्याप्रमाणे प्रसंगाने (प्रसंगतः) प्राप्त झालेल्या एकत्र रहाण्यामुळे चैतन्याचे (बुद्धीतील) प्रतिबिंब (चिद्-बिंब), साक्षी असणारा आत्मा आणि बुद्धि यांचा परस्परावर अध्यास होतो. त्या अध्यासाच्या प्रभावामुळे चिदात्म्याचे चैतन्य (अजडत्व) हे मन-बुद्धीवर भासते आणि मन-बुद्धीचे अचेतनत्व (जडत्व) हे चिदात्म्यावर भासते (४१).


एक लोखंडाचा गोळा आहे. तो अग्नीने तप्त होतो. त्याच्या एकत्र येण्याने लोखंडाच्या गोळ्याच्या आकाराचा आरोप अग्नीवर केला जातो. जसे अग्नी गोल आहे), आणि अग्नीचा (म्हणजे त्याच्या उष्णतेचा) अध्यास लोखंडी गोळ्यावर केला जातो (म्हणजे लोखंडी गोळा भाजतो). बरोबर याचप्रमाणे चैतन्याचे प्रतिबिंब, साक्षी आत्मा/चैतन्य आणि मन-बुद्धि हे एकत्र आल्यामुळे, आत्मचैतन्याचा आरोप मन-बुद्धीवर केला जातो; म्हणजे मन-बुद्धी चेतन आहेत असे मानले जाते आणि मन-बुद्धीच्या अचैतन्याचा आरोप चेतन आत्म्यावर केला जातो. आणि जीवाचा आरोप आत्म्यावर केला जातो. (अध्यासाच्या या तपशीलासाठी ब्रह्मसूत्रावरील शंकराचार्यांचे अध्यास- भाष्य पहावे). परंतु हा सर्व अध्यास/आरोप मिथ्या आहे हे लक्षात ठेवावे.

संक्षेपाने सांगायचे झाल्यास, व्यावहारिक जीवनात अज्ञानी माणूस हा चेतन आत्मा आणि अचेतन असे देह, इंद्रिये, मन आणि बुद्धि यांचा एकमेकांवर परस्परावर आरोप करतो. पण हा आरोप असल्याने तो मिथ्या असतो.

चेतन आत्मा आणि अचेतन (देह, इंद्रिये) मन-बुद्धी यांचा परस्परांवर होणारा हा अभ्यास दूर करता येतो की नाही या प्रश्नाचे उत्तर पुढील श्लोक ४२ मध्ये दिले आहे.




गुरोः सकाशादपि वेदवाक्यतः ।
सञ्जातविद्यानुभवो निरीक्ष्य तम् ।
स्वात्मानमात्मस्थमुपाधिवर्जितं
त्यजेदशेषं जडमात्मगोचरम् ॥ ४२ ॥


गुरुजवळून (=गुरुच्या उपदेशावरून) आणि वेदवाक्यावरून आत्म्याचे ज्ञान करून घेऊन (निरीक्ष्य तम्) आणि नंतर त्या (आत्मज्ञानाने ज्याला आत्म्याचा अनुभव आला आहे अशा पुरुषाने (संजात-विद्यानुभवः) आपल्या देहात असणारा (आत्मस्थ) स्वतःचा आत्मा (स्वात्मानं) हा उपाधि-रहित आहे असे निश्चित करून आत्म्यावर आरोपित केलेल्या (आत्मगोचर) सर्व जड वस्तूंचा त्याग करावा म्हणजे त्यांच्या बाबतीत उदासीन व्हावे. (४२).


आत्मा आणि मन-बुद्धि इत्यादि अनात्म पदार्थ यांचा परस्परांवरचा अध्यास हा गुरुचा उपदेश आणि वेदांतील म्हणजे उपनिषदांतील वाक्ये यावरून दूर करता येते (पहा - श्रुत्याचार्य प्रसादेन दृढबोधो यदाभवेत् । निरस्ताशेषसंसार निदान पुरुषस्तदा ॥ वाक्यवृत्ति, ५०) कळते ते असे - आत्मा हा चैतन्यरूप आहे; देह, मन, बुद्धि इत्यादि अनात्म पदार्थ अचेतन आहेत. ते आत्म्याची उपाधि आहेत. आत्मा उपाधिपेक्षा वेगळा आहे आणि खरे पहाता उपाधीचा कोणताही परिणाम आत्म्यावर होत नाही. हे ज्ञान मुमुक्षू शिष्याने करून घ्यावयाचे आहे. मग गुरुपदिष्ट साधनाचा आचार करून त्याने आत्म्याचा अनुभव घ्यावयाचा आहे. असा आत्मानुभव घेतल्यावर त्याने आत्म्यावर आरोपित केलेल्या अचेतन वस्तूंचा त्याग करावयाचा आहे. म्हणजे त्याने त्यांच्याकडे लक्ष न देता उदासीन रहावयाचे आहे.

जेव्हा मुमुक्षू शिष्याला कळते की देह, इत्यादि उपाधीपेक्षा आत्मा निराळा आहे आणि जेव्हा त्याला आत्म्याचा अनुभव येतो तेव्हा त्याला कळते की तो स्वतः (जीव) हा आत्माच आहे. म्हणजे आता 'मी' (=जीव) आत्मा आहे अशी अनुभूति त्याला येते. मग तो काय म्हणू लागतो हे पुढील श्लोक ४३-४४ मध्ये सांगितले आहे.




प्रकाशरूपोऽहमजोऽहमद्वयो-
असकृद्विभातोऽहमतीव निर्मलः ।
विशुद्ध विज्ञानघनो निरामयः
सम्पूर्ण आनन्दमयोऽहमक्रियः ॥ ४३ ॥


प्रकाशरूप (म्हणजे चैतन्यरूप असणारा आत्मा) मी आहे. मी जन्मरहित आहे. मी अद्वय, द्वैतरहित, एकमेव एक आहे. मी सतत (असकृत) चैतन्यरूपाने प्रकाशमान (विभात) आहे. मी अत्यंत निर्मळ शुद्ध आहे. मी अत्यंत शुद्ध असा विज्ञानघन आहे. मी निरामय (निर्विकारी) आहें. मी पूर्ण आहे. मी आनंदस्वरूप आहे. मी निष्किय/क्रियारहित आहे (४२).


जो मुमुक्षू आत्मसाक्षात्कारी/ब्रह्मसाक्षात्कारी होतो तो आत्मा ब्रह्म होतो (पहा - ब्रह्मतेथ ब्रह्मैव भवति ।) साहजिकच आत्म्याचे जे स्वरूप आहे तेच मुमुक्षूच्या जीवाचे होते. ही गोष्ट तो मुमुक्षू येथे 'मी' शब्दाचा वापर करून सांगत आहे.

आत्मा चैतन्यरूप आहे (प्रकाशरूप); तो चैतन्याच्या प्रकाशाने चमकत असतो (विभात). आत्मा हा शुद्ध चैतन्यरूप असल्याने तो विज्ञानघन चिद्‌घन आहे. निरायम शब्दाचे स्पष्टीकरण मागे येऊन गेले आहे, संपूर्ण शब्द पुढील तीन-चार घेता येईल. १) ज्यात अपूर्ण असे काही नाही. २) सर्व प्रकारच्या मर्यादांनी उपाधींनी रहित. ३) सर्वव्यापक ४) सच्चिदानंदघन.




सदैव मुक्तोऽहमचिन्त्यशक्तिमान्-
अतीन्द्रियज्ञानमविक्रियात्मकः ।
अनन्तपारोऽहमहर्निशं बुधैः
विभावितोऽहं हृदि वेदवादिभिः ॥ ४४ ॥


मी नेहमीच मुक्त आहे. मी अचिंत्य शक्तीने युक्त आहे. इंद्रियांच्या पलीकडे जे ज्ञान आहे ते मी आहे. विकाररहित असे हे माझे स्वरूप आहे. मी अनंत आणि अपार आहे. वेदांचे अध्ययन करणारे शहाणे वेदवेत्ते रात्रंदिवस आपल्या हृदयात माझेच ध्यान करीत असतात (४४).


आत्मरूप झालेला पुरुष 'मी'चा वापर करून आपण कसे आत्मरूप आहोत ते सांगत आहे.

मुक्त म्हणजे कोणतेही, कशाचेही बंधन नसणारा, त्याच्या शक्तीची कल्पनाही करता येत नाही; तो सर्वशक्तिसंपन्न आहे. 'अतींद्रिय-ज्ञान' याचा अर्थ 'इंद्रियांच्या टप्प्यात न येणारा, इंद्रिय-अगोचर आणि ज्ञानरूप' असाही अर्थ होईल. येथे वेद शब्दाने उपनिषदे अभिप्रेत आहेत. उपनिषदांविषयी बोलणारे, त्यांचा अर्थ जाणणारे, त्यातील ज्ञान आत्मसात केलेले असे शहाणे लोक आत्मसाक्षात्कार करून घेण्यास ज्या आत्म्याचे निदिध्यासन करतात तो आत्मा मीच आहे असे त्या आत्मसाक्षात्कारी पुरुषाला म्हणावयाचे आहे.

आत्म्याचे ध्यान/निदिध्यासन हे अज्ञान दूर करण्यास समर्थ आहे, असे पुढील श्लोक ४५ मध्ये कथन केले आहे.




एवं सदात्मानमखण्डितात्मना
विचारमाणस्य विशुद्धभावना ।
हन्यादविद्यामचिरेण कारकै
रसायनं यद्वदुपासितं रुजः ॥ ४५ ॥


अशाप्रकारे अखंड अशा मनोवृत्तीने (आत्मना) सतत (सदा) (आत्म्याचे) चिंतन/अनुसंधान/ध्यान/निदिध्यासन करणाऱ्या मुमुक्षूच्या मनात उत्पन्न झालेली अत्यंत शुद्ध भावना ही त्वरित (अचिरेण) कारकांसह अविद्येचा नाश करून टाकते (हन्यात्). जसे - योग्यप्रकारे सेवन केलेले रसायन/औषध हे रोगांचा (रुजः) नाश करते ( ४५).


कारकांसह अविद्या या शब्दांचे स्पष्टीकरण मागे आले आहे. आत्म्याच्या अखंड अनुसंधानाने मनातील विकार इत्यादी मळ दूर होतात आणि मन शुद्ध होते. शुद्ध मनात आत्मज्ञान प्रगटते आणिअविद्येचा नाश होतो. (पहा - एवं निरतराभ्यस्ता ब्रह्मैवास्मीति वासना । हरत्यविद्याविक्षेपान् रोगानिव रसायनम् ॥ आत्मबोध, ३७)

आत्म्याचा निदिध्यास कसा करावा हे पुढील श्लोकात सांगितले आहे.




विविक्त आसीन उपारतेन्द्रियो
विनिर्जितात्मा विमलान्तराशयः ।
विभावयेदेकमनन्यसाधनो
विज्ञानदृक् केवल आत्मसंस्थितः ॥ ४६ ॥


इंद्रियांना आपापल्या विषयांपासून परावृत्त करून, मनाला (आत्मा) जिंकून घेऊन आणि अंत करण (अंतराशय=मन) संपूर्णपणे शुद्ध करून, मुमुक्षू साधकाने एकांतस्थानी बसावे. नंतर आत्म्यामध्ये मन स्थिर करून (संस्थित) इतर कोणतेही साधन न वापरता, त्याने विज्ञान दृष्टीने केवळ/फक्त आत्म्याचे ध्यान करावे (विभावयेत्) (४६).


आत्म्याचे ध्यान करण्यासाठी, आत्म्यावर मन केंद्रित करण्यासाठी इंद्रिय-संयम, शुद्ध मन आणि आत्म्याचे ठिकाणी मनाचे केंद्रीकरण हे सर्व आवश्यक आहेत. पहा - विविक्तदेशआसिनो विरागो विजितेद्रियः । भावयेदेकमात्मानं निर्मलाकाशवत् सदा ॥ आत्मबोध, ३८ ॥

विश्व हे परमात्माच आहे हे कळल्यावर ध्यान करणारा मुमुक्षू निर्विकल्प समाधीत परमात्म्याशी एकरूप होतो.




विश्वं यदेतत्परमात्मदर्शनं
विलापयेदात्मनि सर्वकारणे ।
पूर्णश्चिदानन्दमयोऽवतिष्ठते
न वेद बाह्यं न च किञ्चिदान्तरम् ॥ ४७ ॥


हे जे विश्व दिसते ते परमात्म्याचे स्वरूप आहे असे जाणून, सर्वांचे कारण असणाऱ्या आत्म्यामध्ये (आत्मति) त्या विश्वाचा लय करावा. तसे केल्यावर तो पूर्ण झालेला आणि चिदानंदरूप झालेला मुमुक्षू स्थिर होतो (वतिष्ठते); त्याला आतील आणि बाहेरील काहीही कळत नाही (४७).


पूर्ण शब्दाचे स्पष्टीकरण मागे श्लोक ४३ खाली आलेले आहे. मुमुक्षूला सर्व विश्व हे परमात्मरूप दिसत असल्याने त्याला आतील म्हणजे अंतःकरणातील आणि बाहेरील म्हणजे बाह्य विश्वातील कोणत्याच गोष्टीचे स्वतंत्रपणे अथवा वेगळेपण भान होत नाही. निर्विकल्प समाधीमध्ये काय होते हे शेवटच्या दोन चरणांत सांगितले आहे. एतत्सदृश श्लोक असे-
आत्मन्येवाखिलं दृश्यं प्रविलाप्य धिया सुधीः ।
भावयेदेकमात्मानं निर्मलाकाशवत् सदा ॥
रूपवर्णादिकं सर्वं विहाय परमार्थवित् ।
परिपूर्णचिदानंद स्वरूपेणावतिष्ठते ॥-आत्मबोध. ३९-४०

वर श्लोक ४७ मध्ये उल्लेखिलेली निर्विकल्प समाधि प्राप्त होण्यापूर्वी मुमुक्षूने ओंकाराची उपासना करावयास हवी. ही प्रणवाची उपासना कशी करायची हे श्लोक ४८ सांगतो.




पूर्वं समाधेरखिलं विचिन्तयेद्
ओङ्‍कारमात्रं सचराचरं जगत् ।
तदेव वाच्यं प्रणवो हि वाचको
विभाव्यतेऽज्ञानवशान्न बोधतः ॥ ४८ ॥


समाधि प्राप्त करून घेण्यापूर्वी (संपूर्ण) चराचर जगत् हे केवळ ओंकार आहे असे चिंतन मुमुक्षूने करावयास हवे. ते जगच प्रणव (ओंकार) शब्दाचा वाच्यार्थ आहे आणि प्रणवच जग या अर्थाचा वाचक (=वाच्य अर्थ सांगणारा) आहे. जो कोणी अज्ञानाच्या प्रभावाखाली आहे. (अज्ञान-वशात्) त्याला जग ॐकाररूप भासते; पण ज्ञान झाल्यावर (बोधतः) ते जग तसे भासत नाही. (४८).


ओंकार आणि प्रणव हे शब्द समानार्थी आहेत. ॐ हे एकाक्षर ब्रह्म (=अंतिम तत्त्व; ॐ इति एकाक्षरं ब्रह्म ।) आहे असे कधी म्हटले जाते तर कधी ब्रह्मप्राप्तीचे साधन ओंकार आहे असे म्हटले जाते. या श्लोकात ॐकार म्हणजे संपूर्ण जग असे म्हटले आहे. माण्डुक्य उपनिषदही सांगते - 'ओमित्येतदक्षरं इदं सर्वं न स्थोपव्याख्यानं भूतं भवद् भविष्यद् इति सर्वं ओंकार एव । वर भाषांतरात 'विभाव्य ते ज्ञानवशात्' हे शब्द 'विभाव्यते अज्ञानवशात्' असे घेतलेले आहेत. ते शब्द 'विभाव्यते ज्ञानवशात्' असेही घेता येतात. तसे केल्यास अर्थ असा होईल - उपनिषदावरून, गुरुपदेशावरून फळलेल्या ज्ञानाच्या प्रभावाखाली जो आहे त्याला जग ॐकारस्वरूप भासते; पण साक्षात्कार झाल्यावर (बोधतः) ते तसे भासत नाही; कारण त्यावेळी त्या जगाचा लय आत्म्यामध्ये झालेला असतो. (श्लोक ५०-५१ पहा).

ओंकार म्हणजे ओम् हे अक्षर. ते अकार, उकार आणि मकार यातील मात्रांनी/घटकांनी बनलेला आहे (संस्कृतमध्ये वर्णमालेतील वर्णांचा बोध/निदेश करण्यास त्याचेपुढे 'कार' हा शब्द ठेवला जातो. उदा. अकार म्हणजे अ, पकार म्हणजे प, इत्यादि). म्हणजे अ+उ+म् असा संधि होऊन ओम् बनला आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तीन देहांच्या उपाधीत सापडून तीन अवस्थांत असणाऱ्या तीन चैतन्याशी (=आत्म्याशी) क्रमाने ॐकाराच्या तीन मात्रांचे ऐक्य असते असे पुढील श्लोक ४९ मध्ये सांगितलेले आहे.




अकारसंज्ञः पुरुषो हि विश्वको
ह्युकारकस्तैजस ईर्यते क्रमात् ।
प्राज्ञो मकारः परिपठ्यतेऽखिलैः
समाधिपूर्वं न तु तत्त्वतो भवेत् ॥ ४९ ॥


सर्व उपनिषदाकडून ( अखिलैः) क्रमाने (क्रमात्) ओंकाराच्या तीन मात्रांतील) अकार ही संज्ञा विश्व या पुरुषाला/आत्म्याला (दिली जाते), उकार म्हणजे तैजस ( आत्मा) असे म्हटले जाते आणि मकार म्हणजे प्राज्ञ असे म्हटले गेले आहे. या तीन मात्रा म्हणजे उपाधीतील तीन आत्मे हा विचार/चिंतन हे समाधीच्या पूर्वी असते. तात्त्विक दृष्टीने पाहिल्यास (तत्त्वतः) असला फरक अथवा ऐक्य हे तसे नाही (४९).


श्लोक २८-२९ च्या स्पष्टीकरणात, आत्म्याला येणाऱ्या तीन देहांच्या उपाधीमुळे आत्म्याला/चैतन्याला विश्व, तैजस आणि प्राज्ञ अशी नावे दिली जातात असे सांगितले होते. या उपाधीतील आत्म्याला उद्देशून येथे 'पुरुष' हा शब्द वापरलेला आहे. या तीन पुरुषांचे ओंकाराच्या तीन मात्रांशी ऐक्य येथे सांगितले आहे. असाच प्रकार मांडूक्य उपनिषदातही आहे.

विश्वक आणि उकारक या शब्दांत शेवटचा क ' हा स्वार्थे क - प्रत्यय आहे. त्यामुळे विश्वक म्हणजे विश्व आणि उकारक म्हणजे उकार असाच अर्थ आहे.

जागृति अवस्थेत विश्व पुरुष/आत्मा असतो; स्वप्न अवस्थेत तैजस आत्मा असतो, तर सुषुप्ति या अवस्थेत प्राज्ञ पुरुष असतो. या तीन अवस्थांच्या पलीकडे तुर्या ही चौथी अवस्था आहे. त्या अवस्थेत अंतिम तत्त्व/परमात्मा/चैतन्य असते (पहा - वेदांतसार). तुर्या अवस्थेत या तीन अवस्था आणि हे तीन पुरुष असूच शकत नाहीत. (पहा - मांडूक्य उपनिषद). म्हणून तात्त्विक/पारमार्थिक दृष्टीने हे तीन पुरुष भासमान, मिथ्या, उपाधिजन्य आहेत.

ओंकाराच्या तीन मात्रांशी एकरूप असणाऱ्या या तीन पुरुषांचा/आत्म्यांचा लय करून त्यांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाप्रत/परमात्म्याप्रत मुमुक्षूने कसे पोहोचायचे हे पुढील श्लोक ५०-५१ मध्ये कथन केले आहे.




विश्वं त्वकारं पुरुषं विलापयेत्
उकारमध्ये बहुधा व्यवस्थितम् ।
ततो मकारे प्रविलाप्य तैजसं
द्वितीयवर्णं प्रणवस्य चान्तिमे ॥ ५० ॥
मकारमप्यात्मनि चिद्‍घने परे
विलापयेद्प्राज्ञमपीह कारणम् ।
सोऽहं परं ब्रह्म सदा विमुक्तिमत्
विज्ञानदृङ्‍मुक्त उपधितोऽमलः ॥ ५१ ॥


नाना प्रकारांनी स्थित असणाऱ्या अकाररूपी विश्व पुरुषाचा लय मुमुक्षूने उकारात करावा. त्यानंतर ॐकाराला उकाररूपी द्वितीय वर्ण (=अक्षर) हे स्वरूप असणाऱ्या तैजस पुरुषाला ओंकाराच्या शेवटच्या मकाररूप प्राज्ञ पुरुषामध्ये लीन करावे (५०). त्यानंतर कारणरूप आणि मकाररूप सुद्धा असणाऱ्या प्राज्ञ पुरुषाला सुद्धा मुमुक्षूने चिद्‌घन अशा परमात्म्यात लीन करावे. नंतर उपाधीपासून मुक्त झालेल्या आणि विज्ञानदृष्टि प्राप्त झालेल्या अशा निर्मळ मुमुक्षूने नित्य (सदा) मुक्त असणारे परब्रह्म 'मी' आहे असे जाणावे आणि तसा साक्षात्कार घ्यावा. (५१)


देहाच्या आणि अवस्थांच्या उपाधीमुळे शुद्ध चैतन्याला, परब्रह्माला, परमात्म्याला विश्व इत्यादि संज्ञा दिलेल्या होत्या. (श्लोक २८-२९ चे स्पष्टीकरण पहा) आता उपाधी जर दूर झाल्या तर शुद्ध चैतन्य आहे त्या स्वरूपात उरते. (पहा - जीवन्मुक्तस्तु तद् विद्वान् पूर्वोपाधिंगुणास्त्यजेत् । स सच्चिदादिधर्मत्त्वं भेजे भ्रमरकीरवत् ॥ आत्मबोध, ४९) तसे झाल्यावर तथाकथित जीव आणि ब्रह्म हा भेद उरतच नाही. मुमुक्षूला कळून येते की 'मी' (जीव) म्हणजेच परब्रह्म आहे. मी परब्रह्माप्रमाणे सदा मुक्त आहे. विद्यमान जीवनात जीव आणि ब्रह्म यांचे ऐक्य ज्याच्या अनुभवाला येते त्याला जीवन्मुक्त अशी संज्ञा दिली जाते.

परब्रह्म आणि 'मी' (जीव) एकरूप आहोत याचा अनुभव घेतलेले पुरुष जीवमुक्त कसा असतो हे श्लोक ५२ मध्ये सांगितलेले आहे.




एवं सदा जातपरात्मभावनः
स्वानन्दतुष्टः परिविस्मृताखिलः ।
आस्ते स नित्यात्मसुखप्रकाशकः
साक्षात् विमुक्तोऽचलवारिसिन्धुवत् ॥ ५२ ॥


अशाप्रकारे "मी परमात्मा आहे" अशी भावना, दृढ स्थिती ज्याच्या ठिकाणी कायमची (सदा) निर्माण झाली आहे, तो स्वतःच्या म्हणजेच आत्म्याच्या आनंदाने संतुष्ट होतो. तो संपूर्ण (संसार/प्रपंच) सर्व प्रकारे विसरून जातो. नित्य आत्मसुख आणि चैतन्य (प्रकाशक) हे त्याचे स्वरूप बनते. (पहा - चिदानंदैकरूपत्वात् दीप्यते स्वयमेव हि ॥-आत्मबोध) असा तो साक्षात मुक्त (जीवनमुक्त) पुरुष हा निश्चल (अचल) जलाने भरलेल्या सागरासारखा स्थिर होतो (५२).


जीवन्मुक्ताला बाह्य प्रपंचाचा विसर पडतो आणि तो नित्य ब्रह्मानंदात/आत्मानंदात तल्लीन होऊन रहातो.

श्लोक ५४ मध्ये पुन्हा जीवनमुक्ताचे वर्णन येते. तत्पूर्वी लक्ष्मणाला उपदेश करणारा राम हा स्वतःच परम पुरुष/परमात्मा आहे असे रामगीता पुढील ५३ व्या श्लोकात कथन करते.




एवं सदाभ्यस्तसमाधियोगिनो
निवृत्तसर्वेन्द्रियगोचरस्य हि ।
विनिर्जिताशेषरिपोरहं सदा
दृश्यो भवेयं जितषड्‌गुणात्मनः ॥ ५३ ॥


अशाप्रकारे जो समाधि योगाचा सतत अभ्यास करतो, ज्याच्या बाबतीत इंद्रियांना गोचर असणारे सर्व विषय हे निवृत्त, परावृत्त झाले आहेत म्हणजे ज्याने इंद्रिये आणि मन हे शब्द, स्पर्श इत्यादि विषयांपासून मागे घेतले आहेत, ज्याने काम, क्रोध, इत्यादि सर्व रिपु संपूर्णपणे जिंकून घेतले आहेत आणि ज्याने देहाच्या (आत्मनः) सहा गुणांना (इंद्रियांना) जिंकले आहे, अशा त्या जीवमुक्त पुरुषाला, हे लक्ष्मणा, मी नेहमी दृश्य होतो म्हणजे तो सतत माझ्या साक्षात्कारातच असतो. (५३).


जीवनमुक्त हा परमात्म्याशी एकरूप झालेला असल्याने, तो सतत परमात्म्याच्या साक्षात्कारात असतो. रामगीतेच्या मते हा परमात्मा म्हणजे स्वतः राम आहे. म्हणून येथे राम लक्ष्मणाला सांगतो की परमात्मा या स्वरूपात माझाच साक्षात्कार जीवनमुक्ताला होत असतो.

काम, क्रोध, आसक्ति, द्वेष, इत्यादि विकारांना अध्यात्मात शत्रु मानले जाते. कारण मुमुख्या बाबतीत ते शमूप्रमाणेच वागतात.

जीवनमुक्त योगी माणसाचे विशेषण असणारा 'जित षड् गुणात्मन' हा समस्त 'जित-आत्म-षड्-गुणस्थ' असा असावयास हवा होता. "ज्याने देहाच्या (आत्मनः) सहा गुणांना (इंद्रियांना) जिंकले आहे" असे त्याचे भाषांतर वर दिले आहे. येथे मात्र ज्ञानेंद्रिये आणि मन हे देहाचे सहा गुण होतील. सूक्ष्म अस्तित्व जन्म, वृद्धि, इत्यादि सहा गुण येथे योग्य ठरत नाहीत. या समासाचा अर्थ "आत्म्याचे सहा गुण ज्याने जिंकले आहेत म्हणजे प्राप्त करून घेतले आहेत" असाही होईल. आत्म्याचे सहा गुण पुढीलप्रमाणे सांगितले जातात - सर्वशक्तित्व, नित्यत्व, नित्यआनंद/समाधान, चेतनत्व, नित्य मुक्तत्व (स्वातंत्र्य;) आणि अस्तित्व. हा योगी आत्मरूप झाला असल्याने हे गुण त्याच्या ठायी आले आहेत. या संदर्भात पुढील अवतरण पहावे - तीर्त्वा मोहार्णवं हत्वा रागद्वेषादि राक्षसान् । योगी शांतिसमायुश्लोक आत्मारामो विराजते ॥ ( आत्मबोध, ५०).

जीवनमुक्ताची इहलोकीच्या जीवनातील स्थिती आणि मरणोत्तर स्थिति यांचे वर्णन पुढील श्लोक ५४ मध्ये आले आहे.




ध्यात्वैवमात्मानमहर्निशं मुनिः
तिष्ठेत्सदा मुक्तसमस्तबन्धनः ।
प्रारब्धमश्नन्नभिमानवर्जितो
मय्येव सक्षात् प्रविलीयते ततः ॥ ५४ ॥


अशाप्रकारे रात्रंदिवस आत्म्याचे ध्यान करून, जीवमुक्त संयमी मुनीने नेहमी सर्व बंधनातून मुक्त होऊन या जगात रहावे. अभिमान/अहंकाररहित असा तो (मुनि) प्रारब्ध कर्माचा भोग घेत घेत तो मेल्यानंतर हे लक्ष्मणा, प्रत्यक्ष माझ्या मध्येच लीन होऊन जातो. (५४).


परमात्म्याशी एकरूप झालेला जीवम्युक्त (श्लोक ५१-५३) हा या जगात रहात असतो; पण तो सर्व बंधनातून मुक्त झालेला असतो; म्हणून त्याला 'जीवमुक्त' (या जगात जिवंत असताना मुक्त झालेला) असे म्हटले जाते. आत्म्याशी एकरूप होताच जीवमुक्त तत्काळ मरून जात नाही. याचे कारण असे - ज्या प्रारब्ध कर्माने त्याला विद्यमान जीवन प्राप्त झाले आहे, ते त्याला मरेपर्यंत प्रारब्ध भोगावेच लागते; पण त्याचे वैशिष्ट्य असते ते असे - प्रारब्धाचे फळ भोगताना त्याचे ठिकाणी अहंकार असत नाही. (पहा - प्रारब्धकर्म योगेन जीवन्मुक्तो यदा भवेत् । किंचित् कालमनारब्ध कर्मबंधस्थ संक्षये ॥ वाक्यवृत्ति,५२).

प्रारब्धाचा परिणाम संपताच जीवात्म्याचा देह मरून पडतो आणि देहाच्या उपाधीतून सुटलेला त्याचा जीव परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. राम हाच परमात्मा असल्याने राम म्हणतो की, तो मज परमात्म्यामध्ये एकरूप होऊन जातो. या स्थितीत त्याला विदेहमुक्त म्हणतात.

येथे 'मयि' शब्दाचा संबंध लक्ष्मणाशी बोलणाऱ्या रामाकडे आहे. राम हाच परमात्मा असे रामगीतेचे मत आहे. (श्लोक ५३ पहा.)

संसार हा संपूर्णपणे भय आणि शोक निर्माण करणारा आहे हे लक्षात घेऊन, वेदाने विहित केलेल्या सर्व कर्मांचा त्याग करून, संन्यासी होऊन, माणसाने आत्म्याकडे वळावयास हवे असे पुढील श्लोक ५५ सांगतो.




आदौ च मध्ये च तथैव चान्ततो
भवं विदित्वा भयशोककारणम् ।
हित्वा समस्तं विधिवादचोदितं
भजेत् स्वमात्मानमथाखिलात्मनाम् ॥ ५५ ॥


हा संसार (भव) प्रारंभी, मध्ये तसेच अंती या सर्व ठिकाणी भय आणि शोक यांचे कारण आहे हे कळून आल्यावर माणसाने वेदांच्या विधिवाक्यांनी विहित केलेली सर्व कर्मे टाकावीत आणि मग सर्वांचा आत्मा असणारा असा जो आपला स्वतःचा आत्मा आहे, त्याचा त्याने आश्रय घ्यावा. म्हणजे आत्मसाक्षात्काराकडे मन वळवावे. (५५)


भव म्हणजे प्राण्याचा/माणसाचा जन्म तसेच त्याचे इहलोकातील जीवन, त्याचा संसार असा अर्थ आहे. हा संसार माणसाच्या बाबतीत भीति, दुःख, शोक इत्यादींचे कारण आहे. (पहा जन्मदुःखं जरादुःखं जायादुःखं पुनः पुनः । संसारसागरे दुःखं तस्याद् जागृहि जागृहि ॥ -शंकराचार्य; तसेच - पुनरपि जननं पुनरपि मरणं... इह संसारे । -शंकराचार्य)

कर्मांमुळे जन्म मिळतो. (श्लोक ८ पहा) म्हणून जन्म आणि संसार चुकवावयाचा असेल तर कर्मे टाकावयास हवीत. म्हणून येथे असे म्हटले आहे की वेदाने विहित केलेली कर्मे टाकून द्यावयास हवीत. (श्लोक २३ पहा)

संसार हा दुःख, भय, शोक यांनी भरलेला आहे तर आत्मा हा निर्भय, सुखरूप, शोकरहित आहे. म्हणून दुःख इत्यादि टाळण्यास माणसाने आत्म्याकडे वळणे हे योग्य आहे. आपला उपाधिरहित आत्मा हाच परमात्मा आहे आणि तो सर्व व्यापक असल्याने तोच सर्वांचा आत्मा आहे.

या जगातील काही उदाहरणे देऊन जीव आणि परमात्मा यांतील तथाकथित भेद नष्ट होऊन ते एकरूप कसे होतात हे पुढील श्लोक ५६ सांगतो.




आत्मन्यभेदेन विभावयन्निदं
भवत्यभेदेन मयात्मना तदा ।
यथा जलं वारिनिधौ यथा पयः
क्षीरे वियद्‍व्योम्न्यनिले यथानिलः ॥ ५६ ॥


ज्याप्रमाणे सागरात पाणी, दुधामध्ये दूध, महान् आकाशात घटातील आकाश आणि वायूमध्ये वायु मिसळून जाऊन एकच होतात; त्याप्रमाणे हे सर्व विश्व आत्म्याशी एकरूप आहे असा विचार केल्यावर, आणि तसा साक्षात्कार झाल्यावर मग जीव हा मज परमात्म्याबरोबर अभेद रूपाने/एकरूपाने स्थित होतो. (५६)


ज्या वस्तु त्याच आहेत, ज्या वस्तु एकरूप आहेत त्या एकमेकात मिसळून गेल्यावर त्यांच्यातला स्वतंत्र असतानाचा फरक नष्ट होतो. जसे नदीचे पाणी समुद्रातील पाण्यात प्रवेशताच दोन्ही पाणी वेगळी न रहाता एकरूप होतात मग नदीतल्या पाण्याला स्वतंत्र अस्तित्व रहात नाही. लहान भांड्यात असणारे दूध मोठ्या भांड्यातील दुधात ओतले की दोन्ही दुधे एकरूप होतात. घटातील आकाश घट फुटताच महाकाशाशी एकरूप होते. फुग्यातील हवा फुगा फुटताच बाहेरील हवेत मिसळून जाते त्याचप्रमाणे देह इत्यादि उपाधि दूर होताच, जीव हा परमात्मरूप होऊन जातो. पहा - उपाधिविलयाद् विष्णौ निर्विशेषं विशेन्मुनिः । जले जलं वियदव्योम्नि तेज स्तेजरस वायथा ॥ ( आत्मबोध, ५३). येथेही राम म्हणजे परमात्मा (मयात्मना) हीच भूमिका आहे.

'सर्वं खल्विदं ब्रह्म' असे उपनिषदे सांगतात. साहजिक ब्रह्मरूप/आत्मरूप झालेल्या जीवन्मुक्ताला हे सर्व विश्व आत्मरूपच दिसते (पहा - आत्मनि एव आत्मानं पश्यति सर्वं आत्मानं पश्यति । बृहदारण्यक उपनिषद, ६.४.२३)

प्रारब्धानुसार मरेपर्यंत जीवन्मुक्ताची जगाविषयी काय वृत्ति असते, ते पुढील श्लोक ५७ मध्ये सांगितले आहे.




इत्थं यदीक्षेत हि लोकसंस्थितो
जगन्मृषैवेति विभावयन्मुनिः ।
निराकृतत्वात् श्रुतियुक्तिमानतो
यथेन्दुभेदो दिशि दिग्भ्रमादयः ॥ ५७ ॥


या जगात (जगातील व्यवहारात) रहाणाऱ्या संयमी (जीवन्मुक्त) मुनीने असा विचार करीत (विभावयन्) असे पहावे - हे जे जग आहे ते श्रुति (वेद), आणि युक्ति (=तर्क, अनुमान) या प्रमाणांच्या आधाराने (मानतः ) निराकृत/बाधित होत असल्याकारणाने, ते एका चंद्राऐवजी दिसणाऱ्या दुसऱ्या चंद्राप्रमाणे अथवा एका दिशेत दुसरी दिशा भासणे याप्रमाणे होणाऱ्या भ्रमाप्रमाणे मिथ्याच आहे (५७).


श्रुति आणि अनुमान या प्रमाणांचा वापर करून जर विचार केला तर जीवमुक्त माणसाला (तसेच विचारी माणसाला सुद्धा) असे कळून येते की आपल्या भोवती दिसणारे हे जग मिथ्या आहे. उदा० श्रुति असे सांगते - ब्रह्म/परमात्मा हे केवळ एकमेव एक सत्य वस्तु आहे (ब्रह्म सत्यम् ।) येथे नाना/अनेक नाही (नेह नानास्ति किंचन ।) येथे अनेकाचा निषेध आहे आणि ब्रह्माचे एकत्व सांगितले आहे. यावरून जग हे मिथ्या आहे हे कळून येते. अनुमान असे सांगता येते - जर ब्रह्म हे एकमेव एक सत्य असेल, तर ब्रह्यापेक्षा अन्य काही सत्य नाही; साहजिकच ब्रह्मापेक्षा वेगळेपणाने भासणारे/दिसणारे जग हे सत्य नसून मिथ्या आहे. अशाप्रकारे श्रुति/वेद आणि तर्क या ज्ञानाच्या प्रमाणांनी जग हे मिथ्या आहे हे कळून येते.

जग कसे मिथ्या आहे ते स्पष्ट करण्यास या जगातील दोन उदाहरणे येथे दिली आहेत. द्विचंद्र आणि दिग्भ्रम याप्रमाणे जग मिथ्या आहे. या जगात चंद्र एकच आहे. पण डोळ्यात सारा झाला अथवा डोळ्यावर दाब दिला अथवा अन्य काही कारणाने एका चंद्राऐवजी दोन चंद्र दिसू लागले. यातील दुसरा चंद्र मिथ्या आहे हे अगदी उघड आहे.

या जगात आपण मुख्य चार दिशा मानतो. अनेकदा विशिष्ट परिस्थितीत दिशांची जाणीव सुटते आणि एक दिशा म्हणजे दुसरी दिशा असे वाटू लागते. यालाच दिग्भ्रम म्हणतात.

हे जे काही जग दिसत आहे ते सर्व परमात्मा राम/ब्रह्म आहे हे जाणून घेणे हे मानवी जीवनाचे ध्येय/इतिकर्तव्य आहे. हे ध्येय साध्य होईपर्यंत माणसाने रामाची/ब्रह्माची उपासना करावयास हवी. हे सर्व पुढील श्लोक ५८ मध्ये सांगून, मग भक्तीच्या तत्त्वाचा निर्देश केला आहे.




यावन्न पश्येदखिलं मदात्मकं
तावन्मदाराधनतत्परो भवेत्
श्रद्धालुरत्यूर्जितभक्तिलक्षणो
यस्तस्य दृश्योऽहमहर्निशं हृदि ॥ ५८ ॥


जोपर्यंत संपूर्ण विश्व हे मज परमात्म्याच्या स्वरूपाचे आहे हे माणसाला समजू शकत नाही, तोपर्यंत त्याने माझी (=परमात्त्याची) आराधना करण्यात तत्पर रहावे. जो कोणी पुरुष हा श्रद्धेने युक्त आणि उत्कृष्ट भक्तीच्या स्वरूपाने (लक्षण) युक्त आहे, त्यालाच त्याच्या स्वतच्या हृदयात मी परमात्मा रात्रंदिवस दृश्य होतो. त्याला सतत माझेच दर्शन होते. (५८).


संपूर्ण जग हे रामरूप/परमात्मरूप आहे अशी दृष्टि प्राप्त व्हावयास हवी. पहा - सर्व खल्विदं ब्रह्म । ऐतदातम्यमिदसर्वम् ।) हे ऐक्य कळेपर्यंत परमात्मा रामाची आराधना/उपासना करावयास हवी (पहा - यावत् सर्वेषु भूतेषु मद्‌भावो नोपजायते । तावदेवमुपासीत वाङ् मनः कायवृत्तिभिः ॥ भागवत पुराण-११.२९.१७) आणि ही आराधना सुद्धा श्रद्धेने आणि उत्कट भक्तीने व्हावयास हवी. भक्ति म्हणजे परमात्म्याविषयी सर्वोकृष्ट प्रेम (परम प्रेमस्वरूपा)

या श्लोकाअखेर रामाचा मुख्य उपदेश संपतो. यापुढील ५९-६२ हे श्लोक रामगीतेला उपसंहारत्मक आहेत.




रहस्यमेतत् शृतिसारसङ्‍ग्रहं
मया विनिश्चित्य तवोदितं प्रिय ।
यस्त्वेतदालोचयतीह बुद्धिमान्
स मुच्यते पातकराशिभिः क्षणात् ॥ ५९ ॥


हे प्रिय (लक्ष्मणा), (सर्व) श्रुतीचे सारसंग्रहरूप असे हे रहस्य मी निश्चित करून तुला सांगितले आहे. येथे, या जगात जो बुद्धिमान पुरुष याचे मनन चिंतन करील तो एका क्षणात पापांच्या राशीतून मुक्त होईल (५९).


प्रास्ताविकात सांगितले होते की ही रामगीता प्रामुख्याने श्रुतीवर म्हणजे उपनिषदांवर आधारलेली आहे. विशेषतः शंकराचार्यांचा केवलाद्वैत वेदांत ज्या उपनिषदांचा वापर करतो त्यावर आधारलेली आहे. या जगात सुखी कसे व्हावे हे राम असे सांगतो -




भ्रातर्यदीदं परिदृश्यते जगत्
मायैव सर्वं परिहृत्य चेतसा ।
मद्‌भावनाभावितशुद्धमानसः
सुखी भवानन्दमयो निरामयः ॥ ६० ॥


हे बंधो लक्ष्मणा, हे जे जग सर्वत्र आजूबाजूला दिसते/भासते आहे ते सर्व माया आहे असे जाणून घे आणि ते तू संपूर्णपणे आपल्या मनातून काढून टाक. म्हणजे त्याच्या बाबतीत उदासीन, तटस्थ हो. त्यानंतर माझ्या (=परमातम्याच्या) चिंतनाने (भावना) तू आपले चित्त शुद्ध करून घे. (भावित) आणि मग क्लेशरहित (निरामय), सुखी आणि आनंदाने परिपूर्ण होऊन जा ( ६०)


येथे विश्वाला 'माया' म्हटले आहे. माया म्हणजे अविद्या/अज्ञान. जग हे मायाजन्य, अज्ञानजन्य आहे. म्हणजे ते अज्ञानाने ब्रह्मावर आरोपित/अध्यस्त केलेले आहे. म्हणून अज्ञान आहे तोपर्यंत जग भासते आणि भास हा सतत टिकणारा नसतो. म्हणून त्याला फारसे महत्त्व देण्याचे कारण नाही. विश्व हे भासरूप असल्याने ते सत्य आहे ही भावना मनातून काढून टाकावयास हवी. मग या विश्वरूपी भासाचे जे सत्य अधिष्ठान परमात्मा आहे, त्याचे चिंतन, ध्यान, निदिध्यासन करून परमात्मरूप होऊन जावयास हवे. तरच तो जगात क्लेशरहित, दुःखरहित (निरामय), सुखयुक्त आणि सदाचा आनंदी होइले. जीवमुक्त हा परमात्मरूप/रामरूप झालेला असतो. आता ' मीच जीवनमुक्त रूप असतो' असे सांगून राम जीवन्मुक्ताची महती पुढील श्लोक ६१ मध्ये कथन करतो.




यः सेवते मामगुणं गुणात्परं
हृदा कदा वा यदि वा गुणात्मकम् ।
सोऽहं स्वपादाञ्चितरेणुभिः स्पृशन्
पुनाति लोकत्रितयं यथा रविः ॥ ६१ ॥


जो जीवन्मुक्त पुरुष आपल्या मनाने गुणांच्या पलीकडे (परं) असणाऱ्या अथवा कधी गुणरहित (अगुण) असणाऱ्या अशा माझी सेवा/उपासना करतो, असा तो पुरुष म्हणजे मी (परमात्मा) आहे. सूर्य आपल्या किरणांनी ज्याप्रमाणे तीनही लोकांना/जणांना पुनीत/प्रकाशित करतो, त्याप्रमाणे हा जीवन्मुक्त औरुष आपल्या पायाला चिकटलेल्या (अंचित) रजःकणांनी स्पर्श करीत तीनही लोकांना पुनीत/प्रकाशित करतो (६१)


परमात्म्याला अज्ञान ही उपाधि येते ( श्लोक २८-२९ पहा) अज्ञानात सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. अज्ञानाचे हेच तीन गुण बुद्धीत उतरतात. (श्लोक ३२) परमात्मा हा अज्ञानाच्या तीन गुणांच्या पलीकडे आहे आणि अंतरात्मा हा बुद्धीच्या तीन गुणांच्या पलीकडे आहे. अज्ञानाच्या उपाधीने मानला गेलेला ईश्वर हा सगुण-सर्वज्ञ, सर्व शक्तिसंपन्न, इत्यादि आहे. पण मूळ परमात्म्यात हे गुण नाहीत म्हणून तो अगुण/निर्गुण आहे. भक्त आपल्या इच्छे प्रमाणे/आवडीप्रमाणे परममात्म्याकडे सगुण अथवा निर्गुण या दृष्टिकोनातून पाहू शकतो आणि तो त्याची तशी उपासना करू शकतो आणि तो जीवन्मुक्त होऊ शकतो.

असा जीवन्मुक्त भक्त हा प्रत्यक्ष मी=राम=परमात्मा आहे असे रामाचे मत आहे. म्हणूनच संत हे सगुण ब्रह्म आहेत असे म्हटले जाते. असा हा जीवन्मुक्त भक्त विद्यमान असेपर्यंत जेथे जेथे पाऊल ठेवतो त्या त्या स्थानांना किंबहुना तीनही लोकांना तो पवित्र करतो. कारण तो स्वतःच पवित्र आहे. सूर्य जसा तीनही लोकांना प्रकाशित करतो त्याप्रमाणे हा जीवन्मक्त आपल्या पदरेणूंनी तीनही लोकांना पवित्र करतो. तीनही लोकांत जाणारे नारदासारखें काही ऋषि पूर्वी होऊन गेले असे म्हणतात.

आता अंतिम ६२ व्या श्लोकात आपण जो हा लक्ष्मणाला उपदेश केला त्याचे महत्त्व काय हे राम सांगतो.




विज्ञामेतदखिलंश्रुतिसारमेकं
वेदान्तवेद्यचरणेन मयैव गीतम् ।
यः श्रद्धया परिपठेद् गुरुभक्तियुक्तो
मद्‌रूपमेति यदि मद्‌वचनेषु भक्तिः ॥ ६२ ॥


मी सांगितलेले हे एकमेवाद्वितीय असे असणारे विज्ञान (विशेष ज्ञान) आहे. वेदांतावरून, उपनिषदांवरून ज्याच्या चरणांचे (म्हणजे स्वरूपाचे) ज्ञान होते अशा मी, हे लक्ष्मणा, तुला सांगितलेले आहे. जो पुरुष गुरूवरील भक्तीने युक्त आहे त्याने श्रद्धापूर्वक हे वचन वारंवार पठण करावे (परिपठेत्) आणि जर त्याची माझ्या वचनावर भक्ति/श्रद्धा असेल तर तो पुरुष मद्‌रूप/परमात्मरूप होतो (६२).


या श्लोकाचे शेवटच्या दोन ओळींचा अर्थ पुढीलप्रमाणेही होईल‍. गुरूवरील भक्तीने युक्त आणि माझ्या वचनावर श्रद्धा असणारा पुरुष जर हे माझे वचन श्रद्धेने पठण करील तर तो मद्‌रूप/परमात्मरूप होऊन जाईल.

रामगीतेतील ज्ञान हे 'श्रुतींचे सार' आहे. श्लोक ५९ मध्ये रामगीतेला 'सर्व श्रुतींचे सार सर्वस्वरूप असे गुह्य ज्ञान' म्हटले आहे. रामगीता ही श्रुतीवर कशी आधारलेली आहे, हे प्रास्ताविकात स्पष्ट केले आहे.

वेदांत म्हणजे वेदाचा अंत्य भाग म्हणजे उपनिषदे. उपनिषदे ही परमात्म्याची चर्चा करतात. म्हणून परमात्मा हा उपनिषदांकडून जाणण्यास योग्य (वेद्य) आहे. (पहा -वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो । गीता १५-१५ असे कृष्ण परमात्मा सांगतो) आणि म्हणूनच उपनिषदांवरून माणसांना परमात्म्याचे ज्ञान होऊ शकते.

आध्यात्मिक जीवनात गुरूवरील निष्ठा/भक्ति आणि ईश्वरावर श्रद्धा हे अत्यंत आवश्यक आहेत. (पहा - यस्य देवे पराभक्तिर्यथा देवे तथा गुरौ । तस्यैते कथिता ह्मर्भाः प्रकाशंते महात्मनः ॥-श्वेताश्वतर उपनिषद, ६. २३).

मुक्तीचे चार प्रकार आहेत - सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. येथे 'मद्‌रूप/परमात्मरूपता' या शब्दाने सरूपता मुक्ति अभिप्रेत दिसते. पण जीवन्मुक्त परमात्म्याशी तादात्म्य पावतो असे मागे म्हटले होते तेही येथे लक्षात घ्यावे. तसे केल्यास सायुज्यता मुक्ति अभिप्रेत आहे असे म्हणता येते.




GO TOP



समाप्त